Home Blog Page 292

प्रगल्भ लोकशाहीसाठी बंधुतेचा विचार महत्वपूर्ण-चंद्रकांत दळवी

सांगोलेकर लिखित ‘विश्वबंधुतेची प्रकाशवाट’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे: “स्वातंत्र्य आणि समतेला बंधुतेची जोड नसेल, तर लोकशाहीचे स्वरूप अपूर्ण राहते. समाजातील तणाव, दुभंगलेली मने आणि विषमता दूर सार्याची असेल, तर बंधुतेचा विचार जनमानसात रुजणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण बंधुता ही केवळ एक सामाजिक मूल्य नसून, प्रगल्भ लोकशाहीचा प्राण आहे,” असे मत रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन व माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले.

महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अविनाश सांगोलेकर लिखित आणि बंधुता प्रकाशन प्रकाशित ‘विश्वबंधुतेची प्रकाशवाट’ या पुस्तकाचे प्रकाशन चंद्रकांत दळवी यांचे हस्ते झाले. रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात झालेल्या प्रकाशन  सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजनिष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल होते. प्रसंगी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, प्रा. शंकर आथरे, संगीता झिंजुरके, दत्तात्रय गायकवाड, डॉ. प्रभंजन चव्हाण आदी उपस्थित होते.

चंद्रकांत दळवी म्हणाले, “बंधुता चळवळीचा हा प्रवास ५१ वर्षांचा आहे. विविध साहित्य संमेलने, काव्य महोत्सव, बंधुता पुरस्कारांतून बंधुतेचे मूल्य खोलवर रुजवण्याचा रोकडे यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. समाजाला एकसंध ठेवण्यासाठी आवश्यक बंधुता विचार व्यापक करण्याचा हा प्रवास यापुढेही चालू राहावा.”

कृष्णकुमार गोयल म्हणाले, “विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत. ध्येयासक्तीने ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी परिश्रम घ्यावेत. आपल्यातील सुप्त गुण ओळखून करिअर घडवण्यासाठी कठोर मेहनत, जिद्द, प्रामाणिकपणा अंगीकारावा. परस्परांचा सन्मान, बंधुभाव जोपासून एकमेकांच्या साथीने राष्ट्राच्या विकासात योगदान द्यावे.

बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “महामानवांच्या मूल्यविचारांचे बळ, प्रज्ञावंताची दृष्टी, विचारवंतांचे विचार, धनवंतांचे धन आणि सहकारी कार्यकर्त्यांची कृतिशील साथ हे बंधुता चळवळीच्या यशाचे गमक आहे. ही चळवळ अधिक व्यापक होण्यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करावेत.”

डॉ. अविनाश सांगोलेकर म्हणाले, “बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी पाच दशकांहून अधिक काळ बंधुता, राष्ट्रबंधुता आणि विश्वबंधुता या तीन टप्प्यांवर केलेल्या यशदायी आणि प्रेरणादायी कार्याचे दस्तावेजीकरण म्हणजे हे पुस्तक आहे.”

महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. महात्मा गांधी आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

डॉ. अरुण आंधळे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. मंदाकिनी रोकडे यांनी आभार मानले.

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘आली मोठी शहाणी’ची घोषणा

हृता दुर्गुळे- सारंग साठ्ये पहिल्यांदाच झळकणार एकत्र

मराठी चित्रपटसृष्टीत सतत नवनवीन प्रयोग होत आहेत. दमदार कथा, हटके विषय आणि फ्रेश जोड्या यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायमच वाढत असते. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर एका खास चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटातून प्रेक्षकांना एक आगळीवेगळी ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळणार आहे. नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार असून या चित्रपटात पहिल्यांदाच हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये एकत्र झळकणार आहेत. त्यांच्या ताज्या केमिस्ट्रीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटातून सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची जोडी प्रेक्षकांसमोर घेऊन येणारे दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले यावेळी या नव्या जोडीला घेऊन येत आहेत.

दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणाले, “लवकरच प्रेक्षकांसाठी एक मनोरंजक चित्रपट घेऊन येत आहोत. या चित्रपटाची कथा लवकरच समोर येईल, इतकं नक्की की, हृता आणि सारंग यांच्या जोडीला प्रेक्षक भरभरून प्रेम देतील, याची मला खात्री आहे.”

फाईन ब्रू प्रॉडक्शन्स प्रस्तुत व ट्रू होप फिल्म वर्क्स यांच्या सहयोगाने प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले यांनी केले असून ईशा मूठे, श्रुती साठे व जयकुमार मुनोत हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याला समर्पित राहून समाजासाठी काम करणे हेच आमचे कर्तव्य : डॉ नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. ३ ऑक्टोबर २०२५ :
थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त विधान भवन, मुंबई येथे आज शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा. राहुल नार्वेकर व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . या वेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सचिव (२) श्रीमती मेघना तळेकर, सचिव (४) श्री. शिवदर्शन साठये, उप सचिव श्री. विजय कोमटवार तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना विधानपरिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक व शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले. मराठवाडा मुक्ती संग्रामात त्यांचा सिंहाचा वाटा होता. स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम आणि शिक्षण चळवळीच्या माध्यमातून त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. आजही मराठवाड्यातील गावागावांमध्ये त्यांचे विचार जिवंत आहेत आणि त्यातून समाजकार्याला दिशा मिळते. विधानमंडळामार्फत आम्ही त्यांच्या कार्याला समर्पित राहून समाजासाठी काम करणे हेच आमचे कर्तव्य आहे.”

