Home Blog Page 2057

देवेंद्र फडणवीस यांना करारा जवाब मिलेगा – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

0

मुंबई -माझे उत्तर तयार आहे. पण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्या उत्तर द्या, अशी विनंती मला केली आहे. त्यामुळे मी उद्या सभागृहात उत्तर देईन. असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर वेगवेगेळे आरोप केले होते. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील नेते फडणवीस यांनी प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

महाविकास आघाडी सरकारकडून गिरीष महाजन यांनी फसवण्याचा कट सुरू असल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. वळसे पाटील म्हणाले की, “माझे उत्तर तयार आहे. पण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्या उत्तर द्या, अशी विनंती मला केली आहे. त्यामुळे मी उद्या सभागृहात उत्तर देईन. “दूध का दूध, पानी का पानी होईल. करारा जवाब मिलेगा.” असे पाटील यांनी ठणकावून सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर आज विधानसभेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उत्तर देणार होते. मंगळवारी सभागृहात फडणवीसांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी तयार होतो. मात्र फडणवीस यांनी यावर उद्या (गुरुवारी) बोला अशी मागणी केली. त्यामुळे मी उद्या उत्तर देऊन दूध का दूध अन् पानी का पानी करणार असल्याचे म्हटले आहे. पुढे पाटील म्हणाले की, फडणवीसांनी खरेतर कायदा सुवस्था यावर बोलायचे होते. पण ते त्यांच्या कर्तव्यापासून दूर गेले आहेत. अशी टीका देखील यावेळी वळसे पाटील यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह एसीपी सुष्मा चव्हाण आणि मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे उपस्थित होते. सुष्मा चव्हाण यांनी सर्व कागदपत्रे गृहमंत्र्यांकडे दिल्याची माहिती आहे.

विधानसभेत काय म्हणाले होते फडणवीस

माझ्यासह गिरिश महाजन यांना संपवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. आमच्याविरुद्ध खोटे पुरावे तयार करीत असेल तर लोकशाही आहे का? आम्हाला संपविण्याच्या कारस्थानाचे पुरावे माझ्याकडे आहेत. माझ्यासह गिरीश महाजनांविरोधात कसा कट शिजला याचे कारागृहात व बाहेर असलेल्या लोकांचे सव्वाशे तासांचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. एवढे पुरावे आहेत की त्यातून 25 वेबसिरीज तयार होतील असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

आमदार गिरीष महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारने कट रचला. त्यात शरद पवारसह अनेक मंत्री सहभागी असल्याचा आरोप देखील त्यांनी सभागृहात केला. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप देखील फडणवीसांनी सभागृहात सादर केली. विधीमंडळाच्या सायंकालीन सत्रात त्यांनी सडेतोड, तडाखेबंद भाषण त्यांनी केले. फडणवीस गौप्यस्फोट करत असताना सभागृहात मोठी शांतता पसरली होती. फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांना पुराव्यांचा पेनड्राईव्हच दिला. त्यानंतर सभागृहात निवेदन करताना त्यांनी पोलखोल केली.

ते म्हणाले, गिरीश महाजनांवर मोक्का लागावा यासाठी राज्य सरकारने सरकारी वकिलांना हाताशी धरुन खटाटोप केला. त्यात पोलिसांचाही सहभाग आहे. हे सर्व कुंभांड रचण्यात आले. एफआयआर सरकारी वकिलाने लिहिला. जबान्या त्यांनी पाठ केल्या. हे सर्व सरकारी वकील स्वःत तोंडाने सांगतात.

महाविकास आघाडीच्या सुनिल गायकवाड, रविंद्र शिंदेने नाथाभाऊंशी बोलणे झाले की, गिरीश महाजनांना फसवायचे. अजित पवार सहकार्य करीत नाही. पण मोठे साहेब सर्व पाहताहेत अशा संवादाचे व्हिडीओतील कागदावर लिहिलेले संवाद फडणवीसांनी सभागृहात वाचून दाखविले. अ‍ॅड. प्रवीण चव्हाण कट कसा रचत आहेत याचा पाढाच त्यांनी वाचला. सुट बुक केला. व्हेज – नाँन व्हेज जेवण करायचे का, मदत लागली तर खडसे साहेबांची घ्या असे काही संवादही त्यांनी वाचून दाखविले. हे षंडयंत्र सरकारातील काही व्यक्तींनी आमच्या विरोधात रचले असा आरोपही त्यांनी केला. सरकारी वकिल अ‍ॅड. प्रवीण चव्हाण विरोधात पुरावे आहेत. गिरिश महाजनांनरील बोगस केसचे पुरावे माझ्याकडे आहेत असेही ते म्हणाले.

महावितरणमधील सक्षम महिलाशक्ती अभिमानास्पद-प्रादेशिक संचालक अंकुश नाळे

0

पुणेदि. ०९ मार्च २०२२: कौटुंबिक जबाबदाऱ्यांसह विद्युत क्षेत्रातील आव्हानात्मक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणाऱ्या व कंपनीला प्रगतिपथवर नेणाऱ्या सक्षम महिला अधिकारी, अभियंता व कर्मचारी महावितरणसाठी अभिमानास्पद आहेत असे गौरवोद्गार महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी मंगळवारी (दि.८) काढले.

