Home Blog Page 304

यंदाची ३९ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रविवार दि. ७ डिसेंबर रोजी -यंदा पूर्ण मॅरेथॉनच्या मार्गात बदल

पुणे-भारताच्या मॅरेथॉनची जननी असलेली आणि पुण्याचे नाव जागतिक क्रीडा नकाशावर नेणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यंदा ३९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यंदा पुरुष-महिला पूर्ण मॅरेथॉनच्या मार्गात काहीसा बदल करण्यात आला आहे.
३९ वी मॅरेथॉन रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ३:०० वाजता सुरू होईल. सणस मैदान येथील हॉटेल कल्पना-विश्व चौकातून या ४२.१९५ किलोमीटरच्या पुरुष व महिला पूर्ण मॅरेथॉनला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात येईल. तसेच पहाटे ३: ३० वाजता पुरुष-महिला (२१.०९५) अर्ध मॅरेथॉन, १० कि.मी.सकाळी ६:३० वाजता, ५ कि.मी. सकाळी ७:०० वाजता आणि सकाळी ७:१५ वाजता व्हील चेअर ३ कि.मी या स्पर्धांना सुरुवात होईल.

पुरुष व महिला पूर्ण मॅरेथॉन यंदा नव्या मार्गाने जाईल. सणस मैदानासमोरील हॉटेल कल्पना-विश्व चौक येथून निघून सणस चौक – बाजीराव रस्ता – नगरकर तालीम – लक्ष्मी रोड – कुलकर्णी पेट्रोल पंप तेथून फिरून शनिवार वाडा – शिवाजी पूल – मनपा भवन – मॉडर्न कॅफे – जंगली महाराज रोड – डेक्कन जिमखाना – संभाजी महाराज पुतळा – खंडूजी बाबा चौक – कर्वे रस्ता – कर्वे पुतळा – डावीकडे वळून इराणी कॅफे – करिश्मा बिल्डींग – म्हात्रे पूल येथे वळून मेहेंदळे गॅरेज – डी पी रोड – जोशी किचन – पंडित फार्म –राजाराम पूल – सिंहगड रोड – डावीकडून नवशा मारुती – पु ल देशपांडे उद्यान – पानमळा – दांडेकर पूल – पर्वती पायथा – महालक्ष्मी चौक – सारसबाग – सणस पुतळा येथून डावीकडे हॉटेल कल्पना-विश्व हा २१.०९५ किमीचा पहिला टप्पा पूर्ण करून तेथूनच दुसरा टप्पा सणस पुतळा – महालक्ष्मी चौक – स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्या समोरून, खंडोबा मंदिराहून दांडेकर चौक तेथून सरळ सिंहगड मार्गे, गणेश मळा, राजाराम पूल संतोष हॉल, गोयल गंगा चौक, धायरी पुलावरून, नांदेड सिटीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाऊन डिस्टेंशन सेंटर येथे सर्कलला गोल वळसा घेऊन परत त्याच मार्गे सणस मैदान येथे परत येईल व ४२.१९५ ची पूर्ण मॅरेथॉन सणस मैदानात पूर्ण होईल. तसेच पुरुष व महिला अर्ध मॅरेथॉन स्पर्धा हॉटेल कल्पना-विश्व चौक येथून निघून सणस पुतळा – बाजीराव रस्ता – नगरकर तालीम – लक्ष्मी रोड – कुलकर्णी पेट्रोल पंप तेथून फिरून शनिवार वाडा – शिवाजी पूल – मनपा भवन – मॉडर्न कॅफे – जंगली महाराज रोड – डेक्कन जिमखाना – संभाजी महाराज पुतळा – खंडूजी बाबा चौक – कर्वे रस्ता – कर्वे पुतळा – डावीकडे वळून इराणी कॅफे – करिश्मा बिल्डींग – म्हात्रे पूल येथे वळून मेहेंदळे गॅरेज – डी पी रोड – जोशी किचन – पंडित फार्म –राजाराम पूल – सिंहगड रोड – डावीकडून नवशा मारुती – पु ल देशपांडे उद्यान – पानमळा – दांडेकर पूल – पर्वती पायथा – महालक्ष्मी चौक – सारसबाग – सणस पुतळा येथून डावीकडे हॉटेल कल्पना-विश्व या मार्गे एक फेरी पूर्ण करून सणस मैदान येथे २१ किलोमीटरचा टप्पा पार करून स्पर्धा संपेल. याशिवाय १० किलोमीटर हॉटेल कल्पना-विश्व येथून निघून महालक्ष्मी चौक – सावरकर पुतळा – सिंहगड रोडवरील संतोष हॉल समोरून वळसा घालून परत सणस मैदान येथे पूर्ण होईल. ५ किलोमीटर ही त्याच मार्गे गणेश मळा चौकापर्यंत जाऊन वळसा घालून परत सणस मैदान येथे पूर्ण होईल. तसेच पुरुष व महिला व्हीलचेअर ३ किलोमीटर ही दांडेकर पूल चौकातून वळसा घेऊन परत सणस मैदान येथे समाप्त होईल.

या मॅरेथॉन मध्ये १५००० हून अधिक स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे .यांच्या प्रवेशाची अंतिम तारीख .२८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत www.marathonpune.com येथे प्रवेश अर्ज भरता येऊ शकेल. या स्पर्धेतील विजेत्यांना पुणे महानगरपालिकेतर्फे ३५ लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील. पुरुष व महिला मॅरेथॉन व अर्ध मॅरेथॉन गटातील पहिल्या ३ भारतीय क्रमांकांच्या स्पर्धकांना विशेष पारितोषिके देण्यात येतील.

यंदा इथियोपिया, केनिया टांझानिया, मॉरीशस इत्यादी देशातून आत्तापर्यंत ७० हून अधिक स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे. याशिवाय सेनादल, रेल्वे, पोलीस, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (ASI) बॉम्बे सॅपर्स, एसआरपीएफ, एनडीए,यांच्याही प्रवेशिका येत आहेत. त्याच बरोबर लडाख-कारगिल येथील मॅरेथॉन स्पर्धेतील विजेते व तेथील अन्य धावपटू देखील सहभागी होणार आहेत.

या मार्गाची मोजणी “एम्स” या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या प्रतिनिधींतर्फे शास्त्रीय पद्धतीने करण्यात आली असून ठीक ठिकाणी पोलीस बंदोबस्त, पुण्यातील गणेश मंडळे, चंद्रशेखर आगाशे कॉलेज, सरहद कॉलेज व पुण्यातील इतर कॉलेज व अनेक क्रीडा संस्था, क्लब चे स्वयंसेवक.,उत्तम प्रकाश योजना, डॉक्टर व नर्सेस यांची पथके, ॲम्ब्युलन्स सेवा, मार्गावर पाणी, एनर्जी ड्रिंक, प्रसाधनगृहे, सणस मैदान येथे छोटे हॉस्पिटलची व्यवस्था आदिंची पूर्वतयारी सुरू झाली आहे. डॉक्टर पथकाचे नेतृत्व डॉक्टर राजेंद्र जगताप करत आहेत. यांच्याबरोबर संचेती हॉस्पिटल, नवले हॉस्पिटल ,भारती विद्यापीठ, सिम्बॉयसिस, एमआयटी, अशा संस्थांची डॉक्टर व नर्सेसची पथके सहभागी होत आहेत. यावर्षी पुणे मॅरेथॉन ची Run For Environmental Suntainability ह्या थीमला अनुसरून संस्थेतर्फे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या वेळी मॅरेथॉन मार्गावरती जमा होणाऱ्या पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांचे रिसायकलिंग केले जाणार आहे. कार्बन फुट प्रिंट कमी करण्यासाठी देखील विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

