Home Blog Page 310

मित्रांनीच व्यावसायिकाचा गोळ्या झाडून केला खून; कारमधून बाहेर फेकून पळाले आरोपी- सीसीटीव्हीत थरार

0

पुणे-बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने संपूर्ण भागात खळबळ उडवली आहे. चारोळीतील अलंकारपुरम 90 फूट रोडवर एका व्यावसायिकाचा त्याच्याच ओळखीतील व्यक्तींनी फॉर्च्युनर कारमध्ये बसवून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घडलेल्या या प्रकरणात आरोपींनी व्यावसायिकाला गोळी घालून ठार केले, त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकला आणि कार घेऊन पसार झाले. सम्पूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून फुटेजमधील थरार पाहून सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर आरोपी कोणत्या दिशेने पळाले, ते कोठे लपले आहेत याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली आहे.

मृत व्यक्तीची ओळख नितीन शंकर गिलबिले (वय 38, रा. वडमुखवाडी, चहोली) अशी झाली आहे. जमीन-खरेदी-विक्रीचा व्यवसाय आणि हॉटेल व्यवसाय करणारे नितीन बुधवारी संध्याकाळी आपल्या दोन मित्रांसह फॉर्च्युनर कारमध्ये बसून बोलत होते. त्याच वेळी वैयक्तिक कारणावरून तिघांमध्ये वाद झाला. सीसीटीव्ही फुटेजनुसार, काही वेळ कारबाहेर चर्चा झाल्यानंतर नितीन पुढच्या सीटवर परत बसले आणि त्याच क्षणी आरोपींपैकी एकाने अचानक त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. नितीनचा जागीच मृत्यू झाला. त्या धक्क्याने निपचित पडलेले नितीन यांचे शरीर आरोपींनी कारमधून बाहेर फेकले. त्यांचे पाय कारच्या दरवाज्यात अडकले असतानाच आरोपींनी ते जोराने ओढून काढले आणि कार पळवली. इतकेच नाही तर कार पळवत असताना वाहन नितीन यांच्या पायावरून चढल्याचेही सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसते.ही घटना समजताच दिघी पोलिस आणि क्राइम ब्रँचची पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली. प्राथमिक तपासात आरोपी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांची नावे समोर आली आहेत. नितीन यांचे भाऊ सचिन गिलबिले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप खूनाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी वैयक्तिक वादातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा माग काढण्यासाठी पाच विशेष पथके तयार केली असून महत्त्वाच्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि संशयितांच्या संपर्कातील लोकांची चौकशी सुरू आहे. पोलिसांना आरोपी लवकर सापडतील याबाबत खात्री असल्याचेही त्यांनी सांगितले.

नितीन गिलबिले हे चारोळी-चहोली परिसरातील ओळखले जाणारे व्यावसायिक होते. त्यांनी गेल्या काही महिन्यांत अलंकारपुरम रस्त्यावर हॉटेल सुरू केले होते तसेच व्यावसायिक गाळे बांधून भाड्याने देण्याचाही व्यवसाय सुरू केला होता. बुधवारी ते खडी मशीन रस्त्यावर काही लोकांशी बोलत थांबले असताना आरोपी कार घेऊन तिथे आले. त्यांनी नितीन यांना कारमध्ये बसवले आणि त्यांच्या हॉटेलच्या दिशेने निघाले. काही मिनिटांतच कारमध्ये वाद वाढला आणि परिस्थिती थेट खूनापर्यंत पोहोचली. आरोपींनी गोळीबार करून नितीन यांचा खून केल्यानंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला एका मोकळ्या जागेत टाकला आणि कार वेगाने पिंपरी-चिंचवडच्या दिशेने घेऊन पळ काढला.

शेवाळवाडीत बिबट्याचा शोध जारी …?

पुणे – सोलापूर रस्त्यावरील शेवाळेवाडी गावातील भवरावस्ती या ठिकाणी काल दुपारी दीडच्या सुमारास बिबट्या रस्ता ओलांडत असताना स्थानिक तरुणांना दिसला आणि त्याची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्यातील अधिकारी संजय मोगले , पुणे वनपाल शितल खेंडके, मांजरीचे पीएसआय महेश कवळे, विजयकुमार ढाकणे व त्यांचा सर्व स्टाफ तसेच वनरक्षक प्रिया अकेन यांनी द्राक्ष बागायतदार संघाच्या परिसरातील भवरा वस्ती या ठिकाणी , बिबट्याचा वावर असणाऱ्या या परिसरात पाहणी करून त्याचे ठसे मिळविल्याची माहिती भाजपचे स्थानिक कार्यकर्ते राहुल रामचंद्र शेवाळे यांनी येथे दिली

