Home Blog Page 2145

इंधनावरील कर केंद्रासह २५ राज्यांनी कमी केले , महाराष्ट्रात नकार का ?इथे १५ रुपये जादा देऊन पेट्रोल डीझेल घ्यावे लागतेय

0

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले या मुद्द्यावर आमची सर्वात जास्त निराशा

मुंबई- पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्यासंदर्भात सरकारने स्पष्टपणे नकार दिला आहे. कालपरवापर्यंत केंद्र सरकारच्या विरोधात सायकल मोर्चे काढत होते. आता माझी अपेक्षा आहे स्वत:च्या सरकार विरोधात सायकल मोर्चे काढले पाहिजेत. याचे कारण केंद्र सरकारने तर कमी केले. 25 राज्य सरकारांनी कमी केले. पण महाराष्ट्र सारख्या पुरोगामी म्हणवणाऱ्या सरकार एक नवा पैसा कमी करायला तयार नाही. त्यामुळे कालपर्यंत यांचे आंदोलन किती बेगडी होते, हे या ठिकाणी लक्षात येते, असे माजी मुख्यमंत्रीविद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. बाजुच्या राज्यांपेक्षा 15-15 जास्त रुपयांनी पेट्रोल-डिझेल घ्यावे लागते आहे. अजूनही सरकारने पुनर्विचार केला पाहिजे. आम्ही अधिवेशनानंतर निश्चित आंदोलन करणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी तिघांनी एकत्रित लढावं, हाच मानस – आदित्य ठाकरे

पुणे-निवडणुका जाहीर होऊ द्या. आमच एकच ध्येय आहे. महाराष्ट्राचा विकास करणे हे गरजेचे आहे आणि ते आम्ही करीत आहोत. महाविकास आघाडी सरकार मार्फत करोना काळात किंवा त्यापूर्वी आम्ही कामे करत आहोत. विकास कामे कुठे ही थांबलेली नाहीत. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि महसुल मंत्री महोदय आम्ही सर्व मिळून एकत्रित काम करीत आहोत. काही महापालिकेच्या निवडणुका लवकरच लागतील. महाविकास आघाडीतील सर्वांनी एकत्रित लढावं, हाच मानस आहे. महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम जे करत आहोत ते सगळीकडे व्हावं अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली

शनिवारी शिवसेनेचे नेते राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे पुणे दौर्‍यावर आले होते. यावेळी युवा सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पुणे स्टेशन येथे आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.त्या दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीमध्ये युती की आघाडी होणार असा प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खूप दिवसानंतर आम्ही सर्व पदाधिकारी एकत्र आलो आहोत. गेल्या काही महिन्यांमध्ये लसीकरणासारख्या बाबतीत आमचे पदाधिकारी अग्रेसर राहिलेले आहेत. लोकांची सेवा करत आहेत. त्यांच्या संकल्पना जाणून घेण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो. शिवसेनेत कानमंत्र देण्यात येत नाही. जे काही असत, ते खुल असते, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

अध्यापक विकास संस्था नवा दृष्टीकोन देणारी ठरेल- उपमुख्यमंत्री अजित पवार

0

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचा उद्घाटन समारंभ

पुणे दि. २५: शिक्षण क्षेत्रात वेगाने घडत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अध्यापकांनी नवे ज्ञान आणि तंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे असून अध्यापकांना त्यासाठी आवश्यक नवा दृष्टीकोन देण्यास महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था उपयुक्त ठरेल, असा विश्वास  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी आदी उपस्थित होते.

           श्री. पवार म्हणाले, आजचा विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडला गेला आहे. तो अभियांत्रिकी, वैद्यकीय, चित्रपट, नाटक, कला, संस्कृती, नवे शोध आदी क्षेत्राबाबत अधिक जागरूक आहे. शिक्षक आणि संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांच्या पुढे राहण्यासाठी नवा दृष्टीकोन स्वीकारण्याची गरज आहे. अध्यापक विकास संस्थेच्या माध्यमातून नव्या युगातील आधुनिक ज्ञान आणि प्राध्यापकांच्या नेतृत्व गुणांचा विकास करणे शक्य होईल. चांगले शिक्षक घडविण्यासाठी ही संस्था उपयुक्त ठरेल.

  • गुरु-शिष्य परंपरेचा गौरवशाली वारसा महाराष्ट्राने समृद्ध केला*
    देशाला गुरु-शिष्य परंपरेचा गौरवशाली वारसा लाभला आहे. हा वारसा समृद्ध करण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या ध्येयनिष्ठ गुरुजनांनी शिक्षणांची गंगा शेतकरी, कष्टकरी बहुजन समाजाच्या घरापर्यंत नेण्याचे काम केले, महिलांना शिक्षणाचे दरवाजे खुले केले. ध्येयनिष्ठ शिक्षणसेवेची परंपरा आजचे शिक्षकही पुढे नेत आहेत.

माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांना नवा वैज्ञानिक दृष्टीकोन देण्याचे कार्य केले. जयंत नारळीकर, जि.प.शाळेचे शिक्षक रणजित सिंह डिसले यांच्यासारख्या अनेक शिक्षकांचे कार्य मौलिक आहे. बदलत्या काळाची गरज लक्षात घेता अध्यापकांनी ही परंपरा पुढे नेण्यासाठी एका विषयापुरते मर्यादीत न रहाता ज्ञानकक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करावा. ज्ञानासोबत नव्या संकल्पना मांडण्यासाठी आणि जगातील इतर भाषा, संस्कृती शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करावे, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.

