Home Blog Page 1969

पुणे शहर परिसरातील टेकडयावर 4 व 5 जून लोकसहभागातून स्वच्छता मोहिम-उपवनसंरक्षक राहुल पाटील

पुणे दि.2: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनविभागामार्फत टेकडी संवर्धनाच्या दृष्टीने व नागरिकांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण होण्यासाठी पुणे शहर परिसरातील टेकड्यांवर 4 व 5 जून रोजी स्वयंसेवी संस्था, पर्यावरणाविषयी आवड असणारे नागरिक, विविध टेकडी गृप यांच्या लोकसहभागातून स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी दिली.

4 जून रोजी हनुमान टेकडी, म्हातोबा टेकडी, वेताळ टेकडी, मोहमंदवाडी, वानवडी येथील टेकडी व 5 जून रोजी वारजे, हिंगणे, तळजाई, सिंहगड, बावधन, घोराडेश्वर येथील टेकडी परिसरात लोकसहभागातून स्वच्छता मोहिम सकाळी  7 ते 9 या वेळेत राबविण्यात येणार आहे. सहभाग नोंदविण्यासाठी  वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे, भांबुर्डा व नोंदणीसाठी ९८३४५२८०३० या भ्रमणध्वनी क्रमांकावर  संपर्क साधावा.

पुणे शहर परिसरातील वनविभागाचे अधिनस्त असणाऱ्या टेकडीवर स्वच्छता मोहिम महिन्यातून एकदा पहिल्या शनिवारी लोकसहभागातून उस्फूर्तपणे  सामाजिक संस्था व इतर सेवाभावी संस्थाच्या   सहभागाने राबविण्यात  येणार आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था, विविध टेकडी गृप यांनी या मोहिमेत उस्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन उपवनसंरक्षक श्री. पाटील यांनी केले आहे

“ऑपरेशन महिला सुरक्षा” या संपूर्ण भारतभर झालेल्या मोहिमेदरम्यान रेल्वे पोलिस दलाने 150 मुली,महिलांची केली सुटका

0

महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या 7000 हून अधिक जणांना अटक

नवी दिल्ली- भारतीय रेल्वेने महिलांची सुरक्षा आणि सुरक्षितता याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. रेल्वे सुरक्षा  दल (RPF) आणि रेल्वेत आघाडीवर काम करणारे कर्मचारी भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांचा सुरक्षित आणि संरक्षित होईल,हे सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम करत असतात.  महिला सुरक्षेच्या या उद्दिष्टाला समर्पित असलेली “ऑपरेशन महिला सुरक्षा” मोहीम दिनांक 3 ते 31 मे 2022 दरम्यान संपूर्ण भारतात राबवण्यात आली.

या मोहिमेदरम्यान आरपीएफने महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या 7 हजारांहून अधिक व्यक्तींना अटक केली आहे.  आरपीएफने 150 मुली/महिलांना मानवी तस्करीचे बळी होण्यापासून वाचवले.

 रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना त्यांच्या संपूर्ण प्रवासासाठी अधिक संरक्षण आणि सुरक्षितता प्रदान करण्याच्या उद्देशाने “मेरी सहेली” हा उपक्रम संपूर्ण भारतभर  कार्यरत आहे.283 प्रशिक्षित महिला अधिकारी आणि कर्मचारी असलेल्या या  चमूने (223 स्थानके व्यापणारा ) विविध ठिकाणी दररोज सरासरी एकूण 1125 महिला आरपीएफ कर्मचारी तैनात केले आहेत, ज्यांनी या कालावधीत 2 लाख 25 हजारांहून अधिक महिलांशी संवाद साधला आणि त्यांना पूर्णतः मदत केली.

 या काळात पुरुष आणि महिला आरपीएफ कर्मचार्‍यांच्या मिश्र तुकड्या असलेले ट्रेन एस्कॉर्ट देखील मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले होते.मिश्र तुकड्या काही महिन्यांपूर्वी सुरू झाल्या आहेत आणि त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

 रेल्वे प्रवास करणाऱ्यांना  त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांच्या सुरक्षिततेसाठी  काय करावे  आणि काय टाळावे,याबद्दल शिक्षित करण्यासाठी, 5742 जागरुकता मोहिमा आयोजित करण्यात आल्या होत्या.  या महिनाभर चाललेल्या कार्यवाहीमध्ये, आरपीएफ जवानांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून, चालत्या ट्रेनमध्ये चढताना/ उतरताना घसरलेल्या आणि चालत्या ट्रेनखाली येण्याची शक्यता असलेल्या 10 महिलांचे प्राण वाचवले.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या “मनातला पाऊस” पुस्तकाचे प्रकाशन

