पुणे-पीएमपीएमएलच्या मार्केट यार्ड डेपोमध्ये पर्वती विधानसभा मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ
यांच्या विकास निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आला.
मार्केट यार्ड डेपोमध्ये ड्रेनेज लाईन, काँक्रिटीकरण, स्वच्छतागृह बांधणे तसेच रुणवाल पार्क लगत संरक्षक भिंतीचे बांधकाम
करणे अशा विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ पार पडला.
याप्रसंगी आमदार सुनिलकांबळे, पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले,
नगरसेविका मानसी देशपांडे, राजश्रीशिळीमकर, राजेंद्र शिळीमकर,
महेश वाबळे, प्रवीण चोरबेले, कविता वैरागे,
अनुसया चव्हाण, प्रसन्न जगताप, स्मिता वस्ते, आनंद रिठे,
वर्षा साठे, दिनेश धाडवे, रमेश बिबवे, बाजार समितीचे प्रशासक
मधुकर गरड, पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालिका डॉ. चेतना केरुरे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक
दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी . चंद्रकांत वरपे, मार्केट यार्ड डेपो मॅनेजर नारायण भांगे
यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, “पीएमपीएमएलच्या डेपोंमध्ये आवश्यक ती विकास
कामे होण्याच्या दृष्टिकोनातून भाजपच्या लोकप्रतिनिधींनी व स्थानिक नगरसेवकांनी आपापल्या भागातील पीएमपीएमएलचे
डेपो विकसित करण्यासाठीच्या प्रस्तावांकडे लक्ष द्यावे, जेणेकरून डेपोंमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देता येतील.
मार्केटयार्ड डेपो व रुणवाल पार्क सोसायटीच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारी विकासकामे माझ्या विकास निधीतून होत
आहेत ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे.”
आमदार . सुनिल कांबळे म्हणाले, “पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन डेपोमध्ये माझ्या विकास निधीतून
विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला. महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून पीएमपीएमएल चा
चेहरा-मोहरा बदलण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले व करत आहोत.”
सदरच्या भूमीपूजन समारंभास मार्केटयार्ड डेपोतील कर्मचारी व रुणवाल पार्क सोसायटी मधील रहिवाशी उपस्थित
होते.
पीएमपीएमएलच्या मार्केट यार्ड डेपोमध्ये आमदार माधुरी मिसाळ यांच्या विकास निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे इनोव्हेशन हॅकेथॉन स्पर्धा २० पासून
पुणे, दि.१९ जाने.: विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि इनव्हेंशनची संस्कृती वाढविण्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे ‘इनोव्हेशन हॅकेथॉन २०२२’ ही स्पर्धा २० ते २५ जानेवारी २०२२ या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस आणि प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेवर आधारित ‘इनोव्हेशन हॅकेथॉन २०२२’ या स्पर्धेचे उद्घाटन २० जानेवारी रोजी सकाळी १०.०० वा. भारत सरकारच्या एज्यूकेशन इनोव्हेशन मंत्रालयाचे इनोव्हेशन डायरेक्टर डॉ. मोहित गंभीर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, सुप्रसिध्द वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, सुप्रसिध्द संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर आणि प्रा.प्रकाश बी. जोशी हे उपस्थित राहणार आहेत. तसेच, २५ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वा. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरित करण्यात येईल
ही स्पर्धा द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये होणार आहे. यात आयडियाथॉन, वर्क्याथॉन आणि ऑक्टॅथॉन हे तीन गट असतील. विद्यार्थ्यांनी स्वतःची कल्पना साकार करणे, त्याला मूर्तरुप देणे आणि ऑॅक्टॅथॉन मध्ये ८ तासात स्पर्धकाने एखाद्या समस्येचे समाधान शोधून काढून त्याचे प्रारूप तयार करावयाचे आहे. या तिन्ही गटांसाठी एकूण ५०० प्रॉब्लेम्स विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत. त्यासाठी ४५० मेंटॉर नियुक्त करण्यात आले आहेत. या मधील १०० प्रॉब्लेम्स स्टेटमेंट्स हे विविध कंंपन्यांकडून प्राप्त झाले आहेत. यामध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विज्ञान, आरोग्य, बिजनेस अॅण्ड लिडरशीप, आर्टस, ह्यूमॅनिटीज अॅड प्रोफेशनल्स स्टडिज, सस्टेनेबल स्टडिज, सार्वजनिक आरोग्य, करोना विषयक औषध निर्माण इ. क्षेत्रातील ३५०० स्पर्धक सहभागी झालेले आहेत. प्रत्येक गटातील प्रथम दोन विजेतांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
प्रा.डॉ.आर.एम.चिटणीस यांनी सांगितले की,“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारी हा दिवस स्टार्ट अप डे म्हणून घोषित केला आहे. त्यावर लगेच एमआयटी डब्ल्यूपीयूने पाऊल उचलून ही स्पर्धा आयोजित केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उद्योजकतेला खतपाणी घालण्यासाठी नवनिर्मिती आणि नवीन संकल्पना आत्मसात करण्याची वेळ आली आहे. या स्पर्धेतून नवे उद्योजक निर्माण होऊन देश प्रगतीपथावर जाईल.”
प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी सांगितले की,“माइंड टू मार्केट आणि पेपर टू प्रोडक्ट ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी ही स्पर्धा खूप महत्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव देऊन त्याला चालना दयावी व त्यांची बौद्धिक क्षमता वृद्धिंगत करुन त्यांना उद्योजक बनविण्याचे धोरण प्रत्यक्षात आणण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न आहे. आता देशात नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणार्यांची संख्या वाढवायची आहे. आत्मनिर्भर भारत आणि स्टार्ट अप इंडिया संस्कृती वाढविण्यासाठी या स्पर्धेतून मदत होणार आहे.”
स्पर्धेसाठी अनेक कंपन्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्याचे व त्यांच्या प्रोजेक्टला सक्रिय मदत करण्याचे आश्वासन देण्याची माहिती प्रवीण पाटील यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला प्र कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर, आर अॅण्ड डी चे अधिष्ठाता डॉ. कृष्णा वर्हाडे, डॉ. कृष्ण प्रसाद गुणाले, विद्यार्थी दिग्विजय पाटील, आर्यन यादव आणि दिशा जैन उपस्थित होते.
स्टोरीटेलच्या रसिकांसाठी दीपा देशमुख लिखित पाच ग्रंथांचा जगावेगळा खजिना!
स्टोरीटेलवर ‘जग बदलणारे ग्रंथोत्सव’!
‘स्टोरीटेल मराठी’ सातत्याने साहित्यप्रेमी श्रोत्यांसाठी मौलेवान दुर्मिळ साहित्य संपदा स्टोरीटेल ओरिजनल ऑडिओबुक्सच्या माध्यमातून रिलीज करीत असते. उल्लेखनीय बाब म्हणजे या आठवड्यात प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख लिखित ‘जग बदलणारे ग्रंथ’ हा पाच ग्रंथांचा जगावेगळा खजिना यानिमित्ताने ‘स्टोरीटेल मराठी’ आपल्या श्रोत्यांच्या हवाली करीत आहे. कुतूहल, ज्ञानाची आस असणाऱ्या प्रत्येकानं आपलं जगणं अर्थपूर्ण आणि समृद्ध करण्यासाठी दीपा देशमुख लिखित ‘जग बदलणारे ग्रंथ’ ऐकायलाच हवेत. हे ग्रंथ अमोघ चंदन, सचिन सुरेश, अस्मिता दाभोळे यांच्या आवाजात असून सोबतच ‘जग बदलणाऱ्या या ग्रंथांचं महत्व विशद करणारं लेखिकेचं मनोगत ऐकायला मिळणं, पर्वणी ठरली आहे.
