Home Blog Page 2069

बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करा – उच्च न्यायालयाने फटकारले

0

मुंबई: . मुंबई शहर आणि राज्यातील इतर शहरांत होणाऱ्या बेकायदा बांधकामांना वेळीच चाप लावा आणि अशा होणाऱ्या बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी खटले भरून कारवाई करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई आणि राज्यातील इतर शहरांमध्ये होणाऱ्या बेकायदा बांधकामांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाची निरीक्षणे नोंदवत राज्य सरकार आणि महानगरपालिकांना आदेश दिले आहेत.भिवंडीमधील इमारत दुर्घटनेत अनेकांचे जीव गेल्यानंतर सुओ मोटो दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवर निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. या याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने एखाद्या दुर्घटनेबाबतच्या चौकशी अहवालाबाबतही महत्वाचा आदेश दिला आहे. कोणतीही इमारत कोसळून वित्त व जीवितहानी झाल्यास नगरविकास प्रधान सचिवांनी १५ दिवसांत चौकशी अहवाल मिळवावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलावीत, असा आदेशही उच्च न्यायालयाने दिला आहे. इमारत कोसळून जीवितहानी झाल्यास अशा कुटुंबातील पीडित नुकसानभरपाई मिळण्यासाठी पात्र असतील, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

प्रभाग क्रमांक १८ मध्ये राज ठाकरेंचे जल्लोषात स्वागत

0


पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक १८ चे मनसेचे पुणे शहर संघटक प्रल्हाद गवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले
याप्रसंगी राज ठाकरे म्हणाले प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपआपल्या प्रभागांमध्ये जनसंपर्क वाढून लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घ्यावे या कार्यक्रमासाठी मनसेचे नेते बाबू वागसकर, किशोर शिंदे, अजय शिंदे, सुशीला नेटके, वनिता वागसकर, गणेश भोकरे, प्रशांत मते, प्रकाश ढमढेरे, संगीता तिकोने व इतर पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन प्रल्‍हाद गवळी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळा देवळे, हेमंत कंठाळे ,साईनाथ चकोर,संदीप ढवळे,उमेश लोखंडे,विकास गवळी, गौरव गवळी,दक्ष गवळी , श्रीराज पवार, विहंग कोटकर, यश येते, प्रज्वल कसबे, भूषण शिदे, युवराज लोखंडे, सौरभ पडावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी नादब्रम्ह ढोल पथक, आढाव सनईवादक पाचशे ते सहाशे फेटे धारी मनसे सैनिक उपस्थित होते तसेच चाफ्याचा हार व तलवार देऊन प्रल्हाद गवळीनी  राज ठाकरेंचे स्वागत केले.

महापालिका निवडणुका जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली-भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील

0

पुणे -महापालिकेच्या आगामी निवडणुका भाजपच्या वतीने शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली लढविल्या जातील अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.पुणे शहर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भाजप पदाधिकार्यांच्या बैठकीत पाटील बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, आगामी निवडणुकीसाठी शहर भाजपची तयारी अंतिम टप्प्यात आहे. बूथस्तरापर्यंतच्या रचना पूर्ण झाल्या आहेत. शहर, विधानसभा आणि प्रभागनिहाय निवडणुक व्यवस्थापन समितीची लवकरच रचना पूर्ण करण्यात येईल. जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महापालिकेत शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास वाटतो.

मुंबईतील भारतीय सिनेमाविषयक राष्ट्रीय संग्रहालय पुन्हा जनतेसाठी खुले

0

मुंबई | फेब्रुवारी 26, 2022

मुंबईतल्या आणि मुंबईला भेट देणाऱ्या सिनेप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय चित्रपटविषयक राष्ट्रीय संग्रहालय (NMIC), जे कोविड महामारीमुळे मधल्या काळात बंद होते, ते आजपासून पुन्हा लोकांसाठी खुले झाले आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल. मुरूगन यांनी आज या संग्रहालयाला भेट दिली आणि त्यांच्याच उपस्थितीत पुन्हा एकदा हे संग्रहालय खुले झाले. मुरूगन यांनी या संग्रहालयात ठेवलेल्या सर्व वस्तूंची, साहित्याची बारकाईने पाहणी केली. दोन भव्य इमारतींमध्ये हे संग्रहालय आहे. – एक गुलशन महल- ही चित्रपटांचा वारसा सांगणारी देखणी इमारत आणि त्याच्या बाजूला बांधलेल्या एक अत्याधुनिक बहुमजली इमारतीत हे संग्रहालय आहे. दक्षिण मुंबईत पेडर रोडवर हे संग्रहालय आहे.

फिल्म डिव्हिजनचे महासंचालक रवींद्र भाकर यांनी डॉ मुरूगन यांना या संग्रहालयाची माहिती दिली. सध्या संग्रहालय बंद असल्याने, काही ठिकाणी प्रलंबित असलेली दुरुस्ती आणि नूतनीकरणाची कामे देखील या काळात पूर्ण करण्यात आल्याचे भाकर यांनी सांगितले.

