श्रीरामजी संस्थान तुळशीबागतर्फे अपरा एकादशीनिमित्त कीर्तन
पुणे : राम नाम सोपे आहे, परंतु ते पूर्वपुण्य असल्याशिवाय मिळत नाही. पूर्व पुण्य गाठीशी असेल तर संतांची संगती लाभते. संतांच्या संगतीत गेल्यावर संत तुमच्यातील वासना नाहीशा करतात आणि माणसातील वासनांचा क्षय होतो. त्यामुळे संत हे पृथ्वीवरील चालते बोलते परमेश्वर आहेत, असे मत कीर्तनकार ह.भ.प. मंदारबुवा गोखले यांनी व्यक्त केले.
श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरात अपरा एकादशीनिमित्त कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.
मंदारबुवा गोखले म्हणाले, वासनांचा क्षय झाल्यानंतर जे मुखातून राम नाम येते ते सोपे आणि सुलभ आहे, असे तुकोबाराय म्हणतात. राम नाम मुखात येऊ लागले की, जीवनातील सुख घडोघडी वाढू लागते. राग, लोभ, मत्सर न करणारा व्यक्ती म्हणजे संत. दु:ख नाहीसे करायचे असेल तर संतांची संगती हवी. जिथे संतांचे चरण स्पर्श होतात तिथे सुखाचा काळ सुरू होतो.
संत संगतीमुळे माणसातील वासनांचा क्षय-कीर्तनकार ह.भ.प. मंदारबुवा गोखले
नाहक त्रास देण्याच्या हेतूने देण्यात येणाऱ्या भेटीस आळा घालण्यासाठी वैधमापन शास्त्र विभागाचे आवाहन
मुंबई, दि.3 : विभागीय सह नियंत्रक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांना भेटीस जाण्यापूर्वी त्याबाबतची माहिती नियंत्रक कार्यालयास व उपनियंत्रक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांना भेटीस जाण्यापूर्वी त्याबाबतची माहिती सह नियंत्रक कार्यालयास देणे आवश्यक असल्याचे निर्देश नियंत्रक, वैध मापन शास्त्र डॅा. रविंद्र कुमार सिंगल यांनी दिले आहेत.
विभागीय सह नियंत्रक व उपनियंत्रक यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांना भेटीस जाण्यापूर्वीचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे शासन परिपत्रक क्र. वैमाशा-2019/465/प्र.क्र.143/ग्रासं-३, दि. 26/11/2019 अन्वये देण्यात आलेले आहेत तसेच याबाबत वेळोवेळी नियंत्रक कार्यालयाकडूनही याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तरीसुद्धा काही अधिकारी आस्थापनांना भेटी देऊन नाहक त्रास देत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी अशा काही तक्रारी असल्यास व्यापारी व आस्थापनांना त्यांबाबत खातरजमा करता येणार आहे, असे परिपत्रक प्रसिध्दीस दिले आहे.
नाहक त्रास देण्याच्या हेतूने देण्यात येणाऱ्या भेटीस आळा घालण्यासाठी यंत्रणेतील सह नियंत्रक यांनी भेटीबाबत मुख्यालयास आगाऊ माहीती दिली असल्याबाबतची खातरजमा संबधित व्यापारी/आस्थापनांना 022- 22621968 या क्रमांकावर करता येईल. तसेच उपनियंत्रक यांच्या भेटीबाबत खालील विभागीय कार्यालयांच्या संपर्क क्रमांकावर खातरजमा करता येईल. अशी नियंत्रक कार्यालयाकडून व्यापारी आस्थापनांना सांगण्यात आले आहे. मुंबई महानगर विभाग- बृहनमुंबई- 022-24148494 कोकण विभाग- 022-27574074 ( ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधूदूर्ग जिल्हा),पूणे विभाग- 020- 26697232 (पुणे,सातारा, कोल्हापूर,सांगली व सोलापूर जिल्हा) नाशिक विभाग- 0253- 2455696 ( नाशिक, अहमदनगर, धूळे, नंदूरबार, जळगांव) औरंगाबाद विभाग- 0240-2952656 (औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड),अमरावती विभाग – 0721-2990038 (अमरावती, यवतमाळ, बुलढ़ाणा, अकोला, वाशिम),नागपूर विभाग- 0712- 2540292,( नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया) अशी माहिती नियंत्रक, वैध मापन शास्त्र विभागाकडून एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या गरीब कल्याण कार्यक्रमामुळे शोषित,वंचितांना मिळाले संरक्षणप्रविण दरेकर यांचे प्रतिपादन
पुणे -कोरोना काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य, ९ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन,३ कोटीहून अधिक लोकांना मालकीचे घर देणे, ४१ कोटींहून अधिक जनधन खाती या सारख्या योजनांतून मोदी सरकारने गरीब कल्याण कार्यक्रम प्रभावीपणे अमलात आणल्याने शोषित, वंचित वर्गाला संरक्षण मिळाले आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केले.मोदी सरकारच्या आठव्या वर्षपूर्ती निमित्त भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या ‘सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची 8 वर्षे’ या अभियानाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दरेकर बोलत होते.
ते म्हणाले की, सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास आणि सब का प्रयास हा मंत्र घेऊन मोदी सरकारने गेल्या आठ वर्षात अंत्योदय आणि एकात्म मानववादाला केंद्रस्थानी ठेवत गोरगरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या. त्याचबरोबर देशांतर्गत सुरक्षा मजबूत करणे , दहशतवादी शक्तींना त्याच भाषेत उत्तर देण्याचे कणखर धोरण यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा ‘बलशाली राष्ट्र’ अशी तयार झाली असून वैश्विक पातळीवर भारताकडे आदराने पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वामुळेच हे शक्य झाले आहे. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या आठ वर्षात अनेक क्षेत्रात भारताची वेगाने प्रगती होत आहे.
जम्मू-काश्मीरसाठीचे 370 वे कलम रद्द करणे, राममंदिराच्या उभारणीतील अडथळे दूर करणे, तिहेरी तलाक पद्धत रद्द करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर करणे या सारख्या निर्णयांमुळे अनेक वर्षांपासूनचे प्रश्न मोदी सरकारने निकालात काढले. कायम अशांत असणाऱ्या ईशान्य भारताला हिंसाचार मुक्त केले. अंतर्गत सुरक्षा बळकट केल्यामुळे गेल्या आठ वर्षात काही अपवाद वगळता दहशतवाद्यांचा एकही मोठा हल्ला झाला नाही. सीमेवर झालेल्या आगळीकीला त्याच भाषेत उत्तर दिले गेल्यामुळे भारताकडे कणखर राष्ट्र म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देणे, वन रँक वन पेंशन सारखे निर्णय अंमलात आणणे, जातीय आरक्षण नसलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना आरक्षण देणे या निर्णयातून मोदी सरकारने समाजातील सर्व घटकांना विकासाच्या प्रवाहात आणले आहे.
