पुणे-भाजप चे पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची येत्या महानगरपालिका निवडणुकीसाठी पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, खा. गिरीश बापट, माजी केंद्रीय मंत्री खा. प्रकाश जावडेकर,शहराध्यक्ष जगदीश मुळीक,आ.माधुरीताई मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. सुनील कांबळे, आ. मुक्ता टिळक, आ. सिद्धार्थ शिरोळे, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वी पणे पूर्ण करेन असा विश्वास राजेश पांडे यांनी व्यक्त केला आहे. येत्या निवडणुकीत शंभर पेक्षा जास्त जागा जिंकून पुनःश्च एकदा भाजप च मनपाच्या सत्तास्थानी येईल आणि पुणे शहराच्या विकासाला गती देईल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे.
राजेश पांडे भाजपचे पुणे महापालिका निवडणूक प्रमुखपदावर …
मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग;कालबद्ध रीतीने इतर मागण्यांवरही कार्यवाही झाली पाहिजे-मुख्यमंत्री
मुंबई, दि. २५ : मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी काल झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्य शासन व मंत्रिमंडळ उपसमितीने मराठा समाजाबाबत आजवर घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीचा विस्तृत आढावा घेण्यात आला तसेच प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कालबद्ध रीतीने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण, समितीचे सदस्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख,राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी तसेच आदी संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.
मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावेळी मराठा समाजासंदर्भातील निर्णयांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती व समाजाच्या, समन्वयकांच्या मागण्यांची माहिती दिली. या विषयांवर विचारविनिमय होऊन अनेक निर्णय घेण्यात आले. मराठा समाजासाठी स्वतंत्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची लवकरच घोषणा होणार आहे. निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाकडे केवळ ओबीसी प्रकरणांची हाताळणी असेल, असेही या बैठकीत निश्चित करण्यात आले.
सहसचिव दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती
मराठा समाजासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी सहसचिव दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. या अधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीला गती मिळेल.
व्यवस्थापकीय संचालकांची रिक्त पदे भरणार
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासह विविध महामंडळांची संचालक व व्यवस्थापकीय संचालकांची पदे रिक्त पदे आवश्यकतेनुसार तातडीने भरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ‘सारथी’ संस्थेच्या विभागीय उपकेंद्रांसाठी भूखंड देण्याचे प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर झाले असून, त्यावर तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले .
सारथीची पद भरती प्रक्रिया महिन्याभरात
‘सारथी’ संस्थेसाठी आवश्यक असलेल्या २७३ पदांसाठी भरती प्रक्रिया महिन्याभरात केली जाईल. मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या १८ नागरिकांच्या वारसांना राज्य परिवहन मंडळात रुजू करून घेण्यात आले असून, उर्वरित प्रकरणांवरही तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले.
इतर वसतिगृहेही सुरू करण्यासाठी प्रयत्न
डॉ.पंजाबराव देशमुख वस्तीगृह योजनेअंतर्गत ठाणे, पुणे, सातारा (कराड), सांगली (मिरज), कोल्हापूर, नाशिक व अहमदनगर येथील सात वसतिगृहे वापरासाठी सज्जे असून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी इतर जिल्ह्यांमध्येही वसतिगृहे कार्यरत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही या वेळी निश्चित करण्यात आले.
मराठा आंदोलनातील जे गुन्हे मागे घ्यायचे राहिले आहेत त्यांच्याबाबतीत महाधिवक्त्यांच्या मार्गदर्शनाखाली गृह तसेच विधी व न्याय विभागाकडून न्यायालयाकडे तातडीने पाठपुरावा करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भातील निर्णयांची माहिती राज्य शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करुन ती वेळोवेळी अद्यावत करण्याची सूचनाही त्यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आऱक्षण रद्दबातल केल्यानंतर विविध नोकरभरती प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांबाबत लवकरच आणखी एक बैठक होणार असून, त्यामध्ये विविध कायदेशीर मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे..
खादी व ग्रामोद्योगी वस्तुंच्या राज्यस्तरीय प्रदर्शनाचा शुभारंभ
पुणे दि.२५: स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने शेतकी महाविद्यालय आवारातील हातकागद संस्थेत आयोजित राज्यस्तरीय प्रदर्शनाला मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा यांनी भेट दिली.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी.रेंदाळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बीपीन जगताप, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी डी. एन. बनसोडे, सहाय्यक जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अमर राऊत आदी उपस्थित होते.
प्रदर्शनात काही वैशिष्ठ्यपूर्ण वस्तू असल्याने नागरिकांसाठी ही विशेष पर्वणी ठरेल आणि उद्योजकांसाठी ही चांगली संधी ठरू शकेल, असा विश्वास यावेळी श्रीमती सिन्हा यांनी व्यक्त केला.
प्रदर्शन ३ मार्चपर्यंत सुरू राहणार असून त्यात खादीचे कपडे, कोल्हापूरी चप्पल, महाबळेश्वरचा मध, विविध मसाले, पापड आणि हस्तकलेच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामोद्योगाला प्रोत्साहन द्यावे असे आवाहनदेखील श्रीमती सिन्हा यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात ३२ वाहनांचा जाहीर ई-लिलाव
पुणे-उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड येथील आवारात २५ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत कार्यालयीन वेळेत वाहने पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत.
जाहीर ई-लिलावात एकुण ३२ वाहने आहेत. यामध्ये बस, ट्रक, डी. व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, रिक्षा, जेसीबी या वाहनांचा समावेश आहे. ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहणार आहे.
ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, तहसिलदार, पुणे शहर व हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगांव व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड यांच्या सूचनाफलकांवर माहितीसाठी लावण्यात आली आहे.
जाहीर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी ०२. मार्च ते ६ मार्च या कालावधीत www.eauction.gov.in या संकेत स्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असणार आहे.
ऑनलाईन नाव नोंदणी झाल्या नंतर २ मार्च ते ७ मार्च या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे खटला विभागात सकाळी १० ते सायंकाळी ६ प्रत्येक वाहनासाठी ५० हजार रकमेचा ‘उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड’ या नावे अनामत रक्कमेच्या धनाकर्षासह ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी व कागदपत्रे पडताळणी, मंजुरीसाठी सादर करणे गरजेचे आहे.
