Home Blog Page 2119

दुबईच्या वर्ल्ड एक्स्पो, 2020 मधील सूक्ष्म-मध्यम-लघु उद्योग मंडपाचे उद्घाटन, ‘खादी इंडिया’ चित्रपट प्रदर्शित

0

नवी दिल्ली – एमएसएमई म्हणजे सूक्ष्म-मध्यम-लघु उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्यमंत्री भानुप्रताप सिंग वर्मा, तसेच मंत्रालयाचे सचिव बी बी स्वैन आणि खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज दुबईच्या वर्ल्ड एक्स्पो, 2020 मधील एमएसएमई मंडपाचे उद्घाटन झाले. यावेळी दुबईचे वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मानवी प्रतिभेची झेप आणि मानवाला निरनिराळ्या बाबतीत मिळालेले यश साजरे करण्यासाठी जगातील लक्षावधी लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ‘वर्ल्ड एक्स्पो, 2020 दुबई’ हा मेळावा भरवण्यात आला आहे. मनामनांना जोडून उज्ज्वल भवितव्याची निर्मिती करण्याच्या उद्देशाने, ‘कनेक्टिंग माइंड्स, क्रिएटिंग फ्युचर्स’ अशी या मेळाव्याची मध्यवर्ती संकल्पना आखण्यात आली आहे. भारतातील एमएसएमई उद्योगांसाठीची व्यवस्था आणि वातावरण मांडून विविध देशांच्या सरकारांशी तसेच उद्योग व व्यापार जगतातील नेतृत्वाशी संवाद साधता यावा, या क्षेत्रात जगभर अंमलात असलेल्या चांगल्या कार्यपद्धती आणि संकल्पनांची देवाणघेवाण करता यावी, या उद्देशाने एमएसएमई मंत्रालयाने सदर मेळाव्यात भाग घेऊन मंडप उभारला आहे.

केव्हीआयसी म्हणजे खादी ग्रामोद्योग आयोग निर्मित ‘खादी इंडिया’ या चित्रपट यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. उद्घाटनपर भाषणात राणे यांनी, रोजगारनिर्मिती आणि उत्पादन क्षेत्राच्या विस्तारासाठी एमएसएमई क्षेत्राकडून मिळत असलेल्या भरीव योगदानाचे कौतुक केले. आज या क्षेत्रातील 6 कोटींपेक्षा अधिक उत्पादन एककांमध्ये 11 कोटींपेक्षा अधिक व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. आर्थिक विकासात या क्षेत्राचे योगदान मोठे आहे. जीडीपी म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात या क्षेत्राचे 30% हून अधिक योगदान आहे. तर भारतातून होणाऱ्या एकूण निर्यातीत 48% वाटा या क्षेत्राचा आहे. देशातील एमएसएमई उद्योगांना आवश्यक असणाऱ्या – निर्यात, उत्पादनाची गुणवत्ता, जीडीपीमधील योगदान आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा तसेच अद्ययावत तंत्रज्ञान याबाबतच्या सुविधा पुरवून देशभरातील एमएसएमई उद्योगांसाठी नवे मापदंड तयार करण्याचा मंत्रालयाचा उद्देश आहे.

एमएसएमई क्षेत्राला अधिक गती देण्यासाठी मंत्रालयाकडून अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले जात आहेत, असे राज्यमंत्री भानुप्रताप वर्मा यांनी सांगितले. पतसुविधा, क्षमताबांधणी, कौशल्य प्रशिक्षण, बाजारपेठेशी जोडून देणाऱ्या दुव्यांची सुविधा व संपर्क, तंत्रज्ञानात नवे बदल आदी विषयांमध्ये वेगाने काम करून या उद्योगांच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाच्या स्मार्ट सिटी मिशन चा ‘ओपन डेटा वीक’ उपक्रम

0
  • उपक्रमात सर्व 100 स्मार्ट शहरे होणार सहभागी; उच्च दर्जाचे डेटासेट्स आणि डेटा ब्लॉग्स स्मार्ट सिटीज ओपन डेटा पोर्टलवर प्रसिद्ध केले जाणार

नवी दिल्ली :- देशभरातील नागरी व्यवस्थेत, ओपन डेटाचा वापर वाढावा आणि अभिनव प्रयोगांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने, केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालय ‘ओपन डेटा सप्ताह’ साजरा करत आहे, अशी घोषणा मंत्रालयाने आज केली.

गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने फेब्रुवारी, 2022 मध्ये सूरत इथे, ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव- स्मार्ट शहरे : स्मार्ट शहरीकरण’ या विषयवार एक परिषद आयोजित केली आहे. या परिषदेच्या आधी, आयोजित केला जात असलेला हा ओपन डेटा सप्ताह, परिषदेच्या आधीच्या विविध उपक्रमांचा भाग म्हणून साजरा केला जात आहे. 17 जानेवारी ते 21 जानेवारी या आठवड्यात साजऱ्या होणाऱ्या या सप्ताहात, ओपन डेटाच्या अधिकाधिक वापराला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवले जातील. 

उपक्रमात, देशातील सर्व, 100 स्मार्ट शहरे सहभागी होणार असून, उच्च दर्जाचे डेटासेट्स आणि डेटा ब्लॉग्स, स्मार्ट सिटीज ओपन डेटा पोर्टलवर प्रसिद्ध केले जाणार आहेत. सध्या या पोर्टलवर, 3800 पेक्षा अधिक डेटा सेट्स आणि 60 पेक्षा अधिक डेटा स्टोरीज उपलब्ध आहेत. विविध हितसंबंधियांनी उपलोड केलेला हा डेटा सर्वांसाठी मुक्त स्वरुपात उपलब्ध असून, कोणीही त्याचे विश्लेषण आणि त्यावर आधारित कृतीचा सल्ला देऊ शकेल.

त्याशिवाय, या उपक्रमात, ओपन डेटाच्या वापराचे लाभ, जसे की कार्यक्षमतेत वाढ, पारदर्शकतेत वाढ, नवोन्मेष आणि आर्थिक वृद्धी या सगळ्यांची माहिती दिली जाणार आहे.

देशभरातल्या सर्व स्मार्ट शहरात डेटा डे निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यात चर्चासत्रे, परिषदा, हकेथॉन, प्रदर्शनी आणि प्रशिक्षण असे कार्यक्रम घेतले जातील.