एनएमआयसी हे भारतातले चित्रपट विषयक वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारी 2019 मध्ये त्याचे उद्घाटन झाले होते.

गुलशन महल वारसा स्थळ असलेल्या इमारतीत आठ विविध सभागृहामध्ये हे संग्रहालय पसरले आहे. भारतीय चित्रपटसृष्टिच्या मूक चित्रपटापासून ते आजच्या आधुनिक तंत्रज्ञानातील चित्रपट सृष्टिचा प्रवास यात दर्शवण्यात आला आहे.  तर नव्या इमारतीत अनेक संवादात्मक उपक्रम/प्रदर्शन  आहेत.

एनएमआयसी मध्ये चित्रपट सृष्टीतल्या अनेक दिग्गज कलाकारांनी वापरलेल्या कित्येक दुर्मिळ वस्तू देखील ठेवल्या आहेत. ‘वीरपंड्या कट्टबोम्मन’ चित्रपटात अभिनेता शिवाजी गणेशन यांनी वापरलेले चिलखत, ‘आदीमई पेन्न’ चित्रपटात एम. जी. आर. यांनी वापरलेला लाल कोट देखील या संग्रहालयात आपल्याला बघायला मिळतो. 

चित्रपटात वापरल्या गेलेल्या वस्तू, दुर्मिळ उपकरणे, पोस्टर्स, महत्वाच्या चित्रपटांच्या चित्रफिती, जाहिरात करणारे बॅनर, साऊंड ट्रॅक, ट्रेलर्स, निगेटिव्ह, जुनी चित्रपट मासिके, चित्रपट निर्मिती आणि वितरणाचे आर्थिक गणित सांगणारी माहिती, असे सगळे या संग्रहालयात अत्यंत सुव्यवस्थितपणे मांडलेले आहे.

बालचित्रपट फिल्म स्टुडिओ आणि गांधी आणि सिनेमा हे देखील या संग्रहलयांचे आकर्षण आहे.

मे मध्ये, एनएमआयसी च्या परिसरात, इथल्या अत्याधुनिक सभागृहात 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन पट महोत्सव- (MIFF) चे आयोजन केले जाणार आहे. 

जीईई लिमिटेडच्या कार्यस्थळांवर भारतीय मानक ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी टाकले छापे

0

मुंबई -भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस), मुंबई शाखेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने 23.02.2022 रोजी मे.जीईई लिमिटेड या कंपनीच्या ठाणे जिल्ह्यात कल्याण-भिवंडी रस्त्यावर असलेल्या कार्यस्थळांवर सक्तवसुली संदर्भात शोध आणि जप्ती मोहीम राबवली. आयएस  15769 नुसार कार्बन किंवा कार्बन-मॅंगनीज पोलादाच्या गॅस शील्ड आणि सेल्फ-शिल्डेड मेटल वेल्डिंगसाठी फ्लक्स कोर्ड (ट्यूब्युलर) इलेक्ट्रोड्स संदर्भातील  गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन तपासण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली.

जीईई लिमिटेडच्या आवारात छापे टाकल्यानंतर  या कंपनीने  दिनांक 12.03.2021 रोजी लागू करण्यात आलेल्या एस.ओ 1203 (ई) गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळले. आयएस 15769 नुसार, वेल्डिंग वायर- फ्लक्स कोर्ड  वायर, 1.2 मिमी आणि 1.6 मिमी चा समावेश असलेले सुमारे = 174 बॉक्सेस (प्रत्येक बॉक्समध्ये 01 नग ) जप्त करण्यात आले

भारतीय मानक ब्युरोच्या मानक चिन्हाचा  गैरवापर केल्यास 2016 च्या कायद्यानुसार दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा किमान 2,00,000 रुपये  दंडाची शिक्षा  किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. न्यायालयात  या गुन्ह्याबद्दल खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.मोठा नफा मिळवण्यासाठी  बनावट आयएसआय चिन्ह असलेली उत्पादने तयार करून  ग्राहकांना  विकली जात असल्याचे अनेकवेळा निदर्शनाला  आले आहे.

खरेदी करण्यापूर्वी नागरिकांनी http://www.bis.gov.in  या  भारतीय मानक ब्युरोच्या संकेतस्थळाला भेट देऊन उत्पादनावरील आयएसआय चिन्हाची  सत्यता तपासण्याची विनंती भारतीय मानक ब्युरोने नागरिकांना केली आहे. कोणत्याही उत्पादनावर आयएसआय चिन्हाचा गैरवापर केल्याचे आढळून आल्यास त्याची माहिती नागरिकांनी,प्रमुख, एमयुबओ -II, पश्चिम प्रादेशिक कार्यालय, बीआयएस, मानकालय, ई 9, मरोळ टेलिफोन एक्सचेंजच्या मागे, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400 093. या पत्त्यावर संबंधितांना द्यावी, अशी विनंती देखील नागरिकांनी करण्यात आली आहे. hmubo2@bis.gov.in  या ईमेल आयडीवर देखील ई-मेलद्वारे अशा तक्रारी करता येतील. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल.