लिलावाचे अटी व नियम २५ फेब्रुवारीपासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथील सुचना फलकावर सकाळी १० ते सायंकाळी ६. वाजेपर्यंत उपलब्ध राहील. ही वाहने ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विकली जातील, असे कराधान प्राधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळवले आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा
पुणे दि.25: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान येथे महाशिवरात्र निमित्त 25 फेब्रुवारी रोजी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी विवेक नायडू यांनी आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव कार्य, प्रथमोपचार याबाबत मार्गदर्शन केले. लखन गायकवाड यांनी आणीबाणीच्या उचल पद्धती, त्रिकोणी बँडेज, स्ट्रेचर, सीपीआर आदींचे प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी प्रस्ताविक केले.
यावेळी देवस्थानचे विश्वस्त, सुरक्षारक्षक, कर्मचारी तसेच मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
0000
राज्याला कृषी निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्यासाठी कृषी निर्यात धोरण महत्त्वपूर्ण-प्रधान सचिव अनूप कुमार
पुणे दि.25: राज्याला कृषी निर्यातीचे प्रमुख केंद्र करण्यासह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषीमालाची निर्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. यासाठी नवे कृषी निर्यात धोरण नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास प्रधान सचिव अनूप कुमार यांनी व्यक्त केला.
राज्याच्या कृषी निर्यात धोरणाची सुरूवात व निर्यातविषयक चर्चासत्र कार्यक्रमाप्रसंगी श्री. अनूप कुमार बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त धीरज कुमार, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, डिजीएफटीचे सहमहासंचालक वरुण सिंग, अपेडाचे श्री.आर. रविंद्रा, जेएनपीटीचे सल्लागार राजन गुरव, उपसंचालक डॉ.ब्रजेश मिश्रा उपस्थित होते.
श्री. अनूप कुमार म्हणाले, महाराष्ट्रामध्ये असलेला वैविध्यपूर्ण शेतमाल, पायाभूत सुविधा, शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग यामुळे महाराष्ट्र देशातील कृषिमालाच्या निर्यातीमध्ये महत्वाच्या स्थानावर आहे. एकूण निर्यातीत वाढ करण्यासोबतच विकसीत देशांना निर्यात वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. शेती उत्पादन वाढीमुळे बाजारपेठेतील कृषिमालाची वाढती उपलब्धता विचारात घेता बाजारपेठेतील दर आणि शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला यामध्ये संतुलन निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यायी बाजारपेठ म्हणुन कृषिमाल निर्यात महत्त्वाची आहे.
श्री. अनूप कुमार म्हणाले, देशामध्ये कृषिमाल निर्यातीमध्ये महाराष्ट्र राज्य अग्रगण्य आहे. निर्यात वाढविण्यासाठी कृषिमाल निर्यातीतील राज्याचा यापूर्वीचा अनुभव, शेतकरी, शेतकरीसमूह, शेतकरी सहकारी संस्था, निर्यातदार, विविध विद्यापिठे, संशोधन संस्था यांच्यासमवेत चर्चा व विचारविनिमय करून राज्याचे कृषी निर्यात धोरण तयार केले आहे. नव्या धोरणामुळे राज्यातील कृषिमालाची निर्यातवृद्धी होईल. कृषी मालाची निर्यात केल्याने शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न 40 ते 50 टक्क्यांनी वाढते. कोरोना कालावधीत कृषी क्षेत्रातील उलाढालीमध्ये वाढ झाली. राज्याने या कालावधीत कृषी निर्यात करून निर्यात वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.
आदिवासीबहुल भागातील आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या पदार्थांची मागणी वाढली आहे, यापुढे निर्यात साखळीमध्ये या पदार्थांचा समावेश करावा लागणार आहे. विकेल ते विकेल या संकल्पनेवर आधारित जागतिक व देशी बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकांचे उत्पादन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कृषी आयुक्त धीरज कुमार म्हणाले, देशाच्या एकूण कृषी निर्यातीपैकी 70 टक्क्यांवर निर्यात महाराष्ट्रातून होते. निर्यातीमध्ये गतवर्षीपेक्षा 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यातील 26 उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. कृषी निर्यातीबाबत जिल्हानिहाय सेल तयार करून मार्गदर्शन केले तर यामध्ये आणखी वाढ होईल.
राज्यात दोन वर्षात फळलागवड क्षेत्रात 80 हजार हेक्टरची वाढ झाली आहे. गतवर्षी 40 व यावर्षी 40 हेक्टर क्षेत्रात फळलागवड झाली आहे. शेतकऱ्यांना निर्यातीस वाव देण्यासाठी फलोत्पादन महत्त्वाचे आहे. कोरोना कालावधीत थेट विक्री व्यवस्था उभ्या राहिल्याने निर्यातीच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. प्रक्रिया उद्योगात राज्य आघाडीवर आहे, मात्र यामध्ये निर्यातीसाठी काम करावे लागणार आहे. राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्याचा पुढाकार याकामी महत्वाचा ठरेल असा विश्वास श्री. धीरज कुमार यांनी व्यक्त केला.
नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, टाळेबंदी कालावधीत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठी आर्थिक उलाढाल केली आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्थेने शेतकऱ्यांना चांगला लाभ झाला आहे. शेतकरी उपक्रमशील आहेत, शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचे काम करावे लागणार आहे. बाजारपेठेत मागणी असलेले शेती उत्पादन तयार करावे लागणार असल्याचे सांगून द्राक्ष निर्यात, कांदा निर्यात धोरणाबाबत त्यांनी माहिती दिली.
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले, विकेल ते पिकेल ही संकल्पना अत्यंत महत्वपूर्ण आहे. औरंगाबाद जिल्हा नियोजन अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यात विक्रीव्यवस्थेच्या संधी निर्माण करण्यासाठी नवी संकल्पना राबविण्यात येत आहे. केशर आंबा व मोसंबी निर्यात, निर्यात सुविधा केंद्राची क्षमता, निर्यातीत पुढे जाण्यासाठी सुविधामध्ये वाढ, सुविधा केंद्रातून झालेली निर्यात, निर्यातीसाठीच्या मर्यादा, आवश्यकता याबाबत त्यांनी सादरीकरण केले.
प्रास्ताविक पणन संचालक श्री.सुनील पवार यांनी केले. निर्यात धोरणबाबत त्यांनी माहिती दिली. पणन मंडळाचे व्यवस्थापक सतीश वराडे यांनी कृषी धोरणाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषी व पणन विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार
राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी; शासन निर्णय जारी
मुंबई दि 25 :- राज्यातील हजारो पोलीस शिपायांचे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम मान्यतेनंतर निघाला आहे. राज्यातील सर्वच अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस उप निरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते, पण आता पदोन्नतीच्या संधीत वाढ करण्याच्या निर्णयामुळे त्याचा थेट फायदा भविष्यात हजारो पोलीस शिपाई, हवालदार आणि सहायक पोलीस उप निरीक्षक यांना होईल. या निर्णयामुळे पोलीस शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यास त्याच्या सेवा कालावधीत पदोन्नतीच्या 3 संधी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस महासंचालक स्तरावर सुकाणू समिती गठित करण्यात येईल.
