Home Blog Page 2068

28 फेब्रुवारी पर्यंत, युक्रेनमधून 1156 भारतीय मायदेशी

0

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2022

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय तसेच गृह मंत्रालयाच्या निकट सहकार्याने युक्रेनमधून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी शक्य ते सर्व सहकार्य करत आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने अनिवार्य आंतरराष्ट्रीय प्रवास मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केले असून मानवतावादी दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये खालील सवलतींना परवानगी दिली आहे:-

  • सध्याच्या ‘भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये’ नमूद केल्यानुसार अनिवार्य आवश्यकता (प्री-बोर्डिंग निगेटिव्ह RT-PCR चाचणी अहवाल किंवा संपूर्ण लसीकरण प्रमाणपत्र) पूर्ण करत नसलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी प्रस्थानापूर्वी ही कागदपत्रे एअर -सुविधा पोर्टलवर अपलोड करण्यातून सूट देण्यात आली आहे.
  • तसेच, ज्या व्यक्तींनी त्यांचे कोविड-19 लसीकरण पूर्ण केले आहे (प्रस्थान/लसीकरण केलेला देश कुठलाही असो) त्यांना आगमनानंतर पुढील 14 दिवसांसाठी त्यांच्या आरोग्यावर स्वतः देखरेख ठेवण्याच्या सूचनेसह विमानतळ सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • जर एखादा प्रवासी आगमनापूर्व आरटी पीसीआर चाचणी अहवाल सादर करू शकत नसेल किंवा ज्यांनी त्यांचे कोविड-19 लसीकरण पूर्ण केले नसेल, त्यांना 14 दिवस त्यांच्या आरोग्याची स्वत: तपासणी करण्याच्या सूचनेसह भारतात आगमनानंतर त्यांचे नमुने सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारतात आल्यानंतर  चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास निर्धारित प्रोटोकॉलनुसार वैद्यकीय नियमांचे त्यांना पालन करावे लागेल.

युक्रेनमधील राजकीय संकटात भारतीय वंशाच्या नागरिकांचा मोठा समुदाय अडकला आहे. युक्रेनमध्ये जारी करण्यात आलेल्या नोटिस टू एअरमन किंवा नोटिस टू एअर मिशन्स (NOTAM) च्या पार्श्वभूमीवर या अडकलेल्या भारतीयांना थेट विमान सेवेद्वारे तिथून बाहेर काढता येत नाही. त्यामुळे पोलंड, रोमानिया, स्लोव्हाकिया आणि हंगेरी येथील भारतीय दूतावास ऑपरेशन गंगा फ्लाइट्स अंतर्गत युक्रेनमधून आणि त्यांच्या संबंधित देशांमधून भारतीय नागरिकांना परत पाठवण्याची व्यवस्था करत आहेत.

28 फेब्रुवारी 2022 पर्यंत (12:00 वाजेपर्यंत), युक्रेनमधून भारतीयांना घेऊन येणारी 5 विमाने भारतात (एक मुंबईत आणि चार दिल्लीत) आली आहेत, ज्यात एकूण 1156 प्रवासी असून आतापर्यंत एकाही प्रवाशाला अलगीकरणात ठेवलेले नाही.

देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रात साकारणार- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

0

रत्नागिरी :मराठी भाषा जगाच्या पाठीवर पोहोचविण्यासाठी देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रात करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे शिक्षण विभाग पंचायत समिती रत्नागिरी, कोकण मराठी साहित्य परिषद, मालगुंड, कवी केशवसुत स्मारक मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी खासदार विनायक राऊत, विश्वस्त प्रमुख कोमसाप रमेश कीर, कोमसापचे अरुण नेरुरकर, अध्यक्षा कोमसाप तथा सदस्य भाषा विकास समिती रत्नागिरी नमिता कीर, कवी केशवसुत स्मारक मालगुंड चे अध्यक्ष गजानन पाटील, जिल्हा परिषद सदस्य साधना साळवी, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, उपसभापती पंचायत समिती रत्नागिरी उत्तम सावंत, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सामंत म्हणाले मराठी भाषा अधिक सुदृढ करण्यासाठी मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो. मराठी भाषेला अधिक चांगले दिवस आणण्यासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. मराठी भाषा अधिक सुदृढ करण्यासाठी, ती जगाच्या पाठीवर पोचविण्यासाठी देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रात करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
ते म्हणाले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. या बाबत मुख्यमंत्री महोदयांनी देखील माननीय पंतप्रधान महोदय यांची भेट घेतली असून ते त्याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी आपण सर्वांनी देखील पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वाचनाचे महत्व या विषयावर आपले विचार मांडणा-या आलिया या मुलीचे त्यांनी कौतुक केले व तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
खासदार विनायक राऊत आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की शासन स्तरावर मराठी भाषा समृद्ध, सुदृढ होण्यासाठी जे जे करणे आवश्यक आहे ते करण्यात येत आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष नमिता कीर म्हणाल्या की मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. वाचन, लेखन संस्कृती वाढविणे आवश्यक आहे.

माझ्या यशाच्या वाटचालीत प्रेक्षकांचा मोठा वाटा-अशोक सराफ

0

पुणेः- आजही प्रेक्षकांनी वाजवलेल्या टाळ्या आणि शिट्ट्या माझ्या कानात गुंजतात. माझ्या प्रगतीत प्रेक्षकांनी कळत नकळत खूप मोठा हातभार लावला आहे, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या.ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा मराठी भाषादिनानिमित्त आणि सिने-नाट्य सृष्टीतील विनोदी कलाकार निर्मिती सावंत यांचा षष्ट्यब्दीपुर्ती निमित्त आज बालगंधर्व रंगमंदिरात विशेष सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. संवाद पुणे आणि कोहिनूर उद्योग समुह यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून कोहिनूर उद्योग समुहाचे प्रमुख कृष्णकुमार गोयल आणि डाॅ. डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील, सचिन ईटकर तसेच भाग्यश्री पाटील, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, नाट्य निर्माते दिलीप जाधव, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकीता मोघे, नाट्य व्यवस्थापक प्रवीण बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना अशोक सराफ म्हणाले की, इतरांकरिता दुर्मिळ असलेले पुणेकरांचे प्रेम मला मात्र भरभरून मिळाले. पुण्याचा प्रेक्षक हुशार आहे. कारण मराठी भाषेतील खाचाखोचा अन्य कोणाला जास्त माहिती असणार? आपली मराठी भाषा अभिजात आहेच, तिला तो दर्जा बहाल करणे ही केवळ औपचारिकता बाकी आहे. विविध शब्द, प्रतिशब्द, शब्दांच्या छटा, द्विअर्थी शब्द अशा अनेक बाबतीत मराठी भाषा समृद्ध आहे. त्यामुळेच हिंदी चित्रपट आणि मालिकांपेक्षा मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये भूमिका साकरण्यास मी अधिक प्राधान्य देतो.

