Home Blog Page 2118

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची ग्राहकसंख्या पाच कोटींच्या पुढे

0

नवी दिल्ली, 18 जानेवारी 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ करतांना म्हटले होते, की देशात वित्तीय समावेशन करण्यासाठीचा हा सर्वात मोठा उपक्रम आहे.त्या पोस्ट पेमेंट बँक या प्रथम डिजिटल बँकेने दूरसंचार मंत्रालयाच्या अखत्यारीतील टपाल विभागाच्या व्याप्तीचा उत्तम वापर करत त्या पायावर आपला विस्तार करत, एक महत्वाचा टप्पा गाठला आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्राहकांची संख्या पाच कोटींवर  पोहोचली  आहे, अशी घोषणा आज बँकेने केली. बँकेचा शुभारंभ झाल्यापासून, केवळ तीन वर्षांच्या आत ही देशातील सर्वाधिक जलद गतीने विस्तारलेल्या बँकांपैकी एक बँक ठरली आहे.

आयपीपीबीने आपल्या 1.36 लाख पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून पाच कोटी खाती डिजिटल आणि संपूर्ण कागदरहित व्यवहार करत सुरु केली आहेत. यापैकी 1.20 लाख खाती ग्रामीण भागातली आहेत. तसेच, 1.47 लाख ग्राहकांच्या घरी जाऊन त्यांना बँकिंग सेवा देण्यात आल्या आहेत.

या कामगिरीमुळे, आयपीपीबीने जगातील सर्वात मोठी डिजिटल वित्तीय साक्षरता मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली असून, टपाल कार्यालयाच्या  2,80,000  कर्मचाऱ्यांच्या परिश्रम शक्तीच्या बळावर, वित्तीय साक्षरता आणि सक्षमीकरणाची मोहीम राबवली आहे.

विशेष म्हणजे, बँकेच्या एकूण खातेदारांपैकी सुमारे 48% महिला खातेदार आहेत, तर 52% पुरुष खातेदार आहेत, ही आकडेवारी, अधिकाधिक महिलांना बँकिंग क्षेत्रात आणण्याचा बँकेचा उद्देश स्पष्ट करणारी आहे. महिलांच्या एकूण खात्यांपैकी 98% खाती त्यांच्या घरी जाऊन उघडण्यात आली आहेत. आणि 68% महिलांना या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरणाचे लाभ मिळत आहेत. आणखी एक मैलाचा दगड  म्हणजे देशातील युवक देखील पोस्ट पेमेंट बँकेकडे आकर्षित झाले आहेत. 41% पेक्षा अधिक खातेधारक 18 ते 35 वर्षे या वयोगटातील आहेत.

या महत्त्वाच्या टप्प्याविषयी बोलतांना टपाल विभागाचे सचिव, विनीत पांडे यांनी सांगितले की, “  इंडिया पोस्टअंतर्गत, देशातीळ सर्वात मोठे वित्तीय समवेशनाचे जाळे उभरण्यास आम्ही कटिबद्ध असून, यात शहरी आणि ग्रामीण भारतातही आमच्या बँकिंग सेवा विस्तारल्या आहेत. केवळ तीन वर्षात, पाच कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची कामगिरी या बँक मॉडेलच्या यशाची पावतीच ठरली आहे. यातून किफायतशीर, सुलभ, सोपी आणि सुरक्षित डिजिटल व्यवस्था, विशेषतः देशाच्या ग्रामीण भागात, निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या घरांपर्यंत बँकिंग सेवा पुरवून आम्ही त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात हातभार लावू शकलो, याचा आम्हाला विशेष आनंद आहे.”

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जे वेंकटरामु यांनी यावर प्रतिक्रिया देतांना सांगितले की, “ हा बँकेसाठी अभिमानाचा क्षण आहे.आम्ही आमचा ग्राहक विस्तार करतांना, सामर्थ्याकडून सामर्थ्याकडे वाटचाल केली आहे. कोविड-19 महामारीच्या काळातही, आम्ही ग्राहकांना निर्वेक्ष बँकिंग आणि सरकार-ते ग्राहक (G2C) सेवा पुरवल्या आहेत.विशेष म्हणजे, बँकेने आपले ग्राहक तयार करतांना संपूर्णपणे कागदरहित व्यवहार करत डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर केला आहे. ग्रामीण, बँकिंग क्षेत्रापासून वंचित असलेल्या नागरिकांची ,त्यांना आवश्यक असलेली उत्पादने आणि सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध आहे.”

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता ३८ कोटी ५८ लाख रूपयांचा निधी वितरित

0

मुंबई, दि.१८ : राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्‍या विविध उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्त पुणे व नागपूर यांना ३८ कोटी ५८ लाख रूपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे.

विभागीय आयुक्त पुणे यांना २९ कोटी ९६ लाख रूपये वितरित करण्यात आले असून, या विभागांतर्गत पुणे जिल्ह्याला ९ कोटी ४४ लाख, सोलापूर जिल्ह्याला १० कोटी, सातारा जिल्ह्याला १० कोटी ५२ लाख तसेच विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ८ कोटी  ६१ लाख रूपये असा एकूण ३८ कोटी ५८ लाख रूपये निधी या जिल्ह्यांना निधी वितरित करण्यात आला आहे.  राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निधी मागणीसाठी पुणे, सोलापूर, सातारा व गडचिरोली जिल्ह्यांनी केलेल्या मागणीनुसार प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून राज्य कार्यकारी समितीने दिलेल्या मान्यतेनुसार हा निधी वितरित करण्यात आला आहे.

खेळण्यांच्या दुकानात छापा घालून अप्रमाणित खेळणी केली जप्त

0

मुंबई-

भारतीय मानक ब्यूरोच्या मुंबई शाखेतील अधिकाऱ्यांच्या पथकाने, शनिवारी (15 जानेवारी 2022)  रोजी मुंबईतील गोरेगाव भागातल्या ओबेरॉय मॉलमधल्या मेसर्स हैमलेज (मेसर्स रिलायन्स ब्रॅंडस लिमिटेड)  या दुकानावर छापे घातले.