येथील ‘प्रकाशभवन’मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता सौ. पुनम रोकडे, श्री. सतीश राजदीप, उपमहाव्यवस्थापक श्री. अजय खोडके (आयटी) व श्री. अभय चौधरी (मानव संसाधन) उपस्थित होते. प्रादेशिक संचालक श्री. नाळे म्हणाले की, भारतात प्रथमच विद्युत क्षेत्रात महावितरणमध्ये महिला तंत्रज्ञांची (लाईनवूमन) भरती करण्यात आली. हा निर्णय अतिशय योग्य व सार्थ असल्याचा प्रत्यय महावितरणच्या महिला तंत्रज्ञांनी केलेल्या कामगिरीमुळे आला आहे. त्यांच्यासह महिला अभियंता व अधिकारी देखील महावितरणमधील विविध पदांच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पूर्ण करीत आहेत. महावितरणची ही सक्षम महिलाशक्तीची वाटचाल अभिमानास्पद आहे असे श्री. नाळे यांनी सांगितले.

यावेळी अधीक्षक अभियंता सौ. पुनम रोकडे व श्री. सतीश राजदीप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला सहायक महाव्यवस्थापक सौ. दिप्ती आंबेकर, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर, कार्यकारी अभियंता श्री. संजीव राठोड, तसेच महिला अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. सुत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी यांनी केले व आभार मानले.

महावितरणचे आजपासून तालुकास्तरावर वीजबिल दुरुस्ती शिबिराचे आयोजन

0

मुंबई, दि. ९ मार्च २०२२:- कृषी वर्गवारीतील ग्राहकांच्या वीजबिलांबाबत असणाऱ्या शंका आणि तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणतर्फ़े उद्या दि. १० मार्चपासून राज्यातील प्रत्येक तालुक्यात वीजबिल दुरुस्ती शिबिराचेआयोजन करण्यात येत आहे.

दि.१० मार्च ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कृषी ग्राहकांच्या देयक दुरुस्ती संदर्भात शिबिरे आयोजित करण्यात येणार असून या शिबिरांमध्ये ग्राहकांचा मंजूर वीजभार, मिटर वाचन, थकबाकी या स्वरुपाच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येईल.  कृषी ग्राहकांच्या वीज देयक दुरुस्ती व मंजूरीचे प्रस्ताव महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे मंजूर करुन देयक दुरुस्तीनंतरची सुधारित थकबाकीची रक्कम ग्राहकाला तात्काळ कळविण्यात येणार आहे.

महावितरणच्या एकूण थकबाकीपैकी सप्टेंबर २०२० अखेर कृषी ग्राहकांकडे रु. ४५,८०२ कोटी थकबाकी झालेली आहे. त्यामुळे कृषी ग्राहकांच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व समावेश “कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२०” जाहीर केले होते. या धोरणा अंतर्गत निर्लेखनाद्वारे रु. १०,४२० कोटी सूट, व्याज व विलंब आकारामध्ये रु. ४,६७६ कोटी सूट दिल्यानंतर सुधारीत थकबाकी रु. ३०,७०६ कोटी निर्धारित करण्यात आली आहे. त्यापैकी फक्त रु.२,३७८ कोटी रक्कमेचा भरणा कृषी ग्राहकांद्वारे करण्यात आलेला आहे. सप्टेंबर २०२० पासून चालू वीज देयकाच्या थकबाकीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होऊन आज रोजी एकूण थकबाकी रु. ३९,९९३ कोटी झाली आहे.

यामध्ये चुकीच्या कृषी देयकांचा मुद्दा वारंवार लोकप्रतिनिधी, ग्राहक प्रतिनिधी व प्रसारमाध्यमातून उपस्थित केला जातो. याबाबत महावितरणतर्फ़े कृषी ग्राहकांच्या देयकांची पडताळणी व दुरुस्ती करण्याबाबत तालुकानिहाय शिबिरे आयोजित करण्यात येत आहे. या शिबिराचा लाभ घेत कृषी ग्राहकांनी आपली वीजबिले तात्काळ दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा – २०१९ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर – अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांची माहिती

0

मुंबई : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०१९ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक  परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर १६ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०१९ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या परीक्षेची जाहीर केलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची आहे, उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्र/कागदपत्रे यांची पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो, असेही अध्यक्ष श्री. निंबाळकर यांनी सांगितले. त्याशिवाय ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०१९  अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference/Opting Out हा दुवा (वेबलिंक) उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही वेबलिंक उद्या, ९ मार्च, दुपारी ३ वाजेपासून १६ मार्च रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. ऑनलाईन पध्दतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राहय धरला जाणार नाही. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) विकल्पाआधारे अंतिम निकाल / शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल असे सांगून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणा-या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही, असेही श्री. निंबाळकर यांनी सांगितले.

सदर्न स्टार एडब्ल्यूडब्ल्यूए तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

0

पुणे-सदर्न  स्टार एडब्ल्यूडब्ल्यूए तर्फे पुण्यात “इंद्रधनुष आसमान की ओर ” या शीर्षकाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. एसजीएस मॉल इथे 5 आणि 6 मार्च 2022 रोजी चित्रकला आणि हस्तकला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर 8 मार्च 2022 रोजी पुण्याच्या कॅम्प परिसरात मैत्री कॉम्प्लेक्स येथे एडब्ल्यूडब्ल्यूए संघटनेच्या 20 हून अधिक नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारे  एक प्रदर्शन भरवण्यात आले होते. याशिवाय, सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत (SSY),1 डिसेंबर 2021 ते 31 जानेवारी 2022 दरम्यान जन्मलेल्या  मुलींना आधार कार्ड देऊन आणि सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत योग्य प्रारंभिक रक्कम भरून त्यांचे खाते उघडून  त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर्न स्टार एडब्ल्यूडब्ल्यूएच्या सर्व फॉर्मेशनद्वारे अशाच प्रकारे आजचा दिवस साजरा केला जात आहे.