माणसाची प्रगती होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. चाकाचा शोध लागला आणि त्याच्या जगण्याला गती मिळाली. विज्ञान आणि शोधांनी माणसाला डोळस बनवलं. कलेनं त्याचं आयुष्य सुंदर केलं. औद्योगिक क्रांती झाली आणि त्याच्या आयुष्यानं वेगळी वाट पकडली. तंत्रज्ञानानं त्याच्या आयुष्यात खूप मोठी जागा व्यापली आणि त्याचं आयुष्य सुखकर केलं. माणसाच्या वाटचालीत स्त्रीनं संघर्ष करून आपलं अस्तित्व सिद्ध केलं. सृष्टीच्या या अफाट पसाऱ्यात माणसाची मग एक एक गोष्ट नीट समजून घेण्याची धडपड सुरू झाली आणि या सगळ्या गोष्टींचा दस्तावेज ‘ग्रंथ’ रुपात जतन करण्याची प्रक्रिया त्यानं सुरू ठेवली. त्यामुळेच जगभरात आज धर्म, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, मानसशास्त्र अनुवंशशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चरित्र अशा अनेक शाखांमधलं लिखाण ग्रंथांच्या रुपानं निर्माण झालं. यातल्या अनेक ग्रंथांनी जगावर प्रभाव टाकला. यातले निवडक ५ ग्रंथ घेऊन त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न ‘जग बदलणारे ग्रंथ’मध्ये प्रख्यात लेखिका दीपा देशमुख यांनी स्टोरीटेल मराठीवर केला आहे. ‘जग बदलणारे ग्रंथां’मध्ये महर्षी व्यासांची ‘भगवत गीता’, गौतम बुद्धांचे ‘त्रिपिटक’, येशू ख्रिस्तांचे ‘बायबल’, वात्सायनांचे कामसूत्र आणि कौटिल्य यांचे अर्थशास्त्र हे पाच मुख्य ग्रंथ आहेत.
स्टोरीटेलच्या या अत्यंत वेगळ्या जग बदलणाऱ्या ग्रंथ सिरीज बद्दल प्रख्यात लेखिका दीपा देशमुख म्हणाल्या “कधी माणसाचं रूप घेतात तर कधी निसर्ग बनून दर्शन देतात. कधी हेच ग्रंथ परिस्थिती बनून समोर येतात आणि आपल्याला सशक्त, सजग आणि सुजाण बनवतात. चांगली पुस्तके एकाच वाचनात संपत नाहीत असे स्टीफन किंग म्हणतो. म.जोतिबा फुले यांनी ग्रंथाचे महत्व विशद केलं, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तक आणि भाकरी यांपैकी एकाची निवड करायची वेळ आली तर मी भाकरीऐवजी पुस्तकाची निवड करेन असं सांगितलं. खरं तर आपल्याकडून कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न करणारे, आपला राग, लोभ, मत्सर न करणारे, तरीही भरभरून देणारे ग्रंथ आपले जिवलग मित्र आहेत, असं मला वाटतं. म्हणूनच आपलं जगणं अर्थपूर्ण आणि समृध्द करण्यासाठी या ग्रंथांशी दोस्ती करायलाच हवी. जरूर ऐका ‘जग बदलणारे’ ग्रंथ!”जग बदलणारे ग्रंथ

भगवद्गीता – महर्षी व्यास
‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्’ म्हणजेच व्यासांनी जगातलं सगळं ज्ञान उष्टं करून सोडलं आहे. (म्हणजे, जगात असा कोणताही विषय नसेल, ज्याला महर्षी व्यासांनी त्यांच्या लेखनात स्पर्श केला नाही) असा समज सर्वत्र आहे. कारण, भगवदगीतेमध्ये किंवा महाभारतामध्ये मानवी जीवनातल्या नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांचं सखोल विवेचन केलं आहे. अनेक धर्मातल्या तत्वज्ञांनी, विचारवंतांनी आणि शास्त्रज्ञांनी भगवद्गीतेची प्रशंसा केली आहे. महात्मा गांधींपासून ते अल्बर्ट आईन्स्टाईनपर्यंत अनेक थोरांना भगवद्गीतेने प्रभावित केले आहे.

त्रिपिटक – गौतम बुद्ध
त्रिपिटक या ग्रंथामध्ये आयुष्य चांगल्या रितीने कसं जगावं या विषयी सांगितलं आहे. दुःख, समुदय, निरोध आणि मार्ग अशी चार आर्यसत्यं बुध्दाने सांगितली आहेत. त्रिपिटक ग्रंथ अभ्यासला, तर मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा केलेला अभ्यास यात सापडतो. ‘ आळस आपल्याला आपल्या उद्दीष्टांपर्यंत पोहोचू देत नसल्यानं तो टाळा. कोणी निंदा केली तर वाईट वाटून घेऊ नका, कारण स्वतःचा शोध घेण्याची ती एक चांगली संधी आहे,’ असं बुध्दाने म्हटलं आहे.
बायबल – येशू ख्रिस्त

बायबल हा परमेश्वाराच्या प्रेरणेतून निर्माण झालेला ग्रंथ समजला जातो. हा ग्रंथ ख्रिश्चन धर्माला प्रेरित करणारा, धर्माची मूलतत्वं काय आहेत आणि परमेश्वर हा तारणकर्ता कसा आहे हे सांगणारा आहे. परमेश्वराचं अस्तित्व, त्याचं प्रकटीकरण कधी आणि कसं झालं याबद्दल या ग्रंथात विवेचन केलं आहे. जगभरात या ग्रंथाची सर्वाधिक विक्री झालेली आहे. लिओनार्दो दा व्हिंचीचं ‘ द लास्ट सपर’ आणि मायकल अँजेलोचं ‘ क्रिएशन ऑफ ॲडम’ ही चित्रं बायबलवरच आधारित होती.
कामसूत्र – वात्स्यायन
असं म्हणतात की आजपासून २४०० वर्षांपूर्वी भारतात एका अजरामर अशा ग्रंथाची निर्मिती झाली. जो ग्रंथ पृथ्वीच्या अंतापर्यंत मानवजातीला आवश्यक असणार होता. या ग्रंथाचे नाव कामसूत्र! हा ग्रंथ प्रत्येक भाषेत पुढे अनुवादीत केला गेला. जगभरात सर्वाधिक विक्रीचा ग्रंथ म्हणूनही हा ओळखला जातो. सुरूवातीची काही वर्षे तर अनेक देशांमध्ये या ग्रंथावर बंदी घातली गेली होती. मात्र पुढे ब्रिटीश सैनिक असलेला सर रिचर्ड बर्टन याने मूळ संस्कृत असलेल्या या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले तेव्हा त्याने म्हटले की कामसूत्र या भारतीय ग्रंथाने प्रेम कसे करावे याची शिकवण देऊन जगावर उपकारच केले आहेत.
अर्थशास्त्र – कौटिल्य
‘माणूस हा जन्माने नाही, तर कर्माने श्रेष्ठ असतो’ असे सांगतानाच चाणक्याने शिक्षण हे माणसासाठी किती महत्वाचे आहे हे पदोपदी सांगितले. चाणक्याने लिहिलेल्या ग्रंथात शिस्त, अधिका-यांची कर्तव्ये, कायदा, उद्योग, राष्ट्राची आचारसंहिता, कार्यालयीन हिशोब आणि कामकाज, व्यापार, जकात आणि उत्पादन शुल्क, मालमत्ता. ठेवी, कर्जवसूली, परराष्ट्रधोरण आणि अर्थशास्त्राविषयी चर्चा केली आहे. कामगारांचे हक्क, संरक्षण, मजूरी आणि कामाचे स्वरूप याविषयी त्यानं विस्ताराने लिहून ठेवलं आहे. त्यानं संबंधित अधिका-यांच्या हलगर्जी पणासाठी त्यांना कठोर दंड करावा असही म्हटलं आहे. हा ग्रंथ अर्थशास्त्र आणि राजनिती यांच्यावर लिहिलेला मानवी इतिहासातला पहिला ग्रंथ म्हणून ओळखला जातो.
‘स्टोरीटेलवर ‘जग बदलणाऱ्या या ग्रंथांचं महत्व’ ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू.९९९/- आहे. पण आता नव्याने वार्षिक वर्गणी भरणा-यांसाठी स्टोरीटेलने अधिक सवलत जाहिर केली आहे आणि फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.