बुद्धीवंतांना अधिक ज्ञानवान करणारी संस्था
अध्यापक विकास  संस्थेमुळे शिक्षणाचा दर्जा सुधारेल, शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र सुधारणा घडून येतील. जगातील नव्या ज्ञानाचा उपयोग प्राध्यापकांना झाल्यास त्याचा फायदा नव्या पिढीला होईल. संस्थेची इमारत प्रशिक्षणार्थींचा उत्साह वाढविणारी आहे. संस्थेत गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देताना त्यात सातत्य राखणे महत्वाचे आहे. संस्थेत असलेल्या सुविधा आणि दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामुळे ही संस्था अध्यापकांना अधिक ज्ञानवान करणारी ठरेल, असेही श्री.पवार म्हणाले.

पुणे येथे सारथी संस्था, सहकार भवन, कृषी भवन, कामगार भवन, नोंदणी भवन, शिक्षण आयुक्तालय आदी संस्था पुढील ५० वर्षांचा विचार करून उभारण्यात येत आहे. अध्यापक विकास संस्थेतही भविष्याचा विचार करून अधिक उन्नत सुविधा निर्माण कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

   महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्र सुदृढ होण्याच्यादृष्टीने महत्वाचे पाऊल-उदय सामंत
श्री.सामंत म्हणाले, प्राध्यापकांना प्रशिक्षण देणारी देशातील ही पहिली संस्था आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याला आधुनिक शिक्षण मिळावे या उद्देशाने अध्यापक विकास संस्थेची स्थापना करण्यात आली. अनेक नामवंत संस्था या संस्थेसोबत काम करीत आहेत.  इन्फोसिसने  सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचे मान्य केले आहे. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच सामंजस्य करार आहे. प्राध्याकांसमवेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही आधुनिक स्वरुपाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा ६० कोटींचा प्रकल्प असून त्याचा हा पहिला टप्पा आहे. हा प्रकल्प देशपातळीवर आदर्शवत ठरेल असा विश्वास श्री.सामंत यांनी व्यक्त केला.

उच्च शिक्षणाशी संबंधित सर्व कार्यालये संस्थेच्या इमारतीत एकाच ठिकाणी असतील. संस्थेतील अद्ययावत स्टुडिओमधून राज्य व संघ लोकसेवा आयोग परीक्षेविविषयी विद्यार्थ्यांना आणि खाजगी संस्थेतील प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येईल. अधुनिकरित्या प्रशिक्षित प्राध्यापक चांगले ज्ञानदान करतील आणि राज्यातील शैक्षणिक क्षेत्राला त्यामुळे अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ऑक्स्फर्डला ‘पुणे ऑफ वेस्ट’ म्हणून ओळखले जाईल- आदित्य ठाकरे
श्री.ठाकरे म्हणाले, शिक्षक हे आजच्या काळातील तंत्रज्ञान आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाप्रमाणे त्यांनाही अद्ययावत करणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने प्रशिक्षण महत्वाचे आहे. पुढची पिढी घडविण्याचे कार्य शिक्षक करतात. नवा देश, नवी पिढी घडविण्यासाठी शिक्षक आणि शिक्षण महत्वाचे आहे.  महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या माध्यमातून असे कार्य होईल आणि त्यातून देशाला नवी दिशा दिली जाईल. देशासह जगभरातील प्राध्यापक या संस्थेला भेट देण्यासाठी पुण्यात येतील. आज शिक्षण पद्धतीत केले जाणार बदल आणि निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधा लक्षात घेता येत्या काळात ऑक्स्फर्डला ‘पुणे ऑफ वेस्ट’ म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास श्री.ठाकरे यांनी व्यक्त केला. नव्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा वाढविण्यावर भर देण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

खासदार बापट यांनी संस्थेच्या उभारणीबाबत समाधान व्यक्त करून ग्रामीण भागातील विदयार्थी आणि प्राध्यापकांना संस्थेचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रास्ताविकात संस्थेचे कार्यकारी संचालक निपुण विनायक यांनी संस्थेची माहिती दिली. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षकांचे प्रशिक्षण हे महत्वाचे अंग आहे. राज्यातील ४ हजारपेक्षा अधिक महाविद्यालये आणि दीड हजार तंत्र शिक्षण महाविद्यालयातील सुमारे १ लाख प्राध्यापकाना प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षण देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. राज्यातील सर्व विद्यापीठ संस्थेचे उपकेंद्र रहातील आणि त्याद्वारे प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मान्यवरांच्या हस्ते जे.जे.महाविद्यालयाने तयार केलेल्या संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. बोधचिन्ह तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कारदेखील उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. गडचिरोली येथील युवकांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणाऱ्या नागपूर येथील ज्ञान फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक    अजिंक्य कोटावार यांना पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते ‘यंग सोशल इनोव्हेटर’  म्हणून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, संचालक उच्च व तंत्रशिक्षण विभाग डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.अभय वाघ, तंत्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ.विनोद मोहितकर, विद्यापीठातील अधिकारी, पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक आदी  उपस्थित होते.