या दुकानात, इलेक्ट्रिक आणि बिगर-इलेक्ट्रिक खेळण्यांची प्रमाणित चिन्हाविना  (बीआयएस स्टँडर्ड मार्क) विक्री सुरु होती. हे केंद्र सरकारने खेळण्यांच्या दर्जाबाबत जारी केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन असल्याचे सिद्ध झाले आहे. या छाप्यादरम्यान अनेक अप्रमाणित खेळणी देखील जप्त करण्यात आली.

मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेता, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली असून, त्यानुसार, 1 जानेवारी 2021 नंतर भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व खेळण्यांवर भारतीय मानक ब्युरोचे सुरक्षिततेविषयक प्रमाणपत्र आणि मुद्रा म्हणजेच  मार्क असणे अनिवार्य आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्यास, बीआयएस कायदा 2016 कायद्यानुसार,  तो दंडनीय अपराध असून, त्यासाठी दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा किमान 2 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्हीची तरतूद आहे. त्यामुळे खेळणी उत्पादक, वितरक आणि व्यापारी यांनी, बीआयसने प्रमाणित न केलेली खेळणी बनवू अथवा विकू नयेत, असा सल्ला देण्यात आला आहे.

ग्राहकांनीही, प्रमाणित उत्पादक तसेच उत्पादनांची माहिती मिळवण्यासाठी, बीआयएस केअर अॅप चा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

देशातील 98 श्रीमंतांकडे 55.5 कोटी गरीब लोकांची संपत्ती- 45% संपत्ती देशातील 10% लोकांजवळ

0

कोरोना महामारीच्या काळात जिथे एकीकडे देशातील गरिबांसमोर खाण्यापिण्याचे संकट निर्माण झाले होते, तर दुसरीकडे या काळात देशातील श्रीमंतांची संख्या वाढली आहे. एनजीओ ऑक्सफॅम इंडियाच्या अहवालानुसार, 2021 मध्ये भारतातील अब्जाधीशांची संख्या 102 वरून 142 पर्यंत वाढली आहे.

आज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2022 चा पहिला दिवस आहे. या निमित्ताने ऑक्सफॅम इंडियाने वार्षिक असमानता सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे. यानुसार, कोरोनाच्या काळात भारतीय अब्जाधीशांची एकूण संपत्ती दुप्पट झाली आहे. त्यांच्या संपत्तीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की टॉप-10 श्रीमंतांकडे इतकी संपत्ती आहे की ते पुढील 25 वर्षे देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालये चालवू शकतात.

देशातील 98 श्रीमंतांकडे 55.5 कोटी गरीब लोकांची संपत्ती आहे
या आर्थिक असमानता अहवालानुसार देशातील 142 अब्जाधीशांची एकूण संपत्ती 719 बिलियन डॉलर म्हणजेच 53 लाख कोटी रुपये आहे. 98 श्रीमंत लोकांकडे 55.5 कोटी गरीब लोकांइतकी संपत्ती आहे. हे सुमारे 657 बिलियन डॉलर, म्हणजे 49 लाख कोटी रुपये आहे. या 98 कुटुंबांची एकूण संपत्ती भारत सरकारच्या एकूण बजेटच्या सुमारे 41% आहे.

45% पैसा फक्त 10% लोकांकडे आहे
कोरोनामुळे विषमता इतकी वाढली आहे की देशातील सर्वात श्रीमंत 10% लोकांकडे देशातील 45% संपत्ती आहे. त्याच वेळी, देशातील 50% गरीब लोकांकडे फक्त 6% संपत्ती आहे.

कोरोनाच्या काळात 28% महिलांनी नोकरी गमावली
जेंडर बाबतीत बोलायचे झाले तर, कोरोनाच्या काळात जॉब लॉसमध्ये 28% महिला आहेत. यामुळे त्यांची एकूण कमाई दोन तृतीयांश कमी झाली आहे. महिलांच्या स्थितीबाबत असे म्हटले आहे की 2021 च्या अर्थसंकल्पात सरकारने महिला आणि बालविकास मंत्रालयावर इतकाच खर्च केला आहे, जो भारतातील बॉटम-10 कोट्याधीशांच्या एकूण संपत्तीच्या निम्माही नाही.

1% टॅक्सने मिळतील 17.7 लाख अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडर
रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की जर भारतातील टॉप- 10% श्रीमंत लोकांवर 1% अतिरिक्त कर लावला गेला तर त्या पैशातून देशाला 17.7 लाख अतिरिक्त ऑक्सिजन सिलिंडर मिळतील. त्याच वेळी, देशातील 98 श्रीमंत कुटुंबांवर 1% अतिरिक्त कर लावला, तर त्या पैशातून आयुष्मान भारत कार्यक्रम पुढील सात वर्षे चालवता येईल. आयुष्मान भारत हा जगातील सर्वात मोठा आरोग्य विमा कार्यक्रम आहे.

84 वर्षे रोज 7.4 कोटी रुपये खर्च करू शकतात
अहवालात असे म्हटले आहे की भारतातील टॉप-10 श्रीमंतांनी दररोज 1 मिलियन डॉलर किंवा 7.4 कोटी रुपये खर्च केले तरी त्यांची संपत्ती खर्च होण्यासाठी 84 वर्षे लागतील. दुसरीकडे, जर देशातील श्रीमंतांवर संपत्ती कर लादला गेला तर 78.3 बिलियन डॉलर म्हणजेच 5.8 लाख कोटी रुपये जमा होऊ शकतात. या पैशातून सरकारचे आरोग्य बजेट 271% वाढू शकते.

Oxfam India publishes annual inequality survey
https://www.oxfamindia.org/knowledgehub/workingpaper/inequality-kills-india-supplement-2022

ओबीसी राजकीय आरक्षण; सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी

0

नवी दिल्ली- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या २७ टक्के राजकीय आरक्षण प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी (१९ जानेवारी) सुनावणी होईल.