नारीशक्ती पुरस्कार विजेत्यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

0

नवी दिल्ली, ०८ :  कथक नृत्यांगना सायली अगावणे, सर्प मित्र वनिता बोराडे आणि उद्योजिका कमल कुंभार या  राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्कार  विजेत्यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला  सदिच्छा भेट दिली. पुरस्कार ही कामाची  पावती  मानून आपापल्या क्षेत्रात समाजासाठी  उत्तमोत्तम कार्य करण्याचा मनोदय या तिन्ही पुरस्कार  विजेत्यांनी  यावेळी  व्यक्त केला.

सायली अगावणे यांना दिव्यांग मुलांसाठी नृत्य शाळा सुरु करायची आहे. वनिता बोराडे यांना पर्यावरण रक्षणासाठी सापांचे रक्षण व्हावे म्हणून आपल्या संस्थेच्या माध्यमातून जनजागृतीपर विविध उपक्रम राबवायचे आहेत, तर  कमल कुंभार यांना वर्षाकाठी ९ हजार महिलांना शेतीपूरक प्रशिक्षण दयायचे आहे. असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

राष्ट्रपती  रामनाथ  कोविंद  यांच्या  हस्ते  या तिघींना मानाच्या नारीशक्ती  पुरस्काराने  गौरविण्यात आले, या पार्श्वभूमीवर त्यांना महाराष्ट्र परिचय केंद्रात आमंत्रित करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी या तिन्ही पुरस्कार विजेत्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. माहिती अधिकारी अंजु निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह पुरस्कार विजेत्यांचे  कुटुंबिय यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी झालेल्या अनौपचारिक चर्चेत पुरस्कार विजेत्यांनी आपल्या कार्याविषयी माहिती दिली.

पुणे  येथील सायली अगावणे डाऊनसिंड्रोमग्रस्त असून त्यांनी अपंगत्वावर मात करत कथक  नृत्यांगना म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वयाच्या ९ व्या वर्षापासूनच कथकचे धडे गिरवायला सुरुवात केली. या नृत्यात पारंगत होत त्यांनी राज्यासह दिल्ली, कटक तसेच परदेशात कोलंबो, बँकॉक, सिंगापूर आणि लंडन येथे नृत्य सादर केले आहे. कथक सोबतच वेस्टर्न डान्सचेही वेगवेगळे प्रकार सायलीने आत्मसात केले आहेत.१२ नृत्यप्रकार आत्मसात करून प्रत्येक नृत्याचे २० असे एकूण २४० स्टेज प्रोग्राम त्यांनी सादर केले आहेत. कोरोना काळातही योगा, कथकसह १२ नृत्यांचा सराव आणि स्केटिंग व पेंटिंग या आवडी जपल्याचेही सायलीने सांगितले. स्केटींग डान्सर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सायलीला आपल्या  सारख्या  दिव्यांग मुलांसाठी नृत्य शाळाही  सुरु करायची आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील बोथा येथील वनिता बोराडे यांना वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आल. डोंगराळ भागात वास्तव्य असल्याने आजुबाजूला वन्यजीवांचा सतत वावर असायचा. यातूनच पुढे साप पकडण्याचा छंद जडला. माहेरी या छंदाला काही जुन्या रुढी व समजामुळे विरोध झाला. मात्र, लग्नानंतर पतीने प्रोत्साहन दिले व पुढे पहिल्या सर्पमित्र म्हणून आपल्या नावाची नोंद झाल्याचे वनिता बोराडे सांगतात. गेल्या ३० वर्षांपासून ५१ हजार सापांना पकडून वनविभागाच्या माध्यमातून सुरक्षित जंगलामध्ये सोडल्याचे सांगतांना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान जाणवले. गैरसमजामुळे सापांना मारण्याचा प्रघात पाहून याविषयी समाजप्रबोधन करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. श्रीमती बोराडे यांच्या सर्प संरक्षण कार्याची दखल घेत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद घेण्यात आली आहे. विविध पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आले असून येत्या काळात ‘सोयरे वनचरे’ या आपल्या संस्थेच्या माध्यमातून सर्प रक्षणासह पर्यावरण रक्षणासाठी जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्याचा मनोदयही त्यांनी यावेळी  व्यक्त केला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील हिंगळजवाडी येथील कमल कुंभार या उद्योजिका असून  पशुपालन क्षेत्रात महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. गेल्या २३ वर्षांपासून महिला बचतगट, बांगड्या विकण्याचा व्यवसाय,आशा कार्यकर्ता, ऊर्जासखी असा प्रवास करत कमल कुंभार यांनी उद्योजिका म्हणून आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उद्योजक म्हणून येणाऱ्या अडचणी व त्यावर यशस्वीपणे मात करण्याच्या त्यांच्या अनुभवाच्या जोरावर आज त्या हजारो महिलांना प्रशिक्षण देत आहेत. सध्या त्या शेळी पालन, कुक्कुट पालन, गांडूळखत, घोडेपालन, सेंद्रीय पालेभाज्या हे व्यवसाय सांभाळतात. त्यांनी आतापर्यंत २० हजार महिलांना शेतीपूरक व्यवसाय  प्रशिक्षण दिले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे कोरोना काळातही  गेल्या दोन वर्षात त्यांनी ५ हजार महिलांना प्रशिक्षण दिले असून यातील ३ हजार महिलांनी स्वत:चे शेतीपूरक व्यवसाय थाटले आहेत. येत्याकाळात वर्षाकाठी ९ हजार  महिलांना शेतीपूरक प्रशिक्षण देण्याचा त्यांचा मानस आहे.