यावर्षी देखील विजेत्यांना देण्यात येणारी गौरव पदके पर्यावरण पूरक बांबींची पूर्तता करणारी असतील. या सोबतच मॅरेथॉन ची माहिती व तयारी या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा marathon mind-set कार्यक्रम दर आठवड्याला Pune international marathon च्या यूट्यूब वरून प्रसारित केला जाणार आहे. गेली ४ वर्षे नाईट मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. मात्र मार्गावर रात्री १२ नंतरही जास्त वाहतूक असल्यामुळे मागील वर्षापासून पहाटे ३.०० वा. पूर्ण व त्यानंतर अर्ध मॅरेथॉन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सारसबाग – सिंहगड रस्ता व नांदेड सिटी आणि परत हॉटेल कल्पना-विश्व या मार्गावर पूर्ण मॅरेथॉन साठी दोन फेऱ्या करण्याऐवजी शहराच्या मध्य भागातूनही मॅरेथॉन जावी ही पुणेकरांची मागणी होती त्यामुळे यंदा हा नवा मार्ग आखण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे पुणेकर या स्पर्धेला मोठा प्रतिसाद देतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

राजकीय पक्ष संपवणे हाच भाजप, RSS चा अजेंडा: – काँग्रेस पुन्हा उभी राहील की नाही याविषयी शंका-प्रकाश आंबेडकर

भाजप, संघ आदिवासींचा सर्वात मोठा शत्रू

मुंबई-वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पुन्हा एकदा भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. राजकीय पक्ष संपवणे हाच भाजप व संघाचा अजेंडा आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीद्वारे ते स्पष्ट झाले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजप व संघाचा राजकीय पक्ष संपवणे हा अजेंडा आहे. त्यांचा हा अजेंडा बिहारच्या निवडणुकीत दिसून आला. काँग्रेस पुन्हा उभी राहू शकते की नाही याविषयी शंका आहे. राजदवर त्यांनी कुटुंबाचा पक्ष म्हणून स्टॅम्प मारला आहे. त्याच्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील निवडणुका होत आहेत. त्यामुळे मी सर्व फुले, शाहू, आंबेडकरवादी, मानवतावादी, लोकशाहीवादी मतदारांनी सातत्याने भाजप व संघाविरोधात लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभे राहण्याची गरज आहे.

उमेदवार जिंकतो की हारतो याची पर्वा न करता वंचित बहुजन आघाडीला ताकद द्यावी. त्यातून पक्ष जिवंत आहे, आम्ही तो टिकवायला बसलो आहोत हे दाखवून देण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकरांनी नुकताच मोदींवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण वरून गोड व आतून खोटे होते. वास्तव हे आहे की, नरेंद्र मोदी, भाजप व संघ आदिवासींचे सर्वात मोठे शत्रू आहेत. भाजप व संघ आदिवासींना आदिवासी म्हणण्याऐवजी वनवासी म्हणतो. त्यातून त्यांची ऐतिहासिक ओळख कमकूवत करण्याचा प्रयत्न केला जातो. अशी धोरणे व शब्दावली आदिवासी समाजाची ऐतिहासिक स्थिती, सांस्कृतिक ओळख व त्यांच्यावरील राजकीय दावे व घटनात्मक अधिकारांना कमकूवत करण्याचा भाजप व संघाच्या रणनीतीचा भाग आहे.

औद्योगिकीकरण, उत्खनन व विकासाच्या नावाने भाजप व संघाने अगोदरच आदिवासींचे जल, जंगल व जमीन हिरावून घेतली आहे. आता ते आदिवासींना ब्राह्मणवाद, वैदिक हिंदुत्व सनातन धर्माच्या संरचनेत सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याद्वारे त्यांची अद्वितीय संस्कृती व ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप व संघ सातत्याने आदिवासींना राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांपासून वंचित करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेषतः सहाव्या अनुसूची अंतर्गत त्यांचे अधिकार नाकारले जात आहेत. नरेंद्र मोदी, भाजप व संघ आदिवासींच्या जल, जंगल व जमिनीच्या अधिकाराचे सर्वात मोठे शत्रू आहेत, असे आंबेडकर म्हणाले होते.

इन्शुरन्स कंपनीला गंडा घालणाऱ्या दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे-टाटा एआयजी या इन्शुरन्स कंपनीची २३ लाखांची फसवणूक तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) येथील दोन तरुण डॉक्टरांनीच केली असल्याचा धक्कादायक प्रकार काल (ता.१७) समोर आला. विशेष म्हणजे या खासगी इन्शुरन्स कंपनीत सिनिअर मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या डॉक्टरने हा बनाव उघडकीस आणला. त्याबाबत पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार या दोन डॉक्टरांविरुद्ध बनावटगिरी आणि फसवणुकीचा (चिटिंग अॅन्ड फोर्जरी) गुन्हा काल तळेगाव दाभाडे पोलिसांनी दाखल केला. परंतू, आरोपी डॉक्टरांना अद्याप अटक झालेली नाही.
विशेष म्हणजे ज्यांनी ही फसवणूक उजेडात आणली ते टाटा एआयजी च्या डॉक्टरचे म्हणजे या गुन्ह्यातील फिर्यादींचे पहिले नाव आणि एका आरोपी डॉक्टरचेही पहिले नाव एकच म्हणजे संदीप हे आहे. दोन्ही आरोपी डॉक्टर योगायोगाने एकाच वयाचे आहेत. डॉ. संदीप देवराम गायकवाड (वय ३६, रा. चिंतामणी रेसिडेन्सी, चौधरी पार्क, दिघी) असे फिर्यादी, तर डॉ. संदीप भीमराव वानखेडे (वय ४०, रा. जी २०४, प्रतिकनगर, शिवाजी चौकाजवळ, तळेगाव दाभाडे व डॉ. विशाल रमेशराव कुकडे (वय ४०, फ्लॅट नं. ३०१, रिअल स्प्रग मिडोज सोसायटी, वराळे-आंबी रोड, तळेगाव दाभाडे) अशी आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावर्षी १२ मार्च ते कालपर्यंत ही फसवणूक तळेगाव दाभाडे येथील श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यात आरोपी डॉक्टर जोडगोळीने स्वताच्या फायद्यासाठी बनावट कागदपत्रे बनवली. त्याआधारे वेगवेगळ्या रुग्णांचे खोटे आरोग्य दावे (मेडीकल क्लेम) टाटा एआयजी कंपनीकडे वरील हॉस्पिलच्या नावे सादर केले. त्याव्दारे तळेगाव दाभाडे येथील हॉस्पटलच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यात २२ लाख ९६ हजार ३५ रुपयांचा क्लेम जमा करून घेतला. मात्र, ही फसवणूक डॉ. गायकवाड यांच्या लक्षात येताच काल त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) रविंद्र खामगळ या गुन्ह्याचा तपास करीत आहेत

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन निवडणूक बेकायदेशीर:उच्च न्यायालयात याचिका दाखल

पुणे-महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन (एमएओ) च्या बेकायदेशीर निवडणुकांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयाने नव्याने निवडणुका घेण्याचा निर्णय द्यावा, अशी मागणी शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे सचिव सूर्यकांत पवार यांनी केली आहे.पुण्यात पत्रकार परिषदेत पवार यांनी सांगितले की, एमएओ ही एक अशासकीय संस्था असून तिचा कारभार आजवर बेकायदेशीरपणे आणि राजकीय दबावाखाली चालला आहे. शासकीय क्रीडा खात्याच्या वरदहस्तामुळे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

न्यायालय आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाने यापूर्वी एमएओने आयोजित केलेल्या बेकायदेशीर निवडणुकांना पूर्णतः स्थगिती दिली होती आणि त्या रद्द केल्या होत्या. असे असतानाही, २०२५ ते २०२९ या कालावधीसाठीच्या निवडणूक प्रक्रिया पार पाडून २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे, जी पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असे पवार म्हणाले.

पवार यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या २०१७ नंतरच्या आणि २०२५ पर्यंतच्या सर्व कार्यकारिणी मंडळांना बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. धर्मादाय आयुक्तांनी १७ ऑक्टोबर रोजी याबाबतचा आदेश रद्द केला असून, त्याची प्रत महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनला सुपूर्द केली आहे. त्यामुळे सध्याची कार्यकारिणीही बेकायदेशीर ठरली आहे, परिणामी २०२५ नंतरची निवडणूक प्रक्रियाही अवैध ठरते.