0

मुंबई, दि. 2 : जो लिहितो तोच लेखक आहे असे नाही तर जो विचार करतो, जो काही तरी सांगू पाहतो तो खऱ्या अर्थाने लेखक असतो. आपल्या मनात आलेले विचार सहजपणे सुचणे आणि लिहिणे यासारखा सुंदर उपक्रम असू शकत नाही. कारण याच लेखनाच्या माध्यमातून आपण सहजपणे अनेक पिढयांशी जोडले जातो असे लेखक आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेते, साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या “मनातला पाऊस” या अरुण शेवते यांनी संपादित केलेल्या, ऋतूरंग प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन प्रख्यात दिग्दर्शक, कवी नागराज मंजुळे यांच्या हस्ते आणि मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य सभागृहात झाले.या पुस्तक प्रकाशन सोहळयास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार विनायक राऊत, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार मंजुळाताई गावीत, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार दिपक केसरकर, आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार शेखर निकम, आमदार महेंद्र थोरवे, आमदार किशोर जोरगे, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अंबरीश मिश्र, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील, लेखक विश्वास पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. मंजुळे म्हणाले की, फॅण्ड्री केल्यानंतर अनेक लोकांचा संपर्क येऊ लागला. गडाख कुटुंबियांशी माझी त्यानंतर ओळख झाली. यशवंतराव गडाख यांना मी गेल्या 9 ते 10 वर्षांपासून ओळखत असून प्रत्येक वेळी त्यांना भेटल्यावर मला त्यांच्याबद्यल वेगळा जिव्हाळा वाटतो. आज त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळयासाठी मला निमंत्रित करण्यात आले आहे हा माझा सन्मान वाटतो.
समाजात राहताना संवेदनशील असणे गरजेचे आहे. या पुस्तकातून यशवंतराव स्वत: बोलल्याचा भास होतो.

अनेकदा त्या त्या वेळी त्या त्या गोष्टी करणे गरजेचे असते, त्यामुळे काहीतरी सुचले तर ते लिहून काढणे अत्यंत गरजेचे आहे. शाळेत असताना अभ्यासावरुन वडिलांकडून खूप मार खाल्ला पण आज वडिल नसल्यावर वडिलांची माया कळून येते.दहावीत नापास झाल्यावर किंवा नोकरी सोडल्यावरही आपले वडिल आपल्या मागे किती भक्कमपणे उभे होते हे सांगताना श्री. मंजुळे हळवे झाले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, मनात सतत वाईट भावना असतील तर मनात चांगले विचार येऊन ते मांडणे कठीणच असते. पण यशवंतराव गडाख यांनी राजकारणात असूनही समाजकारण करीत सोनई गावाचे सोने केले. राजकारणात असूनही शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम केले. 1970 मध्ये अहमदनगरमध्ये साहित्य संमेलन भरवून त्यांनी आपले साहित्यावर किती प्रेम आहे हे दाखवून दिले आहे.

ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अंबरीश मिश्र यावेळी म्हणाले की, लेखक आणि पत्रकार हे अनोळखी वाचकांच्या प्रेमावर जगत असतात. माझी आणि यशवंतराव यांची रोज भेट होत नसली तरी आमची चांगली मैत्री आहे. माझ्या मते रोजगार हमी योजनेचे कामगार आणि लेखक यामध्ये फारसा फरक नाही कारण रोजगार हमी योजनेचे कामगार दररोज दगड फोडतात तर लेखक हे दररोज शब्द फोडत असतात, भाषेशी खेळत असतात. आपल्या लेखनाशी संवेदना आणि प्रामाणिकता असेल तर सोनई असो किंवा सॅन फ्रॅन्सिस्को लेखनातला आनंद मिळतच राहतो.

ज्येष्ठ नेते उल्हास पवार यावेळी म्हणाले की, मनातला पाऊस हे पुस्तक अत्यंत सुंदर आहे. राजकारण करीत असताना समाजकारण कसे करता येते, आपल्या अवती भवती आपल्यासाठी काम करणारे, आपल्या परिचयातले किती महत्वाचे असतात हे त्यांनी खूप चांगल्या शब्दांमध्ये मांडले आहे. आजच्या काळात आपल्याला सूचत असलेल्या गोष्टी लिहून ठेवणे आवश्यक आहे.

एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर म्हणाले की, सालसपणा, सुस्वभावीपणा आणि संस्कृतपणा यशवंतराव चव्हाण आणि यशवंतराव गडाख यांनी नेहमीच जपला. यशवंतराव गडाख यांचे लिखाण हे ग्रामीण जीवनाशी नाळ जोडणारा आहे. त्यांनी आपल्या लेखनातून प्रत्येक गावाचे काय वेगळे वैशिष्टय असू शकते हे उत्तमपणे मांडले आहे. सध्या वाढत्या शहरीकरणामुळे गावाचे अस्तित्व कमी होत असताना मनातला पाऊस हे मनाला आनंद देणारे पुस्तक आहे.

या पुस्तकाविषयी बोलताना अरुण शेवते म्हणाले की, यशवंतराव गडाख आणि माझी अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. 1993 साली मी त्यांची पहिली मुलाखत घेतली आणि आज इतक्या वर्षांनी त्यांची अनेक पुस्तके संपादित केल्यानंतर मनातला पाऊस हे पुस्तक प्रकाशित होत आहे याचा आनंद आहे.

यापूर्वी यशवंतराव गडाख यांचे अर्धविराम आत्मचरित्र, अंर्तवेध, सहवास, माझे संचित ही पुस्तके प्रकाशित झाली असून अर्धविराम हे आत्मचरित्र, पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले होते. त्यांच्या अनेक पुस्तकांना विविध पुरस्कार लाभले आहेत.यशवंतराव गडाख यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त ऋतूरंग मधल्या निवडक लेखांचे हे पुस्तक असूनया पुस्तकाचे संपादन करणाऱ्या अरुण शेवते यांनी केले आहे.