‘ही ताकद अण्वस्त्रापेक्षा मोठी ‘; महिंद्रांनी केले युक्रेनच्या लढवय्यांचे कौतुक

0

मुंबई- महिंद्र ग्रुपचे आनंद महिंद्रांनी रशिया-युक्रेन युद्धप्रसंगाचा एक व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी ‘ही ताकद अण्वस्त्रापेक्षा मोठी’ असल्याचे म्हटले आहे.आनंद महिंद्रा यांनी न्यूयॉर्क टाइम्सचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये युक्रेनची राजधानी कीवच्या रस्त्यांवर लागलेल्या रांगा दिसत आहेत. या रांगा सामान्य नागरिकांच्या आहेत. जे आपल्या भूमीला रशियाच्या आक्रमणापासून वाचविण्यासाठी शस्त्रे हातात घेण्यासाठी तयार आहेत.

https://twitter.com/anandmahindra/status/1497456078442827776

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनच्या नागरिकांना युद्धात लढण्यासाठी लष्करात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. यानंतर या रांगा देशभक्तीचे प्रतिक दाखवत आहेत. याचा व्हिडीओ शेअर करून आनंद महिंद्रा म्हणतात की, जेव्हा लोकांकडे आपल्या देशाला वाचविण्याची इच्छाशक्ती असते, तेव्हा ही ताकद कोणत्याही अण्वस्त्रापेक्षा अधिक शक्तीशाली असते. अशा लोकांवर आक्रमण करणे शक्य होईल परंतू अधिपत्य गाजविणे असंभव असेल.झेलेंस्की यांच्या आवाहनानंतर युक्रेनच्या रस्त्यांवर हजारो नागरीक गोळा झाले आहेत. रांगेत ते शस्त्रे ताब्यात घेत आहेत. त्यांना सैन्याचे जुजबी प्रशिक्षण दिले जात आहे. या व्हिडीओमध्ये लिब बोंडारेनको नावाच्या कॉम्प्युटर इंजिनिअर तरुणाने सांगितले की, रशियन हल्लेखोरांचा मुकाबला करता यावा म्हणून लोक आपली शस्त्रे घेण्यासाठी येथे थांबले आहेत. हे युद्ध लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. मी एक सामान्य नागरिक आहे आणि कायद्याने मी अशा कोणत्याही कामात किंवा युद्धात भाग घेऊ शकत नाही. पण रशियन लोकांना माझा देश ताब्यात घ्यायचा आहे आणि मला जे आवडते ते सर्व नष्ट करायचे आहे. अशा परिस्थितीत मी माझ्या देशाचे रक्षण केले पाहिजे, कारण हे माझे घर आहे.

पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रीय अवकाश निरीक्षण केंद्र

0


पुणे,: भारतातील सर्वात मोठ्या शालेय स्तरावरील खगोलशास्त्रीय अवकाश निरीक्षण केंद्र व प्रयोगशाळेचे अनावरण शनिवारी ( दि.२६ ) करण्यात आले.पुणे शहरातील विद्यार्थ्यांसाठी हेन्केल इंडिया कंपनी व ग्लोबल मिशन अ‍ॅस्ट्रोनॉमी आणि लायन्स क्लब यांच्या सहकार्याने ही प्रयोगशाळा पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेमध्ये सुरु करण्यात आली.या अवकाश निरीक्षण केंद्राचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमळकर,जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.काशिनाथ देवधर,प्रांतपाल हेमंत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी हेंकेल इंडियाचे भुपेश सिंग,संध्या केडिया,डॉ.प्रसाद खंडागळे,शेखर डुंबरे,प्रसाद वैद्य,खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे,मुख्याध्यापिका प्राजक्ता वैद्य,जयंत इनामदार,प्रदिप वाजे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर व नासाचे शास्त्रज्ञ डॉ.रूपेश ओझा यांनी सुमारे चार हजार विद्यार्थांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.यावेळी कुलगुरु डॉ.नितीन करमळकर यांनी विद्यार्थांमध्ये लहान वयातच अवकाश निरीक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी अशा केंद्रांची गरज आहे.भारत सरकारकडून नांदेड जवळ आंतराष्ट्रीय लायगो प्रकल्प उभारण्यात येत आहे.भविष्यात त्यासाठी लागणारे वैज्ञानिक या केंद्रातून तयार होतील असे
त्यांनी सांगितले.मुलांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण करण्यासाठी हेंकेलने यापूर्वी पुणे जिल्ह्यातील जेजुरी,भोर,तळेगाव-ढमढेरे आणि शिरगाव येथे अवकाश निरीक्षण केंद्र सुरु केली असल्याचे डॉ.प्रसाद खंडागळे यांनी सांगितले.
या अवकाश निरीक्षण केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी दुर्बिण,टेलिस्कोप,व्दीनेत्री यासारखी अद्यावत उपकरणे व खगोलशास्त्रीय पुस्तके कंपनीतर्फे देण्यात आली आहेत.सूर्यग्रहण,चंद्रग्रहण,सुपरमून,उल्कावर्षाव,ग्रह-तार्‍यांचे निरीक्षण,लघुग्रहांचे निरीक्षण,ग्रहांची युती अशी निरिक्षणे येथे करता येणार आहेत.भारतामध्ये शालेय स्तरावर अवकाश निरीक्षण केंद्र उभारण्यासाठी ग्लोबल मिशन अ‍ॅस्ट्रोनॉमी आणि रिसर्च सेंटर या संस्थेने अमेरिका आणि स्पेनमधील संशोधन संस्थांसोबत सामंजस्य करार केला आहे.या माध्यमातून विद्यार्थी नासाच्या लघुग्रह शोध मोहिमेत सामील होतील.याव्दारे सध्या दहा हजार विद्यार्थी अवकाश संशोधनाचा अभ्यास करत आहेत.तसेच ‘ट्रेन द ट्रेनर’ कार्यक्रमाद्वारे पुण्याच्या आसपास २५० हून अधिक शिक्षकांना कंपनीने प्रशिक्षण दिले आहे.

