Home Blog Page 2070

राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत तविश पाहवा याला दुहेरी मुकुट,मुलींच्या गटात ओडिशाच्या आहान हिला एकेरीचे विजेतेपद

0

मुंबई,  26 फेब्रुवारी, 2022 :महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 16व्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात हरियाणाच्या तविश पाहवा याने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट संपादन केला. तर,  मुलींच्या गटात ओडिशाच्या आहान हिने एकेरी गटाचे विजेतेपद संपादन केले.  

जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित हरियाणाच्या तविश पाहवा याने दुसऱ्या मानांकित तामिळनाडूच्या फजल अली मीरचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. तविश हा फरिदाबाद येथे शिव नादर शाळेत सहावी इयत्तेत शिकत असून एन-कोर टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षक मणिंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याने याआधी जानेवारी महिन्यात हरियाणा, कर्नाळ येथील 12वर्षाखालील राष्ट्रीय सिरीज टेनिस स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकावले होते.  काल दुहेरीत तविश पाहवाने तक्षम सैनीच्या साथीत प्रणित चिट्टीपुदोरागरी व फझल अली मीरयांचा 6-4, 1-6, 10-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. 
मुलींच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित ओडिशाच्या आहान हिने हरियाणाच्या अव्वल मानांकित आनंदिता उपाध्यायचा 6-4, 6-1 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. 12 वर्षीय आहान ही भुवनेश्वर येथे सेंट झेवियर हायस्कुलमध्ये सहावी इयत्तेत शिकत असून एस बेस टेनिस अकादमीत प्रशिक्षक अजय निशांक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिने याआधी जानेवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात हरियाणा, कर्नाळ येथील 12वर्षाखालील राष्ट्रीय सिरीज टेनिस स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकावले होते.   स्पर्धेतील एकेरी गटातील विजेत्यांना 200एआयटीए गुण, करंडक, प्रशस्तीपत्रक, तर उपविजेत्या खेळाडूंना 150एआयटीए गुण, करंडक, प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे संचालक व एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वैद्य, आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.  
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: अंतिम फेरी: मुले:तविश पाहवा(हरियाणा)[1] वि.वि.फजल अली मीर(तामिळनाडू)[2]6-2, 6-2; 
मुली: आहान(ओडिशा)[2]वि.वि.आनंदिता उपाध्याय(हरियाणा)[1] 6-4, 6-1. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींना सक्शन यंत्रांचे वितरण

0

पुणे दि.२६: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानभवन परिसरात जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींना सक्शन यंत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी जि. प.अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, कृषी सभापती बाबूराव वायकर, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

श्री.पवार यांनी यंत्राविषयी माहिती घेऊन गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे आवाहन यावेळी केले. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून ग्रामपंचायतींना सक्शन यंत्र देण्याची योजना घेण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला ८ लक्ष ९० हजार याप्रमाणे ११ तालुक्यातील वारुळवाडी, ओतूर, चिंबळी, चऱ्होळी खु., अवसरी बु., निंबुत, भिगवण, अंथुर्णे, निराशिवतक्रार, रांजणगाव गणपती, हिंजवडी, भूगाव, कार्ला, कामशेत, इंदोरी, उरळी कांचन, लोणी काळभोर अशा 17 तसेच भोर तालुक्यातील एक याप्रमाणे १८ ग्रामपंचायतींना सक्शन यंत्र पुरविण्यात आले आहे. या यंत्राची क्षमता ३ हजार लिटर आहे.

जम्बो कोविड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय,शिशू वर्गातील मुलांचे शिक्षण सुरू करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठक

पुणे दि.२६: जिल्ह्यातील कोविड संसर्गाचे प्रमाणात नियंत्रणात येत असल्याने शिशू वर्गातील मुलांचे शिक्षण सुरू करण्यात यावे आणि जम्बो कोविड रुग्णालय येत्या २८ फेब्रुवारीनंतर बंद करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि. प.अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, जम्बो कोविड रुग्णालय बंद केल्यानंतर तेथील परिसर पूर्ववत करण्यात यावा. रुग्णालयातील साहित्य पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात उपयोगात आणले जावे. कोविड संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. उद्यान आणि दुकानांच्या वेळा पूर्वीप्रमाणे करण्यात याव्या. ग्रामीण भागात ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना वर्धक मात्रा देण्याचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीत श्री.राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात गेल्या ७ दिवसात नवीन रुग्णांच्या संख्येत ५१ टक्क्यांनी घट झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणात ८५ लाखाने, तर १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणात ४९ हजाराने वाढ झाली. जिल्ह्याने १ कोटी ७२ लक्ष लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या ५८ टक्के व्यक्तींना लशीची वर्धक मात्रा देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

बैठकीस आमदार दिलीप मोहिते, चेतन तुपे, सुनिल टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सह पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.
0000

तळजाई वन उद्यान विविध विकासकामांचे उद्घाटन -वनक्षेत्राच्या अनुरूप विकासकामे करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

0


पुणे दि.२६- वनक्षेत्राचा विकास करताना निसर्गाला धक्का न लावता त्या  परिसराला अनुरूप विकासकामे करावीत आणि स्थानिक प्रजातीच्या वृक्षांना प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

तळजाई टेकडी येथील वन उद्यानातील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भीमराव तापकीर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, माजी महापौर प्रशांत जगताप,  मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर, उप वनसंरक्षक राहुल पाटील आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, नागरिकांना लाभ होईल आणि वन विषयक कायद्याचे पालन होईल अशा पद्धतीने विकास करण्यात यावा. या प्रक्रीयेत वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी, विविध सामाजिक संस्था, महानगरपालिकेलादेखील सहभागी करून घ्यावे. वनक्षेत्रातील स्वच्छता ठेवणे आणि येथील वन्यजीवांना सुरक्षित अधिवास मिळेल याची दक्षता घेणेदेखील गरजेचे आहे.

