Home Blog Page 2067

टाटा कॅपिटल शाखांची संख्या २५० वर पोहोचली.

0

टाटा कॅपिटलने ६० नवीन शाखा सुरु करून २५० शाखांचे नेटवर्क उभारण्याचा महत्त्वाचा टप्पा पार केला

o मार्च २०२३ पर्यंत शाखा विस्तार ३०० पर्यंत वाढवण्याची योजना

o विस्तार योजनेमध्ये सर्वाधिक भर द्वितीय व तृतीय श्रेणीतील बाजारपेठांवर

o सर्व विभाग मिळून एकूण २५ लाख ग्राहक घेतात टाटा कॅपिटलच्या सेवा व उत्पादनांचा लाभ

मुंबई, २८ फेब्रुवारी २०२२: टाटा कॅपिटल लिमिटेड या टाटा समूहातील आर्थिक सेवा पुरवणाऱ्या प्रमुख कंपनीने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ६० नवीन शाखा सुरु करून, द्वितीय व तृतीय श्रेणी शहरांवर विशेष भर देत देशात महत्त्वाकांक्षी विस्ताराची आगेकूच कायम राखली आहे. आता टाटा कॅपिटलचे भारतभरात पसरलेले विशाल नेटवर्क २५० शाखा व एक्स्टेंशन काउंटर्सवर पोहोचले आहे.
तब्बल २५ लाखांहून जास्त ग्राहकांसाठी टाटा कॅपिटल ही विश्वसनीय आर्थिक साथीदार ठरली असून याठिकाणी त्यांना सर्वसमावेशक, वैविध्यपूर्ण उत्पादने व सेवांचा लाभ घेता येतो. ही कंपनी आपल्या नेटवर्कचा सातत्याने विस्तार करत असून मार्च २०२३ पर्यंत आपल्या देशभरातील शाखांची संख्या ३०० वर पोहोचवण्याचे उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे. द्वितीय व तृतीय श्रेणी शहरांवर विशेष भर देत केल्या जात असलेल्या शाखा विस्तारामुळे टाटा कॅपिटल आजवर आर्थिक सेवांपासून वंचित राहिलेल्या ग्राहकवर्गाला त्यांचा लाभ मिळवून देऊन त्या भागांमधील आर्थिक घडामोडींना मदत करू शकेल.
टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसचे एमडी श्री. सरोश अमरिया म्हणाले, “टाटा कॅपिटलमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना सर्व डिजिटल आणि फिजिकल प्लॅटफॉर्म्सवर सेवा व उत्पादने पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ग्राहकांसोबतचे आमचे संबंध अधिकाधिक दृढ बनवण्यात शाखा खूप महत्त्वाची भूमिका बजावते तसेच त्यांच्यासाठी नवनवीन आर्थिक सुविधा निर्माण करण्यात आम्हाला मदत करते. आमची नाविन्यपूर्ण व सहज उपलब्ध होऊ शकतील अशी डिजिटल उत्पादने आमच्या शाखा विस्तार उपक्रमांना साजेशी असून वृद्धीच्या नव्या दिशा शोधण्यातही आम्हाला त्यांचा उपयोग होतो. द्वितीय व तृतीय श्रेणी बाजारपेठांमध्ये विस्तार करून देशात सर्वसमावेशक वृद्धीला चालना देण्याचा उद्देश आम्ही पूर्ण करू पाहत आहोत.”
टाटा कॅपिटलच्या सेवा व उत्पादनांमध्ये विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांकडून घेतली जाणारी कर्जे, गृहकर्ज (परवडण्याजोग्या घरांसाठी कर्जाचा देखील त्यामध्ये समावेश आहे), लघु व मध्यम उद्योजक/कॉर्पोरेट्सना वित्तपुरवठा व संपत्ती व्यवस्थापन सेवा यांचा समावेश असून देशभर पसरलेल्या २५० शाखा व डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर त्यांचा लाभ घेता येतो. टाटा कॅपिटल वेबसाईटवर लॉग इन करून, मोबाईल ऍप्स, ऍलेक्सावर टिया (चॅट व व्हॉइस बॉट), गूगल असिस्टंट आणि व्हाट्सअपवर देखील ग्राहकांना टाटा कॅपिटलच्या सेवांचा लाभ घेता येतो.

पीएमपीएमएल कडून यवत ते सासवड (मार्गे भुलेश्वर) नवीन बसमार्ग सुरू

0


भुलेश्वर देवस्थानच्या पायथ्यापासून वाघापूर चौफुला पर्यंत बससेवेची वाजतगाजत मिरवणूक