कार्यक्रमास उपस्थित सर्वांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याचे स्मरण केले व त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा आदर्श घेण्याचा संकल्प व्यक्त केला.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन.

ओला दुष्काळ जाहीर करा, नुकसानग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत तातडीने द्या.

मुंबई, दि. ३ ऑक्टोबर २०२५

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही भाजपा महायुतीचे सरकार फक्त घोषणाबाजी करत असून शेतकऱ्यांना अद्याप कसलीच मदत मिळालेली नाही. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, सरसकट कर्ज माफ करावे, वीज बिलाची थकबाकी माफ करावी आणि खरवडून गेलेल्या शेत जमिनीला अतिरिक्त नुकसान भरपाई द्यावी, या मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाने आज राज्यभर तीव्र आंदोलन केले.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. यावेळी खासदार डॉ कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष शेख युसूफ, माजी आमदार नामदेवराव पवार, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी वरोरा येथे भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले. नागपूर-चंद्रपूर महामार्गावर झालेल्या या आंदोलनाला हजारो शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजेरी लावली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची आणि कापूस उत्पादकांना प्रति हेक्टर १ लाख रुपयांची तर सोयाबीन उत्पादकांना प्रति हेक्टर २.५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची ठाम भूमिका आंदोलनातून मांडण्यात आली. यावेळी चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर ग्रामीण, जालना, लातूर, वर्धा, रत्नागिरी सह राज्यातील इतर जिल्ह्यात व तालुकास्तरावरही आंदोलन करून शेतकरी विरोधी भाजपा महायुती सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या व प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची नागपुरात ४ व ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा.

काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते कार्याशाळेचे उद्घाटन, विजय वडेट्टीवार व डॉ. नितीन राऊत यांचेही मार्गदर्शनपर संबोधन.

मुंबई, दि. ३ ऑक्टोबर २०२५

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महानगरपालिका क्षेत्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करणार आहेत. दिनांक ४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता उद्घाटन होणार असून संविधानाला अभिप्रेत विकेंद्रित लोकशाही व महानगरपालिकांमधील राजकारण, या विषयावर प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मार्गदर्शनपर संबोधन करतील.

शहरी प्रश्न, सक्रियता आणि राजकारण, या विषयावर विवेक वेलणकर मार्गदर्शन करतील तर सत्र संचलन संग्राम खोपडे करतील. आजचे बदलते शहरी राजकारण आणि आपण, या विषयावर आशितोष शिर्के, राजू भिसे, संग्राम खोपडे हे सत्र संचालन करतील. घरपट्ट्यांची चळवळ या विषयावर संवाद व शहरांकरता भविष्यातील कार्यक्रम या मुद्द्यांवर चर्चा होईल. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील आणि नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे स्वागत करणार आहेत तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी करणार आहेत.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत मार्गदर्शन करणार आहेत. शहरातील सांस्कृतिक राजकारण, शहरी नॅरेटीव व लोकसंवादातून लोकचळवळ या मुदद्यांचाही यावेळी उहापोह केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे..

महापालिका आयोजित ‌‘जागर अभिजात मराठीचा‌’ कार्यक्रमाचे उद्घाटन

पुणे : मोठ्या शहरांमध्ये मराठी भाषेची गळचेपी होताना दिसत आहे. सर्व स्तरातील बहुतांश विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी महापालिकेच्या मराठी शाळांमध्ये उत्तम शिक्षण द्यावे, योग्य पद्धतीने कला-क्रीडा आणि साहित्याला प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण व्हावे, प्रत्येक शाळा आदर्श शाळा बनविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, ज्या योगे इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांचा प्रभाव कमी होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, राज्याच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. वाचनसंस्कृती निर्माण होण्यासाठी शाळांमध्ये ग्रंथालये निर्माण करून तेथे उत्तम ग्रंथसंपदा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे महानगरपालिका, सांस्कृतिक केंद्र आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘जागर अभिजात मराठीचा‌’ हा गाणी, गोष्टी, प्रवचन, कविसंमेलन आणि अभिवाचन यांचा संगम असलेल्या एक दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे उद्घाटन आज (दि. 3) लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बालसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते ल. म. कडू, डॉ. संगीता बर्वे, राजीव तांबे तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त किशोरी शिंदे, बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक आणि महापालिका सांस्कृतिक विभाग प्रमुख राजेश कामठे, संवाद पुणेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे संयोजक सुनील महाजन, माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, कामगार विभाग आयुक्त नितीन केंजळे, उपायुक्त वसुंधरा बारवे, प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे, आशा उबाळे मंचावर होते. रोपट्यास जलार्पण करून आणि फलकावर मराठी भाषेत स्वाक्षरी करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

