Home Blog Page 1964

‘मिसेस वेस्ट इंडिया 2022’ सौंदर्य स्पर्धा पुण्यात संपन्न

पुणे – तुम्हाला जिवंत असल्यासारखे वाटत नसेल तर जगण्यात काही अर्थ नसतो, हे वाक्य ‘मिसेस वेस्ट इंडिया – एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडिया 2022’ या सौंदर्य स्पर्धेमागील तत्त्वाचे सार आहे. ही स्पर्धा ‘दिवा पेजंट्स’चे संचालक कार्ल व अंजना मस्कारेन्हास यांच्या संकल्पनेतून साकारली आहे. यंदा या उपक्रमाचे चौथे वर्ष असून चालू वर्षातील स्पर्धा नुकतीच येथील हयात पुणे (आतिथ्य प्रायोजक) हॉटेलमध्ये उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्यांतील स्पर्धकांना त्यांच्या स्वप्नाचा आविष्कार सादर करण्यासाठी प्रचंड स्पर्धात्मक असे व्यासपीठ मिळवून देण्यात आले. एकूण ३३ विवाहित महिलांना स्पर्धेने गोल्ड श्रेणीत चुरशीने सहभाग घेण्यासाठी प्रेरित केले.

अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांची तयारी ‘दिवा’ने उत्कृष्टरीत्या करुन घेतली. अंजना व कार्ल यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली त्यांना स्वपरिचय फेरी, आवाजातील चढउतार, रंगमंचावरील वावर, प्रश्नोत्तर सत्र अशा कौशल्यांत पारंगत करण्यात आले.

परीक्षक मंडळात प्रसिद्ध चित्रपट तारका व नामवंत व्यक्ती होत्या. अंजना सुखानी (अभिनेत्री), कमल दीप शर्मा (हयात पुणेचे विक्री व विपणन संचालक), वंदना वर्मा (गृहलक्ष्मी मासिकाच्या संपादक व संचालक), विद्या तिवारी (खाद्य समीक्षक), विभूती पांडे (मिसेस वेस्ट इंडिया २०२०) व कार्ल मस्कारेन्हास (दिवाचे संचालक) यांचा त्यात समावेश होता. अभिनेते अमन यतन वर्मा यांनी आपल्या परिपूर्ण सूत्रसंचालनाने प्रेक्षकांना खिळवून टाकले.

गोल्ड श्रेणीतील विजेते :

विजेती – मिताली करंदीकर

फर्स्ट रनर अप – डॉ. मनिषा सिसोदिया

सेकंड रनर अप – डॉ. मृणाली भारद्वाज  

सिल्व्हर श्रेणीतील विजेते :

विजेती – निलाक्षी लोही

फर्स्ट रनर अप – श्वेता अनिरुद्ध

सेकंड रनर अप – डॉ. उर्वशी पाटील

प्रख्यात नृत्य दिग्दर्शक पूजा सिंग यांनी या कार्यक्रमातील नृत्यांचे दिग्दर्शन व संचालन केले आणि त्याला सिसिलिया सन्याल व मृणाली तायडे यांनी सुरेख साथ दिली. कार्यक्रमात १६ महिला व पुरुषांना त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीत सर्वोत्कृष्टता प्राप्त केल्याबद्दल दिवा एक्सन्स ॲवॉर्ड्स देऊन सन्मानित करण्यात आले.

हयात पुणे द्वारा समर्थित

2 मीडिया पार्टनर लोकमत

3 स्माईल पार्टनर डॉ. शिल्पा खेरा – लिली व्हाईट डेंटिस्ट्री

4 NGO पार्टनर श्री अभिषेक दीक्षित – We Help Welfare Foundation

5 कास्टिंग पार्टनर श्री. अभिषेक दीक्षित – दिवा टॅलेंट हब

6 टॅरो पार्टनर मनीषा निहलन्नी

7 हेअर अँड मेक-अप पार्टनर इसास इंटरनॅशनल ब्युटी स्कूल

8 पीआर पार्टनर उषा कर्नानी – प्रेरणा

9 गिफ्टिंग पार्टनर उषा कर्नानी – मोदसूत्र

10 पोर्टफोलिओ शूट पार्टनर आनंद संपत

11 मॅगझिन पार्टनर श्री. मल्लिक इसानी – तमाशा आणि नवोपक्रम

12 सिल्व्हर श्रेणी फिनिटो फॅशन हबसाठी कॉउचर डिझायनर

13 सुवर्ण श्रेणीसाठी कॉउचर डिझायनर श्रीमती युती रावल – युरॅझल

14 गाऊन राउंड पार्टनर अॅडोर

15 वेलनेस पार्टनर श्री. परेश पारेख – निर्वावा नेचर क्युअर

16 व्हिडिओग्राफी पार्टनर श्री. जयप्रकाश पारखे – Iplus मीडिया सोल्युशन्स

17 इव्हेंट फोटोग्राफी पार्टनर श्री. स्वप्नील जावळे – एसजे इलुमिनेशन

18 भेटवस्तू भागीदार श्रीमती योगिता कोठारी – भारतातील नंबर 1 कोठारिस रॉयल ऑरगॅनिक फूड प्रॉडक्ट्सच्या संस्थापक अध्यक्षा

19 गिफ्टिंग पार्टनर श्री. आदित्य गाडिया – हॅपी ट्रीट

20 गिफ्टिंग पार्टनर कु. प्रज्ञा माझगावकर – द प्रिमिक्स कंपनी

22 गिफ्टिंग पार्टनर श्री. विशाल हिरामथ – नारायणी सिल्क

23 चॉकलेट पार्टनर सुश्री मीरा मेहता – अमताझ

24 ज्वेलरी पार्टनर सुश्री वृषाली – वृषालीची ज्वेलरी

25 अधिकृत कोरिओग्राफर आणि शो डायरेक्टर सुश्री पूजा सिंग

26 अधिकृत समन्वयक सिसिलिया सन्याल आणि मृणाली तायडे

27 अधिकृत डीजे श्री संकेत निनारिया

28 इव्हेंट कुबेर इव्हेंट्सद्वारे व्यवस्थापित

‘हॉटेल कायस्थ पंगत’ पुणेकरांच्या सेवेत

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

हिंजवडी : कायस्थ पद्धतीचे जेवण देणारे ‘हॉटेल कायस्थ पंगत’ हिंजवडी येथे पुणेकरांच्या सेवेत रविवार पासून सुरु करण्यात आले. राज्याचे गृहमंत्री दिलीपजी वळसे पाटील यांच्या हस्ते या रेस्टॅारंटचे  उद्घाटन  करण्यात आले.