ड्रायव्हिंग लायसन आता मिळणार ऑनलाईन – परिवहनमंत्री ॲड. अनिल परब

0

मुंबई दि 2 : परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 115 सेवांपैकी ८० सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहेत. आता परिवहन प्राधिकरण (आरटीओ) कार्यालयात वाहन चालक (लायसन्स) अनुज्ञप्तीचे नूतनीकरण, दुय्यम वाहन चालक अनुज्ञप्ती, वाहन-चालक अनुज्ञप्तीमधील पत्ता बदल, दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्राचा पत्ता बदल तसेच बाहेरील राज्यात जाण्यासाठी  ना-हरकत प्रमाणपत्रासाठी जावे लागणार नाही. आता या सहा सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.

परिवहन आयुक्त कार्यालयात आज या सहा सेवांचे लोकार्पण मंत्री श्री. परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. कार्यक्रमास परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, सह परिवहन आयुक्त दिनकर मनवर, एनआयसीचे तांत्रिक संचालक दीपक सोनार आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. परब म्हणाले, विभागामार्फत ११५ अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्र, परवाना संबंधित सेवा देण्यात येत असून, केंद्र शासनाच्या सूचनांनुसार ८० सेवा ऑनलाईन असून, आज सहा सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू केल्या आहेत. याचा तब्बल २० लाख लोकांना लाभ मिळेल. पारदर्शक सेवा नागरिकांना मिळावी यासाठी या सेवा आधारकार्डसोबत जोडण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

अर्जदार अर्ज, पेमेंट व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करु शकतो. या सेवांचा लाभ घेण्याकरिता  आधार क्रमांकचा वापर करण्यात येणार असून, आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP पाठविण्यात येणार, त्यानंतर  त्याची नोंदणी परिवहन या संकेतस्थळामध्ये केल्यास अनुज्ञप्ती / नोंदणी प्रमाणपत्रामधील अर्जदाराची माहिती व आधार अभिलेखातील अर्जदाराची माहिती याची खातरजमा झाल्यानंतरच पुढे अर्ज करणे शक्य होणार आहे. अर्जदाराचे नाव, पत्ता, जन्म तारीख व मोबाईल क्रमांक याची खातरजमा झाल्यामुळे आता पुढील नमुद ६ अर्जाकरिता कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही. तसेच नवीन अनुज्ञप्ती (लायसन्स) / नोंदणी प्रमाणपत्र अर्जदारास पोस्टाने पाठविण्यात येणार आहे.

राज्यामध्ये दुय्यम नोंदणी प्रमाणपत्राकरिता वर्षभरात एक लाख अर्ज प्राप्त होतात. ना-हरकत प्रमाणपत्राकरिता वर्षभरात ३०,००० तर, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदलाकरिता २०,००० अर्ज, (लायसन्स)अनुज्ञप्तीचे दुय्यमीकरण प्रमाणपत्राकरिता दोन लाख अर्ज, अनुज्ञप्तीवरील (लायसन्स) पत्ता बदलकरिता दोन लाखाहून अधिक अर्ज प्राप्त होतात. अनुज्ञप्तीच्या नूतनीकरणाकरिता १४ लाख अर्ज प्राप्त होतात. आता ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण होणार आहे.

जादुगार जशी जादू रंगमंचावर करून दाखवतो तशीच जादू व्हिज्युअल इफेक्ट्स तंत्रामुळे चित्रपटाच्या पडद्यावर घडते: पी.सी.सनथ

0

मुंबई, 2 जून 2022

जादुगार जशी जादू रंगमंचावर करून दाखवतो तशीच जादू व्हिज्युअल इफेक्ट्स तंत्रामुळे चित्रपटाच्या पडद्यावर घडून येते. चित्रपटाच्या कथेवर हे तंत्र जादूची कांडी फिरविते आणि त्या कथेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते असे बाहुबली चित्रपटाचे व्हीएफएक्स पर्यवेक्षक आणि सर्जनशील दिग्दर्शक पी.सी.सनथ यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, “जेव्हा एखादा चित्रपट निर्माता अथवा तंत्रज्ञ चित्रपट तयार करताना एखादी गोष्ट घडवू शकत नाहीत तेव्हा ते व्हिज्युअल इफेक्ट्स तंत्राची मदत घेण्याचा विचार करतात. व्हीएफएक्स तंत्रामुळे कोणतीही गोष्ट घडविता येते, सर्जकाची कल्पनाशक्ती जितकी अमर्याद तितकीच या तंत्राची आविष्काराची शक्ती देखील अपरंपार असते.”

सध्या सुरु असलेल्या 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हीएफएक्स : कथाकथनाकरिता सतत नव्याने उदयाला येत असलेले साधन’ या विषयावरील कार्यशाळेत बोलताना प्रख्यात व्हीएफएक्स पर्यवेक्षक सनथ यांनी हे प्रतिपादन केले.