या तिन्ही  पुरस्कार विजेत्यांना  माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्यावतीने प्रकाशित ‘महामुंबईचा विकास’ ही पुस्तिकाही  भेट स्वरुपात देण्यात आली. सायली अगावणे यांनी यावेळी कार्यालयाच्या ग्रंथालयासाठी  आई मनिषा अगावणे लिखित ‘अमेझींग चाईल्ड सायली’( एक सत्य कथा) हे पुस्तक  भेट दिले. सायलीची  बहीण  जुईली यावेळी उपस्थित होती. वनिता बोराडे आणि त्यांचे पती डी भास्कर यांनी यावेळी ‘सोयरे वनचरे’ या संस्थेची दिनदर्शिका भेट स्वरूपात दिली.

साहिर यांच्या रचनांची रसिकांना मेजवानी

0

पिफअंतर्गत ओम भूतकर आणि समुहाचे बहारदार सादरीकरण

पुणे, ८ मार्च, २०२२
यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची थीम गीतकार साहीर लुधियानवी, सत्यजित रे आणि पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर आधारित असून विविध उपक्रमांचे या अंतर्गत आयोजन करण्यात आले आहे. अशाच साहिर लुधियानवी यांच्या गीतांवर आधारित ‘साहिर’ या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घेतला. ओम भूतकर दिग्दर्शित या कार्यक्रमात साहिर लुधियानवी यांच्या रचना सादर केल्या. रविवारी राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (एनएफएआय) येथे झालेल्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. यावेळी पिफचे संचालक डॉ. जब्बार पटेल, पीफ आयोजन समितीचे सतीश आळेकर उपस्थित होते.

‘जाने वो कैसे लोग थे जिनके’ या गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. नचिकेत देवस्थळी यांनी हे गीत सादर केले. त्यानंतर मुक्ता जोशी यांनी ‘कभी खूद पे तो कभी हालात पे रोना आया’ हे गीत सादर केले. यानंतर नचिकेत देवस्थळी यांनी ‘जश्ने गालिब’ ही गजल सादर केली. यानंतर ओम भूतकर यांनी ‘ताजमहाल’ ही कविता सादर केली. ‘ये महलो ये तख्तो ये ताजो की दुनिया’ ही रचना जयदीप वैद्य यांनी गायली. ‘न तो कारवाँ की तलाश है’ ही कविता सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली. सलग एक तासाच्या या कार्यक्रमात साहिर लुधियानवी यांची गीते, कविता आणि नज्म सादर करण्यात आल्या. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

अभिनेता ओम भूतकर, अभिनेता नचिकेत देवस्थळी यांच्यासह गायिका मुक्ता जोशी, गायक जयदीप वैद्य, गायक अभिजीत ढेरे यांनी यावेळी रचना सादर केल्या. तसेच देवेंद्र भोमे (संवादिनी), केतन पवार (तबला), मंदार बगाडे (ढोलकी) यांनी साथसंगत केली. कार्यक्रम व्यवस्थापन कुशल खोत यांचे होते.

न्यायदान क्षेत्रातील महिला वकिलांचा काँग्रेस भवन येथे सन्मान

0

पुणे-

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी लिगल सेलच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे ‘‘जागतिक महिला दिना’’ निमित्त महिला वकिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘महिलांनी सर्व क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी दाखविलेली आहे. वकिलीमध्ये सुध्दा अनेक नामवंत महिला वकिलांनी युक्तीवाद करून आपल्या पक्षकारांना न्याय मिळवून दिला आहे. तसेच अनेक महिला वकिलांनी न्याय क्षेत्रात खूप मोठे काम केलेले आहे.’’यानंतर पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पुजा आनंद म्हणाल्या की, ‘‘महिला सक्षमीकरणासाठी जास्तीत जास्त महिला वकीलांनी न्याय मिळवून देण्याचे काम करणे गरजेचे आहे.’’कार्यक्रमाचे संयोजन ॲड. अश्विनी गवारे, ॲड. पुजा भोसले यांनी केले. या प्रसंगी उपस्थित सर्व महिला ॲड. विशाखा गाडेकर, ॲड. संघमित्रा गायकवाड, ॲड. सुवर्णा आढाव, ॲड. रेश्मा शिकलकर, ॲड. रेश्मा जगताप, ॲड. अनुपमा गायकवाड इत्यादी महिला वकिलांचा प्रमुखांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.पुणे जिल्हा लिगल सेल उपाध्यक्ष ॲड. श्रीनिवास खुंटे, पुणे शहर जिल्हा लिगल सेल प्रभारी ॲड. राहुल ढाले, महाराष्ट्र प्रदेश लिगल सेल वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. अनिल कांकरिया यावेळी उपस्थित होते.

स्त्री-पुरुष भेदभावरहित सामाजिक संरचना येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक-कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी

0

  पुणे, दि. 8: स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता योग्य समन्वय राखल्यास चांगला समाज घडण्यास मदत होईल तसेच अशा प्रकारची भेदभावरहित सामाजिक संरचना येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक व अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘महिला लैंगिक अत्याचार कायदा व लैंगिक संवेदना’या विषयावर कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक व अपर पोलीस महासंचालक कार्यालयात कार्यशाळा आयोजित केली होती, या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ, संशोधन अधिकारी डॉ.हेमंतकुमार पवार, उपअधीक्षक प्रदीप जगताप, राजाराम भोसले, कारागृह अधिकारी शिवाजी पाटील, महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्या डॉ. अजंली देशपांडे, बँक ऑफ महाराष्ट्राच्या वरिष्ठ अधिकारी अश्विनी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

स्त्री जन्माचे स्वागत करण्याची मानसिकता समाजात रुजत असल्याची बाब स्वागतार्ह आहे असे सांगून श्री. कुलकर्णी म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात स्त्री- पुरुष भेदभाव होणार नाही असा समाज आपल्याला घडवायचा आहे. त्यातूनच पुढील पिढीवर महिलांप्रती आदर राखण्याचे संस्कार घडतील.