ते म्हणाले,’ बिबट्या या परिसरात असल्याची शक्यता निर्माण झाली आहे , मात्र लोकांनी घाबरून न जाता दक्षता घ्यावी ,खबरदारी म्हणून तातडीने कॅमेरे लावून आवश्यकता भासल्यास पिंजरा लावण्याची मागणी आम्ही यावेळी वनाधिकाऱ्यांच्याकडे केली आहे , हा बिबट्या आता द्राक्ष बागातदार संघाच्या परिसरात असल्याची खात्रीलायक माहिती तेथील महिला कामगारांनी दिली, तसेच काल रात्री अकरा वाजता हिंगणे वस्ती या ठिकाणीही काही महिलांनी हाच बिबट्या पाहिला होता, या निमित्ताने परिसरातील सर्व नागरिकांनी खबरदारी घेणे खूप महत्त्वाचे आहे ,शक्यतो रात्री कुणीही बाहेर पडू नये असे आवाहन वन अधिकारी व पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे, बिबट्याच्या पुन्हा काही हालचाली दिसल्यास त्वरित 9881649090, 9371191 757 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

आम्हाला परिसरात कुठलेही ठसे मिळाले नाहीत. नागरिकांच्या सांगण्यावरून माहिती घेतली जात आहे. आजही परिसरात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाहणी केली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. अफवांवर विश्वास ठेवू नये.’ :सुरेश वरक, वनपरिक्षेत्र अधिकारी

२० ते २५ वाहनांना धडक, ८ जणांचा मृत्यू ,२० जण जखमी

वाचवा वाचवा! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना; कार पूर्णपणे जळून खाक, आत 4-5 जण, पुण्यात भीषण अपघात
प्रत्य्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही वाहनं एकाच दिशेने भरधाव वेगाने जात होती. त्यावेळी एका कंटेनरनं अचानक ब्रेक लावला. त्यावेळी कंटेनरच्या मागे एक कार होती. कंटेनरनं अचानक ब्रेक मारताच मागे असलेली कार कंटेनरला जाऊन धडकली. त्यानंतर कारच्या मागे असलेल्या कंटेनरनं कारला मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर काही क्षणातच दोन्ही कंटेनरना आग लागली.अपघातानंतर मोठा आवाज झाला. त्यानंतर आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. एका प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज ऐकून आम्ही अपघातस्थळी धावलो. आम्ही पोहोचलो तेव्हा कारला आग लागलेली होती. ट्रकमध्ये अडकलेला एक जण मदतीसाठी आरडाओरडा करत होता. बहुधा तो क्लिनर होता. बाहेर काढा, बाहेर काढा असं तो मोठमोठ्यानं ओरडत होता. पण आगीची तीव्रता पाहता स्फोट होण्याची भीती होती. कधीही स्फोट होईल असं वाटत होतं. त्यामुळे मदतीसाठी कोणीच पुढे गेलं नाही.दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार, गाडीचा ब्रेक फेल झाला होता. त्यानं पुढील कंटेनरला धडक दिली. दोन कंटेनरच्या मध्ये एक फॅमिली कार होती. त्यात चार ते पाच जण होते. ती कार पूर्णपणे जळून खाक झाली. ट्रकला आग लागली. कंटेनरचा चालक आणि बाकीचे आतच राहिले. त्यांना बाहेर पडता आलं नाही. ते सगळे आतच जळून खाक झाले.

पुणे: पुण्यातील नवले पूल परिसरात मोठा अपघात झाला आहे. ब्रेक फेल झालेल्या कंटेनरनं २० ते २५ वाहनांना धडक दिली. हा कंटेनर धडका देत भरधाव वेगात निघाला होता. त्याच्यापुढे एक कंटेनर होता. त्या कंटेनरला धडक देण्याआधी ब्रेक फेल झालेल्या कंटेनरनं एका कारला धडक दिली. लहान कार दोन कंटेनरच्या मधोमध अडकली. या कारचा चक्काचूर झाला. सीएनजीवर चालत असलेल्या कारनं पेट घेतला. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. यातील काही जणांनी प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

