Home Blog Page 2117

निघाली झोंबिवली एक्सप्रेस

0

                      मराठीतला पहिला वहिला झोंबीपटाची प्रतीक्षा आता संपली असून येत्या २६ जानेवारीला या आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘झोंबिवली’ संपूर्ण महाराष्ट्र भर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने वैदेही अमेय आणि ललित यांचं त्रिकुट आपल्याला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची भव्यता आणि झोंबीची पहिली झलक या ट्रेलर मधून दिसून येते. गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षक मराठीतला पहिला वहिला ‘झोंम कॉम’ असलेला ‘झोंबिवली’ या चित्रपटाची वाट पाहत आहेत. चित्रपटाचा पहिला टिझर हा फेब्रुवारी २०२० ला प्रदर्शित झाला होता या टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता तर वाढवलीच पण त्याच बरोबर मराठी होत असलेल्या या प्रयोगाला उत्तम दाद ही दिली. टीझर नंतर या आलेल्या ‘अंगात आलया’ या गाण्याने अनेकांना आपल्या तालावर नाचवल आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा हे वर्ष कस मजेशीर सुरू होणार आहे याची जाणीव करून दिली. आता या चित्रपटाचा ट्रेलर आला असून ट्रेलर मध्ये अमेय वैदेही आणि ललित यांच्या सोबत तृप्ती खामकर, जानकी पाठक, राजेंद्र सिरसटकर हे ही कलाकार दिसत असून ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत असून त्याची चर्चा ही दर्जेदार सुरू आहे. येत्या दोन्ही आठवड्यात चित्रपट गृहात कोणताच चित्रपट प्रदर्शित होत नसल्याने आणि प्रेक्षकांची लवकर चित्रपट प्रदर्शित करा या मागणीला अनुसरून चित्रपट ४ फेब्रुवारी ऐवजी २६ जानेवारीला प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मिती संस्था आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमने घेतला.

कोथरुडच्या तात्यासाहेब थोरात उद्यानात अवतरणार साडेपाच कोटीची ‘फुलराणी ‘

0

बॅटरी ऑपरेटर मोनोरेल

पुणे-सारस बागेजवळ चे पेशवे उद्यान लुप्त झाले ,पण तेथील धर्तीवर फुलराणी मात्र पुन्हा अवतरणार आहे अर्थात ती आता बॅटरी व्रीलासणार आहे . बाल चमूंचे विशेष आकर्षण ठरणारा बॅटरी ऑपरेटर मोनोरेल प्रकल्प कोथरुडच्या तात्यासाहेब थोरात उद्यानात सुरु करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या प्रकल्पात ७२ व्होल्ट डीसी बॅटरी ऑपरेटर मोनो रेल असणार आहे. दोन बोग्या आणि चालकाच्या दोन केबिन असणार आहेत. त्यासाठी ४१० आरएमटी ट्रॅक तयार करण्यात येणार असून, सुरक्षा रेलींग, प्लॅटफॉर्म, तिकिट घर याची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या निर्मितीसह पाच वर्षांच्या देखभालीसाठी कलकत्यातील ब्रेथवेट कंपनीबरोबर प्रशासनाने करार करण्यासाठी आवश्यक असणार्या सुमारे ५ कोटी ४७ लाख रुपयांच्या तरतुदीला स्थायी समितीने मान्यता दिली.

पावसाळी पाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी साडेछ्त्तीस लाखाचा निधी

शहराच्या विविध भागांमध्ये पावसाळी पाणी व्यवस्थापन प्रकल्पाअंतर्गत विविध विकासकामे आणि देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे ३६ कोटी ५६ लाख रुपयांच्या निधीला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, शहरातील पावसाळी पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या तिसर्या टप्प्याच्या अंतर्गत ही कामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये नाला विकसित करणे, कल्व्हर्ट बांधणे, पावसाळी पाण्याच्या ड्रेनेज लार्इन टाकणे अशा विकासकामांचा समावेश आहे. कोथरुड, वारजे, बावधन, पाषाण, धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा, मनोरुग्णालय, विमाननगर, वडगाव शेरी, हडपसर, कोंढवा, शनिवार पेठ, दत्तवाडी, हिंगणे, वडगाव, वाडिया आदी परिसरात ही विकासकामे होणार आहेत.

२९१८ कुटुंबाना घरे देण्यासाठी महापालिकेची तब्बल ७० कोटी रुपयांची तरतूद

0

पुणे-प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ७० कोटी रुपयांची पूर्ण अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.रासने म्हणाले, महापालिका क्षेत्रात खराडी, वडगाव खुर्द येथे प्रत्येकी एक आणि हडपसर येथे तीन असे पाच प्रकल्प आवास योजनेअंतर्गत सुरू असून, २९१८ सदनिकांचे बांधकाम करण्यात येत आहे. यासाठी अंदाजपत्रकात ७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. कोविड काळात विविध प्रकारच्या आरोग्य विषयक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने सर्वच भांडवली विकासकामांवरील तरतुदींमध्ये दहा टक्के कपात करण्यात आली होती. त्या प्रमाणे आवास योजनेच्या तरतुदीत सात कोटी रुपयांची कपात करण्यात आली होती.

