Home Blog Page 2058

एन.डी.ए. गेट ते आळंदी नवीन बसमार्ग सुरू

0

ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषात फुलांची आकर्षक सजावट केलेली बस झाली मार्गस्थ

पुणे-पीएमपीएमएल कडून आज पासून मार्ग क्रमांक ८३ – एन.डी.ए. गेट (गेट नं.१०) ते आळंदी हा नवीन बस मार्ग सुरू करण्यात आला. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक तथा पीएमपीएमएलचे संचालक प्रकाश ढोरे यांच्या हस्ते कोंढवे धावडे येथे या बससेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला. प्रकाश ढोरे यांच्या विशेष प्रयत्नातून हि बससेवा सुरू झाली.
याप्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका सायली वांजळे, नगरसेवक सचिन दांगट, हवेली तालुका पंचायत समिती सभापती बाळासाहेब मोकाशी, कोंढवे धावडे गावचे उद्योजक अमोल धावडे, माजी उपसरपंच सौ. स्नेहलताई धावडे, पीएमपीएमएलचे वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, सहाय्यक आगार व्यवस्थापक सुरेंद्र दांगट, राजेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्ग क्रमांक ८३ – एन.डी.ए. गेट (गेट नं.१०) ते आळंदी या बससेवेचा मार्ग एन.डी.ए. गेट, उत्तमनगर, माळवाडी, कर्वेरोड, डेक्कन, शिवाजीनगर, मुळा रोड, विश्रांतवाडी, दिघी, मॅगझीन चौक, चऱ्होली फाटा, आळंदी असा आहे. सध्या या मार्गावर एक बस उपलब्ध असून प्रवाशी प्रतिसाद व उत्पन्न वाढल्यास बससंख्या वाढविली जाईल.
एन.डी.ए. गेट ते आळंदी पहिली बस सकाळी ६.०० वा. तर शेवटची बस संध्याकाळी ७.४५ वा. आहे. तसेच आळंदी ते एन.डी.ए. गेट पहिली बस सकाळी ७.५० वा. तर शेवटची बस संध्याकाळी ५.०५ वा. असून आळंदीहून रात्री ९.५५ वा. शेवटची फेरी कोथरूड स्टँड पर्यंत आहे.
या बस लोकार्पण सोहळ्यावेळी बोलताना प्रकाश ढोरे म्हणाले,”आळंदीला जाणेसाठी कोंढवे धावडे, उत्तमनगर, शिवणे व परिसरातील नागरिकांनी दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर टाळून पीएमपीएमएलच्या या बससेवेचा जास्तीत जास्त वापर करावा. जेणेकरुन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.”
स्नेहल धावडे म्हणाल्या, “एन.डी.ए. गेट ते आळंदी अशी थेट बससेवा पीएमपीएमएलने सुरू केल्यामुळे कोंढवे धावडे, उत्तमनगर, शिवणे व परिसरातील नागरिकांची चांगली सोय होणार आहे.”
लोकार्पण सोहळ्यानंतर बस मार्गस्थ झाल्यानंतर उत्तमनगर येथे माजी सरपंच सुभाष नाणेकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बबससेवेचे स्वागत केले. तसेच गणपती माथा येथे पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ, दिलीप उर्फ बाबा धुमाळ व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बससेवेचे स्वागत केले.

सुदृढ समाजनिर्मितीसाठी महिलाभिमुख प्रशासनाची गरज – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

0

नागपूर, दि. 8 : शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना महिलांच्या हिताकडे लक्ष केंद्रित झाले पाहिजे. आदरासह हक्काचा स्त्रोत असे वातावरण कुटुंबात तसेच कामाच्या ठिकाणीही महिलांना मिळाले तर समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत जाईल. आत्मसन्मानाची वागणूक महिलाभिमुख प्रशासनातून दिली गेल्यास सुदृढ समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज केले.

वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे जागतिक महिला दिनानिमित्त ‘महिलाभिमुख प्रशासनाचे महत्त्व’ या विषयावर परिविक्षाधिन प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. या परिसंवादात जिल्हाधिकारी आर. विमला, नागपूर शहरच्या सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे, वनामतीच्या संचालिका भुवनेश्वरी एस. यांनी मार्गदर्शन केले. नागपूरच्या अखिल भारतीय स्वराज्य संस्थेचे प्रादेशिक संचालक डॉ. जयंत पाठक यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

श्रीमती लवंगारे-वर्मा म्हणाल्या की, महसूल विभागात प्रशासकीय महिला अधिकारी म्हणून काम करताना अनेक अनुभव आले. महिलांमध्ये कणखरपणा, कुठलेही काम करण्याची जिद्द असली तर महिला म्हणून भेदभाव होत नाही. कौटुंबिक संगोपन, आत्मसन्मान, मुलांप्रमाणेच समान वागणूक दिली तर समाजातही त्याप्रमाणेच वागणूक मिळेल. यासाठी लिंगभेदभावा संदर्भात पुरुषांप्रमाणेच स्त्रियांमध्येही संवेदनशिलता निर्माण झाली पाहिजे. महिलांनी महसूल, पोलीस विभाग अशा जोखीम असणाऱ्या विभागात काम करताना त्या पदाचे कौशल्य आत्मसात करुन त्याप्रमाणे व्यक्तिमत्वात बदल आणणे फार आवश्यक असते. विकासात्मक काम करताना नियामक विकासावरही भर दिला गेला पाहिजे.  प्रत्येक महिलाने स्वत:साठी वेळ काढावा असे सांगताना विविध प्रशासकीय पदांवर काम करताना त्यांना महिलांच्या संदर्भात आलेल्या अनुभवांचे कथन त्यांनी केले.