कोरोनाच्या संकट काळात मोदी सरकारचे सुशासन आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले गेले. योग्यवेळी टाळेबंदीचा निर्णय घेत अवघ्या नऊ महिन्यात दोन स्वदेशी लस विकसीत करत मोदी सरकारने कोरोना प्रसाराला वेळीच अटकाव केला. भारतासारख्या खंडप्राय देशात लसीकरणाचे आव्हान यशस्वीपणे पेलत मोदी सरकारने प्रगत देशांनाही मागे टाकले. कोरोना काळातच पंतप्रधान गरीब कल्याण योजना राबवत गोरगरीब उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली. या योजनेची जागतिक बँकेनेही प्रशंसा केली आहे. आत्मनिर्भर भारतासारखी संकल्पना प्रत्यक्षात आणल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
आयुक्त,मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करा – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळापूर्व कामांचा घेतला आढावा
पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी नियोजन करताना स्थानिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवा
पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा महिन्याभराने घेणार आढावा
मुंबई, दि. 3 : पूरजन्य परिस्थितीच्या तयारीचा आढावा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन घ्या, तसेच पूरपरिस्थिती हाताळण्याचे नियोजन करताना स्थानिकांचा सहभाग वाढविण्याची सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आदी कामे प्राधान्याने करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः यात लक्ष घालून ही कामे पूर्ण करावीत. नियंत्रण कक्ष, अग्निशमन दलासह आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश नगरविकासमंत्र्यांनी आज दिले. दरम्यान, पावसाळ्यात आपत्कालिन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री, उपकरणांच्या खरेदीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही देतानाच जिल्ह्यांनी नियोजन समितीच्या निधीतून अत्यावश्यक खरेदी करण्याच्या सूचना नगरविकासमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका- नगरपंचायतींनी केलेल्या तयारीचा आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीस नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठी, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपरिषद मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेऊन निर्देश दिले असून शहरांमधील नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, नियंत्रण कक्ष आणि अग्निशमन दलाची सज्जता, धोकादायक इमारती, वृक्षछाटणी आदी विषयांवर महानगरपालिका, नगरपालिकांनी तातडीने कार्यवाही करावी, त्यासाठी विविध विभागांशी समन्वय राखण्याच्या सूचना नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

नालेसफाईवर विशेष लक्ष द्या
शहरांमधील नाल्यांची १०० टक्के सफाई होईल याकडे विशेष लक्ष पुरवून नालासफाई झालेल्या भागातील गाळ, कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना नगरविकासमंत्र्यांनी यावेळी दिल्या. शहरातील पाणी साचणारी ठिकाणे शोधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देतानाच रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यापूर्वी भरण्याचे निर्देशही मंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी पूर्वतयारी करुन ठेवण्याबरोबरच शहरातील मोठे होर्डिंग्ज पडून दुर्घटना घडणार नाही त्यासाठी होर्डिंग्जची तपासणी करण्याच्या सूचनाही नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.
नियंत्रण कक्ष सज्ज ठेवा
पावसाळ्याच्या काळात संकटसमयी शहरांमधील रहिवाशांना तात्काळ मदत पोहोचावी यासाठी सर्व महानगरपालिका, नगरपालिकांनी आपले नियंत्रण कक्ष सज्ज ठेवावेत. जनतेला माहिती देण्यासाठी अलर्ट प्रणाली कार्यन्वित ठेवण्याबरोबरच नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जनतेपर्यंत प्रसारमाध्यमांद्वारे पोहोचविण्याच्या सूचनाही नगरविकासमंत्र्यांनी दिल्या. नियंत्रण कक्षाची सज्जता तपासण्यासाठी मॉकड्रिल घेण्याबरोबरच नियंत्रण कक्षाला आयुक्तांनी अचानक भेटी देऊन पाहणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
साथीचे आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना करा
साथीचे आजार उद्भवणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, त्याशिवाय औषधांचा पुरेसा साठा करण्यासह आपत्कालिन स्थितीमध्ये रुग्णालये, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाला सज्ज करुन ठेवण्याचे निर्देशही यावेळी नगरविकासमंत्र्यांनी दिले.

जलसंपदा विभागाने सतर्क राहावे
पावसाळ्यात धरणांचे दरवाजे उघडताना खालच्या गावांची स्थिती पाहून संबंधितांशी संपर्क-समन्वय करुनच निर्णय घ्यावा, दरवाजे उघडल्यानंतर खालच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घेतानाच जलसंपदा विभागाच्या सर्व अभियंत्यांनी या काळात अधिक सतर्क राहावे. नदीकाठच्या गावांशी संपर्क तुटल्यास त्या गावांमधील रहिवाशांना अन्नधान्ये, औषधे पुरविण्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे. धबधब्यासारख्या पर्यटन प्रवेश बंदीच्या ठिकाणावर लक्ष ठेवून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सतर्क राहावे लागणार आहे. भूस्खलन किंवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी अधिकची दक्षता घेण्याबरोबरच अग्निशमन दलाने सज्ज राहण्याच्या सूचनाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
स्थानिकांच्या सहभागासाठी ‘ठाणे पॅटर्न‘ राबवा
पावसाळ्याच्या काळात आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास ठाण्याच्या धर्तीवर स्थानिक व्यवस्थापन समितीमध्ये स्थानिकांचा सहभाग घेण्यात यावा, त्याचा निश्चितच मदतकार्यात फायदा होणार आहे. मुंबई महानगरपालिकेने एमएमआरडीए, एमएसआरडीसी, जिल्हा प्रशासन, रेल्वे आदी सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवण्याच्या सूचना देतानाच महानगरपालिकेने नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश नगरविकासमंत्र्यांनी दिले. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व यंत्रणांनी पावसाळ्याच्या काळात सतर्क राहण्याचे आवाहनही यावेळी केले.
महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार
मुंबई, दि.३ : राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करून विविध खेळांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीने तसेच खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी व नॅशनल गेम्सच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी व्हावी, याकरिता राज्यात “महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक गेम्स” चे आयोजन महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २०२२ या वर्षामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली.