रासने पुढे म्हणाले, मात्र या प्रकल्पांची महारेरा कायद्या अंतर्गत नोंदणी झाली असल्यामुळे निर्धारीत वेळेत लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा देणे आवश्यक आहे. अन्यथा महारेराच्या वतीने दंड आकारला जाऊ शकतो. वेळेत काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याने विशेष बाब म्हणून आवास योजनेतील निधीत १० टक्के कपात न करता, अंदाजपत्रकात तरतूद केल्याप्रमाणे पूर्ण ७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

एकविरा देवस्थान परिसरात वनपर्यटन राबविण्यात यावे: विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

पुणे, दि.१८: एकविरा देवस्थान तसेच लेण्याद्री देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आराखड्यानुसार कामांना गती द्यावी तसेच एकविरा देवस्थान परिसरात भांबुर्डा वनविहाराच्या धर्तीवर वनपर्यटन राबविणे शक्य असून त्यादृष्टीने वनविभागाने आराखडा करावा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

एकविरा आई मंदिर देवस्थान तसेच लेण्याद्री देवस्थानच्या सर्वांगीण विकास आराखड्याबाबत आढावा बैठक डॉ. गोऱ्हे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे यांनी घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पुणे उपवनसंरक्षक राहूल पाटील, जुन्नर तहसीलदार रवींद्र सबनीस, मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे, पुरातत्व विभागाचे अधिकारी श्री. जंगले, लेण्याद्री देवस्थानचे विश्वस्त जितेंद्र बिडवई आदी उपस्थित होते.

देवस्थानांच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. यातून एकविरा आई मंदिर देवस्थान तसेच लेण्याद्री देवस्थानसह जिल्ह्यातील देवस्थानांचा उत्तम पद्धतीने विकास करण्यात यावा. विश्वस्त आणि प्रशासनात चांगला समन्वय साधून एकविरा आई देवस्थान विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे. तीर्थक्षेत्रांच्या परिसरात वनपर्यटन आणि कृषीपर्यटनावर अधिक भर दिल्यास परिसरात रोजगाराच्या संधी वाढण्यासह विकासाला चालना मिळेल.

लेण्याद्री देवस्थान येथे प्रशासन आणि विश्वस्त यांनी समन्वयाने काम सुरू केले आहे. येथे येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ. प्रकल्प तसेच पथदिव्यांचे काम सुरू असून त्याला गती द्यावी. तसेच सीसीटीव्ही आणि मंदिरातील चांगली प्रकाश योजना बाबतही समन्वयाने आराखडा करावा, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

शाळांमध्ये लसीकरणास सुरुवात-नगरसेविका नागपुरे यांच्या प्रयत्नांना यश

0

पुणे -सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी येथील स्व. तु. ग. गोसावी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १५ ते १८ वयोगटातील मुलामुलींसाठी करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. वडगाव बुद्रुक, हिंगणे खुर्द (प्रभाग क्रमांक ३४) च्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविला जात आहे.
संपूर्ण देशात १५ ते १८ वयोगटातील मुलामुलींसाठी करोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुणे शहरातील ठराविक केंद्रांवर या वयोगटातील मुलांना लस दिली जात आहे. लस घेण्यासाठी होत असलेली गर्दी लक्षात घेत प्रभातील शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी शाळेतच ही लस उपलब्ध करून देण्याची मागणी महानगपालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. याची दखल घेत पालोलिकेच्या आरोग्य खात्याने विठ्ठलवाडी येथील गोसावी माध्यमिक विद्यालयात लसीकरण मोहिम राबविण्यास सुरुवात केली, अशी माहिती नगरसेविका नागपुरे यांनी दिली. शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत जाऊन लसीकरण करण्याचा हा शहरातील पहिलाच उपक्रम असल्याचे नागपुरे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी शाळेत लसीकरण मोहीम आयोजित करण्याबाबत गोसावी शैक्षणिक संस्थेबरोबर चर्चा केल्यानंतर मुख्याध्यापक किरण सुर्यवंशी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पालिकेकडे मागणी केली. विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पखाले, लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी लस उपलब्ध करून देत उपस्थित राहून या मोहिमेची सुरुवात केली. निरामय संस्थेची टीम या लसीकरणासाठी उपस्थित असून डॉ. जयश्री शेटे, सिस्टर सुप्रिया मांडवकर आणि स्नेहल नायर हे यावेळी उपस्थित होते.


गोसावी विद्यालयातील लसीकरण मोहिमेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रभागातील सर्व शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने अशा पद्धतीने लसीकरण मोहीम राबविण्याचा प्रयत्न आहे.

  • मंजुषा नागपुरे, स्थानिक नगरसेविका

टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस 2022 स्पर्धेत रोहन बोपन्ना, रामकुमार रामनाथन यांना मुख्य ड्रॉमध्ये थेट प्रवेश

0
  • ग्रँड स्लॅम स्पर्धेतील  ग्रॅंड स्लॅम उपविजेत्या मॅक्स पर्सेल-ल्युक सेव्हिले यांच्यासह १२ जोड्यांना टाटा ओपनमध्ये थेट प्रवेश
  • प्रेक्षकांविना बायोबबलमध्ये होणार स्पर्धा 

पुणे, जानेवारी 18, 2022: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने आयोजित चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्ना व रामकुमार रामनाथन यांना दुहेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. चौथ्या पर्वातील या स्पर्धेला पुण्यातण्यात म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियम येथे 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे.

