Home Blog Page 1968

स्वयंसहाय्यता गटातील महिलांच्या मुलांकरिता मोफत ई- लर्निग ॲप

0

मुंबई, दि. ३ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि स्माईल्स फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करारातून राज्यातील लाखो महिलांच्या शालेय शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना बायजूज या कंपनीचे प्रीमियम दर्जाचे ई-लर्निग ॲप मोफत दिले जाणार आहे, अशी माहिती ग्राम विकास व पंचायती राज विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिली.

राज्याच्या ग्रामीण भागातील सामान्य आर्थिक परिस्थिती असणाऱ्या महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणे हे महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाचे ध्येय आहे. यासाठी त्यांच्या उत्पन्न वाढीसोबतच त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांचे जीवनमान उंचावणे देखील महत्वाचे आहे. यासाठी स्माईल्स फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे, असे श्री.राजेशकुमार यांनी असे सांगुन विभागाच्यावतीने त्यांचे अभिनंदन केले.

अभियानाचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांनी यावेळी या करारातून ग्रामीण क्षेत्रातील महिलांच्या ४ थी ते १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना हे ऍप मिळणार आहे. तसेच या ऍप मुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील रुची वाढेल आणि गुणवत्ता वाढीस मदत होईल, असे सांगितले.

स्माईल्स फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती उमा आहुजा आणि धीरज आहुजा यांना अपर मुख्य सचिव यांचे हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. फाउंडेशनच्या वतीने धीरज आहुजा यांनी राज्यभर ग्रामीण महिलांसाठी कार्य करणार असल्याचे सांगितले. ग्रामीण विद्यार्थ्यांना या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देत असल्याबद्दल स्माईल्स फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांना अभिमान आहे, भविष्यातही उमेद अभियानाच्या उपक्रमांमध्ये आमचा सक्रिय सहभाग असेल, असे सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपळे सौदागर क्रीडांगणाचे उद्घाटन

पुणे, दि. ३:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपळे सौदागर येथील अखिल भारतीय कबड्डी पंच स्व. बाळासाहेब बाजीराव कुंजीर क्रीडांगणाचे उद्घाटन तसेच पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणेचे भूमिपूजन करण्यात आले. श्री.पवार यांनी क्रीडांगणाची पाहणी करून माहिती घेतली.

क्रीडांगणात मिनी फुटबॉल मैदान, क्रिकेट पिच, मैदानाभोवती चालण्याचा पथ आणि टेनिस कोर्ट तयार करण्यात आले आहे. स्पोर्ट्स कक्ष व स्टेडियम पद्धतीची बैठक आदी व्यवस्थाही करण्यात आली आहे.

मनपा क्षेत्रातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या कामाचा शुभारंभ

श्री.पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातर्फे ८८ चौकाकरीता २९७ सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात आले आहे. मनपाने २ हजार २०० कॅमेरे तर स्मार्ट सिटी अंतर्गत ४३० चौकाकरीता २०९३ कॅमेरे बसविण्यात आले आहेत.  हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मनपा क्षेत्रात  ७ हजार ६०० कॅमेरे कार्यान्वित होणार आहेत.

पुणे विधानभवनावर बसपाचा विराट आक्रोश मोर्चा तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

पुणे– बहुजन समाज पार्टी, पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्यांसंबंधी शुक्रवारी पुणे विधानभवनावर ‘विराट आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.आंदोलनानिमित्त एकत्रित झालेल्या शेकडो कॅडरच्या हातातील झेंड्यांमुळे पुणे शहर ‘निळं’ झाले होते.सकाळी पुणे स्टेशन जवळील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत मोर्चाला सुरूवात करण्यात आली होती.बसपाचे प्रदेश प्रभारी नितीन सिंह ,प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांच्या मार्गदर्शनात प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने , प्रदेश प्रभारी हुलगेश भाई चलवादी यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.दुपारी बसपाच्या शिष्टमंडळाच्या वतीने पुणे विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

पेट्रोल-डिझेलवरील कर कपात करण्यात आली असली तरी महागाईने जनता होरपळत आहे. गॅस चे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत.त्यामुळे यासर्व वस्तूंचे दर कमी करावे आणि महामगाईच्या दृष्टचक्रातून सत्ताधाऱ्यांनी ‘सर्वजनांना’ बाहेर काढावे,असे आवाहन यावेळी प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. मध्यंतरी राजकीय फायद्यासाठी अतित्व शून्य राजकारण्यांकडून राज्यभरासह देशातील धार्मिक वातावरण कलुषीत करण्यासाठी ‘भोंग्यां’चा मुद्दा काढण्यात आला होता. या ‘राज’कारणामुळे देशभरातील एका विशिष्ट धर्मबांधवांमध्ये असुरक्षेची भावना आहे.धार्मिक द्वेष परसरवण्यासाठी हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.असे मुद्दे उपस्थित करीत द्वेष पसरवणाणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील यानिमित्ताने अँड.ताजने यांनी केली.

मोर्चात प्रदेश महासचिव सुदीप गायकवाड,अजित ठोकळे, मा.सुरेश गायकवाड,शीतलताई गायकवाड,बाळासाहेब आव्हारे,आप्पा लोकरे, जिल्हा प्रभारी रमेश अप्पा गायकवाड, मेहमूद जकाते, अशोक गायकवाड, संजय सेंगडे, बापू कुदळे, जिल्हा उपाध्यक्ष धम्मदीप लगाडे, महिला जिल्हाध्यक्ष निधी वैद्य, शहराध्यक्ष सुरेखा कांबळे, युवक आघाडी अध्यक्ष पुणे शहर सिद्धार्थ कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.

दलितांवर अन्याय करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा-नितीन सिंह
पुरोगामी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात दलितांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. गावोगावात दलितांविरोधात सुडाचे राजकारण केले जात आहे.अशात दलितांवर होणारे अन्यायाविरोधात प्रभावी पावले टाकत अत्याचार करणार्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी यावेळी प्रदेश प्रभारी नितीन सिंह यांच्यावतीने करण्यात आली. बहुजनांसह सर्वजनांच्या हितासाठी स्थापन झालेल्या बहुजन समाज पार्टीच्या सामाजिक विचारधारेनूसारच दलितांवरील अत्याचारात घट होवू शकते, असे सिंह म्हणाले. राज्यातील ओबीसी आरक्षण पुर्ववत करावे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात यावी, बेरोजगारी दूर करण्यासाठी १६ कोटी सरकारी नोकर भरती करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

तीव्र आंदोलन उभारणार-रैना
विविध मागण्यांसाठी प्रतिनिधित्व स्वरुपात शेकडो आंदोलक एकत्रित झाले होते. पंरतु, मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात आल्या नाही तर याहून ही मोठे आंदोलन उभारू असा सूचक इशारा यावेळी प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांनी दिला.बहुजन समाज पार्टीचा प्रत्येक कॅडरमध्ये समाजहिताच्या अनुषंगाने न्यायशील ‘हत्ती’चे बळ आहे.समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत संघर्ष करण्यासाठी कॅडर सदैव तत्पर असतात. येत्या काळात बसपाची शक्ती सर्वांनाच दिसून येईल, असे प्रतिपादन रैना यांनी यावेळी केले.  

