Home Blog Page 3027

अमोल पालेकर यांना ‘झेनिथ एशिया सन्मान’ जाहीर

0

पुणे : ’शेजारचा सखासोबती’ अशी मोहक प्रतिमा निर्माण करणारा अभिनेता आणि स्त्रीच्या
संवेदनशील व्यक्तिरेखांचा विस्तार करणारा तरल चित्रपट दिग्दर्शक म्हणून
नावलौकिक मिळविलेल्या अमोल पालेकर यांना आशय फिल्म क्लबतर्फे ‘झेनिथ एशिया सन्मान’
प्रदान करण्यात येणार आहे.
9वा आशियाई चित्रपट महोत्सव दि. 24 ते 30 डिसेंबर दरम्यान पर्यटन आणि
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय
चित्रपट संग्रहालय आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया, एशियन फिल्म
फौंडेशन, मुंबई तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फिल्म अँन्ड टेलिव्हीजन
इन्स्टिट्यूटच्या सक्रीय सहयोगाने रंगणार आहे. या महोत्सवाचे उदघाटन
सोमवार दि. 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त प्रख्यात आसामी आणि
हिंदी चित्रपट दिग्दर्शक जानू बरूआ यांच्या हस्ते होणार असून, उदघाटनानंतर
संध्याकाळी ७.०० वाजता, काझीम ओझ दिग्दर्शित ’झेर’ हा तुर्की चित्रपट
उद्घाटनाचा चित्रपट म्हणून दाखविण्यात येणार आहे. या महोत्सवानिमित्त
देण्यात येणारा ‘झेनिथ एशिया सन्मान अमोल पालेकर
यांना नवसिनेमाचे प्रणेते कुमार शाहनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार
आहे. तसेच दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
मंगळवार दिनांक २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता, अर्काइव्ह थिएटर,
लॉ कॉलेज रोड, पुणे येथे
हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आह, अशी माहिती आशय फिल्म क्लबचे प्रमुख
आणि ९व्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे संयोजक सतीश जकातदार आणि वीरेंद्र
चित्राव यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या सात दिवसीय चित्रपट
महोत्सवात विविध विभाग करण्यात आले असून, चित्रपटांमधील कलावंत आणि
दिग्दर्शक यांच्याशी संवाद आणि खुली चर्चा हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण
असणार आहे. त्यातील ‘इंडियन व्हिस्टा’ या विभागात गेल्या दोन वर्षात
राष्ट्रीय स्तरावर गाजलेले भारतीय भाषांमधील चित्रपट दाखविण्यात येणार
आहेत. त्यामध्ये बंगाली, आसामी, मल्याळम, ओडिया, मणीपुरी अशा विविध
भाषांमधील चित्रपटांचा समावेश आहे. ‘ऑफबीट बॉलीवूड’ या विभागात २०१७-१८
या वर्षातील लव्ह अँन्ड शुक्ला, तीन मुहर्त, भोर हे वेगळ्या धाटणीचे
चित्रपट पाहता येणार आहेत. ‘सिंहावलोकन’ या विभागात डॅन वुल्मन या
इस्रायली दिग्दर्शकाच्या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. डॅन वुल्मन
यांना गोवा चित्रपटमहोत्सवात जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आल्याच्या
निमित्त त्यांचा सन्मान म्हणून त्यांचे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. तर
मराठी चित्रपट सृष्टीवर राज्य करणारे पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगुळकर आणि
सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दिनिमित्त त्यांना आदरांजली म्हणून या तिघांचा
‘जोहार मायबाप जोहार’ हा संतपट दाखविला जाणार आहे. या महोत्सवात
रसिकांना चार नवीन इराणी चित्रपटांचा आणि गतवर्षात गाजलेल्या ‘फर्जंद’,
‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’, ‘पुष्पक विमान’ आणि ‘आरॉन’ या मराठी
चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. ‘स्पेक्ट्रम एशिया’ विभागात वेगवेगळ्या
आशियाई देशातील संस्कृती आणि जीवनशैली मांडणारे आठ चित्रपट दाखविले जाणार
आहेत.
या महोत्सवाचा समारोप प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे
आणि आशियाई फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम यांच्या प्रमुख
उपस्थितीत रविवार दिनांक ३० डिसेंबर रोजी, संध्याकाळी ६.३०वाजता होणार
आहे. या चित्रपट महोत्सवाची सांगता मिलिंद लेले दिग्दर्शित आणि मुक्ता
बर्वे, शरद पोंक्षे ’’अभिनीत बंदिशाळा’’ या नवीन चित्रपटाच्या प्रथम प्रदर्शनाने  होणार आहे

खमक्या नेतृत्वा अभावी पुणे महापालिकेत सावळा गोंधळ -खासदार काकडे

पुणे- खमके नेतृत्व नसल्यानेच पुणे महापालिकेत सावळा गोंधळ कारभार असून विकास कामांना नियोजना अभावी गती मिळालेली नसल्याचा आरोप आज येथे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केला .त्याच बरोबर आपण लोकसभेची निवडणूक लढविणार असून जनतेला उत्तरदायी असू असे त्यांनी वक्तव्य केले आहे . खासदार काकडे यांच्या या वक्तव्यांनी राजकीय धुराळा उठणार आहे . एकीकडे भाजप मला उमेदवारी देईलच असे ते म्हणत असले तरी .. त्यांचा निर्धार हा कोणत्याही स्थितीत निवडणूक लढविण्याचाच  दिसत आला आहे. त्यांनी सुरु ठेवलेल्या सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांच्या गाठी भेटीतून हा निर्धार प्रसंगी उमेदवारी नाकरली तर भाजपला आव्हान देणारा ठरेल काय हे आता पाहावे लागणार आहे .

राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी लोकसभा निवडणुकीसाठीच्या मोर्चे बांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर खासदार संजय काकडे यांनी विधानसभा मतदार संघनिहाय भेटीगाठीस सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून खासदार काकडे आज वडगावशेरी मतदार संघात आले होते. नगररोड कट्ट्यावर मान्यवरांशी विविध विषयांवर चर्चा, दत्त जयंती उत्सवाला उपस्थिती आणि मतदार संघातील मान्यवरांच्या भेटी घेतल्या. खासदार काकडे यांच्या या झंझावती दौऱ्यामुळे ऐन थंडीच्या दिवसात वडगावशेरी मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले.
नगररोड कट्ट्यावर मनसेचे बाबु वागस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील टिंगरे, भाजपचे नगरसेवक राहुल भंडारे, नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे, काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे, भीमराव गलांडे, सुनील मलके, नितीन भुजबळ, नानासाहेब नलावडे, दयानंद अडागळे, रमेश सकट, राजकुमार ढाकणे, जितेंद्र भोसले, मोहन शिंदे, रमेश आढाव आदी मान्यवर उपस्थित होते. कट्ट्याला भेट दिल्यानंतर नगरसेवक बापुसाहेब कर्णे गुरुजी यांनी आयोजित केलेल्या दत्त जयंती उत्सवाला भेट दिली. त्यानंतर वडगावशेरी मतदार संघातील भीमराव गलांडे व नारायण गलांडे यांच्या घरी भेट दिली.
व्यावसायिक व्यक्तीला प्रोफेशनलपणे काम करण्याची व कमिटमेंट पाळण्याची सवय असते. त्यामुळे व्यावसायिक व्यक्ती राजकारणात आली तर, जुमलेबाजी न करता प्रोफेशनली काम करण्यावर त्यांचा भर असतो, असे खासदार काकडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा त्रास येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुले यांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले आहे. याविषयी खासदार काकडे यांना प्रश्न विचारण्यात आल्यावर पुणे महापालिकेत सावळा गोंधळ सुरु आहे. खमक्या नेतृत्व नसल्याने आणि कामांचे नियोजन होत नसल्याने पुण्यातील विकासकामांना अपेक्षित ती गती मिळत नाही, असे सांगून विकासाची कामेच यापुढचं राजकारण ठरवतील, असेही खासदार काकडे यांनी सांगितले.
लोकसभेतून निवडून आल्यानंतर मी जनतेला उत्तरदायी असेल. त्यामुळे पुण्याच्या विकासासाठी लोकसभा निवडणूक लढविणार आहे. खासदार झाल्यानंतर एका वर्षात पुण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार. मध्यवर्ती पेठांसह सर्व उपनगरांना मिळणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून पुरेसा पाणीपुरवठा शक्य आहे. फक्त त्यासाठी नियोजन करुन निर्णय घेण्याची गरज आहे, असेही खासदार संजय काकडे म्हणाले.
खासदार काकडे यांच्या वडगावशेरी मतदार संघातील भेटीगाठीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले.

शरीर, मनाच्या तंदुरुस्तीसह सृजनशीलतेला प्राधान्य द्या- अभिनेता शर्मन जोशी

0
पुणे : “चित्रपट सृष्टीत येताना शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्त असणे फार गरजेचे आहे. आपला आहार, व्यायाम यावर नीट लक्ष देण्यासह आपल्यातील सृजनशीलता विकसित करत राहणे खूप महत्वाचे असते. या क्षेत्रात करिअर करताना संघर्ष करावा लागतो. तो करण्याचीही तयारी असावी,” असा सल्ला सिनेअभिनेता शर्मन जोशी याने विद्यार्थ्यांना दिला.
 
थ्री इडियट्समधील राजू अर्थात अभिनेता शर्मन जोशी याने बावधन येथील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी तामिळी अभिनेत्री ऐश्वर्या देवन, दिग्दर्शक धीरज कुमार, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया, समूह संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शैलेश कासंडे आदी उपस्थित होते.
 
विद्यार्थ्यांशी आणि कलाकारांशी झालेल्या संवादादरम्यान वेगवेगळ्या गप्पा रंगल्या. शर्मन जोशीने सांगितलेले अनुभव आणि थ्री इडियट्समधील ‘कम्मो की शादी हुई की नही?’ हा त्याचा संवाद (डायलॉग) ऐकून विद्यार्थी भारावून गेले. चित्रपट क्षेत्रातील करिअरविषयी विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. विद्यार्थ्यांनी कलाकार आणि सिनेसृष्टीविषयी अभ्यास करुन साकारलेल्या पोस्टर्सने परिसर सजवला होता. हे सगळे पाहून कलाकार प्रभावित झाले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
 
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमध्ये वर्षभर विविध उपक्रम आयोजिले जातात. अनेक विद्यार्थ्यांत असलेल्या अंगभूत कलांना बाहेर काढण्यासाठी या क्षेत्रातील व्यक्तींचे मार्गदर्शन बहुमोल ठरते.”

…तर अधिकाऱ्यांना सार्वजनिक मुताऱ्यांमध्ये डांबणार : माजी उपमहापौर आबा बागुल

0

पुणे –
स्वच्छतेत पुण्याला अव्वल ठरविण्यासाठी कंबर कसलेल्या पुणे महानगरपालिकेला स्वच्छता सर्वेक्षणात सार्वजनिक मुताऱ्यांची दुरावस्था कशी काय दिसत नाही ? असा सवाल करून माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी ”स्मार्ट सिटीच्या गप्पा बंद करा ;आधी सार्वजनिक मुताऱ्यांची स्वच्छता सुधारा” अशा शब्दात पालिका प्रशासनाला सुनावले आहे. इतकेच नाही तर जर हा प्रश्न तातडीने सुटला नाही तर अधिकाऱ्यांना या मुताऱ्यांमध्ये कोंडून ठेवण्याचे आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
यासंदर्भांत आयुक्तांना दिलेल्या पत्रात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे कि, महापालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षणची मोहीम सद्यस्थितीत जोमात सुरु आहे ;पण शहरातील विविध सार्वजनिक मुताऱ्यांची अवस्था काय ? याकडे या सर्वेक्षणात दुर्लक्ष होत आहे. या मुताऱ्यांची अवस्था इतकी खराब आहे कि, त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे अशी वस्तुस्थिती आहे. दुर्गंधी , घाण असूनही नागरिकांना नाइलाजास्तव त्याचा वापर करावा लागत आहे. एकप्रकारे नरकयातना भोगाव्यात अशी स्थिती या मुताऱ्यांची झाली आहे.केवळ नव्या सार्वजनिक मुताऱ्या उभारून हा प्रश्न सुटणार नाही तर आधी स्वच्छतागृहांचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. आरोग्य कोठीनिहाय या मुताऱ्यांच्या स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. पाणी, स्वच्छता आणि देखभालसाठी तरतूद करून या मुताऱ्यांची स्थिती सुधारावी मग त्यानंतरच स्वच्छता सर्वेक्षण असो किंवा स्मार्ट सिटीच्या गप्पा माराव्यात. जर तात्काळ कार्यवाही न झाल्यास या दुर्गंधीयुक्त आणि आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या शहरातील या मुताऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांना कोंडण्याचे आंदोलन करावे लागेल, असा इशारा आबा बागुल यांनी दिला आहे.

ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पाषाण-सूस रोड येथे दि. 23 रोजी ‘न्यू ईअर फेस्ट’

0

पुणे- ख्रिसमस आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रविवार, दि. 23 डिसेंबर 2018 रोजी पुण्यातील पाषाण परिसरातील सुस रोड येथील लोकसेवा ईस्कूल येथे दुपारी 2 ते रात्री 10 या वेळेत ‘न्यू ईअर फेस्ट-फूड, फन, शॉप अ‍ॅन्ड सेलिब्रेट’ याचे आयोजन करण्यात आले आहे. तारका फाउंडेशनचे आशिष कांटे व सहकारी यांनी याचे आयोजन केले आहे.

यामध्ये सुमारे 3 एकर जागेत बच्चे कंपनीसाठी सांताक्लॉज आणि जंपिंग राईड्स, वॉटर राईड, उंट व घोड्यावरून सफर, बग्गीची फेरी आदी आकर्षणे असतील. ‘संगीत सम्राट’ हा प्रख्यात बँड रसिकांचे मनोरंजन करेल. याबरोबरच मराठी व हिंदी चित्रपट कलावंतांची हजेरी हे देखील विशेष आकर्षण असणार आहे. यासोबतच लकी ड्रॉ, क्वीझ स्पर्धा, पार्टी गेम्स् यांचा आनंद सर्वांना लुटता येईल.

या न्यू ईयर फेस्ट मध्ये विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल्स् असणार असून महिला उद्योगांसाठी प्रोत्साहन म्हणून विविध स्टॉल्स देण्यात आले आहेत. त्यामध्ये कुर्ते, चांदीचे दागिने, खेळणी, इमिटेशन ज्वेलरी अशी विविध विक्री दालने देखील असतील. सांताक्लॉज बरोबर फोटो काढण्यासाठी तेथे सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आला आहे.

याप्रसंगी पुणे व पिंपरी चिंचवड वृत्तपत्र विक्रेता संघाच्या नवनिर्वाचित 20 पदाधिकार्‍यांचा स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन आशिष कांटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी skeventspune.com या वेबसाइटवरती संपर्क साधावा.

चांदणी चौकाचे काम आठवडाभरात सुरू होणार – गिरीश बापट

0

पुणे  :  चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपूलाचे काम आठवडाभरात सुरू करण्याचे आदेश हैदराबाद येथील कंपनीला देण्यात आले आहेत. अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

पालकमंत्री या नात्याने नवी दिल्ली येथे सतत पाठपुरावा केल्यानंतर केंन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन विशेष बाब म्हणून या प्रकल्पाला मान्यता दिली. त्यामुळे  चांदणी चौकातील उड्डाणपूल व रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. नियोजित वेळेत हे काम पूर्ण होईल व तेथील वाहतूक कोंडी संपुष्टात येईल असा विश्वासही बापट यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की , हैदराबाद येथील एनसीसी या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. तशी वर्क ऑर्डर भारतीय राजमार्ग राष्ट्रीय प्राधिकरणाने काल दिली. पहिल्या टप्प्यात तीनशे सत्याण्णव कोटी रूपयांची कामे पुर्ण करावे. असे आदेश एनसीसी कंपनीला देण्यात आले आहेत. कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर येत्या आठवडाभरात हे काम सुरू होईल. चांदणी चौकाचे हे काम एकूण ४९५ कोटी रूपयांचे आहे. त्यासाठी लागणारे भूसंपादन महापालिकेने करायचे आहे. महापालिकेने एकूण पंचाऐंशी टक्के भूसंपादन यापूर्वीच केले आहे. उरलेल्या पंधरा टक्के भूसंपादनाची प्रक्रिया अंतीम टप्यात आहे. शंभर टक्के भूसंपादन झाल्याशिवाय केन्द्रीय महामार्ग खाते काम सुरू करण्यास तयार नव्हते. पालकमंत्री या नात्याने श्री गडकरी यांच्याशी चर्चा केल्यावर या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला.

मुंबई पुणे,हिंजवडी  आयटी पार्क. बंगलोर हायवे या रस्यावरील वाहतूक अधिक गतिमान होण्यासाठी हा प्रकल्प उपयोगी पडेल. पुणेकरांना दिलेल्या आणखी वचनांची पूर्तता होत आहे याचा भारतीय जनता पक्षाला अभिमान वाटतो.

भारतीय संस्कृती ज्ञानाचे दालन -प्रकाश हिंदूजा यांचे प्रतिपादन; जगातील सर्वात मोठ्या गोल घुमटाला भेट

0

पुणे : भारत हा देश तत्वज्ञानाचा जन्मदाता देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगातील देशांपैकी एक देश आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ञानातून जगाला शांतीचा संदेश आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत आहेत. भारतीय संस्कृती, ज्ञान, तत्वज्ञ, संस्कृती, परंपरा आणि जागतिक तत्वज्ञानाचे संगम या जगातील सर्वात भव्य गोल घुमटात झाल्याचे दिसून येते आहे. यामुळे भारतीय संस्कृती ही खऱ्या अर्थाने ज्ञानाचे दालन म्हणून जगापूढे येईल, असे प्रतिपादन हिंदुजा ग्रुपचे संस्थापक प्रकाश हिंदुजा यांनी केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी काळभोर येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या गोल घुमटातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रकाश हिंदुजा यांच्या पत्नी सौ. कमल हिंदुजा, एमआयटी विश्वशाती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ. दा. कराड, शहानी ग्रुपच्या प्रमुख माया शहानी, रुपमेक इलेक्ट्रीकल्स कंपनीचे अध्यक्ष उद्योजक नाणिक रुपानी, इंडिया अहेड न्यूज चॅनल आणि आंध्र प्रभा हैद्राबादचे संचालक गौतम मुथ्या, के. पी. बी हिंदुजा कॉलेजच्या प्राचार्या डॉ. मिनू मडलानी, विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहूल कराड आदी उपस्थित होते.

