मार्टीन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला यांच्या तैलचित्रांचे अनावरण !
पुणे शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या ११ मनोरुग्णांची “श्रद्धा” मध्ये रवानगी
पुणे: यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ भरत वाटवानी यांच्या कर्जत येथील “श्रद्धा” पुनर्वसन केंद्राच्या सहकार्याने पुणे येथील कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आज पुणे शहरामध्ये मानसिक आरोग्यासंबंधी जनजागृती रॅलीसह विविध उपक्रम उपक्रमांनी मानसिक आरोग्य दिवस साजरा केला.
पुणे येथील कर्वे समाज सेवा संस्था व कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या वतीने दरवर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येते. यावर्षी कर्वे संस्थेचे समुपदेशन विभागाचे विद्यार्थी व श्रद्धाच्या समाजकार्यकर्त्यानी पुणे शहरातील विविध भागांमधील रस्त्यांवर उतरून प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन मानसिक आरोग्यासंबंधी जनजागृतीपर माहिती पुस्तिकांचे वितरण करीत मानसिक आरोग्य व उपचारासंबंधी चर्चा केली. त्यानंतर ससून सर्वोपचार रुग्णालय ते अपंग कल्याण आयुक्तालय परिसरामध्ये जनजागृतीपर रॅली काढली तसेच शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या निराधार ११ (८ पुरुष व ३ महिला) मनोरुग्णांना उचलून त्यांच्या पुढील उपचार व पुनर्वसनासाठी श्रद्धा च्या कर्जत येथील पुनर्वसन केंद्रामध्ये रवानगी करण्यात आली.
श्रद्धा चे संस्थापक रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ भरत वाटवानी व कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रा. चेतन दिवाण, संचालक डॉ दीपक वलोकर, मानद संचालक डॉ महेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या मानसिक आरोग्य सप्ताहाच्या विविध उपक्रमाना नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे प्रा. चेतन दिवाण यांनी सांगितले.
यावर्षीच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे ब्रीद वाक्य हे “बदलत्या जगामधील तरुण आणि मानसिक आरोग्य”
असे असून यासंबंधी कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये नुकतीच एकदिवसीय परिषद देखील घेण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित समाजातील तरुणांना एक प्रेरणादायी संदेश मिळावा यासाठी ७ वर्षाच्या प्रसन्ना या चिमुकलीने स्वतःच्या हातात पोस्टर घेऊन आजच्या जनजागृती रॅलीसह दिवसभर घेण्यात आलेल्या जनजागृतीपर उपक्रमांमध्ये सहभागी होऊन भर उन्हामध्ये जोरजोरात घोषणाबाजी करीत उपस्थितांची मने जिंकली.
श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या सचिन म्हसे, शैलेश शर्मा, सुरेखा राठी, गणेश रणदिवे तसेच कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशिका वृषाली दिवाण, ग्रंथपाल प्रकाश पवार, संजीवनी मुंढे, शर्मिला सय्यद, पद्मजा शिंदे, अरुंधती कुलकर्णी, वैशाली मेत्रानी, मेधा पुजारी, कुणाल बानुबाकवडे आदींनी रस्त्यावरील मनोरुग्णांना उचलून “श्रद्धा” मध्ये पुढील उपचार व पुनर्वसनास पाठविण्यासाठी परिश्रम घेतले.
येरवडा तुरुंगातील कैद्यांसमोर मुनीश्री पुलकसागरांचे संस्कार प्रवचन
पुणे-
तुरुंग हा कारागृह नसून सुधारगृह आहे. आपण येथे कैदी आहात मात्र जर यापूर्वीच आपली भेट झाली असती तर
आपल्याला तुरुंगवास घडला नसता कारण ,सत्संगाचा विचार आपल्या मनात रूजला असता.असे उद्गार दिगंबर जैन
मुनीश्री प.पू १०८ पुलकसागरजी महाराज यांनी आज येरवडा कारागृहात काढले .पुण्यातील येरवडा कारागृहात सुमारे
४५० कैद्यांसमोर त्यांचे तासभर प्रवचन झाले त्यात ते बोलत होते . यापूर्वी देखील मुनीश्रींनी तिहारपासून देशातील
१९ तुरुंगांमध्ये जाऊन कैद्यांसमोर सत्संगाची प्रवचने केली आहेत.येरवडा येथील आशियातील सर्वात मोठ्या
तुरुंगातील त्यांचे प्रवचन हे तुरुंगातील २० वे प्रवचन होते.
मुनीश्रींच्या पुण्यातील चातुर्मासाचे संयोजन करणाऱ्या सकल जैन वर्षायोग समितीचे उपाध्यक्ष चकोर गांधी यांनी
प्रास्ताविक करून मुनिश्रींची माहिती सर्व कैद्यांना दिली .त्यानंतर झालेल्या प्रवचनात मुनीश्री पुढे म्हणाले की ,
आपण तुरुंगात जरी कैदी असलात तरी त्याची खरी शिक्षा आपल्या कुटुंबियांनाच होत असते, मात्र आता जेवढे दिवस
तुरुंगात राहाल तेवढे अधिक चांगले होण्याचा विचार मनात सदैव बाळगा. कोणत्यातरी घटनेमुळे आपणास शिक्षा
झालेली असते व तुरुंगवास घडलेला असतो. मात्र आता आपले भावी आयुष्य चांगले घडवण्यासाठी चांगला विचार
करा आणि आनंदी राहा असा उपदेश त्यांनी कैद्यांना दिला .
मुनिश्रींच्या प्रवचनावेळी कैद्यांच्या मनावरील ताण कमी होताना दिसला " आपण सारे कैदी आहात ,काही काळाने
आपण तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेरही याल मात्र आपल्यावर देखरेख करणारे सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी हे
मात्र येथेच तुरुंगात राहणार " असे त्यांनी मिश्कीलपणे सांगताच सर्वत्र हशा पिकला .त्यामध्ये कैद्यांबरोबरच पोलिस
अधिकारीही सामील झाले.मुनिश्रींचे हे प्रवचन ४५० कैद्यांनी प्रत्यक्ष हॉलमध्ये बसून ऐकले तसेच तुरुंगातील सर्वत्र
असणाऱ्या स्पीकर्सच्या माध्यमातून तुरुंगातील सर्व ५५०० कैद्यांनी देखील हे प्रवचन ऐकले.मुनिश्रीनी या प्रसंगी
पोलिस अधिकाऱ्यांना व कैद्यांसाठी असणाऱ्या लायब्ररीला त्यांची पुस्तके भेट दिली.