‘जग बदलणाऱ्या या ग्रंथांचं महत्व स्टोरीटेलवर ऐकण्यासाठील लिंक
https://www.storytel.com/in/en/series/71351-Jag-Badalnare-Granth?pageNumber=1
शासनाने यशवंतराव चव्हाणांच्या नावे राष्ट्रीय मराठी साहित्य अकादमी सुरु करावी : रविंद्र बेडकिहाळ
पिंपरी चिंचवड : ‘‘मराठी भाषा समृद्धी व संवर्धन यासाठी नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना भरीव योगदान दिले होते. त्यांच्यामुळेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ, लोकसाहित्य समिती, राज्य मराठी विकास संस्था आदींची निर्मिती झाली. त्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य व संस्कृती संवर्धनासाठी वेगाने कार्य सुरु झाले. तथापि त्यांचे या क्षेत्रातील योगदान लक्षात घेता त्यांच्या नावे ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय मराठी साहित्य अकादमी’ शासनाने सुरु करावी’’, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केली.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कथाकथनाच्या ऑनलाईन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रविंद्र बेडकिहाळ बोलत होते. प्रसिद्ध कवी प्रा.संजय पवार यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
‘‘मराठी भाषा व्याकरणाने शुद्ध, अतिशुद्ध, प्रमाण या वादात न पडता बोली भाषेचे अस्सल गावरानपणसुद्धा स्वीकारले पाहिजे. कारण बोली मराठी भाषासुद्धा समृद्ध आहे. म्हणून त्यासह नव्याने मराठी भाषा शब्दकोष तयार केला पाहिजे’’, अशी अपेक्षा व्यक्त करुन बेडकिहाळ पुढे म्हणाले, ‘‘आपल्या देशात जगातल्या इतर देशांच्या वकिलाती आहेत. त्यांच्याशी समन्वय साधून त्यांच्यामार्फत उत्कृष्ट मराठी ग्रंथांची भाषांतरे त्यात्या देशात गेली पाहिजेत व त्या त्या देशांचे साहित्य मराठीत आणता येईल अशी व्यवस्था झाली तर मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यांची जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर जागतिक देवाण घेवाण होईल. विविध देशांशी आपल्या असलेल्या सांस्कृतिक देवाण घेवाण कार्यक्रमांतर्गत हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी राज्य शासनाच्या भाषा विभागाने पाठपुरावा केला पाहिजे व राज्यशासनाच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली पाहिजे’’, अशी मागणी बेडकिहाळ यांनी केली.
पिंपरी चिंचवड मसाप शाखेचे अध्यक्ष प्रसिद्ध गीतकार राजन लाखे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले व शाखेच्या दोन वर्षाच्या कोरोना काळातील साहित्यिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रसिद्ध कथाकथनकार बबन पोतदार, निलीमा बोरवणकर, डॉ.राजेंद्र माने, विनिता ऐनापुरे यांनी आपल्या भावपूर्ण कथा सादर करुन या कार्यक्रमाची उंची वाढविली. रजनी सेठ यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मसाप शाखेच्या कार्याध्यक्ष विनिता ऐनापुरे, कार्यवाह संजय जगताप व कार्यकारी मंडळ सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ चॅलेंजच्या 11 विजेत्यांमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि औरंगाबाद या चार शहरांचा समावेश
मुंबई/नवी दिल्ली 19 जानेवारी 2022
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं ‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ चॅलेंज अर्थात जनतेसाठी पदपथ या स्पर्धेच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे. या स्पर्धेअंती 11 शहरांना पुरस्कार जाहीर झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, नागपूर, पुणे आणि पिंपरी चिंचवड या 4 शहरांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी एकूण 38 शहरांचे प्रस्ताव दाखल झाले होते.
शहरांतील वाहन-केंद्री रस्त्यांचे लोक-केंद्री रस्त्यांमध्ये परिवर्तन करण्याच्या हेतूने वर्ष 2006 मध्ये लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरणातील शिफारसींच्या धर्तीवर 2020 पासून सुरु करण्यात आलेल्या स्मार्ट शहरे मोहिमेमध्ये सार्वजनिक जागा अधिक लोक-स्नेही बनविण्यासाठी देशातील शहरांमध्ये स्पर्धा सुरु करण्यात येतात.
‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ या स्पर्धेत परीक्षकांनी पुढील फेरीत प्रवेश करणाऱ्या 11 शहरांची निवड केली असून त्यांना मंत्रालयातर्फे प्रत्येकी 50 लाख रुपयांचे पारितोषिक देखील देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी आयटीडीपी अर्थात वाहतूक आणि विकास संस्थेकडून तंत्रज्ञान विषयक मदत घेण्यात आली.
‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील शहरांनी आघाडी घेतली असून ज्या चार शहरांची पुढच्या फेरीसाठी निवड झाली त्या शहरांतील उपक्रमांचा तपशील खाली दिला आहे.
पुणे
पुणे प्रशासनाने अनेक रस्त्यांच्या, बाजूच्या मोकळ्या जागा वापरून नागरिकांसाठी सुरक्षित आणि आकर्षक मनोरंजन विभाग तयार केले. रस्त्यांच्या बाजूच्या भिंतींवर आकर्षक चित्रे काढणे, परिसरात हास्यवर्गांचे, संगीत सत्रांचे आयोजन तसेच लहान मुलांसाठी खेळण्याची जागा निर्माण करणे अशा अनेक नव्या उपक्रमांनी रस्त्यांच्या आजूबाजूची जागा उपयोगात आणण्यात आली.

पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड प्रशासनाने त्यांच्या रस्ते रचनाकारांशी सल्लामसलत करून त्यांच्या शहरामधील हिरवाईच्या जागांना जोडणाऱ्या शहरव्यापी हरित सेतू महायोजनेची आखणी केली. गाड्यांच्या रस्त्यांचे विभाजन करून सायकल मार्ग आणि पदपथासाठी वेगळ्या मार्गांची निर्मिती देखील प्रायोगिक तत्वावर करण्यात आली. या शहरात चालणे आणि सायकल चालविणे अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने सुधारणा केल्या आहेत.
रस्त्यांचा वापर कारसारख्या वाहनांऐवजी नागरिकांना मुक्तपणे वापरू देण्यासाठी सर्व सार्वजनिक संस्था आणि इतर भागधारकांमध्ये एकमत घडवून आणण्यात औरंगाबाद महानगरपालिका प्रशासन यशस्वी ठरले. मोकळ्या रस्त्यांना सुशोभित करण्यासह नागरिकांना कमी शुल्कात, रस्त्यांच्या कडेला विरंगुळ्यासाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच चालणाऱ्या आणि सायकल चालविणाऱ्यांसाठी रस्त्यांची उत्तम सोय करणे असे उपक्रम प्रशासनाने राबविले.
नागपूर शहरातील सीताबर्डी आणि साक्कदरा या अत्यंत गर्दीच्या बाजारांमध्ये चालणाऱ्या लोकांसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपूर शहर प्रशासनाने रस्त्यांच्या धोरणात्मक पुनर्रचना केल्या. शहरातील रस्त्यांच्या लगत विविध रंग वापरून चित्रे, जुने टायर वापरून बसण्याची ठिकाणे तसेच टाकाऊ धातूच्या वस्तूंपासून नव्या पदपथांची सीमा आखणे यासारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले. यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार आणि इतर संबंधितांची मदत घेण्यात आली.
या स्पर्धेतील काही विजेत्या शहरांनी पुढील संकल्पना राबविल्या –
गुरगाव शहरातील शाळांचे परिसर तसेच बाजाराची ठिकाणे केवळ पादचाऱ्यांसाठी राखीव करण्यात आले असून उज्जैन शहराने कारमुक्त विभाग निर्माण केला, उदयपुर शहराने स्थानिक बस स्थानकाकडे येणाऱ्या वाहतुकीची पुनर्रचना केली, कर्नाल शहराने ओसाड जागा आणि उड्डाणपूलाखालील जागांना रंगीबेरंगी कलाकृतींनी जिवंत केले. तर कोहिमाने कलाकृती प्रदर्शनासाठी वस्तूसंग्रहालयाची कल्पना राबविली.