संघटनेतून सन्मान निर्मिती – आर. विमला

स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून महिलांनी सर्वांगिण उन्नती केल्याची आंध्रप्रदेश, केरळमध्ये उत्तम उदाहरणे आहेत. महिलांच्या एकसंघ होण्याने फक्त पैशांची बचत होत नसून त्यांच्यात विचारांची आदानप्रदान होते. महिलांनी एकमेकांशी संवाद साधल्याने अनेक घरगुती, कौटुंबिक, आर्थिक अडचणी सुटल्या आहेत. मातृसत्ताक राज्यांमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. ज्याप्रमाणे स्वयं सहायता बचत गटात दशसुत्रीचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे समाजात किंवा कामाच्या ठिकाणी दशसुत्रीचा अवलंब झाल्यास महिला अधिक सक्षमपणे आपले कर्तृत्व गाजवू शकतात. स्वयं सहायता गटांत पाच सामाजिक तत्वांचा वापर केला जातो. आरोग्य व पोषणा संबंधी जागृती, पाळीच्यासमयी स्वच्छता, संवेदना, लोकांना सहभागी करण्याचे धोरण, ताणतणाव व्यवस्थापन आदी विषयावर विचारांचे आदान प्रदान होत असते. स्वयं सहायता बचत गटांच्या माध्यमातून शाश्वत उपजीविकेचे साधन महिलांनी निर्माण केलीत यासंबंधी श्रीमती विमला यांनी अनुभव कथन केले. स्वयंसहायता गटांप्रमाणेच महिलांनी एकसंघ होऊन काम केले तर समाजात त्यांच्याप्रती सन्मान निर्माण होऊन महिलाभिमुख समाजनिर्मिती होईल, असे विचार त्यांनी मांडले.

महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य – अश्वती दोरजे

      पोलीस अधिकारी म्हणून करिअर निवडताना महिलांच्या सुरक्षेलाच प्राधान्य दिले. महिला ही आदिशक्ती आहे. निर्सगाने महिलेला प्रेम, करुना प्रसंगी धाडस, कणखरता व शक्ती असे गुण दिले आहेत. प्रत्येक महिलेने स्वत:ला कमी लेखू नये. शारिरीक, बौध्दीक क्षमतांना वाव देऊन स्वयंभू बनावे. कुठलेही करिअर निवडताना स्वत:चा परिघ ठरवू नये. महिलांनी आपल्या क्षमता ओळखून वाटचाल करावी. महिलांच्या सुरक्षेस माझे प्राधान्य असून नागपूर शहरात ‘पोलीस दिदी’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात शहरातील 33 पोलीसठाणी सहभागी आहेत. या अभियांतर्गत चमूत महिला अधिकारी व कर्मचारी आहेत. या उपक्रमाला शहरात उत्तम प्रतिसाद मिळाला असून याअंतर्गत प्रत्येक शाळेतील 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींना गुड टच, बॅड टच संदर्भात तसेच महिला सुरक्षेचे धडे देण्यात येत आहे. तात्काळ प्रतिसाद व कारवाई प्रक्रियेमुळे पोलीस दिदी लोकप्रिय झाल्या असून शाळेतील मुलींनी दिदींसोबत हितगुज केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

वनामतीच्या संचालिका भुवनेश्वरी एस. यांनी अतिथींचे आभार मानले.

महाराष्ट्र राज्य 8वर्षाखालील खुल्या व मुलींच्या गटात निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

0

पुणे, ८ मार्च २०२२: पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल(पीडीसीसी) यांच्या वतीने व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेखाली महाराष्ट्र राज्य 8 वर्षाखालील खुल्या व मुलींच्या गटाच्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.    

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा बुद्धिबळ मंडळातर्फे सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटर, प्रभातरोड, पुणे येथे 12 ते 13 मार्च 2022 रोजी पुण्यात 8 वर्षाखालील ही राज्य निवडचाचणी बुद्धिबळ स्पर्धा  होणार आहे.

या स्पर्धेत 150 हून अधिक खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. ही स्पर्धा खुल्या मुले आणि मुलींच्या गटात होणार आहे. प्रत्येक गटात 10000/- अशी पारितोषीक रक्कम देण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन खेळाडू हे हरियाणा येथे होणाऱ्या 8 वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 1 जानेवारी 2014 नंतर जन्मलेल्या किंवा त्यानंतरचे खेळाडू या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये निवडलेले खेळाडू 800/- भरून खेळू शकतात आणि इतर 1500/- ची डोनर एंट्री भरून भाग घेऊ शकतात.