कार्यक्रमापूर्वी मान्यवरांनी संस्थेतील नेतृत्व गुण विकसन केंद्र, नाविन्यता आणि आधुनिक तंत्रज्ञान केंद्र,समानता आणि सर्वसमावेशकता केंद्र, बहुशाखीय अभ्यासक्रम अध्यापन केंद्र, ध्वनिमुद्रण कक्ष आदी विविध कक्षांना भेट देऊन कार्यप्रणालीची माहिती घेतली.

अटलशक्ती महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून दीड लाख घरात संपर्क व संवाद – प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे-आज संपूर्ण पुणे शहरात तीस हजारापेक्षा जास्त कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून अटलशक्ती महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून दीड लाख घरात संपर्क व संवाद साधत आहेत. या माध्यमातून हर घर मोदी ह्या संकल्पाची पूर्तता होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या सर्व योजना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत असे आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 12 येथे महासंपर्क अभियानाचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते.यावेळी मुकेश काळे व दादासाहेब कोरेकर यांच्या घरी त्यांनी भेट दिली व त्यानंतर 5 घरी भेट देऊन अटलशक्ती महासंपर्क अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला.त्यांच्या समवेत शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर,कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,प्रभाग अध्यक्ष अमित तोरडमल,शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नील राजीवडे,बूथ प्रमुख ओम धावडे, रणजित हगवणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.या अभियानाचे प्रमुख संघटन सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले ” काल ऑडिओ कॉन्फरेन्स कॉल मध्ये शहरातील आठ मतदारसंघातील तब्ब्ल 49000 कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे आज एका दिवसातील नागरी संपर्काचे उच्चांक स्थापित होईल अशीच चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार च्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचव्यात व शेवटच्या व्यक्ती ला त्याचा लाभ घेता यावा हा उद्देश्य असल्याचे ही राजेश पांडे म्हणाले. सोशल मीडियाच्या प्रभावाच्या काळात आणि व्यक्तिगत संपर्क खूप कमी झाला असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधावा हे भाजप सारख्या कार्यकर्ताधिष्ठित ( cadre base ) असलेल्या पक्षातच शक्य आहे असे मत प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या ‘हर घर मोदी’ हा उपक्रम स्तुत्य

0

पुणे-

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज इंडियन मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांना अटलशक्ती महासंपर्क अभियानाचे पत्रक व पुस्तिका देऊन ह्या अभियानात सहभाग नोंदविला.त्यांच्या समवेत खासदार गिरीश बापट,आय एम ए चे पुणे शहर अध्यक्ष डॉ. बाळासाहेब देशमुख, डॉ. नवरंगे, अभियानाचे प्रमुख राजेश पांडे, शहर उपाध्यक्ष श्रीपाद ढेकणे, शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर, अल्पसंख्यांक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अली दारुवाला,शहर उपाध्यक्ष सुनील पांडे इ उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार ने अनेक लोकाभिमुख योजना राबविल्या आहेत मात्र अद्याप ही काही घटकां पर्यंत योजना पोहोचल्या नाहीत. देशातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत ह्या योजनां चा लाभ पोहोचावा हीच अंत्योदयाची कल्पना असल्याचे मत ही डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले. पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येणारा हा उपक्रम पथदर्शी असल्याचे सांगतानाच पक्षाच्या ध्येय धोरणांशी सुसंगत असून पुणेकर नक्कीच याचे स्वागत करतील असेही त्या म्हणाल्या.डॉ. अविनाश भोंडवे यांनी त्यांचे स्वागत केले व “केंद्रीय मंत्री पक्षकार्यासाठी वेळ देतात हे भाजप चे वेगळेपण असल्याचे मत व्यक्त केले”.

‘राम’,‘सीता’आणि‘रावण’;स्टोरीटेलवर!

0

अमीश त्रिपाठी यांच्या रामचंद्र मालिकेतील तीन कादंबऱ्या 

वाल्मीकी ऋषींनी रचलेल्या रामायण महाकाव्यचा आधार घेत ‘राम’- इक्ष्वाकूचे वंशज’, ‘सीता’ – मिथिलेची योध्दा’, ‘रावण’ – आर्यावर्ताचा शत्रू’ या तीन महाकाय कादंबऱ्यांची निर्मिती अमीश त्रिपाठी यांनी ‘रामचंद्र’ या महाकाय मालिकेद्वारे केली आहे. ‘राम’, ‘सीता’ आणि ‘रावण’ या त्यांच्या तिन्ही प्रदीर्घ कादंबऱ्यांची मराठी ऑडिओ सिरीज खास स्टोरीटेल ओरिजनलवर रसिकांना आता ऐकायला मिळणार आहे. ‘राम’- इक्ष्वाकूचे वंशज’ करिता अभिनेता स्वप्नील राजशेखर, ‘सीता’ – मिथिलेची योध्दा’करिता अभिनेत्री केतकी थत्ते तर ‘रावण’ – आर्यावर्ताचा शत्रू’ करिता अभिनेते तुषार दळवी यांनी आपल्या बहारदार आवाजातून अस्खलित उभ्या केल्या आहेत.