 याच महिन्यात अॅडलेड आंतरराष्ट्रीय या एटीपी २५० मालिकेतील स्पर्धेत अव्वल मानांकित जोडीला हरवून विजेतेपद मिळविणाऱ्या  भारतीय जोडीला एकत्रित १५६ मानांकनामुळे थेट प्रवेश मिळाला आहे. या स्पर्धेत १४ जोड्यांना थेट प्रवेश देण्यात आला आहे. देशातील सर्वात जु्न्या टाटा ओपन स्पर्धेचे अधिकार आयएमजीकडे असून, भारतात राईज वल्डवाईड मार्फत तिचे काम चालते.

रोहन बोपण्णाने दिवीज शरणच्या साथीत २०१९ आशियाई क्रीडा स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते. रामकुमारला पूरव राजाच्या साथीत उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र, आता रामकुमार आणि बोपण्णा एकत्र खेळत असून, या वर्षात केलेली विजयी सुरवात ते पुण्यात कायम राखण्यास उत्सुक असतील.

ऑस्ट्रेलियन स्पर्धेत २०२० मध्ये उपविजेते राहिलेल्या मॅक्स पर्सेल आणि ल्युक सेव्हिले यांना दुहेरीच्या मुख्य फेरीत थेट प्रवेश देण्यात आला आहे. पुण्यात २३ वर्षीय पर्सेल देशवासीय मॅथ्यू एबडेन याच्यासाथीत खेळणार आहे. याच स्पर्धेत गेल्या वर्षी तो भारतीय लिअॅंडर पेसच्यासाथीत खेळला होता. सेव्हिले जॉन पॅट्रिक स्मिथच्या साथीत खेळणार आहे.

भारतीय खेळाडूंना टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत खेळताना पाहून आम्हाला अधिक आनंद  होतो. भारतीय खेळाडूंना अधिक संधी मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या स्पर्धेत नेहमीच भारतीय खेळाडू दुहेरीत चांगले खेळत आले आहेत आणि यावर्षी देखिल भारतीयांचा खेळ चांगला होईल अशी अपेक्षा आहे. अर्थात, त्यांच्यासमोर असलेले कठिण आव्हान विसरून चालणार नाही. यावर्षी अधिक दर्जेदार खेळाडू यास्पर्धेत खेळणार आहेत, असे स्पर्धा संचालक प्रशांत सुतार यांनी सांगितले.

युवा लॉरेन्झो मुसेट्टी, २०१८ अमेरिकन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारा राडु अल्बोट, रिचर्ड बेरान्कीस आणि स्टिफानो ट्राव्हाग्लिआ यांना एकेरीसह दुहेरीतही थेट प्रवेश देण्यात आला आहे. 

कोविड १९च्या संकटकाळामुळे दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर होणारी टाटा ओपन ही एकमेव दक्षिण आशियातील एकमेव एटीपी स्पर्धा आहे. यावर्षीही कोविडची भिती आहे. सध्याची परिस्थिती आणि ओमिक्रॉनचा वाढता प्रसार बघता संपूर्ण स्पर्धा ही जैव सुरक्षा चक्रात (bio bubble) घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना परवानगी नसेल. स्पर्धा सुरु होण्यासस आता केवळ दोन आठवड्याचा अवधी बाकी आहे. सर्व गोष्टी वेळेवर पार पडाव्यात यासाठी आम्ही आग्रही आहोत. खेळाडूंच्या व्हिसापासून त्याच्या केंद्र तसेच राज्याच्या परवानगीपर्यंत सर्व गोष्टी वेळेवर होणे आजच्या संकटकाळाच्या दृष्टिने आवश्यक आहे, असे टाटा ओपन महाराष्ट्रचे खजिनदार संजय खंदारे यांनी सांगितले. सरकारच्या सर्व परवानगीबाबतचे काम खंदारे सांभाळत आहेत.

आपल्या लाडक्या खेळाडूंचा खेळ प्रेक्षक गॅलरीतून पाहण्याची अनेकांची इच्छा आहे. पण, सध्याची परिस्थिती आम्हाला प्रेक्षकांच्या प्रवेशाची परवानगी देत नाही. खेळाडू तसेच स्पर्धेशी निगडीत सर्वच व्यक्तींच्या आरोग्याची काळजी महत्वाची आहे. आम्ही देखिल त्याला प्राधान्य देत आहोत. कोविड संदर्भातील सर्व मार्गदर्शक तत्वांचे आम्ही काटेकोर पालन करणार आहोत. नियमानुसार आम्ही कोविड चाचण्याही घेणार आहोत, असे संयोजन सचिव प्रविण दराडे यांनी सांगितले.
जागतिक क्रमवारीत ४९व्या स्थानावर असलेला युक्रेनचा इल्या मार्चेन्को याच्यासह ११ टेनिसपटूंना एकेरीतून पात्रता फेरीसाठी थेट प्रवेश देण्यात आला असून, ते मुख्य फेरीतील चार जागांसाठी आपले कौशल्य पणाला लावतील. मार्चेन्को याना यापूर्वी दोन वेळचा ऑलिंपिक विजेता आणि जागतिक क्रमवारीत आघाडीचे स्थान भूषविलेल्या अॅंडी मरे याला हरवून इटलीतील बिएला येथील एटीपी चॅलेंजर स्पर्धेचे  विजेतेपद पटकावले होते.

