Home Blog Page 2144

कोरेगाव भिमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पुर्वतयारीस वेग समाज कल्याण आयुक्तांनी घेतला आढावा

0

पुणे दि.२७:- जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत प्रशासनातर्फे आवश्यक तयारी करण्यात येत असून समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला.

राज्य शासनाने प्रथमच या कार्यक्रमाचे नियोजन करण्याची जबाबदारी समाज कल्याण विभागाकडे सोपवली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि समाज कल्याण आयुक्तांच्या नियंत्रणाखाली तात्पुरती प्रशासकीय समिती गठित केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विविध विभागांच्या समन्वयक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या अधिकाऱ्यांकडून केलेल्या तयारीचा आढावा समाज कल्याण आयुक्त डॉ. नारनवरे यांनी घेतला.

यावेळी पोलिस विभाग, जिल्हा परिषद विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पी.एम.पी.एल., राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच जिल्हा माहिती कार्यालय विभागनिहाय आढावा घेऊन नियोजनासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रथमच हा कार्यक्रम शासनाच्यावतीने होत असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी एकमेकांच्या समन्वयाने कामे वेळेवर पूर्ण करावीत असे यावेळी आयुक्त डॉ. नारनवरे यांनी सांगितले. कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा देण्यासाठी तसेच शांततामय वातावरणात कार्यक्रम संपन्न व्हावा यासाठी शासनाच्यावतीने सर्व तयारी करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

बैठकीस बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये, पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर जाधव, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोनपे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले, अनिल ढेपे, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पी.एम.पी.एल.च्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे, अन्न व औषध प्रशासनचे सहआयुक्त शिवाजी देसाई, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त विजयकुमार गायकवाड, श्रीमती संगिता डावखर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीदेखील अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाय-योजनांचा शासकीय विश्राम गृह येथे आढावा घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश दिले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये, उपमहापौर सुनिता वाडेकर, यांच्यासह विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

तुळापूर, वढू बुद्रुक विकासासाठी दीडशे कोटींचा आराखडा; स्मारक परिसर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

0

महाराष्ट्र विधानसभा नियम ४७ अन्वये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवेदन

मातोश्री महाराणी छत्रपती सईबाई महाराजांच्या राजगड पायथ्याच्या समाधीस्थळाचाही विकास

मुंबई : स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे हवेली तालुक्यातील तुळापूर येथील स्मृतीस्थळ, शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील स्मारक तसेच तुळापूर आणि वढु बुद्रुक परिसराचा विकास करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी तथा छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी छत्रपती सईबाई यांचे राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधीस्थळ परिसरचाही विकास करण्यात येईल. महाराष्ट्राचा अभिमान आणि अस्मिता असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत  दिला.

महाराष्ट्र विधानसभा नियम 47 अन्वये निवेदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक हौतात्म्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन वंदन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “महाराष्ट्राचं आराध्य दैवत, स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज हे, महाराष्ट्राची अस्मिता, अखंड महाराष्ट्राचे, संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमानाचं रक्षण करण्याचं ऐतिहासिक कार्य, छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. महाराष्ट्र धर्माचं, स्वराज्याचं रक्षण करताना छत्रपती संभाजी महाराजांना, एकावेळी अनेक शत्रूंचा, अनेक आघाड्यांवर सामना करावा लागला. ज्ञान, गुण आणि चारित्र्यानं संपन्न असलेल्या संभाजी महाराजांनी हा सामना मोठ्या धैर्यानं केला. छत्रपती संभाजी महाराज इतके शूर, पराक्रमी होते की, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्वराज्यातला एकही किल्ला, स्वराज्याची एक इंच जमीन शत्रूकडे जाऊ दिली नाही. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यासाठी जगले आणि स्वराज्यासाठी त्यांनी आपला देह ठेवला. संभाजी महाराज स्वराज्यासाठी हुतात्मा झाले. या ऐतिहासिक हौतात्म्याचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचं, जागतिक दर्जाचं, भव्य, प्रेरणादायी स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.”

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, “पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातल्या ऐतिहासिक तुळापूर गावात, छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचा देह ठेवला, अखेरचा श्वास घेतला. तुळापूरपासून जवळ, शिरुर तालुक्यातल्या, वढु बुद्रुक गावी, छत्रपती संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. वढू बुद्रुकमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराजांनी ज्याठिकाणी आपला देह ठेवला, जिथं महाराजांनी अखेरचा श्वास घेतला, त्या ऐतिहासिक तुळापूर गावाचा, तसंच, जिथं छत्रपती संभाजी महाराजांची संमाधी आहे, त्या वढु बुद्रुक गावाचा आणि परिसराचा विकास राज्य शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग, पराक्रमाचा, ज्ञान, गुण, चारित्र्यसंपन्नतेचा, स्वराज्यभक्तीचा इतिहास सांगणारं, जागतिक दर्जाचं, भव्य स्मारक, वढू बुद्रुक इथं, महाराजांच्या समाधीस्थळी राज्य शासनाच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे.”

“छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक जण तूळापूर आणि वढू बुद्रुकला भेट देतात. या सगळ्यांसाठी हे स्मारक केवळ पर्यटनस्थळ असणार नाही तर, छत्रपती संभाजी महाराजांना वंदन, अभिवादन करण्यासाठी वढू बुद्रुकला येणाऱ्या प्रत्येकासाठी, हे स्मारक प्रेरणादायी, स्फुर्तीदायी ठरावं, असा प्रयत्न आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं हौतात्म्य हा, महाराष्ट्राच्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा, गौरवशाली इतिहास आहे. या हौतात्म्याला इतिहासात जाज्वल्य राष्ट्राभिमानाची किनार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या हौतात्म्यानं, महाराष्ट्राच्या मावळ्यांमधली स्वराज्यरक्षणाची भावना तीव्र झाली. प्रत्येक मावळा स्वराज्यासाठी पेटून उठला. स्वराज्यासाठी लढण्यास सिद्ध झाला. संभाजी महाराजांच्या, बलिदानानं मावळ्यांना लढण्याची, जिंकण्याची ताकद, प्रेरणा दिली. या बळावर, नंतरच्या काळात, स्वराज्याच्या मावळ्यांनी, औरंगजेबासह, स्वराज्याच्या शत्रूंविरुद्ध निकरानं लढा दिला. स्वराज्याच्या शत्रूंना जेरीस आणलं. सळो की पळो करुन सोडलं. मावळ्यांच्या हल्ल्यांपुढे खुद्द औरंगजेब सुद्धा थकला, आणि महाराष्ट्राच्या याच मातीत त्याची अखेर झाली. महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान, स्वराज्याचा गौरवशाली इतिहास असलेल्या, छत्रपती संभाजी महाराजांचं वढू बुद्रुक इथं भव्य, दिव्य, जागतिक दर्जाचं स्मारक व्हावं. वढु बुद्रुक आणि तूळापूर या ऐतिहासिक स्थळांचा विकास व्हावा, राज्य शासनाचा आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे. या स्मारकाच्या उभारणीतून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा, त्यागाचा, पराक्रमाचा खराखुरा इतिहास सर्वांपर्यंत, विशेषत: भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे,” असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी स्मारकाची रुपरेषा सांगताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, “छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे असलं पाहिजे. त्याला इतिहासाशी साधर्म्य सांगणारा ‘हेरिटेज’ टच असला पाहिजे. स्थानिक ग्रामस्थ, इतिहासतज्ज्ञ आणि संबंधित सर्वांशी चर्चा करुन स्मारकाचा आराखडा ठरवण्यात येणार आहे. स्मारक जागतिक दर्जाचं व इतिहासाप्रमाणं होण्यासाठी, स्मारक आराखड्यासाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करुन स्मारकाचं बांधकाम केलं जाईल. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला जागतिक दर्जाचं प्रेरणास्थळ बनविण्यासाठी, अनेक विकासकामे हाती घेण्यात येत आहेत. वढू बुद्रुक गावातील मुख्य प्रवेशद्वार हे ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा वाटतील अशा दगडामध्ये बांधकाम करणे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या समाधीस्थळाच्या भिंती व बुरुज इतिहासकाळास अनुरुप जसे होते, त्यापद्धतीनं बांधकाम करणे. ‘मावळा’ वीर शिवले यांच्या समाधीस्थळाचा विकास करणे. समाधीस्थळांची दैनंदिन व्यवस्थापन पाहण्यासाठी कार्यालय व बहुद्देशिय सभागृह निर्माण करणे. भक्तनिवास बांधणे. समाधीस्थळाच्या मागील बाजूस ऐतिहासिक चित्रे रंगविणे. निवडक झाडांखाली पारंपारिक पद्धतीने पार बांधणे. वढू बुद्रुक गावातील अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण करणे. नाले आणि जलस्त्रोतांची सुधारणा करणे. पूल आणि बंधाऱ्यांचा विकास करणे. वढू बुद्रुक गावात वाहुकीची कोंडी सोडवण्यासाठी परिघीय रस्ता (रिंगरोड) तयार करणे. वढू बुद्रुक येथील नदीवर घाट बांधणे. समाधीस्थळाजवळ बारा बलुतेदार (गावगाडा) ग्रामीण संस्कृती प्रदर्शनातून मांडणे. भविष्याच्या दृष्टीने आवश्यक सेवा-सुविधा प्रदान करणे. आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत,” अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

“छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या आजूबाजूला जंगलातील झाडे लावण्यात येणार आहेत. डोंगराळ प्रदेशातील अंतर्देशीय सरोवरे व पाणवठ्यांमुळे चिंच, करंज, गोरखचिंच, तुती, आंबा, फणस, कवठ, कमरख, बोर, आसन अशाप्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यास वाव असल्याने तशा पद्धतीनं वृक्षारोपण करणं. ही झाडे त्या भागात प्रचलित असलेल्या परिसंस्थेसाठी अन्नाचे स्त्रोत बनतील. यासोबतच बांबूच्या झाडांच्या लागवडीमुळे दंडकारण्य विकसीत होईल. या शक्यतांव्यतिरिक्त देशी झाडांच्या लागवडीला, संगोपनाला चालना देण्यासाठी वनस्पती रोपवाटिकेचा विकास करणे. उपरोक्त विकास कामासाठी समाधीस्थळ व भौतिक सुविधा पुरविण्यासाठी एक विशेष कार्यक्रम-योजना राबविण्यात येईल व त्यासाठी अंदाजे रु. 150 कोटी इतका निधी आवश्यक असून तो टप्याटप्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे,” असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनावेळी सांगितले.

एसटीच्या विलिनीकरणाबाबत गठीत समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार – परिवहनमंत्री ॲड.अनिल परब

0

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एस.टी) शासनात विलिनीकरण करावे या मागणीवर अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली असून या समितीला बारा आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे. या समितीच्या अहवालानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

ॲड.परब म्हणाले, संपापूर्वी कृती समितीसोबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले गेले होते, तरी संप सुरू राहिला. यामध्ये विलिनीकरणाचा मुद्दा लावून धरण्यात आला. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नेमलेली ही समिती कामगार, युनियनसह सर्व बाजू ऐकून घेऊन शासनास अहवाल सादर करणार आहे.

राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली असून  देशातील कोणत्याही राज्यात मिळणाऱ्या पगाराएवढा पगार आता या कर्मचाऱ्यांना मिळत आहे. हा पगार दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत नियमित जमा होईल याची हमी सुद्धा राज्य शासनाने घेतली आहे, अशी माहिती परिवहनमंत्री श्री. परब यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देतांना दिली.

संपादरम्यान राज्याचे सुमारे साडे सहाशे कोटी रुपयांचे नुकसान झाले असून सामान्य जनता यामुळे वेठीस धरली गेली. कामावर परत येण्याचे वारंवार आवाहन करुनही अनेक कर्मचारी कामावर परतले नाहीत. त्यांच्यावर केलेल्या निलंबनाची कार्यवाही मागे घेण्याचे आश्वासन देऊनही कामावर परतले नव्हते. त्यामुळे जे कर्मचारी बडतर्फ झाले आहेत त्यांना कामावर घेता येणार नाही त्यासाठी वेगळी प्रक्रिया लागेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या विषयाच्या अनुषंगाने सदस्य रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या विषयावरील चर्चेत सर्वश्री शशिकांत शिंदे, परिणय फुके, गोपीचंद पडळकर यांनी सहभाग घेतला.

अनुयायांनी दर्शनासाठी भीमा कोरेगावला गर्दी करू नये रामदास आठवले यांचे आवाहन

0

पुणे : “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगावला जास्त गर्दी होऊ नये, अशी अधिकाऱ्यांनी विनंती केली आहे. त्याला प्रतिसाद देत मीही कार्यकर्त्यांना एक जानेवारीला भीमा कोरेगावला दर्शनासाठी गर्दी करू नये. कोरोनाबाबतीत नियमांचे पालन करून अनुयायांनी दर्शनासाठी यावे,” असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. ‘गो महाविकास आघाडी गो’ असा नारा देत आठवले यांनी राज्य सरकारवर टीका केली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शहराच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत उपमहापौर सुनीता वाडेकर, ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, अशोक शिरोळे, ऍड. आयुब शेख, ऍड. मंदार जोशी, सचिव महिपाल वाघमारे, असीत गांगुर्डे, संजय सोनवणे, निलेश आल्हाट, मोहन जगताप श्याम सदाफुले, जयदेव रंधवे आदी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, “भीमा कोरेगाव स्तंभाजवळील २० हेक्टर जमीन शासनाने जमीन मालकांना योग्य मोबदला देऊन ताब्यात घ्यावी. त्या जागेवर आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे. पुरातत्व खाते, पर्यटन खात्याच्या वतीने तेथे स्मारक उभे राहावे. अनुयायांना केवळ एक जानेवारीलाच नव्हे, तर कायम येता येईल, दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था उभारावी. ग्रंथालय, संग्रहालय उभारावे. महार बटालियन आणि पोलिसांनीही विजयस्तंभाला मानवंदना द्यावी.”

‘गो महाविकास आघाडी गो’

आपल्या मिश्किल कवितांसाठी रामदास आठवले प्रसिद्ध आहेत. ‘गो कोरोना गो’ ही घोषणा जगभर गाजली. आता ओमिक्रोन आला असला, तरी त्याचा प्रभाव फारसा नाही. त्यामुळे यापुढील काळात माझा नारा ‘गो महाविकास आघाडी गो’ असा असणार आहे. तीन चाकांचे हे सरकार एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न आहेत. शेतकऱ्यांना अजून मदत नाही. दलितांना सुविधा मिळत नाहीत. यंदाच्या बजेटमध्ये तरतूद करावी.


… तर शिवसेनेचा पाच वर्ष मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रकृती लवकर सुधारावी. बाळासाहेब असताना शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग झाला होता. ठाकरे चांगले मित्र आहेत. सत्तेत पन्नास टक्के वाटा देऊ, असे म्हटले असले, तरी अडीच वर्षे मुख्यमंत्री देण्याबाबत कधीही आश्वासन दिले नव्हते. शिवसेनेने घात केला. पाच वर्षे मुख्यमंत्री शिवसेनेला देऊन भाजप शिवसेना एकत्र येण्याचा विचार करावा, असा माझा प्रस्ताव आहे. शिवसेना-भाजप एकत्र येईल का हे पाहावे लागेल. काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी हा मार्ग अवलंबला पाहिजे. याबाबत भाजपला विनंती करणार आहे. 
पाच राज्यांत यश मिळेलउत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या पाच राज्यांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भारतीय जनता पार्टीसोबत आहे. या राज्यात रिपाइंला मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे भाजपाला फायदा होईल. भाजपने रिपाइंला प्रत्येक राज्यात काही जागा द्याव्यात. जागा देणे शक्य नसेल, तर सत्तेत वाटा मिळावा, अशी चर्चा करणार आहे. अखिलेश यादव यांचा प्रयत्न सुरु असला, तरी सत्ता मिळणे अवघड आहे. तेथील गुंडशाही संपुष्टात आणून गोरगरिबांना न्याय देण्याचे काम योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जनतेपर्यंत अनेक योजना पोहोचवल्या आहेत. पेट्रोल-डिझेलचा भाव कमी केला आहे. कृषी कायदे मागे घेतले आहेत. पुन्हा सरकार कायदे आणणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, हे चुकीचे आहे. पाचही राज्यात भाजपची सत्ता येईल. 