विविध पार्श्वभूमीतले लोक या कार्यक्रमात सहभागी होतील. यात सरकारी संस्था, खाजगी उद्योग कंपन्या, वैज्ञानिक आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योगक्षेत्र,स्टार्ट अप्स अशा क्षेत्रांचे प्रतिनिधी आणि मान्यवर नागरिकांचा समावेश असेल.

या उपक्रमाचा हेतू, ओपन डेटा- म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रात एखाद्या विषयांवरील माहिती/आकडेवारीची जास्तीत जास्त उपलब्धता, याला प्रोत्साहन देणे हा आहे. उत्तम दर्जाच्या माहिती/आकडेवारीचा लाभ अनेक समूह आणि संस्थांना मिळू शकतो. नव्या प्रकारे संकलित करण्यात आलेला डेटा, नवे ज्ञान आणि दृष्टी देणारा ठरू शकतो, ज्यातून एखाद्या समस्येवरील समाधानची अंमलबजावणी संपूर्ण वेगळ्या पद्धतीने होऊ शकेल. यातून सरकारांनाही, नागरिकांना भेडसावणाऱ्या सर्वसामान्य समस्यांवर तोडगा काढण्यात मदत मिळू शकेल.

सर्व 100 स्मार्ट शहरांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जय्यत तयारी केली असून, भारतातील शहरांना डेटा स्मार्ट शहरे बनवण्यासाठीचा हा एकत्रित प्रयत्न असेल. हे पोर्टल https://smartcities.data.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वैद्यकीय प्राणवायू प्रकल्पातून ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ची पुन्हा प्रचिती

0
  • वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्प उभारणारी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका
  • माहूल येथे प्रतिदिन १५ मेट्रिक टन प्राणवायू वापरुन १५०० जंबो सिलेंडर्स भरणे शक्य, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या सहकार्याने प्रकल्प उभारणी
  • महालक्ष्मी प्रकल्पामध्ये प्रतिदिन १०० ते १२० ड्युरा सिलेंडर्स भरण्याची क्षमता
  • स्वतःच्या प्रकल्पांमुळे सिलेंडर पुनर्भरणाच्या खर्चात होणार ४० टक्के बचत,वाहतुकीचा वेळही वाचणार

मुंबई, दि. 17 : कोविड विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना प्राणवायू पुरवठा करताना झालेली दमछाक पाहून बृहन्मुंबई महानगरपालिकेने थेट स्वतःचेच वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारले. प्रत्येक संकटाला खंबीरपणे सामोरे जाण्याची मानसिकता असणाऱ्या ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ ची यातून पुन्हा प्रचिती आली आहे, असे गौरवोद्गार राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी काढले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या सहकार्याने, एम पश्चिम विभागातील माहूल रस्त्यावर स्थित महानगरपालिका मैदानावर वैद्यकीय वायुरुप प्राणवायू जंबो सिलिंडर पुनर्भरण प्रकल्प (मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांट) उभारण्यात आला आहे. तसेच महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथेही वैद्यकीय द्रवरुप प्राणवायू ड्युरा सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पांचे लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (दिनांक १७ जानेवारी २०२२) झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

कोविडसंसर्ग स्थितीमुळे ऑनलाईन स्वरुपात आयोजित या समारंभास मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, खासदार राहूल शेवाळे, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, बीपीसीएलचे मुख्य व्यवस्थापक (प्रचालने) एन. चंद्रशेखर, जी दक्षिण विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता नरवणकर, एम पश्चिम विभागातील नगरसेवक   श्रीकांत शेटये, नगरसेवक अनिल पाटणकर, नगरसेविका श्रीमती अंजली नाईक, तसेच महानगरपालिका उपआयुक्त (मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण) श्री. रमाकांत बिरादार, उप आयुक्त (परिमंडळ ५) विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त सर्वश्री. विश्वास मोटे, शरद उघडे, पृथ्वीराज चौहाण, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) श्री. कृष्णा पेरेकर, संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पालकमंत्री आदित्य ठाकरे याप्रसंगी संबोधित करताना म्हणाले की, कोविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेत इतर शहरे आणि राज्यातूनही वैद्यकीय प्राणवायू आणून मुंबई महानगरपालिकेने रुग्णांचे प्राण वाचवले. एका रात्री तर युद्धसदृश्य परिस्थिती हाताळून दीडशेपेक्षा अधिक रुग्णांना सुरक्षितपणे हलवावे लागले, इतकी प्राणवायूची कमतरता आपण अनुभवली. अशी स्थिती पुन्हा ओढवू नये म्हणून महानगरपालिकेने तेव्हाच स्वतःचे वैद्यकीय प्राणवायू साठवण व सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला. आज या प्रकल्पांच्या लोकार्पणातून महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून अशाप्रकारचे प्रकल्प असणारी देशातील पहिली महानगरपालिका म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेची नोंद झाली आहे. कोविड विषाणूचे डेल्टा व ओमायक्रॉन हे दोन्ही उपप्रकार अद्याप फैलावत असून सर्वांनी मास्कचा उपयोग, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर यासारख्या नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहनही श्री. ठाकरे यांनी अखेरीस केले. दोन्ही प्रकल्पांची वेगाने उभारणी केल्याबद्दल श्री. ठाकरे यांनी महापौर, सर्व लोकप्रतिनिधी, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन व बीपीसीएल यांचेही कौतुक केले.

मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर संबोधित करताना म्हणाल्या की, माहूल व महालक्ष्मी येथील ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांट हे जणू संजीवनी प्रकल्प आहेत. कोविडच्या दुसऱ्या लाटेत मुंबई व महाराष्ट्राबाहेर प्राणवायू पुरवठ्याअभावी रुग्णांना यातना सहन कराव्या लागल्या, मात्र त्याही स्थितीत मुंबईने योग्य दक्षता व नियोजन याआधारे रुग्णांचे प्राण वाचवले. आता ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांटमुळे पैसा आणि वेळही वाचणार आहे. ही सर्व कामगिरी इतर शहर व राज्यांनाही दिशा देणारी आहे. आपल्या प्रकल्पांमधून वेळप्रसंगी इतरांनाही मदत करता येईल. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक कामगिरीची देशपातळीवर वाखाणणी केली जाते, असे सांगून मुंबईकरांनी कोविड प्रतिबंधक निर्देशांचे पालन करावे आणि प्राणवायू पुरवठ्याची चिंता करु नये, असेही महापौरांनी नमूद केले.