यावेळी बोलताना निर्मिती सावंत म्हणाल्या की, आज माझा जो विशेष सत्कार झाला, त्याचा आनंद आहेच, परंतू, आज मला साठ वर्षेेे पूर्ण झाल्याचे ‘बोंबलून’ सांगितले आहे, त्याचेहीकौतुक आहे. मराठी भाषा जगावी, टिकावी यासाठी आम्ही कलाकारांनी जी जबाबदारी घेतली आहे, त्याला प्रेक्षकांनी पण वेळोवेळी प्रतिसाद देऊन मराठी संवर्धनाचे मोलाचे कार्य केले आहे.

यावेळी बोलताना डॉ. पी.डी. पाटील म्हणाले की, मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीला ज्या कलाकारंनी चांगले दिवस मिळवून दिले, त्यात अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मराठी भाषेच्या समृद्धीमध्ये राज्याच्या विविध भागातील मराठी कलाकारांचे योगदान मोलाचे आहे.यावेळी बोलताना कृष्णकुमार गोयल म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्राला अशोकमामांनी खळखळून हसवले आहे. अशोकमामा हे मराठी चित्रपट सृष्टीतील अमिताभ बच्चन आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून सरकारी कामकाज, न्यायालयीन कामकाज मराठीतून व्हाव, अशी मागणी मी करीत आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी केले.

कोरोनाच्या खास सभेबाबत आळीमिळी..गप ..कशी ?

0

पुणे-कोरोना काळात तातडीची कामे म्हणून६७ (३) क या नियमाखाली करण्यात आलेल्या विविध कामांवर आणि खरेदींवर चर्चा करण्यासाठी खास सभा बोलावण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र ती हवेतच विरल्याचे पहायला मिळाले. वारंवार खास सभा घेण्याचे आश्वासन देणारे सत्ताधारी आणि वारंवार चर्चा करण्याची मागणी करणारे विरोधक अशा दोघांनाही कोरोनाच्या खास सभेचा विसर कसा पडला प्रश्न आता उपस्थित होतो आहे .कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आयुक्तांच्या अधिकारात६७ (३) क या नियमाखाली तातडीची कामे म्हणून विविध कामे व विविध साधन सामुग्रींची खरेदी केली. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात कोटेशन व निविदांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. या काळात सीएसआरच्या माध्यमातूनही कोट्यवधींची खरेदी व कामे करण्यात आली.रुग्णालय व कोवीड केअर सेंटरसाठी लागणारे साहित्य, औषधे, रुग्णांसाठी कपडे, फर्निचर, ऑक्सीजन निर्मितीसाठी प्रकल्प, जेवण, अशा विविध प्रकारच्या कामांना व निविदांना स्थायी समितीने मुख्य सभा मंजुरी देईल, या भरवशावर मान्यता दिली. स्थायीच्या मान्यतेनंतर कोट्यावधींची खरेदी व कामे करण्यात आली. यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप सत्ताधारी व विरोधकांनीही अनेकवेळा मुख्यसभेत केला. तसेच यासंदर्भात सभागृहात माहिती देण्याची मागणीही केली. यावर प्रत्येकवेळी कोरोनावर खास सभा घेण्याचे व त्यात सविस्तर माहिती देण्याचे आश्वासन सत्ताधार्‍यांनी दिले.परंतु नंतर मात्र काहीही झाले नाही आणि कोणी काहीही तक्रार केली नाही.

साहित्याच्या माध्यमातून समाजात वैज्ञानिक विचार रूजविता येतो – पत्रकार राजीव शर्मा

0

नवी दिल्ली, दि. 27 : साहित्याच्या माध्यमातून समाजात वैज्ञानिक विचार रूजविता येतो, असे प्रतिपादन दै. हितवादचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी राजीव शर्मा यांनी ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात आज ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने साजरा होणाऱ्या ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  श्री. शर्मा यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्‍यांनीही पुष्पअर्पण करून अभिवादन केले. परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजू निमसरकर यांनी राजीव शर्मा यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

श्री. शर्मा पुढे म्हणाले, वैज्ञान‍िक विचारानुसार  वागावे असे आपल्या राज्यघटनेतही अंर्तभूत आहे. त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी साहित्य हे एक चांगले माध्यम आहे. साहित्य हे दूधारी तलवारासारखे असते. जेवढा चांगला परिणाम जनमानसावर साहित्यातून होऊ शकाते तेवढाच नकारात्मक परिणाम देखील होत असतो, असे  श्री.शर्मा यावेळी म्हणाले.