पुण्यातील नवले पूल परिसरात आज संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेला निघालेल्या कंटेनरनं अनेक वाहनांना धडक दिली. हा कंटेनर मंद उतारावरुन खाली येत होता. जवळपास २० ते २५ वाहनांना धडक देत तो पुढे गेला. त्यानंतर या कंटेनरनं एका फॅमिली कारला धडक दिली. कंटेनरची धडक बसल्यावर कार अचानक पुढे गेली. कारच्या पुढे दुसरा कंटेनर होता. दोन कंटेनरच्या मध्ये कार अडकली. कारमध्ये सीएनजीचा सिलिंडर होता. दोन कंटेनरच्या मधोमध अडकल्यानं कारचा चेंदामेंदा झाला. सिलिंडरचा स्फोट होताच आग लागली. त्यामुळे मागील कंटेनरदेखील पेटलाकंटेनरमधून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून कारमधून दोन महिला आणि एका मुलीचा मृतदेह काढण्यात यश आलं आहे. आणखी मृतदेह हाती लागण्याची शक्यता आहे. या अपघातात २० जण जखमी झाले आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.डीसीपी संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान पासिंगचा एक कंटेनर साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेनं जात होता. नवले पुलावर सेल्फी पॉईंट असलेल्या भागात या ट्रकचा ब्रेक फेल झाला असण्याची शक्यता आहे. कारण उतारावर मोठ्या प्रमाणावर लहान लहान आकारचे गतीरोधक आहेत. त्यामुळे कंटेनरचा ब्रेक फेल झाला असण्याची शक्यता आहे. ब्रेक फेल झाल्यानं कंटेनरनं अनेक वाहनांना धडक दिली असावी.डीसीपी संभाजी कदम यांनी सध्या तरी घातापाताची शक्यता फेटाळली आहे. ‘वाहनांमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्याला सध्या प्राधान्य आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केलं जात आहे. मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. वाहनांना लागलेली आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. दोन मोठ्या वाहनांना हटवण्यासाठी क्रेन आणल्या गेल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत. या अपघातामागील कारणांचा तपास नंतर केला जाईल,’ अशी माहिती डीसीपी कदम यांनी दिली.

प्राथमिक माहिती…

सायंकाळी ०५•४० वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात नवले पुलावर अपघात होऊन तीन वाहनांनी पेट घेतला आहे अशी वर्दि आली. त्याचवेळी तात्काळ सिंहगड, नवले, काञज, एरंडवणा टँकर, मुख्यालयातील रेस्क्यु व्हॅन तसेच पीएमआरडीए येथील एक रेस्क्यु व्हॅन व दोन फायरगाडी अशा एकूण 8 अग्निशमन वाहने रवाना झाली होती. घटनास्थळी पोहचताच पाहिले की, दोन कंटेनर व त्यामध्ये चारचाकी वाहन अडकून त्याने ही मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. जवानांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. परंतू, दुर्देवाने या घटनेत कंटेनर मधून दोन पुरुष व कारमधून दोन पुरुष दोन महिला व एक मुलगी असे एकूण 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.उपस्थित नागरिकांकडून समजले की, एका मोठ्या कंटेनरने आग लागण्याआधी मागे बर्‍याच वाहनांना धडक दिली होती आणि त्यामध्ये ही अनेक जण जखमी झाले आहेत.याठिकाणी अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासह चार अधिकारी व जवळपास चाळीस जवान कार्यरत होते.

१ किलो सोने चोरून पळालेल्या भामट्याला पोलिसांनी पकडले,सर्व सोनेही केले हस्तगत.