ओबीसींचे आरक्षण रद्द करून तेथे सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने १५ डिसेंबर २०२१ ला दिले होते. ते मागे घ्यावेत, अशा आशयाची याचिका राज्य सरकारने सोमवारी सुप्रीम कोर्टात दाखल केली. त्यावर न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने बुधवारी सुनावणी घेण्याचे मान्य केले.

ओबीसींचे आरक्षण रद्द करून या जागांचे सर्वसाधारण गटात रूपांतर करून राज्य निवडणूक आयोगाने स्वतंत्र अधिसूचना जारी करावी व सध्याची निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या २७ टक्के जागांचे रूपांतर सर्वसाधारण गटात झाल्यानंतर उर्वरित ७३ टक्क्यांसोबतच निवडणूक घ्यावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले होते. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने याचिका दाखल केली आहे.

४० वर्षे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील कार्याबद्दल सन्मान

0

पुणे : सुप्रसिद्ध संवादिनी वादक आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या परफॉर्मिंग आर्ट्स आणि ललित कला विभागाचे संचालक शारंगधर साठे यांना गानवर्धन संस्थेचा कै. पंडित आप्पासाहेब जळगावकर संवादिनी वादक  पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना स्वर-लय-रत्न उपाधी देण्यात आली.
एरंडवण्यातील मनोहर मंगल कार्यालय येथे पुरस्कार प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम, गानवर्धनचे कार्यवाह रवींद्र दुर्वे, कार्याध्यक्ष दयानंद घोटकर उपस्थित होते. शाल, सन्मानपत्र आणि रोख १० हजार असे पुरस्काराचे स्वरूप होते.

मागील ४० वर्षांहून  अधिक काळ शारंगधर साठे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात कार्यरत आहेत. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पंडित शिवकुमार शर्मा, उस्ताद शाहीद परवेझ अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या कौतुकास शारंगधर साठे पात्र ठरलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकार तयार झाले आहेत. 

मी पीएम मोदींबद्दल नाहीच बोललो ; मी दुसऱ्या मोदीवर बोललो – नाना पटोलेंची स्पष्टोक्ती

0

मुंबई-मी पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द वापरले नाहीत. मी आमच्या भागातील मोदी असे टोपण नाव असणाऱ्या गावगुंडावर बोललो आहे. त्यामुळे यामध्ये पंतप्रधान मोदींचा विषयच येत नसल्याचे नाना पटोलेंनी म्हटले आहे.’आपण कोणत्याही प्रकारचे पीएम मोदींविरोधात भाष्य केले नसल्याचे म्हणत पटोलेंनी या प्रकरणाला एकदम वेगळेच वळण दिले आहे.आपण पंतप्रधान मोदी यांना मारू ही शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण काही प्रमाणात तापले होते. नाना पटोले यांच्या विरोधात भंडाऱ्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी देखील पटोलेंवर टीका केली. त्यानंतर अखेर नाना पटोलेंनी आपल्या त्या वक्तव्यावर स्पष्टोक्ती दिली आहे.

फडणवीस आक्रमक
नानाभाऊ शारीरिक उंचीसोबत बौद्धिक आणि वैचारिक उंचीही असावी, असे म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’ असे विधान नाना पटोले यांनी केले होते.

त्यानंतर आता भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भंडाऱ्याच्या प्रचारसभेनंतर नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे. भंडाऱ्यात नाना पटोले यांच्याविरोधात भाजपने तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यावर सडकून टीका केली आहे.

फडणवीस म्हणाले की, नाना यांना शारीरिक उंचीसोबत बौद्धिक आणि वैचारिक उंचीही असावी लागते. तसेच काँग्रेस पक्ष सत्तेसाठी इतक्या रसातळाला गेला आहे का? असा संतप्त सवालही फडणवीसांनी यावेळी विचारला आहे. नाना पटोले यांच्या व्हायरल व्हिडीओनंतर संतप्त झालेल्या भाजप नेत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यात फडणवीस यांनी संबधित वक्तव्याचा पंजाबमधील मोदी यांचा ताफा अडवल्याच्या घटनेचा संदर्भ देत टीका केली आहे.

ते म्हणाले की, ‘पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा ताफा 20 मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते.’ फडणवीस यांनी ट्विट करत ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही हे सहन करणार नाही- चंद्रकात पाटील

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांना दिलेल्या धमकीबाबत आक्रमक उत्तर द्यावे, अशी सूचना आपण सर्व जिल्हाध्यक्षांना केली आहे. पंजाबमध्ये पंतप्रधानांचा ताफा अडवून त्यांना जिवे मारण्यासाठी घातपाताचा प्रयत्न झाला. त्याला नाना पटोले नौटंकी म्हणाले होते. त्याच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. यावेळीही पोलिसांनी तसेच केले तर आम्ही न्यायालयात जाऊ, असे चंद्रकात पाटील म्हणाले.

काय आहे प्रकरण?

भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यावेळी नाना पटोले यांनी एका प्रचारसभेला संबोधित केले. त्यानंतर पटोले यांनी ‘आपण पंतप्रधान मोदी यांना मारू ही शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे विधान केले. त्यांच्या या संभाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभव आल्यानंतर नाना पटोले हे 2019 मध्ये साकोली विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परिणय फुके यांच्या प्रचारासाठी साकोली येथे आले होते. याच गोष्टीचा राग धरून नाना पटोले हे वारंवार मोदींविरोधात वक्तव्य करताना पाहायला मिळत आहे.

प्रचार सभेनंतर काही नागरिकांनी नाना पटोले यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या, त्यावेळी नाना पटोले म्हणाले की, आता आपली ताकद वाढली असून, ‘आपण पंतप्रधान मोदी यांना मारू ही शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे विधान यावेळी पटोले यांनी केले.

भारतामध्ये कोरोना महामारी ही नरेंद्र मोदी यांनी लोकांना मारण्यासाठी आणली. मोदी सरकार लोकांना मारायला लागले आहे. गरीब कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी गॅस सिलिंडर दिले व आता पुढील काळात ज्याच्याकडे गॅस सिलिंडर आहे तो सधन घोषित करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. असे म्हणत नाना पटोले यांनी मोदींवर देखील निशाणा साधला.