इक्ष्वाकू कुलातील प्रभू श्रीराम यांच्या जीवनावरील रामायण हा हिंदू धर्मातील एक पवित्र ग्रंथ आहे. रामायणाची मुख्य कथा अयोध्येचा राजपुत्र रामाची पत्‍नी सीतेचे रावणाकडून अपहरण, आणि तत्पश्चात रामाकडून रावणाचा वध अशी आहे. भारतीय पुराणकथा, दंतकथा, लोककथा, देव, धर्म, संस्कृती, इतिहास, असुर आणि नायक इत्यादींच्या माध्यमातून त्यात आजच्या विज्ञान युगाची सांगड घालत लोकप्रिय कथा कादंबऱ्यांची नवं निर्मिती लेखक अमिश त्रिपाठी यांनी केली आहे. त्यांच्या या लिखाणाला संपूर्ण जगभरात प्रचंड लोकाश्रय मिळाला आहे. त्यांनी लिहिलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांवरील या प्रदीर्घ मालिकेने विक्रीचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.

स्टोरीटेल ऑडिओबुक्सच्या या उपक्रमाविषयी बोलताना लेखक अमिश त्रिपाठी म्हणतात. “सीतेचे आज जे रूप आपल्यासमोर आहे ते 1980 च्या दशकातील टीव्ही मालिकांवर आधारित आहे, ज्या मुख्यतः तुलसीदासांच्या रामचरित मानसवर आधारित आहेत. मात्र सीता: वॉरियर ऑफ मिथिला या पुस्तकात सीतेच्या जन्मापासून ते रावणाने तिचे अपहरण होईपर्यंतचा कालखंड दाखविला आहे. सीता प्रथमतः ती एक मुलगी, एक पराक्रमी स्त्री, तसेच आदर्श पत्नीच्या रूपात असणार आहे..

‘राम’- इक्ष्वाकूचे वंशज’, या भागातील मालिकेत फुटीरतेमुळे अयोध्या कमजोर झाली होती. त्या भयंकर लढाईमुळे प्रचंड नुकसान झालं होतं. या नुकसानचे परिणाम समाजात खोलवर झिरपले होते. लंकेचा राक्षस राजा- रावण हारलेल्या राज्यावर आपलं शासन लागू करत नाही, त्याऐवजी तो त्यांच्यावर आपला व्यापार लादतो. हारलेल्या साम्राज्यातून पैसा खेचून नेतो. सप्तसिंधू साम्राज्याची प्रजा गरीबी, हताशा आणि भ्रष्टाचारात लोटली जाते. या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना एक समर्थ नेत्याची गरज असते. असा नेता आपल्यातच आहे याची त्यांना कल्पनाही नसते. आपण त्याला ओळखतो हे त्यांना ठाऊक नसतं. प्रचंड यातनाना तोंड देत असलेला, बहिष्कृत राजपुत्र. एक असा राजपुत्र ज्याचं मनोबल खच्ची करण्याचे सगळ्यांनी प्रयत्न केलेला असतो. तो राम नावाचा राजपुत्र.

‘सीता’ – मिथिलेची योध्दा’, या मालिकेत असंतोष, विभाजन आदींनी भारत ग्रस्त आहे. लोक भ्रष्ट आणि स्वार्थी उच्चभ्रूंचा आणि राज्यकर्त्यांचा तिरस्कार करतात. फक्त ठिणगी पडण्याचा अवकाश. बाहेरचं जग या विभाजनाचा आणि गोंधळाचा फायदा घेतं. लंकेचा राक्षस रावण दिवसेंदिवस शक्तिशाली बनतो आहे. दुर्देवी सप्त सिंधू परिसरात तो आपले दात खोलवर रूतवत आहे. अशावेळी गरज असलेली योद्धा आहे ती. आपण वाट पाहात असलेली देवी आहे ती. ती धर्मांचं संरक्षण करेल. ती आपलंही रक्षण करेल… अमीश त्रिपाठी यांच्या गाजलेल्या रामचंद्र मालिकेतील ही कादंबरी तितकीच रोमहर्षक…!

‘रावण’ – आर्यावर्ताचा शत्रू’मध्ये रावण मानवांमध्ये श्रेष्ठ होण्यासाठी, विजय मिळवण्यास, लुटपाट करण्यास, आणि आपला हक्क समजत असलेल्या महानतेसाठी दृढ आहे. तो विरोधाभास, क्रूर हिंसा आणि अफाट शहाणपणाने भरलेला माणूस आहे आणि जो व्यक्ती प्रति दानाची अपेक्षा ना करता प्रेम करतो आणि विना पश्चाताप हत्या करू शकतो. रामचंद्र मालिकेतील या तिसर्‍या पुस्तकात अमीशने लंकेचा राजा रावणाच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू मांडले आहेत. तो इतिहासातील सर्वात मोठा खलनायक आहे की तो परिस्थितीचा बळी पडला आहे? याचे उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला स्टोरीटेलची ही संपूर्ण सिरीज ऐकावी लागेल.

अमिश त्रिपाठींच्या आधुनिक विचारांतून साकारलेली आणि प्रचंड लोकप्रिय ‘रामचंद्र’ सिरीज ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू.९९९/- आहे. पण आता नव्याने वार्षिक वर्गणी भरणा-यांसाठी स्टोरीटेलने अधिक सवलत जाहिर केली आहे आणि फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी  भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.