या शिवाय पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उप निरीक्षक या पदोन्नती साखळीमधील पोलीस नाईक या संवर्गातील 38 हजार 169 पदे व्यपगत करण्यात आली असून ती पोलीस शिपाई, पोलीस हवालदार व सहायक पोलीस उप निरीक्षक या संवर्गात वर्ग करण्यात येत आहे. यामुळे आता पुनर्रचनेनंतर पोलीस शिपायांची पदे 1 लाख 8 हजार 58, पोलीस हवालदारांची पदे 51 हजार 210, सहायक पोलीस उप निरीक्षकांची पदे 17 हजार 71 इतकी वाढतील.
या निर्णयामुळे पोलीस दलातील पोलीस हवालदार व सहायक पोलीस उप निरीक्षक या संवर्गातील पदांच्या वाढीमुळे एकूण तपासी अधिकाऱ्यांच्या संख्येत भरीव वाढ होणार असल्याने पोलीस अधिकाऱ्यांवरील ताण कमी होईल.
त्याचबरोबर पोलीस दलात किमान 30 वर्षे सेवा पूर्ण झालेले आणि सहायक पोलीस उप निरीक्षक या पदावर 3 वर्षे सेवा पूर्ण झालेले त्याचप्रमाणे आश्वासित प्रगती योजनेनुसार पोलीस उप निरीक्षकांचे वेतन घेत असलेले अशा तीन निकषांची पूर्तता करणाऱ्या अंमलदारांना श्रेणी पोलीस उप निरीक्षक (ग्रेड पी.एस.आय.) असे संबोधण्यात येईल. या अधिकाऱ्यांना नाशिक येथे 12 आठवड्यांचे प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस अकादमी मध्ये घ्यावे लागेल.
बढतीची दीर्घ प्रतिक्षा आता संपली
सध्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस नाईक- पोलीस हवालदार-सहायक पोलीस उप निरीक्षक या तीन पदोन्नतीच्या संधी मिळतात. तसेच तुलनेने पदोन्नतीची पदे कमी असल्याने अपेक्षेपेक्षा पदोन्नतीस जास्त कालावधी लागत असल्याने कर्मचाऱ्यांचे मनोबल कमी होवून कार्यक्षमतेवर विपरित परिणाम दिसून येतो. सहायक पोलीस उप निरीक्षक या पदावर 3 वर्षे सेवा पूर्ण होण्याआधीच काही जण सेवानिवृत्त होतात किंवा काही अंमलदार हे पोलीस हवालदार पदावरूनच सेवानिवृत्त होतात. अशा अंमलदारांना पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नतीची संधी मिळत नाही. मात्र या निर्णयामुळे पोलीस दलातील अंमलदारांना पदोन्नतीचा मोठा लाभ होणार आहे.
गुन्हे रोखण्यासाठी मोठी मदत
या निर्णयामुळे एकूण तपासी अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार असल्याने गुन्ह्यांची उकल होण्यास तसेच सामान्य नागरीकांना मदत घेण्यास अधिक सुलभता येईल. पोलीस दलाची प्रतिमा त्यामुळे सुधारण्यास मदत होणार आहे. तसेच पोलीस दलास सद्य:स्थितीत प्रत्यक्ष कामकाजाकरिता मिळणाऱ्या मनुष्य दिवसांमध्ये मोठी वाढ होईल आणि गुन्हे उघडकीस येण्याच्या व रोखण्याच्या प्रमाणामध्ये देखील भरीव वाढ होणार आहे.
यंदा मनसेचा वर्धापनदिन पुण्यात साजरा होणार
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर जागा मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यानिमित्ताने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नियोजनाला सुरुवात केली आहे. त्यातच पुढील महिन्यात ९ मार्चला मनसेचा वर्धापनदिन आहे. यंदा मनसेचा वर्धापनदिन पुण्यात साजरा होणार आहे. अशी माहिती पक्षाचे नेते बाबू वागसकर यांनी दिली आहे.वागसकर म्हणाले, मार्चच्या नऊ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातून मनसेचा वर्धापनदिन जल्लोषात साजरा केला जातो. दरवर्षी अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत कार्यक्रम असतो. पण यंदा १६ वा वर्धापनदिन पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे साजरा होणार आहे. राज्यभरातून असंख्य मनसैनिक आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
उद्या राज ठाकरे पुणे दौऱ्यावर
आज सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल होणार आहेत. उद्या दिवसभर राज ठाकरे यांच्या हस्ते शहरातील दोन शाखांचे उदघाटन होणार आहे. तसेच एस एम जोशी सभागृहात होणाऱ्या मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन चर्चा करणार आहेत.
मोदींच्या पुणे दौऱ्यात राष्ट्रवादीचे “मोदी गो बॅक आंदोलन”
पुणे- येत्या ६ मार्चला महापालिकेच्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी आणि भूमिपूजनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असून यावेळी ‘मोदी गो बॅक’ चा नारा घेऊन त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात येईल असे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज येथे जाहीर केले आहे.
या संदर्भात त्यांनी माध्यमांना असे कळविले आहे कि,’ मागील काही दिवसांपासून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच त्यांच्या स्वराज्य भूमी असणाऱ्या महाराष्ट्राचा वारंवार अपमान केला जात आहे. अगदी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कोरोना काळाचा संदर्भ देत स्वराज्य भूमी महाराष्ट्राचा अपमान केला.त्याच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेमधील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा घाट पुणे भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी घातला आहे.
याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे “मोदी गो बॅक आंदोलन” ६ मार्चला संपूर्ण पुणे शहरात करणार आहे. या महाराष्ट्रद्रोही भाजप सरकारने दुटप्पीपणाने आजतागायत आपल्या भूमीला आणि जनतेला कमी लेखले आहे. अशा पंतप्रधान मोदींच्या निषेधार्थ सर्वांनी काळे कपडे घालून, फ्लेक्स, बॅनर लावत मोदी गो बॅक निषेध आंदोलन छेडले जाणार आहे.असे प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.