बहुजनांच्या न्याय हक्कासाठी ‘आक्रोश मोर्चा’-चलवादी
महागाईने होरपळणारे गोरगरीब, झोपडपट्टीधारक यांसह बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता, अशी माहिती प्रदेश प्रभारी हुलगेशभाई चलवादी यांनी दिली.कंत्राटी कामगार कायदे रद्द करावे तसेच महार वतानांच्या जमिनी बळकवणार्या धनदांडग्यांपासून वतनाच्या जमिनी मुक्त करीत मूळ मालकांना देण्यासाठी शासनाने निर्णय करावा, झोपडपट्टीधारकांना ५०० चौरस फुटांचे घर द्यावे, उच्च न्यायालयाने मुस्लिमांना दिलेल्या ५% आरक्षणाची अंमलबजावणी करावी तसेच पुणे मनपामध्ये समान पाणी वाटप करीत शहराला टॅंकरमुक्त करण्याची मागणी चलवादी यांच्याकडून करण्यात आली.

‘बेटी बचाव बेटी पढाओ’ शिल्प प्रेरणादायी ठरेल-राज्यमंत्री आदिती तटकरे

पुणे दि.३- मुली आणि महिलांच्या प्रगतीशील वाटचालीचे उद्दीष्ट समोर ठेऊन तळेगाव दाभाडे नगर परिषद क्षेत्रात उभारण्यात आलेले ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ शिल्प प्रेरणादायी ठरेल. या शिल्पाची प्रतिकृती आपल्याही भागात उभारू, असे प्रतिपादन पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात उभारण्यात आलेल्या ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ शिल्पाच्या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला आमदार सुनिल शेळके, बबन भेगडे, गणेश खांडगे, तहसिलदार मधुसुदन बर्गे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री कु.तटकरे म्हणाल्या, एखाद्या भागातील चांगल्या विकासकामांचे अनुसरण इतर भागातही होणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी चांगल्या कामांची माहिती घेतल्यास आपल्या भागात चांगली कामे करता येतील. मावळ परिसरात वेगाने विकासकामे होत आहेत. जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकप्रतिनीधी म्हणून आपण केलेल्या कामावर पुढे संधी मिळते, असे त्यांनी सांगितले.

महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण मिळाल्याने जनतेचे काम करण्याची संधी मिळाली आहे. ही संधी मिळाल्यानंतर आपल्या कामावर यश अवलंबून असते, असेही त्या म्हणाल्या.

आमदार शेळके म्हणाले, स्त्री भृणहत्या थांबली पाहिजे, मुलींना शिक्षण मिळायला हवे आणि त्यांना स्वावलंबी करायला हवे. समाजामध्ये ही बाब रुजविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. विशेषत: ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण मिळावे यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील.

संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज

0

हवामान विभागाने यावर्षी 100 टक्के पेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. ही कृषी व अन्य क्षेत्रांसाठी सुखावणारी बाब आहे. असे असले तरी कमी कालावधीत जास्त पाऊस पडणे, ढगफुटी सदृश पाऊस पडणे, धरण क्षेत्रात अतिवृष्टी यामुळे पूरस्थिती निर्माण होते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी अथवा संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासन सज्ज असून याबाबतचे योग्य नियोजन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संभाव्य पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. याबाबतच्या जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावरच्या बैठका, कर्नाटक राज्याशी असलेला समन्वय, जलसंपदा व अन्य संबंधित विभागाने केलेली तयारी यामुळे संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर निश्चितपणे मात करण्यात येईल. सन 2019 व 2021 या वर्षीच्या आलेल्या महापुराचा फार मोठा अनुभव प्रशासनाच्या पाठीशी आहे. सन 2021 मध्ये महापूर आला पण कर्नाटक राज्याच्या प्रशासनासी केलेला योग्य समन्वय, धरणातील पाण्याच्या विसर्गाचे केलेले नियोजन यामुळे महाप्रलय टाळण्यात यश आले. हाच विश्वास बाळगून जिल्हा प्रशासन सांगली जिल्ह्यात संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले आहे.

नैसर्गिक आपत्ती बाबत त्वरित माहिती मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण कार्यालय सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी 24 x 7 नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्यासाठी  1077 हा टोल फ्री क्रमांक ही  देण्यात आला आहे. तसेच 0233-2600500 या क्रमांकावर माहिती ही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तालुका पातळीवरील सर्व तहसील कार्यालयात आपत्ती नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहेत. गावपातळीवरील निष्णात पोहणाऱ्यांची यादी संकलित करुन त्यांचे दूरध्वनी क्रमांकही आपत्ती नियंत्रण केंद्रात उपलब्ध ठेवले आहेत.

पूरबाधित गावांची संख्या 104

जिल्ह्यात 104 गावे पूरबाधित क्षेत्रात येतात. जिल्ह्यामधील 10 तालुक्यांपैकी शिराळा वाळवा, पलूस व मिरज या चार तालुक्यातून वारणा व कृष्णा नदीचा प्रवाह असल्यामुळे पुराच्या पाण्याचा फटका अधिक बसतो. जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नदी काठाजवळील 104 गावांबाबत तसेच महानगरपालिका क्षेत्रात विशेष दक्षता प्रशासनाने घेतली असून जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. सांग़ली जिल्ह्यामध्ये एकूण १०४ पूर प्रवण गावामध्ये गाव आपत्ती प्रतिसाद दल गठित करण्यात आलेले आहे. सन २०१९ व सन २०२२ चा महापूरचा अनुभव लक्षात घेता संभाव्य आपत्तीस सामोरे जाण्यासाठी पूर प्रवण तालुक्यात एन.डी.आर.एफ. पुणे यांचे वतीने प्रशिक्षण संपन्न झाले आहे. या प्रशिक्षणामध्ये आपत्तीची ओळख, शोध व सुटका पध्दती, प्रथमोपचार पध्दती, बोट चालविणे इत्यादी प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण महानगरपालिका क्षेत्रातील स्थानिक स्वंयसेवी संस्था प्रतिनिधींनाही देण्यात आले आहे.