प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या मुख्यफेरीत खेळणारा अॅलेक्झांडर वुचिच , ख्रिस्तोफर ऑकोनेल हे अन्य दोन प्रमुख खेळाडू पात्रता फेरीतून आपले नशीब अजमावतील. पात्रता फेरीच्या लढती ३० आणि ३१ जानेवारीस होणार आहेत.

नाना पटोले यांच्यावरील कारवाईसाठी भाजप शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

0


मुंबई, दि. १८ जानेवारी – कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्यासंदर्भात अत्यंत हीन दर्जाचे वक्तव्य केले. नाना पटोले यांच्या या वक्तव्यासाठी त्यांच्यावर राज्य सरकारला कारवाई करण्याचे राज्यपालांनी निर्देश द्यावेत, या मागणीसाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, हा देशाच्या पंतप्रधानांचा म्हणजे देशाचा अपमान आहे. नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्याच्या राज्य सरकारला तात्काळ सूचना द्याव्यात, असे निवेदन राज्यपालांना देण्यात आले आहे. त्या निवेदनावर कार्यवाहीचे आश्वासन राज्यपालांनी दिले आहे. संविधानाचा, घटनेचा, विचारांचा खून करण्याचे काम सरकारच्या आशीर्वादाने सुरू आहे हे राष्ट्रपतींना कळवा, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे. तसेच उद्या बुधवारी मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळ्यासमोर उपोषण केले जाणार आहे. भाजयुमोचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली प्रखर आंदोलन केले जाणार आहे. पंतप्रधानांचा कोणत्याही प्रकारचा अपमान सहन केला जाणार नाही. त्यासाठी भाजपतर्फे सर्व प्रकारची आंदोलने केली जातील, असा इशाराही विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी यावेळी दिला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार मनिषा चौधरी, आमदार कालिदास कोळंबकर,भाजपाचे सरचिटणीस संजय उपाध्याय,उपाध्यक्ष पवन त्रिपाठी, भाजयुमोचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना मुंबई आदी मान्यवर उपस्थित होते.

नाना पटोले यांच्यावर कारवाई झाली नाही तर चर्चगेट येथील गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसणार

आमदार मंगल प्रभात लोढा

उद्या बुधवार दि.१९ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई झाली नाही तर चर्चगेट येथील गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार श्री. मंगल प्रभात लोढा यांनी राज्यपाल यांच्या भेटी दरम्यान दिला.

भाजपाच्या खड्ड्यांनी हैराण होणाऱ्यांना सेनेच्या विम्याचा आधार

0

पुणे, दि. १८ जानेवारी: पुणे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांमध्ये मोठया प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक जागी रस्ते खचल्याने वाहनचालकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली असल्याने शिवसेनेच्या कसबा विधानसभा मतदार संघाच्यावतीने अभिनव पध्दतीने आंदोलन करण्यात आले. खड्यांमुळे वाहनचालकांचा अपघात झाल्यास त्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने एक लाखांचा विमा काढुन देण्यात आला आहे. शिवसेनेचे पुणे उपशहर प्रमुख बाळासाहेब मालुसरे यांच्यावतीने  शिवाजी रोडवरील गाडीखाना हॉस्पिटलसमोर हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, शहर समन्वयक राजेंद्र शिंदे, असंघटीत कामगार सेनेचे अनंत घरत, विभागप्रमुख नितीन परदेशी, संघटक नंदू येवले, युवासेनेचे युवराज पारिख, सनी गवते, संतोष भूतकर, नागेश खडके, अमोल हुलावळे, नितीन रावळेकर, दिनेश दाभोळकर, निलेश जगताप, प्रशांत पैलवान, रमेश क्षिरसागर, राजेश मोरे, हर्षद मालुसरे, गनी पठाण, राजेंद्र अबनावे, बकुळ डाकवे उपस्थित होते.

बाळासाहेब मालुसरे म्हणाले की, पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असुन शहरात निकृष्ठ दर्जाचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. सत्ताधारी भाजप केवळ टेंडर काढून कमिशन गोळा करण्यात व्यस्त आहे. शहरातील अनेक भागांमध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पाणी पुरवठा, सांडपाणी वाहिनी अथवा केबल टाकण्यासाठी शहरामध्ये ठिकठिकाणी महापालिकेकडून खोदकाम करण्यात आले. मात्र त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात डागडूजी केल्यामुळे शहरातील अनेक रस्ते खचले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होणे हि नित्याचीच बाब झाली आहे. बहुतांशी ठिकाणी खड्डा बुजविताना थेट माती टाकून खड्डा बुजविला आहे. तर, काही ठिकाणी खडी न टाकता थेट काँक्रीट टाकले जात आहे. प्रसंगी त्याच ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुणे शहर शिवसेनेच्यावतीने वाहचालकांचा अपघात झाल्यास त्यांना आर्थिक आधार म्हणून एक लाख रुपयाचा विमा काढण्यात आला असल्याचे बाळासाहेब मालुसरे यांनी सांगितले. 

