Home Blog Page 2120

दिपाली धुमाळ यांच्या प्रयत्नातून साकारल्या जाणाऱ्या मियावाकी गार्डनचे व मुख्य प्रवेशद्वारचे खा. वंदना चव्हाणांनी केले भूमिपूजन

0

पुणे : वारजे येथे ३५ एकर जागेवर पुणे महानगरपालिका व वनविभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्या प्रयत्नातून साकारल्या जात असलेल्या संजीवन वनोद्यानातील मियावाकी गार्डनचे व मुख्य प्रवेशद्वारचे भूमिपूजन खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर खटके, डॉ. महेश ठाकूर,  वनविभागाचे अधिकारी प्रदीप संकपाळ व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

यावेळी वंदना चव्हाण यांनी संजीवन वनोद्याना कशाप्रकारे साकारले जात आहे याची माहिती घेतली. वारजेकरांसाठी हे वनोद्याना पर्वणी असून यामुळे वारजेतील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळणार आहे. वनोद्यानाच्या वेगाने सुरू असलेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले व वनोद्याना लवकर पूर्ण होऊन ते नागरिकांना खुले व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

वारजे येथे डुक्कर खिंडीजवळ वन विभागाच्या ३५ एकर जागेमध्ये वन विभाग व पुणे महापालिका यांच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या या वानोद्यानाचे २० ऑगस्ट २०२१ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर चार महिन्यात आतापर्यंत अनेक देशी झाडांची लागवड करण्यात आली आहे. झाडांना पाणी देण्यासाठी टाक्या बसवण्यात आल्या आहेत. वानोद्यानाच्या विकासाचे काम अविरत सुरू असल्याचे दिपाली धुमाळ यांनी सांगितले.

अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे वाड्:मयीन पुरस्कार जाहीर

0


पुणे ः अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे दिल्या जाणार्‍या 2020-21 या वर्षाच्या बाल वाड्:मय पुरस्काराची घोषणा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे यांनी शनिवारी केली. यावेळी खजिनदार डॉ. दिलीप गरूड, कार्यवाह मुकुंद तेलीचरी, सहकार्यवाह सुनील महाजन उपस्थित होते.
विज्ञानविषयक पुरस्कार डॉ. सुनील विभुते यांच्या अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा या पुस्तकाला जाहीर झाला आहे. बाल एकांकिकेचा पुरस्कार प्रभाकर शेळके यांच्या कोरोना राक्षस या पुस्तकाला, बाल कादंबरीचा पुरस्कार नागेश शेवाळकर यांच्या समूदादा या पुस्तकाला, शैक्षणिक साहित्याचा पुरस्कार डॉ. नीलिमा गुंड यांच्या भाषेची भिंगरी या पुस्तकाला, बाल कवितेचा पुरस्कार वीरा राठोड यांच्या हाडेल हप्पी, जादूची झप्पी या पुस्तकाला, बाल कथा संग्रहाचा पुरस्कार प्रा. सुहास बारटक्के यांच्या बांधामधला धामण या पुस्तकाला जाहीर झाला आहे. तसेच मुलांनी लिहिलेल्या साहित्याचा पुरस्कार मुग्धा घेवरीकर हिच्या मुग्धाच्या कविता या पुस्तकाला व पीयुष गांगुर्डे याच्या काळजातली माया पुस्तकाला दिला जाणार आहे.
सुनील महाजन म्हणाले, पुरस्कारासाठी राज्यभरातून 150 पेक्षा अधिक पुस्तके प्राप्त झाली होती. लवकरच कोरोना नियमांचे पालन करून पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. कविंता मेहेंदळे आणि निर्मला सारडा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. 

एकत्र कुटुंब पद्धती आणि मोठ्यांविषयीचा आदरभाव आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या केंद्रस्थानी आहे – उपराष्ट्रपती

0

नवी दिल्ली -उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी आज भारतीय संस्कृतीच्या केंद्रस्थानी असलेली एकत्र कुटुंब पद्धती तसेच मोठ्या वयाच्या व्यक्तींविषयीचा आदरभाव या परंपरा अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.

कुटुंबातील तरुण सदस्यांना मार्गदर्शन करण्यात तसेच योग्य सल्ला देण्यात वयस्कर मंडळी निभावत असलेली महत्त्वाची भूमिका अधोरेखित करत ते म्हणाले की, पिढ्यापिढ्यांमधील नात्यांचे बंध मूल्यव्यवस्थेचे संरक्षण करण्यात आणि तिला प्रोत्साहन देण्यास मदत करतात

उपराष्ट्रपती नायडू यांनी संक्रांतीच्या सणानिमित्त नेल्लोरच्या स्वर्ण भारत विश्वस्त संस्थेच्या वृद्धाश्रमातील रहिवासींशी आभासी पद्धतीने संवाद साधला. त्यांनी या आश्रमातील रहिवासींची विचारपूस केली तसेच त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत चौकशी केली. विश्वस्त संस्थेने सुरु केलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांनी संस्थेचे कर्मचारी तसेच अधिकारी यांचे कौतुक केले.

भारतीय संस्कृतीमध्ये सणांचे महत्त्व विशद करतांना, नायडू यांनी,  निसर्गाचा आविष्कार साजरा करण्यात, कुटुंबांना एकत्र आणण्यात आणि समाजात शांतता आणि एकोपा नांदण्यात संक्रांतीसारख्या सणांचे महत्त्व आजच्या तरुणांनी समजून घेतले पाहिजे हा मुद्दा अधोरेखित केला.

**

लंडनने उत्तर प्रदेशातील मंदिरातून बेकायदेशीररित्या नेलेली 10 व्या शतकातील मूर्ती देशाला परत करणार : केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी

0

नवी दिल्ली -उत्तर प्रदेशातील बांदामधील लोखरी येथील मंदिरातून बेकायदेशीररित्या काढून नेण्यात आलेली बकरीचे शिर असलेल्या योगिनीची 10 व्या शतकातील दगडी मूर्ती देशाला परत केली जाणार आहे अशी घोषणा केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री तसेच ईशान्येकडील भागाचे विकास मंत्री जी.किशन रेड्डी यांनी केली आहे. ट्विट संदेशाद्वारे ही घोषणा करताना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री म्हणाले की आपल्या देशाचा अधिकार असलेल्या कलाकृतींच्या प्रत्यावर्तनाची प्रक्रिया सातत्याने सुरु आहे.

