Home Blog Page 2918

गोदरेज अँड बॉइसचे मँग्रोव्ह्ज मोबाइल ऍप आता ११ भाषांत उपलब्ध

मुंबई– गोदरेज अँड बॉइसचे मँग्रोव्ह मोबाइल ऍप आता किनारपट्टी राज्यांच्या १० भारतीय भाषांत उपलब्ध करण्यात आले असून ४३ नव्या प्रजातींचा समावेश करत एकूण प्रजातींची संख्या आता ६७ वर गेली आहे. २०१७ मध्ये इंग्रजीमध्ये लाँच करण्यात आलेले हे ऍप आशियातील अशा प्रकारचे पहिलेच ऍप आहे. अँड्रॉइड, आयओएस आणि विंडोज प्लॅटफॉर्म्वर गुजराती, मराठी, कोंकणी, तेलुगु, तमिळ, मल्याळम, उडिया आणि बंगाली तसेच हिंदी भाषेत हे ऍप उपलब्ध आहे.

मँग्रोव्हज ऍप पानाचा आकार, फुलाचा रंग आणि प्रजातीच्या नावावरून प्रजाती ओळखण्यासाठी मदत करते. ओळखण्याच्या या वैशिष्यट्याव्यतिरिक्त हे ऍप प्रत्येक रोपाची जात आणि त्याचा वापर, मँग्रोव्हज वितरण आणि पर्यावरणीय यंत्रणा, वनस्पती अनुकूलन, मँग्रोव्ह्जमधील प्राण्यांची जैवविविधता, सध्या असलेले धोके आणि जतनाचे उपाय, भागधारकांची भूमिका, तांत्रिक संज्ञांची सूची आणि विक्रोळीमधील (मुंबई) मँग्रोव्ह्जबद्दल माहिती यात देण्यात आली आहे. हे ऍप शिक्षक, विद्यार्थी, किनारपट्टीवरील राज्यांच्या वन विभागाचे अधिकारी, जैवविविधता संशोधनात सहभागी असलेल्या स्वयंसेवी संस्था, जतन आणि जागरूकता, मँग्रोव्ह संशोधक, निसर्गप्रेमी, मँग्रोव्ह्जमध्ये जाणारे निसर्ग फोटोग्राफर यांच्यासाठी उपयुक्त आहे.गोदरेज अँड बॉइसच्या गोदरेज कन्स्ट्रक्शन विभागाचे उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख अनुप मॅथ्यू म्हणाले, गेल्या काही दशकांपासून गोदरेज मँग्रोव्हज आणि पर्यावरणीय यंत्रणेच्या जतनासाठी कामक रत आहे. लोकांना मँग्रोव्ह्जविषयी जागरूक करत त्यांच्या पर्यावरणीय यंत्रणेचे महत्त्व समजावून देणे हे मँग्रोव्हज ऍप लाँच करण्यामागचे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. ११ भारतीय भाषांत उपलब्ध करत आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत पर्यावरणाच्या जतनाचे महत्त्व पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

गुड अँड ग्रीनबद्दल

गोदरेजमध्ये आमचे शाश्वतता धोरण गुड अँड ग्रीन हे अधिक सर्वसमावेशक आणि हरित भारत तयार करण्यासाठी मदत करण्याच्या इच्छेतून तयार झाले आहे. २०२० पर्यंतच्या आमच्या चार अनिवार्य घटकांपैकी एक म्हणून २०११ मध्ये लाँच झालेले गुड अँड ग्रीन हे सामाईक मूल्याच्या तत्वावर आधारित असून ते व्यावसायिक स्पर्धा आणि सामाजिक व पर्यावरणीय विकास यांचा समतोल साधणारे आहे. याच्या मूळाशी कंपनीची गंभीर सामाजिक समस्या सोडवण्यासाठी मदत करत असतानाच स्पर्धात्मक स्थान प्रबळ करण्याची संकल्पना आहे. २०२० पर्यंत आम्ही जास्तीत जास्त रोजगारक्षण भारतीय मनुष्यबळाची निर्मिती करण्याचे, हरित भारत उभारण्याचे, गुड आणि ग्रीन उत्पादने तयार करण्याचे ध्येय ठेवले आहे. गुड उत्पादने उत्पन्न पिरॅमिडच्या तळातील ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी (उदा. आरोग्यसेवा आणि स्वच्छता) तयार करण्यात येत आहेत. पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ उत्पादनांना ग्रीन उत्पादने म्हटली जातात.

गोदरेज मँग्रोव्ह प्रकल्प

मुंबईच्या विक्रोळी उपनगरात पसरलेली गोदरेजची पिरोजशानगरचा टाउनशीप, ५० हजार कर्मचारी, निवासी आणि दररोज भेट देणाऱ्यांचा स्वागतकर्ता आहे. सर्वसमावेशक शाश्वत अधिवासाचा तो आदर्श नमुना आहे. या आयएसओ १४००१:२०१५ टाउनशीपमध्ये दररोज ७ हजार कर्मचारी भेट देतात, त्या मँग्रोव्ह्जचा समावेश आहे. याचे व्यवस्थापन वैज्ञानिक पातळीवर आणि संशोधन, जतन व जागरूकता या त्रिस्तरीय दृष्टीकोनाद्वारे केले जाते. १९९० पासून गोदरेज टाउनशीपचा मँग्रोव्ह परिसर सूनाबाई पिरोशा गोदरेज मरिन इकोलॉजी सेंटरद्वारे मँग्रोव्हजविषयी विविध जागरूकता उपक्रम राबवण्यासाठी वापरला जातो. हे उपक्रम इच्छित (टार्गेट) समूहाच्या आवश्यकतांनुसार बनवण्यात आले असून त्यात पर्यावरणीय यंत्रणा व इतर फुलोरा आणि त्यावर अवलंबून असलेले प्राणी, गोदरेजचे संवर्धन उपक्रम, मँग्रोव्ह्जचे महत्त्व, त्यांना असलेला धोका, मँग्रोव्हज यंत्रणेच्या संवर्धनातील भागधारकांची भूमिका यांविषयी सखोल माहितीचा समावेश आहे.