राज्यपालांच्या अधिकारांत ढवळाढवळ नकोराज्यपाल सक्रिय आहेत. त्यांचा अधिकाराचा चांगला वापर करत आहेत. गैरवापर करतात असे म्हणणे चुकीचे. याउलट राज्य सरकारकडून राज्यपालांच्या अधिकारात ढवळाढवळ सुरु आहे. ती थांबायला हवी.  राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली असली, तरी हे सरकार घालवणे गरजेचे आहे. 
पालिका निवडणुकीत भाजपसोबत
आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीत रिपाइं भाजपसोबत राहील. सध्या पुणे महापालिकेत ररिपाइंचे पाच नगरसेवक आहेत. मागच्या वेळी १३ जागा दिल्या होत्या. यावेळी १५-१६ जागा द्याव्यात. आरक्षण पडले, तर महापौर पद द्यावे. मुंबईतही भाजप-रिपाइं एकत्रित येऊन उपमहापौर पद रिपाइंला मिळेल. अन्य महानगरपालिका व जिल्हा परिषद यामध्येही आम्ही भाजपसोबत आहोत आणि सत्ता मिळवू.
गांधींबाबतचे वक्तव्य चुकीचे
महात्मा गांधींच्या विचारांवर नरेंद्र मोदी सरकार काम करत आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधीजींचे महत्वपूर्ण योगदान होते. त्यामुळे अशा व्यक्तीच्या बाबतीत साधू-संतांनी अशी टीका-टिपण्णी करणे योग्य नाही. या वक्तव्याबाबत कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करावा.

यावेळी दलित पँथर चळवळीतील यशवंत नडगम यांनी कार्यकर्त्यांसमवेत रिपाइंमध्ये प्रवेश केला. शैलेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. 

शाळा व वर्ग तुकड्यांना अनुदान वेळेत मिळावे यासाठी प्रयत्नशील – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

0

मुबंई, दि. 27 : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या तुकड्यांना अनुदान वेळेत मिळावे यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

विधानपरिषद सदस्य डॉ.सुधीर तांबे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयामध्ये काही कागदपत्राअभावी अनेक शाळा त्रुटीमध्ये आलेल्या आहेत अशा शाळा तसेच वर्ग तुकड्यांना शासनाच्या निर्देशाप्रमाणे ३० दिवसाच्या आत प्रस्ताव दाखल करूनही सहा ते सात महिने उलटले तरी शाळा व वर्ग तुकड्यांना अनुदान मिळालेले नाही यासंदर्भात लक्षवेधी सभागृहात मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत विधानपरिषद सदस्य भाई जगताप, अमरनाथ राजूरकर यांनी सहभाग घेतला.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, शासनाकडून पात्र घोषित करण्यात आलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची तपासणी करून अनुदानासाठी प्राप्त असल्याबाबत काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत. ज्या शाळा त्रुटी असल्याच्या कारणास्तव अपात्र ठरलेल्या आहेत त्या शाळांना तीस दिवसात त्रुटी पूर्तता प्रस्ताव शासनास सादर करण्यास कळविले होते. वित्त विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यापुढे कोणत्याही शाळा अथवा तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करण्यापूर्वी वित्त विभागाची मान्यता आवश्यक राहील असे कळविले होते त्यानुसार वित्त विभागाकडे याबाबतीत काढण्यात आलेल्या त्रुटीं दूर करण्याबाबत स्वत: पाठपुरावा करू, सर्व आमदारांसह उपमुख्यमंत्री यांना भेटून हा प्रश्न सोडविणार असल्याची  माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

बनावट नकाशांबाबत दोषींवर कारवाई होणार – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

0

मुबंई, दि. 27 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या अभिलेखातील १०२ नकाशे संशयास्पद असल्याच्या तक्रारींबाबत दोषींविरूद्धची कारवाई लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत सादर केली.

विधानपरिषद सर्वश्री सदस्य विजय गिरकर, प्रविण दरेकर यांनी मुंबई उपनगर अंतर्गत उपअधीक्षक, भूमि अभिलेख कार्यालयाच्या अखत्यारितील मौजे एरंगळ व उपनगरीय गावे ता.बोरीवली येथील हद्द कायम मोजणीचे जवळपास ८३० हून अधिक नकाशे बनावटरित्या तयार करून भूमि अभिलेख विभागाच्या अधिकृत मूळ अभिलेखात छेडछाड करून खोट्या नोंदी करून शासनाची फसवणूक केल्याबाबत दोषींवर कारवाई होणार का याबाबत लक्षवेधी विधानपरिषदेत सादर केली.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील  वैभव ठाकूर यांनी  दाखल केलेल्या तक्रारीनुसार मुंबई उपनगर जिल्ह्यातील भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या अभिलेखातील १०२ नकाशे संशयास्पद आहेत याची खात्री झाली आहे. जिथे बनावट नकाशे आढळले आहेत असे नगर भूमापन अधिकारी कार्यालय गोरेगाव येथे सखोल चौकशी करून सात आलेखांबाबत तर नगर भूमापन एरंगळ येथे चार सदोष नकाशे आढळले आहेत याबाबतीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबधित नकाशांच्या नकला देण्याचे काम बंद करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात दोषींवर कारवाई लवकरात लवकर करण्यात येईल, अशी माहितीही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत दिली.

कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई – कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत आयोजित करावी असेही त्यांनी निर्देश त्यांनी दिले.
आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी आपल्या सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे असे सांगितले. काही दिवसांपूर्वी आपण दिवसाला 8 लाख डोसेस देत होतो, सद्या 5 लाख डोसेस दिवसाला दिल्या जातात.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल असे पाहण्याचे निर्देश दिले.
डॉ व्यास यांनी अधिक माहिती देताना सांगितले की 8 डिसेंबर रोजी 6200 सक्रिय रुग्ण होते . मात्र आज 10 हजार सक्रिय रुग्ण आहेत. एकूणच गेल्या 20 दिवसांत सक्रिय रुग्णांत 50 टक्के वाढ झाली असून मागील सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती दिली. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 1.06 टक्के झाल्याचेही ते म्हणाले

पीएमपीएमएल कडून पुणे स्टेशन ते कोंढवा (शिवनेरीनगर) नवीन बसमार्ग सुरू

0

पुणे – पीएमपीएमएल कडून दि २६/१२/१०२१ पासून मार्ग क्रमांक १७० पुणे स्टेशन ते कोंढवा (शिवनेरीनगर) हा नवीन बस मार्ग सुरू करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य पातळीवरील नेते.गणेश सातपुते, ‘मनसे’ चे प्रवक्ते योगेश खैरे यांच्या हस्ते कोंढवा (शिवनेरीनगर) येथे या बससेवेचे उदघाटन करण्यात आले. पुणे महानगरपालिकेतील मनसेचे गटनेते व विद्यमान नगरसेवक साईनाथ बाबर व त्यांच्या पत्नी आरती बाबर यांनी या बसेवेसाठी पाठपुरावा केला.मार्ग क्रमांक १७० – पुणे स्टेशन ते कोंढवा (शिवनेरीनगर) या बस सेवेचा मार्ग पुणे स्टेशन, पुलगेट, वानवडी, लुल्लानगर, कोंढवा शाळा, कोंढवा (शिवनेरीनगर) असा असणार आहे. सध्या या बसमार्गावर एका बसद्वारे पुणे स्टेशन व कोंढवा (शिवनेरीनगर) येथून दर दीड तासाला बससेवा उपलब्ध असेल. प्रवाशी प्रतिसाद व उत्पन्न वाढल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढविण्यात येतील. याप्रसंगी बोलताना गणेश सातपुते व योगेश खैरे यांनी कोंढवा (शिवनेरीनगर) परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची पीएमपीएमएल च्या बससेवेची मागणी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या माध्यमातून आज पूर्ण होत असल्याचे सांगितले. तसेच सदरची बससेवा सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर दरात प्रवास करता येणार असल्याचेही ते म्हणाले.

नगरसेवक साईनाथ बाबर म्हणाले, “पुणे स्टेशन पासून कोंढवा (शिवनेरीनगर) पर्यंत पीएमपीएमएल ची थेट बस सेवा नव्हती. सदरची बससेवा सुरू झाल्यामुळे या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच ही बस सेवा सुरू केल्याबद्दल पीएमपीएमएलच्या सर्व अधिकार्‍यांचे परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांनी आभार मानले

याप्रसंगी मनसेच्या पुणे शहर महिला उपाध्यक्षा सुप्रिया शिंदे, मनसेचे हडपसर विधानसभा मतदार
संघाचे विभाग अध्यक्ष अमोल शिरस, मनसेचे शाखाध्यक्ष गणेश बाबर, पुणे स्टेशन डेपो मॅनेजर संजय कुसाळकर, सतिश शिंदे,अशोक सोनवणे सर, ह.भ.प. कुंडलिक रावडे, दादा भणगे, गणेश रावडे, विजय बधे, सचिन कवडे, मारुती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

अमोल शिरस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुप्रिया शिंदे यांनी आभार मानले. पीएमपीएमएलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे यथोचित सत्कार करून सदर बस सेवा सुरु केल्याबद्दल नागरिकांनी आभार मानले.

संगणकतज्ज्ञ डॉ दीपक शिकारपूर ह्यांचा राज्यपालांकडून गौरव

0

पुणे – महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवी सांगता समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ह्यांच्या हस्ते राज्यातील अनेक क्षेत्रातील मान्यवरांचा महाराष्ट्राची गिरिशिखरे ह्या पुरस्काराने सन्मान केला गेला . पुण्यातील संगणकतज्ञ डॉ दीपक शिकारपूर ह्यांचा त्यांनी संगणक साक्षरते साठी केलेल्या भरीव कार्यामुळे गौरव केला गेला . लॉक डाऊनच्या काळात अनेक संगणक व्यावसायिकांचे विद्यार्थ्यांचे त्यांनी समुपदेशन केले आहे व त्यांना प्रस्थापित केले . संगणक साक्षरतेसाठी त्यांनी ४३ पुस्तके लिहिली आहेत व राज्यभर ग्रामीण भागात करिअर विषयावर भाषणे , मेळावे आयोजित केले . 

अटलशक्ती महासंपर्क अभियाना’ला प्रभाग १६ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद – साडे पंधरा हजाराहून अधिक घरांमध्ये संपर्क

0

पुणे – दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या ‘अटलशक्ती महासंपर्क अभियाना’ अंतर्गत प्रभाग क्रमांक १६ मध्ये साडेपंधरा हजार घरांमध्ये संपर्क करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू करण्यात योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना देऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला.
सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ या भागाचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये या अभियानाला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या अभियानात दोन दिवसात प्रभागातील साडेपंधरा हजाराहून अधिक घरांमध्ये संपर्क साधण्यात आला.

केंद्र सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना पुणेकरांपर्यंत पोहोचविणे, तसेच पुणे महापालिकेत सत्ताधारी म्हणून काम करताना गेल्या साडेचार वर्षात नागरिकांसाठी तसेच शहराच्या विकासासाठी पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या योजना तसेच महत्वपूर्ण प्रकल्पांची माहिती नागरिकांना देणे आणि व्यापक जनसंपर्क करणे, ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून हे अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तकाचे प्रकाशन डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आले आहे. तसेच या अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या लोगोचे अनावरण भाजपचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेले आहे.
नागरिकांच्या घरी गेल्यानंतर त्यांना या अभियानाची पुस्तिका भेट देणे, भेट दिलेल्या घरात केंद्र सरकारच्या अभियानाचे लाभार्थी असल्यास त्यांच्याकडून त्याबाबत अभिप्राय घेणे, पक्षाचे कॉल सेंटर, मतदार नोंदणी, युट्यूब चॅनेल यांची माहिती नागरिकांना देणे यासाठी प्राधान्य दिले जात आहे. एका घरात चार लोक राहतात या गृहितकावर हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक भेटीचा तपशील मोबाईल ॲपमध्ये देखील नोंदविला जात असल्याचे सभागृह नेते बिडकर यांनी स्पष्ट केले.