यापूर्वी, लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनी म्हंटले होते की, वर्ष 1980 च्या सुमारास कधीतरी, उत्तर प्रदेशातील बांदामधील लोखरी येथील मंदिरातून बेकायदेशीररित्या काढून नेण्यात आलेल्या 10 व्या शतकातील वैशिष्ट्यपूर्ण दगडी मूर्तीची पुनर्प्राप्ती आणि परत आणण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगतांना मला आनंद होत आहे.

ही शिल्पाकृती म्हणजे बकरीचे शिर असलेल्या योगिनीचे शिल्प असून वालुकाश्मापासून घडविण्यात आलेल्या देवतांच्या दगडी मूर्तींच्या समूहाचा भाग असलेली ही मूर्ती लोखरी येथील मंदिरात बसविण्यात आली होती.

1988 साली ही मूर्ती लंडनच्या कला बाजारात काही काळ आढळली होती. 2021 सालच्या ऑक्टोबरमध्ये भारतीय उच्चायुक्तांना लंडनजवळच्या एका खासगी निवासस्थानाच्या उद्यानात लोखरी येथील मूर्तींच्या वर्णनाशी जुळणारी बकरीचे शिर असलेल्या योगिनीची दगडी मूर्ती सापडल्याची माहिती देण्यात आली.

योगिनी म्हणजे उपासनेच्या तांत्रिक पद्धतींशी संबंध असलेल्या शक्तिरूपी स्त्री देवतांचा गट असतो. त्या बहुतेकदा 64 योगिनी अशा सामूहिक स्वरुपात पुजल्या जातात आणि त्यांच्या ठायी अमर्याद शक्ती असल्याचा भाविकांना विश्वास असतो.

मकर संक्रांतीच्या मंगल दिनी भारतीय उच्चायुक्तांना ही शिल्पाकृती मिळाली असून त्यांनी ती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नवी दिल्ली येथील कार्यालयाकडे पाठवून दिली आहे.

कोविड बाधितांची संख्या वाढत असल्याने निर्बंधात शिथीलता नाही

0

            पुणे दि.१५: जिल्ह्यातील कोविड बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य शासनाच्या कोविड विषयक नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. पुढील आठवड्यातील कोविड संसर्गाची परिस्थिती पाहून निर्बंधात बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले.

            विधान भवन येथे आयोजित पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते. बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे,  विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

            श्री.पवार म्हणाले, कोविड बाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने तूर्तास राज्य शासनाच्या नियमावलीनुसारच जिल्ह्यातील निर्बंध राहतील. ग्रामीण भागात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण चांगले झाले असून महापालिका क्षेत्रात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी शाळांच्या परिसरात लसीकरण मोहिम राबविण्याचा विचार करण्यात यावा. औषधालयातून कोविड चाचणी कीट घेताना संबंधिताच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची नोंद घेण्याच्या सूचना औषध विक्रेत्यांना करण्यात याव्यात. जम्बो कोविड केंद्रातील सर्व सुविधा सज्ज ठेवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लशीची वर्धक मात्रा देण्याकडेही विशेष लक्ष द्यावे, असेही श्री.पवार म्हणाले.

            गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी अवसरी येथील जम्बो कोविड केंद्रात आवश्यक सुविधा देण्याबाबत सूचना दिल्या. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा तयार ठेवाव्यात असेही ते म्हणाले.

            विभागीय आयुक्त श्री.राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीविषयी माहिती दिली. जिल्ह्याने आतापर्यंत १ कोटी ६० लाख लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. १५ ते १८ वयोगटातील ४३ टक्के मुलांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोविड बाधितांच्या संख्येत ३० हजाराने वाढ झाली आहे. ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या ४ हजार ३८७ व्यक्तींनी लशीची वर्धक मात्रा घेतली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई

            कोविडपासून बचावासाठी मुखपट्टी (मास्क) न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एकूण ९ हजार २७० कारवाईत ४५  लाख ३६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पोलिस विभागामार्फत मुखपट्टी वापरण्याबाबत नागरिकांचे प्रबोधनदेखील करण्यात येत आहे. महापालिका आणि नगर पालिकेतर्फेदेखील दंडात्मक कारवाईसोबत जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. कोविड नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू ठेवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिले.

बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, अशोक पवार, भिमराव तापकीर, राहूल कुल, सुनिल कांबळे,  पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, यशदाचे महासंचालक एस.चोक्कलिंगम, सह पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया,   पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

भारतीय जन संघटन संस्थेच्या शांतीलाल मुथा यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या कोविडमुक्त गाव अभियानाची माहिती दिली. हे अभियान प्रत्येक गावात राबविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्ष सुनील चांदेरे

0

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुरंदर तालुक्यातील प्रा. दिगंबर दुर्गाडे यांची तर, उपाध्यक्षपदी मुळशी तालुक्यातील सुनील चांदेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेवर पदाधिका-यांची निवड करताना बारामती लोकसभा मतदार संघाला अधिक ताकद देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचा केंद्र बिंदू असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदी कुणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) मिलिंद सोबले यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांची पहिली बैठक बँकेच्या सभागृहात शनिवारी (दि.15) दुपारी एक वाजता झाली. त्यामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अनुक्रमे दुर्गाडे आणि चांदेरे यांचा एकमेव अर्ज आला, त्यामुळे पदाधिका-यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

अध्यक्षपदी निवड झालेले प्रा. दुर्गाडे यांनी बँकेवर अध्यक्ष म्हणून यापूर्वी काम पाहिले आहे. बँकेच्या कामकाजाचा असलेला मोठा आवाका आणि पूर्वीच्या कामाचा अनुभव विचारात घेऊन त्यांची निवड अपेक्षित मानली जात होती. बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करूनही त्याच्या निवडीवर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्याचे दिसून येत आहे. तर चांदेरे यांची निवड करून तरुण चेहऱ्याला संधी देण्यात आली असली तरी बारामती लोकसभा मतदारसंघाला नेहमीप्रमाणेच झुकते माप देण्यात आले आहे.

दरम्यान, संचालकांच्या पहिल्या बैठकीस बँकेचे संचालक तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील, काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्यासह संचालक उपस्थित होते. जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १७, काँग्रेसचे २ आणि भाजपचे २ मिळून एकूण २१ संचालकांचे पक्षीय बलाबल आहे.

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाध साधला. त्यावेळी उपस्थित पत्रकारांना पवार यांना बँकांच्या पुढील वाटचालीबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी सध्याच्या परिस्थितीत बँका चालवणे खूप अवघड झाले असल्याचे सांगितले.