पुणे- एक किलो सोने चोरी करुन, पोलीसांना गुंगारा देणा-या भामट्याला शिताफिने पकडुन,त्याच्याकडून एकुण १ कोटी २७ लाख रुपयांचे सुमारे एक किलो सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे.
दिनांक १६/१०/२०२५ प्रिसियस रिफायनरी, ७७६ बुधवार पेठ पुणे येथील दुकानात कामाला असलेल्या कामगाराने दुकानातील लॉकरमध्ये ठेवलेले १०० ग्रॅम वजनाचे, १० नग सोन्याचे बिस्कीट (एक किलो शुध्द सोने) लॉकरमधुन चोरी केल्याबाबत फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. १९८/२०२५ भा.न्या.सं.क. ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
दाखल गुन्हयाचे गांर्भीर्य लक्षात घेता पोलीस उप-आयुक्त कृषिकेश रावले यांनी फरासखाना प्रभारी अधिकारी उत्तम नामवाडे यांना आदेशीत करुन, तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे व पोलीस अंमलदार यांची टीम तयार करुने यातील कामगार आरोपी प्रथमेश गणेश मंडले वय १८ वर्षे, रा. पाचेगांव बुग्रा. ता. सांगलो, जिल्हा. सोलापुर यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, त्याने त्याचा मोबाईल क्रमांक बंद करुन ठेवल्यामुळे, तो त्याचे अस्तीत्व तसेच राहण्याचे ठिकाण वारंवार बदलुन, सातारा, सांगली, सोलापुर, कोल्हापुर, विजापुर कनार्टक राज्य, आंध्रप्रदेश येथील विजयवाडा याभागात त्याचा पाठलाग करुन, अखेर त्यास जत जिल्हा सांगली येथुन ताब्यात घेवुन, त्यास दाखल गुन्हयात दि.२९/१०/२०२५ रोजी अटक करण्यात आली. त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने वेग-वेगळ्या ठिकाणी लपवुन ठेवलेले सोने तसेच काही सोने कोल्हापुर येथील कारागीर शकील बशीर मोमीन वय ४५ वर्षे, रा. ८४० लाईन बाजार, छावा गल्ली, कोल्हापुर यास विक्री केले होते. त्या कारागीरास देखील दाखल गुन्हयात दि.१०/११/२०२५ रोजी अटक करुन एकुण १,२७,००,०००/- रु. किंमतीचे सर्व एक किलो वजनाचे सोने हस्तगत करण्यात फरासखाना पोलीस स्टेशन येथील तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांना यश आले आहे. पुढील तपास अरविंद शिंदे, पोलीस उप-निरीक्षक हे करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व व पश्चिम प्रादेशीक विभाग मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परि-१ कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक (अति. कार्य.) उत्तम नामवाडे यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उप-निरीक्षक अरविद शिदे, पोलीस अंमलदार कुष्णा निढाळकर, महेबुब मोकाशी, नितीन तेलंगे, गजानन सोनुने, नितीन जाधव, चेतन होळकर, अर्जुन कुडाळकर, तानाजी नांगरे, महेश राठोड, प्रविण पासलकर, विशाल शिंदे, महेश पवार, शशीकांत ननावरे, सुमित खुट्टे, प्रशांत पालांडे व मनिषा पुकाळे यांनी केलेली आहे.

कात्रजमध्ये अफू विकणाऱ्या देवीलालला पकडले

पुणे- पुणे पोलिसांनी कात्रज मध्ये अफू विकणाऱ्या देवीलाल ला अखेरीस बेड्या घातल्या असून त्याच्याकडून ३,३०,७२०/- रु. किं. चे अफिम जप्त केले आहे . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक १२/११/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना बातमी मिळाली की, दळवीनगर, कात्रज आंबेगाव पुणे येथे सार्वजनिक रोडवर एक इसम अफिम सारख्या अंमली पदार्थाची विक्री करीत आहे.
मिळालेल्या गोपनिय बातमीचे अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ व अंमलदार यांनी गोल्विग स्टार ब्युटी पार्लर दुकानासमोरील दळवीनगर, आंबेगाव येथील सार्वजनिक रोडवर छापा कारवाई करुन देविलाल शंकरलाल आहिर वय ४३ वर्ष रा. पहिला मजला ग्रीन अॅलीव्हीम बिल्डिंग, दळवीनगर, कात्रज पुणे यांस ताब्यात घेतले. त्याचेकडे ३,३०,७२०/-रु.किं.चा १६५.३६ ग्रॅम अफिम हा अंमली पदार्थ मिळून आला असता तो जप्त करण्यात आला आहे.
या बाबत आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे येथे गु.र.नं. २९८/२०२५ एनडी पी एस अॅक्ट ८ क १७ ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून देवीलाल याला या गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त गुन्हे निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहा. पोलीस निरीक्षक रसाळ, सहा. पोलीस निरीक्षक कवठेकर, पोलीस अंमलदार जाधव, मोकाशी, टकले, पवार, राख, सरगर, कुंभार, मांढरे, नेवसे, ताम्हाणे, थोरात, दळवी, आबनावे शेख, तांबोळी व वगारे यांनी केली आहे.