प्रवेशाची अंतिम तारीख 10 मार्च 2022 आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धेच्या संचालक आयए विनिता श्रोत्री यांना 9850439239 या क्रमांकावर आणि पीडीसीसीचे सचिव डॉ संजय करवडे यांच्याशी 9404983301या  क्रमांकावर संपर्क साधा.

सौंदर्य क्षेत्रात काम करणार्‍या महिलांचा सन्मान सोहळा…

0

पुणे, दि. ८ मार्च – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मेसाई प्रतिष्ठानच्या वतीने ब्युटी क्षेत्रात कार्यरत असणार्‍या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरात विविध शहरांतील महिलांसाठी विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बेस्ट मेकअप टीचर आणि बेस्ट मेकअप अकॅडमी या स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धाकांचा बक्षीस वितरण सोहळा स्वारगेट परिसरातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स पदमजी हॉल येथे हा सोहळा पार पडला.

यावेळी मेसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तळोले, उपाध्यक्ष सोनाली तळोले, खजिनदार आश्विनी लोले, पप्पू तळोले, सोमनाथ काशिद, रविंद्र घोसाळकर, नरेश कुलकर्णी, संतोष पांदे, सुहास जाधव उपस्थित होते.

बेस्ट मेकअप टीचर अवॉर्ड विजेते – वैशाली साळुंखे (तासगाव, सांगली), मनिषा जखोटीया (कल्याण, ठाणे),  शीला जगताप (फलटण, सातारा), तारा बनकर (जालना), बेस्ट ब्युटी टीचर पुरस्कार – सपना खाडे(रायगड), बेस्ट ब्युटी अकॅडमी पुरस्कार – सौंदर्या ब्युटी अकॅडमी (पारनेर, अहमदनगर)

विजय तळोले म्हणाले की, कोरोनाकाळात सातत्याने सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय बंद राहत होता. त्यामुळे हातावर पोट असणारे बंधू –भगिनींवर उपासमारीची वेळ आली होती. उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे तसेच कोरोनाच्या भितीमुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे गेले काही वर्ष या भगिनी हवालदील झाल्या होत्या. त्यामुळे मेसाई प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

खेड शिवापूर परिसरात ५ कोटींच्या वीजयंत्रणेची कामे युद्धपातळीवर सुरु

0

पुणे, दि०८ मार्च २०२२: भोर तालुक्यातील खेड शिवापूर परिसरातील उद्योजक तसेच इतर वीजग्राहकांना दर्जेदार व विनाखंडित वीजपुरवठा करण्यासाठी पुढील १५ वर्षांमधील विजेची गरज लक्षात घेऊन सक्षमीकरण व नुतनीकरण योजनेअंतर्गत (एसएसएमआर योजना) सुमारे ५ कोटी रुपये खर्चाचे विविध कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

या योजनेतून प्रामुख्याने १३२ केव्ही कामथडी येथून ३३/२२ केव्ही खेड शिवापूर डबल सर्किटचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र काही स्थानिक नागरिकांकडून विविध कारणांमुळे वीजवाहिनीच्या कामामध्ये अडचणी येत असल्याने त्यांच्याशी चर्चा करून, त्यांची समजूत काढून व प्रसंगी पोलीस विभागाची मदत घेऊन वीजवाहिनीचे काम मार्गी लावण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरु आहेत. ही वीजवाहिनी कार्यान्वित झाल्यानंतर या परिसरातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांचे वीजप्रश्न सुटणार आहेत व त्याची माहिती खेड शिवापूर औद्योगिक संघटनेस देण्यात आली आहे.

यासोबतच पायाभूत सुविधा योजना दोन अंतर्गत १० एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त पॉवर ट्रॉन्सफॉर्मर एक वर्षभरापुर्वी कार्यान्वित करण्यात आलेला आहे. तेव्हापासून वीजपुरवठा सुरळीत असून गेल्या चार वर्षांपासून विजेचा लपंडाव सुरु असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. खेड शिवापूर परिसर हा मिश्र वर्गवारीतील ग्राहकांचा असून कृषी ग्राहकांची संख्या देखील लक्षणीय आहे. यामुळे या परिसरात होणारा वीजपुरवठ्यावर काही प्रमाणात वातावरणाचा देखील मोठा परिणाम होतो. वीजवापर हा मोसमानुसार कमी अधिक होतो.

सध्या उष्णता वाढत असल्याने विजेच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे वीजयंत्रणेवर ताण येत असला तरी तांत्रिक नियोजनातून वीजपुरवठा सुरळीत आहे. खेड शिवापूर परिसरातील दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सुरु असलेल्या वीजयंत्रणेच्या सर्व कामांना स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महिला दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘कमला पॉवर विमेन पुरस्कार’ प्रदान

0

मुंबई, दि. 32 :- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील 38 कर्तृत्ववान महिलांना येथे ‘कमला पॉवर विमेन’  पुरस्कार प्रदान करण्यात आले.

अभिनेत्री सुहास जोशी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पुरस्कार सोहळ्याचे आयोजन अंकीबाई घमंडीराम गोवानी ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. ट्रस्टच्या संस्थापिका निदर्शना गोवानी व रमेश गोवानी  व्यासपीठावर उपस्थित होते.