भाविष्यात मराठी भाषा प्रवाहित होण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर काय उपाययोजना करणे अपेक्षित आहे या विषयी लक्ष्मीकांत देशमुख पुढे म्हणाले, महापालिकेच्या शाळांमधील प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांना मराठी भाषा लिहिणे, बोलणे व वाचण्यासाठी प्रोत्साहित करावे. मुलांच्या अंगातील कला-क्रीडा गुण ओळखून त्यांना मार्गदर्शन करावे आणि या करिता शासनाच्या शिक्षण, सांस्कृतिक व क्रीडा विभागाने एकत्रितपणे प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, वाचन हे निरंतर शिक्षण असते, त्यामुळे भरपूर वाचा, वाचनाची गोडी लावून घ्या आणि जे वाचाल ते तुमच्या भाषेमध्ये सारांश रूपात लिहित रहा. कविता वाचा, गुणगुणा आणि हसतखेळत अभ्यास करा.

ओमप्रकाश दिवटे म्हणाले, मराठी भाषा टिकविण्यासाठी तसेच भाषेचे आदान प्रदन व्हावे या करिता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ल. म. कडू म्हणाले, आपण जे पाहतो ते आपल्या शब्दात मांडत, गंमत जंमत अनुभवत शब्दचित्र कागदावर उमटविण्याचा प्रयत्न करा.

‌‘भाषेमुळे आपण घडतो, भाषेला आपण घडवितो‌’ ही कविता विद्यार्थ्यांकडून सामूहिकरित्या गाऊन घेत डॉ. संगीत बर्वे म्हणाल्या, प्रत्येकाने मराठी वाचायला, बोलायला आणि लिहायला प्रयत्न करून प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.

गोष्टीतून मुलांशी संवाद साधत राजीव तांबे म्हणाले, भाषा जेव्हा मुलांकडून मोठ्या व्यक्ती शिकतात आणि मुले मोठ्यांकडून शिकतात म्हणजेच भाषेचे आदानप्रदान होते तेव्हाच भाषा अभिजात होते.

स्वागतपर प्रास्ताविकात किशोरी शिंदे म्हणाल्या, महानगरपालिकेचा अमृत महोत्सव आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त सांस्कृतिक व शिक्षण विभाग एकत्र येऊन हा उपक्रम करीत आहे. मराठी भाषेची मुळे खोलवर रुजलेली आहेत. या कार्यक्रमातून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत मराठी भाषा प्रवाहित होण्यास मदत होईल.

वसुंधरा बारवे यांनी शुभेच्छा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना दहिवेलकर यांनी केले तर आभार आशा उबाळे यांनी मानले.

महावितरणमधील महिला खऱ्या अर्थाने ‘आदिशक्ती’चे रूप – संचालक राजेंद्र पवार

महावितरणच्या मुख्यालयात महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान

मुंबईदि. ३ ऑक्टोबर २०२५: वीजसेवेसारख्या धकाधकीच्या, जोखमीच्या तांत्रिक क्षेत्रामध्ये महावितरणमध्ये कार्यरत महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगदान व क्षमता सिद्ध केली आहे. ही महिला शक्ती खऱ्या अर्थाने आदिशक्तीचे रूप आहे असे गौरवोद्गार महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी काढले.

नवरात्र उत्सवानिमित्त महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयामध्ये कार्यरत महिला अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ ‘सन्मान सौदामिनींचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक श्री. पवार बोलत होते. व्यासपीठावर कार्यकारी संचालक अपर्णा गिते (सुरक्षा व अंमलबजावणी) व स्वाती व्यवहारे (वित्त) यांची उपस्थिती होती.

संचालक श्री. पवार म्हणाले, एकेकाळी पुरुषांचे क्षेत्र समजल्या जाणाऱ्या वीजक्षेत्रात स्वकर्तृत्वाने भरारी घेणाऱ्या महिला शक्तीचे अस्तित्व खऱ्या अर्थाने प्रकाशमान झाले आहे. महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रभावीपणे व आत्मविश्वासाने महावितरणच्या प्रगतीला हातभार लावला आहे. या महिला शक्तीच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी नवरात्रानिमित्त राज्यभरात ‘सन्मान सौदामिनींचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

कार्यकारी संचालक (वित्त) स्वाती व्यवहारे यांनी सन्मान सौदामिनींच्या आयोजनाचे स्वागत केले. महिलांनी स्वतःसाठी वेळ काढून तब्येतीची जाणीवपूर्वक काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांनी सांगितले, की परिस्थिती अनुकूल नसतानाही महिलांनी धडपड करणे, प्रसंगी दुर्गा होणे आवश्यक आहे. विधवा, परित्यक्ता महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक आणि त्यांना कायदेशीर सल्ला मिळण्यासाठी मार्गदर्शन व प्रबोधन व्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य अभियंता कविता घरत यांनी नवरात्रीच्या नवरंगाचा उत्साह महिलांच्या आयुष्यात निर्माण व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यासाठी महिलांनी स्वतःला सक्षम करण्याची आवश्यकता व्यक्त केली. तर वैशाली तळपलकर यांनी कठीण परिस्थितीत खचून न जाता महिलांनी आत्मविश्वासाने काम करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात मुख्य अभियंता सुचिता गुजर, मुख्य महाव्यवस्थापक (वित्त) स्वाती जानोरकर, सुरक्षा रक्षक स्वाती मोहिते, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) प्रांजली कोलारकर यांचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित नातू यांनी केले तर उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी आभार मानले. यावेळी महावितरण व महानिर्मितीमधील महिला अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गडकरी तुमच्या कर्माची फळे तुम्हाला याच जन्मात भोगावी लागतील..