खासदार अरविंद सावंत मार्गदर्शन करताना म्हणाले की, या दोन्ही प्रकल्पांतून वैद्यकीय प्राणवायू उपलब्ध होणार असल्याने कोविड इतर (नॉन कोविड) प्राणवायूची बचत होईल आणि आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी होईल. महापौर व महानगरपालिका आयुक्तांची टीम ही सर्वोत्कृष्ट कार्य करीत आहे. प्रत्येक निर्णय घेताना दूरदृष्टीने कामकाज केले जात असून मुख्यमंत्री महोदय व पालकमंत्री महोदय देखील त्यावर लक्ष केंद्रीत करत असतात, असा उल्लेखही श्री. सावंत यांनी केला.

खासदार राहूल शेवाळे मनोगतात म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई महानगरपालिका अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देते. कोविड व्यवस्थापनामध्ये धारावी मॉडेल पाठोपाठ ऑक्सिजन मॉडेलच्या माध्यमातून संपूर्ण देशाला मार्गदर्शन करण्याचे कामकाज महानगरपालिकेने केले आहे. ही कामगिरी कौतुकास्पद आहे. माझ्या मतदारसंघातील बीपीसीएल, आरसीएफ, एचपीसीएल, इंडियन ऑईल अशा सर्वच कंपन्यांनी कोविड व्यवस्थापन व प्राणवायू पुरवठ्यासाठी मोठी मदत केली आहे, असा कृतज्ञतापूर्वक उल्लेखही श्री. शेवाळे यांनी केला.

महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल याप्रसंगी म्हणाले की, कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेप्रसंगी, महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये आपण ‘वातावरणातील हवा शोषून त्यातून प्राणवायू निर्मिती’ करणारे प्रकल्प (पीएसए प्लांट) उभारले. मुंबईत सध्या १८६ कोविड रुग्णालये असून आपत्कालीन प्रसंगी एका रुग्णालयातून इतर रुग्णालयांना प्राणवायू मदत पाठविण्यासाठी विविध मर्यादा येतात. माहूल व महालक्ष्मी येथील प्राणवायू प्रकल्पांमध्ये साठवण व पुनर्भरण अशा दोन्ही सुविधा आहेत. त्यामुळे मुंबईतील १८६ रुग्णालयांमध्ये कधीही, कोठेही प्राणवायू पोहोचविण्यास मोठा हातभार लागणार आहे. कोविडची साथ शिखरावर असताना दिवसाला २०० ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर्सची गरज भासत होती. आता एकट्या महालक्ष्मी प्रकल्पामधूनच १०० ते १२० ड्युरा सिलेंडर भरणे शक्य होणार आहे, यातून महानगरपालिकेने साध्य केलेली क्षमता सिद्ध होते, असे डॉ. चहल यांनी नमूद केले.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी संगणकीय सादरीकरणासह प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, कोविडच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायू पुरवठा समस्येवर योग्य नियोजनाने आपण मात केली. असे असले तरी त्यातून बोध घेत ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांट उभारले आहेत. त्यामुळे वैद्यकीय प्राणवायूचा साठा करण्यासह ऑक्सिजन सिलेंडर्सचे योग्य वितरण करणे शक्य होणार आहे. महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी दिवसरात्र धावपळ करुन आवश्यक सर्व परवानग्या मिळवल्या, अवघ्या ३ ते ४ महिने कालावधीत प्रकल्प उभारले, माहूलमधील कामांसाठी बीपीसीएलचे देखील अतिशय मोलाचे सहकार्य मिळाले, याचा उल्लेख करीत महापौर, सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या योग्य समन्वयातून हे घडून आले, असेही श्री. वेलरासू यांनी नमूद केले.

बीपीसीएलचे मुख्य व्यवस्थापक (प्रचालने) श्री. एन. चंद्रशेखर यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले. श्रीमती स्मिता गवाणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

अवैधरित्या अन्नधान्य साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

0

मुंबई, दि.17 : अवैधरित्या अन्नधान्य साठवणूक करणारे गोदामचालक ओमप्रकाश यादव व टेम्पो चालक मोहिद्दीन शेख यांच्याविरूद्ध नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कान्हुराज बगाटे यांच्या मार्गदर्शनाखालील भरारी पथकाने कारवाई केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात अन्नधान्याचे वितरण सुरळीत होणे तसेच अन्नधान्य पुरवठा व वितरणामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याकरिता नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांचे मार्गदर्शनाखाली भरारी पथक गठित करण्यात आलेले आहे. या भरारी पथकामार्फत जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अतंर्गत 14 जानेवारी 2022 रोजी अवैधरित्या अन्नधान्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पो क्र. एम.एच.01-डीआर.1780 चा चालक मोहिद्दिन बाबू शेख याचे विरुद्ध तुर्भे पोलीस ठाणे येथे जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अतंर्गत गुन्हा (नोंद क्रमांक 11/2022) दाखल करण्यात आलेला आहे. या कारवाईमध्ये 7,830 किलो गहू व टेम्पो असा एकुण  रुपये 13,66,430/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टेम्पोचालक मोहिद्दिन बाबू शेख याने दिलेल्या माहितीनुसार भरारी पथकाने जगताप कंपाऊड, सावित्रीबाई फुले शाळेच्या बाजूला असलेल्या कंपाऊडच्या आत पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृतपणे अन्नधान्याचा अवैध साठा आढळून आल्याने या ठिकाणी छापा टाकून एकूण 42 हजार 506 किलो गहू व 8 हजार 085 किलो तांदुळ असा एकूण रुपये 16 लाख 19 हजार 800/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गोदाम चालक ओमप्रकाश यादव याचेवर नेहरु नगर, पोलीस ठाणे, कुर्ला येथे जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अतंर्गत गुन्हा (नोंद क्रमांक 2/2022) दि. 15 जानवारी 2022 रोजी दाखल करण्यात आलेला आहे.