म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे दि.26: सर्वसामान्य नागरिकांचा म्हाडावर विश्वास असल्याने म्हाडाच्या घरासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात अर्ज करतात. सर्वसामान्य नागरिकांचा हा विश्वास म्हाडाने जपावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

शासकीय विश्रामगृह येथे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या २७०३ नवीन सदनिका व ५८ व्यापारी संकुलासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी खासदार वंदना चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमाच्या माध्यमातून  राज्यात गरजूंना घर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कोरोना संकटकाळात मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला, त्यामुळे बांधकाम क्षेत्राला उर्जितव्यवस्था मिळाली. सर्वांना हक्काचे घर मिळावी यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ‘सर्वांसाठी घरे’ कार्यक्रमांतर्गत सर्वांना हक्काचे घर देण्याचा प्रयत्न आहे.

             कोरोना संकटकाळातदेखील म्हाडाने मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध करून दिली. म्हाडाच्या घरासाठी नागरिकांनी  चांगला प्रतिसाद दिला. म्हाडाच्या पारदर्शक कामामुळे सर्वसामान्य नागरिकांचा म्हाडावर विश्वास आहे. म्हाडाच्या घरामुळे गरजूंच्या घराची स्व्पनपुर्ती होते. सर्व सोईसुविधायुक्त घरे देण्यासाठी देण्यासोबतच म्हाडाने पुणे शहराच्या विकासासाठी आणखी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. पुणे शहराची राज्यात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर अशी ओळख आहे. देशातही ही ओळख निर्माण करू, असेही श्री. पवार म्हणाले.

डिजीटल तंत्रज्ञानामुळे जगभर पोहचते आहे मराठी…!!-प्रसाद मिरासदार

0

‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त स्टोरीटेलचे सर्वांना शुभेच्छा देणारे ‘मराठी भाषा गौरवगीत’!

रविवार दिनांक २७ फेब्रूवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने ‘स्टोरीटेल’ प्रकाशित करत आहे सुप्रसिध्द लेखक वि.ग.कानिटकर लिखित ‘दर्शन ज्ञानेश्वरी’. ‘मराठिचिया बोलू कौतुके.. अमृताते पैजा जिंके’ अशी मायमराठीची थोरवी सांगणा-या संत ज्ञानेश्वरांच्या स्मरणानेच ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा व्हायला हवा. कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने मराठी भाषेचे वैभव वाढवण्यासाठी आणि जोपासण्यासाठी डिजीटल युगात काय प्रयत्न करता येतील हे पहाणे गरजेचे आहे.

स्वातंत्र्यानंतरची दोन दशके संपूर्ण भारतात नवनविन गोष्टी घडत होत्या. साठ आणि सत्तरच्या दशकात मराठी साहित्याचा सुवर्णकाळ होता असे मानले जाते. या काळात साहित्य, नाट्य, चित्रपट आदी सर्वच कलांमध्ये वेगवेगळे प्रयोग होत होते. विशेषतः नवकथा, कविता, कादंबरी लेखनाला नवे धुमारे फुटत होते. सर्वच स्तरातील लेखक साहित्य निर्मिती करत होते आणि त्यास मराठी वाचकांचा प्रतिसादही मिळत होता. गावोगावी सरकारी आणि खाजगी ग्रंथालयांचे मोठे जाळे निर्माण झाले होते आणि या वाचनालयातून लोकप्रिय तसेच अभिजात साहित्य वाचत नवी पिढी तयार होत होती. अनेक विषयांवरची, मासिके, साप्ताहिके, दिवाळी अंक प्रकाशित होत होती. नवेनवे प्रकाशक पुढे येत होते. पुस्तके सर्वसामान्यांपर्यंत खेडोपाडी पोहचवण्यासाठी वाचक चळवळी निर्माण होत होत्या. पुस्तक प्रदर्शने आयोजित केली जात होती. अशा सांस्कृतिक उपक्रमांच्या बहरीचा काळ होता.