अंकीबाई घमंडीराम ट्रस्टच्या माध्यमातून निदर्शना गोवानी यांनी कोरोना काळात गरीब, महिला, कोविड योद्धे व उपेक्षितांची सेवा केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना महिला हे शक्तीस्वरूप असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

भारतात स्त्रियांचा सन्मान करण्याची परंपरा वेदकाळापासून असल्याचे सांगताना त्यांनी गार्गी, मैत्रेयी, कात्यायनी, अरुंधती आदींच्या विद्वत्तेचा गौरव केला. देश पारतंत्र्यात असताना काही महिलाविरोधी अनिष्ट प्रथा रुढ झाल्या. परंतु आज महिला सर्व क्षेत्रांत पुढे जात आहेत. महाराष्ट्रातील आदिवासी मुलींनी अलीकडेच माऊंट एव्हरेस्ट देखील सर केले. देश संकटात असताना महिला पुन:श्च शक्तिरूपा होऊन मदतीला धावून येतील असे त्यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी चेतना सिन्हा, स्मिता थोरात, श्वेताली ठाकरे, कीर्ती चिंतामणी, रंजना कोळगे, पूनम चोक्सी, एलिझाबेथ एफ कट्टूक्करेन, प्रतिभा सांगळे, डॉ.जया महेश, पूजा उदेशी, शक्ती मोहन, सीमा टपरिया, विद्या भांडे, भावना जैन, रेखीव खान, प्रभात खान, स्मिता थोरात, विनिता साहू, गीता व्यंकटेश्वर, अलिशा सिंग, नीती मोहन, फरजाना दोहाडवाला, डॉ. रिश्मा पै, अधिवक्ता गौरी छाब्रिया, झैनाब जाविद पटेल, सिस्टर बर्टिला, सिस्टर लुसिया, नीती गोयल, डॉ.महिमा बक्षी, डॉ.ऋचा जैन, अनुपमा देवराजन, माधुरी मडावी, बिनाफर कोहली, श्वेता वर्धन, सुलोचना चव्हाण, मनीषा वाघमारे, दिया मिर्झा, पूनम गौरव बोरसे, संगिता दशरथ धनकुटे, समीरा गुजर यांना सन्मानित करण्यात आले.

ईडीची चौकशी सुरु होताच नवलानींच्या कंपन्यांमध्ये कोट्यावधी ट्रान्सफर -ईडी भाजपाची एटीएम मशीन; खासदार संजय राऊतांचा आरोप