श्री. केदार म्हणाले,राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करून विविध खेळांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीने तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर आपले नैपुण्य दाखवित असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी व राष्ट्रीय खेळ स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी व्हावी याकरिता महाराष्ट्र ऑलिम्पीक असोसिएशनमार्फत राज्यात विविध ठिकाणी मिनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध खेळांना उत्तेजन देण्यासाठी व खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभव मिळावा यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पीक असोसिएशनच्या सहकार्याने मिनी ऑलिपीक स्पर्धा आयोजित करण्याचे प्रस्तावित होते, याचा लाभ दिव्यांग खेळाडूंच्या क्रीडा प्रोत्साहन देण्यास देखील होणार आहे. कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सन २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये या स्पर्धांचे आयोजन करणे शक्य झाले नसल्याचे श्री केदार यांनी सांगितले.
आता या स्पर्धाचे आयोजन महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने सुरक्षा, वैद्यकीय सुविधा, खेळाडुंच्या प्रवासाची साधने इ. बाबी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठी राज्यस्तरावर एक उच्चस्तरीय समिती व पुणे येथे मुख्य स्पर्धा आयोजन समिती अशा दोन समित्या गठीत करण्यात आला असून राज्यस्तरावर एक उच्चस्तरीय समिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे.
ग्रामीण युवकांना मिळणार कॅपजेमिनीकडून प्रशिक्षण
मुंबई, दि. 3 : राज्यातील ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी कॅपजेमिनी कंपनी डिजीटल अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहे. याबाबत राज्याचे कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांच्या समोर कंपनीच्यावतीने सादरीकरण करण्यात आले.
सह्याद्री अतिथी गृहात आज झालेल्या बैठकीत कॅपजेमिनी कंपनीचे डिजिटल इन्क्लुजन विभागाचे उपाध्यक्ष अनुराग प्रताप यांनी याबाबत सादरीकरण केले. राज्याच्या ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी काही प्रशिक्षण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना कौशल्य देण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. कॅपजेमिनी कंपनी डिजीटल अकॅडमीच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

कंपनीचा उपक्रम चांगला आहे. ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी, चांगली संधी मिळण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वास श्री.टोपे यांनी व्यक्त केला. सध्या कंपनीच्यावतीने राज्यातील बारा महाविद्यालयात हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. त्याची उपयुक्तता सिद्ध झाल्यास राज्यातील विविध जिल्ह्यांत हा उपक्रम राबविण्याचा मानस आहे.
यावेळी कॅपजेमिनी कंपनीच्या सीएसआर विभागाच्या मुख्य अधिकारी शोभा मीरा, आरती श्रीवास्तव, ऋता साटम आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राची खेलो इंडियात मुला-मुलींची कबड्डीत दोन्ही संघांची विजयी सलामी
क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी कबड्डीच्या दोन्ही संघांतील खेळाडूंचे केले अभिनंदन
मुंबई, ता. ३ : चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत पहिल्या दिवशी झालेल्या महाराष्ट्राच्या मुलांच्या कबड्डी संघाने आंध्र प्रदेशचा तब्बल १९ गुणांनी तर मुलींच्या संघांने झारखंडचा ४५ गुणांनी उडवला धुव्वा हरियाणाच्या भूमीत विजयी सलामी देत आपले कौशल्य दाखवल्याबद्दल राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी कबड्डीच्या मुला-मुलींच्या संघांतील खेळाडूंचे अभिनंदन केले.
महाराष्ट्राने मुलांच्या संघाने तब्बल ४८ गुण घेतले तर आंध्र प्रदेशला २९ गुणांपर्यंतच मजल मारता आली.ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉप्लेक्समध्ये हा सामना झाला. सुरूवातीला अटीतटीचा वाटणारा सामना महाराष्ट्राने एकतर्फी केला.महाराष्ट्राने पहिल्याच चढाईत एक गुण घेतला. डु ओर डाय रेडमध्येही गुण मिळवला. सुरूवातीपासूनच महाराष्ट्राने आक्रमक खेळ केला. परंतु नंतर आध्र प्रदेशने आक्रमकता वाढवून सामन्यात पुनरागमन केले. चार विरूद्ध पाच गुणांची आघाडी घेतली. त्यांनी चारगुणांची कमाई करीत महाराष्ट्राला ऑल आऊट केले. त्यामुळे सामना बारा विरूद्ध सहा असा फिरला. परंतु नंतर महाराष्ट्राचे खेळाडू आक्रमक झाले. आंध्र प्रदेशला ऑलआऊट केले. त्यामुळे त्यांचे पंधराविरूद्ध सोळा गुण झाले. अठराव्या मिनिटाला सतरा आणि सतरा अशी बरोबरी झाली. परंतु पहिल्या हाफमध्ये महाराष्ट्रने तीन गुणांची आघाडी घेतली. त्यावेळी गुणफलकावर २० विरूद्ध १७ असे गुण होते. दुसऱ्या हाफ मध्ये महाराष्ट्र आणखीच आक्रमक झाला. त्यांनी चढाई आणि बचावातही उजवा खेळ केला. त्यामुळे आठ मिनिटे बाकी असताना जवळपास दुप्पट गुण मिळवले. धावफलक ४० विरूद्ध असा होता. शेवटी महाराष्ट्राने ४८ गुण मिळवत पहिलावहिला खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये विजय नोंदवला. आंध्र प्रदेशचे २९ गुण होते.

शिवम पठारे (अहमदनगर), पृथ्वीराज चव्हाण (कोल्हापूर) यांनी चढाईत नेत्रदीपक कामगिरी केली. त्यांच्या बळावरच महाराष्ट्राला गुण मिळवता आले. दादासाहेब पुजारी, रोहन तुपारे, साईप्रसाद पाटील, जयेश महाजन यांनी उत्कृष्ट पकडी केल्या. त्यामुळे संघाला भरभक्कम आघाडी घेता आली. सामन्यात आऊ आउट झाल्याने महाराष्ट्र सहा गुणांनी पिछाडीवर होता. परंतु नंतर आक्रमक खेळ करीत मुलांनी सफाईदार खेळ केला.
कबड्डीत झारखंडचा ४५ गुणांनी उडवला धुव्वा
चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत पहिल्याच दिवशी कबड्डीत मुलांनंतर मुलींनी विजयी पतका फडकावत महाराष्ट्राचे नाव उंचावले. मुलींनी नेत्रदीपक कामगिरी करीत तब्बल ४५ गुणांनी झारखंडचा धुव्वा उडवला. ६० विरूद्ध १५ असा हा सामना झाला.