सुनील माने, लक्ष्मीकांता माने, निखिल मथुरे, सेलिब्रिटी शेफ यशोधन देशमुख हे या रेस्टॅारंटचे संचालक आहेत.

पीएमपीएलचे संचालक प्रकाश ढोरे, राष्ट्रवादी कॅांग्रेयचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,  पुणे शहर भाजप उपाध्यक्ष गणेश कळमकर, भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, शिवाजीनगर मंडल भाजप सरचिटणीस आनंद छाजेड, भाजपा बालेवाडी प्रभाग अध्यक्षा उमा गाडगीळ, डॉक्टर असोसियशनचे अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे, डॉ.अंबरीश दरक, अखिल अग्रवाल, निर्माती-अभिनेत्री पूनम शेंडे, डॅा. प्रीती मुंडे, उद्योजक बनी दालमिया, कॅफे पीटरचे प्रमुख -उद्योजक सचिन साळुंखे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

रेस्टॅारंट बद्दल अधिक माहिती सांगताना सुनील माने म्हणाले, पुणेकर चोखंदळ आणि चवीचे खाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पुण्याला विविध प्रकारची खाद्य संस्कृती आहे. या खाद्य संस्कृतीत खास कायस्थ पद्धतीचे जेवण देणारे एकही रेस्टॅारंट पुण्यात नव्हते. पुणेकरांची हीच उणीव भरून काढण्यासाठी यशोधन देशमुख यांच्या खास कायस्थ मेनू ने सजलेले  ‘कायस्थ पंगत’ हे  रेस्टॅारंट द सोशल स्ट्रीट हिंजवडी येथे सुरू करण्यात आले आहे. लवकरच पुणे शहरातही ‘हॉटेल कायस्थ पंगत’ सुरु होणार आहे.

कायस्थ खाद्यसंस्कृती जशी विविध पदार्थाने समृद्ध आहे तशीच ती तेवढीच समावेशक ही आहे. अनेक वर्षाच्या ऐतीहासिक नोंदी आणि संशोधन करून शेफ यशोधन देशमुख यांनी हा कायस्थ खाद्यसंस्कृतीचा ठेवा खास पुणेकरांच्या सेवेत आणला आहे.  वैशिष्ठ म्हणजे आजही इथे पारंपरिक पद्धतीने आणि स्थानिक पदार्थांचा वापर केला जातो. विशेष म्हणजे या हॉटेल मध्ये टोमॅटो आणि बटाट्याचा वापर केला जात नाही . कायस्थ खाद्यसंस्कृती हि हजारो वर्षाची परंपरा लाभलेली खाद्यसंस्कृती आहे आणि आज एका नवीन स्वरूपात मूळ चवीत आणण्याचा प्रयत्न शेफ यशोधन देशमुख यांनी केला आहे, असे निखील मथुरे यांनी सांगितले.

कायस्थ खाद्यसंस्कृती प्रामुख्याने मासे ,मटण तसेच अनेक शाकाहारी रुचकर आणि स्वादिष्ठ पदार्थाने सजलेली आहे. चवीने खाण्यासाठी आणि तितक्याच आपुलकीने खाऊ घालण्यासाठी कायस्थ समाज ओळखला जातो. पदार्थ जरी सारखे असले तरीही ते बनवण्याची वेगळी पद्धत आणि त्यात टाकले जाणारे घटक या जेवणाला वेगेळेपण प्राप्त करून देतात. वालाचं बिरडं किंवा बोंबलाचं भुजणं,भरला बोंबील , खिम्याचे कानवले किंवा निनाव, वडीचे सांबार,भरली वांगी, सोडे भरली वांगी, तेलपोळी हे काही कायस्थ पद्धतीचे प्रमुख खाद्यपदार्थ सांगता येतील. आमचा हा नवीन प्रयोग नक्कीच पुणेकरांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.असे माने म्हणाले.

राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्य घोषित

0

औरंगाबादच्या जायकवडी पाणी पुरवठा योजनेच्या कामालाही मान्यता

मुंबई, दि. ६ :- राज्यात ६९२.७४ चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह ३ अभयारण्य घोषित करण्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रातील बांधकामासही बैठकीत मान्यता देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.
वन क्षेत्रातील गावकऱ्यांचे पुनवर्सन आणि त्यांना देण्यात येणारा मोबदला याबाबत विश्वासात घेऊन चर्चा करा, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची १८ वी बैठक आज वर्षा शासकीय निवासस्थानी झाली. बैठकीस यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, , प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर,वाय एल पी राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव-पश्चिम मुंबई) क्लेमेंट बेन , संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक मल्लिकार्जुन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज तसेच वन्यजीव मंडळाचे सदस्य, तज्ज्ञ तसेच विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आदि दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, वन क्षेत्रातील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत विश्वासात घेऊन चर्चा करा. त्यांच्या समस्याकडे लक्ष द्या. वन्य जीवांच्या सुरक्षेबाबत प्राधान्याने विचार करा. वनक्षेत्रातील विकास कामांबाबत प्रस्ताव आणताना, त्यांचा सर्व अंगानी विचार व्हावा. केवळ सर्वेक्षणाच्या मान्यतेनंतर कधीकधी थेट प्रकल्पांना मान्यता मिळाल्याप्रमाणे कामे सुरु होतात. तसे होऊ नये याची काळजी घ्यावी. त्यासाठी अशा प्रस्तावांबाबत संबंधितासह, वन्यजीव मंडळाच्या सदस्य आणि समित्यांसमोर सादरीकरण केले जावे.
राज्यात आतापर्यंत एकूण १५ संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्यात आली असून, त्यातील ८ क्षेत्रांना गत दोन वर्षांत मान्यता देण्यात आली. त्यामध्ये या नव्या १२ संवर्धन क्षेत्रांची भर पडल्याने मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.