मुनीश्रींचा चातुर्मास पुणे व परिसरात सुरु असून ,पुणे शहरानंतर सप्टेंबर महिन्यात मुनीश्रींनी निगडी, चिंचवड,
सांगवी ,एच.एन.डी जैन बोर्डिंग येथे राहून धर्मचिंतन व समाजप्रबोधन केले.आज सकाळी ९ किलोमीटर पायी चालत
ते येरवडा तुरुंगात आले तेथे सुमारे ४५० कैद्यांसमोर त्यांचे प्रवचन झाले.
येरवडा तुरुंगात महात्मा गांधी ,पंडित जवाहरलाल नेहेरू ,सरदार वल्लभभाई पटेल यांना ब्रिटिशांनी कैद करून ज्या
कोठडीत ठेवले होते तेथे मुनीश्रींनी भेट दिली तसेच येरवडा तुरुंगात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी
यांचा ऐतिहासिक "पुणे करार" झाला. तेथील वृक्षासही मुनीश्रींनी भेट दिली. याप्रसंगी तुरुंग अधीक्षक डीआयजी.यु.टी
पवार ,अन्यपोलीस अधिकारी उपस्थित होते ,मुनिश्रींसमवेत सकाल जैन वर्षायोग समितीच्या अध्यक्षा शोभा धारीवाल
,कार्याध्यक्ष मिलिंद फडे ,उपाध्यक्ष अरविंद जैन ,उपाध्यक्ष अजित पाटील, सचिव जितेंद्र शहा ,राजेंद्र शहा ,सुरेंद्र
गांधी ,अॅड लोहाडे , कैलास ठोले आदि. उपस्थित होते. यानंतर मुनीश्रींनी विमाननगरकडे प्रस्थान केले.
सुपरचॅम्प पी. व्ही. सिंधूने सादर केली ‘व्होडाफोन सखी’
‘व्होडाफोन सखी’
इमर्जन्सी अलर्टस आपत्कालीन प्रसंगांमध्ये महिलेच्या लोकेशनविषयीचे अलर्ट तिने नोंदवलेल्या 10 मोबाईलधारकांना पाठवण्यात येतील.
इमर्जन्सी बॅलन्स आपत्कालीन प्रसंगी मोबाईलमध्ये शून्य टॉकटाईम असेल, तरी महिलेला 10 मिनिटे बोलता येईल, इतका टॉकटाईम उपलब्ध करून देण्यात येईल.
प्रायव्हेट नंबर रिचार्ज : रिटेल दुकानांमध्ये मोबाईल रिचार्ज करताना खरा क्रमांक द्यावा लागू नये म्हणून एक 10 आकडी डमी क्रमांक पुरविण्यात येईल.
‘व्होडाफोन सखी’ कशी बनता येईल..
– डायल करा 1800123100 (टोल फ्री) आणि सेवेची मोफत नोंदणी करा.
– आपत्कालीन प्रसंगी संपर्क साधता येतील, असे दहा जणांचे मोबाईल क्रमांक नोंदवा.
मुंबई, 10 ऑक्टोबर 2018 ः व्होडाफोन आयडिया लि. या देशातील आघाडीच्या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीने ‘व्होडाफोन सखी’ ही महिलांसाठीची मोबाईलवर आधारीत सुरक्षा सेवा आज सादर केली. ‘इमर्जन्सी अलर्ट’, ‘इमर्जन्सी बॅलन्स’ आणि ‘प्रायव्हेट नंबर रिचार्ज’ ही वैशिष्ट्ये या सेवेत समाविष्ट आहेत. ‘व्होडाफोन आयडिया’चे प्रीपेड कनेक्शन वापरणाऱ्या देशभरातील महिला ग्राहकांना या सेवेचा उपयोग होईल. ही सेवा स्मार्टफोन अथवा फीचर फोनवर वापरता येईल, तसेच मोबाईलमध्ये टॉकटाईम अथवा इंटरनेट बॅलन्स नसेल, तरीही तिचा लाभ लाखो महिलांना घेता येणार आहे.
प्रख्यात बॅडमिंटनपटू, ऑलिंपिक पदकविजेती, पद्मश्री व अर्जून पारितोषिकांनी सन्मानित पी. व्ही. सिंधू हिच्या हस्ते ‘व्होडाफोन सखी’ सेवेचे उद्घाटन करण्यात आले. ती या प्रसंगी म्हणाली, ‘’मोबाईलमुळे आज लोकांच्या जीवनात अामुलाग्र बदल घडवून आणले आहेत. अधिकाधिक महिलांना मोबाईल सेवा प्रदान करण्याने त्यांना बाहेरच्या जगात सुरक्षितपणे वावरणे सहजशक्य होते.’’ सिंधूच्या हस्ते यावेळी #AbRukeinKyun या चळवळीचा झेंडा उभारण्यात आला. महिलांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी अनोळखी जगात वावरताना सुरक्षितपणाची जाणीव करून देण्यासाठी ही चळवळ सुरू करण्यात आली आहे.
‘’सर्व महिलांनी धीट, धाडसी व चाणाक्ष बनावे, त्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करावे, भिती न बाळगता सगळीकडे प्रवास करावा, सामाजिक व कौटुंबिक दबावांना बळी पडू नये आणि कोणतेही प्रतिबंध न पाळता जगावे. #AbRukeinKyun असा दृष्टीकोन बाळगावा’’, असे आवाहन सिंधू हिने यावेळी केले.
या प्रसंगी बोलताना ‘व्होडाफोन आयडिया कंपनी’चे ‘कन्झ्युमर बिझनेस’ विभागाचे असोसिएट डायरेक्टर अवनीश खोसला म्हणाले, ‘’भारतात एक अब्जाहून अधिकजणांकडे मोबाईल कनेक्शन्स आहेत आणि आपली निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. तरीही एकूण मोबाईलधारकांमध्ये महिलांचे प्रमाण केवळ 18 टक्केच आहे. तसेच यातील बहुसंख्य महिलांकडे फीचर फोन व बेसिक फोनच आहेत. ही मोठी तफावत लक्षात घेता, महिलांना अधिकाधिक प्रमाणात मोबाईल कनेक्शन व संधी देऊन त्यांना सक्षम बनविणे हे मोठे आव्हानात्मक आहे. व्होडाफोन सखीच्या माध्यमातून आम्ही सर्वसमावेशक धोरण आखून खऱे सामाजिक प्रश्न हाताळण्याचे प्रयत्न करीत आहोत. ही एकमेवाद्वितीय व मोफत सेवा महिलांना धाडसाने पावले टाकण्यास व स्वप्नपूर्ती करण्यास उद्युक्त करणार आहे.’’