पंचकुलातील ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये हा सामना रंगला. सामन्यात पहिल्या पाचच मिनिटांत मुलींनी झारखंडवर पाच-शून्य अशी गुणांची आघाडी घेत मानसिक दबाव टाकला. त्यामुळे झारखंडला सामन्यात कमबॅक करता आले नाही.
खेळाडूंनी प्रारंभीच सामना महाराष्ट्राच्या बाजूने झुकवला होता. पहिल्या हापमध्ये १५ गुणांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या हापची दहा मिनिटे उरली असताना महाराष्ट्राच्या मुलींनी तब्बल ४५ गुण फलकावर लावले. त्यावेळी झारखंडचे अवघे १३ गुण होते. त्यामुळे केवळ सामन्याची औपचारिकता उरली होती. सामन्याला एक मिनिट उरला असताना पुन्हा एकदा झारखंडला ऑल आऊट केले. त्यामुळे गुणफलकावर लागले ६० गुण. झारखंडचे होते अवघे १५ गुण.
प्रशिक्षक गीता साखरे-कांबळे, सोनाली जाधव यांनी तर टीम व्यवस्थापक अनिल सातव, महेश खर्डेकर, ज्ञानेश्वर खुरांगे, सपोर्ट स्टाफ विजय खोकले, किशोर बोंडे यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवला. या सर्वांनी ठरवलेल्या प्लॅननुसार खेळाडूंनी सामन्यात कौशल्य दाखवले.

मैदानात जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष
महाराष्ट्राच्या मुलींनीही खेळात तरबेज असल्याचे दाखवून दिले. त्यांचा खेळ पाहून उपस्थित असलेल्या मराठी क्रीडाप्रेमींनी जल्लोषात जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव अशा विजयी जयघोष केला. हरियानातील क्रीडाप्रेमींनी टाळ्या वाजवून मुलींना प्रोत्साहन दिले.
या मुली चमकल्या
चढाईत हरजीतसिंग संधू ११ गुण (मुंबई), ऋतुजा अवघडीने ८ गुण मिळवले. पकडीतही ती चमकली. यशिका पुजारीने पाच गुण मिळवले. निकिता लंगोटे आणि कोमल ससाणे यांनी नेत्रदीपक पकडी केल्या. मुस्काने लोखंडे हिनेही उत्कृष्ट बचाव केला. एकंदरीत सांघिक कामगिरीमुळे महाराष्ट्राला एकतर्फी विजय मिळवता आला.
मुलींचा संघ असा
हरजीतकौर संधू, शिवरजनी पाटील, आरती ससाणे, कोमल ससाणे, रिद्धी हडकर, हर्षदा पाटील, किरण तोडकर, मनिषा राठोड, निकिती लंगोटे, यशिका पुजारी, मुस्कान लोखंडे, ऋतुजा अवघडी.
महात्मा गांधी रुग्णालय समस्याबाबत कार्यवाही करणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. 3 : महात्मा गांधी रुग्णालयातील रिक्त जागा तत्काळ भरण्यात याव्यात. यासाठी केंद्र सरकारच्या जेम पोर्टल वरुन मनुष्यबळ घ्यावे. रुग्णालयातील अर्धवट बांधकाम पूर्ण करावे. रुग्णालयातील स्वच्छता ठेवावी. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.
परळ येथील महात्मा गांधी स्मृती रुग्णालयाच्या विविध प्रकारच्या समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे पुढील आठवड्यात व्यापक बैठक घेणार आहेत.
याबाबत आज सह्याद्री अतिथी गृहात रुग्णालयाच्या समस्यांबाबत बैठक झाली. आमदार अजय चौधरी, नगरसेवक अनिल कोकीळ, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. प्रविण बांगर, आरोग्य विभागाचे सहसचिव वि. ल. लहाने, अवर सचिव महेश लाड आदी उपस्थित होते.
आमदार अजय चौधरी यांनी महात्मा गांधी स्मृती रुग्णालयातील विविध प्रकारच्या समस्यांबाबत माहिती दिली. रुग्णालयातील व्यवस्था पूर्णपणे कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. यावेळी ईएसआयसीचे डॉ. संजय ढवळे, डॉ. राजीव गुरमुखानी, संचालक महेश वरुडकर, कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी बाळा कदम उपस्थित होते.
आंबेडकरी चळवळीत शेवाळे सरांचे योगदान मोलाचे रामदास आठवले यांचे मत
- ‘रिपाइं’नेते एम. डी. शेवाळे यांच्या स्मृतींना अभिवादन.
पुणे, दि. ३ जून: “रिपब्लिकन पक्षाला एकत्र ठेवण्यामध्ये शेवाळे सरांचा वाटा मोठा होता. आंबेडकरी चळवळीत हजारो कार्यकर्ते घडविण्याचे काम त्यांनी केले. बहुजनांच्या विकासासाठी विविध संस्थांच्या माध्यामातून सामाजिक, शैक्षणिक कार्य केले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या डिप्रेस्ड क्लासेस सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळीत, तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड, रा. सु. गवई यांच्यासह रिपब्लिकन चळवळीच्या कार्याला सुरुवात केलेले शेवाळे सर ‘रिपाइं’ला जोडले गेल्याने पक्षाला उभारी मिळाली. शेवाळे सरांनी मला तीस वर्षे एकनिष्ठ साथ दिली. त्यांच्या जाण्याने रिपब्लिकन पक्षाचा शिलेदार हरवला आहे,” अशी भावना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय कोषाध्यक्ष मधुकर धर्माजी शेवाळे उर्फ एम. डी. शेवाळे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे स्मरण करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि सर्व आंबेडकरी पक्ष, संघटना, संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन सभेचे आयोजन केले होते. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या अभिवादन सभेला खासदार गिरीश बापट, आमदार सुनील कांबळे, माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, माजी मंत्री अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, माजी आमदार उल्हास पवार, ऍड. जयदेव गायकवाड, दिलीप कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, भूपेश थुलकर, राजाभाऊ सरोदे, ‘रिपाइं’ प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, अशोक शिरोळे, सचिव महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, बाबुराव घाडगे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संगीता आठवले, शशिकला वाघमारे, हिमाली कांबळे, असीत गांगुर्डे, संजय सोनवणे, निलेश आल्हाट आदी उपस्थित होते.