या उपक्रमांना शैक्षणिक पायाभूत सुविधांचा उदा. मँग्रोव्ह ट्रेल्स, व्हू पॉइंट्स, फुलपाखरे, औषधी आणि पाम बगिचा, संग्रहालय आणि गोदरेजने विकसित केलेले मँग्रोव्ह माहिती केंद्र यांचा पाठिंबा लाभलेला आहे. हे मँग्रोव्ह जागरूकता कार्यक्रम मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील शाळा व महाविद्यालयांमध्ये कायम आयोजित केले जातात. गोदरेजच्या मँग्रोव्ह संवर्धन उपक्रमांद्वारे समाजाला होत असलेल्या लाभाची दखल घेत कंपनीला तत्कालीन माननीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यातर्फे २००५ मध्ये हरित प्रशासन पुरस्कार देण्यात आला होता.

आयएमएतर्फे सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि प्रशिक्षण हॉस्पिटल्समध्ये कौन्सेलिंग सेंटर्स सुरू करण्याची मागणी

0

मुंबई,– इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) वैद्यकीय विद्यार्थी, निवासी आणि चिकित्सकांमधील मानसिक तणावाचे आव्हान हाताळण्यासाठी मार्गदर्शन करणारा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे डॉक्टर्स फॉर डॉक्टर्स असे सार्थ नामकरण करण्यात आले आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) राष्ट्रीय अध्यक्ष, डॉ. सांतनू सेन म्हणाले, ‘या उपक्रमाद्वारे आम्ही कामाच्या तणावामुळे मानसिक उर्जा नष्ट होणे (बर्न आउट) मानसिक आरोग्याशी संबंधित आव्हानांवर उपाय शोधणे, निवासी आणि चिकित्सकांमधील आत्महत्येचे प्रकार रोखणे इत्यादी गोष्टींवर प्रतिबंध आणण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. समस्येसंदर्भात जागरूकता निर्माण करत आणि भावनिक स्वास्थ्यासाठी आवश्यक साधने वापरत आम्ही हे साध्य करणार आहोत. आम्ही स्व- मदतीचे प्रशिक्षण देणार असून गरजूंना डी-४-डी ची मोफत हेल्प लाइन पुरवणार आहोत. ’

डॉक्टर्सनी सर्व डॉक्टर्सची काळजी घेतली पाहिजे, विशेषतः वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये नैराश्य आणि आत्महत्येचा धोका वाढत असल्याचे जागतिक चित्र दिसताना डॉक्टर्सनी स्वतःची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे झाले असल्याचे प्रमुख संस्था आणि डॉक्टर्सची सर्वात मोठी संघटना या नात्याने आयएमएला वाटते. वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टर्समध्ये जागतिक पातळीवर हा धोका २.५ पटींनी वाढला असून २४ ते ३७ वर्ष वयोगटातील व्यावसायिकांना जास्त धोका आहे. भारतातील चिकित्सकांमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी ४५ टक्के जणांची भावनिक दमणूक सर्वोच्च होती, तर ८७ टक्के डॉक्टर्स वैयक्तिक ध्येय साकारण्याच्या बाबतीत नीचांकी पातळीवर होते. उच्च तणाव आणि जोखमीखाली काम करणाऱ्यांना आत्महत्या व मानसिक उर्जा नष्ट होण्याचा धोका संभवत असून आपत्कालीन विभाग, प्रसूती विभाग, मानसोपचार, इंटेन्सिव्हिस्ट्स (आयसीयू डॉक्टर्स) आणि भूलतज्ज्ञ या विभागांतील तज्ज्ञांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो.

भारतातील वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टर्सचे मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी काम करणारी आयएमए राष्ट्रीय समितीच्या अध्यक्ष डॉ. नीलिमा कदाम्बी म्हणाल्या, ‘परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आयएमएने डॉक्टर्स फॉर डॉक्टर्स (डीफॉरडी) हा अभिनव उपक्रम लाँच केला असून त्यामागे वैद्यकीय विद्यार्थी, निवासी आणि चिकित्सकांमधील मानसिक आरोग्यासमोरील आव्हानांचे वाढते प्रमाण हाताळण्याचा हेतू आहे. डीफॉरडीद्वारे शारीरिक दमणूक आणि मानसिक आरोग्य या बाबी धोरण व प्रशिक्षणांत बदल करून संपूर्ण यंत्रणेमध्ये हाताळल्या जाणार आहेत. याद्वारे वैद्यकीय विद्यार्थी, निवासी आणि चिकित्सकांमधे मानसिक स्वास्थ्य, स्थिर तसेच जुळवून घेण्याची वृत्ती रूजवली जाईल.’

आयएमए डीफॉरडी टीमने याआधीच बेंगळुरू, पुणे, दिल्ली, सूरत आणि कोचीन येथे वैद्यकीय व्यावसायिकांसाठी भावनिक स्वास्थ्य आणि दमणुकीबाबत जागरूकता आणि स्व- मदत कार्यशाळा घेतल्या आहेत.

सध्या आयएमए निवासी डॉक्टर्स आणि चिकित्सकांचे हिंसेविरोधात रक्षण करण्यासाठी, कनिष्ठ तसेच निवासी डॉक्टर्ससाठी चांगले जीवनमान आणि काम करण्याच्या सोयी, योग्य एचआर मार्गदर्शक तत्वे, कडक कागदपत्र प्रक्रिया, कॅम्पसवरील रॅगिंग, धमक्या, लैंगिक अत्याचार तसेच सामाजिक भेदभाव इत्यादींविरोधात संरक्षण पुरवण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी व तो आणखी बळकट करण्यासाठी काम करत आहे. डीफॉरडीच्या या उपक्रमाद्वारे वेळेवर सहाय्य तसेच सहज उपलब्ध होणारे व्यावसायिक कौन्सेलिंगही पुरवले जाणार आहे.

आयएमएने सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये २४x७ कौन्सेलिंग सेंटर्स सुरू करण्याची मागणी केली आहे.