आयर्विन पुलाच्या ठिकाणी सर्व साधारण पूर पातळी (फुटांमध्ये) 35, इशारा पातळी-40, धोकादायक पातळी-45 निश्चित करण्यात आली आहे. सन 2019 मधील उच्चतम पातळी-57.6 फूट होती.  ताकारी पुलाच्या ठिकाणी सर्व साधारण पूर पातळी (फुटांमध्ये) 39, इशारा पातळी-44, धोकादायक पातळी-46, सन 2019 मधील उच्चतम पातळी-68.8 फूट होती. बहे पुलाच्या ठिकाणी सर्वसाधारण पूर पातळी (फुटांमध्ये) 17, इशारा पातळी-21.9, धोकादायक पातळी-23.7, सन 2019 मधील उच्चतम पातळी-36.6 फूट होती. भिलवडी पुलाच्या ठिकाणी सर्वसाधारण पूर पातळी (फुटांमध्ये) 46, इशारा पातळी-51 धोकादायक पातळी-53, सन 2019 मधील उच्चतम पातळी-64.6 फूट होती. तर अंकली पुलाच्या ठिकाणी सर्व साधारण पूर पातळी (फुटांमध्ये) 40, इशारा पातळी-45.11, धोकादायक पातळी-50.3, सन 2019 मधील उच्चतम पातळी-62.4. इतकी होती.

पूरनियंत्रणासाठी उपलब्ध साधनसामुग्री

पूरनियंत्रणासाठी जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेकडे 9 बोटी, जिल्हा परिषदेकडे-55 बोटी, महसूल विभागाकडे 19 बोटी अशा एकुण 83 बोटी उपलब्ध आहेत. मिरज तालुक्यातील 17 गावांमध्ये लाईफ जॅकेट- 170, टॉर्च- 34, रोप-51, बॅग-51,मेगा फोन-17, लाईफ रिंग-51, पलूस तालुक्यातील 21 गावांमध्ये लाईफ जॅकेट- 210, टॉर्च- 42, रोप-63, बॅग-63,मेगा फोन-21, लाईफ रिंग-63, वाळवा तालुक्यातील 31गावांमध्ये लाईफ जॅकेट-310, टॉर्च-62, रोप-93, बॅग-93,मेगा फोन-31, लाईफ रिंग-93, शिराळा तालुक्यातील 6 गावांमध्ये लाईफ जॅकेट- 60, टॉर्च- 12, रोप-18, बॅग-18,मेगा फोन-6, लाईफ रिंग-18, साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. त्याबरोबरच जिल्हा प्रशासनाने पुर्व तयारीच्या अनुषंगाने एन.डी.आर.एफ पुणे यांच्याकडील 2 पथके यामध्ये 25 जवान व 5 बोटी प्रत्येकी दिनांक 15 जूलै ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यात उपलब्ध राहणार आहेत.

पाटबंधारे विभागाची यंत्रणा सतर्क

जिल्ह्यामध्ये व धरणाच्या परिसरात पडणाऱ्या पावसाची माहिती तसेच धरणातील पाण्याच्या साठ्याची माहिती संकलित करून दररोज किती पाणी धरणातून सोडण्यात येणार आहे. नदीच्या पाण्याची पातळी किती आहे याची माहिती नियंत्रण कक्षाला वेळच्या वेळी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्नाटकातील आलमट्टी धरण नियंत्रण प्रशासन यांच्याबरोबर समन्वय ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील आर्यविन पूल, बहे पूल, ताकारी पूल, भिलवडी पूल, अंकली पूल येथील नद्यांच्या धोका पातळीची माहिती व इशारा अद्यावतपणे देण्यासाठी यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. सांगली पाटबंधारे विभाग, सांगली येथे दि. 1 जून 2022 पासून मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष सुरू झाला आहे. या अंतर्गत कृष्णा उपखोऱ्यातील माहिती एकत्रित करून प्रशासन, प्रसार माध्यमे यांना संबंधित यंत्रणामार्फत उपलब्ध करून दिली जाते. या नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 0233-2301820/2302925फॅक्स क्रमांक 0233-2302750मोबाईल क्रमांक 9307862396 असा आहे. हा पूरनियंत्रण कक्ष दि. 1 जून ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत अखंडित कार्यरत ठेवण्यात येणार आहे. तसेच महापूर रोखण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत कृष्णा व भीमा खोऱ्‍यासाठी एककालिक आधार सामग्री अधिग्रहण प्रणाली (Real Time Data Acquisition System) ही प्रणाली अधिक सक्षम करण्यात आली आहे. या प्रणालीव्दारे पर्जन्यमान, जलाशयातील येवा, नदीची पाणी पातळी व विसर्ग यांची सध्यस्थिती व पूर्वानुमान उपलब्ध होते. याचा उपयोग करून सन 2021 मधील महापूरात जीवितहानी व मोठ्या प्रमाणात  वित्तहानी टाळण्यास मदत झाली होती.

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका सज्ज

संभाव्य पूरपरिस्थतीचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिका सज्ज असून शहरात पॅचवर्क चे काम सुरू करण्यात आले आहे. आवश्यक ठिकाणी मुरूमाचे रस्ते करण्याची कार्यवाही सुरू आहे. धोकादायक इमारतींचे सर्व्हेक्षण पूर्ण झालेले आहे. विभागनिहाय 24×7 पथके तयार करण्यात आली आहेत. महापालिका क्षेत्रात सुमारे 92 नाले असून यांची साफसफाई सुरू आहे. शहरातील खुले भूखंड तसेच विनावापर मालमत्ता यांचीही सफाई करण्यात येणार आहे. निवारा केंद्रांचीही निश्चिती करण्यात आली आहे. पूरकाळात शवदहनाचा प्रश्न गंभीर होतो यासाठी कुपवाड येथील 8 स्मशानभूमी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. शहरात आपत्ती मित्र ही संकल्पना राबविण्यात येत असून या अंतर्गत आत्तापर्यंत 200 जणांनी आपत्ती मित्र म्हणून नोंदणी केली आहे. तसेच आपत्ती मित्र ॲप ही महापालिकेकडून तयार करण्यात आले आहे. या ॲपवर महापालिकेची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

         पोलीस मुख्यालयात नियंत्रण कक्ष सुरू

लोकांना त्वरीत नैसर्गिक आपत्तीत घडलेल्या घटनांची माहिती व्हावी यासाठी पोलीस मुख्यालयातही नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्र.. 0233-2672100 असा आहे. पोलीस विभागानेही अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून तालुकापातळीवरही यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