ग्लोरिया गर्ल्स हायस्कूल आग प्रकरणाचा पर्दाफाश करणार

0

आग दुर्घटनेस जबाबदार सबंधितांविरुध्द कारवाई करा
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

मुंबई, दि. १८ जानेवारी – शाळेच्या परिसरातील अनधिकृत दुकानांमुळे शाळेमध्ये आगीची दुर्घटना घडली असून या दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांविरुध्द तातडीने कार्यवाही करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात येतील. तसेच या दुर्घटनेचा पर्दाफाश करण्यात येईल असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.
या शाळेला विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शालेय व्यवस्थापनाच्या विनंतीनुसार भेट दिली. यावेळी त्यांच्याबरोबर भाजप भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरेकर यांनी शाळेच्या शिक्षिका, पालक यांच्याशी या विषयाबाबत चर्चा केली. आणि आग लागलेली घटना तसेच सर्व समस्या समजून घेतल्या. विद्यार्थ्यांशीही संवाद साधला आणि त्यांच्याशी समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी भाजपचे नेते मधू चव्हाण, भाजपा भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर, नगरसेविका सौ. सुरेखा लोखंडे व भायखळा विधानसभेतील भाजपाचे कार्यकर्ते, विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते.
भायखळा येथील सेंट ग्लोरिया गर्ल्स हायस्कूलच्या परिसरातील १२ अनधिकृत लाकडांच्या दुकानांना १० जानेवारी रोजी पहाटे आग लागली. या आगीची झळ शाळेला पोहोचली आणि शाळेतही आगीने उग्र रूप धारण केले. शाळेच्या तिस-या माजल्यापर्यंत ही आग पोहोचली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु शाळेच्या परिसरात अनेक अनधिकृत लाकडाची गोदामे आहेत. जर ही आग शाळा सुरू असताना ही दुर्घटना घडली असती तर अनेक विद्यार्थी यामध्ये होरपळली असती अशी भीतीही दरेकर यांनी व्यक्त केली.
जी शाळा गोरगरीबांना मदत करते, जी शाळा गोरगरिबांसाठी काम करतेय तिला सहकार्य करणे, त्या पालकांना मदत करणे, दिलासा देणे आणि त्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणे हे करायला पाहिजे तर येथील नगरसेवक जे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षही आहेत त्यांना विद्यार्थ्यांचे काहीही पडलेले नाही, पालकांचे काहीही पडलेले नाही. त्यांचे इंटरेस्ट वेगळे आहेत. या सर्व गोष्टींचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी देतानाच आगामी अधिवेशनात हा प्रश्न प्रधान्यक्रमाने मांडणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
आगीच्या दुर्घटनेनंतर शाळेत अनेक असुविधा निर्माण झाल्या आहेत. परंतु पालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही. अशी व्यथाही शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांनी दरेकर यांच्याकडे मांडली. त्यामुळे या शाळेच्या पुनर्स्थितीबाबत महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करण्यात येईल व शाळेतील असुविधा प्राधान्याने सोडविण्यात येतील असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
दरेकर म्हणाले की, महापालिका आणि या विभागातील नगरसेवक यांच्या प्रायोरिटी काय आहेत, चुकीच्या लोकांना पाठीशी घालून, त्यांच्याकडून मलिदा खाऊन त्यांना मदत करणे यामुळे अशा घटना घडतात आणि एवढी मोठी अनधिकृत दुकानांची बांधकामे उभी राहतात. या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या माध्यमातून भायखळा आग्रीपाड्यात उर्दू भवन उभारण्याचा शिवसेनेचा डाव-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0


जनआंदोलन उभे राहिल्यास महापालिकाच जबाबदार –

मुंबई, दि. १८ जानेवारी – सत्तेसाठी समझोता केलेल्या शिवसेनेकडून एका विशिष्ट समाजाला खूश करण्याचा प्रयत्न सध्या भायखळा, आग्रीपाड्यात सुरू आहे. महापालिका प्रशासनाकडून उर्दू भाषा केंद्र उभारण्याचा घाट घातला जात आहे. ही जागा सर्वसामान्य नागरिकांच्या वापरासाठी आहे आणि त्याचा वापर त्यासाठीच झाला पाहिजे. आम्ही स्थानिक नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
भायखळा, आग्रीपाडा येथील जागा औद्योगिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण केंद्रासाठी राखीव आहे. तरीही महापालिकेच्या माध्यमातून येथे उर्दू भवन उभारण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. आणि उद्या येथे जनआंदोलन उभे राहिले तर याला महापलिकाच सर्वस्वी जबाबदार असेल, असा इशाराही दरेकर यांनी दिला.
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज प्रस्तावित उर्दू भवन येथील जागेची पाहणी केली. वेळ पडल्यास भाजपतर्फे येथे आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही दरेकर यांनी दिला. यावेळी महापालिकेचे स्थानिक अधिकारी उपस्थित होते. यावेळी दरेकर यांनी या जागेबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून समजावून घेतली. हे काम बेकायदेशीरपणे पुढे रेटून नेता येणार नाही, असेही प्रविण दरेकर म्हणाले. यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा, भाजपचे ज्येष्ठ नेते मधु चव्हाण, भायखळा भाजपा विधानसेभेचे अध्यक्ष नितीन बनकर यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न रोखण्यासाठी भाजपाची दक्षता समिती स्थापन