एक सत्याचा लढा आज हरले. नितीन गडकरी आणि अतुल शिरोडकर जिंकले. फक्त ढसा ढसा रडावेसे वाटत आहे, असे ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. आज झालेल्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीत अंजली दमानिया यांना अंतरिम दिलासा मिळाला नसल्याने त्यांनी या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

अंजली दमानिया म्हणाल्या, आज हाय कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने अंतरिम दिलासा दिला नाही. म्हणजे आज या सगळ्या लोकांची घरे, जी त्यांनी कष्टाच्या पैशांनी विकत घेतली होती, ती एक असा माणूस तोडणार जो फक्त गडकारींचा बिझनेस पार्टनर आहे, म्हणून जिंकला. खरेच या लढ्याला उपयोग आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच फक्त ढसा ढसा राडावेसे वाटत असल्याचे देखील त्यांनी भावना व्यक्त केल्या. पुढे त्यांनी लिहिले की, गडकरी तुमच्या कर्माची फळे तुम्हाला याच जन्मात भोगावी लागतील, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
हे नेमके प्रकरण काय आहे, याची माहिती अंजली दमानिया यांनी 1 ऑक्टोबर रोजी केलेल्या ट्विटमध्ये आपल्याला मिळते. यात त्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती समजाऊन सांगितली आहे. प्रकरण थोडक्यात असे आहे की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा व्यावसायिक मित्र अतुल शिरोडकर यांना भांडुपमधली जमीन केवळ 89 लाखात गडकारींनी मिळवून दिली असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विट नुसार, नितीन गडकरी यांचा व्यावसायिक मित्र असलेला अतुल शिरोडकर यांना सगळेच्या सगळे कायदे धाब्यावर बसवून एसीएस वळसा नायर आणि एसीएस असीम गुप्ता यांना गडकारींनी थेट फोन करून, मित्राला 4 एकर भांडुपमधली जमीन केवळ 89 लाखात मिळवून दिली. या दोन्ही अधिकाऱ्यांना पूर्ण कल्पना आहे की आपण जे करतोय ते चुकीचे आहे, पण त्यांच्यात कायद्याने काम करायची हिंमत नाही. 89 लाखात भांडुपमध्ये आता 2बीएचके चे घर येत नाही. पण गडकरींच्या मित्राला हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळाला, अशी माहिती त्यांनी दिली.

एसआरए हा राजकारण्यांचा अड्डा

पुढे अंजली दमानिया एसआरए हा राजकारण्यांचा अड्डा कसा झाला आहे यावर माहिती देताना लिहितात, साईनगर भांडुप ही 660 घरांची वस्ती. अतिशय स्वच्छ चाळी. 1991-92 मध्ये या 200 ते 250 फुटाची घरे एका जमीन मालकाने बांधली आणि घर व त्या खालची जमीन ही 660 कुटुंबांना विकली. तुम्ही सोसायटी झाली की मी कन्वेयन्स करेन असे मालकाने सांगितले. सुखाने ही माणसे राहत होती.

2007 मध्ये याच मालकाने हीच जमीन अतुल शिरोडकर या इसमाला 2 कोटी रुपयाला विकली. 2 कोटी पैकी फक्त 89 लाख त्या शिरोडकरने दिले. पण पैसे मिळतीलच असे समजून त्या मालकाने कन्व्हेयन्स शिरोडकरच्या नावाने केले. 2009 मधे या लोकांना कळले तेव्हा त्यांनी कोर्टात धाव घेतली. पण गडकरी या शिरोडकरचे मित्र, त्यात आमदार सुनील राऊत मित्र मग काय विचारा. सर्व्हेला 660 पैकी 300 घरे बंद दाखवली, खोटी कॉनसेंट दाखवली, खोटे कागदपत्र केले. अनेक्शर I, अनेक्शर II आणि अनेक्शर III, तिन्ही बनावट. ना प्लॅन धड, ना शिरोडकरांची आर्थिक स्थिती धड.

सुनावणी घेणारे एजीआरसी खरेतर 5 लोकांचे असते. न्याय व्हावा म्हणून. आमच्या केस मध्ये 5 पैकी 3 जण नव्हते, असीम गुप्तांनी आमच्या विरोधात निर्णय दिला, पण अश्विनी जोशी यांनी डिसेंट ऑर्डर दिली. पण तरीही 4 जणांचा निर्णय एकतर्फी आहे असे खोटे दाखवून 33/38 ची नोटीस काढली.

अंजली दमानिया यांनी या लढ्यात कधी उडी घेतली, याविषयी माहिती देताना अंजली दमानिया लिहितात, एप्रिल 2024 पासून मी या लढ्याला सुरुवात केली. यांना न्याय मिळावा म्हणून माझा स्वाभिमान बाजूला ठेऊन, याच वर्षी एप्रिलमध्ये मी दिल्लीला जाऊन गडकारींची भेट घेतली. तेव्हा योगायोगाने संजय दिना पाटील पण भेटले, ते देखील माझ्यासोबत आले. पण काहीही झाले नाही.

