Home Blog Page 1965

संस्कारित नागरिकांच्या संख्येवर ठरतो बलशाली देश-अ‍ॅड.प्रशांत यादव

पुणे : सैनिक देशाचे आणि देशांच्या सिमांचे रक्षण करतात, त्यांचे कार्य अतुलनीय आहे. मात्र, कोणता देश बलशाली आहे, हे केवळ सैनिकांच्या शक्तीवर नाही. तर, त्या देशातील संस्कारित नागरिकांच्या संख्येवर ठरते. गुणवत्ता असलेल्या नागरिकांची संख्या ज्या देशात असते, तो देश ख-या अर्थाने शक्तीशाली असतो. भारतात संस्कार वर्गांच्या माध्यमातून संस्कारित नागरिक घडविण्याचे काम उत्तमपणे सुरु असल्याचे मत रा.स्व. संघाच्या कसबा भागाचे संघप्रमुख अ‍ॅड.प्रशांत यादव यांनी व्यक्त केले. 
श्रुतीसागर आश्रम फुलगांव पुणे संचलित कसबा संस्कार केंद्राच्या ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त कसबा पेठेतील श्री नामदेव शिंपी दैव मंदिर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट,  माजी नगरसेवक योगेश समेळ, कल्पना जाधव, अ‍ॅड.प्रताप परदेशी, शिरीष मोहिते, डॉ.मिलिंद भोई, कुमार रेणुसे, राजू परदेशी, अरविंद कोठारी, केंद्राचे प्रमुख संयोजक अनिल दिवाणजी, अनघा दिवाणजी आदी उपस्थित होते. 


कार्यक्रमात कसबा कार्य गौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व साईनाथ मंडळ ट्रस्ट बुधवार पेठचे अध्यक्ष पीयुष शाह, कसबा गौरव पुरस्कार अष्टपैलू कलाकार वैष्णवी पाटोळे, राष्ट्रीय खेळाडू सार्थक चव्हाण यांना आणि बाल गौरव पुरस्कार सिने नाटय बालअभिनेता शर्व दाते यांना प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. केंद्राचे संस्थापक अध्यक्ष प.पू.स्वामी स्वरुपानंद सरस्वती (फुलगांव) यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. 
अ‍ॅड.प्रशांत यादव म्हणाले, संस्काराचे पंख घेऊन माणूस जन्माला येत नाही. त्याला आई-वडिलांकडून संस्कार मिळतात. तपश्चर्येने प्रत्येक माणूस देवत्वाकडे पोहचू शकतो. त्याची सुरुवात संस्कार वर्गांतून होत असते. ख-या अर्थाने माणसातील संस्कारदीप प्रज्वलित करण्याचे काम संस्कार वर्ग करीत आहेत. स्वरदा बापट म्हणाल्या, आजकाल मोबाईल, टिव्ही शिवाय लहान मुले जेवण देखील करीत नाहीत. तेव्हा अशा संस्कार केंद्राचे महत्व व जबाबदारी वाढत आहे. सर्वत्र सोशल मीडियाचा दुष्परिणाम वाढत असून लहान मुलांना चांगले नागरिक बनविणा-या संस्कार केंद्रामध्ये वाढ व्हायला हवी. 
पुरस्काराला उत्तर देताना पीयुष शाह म्हणाले, मुलांच्या हातात मोबाईल आल्याने काळ बदलला आहे. त्यामुळे संस्कारांसोबतच गुड टच बॅड टच सारख्या संकल्पना मुलांना समजावून सांगायला हव्यात. पालकांनी मुलांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास वेळ देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी चैत्राली सरमहाले, मयुरेश कथवटे, समिधा चव्हाण, यश कुलकर्णी, तन्वी कुलकर्णी, ईश्वरी वनारसे, वज्रा जगताप, शिवाजंली हिरेमठ यांनी विविध स्पर्धांमध्ये सर्वाधिक बक्षिसे मिळविण्याचा मान मिळविला. 
कार्यक्रमाचे आयोजन अनिल दिवाणजी, वसुधा वडके, अनघा दिवाणजी, सुप्रिया कुलकर्णी, सारिका पाटणकर, समृद्धी प्रभुणे, तेजश्री कडू, शिल्पा पिंगळे यांनी केले. संस्कार वर्गातील विविध उपक्रमांना जयश्री प्रभुणे, संगिता ठकार, बसवराज कलादगी, पूर्वा ढोले, आर्या परदेशी, दिव्या राऊत, समिक्षा सोनवणे, तनिष्का सोनवणे, रुपेश कुलकर्णी, जयेश वडके, अथर्व सरमहाले आदी उपस्थित होते.

समाज व शासनाकडून परिचारिका नेहमी उपेक्षित-ज्येष्ठ साहित्यिक डॉ.न.म.जोशी 

 महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनतर्फे परिचारिका जीवनगौरव सन्मान
पुणे : परिचारिका हा सेवेचा सर्वोच्च प्रकार असला, तरी देखील समाज व शासन यांच्याकडून परिचारिका नेहमीच उपेक्षित राहते. कोविड काळात परिचारिकांनी स्वत:च्या जीवावर उदार होऊन काम केले. त्यामुळे त्यांना सन्मान व प्रतिष्ठा मिळवून देणे हे आपले कर्तव्य असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.न.म.जोशी यांनी व्यक्त केले. 
महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनतर्फे ससून रुग्णालयात आयोजित परिचारिका जीवनगौरव सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. राज्य कर्मचारी संघटनेचे लढाऊ नेते नारायण जोशी, असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ.सुमन टिळेकर, पांडुरंग म्हस्के, सविता देवकर, प्रियांका जाधव, अनिल मोरे, संदीप लंगडे आदी यावेळी उपस्थित होते. 
ससूनमधील निवृत्त अधिपरिचारिका आशा जोशी यांनी त्यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त संस्थेला दिलेल्या देणगीतून पुणे जिल्ह्यातील ६० परिचारिकांना कोविड काळात केलेल्या अद्वितीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सेवेचा आनंद आणि कमाईचे समाधान हे दोन्ही परिचारिका क्षेत्रात मिळते. त्यामुळे तरुण स्त्रियांनी परिचारिका क्षेत्र निवडावे, असे मत परिचारिका संघटनेच्या मार्गदर्शिका आशा जोशी यांनी व्यक्त केले.

भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली की त्याचा राजकीय एन्काऊंटर ;पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांचे हेच झाले

औरंगाबाद -भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली की त्याचा राजकीय एन्काऊंटर केला जातो. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांचे हेच झाले. मात्र भाजपाने इतर उमेदवारांना तिकीट देण्याऐवजी पंकजा मुंडे या चांगल्या उमेदवार असल्याचे सांगत विधान परिषदचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भाजपला चिमटा काढला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेची तयारी पूर्ण झाली असून त्याला मोठा प्रतिसाद मिळणार असल्याचा दावा त्यांनी रविवारी औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत केला आहे.

यावेळी गोऱ्हे यांनी औरंगाबादला ठाकरे सरकारच्या काळात कसा निधी दिला आहे, त्याचा पाढा वाचवून दाखवला. यावेळी विनोद घोसाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, अशोक पटवर्धन, रेणूकदास वैद्य यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मराठवाडा आणि औरंगाबादने कायम शिवसेनेवर प्रेम केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलतात हे लोकांना ऐकायचे आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण विषय असो अथवा अनेक विषयवार मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. तसेच औरंगाबाद नामकरण बाबतच्या प्रस्तावबाबत भाजपची ती जुनीच सवय असल्याचे सांगत मराठी भाषेच्या बाबतीतही सातत्याने प्रस्ताव पाठवून त्यामध्ये दोष दाखवत प्रस्ताव परत पाठवल्याचे त्यांनी सांगितले.

ती त्यांची जुनीच सवय असल्याचे सांगत त्यांनी भाजपला टोला लगावला. तसेच राज्यसभेत भाजपने कितीही ताकद लावली तरी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

 पाणी प्रश्नावरून शिवसेनेची कोंडी करणाऱ्या भाजपने केलेल्या टीके विषयी विचारचताच गोऱ्हे म्हणाल्या, औरंगाबाद आणि येथील जनेतेचे शिवसेनेशी वेगळे नाते आहे. या शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शिवसेनेने सातत्याने प्रयत्न केले आहे. त्यासाठी कधीही निधीची कमतरता पडू दिली नाही.

मलनिस्सारण, रस्ते आणि पाण्यासाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही. एवढेच नाही तर मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे मुख्य ठिकाण आणि या लढ्याचे साक्षीदार असलेले शहर म्हणून इथे मराठवाडा मुक्ती संग्रहालय उभारण्यात आले. नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही म्हणून पाणीपट्टी ५० टक्क्याने कमी करत दिलासा दिला. मुबलक पाणी मिळावे यासाठी देखील सरकार, महापालिका युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

समांतर योजेनेला विरोध केला नसता तर आज पाणीप्रश्न मिटला असता. तेव्हा योजनेला विरोध केला, ती बंद पाडली आणि आता मोर्चा काढतायेत, असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या सभेत या सदंर्भात सविस्तर सांगतिलच. संभाजीनगरचा विषय आमच्यासाठी आजचा नाही, तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यावर इतरांना राजकारण करायचे असेल ते करू द्या.

माहिती -तंत्रज्ञान क्षेत्रात दृष्टीहीनांना संधी:युवती परिषदेतील परिसंवादात करीयर संधींवर चर्चा

पुणे :’ दृष्टी नसली तरी माहिती -तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुतांशी  मेन स्ट्रीम टेस्टींग, अॅक्सेसिबिलीटी,प्रोग्रामिंग, संगणक प्रशिक्षण कामांमध्ये दृष्टिहीनांना करीयर संधी आहेत, असे प्रतिपादन माहिती -तंत्रज्ञान तज्ज्ञ श्रीनिवास चक्रवर्थुला यांनी केले.

कोरोना साथीनंतरच्या काळात विविध करीयर संधींचा शोध घेऊन सक्षम होण्यासाठी राष्ट्रीय दृष्टिहीन संघ (नॅशनल फेडरेशन फॉर ब्लाइंड, महाराष्ट्र) च्या वतीने नॅशनल फेडरेशन फॉर ब्लाइंड, इंडिया ‘ च्या सहकार्याने’ आयोजित  इन्स्पिरेशन 2022 ‘ या  राष्ट्रीय युवती परिषदेचे उद्घाटन  दि.४ जून रोजी सकाळी आळंदी येथे झाले. ‘ डेअर टू रिशेप द वर्ल्ड ‘ या संकल्पनेवर ही परिषद झाली.
४ आणि ५ जून रोजी आळंदीत धारिवाल सभागृह ( फ्रूटवाला धर्मशाळा , आळंदी देवाची)येथे ही परिषद पार पडली. विविध राज्यातून दृष्टिहीन युवती उपस्थित  होत्या.परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच जून रोजी नवीन शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली  .त्यात डॉ कुसुमलता मलिक यांनी मार्गदर्शन केले. ‘ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील करियर संधी ‘ विषयावरील कार्यशाळेत श्रीनिवासु चक्रवरथुला यांनी  मार्गदर्शन केले.