भीमा नदीवर एक टीएमसी साठवण क्षमतेचे बॅरेजेस बांधण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

0

पुणे, दि. १५- तापी नदीवरील बॅरेजेसच्या धर्तीवर चासकमान प्रकल्पाच्या क्षेत्रात तसेच धरणाखाली प्रत्येकी एक टीएमसी साठवण क्षमतेचे तीन बॅरेजेस बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

चासकमान कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, आमदार सर्वश्री अशोक पवार, दिलीप मोहिते-पाटील आदी उपस्थित होते. पवना प्रकल्प तसेच भामा आसखेड प्रकल्पांचीही कालवे सल्लागार समितीच्या बैठकादेखील यावेळी पार पडल्या. त्यास पिंपरी- चिंचवडच्या महापौर माई ढोरे यासुद्धा उपस्थित होत्या.

चासकमान प्रकल्पातून सिंचनासाठी रब्बीचे एक आणि उन्हाळी दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय बैठकीत झाला. पवना प्रकल्प तसेच भामा आसखेड प्रकल्पातही समाधानकारक पाणीसाठा असून नियोजनाप्रमाणे पाणी सोडण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

चासकमान प्रकल्प :

चासकमान प्रकल्पात गतवर्षीपेक्षा सुमारे 3 टक्के अधिक पाणी आहे त्यामुळे रब्बीसाठी एक आणि उन्हाळी दोन आवर्तने देण्याचे नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले. कालव्यांची गळतीची ठिकाणे निश्चित करुन गळती काढण्याची कामे हाती घ्यावीत, असेही त्यांनी सांगितले.

कालव्यावरील लोखंडी पूल खराब झाले असल्याने दुसऱ्या बाजूस वाहने घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अंतराचा वळसा घालावा लागतो. त्यामुळे लोखंडी पुलांच्या बाजूला सिमेंटचे पूल बांधण्यासाठी जलसंपदा विभागाने तातडीने प्रस्ताव तयार करुन सादर करावेत. त्यास निधीची तरतूद करण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास रजपूत, जलसंपदा विभागाचे मुख अभियंता एच.व्ही. गुणाले, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय चोपडे आदी उपस्थित होते.

पवना आणि भामा आसखेड प्रकल्पातही समाधानकारक पाणीसाठा असल्याने सिंचनासाठी नदीत यापूर्वीच्या नियोजनाप्रमाणे पाणी सोडण्यात यावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

महापालिकेच्या आयुक्तांनी जलशक्ती मंत्रालयाचीही केली बोळवण ?

0

पुणे- १० जानेवारी पर्यंत जल शक्ती मंत्रालयापुढे आणि पुण्याचे खासदार असलेल्या भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्यापुढे जायका प्रकरणी गतीने केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल ठेवतो असे केंद्रीय जलशक्ती मंत्री यांना आश्वासन देऊन वेळ मारून नेणाऱ्या महापालिका आयुक्तांचा पर्दाफाश आज खुद्द त्यांच्या समोरच खासदार गिरीश बापट यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे . आणि महापालिकेला मिळू पाहणारे जायका चे ८५० कोटीचे अनुदान हातचे वाया जाऊ देणार नाही असाही पवित्रा घेतला आहे .

जलशक्ती मंत्रालयाने पुण्यातील जायका प्रकल्पासाठी गेल्या महिन्यात दिल्लीत बैठक घेतली यावेळी केंद्रीय मंत्री गजेन्द्र सिंह शेखावत आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट उपस्थित होते मात्र निमंत्रण देऊनही ऑनलाईन उपस्थिती लावा असे सांगूनही महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे या बैठकीला उपस्थित नसल्याचे तेव्हा बापट यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते . त्यामुळे बापट यांनी थेट राज्यातील उपमुख्यमंत्री यांना फोन लाऊन त्यांच्या मार्फत त्यांच्याबरोबर असलेले विक्रम कुमार यांना याबाबत जाणीव करून दिली होती . तेव्हा विभागीय आयुक्तांच्याच कार्यालयात बसून विक्रम कुमार यांनी ऑनलाईन जाऊन या बैठकीस उशिरा हजेरी लावली तोवर जल शक्ती मंत्री शेखावत त्यांची प्रतीक्षा करत होते . तेव्हा कुमार यांना जबाबदारीची जाणीव करून देऊन मंत्र्यांनी संतप्त भाषेत त्यांना सुनावले देखील . तेव्हा महिनाभरात म्हणजे १० जानेवारीपर्यंत जायका प्रकरणी गतीने केलेल्या कार्यवाही चा अहवाल आणि प्रगती पुण्याचे खासदार बापट यांना आणि जलशक्ती मंत्रालयाकडे पाठवू असे आश्वासन देऊन कुमार यांनी सुटका करवून घेतली होती .

मात्र आज पुण्याच्या विधानभवनात त्यांची खासदारा बापट यांच्याशी भेट झाली तेव्हा त्यांनी कुमारांना गाठले ,आणि मिडीयाने या दोहोंना एकत्र पाहून जायका चा विषय छेडला असता , जायका चा निधी आपण कोणत्याही परिस्थितीत माघारी जाऊ देणार नाही असा आपला पवित्र कायम ठेवत बापट यांनी विक्रम कुमार यांच्यासमोरच आयुक्त किंवा महापालिकेने जायकाबाबत जी काही प्रगती असेल ती, त्याची माहिती देणे आवश्यक असतानाही दिलेली नाही असे माध्यमांना सांगितले . आणि आता आज आपण ती माहिती घेऊच आणि जायका ला गती देऊ असे माध्यमांना सांगितले.

कालव्यांची गळती थांबवण्याच्या उपाययोजना तातडीने हाती घ्या: अजित पवार

0

पुणे, दि. १५: कालव्यांमधून जास्त गळती होत असलेली ठिकाणे शोधून तेथील गळती थांबवण्याच्या उपाययोजना प्राधान्याने हाती घ्याव्यात तसेच काही ठिकाणी कालवा अस्तरीकरणाची सुरू असलेली कामे दर्जेदार आणि गतीने करावीत, असे स्पष्ट निर्देश उपमख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुणे जिल्ह्यातील विविध धरण प्रकल्पांच्या कालवे सल्लागार समित्यांच्या बैठका श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडल्या त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

नीरा उजवा कालवा, नीरा डावा कालवा, खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती बरी आहे त्यामुळे यापूर्वीच्या नियोजनानुसारच रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी आवर्तनांचे नियोजन करावे, असे निर्देश श्री. पवार यांनी दिले. निरा प्रणालीतून रब्बीचे एक आणि उन्हाळी दोन तर खडकवासला प्रकल्पातून रब्बीचे एक आणि उन्हाळी एका आवर्तनासोबत काटकसरीने पाणी बचत करुन दुसरे आवर्तन सोडण्यात यावे असे या बैठकीत ठरले.