पर्यावरण रक्षणावर विशेष भर
कोरोना संकटाच्या काळात ऑक्सिजनचे महत्व अधोरेखित झाले. ऑक्सिजन प्रकल्पाची मोठ्या प्रमाणावर उभारणी करण्यात आली. माणसाच्या आरोग्याच्यादृष्टीने कायमस्वरुपी ऑक्सिजन देणारी झाडे जगविणे महत्वाचे आहे. शासनाने वनक्षेत्र वाढविण्यावर भर दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे. वनक्षेत्र वाढविण्यासाठी आणि प्रदूषण कमी करून आरोग्यदायी पर्यावरण निर्मितीसाठी आवश्यक निधीदेखील देण्यात येत आहे. वारसा वृक्ष संवर्धनाकडेदेखील विशेष लक्ष देण्यात येत आहे. या कार्यात अभिनेता सयाजी शिंदे यांचे सहकार्य मिळत आहे. तळजाई परिसरातील ग्लिरिसिडीया प्रजातीचे वृक्ष काढून टप्प्याटप्प्याने स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पक्षी आणि प्राण्यांनाही जगण्याचा हक्क
श्री.पवार म्हणाले, विकासाच्या प्रक्रीयेत वन्यजीवांचा अधिवासही टिकेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पक्षी आणि प्राण्यांनाही जगण्याचा हक्क आहे. प्राण्यांची संख्या अलिकडच्या काळात कमी होत चालली आहे. पर्यावरण संतुलनासाठी प्राणी, पक्षी वाचावेत यासाठी वन विभागातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. प्राण्यांच्या अनाथालयासाठी २२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तळजाई वन उद्यानासाठी ५ कोटीचा निधी देण्यात आला आहे.

वन संवर्धनासाठी नागरिकांनी सूचना कराव्यात
पर्यावरण रक्षण आणि वन संवर्धनाच्या कार्यात नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहे. वन विभागातर्फे प्रयत्न करण्यात येत असले तरी नागरिकांनी उपयुक्त सूचना केल्यास त्याचाही विचार करण्यात येईल. हा समृद्ध नैसर्गिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि बहरलेला निसर्ग ही पुण्याची ओळख व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केले. पर्यावरण रक्षणासाठी ई-वाहनांचा उपयोग वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी श्री.भरणे म्हणाले, तळजाई उद्यानाच्या माध्यमातून नागरिकांना चांगले पर्यावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. येथे आवश्यक सुविधा निर्माण करताना नैसर्गिक संपदेचेही जतन करण्यात येईल. परिसराचा विकास झाल्याने नागरिकांना सुविधा होईल.

निसर्गाचा आंनद देणारे वन उद्यान
पाचगाव पर्वती येथील भांबुर्डा वनपरिक्षेत्रातील एकूण २४७ हेक्टर क्षेत्र राखीव वन म्हणून १८८९ मध्ये अधिसूचित झाले आहे. या परिसरात वन उद्यान विकसीत करण्यासाठी १३ कोटींचा निसर्ग पर्यटन आराखडा मंजूर झाला आहे. तळजाई वन उद्यानामध्ये बांबू वनउद्यान, फुलपाखरू वन उद्यान, स्पर्श वन, सुगंधी वन, औषधी वनउद्यान,  जैवविविधता वन उद्यान,  पक्षी निरीक्षण पथ , निसर्ग प्रेक्षागृह, योगासनाकरता योग केंद्र, ध्यान केंद्र अशा विविध प्रकारच्या नैसर्गिक सुविधा करण्यात आल्या आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाचे क्षण घालविण्यासाठी या सुविधा उपयुक्त ठरणार आहेत. उद्यानाला भेट देणाऱ्या नागरिक आणि मुलांसाठी निसर्ग परिचय केंद्रही उपयुक्त ठरणार आहे.

कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पर्यावरणप्रेमी नागरीक उपस्थित होते.
000

गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानक करावे

0

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

पुणे- गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानक असे करावे, अशी आग्रही मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष . आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. तसेच यासंदर्भात मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र ही दिले असल्याची माहितीही आ. पाटील यांनी दिली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज डेक्कन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेस आ. पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस तथा मनपा निवडणूक प्रचार प्रमुख राजेश पांडे, सरचिटणीस दत्ताभाऊ खाडे, दीपक पोटे, भाजपा शिवाजी नगर मंडल अध्यक्ष रवी साळेगावकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर यांच्यासह नगरसेविका ज्योत्स्नाताई एकबोटे, अल्पनाताई वर्पे,श्रद्धाताई प्रभुणे,वासंतीताई जाधव, नगरसेवक जयंत भावे, राजाभाऊ बराटे, सुशिल मेंगडे पदाधिकारी अनिता तलाठी, हर्षदाताई फरांदे,पल्लवीताई गाडगीळ, विद्या टेमकर, कुलदीप सावळेकर, नवनाथ जाधव, स्वप्निल राजीवडे, रणजित हगवणे, प्रकाश तात्या बालवडकर, सतिश मोहोळ, अमोल डांगे, शिवाजी शेळके, गायत्री लांडे, महेश पवळे, दीपक पवार, अतुल चाकणकर, वैभव मुरकुटे, श्रद्धा मराठे, यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