व्हीएफएक्स तंत्राचे महत्त्व अधिक ठळकपणे सर्वांसमोर मांडताना ते म्हणाले की, आजच्या जमान्यात व्हिज्युअल इफेक्ट्स तंत्राचा वापर केलेला नाही असा एकही चित्रपट दिसत नाही. “नव्या तांत्रिक साधनांच्या आगमनामुळे, व्हीएफएक्स तंत्राचा परीघ अधिक रुंदावला आहे, मात्र एखाद्या व्हीएफएक्स तंत्रज्ञाने कधीही हे तंत्रज्ञान अथवा अशा इतर चित्रपटांमध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान यांच्या प्रभावाखाली राहता कामा नये. त्याने नेहमीच त्याच्या हातातील कथेचे सार जाणून घेतले पाहिजे,” एका प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, चलतचित्रांच्या तंत्रज्ञानाच्या शोधापासूनच व्हिज्युअल इफेक्ट्स हा चित्रपटीय कथाकथनाचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे. विसाव्या शतकात जेव्हापासून चित्रपट हे कथाकथनाचे लोकप्रिय माध्यम म्हणून उदयाला आले तेव्हाच व्हिज्युअल इफेक्ट्स हे तंत्र देखील अनेक नवी तंत्रे आणि तंत्रज्ञान यांचा स्वीकार करून चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या गोष्टी चित्रपटाच्या माध्यमातून अधिक उत्तम प्रकारे सादर करण्यात मदत करत आहे.

चित्रपट तयार करणाऱ्यांना त्यांच्या चित्रपटीय स्वप्नांची कल्पना करण्यासाठी आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्यासाठी व्हिज्युअल इफेक्ट्स तंत्राने कशा प्रकारे मदत केली आहे याचे देखील दर्शन या कार्यशाळेच्या वर्गामध्ये घडविण्यात आले. तसेच एआर अर्थात वाढीव सत्यता आणि व्हीआर अर्थात आभासी सत्यता यांसारख्या साधनांच्या मदतीने भविष्यातील चित्रपट निर्मात्यांना व्हीएफएक्स तंत्र नव्या सीमा पार करण्यासाठी उपलब्ध करून देऊ शकणाऱ्या शक्यतांकडे देखील यावेळी निर्देश करण्यात आला.

पी.सी.सनथ हे हैदराबाद येथील फायरफ्लाय क्रिएटिव्ह स्टुडिओचे सह-संस्थापक आणि संचालक आहेत. गेल्या अडीच दशकांपासून ते व्हिज्युअल इफेक्ट्स तंत्राचा उत्तम वापर करत आहेत. बाहुबली-द बिगिनिंग (2015), रोबो (2010), ईगा (2012), पुलीमुरुगन (2016) आणि मलिक (2021) या चित्रपटांसह अनेक तुफान लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांसाठी व्हीएफएक्स तंत्रज्ञ अनि सर्जनशील दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. सर्वोत्तम व्हिज्युअल इफेक्ट्ससाठीच्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील चित्रपट पुरस्कारांसह त्यांनी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त केले आहेत. चित्रपट उद्योग क्षेत्रातील टीव्हीएजीए (तेलंगणा व्हीएफएक्स,अॅनिमेशन अँड गेमिंग असोसिएशन ) सारख्या अनेक संस्थाच्या कार्यात ते सहभागी आहेत. पुण्याची चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था, अहमदाबादची राष्ट्रीय डिझाईन संस्था आणि केरळच्या के.आर.नारायणन राष्ट्रीय व्हिज्युअल विज्ञान आणि कला संस्था यांसारख्या विविध कला आणि चित्रपट निर्मितीशी संबंधित शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्याते तसेच शैक्षणिक सल्लागार म्हणून देखील कार्यरत आहेत.

भोंग्यांचा विषय कायमचा संपवायचाय:राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश; भोंगा पुन्हा ऐरणीवर

 राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांना प्रत्येक घराघरात जाण्याचं आव्हान केलेय. राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून आपला मुद्दा पुन्हा एकदा पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. तसेच पत्रात भोंग्याचा विषय कायमचा संपवायचा असल्याचेही त्यांनी सांगितलेय. त्यासाठी त्यांनी एक पत्र लिहिलेय. हे पत्र प्रत्येक पदाधिकाऱ्यांपर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषेत पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलेय. ते पत्र मनसे सैनिकांना प्रत्येक घरात पोहचवण्याची विनंती केली आहे. व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही, असेही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलेय. 

 पत्रात नेमके म्हटलेय काय?

माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, अशी सुरुवात असलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात की, मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलेच नव्हे तर देशातले राजकारण ढवळून निघाले. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझे एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा. तुम्ही एकच करायचे आहे. माझे पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील – घराघरात स्वतः नेऊन द्यायचे आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपले हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही.

ऊर्जा क्षेत्रातील कोळशाची आयात 40 टक्क्यांनी घटली

0

नवी दिल्ली, 2 जून 2022

कोळशाची आयात,जी 2019-20 मध्ये 248 दशलक्ष टन (दशलक्ष टन) इतक्या उच्च स्तरावर पोहोचली होती, त्यामध्ये पुढील दोन वर्षात सातत्याने घट झाली आहे. 2020-21 मध्ये 215 दशलक्ष टन आणि पुढे 2021-22 मध्ये 209 दशलक्ष टनांपर्यंत खाली आली आहे.

वास्तविक कोळशाच्या मागणीत 2019-20 मध्ये 956 दशलक्ष टनांवरून 2021-22 मध्ये 1027 दशलक्ष टनांपर्यंत सतत वाढ होऊनही, कोळशाची आयात वाढलेली नाही. 2009-10 ते 2013-14 या कालावधीत कोळशाची आयात 22.86% अशा वार्षिक चक्रवाढीच्या गतीने  (CAGR) वाढली.या वार्षिक चक्रवाढीच्या गतीने (CAGR ), कोळशाची आयात 2020-21 मध्ये 705 दशलक्ष टन आणि पुढे 2021-22 मध्ये 866 दशलक्ष टन वर पोहोचली असती.देशांतर्गत पुरवठा कायम ठेवूनच कोळशाची ही आयातीतली वाढ नियंत्रणात ठेवली जाऊ शकते.