या प्रसंगी ‘सेफसिटी’च्या संचालिका व सीओओ, तसेच ‘रेड डॉट फाऊंडेशन ग्रूप’च्या संचालिका सुप्रीत के. सिंग यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी अतिशय खडतर परिस्थितीत ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाचे कार्य केले आहे व #AbRukeinKyun या चळवळीला प्रेरणा दिली आहे.
महिलांच्या या सक्षमीकरणाच्या मोहिमेचा प्रचार व प्रसार देशभरात करण्यात येणार आहे. #AbRukeinKyun असे विचारत सर्व समाजापुढे प्रश्न उभे करणाऱ्या एका मुलीच्या धाडसी कार्यावर आधारीत एका व्हिडीओच्या माध्यमातून ही संकल्पना सादर करण्यात येत आहे. हा व्हिडीओ महिलांनीच बनविलेला आहे. प्रख्यात गायिका नेहा कक्कर हिच्या आवाजातील एक प्रेरणादायी गाणे #AbRukeinKyun या मोहिमेच्या प्रचारामध्ये सादर करण्यात येत आहे.
मोहिमेबद्दल अधिक माहिती देताना ‘व्होडाफोन आयडिया कंपनी’चे मार्केटिंग विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष सिध्दार्थ बॅनर्जी म्हणाले, ‘’आपल्या देशात महिलांची सुरक्षितता हा एक ज्वलंत प्रश्न आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव आपल्या महत्वाकांक्षा मागे ठेवणाऱ्या महिलांची असंख्य उदाहरणे आपण पाहात असतो. या प्रश्नाला सामोरे जाण्याकरीता आम्ही ‘व्होडाफोन सखी’ हे लहान पाऊल पुढे टाकले आहे. यातून महिलांना समाजात वावरताना आत्मविश्वास वाटेल. तसेच त्यांना स्वप्नपूर्ती करण्याची संधी मिळवताना भिती वाटणार नाही. ‘अब रुकेक्यू’ या आमच्या मार्केटिंग मोहिमेतून आम्ही आमच्या महिला ग्राहकांशी जोडले जाणार आहोत. या सुधारणावादी मोहिमेत सहभागी होण्याची विनंती आम्ही त्यांना करीत आहोत.’’
चतुः शृंगी देवी मंदिरात घटस्थापना
औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा : नियमांच्या उल्लंघनाबाबत उत्पादक-विक्रेत्यांना दंड आकारण्यासाठी सुधारणा
मंत्रिपरिषद निर्णय :
मुंबई : औषधे व सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन व विक्रीसंदर्भातील नियमांच्या किरकोळ उल्लंघनाबाबत दंड आकारण्यासाठी संबंधित नियमांमध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिपरिषद बैठकीत मान्यता देण्यात आली. यासंदर्भातील विधेयक विधानमंडळासमोर सादर करण्यासही मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे सहकारी संस्थेतील अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी शिक्षण निधीची तरतूद, साताऱ्यातील तारळी प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता, नव्याने निर्धारणा आदेश देण्यासाठी अतिरिक्त सहा महिन्यांचा कालावधी आदी निर्णयही मंत्रीपरिषदेत घेण्यात आले.
औषधे व सौंदर्य प्रसाधनांची आयात, उत्पादन, विक्री व वितरणाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने 1940 मध्ये कायदा केला आहे. सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण, सुरक्षित व पुरेशी औषधे उपलब्ध होण्यासाठी त्यासंदर्भातील नियमांची रचना 1945 मध्ये करण्यात आली. या कायद्यातील तरतुदींनुसार औषधे व सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादक, विक्रेते आणि वितरक यांना परवाने देणे, त्यांच्या नियमित तपासण्या करणे व त्या आधारे प्रमाणित, सुरक्षित व परिणामकारक औषधे व सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मितीसाठी पडताळणी करण्यात येते. त्यामुळे औषधे व सौंदर्य प्रसाधनांच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक उपाययोजना आखण्यास मदत होते. या कायद्यातील नियम 66(1), नियम 67एच(1), नियम 82(2), नियम 159(1), नियम 22(ओ) (1), नियम 142(1) अंतर्गत परवाना प्राधिकाऱ्यास परवानाधारकाचे परवाने निलंबित किंवा रद्द करण्याचे अधिकार आहेत. मात्र, या शिक्षेव्यतिरिक्त त्यांना दंड आकारण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे या कायद्यात दंडाची तरतूद करण्यासाठी संबंधित कलमांत सुधारणेसह नवीन कलम 33-1बी व कलम 33 एन-2 यांचा समावेश करण्यास आज मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे औषध उत्पादक, विक्रेते तसेच रक्तपेढ्या व मान्यताप्राप्त चाचणी प्रयोगशाळांना कायद्याची जरब बसण्यासह याबाबतची प्रकरणे निकाली निघण्यास मदत होणार आहे.
राज्यात सुमारे 76 हजार 800 औषध विक्री आस्थापना व सुमारे 4400 उत्पादन आस्थापना आहेत. त्यामध्ये दरवर्षी हजारोंच्या संख्येने वाढ होत आहे. या आस्थापनांकडून झालेल्या नियमांच्या किरकोळ उल्लंघनाबाबत परवानाधारकाविरुद्ध परवाना निलंबन किंवा परवाना रद्द करण्यासारखी कारवाई केली जाते. त्याचबरोबर गंभीर उल्लंघनाबाबत न्यायालयीन कारवाई देखील करण्यात येते. प्रशासकीय कारवाईबरोबर काही प्रमाणात न्यायिक कारवाई केल्याने खटल्यांची संख्या वाढत जाते. सद्यस्थितीत प्रशासनातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे कारवायांचा पाठपुरावा करुन प्रकरण अंतिम शिक्षेपर्यंत पोहोचविण्यास काही कालावधी लागतो. सद्यस्थितीत राज्यात प्रशासकीय कारवाईविरुद्ध अपिल करण्यात आल्याची सहा हजार प्रकरणे शासनाकडे प्रलंबित आहेत. तसेच राज्यातील विविध न्यायालयांत 2200 खटले प्रलंबित आहेत. कारवाईविरुद्ध अपिल प्रकरणे आणि प्रलंबित न्यायिक खटल्यांमधील गुन्हेगारांमध्ये तत्काळ शिक्षेअभावी कारवाईचा वचक निर्माण होत नाही. त्यामुळे परवानाधारकांमध्ये किरकोळ उल्लंघनाबाबत धाक निर्माण करण्यासाठी आर्थिक दंडाची तरतूद करण्यात येणार आहे.