जायकवाडी पाणी पुरवठा योजनेच्या कामांबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आवर्जून निर्देश दिले. तसेच या योजनेच्या जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रात उद्भव विहीर व पाणी पुरवठा योजनेच्या कामांसाठी तत्काळ मान्यता मिळावी यासाठी कार्यवाहीला गती देण्यात यावी असेही सांगितले.
पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हणाले, वनक्षेत्रातील रस्ते विकासांच्या कामांना मान्यता देताना वन्यजीवांच्या भ्रमण मार्गांची काळजी घेण्यात यावी. विशेषतः संवेदनशील तसेच व्याघ्र प्रकल्पातील कामांबाबत विशेष काळजी घेण्यात यावी. अभयारण्य क्षेत्रातील गावांच्या विकास कामांबाबत स्थानिकांशी चर्चा करण्यात यावी. प्रकल्प, विकास कामांच्या प्रस्तावांबाबत निर्णय घेताना स्वयंसेवी संघटना, तज्ज्ञ आदींना सहभागी करून घेण्यात यावे. त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करण्यात यावी.”

दोडामार्गातील वनहत्तींच्या समस्येवर तोडगा

यावेळी बैठकीत सिंधुदूर्ग जिल्हयातील दोडामार्ग मधील वन्यहत्ती समस्येबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत दोन महिन्यात अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच या परिसरात हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीपोटी भरपाई निधीत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. आजरा, चंदगड, तिलारी या परिसरातील हत्तींचा प्रवेश बंद करण्याबाबत आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत चर्चा झाली.

राज्यातील १२ संवर्धन राखीव क्षेत्र

आज घोषित करण्यात आलेल्या १२ संवर्धन राखीव क्षेत्रांमध्ये धुळे जिल्ह्यातील (दोन) चिवटीबावरी (६६.०४ चौ.कि.मी), अलालदारी (१००.५६ चौ.कि.मी), नाशिक जिल्ह्यातील (चार) कळवण (८४.१२ चौ.कि.मी), मुरागड (४२.८७ चौ.कि.मी), त्र्यंबकेश्वर (९६.९७ चौ.कि.मी), इगतपुरी (८८.४९९ चौ.कि.मी) रायगड जिल्ह्यातील (दोन) रायगड (४७.६२ चौ.कि.मी), रोहा (२७.३० चौ.कि.मी), पुणे जिल्ह्यातील भोर (२८.४४ चौ.कि.मी), सातारा जिल्ह्यातील दरे खुर्द (महादरे) फुलपाखरू (१.०७ चौ.कि.मी ), कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठार (५.३४ चौ.कि.मी), नागपूर जिल्ह्यातील मोगरकसा (१०३.९२ चौ.कि.मी), यांचा समावेश आहे.

राज्यात नवीन ३ अभयारण्य क्षेत्र

मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्रासह कोलामार्का आणि विस्तारित लोणार यांना वन्यजीव अभयारण्य घोषित करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.

राज्यात १० धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित

राज्यात १० धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामध्ये मयुरेश्वर – सुपे (५.१४५ चौ.किमी.), बोर (६१.६४), नवीर बोर (६०.६९), विस्तारित बोर (१६.३१), नरनाळा (१२.३५), लोणार वन्यजीव अभयारण्य (३.६५), गुगामल राष्ट्रीय उद्यान (३६१.२८ चौ.कि.मी), येडशी रामलिंगघाट वन्यजीव अभयारण्य (२२.३७), नायगाव- मयूर वन्यजीव अभयारण्य (२९.९०), देऊळगाव-रेहेकुरी काळवीट अभयारण्य (२.१७) यांचा समावेश आहे. बैठकीत संरक्षित क्षेत्र व पर्यावरण संवेदशील क्षेत्रातील विविध विकास प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. सुरवातीला ‘लिव्हिंग वुईथ लीओपार्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

शिवशक राजदंड स्वराज्य गुढी प्रत्येक महाविद्यालयात आणि विद्यापीठात उभारली जाणार-उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत

पुणे दि.६-पुढील वर्षांपासून शिवशक राजदंड स्वराज्य गुढी प्रत्येक महाविद्यालयात आणि विद्यापीठात उभारली जाईल आणि प्रत्येक वर्षी एका गडावर विद्यार्थ्यांसह हा शासनातर्फे सोहळा साजरा केला जाईल. यासाठी लवकरच शासन निर्णय काढण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एसएसपीएम विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित शिवस्वराज्य दिन कार्यक्रमात केली.

श्री.सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र नव्या पिढीसमोर दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे असावे यासाठी शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालयातदेखील हा दिन साजरा करण्याला मान्यता दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करून महाराष्ट्राला वेग्ळी दिशा दिली, राज्यावरचे संकट दूर केले, देशाला दिशा दिली. अशा राजांच्याप्रति आदराची भावना व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयात शिवशक राजदंड स्वराज्य ध्वज लावल्यास महाराजांच्या कार्याची प्रेरणा महाविद्यातील विद्यार्थ्यांना मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज देशाचे अराध्य दैवत आहे. त्यांची रणनिती, नम्रतेचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा आणि त्यांचे चरित्र्य राज्यातील जनतेसमोर यायला हवे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी अमित गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. श्री.सामंत यांच्याहस्ते ५१ फुट उंच शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. कार्यक्रमाला किरण साळी, सौजन्य निकम यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

सुभाष जगतापांवर खोटा गुन्हा नोंदविला, दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करा,अन्यथा राज्यभर आंदोलन : रमेश बागवे