0

मुंबई-ईडी हि भाजपाची एटीएम मशीन बनली असून  दिवाण हाऊसिंग,एसआर वाधवान,अविनाश भोसलेंसह अनेकांना नोटीसा गेल्यानंतर त्यांच्या कंपन्यांकडून वसुली करण्यात आल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे .अशा लोकांच्या कंपन्यांनी इडी च्या नोटीसा आल्यानंतर नवलानीच्या सात कंपनीमध्ये करोडो रुपये ट्रान्सफर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील शिवसेना भवनात पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली . संजय राऊत यांनी काल ट्विट करुन याची माहिती दिली होती. यावेळीही ते भाजपाच्या नेत्यांवर शरसंधान साधणार असल्याचं बोललं जात होतं. गेल्यावेळीही संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपासह केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केले होते.“आज मी सकाळपासून आमच्या कार्यकर्त्यांवर प्राप्तिकर विभागाची धाड पडल्याच पाहत आहे. महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत मुंबईच्या प्रत्येक विभागात आणि शाखेत प्राप्तिकर विभागाची धाड पडेल असे मला वाटत आहे. आता या विभागाकडे हेच काम शिल्लक राहिले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात आणि बंगालमध्ये फक्त ठरावीक लोकांनाच लक्ष का करत आहेत आहे प्रश्न देशभरातून विचारला जात आहे. शिवसेनेच्या नेतृत्वातील हे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हे मोठे षड्यंत्र आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.“प्रापतिकर विभागाला आणि ईडीला आम्ही आतापर्यंत पुराव्यासोबत ५० नावे पाठवली आहेत. यावर चौकशी करावी असे या तपास यंत्रणांना का वाटत नाही? किरीट सोमय्यांनी एका केंद्रीय मंत्र्यांच्या बोगस कंपन्यांची यादी ईडीला दिली आहे. भाजपाच्या जवळचे असणाऱ्या ढवंगाळे यांच्या ७५ बोगस कंपन्यांची यादी मी ईडीकडे पाठवली होती. ईडीच्या सर्वात जास्त कारवाया या महाराष्ट्रात होत आहेत. महाविकास आघाडीच्या १४ प्रमुख नेत्यांवर ईडीने कारवाई केली आहे. भाजपा नेत्यांवर कोणत्याही तपास यंत्रणांची कारवाई झालेली नाही. ते लोक मुंबईच्या रस्त्यांवर वाटी घेऊन भीक मागत आहेत का? इनकम आणि टॅक्स फक्त आमच्याचकडे आहे का? या सर्व कारवाया कोण नियंत्रीत करत आहे याबाबत शिवसेना लवकरच मोठा खुलासा करणार आहे,” असे संजय राऊत म्हणाले.“मागच्या पत्रकारिषदेमध्ये मी सुमीत कुमार नरवर यांच्या नावाचा उल्लेख केला होता. बुलंदशहरमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीची संपत्ती आठ हजार कोटींच्यावर गेली आहे. आता ती व्यक्ती मलबार हिलला राहत आहे. ईडीला लावलेल्या चष्म्यातून अशा व्यक्ती दिसत नाही आहेत. याची माहिती मी लवकरच तुम्हाला देईल. दिल्ली आणि महाराष्ट्राच्या कोणत्या भाजपाच्या नेत्याची संपत्ती त्याच्याकडे आहे हे मी आधी पंतप्रधानांना सांगणार आणि त्यानंतर तुम्हाला. ट्रायडेन्ट ग्रुपला आधीच्या सरकारच्या काळात महत्त्वाची कामे मिळत होती त्याची माहितीही माझ्याकडे आहे. ही माहिती मी तपास यंत्रणांना देणार आहे. त्यानंतर तुम्ही मला अटकही करु शकता,” असेही संजय राऊत म्हणाले.“ईडीचे मोठे अधिकारी भाजपाच्या तिकिटावर निवडणुक लढवत आहेत. ईडी भाजपाची एटीएम मशीन बनली आहे. त्यांच्या खंडणीबाबत संपूर्ण यादी मी पंतप्रधान कार्यालयात दिली आहे. मी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात तुमचे स्वच्छ भारत अभियान हे कचरा साफ करण्याचे नसून भ्रष्ट्राचार ही नष्ट करण्यासाठी तुमचा जयजयकार होत आहे असे म्हटले आहे. तुमचे विरोधक असणाऱ्यांच्या मागे तुम्ही ईडीची कारवाई लावली आहे. मी पंतप्रधानांना एका भागाचीच माहिती दिली आहे. अशा दहा भागांची माहिती मी त्यांना देणार आहे,” असे राऊत म्हणाले.“जितेंद्र नवलानीच्या सात कंपन्यांनी १०० पेक्षा अधिक विकासकांकडून वसुली केली आहे. ज्यांची ज्यांची ईडीने चौकशी केली आहे त्या सर्वांनी त्यांचे पैसे जितेंद्र नवलानीच्या कंपनीमध्ये ट्रान्सफर केले आहेत. जितेंद्र नवलानी ईडीच्या अधिकाऱ्यांसाठी काम करत आहेत. २०१७ मध्ये ईडीनं दिवाण हाऊसिंग फायन्सासची चौकशी सुरु केली. अचानक दिवाण हाऊसिंगकडून जितेंद्र नवलानीच्या खात्यात २५ कोटी ट्रान्सफर झाले. मग ३१ मार्च २०२० पर्यंत एसआर वाधवान यांच्या कंपनीकडून नवलानींच्या कंपनीमध्ये आणखी १५ कोटी रुपये ट्रान्सफर झाले. याचप्रकारे अविनाश भोसलेंची चौकशी झाली. त्यानंतर अविनाश भोसलेंकडून १० कोटी रुपये नवलानीच्या सात कंपनीमध्ये ट्रान्सफर केले गेले. ईडीची चौकशी सुरु होताच नवलानींच्या कंपन्यांमध्ये १६ कोटी रुपये ट्रान्सफर झाले. ईडीच्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्यांचा नवालांनींसोबत काय संबंध आहे? आणि पैसे ट्रान्सफर का होत आहेत?,” असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.“मुंबई पोलिसात आज मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. देशातल्या या सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराची तपासणी आजपासून मुंबई पोलीस करणार आहेत. मुंबई पोलीस यासाठी सक्षम आहे. मार्क माय वर्ड. ईडीचे काही अधिकारी लवकरच तुरुंगात जाणार,” असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विधिमंडळाची संयुक्त समिती गठीत करणार – परिवहन मंत्री ॲड. अनिल परब

0

मुंबई, दि. 8 : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे-नाईक निंबाळकर यांनी दोन्ही सभागृहाची संयुक्त समिती नेमण्यात यावी अशी सूचना केली. या समितीमध्ये सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य, मंत्री, विरोधी पक्षनेते यांचा समावेश असावा. असेही त्यांनी सूचित केले. याबाबत येत्या आठवड्याभरात समिती गठीत करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य डॉ. परिणय फुके यांनी राज्य परिवहन मंडळाची बससेवा सुरु करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना परिवहन मंत्री ॲड. परब बोलत होते.

परिवहन मंत्री ॲड परब म्हणाले, एसटी कर्मचारी संपावर गेले असल्याने बससेवा विस्कळीत झाली असून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिकांचे हाल होत आहेत. कर्मचारी कामावर नसल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. हळुहळु कर्मचारी कामावर येत आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी एसटी सेवा प्राधान्याने विद्यार्थ्यांसाठी सुरु करीत आहोत.