विक्रीसंदर्भात किरकोळ स्वरुपाच्या उल्लंघनामध्ये परवाने प्रदर्शित न करणे, दर्शनी फलकावर केमिस्ट व ड्रगिस्ट, ड्रग स्टोअर्स न लिहिणे, पंजीकृत फार्मासिस्ट बदलाबाबत परवाना प्राधिकाऱ्यास न कळवणे, अभिलेख्यात त्रुटी ठेवणे, योग्य वेळेत मुदतबाह्य औषधांची विल्हेवाट न लावणे आदी बाबींचा समावेश होतो. तसेच उत्पादनासंदर्भातील किरकोळ स्वरुपाच्या उल्लंघनामध्ये उत्पादन अभिलेख्यात माहितीचा अंर्तभाव करण्यात त्रुटी ठेवणे, उत्पादन कच्चा माल व तांत्रिक व्यक्तीच्या हालचालीबाबत मंजूर असलेल्या आराखड्याचे पालन न करणे, सक्षम तांत्रिक व्यक्तीच्या बदलाबाबत परवाना प्राधिकाऱ्यास अवगत न करणे, प्रमाणित कामकाजपद्धतीत बदल करणे, व्हॅलिडेशन-परिमाणात बदल करणे आणि कामकाजाच्या जबाबदारीत फेरफार करणे या बाबींचा समावेश होतो.
प्रलंबित अपील प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासह अशा प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी विविध प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार कायद्यातील कलम 27 (डी) अंतर्गत येणारी व इतर किरकोळ स्वरुपाच्या उल्लंघनासाठी आर्थिक स्वरुपाच्या दंडाची तरतूद करुन प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच सौम्य व किरकोळ स्वरूपातील उल्लंघनासाठी परवाना प्राधिकाऱ्यांना आर्थिक दंड ठोठावण्याचे अधिकार देण्यात येतील. या उपाययोजनांमुळे प्रकरणांचा तात्काळ निपटारा होऊन उल्लंघनास आळा बसेल. औषध निरीक्षक तसेच परवाना प्राधिकारी यांच्यावर येणारा अनावश्यक कामाचा ताण कमी होऊन त्यांना इतर गंभीर प्रकरणांवर लक्ष केंद्रित करण्यास अधिक वेळ मिळेल. न्यायालयात दाखल करावयाची प्रकरणे कमी होऊन न्यायालयीन कामकाजावरील ताण कमी होईल. शासनापुढे येणाऱ्या अपिलांची संख्या कमी होऊन अतिरिक्त कामाचा बोजा कमी होईल. तसेच शासनास अतिरिक्त महसूल प्राप्त होणार आहे.
सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा
सहकारी संस्थेतील अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी शिक्षण निधीची तरतूद
सहकारी संस्थांतील अधिकारी-कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिपरिषद बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे प्रत्येक सहकारी संस्थेकडून निश्चित दराने व ठराविक वेळेत सहकार, शिक्षण व प्रशिक्षण निधीचे वार्षिक अंशदान घेण्याची तरतूद करण्यात येणार आहे.
राज्यातील सहकार संस्थांमधील कर्मचारी, अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने 97 व्या घटनादुरूस्तीनंतर 2016 पर्यंत दहा संस्था अधिसूचित करण्यात आल्या आहेत. या संस्थांतर्फे प्रशिक्षणाचे कार्य सुरू आहे. घटनादुरुस्तीपूर्वी प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ ही एकमेव संस्था होती. त्यामुळे सहकारी संस्थांनी प्रशिक्षण व शिक्षण अंशदानाचा निधी कोणाकडे जमा करावा, त्याचा दर काय असावा व त्याचा विनियोग कशासाठी करावा आणि व्यवस्थापन कोणी करावे त्याचप्रमाणे त्याचे लेखे कोणी ठेवावे यासंदर्भातील प्रश्न उपस्थित होत नव्हते. घटनादुरूस्तीनंतर अधिसूचित केलेल्या दहा सहकारी संस्थांपैकी कोणत्या संस्थेने किती दराने प्रशिक्षण व शिक्षण अंशदान निधी जमा करावा, त्याचे व्यवस्थापन कोणी करावे व त्याचा विनियोग कशासाठी करावा व त्याचे लेखे कोणी ठेवावेत याबाबत स्पष्टता नसल्याने सहकारी संस्थांनी प्रशिक्षण व शिक्षण अंशदान निधी देण्याचे बंद केले व त्याचा परिणाम सहकारी संस्थांमधील पदाधिकारी, कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण व शिक्षण न मिळाल्याने संस्थांच्या कार्यक्षमतेवर झाला. त्यामुळे अधिनियमात सुधारणा करून सहकारी संस्थांकडून सहकार, शिक्षण व प्रशिक्षण निधीचे अंशदान जमा करण्याची पूर्वीपासूनची तरतूद पुन्हा सुरू करण्यात यावा असे म्हटले होते. सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाशिवाय अन्य संस्थाही प्रशिक्षण देत असल्यामुळे दरवर्षी शासनास आवश्यक वाटेल अशी संस्था राज्य संघीय संस्था म्हणून घोषित करून शिक्षण व प्रशिक्षण निधीचे दर व कालावधी निश्चित करेल. तसेच या निधीचा विनियोग कसा करायचा याबाबतचे व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम २4 अ चे पोट-कलम 3 मध्ये सुधारणा करण्यास आज मंजुरी देण्यात आली. तसेच यामध्ये पोट-कलम ४ नव्याने दाखल करण्यात येईल. त्यानुसार एखादी सहकारी संस्था, सहकार, शिक्षण व प्रशिक्षण निधीचे अंशदान विहित वेळेत भरणा करण्यास अपयशी ठरल्यास अशा अंशदान रकमेची वसुली जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे करण्यात येईल. याबाबतचे अध्यादेश प्रख्यापित करण्यास राज्यपालांना विनंती करण्यासही मंजुरी देण्यात आली.