या कारवाईमध्ये भरारी पथकातील शिधावाटप निरीक्षक सर्वश्री भगवान खंडेराव, सुशिल साळसकर, संदिप चौधरी, अमोल बुरटे, तसेच स्थानिक शिधावाटप कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी विलास उदुगडे, विजय राठोड, नागनाथ हंगरगे, गजानन फाले, राजेश सोरटे, मंगेश राणे, संदिप साबळे, बाळासाहेब कारंडे तसेच तुर्भे पोलीस ठाणे व नेहरु नगर पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी होते, अशी माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रजासत्ताक दिन सोहळ्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नाही – सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे स्पष्टीकरण

0

मुंबई, दि. 17 : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नसल्याचे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होत असलेल्या संचलनात महाराष्ट्र राज्याने सादर केलेल्या विविध विषयांमधून या वर्षी ‘महाराष्ट्राची जैवविविधता व मानके‘ या विषयाची केंद्र शासनाकडून निवड करण्यात आली आहे. याबाबत वेळोवेळी संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार बैठका आयोजित होऊन महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची एकूण 12 राज्यांसमवेत निवड अंतिम करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत राष्ट्रीय रंगशाळा, नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयाच्या देखरेखीखाली चित्ररथाची बांधणी सुरु असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्याबाबत कोणतीही सूचना संरक्षण मंत्रालयाकडून प्राप्त झालेली नाही. असे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

0

पुणे दि. १७: इतर मागास वर्ग या प्रवर्गातील मुलांसाठी आणि मुलींसाठी १०० प्रवेश क्षमतेची प्रत्येकी एक अशी दोन शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत. पुणे शहरात सुरु करावयाच्या या वसतिगृहांसाठी सर्व सोईसुविधायुक्त खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त श्रीमती संगिता डावखर यांनी केले आहे.

2022-23 या शैक्षणिक वर्षापासून ही दोन वसतिगृहे भाड्याच्या इमारतीत सुरू करण्यात येणार आहेत. या इमारतींमध्ये प्रवेश क्षमतेनुसार खोल्या असणे आवश्यक असून वीज, पाणी, शौचालय, स्नानगृह आदी सर्व प्राथमिक सुविधा आवश्यक आहेत.

ही वसतिगृहे सुरू होण्याच्या दृष्टीने इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या वसतिगृहाच्या परिसरातील इच्छुक इमारत मालकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन स.नं.105/104, विश्रांतवाडी रोड, येरवडा स्टेशनसमोर, येरवडा, पुणे (दूरध्वनी 020-29706611) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचा आवाज हरपला-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. १७ – “शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे. महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, “एन. डी. पाटील हे राज्याच्या पुरोगामी विचारांचे व्यासपीठ होते. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची मशाल त्यांनी शेवटपर्यंत पेटत ठेवली. लढणे आणि संघर्ष करणे हेच त्यांचे जीवन होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ते एक बिनीचे शिलेदार होतेच, पण त्यानंतरच्या बेळगावसह सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात एन. डी. आघाडीवर होते. सीमा भागात जाऊन त्यांनी लढे दिले व पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा चांगलाच स्नेह होता. महाराष्ट्राच्या विरोधात कोणी ‘ब्र’ काढलाच तर शिवसेनाप्रमुखांच्या बरोबरीने ‘एन. डी.’ उभे राहिलेच म्हणून समजा.

“अखंड महाराष्ट्रात बेळगावसह सीमा भाग यावा हा त्यांचा ध्यास होता. एखाद्या वादळासारखे ते शेतकरी, कष्टकऱ्यांच्या लढ्यात उतरत. महाराष्ट्रासाठी त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी होते. एन. डी. पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याचे अतोनात नुकसान झाले असून मी त्यांना महाराष्ट्र राज्यातर्फे आणि शिवसेनेतर्फे अभिवादन करतो,” अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.

पंडितजींच्या निधनानं देशानं महान कलावंत, महाराष्ट्रानं सांस्कृतिक राजदूत गमावला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

0
  • पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांना
    उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 17 :- “प्रसिद्ध कथ्थक नृत्यकलावंत, पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज हे भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्यक्षेत्रातलं स्वतंत्र विद्यापीठ होते. तरुण कलावंतांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडविल्या, त्यांच्यासाठी मार्गदर्शक, दीपस्तंभाचं काम केलं. कथ्थक नृत्यकलेला देशात, सातासमुद्रापार लोकप्रियता मिळवून दिली. कोट्यवधी रसिकांना मनमुराद आनंद दिला. पश्चिम बंगालमध्ये जन्मलेल्या पंडित बिरजू महाराजांना आदर, मान-सन्मान, लोकप्रियता मिळवून देण्याचं काम महाराष्ट्रानं सातत्यानं केलं. महाराष्ट्राबद्दल कृतज्ञता बाळगणारे, पश्चिम बंगालला आई, महाराष्ट्राला वडील मानणारे ते कलावंत होते. पंडितजींच्या निधनानं देशानं महान कलावंत, महाराष्ट्रानं सांस्कृतिक राजदूत गमावला आहे. पंडितजींच्या कुटुंबियांच्या, त्यांच्या कोट्यवधी रसिकांच्या दु:खात मी देखील सहभागी आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

शरद पवारांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोची चाचणी म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या- चंद्रकांत पाटील यांची घणाघाती टीका

0

मुंबई – पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मेट्रोची चाचणी घेऊन जणू काही त्यांच्यामुळे पुणे मेट्रोचा प्रकल्प झाल्याचे प्रशासनाने भासविणे म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असा प्रकार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील लोकप्रतिनिधींना डावलून केवळ राज्यसभा सदस्य असलेल्या एका नेत्याच्या उपस्थितीत चाचणी घेतल्याबद्दल मेट्रोच्या प्रशासनाविरोधात आपण विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार आहे, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिला.
ते मुंबईत भाजपा प्रदेश मुख्यालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह आणि प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते. पाटील म्हणाले की, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यात पंधरा वर्षे आणि देशात दहा वर्षे सरकार असताना हा प्रकल्प रखडला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाच्या सर्व परवानग्या मिळवून काम सुरू करण्यात आले. पुणे मेट्रो हा अकरा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे व त्यामध्ये थेट सहभाग आणि कर्जाला हमी असा केंद्र सरकारचा आठ हजार कोटी रुपयांचा वाटा आहे. राज्य शासन आणि पुणे महानगरपालिकेचा मिळून तीन हजार कोटींचा हिस्सा आहे. पुणे मेट्रोच्या एका टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे ठरले होते पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. अशा स्थितीत शरद पवारांच्या उपस्थितीत आज मेट्रोची चाचणी करणे व त्यांच्यामुळे प्रकल्प झाल्याचे भासविणे हा आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार आहे.
ते म्हणाले की, मेट्रोची चाचणी करायची होती तर त्यासाठी केवळ शरद पवार यांना का निमंत्रित केले असा आपला मेट्रो प्रशासनाला सवाल आहे. पुण्यात आठ विधानसभा सदस्य आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये तीन विधानसभा सदस्य आहेत. पुण्याचे खासदार गिरीश बापट आहेत. माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर हे पुण्याचे निवासी आहेत. मेट्रो प्रशासनाला उद्घाटनपर धाव घ्यायची होती तर त्यांनी या सर्व लोकप्रतिनिधींना तसेच पुण्याच्या महापौरांना सन्मानाने सहभागी करायला होते. त्यांनी केवळ एका नेत्याला श्रेय देण्याचा का प्रयत्न केला, असा आपला सवाल आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत गोवा विधानसभेच्या विषयावरून बरीच वक्तव्ये करतात. दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला उमेदवारी देण्यावरूनही ते टीका टिप्पणी करत आहेत. उत्पल पर्रिकर यांना भाजपाने उमेदवारी दिली तर त्यांना बिनविरोध विजयी करण्याची हमी शिवसेना आणि इतर पक्ष देणार का, असा सवाल त्यांनी केला.
अमरावतीमध्ये महापालिका आयुक्तांनी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आदी लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेताच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलविला. आयुक्तांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होण्याची सूचना आपण भाजपाच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना केली आहे, असे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारच्या प्रशासनाने पोलीस बंदोबस्त लाऊन अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलविला. पण रझा अकादमीने मोर्चा काढला त्यावेळी त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त लावला नाही. अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्याचे शिवसेनेचे काँग्रेस राष्ट्रवादीप्रमाणे धोरण आहे का, असाही सवाल त्यांनी केला.