डॉ. देशपांडे म्हणाल्या, पोलीसांची ‘मदतनीस’ म्हणून भूमिका असावी यासाठी विशाखा समिती स्थापना करण्यात आलेली आहे. महिलांवर अत्याचार झाल्यास स्वतः महिला तसेच इतर कोणतीही व्यक्तीला तक्रार दाखल करता येते. अन्यायाविरोधात धैर्याने आवाज उठवल्यास भविष्यात अशा घटनांना आळा बसू शकेल.

त्या पुढे म्हणाल्या, महिलांकडे सृजनांची शक्ती आहे. समाज निर्मितीतील महत्वपूर्ण सहभागामुळे तिला महत्वाचे स्थान देणे गरजेचे आहे. स्त्री आणि पुरुष समसमान व परस्परपूरक असून भेदभाव न करता तिच्या क्षमतेचा उपयोग करुन घेतला पाहिजे. कोणताही निर्णय घेतांना महिलांचे मत विचारत घेतले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या, समाजात काम करताना महिला म्हणून नव्हे तर समाजाचा घटक म्हणून स्त्री-पुरुष समानतेबाबत मत व्यक्त करावे. कारागृह विभागात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या अंगी दक्षता, चातुर्य, हजरजबाबीपणा, कार्यतत्परता इत्यादी गुण असणे आवश्यक आहे.

यावेळी महानिरीक्षक श्री. कुलकर्णी यांच्या हस्ते कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तुळशीचे रोपटे देवून स्वागत केले. महिला दिनाचे औचित्य साधत आजपासून नियत्रंण कक्षाची जबाबदारी कांचन शेलार व दिक्षीता चिलप यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची लोककला पथकाद्वारे आजपासून जनजागृती मोहिम

0

पुणे, दि. ८: राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचवून योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीकोनातून लोककला पथकाद्वारे जिल्ह्यातील गावांमध्ये उद्या ९ मार्च पासून जनजागृती मोहिमेस सुरुवात करण्यात येत आहे. तीन लोककला पथकाद्वारे राबवण्यात येणारी ही मोहिम १७ मार्च पर्यंत सुरु राहणार आहे.मावळ तालुक्यात कामशेत, तळेगाव दाभाडे, लोणावळा, कार्ले व वडगाव मावळ, खेड तालुक्यात राजगुरुनगर, शेल पिंपळगाव, चाकण, भोसे व आळंदी, आंबेगाव तालुक्यात खडकी, वडगाव काशिंबेग, निरगुडसर, घोडेगाव, मंचर, अवसरी, डिंभे आणि जुन्नर तालुक्यात नारायणगाव, ओझर, जुन्नर व शिरोली येथे कलाछंद कलापथक कार्यक्रम करणार आहे.

बारामती तालुक्यात बारामती, मोरगाव, सुपे, माळेगाव, सोमेश्वर, वाणेवाडी, काटेवाडी, इंदापूर तालुक्यात सणसर, वालचंदनगर, कळंब, निमगाव केतकी, इंदापूर, लोणी, दौंड तालुक्यात कुरकुंभ, दौंड, पाटस, वरवंड, वाळकी तर शिरुर तालुक्यात शिरुर, रांजणगाव गणपती, शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे येथे प्रसन्न प्रोडक्शन कलापथक कार्यक्रम करणार आहे.

मुळशी तालुक्यात पिरंगुट, लवळे, पौड, कुळे, चाले, वेल्हा तालुक्यात वेल्हा, पाबे, दापोडे, हवेली तालुक्यात डोणजे, गोरे, खाणापूर, किरकटवाडी, धायरी गाव, भोर तालुक्यात भोर, नसरापूर, आळंदे, कापुरहोळ आणि पुरंदर तालुक्यात सासवड, जेजुरी आणि हिवरे, भिवरे येथे जय मल्हार कलामंच कलापथक कार्यक्रम करणार आहे.

वाहन मालकांना ई-चलन नोटीसा बजावण्यात आलेली ११ लाख प्रकरणे….12 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीत …

0

पुणे, दि. 8 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशाने येत्या शनिवार १२ मार्च रोजी पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ‘राष्ट्रीय लोकअदालतीचे’ आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयात दाखल तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली होण्यासाठी या राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत यांनी केले आहे.

या लोकन्यायालयामध्ये जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली विविध प्रकारची ४५ हजार पेक्षा जास्त प्रकरणे सामंजस्याने तडजोडीने निकाली काढण्याकरीता ठेवण्यात आलेली आहेत. त्यामध्ये तडजोडयोग्य फौजदारी, निगोशिएबल इन्ट्रुा मेंट अॅक्ट कलम 138, दिवाणी, मोटार अपघात नुकसान भरपाई, कामगार वाद, वीज, पाणी देयकांबाबतची प्रकरणे, वैवाहिक वाद, भूसंपादन विषयक, नोकरीबाबतची प्रकरणे, महसूल प्रकरणे तसेच इतर दिवाणी प्रकरणे घेण्यात आलेली आहे.

त्याचप्रमाणे विविध बँका, वित्तीय संस्था तसेच दूरध्वनी विभाग, विद्युत विभाग आणि पुणे व पिंपरी महापालिका, पुणे जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायती यांच्याकडील प्रलंबित पाणीपट्टी, घरपट्टी देयके अशी सुमारे १ लाख ७५ हजारापेक्षा जास्त दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्याकरीता ठेवण्यात आलेली आहेत.