शासनाने आपली भूमिका वारंवार जाहीर करुनही दिवाळीपूर्वी 19 युनियननी बेमुदत संपाची हाक दिली होती. त्याबाबत तात्काळ कृती समितीची बैठक घेवून शासनाच्या महागाई भत्त्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 12 टक्केवरुन 28 टक्के करुन तफावत दूर केली. तसेच दोन ते तीन टक्के पगारवाढ करण्यात आली. घरभाड्याचा विषय होता, तोही शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे जाहीर करण्यात आला. दिवाळीमध्ये नगारिकांचे हाल होऊ नये म्हणून न्यायालयात सकारात्मक बाजू मांडली. न्यायालयाने आदेश देवूनही कर्मचारी संपावर गेले. विलीनीकरणाबाबत त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली. या समितीला बारा आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. त्रिस्तरीय समितीने आपला अहवाल शासनास सादर केला असून एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करणे शक्य नाही असे स्पष्ट केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्यात आली. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत पगारवाढही देण्यात आली. कर्मचाऱ्यांना कामावर येण्याबाबत वारंवार आवाहन केले गेले. तरीही कर्मचारी कामावर रुजु झालेले नाहीत. यामुळे जनतेला त्रास होत असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर होणारी कारवाई चारवेळा मागे घेतली. कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. आम्ही चर्चा करुन प्रश्न सोडविण्यास तयार आहोत. याबाबत शासनाचे सहानभूतीपूर्ण धोरण आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, असे आवाहनही  परिवहन मंत्री ॲड. परब यांनी केले.

नवीन मराठी शाळेत महिला दिन साजरा

0

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत महिला दिनानिमित्त कोरोना काळात शाळा बंद असल्याने अभ्यासात मागे पडणार्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवी वृत्तीने शिकविणार्या माजी शिक्षिका आणि विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थिनींनी राष्ट्रमाता आणि सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांल प्रेरणादायी कामगिरी करणार्या महिलांच्या वेशभूषा करून त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला. आनंदी बोराटे या विद्यार्थिनीने महाराणी ताराबाईचे स्वगत सादर केले. तिसरीच्या विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेली भेटकार्ड आणि गजरे दिले.
शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे, डीईएसच्या प्रबंधक डॉ. सविता केळकर, माजी नगरसेविका ज्योत्स्ना सरदेशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली रुपाली सावंत, सोनाली मुंढे, अर्चना देव, योगिता भावकर, अंतीर शेठ, तनुजा तिकोने, श्रीपाद जोशी, धनंजय तळपे यांनी संयोजन केले.

अहिल्यादेवीत धाडसी समाजसेविकांचा सत्कार

0

पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त प्रसंगी जीव धोक्यात घालून समाज कार्य करणार्या क्रांत पवार, जया राऊत, अर्चना अभ्यंकर, पायल जिरेसाळ, कल्याणी वैराट, अमृता फासगे, नूतन साबळे या धाडसी महिलांचा सत्कार करण्यात आला. शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे, डीईएसच्या प्रबंधक डॉ. सविता केळकर, अड राजश्री ठकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मतदानाचा अधिकार, महत्त्व, मतदान करण्यासाठी लागणारी प्रगल्भता, वैचारिक बैठक, संवेदनशीलता याबाबत डॉ. साठे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. केळकर यांनी जिद्द, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आदींचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापिका अनघा डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती मिश्रा, दीपाली थोरात, चारुता प्रभुदेसाई, मानसी देशपांडे, स्मिता राजगुरू यांनी संयोजन केले.

आशयाप्रमाणे ध्वनी संयोजन हवे

0

‘पिफ २०२२‘मध्ये ध्वनी संयोजक राकेश रंजन यांचे मत

पुणे, दि. ७ मार्च – आशयाप्रमाणे ध्वनी संयोजन झाले पाहिजे. तुमच्याकडे तंत्र आणि साधने आहेत, म्हणून त्याचा स्वैर उपयोग करू नये, असे मत प्रसिद्ध ध्वनी संयोजक राकेश रंजन यांनी व्यक्त केले.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ २०२२) चित्रपटाचे ध्वनी संयोजन या विषयावर रंजन बोलत होते. चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, डॉन स्टुडिओचे संचालक हेमंत गुजराथी आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यावेळी उपस्थित होते.

राकेश रंजन म्हणाले, “स्क्रिप्ट लिहितानाच ध्वनीचा विचार व्हायला हवा. चित्रपटातील लेखन दृकश्राव्य माध्यमात रुपांतरीत करण्याचे काम तंत्रज्ञान करत असते आणि त्यात ध्वनी संयोजन महत्त्वाचे असते. ध्वनी संयोजन हा सर्जनशील भाग असतो. तो कथेला पुढे नेत असतो. त्यासाठी उत्कृष्ट तंत्रज्ञान वापरले पाहिजे आणि त्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी योग्य बजेटही ठेवले पाहिजे.”

प्रेक्षकांना जोडणारा तोच चांगला ध्वनी असतो. मोठा आवाज म्हणजे चांगला ध्वनी नव्हे, असे सांगून रंजन म्हणाले, की चित्रपट हे बनवा आणि फेकून द्या अशी गोष्ट नसल्याने त्यातील ध्वनीला महत्त्व आहे. ध्वनी संयोजन करताना संगीत, शांततेचा वापर महत्त्वाचा असतो. संगीत हे प्रेक्षकांच्या हृदयाला भिडते आणि शांतता परिणामकारक असते. आपल्या आजूबाजूला अनेक ध्वनी असतात पण ते सगळेच चित्रपटात येत नसतात. हे सगळे आले तर गोंधळ होईल त्यामुळे कथेच्या आशयाप्रमाणे ध्वनी संयोजन हवे. ध्वनी संयोजन करताना खूप सर्जनशीलपणे अभिनव प्रयोग केले पाहिजेत.