श्रीनिवासु चक्रवरथुला म्हणाले, ‘माहिती -तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याची आवड असली पाहिजे, आणि सातत्यपूर्ण कामाची तयारी, चौकटीबाहेर काम करण्याची तयारी असली पाहिजे. दृष्टी असलेल्या व्यक्तींचाही विचार करता आला पाहिजे. कॉल सेंटरमधील कामातही दृष्टीहीन व्यक्तींना  वाव आहे. प्रॉडक्ट मॅनेजर म्हणूनही  काम करता येते.
कौशल्ये प्रशिक्षणात आपण इतके प्रवीण व्हावे, की दृष्टीहीन आहे, म्हणून कोणालाही रोजगार नाकारता येऊ नये, असे प्रतिपादन   राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या प्रवक्त्या   सकिना बेदी यांनी केले.
 ‘ कार्पोरेट क्षेत्रातील वैविध्य आणि सहभाग ‘ या विषयावरील चर्चासत्रात नीरज कुमार, रजनी विनोद , डॉ.सोनम कापसे, सोभना जय माधवन सहभागी झाले. दत्तात्रय जाधव, एचएल. चाफेकर उपस्थित होते.
 ‘कायदेशीर हक्क ‘ विषयावरील परिसंवादात डॉ.संजय जैन ,ऍड .जयना कोठारी, अंचल भतेजा, डॉ. जया सागडे सहभागी झाले. डॉ जया सागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण परिषदेचा समारोप झाला.

पुण्यातील १०१ गणेशोत्सव मंडळे उभारणार स्वराज्यगुढी

गणेशोत्सव मंडळ तेथे शिवस्वराज्य दिन सोहळा

पुणे : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमता : पुण्यातील तब्बल १०१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन सार्वजनिक शिवस्वराज्य दिन म्हणजेच ६ जून शिवराज्याभिषेक दिन साजरा करणार आहेत. प्रत्येक मंडळाशी निगडीत असलेले कार्यकर्ते आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती गणेशोत्सव मंडळ तिथे शिवस्वराज्य दिन सोहळ्याचे प्रवर्तक तसेच शिवजयंती महोत्सव समितीचे आद्यप्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, छत्रपती राजाराम मंडळ, बाबू गेनु मंडळ, जिलब्या मारुती मंडळ, साईनाथ मंडळ ट्रस्ट, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शनी मारुती बाल गणेश मित्र मंडळ, खजिना विहीर मंडळ, निंबाळकर तालीम मंडळ, सेवा मित्र मंडळ यांसह पुण्यातील १०१ मंडळे हा सोहळा साजरा करणार आहेत.

अमित गायकवाड म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच ६ जून १६७४ हा दिवस भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. शिवरायांनी स्वत:चा शक म्हणजेच शिवशक प्रारंभ करुन राजदंड हाती घेत सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम पवित्र सुवर्ण कलश रयतेच्या झोळी मध्ये रिता करुन रयतेची झोळी सुखसमृध्दी, स्वातंत्र्य, समता, समाधानाने भरली.

त्यामुळेच ६ जून शिवस्वराज्य दिन विश्वव्यापी होण्यासाठी आम्ही ६ जून २०१३ पासून भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, शहरात, राज्यात तसेच देशविदेशात उभारुन साजरा करत आहोत. शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंच स्वराज्य चिन्हांनी अलंकृत भगवा स्वराज्यध्वज आम्ही निर्माण केला. भविष्यात महाराष्ट्रातीलच नव्हे तर विश्वभरातील गणेशोत्सव मंडळे यात सहभागी करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

राजकारण विसरून संजय राऊतांनी म्हटले , फडणवीसांच्या तब्बेतीला लवकर आराम पडो…

0

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील राजकीय मतभेद विसरून देवेंद्र फडणवीसांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ‘काळजी घ्या. आपल्या प्रकृतीस लवकरात लवकर आराम पडो! जय महाराष्ट्र!’ असं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.“माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी गृह विलगीकरणात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करोनासंबंधित औषधं आणि उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात जे कुणी आले असाल, त्यांनी आपली करोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांनी काळजी घ्यावी”, असं ट्वीट फडणवीसांनी केल्यानंतर  अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देत ते लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली आहे. फडणवीसांची ट्वीटर पोस्ट पाहून राऊत यांनी दिलेल्या रिप्लाय ला एकाने ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. अमोल नावाच्या कुणी तरी त्यांना असे म्हटले आहे कि, तुम्ही पण काळजी घ्या ED तुम्हाला पकडून घेऊन जाईल …जय मोदीजी ..

दरम्यान चित्रा वाघ आणि असंख्य जणांनी गेट वेल सून सर, लवकर बरे व्हा सारख्या पोस्ट रिप्लाय म्हणून केल्या आहेत . भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी देखील ट्वीट करत फडणवीसांसाठी सदिच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, “आपण काळजी घ्या आणि करोनातून लवकर बरे व्हा! महाराष्ट्रातील तमाम जनतेचं प्रेम आणि सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत. आपण लवकरच बरे होऊन पुन्हा जनसेवेच्या कार्यात रुजू व्हाल असा आम्हाला विश्वास आहे.” त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनीही फडणवीसांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली असून आमच्या प्रार्थना तुमच्यासोबत आहेत, असं म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा कोरोनाची लागण,होम आयसोलेशनमध्ये …

0

मुंबई-राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. आज संध्याकाळी राज्यसभेसंदर्भातली बैठक देखील पार पडणार होती. मात्र, त्या बैठकीला फडणवीस उपस्थित राहणार नाहीत.दोन दिवसांपुर्वी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राज्यसभेबाबत फडणवीस यांची भेट घेतली होती. छगन भुजबळ, सुनील केदार, अनिल देसाई यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती.राज्यसभेसाठी येत्या 10 जूनला मतदान होणार असून, त्याआधी फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते गृहविलगीकरणात असले तरी, राज्यसभेच्या निवडणुकीला ते उपस्थित राहणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

काल फडणवीस लातूरला होते त्यांनी सोलापूर दौरा रद्द करुन मुंबईला परतले होते. फडणवीसांनी स्वत: ट्विट करत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.शुक्रवारी फडणवीस लातूर दौऱ्यावर होते त्याठिकाणाहून ते सोलापुरला देखील जाणार होते. मात्र त्यांना ताप आल्यानंतर त्यांनी तो दौरा करुन मुंबईकडे परतले होते. त्यानंतर त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांच्यावर होम आयसोलेशमध्ये उपचार सुरू आहे. यापुर्वी दुसऱ्या लाटेत देखील फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते उपचार घेत आहेत.