सगळे राजकारणी जिंकले आणि सामान्य माणूस हरला

पुढे अंजली दमानिया यांनी माहिती दिली की, मुंबईतील सुनील राऊत यांच्याशी दोन वेळा बोलले, संजय राऊत यांच्या सामनाच्या ऑफिसमध्ये जाऊन भेट घेतली. सगळ्यांकडे न्यायची भीक मागितली. पण काहीही झाले नाही. 100 वेळा फडणवीस यांना विनंती केली. एकनाथ शिंदेंना भेटले. तेही वळसा नायर यांच्याशी बोलले. आशिष शेलार यांना भेटलो, त्यांनी असीम गुप्ता यांना फोन केला. तसेच एजीआरसीमध्ये स्वतः हजर होऊन जीव तोडून कढले, पण 11 सप्टेंबरला गडकरी जिंकले. सगळे राजकारणी जिंकले आणि सामान्य माणूस हरला. इथे राहणारी माणसे अतिक्रमण करून घुसखोरी करणारी नव्हती, ही घरे त्यांची स्वतःची होती. त्यांनी एसआरए च्या काडीपेट्यांच्या घरात का राहावे? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला होता.

संकटांतून आयुष्याचे खरे धडे -सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर

 सदाशिव पेठेतील नवा विष्णू चौक मित्र मंडळ, नवरात्र उत्सव, सदाशिव पेठ तर्फे विशेष मुलांच्या मातांचा सन्मान

पुणे : आयुष्य हे एक आव्हान किंवा संकट असते, तेव्हाच ते खरे आयुष्य म्हणावे. जे संकट आपल्यावर आलेले असते त्यापलीकडे दुसरे संकट शोधा ; त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग दिसू लागतात. जेव्हा तुम्ही वंचितांचे जग पाहता, तेव्हा तुमचा अहंकार संपून जातो. संकटांतूनच आयुष्याचे खरे धडे मिळतात, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांनी व्यक्त केले.

सदाशिव पेठेतील नवा विष्णु चौक मित्र मंडळ, नवरात्र उत्सव, सदाशिव पेठ तर्फे विशेष मुलांच्या मातांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पूनम गांधी, गौरी तुपे, वैशाली सुरगुडे, पल्लवी सोनाकुल, मालन पवार, मंदा पवार, मनीषा कांबळे, श्वेता कांबळे, कार्याध्यक्ष कुमार रेणुसे, तेजस घोडके, अमित सुरगुडे, गणेश जंगम, सचिन खंडाळकर, रवींद्र गांधी, पांडुरंग ढाकूळ, धीरज वाघेरे, अरुण राठोड, संतोष राठोड, मंगेश सानप, दीपक प्रजापति हे उपस्थित होते. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि मानाचे उपरणे अशा स्वरूपात सन्मान करण्यात आला.

रेणू गावस्कर पुढे म्हणाल्या, या मातांचा सन्मान करताना समाजाने त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे. ते जगताना आपल्या दुःखांपेक्षा इतरांचे दुःख पाहिले, तर नक्कीच मार्ग मिळतो. गरजूंना फक्त सहानुभूती देण्यापेक्षा आपुलकी अधिक महत्त्वाची असते, असेही त्यांनी सांगितले.

कुमार रेणुसे म्हणाले, मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सवात महिलांचा सन्मान केला जातो. अनाथाश्रमात मुलांचे संगोपन करणाऱ्या माता असोत किंवा ससून रुग्णालयातील लहान मुलांची काळजी घेणाऱ्या परिचारिका यांचा सन्मान आम्ही केला आहे. यंदा विशेष मुलांच्या मातांचा गौरव करण्यात आला. विशेष मुलांची जबाबदारी सांभाळणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान असते, असे त्यांनी नमूद केले. प्रा.संगीता मावळे यांनी सूत्रसंचालन केले. शाहीर हेमंत मावळे यांनी आभार मानले.