कालवे दुरूस्तीची कामे गतीने करावीत यावर भर देऊन श्री. पवार म्हणाले की, अस्तरीकरणाची कामे केल्यामुळे कालव्यांची पाणीवहनक्षमता दुपटीने वाढल्याचे दिसून आले आहे. अस्तरीकरणाची कामे दर्जेदार झाली आहेत का हे पाहण्यासाठी आपण स्वत: येणार असून कामे खराब आढळल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यासह अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

खडकवासला प्रकल्प:

पुणे शहरासाठी राखीव पाणीसाठ्यापेक्षा अधिक पाणी महानगरपालिका घेते. ते काटकसरीने वापरुन खडकवासला प्रकल्पांतर्गत नवा मुठा उजवा कालव्यातून रब्बीसाठी एक आणि उन्हाळी दोन आवर्तने देणे शक्य आहे. त्यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

बैठकीस आमदार राहूल कुल, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, अशोक पवार, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास रजपूत, जलसंपदा विभागाचे मुख अभियंता एच.व्ही. गुणाले, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय चोपडे आदी उपस्थित होते.
महापौर श्री. मोहोळ आणि आयुक्त विक्रम कुमार यांनी महापालिका राबवत असलेल्या 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना, पाणी मीटर, पाणी सोडण्यासाठी स्वयंचलित वॉल्व, जुन्या पाईपलाईन बदलून नव्या अधिक व्यासाच्या पाईपलाईन टाकणे, सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी खडकवासला डाव्या कालव्यातून सोडणे आदींबाबत माहिती देऊन पाणीगळती, पाणीचोरी रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यावर या उपाययोजना गतीने पूर्ण कराव्यात आणि शहरातील पिण्याच्या आणि ग्रामीण सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सामंजस्याने सोडवावा, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

राज्यमंत्री श्री. भरणे यांनी पुणे महानगरपालिकेने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाप्रमाणे नियमानुसार पाणीवापर करावा. अधिकचे पाणी वापरल्यामुळे सिंचनासाठी पाणी कमी पडत असून कालव्याच्या अखेरपर्यंतच्या (टेल) भागात कमी दाबाने आणि कमी काळ पाणी राहते असे सांगितले.

नीरा उजवा तसेच डावा कालवा :

नीरा प्रणालीअंतर्गत प्रकल्पांमध्ये गतवर्षीपेक्षा सुमारे सव्वादोन टीएमसी अधिक पाणी असून समाधानकारक स्थिती असल्याने रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी आवर्तने सोडण्यास कोणतीही अडचण राहणार नाही असे यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीस राज्यमंत्री श्री. भरणे, आमदार समाधान अवताडे, शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रणजीतसिंह मोहिते-पाटील, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, नीरा- भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, सांगोला सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक साळुंखे-पाटील, पाणीवापर संस्था प्रतिनिधी सुरेश पालवे-पाटील आदी उपस्थित होते.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) चार्जिंग पायाभूत सुविधांकरिता सुधारित एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे आणि मानके उर्जा मंत्रालयाद्वारे जाहीर

0

नवी दिल्ली- केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने 14 जानेवारी, 2022 रोजी इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) चार्जिंग पायाभूत सुविधांकरिता  सुधारित एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे आणि मानके जारी केली आहेत.  इलेक्ट्रिक वाहनांकरिता, सुरक्षित, विश्वासार्ह, सहजसुलभ  आणि परवडणाऱ्या चार्जिंग पायाभूत सुविधा आणि व्यवस्था सुनिश्चित करून भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा जलद अवलंब करण्याची क्षमता आणणे, हा यामागचा उद्देश आहे. यामुळे संपूर्ण इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थेला चालना मिळून ऊर्जा सुरक्षा आणि देशाची उत्सर्जन तीव्रता कमी होण्यास साहाय्य मिळेल.

ही मार्गदर्शक तत्त्वे सर्वसमावेशक आहेत आणि त्यात

अ) इलेक्ट्रिक वाहनांच्या वैयक्तिक मालकांसाठी; 

ब) सार्वजनिक चार्जिंग स्थानकांसाठी  (PCS) तरतुदींचा समावेश आहे. महत्त्वाचे पाऊल म्हणजे मालक त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग  त्यांच्या निवासस्थानी/कार्यालयात त्यांच्या विद्यमान वीज जोडणीचा वापर करून  करू शकतील. सार्वजनिक चार्जिंग पायाभूत सुविधांसोबत   लांब पल्ल्याच्या ईव्ही आणि/किंवा अधिक भाराच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी  सार्वजनिक चार्जिंग  पायाभूत सुविधांच्या  आवश्यकता नमूद करण्यात आल्या आहेत. .

कोणतीही व्यक्ती/संस्था परवान्याच्या आवश्यकतेशिवाय सार्वजनिक चार्जिंग स्थानक  स्थापन करू शकतात. मात्र  अशी स्थानके  तांत्रिकदृष्ट्या योग्य, सुरक्षितता तसेच कार्यप्रदर्शन मानके आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार दिलेले प्रोटोकॉल तसेच ऊर्जा मंत्रालय, ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो (BEE) आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरण (CEA) यांनी  वेळोवेळी आखलेल्या नियम/मानके/विनिर्दिष्ट तपशील  यांची पूर्तता करणारी असणे आवश्यक आहे.  सार्वजनिक  चार्जिंग स्थानकांसाठी  (PCS)  अनुपालन आवश्यकतांची  संपूर्ण यादी देखील तयार करण्यात आली  आहे. यामध्ये नागरी, वीज आणि सुरक्षा आवश्यकतांसाठी “योग्य” पायाभूत सुविधांसाठीच्या प्रमाणपद्धतींचा  समावेश आहे.

टेक्नॉलॉजी अग्नोस्टिक (विविध ठिकाणच्या तंत्रज्ञानाला अनुरूप) चार्जिंग स्टँडर्ड्स: बाजारात  उपलब्ध असलेली प्रचलित आंतरराष्ट्रीय चार्जिंग मानकेच नव्हे तर नवीन भारतीय चार्जिंग मानके देखील प्रदान करून मार्गदर्शक तत्त्वे अधिक टेक्नॉलॉजी अग्नोस्टिक  करण्यात  आली आहेत.