वृक्षारोपणासह झाडांचे संगोपन करणे अधिक गरजेचे-खासदार प्रकाश जावडेकर

लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड्सतर्फे वारजे वनउद्यानात वृक्षारोपण

पुणे : “झाडे ही आपल्याला ऑक्सिजन देणारी बँक आहे. या बँकेत प्रत्येकाने किमान सहा-सात झाडे लावून त्याचे संगोपन करत ही बँक समृद्ध करावी. पर्यावरण दिनाच्या उत्सवात सर्वत्र वृक्षारोपण होते. मात्र, या लावलेल्या झाडांचे संगोपन करणे अधिक गरजेचे आहे,” असे मत माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांनी केले. यापुढे ‘झाडे लावा झाडे वाढवा’ असा नारा द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड्सच्या पुढाकारातून लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ व राज्याच्या वन विभाग आणि ट्रायडंट सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने वारजे येथील वनउद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जावडेकर यांच्या हस्ते आंब्याचे झाड लावून उपक्रमाचे उद्घाटन झाले. आंबा, सागरगोटे अशी एकूण १५०० झाडे येथे लावण्यात येणार असून, त्यातील १०० झाडे रविवारी लावण्यात आली. उर्वरित झाडे जुलैमध्ये लावली जाणार आहे.
प्रसंगी लायन्स क्लबचे प्रांतपाल हेमंत नाईक, प्रधान वनसंरक्षक जीत सिंग, भाजपचे संदीप बुटाला, लायन्स क्लबचे सदस्य सतीश राजहंस, संयोजक अनिल मंद्रुपकर, किशोर मोहोळकर, सौरभ सूर्यवंशी यांच्यासह धनकवडी येथील भारती विद्यापीठ इंग्लिश हायस्कुल व किरकटवाडी येथील ज्ञानज्योती विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. 
प्रकाश जावडेकर म्हणाले, “वृक्षारोपण खरे तर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून व्हायला हवे. कारण त्यावेळी मातीमध्ये ओलावा असतो. झाडे लावण्याचा केवळ कार्यक्रम न होता, ती जगली आणि वाढली पाहिजेत, यावर आपण काम करावे. भविष्यात स्वच्छ ऑक्सिजन मिळावा, हवेत गारवा राहावा आणि निसर्गाचे चक्र कायम राहावे, यासाठी झाडे लावण्याची गरज आहे. शाळांमधून ‘स्कुल नर्सरी’सारखे उपक्रम प्रभावीपणे राबवायला हवेत.”

हेमंत नाईक म्हणाले, “लायन्स क्लबच्या उद्दिष्टांमध्ये पर्यावरण रक्षण महत्वाचा उपक्रम आहे. शहरी भागात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ‘अर्बन फॉरेस्ट’, देवराई ही संकल्पना राबवत आहोत. नागरिकांचा, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आणि शासनाचे पाठबळ यातून हे उपक्रम यशस्वी होतील.”

अनिल मंद्रुपकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. किशोर मोहोळकर यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली. 

आर्यन्स समूह २६ जूनला अठराशे कोटींचा निधी देणार राष्ट्राला,राष्ट्रीय स्तरावर १५०० तर राज्याच्या स्तरावर ३०० कोटी

पीएम केअर फंड,नॅशनल डिफेन्स फंड आणि पीएम नॅशनल रिलीफ फंड ला १५०० कोटी

राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २०० कोटी आणि मुख्यमंत्री कामगार निधीला १०० कोटी

पुणे – आर्यन्स समुहाच्या वतीने पीएम केअर फंड,नॅशनल डिफेन्स फंड आणि पीएम नॅशनल रिलीफ फंड या राष्ट्रीय स्तरावरील कोषात प्रत्येकी पाचशे कोटी,राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २०० कोटी आणि मुख्यमंत्री कामगार निधीला १०० कोटी याप्रमाणे तब्बल अठराशे कोटी निधी सामाजिक दायित्व म्हणून समर्पित करणार असल्याची घोषणा आज समूहाचे सीईओ मनोहर जगताप यांनी केली.

राज्यात,देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्यानेच आपल्या विविध व्यावसायिक श्रृंखलेतून
उद्योगक्षेत्रात पायाभरणी करीत असलेल्या आर्यन्स उद्योग समूहाच्या वतीने सुरू झालेल्या व येत्या २६ जून रोजी उद्घाटन केले जाणार आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री.जगताप यांनी राष्ट्रीय व राज्य सहाय्यता कोषात भरीव योगदान देण्याचे जाहीर करतांनाच आरोग्य क्षेत्रात कोरोना काळात व पश्चातही अत्यंत पायाभूत समजल्या जाणारे तब्बल ३७ व्हॅटीलेटर लोकार्पण केले जाणार असल्याचे सांगत प्रत्यक्षात औध येथील रुग्णालयाला प्रातिनिधिक स्वरूपात स्व.सुनील मुरलीधर जगताप यांच्या स्मरणार्थ श्रीमती वत्सलाबाई मुरलीधर जगताप यांच्याहस्ते डॉ.गिरीष कुऱ्हाडे यांना व्हॅटीलेटर सुपूर्द केले.
ओमा फौंडेशनच्या वतीने सामाजिक दायित्व म्हणून उर्वरित ३५ व्हॅटीलेटर लवकरच देण्यात येतील.