२०२५ ते २०२९ च्या निवडणुकीसाठी २०१३ पूर्वीच्या महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या मान्यताप्राप्त राज्य संघटनाच पात्र असतील, असेही पवार यांनी सांगितले. निवडणुकीनंतर इतर सर्व राज्य संघटना आणि सहयोगी संघटनांची कागदपत्रे तपासून त्यांना कायदेशीर मान्यता दिली जाईल.

या संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांविरुद्ध राष्ट्रीय स्पर्धेत प्रचंड भ्रष्टाचार आणि अफरातफर केल्याप्रकरणी फौजदारी खटले दाखल झाले आहेत. त्यांची ईडीमार्फत तसेच क्रीडा संचालनालय, बालेवाडी, पुणे यांच्याकडून चौकशी सुरू आहे. मात्र, या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून निवडणूक घेण्यात आली आहे, असेही पवार यांनी नमूद केले. या सर्व बाबी लक्षात घेऊनच उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

पुणे ते शिरूर, शेंद्रा ते बिडकीन, बिडकीन ते ढोरेगाव रस्ता निर्मितीला मान्यता

0

छत्रपती संभाजी नगर ते अहिल्यानगर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १८: पुणे ते शिरूर राष्ट्रीय महामार्गावरील ५३.४ किलोमीटर अंतरातील चार पदरी जमिनीला समांतर (ॲट ग्रेड) व सहा पदरी उन्नत महामार्गासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा औद्योगिक वसाहत ते बिडकीन औद्योगिक वसाहत आणि बिडकीन ते ढोरेगाव (छत्रपती संभाजी नगर ते पुणे महामार्ग) सहा पदरी रस्ता निर्मितीला मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासोबतच नवीन ग्रीनफिल्ड रस्ता छत्रपती संभाजीनगर – जालना डीएमआयसी नोड क्रमांक एक करमाड ते बिडकीन मार्गे समृद्धी महामार्गास सहा पदरी रस्ता जोडणी या नवीन आखणीस तत्वतः मान्यता देण्यात आली.

छत्रपती संभाजी नगर ते अहिल्यानगर दरम्यान सद्यस्थितीत असलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांचा त्रास कमी करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, पुणे ते शिरूर या महामार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग आणि चार पदरी जमिनीच्या समतल (ॲट ग्रेड) मार्गाचे काम तीन वर्षात पूर्ण करावे. रस्ता विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावा. या रस्त्याच्या निर्मितीमध्ये कुठही दिरंगाई होऊ नये. पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुणे ते शिरूर दरम्यान औद्योगिक वसाहती असल्याने वाहनांची अत्यंत वर्दळ आणि भविष्यातील वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता महामार्गाचे काम विनाविलंब सुरू करावे.

पुणे ते शिरूर महामार्गावर ३५ किलोमीटर उन्नत महामार्गापैकी ७.४० किलोमीटर लांबीमध्ये जमिनीला समांतर रस्ता, त्यावर रस्ता व वरती मेट्रो अशा व्हाया डक्टची निर्मिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळ यांनी समन्वयाने करावी. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेंद्रा (करमाड) ते बिडकीन या ३२.८ किलोमीटर लांबी, बिडकीन ते ढोरेगाव या २६ किलोमीटर लांबीच्या सहा पदरी रस्ता निर्मितीच्या कामासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन तातडीने सुरू करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख सचिव मनीषा म्हैसकर यांनी सादरीकरण केले. बैठकीला अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, प्रधान सचिव (विधी व न्याय) सुवर्णा केवले, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

बिबट्यांसाठी जोरदार नाकाबंदी ..पण ..दिसेल तिथे गोळी घालाचे ऑर्डर नाहीत

0

बिबट्यांना शेड्यूल एक मधून बाहेर काढण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश-बिबट्याचे हल्ले ‘राज्य आपत्ती’ठरवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणा

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुणे जिल्ह्यात दोन बचाव केंद्रे सुरू करा
• गाव/शहराजवळील फिरणाऱ्या बिबटे पकडण्यासाठी ड्रोनचा वापर करा
• नरभक्षक बिबट्यांना शोधून नसबंदी करा
• बिबट्यांचा वावर असलेल्या भागात गस्त पोलीस व वन विभागाने वाढवावी
• रेस्क्यू टीम व वाहनांची संख्या वाढवावी

बिबट्यांचा समावेश शेड्यूल एक मध्ये आहे. त्यामुळे नरभक्षक बिबट्यांन पकडणे, त्यांना मारणे यावर मर्यादा येतात. त्यामुळे बिबट्यांना शेड्यूल एकमधून काढण्यासंबंधी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. बिबट्यांच्या नसबंदीची परवानगी केंद्र शासनाकडून मिळाली आहे. त्यामुळे नरभक्षक बिबट्यांना शोधून नसबंदी करण्यात यावे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


मुंबई, दि. 18 – राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवहल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल-1 मधून वगळून शेड्यूल-2 मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावही तयार करून सादर करावा. मानवांवर हल्ले करणाऱ्या बिबट्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ठिकाणी तातडीने पिंजरे बसवावेत. यासोबतच, पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी दोन रेस्क्यू सेंटर पुढील दोन ते तीन महिन्यांत सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले.
बिबट्याकडून मानवावर होणारे हल्ल्यांची समस्या ही राज्य आपत्ती घोषित करण्यासंबंधीचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवण्यात यावेत. तसेच बिबट्यांना शेड्यूल एक मधून काढून शेड्यूल दोन मध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात यावे. मानवावर हल्ले करणाऱ्या बिबट्यांना आळा घालण्यासाठी तातडीने आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे पुरविण्यात यावेत. येत्या दोन ते तीन महिन्यात पुणे जिल्ह्यात बिबट्यांसाठी तातडीने दोन बचाव केंद्रे (रेस्क्यू सेंटर) सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राज्यातील बिबट्यांच्या प्रश्नांसंदर्भात आज मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार शरद सोनवणे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव राजेश कुमार, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंगल, राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख) एम श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) श्रीनिवास रेड्डी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी कालबद्ध पद्धतीने तातडीचे आणि दीर्घकालीन अशा दोन प्रकारे उपाययोजना करण्यात याव्यात. तातडीच्या उपायांमध्ये गावे व शहरांजवळील बिबट्यांना शोधून पकडण्यात यावेत. यासाठी ड्रोनची मदत घ्यावी. पिंजरे, वाहने, मनुष्यबळ आदी बिबटे पकडण्यासाठी आवश्यक साहित्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून द्यावेत. तसेच दीर्घकालीन उपाययोजनेत बिबट्यांची नसबंदी करण्यात यावी. तसेच पकडलेल्या नरभक्षक बिबट्यांना ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यात दोन रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी तातडीने जागा शोधून आराखडे तयार करावेत. तसेच गोरेवाडा सह इतर ठिकाणी सध्या असलेल्या रेस्क्यू सेंटरची क्षमता वाढविण्यात यावी.

CM साहेब … लोकमान्यनगर पुनर्विकासावरील स्थगिती उठवा हो .. ५२५ पत्रे फडणवीसांना

57 इमारती मधील 803 नागरिक जीव मुठीत घेऊन रहात आहेत.