स्टोरीटेलवर ही ऑडिओबुक सिरीज ऐकण्यासाठील लिंक

https://www.storytel.com/in/en/authors/189554-Amish-Tripathi?pageNumber=1

अटलजींना १०० पुस्तकांनी साकारलेल्या भव्य चित्रातून आदरांजली

0

पुणे : धुरंधर राजकारणपटू, स्थितप्रज्ञ नेता, उत्कृष्ट संसदपटू अशा माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तीमत्वाच्या विविध पैलूंबरोबरच लेखक, कवी ही देखील त्यांची एक विशेष ओळख होती. त्यामुळे विविध प्रकारची गोष्टींची, कवितांची मराठी-इंग्रजी पुस्तके संकलित करुन १०० पुस्तकांच्या सहाय्याने साकारलेल्या अटलजींच्याच चित्रातून त्यांना आगळीवेगळी आदरांजली अर्पण करण्यात आली. 
माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त निनाद पुणे, निनाद पतसंस्था व कलातीर्थ संगीत-चित्रकला विद्यालयार्फे सदाशिव पेठेतील खुन्या मुरलीधर मंदिर चौकातील अटल कट्टा येथे हे चित्र साकारण्यात आले होते. यावेळी निनाद पतसंस्थेचे उदय जोशी व सर्व संचालक, कलातीर्थ संगीत-चित्रकला विद्यालयाचे अमोल काळे, महेश कुलकर्णी, आनंद सराफ, शुभदा जोशी, रामलिंग शिवणगे, संजय देशपांडे, अशोक कुलकर्णी, सुनिता शिवणगे, अप्पा जोगळेकर आदी उपस्थित होते. कलातीर्थच्या विद्यार्थ्यांनी अखंड १२ तास विविध चित्रे साकारत येथे चित्रयज्ञ देखील केला. 
उदय जोशी म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्मरण करण्याकरीता सलग ४ वर्षे अटल कट्टा येथे विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी उपक्रमाचे ५ वे वर्ष आहे. अटलजींचे चित्र साकारण्याकरीता मांडण्यात आलेली पुस्तके अनाथ मुलांच्या संस्था व विविध ठिकाणी भेट म्हणून देण्यात येणार आहेत. 
अमोल काळे म्हणाले, अटलजींचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचावे, याकरीता अटल कट्टा येथे विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा ४ बाय ६ फूट आकारातील १०० पुस्तकांच्या सहाय्याने अटलजींचे चित्र सलग ५ तासात आम्ही रेखाटले आहे. तसेच सलग १२ तास विविध चित्र काढून मुला-मुलींनी चित्रयज्ञ हा उपक्रम राबविला असून ही चित्रे सैनिक मित्र परिवारच्या माध्यमातून सिमेवरील सैनिकांना पाठविण्यात येणार आहेत.

ओमायक्रॉन:निर्बंध झाले लागू; रात्री 9 ते सकाळी 6 जमावबंदी सह दिवसाही सर्व कार्यक्रमांवर पुन्हा निर्बंध

0

सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध

मुंबई दि. 24 : राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.  ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील.

विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे.  जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे, मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एवढेच नव्हे तर केंद्रीय आरोग्य विभागाने देखील सर्व राज्यांसाठी संसर्ग रोखण्याकरिता पुरेशी काळजी घेण्यास व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. सध्याच्या निर्बंधाचे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपाचे असून ते आत्ताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत. ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे.

आज दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात खालीलप्रमाणे  अतिरिक्त निर्बंध असतील

  • संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.
  • लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
  • इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखीलउपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
  • उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
  • क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
  • वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.
  • उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.
  • याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यांनी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.
  • जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

नाताळचा सण समाजात एकता, बंधुता, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो -उपमुख्यमंत्री अजित पवार

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नाताळच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 24 :- मानव कल्याणासह जगाला प्रेमाचा संदेश देणाऱ्या भगवान येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या आयुष्यात सुख, समृध्दी, आनंदासह उत्तम आरोग्य घेऊन येवो, समाजात एकता, बंधुता, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो, अशा शब्दात नाताळच्या सणानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार शुभेच्छा संदेशात म्हणतात की, जगाला दया, क्षमा, शांती, परोपकाराची शिकवण देणाऱ्या भगवान येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा नाताळचा सण सर्वत्र आनंद, चैतन्य, उत्साहाचं वातावरण घेऊन येतो. छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद देणारा नाताळचा सण यंदाही उत्साहात साजरा करायचा आहे. मात्र ‘ओमायक्रॉन’चं नव संकट आपल्या राज्यासह संपुर्ण जगासमोर आहे. त्यामुळे यंदा नाताळचा सण उत्साहात मात्र अत्यंत साधेपणाने, घरातच साजरा करा. नाताळचा सण साजरा करताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करा, स्वत:चं, कुटुंबाचं, समाजाचं संरक्षण करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, ती पार पाडूया, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करूया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