श्री.जगताप यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना स्पष्ट केले की,आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज यावर्षी आपला यशोत्सव साजरा करत आहे. समूहाने आपल्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ केला असून येत्या २६ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कंपनीच्या १२० एकरवर फक्त नैसर्गिक स्त्रोतातून साकारल्या जाणार असलेल्या मुख्य कार्यालयाचे भूमिपूजन प्रस्तावित आहे.आर्यन्स समूह रिफायनरी, एक्सर ई-बाईक,लिथियम आयन बॅटरी, सोडियम आयन बॅटरी, हायड्रोजन फ्युएल,बायोफ्युएल, विन एअर, आद्या एअर कॅब सर्व्हिसेस या उपक्रमासह दळणवळण क्षेत्रात पदार्पण करत असून ऑरगॅनिक शेती,होम अप्लयांस,स्व नावाने ह्युमन रोबोट,सोलर एनर्जी आदी ४७ क्षेत्रात सेवारत राहणार असल्याचे लाईव्ह सादरीकरण उपस्थित पत्रकारांना दाखवले.यातील काही उपक्रमांचे पंतप्रधान श्री.मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री.गडकरी,अर्थराज्य मंत्री भागवत कराड,मुख्यमंत्री उद्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि इतर मान्यवरांच्या उद्घाटन होणार आहे,असे नमूद केले.

एक्सर ई- बाईकचे सुद्धा वाटप –
राज्यातील ग्रामीण भागात आरोग्य सेवेत कार्यरत आशा वर्कर्स,महाराष्ट्र पोलिस दलाला व पुणे पोलिसांना प्रत्येकी शंभर याप्रमाणे ३०० एक्सर ई-बाईक समुहाच्या वतीने मोफत वाटप केल्या जात असल्याचे सांगण्यात आले.आर्यन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकुंद जगताप,ओमा फौंडेशनचे अध्यक्ष अजय जगताप,संचालक संजय शेंडगे,कामेश मोदी,किरण लोहार आदी संचालकांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाच्या संयोजनासाठी गृपचे इव्हेंट हेड प्रवीण वानखेडे, निखिल जाधव,अविनाश उबाळे, प्रवीण कदम आदींनी परिश्रम घेतले.

बालिकांच्या शिक्षणासाठी दिल्लीतील मराठमोळ्या आनंद रेखींचा पुढाकार’,नोएडा’त विद्यार्थीनींसाठी नि:शुल्क वातानुकूलित बस सेवा  

0


नवीदिल्ली- बालिकांच्या शिक्षणाचा टक्का वाढावा,उच्च शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’ या संकल्पनेच्या पुर्ततेसाठी दिल्लीतील मराठमोळे भाजप नेते आणि एम्पायर ट्रान्सपोर्टचे संचालक आनंद रेखी यांनी पुढाकार घेतला आहे.राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील नोएडात सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी 200 वाताणुकूलित बसेस चालवून या बसेसमध्ये विद्यार्थीनींना नि:शुल्क प्रवास सुविधा उपलब्ध करवून देण्यात येईल,अशी माहिती शनिवारी रेखी यांनी दिली.
यासंबंधी नुकतीच त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली असून राज्य सरकार बस सेवेसंबंधी लवकरच सकारात्मक निर्णय घेईल,असा विश्वास व्यक्त केला.यूपीतील नोएडात अशाप्रकारचा पथदर्शी प्रकल्प राबवून त्याच्या यशस्वीतेवर इतरही शहरांमध्ये हा उपक्रम राबवता येईल,असे रेखी म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात नवनवीन प्रकल्प, सुविधा देशहितार्थ सुरूवात केली जात आहे. याच अनुषंगाने सर्वसामान्यांसाठी अत्यंत माफक दरात नोएडात या वाताणुकूलित बस सेवा सुरू करण्यात येतील. या बसेसमध्ये विद्यार्थींनांना नि:शुल्क प्रवासाची सुविधा दिली जाईल,असे रेखी म्हणाले.
सर्वसामान्यांसाठी रेखी यांच्या कंपनीकडून यापूर्वी 55 बसेस नोएडात धावत होत्या.कोरोना काळात करण्यात आलेल्या टाळेबंदीदरम्यान याच बसेसच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरोघरी जेवण पोहचवण्याचे काम करण्यात आले होते. पंरतु, नोएडाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून ही परिवहन सेवा बंद केली आहे. ही बस सेवा पुर्ववत करण्यात आल्यास गोरबरीबांना त्याचा लाभ होवून त्यांच्या पैशांची बचत होईल,असे मत रेखींनी व्यक्त केले. सार्वजनिक परिवहन व्यवस्था बाधित होवू नये याकरीता ही सेवा सुरळीत सुरू राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
यापूर्वी देखील नोएडावासियांसाठी अंतर्गत बस सेवा सुरू करण्यात आली होती.पंरतु, नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशन एनएमआरसी कडून ही सेवा बंद करण्यात आली होती. नोएडात सार्वजनिक परिवहानाची प्रभावी व्यवस्था नसतांना बस सेवा बंद करण्यात आल्याने सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा फटका बसतोय. गेल्या तीन वर्षात चांगल्या पद्धतीने परिवहन संचालन केल्याने अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार कंपनीला मिळाले आहेत.पंरतु, असे असतानाही ही सेवा बंद असल्याची खंत रेखी यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे व्यक्त केली.

आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा; कोविड लसीकरणाला पुन्हा गती द्या

0

अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांचे जिल्हाधिकारी, आयुक्त यांना पत्र

मुंबई दि. 4 : कोविड बाधित रुग्णांची गेले काही दिवसांत वाढत असलेली संख्या पाहता आरटीपीसीआर चाचण्यांची  संख्या आणि लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या आहेत.