पुणे -झोपडपट्टी मधील महिलांना शिधापत्रिका व रेशन धान्य बाबत जाब विचारण्यास गेलेल्या  माजी सभागृह नेते, अन्नधान्य वितरण समिती सदस्य,माजी नगरसेवक सुभाष जगताप यांचेवर अधिकाऱ्यांनी पोलिस तक्रार केल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले.सुभाष जगताप यांच्यावरील खोटी कारवाई न थांबवल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा माजी गृहराज्यमंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे यांनी यावेळी दिला.तसेच मातंग समाजाच्या संघटनाचे शिष्टमंडळ लवकरच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,शरद पवार व महविकास आघाडी च्या नेत्यांना भेटणार असल्याचे सांगितले.यावेळी दोषी अधिकारी यांच्यावर चौकशी समिती नेमून कारवाई करावी,सुभाष जगताप यांच्यावरील खोटी कारवाई तत्काळ थांबवण्यात यावी,कामचुकार आणि दप्तर दिरंगाई करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करावी आदी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्यावरील दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध करून तीव्र निदर्शने करण्यात आली.या आंदोलनामध्ये माजी मंत्री रमेश बागवे,लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले, नगरसेवक अविनाश बागवे,निलेश वाघमारे सत्यशोधक बहुजन आघाडी चे संस्थापक सचिन बगाडे,रिपब्लिकन युवा मोर्चा चे नेते राहुल डंबाळे,लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हतागले,पुणे शहर मातंग समाज सचिव संजय केंदले,मातंग एकता आंदोलनाच्या महिला अध्यक्ष राजश्री ताई अडसूळ,गोविंद साठे यासह पुणे शहरातील विविध दलीत,मातंग समाजाच्या संघटनेचे नेते पदाधिकारी,महीला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे जिल्हा मातंग समाज संघटनेचे श्री संजय केंदळे म्हणाले की, “सुभाष जगताप हे गेल्या तीस वर्षांपासून सहकारनगर, पर्वती या परिसरामध्ये सामाजिक कार्यांमध्ये कार्यरत असून गोरगरीब, कष्टकरी ,वंचित, उपेक्षित समाजासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. या समाजातील कुटुंबांना वेळोवेळी न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उपोषण या माध्यमातून गेली तीस वर्ष श्री सुभाष जगताप यांनी आमच्या सर्व समाज बांधवांची सेवा केली आहे. असे असताना गेल्या काही दिवसांत पासून रेशनिंग संबंधित अनेक तक्रारी श्री. सुभाष जगताप यांच्याकडे येत होत्या. परिसरातील नागरिकांच्या रेशनिंगच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी श्री सुभाष जगताप यांनी वारंवार संबंधित विभागाच्या कार्यालयात पाठपुरावा केला. परंतु शेवटी या नागरिकांप्रमाणेच त्यांनादेखील अशाच प्रकारची उडवाउडवीची उत्तरे देत अरेरावीची भाषा करणाऱ्या अधिकाऱ्यांना श्री. सुभाष जगताप यांनी खडे बोल सुनावले, आमच्या न्याय व हक्कासाठी लढताना झालेल्या या घटनेत अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याऐवजी श्री. सुभाष जगताप यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.
गेल्या काही दिवसात श्री सुभाष जगताप यांनी सहकारनगर परिसर चालल्या चालणाऱ्या अवैध धंद्यांवर धाड आवाज उठवल्याने प्रशासकीय यंत्रणेचा त्यांच्यावर रोष होता, तो रोष या घटनेत गुन्हा नोंदवतांना दिसून आला व जामीन मिळणार नाही अश्या प्रकारची कलमे लावण्यात आली. तरीही न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याने त्यांना तात्काळ जामीन मंजूर झाला आहे.पुणे जिल्हा मातंग समाज या घटनेचा जाहीर निषेध करत असून येत्या काही दिवसात जर हे खोटे गुन्हे मागे घेण्यात आले नाही तर भविष्यात यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल “

फिनलंडची  शिक्षणपध्दती भारतासाठी उपयुक्त-अविनाश धर्माधिकारी

 एमआयटी डब्ल्यूपीयूत “शिक्षणगंगा – फिनलंडमधून आपल्या दारी’ या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, ०६ जून : “भारतात नवीन शिक्षणपध्दती विकसित होत असताना फिनलंड सारख्या शिक्षणक्षेत्रात उत्तुंग असलेल्या देशाकडून त्यांचे शिक्षणाचे तंत्र अवलंबून त्याचा भारतासाठी उपयोग केल्यास भारतीय शिक्षणपध्दतीत अमूलाग्र बदल होईल.” असे उद्गार माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळाचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी यांनी काढले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हसिटी, पुणे व कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन (सीसीई फिनलंड)  तर्फे शिरीन कुलकर्णी व हेरंब कुलकर्णी लिखित “शिक्षणगंगा – फिनलंडमधून आपल्या दारी’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे  संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते. सीसीई फिनलंडचे शिक्षणतज्ञ श्रीमती नेल्ली लुहिवूरी, शिक्षणतज्ञ श्री. ख्रिस्तोफ  फेनेव्हेसी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. >
यावेळी सीसीई फिनलंडचे संस्थापक व लेखक हेरंब कुलकर्णी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे डॉ. रत्नदीप जोशी व श्रीमती धनिक सावरकर हे उपस्थित होते.
श्री.धर्माधिकारी म्हणाले, “शिक्षणगंगा फिनलंडमधून आपल्या दारी हे पुस्तक संस्कृतीचे लेणं आहे. यापुस्तकामध्ये फिनलंड या देशामध्ये तेथील सरकारने शिक्षण आणि आरोग्य हे या दोन्हींवर भर देऊन ना
सृजनशील शिक्षण देऊन विद्यार्थी घडविले जात आहेत. या देशाने ३० वर्षात शिक्षणक्षेत्रात भरारी घेतलेली आहे. या शिक्षणपध्दतीचा भारताला फायदा होणार आहे. फिनलंडमध्ये शिक्षकाचे स्थान महत्त्वाचे आहे. नवनवीन प्रयोगकरून भावी पिढी घडवित आहे. लहानपणी आई हिच खरी शिक्षिका आहे. त्यानंतर वडिल आणि त्यानंतर शिक्षक हाच गुरू आहे. शिक्षक हा शिकविण्याच्या नवीन पध्दतीचा अवलंब करून दर्जेदार विद्यार्थी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ”    
प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “वैश्‍विक मूल्याधिष्ठित शिक्षणपध्दतीचा वापर करणे ही काळाची गरज आहे. यातून सर्वगुणसंपन्न असा विद्यार्थी घडला जाईल. शरीर आणि बुध्दीचा विचार आजच्या शिक्षणातून केला जात आहे. परंतू आत्मा आणि मनाचे शिक्षण देणे गरजेचे आहे. मातृ देवो भव, पितृ देवो भव, अतिथी देवो भव आणि आचार्य देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे शिक्षकाला समाजामध्ये मानाचे स्थान आहे.”  
श्री.हेरंब कुलकर्णी म्हणाले, “फिनलंडमध्ये ज्ञानाचा विकास करून विद्यार्थ्यांना हसत -खेळत शिक्षण दिले जाते. त्याठिकाणी क्लासरूम नाहीत परंतू ते निसर्गाच्या सानिध्यात राहून मुलांना सृजनशील शिक्षण दिले जात आहे. तोच प्रयोग भारतातील छत्तीसगढ राज्यातील वनवासी भागामधील विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून अंकगणिताचे शिक्षण दिले आणि चांगल्या प्रकारचे विद्यार्थी निर्माण केले आहेत. माझे यापुढचे पुस्तक हे भारतातील शिक्षणाची गंगा जगाकडे हे असणार आहे.”    
 डॉ. रत्नदीप जोशी यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. सूत्रसंचालन अमेय खरे यांनी केले.
धनिका सावरकर यांनी आभार मानले.

अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु

0

प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. 86 वर्षीय धर्मेंद्र यांना एप्रिल महिन्यातदेखील त्यांच्या होम प्रॉडक्शनच्या अपने 2 या चित्रपटाच्या सेटवर पाठीच्या स्नायूंमध्ये त्रास झाल्यामुळे आयसीयूत दाखल करण्यात आले होते.

प्रकृती अस्वस्थामुळे मुंबईतील याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले होते. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी 1 मे रोजी सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले होते, ‘मित्रांनो, मी एक धडा शिकलो आहे’.

पुढे ते म्हणाले होते, “मित्रांनो, काहीही अति करू नका, मी केले आणि सहन केले. पाठीच्या स्नायूंमध्ये त्रास झाल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये जावे लागले, दोन-चार दिवस कठीण होते. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि देवाच्या आशीर्वादाने मी परत आलो आहे, काळजी करू नका मी आता खूप काळजी घेत आहे… लव्ह यू ऑल,” अशा आशयाचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला होता.

‘कालजयी सावरकर’ लघुपटात अभिनेते मनोज जोशी ‘हिंदुस्थान’च्या भूमिकेत!

0

अभिनेता सौरभ गोखले साकारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका.

पुणे(शरद लोणकर)-स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या क्रांतिकारक विचारांचा प्रवास उलगडून सांगणाऱ्या कालजयी सावरकर या लघुपटाची नुकतीच घोषणा झाली होती. आता या लघुपटात आणखी कोणते कलाकार असतील आणि ते कोणत्या भूमिका साकारतील याविषयीचा खुलासाही झाला आहे. हिंदुस्थान एक राष्ट्र म्हणून आणि निवेदक या नात्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांची गोष्ट लघुपटातून सांगणार आहे. यामध्ये जेष्ठ हिंदुस्थानची निवेदक म्हणून भूमिका अभिनेते मनोज जोशी तर नव्या तरुण भारताची भूमिका अभिनेता तेजस बर्वे साकारत आहे. लघुपट स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावर आधारित असल्याने यामध्ये सावरकरांची भूमिका कोण करणार याविषयी विशेष उत्सुकता होती. आता त्यावरूनही पडदा उठला आहे. अभिनेता सौरभ गोखले हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री पायल गोगटे, अपर्णा चोथे, लिना दातार, ऋता पिंगळे तसेच अभिनेते हृदयनाथ राणे, शंतनू अंबाडेकर, जयोस्तु मेस्त्री, दिनेश कानडे, चिन्मय पाटसकर, हृषीकेश भोसले, पवन वैद्य आणि प्रमोद पवार ह्यांच्या सहयोगी भूमिका आहेत.

लवकरच सदर लघुपटाचे प्रदर्शन सामान्य प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार असून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात याचे विशेष प्रदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक आणि गैर शैक्षणिक संस्थांपैकी कोणत्याही संस्थेला जर या लघुपटाचे प्रदर्शन आपल्या गावात किंवा शहरात करायचे असल्यास अमोघ पोंक्षे यांच्याशी amogh.parc@gmail.com किंवा ९४२१०१०९७१ येथे संपर्क करावा असे आवाहन निर्मात्यांतर्फे करण्यात आले आहे.

khelo india महाराष्ट्राला तिसऱ्या दिवशी ९ सुवर्ण, ४ रौप्य व २ कांस्य पदके

0

योगासन, सायकलिंग, वेटलिफ्टिंग, कुस्तीत दाखवली चमक
पंचकुला, ५-
खेलो इंडिया स्पर्धेत तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या संघाने योगासनात ५ सुवर्ण पदके पटकावली. वेटलिफ्टिंगमध्येही २ मुली आणि एका मुलाने सुवर्ण मिळवले. सायकलिंगमध्येही सुवर्ण कामगिरी झाली. अशी एकूण ९ सुवर्ण पदके मिळाली. योगा (१), सायकलिंग (२) आणि कुस्तीत (१) अशी चार रौप्य पदके तर दोन कुस्तीत कांस्य पदके मुलींनी जिंकली दिली.
ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राने विविध क्रीडा प्रकारांत पदकांची लयलूट केली. सर्वाधिक पदके योगासनात मिळाली. त्यात ५ सुवर्ण आणि एक रौप्य पदकाचा समावेश आहे. पारंपरिक योगा प्रकारात सुमित भंडारे (सुवर्ण, संगमनेर), आर्टिस्टिक पीअरमध्ये – वैदेही मयेकर व युगांका राजम (सुवर्ण), आर्टिस्टिक पीअर मुले – आर्यन खरात व निबोध पाटील (सुवर्ण), रिदमिक योगा – नानक अभंग व अंश मयेकर (सुवर्ण), मुली – स्वरा गुजर व गीता शिंदे (सुवर्ण). पारंपरिक योगा – तन्वी रेडीज (रौप्य).
वेटलिफ्टिंगमध्ये सांगलीच्या काजल सलगरने सुवर्ण पदक पटकावले. याच क्रीडा प्रकारात नंतर सायंकाळी उशिरा दोन पदके मिळाली. ५५ किलोमध्ये -मुकुंद आहेर (सुवर्ण), ४५ किलो वजनगट- हर्षदा गरूड (सुवर्ण)
सायकलिंगमध्ये टाईम ट्रायलमध्ये संज्ञा कोकाटे (सुवर्ण), स्क्रॅच रेसमध्ये पूजा दानोळेस (रौप्य), टीम स्प्रिंटमध्ये आदिती डोंगरे, पूजा दानोळे व संज्ञा कोकाटे (रौप्य).
कुस्तीमध्ये एक रौप्य पदक मिळाले तर दोन कांस्य पदके आली. ४६ किलो वजन गटात – गौरी पाटील (कोल्हापूर) व ५७ किलो वजन गटात धनश्री फंड (अहमदनगर) यांनी कांस्य पदके पटकावली. तर ५७ किलो वजनगटात प्रगती गायकवाड हिने रौप्य पदकावर नाव कोरले. तिचा सुवर्ण पदकासाठीची लढत हरियानाच्या ज्योतीसोबत झाली. मुलांमध्ये गौरव हजारे, ओंकार शिंदे, समृध्दी घोरपडे, साक्षी पाटील यांनीही चमकदार खेळ केला. परंतु त्यांना पदकापर्यंत पोचता आले नाही.