केंद्र सरकारने ‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाची घोषणा केली आहे. पहिल्या फेरीतील 11 विजेती शहरे वगळता कोणतीही स्मार्ट शहरे, राजधानीची शहरे किंवा 5 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
इको टुरिझमच्या कामांना गती देण्याचे वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश
मुंबई, दि. 19 : पर्यावरणपूरक पर्यटन (इको टुरिझम) अंतर्गत कामांना गती देऊन वन विभागातील 2 हजार 762 रिक्त पदभरतीसंदर्भात विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
मंत्रालयातील दालनात वन विभागातील रिक्त पदे तसेच इकोटुरिझम प्रस्तावासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. या बैठकीला नागपूर येथील महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, वन विभागाचे उपसचिव गजेंद्र नरवणे यावेळी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले, निसर्ग पर्यटन विकास मंडळांतर्गत इकोटुरिझमचे प्रस्ताव वन विभागाकडे आहेत या प्रस्तावासाठी निधीची आवश्यकता आहे हे लक्षात घेता याबाबत वित्त विभागाकडे वन विभागाने मागणी करावी. नांदेड जिल्ह्यातील टिटवी निसर्ग पर्यटन केंद्र, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मिरवडी, अकोला जिल्ह्यातील कुटासा, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वडगांव, पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे वाल्हा येथील श्री भवानीमाता परिसर, पुणे जिल्ह्यातील शंभु महादेव हरेश्वर मंदिर, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील सिंरोंभा येथील अप्पर वर्धा धरण, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील संजिवनी बेट, पुणे जिल्ह्यातील वाडे बिल्होई, धुळे जिल्ह्यातील लांडोर बंगला, वसई येथील तुंगारेश्वर देवस्थान या प्रलंबित प्रस्तावाबाबत वन विभागाने केलेल्या कार्यवाहीचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
राज्यमंत्री श्री.भरणे यांनी वनसरंक्षक व सर्वेक्षक संवर्गातील रिक्त पदे,पशुसंवर्धन सहायक आयुक्त, उपायुक्त गट अ पदभरती, वनपाल संवर्गातून वनक्षेत्रपाल संवर्गात तदर्थ पदोन्नती देणे, शाखा अभियंता या संवर्गातून उपवनअभियंता या संवर्गात तदर्थ पदोन्नती देणे, वन परिक्षेत्र अधिकारी संवर्गाचे सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणे, वन अधिकाऱ्यांच्या विभागीय परीक्षा नियमात सुधारणा करणे, वनपाल व वनरक्षक संवर्गाचे सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणे, वन विभागात जलद कृती दल स्थापन करण्याच्या प्रस्तावासंदर्भातील सद्यस्थिती, वन परिक्षेत्र अधिकारी संवर्गाची राज्यस्तरीय ज्येष्ठता सूची, वनसंरक्षणाचे काम करताना मृत्यू झालेले अधिकारी कर्मचारी यांना नुकसान भरपाई व आर्थिक मदत देण्याबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांची रिक्त पदे तातडीने भरणार – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. १९ : राज्यातील पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता, सहायक अभियंता श्रेणी-2 व कनिष्ठ अभियंत्यांची १ हजार २४०, स्थापत्य अभियांत्रिकी सहायकची १ हजार ५३६ रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. या विभागाचा आकृतीबंध तयार झाला असून लवकरच पदभरतीची कार्यवाही करणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.
मंत्रालयातील दालनात शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता श्रेणी-2, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक वर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत बैठक पार पडली. या बैठकीत राज्यमंत्री श्री.भरणे बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, उपसचिव रोहिणी भालेकर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व मुख्य अभियंता व सर्व अधिक्षक अभियंता दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता श्रेणी 2, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे स्थानिक ठिकाणी सुरु असलेल्या कामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. कमी मनुष्यबळात काम करणे कठीण आहे. ही परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने आकृतीबंध तयार केला असून वित्त विभागाला मान्यतेसाठी पाठवलेला आहे. याला मान्यता मिळताच तत्काळ पदभरती होणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.
राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विभागनिहाय रिक्त पदांची अद्ययावत माहिती घ्यावी. बढतीची देखील कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र बदलीचे आदेश निघूनही काही अभियंता नियुक्त ठिकाणी हजर झालेले नाहीत. बदलीचे कार्यादेश मिळूनही विहित कालावधीत बदलीच्या ठिकाणी रुजू न झालेल्या अभियंत्यांवर कारवाई करण्याचे आदेश यावेळी राज्यमंत्री श्री. भरणे यांनी या बैठकीत दिले.
अवसरीचा सोंगाड्या “विनोद” कलेशी “एकनिष्ठ आणि तत्वनिष्ठ”
सोंगाड्या म्हणून तो रंगमंचावर कल्पना आणि समयसूचकता हेरणार,,वेधक कोटीबाजपणा करणारा, रंगपटावर कमालीचा विमुक्तपणाने वावरणारा,अन आपल्या तमाशा कलेशी एकनिष्ठ राहणारा, उत्तम विनोदाचा बादशाह, एक नंबरचा सोंगाड्या म्हणून आज तमाशा क्षेत्रात विनोद अवसरीकर याचे नाव घेतले जाते. त्याचा जन्म ३ / सप्टेंबर/१९७६ साली पुणे जिल्ह्यातील अवसरी (बुद्रुक) ता. आंबेगाव येथे झाला. तमाशा क्षेत्रात काटेरी वाटेवरून जात असतानाही फक्त कलेला रंगदेवता मानणारा, कलेची भक्ती करणारा, संघर्ष करताना,सकारात्मक निर्णय घेणारा,विनोदला त्याचे मन कधी त्याला स्वस्थ बसून दिले नाही. म्हणून काल- परवा त्याने चार मित्रांना एकत्र केले. स्वखर्चाने गाडीत पेट्रोल टाकले. ढोलकी , आणि इतर वाद्यांची जमवाजमव केली. हातात माईक घेतला. अन घसा फाटेपर्यत गावोगावी कोरोना जनजागृतीचे मोफत कार्यक्रम करण्यास सुरुवात केली.”माझ्या समाज प्रबोधनातून कोणी ऐकू अथवा न ऐकू. पण मी एक कलाकार म्हणून माझं समाजाला काही देणे आहे.सरकारला सुद्धा काही देणे आहे.फक्त सरकारकडूनच आपणच अपेक्षा कशासाठी ठेवायच्या.. ! त्यामुळेच सामाजिक बांधिलकीतून मी गावोगावी कोरोना जनजागृतीचे कार्यक्रम करतोय.”असे प्रांजळ मत त्याचे आहे.समाजाची बांधिलकी असलीच पाहिजे. ही प्रेरणा मला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून मिळाल्याचे तो सांगतोय.
खरं तर विनोद अवसरीकर याची पारंपरिक ढोलकी तमाशामधील एक उत्कृष्ट सोंगाड्या म्हणून ओळख आहे. प्रत्येक वाक्यात रसिकांना खळखळून हसवणे ही त्याची खासियत आहे. गेल्या तीस वर्षांपासून एक उत्कृष्ठ सोंगाड्या म्हणून त्याने रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर, तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, दत्ता महाडीक पुणेकर, चंद्रकांत ढवळपुरीकर,अशा नामांकित तमाशात काम केलंय. काही वर्षे एक नवीन प्रयोग म्हणून व्यावसायिक रंगभूमीकडे ही वळण्याचा त्याने प्रयत्न केला.पुण्यासारख्या शहरात त्याने येऊन आपला ग्रामीण बाज दाखवून तेथील प्रतिभावंत आणि चोखंदळ प्रेक्षकांची मनं जिंकली. पण शहरी भागात तो काय जास्त रमलेला दिसत नाही. गड्या आपला गाव बरा, या मताचा कदाचित तो असावा.ते एक पारंपरिक बाजातील व्यक्तिमत्त्व आहे.म्हणूनच अगदी गण – गवळणीतील मावशी ह्या पात्रा पासून रंगबाजीतील सोंगाड्या, वगातील हवालदार आणि, नोकर अशा विनोदी भूमिका करून रात्र भर प्रेक्षकांना खेळवत ठेवायचे काम फक्त विनोदच करू शकतो.म्हणूनच त्याच्या आई वडिलांनी मोठ्या विचारपूर्वक त्याचे नाव विनोदच ठेवले असावे.असे वाटते.