अखिल भारतीय कोळसा उत्पादन 2020-21 मध्ये 716 दशलक्ष टन वरून 2021-22 मध्ये 777 दशलक्ष टन पर्यंत वाढले आहे परिणामी 61 दशलक्ष टन  इतकी वाढ झाली आहे.  त्यामुळे, 2020-21 मधील मागणीत 906 दशलक्ष टन वरून 2021-22 मध्ये 1027 दशलक्ष टन पर्यंत सतत प्रचंड वाढ होऊनही, 2020-21 मधील देशांतर्गत उत्पादन 691 दशलक्ष टन आणि 2021-22 मध्ये 818 दशलक्ष टनांपर्यंत वाढल्यामुळे कोळशाची ही  आयात रोखली गेली असू शकेल. 

2020-21 मध्ये 101 दशलक्ष टन ते 2021-22 मध्ये 104 दशलक्ष टनाने देशांतर्गत संप्रेषण केवळ ऊर्जा क्षेत्रासाठीच नाही तर बिगर-उर्जा क्षेत्रात देखील वाढलेले आहे.

2021-22 मध्ये कोळशाच्या आयातीतील घट मुख्यत्वे ऊर्जा क्षेत्रातील आयात कमी झाल्यामुळे झाली आहे; जी 2020-21 मध्ये 45 दशलक्ष टनांवरून 2021-22 मध्ये 27 दशलक्ष टनांपर्यंत खाली आली, म्हणजे जवळजवळ 40% ची घसरण झाली आहे. 2021-22 मधील उर्जा क्षेत्रासाठी कोळशाच्या आयातीची तुलना 2019-20 च्या कोविडपूर्व  वर्षाशी केली तर ही घट अधिक तीव्र झालेली दिसून येते,जेव्हा ही आयात 69 दशलक्ष टन इतकी होती.देशातील एकूण औष्णिक उर्जा उत्पादन 2020-21 मध्ये 1032 BU वरून 2021-22 मध्ये 1115 BU पर्यंत वाढले आहे, त्यात 83 BU ची निव्वळ वाढ झाली आहे आणि टक्केवारीच्या दृष्टीने ती जवळजवळ 8% आहे.

स्टील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या कोकिंग कोळशाच्या आयातीत 2021-22 मध्ये 11.65% वाढ होऊन ती 57 एमटी इतकी झाली होती.तथापि, 2019-20 या वर्षी कोविडपूर्व वर्षाच्या तुलनेत, कोकिंग कोळशाच्या आयातीत झालेली वाढ सुमारे 10 टक्के आहे.

राजधानीत महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी

0

नवी दिल्ली, दि. 2 :  शूर योद्धा, महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह  यांची  जयंती आज महाराष्ट्र सदन  व  महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार  यांनी  महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात  महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी  तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयात उपस्थित  कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस

0
  • राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन.

मुंबई, दि. २ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

मुंबई येथील ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर ज. जी. समुह रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ज्या नागरीकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झाले आहेत, त्या बुस्टर डोससाठी पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घ्यावा. ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांनी दुसरा डोस घ्यावा व ज्यांचा एकही डोस झाला नाही त्यांनी पहिला डोस तातडीने घ्यावा. तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

भारतीय संस्कृतीचा देश विदेशात प्रचार करण्यासाठी संस्कृती शाळा मॉडेल ठरेल- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, दि.२ :- भारतीय संस्कृतीचा देश विदेशात प्रचार करण्याच्याकामी संस्कृती शाळा मॉडेल ठरेल, तसेच या शाळेतून विविध क्षेत्रात कामगिरी करणारे उत्तम नागरिक निर्माण होतील, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.

भुकुम येथील संस्कृती शाळेच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘संस्कृती पुरस्कार–२०२२’ वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्हाईस ॲडमिरल अजय कोच्चर, संस्थापिका देवयानी मुंगली, विश्वस्त कॅ. गिरीजाशंकर मुंगली, अनुज मुंगली व प्रणित मुंगली, भुकुम शाळेच्या प्राचार्या दामिनी जोशी आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, आपण आपल्या संस्कृतीचा आदर बाळगला पाहिजे. आई-वडील, शिक्षक आणि देशाची सेवा करावी आणि त्यांचा आदर ठेवावा. सांस्कृतिक मूल्य जोपासल्याने आपल्या क्षेत्रात प्रगती साध्य करता येईल. आपल्या क्षेत्रात चांगले विचार घेऊन मार्गक्रमण केल्यास यश निश्चित मिळेल. शैक्षणिक जीवनात महत्त्वकांक्षाबरोबरच एक ध्येय समोर ठेवून पुढील वाटचाल करत राहा.

माणसाच्या चांगल्या कृतीतूनच संस्कृतीची निर्मिती होत असते. देशाची सेवा नि:स्वार्थपणे केली पाहिजे. व्यक्तीव्यक्तींमध्ये कनिष्ठ-वरिष्ठ असा भेदभाव न करता त्यांच्या चांगल्या गुणांचा सन्मान करण्याची आपली परंपरा आहे. विविध क्षेत्रात मोठमोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्यांनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करायला हवा, आणि यशाच्या शिखरावर असतानाही आपल्या मातृभूमीला विसरता कामा नये. तसेच आपण आपल्या मातृभाषेतूनच बोलले पाहिजे, असेही श्री.कोश्यारी म्हणाले.