0

पुणे-छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने उभारण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षात चालू झाले असून गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची दक्षता समिती स्थापन करत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी केली.
आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारच्या साथीने शिवसेनेचे सरकार नोव्हेंबर २०१९ मध्ये सत्तेवर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे हिरवेकरण करण्याचा निंदनीय प्रयत्न सुरू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते व त्यांच्यामुळे आज हिंदू समाज अस्तित्वात आहे. तरीही सध्याच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाच्या सोईने शिवाजी महाराजांचे चरित्र सांगण्याचा घातक प्रयत्न सुरू झाला आहे. त्यातूनच राज्यातील विविध गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने निर्माण करण्यात येत आहेत.
ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी किल्ले रायगड येथे मदार मोर्चा येथे रंगरंगोटी करून व चादर चढवून त्याचे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. त्याच्या विरोधात छत्रपती खा. संभाजीराजे यांनी पुरातत्व खात्याकडे पत्र पाठवून कारवाईची मागणी केली. विशेष म्हणजे स्थानिक शिवसेना आमदारांनी या विषयाकडे दुर्लक्ष केले पण मा. संभाजीराजे यांनी आवाज उठवला. दुर्दैवाने राज्यात ठिकठिकाणी गडकिल्ल्यांवर असे प्रकार घडू लागले आहेत. शिवनेरी गडावर ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक सिद्दी इब्राहिम खान उद्यान’ असा फलक लावला गेला. रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावर ‘शिवाजी महाराजांचे गुरुवर्य पीरसाहेब यांच्या स्थानाकडे’ असा बोर्ड झळकला. या प्रकारांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारी केल्या की पोलीस ऐतिहासिक पुरावा मागतात आणि तक्रार घेत नाहीत. ऐतिहासिक बाबींचे सरसकट कागदोपत्री पुरावे मिळू शकत नाहीत याचा फायदा घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या आशिर्वादाने व पोलिसांच्या मदतीने गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्यात येत आहे.
ते म्हणाले की, शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले आहे आणि तो पक्ष गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याकडे दुर्लक्ष करत असला तरी भारतीय जनता पार्टी शिवरायांच्या इतिहासात बदल करणे सहन करणार नाही. त्यामुळेच आपण पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे एक दक्षता समिती स्थापन करत आहोत. ही समिती गडांना भेट देऊन गेल्या दोन वर्षात गडाचे पावित्र्य भंग करण्याचे कोणकोणते प्रयत्न झाले आहेत याची नोंद करेल आणि नंतर संपूर्ण पक्ष जनजागृती करून गडांचे पावित्र्य जपण्यासाठी संघर्ष करेल. भाजपा खा. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने केंद्र सरकराच्या पुरातत्व खात्याकडे निवेदन देऊन नुकतेच या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. केंद्र सरकार कारवाई करेलच पण पक्ष म्हणून भाजपाही या विषयावर पाठपुरावा करेल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी भाजपाची प्रदेश दक्षता समिती खालीलप्रमाणे –
अध्यक्ष – खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर, माढा
सदस्य – खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
माजी आमदार नितीनराजे शिंदे, सांगली
भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर
भाजपा प्रदेश महिला मोर्चा चिटणीस वर्षा डहाळे
समितीचे मार्गदर्शक भाजपा राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर

ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0

कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर कोल्हापूर येथील कसबा बावड्यातील पंचगंगा स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
राज्य शासनाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही दिवंगत प्रा.एन. डी. पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र, पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी हवेत झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली.
यावेळी स्वर्गीय प्रा.एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज उर्फ माई, मुलगा प्रशांत व सुहास, स्नुषा संगीता, नात रिया यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत दिवंगत प्रा.पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तत्पूर्वी ज्येष्ठ विचारवंत दिवंगत प्रा. एन. डी. पाटील यांचे पार्थिव कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासह, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत प्रा. एन. डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी खासदार, लोकप्रतिनिधी, शिक्षण, सहकार, सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, कामगार, नागरिक यांनीही दिवंगत प्रा.एन.डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

यावेळी दिवंगत प्रा.एन.डी.पाटील यांच्या पत्नी सरोज उर्फ माई, मुलगा प्रशांत व सुहास पाटील यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते.

१२८० गावे कृषिपंपांच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त

0

३१ मार्चपर्यंत योजनेचा लाभ घेण्याचेआवाहन

मुंबईदि. १ जानेवारी २०२२: कृषिपंपांच्या वर्षानुवर्ष थकीत वीजबिलांच्या रकमेत सुमारे ६६ टक्के सवलतीचा लाभ घेत ३ लाख ७५ हजार २५४ शेतकऱ्यांसह राज्यातील तब्बल १२८० गावांनी कृषिपंपांचे वीजबिल कोरे केले आहे. तर राज्यभरातील ३० हजार ३९९ रोहित्रांवरून वीजजोडणी असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी संपूर्ण थकबाकीचा भरणा करून रोहित्रांना देखील थकबाकीमुक्त केले आहे. राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० ची महावितरणकडून सुरु असलेल्या अंमलबजावणीला मोठे यश मिळत असून येत्या ३१ मार्चपर्यंत चालू बिल व सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ होणार आहे.