हाच पुल भाजपाला सत्तेवरून खाली खेचेल .. सेनेच्या नगरसेवकांचे भाकीत

0

पुणे- संभाजी पुलावर आणि एकूणच नदीवर केलेलं मेट्रोचे अतिक्रमण हे अत्यंत अयोग्य असून संभाजी पुलावरील मेट्रोचा पूल २०२२ मध्ये भाजपला महापालिकेतील सत्तेतून बाहेर खेचून काढेल असे भाकीत शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी केले आहे .जेवढ्या वेगाने मेट्रोने आपला मार्ग बदलून संभाजी पुलावर झेप घेऊन गणेश विसर्जन मिरवणुकीतील रथांच्या उंचीवर मर्यादा आणण्याचे काम केले तेवढ्याच वेगाने भाजपची सत्ता देखील आता यावेळी त्यांच्या हातून निसटून जाईल असेही त्यांनी म्हटले आहे .गणेश मंडळ कार्यकर्त्यांची केलेली मुस्कटदाबी पुणेकर कदापि विसरणार नाहीत . आणि २०२२ च्या निवडणुकीत भाजपाला जोरदार धक्का देतील असेही धनवडे यांनी म्हटले आहे. प्रतीश्रावणबाळाच्या शापातून तर भाजपाला अजिबात मुक्ती मिळणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था:प्राध्यापकांचे सक्षमीकरण करणारी राज्य शासनाची देशातील एकमेव संस्था

0

            पुणे,दि.24- राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्थ येणाऱ्या अध्यापकांना तसेच उच्च शिक्षणाशी संबंधित सर्व घटकांना त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात सातत्यपूर्ण उच्च दर्जाचे व्यावसायिक शिक्षण देण्याच्या हेतूने ‘महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था’ स्थापन करण्यात आली असून याद्वारे राज्यातील ५० हजारहून अधिक जणांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या संस्थेचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज (२५ डिसेंबर २०२१) होणार आहे.

            ‘महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था’ ही ‘सेक्शन ८’ संस्था असून उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारातून या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. सर्व जग वेगाने बदलत असताना या बदलाचे प्रतिबिंब शिक्षण व्यवस्थेत येणे ही काळाची गरज आहे. यासाठीच या क्षेत्राशी संबंधित प्रत्येक घटकाला यामध्ये सामावून घेत त्यांना काळासोबत नेण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील राहील.

            या संस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील सर्व घटकांना बदलत्या तंत्रज्ञान, शैक्षणिक पद्धती, उद्योग, व्यवसाय व त्यासंबंधित क्षेत्राचे अद्ययावत  ज्ञान दिले जाणार आहे. यामध्ये रोजगाराच्या उपलब्धतेनुसार नव्या अभ्यासक्रमाची निर्मिती, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अध्यापकांचे संपर्क जाळे तयार करणे,  क्षमता वाढीसाठी सातत्याने नवनवे प्रयोग करणे, विज्ञानावर आधारित तर्कशुद्ध विचारप्रणाली तसेच वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षण या मुख्य उद्धिष्टांवर आधारभूत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे शिक्षण महाराष्ट्रातील अग्रगण्य सहयोगी संस्थांच्या मदतीने दिले जाणार आहे.

            या विकास संस्थेने ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन अँड रिसर्च’ (आयसर), पाचगणी येथील ‘इनिशिएटिव्ह ऑफ चेंज’ या तज्ज्ञ संस्थांशी करार केला आहे. तसेच सर जे जे स्कुल ऑफ आर्ट, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, सेंट झेव्हियर्स महाविद्यालय, डेक्कन इन्स्टिट्यूट पुणे, इन्फोसिस, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी अशा अनेक अग्रगण्य संस्था व शिक्षणतज्ज्ञांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रमही राबविले जाणार आहे.

            उच्च शिक्षणाशी संबंधित घटकांमध्ये कुलगुरू, कुलसचिव, अधिष्ठाता, निबंधक, संचालक, प्राचार्य, अध्यक्ष, शैक्षणिक परिषद सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी अशा अध्यापन क्षेत्राशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या संबंधित असणाऱ्या सर्व घटकांचा समावेश आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणातील अध्यापक व अन्य घटकांना धोरणात्मक पद्धतीने प्रशिक्षित करणारी ही देशातील पहिली व एकमेव संस्था आहे.

केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

0

सातारा मेगा फूड पार्क आणि पुण्यातल्या राष्ट्रीय जल अकादमीला भेट देऊन तिथल्या कामांचा घेतला आढावा

पुणे  24 डिसेंबर 2021

केंद्रीय जलशक्ती आणि खाद्यान्न प्रक्रिया राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी पटेल यांनी सातारा मेगा फूड पार्कला भेट देऊन तिथल्या कामाची पाहणी केली. हे फूडपार्क अद्याप पूर्ण क्षमतेनं सुरु झालेलं नाही. यात निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन पटेल यांनी यावेळी दिले. शीतगृहाच्या सुविधा या फूडपार्कमध्ये उपलब्ध कराव्यात, असेही ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री पटेल यांनी सातारा तालुक्यातील अपशिंगे  आणि खंडाळा तालुक्यातील गुटळवाडी या दोन गावांना देखील भेट दिली आणि  ग्रामीण भागातील घरांना पिण्याच्या पाण्याचा सुरक्षित आणि पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकारने हाती घेतलेल्या जल जीवन अभियानामधून त्या गावांमध्ये सुरु असलेल्या कामांचे परीक्षण केले. गुटळवाडी गावात गावकऱ्यांनी सुरु केलेल्या कचरा पुनर्वापर प्रक्रियेचे देखील केंद्रीय मंत्र्यांनी कौतुक केले.