महसूल विभागणी मॉडेलच्या माध्यमातून सार्वजनिक चार्जिंग केंद्रांसाठी सवलतीच्या दरात जागा : इलेक्ट्रिक वाहनांच्या विकास कालावधीत चार्जिंग केंद्रांना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य स्वरूप देण्याचे आव्हान पेलण्यासाठी या केंद्रांकरिता वापरल्या जाणाऱ्या जागेसाठी महासून विभागणी मॉडेल निश्चित करण्यात आले आहे. सरकारकडे अथवा सार्वजनिक संस्थांकडे उपलब्ध असलेली जमीन सरकारी चार्जिंग केंद्रे उभारण्याचे काम करणाऱ्या सरकारी अथवा सार्वजनिक संस्थेला महसूल विभागणी तत्वावर देण्यात येईल आणि त्या बदल्यात अशा सरकारी चार्जिंग केंद्रांनी तिमाही तत्वावर 1 रुपया प्रती किलोवॅट या निश्चित दराने जमीन-मालक असलेल्या संस्थेला रक्कम चुकती करणे बंधनकारक असेल. या संदर्भातील मार्गदर्शक तत्वांमध्ये महसूल विभागणी मॉडेलचा देखील समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीला 10 वर्षांच्या कालावधीचे असे महसूल विभागणी करार करता येतील. सार्वजनिक चार्जिंग केंद्रे उभारणाऱ्या खासगी संस्थांसाठी देखील निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून 1 रुपया प्रती किलोवॅट हा पायाभूत दर ठरवून सरकारी जमीन मालक संस्थांना महसूल विभागणी मॉडेल स्वीकारता येईल.

इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या सरकारी चार्जिंग स्थानकाला होणाऱ्या विद्युतपुरवठ्याचे दर: इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या सरकारी चार्जिंग स्थानकाला जो विद्युतपुरवठा होईल त्याचा दर एकसमान असेल आणि 31 मार्च 2025 पर्यंत हा दर सरासरी पुरवठा दरापेक्षा जास्त नसेल. वाहनांच्या बॅटरीचे चार्जिंग करण्यासाठी देखील हाच दर लागू असेल.देशांतर्गत वापरासाठी लागू असणारा दर देशांतर्गत चार्जिंगसाठी लागू असेल.

सेवा कराची कमाल मर्यादा राज्य सरकारांकडून निश्चित केली जाईल : विद्युतपुरवठा सवलतीच्या दराने होत आहे आणि अनेक ठिकाणी सरकारी चार्जिंग केंद्रे उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे अनुदान दिले जाईल हे सत्य लक्षात ठेवून राज्य सरकारला अशा चार्जिंग केंद्रांकडून आकारल्या जाणाऱ्या सेवा कराची कमाल मर्यादा निश्चित करावी लागेल.

खुला प्रवेश : कोणतेही सरकारी चार्जिंग केंद्र अथवा चार्जिंग केंद्रांच्या मालिकेसाठी लागणारी वीज कोणत्याही विद्युत निर्मिती कंपनीकडून घेण्यासाठी मोकळीक असेल. सर्व बाबींची पूर्तता असलेला अर्ज सादर झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत यासाठीचा खुला प्रवेश दिला जाईल. परस्पर अनुदानाची सध्याची पातळी ( दरविषयक धोरणातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार 20% पेक्षा अधिक नाही), प्रेषण शुल्क आणि व्हिलिंग शुल्क यांसह लागू असलेले अधिभार त्यांना भरावे लागतील. या तरतुदीमध्ये उल्लेख केलेल्या अधिभार अथवा शुल्कांखेरीज इतर कोणताही अधिभार अथवा शुल्क भरावे लागणार नाही.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारी चार्जिंग सुविधा सुरु करताना : खाली दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार टप्प्याटप्प्याने ही केंद्रे उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे:

टप्पा 1 (1 ते 3 वर्षे): वर्ष 2011 मधील जनगणनेनुसार ज्यांची लोकसंख्या 40 लाखांहून अधिक आहे अशी सर्व महानगरे, या महानगरांना जोडणारे सर्व कार्यरत द्रुतगती महामार्ग आणि यापैकी प्रत्येक महानगराला जोडणारे महत्त्वाचे महामार्ग यांच्यासाठी चार्जिंग केंद्रे उभारण्याचे काम या टप्प्यात हाती घेतले जाईल. ही सर्व महानगरे आणि त्यांना जोडणाऱ्या सध्या कार्यरत असलेल्या द्रुतगती महामार्गांची यादी तयार करण्यात आली आहे.

टप्पा 2 (3 ते 5 वर्षे): या टप्प्यामध्ये राज्यांच्या राजधानीची शहरे, केंद्रशासित प्रदेशांची मुख्यालये अशा मोठ्या शहरांमध्ये  वितरीत आणि प्रात्यक्षिक परिणामांसाठी चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचे काम हाती घेतले जाईल.

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्याची आत्महत्या

0

पुणे-राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आज शनिवारी पुण्यातील सदाशिव पेठेत आत्महत्या केली आहे. अमर मोहिते असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा सांगलीचा आहे. पीएसआयच्या फिजिकलमधून बाहेर पडला होता, तेव्हापासून तो नैराशात असल्याचे समजते.

एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची दुसरी वेळ
दरम्यान, पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी पुण्यातील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर आज सांगलीच्या अमर मोहिते नावाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.

अमर मोहिते हा मूळचा सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो अभ्यासासाठी पुण्यात आला होता. तो पुण्यातील सदाशिव पेठेतील हॉस्टेलमध्ये राहत होता. मोहिते पीएसआय फिजिकलची तयारी करत होता. पीएसआयच्या फिजिकलमधून अमर मोहिते हा बाहेर पडला होता.

नवजोतसिंह सिद्धू अमृतसर पुर्वेतून, तर मालविका सूद मोगातून निवडणुकीच्या रिंगणात

0

 पंजाब काँग्रेसची पहिली 86 उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली-काँग्रेसने पंजाबमध्ये विधानसभेची आपली पहिली यादी जारी केली आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे चमकौर साहिब आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू हे अमृतसर ईस्ट येथून निवडणुकीच्या रिंगणात असतील. तर अभिनेते सोनू सुद यांची बहिण मालविका सूदला मोगा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आले आहे.