स्थायी समितीत धमाका:अडीच हजार कोटीच्या निविदांना एकमताने मान्यता
पुणे-कोणाचाही ,कोणत्याही पक्षाचा विरोध न होता सर्वसंमतीने आज स्थायी समितीमध्ये सुमारे अडीच हजार कोटीच्या कामांच्या निविदांना मंजुरी देण्यात आल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला . स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी बोलविलेल्या या पत्रकार परिषदेस महापौर मुरलीधर मोहोळ , सभागृहनेते गणेश बिडकर आणि भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते .यामध्ये मैलापाणी व्यवस्थापनाचा १४७३ कोटींचा नदीसुधार प्रकल्प (जायका), नदी काठ सुधार प्रकल्पातील संगमवाडी ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा हा ८६९ कोटी प्रकल्प, १४० कोटीचे ८ पीपीपीतील रस्ते व उड्डाणपूल यासह तब्बल २५०० कोटी रुपयांच्या कामांना आज स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली.आज दुपारी एक वाजता स्थायी समितीची बैठक सुरू होणार होती, पण यापूर्वी महापालिकेतील पदाधिकारी, स्थायी समितीचे सदस्यांमध्ये व अधिकाऱ्यांमध्ये खलबते सुरू होते. त्यामुळे ही बैठक प्रत्यक्षात चार वाजता सुरू झाली. तसेच ४ मार्च रोजी नवे स्थायी समिती अध्यक्ष निवडले जाणार असल्याने आजची बैठकही विद्यमान अध्यक्ष रासने यांची अखेरची बैठक ठरली. त्यामुळे महत्त्वाचे सर्व विषय आजच्या बैठकीत मंजूर करून घेण्यासाठी गडबड सुरू असल्याचे चित्र महापालिकेत पाहायला मिळाले.
राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रण प्रकल्पासाठी (जायका) मागविण्यात आलेल्या निविदांपैकी पात्र ठेकेदार एनव्हायरो कंट्रोलज्-टोशिबा वॉटर सोल्यूशन जेव्ही यांच्याकडून कॅपेक्स साठी सुमारे एक हजार पंचाण्णव कोटी एक्कावन्न लाख रुपये, सुमारे एकोणनव्वद लाख सत्तावीस हजार युरो, ओपेक्ससाठी सुमारे तीनशे कोटी २१ लाख रुपये आणि प्रोव्हिजनल रक्कम सोळा कोटी ५३ लाख रुपये असे कराराप्रमाणे काम करून घेण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.रासने म्हणाले, या प्रकल्पाद्वारे शहरात निर्माण होणारया शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या निविदांसाठी केंद्र सरकार आणि अर्थसहाय्य करणारी जपान इंटरनॅशनल को ऑपरेटिव्ह एजन्सी (जायका) यांनी निविदा प्रक्रियेला मान्यता दिली होती. या प्रकल्पात ११ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारणे, सुमारे ११३ किलोमीटर लांबीच्या मलवाहिन्या विकसित करणे, जीआयएस, एआयएस, स्काडा यंत्रणा उभारणे, कम्युनिटी टॉयलेट ब्लॉक उभारणे अशा १३ पॅकेजेसच्या कामांचा समावेश आहे. प्रकल्प पूर्तीनंतर त्याचे पंधरा वर्षे संचलन करणे, देखभाल दुरुस्तीचज जबाबदारी संबंधित कंपनीवर राहणार आहे. सांडपाण्यावर १०० टक्के प्रक्रिया करणारे पुणे देशातील पहिले शहर ठरणार आहे.रासने पुढे म्हणाले, पुणे शहरात आजमितीस ७४४ दशलक्ष लिटर्स प्रतिदिन मैलापाणी तयार होते. त्या अनुषंगाने ५६७ दशलक्ष लिटर्स प्रतिदिन क्षमतेची १० मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. संपूर्ण मैलापाणी शुद्धीकरणासाठी महापालिकेकडून ९९० कोटी २६ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. केंद्र सरकारने १४ जानेवारी २०१६ रोजी त्याला मान्यता दिली असून, ८५ टक्के अनुदान देण्यात आले आहे. उर्वरित रक्कम पुणे महापालिकेला खर्च करावी लागणार आहे. मलवाहिन्या विकसित करण्याबरोबर ३९६ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेची ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहेत.
महापालिका इमारतीत र्इ चार्जिंग स्टेशन
पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये आणि सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉइंट तयार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.रासने म्हणाले, भारत ही जगातील चौथी वाहन बाजारपेठ आहे. जगाच्या तुलनेत देशातील वाहनांची संख्या खूप मोठी आहे. भारताला त्याच्या इंधन क्षमतेच्या ८० टक्के कच्चे तेल अन्य देशांतून आयात करावे लागते. फॉसिल इंधनरहित वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे इंधनाची गरजही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.रासने पुढे म्हणाले, इलेक्ट्रिक वाहने शून्य उत्सर्जन देतात. त्यामुळे कार्बन डाय ऑक्सार्इड तसेच इतर धोकादायक वायू कमी होण्यास मदत होते. पेट्रोल, डिझेलवरील वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांचा दैनंदीन खर्च आणि देखभाल खर्च कमी आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये चार्जिंग स्टेशनवर चार्ज केलेल्या बॅटरी बदलून घेता येतात. इलेक्ट्रिक चार्जिंग पॉर्इंटमुळे या वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन मिळणार आहे.
राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्ती
राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पासाठी दैनंदिन देखरेख करण्यासाठी शाह टेक्निकल कंपनीची चार वर्षांसाठी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, या प्रकल्पाचे आवश्यक असणारा तज्ज्ञ अभियंता वर्ग उपलब्ध होणार आहे. या निविदेमुळे प्रकल्पाचे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होणार आहे. शाह कंपनीची १३ लाख ६२ हजार रुपयांची निविदा मान्य करण्यात आली.