कष्ट आणि चिकाटी हीच माझ्या यशाची गुरुकिल्ली : खासदार गिरीश बापट

0

-‘टेल्को’ परिवारातर्फे खासदार बापट यांचा सत्कार

पुणे: टेल्को मध्ये काम करत असताना लागलेली कष्टाची सवय आणि काम करत असताना आलेली चिकाटी हीच माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे माझ्या यशात ‘टाटा परिवाराचा’ सिंहाचा वाटा आहे असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ‘पुणे शहर’ लोकसभा मतदार संघातून विक्रमी मतांनी निवडून आल्याबद्दल टेल्को मधील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

खासदार बापट म्हणाले, सध्या आपण औद्योगिकरण, कामगार, मालक असे शब्द ऐकतो मात्र टाटा मध्ये परिवार हा शब्द रूढ झाला आहे. या परिवारा मार्फत माझा सत्कार होतोय याचा मला आनंद होत आहे. टेल्को मध्ये असताना खूप काम करत होतो. कोणतंही काम करताना कधी कामाची लाज बाळगली नाही. तसेच काम करत असताना वरिष्ठ प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून चिकाटीने कामे करून घेत असत, ही जिद्द आणि चिकाटी माझ्या अंगी आपसूकच आली. याचा मला आजही फायदा होत आहे. टाटांनी कधीही परिवारा पेक्षा देशाला आणि समाजाला महत्व दिले. हाच संस्कार माझ्यावरही झाला. आजही मी सत्ता आणि पैशाला फार महत्व देत नाही. किंबहुना सामान्य माणसाला माझी मदत मिळाल्यास त्यात मला खूप आनंद मिळतो. म्हणूनच आयुष्यात पैसे कमवण्यापेक्षा मी माणसं कमावली.

एखादी गोष्ट चांगली की वाईट हे मी माझ्या आंतरआत्म्याला विचारून ठरवतो. राजकारण समाजाच्या दैनंदिन गरजांशी निगडित आहे. ज्याची उंची मोठी असली पाहिजे. महात्मा गांधी, अटलबिहारी वाजपेयी तसेच नरेंद्र मोदी या माणसांनी ही उंची गाठली. समाजाच्या कल्याणासाठी अशी माणसे राजकारणात आली पाहिजेत.

मला निवडून देऊन लोकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे. लोकांची जास्तीत जास्त कामे करून हा जनतेचा विश्वास मी सार्थ ठरवीन असे ही खासदार बापट यावेळी म्हणाले.

माजी पोलीस उपमहासंचालक अशोक धिवरे म्हणाले, टेल्को ही एक संस्कृती आहे, या संस्कृती मुळेच टेल्को मध्ये काम करणारा एक सर्वसामान्य माणूस देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाऊन बसू शकला. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी देशाच्या सर्वोच्च सदनामध्ये ते प्रयत्न करतील हा माझा विश्वास आहे. सध्याच्या बदलत्या राजकारणात चांगल्या राजकारणाचा पोत टिकवून ठेवणारी त्यांच्या सारखी माणसे आवश्यक आहेत.

श्रीकृष्ण आंबर्डेकर यांनी गिरीश बापट यांनी केलेल्या कामामुळे ते चिरतरुण आहेत. त्यांच्या कामामुळे नवीन पिढीला ही प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त केली. ऑब्रे रिबेलो यांनी टेल्को मधील आपला एक मित्र, सहकारी सर्वोच्च पदावर गेला असल्याचा आनंद व्यक्त केला. इतक्या मोठ्या पदावर जाऊन ही ते आपल्या जुन्या सहकाऱ्यांना विसरत नाहीत याचा अभिमान असल्याचे सांगितले.

सुनील शिरोडकरांनी आपल्या प्रस्तविकामध्ये खासदार बापट यांच्या बद्दलच्या आठवणी सांगितल्या. टेल्को युनियनचे माजी पदाधिकारी अनिल उरटेकर यांनी ही यावेळी बापट यांचे अभिनंदन करून त्यांच्याकडे पुणेकरांच्या विकासाच्या अपेक्षा व्यक्त केल्या. स्वागत केशव जोशी यांनी केलं. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते दत्ताजीराव गायकवाड, प्रभाकर रेणावीकर, मकरंद तिखे, प्रमोद मायभाटे यांच्या सह टेल्को मधील निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माझ्या कामातून मोदीजींनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार: बापट

खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदीजी यांच्या शपथ विधी सोहळ्याला उपस्थित राहिलो होतो. एक गुलाब पुष्प देऊन मी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मोदीजी मला म्हणाले,’ बापटजी आपको यहां देखकर अच्छा लगा’. हे माझ्या दृष्टीने कुठल्या मंत्री पदापेक्षा कमी नाही. माझ्या कामातून त्यांनी दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवणार असे खासदार बापट यावेळी म्हणाले.

” ईद मिलन ” कार्यक्रम उत्साहात संपन्न

0

पुणे-हिंद फ्रेंड सर्कल व बिंइंग ह्यूमन गाईज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पवित्र रमजान ईद निमित्ताने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने भव्य शिरखुर्मा वाटपाचा कार्यक्रम ताडीवाला रोड येथील पंचशील चौकात आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी शिरखुर्मा वाटप हिंद फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष असिफ खान व जावेद खान खान यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास नगरसेविका लता राजगुरू ,राहुल तायडे , फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे संस्थापक विठ्ठल गायकवाड, मेहबूब नदाफ, शाम गायकवाड, विक्रम जाधव, जान महम्मद शेख, महेंद्र कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गौतम सवाणे , पंचशील सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कुंदन रणधीर , तक्षशिला मंडळाचे अविनाश मोरे , जेष्ठ नेते सुनील जगताप , पँथर ब्रिगेडच्या मुन्नी शेख यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे आयोजन आझाद हिंद फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष असिफ खान व जावेद खान यांनी केले . तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमसुभाई शेख यांनी केले, तर या कार्यक्रमाला आझाद हिंद फ्रेंड सर्कलच्या सर्व सभासद पदाधिकारी सलीम शेख, तन्वीर शेख, सलिम शेख, अरबाज जमादार, फारुख शेख ,अहमद पटेल, मदार शेख, असिफ शेख, इस्माईल नदाफ, संतोष हंगरगी , हरीश काकडे , सोनू यादव , करण कांबळे , अमित आल्हाट, आकाश शेलार,यांनी सदर कार्यक्रमास परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी पार पडल

वीजयंत्रणेपासून सतर्क राहा – महावितरण

0

पुणे-अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहजशक्य आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्‍या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्वीच तात्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणार्‍या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. याशिवाय विजेच्या खाबांना जनावरे बांधू नयेत, त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नयेत किंवा विद्युत खाबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सतर्क व तत्पर राहा

– मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या अभियंता व जनमित्रांनी सतर्क व तत्पर राहावे. वादळ तसेच पावसामुळे तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्थेतून त्वरीत वीजपुरवठा सुरु करावा, असे निर्देश पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी दिले आहेत. पुणे शहर व ग्रामीण भागात सध्या वादळ व मुसळधार पाऊस येत आहे. या पार्श्वभूमिवर मुख्य अभियंता श्री. तालेवार यांच्याकडून सर्व विभागातील वीजपुरवठ्याच्या स्थितीचा दररोज सकाळी व सायंकाळी आढावा घेण्यात येत आहे तसेच वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मार्गदर्शन व सूचना करण्यात येत आहेत.