या अभियानाच्या माध्यमातून मोदी सरकारने नागरिकांसाठी कोणत्या योजना सुरू केलेल्या आहेत. तसेच पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरात सुरू करण्यात आलेले विविध प्रकल्प यांची सविस्तर माहिती दिली जात आहे. या भेटी दरम्यान नागरिक त्यांना असलेल्या तक्रारी आणि समस्या देखील सांगत आहेत.
– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका

धारावी येथील बनावट विदेशी मद्याचा कारखाना उद्ध्वस्त

0

मुंबई, दि. 25 : धारावी येथे छापा घालून बनावट विदेशी मद्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला.

याठिकाणी १६५ विविध प्रकारच्या विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, ११७ विविध प्रकारच्या विदेशी मद्याची बुचे, १२६ विविध प्रकारच्या विदेशी मद्याच्या टोप्या ( कॅप्स), ४० अँबसेल्यूट व्होडकाचे टोपन, विविध ब्रॅन्डच्या विदेशी मद्याची लेबले, एक ड्रायर मशीन, तीन टोचे, तीन फनी, एक मार्कर, तीन टूथ ब्रश, एक बॅग सँग व १२ मोठ्या प्लॉस्टिक गोण्याचा इत्यादी साहित्यासह एकूण रुपये ३ लाख ७० हजार ३९० रुपये किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये कल्पेश भरत वाघेला याच्यासह तीन आरोपींना महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे विविध कलमान्वये अटक करण्यात आली आहे. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दिनांक २८ डिसेंबर २०२१ पर्यंत एक्साईज कोठडीचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, मुंबई आयुक्त कांतीलाल उमाप,  विभागीय उप आयुक्त, ठाणे सुनिल चव्हाण, संचालक (अं.व द) श्रीमती उषा वर्मा  तसेच राज्य उत्पादन शुल्क, मुंबई शहर अधीक्षक सी.बी. राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ मुंबई शहर कार्यालयाने केली असून विविध मद्याच्या उच्च प्रतीचे विदेशी मद्य, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, विविध ब्रँडच्या मद्याचा साठा स्वतः जवळ बाळगून त्याची विक्री आपल्या ओळखीच्या लोकांना  करण्याचा उद्देश होता. या कारवाईमध्ये श्रीमती प्रज्ञा राणे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २, मुंबई शहर व अविनाश पाटील, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, आय विभाग मुंबई शहर, आर. जे. पाटील, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एच विभाग, मुंबई शहर, व जवान जी. डी. पवार, प्रविण झाडे, विनोद अहिरे, बालाजी जाधव, श्रीमती महानंदा बुवा यांनी सहकार्य केले.

या गुन्ह्यातील तपास अधिकारी विनोद शिंदे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २, मुंबई शहर हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

जनतेस आवाहन करण्यात येते की, अवैध बनावट मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्र. १८०० ८३३ ३३३३ व व्हॉटस अप क्र. ८४२२००११३३ संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री तर म्हणाले ,’..मला काही माहिती नाही, माहिती घेतो ….(व्हिडीओ)

0

नेमके खरे कोण ? मेट्रो अधिकारी,महापौर कि उपमुख्यमंत्री ? संभाजी पुलावरील मेट्रो पुलाच्या उंचीचा प्रश्न

पुणे- संभाजी पुलावरून नदीवरून पुढे जाण्यासाठी होत असलेला मेट्रोचा पूल हा विसर्जन मिरवणुकीला अडथला ठरेल अशी हरकत घेऊन आंदोलने सुरु झाल्यानंतर महापौरांनी मेट्रो च्या अधिकाऱ्याने त्यांना पाठवलेले पत्र पुढे करून या पुलाचे काम विरोध होत असेल तर पोलीस बंदोबस्तात करा असे आदेश उपमुख्यमंत्री असलेले आणि पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांनीच दिले असल्याचे स्पष्ट केले आणि हे आंदोलन हा विरोध आम्ही लक्षात घेण्याची गरज नाही असे प्रतिपादित केले होते . पण आज यावर पुण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यम प्रतिनिधींनी छेडले असता , लकडी पुलावरील मेट्रो पुलाविरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केलेले असताना या पुलाचे काम सुरु झालेय याकडे लक्ष वेधले असताना  पवार यांनी ,आपल्याला या संदर्भात काहीही माहिती नाही, माहिती घेतो , आणि पुढील ५० वर्षे डोळ्यापुढे ठेऊन आपण निर्णय घेत असतो असे स्पष्ट केल्याने आता या विषयावर पुन्हा एकदा चर्चा उसळली आहे. महापौरांनी , मेट्रोच्या गाडगीळांच्या पत्राचा हवाला देऊन अजित पवारांनीच हे काम पोलीस बंदोबस्तात सुरु करा म्हणून आदेश दिल्याचे स्पष्ट केले आणि हे काम सुरु झाल्याचे निदर्शनास  आणताच  अजित पवारच मला माहिती नाही माहिती घेतो असे म्हणतात. यावरून नेमके खरे काय आणि खोटे काय ? अशी संदिग्धता पसरते आहे . 