पुणे नदी पुनरुज्जीवल प्रकल्प
संगमवाडी ते बंडगार्डन
पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदीचा विकास करण्यासाठी संगमवाडी पूल ते बंडगार्डन पुलाच्या दरम्यानचे काम करण्यासाठी बी. जी. शिर्के कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या सुमारे २६५ कोटी १४ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.रासने म्हणाले, तांत्रिक छाननी समितीने सुमारे ३६३ कोटी ८८ लाख रुपयांचे पूर्वगणनपत्रकाला मान्यता दिली होती. बी. जी. शिर्के कंपनीने त्या पेक्षा १३.४० टक्के कमी दराने निविदा सादर केली होती. प्रशासनाला कंपनीबरोबर करारनामा करण्यास मान्यता देण्यात आली. माती खोदार्इ, मुरुम खोदार्इ, कठीण दगडामधील खोदार्इ, वाहतूक करणे, ओपन फाउंडेशन, पदपथ निर्मिती, सायकल ट्रॅक तयार करणे, एमब्यांकमेंट बांधणे, गॅबियन वॉल बांधणे, नदीकिनारी बेचेंस बसविणे, झाडे लावणे, विद्युत व्यवस्था अशाप्रकारच्या कामांचा समावेश आहे. पावसाळ्याच्या कालावधीसह तीस महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
बंडगार्डन ते मुंढवा
पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदीचा विकास करण्यासाठी बंडगार्डन पूल ते मुंढवा नदीच्या दोन्ही बाजूने काम करण्यासाठी कुमार इंफ्राप्रोजेक्ट यांच्या सुमारे ६०४ कोटी ७५ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, तांत्रिक छाननी समितीने सुमारे ७१९ कोटी ०३ लाख रुपयांचे पूर्वगणनपत्रकाला मान्यता दिली होती. प्रशासनाला कंपनीबरोबर करारनामा करण्यास मान्यता देण्यात आली. माती खोदार्इ, मुरुम खोदार्इ, कठीण दगडामधील खोदार्इ, वाहतूक करणे, ओपन फाउंडेशन, पदपथ निर्मिती, सायकल ट्रॅक तयार करणे, एमब्यांकमेंट बांधणे, गॅबियन वॉल बांधणे, नदीकिनारी बेचेंस बसविणे, झाडे लावणे, विद्युत व्यवस्था अशाप्रकारच्या कामांचा समावेश आहे. पावसाळ्याच्या कालावधीसह छत्तीस महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
विविध डी. पी. रस्त्यांना मान्यता
खराडी भागातील आठ डी. पी. रस्ते डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या मोबदल्यात खासगी सहभागातून (पीपीपी) डी. पी. रस्ते विकसित करण्यासाठी सुमारे १०८ कोटी १६ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, शहरातील विकास आराखड्यातील रस्ते ताब्यात आलेल्या जागेनुसार आणि उपलब्ध तरतुदीनुसार दरवर्षी टप्प्यानेटप्प्याने विकसित केले जातात. रस्ते विकसनाचा खर्च, तुलनेने कमी उपलब्ध तरतूद आणि जागा ताब्यात घेताना जागा मालकांची रोख मोबइल्याची मागणी अशा कारणांमुळे डी. पी. रस्ते आणि पूल विकसित करण्यात मर्यादा येतात. अशा परिस्थितीत रस्ते विकसन खासगी सहभागातून करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाअंतर्गत रस्त्याच्या जागा एफएसआय किंवा ठेकेदारास क्रेडिट नोट स्वरूपात देण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. सदर क्रेडिट नोट पुणे महापालिकेकडे असलेल्या बांधकाम परवानगी शुल्काच्या अंतर्गत वापरता येते. तसेच ती क्रेडिट नोट हस्तांतरणीय आहे. या वर्षी एकूण ११ रस्ते आणि दोन पुलांची कामे पीपीपीमध्ये करण्यात येत आहेत. पीपीपी अंतर्गत क्रेडिट नोट मोबदल्यामध्ये रस्ते आणि पूल विकसित करण्याची बाब गेल्या वर्षी मुख्य सभेने मान्य केली आहे. पीपीपी प्रस्तावामुळे महापालिकेस थेट गुंतवणूक न करता क्रेडिट नोटच्या मोबदल्यात रस्ते आणि पुलांची कामे विकसित करण्यात येत आहेत. भूसंपादनासाठी एफएसआय, टीडीआर अणि रिझर्व्हेशन क्रेडिट बॉंड या पर्यायांचा वापर करण्यात येतो.
मुंढवा, खराडी नदीवर पुलाला मान्यता
मुंढवा, खराडी येथील मुळा-मुठा नदीवर २४ मीटर लांबीचा पुल डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या मोबदल्यात खासगी सहभागातून (पीपीपी) विकसित करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
हडपसर येथे डी. पी. रस्ता
हडपसर येथील पंतप्रधान आवास योजना प्रकल्पासाठी १२ मीटर डी. पी. रस्ता विकसित करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली. या रस्त्यासाठी ८४ लाख ७४ हजार रुपयांची निविदा मंजूर केल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
शाहू महाराज उद्यानात ७ डी थिएटर
पुणे महापालिकेच्या रास्ता पेठेतील श्री छत्रपती शाहू महाराज उद्यान येथे ७ डी थिएटर उभारण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली. या थिएटरसाठी २ कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली. ७ डी थिएटरमुळे मध्यवर्ती पुण्यातील नागरिकांना विशेषत: लहान मुलांना करमणुकीचे साधन उपलब्ध होणार आहे.
आठवी ते दहावी विद्यार्थ्यांना ‘गाथा शौर्य पथकाची परमवीर चक्र’ पुस्तक
पुणे महापालिका शाळेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘गाथा शौर्य पथकाची परमवीर चक्र’ पुस्तक देण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. विद्यार्थ्यांना सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला. देशासाठी बलिदान देणार्या २१ परमवीर चक्र विजेत्यांची माहिती, हवार्इ दल, नौदल आणि भूदलाचा इतिहास, शहीद वीर जवानांची माहिती या पुस्तकात आहे. बारा हजार पुस्तके खरेदी केली जाणार आहेत.
पीएमपीएमएलला मोफत बसपोटीची रक्कम मिळणार
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) गेल्या आर्थिक वर्षात मोफत किंवा सवलतीच्या दराने दिलेल्या ३ कोटी ८ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती त्याला मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी पुणे महापालिकेला देय असणारी २ कोटी ९ लाख रुपयांची रक्कम तातडीने देण्यात येणार आहे. शिक्षण विभागाची मागणी अजून प्राप्त झालेली नाही. समाज विकास विभाग, माहिती जनसंपर्क कार्यालय, शिक्षणविभाग यांच्याकडून ही सवलत दिली जाते. यामध्ये विद्यार्थी, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, केंद्र व राज्य शासन विशेष प्रावीण्य असणार्याना ही सवलत देण्यात येते. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
पीएमपीएमएलला संचलन तुटीपोटी उर्वरीत रक्कम देण्यास मान्यता
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) संचलन तुटीपोटीची उर्वरीत रक्कम देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षात पीएमपीएमएलला ४९४ कोटी १६ लाख रुपयांची संचलन तुट आली होती. साठ टक्के स्वामित्व हिश्यानुसार २९६ कोटी ५० लाख रुपयांची तुट अदा करणे आवश्यक आहे. ही माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
बस चार्जिंग स्टेशनसाठी विद्युत विषयक कामे
लोहगाव, शिव, वाघोली येथील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बस चार्जिंग स्टेशनला विद्युत पुरवठा करण्यासाठी आवश्यक असणारी विद्युतविषयक विकासकामे करण्यासाठी ८ कोटी ११ लाख रुपयांच्या निधीला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रशियन्स सुद्धा म्हणतात- पुतिन यांनी देशाला एकटे पाडले!