डॉ. व्यास यांनी याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी सविस्तर सूचना दिल्या आहेत.

डॉ. व्यास यांनी नमूद केले आहे की, राज्यातील चाचण्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.  एक जूनच्या माहितीनुसार राज्यातील सव्वीस जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकापेक्षाही कमी झाली आहे. ही बाब तात्काळ सुधारणा करणे आवश्यक आहे. प्रति दहा लाख लोकसंख्येमागे एका आठवड्यात किमान 980 चाचण्या करणे आवश्यक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. एकूण चाचण्यांपैकी साठ टक्के चाचण्या आरटीपीसीआर असायला हव्यात. याबाबत दर आठवड्याला सर्व लॅबोरेटरी चालकांची बैठक घ्यावी. कोविड 19 पोर्टलवर माहिती भरली जावी. रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केली जावी. ज्या लॅबोरेटरी मध्ये अतिशय कमी अथवा एकदम जास्त रुग्ण आढळत असतील तर त्यावर नजर ठेवली जावी.

राज्याच्या काही भागात कोविड विषाणूचे विविध व्हेरियंट आढळले होते. या पार्श्वभूमीवर नवीन पॉझिटिव्ह केसेस बाबत दर आठवड्याला विश्लेषण केले जावे. या आधारे स्थानिक पातळीवर  उपाययोजना करणे शक्य होईल. नवीन रुग्ण आणि पुन्हा बाधित होणारे रुग्ण याबाबत विश्लेषण केले जावे, असे श्री. व्यास यांनी नमूद केले आहे.

नजीकच्या काळात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता गृहित धरून रुग्णालयातील पायाभूत सुविधा, कोविडसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधा व्यवस्थित आहेत का याची पाहणी करावी. मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था, यंत्रसामग्री आदी सुस्थितीत आहेत याची खात्री करावी, असेही डॉ. व्यास यांनी पत्रात नमूद केले आहे.

ताप आणि सारीने आजारी असणारे रुग्णांवर लक्ष ठेवून राहावे. ताप अथवा घशात खवखव असणाऱ्या नागरिकांना चाचणी करुन घेण्यास सांगावे. सहव्याधी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एसएमएसचा( सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सॅनिटायझेशन) वापर करण्यास सांगावे. कोविड अनुकूल वर्तन करण्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात यावे. ट्रेन, बस, चित्रपटगृह, कार्यालय, महाविद्यालय, दवाखाना आणि शाळांत मास्क वापरण्यास प्रवृत्त करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

बारा ते अठरा वयोगटातील लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. त्याचबरोबर लसीकरण आणि संरक्षक लसीचा डोस घेण्यासाठी नागरिकांना उद्युक्त करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते करू, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. ४ :- कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील, अशी नि:संदिग्ध ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली.

गेल्या काही दिवसांपासून कश्मिरी पंडित आणि हिंदूंचे ‘टार्गेट किलिंग’ कश्मीर खोऱ्यात सुरू आहे. महिनाभरात अनेक कश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. अवघ्या देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोऱ्यातील या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली, पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. याक्षणी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी इतकंच वचन देऊ शकतो की, या कठीण काळात काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील.

१९९५ साली महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार अवतरले होते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कश्मिरी पंडितांच्या मुलांना महाराष्ट्रात विशेष बाब म्हणून शिक्षणात आरक्षण दिले होते. तसेच शिवसेनाप्रमुखांनी सातत्याने काश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी आवाज बुलंद केला, याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राने काश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे. हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो आणि कर्तव्य भावनेनेच त्याकडे पाहतो. सध्या खोऱ्यातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. काश्मिरी पंडितांच्या नेत्यांशीही चर्चा सुरू आहे. मी पुन्हा सांगतो, काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व करू. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. महाराष्ट्र आपले कर्तव्य बजावेल.

एआयसीटीएस, पुणे येथे झाले पहिले बालरोग हृदय प्रत्यारोपण

पुणे, 4 जून 2022

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस), पुणे हे भारतीय सेना दलाचे 600 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे. हे कार्डिओ थोरॅसिक शस्त्रक्रियांचे भारतामधील सर्वात जुन्या केंद्रांपैकी एक आहे. 30 मे 2022 रोजी पहिले बालरोग हृदय प्रत्यारोपण करण्यात आले, तेव्हा एआयसीटीएस ने आपल्या गौरवशाली इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला.   

निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याच्या मोहम्मद फरदीन मन्सुरी नावाच्या 14 वर्षांच्या किशोर वयीन मुलाला धाप लागणे आणि थकवा येणे या तक्रारीसाठी दोन वर्षांपूर्वी रुग्णालयात पहिल्यांदा दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टर आणि त्याच्या पालकांना अशी शंका होती, की त्याला एखादा संसर्ग झाला असावा आणि एक दोन आठवड्यांत तो बरा होईल. मात्र त्याचं विधिलिखित काही वेगळंच होतं. कोणाला कल्पनाही नव्हती की त्या मुलाला गंभीर स्वरूपाचा हृदय रोग झाला आहे, ज्यामुळे त्याच्या हृदयाचा विस्तार आणि कार्यक्षमता कमी होत आहे.

मुलाच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा झाली नाही आणि हृदयाच्या कामामधील विफलतेमुळे त्याला वारंवार अतिदक्षता विभागात दाखल करावं लागलं. कुठल्याही उपचाराविना त्या तरुण मुलापासून जीवन दूर जाताना दिसत होतं. हृदय प्रत्यारोपणासाठी त्याला 18 महिन्यांपूर्वी स्वीकारण्यात आले आणि त्याचा यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या प्राप्तकर्त्यांच्या यादीत समावेश करण्यात आला.