आ..‌पाटील म्हणाले की, “स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचं सर्वांचं श्रद्धास्थान आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी पुण्यात याच ठिकाणी विदेशी कपड्यांची होळी करुन, ब्रिटिश सरकारला आव्हान दिले होते. त्यामुळे या परिसराचे आम्हा सर्वांसाठी वेगळे महत्त्व आहे.”

ते पुढे म्हणाले की, “येत्या ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यासाठी दौऱ्यावर येणार आहेत.‌ यावेळी गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्थानक येथे मेट्रोने प्रवासही करणार आहेत.‌ त्यामुळे या मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर करावे, यासाठी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या कडे पत्राद्वारे मागणी केली आहे.”

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे कामगार मित्र पुरस्कार प्रदान

0

मुंबई, : श्रम शक्तीला आपल्या देशात पूर्वीपासून महत्त्व आहे. अखिल विश्वाचा कारभार कामगारांच्या कष्टामुळे चालतो. कामगारांनी पाया रचला नाही तर कुठलीही इमारत उभी राहणार नाही.  कामगारांना विश्वकर्मा म्हणून संबोधले जाते व राष्ट्रनिर्माण कार्यात त्यांचे योगदान अनन्य साधारण आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते धडक कामगार युनियनच्या वतीने देण्यात येणारे ‘कामगार मित्र’ पुरस्कार शुक्रवारी (दि. २५) राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी धडक कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजित राणे, श्रीमती अनघा राणे व पुरस्कार विजेते निमंत्रित उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते कामगार मित्र विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

कामगार चळवळीशी निगडित कार्यकर्ते व कामगारांसाठी काम करणारे वकील, पत्रकार व समाज सेवकांचा सत्कार घडवून आणल्याबद्दल धडक कामगार संघटनेचे अभिनंदन करताना राज्यपाल म्हणाले, कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. कामाला प्रतिष्ठा देऊन ते तन्मयतेने केले तर ते ईश्वरी आनंद देते. आज आपण प्रामाणिकपणे काम केले तर उद्या त्याचा फायदा भावी पिढीला होतो असे राज्यपालांनी सांगितले.

धडक कामगार युनियन गेल्या १० वर्षांपासून काम करीत असून आज संस्थेशी ७.३० लाख कामगार जोडले गेले असल्याचे अभिजित राणे यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी सर्वोच्च न्यायालयातील वकील ऍड सुभाष भुतिया, ऍड. आसिफ मुल्ला, मुल्ला ऍण्ड मुल्ला असोसिएट, आशिष पाटील, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका, ॲड. अशोक भाटिया वरिष्ठ वकील, ऍड. अरुण निंबाळकर वकील, हायकोर्ट मुंबई, ऍड. जय भाटिया, मॅनेजिंग ऍर्टनी, जे. के.बी लिगल, विजय शिर्के, संचालक, शिर्के ग्रुप, इर्शाद मुल्ला व्यवस्थापकीय संचालक, हाजी आदम  मुल्ला, युनिव्हर्सल स्कूल, अशोक पवार, डेप्युटी आरटीओ, अंधेरी आणि बोरिवली, वेगुणपाल शेट्टी, हॉटेल साई पॅलेस उपाध्यक्ष, अमर पवार, व्यवस्थापकीय संचालक, लॅकोझी टोयोटो ऑटो प्रा. लि., राजेश विक्रांत, साहित्य संपादक: वृत्त मित्र, उदय पै, व्यवस्थापकीय संचालक, ऍड आर्ट, अतुल रावराणे, शिवसेना नेते सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य, दशरथ सिंग, एचआर मॅनेजर, पीव्हीआर सिनेमा, करण गायकर, संस्थापक अध्यक्ष, छावा क्रांतीवीर सेना, निलेश चांदोळे, मानव संसाधन व्यवस्थापन (एच आर) कार्निवल सिनेमाज, प्रकाश बारोट, सीईओ, झेनल कंन्सट्रकशन प्रा. लि., राजेश पुरंदरे, ज्येष्ठ पत्रकार, अमोल राणे, सीईओ, वास्ट मीडिया प्रा. ली., रामजस यादव, अध्यक्ष,धडक कामगार युनियन, ऍड. नारायण पणिकर (मुरली),उपाध्यक्ष, धडक कामगार युनियन, प्रकाश पवार, खजिनदार, धडक कामगार युनियन, झोहेब पटेल, संचालक, आदर्श मसाला अँड कंपनी, कुणाल जाधव, जनसंपर्क प्रमुख, धडक कामगार युनियन, मनीषा यादव, ऑफिस को- ओरडीनेटर, धडक कामगार युनियन, मुख्य कार्यालय, झुल्लुर यादव, अध्यक्ष- सेल्स टैक्स ऑफिस यूनिट, कमलेश वैष्णव, ब्यूरो चीफ,  नेशन फस्ट टीवी चैनल, जॉनी  वायके, महाराष्ट्र वन कर्मचारी युनिट अध्यक्ष धडक कामगार युनियन, विजय एस. सावंत (विजू पटेल) निर्माता-दिग्दर्शक- अभिनेता, कमलेश यादव, नगरसेवक, भाजपा, डॉ. अजित सावंत, बी.ए. एम. एस (बॉम्बे), सत्यविजय सावंत, युनिट अध्यक्ष, हसमुख अँड कम्पनी पीजीधडक कामगार युनियन, धीरज पाटील युनिट अध्यक्ष, हॉटेल पर्ल, धडक कामगार युनियन, उत्तम कुमार, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, धडक कामगार युनियन, अभिजित भोईटे, महाराष्ट्र उपाध्यक्ष, धडक कामगार युनियन, डॉ नारायण राठोड, बी के पांडे, कामगार मित्र पत्रकार यांना यावेळी कामगार मित्र पुरस्कार देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनी ५३ पुस्तकांचे लोकार्पण