औषधे व धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध

पुराच्या काळात रोगराई व साथीचे आजार  पसरू नये यासाठी आरोग्य विभागाने यंत्रणा सज्ज ठेवली असून औषधांचा पुरेशा प्रमाणात साठा तसेच वैद्यकीय अधिकाऱ्याचे पथकही त्या त्या भागात नियुक्त करण्यात आले आहे. तसेच पूरग्रस्त गावातील लोकासांठी पुरेशा प्रमाणात धान्याचा साठाही सुरक्षित ठिकाणी करण्यात आला आहे. पूरग्रस्त कुटुंबांना स्थलांतर करण्याची वेळ आली तर त्यासाठी सुरक्षित निवासाची व्यवस्था ही करण्यात आली आहे. जनावरांना सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी त्या त्या परिसरात शाळा व सार्वजनिक ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

याबरोबरच बांधकाम, टेलिफोन, विद्युत विभागांनीही त्यांच्यास्तरावर जय्यत तयारी केली आहे. संभाव्य पूरपरिस्थिती उद्भवल्यास प्रशासन अहोरात्र यासाठी उपलब्ध राहणार आहेच. तरीही जनतेनेही प्रशासनास सहकार्य करून प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंतीदिन १ जुलै रोजी कृषि दिन म्हणून कायमस्वरूपी साजरा होणार

0

मुंबई, दि. 3 : माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त 1 जुलै हा दिवस राज्यात कृषि दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यास कायमस्वरुपी शासन मान्यता देण्यात आली आहे. कृषि विभागाने याबाबतचा शासन निर्णय दि. 31 मे रोजी निर्गमित केला आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेवून त्यांची जयंती 1 जुलै रोजी राज्यात कृषि दिन म्हणून साजरी केली जाते. कृषि दिनानिमित्त प्रत्येक पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद मुख्यालयी कृषिदिन साजरा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून कृषि दिनानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन, चित्रफिती दाखविणे, जिल्हा परिषद स्तरावर कृषि विषयक प्रदर्शन आयोजित करता येणार आहेत.

वनसंरक्षण व संवर्धन ही काळाची गरज

0

संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगात चारशे वर्षांपूर्वी समाजाला “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” असा संदेश दिला असून यातूनच सर्वांचे हित आहे. सर्वांचे भवितव्य सुधारेल आणि जीवन सुलभही होईल. आपल्यासाठी आणि आपल्या भावी पिढीसाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील असायला हवे. यामुळे आपल्या राज्यावर येणारी अनेक नैसर्गिक संकटे रोखता येतील आणि शाश्वत विकासही प्रत्यक्षात साधता येईल.

पर्यावरणीय जीवनचक्रातील प्रत्येक घटक हा एकमेकांवर अवलंबून असतो. त्याप्रमाणेच मानव हा आधीपासूनच जंगलांवर अवलंबून होता. पूर्वी तो कंदमुळे खाऊन जगत होता तर आज कृषी घटकांवर. मानवी जीवन सुखकर करायचे असेल तर मानवाला बदलावे लागेल. वाढत चाललेली लोकसंख्या, औद्योगिकीकरण, नागरिकीकरण, मुलभूत सोयीसुविधा यासाठी वनांवर दिवसेंदिवस ताण पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी, मानवाच्या अस्तित्वासाठी वन संरक्षण व संवर्धन ही काळाची गरज आहे.

सरकारच्या दोन वर्षाच्या कालावधीत अनेक महत्वाचे निर्णय घेऊन त्याची यशस्वी अंमलबजावणी वन विभागाने केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबईतील आरे येथील 808 एकर क्षेत्र राखीव वन म्हणून घोषित, तिलारी संवर्धन राखीव वनक्षेत्र घोषित, वन/ निसर्ग पर्यटनाला चालना, हरित महाराष्ट्र अभियान, वन महोत्सव,१०२० हेक्टर कांदळवन क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित, पांढरी चिप्पी राज्य कांदळवन वृक्ष म्हणून घोषित, भीमाशंकर व राधानगरी अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर,  लोणार सरोवर रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित, गणेशखिंड पुणे व लांडोरखोरी जळगाव हे जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित, व्याघ्र संवर्धन ,कांदळवन  संवर्धनासाठी उपाययोजना असे  अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन वन व वन्यजीव यांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करण्यात आले आहे.

आरे मधील क्षेत्र राखीव वन म्हणून घोषीत

मुंबई शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच मुंबई उपनगरात उपलब्ध असलेला झाडोरा, वनांचे क्षेत्र याचे अधिक सक्षमपणे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी मौजे आरे, गोरेगाव व मोरोशी येथील एकूण 327.201 हे.आर क्षेत्र राखीव वन म्हणून घोषित केले आहे. सदर अधिसूचित 327.201 हे.आर क्षेत्रापैकी 40.469 हे.आर क्षेत्र वन विभागाच्या व उर्वरित 286.732 हे.आर क्षेत्र दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या ताब्यात होते. त्यानुसार सदर क्षेत्र दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडून वनसंरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली यांनी ताब्यात घेतले आहे.

नवीन संवर्धन राखीव क्षेत्र/ नवीन अभयारण्य/जैविक विविधता वारसास्थळे

परिस्थितीकीय, प्राणीजातीय व वनस्पती विषयक महत्व असलेल्या कारणाने, संबंधित क्षेत्रातील प्राणीजातींचे व वनस्पतींचे तसेच त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या प्रयोजनार्थ पुढीलप्रमाणे नवीन संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. तिलारी़ ,जोर-जांभळी ,आंबोली-दोडामार्ग ,विशाळगड पन्हाळगड,  मायणी पक्षी ,चंदगड ,मुनिया संवर्धन राखीव

चंद्रपूर जिल्हयातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या दक्षिणेकडील क्षेत्र म्हणजे लोहारा-जुनोना-कारवा हे वनक्षेत्र व पुढे कोठारी-तोहोगाव-झरण-कन्हारगाव-धाबा या वनक्षेत्रात वाघांचे अधिवास व भ्रमण मार्ग असल्यामुळे मध्य चांदा वन विभाग व मध्य चांदा वन प्रकल्प विभाग, बल्लारशाह या विभागाकडील 269.40 चौ.कि.मी. क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.पर्यावरणाच्या दृष्टीने कांदळवनांचे महत्व लक्षात घेऊन शासकीय जमिनीवरील 1020.33 हेक्टर कांदळवन क्षेत्र  भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 29 अन्वये अंतिमत: राखीव वन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तशी अधिसुचना 27 ऑक्टोबर 2020 रोजी निर्गमित झाली आहे.