देशाला पुढे नेण्याची क्षमता शिक्षणातच – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

पुणे, दि. 25 : देशाला पुढे नेण्याची क्षमता शिक्षणात आहे. शिक्षण क्षेत्रात लावल्या जात असलेल्या नित्यनूतन शोधातूनच आपल्याला प्रगती साधायची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

पिंपरी येथील आचार्य अत्रे रंग मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते जिओटीव्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘पढेगा भारत’ चॅनेलचे उद्घाटन झाले. कार्यक्रमास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, राष्ट्रीय विमुक्त जाती भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या महापौर उषा ढोरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, माजी खासदार डॉ. अमर साबळे, ‘पढेगा भारत’ च्या अध्यक्षा वेणू साबळे आदी उपस्थित होते.

कल्पना करायची असेल तर उच्च दर्जाची करावी, असे सांगून राज्यपाल म्हणाले, साहसाचा संकल्प केला तर आपल्या हातून उत्कृष्ट दर्जाचे काम घडू शकते. माजी प्रधानमंत्री स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी साहसवादाचे कृतिशील उदाहरण घालून दिले. आता पाश्चात्य देशांपेक्षा आपल्या संस्कृतीकडे जग आपल्याकडे आशेने पाहत आहे. मुले ही आपल्यासाठी देवासमान असून त्यांना आपल्याला पुढे न्यायचे आहे. त्यासाठी आभासी ‘डिजिटल’ सोबतच प्रत्यक्ष अशा ‘व्हिजिटल’ अशा दोन्ही पद्धतींचा अवलंब करावा लागेल, असेही श्री. कोश्यारी म्हणाले.

पढेगा भारत’ हे चॅनेल शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण माध्यम ठरेल, असा विश्वास व्यक्त करून सांस्कृतिक संवर्धनासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबरच अध्यात्मिक इंटेलिजन्सलाही महत्त्व द्यावे लागेल, असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.

डॉ. कराड म्हणाले, सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून त्यात जो अधिक स्पर्धात्मक राहील तोच पुढे जाईल. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत. शिक्षणाच्या माध्यमातूनच आपली प्रगती होणार असून ‘पढेगा भारत’ने हे ज्ञानदानाचे पवित्र काम उत्कृष्ट पद्धतीने करून चांगले डॉक्टर, प्राध्यापक, तंत्रज्ञ, उद्योजक आदी सर्वच क्षेत्रातील लोक घडवावेत. दूरचित्रवाणी हे दृकश्राव्य माध्यम असून त्याचा शिक्षणासाठी अधिक चांगला उपयोग होईल, असेही ते म्हणाले.

डॉ. माशेलकर म्हणाले, अल्प खर्चात उच्च दर्जाचे शिक्षण हे उद्दिष्ट असले पाहिजे. शिक्षणाचा विस्तार, वेग, शाश्वतता, गुणवत्ता याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ‘राईट टू एज्युकेशन’ बरोबरच ‘राईट एज्युकेशन’ आणि ‘राईट वे ऑफ एज्युकेशन’ हे आताच्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे. कृतिशील, गतिशील शिक्षणाद्वारे ज्ञानाबरोबरच व्यक्तिसंवर्धन आणि मूल्यवर्धन घडवायचे आव्हान आपल्याला पेलायचे आहे. तंत्रज्ञानाच्या सहकार्याने हे शक्य होत आहे. बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान आणि आत्मविश्वास यातूनच नवी पिढी घडणार आहे, असेही ते म्हणाले

श्री. इदाते म्हणाले, गौतम बुद्धांची प्रज्ञा, शील आणि करुणा ही तत्वे आत्मसंवर्धनासाठी महत्त्वपूर्ण आहेत. शिक्षणातील महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींचे कार्य मार्गदर्शक आहे. त्या मार्गावर चालत अमर साबळे यांनी सुरू केलेले ‘पढेगा भारत’अभियान शिक्षणाला व्यापक स्वरूप देईल असेही ते म्हणाले.

डॉ. नितीन करमळकर म्हणाले, कोविड काळात शिक्षण ठप्प झाले आणि आपण ऑनलाइन शिक्षणाकडे वळून त्याचे स्वरूप व्यापक केले. शालेय शिक्षण ते उच्च दर्जाच्या स्पर्धा परीक्षा एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याचा हा चांगला प्रयत्न आहे. केवळ डिजिटल नव्हे तर दर्जेदार शिक्षण यातून मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी वेणू साबळे यांनी स्वागत करून पढेगा भारतच्या कामाचा आढावा घेण्यासह आज उद्घाटन झालेल्या नवीन चॅनेलची माहिती दिली. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, जिओ चे प्रतिनिधी दीपक शिवले आदी यावेळी उपस्थित होते.

आगामी पुणे महापालिका निवडणुकीत भाजपा किमान १२० जागी विजयी होणार!-भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील

0

अटलशक्ती महासंपर्क अभियानाचा यशस्वी समारोप

पुणे -ज्या शक्तीने विरोधक गारद होतात, अशी शक्ती कार्यकर्त्यांनी निर्माण करावी, अशी माझी नेहमी आग्रही भूमिका असते. अटलशक्ती महासंपर्क अभियानामुळे हे साध्य झालं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा किमान १२० जागी विजयी होऊन पुणेकरांच्या सेवेत पुन्हा कार्यरत होईल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.‌चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. तसेच आता यापुढे ही कार्यकर्त्यांनी लोकसेवेसाठी निरंतर कार्यरत रहावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज भाजपा पुणे शहरच्या वतीने आयोजित अटलशक्ती महासंपर्क अभियानाचा समारोप आ. पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालय आवारात झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उत्तर महाराष्ट्र तथा पुणे शहर संघटनमंत्री रवी अनासपुरे, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