आंबेगाव तालुक्यातील अवसरीकर ह्या गावाला तमाशा कलेची परंपरा आहे. शंकरराव अवसरीकर, संभा अवसरीकर, शिवा अवसरीकर, वसंत अवसरीकर, कुशाबा अवसरीकर, गेनूभाऊ अवसरीकर,ही नावं सध्या कोणाच्या ऐकण्यात नसली तरी एकेकाळी तमाशा क्षेत्रात या तमाशा कलावंतांनी महाराष्ट्र गाजविला आहे. सोंगाड्या, ढोलकीपटू, सरदार,गायक, नाचे, असे विविध प्रतिभावंत लोककलावंत या अवसरीने साठ ते सत्तरच्या दशकात अथवा त्या ही पुर्वीपासून महाराष्ट्राला दिले आहेत.म्हणजेच वळणाचे पाणी वळणार जाते.हीच गोष्ट आज विनोदसाठी ही लागू पडते.
जातीवंत कलावंत कधी रडत नाही तर लढत असतो.हे विनोदने आपल्या वाईट काळात खरं करून दाखविले. ते कोरोनाच्या काळातील आजही त्या आठवणी जागविल्या तर विनोद ढसा ढसा रडतो. तीस वर्षे रसिकांना हसविणारा विनोद अवसरीकर कोरोनाच्या काळात पार खचून गेला होता. जगावर कोरोनाचे संकट आल्याने सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमाला बंदी होती. त्यामुळे घर चालायचे कसे याची चिंता होती. घरात वयोवृध्द वडील सुखदेव अवसरीकर (वय ७५) आई भागूबाई (वय६६), तर शेतात दुसऱ्याच्या बांधावर मोलमजुरीला जाणारी पत्नी, आणि तीन मुलीचे उदारनिर्वाह कसा करायचा,. पैशाची आवक पूर्ण बंद होती.डोकं चिनभिन झाले होते.आर्थिक मार्ग सर्व खुंटले होते.त्यातच आईला बीपीचा त्रास असल्याने त्यांना नित्यनियमाने औषध देणे प्राधान्यक्रम होता.जणू काय परमेश्वर या काळात लोकांना हसविणाऱ्या विनोदची मोठ्या आवडीने परीक्षाच घेत होता की काय असे वाटत होते.पण अशा परिस्थितीत तो हरला नाही. “जो दुसऱ्यावर विसंबला, त्याचा कार्यभार बुडाला” या उक्तीप्रमाणे एक दिवस रंगमंचावरचा कलाकार अचानक रस्त्यावर आला.त्याने या कोरोना काळात भर रस्त्यावर फळं भाजीपाल्याचा बाजार मांडला. तमाशाच्या रंगपटावर दूध, दही,लोणी घेवून चला मथुरेच्या बाजाराला..! म्हणणार विनोदला अचानक आपल्या खऱ्या आयुष्यात भाजीपाल्याचा बाजार मांडावा लागला.फळ विकावी लागली.आपल्या जीवनात असे प्रसंग येतील असे जरा सुध्दा त्याला वाटले नसावे. भर लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर अनावश्यक सेवा सोडली तर एकही गाडी वाटेवर दिसत नसायची. पण त्याच रिकाम्या वाटेकडे विनोद अवसरीकर तमाशातील कोण्या कृष्ण – पेद्याची वाट बघत नव्हता. तर माझा भाजीपाला कोण घेईल का ? अशा मोठ्या आशेने ग्राहकांची वाट बघत बसायचा. तमाशाच्या गाड्या गावात आल्या की लोकं मोठ्या गंमतीने एकेकाळी त्याला बघायला त्याच्या भोवती गराडा घालायचे. मात्र कोरोना काळात त्यालाच दिवसभर शंभर- दोनशे रुपये मिळण्यासाठी रस्त्यावर येणाऱ्या गाड्याची वाट बघत बसायची वेळ आली. पण या संकटाचा त्याने मोठ्या हिमतीने स्वीकार केला.तो कधी डगमगला नाही.
उपहासरूप आणि कोटीरूप ही दोन विनोदाची रूपे विनोद अवसरीकर याच्यात आहेत.ही सर्व वैशिष्ट्ये जरी त्याच्याजवळ असली तरी,केवळ तो एक तमाशा कलावंत असल्याने त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन इतरांचा वेगळा असेल, पण सर्वसामान्य लोकांपर्यंत आपला विनोद पोहचविण्याची कसब त्याच्याकडे आहे.हे नाकारून चालणार नाही.
सध्या रोजच्या जगण्यात व्यवहाराने माणूस जोडला गेला आहे. सकाळी उठल्या पासून ते रात्री झोपेपर्यंत माणूस व्यवहाराची भाषा करत असतो.कोणी कोणाला फुकट दयायच्या भानगडी पडत नाही.ही रित आता सर्वांकडे रुजू झाली आहे.मग अशा स्थितीत एखादा कलाकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर स्वखर्चाने प्रबोधन करीत असेल तर नक्की तो चर्चेचा विषय ठरतो.गाडीचे भाडं, पेट्रोलचा खर्च, सोबत सह कलाकारांचा खर्च,वाद्यांचे भाडे, स्वतःच्या खिशातून घालून समाज प्रबोधन करणे किती जिगरीचे म्हणावे लागेल. पण गेल्या १० जानेवारी पासून विनोद अवसरीकर यांनी आंबेगाव तालुक्यातील गावोगावी कोरोना संबंधी जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे..सकाळी दूध डेरीत दूध घालायला आलेल्या शेतकऱ्यांना कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगापासून कसा बचाव करावा.याची महती ही मंडळी सांगत असतात.घरी मरण्यापेक्षा समाज प्रबोधन करीत मेले, तर माझं भाग्यच समजेल. असे विनोद ठासून सांगत आज पांडुरंग गायकवाड, संतोष बत्तीसे, प्रमोद अवसरीकर या सहकाऱ्यांसह गावोगावी जनजागृती करत आहेत. मंचर,शिंगवे,थापलिंग, म्हाळुंगे, अवसरी,पारगाव, चांडवली,कळंब, या पंचक्रोशीतील वड्यावस्ती जाऊन ही मंडळी कोरोनाचे नियम नागरिकांना सांगत असतात. यापासून आपला बचाव कसा करावा.हे आपल्या गाणी बतावणी मधून सांगत असतात. म्हणूनच “मरावे परि, कीर्ति रुपी उरावे.” हे अशा निस्वार्थी कलाकारासाठी सांगावे लागेल.
खरोखर जर कुणाला विनोद अवसरीकर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायची असेल तर नक्की संपर्क करा. मोबाईल नंबर ८७६६७७१०३६
लेखक – खंडूराज गायकवाड
khandurajgkwd@gmail. com
९८१९०५९३३५
उद्धव ठाकरेंचे उजवे हात असलेल्यांनी कोविड सेंटर द्वारे केली कमाई -किरीट सोमैय्यांचे आरोप
मी करणार ; पुण्याच्या महापौरांनी देखील तक्रार दाखल करावी; ८ कोविड सेंटर द्वारे गैरप्रकार – इडी.सीबीआय कडे तक्रारी
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या कंत्राटात घोटाळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई, पुणे, नवी मुंबईमध्ये कोविडचा घोटाळा करून कमाई केली. ते लोकांच्या जिवाशी खेळले आहेत. बनावट कंपन्यांना कंत्राटे दिली, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला.