जिल्ह्यातील वाहतूक पोलीस विभागाकडील विविध नागरिकांवर मोटार वाहन अधिनियमांतर्गत प्रलंबित असलेली परंतु अद्याप न्यायालयामध्ये दाखल न झालेली अशी एकुण ११ लाख प्रकरणे निकाली करण्याकरीता ठेवण्यात आलेली असून यातील सर्व वाहन मालकांना ई-चलन नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत.

१२ मार्च रोजी पुणे जिल्हयातील सर्व न्यायालयांमध्ये आयोजित केलेल्या लोकअदालतीमध्ये जलद व मोफत न्याय हवा आहे आणि आपला वाद सामोपचाराने मिटविण्याची इच्छा आहे अशा पक्षकारांनी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाकडे अथवा संबंधित तालुका विधी सेवा समितीकडे त्वरीत संपर्क साधावा. जिल्हा कार्यालयाचा मोबाईल क्रमांक ८५९१९०३६१२ असा असून इमेल आयडी dlsapune2@gmail.com असा आहे.

ही राष्ट्रीय लोकअदालत प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित होत असून लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकार, नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. सावंत यांनी केले.
0000

ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाच्या अनुशेष भरतीसाठी विशेष मोहीम राबविणार-राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

0

मुंबई, दि. ८ : राज्यात शासकीय नोकऱ्यांमध्ये सरळसेवेच्या कोट्यात ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाचा मिळून १५ हजार ४२६ पदांचा अनुशेष असून हा अनुशेष भरुन काढण्यासाठी विशेष भरती मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी १४ आणि २२ फेब्रुवारी २०२२ च्या पत्रांन्वये सर्व प्रशासकीय विभागांकडून ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतच्या अनुशेषाच्या पदांची माहिती मागविण्यात आलेली आहे, असे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत सांगितले.

सर्वश्री राहुल कुल, जयकुमार गोरे, प्रकाश आबिटकर आदी सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. भरणे यांनी सांगितले की, विविध शासकीय विभागांसाठी एकूण ११ लाख ५३ हजार ४२ पदे मंजूर असून त्यातील ८ लाख ७७ हजार ४० पदे भरलेली आहेत तर २ लाख ३ हजार ३०३ पदे रिक्त आहेत. राज्यात कोविड प्रादुर्भावाच्या दोन वर्षांच्या काळात पदांची भरती होऊ शकली नाही, मात्र आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवून भरती प्रक्रियेला गती दिली आहे. गृह, आरोग्य आदी विभागांना देखील पद भरतीची परवानगी दिली असून भरती प्रक्रिया ताबडतोब राबवली जाणार आहे.

भरतीसाठी १५ हजार ३९० पदांचे मागणीपत्र प्राप्त;

१ हजार ७०० पदांसाठी लवकरच जाहिराती प्रसिद्ध होणार

शासकीय नोकऱ्यांमध्ये सरळसेवेच्या कोट्यातील भरती प्रक्रिया करण्यासाठी विविध विभागांकडून १५ हजार ३९० पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले असून ७३६६ पदांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे. या सहा महिन्यात साधारणतः ६ हजार २०० पदांकरिता ३०० जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून लवकरच एक हजार ७०० पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करुन भरती प्रक्रिया राबविण्यात येईल असे सांगून गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उत्तम काम केले असल्याचेही राज्यमंत्री श्री. भरणे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील विशेष सक्षम कथ्थक नृत्यांगना, पहिल्या महिला सर्पमित्र आणि सामाजिक उद्योजिका यांचा नारी शक्ती पुरस्काराने सन्मान


मुंबई, 8 मार्च 2022

महाराष्ट्रातील तीन महिलांना, नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महिलांसाठी विशेषत: समाजातील मागास आणि उपेक्षित महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष सेवा कार्य करणा-या महिलांच्या बहुमोल कार्याची घेतलेली दखल म्हणून प्रख्यात महिला आणि संस्थांना सन्मानित करण्यासाठी केन्द्र सरकारने हा पुरस्कार दिला आहे.

महाराष्ट्रातील तीन पुरस्कार विजेते आहेत:

  • सायली नंदकिशोर आगवणे (नारी शक्ती पुरस्कार 2020)
  • वनिता जगदेव बोराडे (नारी शक्ती पुरस्कार 2020)
  • कमल कुंभार (2021 साठी नारी शक्ती पुरस्कार)

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन, येथे आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. एकूण 29 उल्लेखनीय व्यक्तींना आज पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार प्रदान सोहळा येथे पाहता येईल. पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी आहे आणि त्यांची माहिती येथे आहेत.

सायली नंदकिशोर आगवणे – विशेष सक्षम कथ्थक नृत्यांगना

सायली नंदकिशोर आगवणे यांना कठीण परिस्थितीतही भारतीय शास्त्रीय नृत्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नारी शक्ती पुरस्कार 2020 देण्यात आला आहे.

जन्मजात डाऊन सिंड्रोम हा आजार असलेल्या आगवणे यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून कथ्थक शिकण्यास सुरुवात केली. तेंव्हापासून त्यांनी 100 हून अधिक नृत्य कार्यक्रम आणि कार्यक्रमांमध्ये सादरीकरण केले आहे.  ‘डाउन सिंड्रोम’ ग्रस्त सुमारे 50 मुलांना त्या नृत्य शिकवतात.

यापूर्वी, राज्य सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने त्यांना  ‘द बेस्ट इंडिव्हिज्युअल पर्सन विथ डिसएबिलिटी (महिला) – 2012’ श्रेणी अंतर्गत ‘स्पंदन राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे.

वनिता जगदेव बोराडे – पहिल्या महिला सर्पमित्र

वनिता जगदेव बोराडे यांना त्यांच्या वन्यजीव संवर्धनासाठी विशेषत: सापांची सुटका करणे आणि जनजागृतीसाठी केलेल्या विशेष प्रयत्नांसाठी नारी शक्ती पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले आहे.