मुख्य अभियंता श्री. तालेवार यांनी सांगितले, पावसामुळे वीजयंत्रणेत होणारे संभाव्य बिघाड टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. गंभीर बिघाड असल्यास संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सक्रीय राहावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्याच्या कामात अनावश्यक किंवा हेतूपुरस्सर विलंब झाल्याचे दिसून आल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचार्‍यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्य अभियंता श्री. तालेवार यांनी दिले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याबाबतची माहिती संबंधित वीजग्राहकांना देण्यात यावी. वीज अपघात टाळण्यासाठी जनमित्रांनी सुरक्षा साधनांचा वापर करावा व सतर्कपणे दुरुस्तीचे काम करावे व नागरिकांनाही वीजअपघात टाळण्याबाबत उपाययोजनांची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

महावितरणचे कॉल सेंटर 24 तास उपलब्ध – शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे कॉल सेंटर 24 तास उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदविण्यासाठी 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 किंवा 1912 या तीन टोल फ्री क्रमांकावर कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे वीजग्राहकांना संपर्क करण्याची व वीजसेवेविषयक कोणत्याही प्रकारची तक्रार व माहिती देण्याची सोय उपलब्ध आहे.

ओतूरला वादळी पावसाने घर कोसळून दोन चिमुकल्यांचा अंत

0
जुन्नर / आनंद कांबळे
ओतूर(ता.जुन्नर)येथे दुपारी साडेचारनंतर झालेल्या जोरदार वादळी पावसाने घर पडून दोन चिमुकले ठार झाले.
वैष्णवी विलास भुतांबरे(वय ६),आणि कार्तिक गोरख केदार (वय २) अशी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.ही घटना ओतूर जवळील तेलदरा या वस्तीत घडली.या दुर्घटनेत या चिमुरड्यांची आजी चिमाबाई  केदार (वय ६५) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर वादळाने घराचे पत्रे उडत असताना भिंती हलायला लागल्याने या चिमुरड्यांचे आजोबा बापू लक्ष्मण केदार घराबाहेर पळाल्याने त्यांचा जीव वाचला.दरम्यान याच वादळामुळे ओतूर बसस्थानकातील
एका दोन मजली इमारती वर उभारण्यात आलेले मोठे होर्डींग सांगाड्यासह रस्त्यावर कोसळले.परंतू पाऊस सुरु असल्याने रस्त्यावर कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.मात्र होर्डींग पडून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दुचाकीचा चक्काचूर झाला.
ओतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खुने यांनी दिलेल्या माहीतीनुसार  दुर्घटनेत सापडलेल्या दोन्ही चिमुकल्यांना घटना घडल्यानंतर ओतूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले,परंतू त्यांचा उपचारापुर्वीच ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.
दोन्ही नातवंडे डोळ्यादेखत गेली.
दरम्यान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेली दोन्हीही नातवंडे सुटी असल्याने आजोळी आली होती.मात्र त्यांचा डोळ्यादेखत दुर्देवी मृत्यू झाल्याने आजोबा बापू केदार यांच्यासह मुलांच्या आईवडीलांना मोठा धक्का बसला आहे.
 ओतूरला एस टी.स्टँडवर एका बिल्डिंगवर लावलेला जाहीरातीचा फलक वादळी वा-यासह झालेल्या पावसाने कोसळला. एक दुचाकीवर हा फलक पडल्याने तीचे नुकसान झाले.तर येथे नेहमी वर्दळ असते मात्र पाऊस सुरु होता यामुळे याठिकाणी कोणीही नसल्याने मोठी जीवीतहानी टळली.
ओतूर ब्राम्हणवाडा रस्त्यावर रोहोकडी ते ओतूर दरम्यान रस्त्यालगतची झाडे कोसळल्याने दोन्हीही बाजुची वाहतुक विस्कळीत झाली होती.तसेच बाबीतमळा (ओतूर)येथे एका घराचे पत्रे उडुन विद्युत डी.पी.वर पडल्याने वीजप्रवाह खंडीत झाला होता.

रिव्हर अँथम’मुळे महाराष्ट्रातील कोणत्या नद्या प्रदुषणमुक्त झाल्या ? -सचिन सावंत

0

आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात !
मुंबई-
आषाढी वारीच्या तोंडावर देहू नगरीतील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत अवस्थेत आढळले आहेत. यामुळे इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘रिव्हर अँथम’च्या नावाखाली गाणी गाण्यापेक्षा नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी एखादा ठोस कार्यक्रम हाती घेतला असता तर ही घटना झाली नसती, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
इंद्रायणी नदीत मृत मासे सापडल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सावंत पुढे म्हणाले की, आषाढीवारी निमित्त लाखो वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करत असतात. मात्र, नदीत मैलायुक्त सांडपाणी व रासायनिक पाणी सोडले जात असल्यामुळेच या नदीचे पावित्र्यच धोक्यात आले आहे. अशा प्रदुषित पाण्यात वारकऱ्यांनी स्नान कसे करायचे, असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला आहे.
‘रिव्हर अँथम’च्या नावाखाली मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकारी, मंत्री यांना संगिताच्या तालावर ठेका धरायला लावला. यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री कार्यालयाने नद्यांसंदर्भात अनेक स्वयंसेवी संस्थांना बरोबर घेऊन रिव्हर ऍथॉरिटी स्थापन करू असे म्हटले होते. त्याचे काय झाले ? नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी काही उपयोग झालेला तर दिसत नाही, म्हणजे रिव्हर अँथम हा केवळ करमणुकीचा भाग होता का ? असे सावंत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी असे इव्हेंट आणि स्टंट करण्यापेक्षा नद्या प्रदुषणमुक्त करण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यावा. तसे केले नसल्यामुळेच इंद्रायणीसारख्या नद्यांचे पावित्र्य आता धोक्यात आले आहे. अजूनही वेळ गेलेली नसून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नद्या प्रदुषणमुक्त करण्यासाठी कार्यक्रम हाती घ्यावा आणि प्रदुषणाच्या विळख्यातून नद्यांची सुटका करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

गिरीश कर्नाड यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

0

नवी दिल्ली -गिरीश कर्नाड यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे.