आमदार नितेश राणेंना धक्का, उच्च न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन

0

मुंबई– शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे. हा नितेश राणेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

कणकवली येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. यानंतर नितेश राणेंनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र उच्च न्यायालायाकडूनही नितेश राणेंना दिलासा मिळालेला नाही. दरम्यान कोर्टाने मनीष दळवीला अटकपूर्व जामीन मात्र मंजूर केला आहे. दरम्यान नितेश राणे साक्षीदारांवर दबाव आणू नये, पासपोर्ट जमा करावा, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

काय आहे प्रकरण?
शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्याशी नितेश राणे यांचा संबंध असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कणकवली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू करण्यात आला होता.

आंतरजातीय विवाह केल्याने सांगलीमध्ये 13 जोडप्यांना बहिष्कृत केले

0

सांगली जिल्ह्यातील एका ‘जात पंचायत’ने 13 जोडप्यांना आंतरजातीय विवाह केल्यामुळे समाजातून बहिष्कृत केले. या प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली आणि रविवारी पोलिसांनी ‘जात पंचायत’शी संबंधित 6 सदस्यांवर गुन्हा दाखल केला. सांगलीच्या पलूसमध्ये 9 जानेवारीला झालेल्या पंचायतीत नंदीवाले समाजाच्या जातपंचायतीने हा आदेश दिल्याचे सांगली पोलिसांनी सांगितले. नंदीवाले समाज ही भटकी जमात आहे.

13 जोडप्यांपैकी एका जोडप्याने म्हणजेच प्रकाश भोसले (42) यांनी पंचायतीच्या या तालिबानी फर्मानाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 2007 मध्ये त्याने आंतरजातीय विवाह केल्याचे प्रकाशचे म्हणणे आहे, त्यामुळे त्यांची आता हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आघात झाला आहे.

पहिले आंतरजातीय विवाहांना मंजूरी देणारा होता समुदाय
भोसले म्हणाले की, आमच्या समाजात माझ्यासारखे आणखी अनेक पीडित आहेत ज्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सातारा जिल्ह्यातील कराड येथे समाजातील काही मंडळींची सभा झाली. या वेळी असे ठरले की जातीबाहेर लग्न करणाऱ्या लोकांना पुन्हा समाजाचा भाग बनण्याची परवानगी द्यावी. त्या बैठकीला मी उपस्थित होतो. मात्र काही सदस्यांनी यावर आक्षेप घेत नऊ जानेवारी रोजी पलूस येथे स्वतंत्र सभा घेतली होती.

समाजात परत न येण्याचे फर्मान होते
या सभेत या लोकांना समाजात परत येऊ देता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. प्रकाश पुढे म्हणाले की, त्यानंतर ते पुण्याच्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’मध्ये गेले. त्यांच्या मदतीने जातपंचायतीच्या सहा सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करणारे निरीक्षक जाधव यांनी सांगितले की, भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ पीपल फ्रॉम सोशल बॉयकॉट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विज क्षेत्रामध्ये होणाऱ्या नवीन बदलांस सामोरे जाण्यासाठी कर्मचारी वर्गास आधुनिक प्रशिक्षण देण्याचे ऊर्जामंत्री यांचे निर्देश

0

मुंबई : विज क्षेत्रामध्ये येणा-या नवीन बदलांस तसेच आव्हानांना सामोरे जाण्याकरीता तिन्ही वीज कंपन्यांतील मनुष्यबळाला अद्ययावत व प्रशिक्षित करण्यासाठी  अत्याधुनिक प्रशिक्षण,  संशोधन व विकास केंद्र निर्माण करण्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी मानव संसाधन विभागाला आदेश दिले आहेत.
 राज्याची उप राजधानी नागपूर येथे एक अद्ययावत आणि सुसज्ज असे प्रशिक्षण तथा संशोधन व विकास केंद्र निर्माण करावे असे निर्देश त्यांनी नुकतेच झालेल्या मानव संसाधन विभागाच्या आढावा बैठकीमध्ये दिले. यात महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांचे संचालक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ऊर्जा विभागांतर्गत एकूण ८५,००० अभियंते, अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या गुणात्मक विकासाकरीता अद्ययावत तसेच सर्व सोईनी सुसज्ज असे प्रशिक्षण तथा संशोधन व विकास केंद्र निर्माण करून त्यांच्या सेवाकाळात नव नवीन तंत्रज्ञान याचे प्रशिक्षण देऊन  राज्याच्या व त्या अनुषंगाने देशाच्या विकासात हातभार लागेल असे मनोगत त्यांनी व्यक्त केले आहे.
ऊर्जा क्षेत्रामध्ये वेगाने होणा-या घडामोडी पाहता त्यातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांच्यातील कौशल्य विकासाची गरज ओळखून त्यांच्या प्रशिक्षणाची व्याप्ती आणि दर्जावर भर देऊन त्यामध्ये भरीव वाढ करण्याचे निर्देश दिले.
ऊर्जा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांचा सर्वांगीण (360 (degree) विकास होण्याकरीता त्यांस अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वित्त व लेखा विषयात पारंगतता आणणे व पर्यायाने त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरीता त्यांना नियमितपणे प्रशिक्षण देण्याची गरज उर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी अधोरेखित केली. त्याचप्रमाणे उर्जा विभागांतर्गतच्या तिन्ही कंपन्यांमध्ये सद्यस्थितीत असलेल्या प्रशिक्षण व्यवस्थेचा त्यांनी सखोल आढावा घेतला.” कंपनीमधील प्रशिक्षणाची व्यवस्था ही जागतिक दर्जाची असावी. सध्याची प्रशिक्षण व्यवस्था जागतिक दर्जाची करण्याकरीता त्या व्यवस्थेचा अभ्यास करून व कालबध्द कार्यक्रम राबवून यथायोग्य प्रशिक्षण व्यवस्था ऊर्जा विभागाकरीता तयार करायला हवी.आवश्यकतेनुसार या प्रशिक्षण व्यवस्थेअंतर्गत देशातील तसेच परदेशातील अभियांत्रिकी, व्यवस्थापन तसेच वित्त व लेखा विषयात काम करणा-या नामांकित संस्थांबरोबर करार  करण्यात यावा व पायाभूत तसेच विशेषज्ञ स्वरूपाचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत,” असेही डॉ.राऊत यांनी सुचित केले.