कांदळवन हे सागरी किनारपट्टीचे रक्षण तर करतातच परंतू यात संपन्न जैवविविधता दडलेली आहे. पर्यावरण रक्षणातील कांदळवनांचे हेच महत्व लक्षात घेऊन सफेद चिप्पी या कांदळवन वृक्षाच्या प्रजातीला ” राज्य कांदळवन वृक्ष” म्हणून दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे कांदळवन संरक्षणाला अधिक बळकटी येऊन लोकांमध्ये कांदळवन रक्षणासाठी जनजागृती करणे सोयीचे होणार आहे. राज्य कांदळवन वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.

सन 2019- 20 या वर्षात पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन प्राधिकरण ( कॅम्पा) अंतर्गत कामे करण्यासाठी 189 कोटी रुपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली होती. विधिमंडळ अधिवेशनात वित्त विभागाने वनविभागास 189  कोटी रुपये पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर केले होते. त्यापैकी 151 कोटी रुपये निधी  पर्यायी वनीकरण , अंतर्गत ग्रामीण भागातील वणवा प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करणे, गॅस वाटप करणे तसेच जलसंधारणाची कामे करणे यासाठी  प्राधान्याने वापरण्यात आला आहे.सन 2020-21 या वर्षात कॅम्पा अंतर्गत कामे करण्यासाठी 534 कोटी रुपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली होती. या पैकी 104 कोटी रुपये वितरीत करण्यात आले.

वृक्षांचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांची लागवड वाढावी म्हणून हरित महाराष्ट्र अभियान व वन महोत्सवाचे 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत यशस्वी आयोजन करण्यात आले होते.या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. नागपूर वनविभागाचे सेमिनरी हिल स्थित ट्रान्झीट ट्रिटमेंट सेंटरच्या धर्तीवर राज्यात अकरा वन वृतात किमान एक प्राणी बचाव पथक व तात्पुरते प्राणी उपचार केंद्र ( ट्रान्झीट ट्रिटमेंट सेंटर) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जैविक विविधता अधिनियम 2002 व त्या अंतर्गत जैविक विविधता नियम 2008 चे कलम 37 व नियम 22 नुसार गणेश खिंड गार्डन,पुणे येथील 33.01 हेक्टर क्षेत्र व लांडोरखोरी, जळगाव येथील 48.08 हेक्टर क्षेत्र जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

भीमाशंकर व राधानगरी अभयारण्य ‘पर्यावरण संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबतची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता दरवर्षी 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. पक्षी हा निसर्गातील जैवसाखळी व जैवविविधता मधील महत्वाचा घटक आहे. या सप्ताहामुळे पक्षी संरक्षण, संवर्धन, पक्षांच्या विविध जाती, पक्षांचे स्थलांतर व पक्षांचे महत्व याबाबत निश्चितच नागरिकांमध्ये जागृती होण्यास मदत होईल.

कांदळवन प्रतिष्ठान मार्फत विविध संस्थांच्या संशोधन प्रकल्पास अनुदान मंजूर केले. यात डॉल्फिन व व्हेल अभ्यास(16 लक्ष),सागरी कासवांचा अभ्यास(10 लक्ष),गोबीड मासे अभ्यास(12 लक्ष) पाणमांजर व  मगरींचा अभ्यास (6 लक्ष) निधी मंजूर केला आहे.  सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आम्ही कांदळवन लागवड वाढवत आहोत.

10 हेक्टर लागवडचा करारनामा युनायटेड वे मुंबई (United Way Mumbai) यांच्या सोबत केला आहे.  कांदळवन संरक्षणासाठी 117 सुरक्षा रक्षक आहेत, त्यात वाढ करून 183 करण्याचा निर्णय घेण्यात आला.भांडुप येथील कांदळवन क्षेत्र पक्षी निरीक्षणासाठी विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याकरिता इंटरप्रिटेशन सेंटर व स्वागत कमान उभारण्यात येण्याचे ठरले. राज्यातील आंतरराष्ट्रीय महत्व असलेले लोणार सरोवर आता राज्यातील दुसरे तर देशातील एकेचाळीसवे रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने वन विभागाचे 7 पर्यटन संकुल महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.या माध्यमातून वन विभाग व पर्यटन विभाग यांचे समन्वयातून पर्यटकांना सुंदर पॅकेजच्या स्वरूपात वन व निसर्ग पर्यटन करता येणार आहे.

राज्याच्या वन विभागात जलद कृती दलाची स्थापना करणे आणि त्यासाठी अतिरिक्त पदे निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मानव व्याघ्र संघर्षावर उपाययोजना सुचविण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या अभ्यासगटाने  सादर केलेल्या अहवालातील शिफारशीस मंजुरी देण्यात आली. यात चार क्षेत्रांची निश्चिती करण्यात आली असून समितीने क्षेत्रनिहाय  महत्वाच्या शिफारसी केल्या आहेत. यामध्ये राज्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

अंधारी अभयारण्याचे क्षेत्र 78.79 वर्ग कि. मी. ने वाढवले ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अंधारी अभयारण्य क्षेत्राचे विस्तारीकरण करणे आणि वाढ झालेले क्षेत्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात समाविष्ट करण्यास देखील मान्यता देण्यात आली. अंधारी वन्यजीव अभयारण्य हे एकूण 509.27 वर्ग कि.मी क्षेत्रावर पसरलेले आहे. या अभयारण्याला लागून असलेल्या बफर क्षेत्रात देखील उत्तम वनाच्छादन असून हे क्षेत्र जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे उत्तर पूर्व वनक्षेत्रात वाघांचा चांगला वावर आहे त्यामुळे अभयारण्याचा एकूण 78.89 वर्ग कि.मी  क्षेत्राने विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या रस्ता दुभाजकामुळे वाघांसह, वन्यजीव अपघातात बळी पडत आहेत, हे टाळण्यासाठी केंद्राच्या संबंधित यंत्रणेला कळविण्यात आले आहे. तसेच रेल्वे मार्गामुळे होणारे अपघात टाळण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. जंगलावर अवलंबून असणाऱ्यांना, वनक्षेत्र लगतच्या परिसरातील स्थानिकांना विविध विभागांच्या योजनांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी अंतर्गत रस्त्यांची कामे दर्जेदार करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. 