श्री. शर्मा त्यांनी कुसूमाग्रजांची सुप्रसिद्ध कविता  ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ याचे  अभ‍िवाचन करत ही कविता जवेढी मानवी भावनांना व्यक्त करणारी आहे तेवढीच व‍िज्ञानाच्या जवळ असणारी देखील असल्याचे संदर्भासहीत सांगितले. श्री शर्मा म्हणाले, आपण जगत असताना आपल्याला जगण्यातून आलेले ज्ञान हे विज्ञानातून येत असते. पृथ्वीचे प्रेमगीत या कवितेत कवीने प्रेम, विरह या मानवी भावनांची सूंदर, अंत्यत सोप्या शब्दात मांडणी केलेली आहे. ही कविता अनेक वैज्ञानिक सिद्धांत आणि त्तत्थांचा वापर करीत त्याला कुठेही छेद न देत लिहीलेली असल्याचे त्यांनी सांगितले. ही कविता वाचल्यावर लक्षात येत की जीवनातील छोटया-छोटया गोष्टीं विज्ञानाशी निगडीत आहे. विज्ञान म्हणजे आपल्या सभोवतालची सृष्टी, निर्सग, पर्यावरण आहे. विज्ञान आपल्याला मदत करते आपले पर्यावरण जाणून घेण्यासाठी तसेच जीवन व्यवस्थीत जगण्यासाठी असहे श्री शर्मा यांनी सांगितले.

महाराष्ट्र परिचय केंद्राने वि.वा.शिरवाडकरांच्या साहित्य वाचनाचा उपक्रम १४ ते २७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान हाती घेतला होता. या उपक्रमात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ.ज्ञानेश्वर मुळे, तामिळनाडूच्या राज्यपालांचे प्रधान सचिव, श्री.आनंदराव वि. पाटील, महाराष्ट्र सदनचे(दिल्ली)निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव श्री समीर कुमार बिस्वास ,महाराष्ट्र सदनाच्या (दिल्ली) अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे, केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या संचालक सुप्रिया देवस्थळी – कोलते, भारत सरकारच्या रजिस्ट्रार जनरल कार्यालयात सहसंचालक, श्रीमती वृषाली वराडे, भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या उपमहासंचालक श्रीमती अनुजा बापट,  ज्येष्ठ पत्रकार श्री अनंत बागाईतकर,  दै.सकाळचे (दिल्ली) वरिष्ठ प्रतिनिधी श्री.मंगेश वैशंपायन, दै.केसरीचे दिल्ली विशेष प्रतिनिधी, श्री कमलेश गायकवाड, पीटीआय वृत्तसंस्थेचे(दिल्ली) सहायक संपादक श्री. सागर-कुलकर्णी, , दै.पुढारीचे दिल्ली प्रतिनिधी, श्री.सुमेध बनसोड, बीबीसी मराठीचे दिल्ली प्रतिनिधी, श्री गणेश पोळ, केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर मध्ये,मॉनिटर प्रसाद माळी हे या उपक्रमात सहभागी झाले होते.

वि.वा.शिरवाडकरांच्या कथा, कादंबरी, कविता आदी साहित्याचे मान्यवरांनी केलेले वाचन परिचय केंद्राच्या तिन्ही ट्वीटर हँडल,तिन्ही फेसबुक पेज,युट्यूब चॅनेल, इन्स्टाग्राम आणि कु  या समाजमाध्यमांवर संबंधित ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्यात आली होती. त्याला नेटकरऱ्‍यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला  आहे.

मराठी भाषा ही उद्योगाची भाषा देखील झाली पाहिजे-प्रा.डॉ. मिलिंद जोशी

0

“मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी व्यावसायिकांचा सन्मान
पुणेः मराठी भाषिक माणसाच्या महत्वाकांक्षा नेहमी छोट्या असतात, असे मानले जाते. आपली ही गरीबीची मानसिकता प्रथम बाजूला केली पाहिजे. सचोटी, हातोटी आणि कसोटी या तीन गुणांच्या बळावर मराठी उद्योजकांनी आपले स्थान निर्माण केले आहे. मराठी भाषा समृद्ध करायची असेल तर ते काम केवळ साहित्यिकांचे नाही तर उद्योजकांचे देखील आहे. म्हणून मराठी भाषा ही उद्योगाची भाषा झाली पाहिजे. मराठी भाषिक उद्योजकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढावी, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. 
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपती मंडळ व तुळशीबाग व्यापारी असोसिएशनच्या वतीने “मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी व्यावसायिकांचा सन्मान करण्यात आला. लक्ष्मी रस्त्यावरील  मे. श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्सच्यादालनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, पुणे मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन पुणेचे अध्यक्ष, नंदू घाटे, नगसेवक राजेश येनपुरे, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, विश्वस्त विवेक खटावकर, नितिन पंडित, मोहन साखरीया आदी मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी गोरे आणि मंडळीचे डॉ. धनंजय गोरे, पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार, कावरे आईस्क्रीमचे दत्तात्रय कावरे, प्रकाश मसालेचे बाबासाहेब जाधव, गिरे भेळचे गणेश गिरे, काकडे अॅन्ड सन्सचे नितीन काकडे, अक्षय हॉटेलचे अशोक वझे, नगरकर सराफचे पुष्कर नगरकर यांचा सन्मान करण्यात आला. पुणेरी पगडी, सन्मानपत्र, शाल, फळांची परडी, मोत्याची माळ असे सन्मानाचे स्वरूप होते. 

मुरलीधर मोहोळ म्हणाले, मागील आठ-दहा वर्षापूर्वी गणेशोत्सव मंडळ म्हणजे फक्त उत्सवात मोठे स्पिकर लावणे, आपल्या संस्कृती परंपरला फाटा देत वेगळ्या प्रकारे उत्सव साजरा करणे अशी प्रतिमा सामान्य माणसाच्या मनात होती. परंतु ते चित्र बदलले असून अलिकडच्या काळात सामाजिक उपक्रम राबवून ती प्रतिमा बदलण्याचे काम पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांनी केले, असे ही त्यांनी सांगितले.  
विद्याधर अनास्कर म्हणाले, संपूर्ण अर्थव्यस्थेचा महत्वाचा घटक म्हणून व्यापा-यांकडे पाहिले जाते. व्यापारी हा देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. आपल्या भावना मनापासून दुस-या पर्यंत पोहचविण्याचे माध्यम म्हणजे बोली भाषा असेत. आपली मराठी बोली भाषा जपण्याचे काम व्यापारी देखील करतात, असेही त्यांनी सांगितले. काही मराठी व्यापा-यांनी देखील मनोगत व्यक्त केले. रामदास तुळशीबागवाले, विनायक कदम, किरण चौहान, दुर्गेश नवले, राजू साखरीया, राजेश शिंदे, किरण भंडारी, कुशल पारेख, राहुल खोडके यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले. 