पण ऐंशी आणि नव्वदीच्या दशकात अर्थकारणाचे महत्व वाढले. नव्वद साली भारतीय अर्थव्यवस्था खुली झाल्यावर शिक्षणात कला शाखेपेक्षा वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्राला महत्व आलं आणि इंग्रजी भाषेने नव्या पिढीचे विश्व व्यापून गेलं. इंग्रजी माध्यमांच्या शाळा मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ लागल्या आणि मराठी माध्यमातील शाळांची दयनीय अवस्था झाली. नव्या पिढीला मराठी वाचता येईना, मराठी भाषा टिकेल की नाही असा सूर येऊ लागला. याच काळात दोन हजार सालानंतर तंत्रज्ञानाचा जोर सर्वच क्षेत्रात वाढला. संगणकीकरण आणि डिजीटल तंत्रज्ञानाने प्रत्येकाच्या हातातल्या मोबाईलवर सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध होऊ लागले. आणि सर्वच जगात प्रादेशिक भाषांचे महत्व पुन्हा वाढू लागले. कमीतकमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचायचे असेल तर आपले साहित्य फक्त इंग्रजीत प्रकाशित न करता सर्वसामान्यांच्या भाषेत लिहिले पाहिजे हे जाणवू लागले. पुस्तकांप्रमाणेच टि.व्ही., चित्रपट आणि डिजीटल साहित्य निर्मिती स्थानिक भाषेत होऊ लागली. जगभरातील लोक एकमेकांशी व्यवसाय इंग्रजीतून करू लागली तर स्थानिक व्यवहार, सांस्कृतिक आदान प्रदान आपल्या स्वतःच्या भाषेत करू लागली आहेत. यातून ‘ग्लोकल’ संकल्पना पुढे आले. एका प्रकारे सर्वसामान्य माणसांना जागतिक भान आले. स्थानिक भाषेतून कथा, कविता, नाटके, सिनेमे, कादंब-यांची मागणी वाढत असल्याने डिजीटल जगात ‘रिजनल कंटेट’ किंवा स्थानिक साहित्याला मागणी वाढली.

नव्या तंत्रज्ञानामुळे ‘ओटिटी’ प्लॅटफार्मस वाढले. ‘युट्यूब’, ‘फेसबुक’सारखी व्यासपीठं प्रत्येकाला मोफत व्यक्त व्हायला उपलब्ध झाली. ‘स्टोरीटेल’सारखे ‘ऑडिओ ओटिटी’ प्लॅटफार्मस निर्माण झाले. स्क्रिनचा वापर वाढल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो या पासुन बचावासाठी ध्वनी माध्यमामधून पुस्तके, कथा, कविता, नाटके ऐकण्याचा कल वाढू लागला. ऑडिओमध्ये स्वतंत्र प्रयोग होऊ लागले. खास ऑडिओसाठी लेखन करून त्यानंतर कादंब-यात रूपांतर करणे सुरू झाले. थोडक्यात, जग ऐकू लागले!

२०१७  नंतर स्टोरीटेलने मराठीत पहिल्यांदा ऑडिओबुक्सची संस्कृती आणली. मराठी जनता आपल्या मोबाईलवर नामवंतांचे साहित्य ऐकू लागली. मराठी साहित्य जगभरात कुठेही ऐकता येऊ लागल्याने परदेशातही मोठ्या प्रमाणावर इथले साहित्य ऐकले जाऊ लागले. गेल्या पाच वर्षात स्टोरीटेलने मराठी साहित्यविश्वात एक प्रकारे क्रांतीच केली. स्टोरीटेलवर सर्व भारतीय भाषा आणि इंग्रजी मिळून तीन लाखांहून अधिक ऑडिओबुक्स आणि ईबुक्स आहेत. मराठीत पाच हजारांहून अधिक ऑडिओबुक्स आहेत. हा सर्व खजिना अतिशय कमी काळात म्हणजे फक्त तीन वर्षात स्टोरीटेलच्या मराठी टीमने निर्माण केला आहे. आता कुठेही, कधीही आणि कितीही मराठी ऑडिओबुक्स ऐकण्याची सोय स्टोरीटेलमुळे झाली आहे. तुमच्या मोबाईलवर संपूर्ण ग्रंथालय घेऊन हिंडण्याचे सामर्थ्य या उपक्रमामुळे साध्य झालं आहे. कोणतीही भाषा आपण ऐकत ऐकतच शिकतो. त्यानंतर बोलू लागतो आणि मग वाचू आणि लिहू लागतो. मराठी भाषा जगभरातील लोक मोठ्या प्रमाणावर ऐकत आहेत. संत ज्ञानेश्वरांनी आरंभलेला वाड्यज्ञ आणि मागितलेले पसायदान नव्या डिजीटल युगामुळे संपूर्ण विश्वात पोहचते आहे. हीच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साजरी करण्याची गोष्ट आहे.