मेळघाट व्याघ्र प्रकल्प, नवेगाव -नागझिरा,  ताडोबा-अंधारी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पेंच-बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्थानिकांसाठीच्या योजना त्यामध्ये रोजगार संधी, पर्यटन सुविधा, जाणीव जागृती, निसर्ग शिक्षण तसेच पायाभूत विकास कामे, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी वन विभागा सातत्याने प्रयत्न करीत आहे

राजू धोत्रे

विभागीय संपर्क अधिकारी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

डीवाय पाटील पुरस्कृत 16व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एन हर्षिनी,अस्मि आडकर,प्रणव रेथीन आरएस,क्रिश त्यागी यांचा अंतिम फेरीत प्रवेश

0

कोल्हापूर -: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित व डीवाय पाटील पुरस्कृत 16व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात कर्नाटकाच्या एन हर्षिनी, महाराष्ट्राच्या अस्मि आडकर,  यांनी तर, मुलांच्या गटात तामिळनाडूच्या प्रणव रेथीन आरएस, कर्नाटकाच्या क्रिश त्यागी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर विजय मिळवत अंतिम  फेरीत प्रवेश केला. 

कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलींच्या गटात कर्नाटकाच्या बिगरमानांकीत एन हर्षिनी हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत दुसऱ्या मानांकित कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवचा टायब्रेकमध्ये 7-6(5) ,3-6,6-3 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. पुण्याच्या दहाव्या मानांकित अस्मि  आडकरने नवव्या मानांकित महाराष्ट्राच्या आकृती सोनकुसरेचा 4-6,6-1,6-0 असा तीन सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.  

मुलांच्या गटात तामिळनाडूच्या आठव्या मानांकित प्रणव रेथिन आरएस याने हरियाणाच्या चौथ्या मानांकित तेजस आहुजाचे आव्हान 6-1,6-2 असे सहज संपुष्टात आणले. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अव्वल मानांकित कर्नाटकाच्या क्रिश त्यागीने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत  आपलाच राज्य सहकारी तेराव्या मानांकित तनुष घिडयालचा 6-1,6-0 असा पराभव केला. 

निकाल: उपांत्य फेरी: मुली
एन हर्षिनी(कर्नाटक)वि.वि.ऐश्वर्या जाधव(महा)(2) 7-6(5) ,3-6,6-3

अस्मि  आडकर(महा)(10)वि.वि. आकृती सोनकुसरे(महा)(9) 4-6,6-1,6-0

मुले:
क्रिश त्यागी(कर्नाटक)(1)वि.वि. तनुष घिडयाल(कर्नाटक)(13)6-1,6-0 

प्रणव रेथिन आरएस(तामिळनाडू)(8)वि.वि.तेजस आहुजा(हरयाणा)(4) 6-1,6-2

पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरक्षा ठेवीच्या व्याजापोटी ८० लाख वीजग्राहकांना ११५ कोटींचा परतावा

0

पुणे – महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील उच्च व लघुदाब वर्गवारीतील ८० लाख ४१ हजार १८९ ग्राहकांना ११४ कोटी ६६ लाख रुपयांचा परतावा देण्यात येत आहे. यामध्ये मे महिन्याच्या वीजबिलांमध्ये ९२ कोटी ६३ लाख रुपयांचा परतावा समायोजित करण्यात आला आहे तर जून महिन्याच्या बिलामध्ये उर्वरित २२ कोटी ३ लाख रुपयांचा परतावा देण्यात येत आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीजग्राहकांना सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. याआधीची जमा असलेली सुरक्षा ठेव व वीजवापरानुसार नव्याने निर्धारीत करण्यात आलेली सुरक्षा ठेव यांच्यातील फरकाची रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येते. यापूर्वी सुरक्षा ठेव सरासरी एका बिलाच्या रकमेइतकी होती. आता वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे.

तसेच विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर आरबीआयच्या दराच्या सममूल्य दराने ग्राहकांना व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून अदा करण्यात येते. त्याप्रमाणे सन २०२१-२२ मध्ये पुणे प्रादेशिक विभागातील उच्च व लघुदाब वर्गवारीतील ८० लाख ४१ हजार १८९ वीजग्राहकांना एकूण ११४ कोटी ६६ लाख रुपयांच्या व्याजाचा परतावा मे व जूनमधील वीजबिलांच्या माध्यमातून समायोजित करण्यात येत आहे. यामध्ये ९२ कोटी ६३ लाख रुपयांचा परतावा मे महिन्यात देण्यात आला आहे तर २२ कोटी ३ लाखांचा परतावा जूनच्या वीजबिलामध्ये समायोजित करण्यात येत आहे.

जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवरील व्याजापोटी पुणे जिल्ह्यातील ३९ लाख २ हजार २६ वीजग्राहकांना ७१ कोटी १३ लाख, कोल्हापूर जिल्हा- ११ लाख ८६ हजार ७२४ वीजग्राहकांना १४ कोटी ६८ लाख, सांगली जिल्हा- ९ लाख ७ हजार ६१० वीजग्राहकांना ८ कोटी ३० लाख, सातारा जिल्हा- ९ लाख ९१ हजार ९९१ वीजग्राहकांना ९ कोटी ९१ लाख आणि सोलापूर जिल्ह्यातील १० लाख ५२ हजार ८३८ वीजग्राहकांना १० कोटी ६४ लाख रुपयांचा परतावा देण्यात येत आहे. गेल्या एप्रिलमध्ये पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत संबंधित वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. ही रक्कम भरण्यासाठी सहा मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरक्षा ठेवीचे बिल भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

अरविंद केजरीवालांच्या आप च्या मेळाव्याचा प्रतिसाद अनेकांना धक्कादायी

पुणे- आज बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या अरविंद केजरीवाल हाच चेहरा असलेल्या आप च्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला हा प्रतिसाद अनेकांना धक्कादायी असा ठरणारा आहे. दिल्ली सरकारचे सामाजिक कल्याण मंत्री राजेंद्र गौतम , राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन,निवडणूक प्रमुख महादेव नाईक, राज्य अध्यक्ष रंगा राचुरे,सिनेकलाकार गौरी करणी रवी वाल्याच्या चाहत खन्ना शेफाली सेठी आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

अरविंद केजरीवाल यांची काम की राजनीति पुण्यातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवा. जे दिल्लीत झालं, तो बदल पुण्यात ही शक्य आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे”, असे मत आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारचे सामाजिक कल्याण मंत्री राजेंद्र गौतम यांनी आम आदमी पक्षाच्या बालगंधर्व रंगमंदिर येथील निवडणूक मेळाव्यामध्ये व्यक्त केले. त्यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिकेतील आम आदमी पक्षाच्या प्रचाराचा आरंभ करून गॅरंटी कार्डचे अनावरण करण्यात आले.