प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला ‘शिका, संघर्ष करा, संघटीत व्हा’ हा मंत्र शेवाळे सरांनी स्विकारला. शैक्षणिक क्षेत्रामध्ये शेवाळे सरांनी नवीन पायंडा सुरु केला. उपेक्षित, दलित, गरिब मुलांना कमीत कमी खर्चात शिक्षण कसे देता येईल असा सातत्याने प्रयत्न त्यांच्या शिक्षण संस्थेतून होत होता. शेवाळे सरांनी स्वत:च्या मुलीचे लग्न विदर्भातील मुलाबरोबर करुन पुणे आणि विदर्भाचे मनोमिलन करण्यामध्ये पुढाकार घेतला. केवळ श्रद्धांजली किंवा अभिवादन सभेला एकत्र न येता इतर वेळीसुद्धा रिपब्लिकन पक्षातील लोक ज्यावेळी एकत्र येतील त्यावेळी शेवाळे सरांना ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.”
गिरीश बापट म्हणाले, “अभिवादन सभेसारखे कार्यक्रम मनाला वेदना देणारे असतात. आयुष्यभर समाजासाठी काम, कार्यकर्ते घडविण्याची धडपड, कायम पक्षाची चिंता शेवाळे सर करत असत. एखादी व्यक्ती आयुष्यात नसेल तर तीची किंमत उशीरा कळते. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करुन त्यातून निष्पन्न होणार्याअ गोष्टींची जाण आणि योग्य सुचना सल्ला देणारा माणूस आपल्यात नाही.”
डॉ. राजेंद्र गवई, अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, उल्हास पवार यांच्यासह रिपब्लिकन चळवळीतील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी शेवाळे सरांच्या विषयी भावना व्यक्त केल्या.
संभाजीराजेंवर शिवसेनेने अन्याय केला : रामदास आठवले
पुणे : “माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर शिवसेनेने अन्याय केला. भारतीय जनता पक्षाशी चर्चा केली असती, तर राजे भाजपचे उमेदवार म्हणून निवडणून आले असते. मात्र, ही राज्यसभा निवडणुक राजेंनी अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्धार केला होता. शिवाय, शिवसेनेने राजेंना दिलेला शब्द पाळला नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि शिवसेनेने धोका दिल्यानेच आज राजेंना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली,” अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, अशोक शिरोळे, सचिव महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, बाबुराव घाडगे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संगीता आठवले, शशिकला वाघमारे, हिमाली कांबळे, असीत गांगुर्डे, संजय सोनवणे, निलेश आल्हाट आदी उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. शिवसेना-काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात अंतर्गत वाद आहेत. काँग्रेस पाठींबा ठेवायचा की नाही, यावर विचार करत आहे. काँग्रेसमध्ये धाडस दाखवत पाठींबा काढावा. आम्ही राज्यात सरकार बनवू. काँग्रेस खिळखीळी झाली आहे. काँग्रेसला नेता राहिला नाही. कॉग्रेसला अध्यक्ष मिळेना. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा सामना करणे काँग्रेसच्या आवाक्यात नाही.”
“भोंग्याबाबत राज ठाकरे यांची भूमिका अयोग्य आहे. अजान आणि प्रार्थना झाल्या पाहिजेत. निवडणूक आल्या की असे जातीय राजकारण होते. हे थांबायला हवे. रिपब्लिकन ऐक्य होईल असे वाटत नाही. कोणाच्याही नेतृत्वात ऐक्य झालेच, तर माझा गट त्यात नक्की सहभागी होईल. याआधीही अनेकदा ऐक्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो अयशस्वी राहिला आहे. समाजाने ऐक्य केले, तर आपण प्रत्येकाने एक पाऊल मागे येत त्यात सहभागी व्हायला हवे,” असे त्यांनी नमूद केले.
महापालिका निवडणुकांचा आढावा घेत आठवले म्हणाले, ‘महापालिका निवडणूक सोडत झाली आहे. २३ वॉर्ड शेड्युल कास्टसाठी सोडण्यात आले आहेत. रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत निवडणूक लढणार आहे.’ राज्यसभेची सहावी जागा आम्ही निवडून आणू. भाजपचा उमेदवार तेवढी मते मिळवण्यात यशस्वी ठरेल, असेही ते म्हणाले.
आपण संविधानाचे पालन करत शांततेचा मार्ग स्वीकारायला हवा. पंढरपूर मंदिर असो वा अनेक वाद असोत. धर्माच्या नावावर नवनवीन वाद काढू नयेत. शांततापूर्ण समाज निर्माण व्हावा, असेच आपले संविधान आहे.
काय म्हणाले आठवले… – महाराष्ट्राला जीएसटीचा परतावा दिला आहे.- अजूनही परतावा राहिला असल्यास त्यासाठी प्रयत्न करू.
– केंद्राच्या योजनाचे पैसे महाराष्ट्रात आलेत
– नॅशनल हेरॉल्डबाबत आलेल्या नोटिशीला राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी उत्तर द्यावीत.
– हार्दिक पटेलने भाजपमध्ये प्रवेश केलाय, याचा आनंद आहे.- साकीनाका बलात्कार प्रकरणी कोर्टने पीडितेला न्याय दिला.- न्यायालयाचे आभार मानतो.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अद्ययावत बहुमजली वाहनतळाचे भूमिपूजन
पुणे दि.३- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सखुबाई गबाजी गवळी उद्यानासमोरील अद्ययावत बहुमजली वाहनतळाचे भूमिपूजन करण्यात आले.
या वाहनतळामुळे भोसरी येथून आळंदीकडे जाणारा मुख्य रस्ता बाजारपेठेतील असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय होणार आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर तळमजला अधिक ३ मजले असे पार्किंग करण्यात येणार आहे. यामध्ये ७५ चारचाकी तर १५० दुचाकी वाहने पार्क करण्याची व्यवस्था आहे. वरील मजल्यांवरून ये-जा करण्याच्या दृष्टीने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्वाहकाचे नियोजन करण्यात आले आहे.

चिखली जलशुद्धीकरण केंद्राला भेट व पाहणी
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी चिखली जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. या योजनेमुळे मनपा हद्दीत नव्याने जोडल्या गेलेल्या (२००८ ते २०१० या कालावधीतील) गावांची पाण्याची मागणी पूर्ण करणे शक्य आहे. योजनेमुळे सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर येणारा भार कमी होऊन शहरातील सर्व भागांना पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध विकासकामांचे उद्घाटन
पुणे दि.३- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे उद्योग सुविधा कक्ष व औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड क्षेत्रात पोलिस पेट्रोलिंगकरिता स्मार्ट बाईक मोटार सायकल्स हस्तांतरण, ग्रीन मार्शल पथकाकरिता ई-चलन उपकराणाचे वाटप तसेच अग्निशमन दूचाकी वाहनांचे लोकार्पणदेखील करण्यात आले.
कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते.
औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्ष
शहरातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या तथा उद्योग समूहाद्वारे प्राप्त होणाऱ्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून शहराच्या विकासात भर घालण्यासाठी समन्वय साधण्याचे कार्य या कक्षामार्फत करण्यात येईल. स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण प्रकल्पाद्वारे शहराचा शाश्वत विकासासाठी कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील.
महानगरपालिकेचे विविध उपक्रम, योजना, कार्यक्रम शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, कल्याणकारी योजनाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता तसेच उद्योग समूहाचा या कामात सहभाग वाढविण्याकरिता सामाजिक उत्तरदायित्व कक्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कक्षाच्या माध्यमातून खाजगी संस्था तसेच महानगरपालिका यांना एकत्रित आणून नव्या योजना, कल्पना, कार्यक्रम इत्यादींची आखणी आणि त्यांची अंमलबजावणी सुलभ होणार आहे.

उद्योग सुविधा कक्ष वैशिष्ट्ये
शासकीय संस्था आणि उद्योग यांच्यातील संवाद सुनिश्चित करण्याचा उद्योग सुविधा कक्ष पंच तारांकित एक खिडकी सुविधा आहे. पिंपरी चिंचवडमधील व्यापार आणि उद्योगांची वाढ सुलभ करण्यासाठी आणि औद्योगिक प्रतिनिधीत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच महापालिकेच्या उपक्रमात सहभाग वाढविण्यासाठी कक्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि चेंबर ऑफ कॉमर्स आणि मोठ्या उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यात कक्षामुळे मदत होईल.
अग्निशामक मोटार सायकल्सचे हस्तांतरण
पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील अरूंद रस्ते, गल्लीबोळ, मार्केट परिसर, इत्यादी ठिकाणी आग विझविण्यासाठी अग्निशामक जवानास तातडीने व सहजपणे पोहचण्यास या वाहनांमुळे मदत होणार आहे. या वाहनात २०+२० लीटर क्षमतेच्या २ पाण्याच्या टाक्या आहेत. घटनास्थळी तातडीने पोहोचण्यासाठी रस्त्यावरील वाहतूक बाजूला करण्यासाठीदेखील वाहनांची मदत होणार आहे.
ग्रीन मार्शल पथकाकरिता ई-चलन उपकरणचे वितरण
हे अँड्रॉइड प्रणाली आधारित यंत्र असून डिजिटल पावती,डिजिटल पेमेंट, वाहतूक विभागाच्या वाहन प्रणालीशी सुसंगत आहे. या उपकरणाच्या वापरामुळे दंडाची रक्कम जागेवर प्राप्त होऊन त्याची पावती नागरिकास देण्यात येणार आहे. या उपकरणाचा वापर करणे महापालिकेस सुलभ ठरणार असून कारवाईमध्ये अधिक पारदर्शकता येणार आहे.
पिंपरी चिंचवड क्षेत्रात पोलिस पेट्रोलिंगकरिता ५० स्मार्ट मोटारसायकल्सचे हस्तांतरण
शहरामधील वाहतूक कोंडी, गुन्हेगारी व चोऱ्या यांचे पोलिस पथकामार्फत पेट्रोलिंग करण्याकरिता स्मार्ट मोटारसायकल्सचा वापर करण्यात येणार आहे. पोलिस विभागाला कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी या दुचाकी वाहनांची मदत होणार आहे.
ग्रहगोल अनेक…आपली वसुंधरा फक्त एक!
ब्रह्मांडात अनेक आकाशगंगा आहेत, त्यात अनेक ग्रहगोल सामावले आहेत. पण…आपली वसुंधरा फक्त एकच आहे. चला, तिचे रक्षण करण्याचा, तिला जपण्याचा निर्धार करूया!
पर्यावरणातील तापमान मानव आणि निसर्गाच्या दृष्टीने अत्यंत वेगाने वाढते आहे. यामुळे अनेक सजीवांचे अधिवास नष्ट होण्यासोबत पृथ्वीवरील एक दशलक्ष प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. प्रदूषणामुळे हवा, पाणी आणि भूमीची गुणवत्ता घसरते आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी आपल्या वसुंधरेला आणखी हानी होण्यापासून वाचवणे हा एकमेव पर्याय आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या विषयावर चर्चा आणि कृती अपेक्षित आहे.
पन्नास वर्षापूर्वी स्टॉकहोम घोषणेला अनुसरून केनियातील नैरोबी येथे ५ जून १९७२ रोजी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. त्याला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत असल्याने स्टॉकहोम+५० उपक्रमाच्या माध्यमातून जगभरात वसुंधरेच्या रक्षणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न आणखी महत्त्वाचे ठरतात.
जागतिक तापमान वाढीची समस्या
जग वेगाने पुढे जात असताना पर्यावरणाची परिस्थिती आणखी नाजूक होत आहे. घनकचऱ्याचा प्रश्न, जंगलाचे कमी होणारे क्षेत्र, समुद्राची वाढती पातळी, ध्रुवीय प्रदेशाचा वितळता बर्फ, पूर, वादळ, प्रदूषीत नद्या, प्लास्टिकचा वाढता वापर, तापमान वाढ, लहरी हवामान अशा अनेक समस्या आपल्यापुढे आहेत. जागतिक तापमान वाढ १.५ अंशापेक्षा कमी ठेवण्यासाठी हरितगृह वायू उत्सर्जन निम्मे करण्याची गरज आहे. आत्ताच पर्यावरणाचा विचार न केल्यास वायू प्रदूषणाचे प्रमाण ५० टक्के वाढेल आणि पर्यावरणात मिसळणारा प्लास्टिक कचरा २०४० पर्यंत तिप्पट होईल.
अजूनही वेळ गेलेली नाही
या सर्व समस्येच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी समाजाला सर्वसमावेशक आणि न्याय्य विकास प्रक्रीयेसाठी प्रवृत्त करावे लागेल. यासाठी आवश्यक स्वस्त तंत्रज्ञान उपलब्ध असणे ही आशेची आणि उत्साह वाढविणारी बाब आहे. शाळकरी विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुण भविष्यातील अनुकूल बदलांचे प्रमुख शिलेदार आहेत. त्यांच्यापर्यंत विषयाचे गांभीर्य पोहोचविणे संस्था आणि समाजातील प्रबुद्ध नागरिकांची जबाबदारी आहे. तरुणांना केवळ पर्यावरण विषयाच्या एखाद्या उपक्रमात सहभागावर समाधान न मानता शाश्वत विकासाच्या संकल्पना पुढे नेण्यासाठी संशोधनात सहभाग आणि त्यादृष्टीने नवे कौशल्य शिकण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.