तत्पूर्वी काल पटेल यांनी पुण्यातल्या खडकवासला इथल्या राष्ट्रीय जल अकादमीला भेट दिली. या भेटीत त्यांनी तिथल्या कामाचा आढावा घेतला. पाण्याच्या समस्येवर मंत्रालय काम करत असून खाद्यान्न प्रक्रिया उद्योगात गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती पटेल यांनी दिली.

Image

केंद्र सरकारच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.  केंद्र सरकारने जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनसाठी राज्य सरकारला भरीव अनुदान दिले असून राज्य आणि केंद्राच्या शासकीय संस्थांनी या योजना ग्रामीण भागातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, असे मत प्रल्हाद सिंह पटेल यांनी व्यक्त केले. या योजना नागरिकांपर्यंत पोहोचल्या तरच सशक्त भारत घडण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

यावेळी प्रल्हाद सिंह पटेल यांनी जल अकादमीच्या आवारात वृक्षारोपणही केलं. तसेच दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानी जाऊन श्रध्दांजली अर्पण केली.

मेगाफूडपार्कयोजनेविषयी

पुरवठा साखळीच्या प्रत्येक टप्यात प्रामुख्याने नाशिवंत मालावर विशेष लक्ष केंद्रित करत अन्नाची नासाडी कमी करत आणि मूल्यवर्धन करत अन्न प्रक्रिया क्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, देशात मेगा फूड पार्क योजनेची अंमलबजावणी करत आहे. त्याच बरोबर क्लस्टर आधारित दृष्टीकोनाद्वारे  बाजारपेठेपर्यंत मुल्य साखळीसह मेगा फूड पार्क अन्न प्रक्रियेसाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. या योजने अंतर्गत भारत सरकार एका मेगा फूड पार्क प्रकल्पासाठी 50 कोटी रुपयांचे वितीय सहाय्य पुरवते

सातारामेगाफूडपार्कविषयी

सातारा मेगा फूड पार्क 64 एकर जागेवर 139.30 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आले आहे. या मेगा फूड पार्कच्या मध्यवर्ती प्रक्रिया केंद्रात विकासक ज्या सुविधा तयार करत आहेत,  त्यात 5000 मेट्रिक टन कच्चा माल साठविण्यासाठी सुक्या मालाची साठवणूक करण्ये गोदाम, 2000 मेट्रिक टन माल साठविण्यासाठी रॅक्स असलेले गोदाम, तासाला 2 टन क्षमतेची पल्प लाईन, 3000 मेट्रिक टन साठवणूक क्षमतेचे  शीत गृह, 384 मेट्रिक टन क्षमतेचे पिकवणी कक्ष, तासाला 1 टन क्षमतेचे भाज्या आणि फळांचे पॅक हाऊस आणि इतर अन्न प्रक्रिया सुविधा यांचा समावेश आहे. सातारा मेगा फूड पार्क केवळ सातारा जिल्ह्यातल्या लोकांनाच लाभदायक असणार नाही, तर पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यातल्या लोकांसाठीही उपयुक्त ठरेल.

केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र आणि राष्ट्रीय जल अकादमी :

पुणे येथील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र हे भारत सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीतील जल स्रोत विभागाच्या अंतर्गत होणाऱ्या जलशक्ती आणि संबंधित संशोधनाच्या क्षेत्रातील मुख्य संशोधनविषयक  संस्था आहे. नद्या, तटवर्ती भाग, जल साठे यांच्या संरचना तसेच जलशक्ती रचनेची वाहतूक अधिकाधिक प्रमाणात करण्यासाठी विशिष्ट संशोधन आणि विकासात्मक अभ्यासविषयक नियोजन, आयोजन आणि असा अभ्यास हाती घेण्याबाबत ही संस्था कार्य करते.

भारत सरकारने जल स्त्रोतांच्या विकास आणि व्यवस्थापनामध्ये गुंतलेल्या विविध केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांच्या सेवेत असलेल्या अभियंत्यांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने सन 1988 मध्ये राष्ट्रीय जल अकादमीची स्थापना केली. जल संसाधन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय जल अकादमी, “उत्कृष्टता केंद्र” म्हणून काम करेल अशी परिकल्पना करण्यात आली आहे.

दापोडी महावितरण कार्यालयात थकबाकीदार ग्राहकाची शिवीगाळ; फौजदारी गुन्हा दाखल

0

पुणे, दि. २४ डिसेंबर २०२१: थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यामुळे महावितरणच्या दापोडी कार्यालयात येऊन शिवीगाळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या पिंपरी विभाग अंतर्गत दापोडी शाखा कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी (दि. २३) दापोडी येथील काटे रेसीडेन्सीमधील थकबाकीदार ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर दुपारी हे सर्व कर्मचारी दापोडी कार्यालयात काम करीत होते. त्यावेळी आदर्श शिंदे नामक व्यक्तीने कार्यालयात येऊन काटे रेसीडेन्सीमधील घराचा वीजपुरवठा का खंडित केला असे जोरजोराने ओरडून शिवीगाळ सुरु केली. त्याने एका महिला कर्मचाऱ्याकडून थकबाकीदारांच्या नावाची यादी व मोबाईल हिसकावून घेतला व फेकून दिला तसेच कार्यालयातील सर्वांना दमदाटी केली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी या आरोपीविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात कलम ३५३, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजी पुलावर आकार घेतोय हा मेट्रोचा पूल- पहा मेट्रोतून खालून जाणाऱ्या बस वर उडी मारण्याचे होऊ शकेल शुटींग