पुणे- शेकडो पोस्ट कार्ड पाठवून मुख्यमंत्र्यांना पुण्यातील लोकमान्यनगर पुनर्विकासावरील स्थिगिती उठवण्याची विनंती आज येथील रहिवाश्यांनी केली. लोकांनी निवडून दिलेल्या आमदाराच्या दोन वाक्यावर स्थगिती दिली आणि आता लोक गेल्या ऑगस्ट पासून त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने करतोय , ओरड ओरड ओरडतात … मग स्थगिती का नाही उठवत ? असा सवाल या निमित्ताने या रहिवाश्यांनी केला आहे.
ते म्हणाले,’ पुण्यातील लोकमान्य नगर येथील 57 इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग स्थानिक आमदार हेमंत रासनेंच्या एका पत्रावर मुख्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती देऊन रोखला. त्यामुळे हजारो नागरिकांच्या घराचे स्वप्न भंग झाले. ही स्थिगिती उठवण्यासाठी पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समिती स्थापन झाली. ऑगस्ट पासून त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना व म्हाडाच्या उपाध्यक्षांना निवेदन दिले, हेमंत रासनेंच्या कार्यालयावर शेकडोंनी मोर्चा नेऊन त्यांना जाब विचारला, म्हाडाच्या कार्यालयाला घेराव घातला, सह्यांची मोहीम राबवली या सारख्या लोकशाही मार्गाचा त्यांनी वापर केला.शेकडो नागरिकांनी पंतरप्रधान मोदी साहेबांना इमेल पाठवला .
वास्तविक पाहता 57 इमारती मधील 803 नागरिक जीव मुठीत घेऊन रहात आहेत. लोड बेअरिंग पद्धतीने बांधलेल्या या इमारती 60 वर्षांपेक्षा जुन्या झाल्यात. या सर्वांना धोकादायक इमारती म्हणून इंजिनियरांनी प्रमाणपत्र दिलीत. राज्य शासनाच्या 79 ए नुसार दोन तीन चार इमारती (सोसायटी ) एकत्र येऊन विकासक नेमलेत. आता बिल्डिंग पाडायच्या व नवीन बांधकाम सुरू करायच्या बेतात असताना रासणेंनी एकूण 16 एकरचा हा भूखंड डोळ्यासमोर ठेऊन एका बिल्डरच्या सहाय्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन स्थगिती मिळवली. रासने यांचा लोकमान्य नगरशी काहीही संबंध नसताना ही स्थगिती मिळवली त्यावर नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
चार दिवसांपूर्वी समितीच्या सदस्यांनी प्रवीण दरेकर (अध्यक्ष, पुनर्विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य) यांची मुंबईला त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्यांच्याबरोबर अतिशय सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष जयस्वाल साहेबांची भेट करून दिली. समितीच्या सदस्यांनी संपूर्ण लोकमान्य नगरचा लेआऊट त्यांना दाखवून स्थिगिती उठवण्याची विनंती केली. जयस्वाल साहेबांनी सहा इमारतींचा एक मिनी क्लस्टर करण्याचे सुचवले. परंतु येथील सोसायट्या खूप पुढे गेल्यात व काही ठिकाणी ते अश्यक्य असल्याचे त्यांना सप्रमाण दाखवून दिले. त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला.
आज जवळपास 525 नागरिकांनी पोस्ट कार्डाच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना स्थगिती उठवण्याची विनंती केली. लोकमान्य नगर येथे नागरिक जमले आणि त्यांनी ही पोस्ट कार्ड मंत्र्यालयात मुख्यमंत्री यांना पाठवली.समितीने आतापर्यंत लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून स्थगिती उठवण्याची मागणी केली. आता वेळ प्रसंगी कोर्टाचा मार्ग अवलंबण्यात येईल असे कळते.

थंडीतही म्हणा ..पाणी रे पाणी ….गुरुवारी पुण्याचा पाणीपुरवठा बंद

पुणे-गुरुवार दि.२०/११/२०२५ रोजी धरणातून होणारा संपूर्ण पाणीपुरवठा सकाळी ६.०० ते रात्री १२.०० पर्यंत बंद करण्यात येणार आहे त्यामुळे संपूर्ण शहर आणि परिसरातील पाणीपुरवठा देखील बंद राहील असे महापालिकेने कळविले आहे.

गुरुवार दिनांक २०/११/२०२५ रोजी नवीन पर्वती जलशुध्दीकरण केंद्र (५०० एम.एल.डी.), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HLR टाकी परिसर व पर्वती LLR टाकी परिसर, पर्वती टैंकर पॉईट, बडगाव जलशुद्धीकरण केंद्र, राजीवगांधी पंपिंग स्टेशन, लष्कर जलकेंद्र, चिखली जलकेंद्र, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, शिवणे इंडस्ट्रीज परिसर एस.एन.डी.टी. एच.एल.आर, एस.एन.डी.टी. एम.एल.आर टाकी परिसर, चतुर्भुगी टाकी परिसर, होळकर जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल वारजे फेज क्र. १ व २, गणपती माधा, जुने वारजे जलकेंद्र व नव्याने समाविष्ट गावे बुस्टर पंपिंग अंतर्गत येणारा परिसर येथील विद्युत पंपींग विषयक व वितरण व्यवस्था स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे कामांसाठी व खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंत ३००० मी.मी व्यासाची रॉ वॉटर पाईप लाईन टाकण्यात आलेली आहे. खडकवासला धरणातून दोन १४०० मी.मी. व्यासाच्या पाईप लाईन ३००० मी.मी व्यासाच्या पाईप लाईनला जोडण्यात आले आहेत. खडकवासला ते पर्वती ३००० मी.मी व्यासाच्या लाईनवरील फ्लो मीटर बसविणे व १४०० मीमी लाईनवरील बटरफ्लाय वॉल्व्ह बसविणे या करिता १४०० मीमी व्यासाचे स्लुईस वॉल्व्ह पूर्ण बंद होत आहेत याच्या तपासणीसाठी व वडगाव जलशु‌द्धीकरण फेज २ ची क्षमता वाढविण्यासाठी नवीन संपवेल टाकीच्या भिंतीला कोअर कटिंग करण्यासाठी तसेच इतर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी तसेच इतर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी गुरुवार दि.२०/११/२०२५ रोजी धरणातून होणारा
संपूर्ण पाणीपुरवठा सकाळी ६.०० ते रात्री १२.०० पर्यंत बंद करावा लागणार आहे.
. तसेच इतर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी गुरुवार दि.२०/११/२०२५ रोजी धरणातून होणारा संपूर्ण पाणीपुरवठा सकाळी ६.०० ते रात्री १२.०० पर्यंत बंद करावा लागणार आहे..
शुक्रवार दि.२१/११/२०२५ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग :-
पर्वती MLR टाकी परिसर
गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन, मुकुंदनगर इ.
पर्वती HLR टाकी परिसर सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम,
चिंतामणीनगर भाग-१ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोले मळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, स.नं.४२ कोंढवा खुर्द, साईबाबानगर, पद्मावती टँकर पॉईट इत्यादी.
पर्वती LLR परिसर :- शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर,
शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर.
वडगाव जलकेंद्र परीसर हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.
राजीव गांधी पंपिंग :- सच्चाई माता टाकी, संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुंदा माता नगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागर नगर मधील भाग क्रमांक एक व दोन, राजस सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, दत्तनगर, जुना प्रभाग ३८ मधील वरखडे नगर तसेच संपूर्ण जुना प्रभाग ४१ व येवलेवाडी परिसर इ.
लष्कर ते खराडी पंपींग क्लोजरमुळे पाणीपुरवठा बंद होणारा परीसर खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, ईऑन परीसर, चौधरी वस्ती, सातव वस्ती, थिटे वस्ती, तुकाराम नगर, यशवंतनगर, चंदननगर, सुनितानगर, धर्मनगर, सोमनाथनगर, गार्डेनिया, धनलक्ष्मी सोसायटी, गणेशनगर, आनंदपार्क, राजश्री कॉलनी, मतेनगर, महावीरनगर, माळवाडी, मुन्नुरवार सोसायटी इत्यादी.
लष्कर जलकेंद्र भाग :- संपुर्ण रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यदनगर, हेवनपार्क, गोसावी वस्ती शंकर मठ,
वैदूवाडी, रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड डावी बाजू, केशवनगर, मांजरी बु., शेवाळेवाडी, बी.टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, कोरेगावपार्क, ओरीयंट गार्डन, साडेसतरानळी, महंमदवाडी रस्ता उजवीकडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी उरुळी देवाची भेकराईनगर (टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद), हाय सर्व्हिस, बेकर हिल, रेसकोर्स, ठाकरसी टाकी, कॅम्प, ससून.
रावेत चिखली जलकेंद्र: विद्यानगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड परीसर इत्यादी.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर :- पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीन गर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड, इत्यादी..
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील गांधी भवन टाकी परिसरः कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम
कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी. एस. यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन ७ व ९. मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू, शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण,
चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर, इ.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील GSR टाकी परिसर कर्वेनगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. १ ते १०
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील शिवणे इंडस्ट्रीज परिसर.
एस. एन. डी. डी. (एच. एल. आर.) :
गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी,सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, खैरेवाडी, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी इत्यादी.
एस. एन. डी. डी. (एम. एल. आर.): लॉ कॉलेज रोड, पौड रोड, शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा. भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर झोनिंग पध्दतीने, सहवास, क्षिप्रा, मनोहन सोसा. विठ्ठल मंदिर परिसर झोननिंग करून, गोसावी वस्ती परिसर, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बीग बाझार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डी. पी. रस्ता (पार्ट), मयुर कॉलनी परिसर, मयुर डी. पी. रस्त्याची डावी बाजु, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, एरंडवणा परिसर, दशभूजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच. ए. कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनिता, युको बँक, कॉलनी, टैंकर पॉईट, डि. पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर इत्यादी, करिष्मा सोसा., ते वारजेवार्ड ऑफिस गिरीजा शंकर, नवसह्याद्री ताथवडे उद्यान परिसर निलकमल युनायटेड वेस्टर्न अनुरेखा स्थैर्य, मधूचय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, रघुकुल महिम्न, सुखा जयशक्ती, इत्यादी.
चतुः श्रृंगी टाकी परीसर औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, परिसर, चिखल वाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानाश्री सोसायटी, नॅशनल, सिंघ सोसायटी, औंधगाव परिसर.
नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भागः मुळा रोड, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसर, MES, “HE Factory, हरीगंगा सोसायटी इत्यादी.
पाषाण पंपिंग व सुस गोल टाकी परिसर गणराज चौक, पॅनकार्ड रोड, वीरभद्र नगरचा काही भाग, समर्थ कॉलनी काही भाग इत्यादी.
जुने वारजे जलकेंद्र भागः रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, सहयोगनगर पठार, गोकुळनगर पठार, विठठल नगर, ज्ञानेश सोसायटी, यशोदिप चौक, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, अमर भारत सोसायटी, गणपती माथा परिसर, एनडीए रोडचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी इत्यादी.
नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भागः मुळा रोड, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसर, MES, “HE Factory, हरीगंगा सोसायटी इत्यादी.
कोंढवे – धावडे जलकेंद्र: वारजे हाय-वे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे, न्यु कोपरे.