२६९ कोटी ३४ लक्ष रुपयांच्या स्वराज्य रक्षक संभाजी महाराज स्मारक विकास आराखड्यास मान्यता

जिल्ह्यातील ३३ कोटी ५७ लक्ष रुपयांच्या अष्टविनायक विकास आराखड्यास मान्यता

पुणे दि.५- जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासाकामात शिक्षण, आरोग्य आणि रस्ते विकासावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन पुणे येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ३३ कोटी ५७ लक्ष रुपयांच्या अष्टविनाय विकास आराखड्यास आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे तुळापूर येथील स्मारक आणि वढू बुद्रुक येथील समाधीस्थळाच्या २६९ कोटी ३४ लक्ष रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली.

बैठकीस राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, सामाजिक उत्तरदायित्व निधी, जिल्हा परिषद आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून २६ कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व तालुक्यात आवश्यक तेथे अंगणवाडी बांधकाम करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये चांगल्या शैक्षणिक सुविधा देण्यात येत आहेत. रस्ते विकासालाही गती देण्यात येणार आहे.

अष्टविनायक विकासासाठी अंदाजपत्रकात २५ कोटी तरतूद करण्यात आले असून पुरवणी मागण्यातही अधिक निधी देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. परिसर विकास करताना मंदिराचे मूळ स्वरूप आणि सौंदर्य कायम राहावे याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. सर्व कामे मंदिर व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याने त्यांनी यासाठी सहकार्य करावे.

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काम सुंदर आणि भव्य होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. स्मारक आणि समधीस्थळाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेता वाहनतळाचे योग्य नियोजन करावे, लोकप्रतिनिधींनी याबाबत सूचना केल्यास त्यांचाही अंतर्भाव करण्यात येईल, असे श्री.पवार यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी गतवर्षी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत झालेला खर्च, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ विकास आराखड्याबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची आणि अष्टविनायक परिसर विकास आराखड्याची माहिती दिली.२०२१-२१ या वर्षात जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत १०० टक्के , अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत ९९.६९ आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ९९.९२ टक्के खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीस आमदार महादेव जानकर, अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, अशोक पवार, भीमराव तापकीर, संजय जगताप, सुनील शेळके, माधुरी मिसाळ, राहुल कुल, संग्राम थोपटे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, राजेश पाटील, पीएमआरडीएचे सुहास दिवसे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाने साजरा केला जागतिक पर्यावरण दिवस

0

नवी दिल्ली -निवडणूक आयुक्त श्री. अनुप चंद्रा पांडे यांनी आज जागतिक पर्यावरण दिना निमित्त  भारतीय   निवडणूक आयोगाचे महासचिव श्री. उमेश सिन्हा, महा संचालक श्री. धर्मेंद्र शर्मा यांच्यासह निवडणूक आयोगाच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर नवी दिल्ली येथील इंडिया आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन संस्थेच्या (IIIDEM) आवारात वृक्षारोपण केले. त्यांनी यावेळी एका पुस्तिकेचे प्रकाशन केले. तसेच भारतीय निवडणूक आयोग आणि राज्यांमधील निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक काळात केलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

या कार्यक्रमाला संबोधित करताना निवडणूक आयुक्त श्री अनुप चंद्रा पांडे म्हणाले, कमी करा,  पुनर्वापर करा आणि पुनर्निर्मिती करा हा पर्यावरण सापेक्ष निवडणूक व्यवस्थापनाचा आमचा  दृष्टीकोन आहे. पर्यावरण दिवस दर वर्षी साजरा केल्याने त्याचे महत्त्व अधोरेखित होते. यंदाची पर्यावरण दिनाची संकल्पना ‘निसर्गाशी एकरूपतेने जगणे’ ही असून ‘केवळ एक पृथ्वी’ हे त्याचे समर्पक घोष वाक्य असल्याचं ते म्हणाले. भारतीय निवडणूक आयोगाने मतदात्यांची ऑनलाईन नोंदणी यासह विविध प्रक्रियांचे डीजीटायझेशन करून तसेच मतदाता हेल्पलाईन ॲप, सुविधा पोर्टल सुविधा पोर्टल, केवायसी ॲप, सी-विजील, ई-एपिक, पीओडब्ल्यूडी ॲप, मतदाता मोजणी ॲप, विविध भागाधाराकांशी संबंधित प्रक्रियेचे डिजिटलायझेशन, उमेदवारांचे ऑनलाईन नामांकन, एकदाच वापराच्या प्लास्टिकचा वापर टाळणे, कचरा व्यवस्थापन यासारख्या उपक्रमांमधून पर्यावरण पूरक पद्धतीने निवडणुका सुनिश्चित केल्याचं ते म्हणाले.

भारतीय निवडणूक आयोगाने राज्यांमधील निवडणूक अधिकाऱ्यांना प्लास्टिक आणि अन्य घन कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत सरकारने अधिसूचित केलेल्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यांनी  सरकारी नियमानुसार  फ्लेक्स, पत्रके, पिशव्या आणि अन्य प्रसिद्धी साहित्याची काळजी घ्यावी, आणि एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचे निर्देश दिले आहेत.