नाना पटोलेंनी पंतप्रधानांना दिलेली धमकी भाजपा सहन करणार नाही; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा इशारा

0

पुणे-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून मारण्याची व शिव्या देण्याची धमकी दिली आहे, हा प्रकार भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. भाजपाचे कार्यकर्ते जिल्ह्या जिल्ह्यात याबाबत पटोले यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करतील व पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही तर भाजपा न्यायालयात जाईल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी दिला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा ‘मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’ अशी पंतप्रधानांना धमकी देणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्या संदर्भात प्रतिक्रिया देताना आ. चंद्रकांतदादा पाटील बोलत होते.

ते म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांना दिलेल्या धमकीबाबत आक्रमक उत्तर द्यावे, अशी सूचना आपण सर्व जिल्हाध्यक्षांना केली आहे. पंजाबमध्ये पंतप्रधानांचा ताफा अडवून त्यांना जिवे मारण्यासाठी घातपाताचा प्रयत्न झाला. त्याला नाना पटोले नौटंकी म्हणाले होते. त्याच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. यावेळीही पोलिसांनी तसेच केले तर आम्ही न्यायालयात जाऊ, असे पाटील म्हणाले.

त्यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जर तर अशा स्वरुपात एक वक्तव्य केले तर राज्यातील पोलिसांनी कारवाई केली पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पंतप्रधानांबाबत असे बोलतात आणि केंद्रीय गृहमंत्र्यांवर पंतप्रधानांच्या विरोधातील कारस्थानामागे हात असल्याचा आरोप करतात तरीही पोलिस कारवाई करत नाहीत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाई केली तर काँग्रेस पाठिंबा काढून घेईल आणि सरकार कोसळेल यामुळे सत्तेच्या हव्यासातून कारवाई टाळली जात आहे. पण भाजपा हे सहन करणार नाही.

मी मोदींना मारू शकतो म्हणणाऱ्या नाना पटोले यांच्या विरोधात खासदार सुनील मेंढेंनी पोलिसांत दाखल केली तक्रार

0

भंडारा -भाजपचे भंडाऱ्याचे खासदार सुनील मेढे यांनी पटोले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पटोले यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

भंडारा जिल्ह्यातील जेवनाळा येथे रविवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यावेळी पटोलेंनी मोदींविरोधात वादग्रस्त भाष्य केले. पटोले यांनी आपल्या मतदार संघात निसटता पाय मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. सायंकाळी घेण्यात आलेल्या प्रचार सभेत नाना पटोले यांनी ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वादग्रस्त विधान केले आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभव आल्यानंतर नाना पटोले हे 2019 मध्ये साकोली विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परिणय फुके यांच्या प्रचारासाठी साकोली येथे आले होते. याच गोष्टीचा राग धरून नाना पटोले हे वारंवार मोदींविरोधात वक्तव्य करताना पाहायला मिळत आहे.

नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भंडारा गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढे यांनी आपल्या भाजप पदाधिकाऱ्यांसोबत पोलिस ठाण्यात पोहोचून नाना पटोले यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली असून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

भारतामध्ये कोरोना महामारी ही नरेंद्र मोदी यांनी लोकांना मारण्यासाठी आणली. मोदी सरकार लोकांना मारायला लागले आहे. गरीब कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी गॅस सिलिंडर दिले व आता पुढील काळात ज्याच्याकडे गॅस सिलिंडर आहे तो सधन घोषित करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. असे म्हणत नाना पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला होता.

अपघातग्रस्त भागात उपाययोजनांना सुरुवात : महापौर मोहोळ

0
  • NHAI, पोलीस, महापालिका अधिकारी यांची महापौरांनी घेतली बैठक
  • उपाययोजना युद्धपातळीवर पूर्ण करणार : महापौर

पुणे (प्रतिनिधी)

वारंवार अपघात होणाऱ्या नवले पूल आणि परिसरात उपाययोजनांना सुरुवात झाली असून या कामात तातडीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि दीर्घकालीन उपाययोजना अशा दोन्ही टप्प्यांवर काम सुरु झाले आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. दिशादर्शक फरक वाढवण्यापासून तर सर्व्हिस रोड बांधेपर्यंतची कामे या उपाययोजनांमध्ये करण्यात येणार असून कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी महापौर मोहोळ लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत.

नवले पूल आणि एकूणच शहरतून मुंबई-बंगलोर महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात महापौर मोहोळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजक केले होते. बैठकीला महामार्ग प्राधिकरणचे मुख्य प्रकल्प अधिकारी रामचंद्र राव, प्रकल्प अधिकारी एस.एस कदम, सल्लागार भारत तोडकरी, राकेश कोरी, आयुक्त विक्रम कुमार, महामार्ग प्राधिकरणचे उपव्यवस्थापक अंकित यादव, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, पथ अभियंता व्ही.जी. कुलकर्णी, वाहतूक व्यवस्थापक निखिल मिजार आदी उपस्थित होते.

बैठकीबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘महामार्ग प्राधिकरणच्या वतीने दिशादर्शक आणि माहितीफलक लावण्यास सुरुवात झाली असून यात ताशी ६० किमी, तीव्र उतार, हळू जा, अशा फलकांचा समावेश आहे. तुटलेल्या क्रॅश बॅरिअर्सची कामेही हाती घेण्यात आली आहेत. धोकादायक ठिकाणे निश्चित करुन त्या भागात रंबल स्ट्रीप पट्टेही बसविले जात आहेत. त्या सोबतच कॅट आय, रिफ्लेकटिंग बोर्ड आणि सोलर ब्लिनकिंग बसविण्यात आले असून पथदिवेही बसविण्यात येत आहेत’

संपूर्ण महामार्गालगत सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी महिमार्ग प्राधिकरण आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात करण्यात आली आहे. शिवाय नवले पुलाखाली असलेली अतिक्रमणे काढून त्यानंतर महामार्ग प्राधिकरण सर्व्हिस रोड दुरुस्ती करणार आहे. नव्या कात्रज बोगद्यानंतर आणि दरीपुलाजवळ गॅन्ट्री तयार करुन कायमस्वरूपी स्पीडगन आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही पोलीस आणि महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. नर्हे स्मशानभूमीसंदर्भात स्थानिक नागरिकांशी चर्चा करुन निर्णय होणार आहे. शिवाय सर्व्हिस रोड आणि महामार्गावर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णयही घेतलाअसल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

महापौर मोहोळ पुढे म्हणाले, ‘अपघात रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी उपाययोजना करत असून सदरील उपाययोजना वेगाने आणि दर्जेदार करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी महापालिकेच्या बाजूने पूर्ण क्षमतेने काम करत आहोत. सर्व उपाययोजना संयुक्तिकरित्या होत असल्याने त्या नक्कीच प्रभावी आणि परिणामकारक असतील, यात शंका नाही’.

◆कायमस्वरूपी उपाययोजना…

  • भूमकर चौक ते नवले पूल आणि विश्वास हॉटेल चौक या दोन ठिकाणी अंडरपास करण्यात येणार
  • विश्वास हॉटेल चौक ते पासलकर चौक आणि नवलेपुलाच्या वडगाव बाजूचा सर्व्हिस रस्ता रुंदीकरण करणे
  • सिंहगड रस्ता ते मुंबई बायपासला जाण्यासाठी आणि महामार्गावरुन सिंहगड रस्त्याला जाण्यासाठी क्लोव्हर लिफ जंक्शनचे विकसन करण्यासाठी डीपीआर तयार करण्यात येणार

‘नानाभाऊ, शारीरिक उंचीसोबत बौद्धिक उंचीही असावी’, पटोलेंच्या मोदींबाबतच्या वादग्रस्त व्हिडीओनंतर फडणवीसांचा हल्लाबोल

0

मुंबई-नानाभाऊ शारीरिक उंचीसोबत बौद्धिक आणि वैचारिक उंचीही असावी, असे म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’ असे विधान नाना पटोले यांनी केले होते.

त्यानंतर आता भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भंडाऱ्याच्या प्रचारसभेनंतर नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे. भंडाऱ्यात नाना पटोले यांच्याविरोधात भाजपने तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यावर सडकून टीका केली आहे.

फडणवीस म्हणाले की, नाना यांना शारीरिक उंचीसोबत बौद्धिक आणि वैचारिक उंचीही असावी लागते. तसेच काँग्रेस पक्ष सत्तेसाठी इतक्या रसातळाला गेला आहे का? असा संतप्त सवालही फडणवीसांनी यावेळी विचारला आहे. नाना पटोले यांच्या व्हायरल व्हिडीओनंतर संतप्त झालेल्या भाजप नेत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यात फडणवीस यांनी संबधित वक्तव्याचा पंजाबमधील मोदी यांचा ताफा अडवल्याच्या घटनेचा संदर्भ देत टीका केली आहे.

ते म्हणाले की, ‘पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा ताफा 20 मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते.’ फडणवीस यांनी ट्विट करत ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

काय आहे प्रकरण
भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यावेळी नाना पटोले यांनी एका प्रचारसभेला संबोधित केले. त्यानंतर पटोले यांनी ‘आपण पंतप्रधान मोदी यांना मारू ही शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे विधान केले. त्यांच्या या संभाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभव आल्यानंतर नाना पटोले हे 2019 मध्ये साकोली विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परिणय फुके यांच्या प्रचारासाठी साकोली येथे आले होते. याच गोष्टीचा राग धरून नाना पटोले हे वारंवार मोदींविरोधात वक्तव्य करताना पाहायला मिळत आहे.

प्रचार सभेनंतर काही नागरिकांनी नाना पटोले यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या, त्यावेळी नाना पटोले म्हणाले की, आता आपली ताकद वाढली असून, ‘आपण पंतप्रधान मोदी यांना मारू ही शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे विधान यावेळी पटोले यांनी केले.

भारतामध्ये कोरोना महामारी ही नरेंद्र मोदी यांनी लोकांना मारण्यासाठी आणली. मोदी सरकार लोकांना मारायला लागले आहे. गरीब कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी गॅस सिलिंडर दिले व आता पुढील काळात ज्याच्याकडे गॅस सिलिंडर आहे तो सधन घोषित करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. असे म्हणत नाना पटोले यांनी मोदींवर देखील निशाणा साधला.

शेतकऱ्यांना जुन्या दराने खताची विक्री करावी – कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन

0

मुंबई, दि. 17 :  महाराष्ट्रात सध्या रब्बी ऊन्हाळी हंगाम पेरण्या सुरू आहेत. ऊस, फळबागा, भाजीपाला गहू या पिकांसाठी शेतकऱ्यांकडून खताची मागणी वाढत आहे. त्यामुळे रासायनिक खत कंपन्यांनी त्यांच्याकडील जुन्या खतांचा साठा जुन्या दरानेच विक्री करावा, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी रासायनिक खत विक्रेत्यांना केले आहे. तसेच याबाबत कृषी विभागानेही लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवडयोग्य क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे खताची मागणीही वाढली आहे. मात्र खत पुरवठादारांनी खताच्या किमती वाढविल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. दर वाढवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे  खत पुरवठादारांनी त्यांच्याकडील जुना खत साठा त्याच दराने विक्री करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, याबाबत कृषीमंत्री श्री. भुसे यांनी नुकतीच केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मंडाविया यांना पत्र लिहून खत विक्री दर नियंत्रित करण्याची मागणी केली होती.

राज्यात ०६ डिसेंबर, २०२१ रोजी घोषित केलेल्या दरांनुसार प्रती ५० किलो बॅगचा खतनिहाय दर, खत कंपनीचे नाव खालीलप्रमाणे. : (कंसात नमूद दर दि. १३ जानेवारी,२०२२ रोजीचे)

१०:२६:२६- स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज -१४४०  (१६४०). वाढ: १७० रुपये.