पुणे-पीएमपीएमएल कडून आज पासून मार्ग क्रमांक २२० – यवत ते सासवड (मार्गे भुलेश्वर) हा नवीन बस मार्ग सुरू करण्यात आला. आमदार संजय जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते या बससेवेचा शुभारंभ भुलेश्वर देवस्थानच्या पायथ्याशी करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, पंचायत समिती सदस्या सुनिता कोलते, भुलेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षअरुण यादव, पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, शेवाळेवाडी डेपो मॅनेजर . सोमनाथ वाघोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बससेवेबद्दल बोलताना आमदार संजय जगताप म्हणाले,”ही बससेवा माळशिरस, टेकवडी, आंबळे, राजेवाडी, वाघापूर चौफुला परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना उपयुक्त ठरेल. सासवडच्या विकासात पीएमपीएमएलचे योगदान मोठे आहे. लोकप्रतिनिधींनी पीएमपीएमएलच्या बससेवेचा वापर केल्यास नागरिकही या बससेवेचा जास्तीत जास्त वापर करतील. नवीन सुरू झालेला कोणताही बसमार्ग टिकवणे आपल्या हातात असते. त्यासाठी खाजगी वाहनांचा वापर टाळून आपण सर्वांनी पीएमपीएमएलच्या बससेवेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे.”
मार्ग क्रमांक २२० – यवत ते सासवड (मार्गे भुलेश्वर) या बससेवेचा मार्ग यवत, भुलेश्वर, माळशिरस, टेकवडी, आंबळे, राजेवाडी, वाघापूर चौफुला, सिंगापूर, उदाचीवाडी, वनपुरी, आंबोडी, सासवड असणार आहे. सध्या या मार्गावर ४ बसेस द्वारे साधारणपणे दर दीड तासाने बससेवा उपलब्ध असेल. यवत ते सासवड एकूण २२ फेऱ्या होणार आहेत. यवत ते सासवड पहिली बस सकाळी ६.३० वा. तर शेवटची बस संध्याकाळी ८.०० वा. आहे. तसेच सासवड ते यवत पहिली बस सकाळी ७.५५ वा. तर शेवटची बस रात्री ८.०० वा. आहे.
भुलेश्वर देवस्थानच्या पायथ्याशी या बससेवेचे उदघाटन झाल्यानंतर पुढे माळशिरस, भुलेश्वर विद्यालय, टेकवडी, आंबळे, राजेवाडी या ठिकाणी ग्रामपंचायत व विकास सोसायटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहात व फटाके वाजवून या बससेवेचे स्वागत केले. या बसचे चालक शिवलिंग पवार व वाहक अमृत बोरकर यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला. सदरची बससेवा सुरू झाल्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे, अशी भावना विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केली.

‘आयसीएआय’ पुणेच्या अध्यक्षपदी सीए काशिनाथ पठारे

0

उपाध्यक्षपदी सीए राजेश अग्रवाल, सचिवपदी सीए प्रीतेश मुनोत, खजिनदारपदी सीए प्रणव आपटे यांची निवड

पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेच्या अध्यक्षपदी सीए काशिनाथ पठारे यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी सीए राजेश अग्रवाल, सचिवपदी सीए प्रीतेश मुनोत, खजिनदारपदी सीए प्रणव आपटे, तर ‘विकासा’ या विद्यार्थी शाखेच्या अध्यक्षपदी सीए मौसमी शहा यांची निवड झाली आहे. २०२२-२०२३ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष सीए काशिनाथ पठारे यांनी मावळते अध्यक्ष सीए समीर लड्डा यांच्याकडून पदभार स्वीकारला. कार्यकारिणी सदस्य म्हणून सीए ऋषिकेश बडवे, सीए अमृता कुलकर्णी, सीए सचिन मिणियार, सीए अजिंक्य रणदिवे यांची निवड करण्यात आली आहे. 
यावेळी केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य आणि वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे उपाध्यक्ष सीए यशवंत कासार, सीए ऋता चितळे उपस्थित होते. शाखेच्या वतीने तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले. सीए समीर लड्डा यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामांविषयी तसेच राबविलेल्या योजनांविषयी माहिती दिली. सर्व सहकारी व कर्मचारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 
आयसीएआय पुणे शाखेची सुरुवात १९६२ मध्ये झाली. आज पुणे शाखेचे १०,००० पेक्षा अधिक सभासद आहेत. तर २२००० पेक्षा जास्त विद्यार्थी पुणे शाखेशी संलग्नित आहेत. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवन येथे अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या संस्थेत सनदी लेखापालांसाठी अनेक उपक्रमांचे आयोजन वर्षभर केले जाते. त्यामध्ये कार्यशाळा, चर्चासत्रे आदी गोष्टींचा समावेश आहे.

अखेर सरकारच्या आश्वासनानंतर छत्रपती संभाजीराजे यांचे उपोषण मागे

0

मुंबई-मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्याने, तसेच सरकारच्या आश्वासनानंतर खासदार संभाजीराजे यांनी अखेर आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. खासदार संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाची हाक दिली होती. आज उपोषणाचा तिसरा दिवस होता , आज सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर आपण उपोषण मागे घेत आहोत. असे संभाजीराजे म्हणाले.

संभाजीराजे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संयोगिता राजे या देखील उपोषणाला सोबत होत्या. त्यांनी देखील आपण उपोषण मागे घेत असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर अखेर खासदार संभाजी छत्रपती यांनी आज उपोषण मागे घेतले. तीन दिवसानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी उत्तर दिले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या.

राज्यसरकार आणि मराठा समाजाच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागण्या मान्य केल्या. केवळ मागण्या मान्य केल्या नाही तर त्याचे मिनिट्स आणले. या मागण्या किती दिवसात आणि कसा पद्धतीने पूर्ण करणार याचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. असे एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्यसरकार इतकी तयारी करेल याची मला अपेक्षा नव्हती. मात्र, सरकारने जी तयारी केली ते पाहून भारावलो आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे हे माहित आहे. पण, जेथे-जेथे माझी गरज बसेल तेथे राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेन मी सुद्धा तुमच्यासोबत आहे. अशी ग्वाही संभाजीराजे यांनी दिली आहे.