बाजीराव रस्त्यावरील जुगार अड्डयावर छापा: ९ जण पकडले

पुणे- बाजीराव रस्त्यावर फुटक्या बुरुजा जवळील फ्लॅट मध्ये गेली काही वर्षे सुरु असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली आहे.
विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, श्रीपाद चेंबर्स कमर्शियल प्रिमायसेस, को. हौसिंग सोसायटी, पहिला मजला प्लॅट ०३, बाजीराव रोड फुटका बुरुज चे समोर बंद सदनिका मध्ये मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा चालू असल्याची माहिती पोलीस अंमलदार सचिन कदम यांना मिळाली असता त्यांनी हीबातमी तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांना सांगितली. त्यांनी ही बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप कसबे यांना सांगितली असता त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे शहर यांची पुर्व परवानगी घेवुन या ठिकाणी जावुन कारवाई करण्याबाबतचे तोंडी आदेश सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांना दिले. त्यांनी या आदेशान्वये स्टाफसह या ठिकाणी जावुन बातमीच्या अनुषंगाने खातरजमा केली असता सदर ठिकाणी एकुण ०९ इसम हे पत्याचे पानाने पैसे लावून हार जितीचा रम्मी हा जुगार खेळ खेळत असताना मिळुन आले.
सदर ठिकाणी सदरचे इसम हे जुगाराचे साहित्यासह मिळुन आल्याने त्यांच्याविरुध्द विश्रामबाग पोलीस स्टेशन गु.र.नं. ३०३/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४,५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन एकुण २,०९,१००/-रु.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार सचिन कदम विश्रामबाग पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०१ कृषिकेश रावले, सहा. पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस स्टेशन प्रदिप कसबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), अरुण घोडके यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, आशिष खरात, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, अर्जुन थोरात, नितीन बाबर व सागर मोरे यांनी केलेली आहे.

दोरास्वामी नामक WANTED गुन्हेगारास शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून पकडले

पुणे-दोरास्वामी नामक प्राणघातक हल्ल्यामधील WANTED गुन्हेगारास शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ दिनांक १३/११/२०२५ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत वरिष्ठांच्या आदेशा अन्वये गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत मनपा बस स्टॉप भागात पेट्रोलिंग करत असताना फौजदार अजित बडे, पोलीस हवालदार १७२८ चव्हाण, पोलीस नाईक २२९७ जाधव, पोलीस शिपाई १०१२८ सांगवे, १०३६९ तायडे हे शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील मनपा बस स्टॉप येथे जमले असताना पोलीस नाईक २२९७ जाधव व पोलीस शिपाई १०१२८ सांगवे यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर १७३/२०२५आर्म अॅक्ट कलम ४(२५), मपोका. कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील तसेच खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ३२३/२०२५ बी. एन. एस. कलक १०९,३५१(३), ३ (५), आर्म अॅक्ट कलम ४ (२५), मपोका. कलम ३७(१) सह १३५ मधील WANTEDआरोपी अभिषेक गणेश दोरास्वामी हा त्याच्या राहेत घराजवळ आलेला आहे. तेव्हा मिळालेली बातमी आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना कळवली असता त्यांनी सुचना देवून बातमीची खात्री करुन कायदेशिर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने वर संबधित पोलीस टीम यांनी आरोपीच्या राहते घराजवळ जाऊन सापळा रचून त्यास जागीच पोलीस स्टाफच्या मदतीने पकडले. त्याचे नाव अभिषेक गणेश दोरास्वामीवय १९ वर्ष रा. प्लॉट नंबर ११, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ, शिवाजीनगर पुणे असे आहे . त्याच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने दाखल गुन्हा केला असल्याची कबुली दिली .
हि कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील (अति. कार्यभार सह पोलीस आयुक्त), अपर पोलीस आयुक्त पुर्व व पश्चिम प्रादेशीक विभाग मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त कृषिकेश रावले, सहा. पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोउपनि. अजित बडे, पोहवा. दिपक चव्हाण, पोहवा. राजकिरण पवार, पोना. सचिन जाधव, पोशि. सुदाम तायडे, पोशि. श्रीकृष्णा सांगवे यांनी केली आहे.

नवी दिल्लीतील राष्ट्रीय ऊर्जा परिषदेत महावितरणचा पाच पुरस्कारांनी गौरव  

0

मुंबई, दि. १३ नोव्हेंबर २०२५: इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित १९ व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेत विविध वर्गवारीमध्ये उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत बुधवारी (दि. १२) महावितरणला पाच पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यामध्ये हरित ऊर्जा आणि कार्यक्षमता व ग्राहक सेवेची परिणामकता यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रथम स्थान मिळाले आहे.

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे नवी दिल्ली येथे दोन दिवसीय राष्ट्रीय ऊर्जा परिषद उत्साहात झाली. महावितरणने हरित ऊर्जा, तंत्रज्ञान स्वीकार आणि ग्राहक सेवेसह वीज क्षेत्रातील विविध उद्दिष्टांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. त्याची दखल घेत या परिषदेत महावितरणला हरित ऊर्जेतील प्रगती (Green Energy) तसेच नाविन्यासह परिणामकता (Innovation with Impact – Large DISCOM) वर्गवारीत देशात प्रथम स्थान मिळवले आहे. तर सेवांची गुणवत्ता आणि ग्राहक सक्षमीकरण (Quality of Services and Customer Empowerment), तंत्रज्ञानाचा स्वीकार (Technology Adoption), नावीन्यासह परिणामकता – सामान्य (Innovation with Impact – General) या वर्गवारीमध्ये राष्ट्रीय स्तरावर तिसरे स्थान मिळाले आहे. महावितरणच्या वतीने अधीक्षक अभियंता सौ. किरण नागावकर व सौ. सलोनी वाकोडे, कार्यकारी अभियंता श्री. नीलम गांगुर्डे यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