१०:२६:२६ – चंबल फर्टीलाईझर्स लि.-१४६५ (१५००), वाढ: ३५ रुपये.

१२:३२:१६- स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज -१४४० (१६४०) वाढ: १५० रुपये.

१६:२०:०:१३ – कोरोमंडळ इंट. लि.-

१०७५ (१२५०) वाढ: १७५ रुपये.

अमोनियम सल्फेट: गुजरात स्टेट फर्टी. कंपनी-  ८७५ (१०००) वाढ: १२५.

१५:१५:१५:०९ – कोरोमंडळ इंट. लि.-

११८०  (१३७५ ) वाढ:१९५.

वैद्यकीय प्राणवायू प्रकल्पातून ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ची पुन्हा प्रचिती

0
  • वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्प उभारणारी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका
  • माहूल येथे प्रतिदिन १५ मेट्रिक टन प्राणवायू वापरुन १५०० जंबो सिलेंडर्स भरणे शक्य, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या सहकार्याने प्रकल्प उभारणी
  • महालक्ष्मी प्रकल्पामध्ये प्रतिदिन १०० ते १२० ड्युरा सिलेंडर्स भरण्याची क्षमता
  • स्वतःच्या प्रकल्पांमुळे सिलेंडर पुनर्भरणाच्या खर्चात होणार ४० टक्के बचत,वाहतुकीचा वेळही वाचणार

मुंबई, दि. 17 : कोविड विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना प्राणवायू पुरवठा करताना झालेली दमछाक पाहून बृहन्मुंबई महानगरपालिकेने थेट स्वतःचेच वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारले. प्रत्येक संकटाला खंबीरपणे सामोरे जाण्याची मानसिकता असणाऱ्या ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ ची यातून पुन्हा प्रचिती आली आहे, असे गौरवोद्गार राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी काढले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या सहकार्याने, एम पश्चिम विभागातील माहूल रस्त्यावर स्थित महानगरपालिका मैदानावर वैद्यकीय वायुरुप प्राणवायू जंबो सिलिंडर पुनर्भरण प्रकल्प (मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांट) उभारण्यात आला आहे. तसेच महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथेही वैद्यकीय द्रवरुप प्राणवायू ड्युरा सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पांचे लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (दिनांक १७ जानेवारी २०२२) झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

कोविडसंसर्ग स्थितीमुळे ऑनलाईन स्वरुपात आयोजित या समारंभास मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, खासदार राहूल शेवाळे, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, बीपीसीएलचे मुख्य व्यवस्थापक (प्रचालने) एन. चंद्रशेखर, जी दक्षिण विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता नरवणकर, एम पश्चिम विभागातील नगरसेवक   श्रीकांत शेटये, नगरसेवक अनिल पाटणकर, नगरसेविका श्रीमती अंजली नाईक, तसेच महानगरपालिका उपआयुक्त (मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण) श्री. रमाकांत बिरादार, उप आयुक्त (परिमंडळ ५) विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त सर्वश्री. विश्वास मोटे, शरद उघडे, पृथ्वीराज चौहाण, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) श्री. कृष्णा पेरेकर, संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पालकमंत्री आदित्य ठाकरे याप्रसंगी संबोधित करताना म्हणाले की, कोविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेत इतर शहरे आणि राज्यातूनही वैद्यकीय प्राणवायू आणून मुंबई महानगरपालिकेने रुग्णांचे प्राण वाचवले. एका रात्री तर युद्धसदृश्य परिस्थिती हाताळून दीडशेपेक्षा अधिक रुग्णांना सुरक्षितपणे हलवावे लागले, इतकी प्राणवायूची कमतरता आपण अनुभवली. अशी स्थिती पुन्हा ओढवू नये म्हणून महानगरपालिकेने तेव्हाच स्वतःचे वैद्यकीय प्राणवायू साठवण व सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला. आज या प्रकल्पांच्या लोकार्पणातून महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून अशाप्रकारचे प्रकल्प असणारी देशातील पहिली महानगरपालिका म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेची नोंद झाली आहे. कोविड विषाणूचे डेल्टा व ओमायक्रॉन हे दोन्ही उपप्रकार अद्याप फैलावत असून सर्वांनी मास्कचा उपयोग, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर यासारख्या नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहनही श्री. ठाकरे यांनी अखेरीस केले. दोन्ही प्रकल्पांची वेगाने उभारणी केल्याबद्दल श्री. ठाकरे यांनी महापौर, सर्व लोकप्रतिनिधी, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन व बीपीसीएल यांचेही कौतुक केले.

मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर संबोधित करताना म्हणाल्या की, माहूल व महालक्ष्मी येथील ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांट हे जणू संजीवनी प्रकल्प आहेत. कोविडच्या दुसऱ्या लाटेत मुंबई व महाराष्ट्राबाहेर प्राणवायू पुरवठ्याअभावी रुग्णांना यातना सहन कराव्या लागल्या, मात्र त्याही स्थितीत मुंबईने योग्य दक्षता व नियोजन याआधारे रुग्णांचे प्राण वाचवले. आता ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांटमुळे पैसा आणि वेळही वाचणार आहे. ही सर्व कामगिरी इतर शहर व राज्यांनाही दिशा देणारी आहे. आपल्या प्रकल्पांमधून वेळप्रसंगी इतरांनाही मदत करता येईल. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक कामगिरीची देशपातळीवर वाखाणणी केली जाते, असे सांगून मुंबईकरांनी कोविड प्रतिबंधक निर्देशांचे पालन करावे आणि प्राणवायू पुरवठ्याची चिंता करु नये, असेही महापौरांनी नमूद केले.