शिवसेनेच्या मंत्र्यांचा बैठकीवर बहिष्कार ?

फडणवीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांना झापले

मुंबई-आजच्या प्री-कॅबिनेटला शिवसेनेचे सर्व मंत्री उपस्थित होते. पण त्यानंतर झालेल्या कॅबिनेटला एकनाथ शिंदे वगळता शिवसेनेचा एकही मंत्री पोहोचला नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यात त्यांनी भाजपकडून मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडण्यात येत असल्याच्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.शिंदे गटाचे मंत्री भेटीस आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी उभय नेत्यांत काय चर्चा झाली याचा तपशील समोर आला नाही. पण यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना मित्रपक्षांचे पदाधिकारी पळवण्याच्या मुद्यावरून चांगलेच झापल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने आज बृहन्मुंबई उपनगरातील 20 एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्यासंबंधीचे धोरण निश्चित केले. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबई व उपनगरांत मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने आजच्या बैठकीत आयकॉनिक शहर विकासासाठी धोरणही जाहीर केले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. भाजपवर मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडण्याचा आरोप करत शिवसेनेने ही भूमिका घेतली. त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे राजकारण तापले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक झाली. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्यामुळे या बैठकीत जनमतावर प्रभाव टाकणारे कोणतेही मोठे निर्णय घेण्यात आले नाही. केवळ निवडक विभागांचे 6 निवडक विषय या बैठकीद्वारे हातावेगळे करण्यात आले. यात सरकारने बृहन्मुंबई उपनगरातील वीस एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्याबाबतचे धोरण निश्चित. यातून मुंबई शहर व उपनगर क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत.

राज्यात सध्या नगरपरिषद व नगरपंचायत निडवणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात स्थानिक पातळीवर वेगवेगळे राजकीय समीकरणे अस्तित्वात येत आहेत. त्यातच भाजपकडून मित्रपक्षांचे पदाधिकारी पळवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यावरून सत्ताधारी महायुतीच्या गोटात प्रचंड धुसफूस सुरू झाली आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेना प्रचंड नाराज झाली आहे. या नाराजीतूनच शिवसेनेच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर कथितपणे बहिष्कार टाकला.

तुम्ही उल्हासनगरमध्ये या प्रकाराची सुरुवात केली. तुम्ही जे केले ते आम्ही चालवून घ्यायचे आणि भाजपने केले तर ते चालणार नाही असे अजिबात चालणार नाही, असे ते म्हणाल्याचे सांगण्यात येत आहे. यापुढे एकमेकांचे नेते, पदाधिकाऱ्यांना प्रवेश देऊ नका. दोन्ही पक्षांनी या प्रकरणी पथ्य पाळावीत. तुम्ही पथ्य पाळणार असाल तर भाजपही पथ्य पाळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना सुनावले. या प्रकाराची आज दिवसभर मंत्रालय परिसरात चर्चा सुरू होती.

डोंबिवलीतील अनमोल म्हात्रे, महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील यांच्यासह अनेक जणांचा भाजपामध्ये प्रवेश

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

डोंबिवली-येथील माजी नगरसेवक दिवंगत वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल म्हात्रे तसेच माजी नगरसेवक महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे यांच्यासह कल्याण डोंबिवली मधील शिवसेना शिंदे गटाच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. याप्रसंगी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, भाजपा डोंबिवली पश्चिम मंडल माजी अध्यक्ष समीर चिटणीस, माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक राहूल दामले, मंदार हळबे, जितेंद्र भोईर, नंदू म्हात्रे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत माझे मित्र आणि हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित असलेले महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे, संजय विचारे यांनी पक्षात प्रवेश केला.
या भागातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आम्ही वर्षानुवर्षे एका मित्रत्वाच्या नात्याने अतिशय ताकदीने एकत्र काम करत होतो. मविआ सरकारच्या काळात या कार्यकर्त्यांना त्याकाळात त्रास देण्याचा प्रयत्न झाला. आगामी काळात विकासाची दृष्टी ठेवून काम होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मित्र म्हणून जर सगळे एकत्र राहिलो तर चांगल्या पद्धतीने काम पुढे नेता येईल असे वाटते, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.
अनमोल म्हात्रे यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्यांत अश्विनी म्हात्रे, शिवसेनेचे युवा विभाग प्रमुख गजानन जोशी, विभाग अध्यक्ष ओमकार सुर्वे, माधुरी साळुंके, सुषमा सावंत, अलका कोलते, सविताताई शेलार, लक्ष्मीताई रानभरे, श्रध्दा माने यांचा समावेश आहे.
महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्यांत अण्णा राणे, संजय विचारे, शाखा प्रमुख सरिता शर्मा, विभाग प्रमुख संगीता अंबरे, उपविभाग प्रमुख आरती चव्हाण, अलका कुळे, छाया कांबळे, उप विभाग प्रमुख ऋषिकेश देशमुख, विभाग प्रमुख दीपक पारेख, शाखा प्रमुख वसंत सुखदरे, सुनील पाटील, संदीप तेमुरे आदींचा समावेश आहे .

राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते नैसर्गिक शेती परिषदेचे उद्घाटन

पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेती करणारा शेतकरी महत्वाचा-– राज्यपाल आचार्य देवव्रत

पुणे, दि. 18 नोव्हेंबर – आपल्या देशात रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नैसर्गिक शेती हा प्रभावी पर्याय असून, पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला फॅमिली डॉक्टरपेक्षाही नैसर्गिक शेती करणारा शेतकरी अधिक गरजेचा ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

शिवाजीनगर येथील कृषि महाविद्यालयात आयोजित एक दिवसीय नैसर्गिक शेती परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषि मंत्री दत्तात्रय भरणे आणि कृषि विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार रासायनिक शेतीमुळे भविष्यात गंभीर परिणाम घडू शकतात. जमिनीतले सूक्ष्मजीव पोषक घटक रोपांपर्यंत पोहोचवतात, पण रासायनिक शेतीत हे सूक्ष्मजीव नष्ट होत असल्याने जमिनीचा पोत बदलतो, अन्नातील पोषक घटक कमी होतात. युरियामधील नायट्रोजनमुळे नायट्रस ऑक्साइड तयार होत असल्याने कॅन्सरसारख्या रोगांमध्ये वाढ होत आहे. यापासून मुक्तता नैसर्गिक शेतीच देऊ शकते.