वीजबिलांची थकबाकीमुक्ती, कृषिपंपांना नवीन वीजजोडण्या, भरलेल्या कृषी बिलांमधील ६६ टक्के रक्कम स्थानिक वीजयंत्रणेसाठी खर्च करण्याची तरतूद असलेल्या कृषिपंप वीजजोडणी धोरणाची अंमलबजावणी वेगाने सुरु आहे. राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतील या धोरणाला तर महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या नेतृत्वातील अंमलबजावणीला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. परिणामी ३ लाख ७५ हजार शेतकऱ्यांसह १२८० गावांनी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीचे स्वप्न साकारले आहे. तर आतापर्यंत १९ लाख ५८ हजार ७३४ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग घेतला असून २०६३ कोटी ४३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. या शेतकऱ्यांची एकूण ६१०० कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्यात आली आहे.

कोकण प्रादेशिक विभागातील सर्वाधिक ११२२, पुणे- ९३, नागपूर- ६१ आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागातील ४ अशा एकूण १२८० गावांमधील शेतकऱ्यांनी चालू वीज बिल व ५० टक्के सुधारित थकबाकीचा भरणा करून १०० टक्के थकबाकीमुक्ती मिळविली आहे. याचप्रकारे राज्यभरातील ३०,३९९ वितरण रोहित्रे कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त झाले आहेत. या रोहित्रांवरून वीजजोडणी घेतलेल्या ४३ हजार ७७५ शेतकऱ्यांनी ३८ कोटी २९ लाख रुपयांचा भरणा करून कृषिपंपांचे वीजबिल कोरे केले आहे. यात कोकण- १० हजार ४४, पुणे- ८ हजार २३०, नागपूर- ८ हजार ३९३ आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागातील ३ हजार ७३२ रोहित्रांचा समावेश आहे.

कृषिपंपांच्या वीजबिलांमधून आतापर्यंत राज्यातील ३ लाख ७५ हजार २५४ शेतकऱ्यांनी संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळविली आहे. या शेतकऱ्यांनी चालू बिल व ५० टक्के सुधारित थकबाकीचे एकूण ७५४ कोटी ५८ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यांना विलंब आकार, व्याज व निर्लेखन व्यतिरिक्त उर्वरित ५० टक्के थकबाकीचे म्हणजे ५४४ कोटी ३२ कोटी रुपयांची अतिरिक्त सवलत मिळाली आहे. यामध्ये पुणे प्रादेशिक विभागातील सर्वाधिक ६ लाख ७० हजार ३२४, कोकण- ५ लाख ६२ हजार ४९३, औरंगाबाद- ४ लाख ४१ हजार ९८२ आणि नागपूर प्रादेशिक विभागातील २ लाख ८३ हजार ९३५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. सुधारित थकबाकीमध्ये ५० टक्के सवलतीची मुदत येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत आहे. त्याआधी योजनेत अद्यापही सहभागी न झालेल्या शेतकऱ्यांनी चालू बिल व ५० टक्के थकबाकीचा भरणा केल्यास त्यांना थकबाकीमुक्तीची संधी आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला मात्र आवश्यक चालू बिल तसेच सुधारित थकबाकी ५० टक्क्यांपेक्षा कमी भरलेली आहे त्यांनीही येत्या ३१ मार्चपर्यंत उर्वरित चालू बिल व थकबाकीची रक्कम भरल्यास कृषिपंपाचे संपूर्ण वीजबिल कोरे करता येणार आहे.

कृषिपंपांच्या वीजबिलांबाबत तक्रारी किंवा शंका असल्यास त्याचे ताबडतोब निराकरण करण्याचे आदेश मुख्यालयातून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. आतापर्यंत राज्यभरातून प्राप्त झालेल्या कृषिपंपाच्या बिलांबाबत १ लाख ५९ हजार ३४७ पैकी १ लाख ५० हजार ४२१ (९४.४ टक्के) तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात आले आहे तसेच वीजबिल दुरूस्तीचे सुमारे २७३ कोटींची रक्कम संबंधीत शेतकऱ्यांच्या वीजबिलामध्ये समायोजित करण्यात आली आहे. येत्या मार्चपर्यंत सध्याच्या सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम व चालू बिल भरून शेतकऱ्यांनी कृषिपंपाचे वीजबिल थकबाकीमुक्त करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सोनियाजी ,​​​​​​​राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोघेही काँग्रेसला कमकुवत करत आहे- थेट पत्र

0

मुंबई-AICC सदस्य विश्वबंधू राय यांनी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. राय यांनी पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे पदाधिकारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे पक्ष कमकुवत झाला आहे. विश्वबंधू राय हे मुंबई काँग्रेसचे महासचिव आहेत. तसेच ते माजी खासदार संजय निरुपम यांचे निकटवर्तीय मानले जातात.राय यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारमधील काँग्रेसचे 12 मंत्री पक्षाच्या अजेंड्यावर काम करत नाहीत. संघटन मजबूत करण्याबाबत हे मंत्री पूर्णपणे उदासीन आहेत. तसेच पुढे त्यांनी काँग्रेस हायकमांडला आठवण करून दिली की 2019 मध्ये काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबईला भेट दिली तेव्हा एसआरए योजनेअंतर्गत झोपडपट्टीवासीयांना 500 चौरस फूट फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते.मुंबईसह सुमारे 10 महापालिकांच्या निवडणुकीपूर्वी लेटरबॉम्ब फुटल्याने काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या मंत्र्यांची पोलखोल करण्यासाठी हे पत्र लिहिले आहे