स्टोरीटेलने ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून, जगभरातील सर्वांना शुभेच्छा देणारे ‘मराठी भाषा गौरवगीत’ तयार केले आहे. हे गीत आपण स्टोरीटेलच्या युट्युब चैनलवर ऐकू शकता आणि तुम्हाला आवडल्यास जरूर तुमच्या सोशल मीडिया हैंडल्सवरून शेअर करू शकता, अभिजात मराठी ऑडिओबुक्स अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन या गीताचे गीतकार प्रसाद मिरासदार यांनी स्टोरीटेलच्यावतीने जाहीर केले आहे. या गीताला संगीत दिवंगत संगीतकार नरेंद्र भिडे यांनी दिले असून गायक यश गोखले आहेत.

युट्युब लिंक:- https://www.youtube.com/watch?v=FPM72KslYUc

श्री. वि. ग. कानिटकर लिखित “दर्शन-ज्ञानेश्वरी” ऐकण्यासाठील लिंक

https://www.storytel.com/in/en/books/darshan-dnyaneshwari-1574553

सावरकर पुण्यतिथीनिमित्त फर्ग्युसनमध्ये कार्यक्रम

0

पुणे-स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य असणार्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोलीत आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले. सावरकरांच्या साहित्याचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले यांच्या हस्ते सावरकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, संचालक मिलिंद कांबळे, डॉ. आर. जी. परदेशी, उपप्राचार्या स्वाती जोगळेकर, प्राजक्ता प्रधान, आनंद काटीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सन १९०२ ते १९०५ या कालावधीत सावरकर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील इमारत क्रमांक १ मधील खोली क्रमांक १७ मध्ये वास्तव्यास होते. महाविद्यालयाने याखोलीचे एका स्मारकामध्ये रुपांतर केले आहे. सावरकरांचा अर्धपुतळा, पदवी  स्वीकारतानाचा अंगरखा, त्यांची काही प्रचित्रे, पुस्तके आदी स्वरुपात त्यांच्या स्ती जतन केल्या आहेत. सावरकरांचे वास्तव्याने पावन झालेली ही ऐतिहासिक खोली विद्यार्थ्यांचे प्रेरणा स्थान बनली आहे.

सावरकरांचे विचार कालातीत-निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे

0

पुणे-सावरकरांचे विचार कालातीत आहेत. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर असायला पाहिजे, दुसर्या देशांवर अवलंबून राहाणे योग्य नाही हा सावरकरांचा विचार रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आजही महत्त्वाचा ठरत असल्याचे मत माजी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद खंडारे यांनी व्यक्त केले.

मी सावरकर संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्हॉटसअप वक्तृत्व राज्यस्तरीय स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात खंडारे बोलत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. अभिनेता योगश सोमण यांची प्रमुख उपस्थिती होती.तरुणांनी सावरकरांचे विचार आचरणात आणावेत आणि त्यावर संशोनध होणे आवश्यक असल्याचे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सावरकरांचे विचारांचा प्रसार करण्याची गरज असल्याचे मत सोमण यांनी व्यक्त केले.

रत्नागिरीच्या  कश्ती शेख या विद्यार्थिनीला स्पर्धेची महाविजेती म्हणून निवड करण्यात आली. मी सावरकर टीमचे रणजीत नातू यांनी सूत्रसंचालन, स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टचे धनंजय बर्वे यांनी प्रास्ताविक आणि अमेय कुंटे यांनी आभार मानले.स्वागत मी सावरकर टीम रणजीत नातू, प्रास्ताविक धनंजय बर्वे अध्यक्ष स्वानंद चॅरिटेलबल ट्रस्ट, अमेय कुंटे आभार मानले

‘अवघा रंग एक झाला’ रंगावली प्रदर्शनात रंग आणि कलांचा आविष्कार

0

राष्ट्रीय कला अकादमी आणि नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्यावतीने गालिचा रांगोळी प्रदर्शन : २९ फेब्रुवारी पर्यंत प्रदर्शन 

पुणे: किंकरी, उरुमी, ढोडरो बानाम, पाहु या आदिवासी संगीत वाद्य बारकाईने साकारलेली मनमोहक रांगोळी… मराठी मातीचा  अभिमान असणारी मराठी भाषेच्या शुभेच्छा देणारी आणि अतिशय सुंदर पद्धतीने साकारलेली  हिन्दू देवी देवतांची रांगोळी यासोबतच. स्वातंत्र्यवीर सावरकर… शहिदांना अभिवादन… विविध रंग आणि पैठणीचा सुंदर साज उलगडणारी रांगोळी… अशा विविध संकल्पनेतून निर्माण झालेल्या गालिचा रांगोळी पाहण्याची संधी अवघा रंग एक झाला या गालिचा रंगावली प्रदर्शनातून पुणेकरांना मिळाली.