सोलापूर पूरग्रस्तांना AMC पुणेचा मदतीचा हात

चार दिवसांत पूरग्रस्तांसाठी दोन लाखांची मदत जमा

पुणे –
जगात दोनच धर्म श्रेष्ठ मानले जातात – एक माणूस धर्म आणि दुसरा शेजार धर्म. या धर्माचं उत्तम उदाहरण पुण्यातील डॉक्टरांनी घालून दिलं आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पसलेवाडी आणि बोपली या गावांवर अलीकडच्या अतिवृष्टीमुळे आणि सीना नदीच्या पुरामुळे मोठं संकट आलं. शेकडो कुटुंबं विस्थापित झाली, तर जनजीवन विस्कळीत झालं. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची संघटना – AMC (Association of Medical Consultants), Pune – यांनी एक संवेदनशील शेजारी या नात्याने मदतीचा हात पुढे केला आहे.
AMC पुणेने सभासद डॉक्टरांना मदतीचे आवाहन केल्यानंतर अवघ्या चार दिवसांत जवळपास दोन लाख रुपयांची मदत जमा झाली. यात रोख रक्कम तसेच अत्यावश्यक साहित्याचा समावेश होता. या उपक्रमाला हडपसर मेडिकल असोसिएशनने देखील मोलाची साथ दिली.
मदतीच्या किटमध्ये – टूथब्रश, टूथपेस्ट, अंगावरील कपड्यांचा साबण, खाद्यतेल, साखर, गव्हाचे पीठ, डाळ, तांदूळ, चहा पावडर, दूध पावडर, शेंगदाणे, मीठ अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला. एकूण १०० किट्स तयार करण्यात आले तसेच २०० उच्च दर्जाची ब्लॅंकेट्स खरेदी करण्यात आली.
दि. १ ऑक्टोबर रोजी हे साहित्य प्रत्यक्ष गावी पोहोचवून सुमारे २०० कुटुंबांना मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी पुणे जिल्ह्यातील डॉक्टरांनी दिलेल्या मदतीचे मनापासून कौतुक केले.
एएमसीचे अध्यक्ष डॉ.हनुमंत साळे, सेक्रेटरी डॉ.रोशनी कवले, खजिनदार डॉ.चेतन म्हस्के , नियोजीत अध्यक्ष डॉ.साधना धर्माधिकारी, उपाध्यक्ष डॉ.विजय पवार, एच एम ए चे अध्यक्ष डॉ.मनोज कुंभार आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
AMC पुणे कार्यकारिणी, सर्व सभासद, हडपसर मेडिकल असोसिएशन चे सभासद आणि या उपक्रमासाठी हातभार लावणारे सर्व दानशूर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. विशेष म्हणजे, या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन निखिल शिंदे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने काटेकोरपणे केले, ज्यामुळे मदत योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी पोहोचली.
पूरग्रस्त बांधवांना लवकरात लवकर स्थैर्य लाभो, त्यांच्या जीवनात पुन्हा प्रकाशमान दिवस यावेत, अशा सदिच्छा संस्थेने दिल्या.

लोकमान्यनगरवासियांचा म्हाडाच्या इमारतीला घेराओ -BJP आमदाराच्या दबावाखालील कारभाराने शेकडो रहिवाश्यांची अवस्था दयनीय, उतरले रस्त्यावर..

पुणे – भाजपा आमदाराच्या दबावाखालील म्हाडाच्या पक्षपाती कारभारामुळे पुण्यातील म्हाडाच्या रहिवाशांची अवस्था दयनीय झाली असून  म्हाडाच्या अनागोंदी  कारभारामुळे “कोणी नवीन घर देत का घर” अशी नागरिकांची अवस्था झाली आहे.  पुणे लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने व महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड पुनर्विकास कृती समिती येरवडा यांच्यावतीने (ता. ३) रोजी पुणे स्टेशन येथील म्हाडाच्या इमारतीला शेकडो नागरिकांनी घेराओ घातला . यावेळी नागरिकांनी म्हाडाच्या आणि राज्य शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. “घर आमच्या हक्काच” मुर्दाबाद मुर्दाबाद राज्य शासनाचा मुर्दाबाद, म्हाडाचा धिक्कार असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. याप्रसंगी ॲड. गणेश सातपुते यांनी लोकमान्यनगर बचाव कृती समिती तर अजय बल्लाळ यांनी महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड येरवडा कृती समिती येथील रहिवाशांची बाजू मांडली. नागरिकांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. “आम्हाला आमची स्वप्नं साकार करू द्या,  आमच्या घरांवर विकासकांवर आणलेले स्थगिती अगोदर उठवा, मगच चर्चा अशी नागरिकांनी ठाम भूमिका घेतली. परिणामी गोंधळातच वादळी चर्चा झाली. आम्हाल आमची स्वप्न पाहू द्या आणि पूर्ण करू द्या, तुम्ही आम्हाला गृहित धरू नका, म्हाडाने आणलेले स्थगिती त्वरित हटवा, आमचा आम्हाला विकास करू द्या, रहिवाशांना विचारात घेऊनच स्वतः रहिवाशांना घरांचे पुनर्विकासाला करू द्या. यावेळी नागरिकांनी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडाचे अध्यक्ष आढळराव पाटील, मुख्य अधिकारी राहुल समोरे यांना भेटून नागरिकांनी निवेदन दिले.  गेली अनेक वर्षं चर्चेत असलेला लोकमान्यनगर पुनर्विकास सुरळीतपणे होऊ लागलेला असतानाच पुनर्विकास प्रक्रियेला खीळ बसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. उपस्थित नागरिकांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या. नागरिक म्हणाले की लोकमान्यनगर येथील काही इमारती तिरक्या झाल्या आहेत. अशा नरक यातना सोसत येथील रहिवाशी जीव मुठीत घेवून राहत आहेत. येथील सर्व इमारती कॉपरेटिव सोसायटी रजिस्टर झाल्या आहेत. त्यांचे प्रॉपर्टी कार्ड व नोंदणी झाली आहे. सेल डीड, लीस डीड, कन्व्हेन्स डिड झाले असून देखील म्हाडाच्या भोंगळ कारभारामुळे येथील नागरिक हवालदिल झाले आहेत.महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड येरवडा येथील नागरिकांनी बोलताना सांगितले की गेली अनेक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करत आहोत. म्हाडाने आणि राज्य शासनाने यावर तात्काळ लक्ष द्यावे. शासनाकडून त्वरित दखल जो पर्यंत घेतली जात नाही. तो पर्यंत हा लढा चालूच राहणार असून हा लढा भविष्यात तीव्र होणार असल्याचे पुणे लोकमान्यनगर कृती समिती व महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड पुनर्विकास कृती समिती येरवडा यांच्या वतीने सांगण्यात आले.  