साताऱ्यातील तारळी प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळी मोठा पाटबंधारे प्रकल्पास 2013-14 च्या दरसूचीनुसार 1 हजार 610 कोटींच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिपरिषद बैठकीत चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे पाटणसह कराड, सातारा, खटाव आणि माण या अवर्षणप्रवण क्षेत्रास सिंचनासाठी लाभ होणार आहे.
तारळी प्रकल्पांतर्गत पाटण तालुक्यातील डांगिष्टेवाडी येथे तारळी नदीवरील या धरणामुळे खालील बाजूस तारळी नदीवर 8 उपसा सिंचन योजना करुन तारळी खोऱ्यातील 6 हजार 507 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या व्यतिरिक्त उरमोडी उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्यास शाखा कालवे काढून त्याद्वारे सातारा जिल्ह्यातील खटाव व माण तालुक्यातील एकूण 8 हजार 876 हेक्टर इतक्या अवर्षणप्रवण क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. जलसंपदा विभागाच्या प्रस्तावानुसार 1 हजार 610 कोटींमध्ये 1 हजार 482 कोटी प्रत्यक्ष कामासाठी तर 128 कोटी अनुषंगिक कामांसाठी खर्च करण्यात येतील. या सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे प्रकल्पांतर्गत रखडलेले भूसंपादन, पुनर्वसन, कोपर्डे पोहोच कालवा तसेच माण व खटाव कालव्याचे काम पूर्ण होऊन अवर्षण प्रवण क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत झाला असल्याने केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होणार आहे.
व्हॅटबाबतचे अपील आदेश
नव्याने निर्धारणा आदेश देण्यासाठी अतिरिक्त सहा महिन्यांचा कालावधी
मूल्यवर्धित करविषयक प्रकरणांतील अपील, त्यावरील पुनर्विचार आणि नवीन आदेश या पद्धतीत सुधारणा करून सुटसुटीतपणा आणण्यासाठी कायद्यात बदल करण्यास आज झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
या निर्णयानुसार मूल्यवर्धित करविषयक (व्हॅट) अपील प्रकरणांमध्ये आदेश मिळाल्यानंतर नव्याने करनिर्धारणा आदेश काढण्यासाठी सहा महिन्यांचा अतिरिक्त कालावधी मिळण्यासह निर्धारणा अधिकारी आणि करदात्यांनाही आता पुरेसा वेळ मिळणार आहे. यासंदर्भातील अधिनियमामध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यासही मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम 2002 नुसार निर्धारणा कार्यवाही दरम्यान व्यापारी हजर न राहिल्यास एकतर्फी निर्धारणा आदेश देता येतो. या आदेशाविरुद्ध अपील दाखल झाल्यास असे आदेश रद्द करण्याचे अधिकार प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांना आहेत. हे आदेश रद्द केल्यानंतर नव्याने निर्धारणा आदेश पारित करण्यासाठी मूळ निर्धारणा अधिकाऱ्याकडे परत पाठवले जातात.
अधिनियमातील कलम 23 (7) नुसार असे अपील आदेश मिळाल्यानंतर 18 महिन्यांच्या कालावधीमध्ये नवीन निर्धारणा आदेश देणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत निर्धारणा अधिकाऱ्यांकडे अशी सुमारे 33 हजार 696 प्रकरणे प्रलंबित आहेत. कारण 1 जुलै 2017 पासून वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरु झाल्याने, संबंधित करदाते तसेच कर अधिकारी हे जीएसटीसंदर्भातील जास्तीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. त्यातच, बहुतांशी मूल्यवर्धित कर निर्धारण प्रकरणांमध्ये नव्याने आदेश देण्याची कालमर्यादा ऑक्टोबर 2018 ते डिसेंबर 2018 या दरम्यान आहे. नवीन आदेश देण्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना तसेच करदात्यांना त्याच्या पूर्ततेसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही तर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.
ही सर्व परिस्थिती पाहता, नवीन निर्धारणा प्रकरणांचा निपटारा गुणवत्तापूर्ण पद्धतीने होण्यासाठी महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम 2002 अंतर्गत कलम 23 (7) मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. त्यानुसार नवीन निर्धारणा आदेश देण्यासाठी अतिरिक्त सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. दरम्यान, अनेक प्रकरणांतील कालमर्यादा लवकरच संपुष्टात येत असून विधिमंडळाचे अधिवेशन सुरु नसल्याने ही सुधारणा अध्यादेशाद्वारे करण्यासही मान्यता देण्यात आली आहे
पुण्यनगरी चे रामदास ढमाले यांची महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट
परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री. ढमाले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री. कांबळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याविषयी माहिती दिली. शासनाच्या जनसंपर्कासाठी कार्यालयाने समाज माध्यमांचा केलेला प्रभावी उपयोग, दिल्लीस्थित विविध राज्यांच्या जनसंपर्क विभागांसोबत संपर्क व समन्वययाबाबतही माहिती दिली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन श्री.ढमाले यांनी माहिती जाणून घेतली व कार्यालयाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
विठ्ठलचरणी अालेले 32 वर्षातील दागिने वितळवून बनवणार बिस्किटे
पंढरपूर- श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू ठेवण्यासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. कोट्यवधी रुपये किंमतीचा हा एेवज सांभाळणे मंदिर समितीला जिकिरीचे होऊ लागले आहे. त्यामुळे अाता १९८५ पासून मंदिर समितीकडे जमा झालेले शेकडो किलोंचे सोने-चांदीचे दागिने वितळवून त्याच्या विटा बनवण्यासाठी मंदिर समितीने राज्य शासनाकडे परवानगी मागितली आहे. मंदिराचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या भुवैकुंठ पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणीचरणी लाखो वारकरी श्रद्धेने सोने-चांदीचे दागिने अर्पण करत आसतात. पंढरपूर मंदिरे देवस्थान अधिनियमानुसार देवाला अर्पण करण्यात येणारे सोने -चांदीचे दागिने, वस्तू वितळवून घेताना शासनाचा प्रतिनिधी उपस्थित असणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे मंदिर समितीचा ठराव संमत झाला असून, शासनाकडे याबाबत परवानगी मागितली आहे.