काँग्रेस पंजाब विधानसभेसाठी कंबर कसली असून, आज आपली पहिली 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे चमको साहिब या ठिकाणाहून निवडणूक लढवणार आहेत. तर नवजोत सिंह सिंद्धू यांनी अमृतसर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अभिनेते सोनू सुद यांनी बहिण मालविका हिला मोगा येथील उमेदवारी देण्यात आली. तर गायक सिंद्धू मूसेवाला यांना मानसा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर तर कादियातून प्रताप सिंह बाजवा, पठानकोटमधून अमित विज आणि दीनानगर येथून अरुणा चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बलबीर सिंद्धू हे मोहाली येथून मैदानात उतरणार आहेत. तर कॅप्टन अमरिंदर सिंहचे जवळचे नातेवाईक असलेले कॅप्टन संदीप संधू यांना देखील काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. तर मलोटचे आमदार आणि विधानसभा अध्यक्ष अजब सिंह भट्टी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याजागी आम आदमी पार्टी सोडून काँग्रेसमध्ये येणाऱ्या रुपिंदर कौर रुबी यांनी तिकीट देण्यात आले आहे.

तत्पूर्वी, दिल्लीत शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत तिकिटांची पहिली यादी अंतिम करण्यासाठी विचारमंथन सुरू होते. मात्र तरीही पाच नावांवर एकमत होऊ शकले नाही. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत विचारमंथन झाले. पंजाबमधील सर्व दिग्गज नेत्यांनी आपली बाजू सोनिया गांधींसमोर मांडली आहे. सुमारे 20 जागांवर आपल्या समर्थकांचे समायोजन करण्याच्या प्रकरणात सिद्धू आणि चन्नी विरोध करत असल्याची बाब समोर आली आहे.

74 व्या लष्करदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली

0

पुणे-

 74 व्या लष्करदिनानिमित्त, दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन, यांनी पुष्पचक्र अर्पण करून राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूरवीरांना आदरांजली वाहिली.  हा कार्यक्रम पुण्यातील राष्ट्रीय युध्दस्मारक येथे कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य पालन करून आयोजित करण्यात आला होता.

 15 जानेवारीला लष्करदिन (आर्मी डे) साजरा केला जातो.  1949मध्ये या दिवशी लेफ्टनंट जनरल (नंतरचे फील्ड मार्शल) के.एम. करिअप्पा,भारतीय लष्कराचे पहिले प्रमुख ( कमांडर-इन-चीफ) म्हणून नेमले  गेले होते. दर वर्षी  निःस्वार्थपणे देशाची सेवा करणाऱ्या आणि धैर्य आणि बलिदानाचे सर्वोच्च उदाहरण घालून देणाऱ्या लष्करातील जवानांचा सन्मान केला जातो,

 देशाच्या पश्चिम सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या दक्षिण कमांडने स्वातंत्र्यानंतर सर्व मोठ्या लष्करी कारवायांमध्ये भाग घेतला आहे आणि नैसर्गिक आपत्ती आणि इतर आपत्तींच्या वेळी नागरिकांना मदत केली आहे.  74 व्या लष्कर दिनानिमित्त, दक्षिण कमांडच्या अधिकारी आणि सैनिकांनी भारतीय सैन्याची गौरवशाली परंपरा जपण्याची आणि राष्ट्राची अखंडता आणि सुरक्षितता जपण्याची शपथ घेतली.
 
  दक्षिण कमांड प्रमुखांनी या शुभ प्रसंगी सर्व पदांवरील अधिकारी, शूर जवान, वीर नारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा दिल्या तसेच दक्षिण कमांडच्या सर्व अधिकारी आणि जवानांना अंतर्गत आणि बाह्य शत्रूंपासून मातृभूमीचे रक्षण करण्याच्या कार्यात स्वतःला समर्पित करण्याचे आवाहन केले.  कोणत्याही आपत्ती किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांना सतत मदत करण्याबाबत दक्षिण कमांडच्या वचनबद्धतेबाबत विश्वासही त्यांनी  प्रकट केला.

स्थायी समिती अध्यक्षांची ‘वाझेगिरी

0

भ्रष्टाचार करायला अक्कल लागत नाही

जाधव, चहल, वेलारसु यांची ‘वाझेगिरी

भाजपा आमदार अमित साटम यांचा हल्लाबोल

भाजपाचा स्थायी समिती अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव

मुंबई-गेल्या २५ वर्षांत महापालिकेत ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे तरी ‘आमच्या कारभारात लपवाछपवी नाही’ असे म्हणणारे मुख्यमंत्री १५ कोटींच्या ‘मनी लॉन्ड्रिंग’ प्रकरणात आयकर खात्याने ताशेरे ओढलेल्या स्थायी समिती अध्यक्षांचा अभिमान बाळगतात हे दुर्दैवी आहे. स्थायी समितीत बेकायदेशीर प्रस्ताव मंजूर केले जात असताना ही लपवाछपवी नेमकी कशासाठी? भ्रष्टाचारासाठी की, मलिदा लाटण्यासाठी? असा खोचक सवाल भाजपा आमदार अमित साटम यांनी पत्रकार परिषदेत विचारला. पालिकेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, आयुक्त इक्बालसिह चहल, वेलरसु यांच्या रुपात ‘वाझेगिरी’ सूर असून त्याचा नेमका ‘हँडलर’ कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे तसेच भ्रष्टाचार करायला अक्कल लागत नाही अशी बोचरी टीका आमदार साटम यांनी केली. सत्ताधाऱ्यांची घटका भरली असून येणाऱ्या निवडणुकीत महापालिकेला खड्ड्यात घालणाऱ्यांना मुंबईकर जनता उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आमदार साटम यांनी पत्रकार परिषदेत दिला. भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट, पक्षनेता विनोद मिश्रा यांच्यासह नगरसेविका राजेश्री शिरवडकर, ज्योती अळवणी उपस्थित होते.

‘प्रत्येक कामासाठी तिळगुळ द्यावे लागतात’ असं थेट मुख्यमंत्री म्हणतात याचा अर्थ पालिकेतील २५ वर्षांच्या भ्रष्टाचाराचे सत्य त्यांनी स्वीकारले आहे. सचिन वाझे ‘ओसामा बिन लादेन’ नाही असं म्हणायला अक्कल लागत नाही अशी बोचरी टीका करत स्थायी समितीत होणाऱ्या भ्रष्टाचारावर आमदार साटम यांनी ताशेरे ओढले. कोविडच्या काळातही ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असून कोविड सेंटरची कामे नातेवाईक गँगला दिली जातात. कोविड काळात केलेल्या कामाचं कौतुक करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी ४ लाख ८५ हजारांपैकी १ लाख ४२ हजार मृत्यू केवळ महाराष्ट्रातले असल्याकडे आमदार साटम यांनी लक्ष वेधले. कोस्टल रोड, पोईसर, मिठी नदी, शालेय टॅब खरेदी, ट्रेंचिंग अश्या कामात भ्रष्टाचार करून सर्वसामान्य जनतेला ओरबडता येईल तेवढे ओरबडायचे काम सुरु असून महापालिकेत पराभव होण्याच्या भीतीमुळे बेकायदेशीर प्रस्ताव पास केले जात आहेत. त्याच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून जनतेच्या, प्रसंगी न्यायालयात दाद मागू आणि न्यायालयात तरी न्याय मिळेल असा विश्वास आमदार साटम यांनी व्यक्त केला.