प्रशिक्षण घेण्याकरीता कर्मचा-यांना प्रोत्साहित करण्याकरीता कंपनीने आपल्या स्तरावर कर्मचाऱ्याकरीता योजना आखाव्यात किंबहुना, नियतकालीक प्रशिक्षण घेण्याची तरतूद कंपनी स्तरावर करावी. प्रशिक्षण न घेणा-या कर्मचा-यांच्या कार्यमुल्यांकनात ह्या संदर्भात विपरीत नोंद घेण्याची यंत्रणा सुद्धा कार्यान्वित करावी, असे त्यांनी यावेळी निर्देश दिले.
ऊर्जा क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अशाप्रकारे तयार करण्यात यावे की, ते पुढील पदोन्नती व सरळसेवा भरतीद्वारे वरिष्ठ पदावर नियुक्त झाल्यानंतर त्या पदाच्या जबाबदा-या सक्षमपणे पार पाडतील, अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. वीज क्षेत्रातील विशेष प्राविण्याची कामे  उदा एचव्हीडिसी (HVDC), एसएलडीसी (SLDC), एसटीयु हॉटलाईन (STU Hotline) and एस /एस एम ऑटोमेशन ( S/Sm Automation) व ईतर करीता उच्च दर्जाच्या संस्थांच्या सहाय्याने विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करून  कर्मचारी वर्गास प्रविण बनविण्याचे ध्येय्य ठेवण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.
त्यांनी पुढे असेही सुचीत केले की विशेष प्राविण्याची कामे करण्याकरिता सुयोग्य कर्मचा-यांची निवड करून त्यांना दिर्घ मुदतीच्या प्रशिक्षणाकरीता, ज्यामध्ये साधारणतः २ महिन्यांचे वर्गांतर्गत प्रशिक्षण  आणि १ महिन्याचे प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण  देण्याची व्यवस्था असेल अशा प्रशिक्षणाकरीता पाठविण्यात यावे. 
या प्रशिक्षणामुळे प्राविण्य असलेले अनेक कर्मचारी सातत्याने घडत राहतील व त्याअन्वये  यंत्रणेतील अतीमहत्वाची पदे उदा. कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता  व मुख्य अभियंता यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांवर योग्य  व्यक्तीची पदस्थापना करण्यामध्ये व्यवस्थापनाला अडचण येणार नाही आणि पर्यायाने यंत्रणा सुरळीतपणे अखंडपणे व अविरत सुरू राहू शकेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
वीज क्षेत्रामध्ये काम करणारा प्रत्येक अभियंता, अधिकारी व कर्मचारी हे जागतिक पातळीवर होत असलेल्या विविध घडामोडीबाबत अनभिज्ञ असता कामा नये. या घडामोडी व बदलांचे त्यांना अद्ययावत आणि शास्त्रशुद्ध ज्ञान असावे यासाठी त्यांना वेळप्रसंगी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण देण्यात यावे अशाही सुचना  त्यांनी आढावा बैठकीदरम्यान दिली.
 सोबतच त्यांनी  उर्जा क्षेत्रातील घडामोडींबाबत  कर्मचारी  यांना कायम अद्ययावत माहिती मिळावी  यासाठी त्यांना वेगवेगळी माध्यमे जसे की फेसबुक  Facebook आणि ट्वीटर / Twitter Groups इत्यादींवरील चर्चासत्रामध्ये सहभागी होण्यासाठी विविध नामांकित संस्थांचे सदस्यत्व घेण्याकरीता तसेच परिषदा आणि परिसंवाद यामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे असेही त्यांनी निर्देश दिले.

मेट्रो कॅश अँड कॅरी इंडिया (प्रा.) लिमिटेडवर छापा

0

मुंबई-भारतीय मानक ब्युरोच्या  (BIS), मुंबई शाखा कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या पथकाने मुंबईतल्या बोरिवली पूर्व इथल्या मे. मेट्रो कॅश अँड कॅरी इंडिया (प्रा.) लिमिटेडवर गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे उल्लंघन करून ISI प्रमाणचिन्हाचा गैरवापर केल्याबद्दल 13.01.2022 रोजी छापा घालून मोठ्या प्रमाणात अप्रमाणित खेळणी जप्त केली.    

हे दुकान, भारत सरकारने जारी केलेल्या खेळण्यांबाबतच्या  गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे उल्लंघन करून, प्रमाणचिन्हांशिवाय  (BIS स्टँडर्ड मार्क) इलेक्ट्रिक आणि नॉन-इलेक्ट्रिक खेळण्यांची विक्री करताना आढळले.

मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन,   01-01-2021 पासून देशात विकली जाणारी सर्व खेळणी त्यांच्या सुरक्षिततेसाठी BIS द्वारे प्रमाणित केली  जाणे  आणि त्यांच्यावर प्रमाणचिन्ह  असणे बंधनकारक असल्याची अधिसूचना भारत सरकारच्या  वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने काढली आहे.

भारत सरकारने जारी केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे उल्लंघन दंडनीय गुन्हा आहे. याप्रकरणी BIS कायदा 2016 नुसार दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान 2,00,000 रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 

उत्पादक, वितरक  आणि व्यापार्‍यांना बीआयएसच्या प्रमाणपत्राशिवाय खेळण्यांचे उत्पादन आणि विक्री करू नये असा  सल्ला देण्यात आला आहे. 