नैसर्गिक शेतीसाठी योग्य बियाणे निवडणे, बिजामृत प्रक्रीया, घनजीवामृताचे योग्य प्रमाणात उपयोग आणि पाण्यासोबज जीवामृत देणे, जमिनीचे आच्छादन करणे आणि बहुपीक पद्धत या पाच बाबी महत्वाच्या असल्याचे नमूद करून ते म्हणाले, नैसर्गिक शेतीमुळे मातीत वाढणारी गांडुळे जमिनीत 10 फूट खोल पर्यंत छिद्रे तयार करतात, ज्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते. देशी गांडुळाच्या प्रजाती आपल्या आयुष्यात 40 ते 50 हजार गांडुळे तयार करतात. त्यांच्या जीवनचक्राच्या शेवटी जमिनीला 17 प्रकारचे पोषक घटक मिळतात. जीवामृताच्या वापरामुळे जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. देशी गायीच्या शेणात उपयुक्त जिवाणू मोठ्या प्रमाणात असतात. शेण, गोमूत्र, गूळ, डाळीचे पीठ व मोठ्या वृक्षाखालची रसायनरहित माती मिसळून जीवामृत 5 दिवसांत तयार होते. उरलेल्या शेणापासून घनजीवामृत तयार करता येते. यामुळे उत्पादन वाढते आणि पौष्टिक अन्न मिळते.

राज्यपाल पुढे म्हणाले, रासायनिक शेती पद्धत पाश्चात्य देशांकडून आलेली आहे. एकेकाळी भारतीय जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनची मात्रा सुमारे 1.5 टक्के होती, ती आता 0.5 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. हा घटक जमिनीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो कमी झाल्याने जमिनी पडीक पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच रासायनिक शेती खर्चिक असल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. पूर्वी शेतकरी पारंपरिक वाण टिकवत असत. ते पुन्हा टिकवले नाहीत तर परदेशी वाणांवर अवलंबून राहावे लागेल आणि त्यांची बाजारातील मनमानी वाढेल. त्यामुळे कृषी विद्यापीठांनी पारंपरिक वाणांचे अधिक संशोधन करून ते हवामान बदल व रोगांना प्रतिरोधक करण्याची गरज आहे.

जैविक आणि नैसर्गिक शेतीतील फरक सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, जैविक शेतीमध्ये एक टन शेणखतात फक्त 2 किलो नायट्रोजन असते, तर एक एकर शेतीसाठी 60 किलो नायट्रोजनची गरज असते—म्हणजे दीडशे क्विंटल वर्मी कंपोस्ट लागतो. शिवाय यासाठी अधिक मनुष्यबळ लागते आणि मिथेनसारखे घातक वायू तयार होतात. त्यामुळे नैसर्गिक शेती हा अधिक उपयुक्त पर्याय आहे. जंगलातील वृक्ष कोणत्याही रासायनिक खताविना सदाहरित राहतात याचा उल्लेख करून त्यांनी निसर्गाकडे परतण्याचे आवाहन केले.

राज्यपालांनी देशी गायींच्या संगोपनातून मिळणाऱ्या दुध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पन्नाचे महत्त्वही अधोरेखित केले. शेतकऱ्याला पीकांच्या नुकसानीपासून सावरण्यासाठी पशुपालन उत्तम जोडव्यवसाय असल्याचे सांगून पशुसंवर्धन विभागाने अधिक दूध देणाऱ्या देशी गायींचे ब्रीड विकसित करण्यासाठी अधिक संशोधन करावे, असे त्यांनी सांगितले.

नैसर्गिक शेती परिषदेच्या माध्यमातून उपयुक्त माहिती घेत ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करून राज्यपाल म्हणाले, नैसर्गिक शेती परिषदेकडे केवळ औपचारिक आयोजन म्हणून न पाहता, त्यातून नैसर्गिक शेतीच्या प्रसारासाठी उपयुक्त सूचना पुढे याव्यात अशी अपेक्षा आहे. देशातील कृषी क्षेत्रातील वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर या विषयावर सखोल चर्चा आवश्यक आहे. रासायनिक शेतीची पद्धत न बदलल्यास भविष्यात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल. विविध अभ्यासांमधून नैसर्गिक शेती रासायनिक शेतीपेक्षा फायदेशीर ठरू शकते, हे सिद्ध झाले असल्याने कृषी क्षेत्राशी संबंधित अधिकारी, संशोधक, शास्त्रज्ञांनी नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले. बियाणांमधील गुणवत्ता कायम रहावी, त्यांच्यात रोगप्रतिकार क्षमता अधिक असेल आणि उत्पादकताही चांगली असेल अशारितीने कृषी विद्यापीठांनी परंपरागत बियाणांना अधिक उत्पादनाच्यादृष्टीने उन्नत करावे, असे आवाहनदेखील श्री.देवव्रत यांनी केले.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, आज कृषि बाजारपेठेत उत्पादनापेक्षा गुणवत्तेला महत्त्व मिळत असल्याने शेतीत परिवर्तन करण्याची गरज आहे. शास्त्रज्ञ व कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून द्यावे. कृषी विभाग भविष्यात नैसर्गिक शेतीच्या प्रसारासाठी सकारात्मक काम करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राज्यपाल महोदयांनी आपल्या गुरुकुलातील 200 एकर शेतीत नैसर्गिक शेती यशस्वीरीत्या केली असून, ते या क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावत आहेत. त्यांचा अनुभव राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

कृषि विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी राज्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची भूमिका मांडली. महाराष्ट्राने यादिशेने प्रयत्न सुरू केले असून नैसर्गिक शेतीचे क्षेत्र वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जनाची नव्हे मनाची लाज असेल तर राजीनामा द्या:अंजली दमानियांचा अजित पवारांवर घणाघात

पुणे -सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनाची लाज असेल तर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी केली. दमानिया यांच्या या मागणीमुळे पुण्यातील मुंढवा भूखंड प्रकरणात अडकलेल्या पार्थ पवार यांच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. पार्थ हे अजित पवारांचे सुपुत्र आहेत.

अंजली दमानिया आज मुंढवा येथील जमीन पाहण्यासाठी गेल्या होत्या. पण प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, मुंढवा येथील जमिनीची माहिती घेण्यासाठी मी आले होते. पण आत गेटमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांनी मला तिथे जाण्याची परवानगी नाकारली. मी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधला. त्यांनी माझ्याशी अर्वाच्य भाषेत परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांनी कुणाच्यातरी दबावाखाली ही परवानगी नाकारल्याचा संशय आहे. पण मी या सर्व गोष्टींचा किस पाडणार आहे. मी आज या प्रकरणाची सर्व माहिती घेऊन उद्या पत्रकारांना देईन.

अजित पवार यांनी यापूर्वीच मुंढवा भूखंड खरेदी विक्रीचा व्यवहार रद्द करण्यात आल्याचा दावा केला आहे. अंजली दमानिया यांनी त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्या म्हणाल्या, अजित पवार हा व्यवहार रद्द करणारे कोण आहेत? मुळात उपमुख्यमंत्री हे पदच घटनाबाह्य आहे. हे पदच अस्तित्वात आहेत. ते अर्थमंत्री आहेत. अर्थ मंत्रालयाच्या नियम पु्स्तिकेनुसार त्यांना आपल्या खात्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत पडू शकत नाहीत. कोणताही व्यवहार हा त्याच्या कायद्याने रद्द होतो. 5 कायदे सेल डीड रद्द करण्याची परवानगी देतात त्याच्या सेक्शन प्रमाणे सेक्शन 16 ऑफ स्पेसिफिक रिलिफ अॅक्टनुसार जर दोन व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कोणताही अधिकार नाही.