मंदिराचा ताबा शासनाकडे अाल्यापासून म्हणजे २६ फेब्रुवारी १९८५ ते ३१ मार्च २०१८ पर्यंत मंदिराकडे २५ किलो ६६ ग्रॅम ३८७ मिली सोने तर ८३४ किलो २० ग्रॅम ६२४ मिली इतके चांदीचे दागिने आणि वस्तू आहेत. त्यामुळेच तीर्थक्षेत्र पंढरपुरातील विठ्ठलाला गरिबांचा बालाजी म्हणून संबोधले जाते. या अर्पण दागिन्यांत सोन्याचा टोप, नाम,लाॅकेट, कंठी, मासोळी, धोतर आदी दागिने, पूजेच्या वस्तू आणि श्री रुक्मिणी मातेला गंठण, पोहेहार, बोरमाळ, कर्णफुले, तोडे, पाटल्या, पैजण, जोडवी, मासोळी अादींचा समावेश आहे.
विविध बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या ठेवी जमा
स्टेट बँक आँफ इंडिया, कॅनरा, बँक आॅफ महाराष्ट्रात मंदिर समितीच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आहेत. ठेवींवरील व्याजापोटी लाखो रुपयांचे उत्पन्न समितीला मिळते. २०१६ मध्ये समितीचे वार्षिक उत्पन्न २७ कोटी रुपये इतके होते. दोन वर्षामध्ये त्यात मोठी वाढ झाली आहे. या शिवाय शिवाजी महाराज, पेशवे यांच्या काळात अर्पण दुर्मिळ दागिन्यांचा मंदिरात खास खजिना आहे. हे दागिने अतिप्राचिन असल्याने त्यांची बाजारात किंमत करणे अवघड आहे. एरव्ही सणासुदीच्या दिवशी, नवरात्रोत्सवामध्ये अशा पारंपरिक दागिन्यांनी विठ्ठल रुक्मिणीस सजवण्यात येते.
खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर..?
मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांही उपस्थित होत्या. या भेटीवरून उदयराजे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आलेआहे.
राष्ट्रवादीकडून भोसले यांनी उमेदवारी मिळणार नसल्याने उदयराजे यांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ही भेट विकासकामांसाठी असल्याचे स्पष्टीकरण उदयनराजे भोसले यांनी दिले आहे.
उदयनराजे यांनी सांगितले की, मतदारसंघातील कामांबाबत आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र, या भेटीमागे राजकीय गणित असल्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
या भाजप नेत्यांची घेतली भेट..
उदयनराजे यांनी केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांचीच नाही तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचीही भेट घेतली. विशेष म्हणजे उदयनराजे यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्यासाठी तब्बल अर्धा तास प्रतिक्षा केली.
तनुश्री प्रकरणी महिला आयोगाची नाना पाटेकरांसह चौघांना नोटीस -पोलिसांनी काय केले ? असाही उपस्थित केला सवाल ..
मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता यांच्या तक्रारीची महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे. आयोगाकडून अभिनेते नाना पाटेकर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांनी या प्रकरणात आजपर्यंत नेमके काय केले ? असा सवालदेखील आयोगाकडून विचारण्यात आला आहे. तनुश्री दत्ता यांच्यावतीनं त्यांच्या वकिलांनी लेखी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे तनुश्री दत्ता यांनी स्वत: आयोगासमोर उपस्थित राहून त्यांचं म्हणणं मांडावं, अशी सूचना आयोगानं केली आहे. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या हॉर्न ओके प्लीज चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ता यांनी केला आहे.
तनुश्री दत्ता यांच्या तक्रारीनंतर महिला आयोगानं अभिनेता नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांना नोटीस पाठवली. या चौघांना 10 दिवसांमध्ये आपली बाजू मांडण्याच्या सूचना आयोगानं केली आहे. तनुश्री दत्तानं आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर ही सूचना करण्यात आली. तनुश्रीनं तिच्या तक्रारीत या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केल्याचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे या प्रकरणात काय कारवाई केली, असा प्रश्न विचारत अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगानं पोलिसांना दिले आहेत.
चित्रपटसृष्टीतील अशा घटना रोखण्याची जबाबदारी निर्माते, दिग्दर्शक तसेच संबंधित संघटनांचीदेखील आहे. महिलांसोबत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच तक्रार करण्यासाठी यंत्रणा असणे आवश्यक आहे. यादृष्टीनेच कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा, २०१३ या कायद्यानुसार सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने तात्काळ अंतर्गत तक्रार निवारण समिती (आयसीसी कमिटी) स्थापन करावी असे निर्देश आयोगाने सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला दिले आहेत.
‘सिंटा’द्वारे करण्यात येणार चौकशी
तसेच या प्रकरणाची सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला (सिन्टा) तत्काळ तक्रार निवारण समिती (आयसीसी) स्थापन करण्याचे आदेशही राज्य महिला आयोगाने दिले आहेत.
‘सिंटा’द्वारे (सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन) पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे. ‘सिंटा’च्या नियमानुसार, तीन वर्षे जुनं प्रकरणच ‘सिंटा’ हाताळू शकते. तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या प्रकरणाला आता दहा वर्षे झाली आहेत. मात्र, या प्रकरणात नाना किंवा तनुश्री यांनी नव्यानं तक्रार दाखल केली तर आम्ही चौकशी करण्यास तयार असल्याचे ‘सिंटा’ने स्पष्ट केले आहे.
माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातील अभिनव कल्पनेतून साकारलेला उपक्रम म्हणजे ‘‘जोडी तुझी माझी’’
‘माय अर्थ फाऊंडेशन’, ‘एचआर फोरम’, भारतीय कामगार सेनेच्यावतीने प्रदूषण रोधक मास्कचे वाटप
पुणे :’माय अर्थ फाऊंडेशन’, ‘पुणे सिटी एचआर फोरम’, ‘भारतीय कामगार सेने’च्या वतीने मंगळवारी प्रदूषण रोधक मास्कचे वाटप नागरिक आणि वाहतूक पोलिसांना करण्यात आले.
‘जे डब्ल्यू मेरियट हॉटेल’चे मनुष्यबळ व्यवस्थापक विश्वास जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
पुणे विद्यापीठ चौक आणि पुण्यातील प्रमुख चौकात ५०० मास्कचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला ‘माय अर्थ फाऊंडेशन’ चे अनंत घरत, विश्वास जगताप, ‘एनव्हायर्नमेंट क्लब ऑफ इंडिया’ चे गणेश शिरोडे, किरण शिंदे, युवराज शिंगाडे, राजन नायर, दीपक शेडे, कमलेश कांबळे, तानाजी लोहकरे, श्रीनाथ विटेकर, राजेश शेलार, विजय जोरी, तसेच पोलीस मित्र व पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
वर्ल्ड मास्टर्स पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०१८ या स्पर्धेत पुण्याचे श्याम सहानी यांनी कांस्य पदक पटकाविले
पुणे-वर्ल्ड मास्टर्स पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०१८ – १ ऑक्टोबर २०१८ ते ६ ऑक्टोबर २०१८ दरम्यान मंगोलियामधील उलनबतार येथे या स्पर्धा पार पडल्या . भारतातून सहा संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते . त्यामध्ये महाराष्ट्रातुन पुणे येथील श्याम सहानी हे (वय ५९ )मास्टर २ या १०५ किलो वजनी गटात भाग घेतला . या स्पर्धेत श्याम सहानी कांस्य पदक पटकाविले .