म्हणून…”म्हाडा महासंघाची स्थापना” केली – ॲड. गणेश सातपुते गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) महाराष्ट्रभर गृहनिर्माणाची कामे करते आहे. मात्र महाराष्ट्रभर आपण पाहिले तर म्हाडाच्या बांधकामांची आणि नागरिकांची अवस्था चिंताजनक आहे. तेथील बांधकामांचा पुनर्विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून म्हाडा महासंघ काम करेल. 

पीएमआरडीए कार्यालयात महात्मा गांधी,लालबहादूर शास्त्री यांना अभ‍िवादन

पिंपरी (दि.३) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) आकुर्डी कार्यालयात गुरुवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी महात्मा गांधींच्या सत्य-अहिंसा, स्वच्छता व स्वावलंबन या विचारांचा तसेच शास्त्रीजींच्या “जय जवान, जय किसान” या घोषणेचे स्मरण करून देत कर्मचाऱ्यांना त्यांचे कार्य आदर्श मानून प्रामाणिकपणे व समर्पण भावनेने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी कक्ष अधिकारी विशाल ताठे, जनसंपर्क अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर भाले, वरिष्ठ लिपिक पांडुरंग मधुरकर, सुधाकर ठाकरे, हुसेन नदाफ आदी उपस्थित होते.

मिठी नदी स्वच्छ करण्याच्या निविदा प्रक्रियेत मनपाचे स्पष्टीकरण म्हणजे घोळ असल्याची मान्यता

केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन – सचिन सावंत यांचा पुनरुच्चार

भाजपाच्या मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी हे कुकर्म

मुंबई दि. ३ ॲाक्टोबर २०२५

मुंबई महानगरपालिकेतर्फे मिठी नदी स्वच्छतेसाठी काढल्या गेलेल्या निविदा प्रक्रियेवरील आरोपांवर मुंबई महानगरपालिकेने माध्यमांना दिलेले स्पष्टीकरण हे या निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याची मान्यता असून या निविदा प्रक्रियेत केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचा पुनरुच्चार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

मिठी नदी स्वच्छतेसाठी काढल्या गेलेल्या निविदेत पंप उत्पादक कंपनीची निविदेमध्ये उलाढाल ₹५० कोटी निर्धारित केली होती. पण बोली पूर्व बैठकीनंतर मनमानी पद्धतीने बदल करण्यात येऊन ही उलाढाल ₹२१० कोटी करण्यात आली. पंप उत्पादक कंपनीचा केवळ कंत्राटदार कंपनीला पंप पुरवणे इतका संबंध असताना हे बदल जाणिवपूर्वक स्पर्धा टाळण्यासाठी करण्यात आले.
केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निविदा प्रकाशित केल्यानंतर त्यातील पात्रता निकष कठोर करु नयेत. जेणेकरून स्पर्धा कमी होऊ नये असे स्पष्ट निकष असल्याने या निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप पुराव्यानिशी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून सचिन सावंत यांनी केला होता. त्यावर निविदेतील पंप पुरवठ्याचा भाग हा ₹७०० कोटींचा असल्याने आम्ही पंपाच्या दर्जाचे निकष देऊ शकत नसल्याने या किमतीच्या ३० टक्के इतकी पंप उत्पादक कंपनीची उलाढाल असावी असे वाटल्याने आम्ही हे बदल चांगल्या हेतूने केले आले आहेत असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना आपले नाव प्रकाशित होऊ नये या अटीवर सांगितले आहे.
महानगरपालिकेच्या या स्पष्टीकरणाला संपूर्णपणे नाकारुन सचिन सावंत यांनी महापालिकेचे पुन्हा वाभाडे काढले. ते म्हणाले की सदर निविदा प्रकाशित होण्याची ही तीसरी वेळ आहे. प्रथम ही २०२३ साली मार्च महिन्यात काढली गेली होती. नंतर ती रद्द करण्यात आली. त्यानंतर १४ फेब्रुवारी २०२५ रोजी पुन्हा काढण्यात आली. ती ही रद्द केल्याने आता २०२५ च्या सप्टेंबर महिन्यात पुन्हा ती आणली गेली आहे. या तीनही निविदांमध्ये पंप उत्पादक कंपनीची उलाढालीचा निकष हा ₹५० कोटीच होता. मग गेली तीन वर्षे महापालिकेचा हेतू वाईट होता का? तुमचा अभियांत्रिकी विभाग , सल्लागार आतापर्यंत झोपले होते का? या अगोदर निविदां मधील कामाची किंमत मोठी होती मग ₹५० कोटी उलाढाल ठरवताना ३०% ची मर्यादा का आठवली नाही? अशी प्रश्नांची सरबत्ती सावंत यांनी केली आहे.
या अगोदर केवळ चार पंप उत्पादक पात्र ठरत होते निविदेतील बदला नंतर किती व कोणते पंप उत्पादक पात्र ठरु शकतात हे जाहिर करा, असे आव्हान सावंत यांनी मुंबई महानगरपालिकेला दिले आहे. एका भाजपा मित्र उद्योजकाला हे कंत्राट देण्यासाठी हे कुकर्म केले जात आहे व त्याची चावी निविदेतील ही अट आहे असे सावंत म्हणाले. ही निविदा तात्काळ रद्द केली जावी व महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी सावंत यांनी केली.