पुण्यातील पीएमआरडीए कार्यालयाला बुधवारी (१९ जानेवारी) सोमय्या यांनी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अनेक कंपन्यांमध्ये पार्टनर उद्धव ठाकरे यांचा उजवा आणि डावा हात आहे. हा घोटाळा मुंबईत आणि पुण्यातही झाला आहे. जी कंपनीच अस्तित्वात नाही अशा कंपन्यांना कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
त्यामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला. पुणे जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट दिल्याच्या विरोधात मी फौजदारी तक्रार दाखल करणार आहे. जी कंपनी अस्तित्वातच नव्हती त्या कंपनीला जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट दिले. आज मी सगळ्या फायली तपासल्यानंतर माझी शंका पक्की झाली आहे. मी येत्या काही दिवसांत राज्यपालांना भेटणार आहे. हे कोविड केंद्र ज्या पद्धतीने दिले गेले, बेनामी ओनरशिप कोणाची आहे, हे सगळे पुरावे राज्यपालांना देणार आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आश्चर्य म्हणजे, पीएमआरडीए, मुंबई महापालिका, एमएमआरडीए, सिडकोला जी कागदपत्रे दिली ती तपासलीही नव्हती. ज्याला अनुभव नाही अशा माणसाला आठ कोविड सेंटर दिले गेले. पुणे आयुक्त आणि महापौरांशी बोलणे झाले आहे, पुण्याच्या महापौरांनी या कंपन्याच्या विरोधात फौजदारी तक्रार द्यावी,’ असे सोमय्या म्हणाले.
‘लाइफ लाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस ही कंपनी नोंदणीकृतच नाही. तीन ठिकाणी पार्टनरशिप म्हणून कागदपत्रे दिले. तिन्ही ठिकाणी कागदपत्रे वेगवेगळी आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाच्या दबावामुळे जमा केलेली कागदपत्रे तपासली गेली नाहीत. याविरोधात सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, मुंबई महापालिका आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडे तक्रारी केल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
कंपनी मालकाचे नाव पुढच्या आठवड्यात सांगणार
या बनावट कंपन्यांचे नाव शोधा, मी कंपनीच्या मालकाचे नाव पुढील आठवड्यात घोषित करणार आहे. मालक हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उजवा हात आहेत. त्याचे सगळे पुरावे माझ्याकडील फाइलमध्ये आहेत. पण ते पुढील आठवड्यात जाहीर करणार, असे सोमय्या यांनी सांगितले.
गोव्यात काँग्रेस विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी रिंगणात; उद्या जाहीर होणार उमेदवारांची पहिली यादी
मुंबई-गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी आता काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीने युक्तीची घोषणा केली आहे.
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की,” गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकसोबत निवडणूक लढणार आहे. आम्ही काँग्रेस सोबत देखील युतीबाबत चर्चा केली होती. मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आम्ही गोव्यात महाविकास प्रमाणे युती करत निवडणूक लढवणार आहोत. जर काँग्रेसला वाटत असेल की, गोव्यात त्यांना स्वबळावर यश मिळू शकते. तर माझ्याकडून त्यांना शुभेच्छा” असे म्हणत संजय राऊतांनी काँग्रसेला खोचक टोला लगावला.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, आम्ही काँग्रेसला युतीसाठी प्रस्ताव पाठवला होता. मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रस पार्टी आणि शिवसेना युती करुन गोव्यात विधानसभा निवडणूक लढवणार आहे. उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर करण्यात येईल, त्यानंतर काही दिवसांनी दुसरी यादी जाहीर करण्यात येईल. अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. गोव्यात महाविकास आघाडीसोबत काँग्रेस युती करण्यास तयार नसल्याने प्रियंका काँग्रेसवर आक्रमक झाल्या. प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “गोव्यात काँग्रेस पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत युती करण्यास तयार नाही. काँग्रेस विरोधकांना सोबत घेत नाही, त्यामुळे आणखी फूट पडेल, ज्याचा फायदा भाजपलाच होईल. अशी प्रतिक्रिया प्रियंका यांनी दिली आहे.
गोवा विधानसभा निवडणूक 2022
गोव्यात विधानसभा निवडणूक ही 14 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. तर मतमोजणी ही 10 मार्चला होणार आहे. गोव्या सत्ताधारी भाजप असून, त्याविरोधात गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्र गोमंतक पार्टी, काँग्रेस आणि आप, तृणमूल, शिवसेना, एनसीपी हे उतरले आहेत.
2017 साली काँग्रेसला 17 जागा
2017 साली काँग्रेसला 17 जागा मिळाल्या मिळाल्या होत्या. तर भाजपला 13 जागा मिळाल्या होत्या. भाजपने 3 जीएफपीतचे आमदार, 3 एमजीपीचे आमदार आणि दोन अपक्ष आणि NCP आमदारांच्या पाठिंब्याने मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा दावा केला. 17 मार्च 2019 रोजी त्यांच्या निधनानंतर विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली.
पुण्यातून अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण अखेर सापडला…
पुणे-आठवडाभरापासून सोशल मीडियावर येथील बालेवाडीतून अपहरण करण्यात आलेल्या स्वर्णव चव्हाण या चार वर्षाच्या मुलाच्या शोधमोहीमेसाठीची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. डॉ. सतिश चव्हाण यांच्या मुलाचे अपहरण झाल्यानंतर पुणे पोलिसांना आरोपीचा शोध घेणे खूप कठीण होऊन बसले होते. परंतू 8 दिवसांनी लहानग्या स्वर्णवचा (डुग्गुचा) शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.
पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच सह पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.11 जानेवारीला त्याचे बालेवाडीतून अपहरण झाले होते. पुणे पोलिसांची मोठी फौज या मुलाला शोधत होती. त्याच्या शोधावेळी अत्यंत गुप्तता पाळून हा तपास सुरू होता. जवळपास 300 ते साडेतीनशेच्या वर पोलिस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते. अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले.
स्वर्णवचे अपहण कोणी का केले असेल याचा उलगडा मात्र अद्याप झालेला नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती स्वर्णवला दुचाकीवरुन घेऊन जाताना दिसत होता. परंतू डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे आरोपीचा शोध घेणे पोलिसांना कठीण जात होते. डॉ. सतिश चव्हाण यांनीही सोशल मीडियावर अपहरणकर्त्या आरोपीला विनंती करत आपल्याजवळील जे काही आहे ते तुला देतो पण माझ्या मुलाला सोड अशी विनंती केली होती. अखेरीस पुणे पोलिसांच्या या शोधमोहीमेला यश आले आहे.दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीचा शोध सुरु आहे.
पुण्यातील असंख्य आई वडिलांना डुग्गु सापडल्याची बातमी कळल्यावर भरभरून आनंद झाला आहे. त्यांना आपलाही मुलगा नेहमीच सुरक्षित राहील. असा विश्वास पुणे पोलिसांकडून मिळाला आहे. त्याबद्दल अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून डुग्गुला शुभेच्छाही दिल्या आहेत.”आज त्यांना मुलगा मिळाला. त्यांना खूप आनंद झाला असून पुणे पोलिसांचे विशेष आभार नागरिकांनी मानले आहेत. तर अभिनंदन सहिसलामत मिळाला त्याबद्दल देवाचे आभार हि पोस्ट वाचून खुप आम्हाला आनंद झाला. तर मुलाच्या आईवडिलाना तर किती आनंद झाला असेल कल्पना करवत नाही. असेही ते म्हणाले आहेत.””देव कृपेने तो सुखरूप घरी आला त्याबद्दल आम्ही पोलिसांचे आभारी आहे. पण अपहरण कर्त्याच्या चुकीची पोलिस प्रशासनाने दखल घेऊन त्याला शिक्षा द्यावी अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.””आई वडिलांना एवढे दिवस काढले असतील? असा सवाल उपस्थित करत अनेक जण भावनिकही झाले आहेत. ती माऊली आता आपल्या लेकराला मन भरेपर्यंत कवटाळून मिठी मारेल. अशा प्रकारे नागरिकांनी भावना व्यक्त केल्या आहेत.”
स्वर्णव कसा सापडला?