त्या म्हणाल्या, आत्ताच्या घडीला सुरुवातीला सांगितले गेले गेले की, 21 कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार. त्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, हा आम्हाला पैसे नकोत. आम्हाला तो व्यवहार रद्द करून हवा. त्याच्यापुढे ते म्हणतात, 21 कोटी नव्हे 42 कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार. पण लिगली हा व्यवहार ना अजित पवार रद्द करू शकतात ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रद्द करू शकतात ना पंतप्रधान नरेंद्र मोदी रद्द करू शकतात. कुणाकडेही ते अधिकार नाहीत.

कारण, यात फ्रॉड झाला आहे. त्यामुळे यात सिव्हिल कोर्ट यातील गैरव्यवहार तपासत नाही तोपर्यंत हा व्यवहार कुणीही रद्दबातल करू शकत नाही. सरकारने यासंबंधी एखादी कारवाई केली तर मी त्याला हायकोर्टात आव्हान देईन, असे दमानिया म्हणाल्या.

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, मला आत्ता बऱ्याच ठिकाणावरून बरीच माहिती गोळा करायची आहे. त्यामुळे मी आता कुठे जात आहे व कुणाला भेटणार आहे हे मी काही सांगू शकत नाही. उद्या पत्रकार परिषदेत या सर्व गोष्टी सांगेन. कोणत्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तत्काळ राजीनामा देतो. अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यात मी आरोप केले होते तेव्हा त्यांनी सायंकाळी 5 वा. अचानक राजीनामा दिला होता.

पण आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत. पुण्याचे पालकमंत्री आहेत. असे असताना सरकारने पुण्याच्या अधिकाऱ्यांचा भरणा असलेली एक चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीकडून निष्पक्ष चौकशीची कशी अपेक्षा ठेवावी हा प्रश्न आहे. त्यामुळे अजित पवारांनी मनाची लाज असेल तर तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे दमानिया म्हणाल्या.

आमदार योगेश टिळेकर यांच्या पुढाकाराने कोंढव्यातील 23 कोटींचा विकासकामांचा शुभारंभ संपन्न

पुणे – प्रभाग क्रमांक ४० मधील काकडे वस्ती ते ह.भ.प. पुंडलिक दादा टिळेकर चौक या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन राज्य राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. २३ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे कोंढवा परिसराचा चेहरामोहराच बदलणार आहे.यावेळी बोलताना आमदार योगेश टिळेकर यांनी प्रभागातील सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांची माहिती दिली. “देशात-राज्यात भाजपचे सरकार आणि महानगरपालिकेतही भाजपची सत्ता असल्यासच विकासाची गंगा प्रत्येक घरापर्यंत पोहोचू शकते,असे सांगत येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.टिळेकर यांनी पुढील काळात आणखी अनेक कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले. आपल्या मनोगतामध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, “योगेश टिळेकर यांच्यासारख्या कार्यक्षम व्यक्तीला विधान परिषद सदस्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत योग्य निर्णय घेतला. त्यांच्या नेतृत्वामुळेच राज्य शासनाचा मोठा निधी या भागाला मिळाला आहे.” त्या पुढे म्हणाल्या की कात्रज-कोंढवा रोड लवकरच पूर्ण होत असून बाधितांना रोख मोबदला देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने हा रस्ता नागरिकांसाठी लवकरच खुला होईल. व याभागातील वाहतुकीची समस्या लवकरच सुटेल या कार्यक्रमाला माजी नगरसेविका रंजना टिळेकर, मनीषा कदम, राणी भोसले, वीरसेन जगताप, वृषाली कामठे, राजाभाऊ कदम, सुनील कामठे, रायबा भोसले, चेतन टिळेकर, करण मिसाळ, अभिजीत शहा यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजस्थानच्या माउंट अबूमध्ये पारा शून्य

0

डोंगराळ भागातून वाहणाऱ्या बर्फाळ वाऱ्यांमुळे थंडीने कहर करायला सुरुवात केली आहे. दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये तापमान झपाट्याने घसरत आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात, पारा उणे ८ अंशांपर्यंत घसरला आहे, ज्यामुळे धबधबे आणि तलाव गोठले आहेत.

२०२१ नंतर पहिल्यांदाच, नोव्हेंबरमध्ये राजस्थानमधील पारा ५ अंशांपेक्षा कमी झाला आहे. फतेहपूरमध्ये गेल्या २४ तासांत ४.९ अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवले गेले. १५ शहरांमध्ये ५ ते १० अंशांदरम्यान तापमान नोंदवले गेले. माउंट अबूमध्ये, १५ वर्षांत प्रथमच नोव्हेंबरमध्ये पारा शून्यावर पोहोचला आहे. यामुळे दव थेंब गोठले आहेत. गेल्या वर्षी, १० डिसेंबर २०२४ रोजी माउंट अबूमधील दव थेंब पहिल्यांदाच बर्फात रूपांतरित झाले.

मंगळवारी मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदूर आणि राजगढसह २६ जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. इंदूरमधील शाळांच्या वेळा आजपासून सकाळी ९ वाजता करण्यात आल्या आहेत. भोपाळमध्ये नर्सरी ते आठवीच्या शाळांना सकाळी ८:३० नंतर सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सोमवारी दिल्लीत तीन वर्षातील सर्वात थंड सकाळ अनुभवली. सोमवारी सकाळी दिल्लीतील किमान तापमान ८.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. नोव्हेंबरमधील याआधीचे सर्वात कमी तापमान २९ नोव्हेंबर २०२२ रोजी ७.३ अंश सेल्सिअस होते. मंगळवारीही धुके कायम राहिले.
मध्य प्रदेशात कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. भोपाळ, इंदूर आणि राजगड येथे मंगळवारी तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, देवास, झाबुआ, छिंदवाडा, सागर, शहडोल आणि खंडवा येथे शाळा उघडण्याचे तास वाढवण्यात आले आहेत. सोमवारी राज्यातील नऊ शहरांमध्ये तापमान १० अंशांपेक्षा कमी झाले. राजगडमध्ये सर्वात कमी ५ अंश तापमानाची नोंद झाली.सोमवारी, राजस्थानमध्ये थंडीच्या लाटेच्या प्रभावामुळे तापमान ५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले. दिवसभर थंडी वाढत असल्याने, राजस्थानातील बिकानेर, जोधपूर, बारमेर आणि फलोदी वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहिले. हवामान खात्याने १८ नोव्हेंबर रोजी पाच जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील पाच दिवस राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, थंडीपासून आराम मिळणार नाही.

संघर्ष वादळाचा..

सलग सात वेळा महापालिका निवडणूक निवडून आलेले,म्हणजे ३५ वर्षे कॉंग्रेसचे नगरसेवक अशी ज्यांची कारकीर्द ते आज कॉंग्रेस पक्षात नाहीत.अन कोणत्याच पक्षात नाहीत.आपल्या वार्डात चांगली उद्याने,चांगली अत्याधुनिक शाळा आणि दर वर्षी काशीयात्रा काढणारे म्हणजे ३५ वर्षातील कारकिर्दीत ज्यांनी ३० वर्षे सुमारे ४० हजार नागरिकांना काशी यात्रा मोफत घडविली.सारी हयात ज्यांनी नवनवीन योजना वार्डात आणण्यासाठी कल्पकता लाऊन काम केले.राज्यभरात मोफत यात्रांचे जे जनक ठरले,कलमाडी वगळता कॉंग्रेसच्या एकही नेत्याने केला नाही असा दर वर्षी नवरात्रौत्सव साजरा करून ज्यांनी कला संस्कृती आणि उत्सव परंपरेला एक चांगले रूप दिले.ते आबा बागुल…विधानसभा निवडणुकीत अवघे १० हजार मते घेऊन पडावेत ?…पक्ष गेला,पद गेले,सारे काही गेले पण अजूनही संघर्ष सुरु आहे या वादळाचा..