त्या पहिल्या महिला सर्पमित्र आहेत. त्यांनी आतापर्यंत 50,000 हून अधिक सापांचे प्राण वाचवले असून सुरक्षित ठिकाणी त्यांना सोडले आहे. म्हणूनच त्या सर्पमित्र म्हणून ओळखल्या जातात. भारतीय टपाल विभागाने टपाल तिकीट जारी करून त्यांचा गौरव केला आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे.

निसर्ग आणि वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या ‘सोयरे वनचरे मल्टीपर्पज फाउंडेशन’च्या त्या संस्थापक आहेत.

कमल कुंभार – सामाजिक उद्योजक

कमल कुंभार या सामाजिक उद्योजिका उद्योजिका असून त्यांना पशुपालन क्षेत्रात महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी विशेष योगदानाबद्दल नारी शक्ती पुरस्कार 2021 मिळाला आहे.

त्यांनी 5,000 हून अधिक महिलांना सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली आहे.  त्या ‘कमल पोल्ट्री अँड एकता सखी प्रोड्युसर कंपनी’च्या संस्थापक आहेत. या माध्यमातून त्यांनी दुष्काळी उस्मानाबाद भागातील 3,000 हून अधिक महिलांना मदत केली आहे. त्यांनी कोंबड्याच्या प्रमुख प्रजातींसाठी (चिकन) पोल्ट्री कार्यपद्धतीही स्थापित केली आहेत.

त्यांना पुण्यातील स्वयं शिक्षण प्रयोगाच्या स्वयंसेवी संस्थेच्या स्वच्छ उर्जा कार्यक्रमा अंतर्गत ‘वुमन इन क्लीन एनर्जी प्रोग्रॅम’ मध्ये ‘ऊर्जा सखी’ म्हणून प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यांनी सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांनी 3,000 हून अधिक घरे उजळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

यापूर्वी निती आयोगाने त्यांना 2017 मध्ये  वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांना ‘सीआयआय फाउंडेशन वुमन एक्झम्प्लर अवॉर्ड’नेही सन्मानित करण्यात आले आहे.

नारी शक्ती पुरस्कार

केंद्र सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ‘नारी शक्ती पुरस्कार’ दिले जातात. व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या असामान्य कार्याला पोहोचपावती म्हणून त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. अनेक महिला समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणतात, महिला ‘गेम चेंजर्स’ म्हणून अनेकदा भूमिका बजावतात, हा पुरस्कार समाजाच्या प्रगतीत महिलांची समान भागीदार म्हणून दखल प्रयत्न आहे.

2020 आणि 2021 या वर्षांसाठी नारी शक्ती पुरस्कार विजेते विविध क्षेत्रातील आहेत. यात उद्योजकता, कृषी, नवोन्मेषी उपक्रम, सामाजिक कार्य, कला आणि हस्तकला, एसटीईएमएम, वन्यजीव संवर्धन, भाषाशास्त्र, व्यावसायिक नौदल (मर्चंट नेव्ही), शिक्षण, साहित्य आणि अपंगत्व हक्क यांचा समावेश आहे.

या पुरस्कार विजेत्यांच्या कार्यामध्ये त्यांचे वय, भौगोलिक स्थिती कधीच अडथळा बनली नाही. तसेच संसाधने, स्त्रोत यांचा असलेला अभाव त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गात आडवे आले नाहीत. त्यांच्याकडे असलेल्या दुर्दम्य भावनेमुळे समाजाला आणि तरूण भारतीयांच्या मनांना लिंग भेदभावाच्या विरोधात उभे राहण्यासाठी प्रेरणा देत राहणार आहे.

गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारने षड्यंत्र रचल्याचा फडणवीसांचा सभागृहात मोठा गौप्यस्फोट…

0

मुंबई-भाजपा आमदार गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील, एसीपी यांच्यामार्फत सरकारने षड्यंत्र रचल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांना केला आहे. सरकार पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांना सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असणारा पेनड्राईव्हही सुपूर्द केला.राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लक्षवेधी मांडताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत

“देशामध्ये लोकशाही असून महाराष्ट्र पुरोगामी राज्य असल्याचे आपण म्हणतो. महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कतीमध्ये आपण एकमेकांचे विरोधक आहोत पण शत्रू नाहीत. महाराष्ट्राची पोलीस व्यवस्था ही प्रगल्भ आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा मला अभिमान आहे. पण अलिकडच्या काळात पोलीस दलाचा गैरवापर सकाकडून वाढला आहे. सरकारच षड्यंत्र करत असेल तर लोकशाहीला अर्थ उरत नाही,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

“पेनड्राईव्ह मी अध्यक्षांना सुपूर्द करत आहे. सरकार कशा प्रकारचे कटकारस्थान शिजवत आहेत ते मी या पेनड्राईव्हमध्ये दिले आहे. गिरीश महाजनांच्या संदर्भात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१८मध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोईटे गटाच्यावतीने गिरीष महाजनांचे स्वीय सहाय्यक रामेश्वर यांनी पाटील गटाच्या व्यक्तीचे अपहरण केले. त्यानंतर महाजनांचा फोन आला आणि त्यांनी धमकी दिली. अशा प्रकारची बनावट केस तयार करण्यात आली. त्या प्रकरणात गिरीष महाजनांना मोक्का लावण्यात यावा असे सांगून कागदपत्रे तयार करण्यात आली,” असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