या तरुण मुलाचं वजन, रक्त गटाशी जुळणारं आणि प्रत्यारोपणासाठी सुरक्षितपणे आणता येईल एवढ्या अंतरावर हृदय उपलब्ध होणं हे या विशिष्ट प्रकरणामधलं आव्हान होतं. दीर्घ प्रतीक्षेनंतर 30 मे 22 रोजी तो  दिवस उजाडला, जेव्हा एआयसीटीएस च्या पथकाला संभाव्य हृदय दात्यासंबंधी सूचना मिळाली, ही एक 14 वर्षांची मुलगी होती, आणि रस्ते अपघातात तिच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली होती. तिचं वजन आणि रक्तगट प्रतीक्षा करत असलेल्या रुग्णाचं वजन आणि रक्त गटाशी जुळत होतं. क्षेत्रीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र, पुणे जिल्हा यांच्या माध्यमातून सह्याद्री रुग्णालय, पुणे इथून दात्याचं हृदय आणण्यासाठी समन्वय साधण्यात आला.

रात्री उशीरा सूचना मिळाल्यावर लगेच एआयसीटीएस ने हृदयाच्या प्राप्तीसाठी मुल्यांकनाची प्रक्रिया तत्काळ सुरु केली, सकाळी 10 ही वेळ निश्चित केली. हृदय प्राप्त करण्यासाठी ठरल्या वेळेला एआयसीटीएस चं पथक रुग्णालयात पोहोचलं. यकृत आणि मूत्रपिंडानंतर हृदय काढण्यात आलं आणि सुरक्षितपणे एआयसीटीएस मध्ये आणलं गेलं.

दान करण्यात आलेलं हृदय घेऊन येण्यासाठी मोकळा रस्ता मिळावा यासाठी सैन्य दलाच्या दक्षिण मुख्यालयाच्या पोलीस पथकाने पुणे वाहतुक पोलिसांशी समन्वय साधला आणि केवळ 11मिनिटांमध्ये हे हृदय एआयसीटीएस, पुणे इथे आणलं गेलं. 

एआयसीटीएस मध्ये त्यापूर्वीच लाभार्थी रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये आणलं गेलं होतं आणि त्याचं हृदय काढण्याची प्रक्रिया सुरु होणार होती. त्यानंतर संपूर्ण पथकानं अत्यंत वेगाने काम केलं आणि ठरलेल्या वेळात हृदयाचं प्रत्यारोपण पूर्ण झालं. तरी, या कामाचा काही भागच पूर्ण झाला होता. प्रत्यारोपण करण्यात आलेल्या हृदयाला नव्या शरीरात आपली गती आणि प्रक्रिया सुरु करायला वेळ लागत होता. त्यामुळे रुग्णावर ईसीएमओ (Extra Corporeal Membrane Oxygenation) हा शस्त्रक्रिया पश्चात उपचार सुरु करण्यात आला. या मुलाला त्याचं निरोगी बालपण परत देण्यासाठी सर्वसमावेशक बहु-अनुशासानात्मक सांघिक कार्याची आवश्यकता आहे. 

1960 च्या दशकात अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतल्या प्रयोगशाळांमध्ये सुरु झाल्यापासून हृदय विफलतेवरील हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेने मोठा पल्ला गाठला आहे. समाजामध्ये प्रत्यारोपणाचं महत्त्व समजून घेणं आणि ते स्वीकारणं याची आता कुठे सुरुवात झाली आहे. समाजाच्या स्वीकृतीमुळे हृदय दात्यांची उपलब्धता वाढत आहे. या स्वीकृतीला अजूनही जागतिक पातळीवर सामाजिक संस्कार आणि धारणांवर मात करायची आहे. 

यशस्वी हृदय प्रत्यारोपण हे अनेक वर्षाचं प्रशिक्षण, तंत्रज्ञानामधील सुधारणा आणि अनेक वेळा सराव करून रूळलेली मानकं याचं एकत्रित फलित आहे. हा उपचार त्याच्यावर अवलंबून असलेल्यांच्या सहज आणि व्यापकपणे आवाक्यात यावा, यासाठी एआयसीटीएस ने हा खडतर प्रवास यशस्वीपणे सुरु केला आहे.

साखर कारखान्यांनी अधिक इथेनॉल निर्मिती करण्याची गरज – नितीन गडकरी

पुणे, 4 जून 2022

आत्मनिर्भर भारतासाठी भविष्यात पेट्रोल आणि डिझेल सारखे प्रदूषणकारी इंधन हद्दपार करण्याची गरज असून साखर कारखान्यांनी देखील आगामी काळात साखरेचं उत्पादन कमी करून इथेनॉल सारख्या पर्यायी इंधनाच्या निर्मितीकडे वळण्याची गरज असल्याचं स्पष्ट मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्याजवळील मांजरी इथं व्यक्त केलं.

वसंतदादा साखर संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय साखर परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दूरस्थ पद्धतीनं यावेळी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह साखर उद्योगातील दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी यांनी साखर उद्योगाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं . सध्या 100 टक्के इथेनॉल वर चालणाऱ्या गाड्या उपलब्ध असून इथेनॉल हे हरित इंधन मानले जाते. भविष्यात इथेनॉल विक्रीचे पंप सुरू करण्याची गरज असून पुण्यात त्याची अंमलबजावणी व्हावी  अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली . बाजारात सध्या साखरेचे दर वाढलेले दिसत असले तरी ही परिस्थिती कायमस्वरूपी टिकणार नाही म्हणून साखरेचे भाव स्थिर रहण्यासाठी सुद्धा साखरेचं उत्पादन कमी करणे आवश्यक असल्याचं गडकरी यांनी स्पष्ट केलं.

