पुणे, दि.1 : तंत्रज्ञानामध्ये बदल होत असताना नागरिकांनी जागरुकता जपणे आवश्यक आहे. समाज माध्यमांवर कोणताही संदेश पुढे पाठवताना स्वयंनियमन ही आधुनिक काळाची गरज बनली आहे. यामुळे फेक न्यूजवर निर्बंध येण्यास मदत होईल, असे प्रतिपादन सायबर क्राईम तपास विशेषज्ञ संदीप गादिया यांनी आज केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने रानडे इन्स्टीट्यूट कॅम्पस येथील पुणे विद्यापीठाच्या जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात पत्रकारांसाठी आयोजित ‘फेक न्यूज –परिणाम व दक्षता’ या विषयावरील कार्यशाळेत श्री. गादिया बोलत होते. यावेळी सायबर क्राईम तज्ज्ञ विवेक जाधव, माहिती उपसंचालक मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, सहायक प्राध्यापक योगेश बोराटे उपस्थित होते.
श्री. गादिया म्हणाले, इंटरनेटवर अपलोड केलेल्या पोस्टवर आपले नियंत्रण राहत नाही. त्यामुळे इंटरनेट किंवा समाजमाध्यमावर माहिती देताना प्रत्येकाने खबरदारी घ्यायला हवी. आजचे युग समाज माध्यमांचे युग आहे. मात्र समाज माध्यमांचा वापर करत असताना आपण अडचणीत येऊ, अशी कोणतीही कृती करू नये. आज प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटचा वापर अनिवार्य आहे. मात्र मागील काही वर्षांमध्ये सायबर क्राईमचे प्रमाण हे तिपटीने वाढले आहे.
काही विघ्नसंतोषी व्यक्ती समाज माध्यमांवरील माहितीचा गैरवापर करतात. अनेक आतंकवादी कारवाया, गुन्हेगारी षडयंत्र इंटरनेटच्या मदतीने तयार करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. सायबर गुन्हेगार कोणाच्याही नावाचा गैरवापर करण्याची शक्यता आहे. हे टाळायचे असेल तर प्रत्येकाने स्वतःच्या इंटरनेटवरील वागणुकीवर काही बंधने आणणे महत्त्वाचे आहे, अनोळखी व्यक्तींशी संवाद साधू नये, अनोळखी व्यक्तीच्या पोस्टला प्रतिसाद देऊ नये तसेच वैयक्तिक माहिती इंटरनेटवर उघड करू नये, असे आवाहन श्री. गादिया यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे सायबर क्राईमची माहिती दिली. तसेच सायबर क्राईमबाबत उपस्थितांचे शंकानिरसन केले.
सायबर क्राईम तज्ज्ञ विवेक जाधव म्हणाले, मागील काही काळात व्हॉट्सअप, फेसबुक यांसारख्या समाज माध्यमांचा वापर करून अफवा पसरवण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. नागरिकांनी इंटरनेटवरील माहितीची पडताळणी न करता ती पुढे पाठवू नये. विश्वासार्ह नसलेला मजकूर समाज माध्यमांतून पुढे पाठविल्यामुळे त्याचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागले आहेत. हे टाळण्याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
सहायक प्राध्यापक योगेश बोराटे म्हणाले, समाजमाध्यमांवरील मजकूर पाठवण्यामागील उद्देश बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे सर्वांनी स्वतःच शिस्त लावून घ्यावी. विश्वासार्ह पोस्टशिवाय इतर कोणताही मजकूर पुढे पाठवू नये. पत्रकार म्हणूनच नव्हे तर एक सामान्य नागरिक म्हणून आपली ती जबाबदारी आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फेक न्यूज रोखण्यासाठीचा आयोजित केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.
उपसंचालक मोहन राठोड म्हणाले, फेक न्यूज सध्याचा ज्वलंत व महत्त्वाचा विषय आहे. मोबाईल व इंटरनेटचा वापर जबाबदारीने व काळजीपूर्वक करावा. सायबर क्राईमवर आळा घालण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या नेहमी संपर्कात राहावे, अशी सूचना त्यांनी सर्वांनी केली. नागरिकांच्या जागृतीसाठी अशी कार्यशाळा सातत्याने आयोजित करणार असल्याचे श्री. राठोड यांनी सांगितले.
प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी केले. सूत्रसंचालन विशाल कार्लेकर यांनी केले तर आभार माहिती सहायक जयंत कर्पे यांनी मानले. कार्यशाळेस पत्रकार तसेच जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.