आपण काय करू शकतो
परिसंस्थेचा घटक म्हणून निसर्गाकडून बरेच काही मिळवताना निसर्गाला आणि पर्यायाने वसुंधरेला जपण्यासाठी आपण अत्यंत छोट्या कृतीतून योगदान देऊ शकतो. प्लास्टिकचा वापर बंद करणे, घनकचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे, पाण्याचा मर्यादीत वापर, सौर ऊर्जेचा वापर, ई वाहने किंवा सायकल सारख्या वाहनांचा उपयोग, सार्वजनिक वाहतूक सुविधेचा अधिकाधिक वापर, सेंद्रीय शेतमाल खरेदी, फ्रीज, वातानुकुलन यंत्रणेचा मर्यादित वापर, इमारतीभोवती जलपुर्नभरण व्यवस्था, वृक्षारोपण, कागदाचा वापर कमी करणे, जलस्त्रोतांतील कचरा स्वच्छ करण्याचे उपक्रम, अशा लहान लहान बाबी महत्वाच्या ठरतील. सामुहीकरित्या वृक्ष संवर्धनही तेवढेच महत्त्वाचे आहे.
निसर्गासोबत सहचर्य ठेवूनच आपल्या वसुंधरेचे रक्षण शक्य आहे आणि त्यासाठी त्वरित कृती गरजेची आहे. हे संकट प्रत्येकाच्या दारात आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपली भूमिका समजून घेतल्यास, त्याविषयी इतरांशी चर्चा केल्यास आणि परस्परांच्या सहकार्याने सकारात्मक कृती केल्यास ही वसुंधरा आपल्यासाठी आनंददायी अधिवास ठरेल.
वसुंधरेच्या अंगाखाद्यांवर खेळणारे प्राणी-पक्षी, बहरणारे वृक्ष-वेली, खळखळणाऱ्या नद्या हे तिचे वैभव आहे. ते नष्ट होताना तिला होणाऱ्या वेदना आपल्या रोजच्या जीवनाचा भाग होण्याआधी तिची आर्त हाक ओळखून आत्ताच एक पाऊल पुढे टाकू या, आपल्या गावात, शहरात, परिसरातील पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमात सहभागी होऊया…शेवटी आपली एकच वसुंधरा आहे…आपल्याला पोसणारी, वाढवणारी, आपल्या अंगाखांद्यावर खेळवणारी!
-जिल्हा माहिती कार्यालय, पुणे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाकड येथील उद्यानाचे उद्घाटन
पुणे, दि. ३:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाकड येथील तानाजीभाऊ तुकाराम कलाटे उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. पवार यांनी उद्यानाची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी आयुक्त राजेश पाटील, उपायुक्त विकास ढाकणे आणि जितेंद्र वाघ, माजी गृह राज्यमंत्री सचिन अहिर, माजी नगरसेवक आदी उपस्थित होते.

हे संगीत संकल्पनेवरील आधारित महाराष्ट्रातले पहिले उद्यान आहे. यामध्ये रंभा-सांभा, चांम्स्, स्टूल, ड्रम, टंग व डमरु असे संगीत वाद्य आहेत. ४८० चौरस मीटर आकाराचे पियानो सभागृह, लहान मुलांसाठी क्रीडांगण आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. उद्यानाच्या जागेचे क्षेत्रफळ १० हजार चौरस मीटर आहे. ३ हजार ८५० चौरस मीटर क्षेत्रात लॉन असून परिसरात झाडे लावण्यात आली आहेत. जॉगिंग पथ आणि योगा सभागृहाची सुविधादेखील करण्यात आली आहे.

व्हेरॉक वेंगसरकर अकादमीतील पव्हेलिअनचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील थेरगाव गावठाण येथील व्हेरॉक वेंगसरकर अकादमीतील पव्हेलीअनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री.पवार यांनी पव्हेलीअनची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आयुक्त राजेश पाटील, उपायुक्त विकास ढाकणे आणि जितेंद्र वाघ, माजी नगरसेवक आदी उपस्थित होते.
टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडची नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ईपीसी कॉन्ट्रॅक्टर म्हणून निवड
राष्ट्रीय – नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) कामे करण्यासाठी यमुना इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडने (वायआयएपीएल) टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडची निवड केली आहे. पायाभूत सोयीसुविधांच्या प्रचंड मोठ्या प्रकल्पांचे डिझाईन, खरेदी आणि बांधकाम क्षेत्रातील आपला अनुभव ज्यांनी सिद्ध केला आहे अशा तीन निवडण्यात आलेल्या टीम्समधून अखेरीस टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडची निवड करण्यात आली आहे. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड टर्मिनल रनवे, एअरसाईड इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, युटिलिटीज, लॅन्डसाईड सुविधा आणि इतर सहायक इमारतींची उभारणी करेल. पायाभूत सुविधांच्या कुशल उभारणीच्या दीर्घ व यशस्वी अनुभवाच्या बळावर टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडने केलेल्या काही उत्कृष्ट कामांमध्ये नवे संसद भवन, मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक, डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉरचे अनेक भाग आणि मुंबई, पुणे, दिल्ली, लखनौ, अहमदाबाद व चेन्नईसह विविध शहरांमध्ये मेट्रो रेल लाईन्स यांचा समावेश आहे.
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रचनेची प्रेरणा असणार आहे, भारत! उपयोग करणार असलेल्या लोकांसाठी अनुकूल, आधुनिक डिझाईन विकसित करण्यासाठी स्विस तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि भारतीय संस्कृती व आदरातिथ्याचा मिलाप घडवून आणला जाईल. पॅसेंजर टर्मिनलची उभारणी अनेक महत्त्वाचे निकष डोळ्यासमोर ठेवून केली जाईल, यामध्ये कमी आणि कुशल पॅसेंजर फ्लो, डिजिटल सेवा, पर्यावरणावरील परिणाम कमीत कमी असावा यासाठीची वचनबद्धता यांचा समावेश असेल. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील असे विमानतळ बनेल ज्याठिकाणी कुटुंबे/वयस्क व्यक्ती आणि व्यापारासाठी प्रवास करणाऱ्यांना संपर्कविना प्रवास आणि वैयक्तिक सेवा प्रदान केल्या जातील.