 राष्ट्रीय कला अकादमी (न्यास) आणि नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अप्पा बळवंत चौकातील नू.म.वि. प्रशालेत  ‘अवघा रंग एक झाला’ या गालिचा रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन चित्रकार विशाल वाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय कला अकादमीच्या संचालिका रोमा लांडे, अमर लांडे, अतुल सोनावणे, सुनील सोनटक्के उपस्थित होते.  गणेश माने, किरण फाळके, सुप्रिया मुरमुरे, अरुणा गाडे, गौरव निविलकर, कुणाल चौधरी यांनी संयोजन केले. 
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, बाप्पी लाहिरी यांनी रंगावलीतून श्रद्धांजली, विज्ञान दिन, महाशिवरात्री, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अशा विविध विषयांवर रंगबेरंगी रांगोळ्या प्रदर्शनात साकारण्यात आल्या आहेत.
प्रदर्शनात २० पेक्षा अधिक रंगावल्या साकारण्यात आल्या आहेत. दि. २८ फेब्रुवारी पर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत हे प्रदर्शन विनामूल्य पाहता येणार आहे.

विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या-उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे दि.२६: विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्यातील कौशल्याचा विकास करण्यावर विशेष भर देण्यात यावा. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्यांची वाढ व्हावी,  विद्यार्थी गुणवंत, ज्ञानवंत होण्यासोबतच प्रज्ञावंत, चारित्र्यसंपन्न व्हावेत याकडेही शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अल्पबचत भवन येथे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, महिला व बालकल्याण सभापती पुजा पारगे, शिक्षण समिती सदस्या अरूणा थोरात, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, नव्या युगाच्या आवाहनांना सामोरे जाणारे विद्यार्थी घडविण्यासाठी शैक्षणिक दर्जा उंचावणे ही शिक्षकांची मोठी जबाबदारी  आहे. कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक नुकसान भरून काढावे लागणार आहे. कोरोनानंतर शाळेत येणारा विद्यार्थी ताणतणावात राहणार नाही, असे शैक्षणिक वातावरण तयार करण्यावर शिक्षकांनी भर द्यावा. पालकांचाही यामध्ये सहभाग महत्त्वाचा राहणार आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक, देशाचे भविष्य आहेत. हे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देऊन चालणार नाही, तर मिळवलेल्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याचे कौशल्यही त्यांना शिकवायला हवे.

जीवनात यशस्वी होण्यासाठी ज्ञानाइतकेच विज्ञान तंत्रज्ञान, कौशल्यांचा विकासही महत्वाचा आहे. कलाकौशल्यापासून संवाद कौशल्यापर्यंत प्रत्येक गोष्टी जमल्या पाहिजेत. समाजात यशस्वी झालेल्या व्यक्तींनी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची सांगड घालून त्याचा उपयोग जीवनात केल्याने ते यशस्वी झाले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचा कित्ता गिरवला पाहिजे. त्यांच्यासारखी विज्ञानाची कास धरली पाहिजे. असे कौशल्य विद्यार्थ्यांनी मिळवावे त्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शन करावे. शिक्षणाच्या प्रभावी उपयोगासाठी, देशाच्या, समाजाच्या विकासासाठी ते आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

जिल्हा परिषद शाळेमध्ये चांगले बदल केले आहेत, राज्यातील काही भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेला पायाभूत सुविधा देण्यासाठी आपला सातत्याने प्रयत्न आहे.  दुर्गम, डोंगरी भागातील शिक्षक, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठीही आपण सर्वतोपरी सहकार्य करू.

महिलांना सन्मान मिळाला पाहीजे, यासाठी राज्य शासनाने चौथे महिला धोरण आणण्याचा निर्णय घेतला असल्याचेही श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

जि.प. अध्यक्षा श्रीमती पानसरे म्हणाल्या,  कोरोना कालावधातीही शिक्षकांनी ज्ञानदानाचे अत्यंत चांगले कार्य केले आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण सातत्याने सुरू राहीले. ग्रामीण भागातील अनेक शाळा आदर्श करण्यासाठी शिक्षकांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. शिवतरे  यांनी पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेल्या सामान्य ज्ञान मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गुणवंत शिक्षक, शिक्षिका, त्यांचे कुटुंबीय, शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