प्रकाश हिंदुजा म्हणाले, भारतीय संस्कृती ज्ञानाचे माहेरघर आहे. या देशातील अनेक संत-महंत आणि तत्वज्ञ यांनी जगाला विश्वशांती व मानव कल्याणाचा संदेश दिला आहे. हाच संदेश भविष्यातील नवतरुणांना अविरतपणे देण्याचे कार्य या जगातील सर्वात मोठ्या गोल घुमटाच्या माध्यमातून होत राहिल. तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात कोणत्याही तंत्रज्ञानाशिवाय केवळ मानवी मनुष्यबळाच्या सहाय्याने   उभारण्यात आलेला हा गोल घुमट एक अद्भूत आणि स्थापत्य कलेच दर्शन घडविणारा अद्भूत नमूना  आहे. व्हिजन आणि दूरदृष्टीचे दर्शन घडवत जागतिक स्तरावरील शिक्षण देण्याचे कार्य ही एमआयटी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून  होत असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

माया शहानी म्हणाल्या, भारत हा देश एकता आणि विविधतेने नटलेला देश आहे. येथे अनेक जाती-धर्मांचे नागरिक बंधुभावाने नांदतात. एकतेचे आणि विविधतेचे प्रतिक म्हणून भविष्यात हे जगातील सर्वात मोठे गोल घुमट ओळखले जाईल. भारतीय तत्वज्ञान आणि सांस्कृतिक शिक्षणाचे धडे भविष्यात या भव्य घुमटाच्या माध्यमातून नवतरुणांना मिळत राहिल.

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, जगातील सर्वात मोठ्या गोल घुमटातील तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज सभागृहात उभारण्यात आलेल्या ५४ पुतळ्याच्या माध्यमातून जगाला विश्वशांतीचा संदेश देण्याचा कार्य होत राहिल. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे दर्शन या घुमटालामुळे जगाला मिळत राहिल. भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञानाचे संगम या घुमटात झाल्याचे चित्र आहे.

अनु मलिक यांचे मराठी ‘आसूड’ चित्रपटाला संगीत

0

मराठी सिनेसंगीताच्या आकर्षणाने हिंदी चित्रपटसृष्टीतल्या गुणी गायक व संगीतकारांनी मराठी चित्रपटांमध्ये आपल्या प्रतिभेची मोहोर उमटवली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठं नाव म्हणजे सुप्रसिद्ध गायक संगीतकार अनु मलिक. आजवर असंख्य हिंदी चित्रपटांतील गाण्यांना आवाज व संगीत देणारे राष्ट्रीय पारितोषिक आणि फिल्मफेअर अॅवॉर्ड विजेते अनु मलिक आसूड या आगामी मराठी चित्रपटात आपल्या संगीताची जादू दाखवणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी प्रथमच मराठीत पाऊल ठेवलं आहे. हा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

२ नोव्हेंबर १९६० रोजी जन्मलेल्या अनु मलिक यांना संगीताचा वारसा त्यांचे वडील ख्यातनाम संगीतकार सरदार मलिक यांच्या कडून मिळाला. १९८० साली वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. गाण्यांमध्ये तबल्याचा वैशिष्ट्यपूर्ण वापर ही अनु मलिक यांच्या संगीताची खासियत आहे. आजही त्यांच्या गाण्यांवर तरूणाई फिदा असते. ‘बॉर्डर’, ‘बाजीगर’ ’विरासत’, रेफ्युजी, ‘बादशहा’, जुडवाँ, ‘मै हूँ ना’, ‘शूट आउट अॅट वडाला’, ‘दम लगाके हैशा’, ‘यमाला पगला दिवाना’ या चित्रपटांमध्ये त्यांनी संगीत दिलेली गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. ‘उँची है बिल्डींग’, ‘गरम चाय की प्याली हो’, ‘जानम समझा करो,’ ‘ज्युली ज्युली’, ‘मै खिलाडी तू अनाडी’ ही त्यांनी गायलेली गाणी सुद्धा सुपरहिट झाली.

हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अनु मलिक यांचे मराठी संगीतावरही विशेष प्रेम आहे. भीमसेन जोशी, लता मंगेशकर आणि आशा भोसले ही तर त्यांची दैवतचं आहेत, पण त्याचसोबत सुधीर फडके, श्रीधर फडके, हृदयनाथ मंगेशकर या प्रतिभावान गायक-संगीतकरांचेही ते चाहते आहेत. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले या मराठी कलाकारांबद्दल ही त्यांच्या मनात आदर आहे.

अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर ‘आसूड’ हा चित्रपट भाष्य करत असल्याने विषयाची खोली लक्षात घेता तशाप्रकारचं संगीत देणं अपेक्षित होतं. यातील गाणी व संगीत प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडणार असून आपल्या मराठी पदार्पणाबद्दल अनु मलिक सांगतात की,  ‘मराठीत काम करण्यास मी उत्सुक होतो, ‘आसूड’ च्या निमित्ताने मला ही संधी मिळाली हा मी माझा सन्मान समजतो. आसूड साठी संगीत देणं माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव होता’. यापुढेही मला मराठी चित्रपटांना संगीत देण्याची संधी मिळेल असा विश्वास अनु मलिक यांनी व्यक्त केला.

गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’ या चित्रपटात एका युवकाचा व्यवस्थेविरोधातील लढा दाखवताना शेतकऱ्यांच्या सद्य स्थितीचा, त्यांच्या समस्यांचा विषय हाताळण्यात आला आहे. चित्रपटाची निर्मिती दिपक मोरे यांची असून सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. लेखन व दिग्दर्शन निलेश जळमकर तर सहदिग्दर्शन अमोल ताळे यांचे आहे. कथा–पटकथा आणि संवाद निलेश जळमकर व अमोल ताळे यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे.