व्हाईस ॲडमिरल श्री. कोच्चर म्हणाले, शाळेत आल्यानंतर ४० वर्षापूर्वीच्या डेहराडून येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीमधील शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा मिळाला. प्रबोधनीमधील पायाभूत शिक्षणामुळे तसेच येथील शारीरिक, मानसिक, सामाजिक अशा सर्वांगीण विकासामुळे देशसेवा करण्याची संधी मिळाली. नवीन शैक्षणिक धोरणामुळे देशाचा विकासास हातभार लागणार आहे. संस्कृती शाळेमध्ये शिक्षण घेवून उत्तम नागरिक समाजात घडतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उत्कृष्ट राष्ट्रीय सेवेबद्दल राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल अजय कोच्चर यांना सन्मानित करण्यात आले. जहांगीर रुग्णालयाचे अध्यक्ष एच. सी.जहांगीर (आरोग्य), लेखिका नमिता गोखले (साहित्य), आमदार सिद्धार्थ शिरोळे (प्रशासन), ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले आणि शिक्षणतज्ज्ञ कमला इदगुंजी (शैक्षणिक) मिरर नाऊचे सहसंपादक मंदार फणसे आणि सकाळचे संपादक सम्राट फडणीस (पत्रकारिता), नेमबाज प्रियेशा देशमुख (क्रीडा) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राज्यपाल महोदयांच्या हस्ते संस्कृती शाळेच्या प्रागंणात वृक्षारोपण करण्यात आले.

देशसेवेसाठी जीवन समर्पित करणारे अधिकारी निर्माण व्हावेत – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, दि.२- देशातील आदर्श व्यक्तिमत्व डोळ्यासमोर ठेवून देशसेवेसाठी जीवन समर्पित करणारे चारित्र्यवान आणि कर्तव्यदक्ष अधिकारी निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.

केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि विवेक व्यासपीठने संयुक्तपणे सुरू केलेल्या स्पार्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, माजी सनदी अधिकारी प्रवीण दीक्षित, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, स्पार्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक धनंजय काळे, श्री मुकुंद भवन ट्रस्टचे संचालक पुरूषोत्तम लोहिया, मार्गदर्शन केंद्राचे कार्यवाह महेश पोहनेरकर आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, देशसेवेसाठी विविध क्षेत्रात लोक कार्य करीत आहेत. एक श्रेष्ठ भारत निर्माण करण्यासाठी कर्तव्यनिष्ठ आणि कार्यप्रवण लोकांची गरज आहे. हीच गरज ओळखून समाजातील आर्थिक दुर्बल, उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी तयार करण्याच्या उद्देशाने स्पार्क अकॅडमीची सुरुवात करण्यात आलेली आहे. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करून यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

देशात सुमारे एक लाख विद्यार्थी भारतीय प्रशासकीय, पोलीस सेवेची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तयारी करतात. त्यापैकी साधारण ८०० विद्यार्थ्यांची निवड होते. उर्वरीत विद्यार्थ्यांनी निराश होवू नये. आपल्या प्रशासकीय सेवेसाठी केलेल्या तयारीचा आणि या अनुभवाचा समाजहितासाठी उपयोग करावा. स्पार्क या नावाप्रमाणेच येथील विद्यार्थी देशसेवेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत चांगले कार्य करून यश संपादन करतील, पुढील चार ते पाच वर्षात येथून जास्तीत जास्त अधिकारी निर्माण होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माजी पोलीस महासंचालक श्री. दीक्षित म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी स्वतःला वाहून घेणारे सनदी अधिकारी कार्यरत आहेत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केलेले आहे. समाजातील सर्व घटकातील होतकरु विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी या मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी चिकाटीने अभ्यास करावा आणि अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

संचालक श्री.लोहिया म्हणाले, श्री मुकुंद भवन ट्रस्ट विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होवून आपले योगदान देत आहे. कोरोनाच्या काळात गरीब नागरिकांना अन्नदान करण्यात आले. आळंदी, पंढरपूर, पैठण आदी ठिकाणी भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय करण्यात आलेली आहे. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मातंग एकता आंदोलनच्या महीला आघाडीच्या शहराध्यक्षपदी अॅड राजश्री अडसूळ

पुणे – मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेची निर्धार बैठक संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करण्यात आली होती.यावेळी महिलांसाठी लढणाऱ्या,त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या सक्रीय अशा वकील आणि कार्यकर्त्या  अॅड राजश्री अडसूळ यांची पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी नियुक्तीचे पत्र रमेश बागवे यांनी त्यांना प्रधान केले. यावेळी संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे, समन्वयक विठ्ठलराव थोरात, जनरल सेक्रेटरी अरुण गायकवाड, व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी महिलांना मार्गदर्शन करताना बागवे म्हणाले कि,राज्यात दिवसेंदिवस मागासवर्गीय महिला भगिनीच्या अत्याचार मध्ये लक्षणीय वाढ झाली असून, ह्या अन्याय अत्याचाराला पायबंध घालण्यासाठी, संघटनेच्या महिला भगिनींची एक सक्षम फळी निर्माण करण्यासाठी अॅड राजश्री अडसूळ आपण पुढाकार घ्यावा. असे आव्हान करण्यात आले.