मराठा समाजाच्या खालील मागण्या झाल्या मान्य

  • मराठा समाजातील उमेदवारांना अधिकाधिक नोकऱ्या पुरवण्यासाठी प्रयत्न करणार.
  • सार्थीचं व्हीजन डॉक्यूमेंटबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन 30 जून, 2022 पर्यंत याची पूर्तता करणार.
  • सार्थी संस्थेमध्ये रिक्त असणारी पदं 15 मार्च, 2022 पर्यंत भरणार.
  • सार्थी संस्थेच्या आठ उपकेंद्रासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव देखील 15 मार्च, 2022 पर्यंत मंत्रीमंडळासमोर ठेवणार.
  • आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 100 कोटींपैकी 80 कोटी दिले असून आणखी 20 कोटी आणि पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त 100 कोटी निधी देणार.
  • व्याज परतावा संदर्भात कागदपंत्रांची पूर्तता करुन व्याज परतावा देऊ. यामुळे कर्ज मिळण्यास अडचणी येणार नाहीत, असं शिंदे यांनी सांगितलं.

…म्हणून राजे झाले भावूक

राज्यभरातून अनेक जण संभाजीराजे यांच्या उपोषणाला पाठिंबा देताना पाहायला मिळाले. आज काही वारकरी देखील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात दाखल झाले होते. यावेळी उपोषणात वारकऱ्यांनी अभंग सादर केला. त्यांचे कौतुक करताना संभाजीराजे भावूक झाले होते. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले.

पुन्हा हेमंत रासनेच स्थायी अध्यक्षपदावर

0

पुणे -पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाने विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. रासने यांनी नगरसचिव शिवाजी दौंडकर यांच्याकडे सोमवारी आपला अर्ज दाखल केला.
स्थायी समितीच्या सदस्यांची मुदत २८ फेब्रुवारीला संपत असल्याने नवीन समिती अस्तित्वात येणे आवश्यक आहे. पालिकेच्या सभागृहाची मुदत १४ मार्चला संपुष्टात येत असल्याने या समितीला १४ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यात आला. सत्ताधारी भाजपकडून रासने यांनी अर्ज भरला. यावेळी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, आमदार सुनील कांबळे, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रदीप गायकवाड यांनी अर्ज भरला. विरोधी पक्षनेते दिपाली धुमाळ, विशाल तांबे, बंडू गायकवाड, बाळा ओसवाल उपस्थित होते. ही निवडणूक येत्या शुक्रवारी०४ मार्चला सकाळी ११ वाजता पुणे महनगरपालिकेच्या नवीन इमारतीत होणार आहे.

भारतातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत 88% वाढ

0

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2022

भारतातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत 2013-14 नंतर 88% वाढ झाली आहे. 2013-14 सालच्या  66000 लाख अमेरिकन डॉलर्स च्या निर्यातीवरून 2021-22 साली  ही निर्यात 1,24,000 लाख अमेरिकन डॉलर्स पर्यंत वाढली आहे.

मोबाईल फोन्स, माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर (लॅपटॉप्स, टॅब्लेट्स),  टी व्ही व इतर ग्राहकोपयोगी वस्तू, औद्योगिक वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, आणि वाहनउद्योगात वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा या निर्यातीत मोठा सहभाग आहे.

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक धोरण 2019  अंतर्गत  इलेक्ट्रॉनिक सिस्टीम संरचना आणि उत्पादन (ESDM) या क्षेत्रात भारताला  जागतिक केंद्र बनवणे  हे  उद्दिष्ट असून त्यासाठी लागणारे घटक  विकसित करणे आणि या उद्योगासाठी  पोषक वातावरण तयार  करणे हे काम सुरु आहे. यात मोठ्या उत्पादकांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना (PLI), तसेच इलेक्ट्रॉनिक घटकांच्या व सेमीकंडक्टर्स उत्पादनासाठी प्रोत्साहन योजना (SPECS) , सुधारित इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्लस्टर योजना (EMC 2. 0) ही माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर उत्पादनासाठी असलेली उत्पादन संलग्न प्रोत्साहन (PLI) योजना, या चार योजनांद्वारे इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला पाठबळ देणे आणि त्यासाठी आवश्यक व्यवस्था तयार करणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत.

या क्षेत्रातील निर्यात सतत वाढत आहे. जानेवारी 2021 मधील 275. 4 लाख अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीपेक्षा जानेवारी 2022 मधील निर्यात 23. 69 % नी वाढून 340. 6लाख अमेरिकन डॉलर्स झाली आहे. जानेवारी 2020 मधील 258. 5 लाख अमेरिकन डॉलर्स किमतीच्या निर्यातीच्या तुलनेत जानेवारी 2022 मधील निर्यात 31. 75% नी वाढलेली दिसून येते.

2020-21 मधील (एप्रिल ते जानेवारी) मधील 228. 9 अब्ज अमेरिकन डॉलर्स निर्यातीच्या तुलनेत 2021-22 मधील (एप्रिल ते जानेवारी) निर्यात 335. 44 अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत अर्थात 46. 53% ने वाढली असून 2019-20 (एप्रिल ते जानेवारी) तील 264.13 अब्ज अमेरिकन डॉलर्स निर्यातीच्या तुलनेत ती 27 % वाढली. 