लोटस पब्लिक स्कूलच्या जवळ एक इमारत आहे. तिथे स्वर्णवला अज्ञात व्यक्तीने सोडले आणि त्याच्या बॅगेत एक चिठ्ठी ठेवली होती. त्याच्या वडिलांचा नंबर होता. दरम्यान, तेथील वॉचमन दादाराव जाधव यांच्याकडे हा मुलगा सोडून ती व्यक्ती पसार झाल्यानंतर याच इमारतीमध्ये लिफ्टचं काम करणाऱ्यांनी या बॅगेत असलेल्या चिठ्ठीवरील नंबरवर व्हिडिओ कॉल करून मुलगा त्यांचा आहे का ही खात्री करून घेतली. त्यानंतर मुलाचे कुटुंबीय त्या ठिकाणी आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली आहे. तत्काळ त्या ठिकाणी पिंपरी-चिंचवड पोलीस दाखल झाले असून ते पुढील तपास करत आहेत.
वॉचमनने सांगितलं नक्की काय घडलं.
“तो माणूस माझ्यासमोरुन पार्किंगमध्ये गेला. तिथून पुन्हा माझ्याकडे आला. थांबला. त्याने मला विचारलं जेवण झालं का? मी जेवणं झालं असंही त्याला सांगितलं,” अशी माहिती स्वर्णवला इमारतीमध्ये सोडणाऱ्या त्या व्यक्तीला पाहणाऱ्या वॉचमन दादाराव जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
“मुलाला खुर्चीवर बसवलं आणि मला म्हणाला याचा दहा मिनिटं संभाळा मी आलोच. तो निघून गेला आणि नंतर आलाच नाही. मला त्याने कपडे कोणती घातली होती. त्याचा चेहरा कसा होता हे काहीच आठवत नाही. त्याचे फक्त डोळे दिसत होते. तोंडावर काहीतरी वेगळ्या प्रकारचा मास्क होता,” असं स्वर्णवला सोडणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलताना जाधव यांनी सांगितलं. “ही व्यक्ती गाडीवर आलेली नव्हती. मग बराच वेळ तो आला नाही तेव्हा मी लिफ्टच्या काम करणाऱ्या कामगारांना त्याबद्दल सांगितलं,” असंही जाधव म्हणाले.
.अन् बॅगेत सापडला नंबर
“या बाबांपाशी (वॉचमनजवळ) तो व्यक्ती मुलाला सोडून गेला. मी दहा मिनिटांमध्ये आलो सांगून तो निघून गेला. बराच वेळ तो माणूस आला नाही. तो मुलगा रडू लागला. बाबांनी आम्हाला येऊन सांगितलं. आम्ही बाहेर येऊन थोडा वेळ वाट पाहिली पण तो माणूस काही आला नाही. अखेर आम्ही त्या मुलाची बॅग तपासली तर बॅगेत एक नंबर सापडला. त्यावर फोन केला तर तो डॉक्टरांना लागला. त्यांनी व्हिडीओ कॉल करण्यास सांगितलं असता मी व्हिडीओ कॉल करुन त्यांना त्यांचा मुलगा दाखवला व्हिडीओ कॉलवर,” असं लिफ्टचं काम करणाऱ्यांनी सांगितलं.
व्हिडीओ कॉल, लोकेशन अन् पोलीस.
“फोन सुरुच ठेवा मी आलोच, असं डॉक्टर व्हिडीओ कॉलवर म्हणाले. त्यांनी नक्की लोकेशन कुठे आहे असं विचारलं असता आम्ही पुनावळेमध्ये पाण्याच्या टाक्या आहेत तिथे समोरच इमारत आहे, असं लोकेशन सांगितलं. त्यानंतर त्यांनी लाइव्ह लोकेशन मागितलं. आम्ही त्यांना फोनवरुन लोकेश पाठवलं. नंतर लगेच डीएसपी आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांचे फोन आले त्यांनीही लोकेशन मागवलं. आम्ही त्यांनाही लोकेशन पाठवलं. त्यानंतर १० ते १५ मिनिटांमध्ये त्या मुलाचे वडील आले, पोलीसही आले. नंतर अर्ध्या तासाने त्याची आई आली,” असं या मुलाला त्याच्या पालाकांच्या स्वाधीन करण्यासाठी वॉचमनला मदत करणाऱ्या लिफ्ट काम करणाऱ्यांनी सांगितलं.
स्फोटात तीन नौदल कर्मचाऱ्यांच्या मृत्यू
मुंबई-मुंबईच्या नौदल डॉकयार्ड इथे असलेल्या आयएनएस रणवीरच्या एका कंपार्टमेंटमध्ये काल झालेल्या एका स्फोटात तीन नौदल कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाला आहे. हा स्फोट झाल्यावर, जहाजावरील कर्मचाऱ्यांनी त्वरित आणि तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या. या घटनेत मोठी वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
आयएनएस रणवीर ही युद्धनौका, नोव्हेंबर 2021 पासून, पूर्व नौदल कमांडमधून क्रॉस कोस्ट कार्यवाहीसाठी इथे तैनात होती आणि लवकरच ही नौका आपल्या तळावर परत जाणार होती. या घटनेच्या बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहे.
पुन्हा सायकलचा घाट:३०० कोटींचा चुराडा केल्यावर?
मेट्रो आणि महापालिका यांचा या योजनेतील प्रत्यक्षातील सहभागामध्ये दडलंय काय ?
पुणे- ‘सायकल चालवा ,प्रदूषण घालवा ‘ असा नारा देत महापालिकेच्या सभागृहात आलेले नगरसेवक आठवा … तब्बल सुमारे साडेतीनशे कोटीची राख रांगोळी सायकल योजनेवर केल्यावर आता पुन्हा एकदा मेट्रो ला गाठण्यासाठी सायकलींचा घाट घालण्याची हौस भागविण्यात येणार आहे. या पूर्वी आणलेल्या सायकली ,उभारलेले सायकल मार्ग यांनी पुणेकरांच्या वाहतूक समस्येत भरच घातली होती आणि कुणाचे तरी चांगभले केले होते हे स्पष्ट असतानाही आता मेट्रोच्या प्रवाशांना घरापासून स्थानकापर्यंत पोचण्यासाठी महामेट्रोने मायबाईकच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर सायकली उपलब्ध करून दिल्या असून त्या शहरात पोचल्याचे वृत्त आहे. मेट्रोच्या उदघाटनाच्या दिवसापासून त्या पुणेकरांना उपलब्ध होणार आहेत.वनाज- रामवाडी मार्गावर पहिल्या टप्प्यात मेट्रो वनाज, आनंदनगर, आयडीयल कॉलनी, नळस्टॉप आणि गरवारे कॉलेज दरम्यान धावणार आहे. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी ते फुगेवाडी दरम्यानच्या मार्गावर मेट्रो कार्यान्वित होणार आहे असे सांगितले जाते आहे.दोन्ही शहरांतील ३१ मेट्रो स्थानकांवर या सायकली उपलब्ध होणार आहेत. मात्र यासाठी महापालिका नेमके काही खर्च करणार आहे काय ? काही जागा देणार आहे काय ? किंवा अन्य खाजगी वाहनांची कोंडी करण्याचा डाव यातून रचला जातोय काय ? असे प्रश्न पुढे येत आहेत .
सायकलींचे भाडे
- दरमहा सुमारे ६०० रुपये
- वन टाईम युज – किमान २० रुपये १० तासांसाठी
- १० तासांपुढे प्रत्येक तासाला भाडे २ रूपये
प्रवाशांना घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत जाण्याठी मायबाईकतर्फे सायकली भाडेतत्त्वावर उपलब्ध होणार आहेत. त्याचे महिन्यांचे भाडे ६०० ते ७०० रुपये असू शकेल. प्रवाशाने दरमहा तत्त्वावर ही सायकल घेतल्यास तो घरीही घेऊन जावू शकेल. घरापासून मेट्रो स्थानकावर पोचल्यावर तेथे सायकल स्टॅंडवर सोडायची. मेट्रोतून पुढे प्रवास करायचा. त्या स्थानकावर उतरल्यावर तेथील सायकल घ्यायची आणि पुढे प्रवाशाने इच्छितस्थळी जायचे, अशा प्रकारची ही योजना आहे.मायबाईकच्या ॲपवरून प्रवाशांना ही सायकल लॉक, अनलॉक्ड करता येईल. तसेच सायकलच्या भाड्याची रक्कमही ॲपवरून रिचार्ज करता येईल. त्यासाठी प्रवाशांना ॲपचा वापर करावा लागेल. या सायकलला जीपीएस सिस्टीम असेल. तसेच ॲपद्वारेच तिचा वापर करता येईल. सायकल भाडेतत्त्वावर न घेताही ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना या सायकलचा वापर करणे शक्य होणार आहे. मेट्रोच्या उदघाटनाच्या दिवसापासून या सायकली प्रवाशांना उपलब्ध होतील असेही सांगितले जातेय .