औंध रोड, बोपोडी, चिखलवाडी परिसरातील पावसाळ्या पूर्वीची कामे तातडीने करा – सुनील माने

पुणे :औंध रोड, बोपोडी, चिखलवाडी येथे दरवर्षी पावसाळयामध्ये नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यावर्षी पावसाळा सुरु होण्यास अत्यंत थोडा कालावधी शिल्लक असूनही या भागातील पावसाळ्या पूर्वीची कामे अद्याप सुरु झालेली नाही.  ही कामे तातडीने सुरु करावीत अशी मागणी भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी आज औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहआयुक्त संदीप खलाटे यांच्याकडे केली.

सुनील माने म्हणाले, औंध रोड, बोपोडी, चिखलवाडी येथील नागरिकांना पावसाळ्यात त्रास होत असल्याने माझ्याकडे नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. चिखलवाडी येथील बुद्ध विहारासमोरील तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडीयम येथील ड्रेनेज लाईनची स्वच्छता झाली नसल्याने, येथे रस्त्यावर पाणी साठण्याची शक्यता आहे. माता रमाबाई आंबेडकर शाळेच्या ड्रेनेज लाईनची स्वच्छता नसल्याने या शाळेच्या मैदानावर पाणी साठते तेच पाणी स्थानिकांच्या घरात येते. माउंटवर्ड सोसायटी ते खडकी स्टेशन या मार्गावर सुद्धा पावसाळ्यात पाणी साठते.

त्याचप्रमाणे औंध रोड चव्हाण वस्ती येथील पाठीमागील बाजूस असलेले चेंबर्स मध्ये गाळ साचल्याने तेथे ड्रेनेजचे पाणी साठून राहते. पावसाळ्यापूर्वी या ड्रेनेजमधील गाळ काढणे आवश्यक आहे, बोपोडी येथील लहूजी वस्ताद साळवे नगर तसेच बोपोडी सर्वे नंबर २४ येथील चेंबरचे पाणी नागरिकांच्या घरात जाते, बोपोडी येथील हॅरीस ब्रिजच्या खाली ही प्रतिवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठून रहदारीला अडथळा निर्माण होतो. ही कामे लवकरात लवकर करून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रभागातील सर्व गोल चेंबर्स तसेच मेन लाईनचा गाळ पावसाळ्याच्या आधी काढणे ही गरजेचे आहे. आपण वैयक्तिक लक्ष घालून पावसाळयापूर्वी ही कामे करून या परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी विनंती खलाटे यांच्याकडे सुनील माने यांनी केली.  

३ जून जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने चला, एक दिवस सायकल चालवूया!

तंत्रज्ञानाच्या शोधाने मानवी जीवन सुखी आणि समृद्ध जसे केले तसे पर्यावरणाच्या हानीसारखे काही प्रश्नदेखील निर्माण झाले आहे. त्यावर उत्तरे शोधण्याठीदेखील विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. पण त्यासोबत आपण रोजच्या जीवनशैलीत काही बदल घडवून आणला तर अशा समस्यांमधून मार्ग काढणे अधिक सोईचे होणार आहे. आज जगभरात साजऱ्या होणाऱ्या सायकल दिनाचाही हाच उद्देश आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने १२ एप्रिल २०१८ रोजी केलेल्या ठरावानुसार दरवर्षी ३ जूनला हा दिवस साजरा करण्यात येतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते चालण्यासाठी आणि सायकलींगसाठीच्या सुरक्षित पायाभूत सुविधा उत्तम आरोग्य प्राप्त करण्यासाठी महत्वाच्या ठरतात. खाजगी वाहनाचा उपयोग न परवडणाऱ्या सामान्य माणसासाठी पायी चालण्याची आणि सायकल चालविण्याची सवय त्याला हृदयरोग, मधूमेह, विशिष्ठ प्रकारच्या कर्करोगापासून दूर ठेवते. अशा प्रकारची वाहतूक सुरक्षितच नाही तर किफायतशीरदेखील असते.

सायकल चालविल्या्ने माणसाची रोगप्रतिकारशक्तीह वाढते. केपटाऊन विद्यापीठाचे प्रा.नोक्स यांच्या मते अशाप्रकारचे व्यायाम शरिरातील प्रथिनांचे प्रमाण वाढवतात आणि पांढऱ्या पेशींना क्रीयान्वीत करून प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. मानसीक स्वास्य्ा, वजन कमी करणे, भूक वाढविणे, फुफ्फुसाचे आरोग्य, चांगली झोप येण्यासाठी, बुद्धीचे सामर्थ्य वाढविण्यासाठीदेखील सायकलचा वापर उपयुक्त ठरतो.

जागतिकीकरणाच्या प्रक्रीयेत शहरांचा झपाट्याने विकास होताना रस्त्यावरील सुरक्षित वाहतूक आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठीदेखील सायकलचा उपयोग महत्वाचा आहे. कोरोनाच्या संकटाने वाहतूकीच्या पर्यायाबाबत विचार करण्यास आपल्याला भाग पाडले आहे. या पार्श्वभूमीवर विचार केल्यास सायकलची उपयुक्तता आणखी उठून दितसे.

पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर असे बदल स्विकारणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा अभियाना’त महानगरात सायकल चालविण्यासाठी स्वतंत्र पथ तयार करण्याचाही विचार करण्यात आलेला आहे. धकाधकीच्या जीवनात निकोप जीवनासाठी नवी जीवनशैली स्विकारतांना नव्या पिढीसाठी हा चांगला पर्याय आहे. म्हणून सायकल दिनाच्या निमित्ताने वाहतूकीच्या या साध्या, सोप्या, प्रदूषण विरहीत आणि स्वस्त पर्यायाकडे जगाचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न दरवर्षी करण्यात येतो.

सायकलवर होणारा खर्च लक्षात घेता ती सामान्यांच्या आवाक्यात असल्याने असमानता कमी करण्यासोबत ती इतर सामाजिक सेवा अधिक सुलभ बनविण्यातही उपयुक्त ठरते आणि हवामान बदलाविरुद्धच्या लढ्याला बळ देते. रस्त्यावरची गर्दी कमी करण्यात आणि शहरातील हवा शुद्ध ठेवण्यासही सायकल मदत करते. ही उपयुक्तता लक्षात घेऊन सायकल वापराबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी विविध सामाजिक संस्थादेखील प्रयत्न करतात. जागतिक सायकल दिन हा सामुहिकरित्या केलेला महत्वाचा प्रयत्न आहे.

या दिवसाच्या निमित्ताने प्रशासनासोबतच सामाजिक संस्था, क्रीडा संघटना, खाजगी क्षेत्र आणि अन्य संबंधित क्षेत्रांनी या दिवसाच्या निमित्ताने जनजागृती उपक्रमात सहभाग घेण्याची गरज आहे. सायकल स्पर्धा, सायकल रॅली, जुन्या सायकलींचे प्रदर्शन, सायकल चालविणाऱ्या वयोवृद्धांचा सन्मान, ‘एक दिवस सायकलचा’ सारखे उपक्रम राबवून सहभागी झाल्यास उद्दीष्ट गाठण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. शारीरिक व्यायामासोबत शाश्वत विकासाची हमी देणारे ही सायकल आपणही एक दिवस चालवूया!
-जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

साहित्यिकांनी मराठी भाषेच्या दर्जाशी तडजोड करू नये सिराज शिकलगार यांचे प्रतिपादन; बंधुता दिन व ‘बंधुता काव्य महोत्सव’चे उद्घाटन

पुणे : “मराठी भाषा टिकवण्यासाठी साहित्य निर्मितीत शुद्ध लेखन व व्याकरण कटाक्षाने तपासले पाहिजे. अलीकडच्या काळात आभासी माध्यमाच्या वापरामुळे लेखनात याकडे दुर्लक्ष होत आहे. लेखकांनी पुस्तक आणि आभासी माध्यमांवरील लेखन यातील फरक समजून घेत मराठी भाषेच्या दर्जाशी तडजोड करू नये,” असे प्रतिपादन लेखक व कवी सिराज शिकलगार यांनी केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, बंधुता प्रतिष्ठान, काषाय प्रकाशन पुणे, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रितम प्रकाश महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित बंधुता दिन व ‘बंधुता काव्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सिराज शिकलगार बोलत होते. बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजिला होता.
प्रसंगी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, बंधुता काव्य महोत्सवाचे अध्यक्ष कवी शंकर आथरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, लेखिका डॉ. माधवी खरात, स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, रजनी पाचंगे, संयोजक प्राचार्य सदाशिव कांबळे, प्रा. अनंत सोनवणे, प्रा. प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनंत सोनवणे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बंधुता प्रबोधन यात्री काव्यसंमेलन रंगले. ‘बंधुता प्रकाशपर्व साहित्य पुरस्कार’ सिल्लोड येथील कवी नारायण खेडकर यांना, ‘बंधुता प्रकाशयात्री साहित्य पुरस्कार’ पलूस येथील कवी नामदेव जाधव यांना, तर ‘बंधुता प्रकाशगाथा साहित्य पुरस्कार’ पाथर्डी येथील दिनेश मोडोकर यांना प्रदान करण्यात आले. डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या ‘आई म्हणते’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले.
सिराज शिकलगार म्हणाले, “समाजाला दिशा दाखवण्याचे काम साहित्यिकांनी केले आहे. प्रस्थापित साहित्यिकांनी नवोदितांना प्रोत्साहन द्यावे. बंधुतेची चळवळ विस्तारण्याची गरज आहे. बंधुतेचे तत्व आणि मराठीचा संस्कार रुजण्यासाठी असे महोत्सव उपयुक्त आहेत.”
प्रकाश रोकडे म्हणाले, “माणसे जोडण्याचा, बंधुभाव जोपसण्याचा माझा छंद आहे. बंधुतादिन साजरा होतोय, याचा आनंद आहे. बंधुतेचा विचार आपल्या प्रगतीसाठी महत्वाचा असून, त्यातूनच सामाजिक समानता प्रस्थापित होणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.”

शंकर आथरे म्हणाले, “कसदार, आशयघन काव्यासाठी कवीला निसर्ग आणि माणसांकडे सूक्ष्मपणे पाहावे लागते. संवेदना प्रत्येकाला असतात; पण त्याचे कवितेत रूपांतर करण्यासाठी कवी मातृह्रदयी असावा लागतो. कविता आपले अंतरंग, दृष्टिकोनाचे प्रतिबिंब असते.”

डॉ. माधवी खरात, डॉ. अरुण आंधळे, डॉ. अशोक पगारिया, रजनी पाचंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच रोकडे यांचे अभीष्टचिंतन केले.