0

मुंबई, दि. २६- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ आज राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील १०९८ उपकेंद्रांवर घेण्यात आली. पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशाळा आणि एसएनडीटी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रांना आयोगाचे अध्यक्ष श्री. किशोरराजे निंबाळकर यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. आसनव्यवस्था आणि परीक्षार्थ्यांसाठी असलेल्या सुविधांची त्यांनी माहिती घेतली. दरम्यान, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या वेळीही श्री. निंबाळकर यांनी नागपूर येथील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी दिल्या.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ द्वारे सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील ६६६ पदांची भरती करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील १०९८ परीक्षा केंद्रांवर ३ लाख ६२ हजार ३१९ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला असून या परीक्षा प्रक्रियेची श्री. निंबाळकर यांनी पुणे शहरातील विविध परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. डेक्कन जिमखाना येथील विमलाबाई गरवारे प्रशाला आणि कर्वे रोडवरील श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयाच्या केंद्रांवर सुरु असलेल्या परीक्षा प्रक्रियेची श्री. निंबाळकर यांनी पाहणी केली.

दि. २३ जानेवारी २०२२ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ घेण्यात आली, त्यावेळीही नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, धनवटे नॅशनल कॉलेज, कमला नेहरू महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांना श्री. निंबाळकर यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली होती.

भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी आयोग ‘ॲक्शन मोड’ मध्ये – श्री. निंबाळकर

राज्यातील सर्व केंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ सुरळीतपणे पार पडली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा आणि सरळसेवा भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.

स्वतः अध्यक्ष परीक्षा केंद्रांना भेटी देत असून परीक्षा प्रक्रिया आणि नियोजनाची माहिती घेत आहेत. आयोगाकडे प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रिया लवकर करण्यासाठी आयोग ‘ॲक्शन मोड’मध्ये असून दोन दिवसांत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विविध पदांच्या मुलाखती घेऊन त्या मुलाखतींचा निकाल व गुणवत्ता यादी त्याच दिवशी जाहीर केली आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे.

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींचे महाविकास आघाडी समर्थन करते का? भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.‌चंद्रकांतदादा पाटील यांचा सवाल

पुणे-नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी सरकार मधील सर्व घटक पक्षांचे नेते महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनाला बसले. त्यामुळे १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध असणाऱ्यांचे समर्थन करतात का? असा सवाल भाजपा‌ प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थित केला. तसेच शिवसेनेचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील प्रेम सोईचे असल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केला. ते‌ पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे माध्यमांशी बोलत होते.आ. पाटील म्हणाले की, “१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपीसोबतचे जमीन खरेदी-विक्रीसंदर्भातील पुराव्यांच्या आधारे नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. कसून चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली. त्यानंतर न्यायालयानेही नवाब मलिक यांना ईडीच्या कोठडीत पाठवले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी सरकार मधील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी मंत्रालयाजवळच्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनाला बसले. त्यामुळे एकप्रकारे १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींना पाठिशी घालण्याचाच प्रकार आहे.”ते पुढे म्हणाले की, “घटनात्मक दृष्ट्या एखाद्या सरकारी नोकरदाराला अटक झाल्यानंतर २४ तासांच्या आत त्याचे निलंबन करायचे असते. तसेच चार्टशीट दाखल झाल्यानंतर त्याला सेवेतून बडतर्फ करावे लागते. त्यानुसार मंत्र्याच्या अटकेनंतर ही प्रक्रिया का राबवली जात नाही.”

ते पुढे म्हणाले की, मंत्रालयाच्या आवारात किंवा आसपासच्या परिसरात मराठा समाजबांधवांना,ओबीसी राजकिय आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करु इच्छिणाऱ्यांना आंदोलनास परवानगी नाही. पण दुसरीकडे नवाब मलिकांच्या अटकेनंतर राज्याचं अख्खं मंत्रिमंडळ महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं. त्यामुळे या आंदोलनास कोणी परवानगी दिली, याची सखोल चौकशी झाली पाहिजे.”शिवसेनेला सवाल करताना आ.‌पाटील म्हणाले की, “संजय राठोड यांचा राजीनामा शिवसेनेनं तातडीने घेतला. पण नवाब मलिकांच्या अटकेनंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शिवसेनेने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.”शिवसेनेच्या सावरकर प्रेमावर विचारले असति आ.‌पाटील म्हणाले की, “महाविकास आघाडीसोबत सत्तेत असेपर्यंत शिवसेनेचे मतपरिवर्तन होऊच शकत नाही. कारण तिघांनी एकत्रित येऊन ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ ठरवला आहे, त्यानुसार एकमेकांच्या निष्ठांना धक्का लागू नये, याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे टिपू सुलतानची जयंती साजरी केली; तर त्यांना चालतं. पण सावरकरांमुळे शिवसेना सोडून इतर दोन पक्षांच्या निष्ठा, मन दुखावणार असेल, तर सावरकर प्रेम जाहीर करायचं नाही, हे त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे सोयीनुसार शिवसेना सावरकर प्रेम व्यक्त करत असते,” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.