“सर्वच माध्यमांमधून त्यांनी साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी गिरीश कर्नाड कायम स्मरणात राहतील. त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांबाबत ते मनापासून बोलायचे. त्यांनी केलेले काम आगामी काळातही लोकप्रिय राहील. त्यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो” असे पंतप्रधान म्हणाले.

कोविंद म्हणाले, "मी अनुभवी अभिनेता, लेखक आणि अभिनेता गिरीश कर्नाड यांचे निधन ऐकून दुःखी झालो आहे." 
आमचे  सांस्कृतिक जग पूर्वीपेक्षा सध्या कमी समृद्ध असे आहे. त्यात कर्नाड यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्राची अधिक मोठी हानी 
होईल.मी त्यांच्या कुटुंबाचे आणि त्यांच्या कार्याचे अनुसरण करणारे सर्व लोक यांचे हे दुखः लक्षात घेवून दुख्ही झालो आहे. ईश्वर 
हे दुखः पेलण्याची शक्ती आम्हास देवो .

सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावास ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा – पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

0

मुंबई : भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव मौजे नायगाव (तालुका खंडाळा, जिल्हा सातारा) या ऐतिहासिक स्थळास आता ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला असल्याची माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.

भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती घेण्यासाठी त्यांचे जन्मगाव असलेल्या मौजे नायगाव या ठिकाणास विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक सहली वर्षभर भेट देत असतात. या ठिकाणास दरवर्षी 5 लाखापेक्षा अधिक पर्यटक भेट देतात. ही पार्श्वभूमी विचारात घेवून यापूर्वी ‘क’ वर्गात असणाऱ्या या पर्यटनस्थळास आता ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.

सन 2004 मध्ये शासनातर्फे मौजे नायगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचे राज्य संरक्षित राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आले आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील निवडक प्रसंगांची उठावदार शिल्पे असणारी शिल्पसृष्टी उभारण्यात आली आहे. तसेच त्यांच्या जन्मदिनी म्हणजेच 03 जानेवारी रोजी या ठिकाणी शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आता या स्थळास ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्याने या ऐतिहासिक स्थळाच्या विकासाला अधिक प्रमाणात चालना मिळेल. तसेच त्या माध्यमातून सावित्रीबाईंचे कार्य आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल. या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्थळास अधिकाधिक पर्यटकांनी भेट द्यावी, असे आवाहन मंत्री श्री. रावल यांनी केले आहे.

सलग सहा तास ‘नॉन-स्टॉप स्टंट मॅरेथॉन’ करणाऱ्या ‘टीव्हीएस अपाचे’ची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद

TVS Apache RTR 200 4V’ या मोटरसायकलवरून स्टंटबाजांच्या 5 पथकांनी केल्या रोमांचक कसरती

पुणे: सलग सहा तास ‘नॉन-स्टॉप स्टंट शो’ करून टीव्हीएस मोटर कंपनीच्या अपाचे या प्रीमिअम बाईकने नवा विक्रम व नवा इतिहास प्रस्थापित केला आहे. या विक्रमाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये करण्यात आली आहे. Apache Pro Performance X या उपक्रमाचा एक भाग म्हणून कोईमतूर, बंगळूर, जयपूर, इंदूर आणि दिल्ली येथील 5 स्टंट पथकांनी ‘TVS Apache RTR 200 4V’ मोटरसायकली वापरून सहा तास स्टंट शो केले. पुण्यातील सीझन्स मॉल येथे जोराच्या पावसामध्ये हा शो आयोजित करण्यात आले होते.

स्टंटबाजांनी या कार्यक्रमात प्रेक्षकांना आपल्या टीव्हीएस अपाचेवरील विविध कसरतींनी आणि कौशल्याने मंत्रमुग्ध केले. जीझस ख्राईस्ट पोल, पिलियन थ्रिल राईड, 360 अंशातील फ्रंट व्हीली, सिंक्रोनाईज्ड फ्लॉवर बर्नआऊट, आदी कसरतींनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ही स्टंट्स करीत असताना स्टंटबाज थकले, दमले; मात्र जोरदार पावसाच्या सरी कोसळत असतना देखील आपला पूर्वीचा विक्रम तोडण्याच्या इर्षेने ते कसरती करीत राहिले आणि जिंकले.

टीव्हीएस अपाचे स्टंट पथकाने 2017 मध्ये असेच स्टंट्स सलग 5 तास केले होते. त्यावेळी ‘Apache Pro Performance (APP)’ या त्यावेळच्या लोकप्रिय कार्यक्रमाचे नामकरण ‘टीव्हीएस Apache Pro Performance X असे करण्यात आले होते. ‘टीव्हीएस रेसिंग’च्या माध्यमातून सुरू झालेला हा उपक्रम (नियंत्रित वातावरणातील) साहसी खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला आहे. ‘टीव्हीएस अपाचे आरटीआर’ श्रेणीतील मोटरसायकलींवर हे खेळ प्रेक्षकांच्या समोर घेण्यात येतात. यातून ‘रेसिंग डीएनए अनलीश्ड’ हा ब्रॅन्ड प्रेक्षकांच्या मनावर ठसविण्यात येतो.

सीझन मॉलमधील या विक्रमी साहसी खेळाला 25,000 हून अधिक प्रेक्षक संख्या लाभली.