प्रमाणित उत्पादक आणि उत्पादनांच्या तपशीलांसाठी ग्राहकांना BIS केअर अॅप वापरण्यास प्रोत्साहित केले जात आहे. 

फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्समुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा भारताचा संघ तयार होईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

अलिबाग,दि.16 (जिमाका):- नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्समुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा भारताचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

खारघर येथील फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचे (Centre of Excellence) उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमल, खासदार तथा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष व महिला आशिया चषक भारत 2022 चे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळाराम पाटील, आमदार प्रशांत ठाकूर,आदेश बांदेकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून तर नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी, सहव्यवस्थापक कैलास शिंदे यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.

मातीशी नाळ जोडली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, तंत्रज्ञान विकसित होत असताना सध्याच्या पिढीची  मैदानाशी, मातीशी नाळ तुटत चालली आहे. मात्र या उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून ही नाळ मातीशी पुन्हा जोडली जाईल. आरोग्यदायी जीवनासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. खारघर येथे निर्माण झालेले हे उत्कृष्टता केंद्र नव्या पिढीसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरेल. येथे विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, याहून अधिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यासाठी नगरविकास विभाग, सिडको यांनी आतापर्यंत केलेले काम निश्चितच अभिनंदनीय आहे.

स्पोर्ट सिटीचा उदय

खारघर हे शहर भविष्यात “स्पोर्टस् सिटी” म्हणून नावारूपाला येईल, यात शंकाच नाही. या ठिकाणी सर्व खेळांसाठीच्या आवश्यक सोयीसुविधा एकाच शहरात ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे सांगून शेवटी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी या मैदानात सराव करणारा भारताचा संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर विजेता संघाच्या रूपात दिसावा, जागतिक पातळीवर भारताच्या संघाचा दरारा निर्माण व्हावा, अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र शासनाचे व  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष आभार मानले. नव्या पिढीचा आवडता खेळ फुटबॉलच्या विकासाकरिता महाराष्ट्र शासनाचे उत्तम सहकार्य मिळत आहे. या उत्कृष्टता केंद्राच्या व मैदानाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम खेळाडू घडतील, असे सांगून महाराष्ट्र राज्याचा आणि देशाचा नावलौकिक वाढेल यासाठी सर्वजण मिळून सातत्याने प्रयत्नशील राहू, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच याच मैदानात लवकरच एएफसी वूमेन एशियन कप इंडिया 2022 चे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री ठाणे श्री.एकनाथ शिंदे यांनी खारघर येथील हे उत्कृष्टता केंद्र एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, असे सांगून नवी मुंबई शहर हे एज्युकेशन सिटी, आयटी सिटी याबरोबरच आता “स्पोर्टस् सिटी” म्हणूनही ओळखले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

नव्या पिढीसाठी पर्वणी

पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी फुटबॉलप्रेमी नव्या पिढीसाठी हे केंद्र एक पर्वणी ठरणार असून येथे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. खारघर, नवी मुंबई, पनवेल हे विविध खेळ व त्या खेळांसाठीच्या सोयीसुविधांचे केंद्रबिंदू होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले खेळाडू, संघ आपल्या महाराष्ट्राचे व भारताचे नाव मोठे करतील, असे सांगितले.

क्रीडा क्षेत्रातील मानाचा केंद्रबिंदू

राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे म्हणाल्या, नव्या पिढीचा फुटबॉल हा आवडता खेळ आहे. येत्या काळात पनवेल येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. या पार्श्वभूमीवर या उत्कृष्टता केंद्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या ठिकाणी जागतिक दर्जाच्या स्पर्धा आयोजित होतील. ग्रामीण व शहरी भागातील प्रतिभावंत खेळाडूंसाठी हा प्रकल्प निश्चितच लाभदायक राहील. यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम खेळाडू घडविले जातील,  त्यामुळे हा प्रकल्प क्रीडा क्षेत्रातील एक मानाचा केंद्रबिंदू ठरेल.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आपल्या शुभेच्छा दिल्या असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पाविषयीची तांत्रिक व प्रशासकीय माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. तसेच या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल सर्व मान्यवरांचे विशेष आभारही मानले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे या प्रकल्पाचे आभासी उद्घाटन झाले. त्यानंतर या प्रकल्पाच्या निर्मितीबाबतची छोटीशी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी केले तर आभार प्रदर्शन सिडकोचे अधीक्षक अभियंता रमेश गिरी यांनी केले .

उत्कृष्टता केंद्र (Centre of Excellence), खारघरनवी मुंबई बाबतची विस्तृत माहिती:-

उत्कृष्टता केंद्र असलेल्या अत्याधुनिक असा महत्वाकांक्षी प्रकल्प खारघर, नवी मुंबई येथे सिडकोद्वारे विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

याचे प्रामुख्याने उद्दिष्ट आहे की, भारतातील आगामी प्रतिभावान फुटबॉल खेळाला चालना देणे. जागतिक दर्जाच्या आंतराष्ट्रीय फिफा सामन्यांसाठी 40,000 प्रेक्षक आसन क्षमतेचे फुटबॉलचे स्टेडिअम टप्प्याटप्प्याने उभारण्यात येत आहे.

या उत्कृष्टता केंद्रासाठी एकूण 10.5 हेक्टर एवढी जागा आहे. जी आंतराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्कच्या 42 दशलक्ष चौरस फूटच्या आवारातच आहे.

ज्यात वैशिष्टपूर्ण पध्दतीने रहिवासी आणि वाणिज्यिक अशा एकत्रित वापरासाठी विकसित करणे प्रस्तावित आहे.

प्रस्तावित उत्कृष्टता केंद्र हे मुंबई-पुणे जलदगती मार्गापासून 20 मीटर वाहतुकीच्या अंतरावर आहे.

भविष्यातील पायाभूत विकसनशील सुविधांच्या निकट आहे. ज्यात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर, नैना यांचा समावेश आहे. तसेच मुंबई या भारताच्या आर्थिक राजधानी व कला व क्रीडा यांचे केंद्रस्थान असलेल्या शहरापासून फक्त 1 तास वाहतूक अंतरावर आहे.

अंमलबजावणीच्या सुलभतेसाठी आणि भविष्यातील वापरासाठी हे काम 3 टप्प्यात विभागले आहे.

पहिल्या टप्प्यात फिफाच्या दर्जाच्या सरावासाठी लागणार्‍या चार पिचेस (फुटबॉल मैदान) व प्रेक्षकांची गॅलरी ज्यात टेन्साईल रुफ सिस्टीमचा समावेश आहे.