0

मुंबई, ; साहित्य संस्कृती, कला, इतिहास अशा विविध विषयांवरील वैविध्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, नाविन्यपूर्ण व दुर्मिळ 53 पुस्तकांचे लोकार्पण मराठी भाषा गौरवदिनी दि. 27 फेब्रुवारी, 2022 रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ‘पुस्तक प्रकाशन’ हे मुख्य उद्दिष्ट असून साहित्य संस्कृती, कला, इतिहास यासारख्या विषयांवर वैचारीक, समीक्षात्मक, चरित्रात्मक, वाङमयीन संशोधन या विषयांवरील वैविध्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, नाविन्यपूर्ण व दुर्मिळ ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित केले जातात. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेल्या पुस्तकांचे दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी लोकार्पण करण्याची अनेक वर्षाची मंडळाची परंपरा आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील कोरोनासारख्या महासंकटातही ही परंपरा खंडित न होऊ देता मंडळाकडून अत्यंत मौलिक अशा 53 पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते त्यांच्या मंत्रालयीन दालनात दि. 23 फेब्रुवारी, 2022 रोजी झाले, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील यांनी कळविले आहे.

उपमहापौरांसह भाजपाचे 5 नगरसेवक सेनेत

0

नाशिक-भाजपाचे पाच नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत नाशिक महापालिकेतील भाजपाच्या उपमहापौर यांच्यासोबत आणखी चार नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. नाशिकमधील परिस्थितीवर खासदार संजय राऊत वैयक्तिक पातळीवर लक्ष ठेवून असतात असं सांगितलं जातं. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये येऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याला राजकीय प्रत्युत्तर देत शिवसेनेनं भाजपाला मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे.

नाशिकचे भाजपाचे उपमहापौर भिकूबाई बागुल यांच्यासह नगरसेवक प्रथमेश वसंत गीते, जयश्री ताजने, हेमलता कांडेकर, मुसीर सैय्यद यांनी आज भाजपाचा सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपाच्या या पाच जणांसोबत भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभू बागुल आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. शिवसेनेनं आता बागुल यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी टाकली आहे. तसंच त्यांच्याच खांद्यावर नाशिक महापालिका निवडणुकीची धुरा सोपविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे

हेमामालिनी म्हणाल्या, युद्ध थांबवतील मोदी, जगाला आहे विश्वास

0

एएनआय या वृत्तसंस्थेने केलेल्या एका ट्वीटमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून, हे युद्ध संपुष्टात येण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यस्थी करत हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नव्हे तर, मोदीजींनी पुढाकार घेत हे युद्ध थांबवावे अशी संपूर्ण जगातील नेत्यांची इच्छा असल्याचे हेमा मालिनी यांनी म्हटले असून, संपूर्ण जगातील नेते भारताच्या पंतप्रधानांना आदर देत असल्याचे म्हटले आहे.

युक्रेनमधील परिस्थिती चिघळल्यानंतर युक्रेनच्या भारतातील राजदूत डॉ. इगोर पोलिखा (Dr Igor Polikha) यांनी पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत चर्चा करण्याचे आणि हे युद्ध थांबवण्यास सांगण्याचे कळकळीचं आवाहन केले होते. 

पुण्यातून युक्रेन येथे शिक्षणासाठी गेलेले ७७ विद्यार्थी अडकले.

0

पुणे : पुण्यातून युक्रेन येथे शिक्षणासाठी गेलेले ७७ विद्यार्थी तेथील युद्धजन्य स्थितीमुळे अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी जारी केलेल्या या यादीमध्ये सांगली जिल्ह्यातील दोन आणि मुंबईतील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.

याशिवाय, पुण्यातील आणखी काही विद्यार्थी युक्रेनमध्ये असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करीत असून, त्यांच्याशी संपर्कात असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी युक्रेनमधील किव्ह, खार्किव, विनितसिया, बोकोवेलियंट, हरिकिया, ओडिसा, कार्नोबिन, टार्नोपिया, युवान, झापोरोझ्ये, बुकोव्हिनियन मेडिकल युनिव्हर्सिटीसह विविध प्रांतामध्ये आहेत. त्यापैकी बहुतांश विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले आहेत. त्याठिकाणी शून्य ते एक डिग्री सेल्सिअस तापमान तर दुसरीकडे युद्धजन्य स्थिती अशा संकटात विद्यार्थी अडकून पडले आहेत.