अपर मुख्य सचिव (ऊर्जा) सौ. आभा शुक्ला यांनी राज्याच्या वीज क्षेत्रासाठी रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅन तयार केला आहे. या नियोजनाद्वारे अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांमध्ये अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात प्राधान्य दरांवर दीर्घकालिन वीज खरेदी करार (पीपीए) केले आहेत. यात प्रामुख्याने हरित ऊर्जेचे करार आहेत. येत्या २०३० मध्ये राज्याचा हरित ऊर्जा वापर सध्याच्या १३ टक्क्यांवरून ५२ टक्के होणार आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणासोबतच वीजखरेदी खर्चात देखील ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे.

सद्यस्थितीत छतावरील सौर ऊर्जानिर्मितीमध्ये ३२०४ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी २७७३ मेगावॅट क्षमतेचे ५१२ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून ६ लाख २५ हजारांवर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. यासह देशात सर्वाधिक ६ लाख ४७ हजारांवर सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले असून २१ लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे.

राज्यातील ३ कोटी १६ लाखांवर वीजग्राहकांना सेवा देताना सर्वच बाबतीत महावितरणने नाविन्यासह परिणामतेत वाढ केली आहे. वसूली व बिलिंग कार्यक्षमतेत वाढ तसेच पायाभूत यंत्रणेचे सक्षमीकरण आदींची दखल घेण्यात आली आहे. विजेच्या मागणीचा अचूक अंदाज घेण्यासाठी एआयचा वापर सुरू करण्यात आला आहे. यासह इतर विविध कामगिरीची दखल घेत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेत महावितरणला पाच पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

पुण्याच्या नवले पुलावर भीषण अपघात:दोन ट्रकला आग, दोघांमध्ये कार अडकली

५ जणांचा मृत्यू

पुणे-येथील नवले पुलावर भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रकला आग लागली असून या दोन्ही ट्रकच्या मध्ये एक कार अडकली असून यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन ट्रक एकमेकांना धडकले होते आणि त्यात एक कार अडकली होती, अशी माहिती समोर आली आहे.

साताराच्या दिशेने पुण्याकडे येणाऱ्या दोन्ही ट्रकचा अपघात झाला आणि यात एक कार अडकली होती. यावेळी दोन्ही ट्रकला आग लागली असून यात मृतांची संख्या देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या अपघातामुळे नवले ब्रिजवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अग्निशमन दलाकडून ट्रकला लागलेल्या आग विझवण्याचे प्रयत्न करत असून यावेळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नवले पुलावर अनेक अपघात होत असतात, परंतु हा अपघात सर्वात मोठा असल्याचे बोलले जात आहे. दोन ट्रकचा अपघात झाला असून यात मागच्या ट्रकचा चालक अद्यापही ट्रकमध्येच अडकला असल्याचे दिसून येत आहे. तर सध्या या अपघातात अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. चारचाकी जी या दोन्ही ट्रकच्या मध्ये अडकली होती, या कारमधील प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका ट्रकचा ब्रेक फेल झालेला होता आणि त्या ट्रकने पुढच्या ट्रकला धडक दिली. मध्ये एक कार होती, त्यात 4-5 लोक होती, ती संपूर्णपणे जळून खाक झाली आहेत. ट्रक चालक देखील ट्रकमध्येच अडकली असून त्यांना देखील आगीमुळे उतरता आले नाही. त्यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. तसेच मागे एक ट्रॅव्हलर होती, त्याला सुद्धा धडक देण्यात आली, त्यात 17-18 लोक होती. जवळपास 20-25 लोक जखमी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा खऱ्या ओबीसींनाच मिळाव्यात

कुणबी प्रमाणपत्रावर आधारित उमेदवार दिल्यास संघर्षाचा इशारा

पुणे:

पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत इतर मागास प्रवर्गातील राखीव जागांवर खऱ्या ओबीसींना उमेदवारी मिळावी. कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारी दिली गेल्यास ओबीसी बहुजन महासंघ सर्वच जागांवर उमेदवार उभे केले जातील, असा इशारा ओबीसी बहुजन महासंघाचे बाळासाहेब झोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ओबीसी बहुजन महसंघाचे भानुदास पानसरे, किसन नांगरे, चंदाताई केदारी, आनंद रोकडे, राजेंद्रभाऊ नांगरे, विशाल शेळके, महादेव मरगळे, भाऊसाहेब मरगळे, अशोक कांबळे, भाऊसाहेब आखाडे, कृष्णा पानसरे आदी उपस्थित होते.