“विरोधकांची कत्तल कशी करायची यासाठी षड्यंत्र शिजत होते. या कथेमध्ये प्रमुख पात्र विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण हे होते. सुरेशदादा जैन, रमेश कदम, डीएसके, महेश मोतेवार, रवींद्र बराटे या प्रकरणात त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. गिरीश महाजन यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला त्या प्रकरणातही सरकारी वकील हेच आहेत. या वकिलांचे कार्यालय आहे की, महाविकास आघाडी सरकारचा राजकीय कत्तलखाना अशी स्थिती आहे. चाकू प्लांट करण्यापासून ते गळ्याला रक्त लावण्यापासून ते ड्रग्जचा धंदा कसा दाखवायचा, रेड कशी टाकायची आणि कसेही करुन ही केस मोक्कामध्ये कशी फिट बसेल याचे नियोजन, गुन्हेगारी स्वरुपाचा कट एक सरकारी वकील करतो याची ही निर्लज्ज कथा आहे. या सरकारी कत्तलखान्याच्या नायकाची कथा आहे. यातील महानायकही मोठे आहेत. महाविकास आघाडीच्या कारागृहात गेलेल्या आणि कारागृहाबाहेर असलेल्या नेत्यांबाबतची त्याची मते, भविष्यातील सर्व योजना त्यांच्या कारनाम्याबाबत असलेली माहिती यावरही ते स्वतः प्रकाश टाकणार आहेत. या सव्वाशे तासाहून अधिक रेकॉर्डिंगमधील काही महत्वाचा भाग मी आपल्याला देतो,” असे देवेंद्र फडणवीसांना म्हटले.

आम्ही हवेत बोलत नाही. साधे पुरावे नव्हे तर व्हिडीओ आहेत. यावर कोण कारवाई करेल. राज्यातील महाविकास आघाडीचे नेते व पोलिसांचा यात सहभाग आहे, त्यामुळे हि केस सीबीआयकडे द्यावी. आम्हाला संपविण्यासाठी असा कट शिजत असेल तर शेवटी आरपारची लढाई लढावी लागेल. तुम्ही फक्त कांगावा करता प्रत्यक्षात पुरावे आम्ही देतोय. म्हातारी मेल्याचे दुखः नाही काळ सोकावु नये. यात शहाणपण नाही तर जनतेसाठी हे प्रकार योग्य नसल्याचेही फडणवीस म्हणाले.

विधीमंडळाच्या सायंकालीन सत्रात त्यांनी सडेतोड, तडाखेबंद भाषण त्यांनी केले. फडणवीस एक एक गौफ्यस्फोट करीत होते तसे तसे सभागृहात मोठी शांतता पसरली होती. फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांना पुराव्यांचा पेनड्राईव्हच दिला. त्यानंतर सभागृहात निवेदन करतना त्यांनी पोलखोल केली.

ते म्हणाले, गिरीश महाजनांवर मोक्का लागावा यासाठी राज्य सरकारने सरकारी वकिलांना हाताशी धरुन खटाटोप केला. त्यात पोलिसांचाही सहभाग आहे. हे सर्व कुंभांड रचण्यात आले. एफआयआर सरकारी वकिलाने लिहिला. जबान्या त्यांनी पाठ केल्या. हे सर्व सरकारी वकील स्वःत तोंडाने सांगतात.

महाविकास आघाडीच्या सुनिल गायकवाड, रविंद्र शिंदेने नाथाभाऊंशी बोलणे झाले की, गिरीश महाजनांना फसवायचे. अजित पवार सहकार्य करीत नाही. पण मोठे साहेब सर्व पाहताहेत अशा संवादाचे व्हिडीओतील कागदावर लिहिलेले संवाद फडणवीसांनी सभागृहात वाचून दाखविले. अ‍ॅड. प्रवीण चव्हाण कट कसा रचत आहेत याचा पाढाच त्यांनी वाचला. सुट बुक केला. व्हेज – नाँन व्हेज जेवण करायचे का, मदत लागली तर खडसे साहेबांची घ्या असे काही संवादही त्यांनी वाचून दाखविले. हे षंडयंत्र सरकारातील काही व्यक्तींनी आमच्या विरोधात रचले असा आरोपही त्यांनी केला. सरकारी वकिल अ‍ॅड. प्रवीण चव्हाण विरोधात पुरावे आहेत. गिरिश महाजनांनरील बोगस केसचे पुरावे माझ्याकडे आहेत असेही ते म्हणाले.

महिला शाहीरांची छत्रपती शिवरायांना पोवाड्यातून मानवंदना

0

पुणे : मराठमोळा पेहराव करून महानगरपालिकेच्या प्रांगणात जमलेल्या महिला शाहिरा… छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या मातृशक्ती जिजामाता यांना केलेले नमन… निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी जाणता राजा…या शब्दात बुलंद आवाजातील पोवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना महिला शाहिरांनी मानवंदना दिली.

महिला व बालकल्याण समिती पुणे महानगरपालिका आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त प्रबोधिनीच्या महिला शाहिरांनी पोवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. पुणे महानगरपालिका भवनाच्या प्रांगणात नवीन बसविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, महिला व बाल कल्याण समिती पुणे महानगरपालिकेच्या रुपाली धाडवे, प्रबोधिनीचे अरुणकुमार बाभुळगावकर आदी उपस्थित होते.  अक्षदा इनामदार, श्रद्धा जाधव, आदिती कालेकर, तृप्ती उफाळे, कृष्णा उफाळे, सानवी कुटे यांनी पोवाडा सादरीकरण केले.साहिल पुंडलिक यांनी हार्मोनियम, होनराज मावळे यांनी ढोलकी आणि शिवम उभे यांनी तालवाद्याची साथसंगत केली.

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, पुणे महानगरपालिकाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण झाले. महाराजांना मानवंदना देण्यासाठी व महिलादिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.