खासदार अरविंद सावंत मार्गदर्शन करताना म्हणाले की, या दोन्ही प्रकल्पांतून वैद्यकीय प्राणवायू उपलब्ध होणार असल्याने कोविड इतर (नॉन कोविड) प्राणवायूची बचत होईल आणि आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी होईल. महापौर व महानगरपालिका आयुक्तांची टीम ही सर्वोत्कृष्ट कार्य करीत आहे. प्रत्येक निर्णय घेताना दूरदृष्टीने कामकाज केले जात असून मुख्यमंत्री महोदय व पालकमंत्री महोदय देखील त्यावर लक्ष केंद्रीत करत असतात, असा उल्लेखही श्री. सावंत यांनी केला.

खासदार राहूल शेवाळे मनोगतात म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई महानगरपालिका अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देते. कोविड व्यवस्थापनामध्ये धारावी मॉडेल पाठोपाठ ऑक्सिजन मॉडेलच्या माध्यमातून संपूर्ण देशाला मार्गदर्शन करण्याचे कामकाज महानगरपालिकेने केले आहे. ही कामगिरी कौतुकास्पद आहे. माझ्या मतदारसंघातील बीपीसीएल, आरसीएफ, एचपीसीएल, इंडियन ऑईल अशा सर्वच कंपन्यांनी कोविड व्यवस्थापन व प्राणवायू पुरवठ्यासाठी मोठी मदत केली आहे, असा कृतज्ञतापूर्वक उल्लेखही श्री. शेवाळे यांनी केला.

महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल याप्रसंगी म्हणाले की, कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेप्रसंगी, महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये आपण ‘वातावरणातील हवा शोषून त्यातून प्राणवायू निर्मिती’ करणारे प्रकल्प (पीएसए प्लांट) उभारले. मुंबईत सध्या १८६ कोविड रुग्णालये असून आपत्कालीन प्रसंगी एका रुग्णालयातून इतर रुग्णालयांना प्राणवायू मदत पाठविण्यासाठी विविध मर्यादा येतात. माहूल व महालक्ष्मी येथील प्राणवायू प्रकल्पांमध्ये साठवण व पुनर्भरण अशा दोन्ही सुविधा आहेत. त्यामुळे मुंबईतील १८६ रुग्णालयांमध्ये कधीही, कोठेही प्राणवायू पोहोचविण्यास मोठा हातभार लागणार आहे. कोविडची साथ शिखरावर असताना दिवसाला २०० ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर्सची गरज भासत होती. आता एकट्या महालक्ष्मी प्रकल्पामधूनच १०० ते १२० ड्युरा सिलेंडर भरणे शक्य होणार आहे, यातून महानगरपालिकेने साध्य केलेली क्षमता सिद्ध होते, असे डॉ. चहल यांनी नमूद केले.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी संगणकीय सादरीकरणासह प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, कोविडच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायू पुरवठा समस्येवर योग्य नियोजनाने आपण मात केली. असे असले तरी त्यातून बोध घेत ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांट उभारले आहेत. त्यामुळे वैद्यकीय प्राणवायूचा साठा करण्यासह ऑक्सिजन सिलेंडर्सचे योग्य वितरण करणे शक्य होणार आहे. महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी दिवसरात्र धावपळ करुन आवश्यक सर्व परवानग्या मिळवल्या, अवघ्या ३ ते ४ महिने कालावधीत प्रकल्प उभारले, माहूलमधील कामांसाठी बीपीसीएलचे देखील अतिशय मोलाचे सहकार्य मिळाले, याचा उल्लेख करीत महापौर, सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या योग्य समन्वयातून हे घडून आले, असेही श्री. वेलरासू यांनी नमूद केले.

बीपीसीएलचे मुख्य व्यवस्थापक (प्रचालने) श्री. एन. चंद्रशेखर यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले. श्रीमती स्मिता गवाणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

000

अ) माहूल स्थित वायूरुप वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्पाविषयीः बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने माहूल रस्त्यावर स्थित महानगरपालिका मैदानावर वायूरुप वैद्यकीय प्राणवायू जंबो सिलेंडर पुनर्भरण (Medical Grade Oxygen Cylinder Bottling Facility) प्रकल्प उभारला आहे. सुमारे ८५० चौरस मीटर क्षेत्रफळ जागेवर हा प्रकल्प साकारला आहे. येथे एकूण ३ तीन कॉम्प्रेसर लावण्यात आले आहेत. यामध्ये महानगरपालिकेने २ कॉम्प्रेसर, १ बफर व्हेसल, ४ मॅनिफोल्ड स्कीड इत्यादी यंत्रणा खरेदी केली आहे. बीपीसीएल मुंबई रिफायनरीने या प्रकल्पासाठी हातभार म्हणून सार्वजनिक उत्तरदायित्व स्वरुपात संयंत्रे उपलब्ध करुन दिली आहेत. यामध्ये १ कॉम्प्रेसर, १ बफर व्हेसल, ४ मॅनिफोल्ड स्कीड इत्यादी संयंत्रांचा समावेश आहे. त्यासोबत, बीपीसीएल मुंबई रिफायनरीच्या वैद्यकीय प्राणवायू उत्पादन प्रकल्पापासून महानगरपालिकेच्या जंबो सिलेंडर पुनर्भरण प्रकल्पापर्यंत दीड किलोमीटर लांबीची प्राणवायू वाहिनीदेखील बीपीसीएलने टाकली आहे.

बीपीसीएल मुंबई रिफायनरीच्या माहूलमधील वैद्यकीय प्राणवायू उत्पादन प्रकल्पामध्ये प्रतिदिन सुमारे ७२ मेट्रिक टन वैद्यकीय प्राणवायूची निर्मिती होते. पैकी प्रतिदिन सुमारे १० ते १५ मेट्रिक टन इतका वायूरुप वैद्यकीय प्राणवायू महानगरपालिकेच्या माहूलमधील सिलेंडर पुनर्भरण प्रकल्पासाठी उपलब्ध होणार आहे. या पुनर्भरण प्रकल्पामध्ये ७.१ घनमीटर क्षमतेचे सुमारे ११२ सिलेंडर एका तासात भरता येतात. या हिशेबाने ८ तासांच्या एका सत्रामध्ये सुमारे ८०० जंबो सिलेंडर भरता येऊ शकतात. २४ तासांच्या तीन सत्रात मिळून, १५ मेट्रिक टन प्राणवायू उपलब्ध झाल्यास त्यातून किमान १ हजार ५०० जंबो सिलेंडर भरले जावू शकतात. प्राणवायूच्या गुणवत्तेची पडताळणी करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळेची तरतूद देखील करण्यात आली आहे. पुनर्भरण केलेले सिलेंडर्स रुग्णालयांपर्यंत वाहून नेण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने स्वतःची वाहतूक व्यवस्था देखील उभी केली आहे.