खुलताबाद तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य द्या- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

0

औरंगाबाद, दिनांक 05 : कृषि, आरोग्य, रोजगार हमी अशा विविध विभागांच्या योजनांचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे. याशिवाय कोविड काळात विधवा झालेल्या एकल महिलांना रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण देऊन, बालकांना सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळवून द्यावा. अशा प्रकारे शासनाच्या विविध योजनेच्या लाभातून सर्वांगीण विकास साध्य करावा अशा सूचना खुलताबाद तालुका प्रशासनास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

खुलताबाद तहसील कार्यालयात तालुक्यातील विकास कामांचा आढावा डॉ.गोऱ्हे यांनी घेतला. या बैठकीस उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार किरण देशमुख,तालुका आरोग्य अधिकारी डॉ किरण शिंदे, गट विकास अधिकारी श्री सुरडकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी सविता बिक्कड, यांच्यासह महिला पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी नैसर्गिक आपत्ती संदर्भात उपाय योजना, मॉन्सून पूर्व तयारी, अन्नधान्य पुरवठा, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत, रोजगार हमी योजना, तालुक्याला आवश्यक निधी, महिला दक्षता समिती आदींचा आढावा घेतला. सामान्यांच्या विकासासाठी शासनाचे विविध विभाग चांगले काम करत आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमातून महिला, बालक आणि शेतकरी यांना सर्व लाभ मिळवून द्यावेत, खुलताबाद तालुक्यातील उभारी 2.0 अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना त्यांच्या नावावर सातबारा करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असून, कोविड मध्ये ज्या महिला विधवा झाल्या आहेत त्यांच्या नावावर ही शेती अथवा मालमत्ता हस्तांतरण करण्याची प्रक्रिया जलद राबवावी, अशी सूचनाही डॉ.गोऱ्हे यांनी अधिकाऱ्यांना केली.

कोविडने पती गमावलेल्या विधवा महिलांना बी-बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा कृषी विभागाने आयोजित कराव्यात. सानुग्रह अनुदान, महिला आर्थिक विकास महामंडळ,याबरोबरच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मौलाना आझाद विकास, महामंडळाच्या कर्ज योजनांचा महिलांना लाभ मिळवून द्यावा. त्याचबरोबर कोविडमुळे जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा.बोगस बियाणे उत्पादन केलेल्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे निर्देश कृषि अधिकारी यांना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

कोविड कालावधीत पालक गमावलेले पाल्य, कोविड काळातील लसीकरण नियोजन, सद्यस्थितीत करत असलेल्या उपाययोजना, मॉन्सून पूर्व तयारी, मुख्यमंत्री पाणंद रस्ते, पाणी पुरवठा योजना, कृषी आदींसह विभागाच्या विविध योजना आणि कामांचा त्यांनी सविस्तर आढावा डॉ .गोऱ्हे यांनी घेतला. बैठकीनंतर विविध प्रकारचे निवेदन स्वीकारून प्रलंबित विकास कामाबाबत सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना अंमलबजावणीबाबत सूचना नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

सावित्रीबाई फुले स्मारक आणि जलतरण तलावासाठी विद्यापीठाला १० कोटी रुपयांचा निधी-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि.५- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी आणि जलतरण तलावासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील पै. खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील पॅव्हेलिअन इमारत, इनडोबर हॉल आणि अद्ययावत सिंथेटीक ट्रॅकच्या उद्घानप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.कारभारी काळे, प्र-कुलगुरु डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षणाचे संचालक डॉ. दीपक माने, क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, बालेवाडी परिसरात उत्तम क्रीडा सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठातदेखील अद्ययावत क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. राज्यातल्या कुठल्याही भागात समाजाच्या हितासाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी शासन भक्कमपणे पाठीशी उभे राहील. डेक्कन कॉलेज आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्माकरकासाठीदेखील सहकार्य करण्यात येईल.

खेळाडूंना पायाभूत सुविधा आणि प्रोत्साहन देण्याची गरज

पुढच्या पिढीला अभिमान वाटेल असे विद्यापीठ घडविण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून करावा. आपल्या युवा पिढीत मोठी क्षमता आहे. खेळाडुंच्या क्षमतेला वाव देताना पायाभूत सुविधा निर्माण करून देत प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विद्यापीठाला कुठलीही समस्या असल्यास ती सोडविण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. खेळाडुंवर भार न टाकता क्रीडा संकुलाची देखभाल करण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या बाबतीत आपलेपणाच्या भावनेने सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवून काम करावे, प्रत्येक विद्यार्थी आपला असल्याची भावना अधिकारी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी दाखवावी, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.

ते पुढे म्हणाले , पै.खाशाबा जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन करून यशाची प्रेरणा सर्वांना दिली. देशाला कुस्तीतले पहिले कांस्य पदक मिळवून दिले. स्वामी विवेकानंदांनी आपल्या विचार आणि कार्याने जगाला प्रभावीत केले. त्यांचे विद्यापीठात उभारण्यात आलेले पुतळे मानवतेसाठी कार्य करण्याची आणि यशाची प्रेरणा विद्यार्थ्यांना देतील असे त्यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग काही शहरात वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.

पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा देताना ते म्हणाले, जागतिक तापमान वाढीमुळे जगावर परिणाम होत असताना पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, ही काळाची गरज आहे. एक दिवस पर्यावरणाचा विचार न करता ३६५ दिवस आपल्यापरिने पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यायला हवे.