ध्वनी संयोजन क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांशी बोलताना रंजन म्हणाले की गुणवत्तेला पर्याय नसतो, हे लक्षात ठेऊन ध्वनी संयोजन केले पाहिजे.

ऍनॅलॉग ते डिजिटल हा आपला प्रवास सांगून राकेश रंजन यांनी आपल्या ध्वनी संयोजन केलेल्या चित्रपटांच्या ध्वनी-चित्रफिती दाखवल्या आणि सत्यजित रे आणि अनेक दिग्दर्शकांच्या सांगितल्या.

घराघरातल्या माता-भगिनी-कन्यांना,मान, सन्मान, सुरक्षितता देत आत्ननिर्भर करुया..

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 7 :- महाराष्ट्राच्या भूमीला राजमाता जिजाऊं माँसाहेबांच्या राष्ट्रवादाचा, महाराणी ताराराणींच्या शौर्याचा, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या सत्यशोधक विचारांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या देदिप्यमान कर्तृत्वाचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या स्त्रीशक्तीचा गौरवशाली वारसा पुढं नेण्याचं काम राज्यातल्या माता, भगिनी, कन्यांनी समर्थपणे केलं आहे. शेती, शिक्षण, उद्योग, व्यापार, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, संरक्षण अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्रकन्या आज आपलं कर्तृत्वं सिद्ध करत आहेत. महाराष्ट्राच्या घराघरातल्या या महाराष्ट्रकन्यांना मान, सन्मान, सुरक्षित वातावरण देत आत्मनिर्भर करुया. स्त्री-पुरुष समानतेतून उद्याचं शाश्वत भविष्य घडवूया, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील स्त्रीशक्तीचा गौरव करुन राज्यातील जनतेला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जागतिक महिला दिनानिमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील माता-भगिनींना, स्त्रीशक्तीला वंदन केलं असून समाजनिर्मितीतील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्रानं सुरुवातीपासूनंच स्त्रीशक्तीचं महत्वं ओळखून त्यांना संधी देण्याचं काम केलं. राज्यातील स्त्रीशक्तीनंही संधींचं सोनं करत बलशाली महाराष्ट्र घडवण्यात योगदान दिलं. राजमाता जिजाऊं माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून रयतेचं राज्य, स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली. क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी महिलांची पहिली शाळा सुरु करुन महिलांना स्त्रीशिक्षणाची दारं खुली करुन दिली. महाराणी ताराबाईंनी आपल्या शौर्यानं इतिहास घडवला, त्या इतिहासानं अनेकांना प्रेरणा दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, अलिकडच्या काळात भारतरत्न लतादीदी त्यांच्या स्वरसामर्थ्यामुळे स्वरसम्राज्ञी ठरल्या. लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी भारतीय लष्कराचं नेतृत्वं केलं. तत्कालिन संरक्षणमंत्री शरद पवार साहेबांनी महिलांसाठी सैन्यदलांची दारं खुली केल्यानं आज अनेक महिला देशाच्या संरक्षणाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. महाराष्ट्रानंही वेळोवेळी महिला धोरण लागू करुन राज्यातील महिला शक्तीला विकासाची संधी दिली. नोकरीत, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण दिल्यानं अनेक माता-भगिनी राजकारण, समाजकारणात आता सक्रीय झाल्या आहेत. उद्योगजगतात जबाबदारीच्या पदावर काम करत आहेत. निर्णयप्रक्रियेत त्यांचं योगदान महत्वाचं ठरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौऱ्यात माझ्या शासकीय गाडीचं सारथ्यं स्थानिक पोलिस दलातील तृप्तीताई मुळीक या पोलिस भगिनीनं केलं होतं. राज्याच्या घराघरातली, गावखेड्यातली स्त्रीशक्ती ही महाराष्ट्राची मोठी ताकद आहे. या स्त्रीशक्तीला अधिक सक्षम, समर्थ, स्वावलंबी करुन बलशाली महाराष्ट्र घडवूया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक महिला दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात केलं आहे.

सायली आगवणे, वनिता बोराडे, कमल कुंभार यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

0

मुंबई, दि. 7 :- केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाचा राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार’ महाराष्ट्रातील दिव्यांग कथ्थक नृत्यांगना सायली नंदकिशोर आगवणे, महिला सर्पमित्र वनिता जोगदेव बोराडे आणि उद्योजिका कमल कुंभार यांना जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी असलेला आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिला जाणारा मानाचा पुरस्कार तीन महाराष्ट्रकन्यांना मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला आहे. राजमाता जिजाऊँ, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या लेकी महाराष्ट्राच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा पुढे नेत आहेत, हे या पुरस्कारातून पुन्हा सिद्ध झालं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्कार विजेत्यांचं कौतुक केलं आहे.