रोमानियाहून 198 भारतीयांना घेऊन चौथे विमान मायदेशी येण्यासाठी निघाले

0

आतापर्यंत 3 ​​​​​​​विमानांमधून 709 विद्यार्थ्यांची घरवापसी

नवी दिल्ली – शनिवारी रात्री 8 वाजता एअर इंडियाचे विमान 219 युक्रेन हून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमान उतरताच सर्वजण आनंदात म्हणाले- जय हिंद…! युक्रेन हल्ल्याच्या चौथ्या दिवशी 198 भारतीयांना घेऊन चौथ्या विमानाने बुखारेस्ट, रोमानिया येथून उड्डाण केले आहे. यापुर्वी रविवारीच 490 भारतीय विद्यार्थ्यांना रोमानिया आणि हंगेरीमार्गे भारतात आणण्यात आले. रोमानियाहून एअर इंडियाचे विमान शनिवारी रात्री 9.30 वाजता उड्डाण करून रविवारी पहाटे 3 वाजता दिल्लीला पोहोचले.हंगेरीतील बुडापेस्ट येथून रविवारी एक विमानही आले, ज्यामध्ये 240 भारतीय होते. युक्रेनमधून आतापर्यंत एकूण 709 विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली आहे. विमानात बसलेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आणि भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.

भारतात परतलेल्या विद्यार्थ्याशी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी संवाद साधला आणि युक्रेनमध्ये असलेल्या त्यांच्या मित्रमैत्रिणींना बळ देण्याची आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याची त्यांना विनंती केली.

अपडेट्स

  • युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विमानतळावर खास कॉरिडॉर उभारण्यात आला आहे. विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या परतीची ही मोहीम सुरूच राहणार आहे.
  • भारतीय दूतावासाने एक सल्लागार जारी केला आहे की युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची उझोरोड-वायसन नेमेके सीमेवरून सुटका केली जाईल.
  • हंगेरीतील भारतीय दूतावासानेही सीमेवरून प्रवेश करण्याबाबत तपशीलवार सूचना जारी केली आहे.
  • भारतीय विद्यार्थी तेजीने हंगेरी आणि पोलंडच्या सीमेवर पोहोचत आहेत.
  • युक्रेनमधून पटना येथे आलेल्या रीमा सिंह यांनी सांगितले की, विद्यापीठाने आपला अभ्यास व्यर्थ जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे. परिस्थिती सुधारताच ऑनलाइन अभ्यास सुरु केला जाईल.
युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या लोकांपैकी प्रत्येकाला मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकार कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया

ज्योतिरादित्य म्हणाले- प्रत्येकजण सुखरूप मायदेशी परतेल
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी रोमानियाहून परतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत तर केलेच, शिवाय फ्लाइटमध्ये त्यांच्याशी संवादही साधला. तुम्ही आल्याने आम्हाला खूप आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबद्दल मी एअर इंडियाचेही आभार मानतो. सिंधिया म्हणाले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या प्रत्येक भारतीयाला त्याच्या मायदेशी परत आणले जाईल. मोदीजी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या संपर्कात आहेत आणि प्रत्येकजण सुरक्षित परत येईल.

मातृभूमीत आपले स्वागत आहे: गोयल
युक्रेनमधून मुंबईत आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे मुंबईत आगमन होताच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी स्वागत केले. ते म्हणाला- ‘तुम्हा सर्वांचे मातृभूमीत स्वागत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला परत आणले जाईल. ते म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून पंतप्रधान मोदींना तुमची खूप काळजी वाटत होती. यासाठी त्यांनी अनेकांशी चर्चा केली.

बांबू उद्योगाला जास्त नफा मिळवून देण्यासाठी बांबू चारकोलवरील निर्यातबंदी हटवण्याचा खादी ग्रामोद्योग आयोगाचा प्रस्ताव

0

मुंबई -खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) अपरिपक्व बांबूचा पुरेपूर वापर करण्यासाठी आणि बांबू उद्योगामध्ये नफ्याचे प्रमाण वाढवण्याच्या उद्देशाने बांबू चारकोलवरील निर्यातबंदी हटवण्याची सरकारला विनंती केली आहे. भारतीय बांबू उद्योगामध्ये उच्च उत्पादनखर्च हे सर्वात मोठे आव्हान आहे आणि त्यामुळे बांबूचा वापर हव्या त्या प्रमाणात होत नाही. मात्र, बांबू चारकोलच्या निर्यातीमुळे बांबूच्या कचऱ्याचा पुरेपूर वापर होईल आणि अशा प्रकारे बांबू व्यवसाय अधिक फायदेशीर होऊ शकेल.

केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून बांबू उद्योगाच्या व्यापक फायद्यासाठी बांबू चारकोलवरील निर्यातबंदी हटवण्याची मागणी केली आहे.

भारतामध्ये बांबूचा सर्वाधिक वापर अगरबत्ती उत्पादनात केला जातो. यामध्ये बांबूचा कमाल 16 टक्के म्हणजे केवळ वरच्या थराचा वापर अगरबत्तीच्या काड्या तयार करण्यासाठी केला जातो. उर्वरित 84 टक्के भाग पूर्णपणे वाया जातो. अगरबत्ती आणि बांबू कला उद्योगात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा व्यावसायिक वापर केला जात नाही. परिणामी बांबूच्या गोल काड्या तयार करण्यासाठीचा उत्पादनखर्च 25,000 ते 40,000 प्रति मेट्रिक टन इतका होतो. तर बांबूची सरासरी किंमत 4,000 ते 5,000 रुपये प्रति मेट्रिक टन आहे. या तुलनेत चीनमध्ये बांबूची किंमत 8,000 ते 10,000 रुपये प्रति मेट्रिक टन आहे मात्र त्यांचा उत्पादनखर्च 12,000 ते 15,000 रुपये प्रति मेट्रिक टन आहे.