किव्ह ही युक्रेनची राजधानी आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. तर, खार्किव हे युक्रेनच्या ईशान्येकडील सर्वात मोठे शहर असून, प्रदेशाचे प्रशासकीय केंद्र आहे.

पुणे जिल्ह्यातील या भागातील आहेत विद्यार्थी

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कोथरूड, बाणेर, हडपसर, चंदननगर, ससाणेनगर, सोपानबाग, केसनंद, केशवनगर, वाघोली, लोणीकंद, वानवडी, खेड, पुरंदर, थेऊर, शिरूर घोडनदी, शिरूर गुजरमळा, केडगाव, दौंड, पाषाण, बोराटे आळी मुळशी, वडगाव बुद्रूक, बालेवाडी, मुंढवा, जुनी सांगवी, इंदापूर, शिवापूर, जुन्नर, मावळ, लोहगाव, डुडुळगाव, आळंदी रस्ता, उरुळी देवाची, नारायणगाव, लोणावळा, बोऱ्हाडेवाडी, पिंपरी चिंचवड, देहू रस्ता, आंबेगाव बुद्रूक, चाकण, लोणावळा, शिक्रापूर परिसरातील आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या या यादीमध्ये पुणे जिल्ह्याव्यतिरिक्त वाटेगाव-सांगली येथील दोन आणि मुंबई येथील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासन हे केंद्र आणि राज्य सरकारशी संपर्कात आहे. संबंधित विद्यार्थ्यांची यादी राज्य सरकारला पाठविण्यात आली आहे.

– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

युक्रेनचे चर्चेचे निमंत्रण रशियाने स्वीकारले.

0

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेस्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना चर्चेचे निमंत्रण पाठवले असल्याचा मोठा दावा रशियन मीडियाने केला होता. युक्रेनच्या या आमंत्रणाला रशियाने होकार दर्शवला असून, रशिया एक शिष्टमंडळ चर्चेसाठी युक्रेनला पाठवणार आहे. हे शिष्टमंडळ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांच्यसोबत चर्चा करणार आहे.

राज्यातील अंदाजे १२०० विद्यार्थ्यी युक्रेन देशात अडकले-मायदेशात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न

0

मुंबई, दि.२५ – सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून राज्यातील अंदाजे १२०० विद्यार्थ्यी युक्रेन देशात अडकले आहेत त्यातील ३०० विद्यार्थ्यांशी पालकांचा संपर्क झाला आहे. राज्य नियंत्रण कक्ष या विद्यार्थ्यांशी संपर्कात असून महाराष्ट्र शासनाकडून या विद्यार्थ्यांना तसेच अडकलेल्या नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिंहगड येथील निवासस्थानी युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थ्यी तसेच नागरिकांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते.

मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रातील युक्रेनमध्ये  अंदाजे १२०० विद्यार्थ्यी अडकले असून ३०० विद्यार्थ्यांनी पालकांशी सपंर्क साधला असल्याची माहिती नुकतीच प्राप्त झाली आहे.युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती जिल्हास्तरावर देखील संकलित करण्याचे काम सुरू आहे.सर्व जिल्हाधिकारी यांनी देखील हेल्पलाईन नंबर जाहिर केलेले आहेत.  राज्याचा नियंत्रण कक्ष  022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर मोबाईल तसेच व्हॉटस क्रमांक ९३२१५८७१४३ आणि controlroom@maharashtra.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा.

मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रातील किती लोक अडकले  आहेत याची माहिती विभाग घेत आहे.तात्काळ संपर्क केंद्रही सुरू केले आहे.जी जी मदत हवी असेल  त्या मदतीसाठी राज्य सरकार  देण्यास तयार आहे .केंद्र सरकारने उपाययोजना केल्या आहेत.कदाचित युक्रेन मधून विमान उडू शकणार नाही.बाजूच्या देशातून विमान जर घेतलं तर त्यासाठी तयारी दर्शवली आहे.या सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा स्तरावर संकलित करण्याची तयारी आम्ही केली आहे.काही लोकांशी संपर्क होण्यात अडचणी येत आहेत. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालयाने  नवी दिल्ली येथे  हेल्पलाईन्स कार्यन्वित केल्या आहेत. केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालय, नवी दिल्ली येथील क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.

  • टोल फ्री – 1800118797
  • फोन 011-23012113 / 23014104 / 23017905
  • फॅक्स 011-23088124
  • ईमेल situationroom@mea.gov.in या हेल्पलाईनवर संपर्क

साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठी भाषा गौरव दिनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार गौरव व पुरस्कार प्रदान सोहळा

0

मुंबई, दि. 25 : ज्ञानपिठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून येत्या रविवारी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा विभागातर्फे सायंकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना गौरव व पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

यावेळी विंदा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त श्री भारत सासणे यांच्यासह श्री.पु.भागवत पुरस्कार प्राप्त प्रकाशन संस्था  – लोकवाङ्मय गृह, मुंबई, डॉ अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्काराचे मानकरी (व्यक्ती) – डॉ. रमेश नारायण वरखेडे, नाशिक, कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्काराचे मानकरी (व्यक्ती) – डॉ. चंद्रकांत पाटील, पुणे, कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार मिळालेले (संस्था) – मराठी अभ्यास केंद्र, मुंबई यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख,मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, आमदार राहुल नार्वेकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  यावेळी चौरंग निर्मित ‘शारदेच्या अंगणी मराठीच्या प्रांगणी’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.