निर्यातीत वाढ होण्यासाठी सरकार अनेक सक्रिय पावले उचलत आहे. विशेषतः कोविड काळामध्ये  निर्यातीतील अडचणी, मर्यादा, आणि अडथळे दूर करण्यासाठी सरकारने विशेष देखरेख विभागाची स्थापना केली आहे. निर्यातदारांना परवाने मिळवण्यासाठी मदत करणारा व तक्रार निवारण करणारा एक माहिती तंत्रज्ञान आधारित  मंच स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. 

राज ठाकरे यांच्या हस्ते श्री संत नामदेव महाराज यांच्या पसायदान शिल्पाचे प्रकाशन

0

पसायदानाचे शिल्प आळंदी येथील नामदेव शिंपी धर्मशाळेस भेट 
पुणे : नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर शाखेच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पसायदान शिल्पाचे प्रकाशन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आळंदी येथील नामदेव शिंपी  धर्मशाळेस पसायदान शिल्प भेट देण्यात आले.  शिल्पकार अशोक काळे यांनी हे शिल्प साकारले आहे. 
प्रकाशन करण्यापूर्वी राज ठाकरे यांनी पसायदान शिल्पाचे पूर्ण वाचन केले. यावेळी नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेच्या वतीने त्यांचा पुणेरी पगडी, शाल श्रीफळ व माता जिजाऊ सोबत बाल शिवाजी यांची मूर्ती भेट देवून सत्कार करण्यात आला. 

यावेळी नामदेव समाजोन्नती परीषदेचे पुणे विभागीय उपाध्यक्ष संजय नेवासकर, पुणे शहराध्यक्ष संदिप लचके, शिल्पकार अशोक काळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस अजय शिंदे, पुणे शहर संघटक प्रल्हाद गवळी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधी समिती पुणे शहर अध्यक्ष अॅड. सतीश कांबळे, ना.स.प. पुणे शहराचे सचिव सुभाष मुळे, उपाध्यक्ष सोमनाथ मेटे, मुख्य समन्वयक प्रशांत सातपुते, सहसचिव विजय कालेकर, खजिनदार अक्षय मांढरे, सल्लागार सुभाष पांढरेकामे, कैलास देवळे, स्वप्निल खुर्द, संजय वैद्य, महाराष्ट्र मनसे सैनिक धनंजय दळवी व शिंपी समाज बांधव व मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मल्लखांब क्रीडा प्रकारात करिअरसाठी सर्वतोपरी मदत-भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील

0

पुढील वर्षी राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करणार

रोशनी मरगजेच्या शैक्षणिक पालकत्वाची घोषणा–शाहू-लक्ष्मी कला अकादमीची रोशनी मरगजे ही उत्तम मल्लखांबपटू असून, तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शिक्षणातही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रोशनीची आई ही घरकाम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याची माहिती यावेळी आ. पाटील यांना मिळाली. यानंतर तिच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेणार असल्याची घोषणा आ. पाटील यांनी यावेळी केली.

पुणे-भारतीय क्रीडाप्रकार नवोदित खेळाडुंमध्ये रुजावा, यासाठी मल्लखांबसारख्या क्रीडा प्रकारात करिअर करु इच्छिणाऱ्या खेळाडुंना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. तसेच, पुढील वर्षी राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचीही घोषणा आ. पाटील यांनी केली.

शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी आणि पुणे जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. अनुराधा येडके यांनी कोथरुडमधील पटवर्धन बाग येथील ग्राउंडवर दि. 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी आमदार चंद्रकांतदादा पाटील पुरस्कृत निमंत्रित जिल्हास्तरीय आमदार चषक मल्लखांब स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये एकूण 22 संलग्न संस्थेतील 450 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या सांगता कार्यक्रमात आ. चंद्रकांतदादा पाटील बोलत होते.

या स्पर्धेस पुण्यातील मल्लखांबातील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सन्मान कबड्डीतील अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, कबड्डीतील प्रथम पुरस्कार विजेत्या महिला श्रीमती शकुंतला खटावकर, मल्लखांबचे शिवछत्रपती पुरस्कार विजेत राजू जालनापूरकर, शाहू-लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या अध्यक्षा प्रा. अनुराधा एडके, सचिव राज तांबोळी, रविंद्र पेठे, चंद्रकांत पवार, जितेंद्र खरे, अभिजीत भोसले, सचिन परदेशी, सचिन पुरोहित, प्रतीक कोरडे, आकाश तगारे, चिन्मय बापट, सानिका नाडगौडा यांच्यासह भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, शिक्षण मंडळ अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, वासंती जाधव, वृषाली चौधरी, नगरसेवक सुशील मेंगडे, जयंत भावे, दीपक पोटे, स्विकृत सदस्या मिताली सावळेकर, संदीप बुटाला, जगन्नाथ कुलकर्णी, कुलदीप सावळेकर, अमोल डांगे, अजित जगताप, गिरीश भेलके, जयंत भावे, मंजुश्री खर्डेकर, पुनीत जोशी, प्रशांत हरसुले, अजित जगताप, रणजित हगवणे, स्वप्नील राजिवडे, प्रतीक पाटील, महेश पवळे आदी उपस्थित होते.
आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “भारतीय खेळाच्या विकासासाठी खेळांना राजाश्रय मिळावा यासाठी माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात भाजपाचे सरकारच्या काळात अनेक प्रयत्न केले. यात खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कायदा करुन, शासकीय नोकरीत सामावून घेतले. याचा ३०० पेक्षा जास्त खेळाडुंना लाभ झाला असून, अनेकांना प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या नोकरीची संधी मिळाली. भविष्यातही मल्लखांबसारख्या क्रीडा प्रकारात करिअर करु इच्छिणाऱ्यांसाठी सर्वतोपरी मदत करु,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