दुसर्‍या टप्प्यात सर्व सुविधांनी युक्त अशा सदस्यता प्रकार असलेल्या अ‍ॅथलेटिक सुविधांनी युक्त अशा क्लब हाऊसचा समावेश आहे.

तसेच तिसर्‍या टप्प्यात 40,000 क्षमतेच्या अत्याधुनिक अशा फिफा दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यातील उत्कृष्टता केंद्र असलेल्या वास्तुचा उपयोग व्यावसायिक खेळाडूंना मुख्य सामन्याआधीच्या सरावाकरिता केला जाईल, जे स्टेडिअमच्या बाजूलाच लागून आहे. तसेच राज्य / जिल्हा पातळीवरील सामने, आंतर महाविद्यालयीन सामने तसेच युवा विकास कार्यक्रमाकरिता त्याचा वापर केला जाईल.

4 पिच पैकी 3 पिच नैसर्गिक गवताचे असतील व एक पिच कृत्रिम गवताचे असेल. हे सर्व पिच फिफाची तांत्रिक मार्गदर्शक तत्वे वापरुन बनविले जातील. जेणेकरुन फिफाचे आंतरराष्ट्रीय सामने येथे खेळविणे शक्य होणार आहे.

जागतिक पातळीवर कृत्रिम गवताची मोठया प्रमाणावर स्वीकृती होत असताना, कृत्रिम गवताचे पिच अशा प्रकारे बनविले जाईल की, जेणेकरुन फिफाच्या अति उच्च अशा गुणवत्ता मानांकनात ते गणले जाईल.

प्रत्येक नैसर्गिक गवताच्या पिचला स्वयंचलित सिंचनाची सुविधा दिला जाईल. 2 लाख लिटर क्षमता असलेल्या भूमिगत पाण्याची टाकी पुरविली जाईल. तसेच फिफाच्या शिफारसी प्रमाणे लागणाऱ्या नाले आणि कुंपणाची व्यवस्था केली जाईल.

सर्व उत्पादने आणि ब्रँड हे जागतिक दर्जाचे वापरले जातील याकडे खात्रीलायक पध्दतीने लक्ष दिले जाईल. मुख्यत्वे करुन कृत्रिम गवताचे गालीचे हे फिफा ने प्रमाणित केलेल्या सात कंपन्यांपैकी असतील त्यापैकी काही म्हणजे लिमोन्टा, फिल्डटर्फ, डोमो स्पोटर्स ग्रास, ओमेगा इत्यादी.

प्रत्येक पिचचा आकार 68 × 105 मीटर एवढा असणार आहे आणि तीनही नैसर्गिक पिच वर 500 लक्सचे प्रकाशझोत दिवे लावले जातील, जे फिफाच्या वर्ग- 2 तपशिलाप्रमाणे असतील, जेणेकरून येथे सांघिक आणि क्लब सामने खेळविता येतील.

तसेच जास्तीत जास्त वापराचे अनुमान असलेल्यास पिच क्र. 4 वर कृत्रिम गवताच्या पिचसह 2000 लक्सचे प्रकाशझोत दिवे लावण्यात येतील, जेणेकरून हे सामने दूरदर्शनवर दाखविणे सोयीचे होईल. जे की, फिफाच्या वर्ग – 4 तपशिलाप्रमाणे असतील.

सरावाच्या 4 पिचेससाठी प्रेक्षक गॅलरी व टेन्साईल रुफ सिस्टीमची बैठक व्यवस्था नियोजित आहे. ज्यात खालच्या बाजूने प्रेक्षकांसाठी स्वच्छतागृह, खेळाडूंची कपडे बदलण्याची खोली, डॉक्टरची खोली, उत्तेजक द्रव्य सेवन नियंत्रण खोली, न्हाणीघर, साठवणुकीची खोली, प्रशासक व माहिती तंत्रज्ञान व्यवस्थेसाठी जागा इत्यादीसाठी केली जाईल.

बैठक व्यवस्था ही एका वेळेस 4 संघ सहभागी करु शकेल अशा क्षमतेची असेल व वापराप्रमाणे वरील सर्व सुविधांना पुरेसा प्रकाश असेल, असे नियोजन आहे.

जगातील 12 देशांतील उत्कृष्ट  फुटबॉल संघ आशियाई फेडरेशन कॉन्फेडरेशन महिला आशियाई कप 2022 यात सहभागी होत असून हे सामने भारतात अहमदाबाद, भुवनेश्‍वर आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये होणार आहेत.

महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये काही सामने खेळविण्यात येणार आहे.

सिडकोव्दारे विकसित करण्यात येणार्‍या आंतराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क मध्ये 10.50 हेक्टर क्षे़त्रावर उत्कृष्टता केंद्र प्रकल्प अंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या नैसर्गिक गवताच्या फुटबॉल मैदानावर वरील सामन्याकरिता सहभागी झालेल्या संघाना सराव करण्याकरिता या मैदानांची निवड वेर्स्टन इंडिया  फुटबॉल असोसिएशन शिफारशीद्वारे करण्यात आली असून वरील 02 नैसर्गिक गवताच्या फुटबॉल मैदानावर सिडकोतर्फे वेर्स्टन इंडिया  फुटबॉल असोसिएशनला सरावाकरिता विनामोबदला देण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमानी विचारच प्रेरक – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई दि. १६: स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या रुपाने स्वराज्याला दुसरे छत्रपती मिळाले. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा त्यांनी सक्षमपणे पुढे नेला. छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचे रक्षण करत स्वराज्याचा विस्तार केला. युद्धनिपुण, प्रकांड पंडित छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाला आणि शौर्याला मानाचा मुजरा करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा ‘स्वाभिमानी’ विचारच प्रेरक असून त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली निधनानंतर त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यावर मोठे संकट आले. स्वराज्यावरील या संकटाचा मोठ्या धैर्याने सामना करत छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचे रक्षण करुन स्वराज्याच्या सीमा विस्तारल्या. आपल्या कार्यकाळात छत्रपती संभाजी महाराज एकही युद्ध हरले नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने स्वराज्यातील रयतेला स्थैर्य प्राप्त झाले, स्वराज्याला सक्षम छत्रपती मिळाले, स्वराज्याच्या शत्रूंवर वचक बसला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या शिकवणीवर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार केला. रयतेसाठी आणि स्वराज्याच्या स्वाभिमानासाठी त्यांनी समर्पण केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आदर्श विचारांवर मार्गक्रमण करत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.