वाया जाणाऱ्या बांबूचा “बांबू चारकोल” तयार करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे वापर केला जाऊ शकतो. मात्र, स्थानिक बाजारात त्याचा वापर जास्त होत नसला तरी आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे, असे केवीआयसीचे अध्यक्ष सक्सेना यांचे म्हणणे आहे. बांबू चारकोल वरील निर्यातबंदीमुळे भारतीय बांबू उद्योगाला आंतरराष्ट्रीय मागणीचा फायदा मिळवणे शक्य होत नाही. त्यासंदर्भात वारंवार केलेल्या मागण्या विचारात घेऊन केव्हीआयसीने सरकारला बांबू चारकोलवरील निर्यातबंदी हटवण्याचा विचार करण्याची मागणी केली आहे. यामुळे जागतिक बाजारात या उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर असलेल्या मागणीचा फायदा भारतीय उद्योगाला घेता येईल. त्याचबरोबर वाया जाणाऱ्या बांबूचा सुयोग्य वापर करणे देखील शक्य झाल्यामुळे टाकाऊ वस्तूंमधून संपत्ती निर्माण करण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला देखील प्रत्यक्षात आणता येईल.

जागतिक बाजारात बांबू चारकोलच्या आयातीची मागणी साधारणपणे 1.5 ते 2 अब्ज डॉलरच्या जवळपास आहे आणि अलीकडच्या वर्षात त्यामध्ये 6 टक्के वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात बार्बेक्यूसाठी बांबू चारकोलची विक्री 21,000 ते 25,000 रुपये प्रति टन या दराने होते. त्याशिवाय मृदा पोषणासाठी त्याचा वापर केला जातो आणि ऍक्टिवेटेड चारकोल उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून त्याचा वापर होतो. अमेरिका, जपान, कोरिया, बेल्जियम, जर्मनी, इटली, फ्रान्स आणि युके या देशांमध्ये या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्यावर अतिशय नाममात्र आयात शुल्क आकारले जाते.

डॉ.सी.डी.देशमुख यांच्या नावाला साजेशी वास्तू साकारा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

अलिबाग,दि. 27 :- मूळ रोह्याचे असलेले डॉ. चिंतामणराव देशमुख उर्फ सी. डी. देशमुख हे एक कर्तुत्ववान व्यक्तिमत्व होते. अशा या महान व्यक्तिमत्वाच्या नावाला साजेशी वास्तू उभी करावी, त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. रोहा येथे डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाचा भूमिपूजन सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी श्री. पवार बोलत होते.

यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, सभापती गीताताई जाधव, बबन मनवे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, तहसिलदार कविता जाधव, पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच स्व.कुसुमाग्रज व डॉ.चिंतामणराव देशमुख यांच्या स्मृतीला अभिवादन करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील तमाम जनतेला व कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेल्या नागरिकांना मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

ते पुढे म्हणाले,करोना काळात राज्यावर आर्थिक संकट ओढवले होते. मात्र या शासनाने राज्यातील विकासकामांना खीळ बसणार नाही, विकासकामांची गती मंदावणार नाही, याकरिता सर्व प्रकारे काळजी घेतली. रायगडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 406 कोटींचा नियतव्यय मंजूर केला, महिलांसाठी शंभर खाटांचे विशेष रुग्णालय , 93 पर्यटन स्थळांना जोडणारा रेवस-रेड्डी मार्ग, 720 किलोमीटर समुद्रकिनारा पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठीचे नियोजन, आंतरराष्ट्रीय विमानतळ, जलवाहतूक वाढीस लागण्यासाठी त्या दृष्टीने नियोजन, जिल्ह्यात तेरा आयकॉनिक पूलांचे भव्यदिव्य नाविन्यपूर्ण काम त्याचबरोबर तालुका क्रीडा संकुलासाठी 5 कोटी, जिल्हा क्रीडा संकुलासाठी 25 कोटी तर माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुलासाठी 50 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. ही सर्व कामे दर्जेदार होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावेत, या कुठल्याही कामासाठी निधीची कमतरता पडू दिला जाणार नाही.

उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की, डॉ.सी.डी.देशमुख हे स्वतंत्र भारताच्या अर्थशास्त्रातील मोठे नाव होते. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री, रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर, विद्यापीठ अनुदान समितीचे पहिले अध्यक्ष अशा विविध मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडताना ते आपल्या मूळ गावाला मात्र कधीही विसरले नाहीत. त्यांच्या नावाने साकारले जाणारे हे शहर सभागृह व नाट्यगृह सर्वोत्तम होईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जावे. 22 कोटी 70 लाख इतक्या निधीतून साकारल्या जाणाऱ्या या सभागृहात 800 खुर्च्या, सोलर पॅनल, संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा, सुसज्ज वाचनालय, कॅफेटेरिया, ग्रीन रूम, प्रोजेक्ट रूम, अत्याधुनिक ध्वनीक्षेपण यंत्रणा अशा विविध सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. यासाठी अधिक निधीची गरज लागली तरी तो पुरविला जाईल.

कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्प उत्तम झाल्याबाबत समाधान व्यक्त करुन उपमुख्यमंत्री श्री.पवार पुढे म्हणाले की, जनतेचे प्रश्न त्यांच्या गरजा लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेने विविध नाविन्यपूर्ण योजना राबवून नव्या पिढीला जुना वारसा जतन करण्याचे संस्कार द्यावेत. हे काम रोहा येथे कुंडलिका नदी संवर्धन, शिवसृष्टी, छत्रपती शिवाजी महाराजांचा साकारण्यात येणारा 35 फूट पुतळा, स्वराज्यातील महत्त्वाच्या सहा किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्याच्या कामातून केले जात आहे, याबद्दल संबंधित सर्वांचे श्री.पवार यांनी अभिनंदन केले. तसेच या भागात जागतिक दर्जाची “बाग” साकारण्यात यावी, असे आवाहन करताना त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी पुनःश्च सांगितले. शेवटी  युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी काळजी करू नये. केंद्र व राज्य शासन त्या सर्वांना सुखरूपपणे आपापल्या घरी परत आणण्यात नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