ते पुढे म्हणाले की, “गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे आपल्या खेळाडुंना आपल्यातील कलागुण दाखविण्याची संधी मिळाली नाही. यंदा कोविडचे नियम पाळून आपण जिल्हास्तरिय स्पर्धेचे आयोजन केले. पण पुढील वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेचे नियोजन करणार असून, त्याचे नियोजन आतापासून सुरु करावे.” अशा सूचना आ. पाटील यांनी संयोजकांना दिल्या. तसेच स्पर्धेतील पहिल्या दहा उत्कृष्ट खेळाडूंना पाच हजार रुपयांची खेळ साहित्य खरेदीची कुपनही देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, स्पर्धेमध्ये प्रत्येक गटातील पहिला तीन खेळाडूंना आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते दोन लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पुरुष व महिला यांनाही रोख पारितोषिके देण्यात आली.

या स्पर्धेस प्रथम अर्जुन पुरस्कार विजेती महिला कु हिमानी परब आणि कबड्डीतील प्रथम पुरस्कार विजेत्या महिला श्रीमती शकुंतला खटावकर, पुण्यातील मल्लखांबातील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सन्मान कबड्डीतील अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांनी उपस्थिती लावली. तसेच, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी आणि पुणे जिल्हा मल्लखांब संघटनातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी काम पाहिले. यामध्ये रविंद्र पेठे, जितेंद्र खरे, राज तांबोळी, चंद्रकांत पवार,अभिजीत भोसले, सचिन परदेशी, सचिन पुरोहित, प्रतीक कोरडे, आकाश तगारे, चिन्मय बापट, सानिका नाडगौडा इत्यादींनी मदत केली.

कल्याण ज्वेलर्समध्ये नौकरी देण्याच्या आमिषाने ठकविणाऱ्यांविरोधात कल्याण ज्वेलर्सने पोलीस ठाण्यात नोंदविली तक्रार

0

नोकरीच्या शोधात असलेल्यांना कंपनीच्या नावे चालवल्या जात असलेल्या ऑनलाइन घोटाळ्याविषयी धोक्याची सूचना

थ्रिसुर28 फेब्रुवारी 2022 – कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडने कंपनीच्या नावे चालवल्या जात असलेल्या ऑनलाइन नोकरी घोटाळ्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या घोटाळ्याचा एक भाग म्हणून उमेदवारांकडून सुरुवातीला 3500 रुपये अर्ज शुल्क घेतले जाते. त्यानंतर दोन आठवड्यांनी परत संपर्क साधून खोटे ऑफर लेटर दिले जाते व नोकरी मिळवण्यासाठी 84,000 रुपये सुरक्षा ठेव रक्कम भरायला सांगितली जाते.

कल्याण ज्वेलर्सने आधी सोशल मीडिया पेजेसवरून कंपनी उमेदवारांकडून अशाप्रकारचे प्रक्रिया शुल्क किंवा अर्ज शुल्क आकारत नसल्याचे स्पष्ट केले आणि नोकरीच्या शोधात असलेल्यांना या बेकायदेशीर गोष्टीबद्दल किंवा ऑनलाइन घोटाळ्याविरोधात सावध राहायला सांगितले. त्याचप्रमाणे कल्याण ज्वेलर्सने कोणत्याही थर्ड पार्टीस कंपनीच्या वतीने नोकरभरती प्रक्रिया करण्याचे काम दिले नसल्याचेही स्पष्ट केले.

कंपनीने उमेदवारांना कल्याण ज्वेलर्सच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करून तिथे ‘करियर’ विभागात संबंधित पदांसाठी अर्ज करावा अशी विनंती केली आहे. इच्छुक उमेदवारांना कल्याण ज्वेलर्सच्या जवळच्या शोरूममध्ये आपला सीव्ही देता येईल आणि कंपनी योग्य पदासाठीअर्जाची छाननी करेल.

थ्रिसुर येथील शहर पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आणि एफआयआर नोंदवण्यात आली आहे. कंपनीने गोळा केलेली माहिती पोलिसांना देण्यात आली असून प्राथमिक तपासकार्य सुरू आहे. 

राज्यपालांसह महापौरांनाही राष्ट्रवादीचा निर्वाणीचा इशारा

0

पुणे- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काल केलेलं वक्तव्य एक षडयंत्र असून कोश्यारी यांनी दोन दिवसात माफी मागावी अन्यथा होणाऱ्या परिणामांना तयार राहावे असा इशारा देणाऱ्या राष्ट्रवादी ने आज पुण्याचे महापौर मोहोळ यांना ही प्रभाग क्रमांक २३ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली नाही, तर यापुढे तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा आज आंदोलन करताना दिला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल औरंगाबादमध्ये केलेल्या भाषणात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्याच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ नेते अंकुश काकडे ,विरोधी पक्षनेत्या दिपालीताई धुमाळ ,नगरसेवक योगेश ससाने ,सचिन दोडके ,प्रवक्ते प्रदीप देशमुख, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे,सुषमा सातपुते,विक्रम जाधव,गणेश नलावडे,दिपक कामठे,दिपक जगताप,निलेश वरें,अमर तुपे आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.