फ्लॅशबॅक
पुणे शहरांमध्ये लोकांचा सायकलिंग, सार्वजनिक वाहतूक आणि रस्त्यांवरुन चालण्याचा अनुभव सुरक्षित, सोयीस्कर आणि आरामदायक असायला हवा. शहराच्या वाहतूक यंत्रणेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुणे महानगरपालिकेने 2016 मध्ये ‘पुणे सायकल प्लॅन’ तयार केला होता . महापालिकेच्या या उपक्रमाला शहरी विकास मंत्रालय आणि केंद्र सरकारने समर्थन दिले होते .
या सायकल प्लॅनची ४ प्रमुख उद्दिष्टे सांगितली होती ती पुढीलप्रमाणे
- पुणे सायकल प्लॅनअंतर्गत शहरात ३०० किलोमीटरचा सायकल ट्रॅक तयार करण्याची योजना
- या ट्रॅकची रुंदी, लांबी, जंक्शन इत्यादी बाबींचा तसेच इतर आणखी संबंधित गोष्टींचा समावेश असणारी व्यापक मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे
- सायकल शेअरिंगसाठी सार्वजनिक यंत्रणा निर्माण करणे, पहिल्या टप्प्यात 3000 सायकल, 250 स्थानके आणि 40 विभागांचा समावेश
- अतिक्रमण रोखण्यासाठी ट्रॅकची रचना, सायकल वॉर्डन, सीसीटीव्ही आणि ई-चलन्ससह अंमलबजावणीची योजना
- On 14 December 2017, the PMC General Body approved the Comprehensive Bicycle Plan for Pune. The Cycle Plan has been prepared with support from the Ministry of Housing and Urban Affairs, Govt of India.
- असे सांगितले जाते या योजने साठी सुमारे साडेतीनशे कोटी खर्च करण्यात आले. मात्र प्रशासनाकडून आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आजवर यावरील कोणतीही माहिती प्रकाशित केली नाही .
करोडोंची वर्गीकरणे संशयाच्या भोवऱ्यात : वर्गीकरणांच्या कामांवर लक्ष ठेवा
पुणे-महापालिकेत स्थायी समिती मार्फत दरवर्षी होण अखेरीस होणारी वर्गीकरणे हि संशयाच्या भोवऱ्यात असतातच पण यंदा महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर या वर्गीकरणाचे कट आखले जात असल्याचे आरोप होत असून माहिती असूनही महापालिका आयुक्त देखील यास साथ देत असल्याचा संशय व्यक्त होतो आहे . वर्गीकरणासाठी प्रशासन आणि राजकीय पक्ष ‘हम साथ साथ ही ची भूमिका राबवीत आल्याचे दिसते आहे तर आपापल्या प्रभागात ‘साध्या साध्या ‘ कामासाठी वर्गीकरणाचे आग्रह नेत्यांना पत्करावे लागत आहेत . स्थायी समितीच्या बैठकातून हे वर्गीकरणाचे प्रस्ताव मुख्य सभेकडे पाठविण्यात येतात आणि आता अॉनलाइन मुख्य सभांतून ते चर्चेविना सहज संमत होणार आहेत .
कालच्या स्थायी समिती बैठकीत कर्वे रस्त्यावरील उड्डाणपुलाचे ९ कोटी रुपये जी तरतूद करण्यात आली होती त्यातील ३ कोटी रुपये वळविण्यात आलेत .महापौर मोहोळ यांच्या प्रभागात करिष्मा चौक ते कर्वे पुतळा असा हा उड्डाण पुल प्रस्तावित असताना आता हि रक्कम खर्ची पडणार नसल्याचे कारण देऊन प्रभागातील स्वच्छतागृहे दुरुस्त करणे ,विद्युत विषयक कामे करणे, थर्मो प्लास्टिक चे पत्ते मारणे अशा १८ प्रकारच्या कामांचा उल्लेख करत हा निधी वळविला आहे. तर आमदार मुक्ता तिलक यांच्या प्रभागात सरस बाग ते अप्पा बळवंत चौक असा उड्डाणपूल बांधण्यासाठी १ कोटी ची तरतूद होती तीही खर्ची पडणार नसल्याने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी वळविण्यात आली आहे.
हि वर्गीकरणे मोठी गंमतीदार आहेत . महापौरांच्या वॉर्डात उड्डाण पुलाला तरतूद केलेले ९ कोटी रुपये खर्ची पडणार नसल्याचे चक्क जानेवारीच्या मध्यावर लक्षात येणे आणि ती रक्कम १८ प्रकारच्या साध्या साध्या कामांवर वळविणे हा विषय चर्चेच्या घेर्यात सापडू शकणारा आहे . मार्च पूर्वी आता हि रक्कम खर्च होणार आहे म्हणजे १८ प्रकारची कामे पूर्ण करून ३ कोटी खर्च करून टाकले जाणार आहेत . यात प्रश्न असा निर्माण होतो कि, २ वर्षे बजेट केलेल्या माननीयांनी या १८ प्रकारच्या साध्या साध्या कामांसाठी यंदा बजेट करताना तरतूद केलेली नव्हती काय ?आमदार सध्या आमदार असलेल्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवकांच्या वार्डातील सारसबाग ते अप्पा बळवंत चौक उड्डाणपुलासाठी केलेली १ कोटीची तरतूद वर्षभरात का खर्च होऊ शकली नाही ? आणि खड्डे बुजविण्यासाठी त्यांनी यंदाच्या बजेट मध्ये तरतूद करवून घेतली नव्हती काय ?
या सर्व पार्श्वभूमीवर वर्गीकरणातून नेमकी कोणकोणती कामे होत आहेत यावर लक्ष कोण ठेवणार ? खरेच हि कामे होतात काय ? कि केवळ कागदोपत्री कामे झाल्याचे दाखवून त्यांची बिले काढली जातात ? या प्रश्नांचा भडीमार आता होऊ शकतो . पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचीच हातमिळवणी झाल्याने व्न्नन्न्वार्गीकार्नाचे विषय संशायाच्याच भोवर्यात अडकत आले आहेत . त्यात आता यंदा निवडणुकांना सामोरे जायचे आहे.
उर्दू शाळांमध्ये वर्गवाढ करण्याबाबत प्रस्ताव सादर करावेत – शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड
मुंबई, दि. 18 :- अल्पसंख्याक समाजामधील मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे अल्पसंख्याक विकास समितीच्या काही सदस्यांनी सूचना केल्यानुसार जेथे सातवीपर्यंत शाळा आहेत अशा संस्थांमधील शाळांची १२ वी पर्यंत वर्गवाढ करण्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. जेथे तातडीने मान्यता देणे शक्य आहे, अशा शाळांमधील वर्गवाढीस मंजुरी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने अल्पसंख्याक समाजासंदर्भात शैक्षणिक धोरण ठरविण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधी, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ आदींसमवेत चर्चा करून याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रा.गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीस शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंग, उपसचिव समीर सावंत, शिक्षण संचालक महेश पालकर, बालभारतीचे संचालक के.बी.पाटील, विवेक गोसावी आदी उपस्थित होते.
मराठी प्रमाणेच उर्दू भाषिक शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून द्वैभाषिक पुस्तके लागू करण्याची सूचनाही करण्यात आली होती, त्यानुसार पहिल्या इयत्तेत उर्दू आणि इंग्रजी अशी द्वैभाषिक पुस्तके प्रायोगिक तत्त्वावर सुरू करावीत, असे निर्देश प्रा.गायकवाड यांनी दिले. अल्पसंख्याक संस्थांमधील मान्यताप्राप्त रिक्त पदांवर शिक्षक भरती, शिक्षकांचे समायोजन याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