कॉंग्रेस पक्षाने त्यांना ३५ वर्षाच्या कारकिर्दीत सत्ता असताना नगरसेवकांनाच देतात अशा पदांपैकी स्थायी समिती अध्यक्ष पद आणि  अर्धसत्ता असताना म्हणजे आघाडी असताना उपमहापौर पद दिले, आणि सत्ता नसताना गटनेते पद दिले. एवढ्या वर्षे नगरसेवक म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आमदार व्हावेसे वाटणार नाही काय ? आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात निव्वळ कॉंग्रेसच्याच नव्हे तर अन्य पक्षांच्या बड्या बड्या नेत्यांनीही आबा बागुलांचे भरभरून कौतुक करून आबा ने आता आमदार व्हायलाच हवे अशी हवाही भरलेली.चौथीत पास झालेल्या विद्यार्थ्याने हायस्कूल प्रवेश घेण्याचा अट्टाहास का धरु नये काय ?असाच अशा स्वरूपाचा इथे प्रश्न होता…अडचण होती शरद पवारांची म्हणजे आघाडीतील घातक आणि घटक पक्षांची…राजीव गांधींची सर्वात मोठी चूक कुठे झाली असेल तर ती औरंगाबादच्या सभेत त्यांनी शरद पवारांना सोबत घेतले. राष्ट्रवादीशी आघाडी कॉंग्रेसने केली.आणि त्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रवादीने कधी मोठे होऊ दिले नाही.राष्ट्रीय पक्ष असलेल्या आणि स्वातंत्र्य चळवळीत एक महत्वाचा पक्ष असलेल्या कॉंग्रेसला आणि राज्यातील कॉंग्रेसच्या छोट्या बड्या नेत्यांना कार्यकर्त्यांना…ज्यांचे थेट दिल्लीशी थेट संधान असलेले कॉंग्रेसचे नेते पुण्यात होते त्या काकासाहेब गाडगीळ,बॅरीस्टर गाडगीळ,जयंतराव टिळक यांच्या नंतर…शरद पवारांच्या मोटीला बांधले गेले हे वास्तव आहे.केंद्रात गृहमंत्री राहिलेले शंकरराव चव्हाण जेव्हा एकदा पुण्याच्या कॉंग्रेस भवनात आले तेव्हा कलमाडी नावाच्या पवारांच्या चेल्याने कॉंग्रेस हाउस ला कुलूप लावून ठेवले होते.शंकरराव यांच्या निष्ठेवर इतिहासात देखील कोणी शंका घेऊ शकणार नाही असा खमक्या नेता.पण शरद पवारांशी संधान करण्याच्या निर्णयाने त्यांची सुद्धा अवस्था अशी झाली होती.राज्यात कॉंग्रेस कोणी सर्व प्रथम हाणून पडली असेल तर ती कॉंग्रेसच्या दिल्लीश्वरांनी जवळ केलेल्या शरद पवारांनीच.बरे ते स्वतः या पक्षात राहणार नव्हते आणि राहिलेही नाहीत मात्र कॉंग्रेसच्या सहाय्याने त्यांनी आपला पक्ष घडविला.कॉंग्रेस मध्ये आपल्याला माननारी नेते मंडळी पेरली प्रशासनात पुण्याच्या कलेक्टर पासून ते दिल्लीतील पी एम ओ कार्यालयापर्यंत स्वतःचे असे आय ए एस,आय पी एस बसवून ठेवले.त्यामुळे भाजपने नाही तर सर्वप्रथम कॉंग्रेस खोकली करण्याचे काम राज्यात कोणी केले असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेसने केले असेच म्हणावे लागेल.भाजपचे मुरलीधर मोहोळ नगरसेवक होते,तातडीने सलग २ वेळा स्थायी समिती अध्यक्ष आणि कॉंग्रेसच्या गिनतीत पकडले तर २ वेळा महापौर…म्हणजे ते सुमारे अडीच वर्षे महापौर होते म्हणून २ वेळा म्हटले…पण ५ वर्षात भाजपने त्यांना एवढे खंबीर करून ठेवले कि शहरभर डंका पिट्वून ते खासदार झाले आणि नंतर त्याच भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रीपद देऊन शहरचे नेतृत्व हि बहाल केले. जुन्या जाणत्यांना दूर करून स्वतःमधील वेगळ्या कौशल्याची दखल त्यांनी दाखविली आणि भाजपा नेतृत्वाने त्यांची दखल घेतली.नशीब बिशिब काही नाही …ते कसब ते कौशल्य अण्णा जोशीपासून ते अरविंद लेले सोडा तर प्रदीप रावत आणि अनिल शिरोळे यांच्यातही नव्हते. कॉंग्रेसचे वेगळे काही होऊ शकले नव्हते त्याला शरद पवार कारणीभूत होते,कॉंग्रेसचे अनेक  नेते स्थानिक स्तरावर होते पण ते कायम आपापल्या वार्डात,मतदार संघातच रमले,त्यांनी कधी मोठे स्वप्न पाहिलेच तर पवारांची आघाडी ते लीलया उध्वस्त करून टाकी.बागवे गृहराज्यमंत्री झाले तेव्हा गृहमंत्री राष्ट्रवादी चे होते.

पुण्याच्या पोलीस कमिशनरपदावर भाजपा प्रेमी बसवले आणि बागवे त्यांच्यात शीत युध्द जारी ठेवले गेले.पुढे हेच कमिशनर अन्य राज्यातून भाजपचे खासदार झाले.कलमाडींना दीपक मानकर भारी होऊ लागले आणि अध्यक्षपदाच्या शर्यतीतून मानकरांचे नाव उडविले गेले.आणि संतप्त मानकर कॉंगेस मधून बाहेर पडले.कॉंग्रेसचे अनेक आमदारही आघाडीने हळूहळू घरी बसवले हे वास्तव आहे. विठ्ठल पाटील तुपे जे जनता पक्षातून येऊन कॉंग्रेसचे खासदार देखील झाले होते आज त्यांचे पुत्र देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत.थोपटे,थिटे,मोझे असे अनेक नेते लयास गेले.ढोले पाटील राष्ट्रवादीत गेले ,

आबा बागुल तर फारच तृष्ट पद्धतीने यात भरडले गेले. त्यांना ज्या पर्वती मतदार संघातून आमदार व्हायचे होते तिथे कायम आघाडीत तो राष्ट्रवादीला दिला गेला आणि राष्ट्रवादीच्या एका गटाने बागुलांची नाराजी समोर करत आतून भाजपचा हा बालेकिल्ला बनवला.आणि आता तर पुढे कोणाची मदत नको म्हणूनच भाजपने या मतदार संघाला मंत्रीपद देखील दिले आहे. .विशेष म्हणजे कसबा मतदार संघातून ज्यांनी कॉंग्रेस पक्षाला राम राम ठोकत कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी  केली त्या कॉंग्रेसने पहिल्या महिला महापौर बनविलेल्या व्यवहारे याचे निलंबन मागे घेत कॉंग्रेसने पुन्हां त्यांना सन्मानाने पक्षात घेतले देखील.पण आबा बागुलांना आपण भर सभेत उमेदवारीचे शब्द दिले होते त्याची जाणीव न ठेवता,पक्षाने त्यांचे केलेले निलंबन मागे घेण्याची मानसिकता देखील कॉंग्रेसचेच तेच नेते दाखवायला देखील तयार नाहीत.यापेक्षा दुर्दैव कुठले. निष्ठावंतांवर असे घाव होत असलेले पाहून कुठला कार्यकर्ता अशा नेत्यांचे,पक्षाचे हात बळकट करेल.

स्वातंत्र्य चळवळीतील पक्ष,देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्यांचा हा पक्ष  आणि त्या पक्षात ४०/ ४० वर्षे काम करणारांची हि अवस्था..? 

आता सांगा या पक्षाची वाताहत कोणी लावली ?पक्ष म्हणजे काय असतोय ? कार्यकर्ता नसतोय ? कार्यकर्ता हाच पक्ष असतोय…आणि तोच कार्यकर्ता वादळाच्या घेऱ्यात असेल तर पक्षही वादळाच्या घेऱ्यात सापडल्याशिवाय राहनार नाही?