पालकमंत्री कु.आदिती तटकरे आपल्या मनोगतात म्हणाल्या की, आजचा दिवस रोहेकरांसाठी अतिशय आनंदाचा व अभिमानाचा दिवस आहे. जिल्ह्यातील विविध विकास कामांना उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या खंबीर पाठबळामुळे गती मिळत आहे. नुकतेच भूमीपूजन झालेल्या अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शंभर खाटांचे महिलांसाठी विशेष रुग्णालयाला मंजूरी, विविध पर्यटनस्थळांचा विकास, त्यातून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न, ट्रॉमा केअर सेंटर, कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पासह येथे साकारण्यात येणारी शिवसृष्टी, सहा महत्त्वाच्या किल्ल्यांची प्रतिकृती, छत्रपती शिवाजी महाराजांचा साकारण्यात येणारा 35 फूट पुतळा, तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावरील क्रीडा संकुले अशा विविध विकासकामांमुळे व त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठबळामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास गतीने होईल यात शंकाच नाही तसेच यापुढेही आपण लोकहिताची कामे, नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात राबवित राहू, असेही त्या म्हणाल्या.

खासदार सुनील तटकरे यावेळी म्हणाले की, कुंडलिका नदीच्या आसपासचा परिसर “राज्यस्तरीय नगरोत्थान” योजनेंतर्गत सुशोभित करण्यात आला. पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित केली. कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर तसेच जिल्ह्याच्या इतर भागातही पर्यटनदृष्ट्या विविध विकास कामांना सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे “क” वर्ग नगरपालिका कार्यक्षेत्रात राज्यातील विविध नाट्यगृहाच्या तोडीचे किंबहुना त्याहूनही देखणे सभागृह रोहा नगरपरिषदेचे असणार आहे. हे राज्यातील असे पहिले नाट्यगृह असेल असे सांगून ते पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षात कोकणावर विविध संकटे आली. मात्र अर्थमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भक्कम पाठबळ दिले. त्यामुळे कोकण विभागातील नागरिकांना नुकसानभरपाई व इतर शासकीय लाभ जलद गतीने मिळाले.

शेवटी खासदार तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खंबीर साथीने या जिल्ह्यात कला, क्रीडा, साहित्य व इतर क्षेत्रातही विविध दर्जेदार विकास कामे केली जातील,अशी ग्वाही याप्रसंगी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विधान परिषद सदस्य आमदार श्री.अनिकेत तटकरे यांनी रोह्याच्या या भूमीत साकारल्या जाणाऱ्या डॉ.सी. डी.देशमुख सभागृहाची रचना कशी असेल, त्याचा उपयोग येथील जनतेला कशा प्रकारे होणार आहे, कशा पद्धतीने ते साकारले जाणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली आणि या सर्व विकासकामांसाठी भरघोस निधी व मार्गदर्शन उपलब्ध करून देत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष आभार मानले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला व डॉ. सी.डी.देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक संजय भुस्कुटे यांनी केले तर आभार मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी मांडले. कार्यक्रमाचा समारोप रायगड पोलीस बँड पथकाने वाजविलेल्या राष्ट्रगीताच्या धूनने झाली.

…अन् अवकाशात झेपावली फायटर प्लेन

0

शि.प्र.मंडळीच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातर्फे विज्ञान सर्वत्र पूज्यते विज्ञान प्रसार महोत्सव ; एरो मॉडेलिंग शो चे आयोजन
पुणे : राफेल…फायटर प्लेन…उडती तबकडी…फ्लाईंग फिश… ग्लाईडर..अशी विविध प्रकारची विमाने अवकाशात उंच झेपावली. तब्बल १२ प्रकारची विमाने २०० फूट अवकाशात उंच उडत असताना शि.प्र. मंडळीच्या विविध शाखांतील विद्यार्थी, विज्ञानप्रेमी व पुणेकरांनी एरो मॉडेलिंग शो चा आनंद घेतला. तसेच भारतीय हवाई दलाच्या कार्याला सलाम केला. 
सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार, मुख्य वैज्ञानिक सल्लागार समिती भारत सरकार यांचे कार्यालय आणि विज्ञान प्रसार यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान सर्वत्र पूज्यते या विज्ञान प्रसार महोत्सवाचे आयोजन शिक्षण प्रसारक मंडळीचे सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. एरो मॉडेलिंग शो ला शि.प्र. मंडळीच्या नियामक मंडळाचे सदस्य अ‍ॅड. मिहीर प्रभुदेसाई, सदस्य राजेंद्र पटवर्धन यांसह प्रमुख पाहुण्या म्हणून अमिता जैन उपस्थित होते. सदानंद काळे व सहका-यांनी हा एरो मॉडेलिंग शो दाखविला व विमानांची माहितीही दिली.
अ‍ॅड. मिहीर प्रभुदेसाई म्हणाले, मुस्कान या संकल्पनेवर आधारित एरो मॉडेलिंग शो चे आयोजन करण्यात आले. दिव्यांग देखील सामान्य मुलांप्रमाणे आहेत. त्यामुळे वि. रा. रुईया मूकबधिर विद्यालयातील मुलांना देखील यावेळी सहभागी करून घेण्यात आले. यानिमित्ताने त्यांच्या चेह-यावर हास्य फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिनांक १७ डिसेंबर १९०३ रोजी विमानाचा शोध लागला. पक्षी बघून मानवाने विमानाचा शोध लावला होता, त्यामुळे फ्लाइंग ईगलच्या उड्डाणाने शो ला सुरुवात झाली. त्यानंतर विविध प्रकारच्या विमानांचे उड्डाण स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात झाले.
महोत्सवात भारतीय वैज्ञानिकांवर आधारित विज्ञान चित्रपट महोत्सव, विज्ञान कविता, रंगावली, नाटक स्पर्धा देखील पार पडली. दरम्यान, डॉ.गिरीश टिल्लू, प्रा.योगेश शौचे, अनिरुद्ध देशपांडे, प्रशांत दुराफे, राघवेंद्र गायकैवारी, संजय इनामदार, प्रा.संजय ढोले, डॉ.दिप्ती साठ्ये आदी मान्यवरांची व्याख्याने देखील आयोजित करण्यात आली होती. महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने यामध्ये विज्ञानप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन शि.प्र.मंडळी तर्फे करण्यात आले आहे.