त्यांच्यबरोबर भारतातील कोच कृष्ण साहू हे उपस्थित होते . त्याचबरोबर भारतातून या स्पर्धेत पंजाबमधून अश्विन कुमारने ब्रांज पदक ,मध्य प्रदेशमधून जगदीश जुनानीयाने ब्रांज पदक व भोपाळमधून सीमा वर्माने ब्रांज पदक पटकाविले .श्याम सहानी हे फिशर्स जिममध्ये पॉवरलिफ्टिंग करतात . संजय शर्मा हे त्यांचे कोच आहेत . श्याम सहानी यांनी मागीलवर्षी इंडोनिशिया येथे पार पडलेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चार ब्राँझ पदक पटकाविली . तसेच , त्यांनी नुकत्याच पुणे येथे महाराष्ट्र चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले . जम्मू काश्मीरमध्ये सन २०१५ – १६ मध्ये राष्ट्रीय स्तरावर पार पडलेल्या स्पर्धेत सिल्वर व कांस्य पदक पटकाविले .
पॉवरलिफ्टिंग इंडियाचे भारताचे अध्यक्ष राजेश तिवारी व महाराष्ट्रचे सचिव संजय देसाई यांनी श्याम सहानी यांचे अभिनंदन केले.
तीन वर्षांत पाच लाख मुलींच्या शिक्षणाचा नन्ही कली प्रकल्पाचा निश्चय
मुंबई : येत्या तीन वर्षांत पाच लाख मुलींना शिकवण्याचा निश्चय नन्ही कली या प्रकल्पाद्वारे करण्यात आला आहे. या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या इतर संस्थांशी अधिक चांगल्या प्रकारे समन्वय साधून, नन्ही कली केंद्रांमध्ये आणखी सुधारणा करून तसेच प्रकल्पात काम करणाऱ्या पथकांना अधिक बळकटी देऊन हा निश्चय अमलात आणण्यात येईल, असे ठरविण्यात आले आहे.
महिंद्रा उद्योगसमुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, स्त्रिया शिक्षित झाल्यामुळे कुटुंब, समाज व देश हे दारिद्र्यातून बाहेर पडू शकतात असे प्रतिपादन जागतिक बॅंकेने केलेले आहे. यातूनच स्त्रियांच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होते. दारिद्र्याच्या खातेऱ्यातून भारतीय समाजाची मुक्तता करायची असेल, तर एकही क्षण न दवडता देशातील सर्व मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करावीच लागेल. तीन वर्षांत पाच लाख मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची शपथ घेऊन, नन्ही कली या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही मुलींना त्यांचा शिक्षणाच्या हक्क मिळवून देणार आहोत. यामध्ये येणारे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक अडथळे आम्ही दूर करण्याचा जोमाने प्रयत्न करू.
रतात मुली त्यांच्या आयुष्यात सरासरी चार वर्षांहून कमी काळ शिक्षण घेतात, असे दिसून आलेले आहे. ही परिस्थिती तात्काळ सुधारण्यासाठी व दीर्घकालीन उपाय योजण्यासाठी उद्योग क्षेत्राने पुढाकार घ्यायला हवा.
‘नन्ही कली’ प्रकल्पाविषयी ..
‘नन्ही कली’ हा प्रकल्प महिंद्र समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी 1996 मध्ये सुरू केला. शिक्षित स्त्रिया या केवळ अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देतात असे नव्हे, तर हुंडा व बाल विवाह यांसारख्या क्रूर प्रथांचे निर्मूलन करण्यातही पुढाकार घेतात, या जाणिवेतून नन्ही कली हा प्रकल्प उभारण्यात आला. आतापर्यंत 14 राज्यांमधील ग्रामीण, आदिवासी व नागरी भागांतील साडेतीन लाख मुलींना या प्रकल्पाच्या माध्यमातून सक्षम बनविण्यात आले आहे. त्यांना शैक्षणिक व तत्सम साहित्य पुरविले जाते. प्रकल्पामधून मुलींच्या शिक्षणाविषयी समाजात असलेल्या गैरसमजुती व रुढी यांविषयी जनजागृतीही करण्यात येते. या विषयी अधिक माहिती घेण्यासाठी www.nanhikali.org. ही वेबसाईट पाहावी.
‘महिंद्र’विषयी ..
महिंद्र उद्योगसमुहाची एकूण उलाढाल 20.7 अब्ज डॉलर इतकी आहे. नावीन्यपूर्ण मोटारी व एसयूव्ही बनविणे, ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून ग्रामीण प्रगतीला चालना देणे, नवीन व्यवसायांची जोपासना करणे, हे या समुहाचा उद्दीष्ट आहे. तसेच युटिलिटी मोटारी, माहिती तंत्रज्ञान, अर्थसेवा आणि पर्यटनविषयक सेवा आदी उद्योगांमध्ये हा समूह कार्यरत आहे. महिंद्र समुहातर्फे जगात सर्वाधिक संख्येने ट्रॅक्टर बनविले जातात. कृषी उद्योग, हवाई उद्योग, व्यावसायिक वाहनांची निर्मिती, सुट्या भागांचे उत्पादन, संरक्षणविषयक उत्पादने, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, अपारंपारीक ऊर्जा, स्पीडबोट, पोलाद उत्पादन अशा इतरही अनेक क्षेत्रांमध्ये महिंद्र उद्योगसमूह आपले पाय रोवून आहे. शंभर देशांमध्ये या समुहाच्या विविध कंपन्या आहेत व त्यांमध्ये दोन लाख चाळीस हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात.