‘मोदींएवढा देश कुणीही खड्ड्यात घालू शकत नाही’- राज ठाकरेंची नाशकात पत्रकार परिषद

0

नाशिक- ‘नरेंद्र मोदी यांनी देश जितका खड्ड्यात घातलाय, त्यापेक्षा जास्त कुणीही घालू शकत नाही. अगदी मायावतींनी ठरवलं तरी त्याही ते करू शकत नाहीत,’ अशी तोफ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज डागली. ‘मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांत झालेला भाजपचा पराभव हा जनतेचा मोदींवरील राग आहे. हा रागच मतांमधून बाहेर पडलाय,’ असंही ते म्हणाले.

राज ठाकरे यांनी नुकताच नाशिकचा दौरा केला. दौऱ्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे राज यांनी सांगितले. या गर्दीवरुन जनतेचा शिवसेना-भाजपवरील विश्वास उडाल्याचे दिसत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. येत्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची दुर्दशा होईल, असे भाकितही त्यांनी यावेळी वर्तविले.

राम मंदिरावरुन दंगली घडवण्याचा सरकारचा कट आहे. सरकारकडे रुपयाही शिल्लक नसून केवळ घोषणाबाजी सुरु आहे, असं सांगतानाच पैसा नाही, मग कशाच्या जोरावर कांद्याला अनुदान जाहीर केलं? असा सवालही राज ठाकरेंनी विचारला. काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा आताचे सरकार बेक्कार असल्याचा टोलाही राज यांनी यावेळी लगावला.

जनतेने मोदींवरचा राग मतांच्या माध्यमातून व्यक्त केला..

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. हा मोदींवरचा राग आहे. जनतेने आपला राग मतांच्या माध्यमातून व्यक्त केला, अशी खोचक टीकाही राज ठाकरे यांनी केली. राज यांनी मोबाईल कॉल आणि इंटरनेट डेटावरील सरकारी पहाऱ्यावर संताप व्यक्त केला. मोदींनी आधी जगतेच्या घरातील पैसे काढले, आता लोकांच्या घरात घुसणार का? असा सवाल उपस्थित केला.

फावडे -कुर्‍हाड एकाचवेळी पायावर मारुन घेण्यासारखं..

लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होणार नाहीत, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेणे म्हणजे भाजपसाठी फावडे -कुऱ्हाड एकाचवेळी पायावर मारुन घेण्यासारखं आहे.

हनुमान उडत असल्यान ….

हनुमानाच्या जातीवरून राजकीय नेते करत असलेल्या अनावश्यक चर्चेचाही राज यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. ‘हनुमान उडत असल्यानं वेगवेगळ्या देशात जात असणार. त्यामुळं तो सगळ्यांना आपला वाटत असणार, असा टोला त्यांनी लगावला.

‘ते’ गडकरींचे शत्रू असावेत!
पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याबदद्ल विचारलं असता, ‘गडकरींच्या नावाची पंतप्रधानपदासाठी चर्चा करणारे बहुधा त्यांचे शत्रू असावेत, असं सूचक वक्तव्य राज यांनी केलं.

नरेंद्र मोदींचा लग्नावर विश्वास आहे काय ?

अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे २७ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार असून मुंबईतील सेंट रेजिस येथे हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याविषयी राज ठाकरेंना शनिवारी प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे म्हणाले, अमितचं लग्न साधेपणाने करणार आहोत. मी दोन- तीन महिन्यांपूर्वी सहज आकडा काढला तर हा आकडा माझा पक्ष, इतर पक्ष, सामाजिक संस्था, मित्र- पत्रकार असे मिळून किमान साडे पाच ते सहा लाखांच्या घरात गेला. त्यामुळे सर्वांना लग्नात बोलावणे शक्य नाही. आमच्या हौसेसाठी दाम्पत्याची फरफट करणेही योग्य नाही. माझ्याच पक्षाचा विचार केला तर फक्त मुंबईतील गटाध्यक्षांची संख्याच ११ हजार होती. आता लग्नात ते एकटे येणार नाहीत. त्यांच्यासोबत कार्यकर्तेही असतीलच,  हे सगळं हाताबाहेरचे प्रकरण असल्याने मोजक्या लोकांनाच लग्नाला बोलावणार, असे त्यांनी सांगितले.

नरेंद्र मोदींना लग्नाची पत्रिका देणार का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर राज ठाकरे म्हणाले, मोदींना लग्नावर विश्वास आहे का?. राज ठाकरेंच्या या प्रति प्रश्नाने उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. दरम्यान, शुक्रवारीच राज ठाकरेंनी अमित आणि मितालीच्या लग्नाची पत्रिका सप्तश्रृंगी देवीच्या चरणी ठेवून देवीचे आशीर्वाद घेतले होते.

सचिन, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे यांच्या ‘लव्ह यु जिंदगी’चा ट्रेलर प्रदर्शित

0

एसपी प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, सचिन बामगुडे निर्मित  मनोज सावंत दिग्दर्शित “लव यु जिंदगी” चित्रपटाचा ट्रेलर २० डिसेंबरला मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये भव्यतेने प्रदर्शित झाला. चित्रपटाचा रंजक आणि उत्कंठावर्धक टीझर बघून लव यु जिंदगी चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांच्या आणि माध्यमांमध्ये निर्माण झाली होती. सचिन पिळगावकर, कविता लाड मेढेकर, प्रार्थना बेहरे यांची  प्रमुख भूमिका असलेला लव यु जिंदगीचा ट्रेलर आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ट्रेलरदेखील टीझर इतकाच रंजक झाला असून चित्रपट विनोदी, कौटुंबिक आणि आज प्रत्येक व्यक्तीला ‘रिलेट करता येण्याजोगा वाटतो. ट्रेलरमध्ये अनिरुद्ध दाते या जिंदादील व्यक्तीची कथा दर्शवते. आयुष्यावर प्रेम करायला वयाची सीमा नसते हे हा सिनेमा सांगतो.

चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मनोज सावंत यांचं आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा प्रथम चित्रपट आहे. चित्रपटाची निर्मिती एस. पी. प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि एस. पी. एंटरप्राइजेज यांनी प्रस्तुती केली आहे. चित्रपटाचे निर्माते सचिन बामगुडे यांनी चित्रपटाची ही दुहेरी बाजू समर्थपणे सांभाळली आहे.