दोन दिवस चालणाऱ्या या साखर परिषदेत साखर उद्योगासमोरील समस्या आणि त्यावरील उपाय योजना,साखर उद्योगातील नाविन्य पुर्ण संशोधन,साखर उद्योगाच्या केंद्र सरकारकडून असलेल्या अपेक्षा यासह विविध विषयांवर महत्वापूर्ण परिसंवाद होणार आहेत. या विषयातील देशभरातील नामवंत तज्ञ त्यात सहभागी होणार आहेत. व्ही एस आय तर्फे दिल्या जाणाऱ्या गुणवत्ता पुरस्कारांचे परिषदेत वितरण होईल. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार या परिषदेच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत .

देशात पाच टक्केच नागरिक सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करतात-डॉ. पी. ए. इनामदार 

 एमआयटीत मंदिर-मस्जिद विवादावर महाचर्चा

पुणे, ता. ४ – भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशात अनेक जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. काही लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे कार्य करत आहेत. हे भारतीय संस्कृती, परंपरा आणि विविधतेला अपायकारक आहे. देशात ९५ टक्के लोकांना शांतता हवी आहे, मात्र ५ टक्के लोक समाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कार्य करत असतात. त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडत असून सर्वांनी एकत्र येऊन धार्मिक सलोखा निर्माण करण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे (एम.सी.ई.) अध्यक्ष डॉ. पी. ए इनामदार यांनी व्यक्त केले.

विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि महाराष्ट्र राज्य मुस्लिम बुद्धिजीवी मंच, पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित काशी-बनारस, मथुरेच्या मंदिर मस्जिद विवादावरील महाचर्चेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी नालंदा विदयापीठाचे कुलगुरू आणि ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ पद्मभूषण प्रा. डॉ. विजय भटकर, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, विश्‍वशांती केंद्राचे सल्लागार व महाराष्ट्र राज्य मुस्लिम बुद्धीजीवी मंचचे अध्यक्ष डॉ. एस. एन. पठाण, चार्टड अकाऊटंट महेंद्र देवी, भारतरत्न मौलाना आझाद असोसिएशन, पुणेचे संस्थापक अध्यक्ष अनामत जाफर शेख, कोंढवा पुणे येथील समाजसेवक जाहिदभाई शेख, रफिक तांबोळी, मिर्झा अब्दुल, माजिद पैठणकर, मौलाना अहमद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. पी. ए इनामदार म्हणाले, धर्म जाती, पंथ यातून भारतीयांमध्ये फुट पडली आहे. ही अत्यंत क्लेषदायक बाब आहे. मंदिर – मस्जिदीच्या वादातून सर्व धर्मियांनी बाहेर पडावे.  राजकीय हेतूने हे विषय पेटविले जात आहे. यातून जातीय ध्रुवीकरण केले जात असून निष्पाप नागरिकांना त्रास दिला जात आहे. प्रत्येक धर्माचे तत्वज्ञान उत्तम आहे. सर्व धर्म एकात्मतेची शिकवण देतात.  आज सर्व धर्मांनी तत्वज्ञानाच्या गोष्टी कमी करून त्यातील विचारांवर अमंल करण्याची आवश्यकता आहे. शांततेसाठी दुसर्‍याचे ऐकून घेण्याची क्षमता विकसित करावी लागणार आहे. शांतीशिवाय विकास नाही. ईश्‍वर एकच असून त्यांचा संदेश ही एकच आहे.

डॉ. विजय भटकर म्हणाले, भारतात विविध जातीचे लोक राहत आहेत. पुन्हा राम मंदिर आणि बाबरी मस्जिदचा वाद देशाला परवडणारा नाही. विश्‍वशांतीसाठी सर्वांनी एकत्र यावे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून मानवता कल्याण आणि सामाजिक बंधुता विचार शिकविला जात आहे. ही बाब प्रत्येक विद्यापीठांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवली पाहिजे. धार्मिक वादविवादावर मार्ग काढण्याची गरज असून तत्वज्ञानी आणि बुद्धिजीवी नागरिकांनी यासाठी पुढाकार घ्यावा. चांगल्या समाज निर्मितीसाठी शांती आणि धार्मिक सलोखा आवश्यक आहे.

डॉ. विश्‍वनाथ कराड म्हणाले, आयोध्येतील विवाद जमीन २.७० एकर वाद होता. हा सर्वाच्च न्यायालयाने मिटवला. राम मंदिराच्या निर्माणासाठीचे कार्य होत असतानाच मुस्लिम बांधवाच्या आस्थेसाठीही कार्य होत आहे. याचनुसार काशी आणि बनारसमधील मस्जिदांसाठी किमान ५ एकर जमीन सरकारने द्यावी. याने हिंदु- मुस्लिम धर्मातील वाद संपुष्टात येईल. वाद-विवाद करून समाजांमध्ये केवळ तेढ निर्माण होईल, मात्र एकत्र येऊन मार्ग काढल्याने वाद मिटेल. सर्वांनी एकत्र येऊन मानवता कल्याणाचे कार्य करावे. काशी, बनारस आणि मथुरा येथील मंदिर – मस्जिद वाद अयोध्येच्या निर्णयाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मिटवावा.

जाहिदभाई शेख म्हणाले, धार्मिक वाद मिटविण्यासाठी भारतातील मुस्लिम समाजाने शिक्षणाचा मार्ग स्वीकारावा.  धर्मा-धर्मातील द्वेष्ट मिटविण्यासाठी शिक्षण ही महत्वाची भूमिका निभावेल. मुस्लिमांनी साक्षरतेसाठी पुढाकार घेऊन भारत निर्माणासाठी पुढे यावे. 

महेंद्र देवी म्हणाले, शिक्षण ही वादातून मार्ग काढण्यासाठीची गुरूकिल्ली आहे. शांती आणि विवेकाने सर्व धर्मियांनी एकत्र राहून देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची गरज आहे.

डॉ. एस. एन. पठाण यांनी प्रस्ताविक केले.