मुळशी तालुक्यात पंचायत समितीच्या नऊ जागांपैकी इतर मागास प्रवर्गासाठी ३ तर अनुसूचित जातीसाठी १ जागेवर आरक्षण मिळाले आहे. या जागांवर केवळ खऱ्या ओबीसींचाच हक्क आहे. त्यामुळे या जागांवर खऱ्या ओबीसी उमेदवारांनाच संधी मिळावी, अशी आग्रही मागणी ओबीसी बहुजन महासंघाने सर्वच राजकीय पक्षांना केली आहे.

ओबीसींच्या हक्काच्या जागांवर कुणबी प्रमाणपत्र मिळविल्या उमेदवारांना उभे केल्यास ओबीसी बहुजन महासंघ आरक्षित जागाच नव्हे तर सर्वच ९ जागांवर निवडणूक लढविण्याचा इशारा महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. केवळ निवडणूक जिंकणे, हरणे एवढ्यापुरता हा प्रश्न नाही तर ओबीसी, बहुजन समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. उद्या आमचे ग्रामपंचायत सदस्य पदावरही ओबीसी बहुजन दिसणार नाही. गावगाड्यातून आम्हाला नाहीसे करण्याचा हा प्रयत्न आहे, अशा तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

गुरुवारी ओबीसी महासंघाच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन

आपल्या भावना सर्वच राजकीय पक्षांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आणि ओबीसी बहुजन आणि रिपब्लिकन समाजाची एकजूट दाखविण्यासाठी गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी मुळशी तालुका ओबीसी बहुजन महासंघाच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्याला ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, मंगेश ससाणे, रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही : हर्षवर्धन सपकाळ

नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांवर शिक्कामोर्तब, राजकीय मंडळाच्या बैठकीत निर्णय.

आगामी काळात काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा ओघ वाढणार, सत्ताधारी पक्षातील अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक.

मुंबई, दि. १३ नोव्हेंबर २०२५

राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारमध्ये अंतर्गत वाद पराकोटीला गेले आहेत पण सत्तेसाठी हे सर्वजण एकत्र आहेत. सत्तेसाठी काहीही व वाट्टेल ते अशी त्यांची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेसाठी लाचार आहेत त्यामुळे सत्ता सोडून ते राहू शकत नसल्यानेच ते सत्तेतून बाहेर पडणार नाहीत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

टिळक भवन येथे काँग्रेसच्या राज्य निवडणूक मंडळाची दोन दिवसांची बैठक पार पडली. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, सहप्रभारी बी. एम. संदीप, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, वजाहत मिर्झा,प्रदेश सरचिटणीस संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, सचिन नाईक आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्य निवडणूक मंडळाच्या दोन दिवस चाललेल्या या बैठकीत नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय समिकरणं वेगळी आहेत. स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांशी चर्चा करून आघाडी करण्यात आली आहे. काही जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी, शेकाप, शेतकरी संघटना, रासप यांच्याशी आघाडी झालेली आहे. मनेसशी आघाडी करण्यासंदर्भात कोणत्याच जिल्ह्यातून प्रस्ताव आलेला नाही, असे सपकाळ यांनी सांगितले.

भाजपा पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश..
चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप आमदार बंटी भागडिया यांचे कट्टर समर्थक आणि भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री जुनेद खान यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

महायुतीमध्ये फसवणूक झाल्याची भावना तीनही पक्षातील असंख्य पदाधिकाऱ्यांच्या मनात वाढीस लागलेली आहे. आगामी काळात सत्ताधारी पक्षातील अनेक महत्वाचे नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असे हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले..