चित्रपटात अनिरुद्ध दाते यांची भूमिका सचिन पिळगावकर यांनी केली आहे. अनिरुद्ध दातेच्या बायकोच्या भूमिकेत कविता लाड मेढेकर आहेत. प्रार्थना बेहरेला अनिरुद्ध दातेची तरुण मैत्रीण म्हणून ‘रिया’च्या टवटवीत भूमिकेत बघताना छान वाटतं. याशिवाय अतुल परचुरे आणि समीर चौघुले यांनी नेहमीप्रमाणे आपल्या सहज अभिनयाने आपापल्या भूमिकेला सजवलं आहे. चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन समीर सापतिस्कर यांनी केलंय. चित्रपटाला साजेसं छायाचित्रण  पराग देशमुख यांचं आहे. पार्श्वगायनाची धुरा अवधूत गुप्ते आणि सचिन पिळगावकर यांनी सांभाळली आहे. लव यु जिंदगी चित्रपटाची पटकथा श्रीपाद जोशी आणि मनोज सावंत तर संवाद गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिले आहेत. सचिन पिळगावकर, कविता लाड मेढेकर आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला एक  सकारात्मक चित्रपट “लव यु जिंदगी” ११ जानेवारीला  महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय.

स्मार्टेस्टमूव्ह करा आणि व्होडाफोन प्रीमिअर बॅडमिंटन लीग 2018 मध्ये अनुभव घ्या

0

मुंबई-: 22 डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या व्होडाफोन प्रीमिअर बॅडमिंटन लीग 2018-19मुळे व्होडाफोन ग्राहकांसाठी आणखी एक आकर्षक संधी उपलब्ध होणार आहे. बॅडमिंटन खेळाडू एकमेकांशी चुरस करत असताना, व्होडाफोन ग्राहकांना व्होडाफोन सुपरफॅन बनून या ग्राहकांच्या स्मार्टेस्टमूव्ह अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

यंदाच्या बॅडमिंटन पर्वामध्ये, व्होडाफोन सुपरफॅनना बॅडमिंटन खेळाडूंचा खेळ लाइव्ह पाहता येणार आहे आणि काही सुपर अनुभव घेता येणार आहेत. लक्झरी कारने मैदानात जा, व्हीआयपी बॉक्समधून सामना पाहा आणि शटल कॉकवर आवडत्या खेळाडूची स्वाक्षरी घ्या आणि लाखो प्रेक्षक तुम्हाला टीव्हीवर लाइव्ह पाहणार असल्याने स्टार व्हा! व्होडाफोन सुपर फॅन होण्यासाठी व्होडाफोन ग्राहकांनी 199 येथे केवळ SUPERFAN <CITY> असा एसएमएस करावा. थर्ड पार्टी/एक्स्टर्नल पार्टी ऑडिटद्वारे विजेत्यांची निवड केली जाईल.

व्होडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ मार्केटिंग ऑफिसर शशी शंकर यांनी सांगितले, “आमच्या ग्राहकांना आणि क्रीडाप्रेमींना सहभागी करून घेण्यासाठी क्रीडा उपक्रम ही मोठी संधी असते. भारतीय बॅडमिंटनची व चाहत्यांची संख्या वाढतच असल्याने, बॅडमिंटन प्रीमिअर लीगबरोबरच्या आमच्या सहयोगामुळे आमचा हा विश्वास प्रबळ झाला आहे. व्होडाफोन प्रीमिअर बॅडमिंटन लीग 2018 मुळे आमच्या ग्राहकांना सहभागी होण्यासाठी व आकर्षक वस्तू जिंकण्यासाठी स्मार्टेस्ट मूव्ह दाखवण्याची संधी मिळणार आहे.”

अपूर्वाने विजयची लग्नाची मांगणी स्विकारल्यावर आता होणार शुभमंगल; नाना करणार अपूर्वाचे कन्यादान

0

प्रेमामध्ये कोणत्याही गोष्टीत फरक पाडला जात नाही, जे आहे ते आपुलकीने, प्रेमाने स्विकारणे
म्हणजे प्रेम. उंची, रुप, दिसणे, आर्थिक-सामाजिक परिस्थिती याला जास्त मोल न देता प्रेमाला
महत्त्व देणे महत्त्वाचे असते आणि हे सिध्द केलंय सोनी मराठीवरील प्रेमळ जोडी ‘अपूर्वा आणि
विजय’यांनी. मेमरी कार्ड रिकव्हरीच्या निमित्ताने अपूर्वाचं विजयच्या मल्टीपर्पज दुकानात येणं हे
विधिलिखितच होतं. कारण अचानकपणे झालेल्या भेटीचं भविष्यात काहीतरी वेगळंच प्लॅनिग
तयार झालेलं असतं. अनेक अडचणींना धैर्याने सामोरे गेल्यावर ‘जुळता जुळता जुळतंय
की’ मालिकेत अपूर्वा आणि विजयच्या आयुष्यात आनंदी प्रसंग घडणार आहे.
कोल्हापूरमधील रंकाळा येथे एकदम हटके म्हणजे इतर मुलं गुलाब किंवा महागडं गिफ्ट देऊन
प्रपोज करतात पण विजयने मात्र अपूर्वाला ऐतिहासिक वारसा असलेल्या ऱंकाळाच्या मधोमध
जाऊन जिलेबी स्टाईलने लग्नाची मागणी घातली होती आणि अपूर्वाने ती मागणी अगदीच भाऊक
होऊन स्विकारली आणि विजय अपूर्वानी आपल्या घरी सगळ्यांना ही गोड बातमी देऊन त्यांची
परवानगी अखेर घेतली. या गोड प्रसंगानंतर ‘जुळता जुळता जुळतंय की’मध्ये होणार अपूर्वा आणि
विजयचं शुभमंगल! ‘लग्न’ ही अशी गोष्ट आहे की प्रत्येकजण याबाबतीत उत्सुक असतो, नवीन
जबाबदा-या तितक्याच ताकदीने पेलण्यासाठी स्वत:ला समर्थ करत असतो आणि त्याच्याच
सोबतीला आपसूकपणे प्रेम हे दिवसेंदिवस वाढत जाते. आणि कोणतेही नातं टिकवण्यासाठी अन् ते
फुलवण्यासाठी प्रेमाची वाढ होणे आवश्यक असते आणि प्रेमात एकमेकांना एकमेकांची साथ असली
कोणतीही गोष्ट शक्य होते. असेच अपूर्वा आणि विजय यांचे प्रेम, तसेच प्रेमाच्या सुरुवातीला
छोट्या-मोठ्या संकेतातून व्यक्त केलेल्या भावना सर्व काही आता जिंकलंय आणि त्यांचा लग्नाचा
योग आता जुळून आलाय.
कोल्हापूरमधील लोकांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या आशिर्वादाने अपूर्वा आणि विजय यांचा
लग्नसोहळा पार पडणार आहे. आणि विशेष म्हणजे नवरी मुलीच्या व-हाडीत कोल्हापूरमधील
मंडळी सामिल असणार आहे. यावरुन हे स्पष्ट होते की या संपूर्ण सोहळ्यात अपूर्वा एकटी पडणार
नसून तिच्या सोबतीला रक्ताच्या नात्याच्या पलीकडची लोकं या प्रवासात तिच्या सोबत असणार
आहेत. मुलीची बाजू खंबीर असणं खूप गरजेचं असतं आणि कोल्हापूरकरांनी अगदी योग्य असा
निर्णय घेऊन नवरी मुलीच्या बाजून लग्नात सामील होण्याचे ठरवले.
मुलीसाठी आणि तिच्या पालकांसाठी लग्नसोहळ्यातील सर्वात जास्त भावनिक गोष्ट
म्हणजे ‘कन्यादान’. कन्यादान करताना पालकांना अश्रु आवरत नाही, ज्या मुलीचा तिच्या
लहानपणापासून सांभाळ केला, प्रेमाने-लाडाने वाढवले, तिचे कन्यादान करणे हे कोणत्याही आई-
वडीलाला भावूक करते. पण या मालिकेत कन्यादानासारखीच आणखी एक भावूक करणारी गोष्ट
म्हणजे अपूर्वाच्या घरातून भाऊ सोडला तर कोणीही या लग्नात उपस्थित नाही, त्यामुळे आपले