श्री पाटील म्हणाले की, ज्या शक्तीने विरोधक गारद होतात, अशी शक्ती कार्यकर्त्यांनी निर्माण करावी, अशी माझी नेहमी आग्रही भूमिका असते. अटलशक्ती महासंपर्क अभियानामुळे हे साध्य झालं आहे. त्यामुळे जे कुंपणावर होते, ते आता आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत. या अभियानापूर्वी राजकीय विश्लेषण करणाऱ्या संस्था पुणे महापालिका निवडणुकीत भाजपा ८० जागांवर विजयी होईल, असे सांगत होत्या.‌ पण या अभियानानंतर महापालिका निवडणुकीत भाजपा किमान १२० जागी विजयी होऊन पुणेकरांच्या सेवेत पुन्हा कार्यरत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, संघटना माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आहे.‌ त्यामुळे कार्यकर्त्यांनी लोकसेवेसाठी निरंतर कार्यरत रहावे, त्यासाठी लोकसहभागातून सर्वतोपरी मदत करु, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

डॉ. प्रकाश आमटे यांचे प्रेरणादायी ‘प्रकाशवाटा’ ऐका स्टोरीटेलवर!

0

मॅगसेसे पुरस्कार प्राप्त प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे यांचे प्रकाशवाटा हे आत्मचरित्र मराठी साहित्य विश्वात खूपच लोकप्रिय आहे. तरूणांना प्रेरणादायी ठरलेले हे आत्मचरित्र स्टोरीटेल वर रविवार दिनांक २६ डिसेंबर या प्रकाश आमटे यांच्या जन्मदिनी  प्रकाशित होत आहे. सुप्रसिध्द अभिनेते सचिन खेडेकर यांनी मूळ मराठी प्रकाशवाटा वाचले आहे. याशिवाय, प्रकाशवाटाचे इंग्रजी आणि हिंदी अनुवादही ऑडिओबुक स्वरूपात स्टोरीटेलवर उपलब्ध आहेत. 

प्रकाश आमटे म्हणतात, “आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी, असं बाबांच्या मनात होतं. या कामाची जबाबदारी मी घेतली आणि सर्वांनी मिळून ती पार पाडली. बाबांचं हे स्वप्न हेमकलशात प्रत्यक्षात कसं उतरतंय, त्याची ही गोष्ट! म्हटली तर माझ्याही जीवनाची गोष्ट.” ‌सामाजिक कार्यासाठी ‘रेमन मॅगसेसे’ हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार ज्यांना देण्यात आला, त्या डॉ. प्रकाश आमटे यांनी साकार केलेल्या स्वप्नांची ही गोष्ट ‘प्रकाशवाटा’मध्ये शब्दबद्ध केली आहे. दुर्गम भागात गेली चार दशकं सुरु असलेल्या नि:स्वार्थ कामाची ही ओळख संस्मरणीय तर ठरतेच पण आबालवृद्धांना प्रेरणाही देते. 

प्रकाशवाटा’ हे डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांच्या हेमलकसाच्या ‘लोकबिरादरी प्रकल्पा’तल्या अनुभवांवर लिहिलेले पुस्तक आहे. डॉ. बाबा आमटेंचे समाजकार्य अविरत पुढे चालू ठेवताना त्यांची दोन मुले डॉ. प्रकाश आणि डॉ. विकास यांनी आपले आयुष्य देखील त्यांच्या या कार्यासाठी वाहिले. अशाच एका कामाची लोकविलक्षण कहाणी म्हणजे “प्रकाशवाटा”. हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पावर काम करत असताना आलेले अविस्मरणीय अनुभव आणि आलेल्या संकटांवर केलेली मात यांची थरारक कथा या पुस्तकातून वाचायला मिळते. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडच्या दुर्गम भागात ‘माडिया-गोंड’ ही कशीबशी लाज झाकावी एवढीच कपडे वापरणारी अतिशय मागासलेली जमात वास्तव्य करून आहे. अंगभर कपडे घातलेला माणूस बघून घाबरून दूरवर जंगलात पळून जाणारे हे आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेले या कथेतून अनुभवायला मिळतात.

ध्येयवेड्या वृत्तीच्या डॉ. बाबा आमटेंनी अशा या दुर्गम भागात प्रकल्प उभारण्याचे ठरवले. वयाच्या साठाव्या वर्षीची बाबांची जिगर पाहून डॉ. प्रकाश यांनी तत्काळ या प्रकल्पाची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कार्यात त्यांची नुकतेच लग्न करून आलेली पत्नी डॉ. मंदाताई देखील सामील झाल्या. “प्रकाशवाटा” मध्ये मनाला चटका लाऊन जाणारे अनेक प्रसंग आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीतून, जीवावर बेतणाऱ्या प्रसंगातून मार्ग काढत हेमलकशाला इस्पितळ, शाळा सुरु करणाऱ्या झपाटलेल्या लोकांची ही कहाणी आहे. बाबा आमटेंची ही चळवळ आता त्यांची तिसरी पिढी सांभाळत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक समर्थपणे हे काम पुढे सुरु आहे.

डॉ. प्रकाश आमटे यांचे प्रेरणादायी अनुभव ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू.९९९/- आहे. पण आता नव्याने वार्षिक वर्गणी भरणा-यांसाठी स्टोरीटेलने अधिक सवलत जाहिर केली आहे आणि फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी  भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.

स्टोरीटेलवर ही ऑडिओबुक सिरीज ऐकण्यासाठील लिंक
https://www.storytel.com/in/en/books/prakashwata-1503735