पालिकेत स्थायी समिती अध्यक्षांचा मनमानी कारभार सुरू असून स्थायी समितीत महत्वाच्या प्रस्तावावर विरोधकांना बोलू दिले जात नाही. स्थायी समिती अध्यक्षांकडून प्रस्तावास तीन सुस्पष्ट दिवस झाले नसतानाही प्रस्ताव समितीसमोर आणून बेकायदेशीरपणे मंजूर केले जातात. त्यांच्या हुकुमशाही वृत्तीमुळे लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत असून कायद्याचे पालन होत नसल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या स्थायी समिती सदस्यांनी अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला आहे.

टॅब खरेदीत घोटाळा
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदीच्या प्रस्तावात भ्रष्टाचार झाला असून याबाबत वारंवार भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्मरणपत्र देऊनही त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पूर्वीपेक्षा जास्त खर्च करूनही शैक्षणिक वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांना टॅब दिले जात आहेत. प्रत्येक टॅबसाठी अंदाजित रक्कम २० हजार रुपये असून टॅबचा दर्जा, किंमत, कंपनी याबाबतची कोणतीही माहिती सभागृहाला देण्यात आलेली नाही. २०१५ मध्ये खरेदी केलेल्या अनेक टॅबमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. चार्जिंग न होणे, टॅब हँग होणे, शैक्षणिक ॲप न उघडणे अश्या अनेकविध समस्या आढळून आल्या असताना नवीन टॅब खरेदी प्रसंगी या समस्यांचा विचार करण्यात आलेला नाही. टॅबमध्ये शैक्षणिक ॲप्लिकेशनसाठी प्रति टॅब २ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत तर वाढीव वॉरंटीसाठी प्रति टॅब ४ हजार ४०० रुपये खर्च येणार आहे. तर टॅबमध्ये स्वतंत्र मेमरीही नाही. या सर्व बाबी अनाकलनीय असून टॅब खरेदीसाठी बजेट १० कोटी असताना ३८ कोटींची टॅब खरेदी कशी केली जाते असा सवाल करत हा तर जनतेचा पैसा कंत्राटदाराच्या खिशात घालण्याचा प्रकार असल्याची टीका गटनेते श्री. प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

जंबो कोविड सेंटरच्या खर्चाचा हिशोब नाही
बीकेसी रुग्णालय वांद्रे (पूर्व) व दहिसर जम्बो कोविड सेंटरच्या खर्चातही भ्रष्टाचार झाला असून खर्चाची तपशीलवार माहिती सदस्यांना दिली जात नाही आयुक्तांनी केलेल्या ५ ते ७५ लाखापर्यंतचा खर्चाची माहिती स्थायी समितीला १५ दिवसाच्या आत सादर करणे बंधनकारक असताना त्याचे उल्लंघन केले जात आहे. कंत्राटदाराची नेमणूक करताना त्याची जाहिरात सार्वजनिक वृत्तपत्र किंवा मुंबई मनपाच्या संकेतस्थळावर दिली जात नाही. याचा अर्थ ही सर्व प्रक्रियाच बेकायदेशीर असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप गटनेते श्री. प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

गहाळ फाईल गेली कुठे?
मुंबईकरांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या पावसाळी औषधांच्या खरेदीचा प्रस्ताव आठ महिन्यांपासून महापौर कार्यालयात प्रलंबित होता. मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची असणारी ही फाईल अचानक गहाळ कशी होऊ शकते, असा प्रश्न श्री. प्रभाकर शिंदे यांनी विचारला आहे. महापौरांच्या या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य ४ लाख १५ हजार मुंबईकरांना खाजगी लॅबमध्ये आरोग्य तपासणी करावी लागली. त्याचा साधारणपणे ६० ते ६५ कोटींचा भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. खाजगी लॅब मालक आणि महापौरांनी संगनमताने फाईल गायब तर केली नाही ना ? अशी शंका गटनेते श्री. प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केली.

पोईसर नदीवरील खर्च दुप्पट
पोईसर नदीवरील सेवारस्ता, पर्जन्य जलवाहिनी बांधणे, पाच मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी कार्यालयीन अंदाज मूळ रक्कम ५०० कोटींवरून १५०० कोटी तिप्पट कशी झाली? हे अनाकलनीय आहे. या खर्चाचाही तपशील स्थायी समिती सदस्यांना दिला जात नाही याचा अर्थ कंत्राटदार आणि सत्ताधारी यांच्यात मिलीभगत आहे अशी खरमरीत टीका गटनेते श्री. प्रभाकर शिंदे यांनी केली.

आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’त ‘खिसा’ सर्वोत्कृष्ट!

0

‘साईड मिरर’, ‘लगाम’ यांचाही गौरव!
कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या नावाने सर्व पुरस्कार वितरीत!

‘प्रबोधन गोरेगाव’ संस्थेतर्फे आयोजित ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात’ ‘खिसा’ या लघुपटाने सर्वेत्कृष्ट लघुपटाचा मान मिळवला आहे. याच लघुपटासाठी राज मोरे सर्वेत्कृष्ट दिग्दर्शक तर वेदांत क्षीरसागर सर्वेत्कृष्ट बालकलाकार ठरला आहे. मदन काळे दिग्दर्शित ‘लगाम’ या लघुपटाला दुसऱ्या क्रमांकाचे तर विराज झुंजारराव दिग्दर्शित ‘साईड मिरर’ला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे अभिनेते संदीप कुलकर्णी, प्रबोधन गोरेगावचे संस्थापक व महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, अशोक राणे, दिग्दर्शक निखील महाजन, प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितिन शिंदे आदी उपस्थित होते.

राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन गोरेगावच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने पहिला प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रभादेवी येथी ल पु.ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाटय़मंदिर येथे शुक्रवारी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि प्रसिध्द अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रवीण खाडे दिग्दर्शित ‘ताजमहाल’ हा सामाजिक महाराष्ट्र या विषयावरील सर्वेत्कृष्ट लघुपट ठरला. तर ‘वन्स ही डिड अटीनएज पेंटिंग’ या लघुपटासाठी दीक्षा सोनावणे सर्वेत्कृष्ट अभिनेत्री ठरली. या महोत्सवात ७७ मराठी लघुपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यामधून १५ लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. यातून सर्वोत्कृष्ट लघुपटाची निवड करण्यात आली आहे. यावेळी इफ्फी महोत्सवात जागतिक स्पर्धा वि भागात पुरस्कार पटकावणाऱ्या ‘गोदावरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांचा विशेष गौरव करण्यात आला.

‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’चे अध्यक्ष सुभाष देसाई याप्रसंगी बोलताना म्हणाले, “हा लघुपट यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार. ‘प्रबोधनच्या ५०व्या वर्धापनाचे’ औचित्य साधून काय करता येईल? याविषयी सर्व पदाधिका-यांसोबत चर्चा करताना, ‘लघुपट महोत्सव’ करावा असे ठरले, आणि त्यासाठी एकमेव नाव होते ते म्हणजे ‘चित्रपट पाहिलेला माणूस’ अशोक राणे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे हा पहिला दर्जेदार महोत्सव प्रबोधनने यशस्वी केला. ज्यांनी ज्यांनी या महोत्सवात सहभाग घेतला त्या सर्वांचे कौतुक. एका चमकदार कल्पनेतून कलावंताला आपली प्रतिभा मांडता येते. आणि ‘प्रतिभा’ आहे म्हणून ‘प्रतिमा’ पुढे सादर करता येते. या सर्व प्रतिभासंपन्न कलावंतांचे आभार, त्यांच्या उदंड सहभागामुळे हा लघुपट महोत्सव विशेष झाला, आम्ही यापुढेही प्रत्येकवर्षी हा महोत्सव असाच सुरु ठेवणार असून कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या नावाने सर्व पुरस्कार वितरीत होतील.”

या समारंभाचे प्रमुख पाहुणे अभिनेते संदीप कुलकर्णी म्हणाले “टेक्नॉलॉजी येते, फॉरमॅट्स बदलतात, सगळं काही बदलतं, मात्र कलाकार तोच राहतो, थियटर मधून, टेलिव्हिजन, चित्रपटातून सतत वेगळ वेगळ पहात रहा. मी सर जे.जे.मध्ये फाईन आर्टसला असताना आम्हाला तेव्हा पाचही वर्षे प्रख्यात पेंटर प्रोफेसर प्रभाकर कोलते हे शिक्षक होते, त्यांनी आम्हाला आर्टिस्ट म्हणजे काय हे डिस्कवर करायला लावलं. खरंतर मला पेंटर व्हायचं आणि पॅरिसमध्ये स्वतःचा स्टुडीओ सुरु करायचा, असं सर्वकाही ठरलं होत. मात्र हे करत असताना आंतरराष्ट्रीय चित्रपटांच एक्सपोजर पाहिलं आणि मी चित्रपटांकडे, त्यातील अभिनयाकडे आकर्षित झालो. कलाकार हा एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतो. हा फेस्टिव्हल सुद्धा तुमच्या जीवनात असाच असंच काहीतरी वेगळ घडवणार आहे. ‘प्रबोधन’.. सोबत जोडली गेलेली माणसे मुळात वेगळी आणि दिग्गज आहेत.”

या फेस्टिवलची रचना अत्यंत वेगळी आणि अभ्यासपूर्ण केली असून आपल्या मराठी कलावंतांनी निर्माण केलेल्या कलाकृती जगभरात नावाजल्या जाव्यात या उद्देशाने ‘कान्स’, ‘ओबरहौसेन’(जर्मनी), कार्लोवी वेरी(झेक रिपब्लिक) या तीन सर्वोत्कृष्ट जागतिक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पाठविण्यासाठी पाच लघुपटांची निवड करण्यात आली. यासाठीचा सर्व खर्च व प्रक्रिया “प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा”च्या वतीने केला जाणार आहे. या महोत्सवाचे परीक्षण मोनालिसा मुखर्जी, मंदार कमलापूरकर, समीक्षक पत्रकार लेखक गणेश मतकरी, मनोज कदम व विजय कलमकर यांनी केले.

करोनाचे सर्व नियम पाळून मोजक्याच कलावंत तंत्रज्ञांच्या उपस्थित पहिल्या ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या’ अंतिम फेरीचे आयोजन पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले होते. या प्रसंगी ’५२ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ जागतिक स्पर्धा विभागात पुरस्कार मिळविणार्याग ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटातील प्रमुख अभिनेते जितेंद्र जोशी यांचा विशेष सन्मान होणार होता मात्र जितेंद्र जोशी करोनाग्रस्त असल्याने त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्वांशी संवाद साधला.

महोत्सवातील पुरस्कार विजेते लघुपट

‘खिसा’ सर्वोत्कृष्ट लघुपट – प्रथम पुरस्कार
रु. ७५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

‘लगाम’ सर्वोत्कृष्ट लघुपट – द्वितीय पुरस्कार
रु. ५०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

‘साईड मिरर’ सर्वोत्कृष्ट लघुपट – तृतीय पुरस्कार
रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

‘ताजमहाल’ सर्वोत्कृष्ट लघुपट सामाजिक लघुपट
(रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

कान्स, ओबरहौसेन जर्मनी, कार्लोवी वेरी (झेक रिपब्लिक) या तीन सर्वोत्कृष्ट जागतिक महोत्सवांमध्ये पाठविण्यासाठी निवड झालेले लघुपट
१. अर्जुन / दिग्दर्शक: शिवराज वाईचळ
२. बटर चिकन / दिग्दर्शक: मयुरेश वेंगुर्लेकर
३. साईड मिरर / दिग्दर्शक: विराज झुंजारराव
४. लगाम / दिग्दर्शक: मदन काळे
५. ताजमहाल / दिग्दर्शक: प्रविण खाडे

वैयक्तिक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट अभिनेता – हरीश बारस्कर – (ताजमहाल)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री दीक्षा सोनावणे – (वन्स ही डिड अ टीनएज पेंटिंग)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार – वेदांत क्षीरसागर – (खिसा)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – राज मोरे – (खिसा)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट पटकथालेखक – कैलास वाघमारे – (खिसा)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार – किरण जाधव – (लगाम)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट संकलक मयुरेश वेंगुर्लेकर – (बटर चिकन)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट ध्वनि – अनमोल भावे – (अर्जुन)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)