टेबल टेनिस अचंता शरथ कमल, मधुरीका पाटकर, श्रीजा अकुला, मनुष शाह यांना विजेतेपद
पुणे- सुदेश शेलार मेमोरियल फाऊंडेशन व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने व टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 6व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक-11स्पोर्ट्स राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुरूष गटात पीएसपीबीच्य अचंता शरथ कमलने आरएसपीबीच्या अनिर्बन घोषचा तर महिला गटात पीएसपीबीच्या मधुरिका पाटकरने पीएसपीबीच्याच दिव्या देशपांडेचा पराभव करत विजेतेपद पटकावले. युथ गाटत मुलींमध्ये आरबीआयच्या श्रीजा अकुला हिने पश्चिम बंगालच्या प्राप्ती सेनचा तर मुलांच्या गटात गुजरातच्या मनुष शाहने हरीयाणाच्या जीत चंद्राचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरूष गटात अंतिम फेरीत पीएसपीबीच्य अचंता शरथ कमलने आरएसपीबीच्या अनिर्बन घोषचा 4-0(11-6, 11-8, 11-3, 11-5) असा पराभव करत विजेतेपद पटकावले. याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत पीएसपीबीच्या अचंता शरथ कमलने अमलराज अँथोनीचा4-3(12/14,7/11,11/9,14/12,11/7,9/11,13/11)असा संघर्षपूर्ण पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. आरएसपीबीच्या अनिर्बन घोषने पीएसपीबीच्या सनील शेट्टीचा 4-3( 11/9,11/9,10/12,11/9,9/11,8/11,11/9)असा सनसनाटी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. वितेजेपदा बद्दल बलताना अचंता म्हणाला की, अनिर्बन हा उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याने स्पर्धेदरम्यान मानांकीत खेळाडूंवर विजय मिळवला आहे, मात्र या सामन्यात तो माझ्यावर दबाव आणु शकला नाही त्यामुळे मी चांगली कामगिरी करू शकलो व विजेतेपद मिळवले.
पीएसपीबीच्या मधुरिका पाटकरने पीएसपीबीच्याच दिव्या देशपांडेचा संघर्षपुर्ण लढतीत 4-2(7-11, 10-12, 11-8, 11-9, 12-10, 11-5) असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. पहिले दोन सेट गमावल्यानंतर मधुरीकाने आक्रमक खेळी करत शेवटचे चारही सेट जिंकुन विजेतेपद पटकावले. याआधीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पीएसपीबीच्या मधुरिका पाटकरने दुसऱ्या मानांकित मनिका बात्राचा 4-2(10/12,11/1,13/11,6/11,11/9,12/10)असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद करत अंतिम फेरीत धडक मारली होती. मधुरिका पाटकर म्हणाली कि, सामन्याच्या सुरुवातीला शुल्लक चुकांमुळे मला संघर्ष करावा लागला. सामन्यात 2-0अशा फरकाने पिछाडीवर असताना मी माझ्या खेळात नवीन रणनिती आखत पुढील दोन्ही गेम जिंकून सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतरदेखील मी माझ्या खेळात सातत्य राखले व सामन्यात विजय मिळवला. या स्पर्धेमुळे मानांकीत खेळाडूंबरोबर खेळता आल्याने मला माझ्या खेळात आणखी सुधारणा करता आली. बेल्जीयम येथे होणाऱ्या आगामी प्रो टेबल टेनिस लीग स्पर्धेत मधुरीका सहभागी होणार आहे. मधुरिका हि मुंबई येथील बूस्टर्स टेबल टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक शैलेजा गोहड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
युथ मुलींच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत आरबीआयच्या श्रीजा अकुला हिने पश्चिम बंगालच्या प्राप्ती सेनचा 4-3(11-7, 5-11, 11-9, 14-16, 11-9, 9-11, 12-10)असा संघर्षपूर्ण पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. श्रीजा ही उस्मानिया युनिव्हर्सिटी वाणिज्य शाखेत शिकत असून एमएलआर टेबल टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक सोमनाथ घोष यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
युथ मुलांच्या गटात एकतर्फी झालेल्या लढतीत गुजरातच्या मनुष शाहने हरीयाणाच्या जित चंद्राचा 4-0(11-6, 12-10, 12-10, 13-11) असा पराभव करत युथ गटाचे विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व रोख रक्कमेची असे पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव एम.पी.सिंग, बॅडमिंटन ऑलंपियन निखिल कानिटकर, टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाचे सल्लागार धनंजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयकर विभागाचे सहआयुक्त मिलिंद चहुरे, सिम्बायोसिस स्पाचे संचालक डॉ.सतीश ठिगळे, एमएसटीटीएचे अध्यक्ष राजीव बोडस, एमएसटीटीएच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस, स्पर्धा संचालक राजेश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पुरुष गट: उपांत्य फेरी:
अचंता शरथ कमल(पीएसपीबी)वि.वि.अमलराज अँथोनी(पीएसपीबी) 4-3(12/14,7/11,11/9,14/12,11/7,9/11,13/11;
अनिर्बन घोष(आरएसपीबी)वि.वि.सनील शेट्टी(पीएसपीबी) 4-3( 11/9,11/9,10/12,11/9,9/11,8/11,11/9);
पुरुष गट: अंतिम फेरी:
अचंता शरथ कमल(पीएसपीबी)वि.वि. अनिर्बन घोष(आरएसपीबी) 4-0(11-6, 11-8, 11-3, 11-5)
महिला गट: उपांत्य फेरी:
दिव्या देशपांडे(5)(पीएसपीबी)वि.वि.सागरिका मुखर्जी(आरएसपीबी) 4-1(11/6,11/7,11/1,9/11,11/6);
मधुरिका पाटकर(4)(पीएसपीबी)वि.वि.मनिका बात्रा(पीएसपीबी) 4-2(10/12,11/1,13/11,6/11,11/9,12/10).
महिला गट: अंतिम फेरी:
मधुरिका पाटकर(4)(पीएसपीबी)वि.वि. दिव्या देशपांडे(5)(पीएसपीबी) 4-2(7-11, 10-12, 11-8, 11-9, 12-10, 11-5)
युथ गट: मुली: अंतिम फेरी: श्रीजा अकुला(1)(आरबीआय) वि.वि.प्राप्ती सेन(4)(पश्चिम बंगाल) 4-3(11-7, 5-11, 11-9, 14-16, 11-9, 9-11, 12-10)
युथ गट: मुले: अंतिम फेरी:
मानुष शाह(6)(गुजरात) वि.वि जित चंद्रा(1)(हरीयाणा) 4-0(11-6, 12-10, 12-10, 13-11)