आम आदमी पक्षाचे सरकार पुणे महापालिकेमध्ये निवडून आल्यानंतर पुणेकर जनतेला 6 सेवा हमी पूर्वक देण्यात येतील. मोफत व दर्जेदार शिक्षण, मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा, महिलांसाठी मोफत बस सेवा, टँकर मुक्त पुणे, कचरामुक्त पुणे आणि घरपोच सरकारी कागदपत्रे या सहा हमीपत्रांचे यावेळी अनावरण करण्यात आले. आम आदमी पक्ष जनतेला आश्वासन देत नाही तर गॅरंटी देतो आणि निश्चित पूर्ण करतो असा संदेश या हमी पत्राच्या माध्यमातून आम आदमी पक्ष पुणेकरांना देत आहे.

गुरुवार दि. २ जून रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात मोठ्या जल्लोषात पार पडला. दिल्ली सरकारचे समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम, राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन, महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रमुख महादेव नाईक, राज्य अध्यक्ष रंगा राचुरे, राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, राज्य सचिव धनंजय शिंदे, आप वाहतूक विंग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य, पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, डॉ अभिजित मोरे हे यावेळी मंचावर उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आलेले होते.

कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून आप पुणे टीमकडून पुणे मनपा निवडणुकीचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश प्रवक्ते डॉ. अभिजीत मोरे यांनी केले, आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात त्यांनी आम आदमी पक्ष पुणे टीमकडून गेल्या १ वर्षांत केलेल्या कामाचे सादरीकरण केले. जवळपास ८५ वेगवेगळ्या टीमच्या माध्यमातून पक्षाचा प्रभावी प्रचार करण्यात येत आहे.

आप वाहतूक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत आचार्य, पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी आपल्या भाषणात आप पुणे टीमच्या कामाचे कौतुक केले.

आपल्या कुटुंबाच्या उज्वल भवितव्यासाठी जनतेने आम आदमी पक्षाला सत्तेवर आणावे असे आवाहन यावेळी निवडणूक प्रमुख महादेव नाईक यांनी केले तर राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनी बूथ बांधणीवर भर देण्याची गरज यावेळी मेळाव्यामध्ये व्यक्त केली. सिनेकलाकार गौरी कर्णिक, रवी वालेचा, चाहत खन्ना, शेफाली सेठी यांनी यावेळी आम आदमी पक्षाच्या काम की राजनीतिला जाहीर पाठिंबा दिला आणि अशा पद्धतीच्या सकारात्मक राजकारणाला सर्वच नागरिकांनी सहकार्य केलं पाहिजे अशी भावना यावेळी व्यक्त केली.किरण कद्रे, विद्या यंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आनंद अंकुश यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने अनेक लोकांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला.

निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा, मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

0

मुंबई, दि. २ : कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील, तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

वर्षा निवासस्थानी असलेल्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते.

प्रारंभी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील कोविड विषाणूच्या संसर्गाबाबत सविस्तर माहिती दिली.

१६ एप्रिल २०२२ रोजी राज्यात सर्वात कमी ६२६ सक्रिय रुग्ण होते. आज दीड महिन्यात त्यात सात पटीने वाढ झाली असून ती संख्या ४५०० वर गेली आहे असे सांगून आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या ९७ टक्के रुग्ण आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर ६ टक्के असून राज्याचादेखील वाढून ३ टक्के झाला आहे असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोविड आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन पुढील पंधरा दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. कोविडचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी कोविड अनुकूल व्यवहार करण्यावर भर दिला पाहिजे.

फिल्ड रुग्णालये सुसज्ज ठेवा

कोविड कालावधीत उभारण्यात आलेली फिल्ड रुग्णालये व्यवस्थित आहे का पाहा. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावे. या  ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी आहेत का, आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का याचा आढावा घ्यावा, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या.

कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोविड विषाणूचा नवीन व्हेरियंट आहे का, असल्यास त्याची संसर्ग क्षमता किती आहे, यावर लक्ष ठेवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

लवकरच शाळा सुरू होतील. शाळेच्या बाबत जागतिक स्तरावर काय निर्णय घेतले गेले आहेत, तेथील मुलांना संसर्ग होण्याची स्थिती काय आहे, याबाबत माहिती घ्यावी, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी कोविड टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. अजित देसाई, डॉ. बजान, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. तात्याराव लहाने यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे आपली मते मांडली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तात्काळ कोविड चाचणी करुन घ्या

गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरावा

बारा ते अठरा वयोगटातील लसीकरण वाढवा.

ज्येष्ठ, सहव्याधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, बूस्टर लस घ्यावी

आरोग्य व्यवस्थेने पायाभूत सुविधांची तयारी करुन ठेवावी

ऑक्सिजन, औषधे यांचा साठा करुन ठेवावा.

येणाऱ्या पावसाळ्यामुळे जलजन्य आजारदेखील डोके वर काढतात, त्यांची लक्षणे कोरोना सारखीच असल्याने डॉक्टरांनीदेखील अशा रुग्णांना वेळीच चाचण्या करून घेण्यास सांगावे.

भव्य शोभायात्रा व ढोल-ताशांच्या गजरात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

पुणे शहरातील समस्त राजपूत समाजाच्या वतीने आयोजन ; वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची ४८२ वी जयंती

पुणे – ढोल-ताशांचा गजर… बँडचा निनाद… शंख नाद व पुष्पवृष्टी अशा पारंपरिक वातावरणात वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८२ व्या जयंतीनिमित्त पुणे शहरातील समस्त राजपूत समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला.

यावेळी रा.स्व. संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, अजय खेडेकर, डॉ.मिलिंद भोई यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे व पालखीचे पूजन झाले. अ‍ॅड. प्रताप परदेशी, किशोर राजपूत, स्वप्नील नाईक, सुदेश काची, शैलेश बढाई, विजय परिहार, राजेश ठाकूर, सोमनाथ परदेशी, रवींद्र परदेशी, मधुबाला परदेशी, विनायक काची, मनिष साळुंके आदींनी सोहळ्याचे आयोजन केले. ब-याच वर्षांनी पुणे शहरातील व उपनगरातील राजपूत समाज एकत्र आला.

महाराणा प्रताप उद्यानातील महाराणा स्मारकातील पुतळ्यास सकाळी पुष्पहार अर्पण व अभिवादन केल्यावर गुणवंत व कर्तबगार व्यक्तिंचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.

महाराणा प्रताप यांची जयंती तिथीनुसार मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचे ठरले. महाराष्ट्र सरकारने शासन परिपत्रक काढुन राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात महाराणा जयंती शासकीय पध्दतीने साजरी करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर वीरशिरोमणी महाराणाजींना शासनाने राष्ट्रपुरुष म्हणून घोषित केल्याने यावर्षी संपुर्ण राज्यांमधे व पुणे शहरात यंदाची जयंती मोठ्या प्रमाणात विविध सामाजिक, धार्मिक मिरवणूक व अभिवादन करुन साजरी करण्यात आली.