युक्रेन येथून जिल्ह्यातील १०२ विद्यार्थी सुखरूप परतले

0


जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

पुणे दि.७- युक्रेन देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने भारतातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या १०२ विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यात शासन व प्रशासनाला यश आले आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात युक्रेन येथील विद्यार्थिनी शाकंभरी लोंढेपाटील हिला पुष्पगुच्छ देऊन तिच्या धाडसाबद्दल अभिनंदन केले आणि तेथील परिस्थितीची माहिती घेतली.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी शाकंभरीच्या धाडसाचे कौतुक केले. तिने प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता धैर्याने परिस्थितीला तोंड दिले. तिने अशा परिस्थितीतही इतरही देशाच्या विद्यार्थ्यांना केलेली मदत स्तुत्य आहे, असे ते म्हणाले. शांकभरीने युक्रेनमधील परिस्थितीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. प्रतिकूल परिस्थितीत मुलीने दाखविलेल्या धाडसाबद्दल तिचे कौतुक करीत शाकंभरीचे वडील शाम लोंढेपाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.

युक्रेनमधील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र व राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनामार्फत पालक आणि नातेवाईंकांना माहिती देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला. जिल्हा नियंत्रण कक्षात पालकांकडून विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त झाल्यावर राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला या विद्यार्थ्यांची माहिती देण्यात आली.

नियंत्रण कक्षातर्फे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे व त्यांचे सहकारी सातत्याने विद्यार्थ्यांच्या संपर्कात होते. विद्यार्थी असलेल्या ठिकाणाबाबत माहिती घेऊन दररोज सायंकाळी मंत्रालयातील कक्षाला त्याविषयी कळविण्यात येत होते. राज्य शासनातर्फे केंद्र सरकारच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती देण्यता येत होती. ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत या विद्यार्थ्यांना विमानाने भारतात आणले गेले व राज्य शासनाने त्यांना महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था केली.

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रशासनातर्फे अभिनंदन
युक्रेनमध्ये असलेल्या १०९ विद्यार्थ्यांपैकी १०२ विद्यार्थी पुण्यात परतले असून ३ विद्यार्थी पोलंड येथे व १ विद्यार्थी ओमान या देशातील त्यांच्या पालकांकडे सुखरूप पोहोचले आहेत. इतर ३ विद्यार्थी प्रवासात असून लवकरच ते पुण्याला परततील. जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांच्या सुचनेनुसार उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी जिल्ह्यात परतलेल्या विद्यार्थ्यांची घरी जाऊन भेट घेतली व ते सुखरुप परत आल्याबद्दल अभिनंदन केले. शासन आणि प्रशासनातर्फे वेळोवेळी संपर्क करून माहिती घेण्यात येत असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी खूप धीर दिला-शाकंभरी लोंढेपाटील
मी युक्रेनच्या दक्षिण भागात रहात होते. २४ फेब्रुवारी नंतर तीन दिवस बंकरमध्ये काढले. जवळचे खाद्य संपल्याने केवळ नळाच्या पाण्यावर रहावे लागले. त्यानंतर भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि विशेष करून जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांची खूप मदत झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे खूप धीर दिला. या सर्वांचे मी आभार व्यक्त करते.

महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला अंतिम मंजुरी -यंदाच्या वर्षासाठी १०० प्रवेश देण्याची परवानगी

0

पुणे (प्रतिनिधी):-महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठीची अंतिम मंजुरी एनएमसीकडून प्राप्त झाली असून महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. एनएमसीच्या मंजुरीनंतर यंदाच्या वर्षासाठी १०० प्रवेश देण्याची परवानगी देण्यात आली आहे. या परवानगीसह स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय असणारी महापालिका म्हणून पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हि माहिती दिली .

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरीसाठी नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय आणि आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची नवी दिल्लीतील आरोग्य मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली होती. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ही भेट झाली. या भेटीत सकारात्मक चर्चाही झाली होती. वैद्यकीय महाविद्यालयाने आजवर मंजुरीसंदर्भातील सर्व टप्पे पार केले असून आता प्रत्यक्ष परवानगी मिळाल्याने प्रवेश प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरी मिळणे हा क्षण पुणे शहरासाठी जितका महत्वाचा आहे, तितकाच तो अभिमानाचाही. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकल्पनेपासून तर थेट अंतिम मंजुरीमिळेपर्यंतच्या विविध टप्प्यांमध्ये भूमिका निभावता आली, याचे मनस्वी समाधान आहे. आपल्या पाठपुराव्याला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मोलाची साथ मिळाल्याने अंतिम मंजूरीपर्यंतचा प्रवास पूर्ण झाला. त्याबद्दल तिघांचेही समस्त पुणेकरांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद’.

असा झाला वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रवास…

■ २८ ऑगस्ट, २०१९ : मुख्यसभेत ठराव मंजूर
■ २६ मे, २०२० : वैद्यकीय ट्रस्ट स्थापन करण्यास राज्य सरकारची मंजुरी
■ १३ ऑगस्ट, २०२० : वैद्यकीय ट्रस्टची नोंदणी
■ २८ नोव्हेंबर, २०२० : MUHS कडून Affiliations Consent प्राप्त
■ ७ मार्च, २०२२ : अंतिम मंजुरी