टीव्हीएस अपाचे या श्रेणीबद्दल :

टीव्हीएस अपाचे ही श्रेणी 2006 मध्ये सर्वप्रथम सादर करण्यात आली व लगेचच ती युवा ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाली. ‘भारतीय बाजारपेठेतील सर्वोत्तम मोटरसायकल’ अशी तिची गणना झाली. गेल्या अनेक वर्षांत, या ब्रँडच्या पोर्टफोलिओमध्ये टीव्हीएस अपाचे आरटीआर 160, 180, 200 आणि टीव्हीएस अपाचे आरआर 310 यांचा समावेश झाला आहे. या पुरस्कार-विजेत्या मालिकेतील मोटरसायकलींची रचना ‘रेस ट्रॅक’मधून प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे. अत्यंत कार्यक्षम, तांत्रिकदृष्ट्या सरस अशा या मोटरसायकली ग्राहकांना आनंद व समाधान देण्यासाठी बनविलेल्या असतात. टीव्हीएस अपाचे या श्रेणीने आपल्या ग्राहकांशी नातेसंबंध जुळवून घेण्यासाठी अनेक अनुभवात्मक उपक्रम तयार केले आहेत. ‘अपाचे रेसिंग एक्सपीरियन्स’ (एआरई) हे अशाच स्वरुपाचे एक व्यासपीठ आहे, जेथे अपाचे बाळगणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या मोटरसायकलमध्ये ‘रेसिंग डीएनए’चा समावेश करुन ‘टीव्हीएस रेसिंगमधील नॅशनल रोड रेसिंग चॅम्पियन्स’च्या मार्गदर्शनाखाली एक विशेष अनुभव मिळतो. अनेक ठिकाणी ‘टीव्हीएस अपाचे ओनर्स ग्रूप’ (एओजी) तयार करण्यात आले आहेत. यामध्ये ग्राहकांना मोटारसायकल चालविण्यात त्यांना आलेली मजा व थरार यांचे अनुभव एकमेकांना सांगता येतात. आज 35 हून अधिक शहरांमध्ये 3,000 हून अधिक ग्राहकांचा सहभाग असलेले ‘एओजी ग्रूप’ कार्यरत आहेत. तसेच, अपाचे या ब्रॅन्डच्या माध्यमातून ‘अपाचे प्रो परफॉर्मन्स’ (एपीपी) सारखे शोदेखील आयोजित करण्यात येतात. यात सध्याच्या ग्राहकांना सहभागी करून घेण्यात येते व संभाव्य ग्राहकांशी संवाद साधण्यात येतो

कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी सांझी रामसह तिघांना जन्मठेप, तर तिघांना 5 वर्षांचा तुरुंगवास

0

नवी दिल्ली- संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणातील निकाल अखेर सुनावण्यात आला आहे. यातील मुख्य आरोपी सांझी राम याच्यासह तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून इतर तिघांना 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तत्पूर्वी, न्यायालयाने एकूण 7 आरोपींपैकी 6 जणांना दोषी ठरवले होते. जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी विशेष न्यायालयात पार पडली.या प्रकरणी मुख्य आरोपी सांझी राम याच्यासह, परवेश कुमार, दीपक खजुरिया यांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे, तर आनंद दत्ता, सुरेंद्र वर्मा, तिलक राज या आरोपींना 5 वर्षांची शिक्षा झाली आहे.

मंदीराचा पुजारी होता मास्टरमाइंड
गुन्हे शाखेने गेल्या वर्षी 9 एप्रिल रोजी आरोपींविरोधात चार्टशीट दाखल केली होती. या चार्जशीटनुसार मंदिराचा पुजारी सांझी राम या संपूर्ण घटनेचा मास्टरमाइंड होता. अपहरण केल्यानंतर मुलीला त्याच्याच मंदिरात ठेवण्यात आले होते. कोर्टाने एसपीओ दीपक खजूरिया, सुरिंदर वर्मा, प्रवेश कुमार ऊर्फ मन्नू, हेड कॉन्स्टेबल तिलक राज आणि पोलिस उपनिरीक्षक अरविंद दत्ता यांना दोषी ठरवले. तर पुजारी सांझी रामचा मुलगा विशालची निर्दोष मुक्तता केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून खटला ट्रान्सफर केला
सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी हा खटला जम्मू-काश्मीरच्या बाहेर पठाणकोटच्या जलद गती कोर्टाकडे सुपूर्त केला होता. 10 जानेवारी 2018 रोजी मुलगी बेपत्ता झाली होती. नंतर तिचा मृतदेह जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता. मुलीला येथील एका मंदिरात कोंडून ठेवून तिच्यावर अनेक दिवस बलात्कार केल्याचा आरोप आहे.

एमआयटी-एडीटी विद्यापीठातर्फे एमआयटी स्कूल ऑफ ड्रामाचा शुभारंभ

0

नाट्यशास्त्र, व्हिज्युअल इफेक्ट्स मोशन ग्राफिक्स हा पदवी अभ्यासक्रम

पुणे :- एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर येथील  एमआयटी स्कूल ऑफ फिल्म अँन्ड टेलिव्हिजन शाखेतर्फे एमआयटी स्कूल ऑफ ड्रामा (नाट्यशास्त्र) या महाविद्यालयाची सुरूवात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात आली आहे.  या महाविद्यालयात नाट्यशास्त्र या विषयात तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.  तसेच व्हिज्युअल इफेक्ट्स व मोशन ग्राफिक्स या पदवी अभ्यासक्रमाचीही यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती एमआयटी एसएफटीचे अध्यक्ष आणि अधिष्ठाता डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय, प्रा. समर नखाते,  प्रा. बैजू कुरूप उपस्थित होते. एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली हा अभ्यासक्रम सुरू होत आहे.

जब्बार पटेल म्हणाले, एमआयटी स्कूल ऑफ ड्रामा (नाट्यशास्त्र) हा अभ्यासक्रम बारावीनंतर तीन वर्षाचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रतिवर्षी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. बीए इन ड्रामॉटिक आर्ट या विषयात विशेष अभिनय आणि थिएटर तंत्र या विषयावर अधिक भर देण्यात येणार आहे. थिएटर तंत्रज्ञानातील विशेषज्ञ, अभिनय, परिदृश्य (आर्किटेक्चर आणि स्पेस), व्हिज्युअल आर्ट्स, साहित्य आणि इतर परफॉर्मिंग आर्ट्स (संगीत, नृत्य व लोककला ) या विषयातील तज्ञांचे प्राध्यापकांचे मार्गदर्शन या अभ्यासक्रमासाठी मिळणार आहे. थिएटरच्या प्रत्येक पैलू शिकण्यासाठी लागणारे व्यावहारिक व नाट्यविषयक प्रशिक्षण आणि भारतातील व आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील विविध कलांचा अंतर्भाव या अभ्यासक्रमामध्ये असणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाट्यकला आणि भारतीय नाट्यकलेची सांगड या अभ्यासक्रमात घातली जाणार आहे.