‘खोटं बोल पण रेटून बोल’ हे सूत्र वापरून इतिहासाची सतत मोडतोड करणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे व्यापक कारस्थान आहे. महान राष्ट्रपुरुषांचा सतत अवमान करणे व ज्यांचे इतिहासात काडीचे योगदान नाही त्यांचे उदात्तीकरण करणे ही भाजप ची मोहीम आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काल केलेलं वक्तव्य हे काही अनावधानाने केलेलं नाही, भाजपच्या व्यापक षड्यंत्राचाच तो भाग आहे. भगतसिंग कोश्यारींच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात आले. परंतु जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे मावळे या स्वराज्यात आहेत तोपर्यंत हे षडयंत्र कधीही यशस्वी होणार नाही असे यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ठणकावून सांगितले. “छत्रपतींचा आशीर्वाद” म्हणत साळसूदपणाचा आव आणणारे भारतीय जनता पक्षाचे नेते वास्तवात किती टोकाचे शिवद्रोही आहेत हे वारंवार सिद्ध होत आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होण्यापूर्वी आपण सगळेच शिवाजी महाराजांचे निष्ठावान मावळे आहोत. हीच वेळ आहे सर्व मावळ्यांनी एकजूट होण्याची, भाजप व आरएसएस चे शिवद्रोही कारस्थान उधळून लावण्याची. यापुढे या मनुवादी विचारसरणीच्या विरोधातील आपला लढा अधिक तीव्र होणार आहे, मनुवादाचा समूळ नायनाट केल्याशिवाय आता आपण शांत बसायचं नाही हा संदेश प्रशांत जगताप यांनी सर्व उपस्थितांना दिला. तसेच राज्यपाल कोश्यारी यांनी दोन दिवसात माफी मागावी अन्यथा होणाऱ्या परिणामांना तयार राहावे असा इशाराही पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे हडपसर मधील प्रभाग क्रमांक २३ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत प्रस्ताव महापालिकेस दिला असून त्या प्रस्तावावर प्रभाग क्रमांक २३ मधील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्याच प्रमाणे महापौरांनी देखील विशेषाधिकारात स्वाक्षरी करण्यास नकार दिला. शिवाय हा विषय स्थायी व मुख्य सभेत घेणार नसल्याचे सांगितले. या घटनेतून भारतीय जनता पार्टी चा खरा चेहरा उघड होत असून केवळ निवडणुकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि नंतर मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विरोध करायचा अशी दुटप्पी भूमिका भारतीय जनता पक्ष पुणे महानगरपालिकेत घेत आहे. या आंदोलनात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी भाजपला असा सूचक इशारा दिला की, जर दोन दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रस्तावावर स्वाक्षरी केली नाही, तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

शासकीय सफाई कामगारांच्या मुला-मुलींच्या शाळेची जागा बार्टीच्या ताब्यात देण्याचे आदेश

0

पुणे दि.28: येरवडा महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे वसतीगृह व क्रांतीज्योती सावित्री बाई फुले मुलींचे वसतीगृह कोविड केअर सेंटर म्हणून कोरोना बाधित बंद्यांच्या कारागृहासाठी तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेली जागा शासकीय सफाई कामगारांच्या मुला-मुलींची शाळा सुरू करण्यात येणार असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या ताब्यात देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

बार्टी येरवडा संकुलासमोर असलेल्या तसेच एकाच आवारात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे वसतीगृह व क्रांतीज्योती सावित्री बाई फुले मुलींचे वसतीगृह कोरोना कालावधीत कोविड-19 बाधीत बंद्यांसाठी तात्पुरते कारागृह घोषीत करण्यात आले होते.

आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेला इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतची शाळा सुरु करण्याबाबत शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. तसेच राष्ट्रीय सफाई कार्मचारी आयोग, नवी दिल्ली यांनी बार्टी संस्थेमार्फत सफाई कर्मचाऱ्यांसाठी सर्वांगिण विकासाचे प्रशिक्षण सुरु करणे व येरवडा येथील सफाई कामगारांच्या मुला-मुलींची निवासी शाळा तात्काळ सुरु करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार शाळा सुरु करणे आवश्यक असून शाळेसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने व शाळा निवासी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे वसतिगृह व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह शाळा सुरु करण्यासाठी ताब्यात देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांची खंत दूर करण्यासाठी वेगळ्या व्यासपिठाची गरज-आ. चंद्रकांतदादा पाटील

0

कोथरुडमध्ये मोबईल प्रशिक्षण शिबीराची सांगता

पुणे-ज्येष्ठ नागरिकांना आपल्या उतारवयात जिवनात काही करायचे राहून गेले, याची खंत राहू नये, यासाठी वेगळे व्यासपीठ उपलब्ध असणे गरजेचे असून, त्यासाठीच मोबाईल प्रशिक्षण शिबीर एक माध्यम आहे, असे प्रतिपादन आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. तसेच, राजकारणातून निवृत्तीनंतर सीमेवरील जवानांची सेवा करण्याची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कोथरुडमधील ज्येष्ठ नागरिकांना टेक्नोसॅव्ही बनवण्यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नातून आठ आठवड्यांचे मोबाईल ट्रेनिंग शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरातील पहिल्या बॅचच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा डॉ. अलका भानू, श्री. शेजवलकर, सचिव श्री. आनंद आपटे, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुणे मनपा शिक्षण मंडळ अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, मोबाईल ट्रेनिंग शिबीराच्या समन्वयक नगरसेविका माधुरीताई सहस्रबुद्धे, नगरसेवक जयंत भावे, स्विकृत सदस्या मिताली सावळेकर तसेच प्रशिक्षक श्री. बिंदूमाधव मेंडजोगे उपस्थित होते.

आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “ज्येष्ठ नागरिकांना आपल्या उतारवयात पैसे कमावण्यापेक्षा शांत आरामदायी जीवन व्यतीत करावे असे वाटते. यावेळी त्यांना आपल्या आयुष्यात काही साध्य करायचे राहून गेले असल्याची खंत राहू नये, यासाठी या वयातही त्यांचे नियोजन असते. मला देखील राजकारणातून निवृत्तीनंतर सीमेवरील जवानांची सेवा करायला आवडेल. त्याचप्रमाणे इतर ज्येष्ठ नागरिकांनाही असे काही करायचे असल्यास, त्यांनी तशी इच्छा व्यक्त करावी. त्यांच्यासाठी आपण वेगळे व्यासपीठ उपलब्ध करुन देऊ,” असेही त्यांनी यावेळी आश्वस्त केले.

ते पुढे म्हणाले की, “कोथरुडमधील नागरिकांच्या गरजा ओळखून अनेक नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. त्यापैकी कोथरुडमधील वाचकांसाठी फिरते पुस्तक घर, वस्ती भागातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी मोफत फिरता दवाखाना यांसह अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. आजच्या अधुनिक युगात ज्येष्ठ नागरिकांना टेक्नोसॅव्ही असणे गरजेचे असल्यामुळे त्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी आठ अठवड्यांचे मोबाईल ट्रेनिंग शिबीराचे आयोजन केले होते. त्यातील पहिल्या बॅचचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. आता लवकरच पुढची बॅचही सुरु करणार,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिबीराच्या समन्वयक नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म्हणाल्या की, “प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना आपल्या आयुष्यातील सेकेंड इनिंग अर्थपूर्ण करण्याची इच्छा असते. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या विविध उपक्रमातून कोथरुडकरांसाठी अराजकीय व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. मोबाईल ट्रेनिंग शिबीर हे त्यापैकीच एक असून, यासर्व अराजकीय व्यासपिठांबद्दल नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.” यावेळी प्रशिक्षक श्री. बिंदूमाधव मेंडजोगे आणि एरंडवणे ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षा डॉ. अलका भानू यांनाही आपले मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, आठ अठवड्यांचे मोबाईल ट्रेनिंग शिबीरात महिलांचा उत्सफूर्त प्रतिसाद घेतला. या शिबीरात यशस्वीपणे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना विशेष भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा आ. पाटील यांनी केली होती. त्यानुसार श्री. पुष्पहास फडके, सुचेता खेर आणि ज्योत्सना कणेकळ या विशेष सन्मानासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी पुष्पहास फडके यांना स्मार्टफोन देऊन गौरविण्यात आले. तर इतर सहभागी ज्येष्ठ नागरिकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या हिताला बाधा येणार नाही-महापारेषणचे संचालक सुगत गमरे यांची ग्वाही

0

विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे अधिवेशन उत्साहात

पुणे, दि. २८ फेब्रुवारी २०२२: जोपर्यंत वीज कंपन्यांकडून अधिकृत भूमिका जाहीर होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या वावड्यांवर विश्वास ठेऊ नये. वीज कंपन्यांतील सर्व  कर्मचाऱ्यांच्या हिताला बाधा येणार नाही याची व्यवस्थापनाकडून पूर्ण काळजी घेतली जात आहे अशी ग्वाही महापारेषण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे यांनी दिली.

पुणे येथील बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये शनिवारी व रविवारी (दि. २६ व २७) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे ४४ वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन उत्साहात झाले. संघटनेचे महावितरण, महापारेषण व महानिर्मिती व सुत्रधारी कंपनी अंतर्गत वित्त व लेखा, मानव संसाधन, माहिती व तंत्रज्ञान, औद्योगिक संबंध, जनसंपर्क, विधी, सुरक्षा व अंमलबजावणी आदी विभागातील राज्यभरातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संचालक श्री. सुगत गमरे बोलत होते. महानिर्मितीचे संचालक (वित्त) श्री. बाबासाहेब थिटे यांच्याहस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर महावितरणचे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, संघटनेचे अध्यक्ष श्री. सुनील पाठक, पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. सतीश तळणीकर, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भरत पाटील (महापारेषण), सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. ललीत गायकवाड (महावितरण), संघटनेचे सरचिटणीस श्री. मनोज ठवरे, संघटन सचिव श्री. संजय खाडे, पुणे परिमंडल कार्याध्यक्ष श्री. विजय गुळदगड आदींची उपस्थिती होती.