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युक्रेनवर हल्ला करण्याच्या निर्णयाचा जगभरातून निषेध होत आहे. अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हंगेरी, फ्रान्स, जपान, स्वित्झर्लंडमधील लोक रशियन हल्ल्याचा निषेध करत आहेत. त्याचवेळी पुतीन यांच्याविरोधात त्यांच्याच देशात लोक निदर्शने करत आहेत. रशियन सेलिब्रिटी, पत्रकार म्हणतात की हे युद्ध सुरू करून रशियाने स्वतःला जगापासून वेगळे केले आहे.
न्यूयॉर्क, पॅरिस, बुडापेस्ट, टोकियो, बर्लिनपासून मॉस्कोपर्यंत लोक कसे यूक्रेनवर रशियाच्या मिलिस्ट्री अॅक्शनचा विरोध करत आहेत.युक्रेनवरील आक्रमणाचा निषेध करण्यासाठी टोकियो ते तेल अवीव आणि न्यूयॉर्कपर्यंतच्या शहरांमधील सार्वजनिक चौकांवर आणि रशियन दूतावासाबाहेर निदर्शक निघाले, तर रशियामध्ये असे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हजाराहून अधिक लोकांना अटक करण्यात आली.
युक्रेनने आत्मसमर्पण केल्याशिवाय चर्चा नाही; मोदींनंतर आता शी जिनपिंग यांच्याशी पुतिन यांची चर्चा
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आज दुसरा दिवस आहे. आज रशियाकडून हल्ल्यांची तीव्रता लक्षणीय वाढली आहे. राजधानी कीव्हमध्ये सकाळी 7 मोठे स्फोट झाले. लोक रात्रभर घरे, भुयारी मार्ग आणि भूमिगत आश्रयस्थानांमध्ये लपले. खाण्यापिण्यापासून ते दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा तुटवडा आहे.रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनीही युद्ध संपण्याच्या आशा फेटाळून लावल्या आहेत. न्यूयॉर्क टाइम्सशी संभाषणात, लावरोव्ह म्हणाले- आम्ही यापुढे युक्रेनशी चर्चेची ऑफर स्वीकारणार नाही. युक्रेन आत्मसमर्पण करेल या एका अटीवरच वाटाघाटी होऊ शकतात. त्यांचे अध्यक्ष आतापर्यंत फक्त खोटे बोलले आहेत.
चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात वाढले रेडिएशन
गुरुवारी रात्री रशियन सैन्याने युक्रेनच्या चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हल्ले केले. येथे अनेक स्फोटही झाले. त्यामुळे या अणुप्रकल्पातील किरणोत्सर्गाची पातळी वाढली आहे. युक्रेनच्या न्यूक्लियर एजन्सीने याला दुजोरा दिला आहे. किरणोत्सर्गाच्या वाढत्या पातळीमुळे या भागात राहणाऱ्या हजारो लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यांना आरोग्याच्या समस्या देखील असू शकतात. दरम्यान, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने नागरिकांना रशियाच्या लष्करी हालचालींची माहिती ठेवण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर पेट्रोल बॉम्ब फेकले.
कीव्हमध्ये सकाळपासून सात मोठे स्फोट
युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये सकाळपासून सात मोठे स्फोट झाले आहेत. शहरावर एकामागून एक क्षेपणास्त्रे हल्ले होत असून लोक घरात लपून बसले आहेत. येथील महापौरांनी लोकांना घरातच थांबण्यास सांगितले आहे. युक्रेनने दावा केला आहे की, त्यांच्या सैन्याने 800 हून अधिक रशियन सैनिकांना ठार केले आहे. 30 रशियन रणगाडे आणि 7 गुप्तचर विमानेही नष्ट करण्यात आली आहेत.
दरम्यान, रशियाचे सैन्य राजधानीत घुसल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे. रशियन रणगाडे येथून फक्त 32 किमी अंतरावर असून त्यांना रोखण्यासाठी युक्रेनच्या लष्कराने तीन पूल उडवून दिले आहेत. येत्या 96 तासांत म्हणजेच 4 दिवसांत कीव्ह रशियाच्या ताब्यात जाईल, अशी भीती झेलेन्स्की यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की रशियन सैन्याने निवासी भागांना लक्ष्य केले असून त्यांनी रशियन नागरिकांना या युद्धाचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे.
शुक्रवारी सकाळी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनीही एक निवेदन जारी केले. ते म्हणाले की, जगाने आपल्याला युद्धात लढण्यासाठी एकटे सोडले आहे. त्यांनी सांगितले की, ते कीव्हमध्ये आहेत आणि रशियन सैन्य तेथे दाखल झाले आहे. रशियाचे टार्गेट त्यांचे कुटुंब असल्याचेही त्यांनी सांगितले.
युक्रेनचे संपूर्ण सैन्य युद्धात उतरले
युक्रेन सरकारने 18 ते 60 वयोगटातील पुरुषांना देश सोडण्यास बंदी घातली आहे. युक्रेनने आपल्या 10,000 नागरिकांना लढाईसाठी रायफल दिल्याचे काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.