जनसामान्यांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ‘मिशन मोडने’ काम करावे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

0

मुंबई, दि. 27 : परराष्ट्र व्यवहार देशाकरिता अतिशय महत्वाचा विभाग असून करोनाच्या कठीण काळात या विभागाने अतिशय कुशलतेने काम केले. सध्या युक्रेन  येथे उद्भवलेल्या परिस्थितीत देखील परराष्ट्र व्यवहार मंत्रालय भारतीय लोकांना सुरक्षित आणण्यासाठी चांगले काम करीत आहे. या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कार्यामुळे देशाची प्रतिमा तयार होते असे सांगून परराष्ट्र मंत्रालयाने नागरिक तसेच देशात येणाऱ्या पाहुण्यांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परराष्ट्र मंत्रालयाच्या मुंबईतील विभागीय पारपत्र कार्यालय, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, प्रवासी संरक्षक विभाग तसेच परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागीय शाखा सचिवालयातर्फे एक आठवड्याच्या क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा सांगता व बक्षीस समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई येथे आज रविवारी संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला क्षेत्रीय पारपत्र अधिकारी डॉ राजेश गवांडे, प्रवासी संरक्षक अधिकारी राहुल बऱ्हाट, भारतीय संस्कृती संबंध परिषदेच्या विभागीय संचालिका रेणू प्रिथियानी व परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी, कर्मचारी व निमंत्रित उपस्थित होते.

देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबई येथे अनेक राष्ट्रप्रमुख, विदेशातील प्रांतीय मुख्यमंत्री, संसद सदस्य, राजदूत व उद्योजक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे मुंबईतील परराष्ट्र मंत्रालय विभाग दिल्लीपेक्षाही अधिक सक्रिय आहे, असे सांगून परराष्ट्र मंत्रालयातील लोक किती तत्परतेने आणि लोकाभिमुखतेने काम करतात यावर देखील देशाच्या परराष्ट्र नीतीचे यश अवलंबून असते असे राज्यपालांनी सांगितले.     

सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री असताना सामान्य नागरिकांना त्वरित प्रतिसाद देणारी प्रणाली विकसित केली होती असे सांगून या प्रणालीच्याही पुढे जाऊन परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सौजन्यपूर्ण सेवा दिली तर तो विभाग आदर्श विभाग म्हणून प्रस्थापित होईल असे राज्यपालांनी सांगितले.  

राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले तसेच काव्य संमेलनातील सहभागी कवींचा सत्कार करण्यात आला.

मी मराठी – स्वाक्षरी मराठी मोहीममहाराष्ट्र नवनिर्माण सेना कसबा विभागाच्यावतीने आयोजन

0

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसबा विभागाच्यावतीने जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त बाजीराव रस्त्याजवळील शनिपार चौक येथे ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे १२०० पुणेकरांनी मराठी स्वाक्षरी करून उपक्रमात सहभाग घेतला. उपक्रमाचे यंदा १३ वे वर्ष आहे. मराठी स्वाक्षरी करणाऱ्यांना यावेळी मोफत मास्कचे सुद्धा वाटप करण्यात आले.

यावेळी मनसे नेते राजेंद्र बाबू वागस्कर, सरचिटणीस किशोर शिंदे, अजय शिंदे, उपाध्यक्ष गणेश सातपुते, रणजित शिरोळे, योगेश खैरे, सुशिला नेटके, वनिता वागस्कर,प्रल्हाद गवळी, राकेश क्षीरसागर, संतोष पाटील, जयश्री पाथरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी अजय राजवाडे, ऋषिकेश करंदीकर, महेश काबरा यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे आयोजन विभाग सचिव वसंत खुटवड आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सारंग आनंद सराफ यांनी केले होते.

महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र भिमाशंकर येथे वाहनतळ सुविधा

0


भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाचे नियोजन
पुणे दि.२७- कोरोना कालावधीनंतर प्रथमच महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र भिमाशंकर येथे देशभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता असल्याने सोमवार व महाशिवरात्रीचा दिवस असे १ मार्चपर्यंत भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी व वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

महाशिवरात्रीपूर्वी रस्त्याचे नवीन झालेले काम व देवस्थान विकास आराखड्यातील सुरू असलेल्यात कामांच्या पार्श्वभूमीवर ही व्यवस्था करण्यायत आली आहे. मोठी वाहने (टेम्पो, बस, मिनीबस इ.) हॉटेल शिवामृत येथे लावावीत. (अंतर ६ कि.मी.) वाहनतळ क्रमांक ४ येथे चारचाकी वाहने (अंतर ४ कि.मी.) आणि वाहनतळ क्र. ३ येथे चारचाकी वाहनांचे पार्कंग होईल. (अंतर २ कि.मी.) वाहनतळ क्र. २ येथे दोनचाकी वाहने उभी राहतील (अंतर १ कि.मी.)

वाहने लावलेल्या ठिकाणापासून एस.टी. महामंडळाच्या बसेसमधून महाद्वार (एस.टी.स्टॅड) पर्यंत भाविकांना ने-आण करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी वाहनतळ ठिकाण सोडून इतरत्र बेशिस्तपणे वाहन पार्क केल्यास ते बाजूला करण्यासाठी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दोन क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. श्री क्षेत्र भिमाशंकर येथे येणारे भाविकांना ध्वनीक्षेपकाद्वारे योग्य सूचना व मार्गदर्शन करण्यासाठी ८ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

श्री क्षेत्र भिमाशंकर येथे साखळी चोर (चेन स्नॅचिंग) व पाकीटमार करणारे, छेडछाड करणारे इसम यांच्यावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व चित्रीकरण करणारी पथक नेमण्यात आली असून कारवाईसाठी दिवसा व रात्रीसाठी साध्या वेशातील पथके नेमण्यात आली आहेत. अवैध दारू व भांग विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस यांची पथके ठेवण्यात आली आहेत.