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भूसारी यांचे काल अपघातात दुःखद निधन झाले. आजच्या राज्य निवड मंडळ बैठकीच्या सुरूवातीला सर्वांनी मौन राहून त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

चांदणी चौक ते बावधन रस्ता पूर्ण रुंदीने विकसित करून उतार कमी करण्याचे ओमप्रकाश दिवटेंचे आदेश

पुणे- शहर वाहतूक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने चांदणी चौक ते बावधन (सर्वे नंबर २०, गल्ली नंबर १, बावधन खुर्द) येथील तीव्र उताराच्या रस्त्याचे रुंदीकरण करून उतार कमी करण्याचे आदेश आज येथे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिले या रस्त्या बाबत आज दि. १३/११/२०२५ रोजी जागा पाहणी झाली.यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष)ओमप्रकाश दिवटे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग अभिजित आंबेकर, उप अभियंता, पथ विभाग सुनील भोंगळे उपस्थित होते.
वाहतूक सुधारणा करण्याचे अनुषंगाने दिवटे यांनी चर्चा करून निर्देश दिले .हा रस्ता पूर्ण रुंदीने विकसित करून त्याचा उतार काही प्रमाणात कमी करण्याच्या अतिरिक्त आयुक्त यांनी सूचना दिल्या.या रस्त्याला काटकोनात जोडल्या जाणाऱ्या अन्य रस्त्याचे स्टेटस, ताबा इत्यादी बाबी संबंधित खात्याकडून तपासणी करून घ्या आणि रस्त्यासाठी उर्वरित जागांचा ताबा मिळाल्यास आवश्यक त्या सुधारणा करून वाहतुकीमधील अपघात प्रवणता कमी करा असेही यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.
हा रस्ता विकसित केल्यास नवीन लिंक रोड तयार होऊन सदरच्या परिसरातील नागरिकांना हायवेपर्यंत जाणे सुरक्षित व सोयीस्कर होईल या दृष्टिकोनातून पथ विभागाने पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

जप्त वाहनांचा १८ नोव्हेंबर रोजी जाहिर ई-लिलाव

पुणे, दि. १३:प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या वायुवेग पथकाद्वारे मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांमध्ये अटकावून ठेवलेली, मोटार वाहन कर न भरलेली तसेच हक्क सांगून सोडवून न घेतलेली एकूण २९ वाहने www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहिर ई-लिलावाद्वारे विक्रीस ठेवण्यात आली आहेत.

वाहने “जशी आहेत तशी” या तत्वावर विकली जाणार असून, सदर ई-लिलाव रद्द अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, पुणे यांच्याकडे राखीव आहेत. ही वाहने वाघोली वाघेश्वर वाहनतळ आवारात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत पाहणीकरिता उपलब्ध आहेत.

वाहन मालक, चालक, वित्तदाते किंवा ज्या कोणाचे हितसंबंध आहेत त्यांनी लिलावाच्या तारखेपूर्वी महसूल भरून किंवा हक्क सांगून वाहने सोडवून घेता येतील. लिलावानंतर कोणतीही हरकत ग्राह्य धरली जाणार नाही, असेही आवाहन कराधान प्राधिकारी तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण केंद्राची स्थापना

पुणे, दि. 13 नोव्हेंबर : जिल्ह्यातील १४ नगरपरिषद व ३ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय येथे तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आला आहे.

निवडणुकीच्या तक्रार निवारणबाबत केंद्राचा ०२०-२६०६१७०५ दूरध्वनी क्रमांक आहे. संबंधितांनी या क्रमांकावर संपर्क साधून निवडणुकीसंदर्भातील आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन नगरपालिका प्रशासन शाखेच्या प्र. जिल्हा सह आयुक्त ॲलिस पोरे यांनी केले आहे.
000

दिव्यांग कल्याण क्षेत्रात कामकरणाऱ्या संस्थांनी नोंदणी करणे अनिवार्य : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. 13 नोव्हेंबर: दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ४९-५३ नुसार दिव्यांगांच्या कल्याण पुनर्वसन आणि सक्षमीकरण क्षेत्रात काम करणा-या नागरी समाज संघटना/ संस्थांची नोंदणी अनिवार्य आहे. यासाठी आयुक्त, दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात करण्यात आलेले असल्याचे जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय समिती दिव्यांग यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

शासन निर्णय दि.१७ ऑक्टोंबर २०२५ नुसार कोणतीही व्यक्ती अथवा नागरी समाज संघटना, संख्या दिव्यांग क्षेत्रात वैध नोंदणी शिवाय कार्य करू शकत नाही. जिल्हयातील ज्या व्यक्ती,संस्था,संघटना यांना दिव्यांग क्षेत्रात कार्य करावयाचे आहे. त्यांनी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत आयुक्त दिव्यांग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे नोंदणी करावी व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असेही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कळविले आहे.

आयुक्त, दिव्यांग कल्याण यांचेकडे नोंदणी नसलेल्या संस्था, व्यक्ती दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असल्याचे दिसून आल्यास संबंधिताविरुदध दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ९१ नुसार व इतर अनुषंगिक कायद्यानुसार कारवाईस पात्र असतील.

अधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे येथे संपर्क साधावा.