या दोन दिवसीय अधिवेशनात कंपनी व संघटनेसमोरील वाटचाल व आव्हाने, प्रस्तावित धोरणे व कायदे आदींवर विचारमंथन झाले. तसेच संघटनेच्या ध्येयधोरणांसंदर्भात ठराव मांडून चर्चा करण्यात आली. या अधिवेशनाच्या आयोजनासाठी केंद्रीय सल्लागार श्री. गुलाबराव मानेकर, पुणे-बारामती परिमंडलाचे अध्यक्ष श्री. संजय चव्हाण, कार्याध्यक्ष श्री. विजय गुळदगड, सचिव श्री. सतीश फडतरे तसेच विविध आयोजन समित्या, पदाधिकारी व सदस्यांनी परीश्रम घेतले.

पीवायसीच्या वतीने स्नूकरसाठी मार्गदर्शन कार्यशाळा,शिबिर

0

पुणे, 28 फेब्रुवारी 2022: – पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने स्नूकर  या खेळासाठी आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन कार्यशाळेला अर्जुन पुरस्कार विजेते आणि माजी राष्ट्रीय विजेते देवेंद्र जोशी हे खेळाडूंना मार्गदर्शन करतील. 

देवेंद्र जोशी हे १९९५च्या जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेचे उपविजेते आहेत. त्याचबरोबर २००१ आणि २००६चे राष्ट्रीय बिलियर्ड्स विजेते आहेत. २००३चे एशियन चॅम्पियनही आहेत. ही कार्यशाळा चार महिने चालणार आहे. पीवायसी क्लबमध्ये होणाऱ्या या कार्यशाळेसाठी सर्व सुविधा आयोजकांकडून पुरविल्या जाणार आहेत. यासाठी वेगवेगळ्या पाच बॅचेस तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक बॅचमध्ये सात जणांना प्रवेश असेल. प्रत्येक आठवड्यात दोन सराव सत्रही असणार आहेत. कार्यशाळा पूर्ण झाल्यानंतर एका स्पर्धेचेही आयोजन करण्यात येईल. माजी राष्ट्रीय खेळाडू राजवर्धन जोशी आणि आदित्य देशपांडे हे कार्यशाळेतील सहभागी खेळाडूंना  प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करतील .

नुकतेच देवेंद्र जोशी यांनी एक सत्रही घेतले. त्यात त्यांनी स्नूकर या खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी ही कार्यशाळा किती महत्त्वाची आहे, हे उपस्थितांना समजून सांगितले. या कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळाला. या वेळी पीवायसीचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, सचिव सारंग लागू, बिपिन चोभे हे उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी विशेष अभ्यासक्रम देवेंद्र जोशी यांनी तयार केला आहे. प्रत्येक  सहभागावर  आयोजकांकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे.  पीवायसी क्लबच्या सदस्यांबरोबर बाहेरचे हौशी खेळाडूही या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतील, अशी माहिती पीवायसी क्लबच्या बिलियर्ड्स अँड स्नूकर विभागाचे प्रमुख बिपिन चोभे यांनी दिली.अधिक माहितीसाठी इच्छुकांनी पीवायसी क्लब (दूरध्वनी क्रमांक ०२० – ६७६०२०६०) येथे संपर्क साधावा.

लहानग्यांनी लुटला रॅम्बो सर्कसचा आनंद

0

पुणे : विदूषकांच्या गमतीजमती, विविध साहसपूर्ण व चित्तथरारक प्रात्यक्षिके, पाळीव प्राण्यांच्या लक्ष्यवेधी कवायती, मृत्यू गोलातील थरार, मुलामुलींचे कसरतीचे प्रयोग आणि रोमहर्षक नृत्य, सायकलवरच्या-दोरीवरच्या तोल सांभाळत केलेल्या कसरती, रिंगमास्टरच्या तालावर नाचणारे प्राणी पाहून लहानग्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. टाळ्यांचा कडकडाट मुलांनीही सर्कशीतील कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली.

निमित्त होते, वंचित विकास संस्थेतर्फे फुलवा प्रकल्प आणि अभिरुची वर्गातील लहान मुलांसाठी आयोजिलेल्या रॅम्बो सर्कस प्रयोगाचे! सिंहगड रस्त्यावर लागलेल्या सर्कसचा प्रयोग पाहून कोरोनामुळे कोमेजलेल्या या चेहऱ्यावर हास्याचे धुमारे उडाले. साडेतीनशेहून अधिक मुलामुलींनी याचा आनंद घेतला. संस्थेच्या संचालक मीनाताई कुर्लेकर, सुनीताताई जोगळेकर, देवयानी गोंगले, स्नेहल मसालिया यांच्यासह प्रत्येक वर्गाच्या ताई उपस्थित होत्या.

स्नेहल मसालिया म्हणाल्या, “सर्कस बघायला सर्वांना आवडते. पण वस्तीमधील मुलांना या गोष्टी बघायला मिळत नाहीत. त्यामुळे वंचित विकास संस्थेने या मुलांकरिता खास प्रयोगाचे आयोजन केले होते. सर्कसमधील खेळ बघताना लहान मुलांच्या चेहेऱ्यावर हसू आणि आनंद दिसत होता. यावेळी सर्व मुलांना खाऊंचेही वाटप करण्यात आले. येथे असलेल्या प्राण्यांच्या प्रतिकृतीसोबत या मुलांनी खेळण्याचा, छायाचित्रे काढण्याचा आनंद घेतला.”