श्री क्षेत्र भिमाशंकर महाशिवरात्र यात्रा कालावधी दरम्यान भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी व व्यापक लोकहिताच्यादृष्टीने प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास भाविकांनी सहकार्य करावे. श्री क्षेत्र भिमाशंकर महाशिवरात्र यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर आणि घोडेगावचे पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी केले आहे.

नाना पटोले, संजय काकडे, बच्चू कडू,आशिष देशमुख यांचे बेकायदा फोन टॅप कशासाठी ,कोणासाठी ? लवकरच समोर येईल : गृहमंत्री वळसे

0

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यात शनिवारी गुन्हा दाखल

मुंबई-राजकीय नेते, लोकप्रतिनिधींचे बेकायदा फोन टॅपिंग केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्ला सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे सीआरपीएफच्या अतिरिक्त महासंचालकपदी कार्यरत आहेत. शुक्ला यांनी सन २०१५ ते १९ या पाच वर्षांच्या कालावधीत फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीच्या पडताळणीत लोकप्रतिनिधींचे फोन टॅपिंग केल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार भारतीय तार अधिनियम कलम २६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाना पटोले, संजय काकडे, आशिष देशमुख आणि बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आले होते. सार्वजनिक आणि अंतर्गत सुरक्षेसाठी फोन टॅप करण्याची परवानगी दिली जाते, परंतु शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगची गरज नव्हती. ड्रगरेकेट चे चुकीचे कारण , या नेत्यांचे फोन टॅपिंग केले त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्ला यांनी हे फोन कशासाठी टॅप केले हे लवकरच समोर येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

तिसरा पेनड्राइव्ह फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्रालयास दिल्याचा संशय
माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलिसांच्या बदल्यांबाबत पैसे मागत असल्याचा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणात मुंबईतील गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या याचिकेच्या सुनावणीवेळी वरिष्ठ सरकारी वकील दारियस खंबाटा यांनी गोपनीय माहितीचे दोन पेनड्राइव्ह सरकारच्या ताब्यात आहे, असे सांगून तिसरा पेनड्राइव्ह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह मंत्रालयास दिला, असे सांगितले होते. हा पेनड्राइव्ह फडणवीस यांना शुक्लांनी दिल्याचा आघाडी सरकारचा आरोप आहे.

भाजपच्या एजंट असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आरोप
राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या नेतृत्वात शुक्ला यांनी गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी राज्य सरकारतर्फे चौकशी करण्यात आली होती. त्या अहवालाचा दाखला देत २५ मार्च २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक, मंत्री जितेंद्र आव्हाड व मंत्री हसन मुश्रीफ यांनी रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट म्हणून काम करीत असल्याचा आरोप केला होता. दुसऱ्याच दिवशा कुंटेंच्या अहवालाच्या आधारावर २६ मार्च २०२१ रोजी अज्ञात व्यक्तीविरोधात गोपनीयतेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रश्मी शुक्ला १९८८ बॅचच्या अधिकारी : शुक्ला या मूळच्या मुंबई येथील रहिवासी असून सन १९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. मार्च २०१६ मध्ये त्यांनी पुणे पोलिस आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. ऑगस्ट २०१८ मध्ये कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर त्यांची राज्य गुप्त वार्ता प्रमुख म्हणून मुंबई येथे नियुक्ती झाली होती.

युक्रेनमध्ये अडकलेले २१९ विद्यार्थी मुंबईत सुखरूप परतले; पुणे, यवतमाळ, नागपूर, मुंबई अशा विविध भागातील विद्यार्थ्यांचा समावेश

0

मुंबई, दि, 26- एअर इंडियाचे AI – 1944 हे विशेष विमान (बुखारेस्ट- मुंबई)  युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप घेऊन आज मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री आठ वाजताच्या सुमारास दाखल झाले.मुंबईत  परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुणे, यवतमाळ, नागपूर, मुंबई अशा विविध भागातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

यावेळी विमानतळावर, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व राज्य शासनाचे मानले आभार मानले.विद्यार्थ्यांसाठी विमानतळावर चहापान व बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच त्यांना  आपापल्या राज्यात पाठविण्यासाठी मदत करण्यात येत होती. गोयल यांनी देशाविषयी दाखवलेल्या समर्पणासाठी एअर इंडियाचे मनापासून आभार मानले. घरी परत येणाऱ्या प्रवाशांनी एअर इंडियाचे आभार मानले आहेत.गोयल म्हणाले विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आणखीही विमाने पाठवली जाणार आहेत, आणि दुसरे विमान रविवारी पहाटे दिल्लीत पोहोचण्याची शक्यता आहे.

युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने सर्वत्र अत्यंत भीतीदायक व दहशतीचे  वातावरण आहे. मात्र युक्रेनमधील भारतीय दूतावासाने केलेली मदत व महाराष्ट्र  शासनाची भक्कम साथ व संपर्कासाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आज आम्ही मुंबईत सुखरूप परतलो आहोत, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया नागपूर येथील विद्यार्थी गौरव बावणे यांनी दिली.

युक्रेनमध्ये परतलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य शासनाचे विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्यांची माहिती जिल्हास्तरावर संकलित करण्याचे काम सुरु आहे.  सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी हेल्प लाईन क्रमांक जाहीर केले आहेत. तसेच राज्याचे नियंत्रण कक्ष 022- 22027990 या नंबरवर तसेच व्हॉट्सॲप क्र.9321587143 आणि controlroom@maharashtra.gov.in  या संपर्काचा राज्यातील विद्यार्थ्यांना फायदा झाला.

मुंबईत परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सौरभ राठोड, करीना नोरोना, निलेश तिवारी, गौरव बावणे, अदनान खान, सनीला पाटील, अजय शर्मा आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुंबईत सुखरूप परतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळाले. या विद्यार्थ्यांनी युक्रेनच्या युद्धजन्य परिस्थितीतून मायदेशी सुखरुप पोहोचविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य शासनाने केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले आहेत.