यमुना इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्तोफ श्नेलमन यांनी सांगितले, “टाटा प्रोजेक्ट्ससोबत नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम कामांसाठी भागीदारी करून आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हे ईपीसी कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या हाती सोपवून आमच्या प्रकल्पाने पुढील टप्प्यात प्रवेश केला आहे, ज्यामध्ये साईटवर बांधकामाची गती अतिशय वेगाने वाढेल. २०२४ पर्यंत दरवर्षी १२ मिलियन प्रवाशांच्या क्षमतेसह एक पॅसेंजर टर्मिनल, रनवे आणि विमानतळावरील इतर पायाभूत संरचना तयार करण्यासाठी आम्ही टाटा प्रोजेक्ट्ससोबत काम करत आहोत. भारतात एव्हिएशन इकोसिस्टिमच्या सर्वसमावेशक आणि पर्यावरणानुकूल विकासाला सक्षम बनवणे, प्रोत्साहन देणे आणि सुदृढ करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ राज्यासह देशभरात रोजगारसंधी निर्माण करण्याला आणि आर्थिक विकासाला चालना देईल.”
टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे सीईओ आणि नियुक्त एमडी विनायक पै म्हणाले, “आम्हाला जेवरमध्ये ग्रीनफील्ड नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सोपवले गेले याचा अतिशय अभिमान वाटतो. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड भारतातील सर्वात प्रगत आणि पर्यावरणानुकूल विमानतळ नेमून दिलेल्या वेळेत तयार करण्यासाठी वायआयएपीएलसोबत काम करेल. आम्ही गुणवत्ता, सुरक्षा आणि पर्यावरण सुरक्षा यांच्या सर्वोत्कृष्ट मानकांचे पालन करत या विमानतळाच्या बांधकामामध्ये नवीन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.”
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पॅसेंजर टर्मिनलचे लेआऊट कुशल असून डिझाईन अतिशय प्रभावी आहे. याठिकाणी हिरवाईने सजलेली, अनेक उच्च दर्जेदार ठिकाणे तयार केली जातील, ऊर्जेची बचत आणि पर्यावरण अनुकूलता यांचा वास्तविक आणि संतुलित अनुभव याठिकाणी घेता येईल. या विमानतळाच्या डिझाईनमध्ये पर्यावरण अनुकूलतेबरोबरीनेच प्रवाशांची सुविधा आणि भविष्यातील गरजांच्या दृष्टीने लवचिकतेबरोबरीनेच कालातीत डिझाईन यांचा मिलाप घडवून आणला जाईल.
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे डिझाईन पर्यावरणाला अनुकूल व शाश्वत विकासावर आधारित आहे. हे भारतातील पहिले शुद्ध शून्य उत्सर्जन विमानतळ बनेल. आयजीबीसीने प्रमाणित केलेल्या इमारती, रेनवॉटर हार्वेस्टिंग, झिरो लिक्विड डिस्चार्ज सीवेज ट्रीटमेंट प्लांट, कचरा व्यवस्थापन सुविधा यासारख्या हरित पायाभूत संरचनेच्या आवश्यक बाबी ध्यानात ठेवून या विमानतळाची रचना आणि विकास केला जाईल.
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या डिझाईनची प्रेरणा असणार आहे, भारत! यामध्ये असे अनेक रचना घटक समाविष्ट केले जातील जे स्थानिक वास्तुकला दर्शवण्याबरोबरीनेच पर्यावरणाला अनुकूल संचालनात देखील योगदान देतील. उदाहरणार्थ, टर्मिनलच्या सेंट्रल लॅन्डस्केप्ड कोर्टयार्डमध्ये नैसर्गिक प्रकाश आणि व्हेंटिलेशनचा उपयोग केला जाईल, ज्यामुळे उर्जेवर होणारा खर्च आणि कार्बन उत्सर्जन कमी होईल. कॅम्पस लँडस्केपिंगचा उद्देश फक्त सौंदर्य वाढवण्यापुरता नसेल तर त्यातून उपयोग मूल्य देखील निर्माण केले जाईल.
इतर स्थानिक डिझाईन घटकांमध्ये वाराणसी आणि हरिद्वारच्या प्रसिद्ध घाटांप्रमाणे टर्मिनल फोरकोर्टवर लोकांचे स्वागत आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी पायऱ्यांच्या फ्लाईट्स असतील. कोर्टयार्डला हवेलीचे रंगरूप दिले जाईल, ज्यामुळे टर्मिनल इमारतीमध्ये ताजी हवा व सूर्यप्रकाश खेळता राहील. राज्यातील महत्त्वाच्या नद्यांपासून प्रेरणा घेत सफेद, पारदर्शी, वळणदार छत नदीप्रमाणे आभास निर्माण करेल. पॅसेंजर टर्मिनलमध्ये भारतीय वास्तुकलेपासून प्रेरणा घेऊन तयार केलेले नक्षीदार सजावटीचे जाळीदार स्क्रीन्स असतील. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ उत्तर प्रदेश राज्यात प्रवेश करतानाचा भव्य, शानदार अनुभव प्रदान करेल.
झ्युरिक एअरपोर्ट इंटरनॅशनल एजीने विमानतळ विकासाच्या कामाची बोली २०१९ साली जिंकली आणि तेव्हापासून आजतागायत विमानतळाच्या विकासकामात अनेक महत्त्वाचे टप्पे पार केले आहेत. यामध्ये सुरक्षा अनुमती, कन्सेशन अग्रीमेंटवर स्वाक्षऱ्या, आर्किटेक्ट्सची निवड, ब्रँड आयडेंटिटीचा शुभारंभ, समभागधारक आणि राज्य सहायता करारांवर स्वाक्षऱ्या, मास्टरप्लॅन आणि विकास प्लॅनला अनुमती, एसबीआयसोबत फायनान्शियल क्लोज, विमानळावर सीएनएस-एटीएम सेवांसाठी एएआयसह आणि फ्युएल फार्मची रचना, उभारणी आणि संचालन यासाठी कन्सेशनेरची निवड यांचा समावेश आहे. कन्सेशनचा कालावधी अधिकृतरीत्या १ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु झाला आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ झाल्यानंतर साईटवर मातीकाम आणि बाउंड्री बांधण्याचे काम यांच्यासह ईपीसी कामांची तयारी सुरु झाली आहे. आता ईपीसी कंत्राट दिले गेले आहे, विमानतळाचा पहिला टप्पा कन्सेशन कालावधी सुरु झाल्यापासून तीन वर्षांच्या आत पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