शोभायात्रेला महाराणा प्रताप उद्यान येथून सुरुवात झाली. चिंचेची तालीम , सेवा मंडळ, फडगेट पोलीस चौकी शितळादेवी चौकातून मिठगंज पोलीस चौकी मार्गे कस्तुरे चौकात समारोप झाला. मिरवणुकीत ढोल ताशा पथक व बँड पथक देखील सहभागी झाले होते. राजस्थानी राजपूत सेवा संघ कात्रज कोंढवा विभागातील समाजबांधव दुचाकी रॅलीद्वारे सहभागी झाले होते. संपूर्ण सोहळ्यात ५ ते ६ हजार समाजबांधवांनी सहभाग घेतला.

सामाजिक सुरक्षा विभागाच्या गुन्हे शाखेची बुधवार पेठेतील मटका अड्ड्यावरही धाड

बुधवार पेठेतील एका इमारतीत सुरु असलेल्या जुगार अड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून 12 जणांना अटक केली.पोलिसांनी केलेल्या या कारवाईत रोख रक्कम तसेच जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर फरासखाना पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळेपोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक,पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत,,निलम शिंदे, प्रमोद मोहिते, इरफान पठाण, अश्विनी केकाण यांच्या पथकाने केली.

या प्रकरणी अतुल अरुण उमापती , सुहास संतोष दाकले, महादेव गौतम डोकेफोडे , भोलेनाथ राजू बनसोडे , इंद्रजीत विनोद पाटील निखिल मारुती मारणे परशुराम चर्मकानी नाडर तुकाराम तानाजी मारणे , मंदार बंडोपंत काळे तुषार मिलिंद बहुले निखिल नंदकुमार क्षीरसागर ऋषिकेश दत्तात्रय जाधव यांना अटक केली आहे. (Pune Crime)बुधवार पेठेतील क्रांती हॉटेलजवळील एका इमारतीमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी जुगार अड्ड्याचा मालक तसेच जुगार खेळण्यासाठी आलेल्या आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 77 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

धनकवडीत आणखी एका मटका अड्ड्यावर छापा २१ जणांना अटक – दोघांचा शोध जारी

पुणे- केके मार्केट जवळील महापालिकेच्या तर्क टर्मिनस मध्ये चालू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकलेल्या पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या गुन्हे शाखेने धनकवडीत आणखी एका मटका अड्ड्यावर छापा टाकून २३ जणांवर कायदेशीर कारवाई केली आहे. हा मटका अड्डा सावरकर चौकातील फाईव स्टार सोसायटी तील तळमजल्यावरील एका सदनिकेत सुरु होता. हा अड्डा चालविणारे सुनील नारायण निर्मल (वय -३५ सावरकर चौक ,फाईव्ह स्टार सोसायटी ,धनकवडी )आणि किशोर लक्ष्मण कांबळे (रा. तळजाई माता वसाहत, पद्मावती) या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत . यातील कांबळे हाच ट्रक टर्मिनस येथील मटका अड्ड्यावर देखील मालक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानाव्ये , आणि मार्गदर्शनाखाली सहआयुक्त संदीप कर्णिक ,भाग्यश्री नवटके ,उपायुक्त श्रीनिवास घाडगे,पोईल्स निरीक्षक राजेश पुराणिक फौजदार श्रीधर खडके सुप्रिया पंढरकर,पोलीस अंमलदार कुमावत,कांबळे ,पठाण ,कोलगे चव्हाण आदींनी हि कारवाई केली. पोलिसांनी तब्बल २१ जणांना येथून अटक केली आणि जुगाराचे साहित्य व १ लाखावर रोकड येथून जप्त केली . कांतीलाल लक्ष्मण काळे, इसाक वजीर शेख ,संदीप हनुमंत कांबळे,बबन मनसिद्ध रणखांबे, विकास चंद्रकांत कसबे,समाधान बाळू वाघमारे ,सिद्धराम शरणाप्पा पाटील,संतोष मारुती शेवते ,विनोद मारुती पवार,सुनील आनंद सूर्यवंशी,संजय शिवाजी शिंदे ,अनिल जयसिंग गायकवाड ,अर्जुन बाळासाहेब कदम ,पांडुरंग तुकाराम इंगळे,अजित रामचंद्र सपकाळ ,विष्णू रघुनाथ ढगे ,संदीप विश्वनाथ विनपुरे,विनायक नागू डांगे,चंद्रकांत वैजनाथ तोडकरी ,ज्ञानेश्वर गुलाब कुचेकर,दिगंबर काशिनाथ संग रकर अशी अटक केलेल्या २१ जणांची नावे आहेत

महापालिकेच्या जागेतील मटका :जुगार अड्ड्यावर अखेरीस छापा

पुणे- अनेक वर्षे कुणा राजकीय पुढाऱ्याच्या आशीर्वादाने सुरु असल्याची चर्चा असलेला केके मार्केट जवळील महापालिकेच्या ट्रक टर्मिनस च्या जागेत सुरु असलेल्या मटका – जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ६ जणांना अटक केली तर दोघांचा शोध सुरु आहे. महापालिकेने ट्रक टर्मिनस साठी आरक्षित ठेवलेल्या जागेत हा गैर, बेकायदा धंदा अनेक वर्षे सुरु होता . विशेष म्हणजे याबाबत तक्रार करणाऱ्यांना दमदाटी करण्यात येत होती . पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानाव्ये , आणि मार्गदर्शनाखाली सहआयुक्त संदीप कर्णिक ,भाग्यश्री नवटके ,उपायुक्त श्रीनिवास घाडगे,पोईल्स निरीक्षक राजेश पुराणिक फौजदार श्रीधर खडके सुप्रिया पंढरकर,पोलीस अंमलदार कुमावत,कांबळे ,पठाण ,कोलगे चव्हाण आदींनी हि कारवाई केली. एका पत्र्याच्या शेड मध्ये हा जुगार अड्डा सुरु होता. जुगाराचे साहित्य आणि सुमारे २६ हजाराची रोकड जप्त केली आहे. गणेश विजय जगताप (वय ३५ ),किशोर लक्ष्मण कांबळे (वय ३८ ) दोघे रा. स. नंबर ६५ रा. तळजाई माता वसाहत , पदमावती,पुणे हे हा जुगार अड्डा चालवीत होते पोलीस,त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी कळविले आहे. याशिवाय सुनील भानुदास क्षीरसागर ,उद्या चंद्रकांत कहार यांच्यासह ६ जणांना अटक करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा विभाग , गुन्हे शाखा यांनी हि कारवाई केली