पुणे, दि. ०८ मार्च २०२२: भोर तालुक्यातील खेड शिवापूर परिसरातील उद्योजक तसेच इतर वीजग्राहकांना दर्जेदार व विनाखंडित वीजपुरवठा करण्यासाठी पुढील १५ वर्षांमधील विजेची गरज लक्षात घेऊन सक्षमीकरण व नुतनीकरण योजनेअंतर्गत (एसएसएमआर योजना) सुमारे ५ कोटी रुपये खर्चाचे विविध कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.
या योजनेतून प्रामुख्याने १३२ केव्ही कामथडी येथून ३३/२२ केव्ही खेड शिवापूर डबल सर्किटचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र काही स्थानिक नागरिकांकडून विविध कारणांमुळे वीजवाहिनीच्या कामामध्ये अडचणी येत असल्याने त्यांच्याशी चर्चा करून, त्यांची समजूत काढून व प्रसंगी पोलीस विभागाची मदत घेऊन वीजवाहिनीचे काम मार्गी लावण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरु आहेत. ही वीजवाहिनी कार्यान्वित झाल्यानंतर या परिसरातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांचे वीजप्रश्न सुटणार आहेत व त्याची माहिती खेड शिवापूर औद्योगिक संघटनेस देण्यात आली आहे.
यासोबतच पायाभूत सुविधा योजना दोन अंतर्गत १० एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त पॉवर ट्रॉन्सफॉर्मर एक वर्षभरापुर्वी कार्यान्वित करण्यात आलेला आहे. तेव्हापासून वीजपुरवठा सुरळीत असून गेल्या चार वर्षांपासून विजेचा लपंडाव सुरु असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. खेड शिवापूर परिसर हा मिश्र वर्गवारीतील ग्राहकांचा असून कृषी ग्राहकांची संख्या देखील लक्षणीय आहे. यामुळे या परिसरात होणारा वीजपुरवठ्यावर काही प्रमाणात वातावरणाचा देखील मोठा परिणाम होतो. वीजवापर हा मोसमानुसार कमी अधिक होतो.
सध्या उष्णता वाढत असल्याने विजेच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे वीजयंत्रणेवर ताण येत असला तरी तांत्रिक नियोजनातून वीजपुरवठा सुरळीत आहे. खेड शिवापूर परिसरातील दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सुरु असलेल्या वीजयंत्रणेच्या सर्व कामांना स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.