काँग्रेसचे आश्वासन पूर्ण करण्यात अपयश आले
राय यांनी पुढे लिहिले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील होऊनही काँग्रेसचे हे आश्वासन पूर्ण झाले नाही, तर शिवसेनेने 500 स्क्वेअर फुटांच्या सदनिकाधारकांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन दिले होते. ते नुकतेच पूर्ण झाले आहे. राज्य सरकारमध्ये काँग्रेसचा समावेश आहे. असे असतानाही जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात कुचराई होत आहे. या व्यतिरिक्त जनतेसोबत वीज बिल माफ करण्याविषयी केलेले आश्वासन देखील पूर्ण करण्यात आले नाही, याविषयी ऊर्जा मंत्र्यांची तक्रार करण्यात आली आहे.

मुंबई काँग्रेस शिवसेनेच्या संगनमताने चालवली जात आहे
अध्यक्ष भाई जगताप हे शिवसेनेच्या संगनमताने मुंबई काँग्रेस चालवत असल्याचा आरोप विश्वबंधू राय यांनी केला आहे. 36,000 कोटींचे वार्षिक बजेट असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक डोक्यावर असुनही मुंबई काँग्रेसकडून एकट्याने निवडणूक लढवण्याची कोणतीही तयारी दिसत नसल्याचे त्यांनी सोनिया गांधींना सांगितले. महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विविध महामंडळांमध्ये त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची नियुक्ती करत आहेत, तर काँग्रेस कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

राय यांनी हा प्रश्न देखील उपस्थित केला आहे की, मुंबईमध्ये पक्षाची डिजिटल सदस्यत्व मोहीम सुपर फ्लॉप कशी ठरत आहे. याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला दिली आहे. राय म्हणाले की, महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसचा सहभाग आहे. असे असतानाही पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेला राज्य सरकारने मान्यता दिली नाही. या राजकीय घटनेमुळे मुंबईतील लोकांमध्ये पक्षाची प्रतिमा डागाळली आहे.

केंद्रीय मंत्री राणेंना अटक केली होती, मग नाना पटोलेंना का नाही ?

0

मुंबई–विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली मारण्याची भाषा केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यात आली होती. मग आता नाना पटोलेंना अटक का नाही? असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे तसेच राज्या सिलेक्टिव्ह काम सुरू असल्याचा आरोप देखील फडणविसांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावली असते असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मग आता तर नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबतीत जे विधान केले, त्यापेक्षा हे भयानक विधान नाना पटोलेंनी केले आहे. मग असे असताना केंद्रीय मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना रातोरात अटक करणारे पोलिस आता का गप्प आहेत ? कारवाई का केली जात नाही? असा सवाल फडणवीसांनी केला आहे.

…त्या राज्याची अधोगती झाल्याशिवाय राहात नाही
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘राणेंना अटक केली तशी पटोलेंना केली जात नाही. यामुळेच मी म्हणतो सिलेक्टिव्ह काम सुरू आहे. पोलिस विभाग सिलेक्टिव्ह होतो, त्या राज्याची अधोगती झाल्याशिवाय राहात नाही. मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारीच आहे की देशाच्या पंतप्रधानांना कोणी जीवे मारण्याची धमकी दिली असेल तर त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे ! हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्यच आहे, उपकार नाहीत. असा टोला देखील देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.

कायदा माणूस बघून चालेल अशी परिस्थिती आलीय
देवेंद्र फडणीसांनी नाना पटोलेंवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. ते म्हणतात की, शारीरिक उंची वाढल्यामुळे बौद्धिक उंची वाढतेच असे नाही. नाना पटोले यांनी हे दाखवून दिले आहे. काँग्रेस नेत्यांच्या मनात मोदींजींबद्दल असूया आहे कारण पंजाबमध्ये देखील पंतप्रधानांचा ताफा अडवण्यात आला होता. आता पटोलेंनी असे विधान केले आहे. मात्र अशा प्रकारचे विधान हे लोकशाहीसाठी घातक आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला राबडी देवी म्हटलं तर पोलिस जातात…
पुढे बोलताना देवेंद्र फडणीसांनी रश्मी ठाकरे यांचा उल्लेख देखील केला आहे. ते म्हणाले की, ‘मला एका घटनेचे आश्चर्य वाटते. पण मी या घटनेचे समर्थन करत नाही. आमच्या एका कार्यकर्त्याने मुखमंत्र्यांच्या पत्नीला राबडी देवी म्हटले होते. यावेळी मध्यरात्री त्याच्या घरी पोलिस जातात. मात्र नाना पटोले मी पंतप्रधानांना मारू शकतो अशी थेट धकमी देतात आहेत. असे असताना त्यांच्या विरुद्ध साधा FIR देखील दाखल होत नाही. आता कायदा माणूस बघून चालेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.’ असे देखील फडणवीस म्हणाले.