पुणे : चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपूलाचे काम आठवडाभरात सुरू करण्याचे आदेश हैदराबाद येथील कंपनीला देण्यात आले आहेत. अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.
पालकमंत्री या नात्याने नवी दिल्ली येथे सतत पाठपुरावा केल्यानंतर केंन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन विशेष बाब म्हणून या प्रकल्पाला मान्यता दिली. त्यामुळे चांदणी चौकातील उड्डाणपूल व रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. नियोजित वेळेत हे काम पूर्ण होईल व तेथील वाहतूक कोंडी संपुष्टात येईल असा विश्वासही बापट यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले की , हैदराबाद येथील एनसीसी या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. तशी वर्क ऑर्डर भारतीय राजमार्ग राष्ट्रीय प्राधिकरणाने काल दिली. पहिल्या टप्प्यात तीनशे सत्याण्णव कोटी रूपयांची कामे पुर्ण करावे. असे आदेश एनसीसी कंपनीला देण्यात आले आहेत. कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर येत्या आठवडाभरात हे काम सुरू होईल. चांदणी चौकाचे हे काम एकूण ४९५ कोटी रूपयांचे आहे. त्यासाठी लागणारे भूसंपादन महापालिकेने करायचे आहे. महापालिकेने एकूण पंचाऐंशी टक्के भूसंपादन यापूर्वीच केले आहे. उरलेल्या पंधरा टक्के भूसंपादनाची प्रक्रिया अंतीम टप्यात आहे. शंभर टक्के भूसंपादन झाल्याशिवाय केन्द्रीय महामार्ग खाते काम सुरू करण्यास तयार नव्हते. पालकमंत्री या नात्याने श्री गडकरी यांच्याशी चर्चा केल्यावर या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला.
मुंबई पुणे,हिंजवडी आयटी पार्क. बंगलोर हायवे या रस्यावरील वाहतूक अधिक गतिमान होण्यासाठी हा प्रकल्प उपयोगी पडेल. पुणेकरांना दिलेल्या आणखी वचनांची पूर्तता होत आहे याचा भारतीय जनता पक्षाला अभिमान वाटतो.