कन्यादान कोण करणार हा प्रश्न अपूर्वाला सतत सतावत असतो. पण अपूर्वाने तिच्या स्वभावातून
विजयच्या घरातील माणसांची मने जिंकली आहेत आणि म्हणूनच विजयचे
आजोबा ‘नाना’ अपूर्वाचे कन्यादान करणार आहेत. मुलाकडच्या मंडळीतून कोणी एका व्यक्तीने
कन्यादानासाठी पुढाकार घेणे आणि कन्यादानासारखी मोठी जबाबदारी आपलेपणाने पार पाडणे
हा एक महत्त्वाचा विचार समाजात पोहचवण्याचे उत्तम कार्य सोनी मराठी आणि या मालिकेने केले
आहे. त्यातबरोबर या लग्नाप्रसंगी विजय प्रथेप्रमाणे मुलीनेच का वचन द्यायचं असं म्हणून तो पण
सात वचनांपैकी काही वचन देणार आहे. ते कुठले वचन असणार हे पाहणयासाठी बघा लग्नाचा
विशेष भाग २६ डिसेंबरला संध्याकाळी ७ वाजता फक्त सोनी मराठीवर.

ग्रामीण भागातील शासकीय भूखंडावरील झोपड्या नियमानुसार करण्याची मागणी

0
झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी केली मागणी
पुणे : बारामती तालुक्यातील मालेगावमधील शासकीय गायरान भूखंडावर गेली 25 ते 30 वर्षांपासूनवसलेल्या झोपडपट्टी वासीयांचा ग्रामीण निवारा अतिक्रमण नियमानुकूल करण्याची मागणीचे निवेदन झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राम किशोर नवल यांना दिले. बारामती उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने तहसीलदार आणि गट विकास अधिकाऱ्यांच्या  मार्फत नव्वद अनुसूचित जाती प्रवर्गातील झोपड्यांना अतिक्रमणातून काढून नियमानुकूल प्रस्तवास मान्यता देण्याचा आग्रह संघटनेने धरला असून मान्यता देण्याची प्राथमिकता जिल्हाधिकारी यांना दिली आहे.
या शिष्टमंडळात उमेश भोंडवे, बापू शेंडगे, महंमद शेख, प्रदीप पवार, सुरेखा भालेराव, वंदना पवार, दत्ता बाबर, हर्षद पवार, नारायण मोहिते, शारदा पवार, अलका वाबळे, सिंधू पानसरे, वाल्मिक कुचेकर, आदी उपस्थित होते.

रफींच्या बहारदार गीतांच्या मैफलीने श्रोते मंत्रमुग्ध

0
महक व म्युझिक इंडियातर्फे रफींच्या जन्मदिनानिमित्त ‘माधुर्य मधुरता’ कार्यक्रम
पुणे : दिल पुकारे आ रे आ रे… पर्बत के इस पार… गुलाबी आँखे… छुप गये सारे नजारे… बेखुदी में सनम.. निंदिया से जागी बहार… पत्ता पत्ता बुटा बुटा… कोयल बोली दुनिया डोली… या आणि अशा बहारदार गीतांनी शुक्रवारची सायंकाळ ‘रफीमय’ झाली. लतादीदी व रफी साहेबानी गायलेली एकूण २४ गाणी या कार्यक्रमात सादर झाली.
निमित्त होते, सुरांचा बादशहा मोहम्मद रफी यांच्या जन्मदिनानिमित्त महक व म्युझिक इंडिया यांच्या वतीने आयोजिलेल्या ‘माधुर्य मधुरता’ या युगुल गीतांच्या कार्यक्रमाचे. ज्यांच्या गायनात माधुर्य आणि मधुरता आहे, अशा मोहम्मद रफी आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या युगुलगीतांची मैफल कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगली. प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल आणि गफार मोमीन यांच्या जोडगोळीने रसिकांच्या मनावर मोहिनी घातली.
संगीत संयोजन सईद खान यांनी केले. गोविंद कुडाळकर (तबला), राजन साळवी (ढोलक), सचिन वाघमारे (बासरी), सईद खान (सिंथेसायझर), असिफ खान इनामदार (ऑक्टोपॅड) वर साथसंगत केली. संदीप पंचवाटकर यांच्या अर्थपूर्ण निवेदनाने मैफलीत रंगत आणली.