ज्येष्ठांंवरील अत्याचारात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

मुंबई: महाराष्ट्रातील वृद्ध असुरक्षित असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यात मध्य प्रदेशने आघाडी गाठली आहे, तर त्यापाठोपाठ महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.एनसीआरबीने देशातील १९ महानगरांमधील गुन्हेगारीचा आढावा घेतला असून, त्यात मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.

चढता आलेख
प्रकार दाखल पीडित
हत्या १९० १९६
हत्येचा प्रयत्न ८५ ८७
छेडछाड ६१ ६१
अपहरण १० १०
बलात्कार ४ ४
चोरी १,२४३ १,२४३
खंडणी २९ २९
जबरी चोरी ३२६ ३२७
दरोडा ११ १३
फ्रॉड ८६३ ८६६

एनसीआरबीने २०२३मध्ये घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी जारी केली. यात अन्य राज्यांच्या तुलनेत ज्येष्ठांंवरील अत्याचारात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. संपूर्ण देशात वृद्धांवरील अत्याचाराचे एकूण २७,८८६ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात ५ हजार ११५ गुन्ह्यांची नोंद आहे. पहिल्या क्रमांकावर मध्य प्रदेश (५,७३८) आहे. २०२३मध्ये राज्यात १९० वृद्धांंच्या हत्येची नोंद केली आहे. दरोड्याच्या ११ घटना समोर आल्या, तर वृद्धांंना लक्ष्य करत चोरीचे १,२४३ गुन्हे नोंद झाले असून, जबरी चोरीच्या ३२६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. वृद्धांंच्या विनयभंगाच्या ६१, तर बलात्काराचे ४ गुन्हे घडले आहेत. शिवाय फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांमध्येही ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट ठरताना दिसताहेत. एनसीआरबीने देशातील १९ महानगरांमधील गुन्हेगारीचा आढावा घेतला असून, त्यात राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे शहरांचा समावेश आहे.

मुंबईत ५१८ गुन्हे नोंद झाले आहेत. २०२२मध्ये हाच आकडा ५७२ होता, तर २०२१ मध्ये ९८७ गुन्ह्यांची नोंद पोलिस दप्तरी झाली होती. दिल्ली (१,३६१), कर्नाटक बंगळुरू (६४९) नंतर मुंबईचा क्रमांक लागतो. मुंबईत ५ हत्याची नोंद झाली झाली. दोषारोपपत्र दर ३८.५ टक्क्यांवर आला आहे.
घरात एकट्या असलेल्या वृद्धांना घरातल्या रेशनिंगपासून गॅस, लाइटबिल, औषध आणून देण्यासाठी पोलिस पुढाकार घेताना दिसत आहेत. यामुळे त्यांच्यातील नाळ अधिक घट्ट होताना दिसत आहे. मुंबईत एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, वृद्ध आजी – आजोबांची माहिती पोलिस दप्तरी नोंद आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीगाठीसह त्यांच्या प्रत्येक कॉलला मुंबई पोलिस मदतीसाठी धावून जात आहेत.

ऐन दसऱ्याच्या दिवशी कोथरूडमध्ये मुलाने केली पित्याची हत्या

टीव्ही बंद कर अन् माझ्या डोळ्यात ड्रॉप टाक म्हटल्याने राग अनावर

पुणे: ऐन दसऱ्याच्या दिवशी कोथरूड मधील जय भवानी नगरमध्ये एका मुलाने वडिलांचा चाकूने वार करून खून केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी मुलाला ताब्यात घेतले. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सणाच्या दिवशीच घराघरात आनंदाचे वातावरण असताना जय भवानी नगरमध्ये घडलेल्या
खून झालेल्या व्यक्तीचे नाव तानाजी पायगुडे असे असून, आरोपी मुलगा सचिन तानाजी पायगुडे (वय ३३) याला कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तानाजी यांची पत्नी सुमन तानाजी पायगुडे यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पायगुडे कुटुंब जय भवानी नगर येथील चाळ क्रमांक दोनमध्ये वास्तव्यास आहे. दसऱ्याच्या दिवशी, दुपारी साधारणपणे बारा वाजता सचिन हा माळ्यावर टीव्ही पाहत बसला होता. त्यावेळी वडील तानाजी यांनी त्याला “टीव्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यात ड्रॉप टाक” असे सांगितले.यावरून दोघा बापलेकात वाद झाला. रागाच्या भरात सचिन याने वडिलांवर स्वयंपाकघरातील चाकूने हल्ला केला. त्याने तानाजी यांच्या तोंडावर आणि गळ्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या तानाजी यांचा जागीच मृत्यू झाला.