0

पुणे- छत्रपती संभाजी पुलावरून मेट्रो जाण्याचा विषय खूपच गाजला आणि राजकारण्यांच्या गदारोळात अखेरीस आहे त्या गोष्टी बरोबर मानून त्या स्विकारीत मेट्रोचा पुल संभाजी पुलावर आकार घेऊ लागलाय . हा पूल पाहिला आणि खालून जाणारी बस पाहिली तर कोणत्याही सिने दिग्दर्शकाला येथून मेट्रोतून खाली बसवर हिरो -व्हिलन यांच्या पाठ्लागातील थ्रील मानली जाईल अशी उडी मारण्याचा शॉट चित्रित करण्याचा मोह झाल्या शिवाय राहणार नाही . कारण अशी उडी देखील सहज शक्य आहे हे लोकही आता हा पुल पाहताक्षणी बोलू लागले आहेत .

इथे गणेश विसर्जन मिरवणुकीतील रथ कसे पार करता येतील हा काही कार्यकर्त्यांचा प्रश्न होता . अर्थात कोणी याला राजकीय प्रश्न होता अशी टिप्पणी देखील करेल . पण वास्तव काही दडून राहणारे नसते . येथून विसर्जन मिरवणूक नेताना बडी बडी धनाढ्य मंडळे स्वतःचे देखावे हायड्रोलिक म्हणजे खाली सरकणारे किंवा फोल्ड होणारे करू शकतील पण छोटी छोटी असूनही बडे बडे उंच देखावे करणारांना मात्र येथे एन्ट्री आता घेता येणार नाही त्यांना संभाजी पुलावरून त्यांना जोशी पुलाचा रस्ता दाखविला आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे .संभाजी पुलावरील मेट्रोचे काम पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास मेट्रो प्रशासनाने हाती घेतले. हे काम शुक्रवारी सकाळपर्यंत पूर्ण होत असल्याची माहिती मेट्रोच्या वतीने देण्यात आली . मेट्रोचे काम हाती घेतल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूने आणि खंडूजीबाबा व टिळक चौकात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जंगली महाराज रस्त्यावरून येणारी वाहने गोखले रस्त्याकडे (फर्ग्युसन) वळवण्यात आली होती. तर कोथरुडकडून येणार्‍या वाहनांना संभाजी पुलाकडे जाण्यास मज्जाव करून ती गोखले रस्त्याकडे वळवण्यात येत होती. तसेच टिळक चौकातून पूलाकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद करून वाहतूक केळकर रस्त्याकडे वळवण्यात आली होती. या बंदोबस्तासाठी जवळपास 75 पोलिस कर्मचारी व 6 अधिकारी तैनात करण्यात आल्याचे डेक्कन पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले.

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त प्रदर्शनीद्वारे वीजग्राहकांचे प्रबोधन

0

पुणे, दि. २४ डिसेंबर २०२१: राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून महावितरणच्या पुणे परिमंडलाकडून वीजग्राहकांचे प्रबोधन करण्यात आले. तसेच महावितरणची ग्राहकसेवा, वीजसुरक्षा, वीजबचतीबाबत माहितीपत्रक वितरीत करण्यात आले.

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शुक्रवारी (दि. २४) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने प्रदर्शनी लावण्यात आली. यामध्ये महावितरणकडून लावण्यात आलेल्या प्रदर्शनीद्वारे वीजग्राहकांचे प्रबोधन करण्यात आले. महावितरणचे मोबाईल अॅप, ऑनलाइन वीजबिल भरणा, नवीन वीजजोडणीसह वीजबिलांच्या नावामध्ये बदल, पर्यावरणपुरक गो-ग्रीन योजना आदींसह वीजसुरक्षेचे महत्व व खबरदारी, वीजबचतीचे उपाय आदींबाबत प्रदर्शनीला भेट दिलेल्या वीजग्राहकांना माहिती देण्यात आली. तसेच संबंधीत माहितीचे पत्रकही वितरीत करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या प्रदर्शनीला भेट दिली व महावितरणच्या मोबाईल अॅपबाबत सविस्तर माहिती घेतली. अॅपद्वारे एका क्लिकवर सर्व सेवा मिळत असल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी समाधान व्यक्त केले. या सोबतच अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार व श्री. प्रकाश राऊत यांनी देखील प्रदर्शनीला भेट देत वीजग्राहकांशी संवाद साधला. दिवसभराच्या या प्रदर्शनीमध्ये ग्राहक सुविधा केंद्रांचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. बी. भरणे व राकेश महाजन, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी व ग्राहक सुविधा केद्रांतील कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या ग्राहकसेवेची माहिती दिली. या प्रदर्शनीच्या आयोजनासाठी कार्यकारी अभियंता सर्वश्री अनिल गेडाम, भागवत थेटे, अमित कुलकर्णी आदींनी सहकार्य केले.