16व्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत तविश पाहवा, आनंदिता उपाध्याय यांना दुहेरी मुकुटाची संधी
मुंबई, 25 फेब्रुवारी, 2022 :महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 16व्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात हरियाणाच्या तविश पाहवा याने तर, मुलींच्या गटात आनंदिता उपाध्याय या खेळाडूंनी दुहेरी गटातील विजेतेपदाबरोबरच एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित हरियाणाच्या तविश पाहवा याने मध्यप्रदेशच्या विवान बिदासरियाचा 6-2, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या मानांकित तामिळनाडूच्या फजल अली मीर याने महाराष्ट्राच्या शौनक सुवर्णाचा 6-3, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दुहेरीत अंतिम फेरीत तविश पाहवाने तक्षम सैनीच्या साथीत प्रणित चिट्टीपुदोरागरी व फझल अली मीरयांचा 6-4, 1-6, 10-4 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
मुलींच्या गटात उपांत्य फेरीत हरियाणाच्या अव्वल मानांकित आनंदिता उपाध्याय हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत महाराष्ट्राच्या दहाव्या मानांकित पार्थसारथी मुंढेचा 6-4, 6-2 असा पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या मानांकित ओडिशाच्या आहान हिने तिसऱ्या मानांकित हरियाणाच्या प्राची मलिकचा 6-3, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीत अंतिम फेरीत आनंदिता उपाध्याय हिने हविशा चौधरीच्या साथीत प्राची मलिक व अहान यांचा 1-6, 7-6(7), 10-4 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील दुहेरी गटातील विजेत्यांना करंडक, प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे आजीव अध्यक्ष शरद कन्नमवार, स्पर्धेचे संचालक व एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एआयटीए सुपरवायझर वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : एकेरी: उपांत्य फेरी: मुले: तविश पाहवा(हरियाणा)[1] वि.वि.विवान बिदासरिया(मध्यप्रदेश) 6-2, 6-1; फजल अली मीर(तामिळनाडू)[2]वि.वि.शौनक सुवर्णा(महाराष्ट्र) 6-3, 6-1;
मुली:
आनंदिता उपाध्याय(हरियाणा)[1] वि.वि.पार्थसारथी मुंढे(महाराष्ट्र)[10]6-4, 6-2;आहान(ओडिशा)[2]वि.वि.प्राची मलिक(हरियाणा)[3]6-3, 6-1;
दुहेरी: उपांत्य फेरी: मुले:
प्रणित चिट्टीपुदोरागरी/फझल अली मीर[3] वि.वि.विराज चौधरी/कुशाग्र अरोरा[1] 7-5, 6-1; तविश पाहवा/तक्षम सैनी[2] वि.वि.शिवा शर्मा/दिशेंदर लांबा[4]7-6(5), 6-0; अंतिम फेरी: तविश पाहवा/तक्षम सैनी[2] वि.वि.प्रणित चिट्टीपुदोरागरी/फझल अली मीर[3] 6-4, 1-6, 10-4;
मुली:
आनंदिता उपाध्याय/हविशा चौधरी[1] वि.वि.सूर्यांशी शेखावत/नंदिनी कंसल[2]6-1, 6-3; प्राची मलिक/अहान[2] वि.वि.पार्थसारथी मुंढे/एरवा रेड्डी 7-5, 6-1;अंतिम फेरी: आनंदिता उपाध्याय/हविशा चौधरी[1] वि.वि.प्राची मलिक/अहान[2] 1-6, 7-6(7), 10-4.
सिंधुदुर्ग येथे आयोजित एमएसएमई परिषदेचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई/सिंधुदुर्ग, 25 फेब्रुवारी 2022
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एमएसएमई तंत्रज्ञान केंद्र स्थापन करणार असल्याची घोषणा केंद्रीय एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली. केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाने सिंधुदुर्ग येथे आयोजित केलेल्या एमएसएमई परिषदेच्या उद्घाटनपर सत्रात ते आज बोलत होते. केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाचे सचिव बी. बी. स्वेन, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना, एमएसएमई मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि विकास आयुक्त शैलेश कुमार सिंग, कॉयर बोर्डचे अध्यक्ष डी. कुप्पूरामु तसेच मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
सिंधुदुर्ग येथे सुमारे 200 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारे हे एमएसएमई-तंत्रज्ञान केंद्र उद्योग क्षेत्रामध्ये विशेषतः एमएसएमई उद्योगांमध्ये स्पर्धात्मकता वाढवेल तसेच त्या उद्योगांच्या परिसरातील रोजगार मिळविणाऱ्या तसेच बेरोजगार युवकांची रोजगारविषयक पात्रता वाढविण्यासाठी त्यांना तंत्रज्ञान तसेच त्याचे अंतःपोषण याविषयी सल्लावजा पाठबळ पुरवतील.

या परिषदेच्या आयोजनामागचा उद्देश, सिंधुदुर्ग जिल्ह्याला देशात पर्यटनासोबतच, औद्योगिक क्षेत्रातही अव्वल स्थानी आणणे हा आहे. उद्योगांच्या मदतीने स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे सांगत, राणे यांनी पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश लोकांना नोकरीधंद्यासाठी मुंबईला जावे लागे,आणि या चाकरमान्यांनी पाठवलेल्या पैशांवरच इथल्या लोकांचा चरितार्थ चालत असे, अशी आठवण सांगितली. आता मात्र,ही परिस्थिती बदलायची असून आपल्याला इथेच रोजगाराच्या संधी आणि पैसा उभा करुन त्या आधारावर आपल्या पुढच्या पिढीला शिक्षित करायचे आहे, यावर त्यांनी भर दिला.

या परिषदेला उपस्थित असलेल्या मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी मंत्रालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देणारे व्यापक सादरीकरण केले. या सादरीकरणासाठी ग्रामीण तसेच निम-शहरी भागातील अनेक उद्योजक आणि युवक उपस्थित होते.

या बैठकीला संबोधित करताना केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, “निर्यात, उत्पादनांचा दर्जा तसेच स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान या बाबतीत देशभरातील एमएसएमई उद्योगांना नव्या उंचीवर घेऊन जाऊन एक मापदंड निर्माण करण्यावर तसेच देशभरात कार्यरत असलेल्या एमएसएमई उद्योगांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यावर त्यांच्या मंत्रालयाने सध्या लक्ष केंद्रित केले आहे.”

याच दिशेने अधिक प्रगती करत मंत्रालय एमएसएमई क्षेत्राला प्रोत्साहन देणारे अनेक महत्त्वाचे उपक्रम हाती घेत आहे आणि देशातील एमएसएमई उद्योगांच्या समग्र समावेशक विकासासाठी सुलभ कर्ज पुरवठा, क्षमता निर्मिती आणि कौशल्यविषयक प्रशिक्षण, बाजारांशी सोप्या पद्धतीने जोडणी, तंत्रज्ञानाचे अद्यायावतीकरण इत्यादी उपक्रम सक्रीयतेने राबविण्यासाठी पुढाकार घेत आहे या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. ते पुढे म्हणाले की अशा प्रकारच्या परिषदा या उद्योजक, धोरण कर्ते आणि इतर भागधारकांना उत्तम माहिती, नाविन्यपूर्ण कल्पना यांच्या देवाणघेवाणीसाठी तसेच व्यवसाय करण्याच्या संधी शोधण्यासाठी खुली चर्चा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा मंच पुरवत आहेत.
कोकण विभागासाठी मंत्रालयाने हाती घेतलेल्या उपक्रमांचे कौतुक करून केंद्रीय मंत्री राणे म्हणाले की महाराष्ट्रात, विशेषतः कोकण भागात रोजगार निर्मितीसाठी प्रचंड वाव आहे. कोकणात पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्फूर्ती अर्थात पारंपारिक उद्योगांच्या पुनरुत्थानासाठी निधी पुरवठा योजना, मधु अभियान आणि कुंभार सशक्तीकरण योजना यांच्यासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या कडक अंमलबजावणीतून उद्योजकता आणि रोजगार निर्मिती यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. वर्ष 2016 पासून आतापर्यंत कोकणात दोन हजारहून अधिक नव्या उत्पादन एककांची उभारणी करून मंत्रालयाने उद्योजकतेला मोठी चालना दिली आहे आणि त्यातून तब्बल 16,400 प्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले आहेत. या प्रकल्पांना मदत करण्यासाठी एमएसएमई मंत्रालयाने अनुदानापोटी 71.65 कोटी रुपयांची रक्कम वितरीत केली आहे, असे ते म्हणाले.