ब) महालक्ष्मी रेसकोर्स स्थित द्रवरुप वैद्यकीय प्राणवायू ड्युरा सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्पाविषयी : महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथे द्रवरुप वैद्यकीय प्राणवायू ड्युरा सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. याठिकाणी सुमारे १३ हजार लीटर द्रवरुप वैद्यकीय प्राणवायू साठवता येईल, इतकी मोठी टाकी आहे. या प्रकल्पामध्ये एकाचवेळी प्रत्येकी २१० लीटर क्षमतेचे १० सिलेंडर्स भरता येवू शकतात. या प्रकल्पाची दररोज १०० ते १२० सिलेंडर भरण्याची क्षमता आहे. त्याच्या प्रचालनासाठी प्रशिक्षित व अनुभवी कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे. तसेच, सिलेंडर्स वाहतुकीसाठी २ विशेष परावर्तित वाहनेदेखील नेमण्यात आली आहेत. वापरात असलेल्या वाहनांमध्येच आवश्यक ते बदल करुन ती उपलब्ध करण्यात आल्याने, नवीन वाहने खरेदीचा खर्च वाचला आहे, हेही महत्त्वाचे आहे. एकूणच, या प्रकल्पाच्या उभारणीमुळे ड्युरा सिलेंडर पुनर्भरणाचा खर्च सुमारे ३५ ते ४० टक्के कमी झाला असून यातून महानगरपालिकेची जवळपास दीड ते दोन कोटी रुपयांची बचत होणे अपेक्षित आहे.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील उपक्रमात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

0

मुंबई, दि. 17 : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यनिमित्ताने राज्यभर विविध उपक्रम आयोजित केले आहेत. यात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे. मंत्रालयात मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालयाद्वारे आयोजित युवा कवींच्या संमेलनाचे श्री.देसाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सहसचिव मिलींद गवादे, भाषा संचालक श्रीमती विजया डोणीकर उपस्थित होते. नवोदित कवी संमेलनात सहभागी युवा कवींनी आपल्या कविता यावेळी सादर केल्या.

नव्या जाणीवांच्या कविता सादर करणारे हे कवी राज्यातील विविध भागातून निमंत्रीत केले गेले होते. यात प्रशांत केंदळे, पवन नालट, वृषाली विनायक, विशाखा विश्वनाथ, अविनाश उषा वसंत, कमलेश महाले, प्रदीप कोकरे, अक्षय शिंपी आदिंनी आपल्या कविता सादर केल्या. या कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान युवा कवी महेश दत्तात्रय लोंढे यांनी भूषविले.

निसर्गाशी नातं सांगणाऱ्या कविता, कोरोनाच्या परिस्थितीतील कविता, मातृत्व आणि नात्याच्या कविता अशा विविध विषयावरील कवितांनी रसिकांची मने जिंकून घेतली. मराठी भाषेला नवे शब्द देऊन त्यास समृद्ध करण्याची जबाबदारी युवा साहित्यिकांवर असल्याचे कवी संमेलनाचे अध्यक्ष श्री.लोंढे यांनी सांगितले.

झब्बा आणि कुर्ता ही कवींची प्रतिमा आता बदलत असून जीन्स आणि टी-शर्ट या आधुनिक पेहरावातील कवी मराठी भाषेच्या संवर्धनात मोलाचा वाटा उचलत आहेत. युवा साहित्यिकांच्या रुपाने एक आशादायी चित्र या संमेलनातून दिसले आहे, अशा शब्दात भाषा संचालक श्रीमती डोणीकर यांनी उपस्थित कवींचे आभार मानत त्यांना प्रोत्साहित केले.

यंदा राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू होणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

0

मुंबई, दि. 12 : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर गतवर्षी रद्द करावी लागलेली, हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धा यावर्षी डिसेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केली. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध केंद्रांबरोबरच राज्याबाहेरील संघांसाठी एक व देशाबाहेरील संघांसाठी एक अशी दोन नवीन ऑनलाईन केंद्रे सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

राज्याच्या हीरक महोत्सवी व देशाच्या अमृत महोत्सवी तसेच स्पर्धेच्या हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून  स्पर्धेची व्याप्ती अधिक वाढविण्यात येत आहे. त्यामुळे राज्याबाहेरील व देशाबाहेरील मराठी रंगकर्मींना या स्पर्धेचा लाभ घेता येईल यामुळे मराठी रंगभूमी अधिक समृद्ध होईल,असा विश्वास  श्री.देशमुख यांनी व्यक्त केला.

सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख म्हणाले, की दरवर्षी या स्पर्धांमधून जवळजवळ एक हजार संघ सहभागी होतात. या सर्व संघांच्या माध्यमातून जवळपास 20 हजार कलाकार वीस लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. अनेक रंगकर्मी, संस्था, संघटना यांनी या स्पर्धा लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणी केली होती. त्या मागणीस अनुसरून, कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या डिसेंबरपासून संपूर्ण राज्यात नेमून दिलेल्या केंद्रांवर ही स्पर्धा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मराठी हौशी नाट्य स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, संगीत नाट्य स्पर्धा, संस्कृत नाट्य स्पर्धा, हिंदी नाट्य स्पर्धा, दिव्यांग नाट्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील रंगकर्मींनी या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घेऊन कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करून, प्रयोग सादर करावेत असेही सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आवाहन केले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही लवकरच घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.