पुरस्काराचे नाव व पुरस्कारार्थी यांची माहिती खालीलप्रमाणे –

1)​विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक – श्री. भारत सासणे

  • श्री. भारत सासणे यांनी कथा, नाटक, एकांकिका, कादंबरी, बालसाहित्य, ललित व श्रुतिका लेखन, चित्रपट पटकथा या वाङ्मय प्रकारात लेखन केले असून त्यांची 35 पुस्तके प्रकाशित आहेत.
  • श्री. भारत सासणे यांना राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी 7 पुरस्कार व इतर 30 पुरस्कार मिळाले आहेत. मराठवाडा साहित्य संमेलन, सांगली येथे संपन्न झालेल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन व जळगांव येथे संपन्न झालेल्या उत्तर महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
  • श्री. भारत सासणे यांनी ‘दीर्घकथा’ हा वाङ्मयप्रकार नाविन्यपूर्णतेने व प्रयोगशीलतेने हाताळला आहे.

2)​श्री.पु.भागवत पुरस्कार प्राप्त प्रकाशन संस्था  – लोकवाङ्मय गृह, मुंबई

  • पुस्तक व्यवसायापुढची सगळी आव्हाने पेलून सदैव पुरोगामी विचारांशी बांधिलकी बाळगणाऱ्या लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने समाजाला नवी दृष्टी देणारे वाङ्मय सातत्याने प्रकाशित केले आहे.
  • ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे बृहद चरित्र’, नेमाडे यांच्या मुलाखतींचा संग्रह, अशोक केळकरांचा ‘रुजुवात’ हा मराठी समीक्षेचा मानदंड, सतीश काळसेकर यांचे कसदार साहित्य, दहा निवडक लेखकांच्या साहित्याची संपादित ‘निवडक साहित्यमाला’, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र-चरित्र, अशोक शहाणे, अरुण खोपकर, अरुण काळे, प्रतिमा जोशी, जयंत पवार, मनोहर ओक, नीतिन रिंढे, अशा नव्या वळणाच्या प्रयोगशील लेखकांच्या साहित्याने लोकवाङ्मयची सूची उजळून निघाली आहे.
  • नवीन लेखक / कवींना पुढे आणण्यासाठी कविसंमेलने, विविध लेखनविषयक स्पर्धा, आपले वाङ्मय वृत्त या मासिकाद्वारे साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक परिघावरील लिखाणाला चालना देण्याचे काम लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने केले आहे.
  • वि.पु. भागवत पुरस्कारासह मराठी विज्ञान परिषद, फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स, मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य संघ या संस्थांचे पुरस्कार लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेस प्राप्त झाले आहेत.
  • लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेची गेल्या पन्नास वर्षांतील तेराशे पुस्तकांची भरघोस निर्मिती मराठी साहित्य निर्मिती क्षेत्रात मौलिक स्वरुपाची भर घालणारी आहे.

3) डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (व्यक्ती) – डॉ. रमेश नारायण वरखेडे, नाशिक

  • ‘अनुष्टुभ’ या मराठी साहित्य आणि समीक्षाव्यवहारात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या वाङ्मयीन नियतकालिकाचे संस्थापक संपादक.
  • पुणे विद्यापीठात व्यावहारिक मराठीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात तसेच पाठ्यपुस्तक निर्मितीतही पुढाकार.
  • का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन केंद्र धुळे येथे कार्यरत असताना खानदेशातील भिलोरी, पावरा, बंजारा, अहिराणी या बोलींचा भाषिक आणि लोकसांस्कृतिक अभ्यास करण्यासाठी पद्धतिशास्त्र विकसित केले. तसेच ह्या विषयाचा अभ्यास करणाऱ्यांना उपयुक्त असे ‘समाजभाषाविज्ञान:प्रमुख संकल्पना’ हे पुस्तक १९८८ मध्ये प्रकाशित.
  • 19वर्षे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अनुदेशन तंत्रविज्ञानाचे प्राध्यापक आणि मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे या विद्याशाखेचे संचालक म्हणून कार्यरत. स्वयं-अध्ययनपर पुस्तकांची निर्मिती. ग्रंथालयशास्त्र, वृत्तपत्रविद्या, मानवी हक्क, ग्राहक संरक्षण, पंचायतराज, सामाजिक परिवर्तने आणि चळवळी असे अनेक नवे अभ्यासक्रम विकसित करून त्यांची परिभाषा तयार केली.
  • निवृत्तीनंतर नाशिक येथे इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज इंजिनिअरिंग या संस्थेचे अध्यक्ष आणि ‘क्रिटिकल इन्क्वायरी’ या द्वैभाषिक संशोधन-पत्रिकेचे आठ वर्षे संपादन.

4) डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (संस्था) – मराठी अभ्यास परिषद, पुणे

  • मराठी भाषेचा सर्वांगीण विकास, लोकव्यवहारात मराठीचा वापर, ज्ञानव्यवहारात मराठी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे आणि मराठीजनांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे या चतु:सूत्रीनुसार मराठी भाषेच्या हिताच्या आणि समृद्धीच्या दृष्टीने ही संस्था चाळीस वर्षे सातत्याने कार्यरत
  • भाषाविषयक सैद्धान्तिक विचारविमर्श, भाषांतरित साहित्याची चिकित्सा तसेच भाषा आणि जीवन यातील विविधपदरी संबंध आणि त्यावरचे भाष्य मांडणारे भाषा या विषयाला वाहिलेले ‘भाषा आणि जीवन’ हे त्रैमासिक 1983पासून आजतागायत सुमारे चाळीस वर्षे प्रकाशित होणारे केवळ मराठीच नव्हे तर
  • सकल भारतीय भाषांमधले हे एकमेव भाषाशास्त्रीय नियतकालिक.
  • कोश, बोलीभाषा, अन्य भाषारूपे यांचा अभ्यास, भाषा आणि संस्कृती यांसंबंधी लेखन आणि लेखक यांना पुरस्कार.2018पासून या पुरस्काराचे नामकरण ‘प्राध्यापक ना. गो. कालेलकर पुरस्कार’.
  • वर्धापनदिनानिमित्त व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद तसेच मराठी भाषा दिनानिमित्त ‘भाषातज्ज्ञ श्रीमती सत्त्वशीला सामंत स्मृतिव्याख्यान’ इ. उपक्रम.
  • त्रिभाषा-सूत्राचे मूल्यमापन, भाषिक नीती आणि व्यवहार, प्रसार माध्यमे आणि मराठीचा विकास, पाठ्यपुस्तकांचे मूल्यमापन आदी विषयांवर सकारात्मक मंथन.

5) कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (व्यक्ती) – डॉ. चंद्रकांत पाटील, पुणे

  • कवी, समीक्षक, अनुवादक, अनेक बहुचर्चित मराठी आणि हिंदी कवितासंग्रहांचे संपादक तसेच राष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्याचे मोलाचे कार्य
  • १९६६ साली भालचंद्र नेमाडे यांच्यासह ‘वाचा’ या लघुनियतकालिकाचे प्रकाशन.
  • हिंदी साहित्याचा मराठी अनुवाद आणि मराठी साहित्याचा हिंदी अनुवाद करण्याचे कार्य.
  • दोन हजारहून अधिक कवितांचा अनुवाद, कविता-नाटक-कादंबरी यांच्या अनुवादांचे ४० संग्रह, १० संपादित ग्रंथ, ५ कवितासंग्रह, ५ लेखसंग्रह अशी ग्रंथसंपदा.
  • गेली सात वर्षे ज्ञानपीठ पुरस्कारासाठीच्या अंतिम निवडसमितीत परीक्षक तसेच मध्यप्रदेश सरकारचा कबीर सन्मान, कुसुमांजली राष्ट्रीय पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार यांसह अनेक राष्ट्रीय वा राज्यस्तरीय पुरस्कार समित्यांत परीक्षक म्हणून कार्य.
  • महाराष्ट्र शासनाच्या चार पुरस्कारांसह मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांचे पुरस्कार, विविध राष्ट्रीय पुरस्कार आणि अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार.

5) कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (संस्था) – मराठी अभ्यास केंद्र, मुंबई

  • मराठी भाषा, समाज आणि संस्कृती ह्यांसाठी विधायक चळवळ उभारू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन.
  • शालेय शिक्षणात येणारे मराठी भाषेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करून राज्य शासनाला द्विस्तरीय आराखडा सादर.
  • ‘उच्च शिक्षणाची दशा आणि दिशा’ हा उच्च शिक्षणात मराठीच्या वापरासंबंधी लक्ष वेधणारा अभ्यासग्रंथ प्रकाशित. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर सर्वत्र मराठी माध्यम उपलब्ध व्हावे यासाठी पाठपुरावा. त्यातून मुंबई विद्यापीठाच्या ‘बॅचलर ऑफ मास मीडिया’ अभ्यासक्रमांचे मराठीकरण.
  • न्यायव्यवहारात मराठीचा वापर व्हावा यासाठी ‘न्यायाच्या प्रतीक्षेत मराठी’ ह्या अभ्यासग्रंथाचे प्रकाशन करून जिल्हा व तालुका न्यायालय वकील परिषदेत त्याचे वितरण तसेच या संदर्भातीस चर्चासत्रांचे आयोजन.
  • माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात मराठीचा वापर वाढावा यासाठी संगणकीय मराठीच्या वापराबद्दल कार्यशाळा. राज्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक संगणकात मराठीचा वापर अनिवार्य होण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या अधिकाऱ्यांशी चर्चा. मराठीसाठी इन्स्क्रिप्ट फलक सर्वमान्य व्हावा, एमएससीआयटी अभ्यासक्रमात युनिकोड व मराठीचा समावेश व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा. त्या संबंधित पुस्तिका प्रकाशित.

युक्रेनमध्ये अडकले असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

0

कोल्हापूर, दि. 25 :   जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी केले आहे.

सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेन देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी नवी दिल्ली येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

नवी दिल्ली येथील मदत कक्ष

केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली, टोल फ्री क्र. 1800118797

दूरध्वनी क्र. 011-23012113 / 23014105 / 23017905

फॅक्स 011-23088124 ई मेल situationroom@mea.gov.in

कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक किंवा विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर टोल फ्री क्रमांक 1077, दूरध्वनी 0231-2659232 व 2652953 ई मेल rainkolhapur@gmail.com

‘पिफ २०२२’ जावेद अख्तर देणार विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान

0

मराठी स्पर्धा विभागासाठी निवड झालेल्या चित्रपटांची यादी जाहीर

पुणे, २५ फेब्रुवारी, २०२२ : ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते जावेद अख्तर यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान देणार आहेत. पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते १० मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या २०व्या ‘पिफ’च्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक विभागाचे मंत्री अमित देशमुख उपस्थित राहणार आहेत.

ज्येष्ठ सिने दिग्दर्शक आणि ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी समर नखाते (क्रिएटिव्ह डायरेक्टर – पिफ), प्रकाश मगदूम (संचालक – एनएफएआय) आणि मेघराज राजेभोसले (अध्यक्ष – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ) उपस्थित होते. तसेच पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, सबिना संघवी आणि चित्रपट निवड समितीचे सदस्य मकरंद साठे, अभिजित रणदिवे देखील यावेळी उपस्थित होते.

३ मार्च रोजी सायंकाळी ४:३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणाऱ्या २० व्या ‘पिफ’च्या उद्घाटन सोहळ्याची अधिक माहिती डॉ. पटेल यांनी दिली. डॉ. पटेल म्हणाले, स्वित्झर्लंडच्या मानो खलील यांच्या ‘नेबर्स’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होईल. उद्घाटन सत्राचे सादरकर्ता म्हणून अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अभिनेता स्वप्निल जोशी तर पं. सत्यशील देशपांडे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्याची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमांनी होणार असून यावेळी शर्वरी जमेनीस, गणेश चंदनशिवे आणि यशवंत जाधव यांचे सादरीकरण होणार आहे.

मेघराज राजेभोसले (अध्यक्ष – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ) यांनी मराठी स्पर्धा विभागासाठी निवड झालेल्या चित्रपटांची यादी यावेळी जाहीर केली. यात ‘आता वेळ झाली’ (अनंत महादेवन),’ गोदावरी’ (निखिल महाजन), ‘मीडियम स्पायसी’ (मोहित टाकळकर), निवास (मेहुल आगजा), ‘एकदा काय झाले’ (डॉ. सलील कुलकर्णी), ‘पोटरा’ (शंकर धोत्रे) आणि ‘तिचं शहर होणं’ (रसिका आगाशे) या ७ चित्रपटांचा समावेश आहे.

तसेच २० व्या ‘पिफ’दरम्यान प्रीमिअर होणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये ‘वर्तुळ’ (श्रीकांत चौधरी), ‘अवकाश’ (चित्तरंजन गिरी) ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटोलॉजी’ (प्रसाद नामजोशी, सागर वंजारी), ‘जननी’ (अशोक समर्थ), ‘राख – सायलेंट फिल्म’ (राजेश चव्हाण) आणि ‘रंगांध’ (धोंडिबा बाळू कारंडे) आदी चित्रपटांचा समावेश आहे. पिफ – २०२२ चा रेट्रोस्पेक्टिव्ह विभाग जगविख्यात भारतीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शक सत्यजित रे आणि इटालियन चित्रपट क्षेत्रातील एक महत्वाचे नाव असलेले पीअर पाओलो पासोलिनी यांना समर्पित केला जाणार आहे.

एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी ‘पिफ’दरम्यान एनएफएआयच्या आवारात होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, ४ ते १० मार्च दरम्यान एनएफएआयमध्ये ‘चित्रांजली’ या भित्तीचित्रे (पोस्टर) प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन स्वातंत्र्य सैनिक (फ्रीडम फाइटर), युद्ध वीर (वॉर हिरोज्) या थीमवर आधारित असणार आहे. तसेच ३५ एमएम या जगभरात नामशेष होत जाणाऱ्या फॉरमॅटमध्ये सत्यजित रे यांचे ‘अगंतुक’, ‘देवी’ आणि ‘जलसागर’ हे तीन चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. तसेच भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतीत ‘गुळाचा गणपती’ व साहीर लुधियानवी यांच्या स्मृतीत ‘प्यासा’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासू एनएफएआयमध्ये संशोधने झाली आहेत. या संशोधनांवर आधारित कानडी सिने दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांचे पुस्तक प्रकाशन पिफदरम्यान करण्यात येणार आहे.

यंदा पिफदरम्यान काही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये ५ मार्च रोजी विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानात ‘साहिर लुधियानवी आणि त्यांचे लेखन’ या विषयावर गीतकार जावेद अख्तर बोलणार आहेत. ६ मार्च रोजी ओम भुतकर यांचा उर्दू कविता आणि साहित्यावर आधारित ‘सुखन’ हा कार्यक्रम होईल. ७ मार्च रोजी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि डॉन स्टुडिओतर्फे ‘साऊंड इन फिल्म्स’ या विषयावर कार्यशाळा होणार आहे. तर ८ मार्च रोजी ‘सत्यजित रे आणि त्यांचा सिनेमा’ या विषयावर धृतिमान चॅटर्जी, डॉ. मोहन आगाशे आणि रवी गुप्ता आदी मान्यवरांचा सहभाग असलेला परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.