या प्रसंगी मधुमक्षिका पालनासाठी लागणारे 500 खोके, विजेवर चालणारी कुंभारकामाची 100 चक्रे आणि अगरबत्ती तयार करणारी 100 यंत्रे यांचे वाटप देखील करण्यात आले. या साहित्याचा वापर करून केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातच तब्बल 650 लाभार्थ्यांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी मदत होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंत्रालयाच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. ते म्हणाले की ग्रामीण कारागिरांना अगदी त्यांच्या दाराशी उपजीविका उपलब्ध होण्यासाठी ही यंत्रे उपयुक्त ठरतील.
केंद्रीय मंत्री राणे यांनी या कार्यक्रमात रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण कारागिरांना विजेवर चालणारी कुंभारकामाची चाके, मधुमक्षिका पालनासाठी लागणारे खोके आणि अगरबत्ती तयार करणारी यंत्रे यांचे वाटप देखील केले.
या कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांनी सुरु केलेला प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणाऱ्या 25 खादी कारागिरांचा प्रमाणपत्रे देऊन सन्मानही राणे यांनी केला. तसेच, एमएसएमई मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने सुरु केलेल्या स्वयंरोजगार उपक्रमांमध्ये भाग घेऊन आत्मनिर्भरतेच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या 10 पीएमईजीपी योजनेच्या लाभार्थ्यांना यावेळी राणे यांच्या हस्ते परवानापत्रे प्रदान करण्यात आली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते कुडाळ येथील कोनबॅक स्फूर्ती समूहाचे उद्घाटन
केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांनी कुडाळ येथील कोनबॅक स्फूर्ती समूहाचे उद्घाटन केले. आंबा आणि काजू याकडेच केवळ उत्पन्नाचे साधन म्हणून न बघता बांबूकडेही लक्ष दिले पाहिजे. बांबू देखील उत्पन्नाचे उत्तम साधन आहे. त्यामुळे बांबूच्या व्यवसायाकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यावेळी म्हणाले. स्थानिकांनी याकार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हानही त्यांनी केले. कोकण आणखी समृद्ध व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशील असून त्या दिशेने आपले मंत्रालय कार्यरत आहे असेही त्यांनी सांगितले.
या समूहाच्या विकासासाठी केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाने 1.45 कोटी रुपयांचा निधी दिला असून या प्रकल्पातून 300 कारागिरांना मदत केली जाईल.
कोनबॅक विषयी
कोनबॅक स्वायत्त, विना-नफा तत्वावर चालणारी सीबार्ट अर्थात भारतीय बांबू संसाधन आणि तंत्रज्ञान केंद्राच्या मालकीची संस्था असून स्वतःहून टिकाव धरणाऱ्या संस्थात्मक परिसंस्थेमध्ये ती विकसित करण्यात आली आहे. या संस्थेत भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये विकल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या बांबू उत्पादनांची रचना, नमुना तयार करणे आणि या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी संपूर्णपणे विकसित सुविधा यंत्रणा आहे. या संस्थेकडे गरीब बांबू उत्पादकांना मोठ्या आणि अधिक किफायतशीर बाजारांशी जोडण्याची यंत्रणा उपलब्ध आहे आणि या संस्थेच्या कार्याचे आदर्श नमुना म्हणून या आधीच भारतात इतर अनेक ठिकाणी तसेच परदेशात सुद्धा अनुकरण केले जात आहे.
स्फूर्ती विषयी
पारंपरिक उद्योगांच्या पुनरुज्जीवनासाठी निधी देण्याची योजना- (SFURTI) हा एमएसएमई मंत्रालयाचा एक महत्वाचा उपक्रम असून त्याद्वारे समूह विकासाला प्रोत्साहन दिले जात आहे. खादीच्या समूह विकासासाठी खादी ग्रामोद्योग संस्था एक नोडल एजन्सी म्हणून काम बघते. ह्या योजनेअंतर्गत पारंपरिक उद्योग आणि कलाकारांना संघटित करुन त्यांना स्पर्धेसाठी सक्षम केले जाते तसेच दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी पाठबळही पुरवले जाते. तसेच, पारंपरिक उद्योग आणि ग्रामीण उद्योजकांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्याचाही या योजनेचा उद्देश आहे.
परिस्थितीवर मात करीत सीए झालेल्या धनश्री हिरणवाळे हिचा सन्मान
पुणे : लोकांच्या घरी घरकाम करणारी आई…. तुटपुंज्या पगारावर काम करणारे वडील….दोन खोल्यांमध्ये राहणारे मोठे कुटुंब…आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची… अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत अरण्येश्वर परिसरात राहणाऱ्या धनश्री हिरणवाळे हिने पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षेत यश मिळवले. तिच्या या प्रेरणादायी प्रवासाचा सन्मान जनता सहकारी बँक सहकार नगर शाखेच्या वतीने करण्यात आला.
यावेळी जनता सहकारी बँकेचे संचालक माधव माटे यांनी धनश्री हिच्याशी ऑनलाईन संवाद साधला आणि शुभेच्छा दिल्या. जनता सहकारी बँक सहकार नगर शाखेचे शाखाप्रमुख पराग ठाकूर, उपशाखा प्रमुख विलास पोकळे, शाखा चिटणीस गौरी निकम, सचिन ढवळे, अर्चना हिरणवाळे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बँकेचे संचालक माधव माटे यांनी धनश्री हिरणवाळे हिला बँकेत नोकरीचा प्रस्ताव देखील दिला.
पराग ठाकूर म्हणाले, जनता सहकारी बँकेच्यावतीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. धनश्री हिरणवाळे हिची आई घर काम करते आणि वडीलही तुटपुंज्या पगाराची नोकरी करतात. आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असताना मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर सीएच्या परीक्षेत तिने यश संपादन केले. तिच्या या प्रवासातून इतरांनाही प्रेरणा मिळावी, यासाठी बँकेच्या वतीने तिला सन्मानित करण्यात आले. यावेळी धनश्री हिरणवाळे हीचे बँकेत खाते देखील उघडण्यात आले.