मत्‍स्‍योत्‍पादनात वाढ करणारी निलक्रांती योजना

0

देशात उपलब्ध नैसर्गिक साधनांचा पूर्ण क्षमतेने पूरक उपयोग करुन शाश्वत मत्स्योत्पादनात वाढ करणारी नीलक्रांती योजना पुणे जिल्‍ह्यात राबविण्‍यात येत आहे. मत्‍स्योत्‍पादनाच्‍या माध्यमातून अन्न सुरक्षा प्रदान करुन या व्यवसायाला जागतिक पातळीवरील उद्योजकीय दर्जा प्राप्त करुन देऊन रोजगार निर्मिती करणे,  मच्छिमारांचे व मत्स्यसंवर्धन करणाऱ्या शेतकऱ्याच्‍या सहाय्याने उत्पन्न दुपटीने वाढविणे हा मूळ उद्देश या योजनेचा आहे.

देशात उपलब्ध असलेल्या भूजलाशयीन व सागरी क्षेत्रातील संसाधनांचा पूर्ण क्षमतेने वापर करुन 2020 पर्यंत मत्स्योत्पादनात तिपटीने वाढ करणे. आधुनिक उद्योगाचा दर्जा प्राप्त करुन देणे. जागतिकदृष्‍टया उत्कृष्ट नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा, इ.कॉर्मसचा उपयोग करुन उत्पादकता वाढवणे. काढणीपश्चात मुलभूत सेवा उपलब्ध करुन देऊन बाजारपेठ उपलब्ध करुन देऊन मच्छिमारांचे व मत्स्यसंवर्धन करणा-या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविणे. उत्‍पन्‍नात वाढ करण्यासाठी मच्छिमार व मत्स्यसंवर्धक शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे. संस्‍थात्‍मक सहाय्याने सहकाराच्या माध्यमातून उत्पादक कंपन्याकडून सहाय्य घेऊन 2020 पर्यंत निर्यात तिपटीने वाढविणे व त्याचा लाभ मच्छिमारांपर्यत पोहचविणे. देशाला अन्न सुरक्षा प्रदान करण्यासाठी प्रोत्साहीत करणे. यादृष्टिने पुणे जिल्ह्यातील उपलब्ध साधनसंपत्तीचा उपयोग करण्याचे नियोजन करण्‍यात आले आहे.

पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ 15 हजार 643 चौ.कि.मी असून जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या 13 आहे.  प्रमुख उपनद्या व नद्यांची संख्या 5 असून त्‍यांची लांबी 1252 कि.मी. इतकी आहे. पुणे जिल्‍ह्यात राज्य पाटबंधारे तलाव त्यामध्‍ये 200 हेक्टर वरील 17 असून 17 हजार 417 हेक्‍टर जलक्षेत्र आहे. 200 हेक्टर खालील 69 पाटबंधारे तलाव असून 2669.5 हेक्‍टर जलक्षेत्र असे एकूण 20 हजार 86.5 हेक्‍टर जलक्षेत्र आहे. जिल्हा परिषदेचे पाझर तलाव 112 असून 773 हेक्‍टर जलक्षेत्र, नगरपरिषदेचे 4 असून 100 हेक्‍टर जलक्षेत्र तर ग्रामपंचायतीचे  10 तलाव असून 350 हेक्‍टर जलक्षेत्र असून असे  एकूण 923 हेक्‍टर जलक्षेत्र आहे.

नीलक्रांती योजनेंतर्गत गोड्या पाण्‍यातील योजना राबविण्‍यात येतात. यामध्‍ये देण्‍यात येणा-या अनुदानात केंद्र शासनाचा 60 टक्‍के तर राज्‍य शासनाचा 40 टक्‍के हिस्‍सा असतो. या योजनेमध्‍ये नवीन तळी बांधकाम, तळ्यांची दुरुस्‍ती, नूतनीकरण व पुनरुज्‍जीवन, निविष्‍ठा अनुदान, मत्‍स्‍यबीज उत्‍पादन केंद्राची स्‍थापना करणे,  नवीन नौका व जाळी खरेदी करणे, मासळी वाहतुकीसाठी वाहन आदींचा समावेश आहे.

सन 2017-18 मध्‍ये नवीन मत्‍स्‍यसंवर्धन तळी तयार करण्‍यासाठी हवेली तालुक्‍यातील लोणी काळभोर येथील ज्ञानेश्‍वर काळभोर, बारामती तालुक्‍यातील सोनगाव येथील अशोक बाळासाहेब गीते आणि पुरंदर तालुक्‍यातील पिंपरे (खुर्द) येथील पंडित जगदेवराव चव्‍हाण या लाभार्थ्‍यांना लाभ देण्‍यात आला आहे.  पिंजरा पध्‍दतीने मत्‍स्‍यसंवर्धन करण्‍यासाठी वेल्‍हे तालुक्‍यातील पानशेत येथे वेस्‍ट कोस्‍ट फ्रोजन फूडस प्रा. लि. ला प्रक्‍लपाचे काम पूर्ण झाल्‍यानंतर अनुदान अदा करण्‍यात आले आहे. मत्‍स्‍यबीज निर्मिती केंद्रासाठी इंदापूर तालुक्‍यातील भिगवन कार्प मत्‍स्‍यबीज उत्‍पादन व संशोधन केंद्रास अनुदान देण्‍यात आले. मत्‍स्‍यखाद्य बनविण्‍यासाठी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रास अनुदान अदा करण्‍यात आले. मासेमारी साधने, होडी, जाळे, आईस बॉक्‍स यासाठीही लाभार्थ्‍यांना लाभ देण्‍यात आला.

पुणे जिल्‍ह्याच्‍या काही भागात पाणीटंचाईची परिस्थिती असली तरी ज्‍या भागात पाणी उपलब्‍ध आहे, तेथे नीलक्रांती योजनेच्‍या माध्‍यमातून मत्‍स्‍योत्‍पादकांना आणि मत्‍स्‍यसंवर्धन करणा-या शेतक-यांना लाभ मिळाला आहे.

राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे