Home Blog Page 2072

मंत्र्यांना अटक करून दहशतीने सरकार पाडण्याचा कुटील डाव -रमेश बागवे,प्रशांत जगताप ,संजय मोरे

पुणे- केंद्र सरकारने ई.डी.च्या मार्फत महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना सूडापोटी अटक केल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीने ए. डी. कॅम्प चौक, नाना पेठ, पुणे येथे आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप , शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे , राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, जयदेव गायकवाड, अरविंद शिंदे, गोपाळ तिवारी, संगीता तिवारी, सोनाली मारणे, अविनाश बागवे, रफिक शेख, पल्लवी जावळे, प्रदिप देशमुख, विशाल मलके, शिलार रतनगिरी, रमेश सोनकांबळे, सतिश पवार, सुनिल घाडगे, राहुल तायडे, विनय ढेरे, विवियन केदारी, मेहबुब नदाफ, रजनी त्रिभुवन, सुरेखा खंडागळे, अनुसया गायकवाड, जावेद खान, जुबेर शेख, भोलासिंग अरोरा, मुन्नाभाई शेख, मीरा शिंदे, अभिजीत महामुनी, बंडू नलावडे, सुमित डांगी, राधिका मखामले, कल्पना उनवने, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     यावेळी बोलताना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘केंद्र सरकारने महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी मंत्र्यांना अटक करीत आहे. ई. डी., सी. बी. आय., इन्कम टॅक्स यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दडपशाही आणून भितीचे वातावरण निर्माण करीत आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वारंवार केंद्रातील मोदी सरकारचा पर्दाफाश केल्यामुळे त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करून अटक केली. अशाच प्रकारे अल्पसंख्यांकावर अत्याचार करण्याचा मोदी सरकारने विडा उचलेला आहे. हाथरस आणि उन्नाव येथे सुध्दा दलित महिलांवर अत्याचार झाले. तेथील भाजप सरकारने या प्रकरणावर सुरूवातील कानाडोळा केला आणि नंतर जनतेच्या दबावामुळे आरोपींवर कारवाई केली. महाराष्ट्रात भाजपचे सरकार होऊ शकले नाही याचा राग केंद्र सरकारला आहे. अशा प्रकारे मंत्र्यांना अटक करून महाराष्ट्रातील सरकारला पाडण्यासाठी कट रचत आहे.’’

     राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, ‘‘केंद्र सरकारचे ई.डी. खाते हे मोदी सरकारचे हस्तक म्हणून काम करीत आहे. अनेकांना चौकशीसाठी बोलावून त्यांना आणि त्यांच्या कुटूंबियांना मानसिक त्रास द्यायचे काम ई.डी. खाते करीत आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भारतीय जनता पक्ष करीत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते ई.डी. ऑफिसमध्ये बसून महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात कट रचतात आणि त्याची अंमलबजावणी ई.डी. खाते करीत आहे. देशाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचा कारभार कोणत्याही सरकारने केलेला नाही. मोदी सरकार सत्तेत आल्यावर सूडापोटी देशातील विरोधकांच्या मुसकट दाबण्यासाठी सी. बी. आय., ई.डी. मार्फत कारवाया करीत आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही तीव्र निषेध करतो.

     शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले की, ‘‘मोदी सरकारने या देशात अघोषित आणीबाणी आणली आहे. आपल्या राजकीय विरोधकांचा ई.डी., सी.बी.आय. मार्फत चौकशी लावून त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना बदनाम करण्याचे काम करीत आहे. देशात अनेक ज्वलंत प्रश्न आहे. या मुळ विषयांवरून लोकांची दिशाभुल करण्यासाठी अशा प्रकारची कारवाई करीत आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर ई. डी. ने व सी.बी.आय. ने गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेचे अनंतराव अडसुळ, प्रताप सरनाईक व भावना गवळी यांच्यावर सुध्दा ई.डी. ने कारवाई केली आहे.   

     मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अतिशय खंबीरपणाने राज्याचा कारभार सांभाळत आहे. किरीट सोमय्या हा भाजपाचा मोहरा आहे. आपली सत्ता येवू शकली नाही म्हणून सूडभावनेने महाविकास आघाडी सरकारला पाडण्यासाठी हा खेळ खेळला जात आहे. जर केंद्र सरकारने अशा पध्दतीने कारवाई सुरू ठेवली तर शिवसैनिक आपल्या पध्दतीने त्यांना उत्तर देतील.’’

 

जगाने आम्हाला युद्धात लढण्यासाठी एकटे सोडले! गरजेच्या वेळी सर्वांनी फिरवली पाठ; यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष भावूक

0

 युक्रेनचे अध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की यांनी अमेरिका आणि नाटो देशांकडून युद्धात मदतीची आशा व्यक्त केली होती, परंतु अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्यास नकार दिला आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की यांनी आपली वेदना व्यक्त केली. ते म्हणाले की, जगाने आपल्याला युद्धात लढण्यासाठी एकटे सोडले आहे.

त्यांनी सांगितले की ते कीवमध्ये आहेत आणि रशियन सैन्य तेथे दाखल झाले आहे. या रशियनांचे पहिले टार्गेट तेच स्वतः असून दुसरे टार्गेट त्यांचे कुटुंब असल्याचेही त्यांनी सांगितले.

युक्रेन स्वबळावर युद्ध लढेल – वलोडिमिर जेलेंस्की
यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की यांनी रशिया हल्ल्याच्या पहिल्या दिवशीच्या अखेरीस राष्ट्राच्या नावावर एक व्हिडिओ संबोधनात घोषणा केली की, ‘आपल्याला आपल्या राज्याची संरक्षणासाठी एकटे सोडण्यात आले आहे.’ युक्रेन आता रशियाशी स्वबळावर युद्ध लढणार आहे. ते म्हणाले, ‘आपल्यासोबत लढायला कोण तयार आहे? मला कोणी दिसत नाही. युक्रेनला नाटो सदस्यत्वाची हमी देण्यास कोण तयार आहे? सगळे घाबरले आहेत.’

जेलेंस्की म्हणाले, ‘सीमेवर तैनात युक्रेनच्या सैन्याने ज्मीनई बेटाचे रक्षण करताना आपले शौर्य दाखवले. ते शहीद झाले, परंतु त्यांनी रशियन सैन्याला शरणागती पत्करली नाही. दुर्दैवाने, आज आम्ही आमच्या 137 वीरांसह 10 लष्करी अधिकारी गमावले आहेत. या सर्वांना मरणोत्तर हिरो ऑफ युक्रेन ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. युक्रेनसाठी ज्यांनी आपले प्राण दिले त्यांना नेहमी लक्षात ठेवले जाईल.

रशियाने युक्रेनला लक्ष्य क्रमांक-1 म्हणून चिन्हित केले आहे
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, रशियन सैन्याने कीवमध्ये प्रवेश केल्यानंतर खूप विनाश आणि तोडफोड केली, परंतु त्यांनी आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.. जेलेंस्की म्हणाले, ‘मी राजधानीत राहतो, माझे कुटुंब देखील युक्रेनमध्ये आहे, माझी मुले युक्रेनमध्ये आहेत. माझे कुटुंब देशद्रोही नाही, ते युक्रेनचे नागरिक आहेत. ते नेमके कुठे आहेत, हे सांगण्याचा मला अधिकार नाही. आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार, शत्रूने मला लक्ष्य क्रमांक 1, माझ्या कुटुंबाला लक्ष्य क्रमांक 2 असे मार्क केले आहे.

दुसऱ्या दिवशीही युक्रेन स्फोटांनी हैराण
दुस-या दिवशीही रशियाने युक्रेनला बॉम्बस्फोट करून हैराण केले आहे. शुक्रवारी सकाळी युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेंस्की यांनी संपूर्ण सैन्याला युद्धात उतरवण्याची घोषणा केली. युक्रेनने दावा केला आहे की त्यांच्या सैन्याने 800 हून अधिक रशियन सैनिकांना ठार केले आहे. 30 रशियन टँक आणि 7 गुप्तचर विमानेही नष्ट करण्यात आली आहेत.

युक्रेन सरकारने 18 ते 60 वयोगटातील पुरुषांना देश सोडण्यास बंदी घातली आहे. युक्रेनने आपल्या 10,000 नागरिकांना लढाईसाठी रायफल दिल्याचे काही वृत्तांत सांगितले जात आहे.

युक्रेनवर रशियन हल्ल्याचा आज दुसरा दिवस आहे. गुरुवारी रशियाने देशभरात 200 हून अधिक हल्ले केले. सर्वच भागातील नागरिकांमध्ये भीती पसरली असून लाखो लोकांनी दिवस आणि रात्र भुयारी मार्ग, मेट्रो स्टेशन, भूमिगत आश्रयस्थानांमध्ये घालवली. अनेक ठिकाणी लोकांना जीवनावश्यक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे.

युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये सकाळपासून सात मोठे स्फोट झाले आहेत. शहरावर एकामागून एक क्षेपणास्त्रे हल्ले होत असून लोक घरात लपून बसले आहेत. खाण्यापिण्यापासून इतर जीवनावश्यक वस्तूंची टंचाई असतानाही लोक घराबाहेर पडत नाहीयेत. त्याचवेळी लिव्ह शहरात हवाई हल्ल्याचा सायरन झाला आहे. यानंतर येथील महापौरांनी लोकांना घरातच थांबण्यास सांगितले आहे. युक्रेनने दावा केला आहे की, त्यांच्या सैन्याने 800 हून अधिक रशियन सैनिकांना ठार केले आहे. 30 रशियन रणगाडे आणि 7 गुप्तचर विमानेही नष्ट करण्यात आली आहेत.

दरम्यान, रशियाचे सैन्य राजधानीत घुसल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे. रशियन रणगाडे येथून फक्त 32 किमी अंतरावर असून त्यांना रोखण्यासाठी युक्रेनच्या लष्कराने तीन पूल उडवून दिले आहेत. येत्या 96 तासांत म्हणजेच 4 दिवसांत कीव्ह रशियाच्या ताब्यात जाईल, अशी भीती झेलेन्स्की यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की रशियन सैन्याने निवासी भागांना लक्ष्य केले असून त्यांनी रशियन नागरिकांना या युद्धाचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे.

शुक्रवारी सकाळी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनीही एक निवेदन जारी केले. ते म्हणाले की, जगाने आपल्याला युद्धात लढण्यासाठी एकटे सोडले आहे. त्यांनी सांगितले की, ते कीव्हमध्ये आहेत आणि रशियन सैन्य तेथे दाखल झाले आहे. रशियाचे टार्गेट त्यांचे कुटुंब असल्याचेही त्यांनी सांगितले.

युक्रेनचे संपूर्ण सैन्य युद्धात उतरले
युक्रेन सरकारने 18 ते 60 वयोगटातील पुरुषांना देश सोडण्यास बंदी घातली आहे. युक्रेनने आपल्या 10,000 नागरिकांना लढाईसाठी रायफल दिल्याचे काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

रशिया आणि युक्रेन युद्धाशी संबंधित महत्त्वाचे अपडेट…

  • रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 137 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 316 जण जखमी झाले आहेत.
  • अमेरिकेच्या अहवालानुसार, रशियाने युक्रेनवर एकूण 203 हल्ले केले, ज्यामध्ये 160 हल्ले क्षेपणास्त्रे आणि 83 जमिनीवर आधारित लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला.
  • रशियन सैन्याने युक्रेनच्या कोनोटोप शहराला वेढा घातला असून बाकीच्या सैन्याने राजधानी कीवच्या दिशेने आगेकूच केली.

सुडबुद्धीच्या राजकारणात महाराष्ट्रातील प्रमुख प्रश्नाकडे दुर्लक्ष -औंधमधील डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह तात्काळ सुरू करा – संभाजी ब्रिगेड

0

पुण्यात विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल…

पुणे – सुडबुद्धीच्या राजकारणात महाराष्ट्रातील प्रमुख प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, बे-रोजगार तरूण, नोकर भरती… इत्यादी तरुणांचे प्रमुख प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. विद्यार्थ्यांवरील होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही.असा इशारा देत औंधमधील डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह तात्काळ सुरू करा अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी सांगतिले कि ,’ मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर राज्य सरकारने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वस्तीगृहाची निर्मिती केली. पुण्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख (औंध आयटीआय, पुणे) वस्तीगृहाचे उद्घाटन 2018 मध्ये तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले होते. मुलांसाठी २५० आणि मुलींसाठी ५० आसन क्षमता असणारे हे वस्तीगृह सध्या बंद आहे. सरकारचा प्रचंड भोंगळ कारभार सुरू असून वस्तीगृहात प्रवेश असणारे मागील वर्षातील विद्यार्थी वारंवार जिल्हाधिकारी व सरकारकडे पाठपुरावा करत असताना सुद्धा जाणीवपूर्वक सरकारच्या निष्क्रिय पणामुळे डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह सुरू होत नाही. कोरोना काळातील बिकट परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील ‘मुलांकडे राहायला घर नाही आणि खायला पैसे नाहीत’ अशी परिस्थिती असताना सरकार त्यांचा छळ करत आहे, हेच महाविकास आघाडी सरकारचे निष्क्रियपणाचे लक्षण आहे. विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असून शेतकऱ्यांच्या मुलाची पुण्यात प्रचंड हेळसांड होत आहे. पुण्यातील बंद केलेली सर्व वस्तीगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू करावी… अशी संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन विनंती केली आहे,अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.असाही इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे, संदिप लहाने पाटील, विद्यार्थी हर्षवर्धन शिंदे, स्वप्निल चौधरी, स्वप्निल बहीर, जयेश सोनवणे, अभिषेक शिंदे आदी उपस्थित होते.

संतोष शिंदे म्हणाले,’ पंजाबराव देशमुख वसतिगृह व प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू झाले पाहिजे. अन्यथा गुरूवार दि. ३ मार्च २०२२ पासून संभाजी ब्रिगेडच्या वतीने विद्यार्थ्यांना घेऊन औंध आयटीआय समोर ‘अमरण उपोषण’ करण्यात येईल. मुळात राज्यामध्ये शाळा, महाविद्यालय सुरू झालेली असताना सुद्धा राज्य सरकार मुलांचे वस्तीगृह सुरू करू नाही, हे दुर्दैवी आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह, पुणे मध्ये पूर्ण वेळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून मुलांना जेवणासाठी सुद्धा उत्तम प्रकारची मेस (खाणावळ) त्या ठिकाणी सुरू करावी. मागील काळात याच हॉस्टेल मध्ये दोन वर्ष मुलांना पिण्यासाठी पाणी नव्हते. यापेक्षा दुर्दैवी अवस्था काय…? तसेच सदर वसतिगृहासाठी पूर्णवेळ अधिकारी देण्यात यावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.

नितीन गडकरी यांनी मध्य प्रदेशात 5722 कोटी रुपये खर्चाच्या 11 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली

0

नवी दिल्‍ली-

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांनी आज मध्य प्रदेशमध्ये 5722 कोटी रुपये खर्चाच्या एकूण 534 किमी लांबीच्या 11 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली.

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, या प्रकल्पांमुळे यात्रेकरू आणि पर्यटकांना सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. ते म्हणाले की, यामुळे उज्जैनला लागून असलेल्या कृषी बाजारपेठेतून  उत्तम कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. ते  म्हणाले की, उज्जैन-देवास औद्योगिक  मार्गिका विकसित केली जाईल ज्यामुळे  रोजगार निर्मितीच्या नवीन संधी निर्माण होतील. त्याचबरोबर  संपूर्ण माळवा-निमार प्रदेशाचा विकास केला जाईल , सीमावर्ती भाग साठवणूक केंद्रे म्हणून विकसित केला जाईल , यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होईल आणि प्रवासही सुरक्षित होईल  असे  गडकरी म्हणाले.

सरकार सर्वांसाठी सुरळीत संपर्क व्यवस्था, वेगवान विकास, उत्तम सुरक्षा आणि समृद्धी सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेसह अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निरंतर पावले उचलत आहे.

संरक्षण मंत्रालयाने केला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसोबत 1075 कोटी रुपयांचा करार

0

नवी दिल्‍ली-

भारत सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला संरक्षण क्षेत्रातर्फे आणखी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संरक्षण मंत्रालयाच्या अधिग्रहण शाखेने टी-90 या लढाऊ रणगाड्यांच्या कमांडरसाठीच्या दृष्टी सुविधेमध्ये आधुनिकीकरणासाठीचे बदल करण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स मर्यादीत (बीईएल) या कंपनीशी 1075 कोटी रुपयांचा करार केला आहे. या करारानुसार या कंपनीतर्फे भारतीय लष्करातील 957 टी-90 रणगाड्यांमध्ये हे बदल केले जाणार आहेत.

भारताच्या अत्यंत महत्त्वाच्या टी-90 या लढाऊ रणगाड्यांच्या कमांडरसाठीच्या दृष्टी सुविधेमध्ये रात्री पाहता येण्यासाठी नळीवर आधारित प्रतिमा रूपांतरण सुविधा आहे. भारतीय लष्कराने अपेक्षा व्यक्त केल्यानुसार सध्याच्या नळीआधारित दृष्टी सुविधेच्या ऐवजी भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि बेल ही कंपनी यांनी संयुक्तपणे मध्यम लहरींवर आधारित औष्णिक प्रतिमा तंत्रज्ञानावर आधारित दृष्टी सुविधा संरेखीत आणि विकसित केली.

या नव्या आधुनिक दृष्टी सुविधेमध्ये दिवसा आणि रात्री 8 किलोमीटर अंतरावरील लक्ष्य ओळखण्याची क्षमता असणारा औष्णिक प्रतिमा दर्शक  तसेच 5 किलोमीटरच्या कक्षेतील परिसर अचूकपणे न्याहाळण्यासाठी लेझर रेंजर शोधक बसविलेला आहे. या अत्याधुनिक सुविधांमुळे लढाऊ रणगाड्याची अधिक लांब अंतरावरील लक्ष्य हेरण्याची क्षमता वाढली आहे. क्षेपणास्त्र विषयक सॉफ्टवेअर आणि एलआरएफ यांनी केलेल्या सुधारणेमुळे, टी-90 रणगाड्याचे कमांडर लक्ष्य ओळखणे, त्यावर मारा करणे आणि ते नष्ट करणे या क्रिया विशिष्ट अचूकतेसह करू शकतील. स्वदेशी पद्धतीने विकसित करण्यात आलेल्या या सुविधेने प्रत्यक्ष युद्धक्षेत्रावरील कठोर मूल्यमापन चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.

स्वदेशी पद्धतीने यशस्वीपणे विकसित आणि औष्णिक प्रतिमेवर आधारित कमांडरच्या नव्या दृष्टी सुविधेनेदेशातील संशोधन आणि विकास प्रक्रिया तसेच संरक्षण सामग्रीचे उत्पादन यांना आणखी उत्तेजन दिले आहे.

मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आज पुन्हा निषेध आंदोलन

0

पुणे – काल ईडी ने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली असून आता ते ईडी च्या कोठडीत आहेत. ईडीने केलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ आज सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलन केले. हे आंदोलन पुण्यात अलका चौक येथे करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप,किशोर हनुमंत कांबळे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस पुणे शहर,मनोज पाचपुते-अजिंक्य पालकर कार्याध्यक्ष,राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला.

प्रशांत जगताप म्हणाले, सरकारच्या दबावापुढे झुकून आणि राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी ईडीच्या माध्यमातून मलिक यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास यंत्रणेचा दुरुपयोग आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापि असले प्रकार खपवून घेणार नाही. आम्ही मुंबईत पण आज मोठे आंदोलन केले आहे. नवाब मलिक यांनी कोणताही घोटाळा केला नाही. तरी भाजप सरकार महा विकास आघाडी सरकार पाडण्यासाठी असले घाणेरडे प्रकार करत आहे. जो पर्यंत मंत्री नवाब मलिक यांची सुटका व त्यांना योग्य न्याय मिळत नाही. तोपर्यंत आम्ही आंदोलन असेच चालूच ठेवणार, असे प्रशांत जगताप म्हणाले.

पुणे महापालिका निवडणुकीत आपचा सर्व 173 जागा लढवण्याचा संकल्प

0

पुणे:”आम आदमी पक्ष विसर पडलेल्या हक्कांची जाणीव सर्वसामान्य लोकांना करून देत आहे. नगरसेवक म्हणजे सर्वसामान्य जनतेने निवडून दिलेला नोकर असतो. हा नोकर जर काम करत नसेल तर मालकाला पुढे यावे लागेल आणि नोकराच्या खुर्चीत बसावे लागेल. म्हणूनच ‘आपणच होऊ नगरसेवक’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे”, अशा शब्दांमध्ये आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

बालगंधर्व रंगमंदिरात आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळावा भरवण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विजय कुंभार बोलत होते. ‘भ्रष्टाचार संपवणार,आम आदमीचे सरकार’ ही मेळाव्याची प्रमुख संकल्पना होती.

सभागृहातील प्रचंड गर्दीचा उल्लेख भाषणात करून कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय कुंभार पुढे म्हणाले की, ” या गर्दीचे सांगणे असे आहे की आता आम्हाला पुण्यामध्ये आम आदमी पक्ष हवा आहे. ‘नाही रे ‘ वर्गाला आपल्या हक्कांची मुळीच जाणीव नाही. त्यांना हक्कांचा विचार करण्यासाठी वेळच मिळू नये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली गेली आहे.अशा ‘नाही रे’ वर्गासाठी आता आपल्याला मैदानात उतरावे लागेल.”

या मेळाव्यात रिक्षाचालकांपासून दुकानदार, डॉक्टर, इंजिनीयर, वकील, निवृत्त न्यायाधीशांपर्यंत शेकडो कार्यकर्ते व सामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रेक्षागृहा बाहेरही अनेक आम आदमी कार्यक्रम ऐकत उभे होते. ‘आम आदमी पार्टीचा झाडू फिरवू ,भ्रष्टाचार साफ करू’ हा मुद्दा वक्त्यांनी मांडला. भ्रष्टाचार मुक्त सुशासन आणि विकासाचे दिल्ली नव्हे तर त्याहून प्रगत पुणे माॅडेल या मुद्याला पुणेकरांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये साथ दिली.

यावेळी पुणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. पुणे राज्य प्रवक्ते डॉ.अभिजीत मोरे, राज्य वाहतूक विंगचे अध्यक्ष श्रीकांत आचार्य, पुणे शहर जनसंपर्क प्रमुख प्रभाकर कोंढाळकर, ज्येष्ठ कार्यकर्त्या तारा मैत्रेयन, जेष्ठ कार्यकर्ते किशोर मुजुमदार, खडकवासला विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी गायकवाड, आम आदमी रिक्षचालक संघटनेचे अध्यक्ष असगर बेग, निवृत्त न्यायाधीश मंजुषा नयन, क्षेत्रीय कार्यालय निहाय अध्यक्ष – सुदर्शन जगदाळे, रोहन रोकडे, अनिल धुमाळ, किरण कांबळे, सतीश यादव, सुशील बोबडे, घनश्याम मारणे, नरेंद्र देसाई, मनोज फुलावरे आदी व्यासपीठावर होते.

आपचे राज्य प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि पारंपरिक राजकीय पक्षांनी चालविलेल्या उघड भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. बोगस अभियंता पदोन्नती घोटाळा, कचरा घोटाळा, किमान वेतन घोटाळा, मालमत्ता सर्वेक्षण घोटाळा, जम्बो हॉस्पिटल ठेक्यामधील भ्रष्टाचार, समान पाणी पुरवठा योजना या फसव्या योजनेत खर्च होणारे अडीच हजार कोटी, फुगत चाललेला जायका प्रकल्प तसेच कोरोनाच्या काळात धूळ खात पडून असलेली महानगरपालिकेची रुग्णालये अशा मुद्यांकडे लक्ष वेधले.

डॉ. मोरे यांनी स्मशानभूमीचे होऊ घातलेले खाजगीकरण, बोलकी झाडे, लाखो – करोडो रुपयांचे झाडांविषयी झालेले भ्रष्टकारण आदी अनेक मुद्द्यांचा उहापोह केला. 125 एकर क्षेत्र असलेल्या 270 अॅमिनिटी स्पेस नामक मोकळ्या जागा 90 वर्षांच्या करारावर विकत देण्याचा भाजपचा आम आदमी पार्टीने हाणून पाडलेला डाव यावरही भाष्य केले.

जेष्ठ कॅलिग्राफीतज्ञ प्रभाकर भोसले यांनी विकासाचे दिल्ली मॉडेल सविस्तर प्रेझेंटेशन करून सर्वांना समजावून सांगितले. पुण्यात याच धर्तीवर बदल करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

आप वाहतूक विंगचे राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य यांनी कराचा पैसा हा धोरणात्मकपणे कसा लुटला जातो, सामान्य लोक कसे ठगवले जातात याबाबत सविस्तर मांडणी केली. ही परिस्थिती बदलण्याचे आवाहन केले. तसेच परिवर्तनाच्या या लढाईत रिक्षाचालक, टेम्पोचालक आम आदमी पक्षासोबत नेटाने उभे राहतील याची ग्वाही दिली.

आप पुणे शहर जनसंपर्क प्रमुख प्रभाकर यांनी “पुणे मनपाची निवडणूक आपल्याला केवळ लढवायची नाही तर जिंकायची आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी जीवाचे रान करुन कष्ट करण्याचे” जोशपूर्ण आवाहन केले.

शहरातील सर्व 173 जागा लढवण्याचा निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. ‘आपणच होऊ नगरसेवक’ मोहिमेतील इच्छूकांपैकी इंजिनियर सुदर्शन जगदाळे, रिक्षाचालक किरण कांबळे, डॉक्टर प्रेरणा बनसोडे , गृहिणी सना शेख, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती ताकवले, व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते कृष्णाजी गायकवाड, निवृत्त जवान संतोष चौधरी, व्यावसायिक राहुल म्हस्के, अॅड. दत्तात्रय भांगे, माजी न्यायाधीश मंजुषा नयन आदींनी मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, पुणे शहर रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षाचालकांच्या 12 कोविड विधवांना परमिट हस्तांतरणाचा कार्यक्रम संयोजकांच्या हस्ते पार पडला.

प्रामाणिकपणा दाखवून समाजाला आदर्श घालून देणाऱ्या 9 जणांचा यावेळी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सर्व रिक्षा चालकांचा प्रातिनिधिक म्हणून अशोक शिंदे व सुरेश पारखी यांचा सत्कार करण्यात आला.

आनंद अंकुश यांनी सूत्र संचालन केले. तर विद्यानंद नायक यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केलेल्या पक्ष व आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : जगदीश मुळीक

0

पुणे – दहशतवादी दाऊद इब्राहीमला देशद्रोही कृत्य करण्यासाठी अर्थ पुरवठा केल्याच्या आरोपावरून ईडीने अटक केलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी अशी मागणी शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात शहर भाजपच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी मुळीक बोलत होते. संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, संदीप लोणकर, दत्ता खाडे, दीपक नागपुरे, अर्चना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुळीक म्हणाले, दाऊद इब्राहिमने मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले. वेळोवेळी दहशतवादी कृत्यांना पाठबळ दिले. त्याच्याशी मलिक यांचे आर्थिक व्यवहार आहेत. हा देशद्रोह आहे. अशा व्यक्तीस मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत भाजपा तीव्र आंदोलन करणार आहे.

नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी बाणा ‘ मुख्यमंत्री दाखवणार का ? भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांचा सवाल

0

पुणे, ता. २४ : बॉम्बहल्ले करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान असून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून ठाकरी बाणा  दाखवणार का,असा सवाल भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप हा देशद्रोहाएवढाच गंभीर असल्याने असा ठपका असलेला मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात असणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे,असे ते म्हणाले.

मुंबई महापालिकेसह अन्य निवडणुकांवर डोळा ठेवून मुस्लिमांच्या अनुनयाकरिता देशद्रोही दाऊदच्या हस्तकास अभय देण्याचे हीन राजकारण ठाकरे सरकारच्या अधोगतीस कारणीभूत ठरेल असा इशाराही भांडारी यांनी दिला. नवाब मलिक यांनी दाऊदच्या दहशतवादी कारवायांकरिता पैसा जमा करण्याच्या कटास साह्य केल्याचा आरोप असून त्यासाठीचे सज्जड पुरावे ‘ईडी’कडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्या दाऊद इब्राहीमने १९९२ मध्ये मुंबईत भीषण बॉम्बस्फोट घडवून शेकडो निरपराध नागरिकांचे बळी घेत देशाविरुद्धचा सर्वात घातक दहशतवादी कट आखला, त्याच दाऊदशी नवाब मलिक यांची हातमिळवणी असल्याचा गंभीर आरोप ईडीकडून करण्यात येत असतानाही मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास विरोध करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लांगूलचनाच्या राजकारणाची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागेल.अशा देशद्रोही कारवायाना मदत केल्याचे पुरेसे पुरावे ईडीकडे असल्याचे सांगण्यात येत असतानाही मलिक यांना मंत्रिपदावर ठेवण्याच्या दबावापुढे झुकून मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपण कणाहीन राजकारणी असल्याचे सिद्ध केले आहे, अशी टीकाही भांडारी यांनी केली.

१९९२-९३ च्या बॉम्बस्फोटात दाऊदच्या हल्ल्यापासून मुंबईकरांचे संरक्षण करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचे वारस आज मात्र, मुख्यमंत्रीपद आणि सत्तेच्या हव्यासापोटी दहशतवादी दाऊदच्या हस्तकास वाचविण्याचा घातक खेळ करत आहे, असा आरोप करून, ठाकरे यांच्या कणाहीन राजकारणामुळे महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेस धोका निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर आता मलिक यांची हकालपट्टी करावी, असे ते म्हणाले.

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भर विधिमंडळात भ्रष्ट पोलीस आधिकारी सचिन वाझे याची पाठराखण केली होती. त्यानंतर खंडणीखोर अनिल देशमुख यांनाही पाठीशी घालण्याचे आटोकाट प्रयत्न केले. केवळ सत्ता टिकविण्यासाठी भ्रष्ट, व्यभिचारी आणि लाचखोर, खंडणीखोर सहकाऱ्यांना वाचविताना ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या ठाकरी बाण्यास मूठमाती दिली. आता मतांच्या राजकारणासाठी देशद्रोही कारवायांतील सहभागाचा आरोप असलेल्या नवाब मलिक या मंत्र्याकरिता आपला कणा झिजविण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. स्वतःची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सांभाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे अनुयायी असलेल्या कडवट शिवसैनिकांच्या भावनांची थट्टा चालविली आहे, असा आरोप भांडारी यांनी केला.

नवाब मलिक या मंत्र्याने दाऊदच्या कारवायांसाठी बेनामी पद्धतीने मालमत्ता हडप करून गरीब कुटुंबांची फसवणूक केली असून हा पैसा दाऊदकडे वळविल्याचा आरोप आहे. दाऊदच्या दहशतवादी कारवायांना आर्थिक साह्य करण्याच्या अशा गुन्हेगारी व देशद्रोही कारवायांना सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने संरक्षण द्यावे हा महाराष्ट्राच्या कोट्यवधी नागरिकांच्या सुरक्षिततेशी सामूहिक खेळ आहे. अशा खेळात सहभागी होऊन राज्याच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या जनताविरोधी सरकारच्या निषेधार्थ भाजप संपूर्ण शक्तिनिशी लढा देईल, असा इशाराही भांडारी यांनी दिला.

राज्यात सर्व जिल्ह्यांत व तालुक्यात १२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत

0

मुंबई, दि. २४ : विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, १९८७ मधील तरतुदी अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, यांनी संपूर्ण राज्यात तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय लोकअदालत १२ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी कळविले आहे.

मुंबई येथील सर्व न्यायालयात १२ मार्च रोजी लोक अदालतीचे आयोजन

न्यायालयीन प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटविण्याबाबत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण हे वेळोवेळी लोक अदालतीचे आयोजन करीत असते. त्या अनुषंगाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र  राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार शनिवार दि. १२ मार्च २०२२ रोजी मुंबई येथील सर्व न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. व त्याद्वारे दूरचित्रसंवाद प्रणालीच्या माध्यमातून प्रकरणे तडजोड करून मिटविण्याची मुभा देण्यात आली आहे.

लोकअदालतीत ठेवण्यात येणारी प्रकरणे

धनादेश अनादराची प्रकरणे, बॅंकेची कर्ज वसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणी देयकाबाबतची प्रकरणे, तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, आयकर कायद्यातील फौजदारी स्वरूपातील तडजोड प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई देण्याबाबतची प्रकरणे, वैवाहिक वाद, संपादन प्रकरणे व दिवाणी दावे तसेच उपरोक्त नमूद स्वरूपातील दाखल पूर्व प्रकरणे सुनावणी करिता ठेवण्यात येणार आहेत.

तरी ज्या पक्षकारांना वर नमूद प्रकारची प्रकरणे दि. १२ मार्च २०२२ रोजी लोकअदालतीत ठेवावयाची आहेत. त्या पक्षकारांनी संबंधित न्यायालयात आपल्या प्रकरणात विनंती अर्ज लवकर सादर करावा व प्रकरण सामंजस्याने तात्काळ मिळवावे, असे आवाहन मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे तथा नगर दिवाणी व सत्र न्यायालय, बृहन्मुंबईचे प्रधान न्यायाधीश उर्मिला जोशी-फलके व सचिव हितेंद्र वाणी यांनी केले आहे.

राष्ट्रीय लोक अदालतीचे फायदे

  • प्रकरणात जमा केलेली संपूर्ण कोर्ट फी परत मिळते
  • लोकअदालतीतील निवाड्यास कुठल्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही.
  • सामंजस्याने वाद मिटल्यामुळे वेळ व पैसे दोन्हींची बचत होते.
  • लोक अदालतीमध्ये पक्षकारांना आपली बाजू स्वत: मांडण्याची संधी मिळते.

अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी कळविले आहे.

पुणे, नांदेड, जालना, गडचिरोली जिल्हा रुग्णालयात होणार कॅथलॅब

0

मुंबई दि. 24 : राज्यातील चार जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कॅथलॅब उभा करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पुणे, जालना, नांदेड आणि गडचिरोली जिल्हा रुग्णालयात नवीन कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्याकरिता कामाच्या अंदाजपत्रक आणि आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

पुणे, गडचिरोली, जालना आणि नांदेड जिल्हा रुग्णालयामध्ये नवीन कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्याकरिता ३२ कोटी २३ लाख वीस हजार रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. या चारही रुग्णालयात स्थापत्यविषयक कामकाज करण्यासाठी सहा कोटी आणि यंत्रसामग्री आणि साहित्य खरेदीसाठी २६ कोटी २३ लाख आणि वीस हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

इयत्ता बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल; ५ आणि ७ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा आता ५ आणि ७ एप्रिल २०२२ रोजी होणार

0

मुंबई, दि. 24 :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) मार्च-एप्रिल 2022 च्या सर्वसाधारण व द्विलक्षी (जनरल आणि बायफोकल) आणि व्यावसायिक (एमसीव्हीसी) वेळापत्रकातील दि. 05 मार्च आणि दि. 07 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयांच्या परीक्षा अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव नियोजित तारखांऐवजी अनुक्रमे दि. 05 एप्रिल आणि दि. 07 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा दि. 04 मार्च ते 30 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये बदल करण्यात येत आहे.

यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार शनिवार दि. 05 मार्च 2022 रोजी प्रथम सत्रात होणारी हिंदी विषयाची तसेच द्वितीय सत्रात होणारी जर्मन, जपानी, चिनी, पर्शियन विषयांची परीक्षा आता मंगळवार दिनांक 05 एप्रिल 2022 रोजी नियोजित वेळेत होईल. तर, सोमवार दि. 07 मार्च 2022 रोजी प्रथम सत्रात होणारी मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, (अरेबिक/देवनागरी) मल्याळम, तमिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली विषयांची तसेच द्वितीय सत्रात होणारी उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश आणि पाली विषयांची परीक्षा आता 07 एप्रिल 2022 रोजी नियोजित वेळेत होईल.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) च्या लेखी परीक्षा व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकात इतर कोणताही बदल नाही. त्याचप्रमाणे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तरी वेळापत्रकातील उपरोक्त अंशत: बदलाची सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/ प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.

बृहन्मुंबई हद्दीत ८ मार्चपर्यंत जमावबंदी आदेश जारी

0

मुंबई, दि. 24 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत 8 मार्च 2022 पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा जमाव करणे, मोर्चा काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, संगितीय बँड, फटाके फोडणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ आणि विवाहप्रथेशी संबंधित अन्य समारंभ, अत्यंविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या वैधानिक बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून होणारे कार्यक्रम यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास यातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलीसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे, असे बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त (अभियान) श्री. संजय लाटकर यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे

पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत सहभागी व्हा – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन

0

मुंबई, दि. 24 : भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकारण्याची मुदत 15 मार्च 2022 आहे. राज्यातील सर्व वयोगटातील नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठीच्या या उपक्रमास हातभार लावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी आणि प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्त्व पटवून देण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य’ या मध्यवर्ती संकल्पनेवर पाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या आहे. या स्पर्धेत ई-प्रमाणपत्रापासून रूपये 2 लाखापर्यंत आकर्षक अशी बक्षिसेही जाहीर केली आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी वयाचे बंधन नसल्याने भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी https://ecisveep.nic.in/contest/ या संकेतस्थळावर नोंदणी करून त्यांच्या प्रवेशिका voter-contest@eci.gov.in या ई-मेलवर पाठवाव्यात. ई-मेल करतांना विषयात स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा आवर्जून उल्लेख करावा, असेही श्री.देशपांडे यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रश्नमंजुषा, घोषवाक्य, गीत गायन, व्हिडिओ मेकिंग आणि भित्तिचित्र स्पर्धा अशा एकूण पाच प्रकारच्या स्पर्धा आहेत.

गीत, व्हिडिओ मेकिंग आणि भित्तिचित्रे स्पर्धेकरिता श्रेणी ठरविण्यात आली असून, संस्थात्मक श्रेणीअंतर्गत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा राज्य किंवा केंद्र सरकारच्या नोंदणीकृत संस्थांना या संस्थात्मक श्रेणीमध्ये भाग घेता येईल. व्यावयायिक श्रेणीअंतर्गत ज्या व्यक्तिचे उदरनिर्वाहाचे मुख्य स्त्रोत गायन/ व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र असा आहे, अशी व्यक्ती व्यावसायिक श्रेणीत गणली जाईल. हौशी श्रेणीअंतर्गत गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र हा छंद म्हणून जोपासत असलेली व्यक्ती हौशी म्हणून गणण्यात येईल.

गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्रे स्पर्धेकरिता तीन श्रेणीत वर्गीकरण करण्यात आले असून संस्थात्मक, व्यावसायिक आणि हौशी या श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना रोख पारितोषिके दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक श्रेणीला विशेष उल्लेखनीय रोख पारितोषिकेही दिली जाणार आहे. संस्थात्मक श्रेणीमध्ये चार विशेष उल्लेखनीय तर व्यावसायिक आणि हौशी श्रेणीसाठी तीन विशेष उल्लेखनीय पारितोषिके देण्यात येणार आहे.

घोषवाक्य स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक रूपये 20 हजार, द्वितीय पारितोषिक रूपये 10 हजार, तृतीय पारितोषिक रूपये सात हजार पाचशे तसेच सहभागी होणाऱ्यापैकी 50 स्पर्धकांना प्रत्येकी दोन हजार रूपये उल्लेखीनय पुरस्कार म्हणून देण्यात येणार आहे.

प्रश्नमंजुषा स्पर्धेकरिता भाग घेणाऱ्या विजेत्यांना भारतीय निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक वस्तू देण्यात येणार असून, तिसरी पातळी पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना ई-प्रमाणपत्रे देण्यात येतील, अशी माहिती श्री.देशपांडे यांनी यावेळी दिली.

यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेले ‘लोकशाही समजून घेताना’ या पुस्तकाच्या किंडल आवृत्तीची माहिती श्री.देशपांडे यांनी दिली.

एमटीडीसीच्या निवास व न्याहारी योजनेद्वारे पर्यटक सुविधांबरोबरच उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होईल – पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे

0

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) निवास, न्याहारी तसेच महाभ्रमण योजनेच्या माध्यमातून पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच ग्रामीण भागातील उद्योजक यांना उद्योगसंधी आणि सर्वसामान्यांना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल, असा विश्वास पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. आता परिस्थिती हळूहळू सुरळीत होत असल्याने एमटीडीसीमार्फत निवास व न्याहारी आणि महाभ्रमण योजनेबाबत माहिती देणारी दोन दिवसांची कार्यशाळा नुकतीच दिवेआगर येथे आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्यमंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींसह योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेत एमटीडीसीचे महाव्यवस्थापक दिनेश कांबळे यांनी योजनेच्या सादरीकरणाद्वारे पर्यटन संकल्पनांच्या व्यावसायिक संधी, शासकीय योजनांचे स्वरूप यांची माहिती देऊन त्याबाबतचे प्रशिक्षण दिले.

पर्यटन राज्यमंत्री कु.तटकरे म्हणाल्या, रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. एमटीडीसीच्या विविध योजनांचा उद्योजकांनी येथे नक्कीच लाभ घ्यावा. महामंडळाने या योजनेत अधिकृतरित्या नोंदणीसाठी काही अटी शर्ती आखल्या असून नोंदणी केल्यानंतर पर्यटकांना काय सुविधा द्याव्या, पर्यटकांच्या निवासासाठी काय कार्यपद्धती असावी याचे मार्गदर्शन करण्यात येते. ग्रामीण भागातील पर्यटनाच्या व्यावसायिक संधीबाबत तरुणवर्ग जागरूक होत आहे ही एक सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी निवास व न्याहारी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या व्यावसायिकांना राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

एमटीडीसीच्या निवास व न्याहारी तसेच महाभ्रमण योजनांना आजवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पर्यटन क्षेत्रात या उपक्रमांचे महत्त्व सिद्ध झाले आहे. ग्रामीण भागातील उद्योजकांना तसेच सामान्य जनतेला उत्पन्नाचा स्रोत म्हणून निवास व न्याहारी योजनेअंतर्गत नोंदणी करून आपली जागा, कक्ष किंवा निवास व्यवस्था पर्यटकांसाठी विविध सांस्कृतिक अनुभवांसह परवडणाऱ्या दरात प्रदान करता येते. अधिकाधिक लोकांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचवली जावी या उद्देशाने या कार्यशाळेत सहभागी झालेल्या इच्छुकांना या योजनांचे स्वरूप व त्याबाबतची माहिती दिली गेली.