व्हिज्युअल इफेक्ट्स आणि मोशन ग्राफिक्समध्ये या वर्षापासून पदवी अभ्यासक्रम ही या विभागात सुरू करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम सिनेमा उद्योगांच्या गरजांनुसार तयार केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरला वेगळे वळण देण्यासाठी हे शिक्षण महत्वाचे ठरणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष अनुभव प्रशिक्षणावर आमचा अधिक भर असणार आहे. चित्रपट क्षेत्राच्या गरजानुसारच व्हिज्युअल इफेक्ट्स आणि मोशन ग्राफिक्सच्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.

प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, देशाच्या उभारणीसाठी युवकांना तांत्रिक ज्ञानासोबतच मुल्याधिष्ठीत शिक्षण देण्यासाठी आम्ही कठीबद्ध आहोत. एमआयटी एडीटी विद्यापीठात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण देण्यात येते. या वर्षापासून नाट्यशास्त्र या विभागात तंत्रज्ञानाची योग्य सांगड घालून विद्यार्थी घडविण्यावर आमचा भर राहणार आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ज्ञान आणि सर्जनशीलतेच्या मूल्यांसह विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. यासाठी नाट्यशास्त्र या पदवी अभ्यासक्रमाची आम्ही सुरूवात करीत आहोत. तसेच सिनेमा उद्योगांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळासाठी व्हिज्युअल इफेक्ट्स आणि मोशन ग्राफिक्सच्या अभ्यासक्रमाची ही सुरूवात केली आहे. देशातील आणि राज्यातील विद्यार्थ्यांना रोजगारासाठी याचा लाभ होणार आहे.

डॉ. सुनील राय म्हणाले, एमआयटी-एडीटी विद्यापीठात कला, डिझाईन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवकल्पनांना बळ देण्यासाठी विविध अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. नाट्यशास्त्र विभाग आणि व्हिज्युअल इफेक्ट्स आणि मोशन ग्राफिक्स या पदवी अभ्यासक्रमांद्वारे चित्रपट व्यवसायाला लागणाऱ्या तांत्रिक बाबींसाठी कूशल मनुष्यबळाची निर्मितीस आमचा हातभार लागेल.

76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत तनिश वैद्य, तीर्थ जिल्का, ऋग्वेद ढवळे, प्रभाकर सिंग यांची विजयी सलामी

0
पुणे, दि.10 जून 2019: महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए) यांच्या तर्फे आयोजित व स्क्वॅश रॅकेटस्‌ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत तनिश वैद्य,  तीर्थ जिल्का, ऋग्वेद ढवळे, प्रभाकर सिंग, अहानराजे कुमार, मोहित भट्ट, सचिन शिंदे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली. 
 
आयस्क्वॅश अकादमी, चंचला संदीप कोदरे स्पोर्टस्‌ क्लब, मुंढवा, आणि आरएसआय येथील स्क्वॅश कोर्टवर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत पुरुष गटात महाराष्ट्राच्या प्रभाकर सिंग याने कर्नाटकाच्या गौतम आत्मकुरचा 6-11, 12-10, 11-7, 11-9 असा संघर्षपूर्ण पराभव करून शानदार सुरुवात केली. महाराष्ट्राच्या तीर्थ जिल्काने जम्मू काश्मिरच्या आशिक हमिद मीरला 11-1, 11-1, 11-1 असा सहज पराभव करून आजचा दिवस गाजवला. ऋग्वेद ढवळेने शामसुल अर्फिनवर 11-3, 11-5, 11-2 असा विजय मिळवला. सर्व्हिसेसच्या सीएच अरुण कुमारने महाराष्ट्राच्या अजय देशमुखचा 8-11,11-4, 11-4, 11-5 असा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. 
 
अन्य लढतीत महाराष्ट्राच्या अर्णव नाडकर्णी याने बिहारच्या सुजीत कुमारचा 11-5, 11-8, 13-11 असा पराभव करून आगेकूच केली. महाराष्ट्राच्या श्रेयस मेहताने उत्तर प्रदेशच्या विशाल कुमारचा 11-0, 11-0, 11-4 असा पराभव केला. 

 
स्पर्धेचा सविस्तर निकाल- पहिली पात्रता फेरी- पुरूष गट
दिदार रिबेलो(हरियाणा) वि.वि लाल बाबु राय(बिहार) 11-1, 11-3, 11-1;
तनिष वैद्य(महाराष्ट्र) वि.वि पिरझादा काद्री(जम्मु काश्मिर)11-1, 11-1, 11-1;
अहानराजे कुमार (महाराष्ट्र) वि.वि प्रांजल पांडे(आसाम) 11-1, 11-1, 11-2;
अभिषेक सोंथालीया( महाराष्ट्र) वि.वि राजा कुमार(बिहार)  11-2, 11-1, 11-0;
जयराज सिंग(राजस्थान) वि.वि साझ चंडोक(मध्य प्रदेश) 11-9, 11-4, 11-2;
ग्यानेंद्र सिंग(उत्तर प्रदेश) वि.वि सहदेव कुमार(बिहार) 11-2, 11-2, 11-2;
प्रभाकर सिंग( महाराष्ट्र) वि.वि गौतम अत्माकुर(कर्नाटक)  6-11, 12-10, 11-7, 11-9;
विर चोत्रानी( महाराष्ट्र) वि.वि शिवम कांत(बिहार)  11-1, 11-1, 11-0;
मोहित भट्ट( महाराष्ट्र) वि.वि इरफान भट(जम्मु काश्मिर) 11-1, 11-1, 11-1;
गुरसिमर सिंग(दिल्ली) वि.वि सचिन कुमार त्यागी(उत्तर प्रदेश)  11-2, 11-1, 11-3;
राहुल राय(सर्व्हिसेस) वि.वि पार्थ ककानी( महाराष्ट्र)  11-9, 11-6, 11-3;
सचिन शिंदे( महाराष्ट्र) वि.वि नुमान नासीर(जम्मु काश्मिर) 11-0, 11-1, 11-1;
बबलु कुमार(उत्तर प्रदेश) वि.वि सुरेंद्र यादव(मध्य प्रदेश)11-3, 9-11, 11-2, 11-8;
अर्णव नाडकर्णी( महाराष्ट्र) वि.वि सुजीत कुमार(बिहार) 11-5, 11-8, 13-11;
श्रेयस मेहता( महाराष्ट्र) वि.वि विशाल कुमार(उत्तर प्रदेश) 11-0, 11-0, 11-4;
अधिप शेट्टी( महाराष्ट्र) वि.वि संतोष कुमार(सर्व्हिसेस)   11-3, 11-3, 11-2;
तीर्थ जिल्का( महाराष्ट्र) वि.वि आशिक हमिद मीर(जम्मु काश्मिर) 11-1, 11-1, 11-1;
ऋग्वेद ढवळे( महाराष्ट्र) वि.वि शामसुल अर्फिन(बिहार)  11-3, 11-5, 11-2;
ईशांत उप्पल(महाराष्ट्र) वि.वि अभिषेक पाल(उत्तर प्रदेश) 11-1, 11-1, 11-1;
सीएच अरुण कुमार(सर्व्हिसेस)वि.वि.अजय देशमुख(महाराष्ट्र) 8-11, 11-4, 11-4 11-5;
प्रतिक गुरुनानी(राजस्थान)वि.वि.नरेश शिंगवा(महाराष्ट्र)11-4, 11-2, 11-6;  

नाणेघाट व किल्ले जीवधन परीसरात ५ किलो बियांचे ३ हेक्टर क्षेत्रावर रोपण.

0
जुन्नर/आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील नाणेघाट व किल्ले जीवधन परीसरात निसर्गरम्य जुन्नर तालुका पेज परिवारातर्फे नगर,कल्याण, सातारा, लातुर,पुणे व नाशिक जिल्ह्यातील ६० पर्यटकांच्या माध्यमातून १२ प्रजातींच्या विविध वृक्षांच्या जवळपास ५ किलो बियांचे रोपण अंदाजे ३ हेक्टर क्षेत्रात करण्यात आले.  या परीसरातील प्लास्टिक गोळा करून हा परीसर प्लास्टीकमुक्त करण्यात आला. विशेष म्हणजे गेली ४ वर्ष लगातार पावसाळा सुरू होण्याआधी हा उपक्रम रमेश खरमाळे (माजी सैनिक) निसर्गरम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज व सह्याद्रीचे सौंदर्य ग्रुपच्या माध्यमातून राबवत असुन विनायक साळुंके, प्रविण खरमाळे, स्वाती खरमाळे व सैराट टीमचे विशाल बो-हाडे साथ देत आहेत.
आज बियांचे रोपण केल्यानंतर लगेचच २ तासांत नाणेघाट परीसरात पावसाने जोरदार हजेरी लावली व रोपण केलेल्या बियांची उगवण काही दिवसांतच होईल असा आनंद आलेल्या सर्व पर्यटकांनी व्यक्त केला.
खरमाळे प्रत्त्येक वर्षी पावसाळ्या आगोदर  जुन्नर तालुक्यातील विविध ठिकाणी निःशुल्क ट्रेकचे आयोजन बिया रोपण, स्वच्छता अभियान व ट्रेक असे आयोजन करत असून आलेल्या पर्यटकांना किल्ले, पर्यावरणाचे मानविय जीवनात महत्त्व , ट्रेक का? व कशासाठी? व जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा याबाबत मार्गदर्शन करत आहे.
आज बिया रोपणानंतर किल्ले जीवधन कल्याण दरवाज,जीवाईदेवी, धान्यकोठार, जुन्नर दरवाजा मार्गे वानर लिंंगी असा ट्रेक करत उपक्रमाची सांगता आलेल्या पर्यटकांचे आभार मानुन झाली

विद्यार्थी सहायक समितीचे प्रवेश सुरु

0

ग्रामीण भागातील गरीब व गरजु विद्यार्थ्यांसाठी पुण्यात वसतिगृह प्रवेश

पुणे : पुण्यात उच्चशिक्षणासाठी येणा-या ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरु विद्यार्थ्यांना अल्पदरात निवास, भोजनासाठी येथील विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळू शकतो, गेली त्रेसष्ठ वर्षे ग्रामीण विद्यार्थ्यांना पुण्यात अल्प दरात निवास, भोजन आणि व्यक्तिमत्व विकासासाठी ही संस्था काम करीत आहे. विद्यार्थी सहायक समितीच्या प्रवेश प्रक्रियेला १ जून पासून सुरवात झाली आहे.

संस्थेची पाच सुसज्ज वसतिगृहे असून सुमारे ४५० विद्यार्थी आणि ३२० विद्यार्थिनी येथे राहतात. उच्च शिक्षणातील विविध विद्याशाखांसाठी पुण्यात प्रवेश मिळाल्यावर समितीमध्ये प्रवेश मिळू शकेल. प्रवेश अर्जासोबतची कागदपत्रे तपासून मुलाखत घेतली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पहाटे योगासने, कमवा व शिका योजनेत सहभाग नोंदवणे, व्यक्तिमत्व विकासाच्या विविध उपक्रमात सहभाग नोंदवणे अनिवार्य असते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडल्याचे सर्व माजी विद्यार्थ्यांचे निरीक्षण आहे. या संस्थेचे कामकाज समाजातून मिळणा-या आर्थिक मदतीवर सुरु असल्याने येथील नियमांची काटेकोर अमंलबजावणी होते.

गरजू विद्यार्थी–विद्यार्थीनींनी संस्थेच्या सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. समितीचे प्रवेश अर्ज व माहितीपत्रक १ जूनपासून ऑनलाईन www.samiti.org या संस्थेच्या वेबसाईटवर तसेच कार्यालयात (सकाळी ११ ते सायं. ४ वा.) मिळतील. संस्थेचा पत्ता पुढीलप्रमाणे : (मुलींचे वसतिगृह), डॉ.अ.श.आपटे वसतिगृह, विद्यार्थी साहाय्यक समिती, ११८२/१/४, शिवाजीनगर, फर्ग्युसन कॉलेज रोड, पोलिस ग्राऊंड जवळ,  बॅंक ऑफ महाराष्ट्र ’यशोमंगल’ शेजारी,  पुणे – ४११००५ फोन: (०२०) २५५३३६३१, (मुलांचे वसतिगृह), लजपतराय विद्यार्थी भवन, १०३अ, शिवाजी हौ.सो.मागे, सेनापती बापट रस्ता, पुणे–४११०१६.फोन: (०२०) २५६३९३३० येथे संपर्क साधावा, असे आवाहन  संस्थेतर्फे करण्यात आले आहे.