श्री.सामंत म्हणाले, पुण्याच्या शैक्षणिक पंढरीत अपूर्ण शिक्षण प्रकल्प पूर्ण करून पुण्याला देशपातळीवर लौकीक वाढविण्याचा प्रयत्न आहे. राज्याच्या विद्यार्थ्याला सक्षम करणारे शिक्षण विद्यापीठात मिळायला हवे यासाठी विद्यापीठ आणि शासनाला मिळून काम करावे लागेल. काश्मिरी पंडीतांच्या मुलांना शिक्षणासाठी राखीव जागा ठेवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानासाठी १३ कोटी ३३ लाख रुपये मंजूर करण्याात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा संकुलाच्या जलतरण तलाव आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक उभारण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ.काळे म्हणाले, सावित्रीबाई फुले विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करीत अनेक बहुमान प्राप्त केले. विद्यापीठाने अनेक आंतरराष्ट्रीय सामंज्यस्य करार करून आपला विस्तार केला आहे. देशपातळीवर विद्यापीठ १८ व्या स्थानी आहे. २७ एकर मध्ये उभारलेल्या क्रीडा संकुलामुळे क्रीडा क्षेत्रात विद्यापीठाचा नावलौकीक देशपातळीवर पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्री.पांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. क्रीडा संकुलाचा परिपूर्ण वापर करण्यासाठी विद्यापीठ लवकरच धोरण ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमापूर्वी श्री.पवार आणि श्री.सामंत यांनी स्वामी विवेकानंद आणि खाशाबा जाधव यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. त्यांनी यावेळी सिंथेटिक पथ, व्यायामशाळा आणि शुटींग रेंजची पाहणी करुन माहिती घेतली. शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या युवक-युवतींनी मर्दानी खेळ दांडपट्टा, लाठीकाठी आणि तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर केले. खेलो इंडिया स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मल्लखांबच्या खेळाडूंनी मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर केले. मंत्रीद्वयांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

अशा आहेत विद्यापीठातील नव्या क्रीडा सुविधा

क्रीडा संकुलामध्ये बहुउद्देशीय क्रीडा प्रकारांसाठी इनडोअर सभागृह तयार करण्यात आला आहे. यामध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, ज्युदो, कराटे, नेटबॉल, टेबल टेनिस, कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक्स असे विविध क्रीडा प्रकार खेळता येणार आहेत.

क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक व पॅव्हेलियन इमारत तयार करण्यात आली आहे. त्याच्या मध्यभागी फुटबॉल क्रीडांगण तयार करण्यात आले असून यासाठी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान (रुसा) अंतर्गत रुपये ४ कोटीचे अनुदान प्राप्त झाले व उर्वरित खर्च विद्यापीठाने केला आहे. या अद्ययावत सिंथेटिक पथचा खेळाडूंना लाभ होणार आहे.

भारताने 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य निर्धारित वेळेच्या 5 महिने आधीच पूर्ण केले

0

देशाची ऊर्जा सुरक्षा वाढवण्यासाठी, इंधनाच्या आयतीवरचे अवलंबित्त्व कमी करण्यासाठी, परदेशी चलन वाचवण्यासाठी, पर्यावरणाबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि देशाच्या कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी भारत सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रमाचा प्रचार करत आहे. सरकारने 2018 मध्ये अधिसूचित केलेल्या ‘जैव इंधनावरील राष्ट्रीय धोरणामध्ये 2030 सालापर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे सूचक लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. तरीही, 2014 पासून सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे झालेली उत्साहवर्धक कामगिरी लक्षात घेता 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य वर्ष 2030 ऐवजी 2025-26 मधेच पूर्ण होणार आहे. 

माननीय पंतप्रधानांनी जून 2021  मध्ये प्रकाशित केलेल्या “भारतामधील इथेनॉल मिश्रणाचा मार्ग 2020-25” मध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे ध्येय गाठ्ण्यासाठीचा मार्ग तपशीलवार मांडण्यात आला होता. 

मात्र, सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) केलेल्या समन्वयीत प्रयत्नांमुळे 10% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट नोव्हेंबर, 2022 या नियोजित वेळेच्या खूप आधी पूर्ण झाले आहे, यानुसार सार्वजनिक क्षेत्रातल्या ओएमसी नी देशभर पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

गेल्या 8 महिन्यांमधील या उद्दिष्ट पूर्तीने केवळ भारताची ऊर्जा सुरक्षा वाढवली नाही, तर 41,500  कोटी पेक्षा जास्त परदेशी चलनाच्या स्वरुपात त्याचा लाभ झाला,  हरित वायु उत्सार्जानामध्ये (GHG) 27 मेट्रिक टन घट झाली तर शेतकर्‍यांना 40,600 कोटी रुपये खर्चाची रक्कम प्रदान करण्यात आली. 

सरकारने केलेल्या या सर्व उपाययोजनांमुळे ईबीपी कार्यक्रम 2025-26 पर्यंत 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठण्याच्या मार्गावर आहे.

निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. 5- वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण सर्वजण मिळून ही जबाबदारी पार पाडूया, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

            वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपायोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान 2.0’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा सन्मान जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, सदस्य सचिव अशोक शिनगारे आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री म्हणाले, पर्यावरणात प्रत्येक घटक महत्वाचा आहे. आपण सर्वजण एक‍ टीम आहोत आणि सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर कोणताही उपक्रम कसा यशस्वी होऊ शकतो याचे ‘माझी वसुंधरा अभियान’ हे उत्तम उदाहरण आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य यात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. विकास हा झालाच पाहिजे परंतु तो पर्यावरणाची जपणूक करून शाश्वततेकडे जाणारा असणे आवश्यक आहे. मागील काही वर्षांत कमी दिवसांत अधिक पाऊस पडतोय, दरडी कोसळत आहेत यामुळे होणाऱ्या हानीपासून पुढील पिढीचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राज्य शासनाने प्रत्यक्ष पावले उचलली आहेत. त्यानुसार वसुंधरेची जपणूक करण्याचा आपला जुना संस्कार नव्याने रूजविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

            मुख्यमंत्री म्हणाले, विकास कशाला म्हणावे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपण निसर्ग आणि त्यातील वन्यजीव जपत पुढे आलो आहोत, यांची उपयुक्तता लक्षात घेता हा वारसा पुढे नेण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली. झाडांपासून मिळणाऱ्या प्राणवायूची निकड कोविड काळात सर्वाधिक जाणवल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईसारखी समृद्ध वन्य जीवसृष्टी असलेले शहर जगात अन्यत्र कुठेही नाही याचा उल्लेख करून पर्यावरण रक्षणासाठी आज होत असलेल्या कामांची फळे कदाचित आता दिसणार नाही, तथापि पुढच्या पिढीला याचा निश्चित लाभ होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. निसर्गाची हाक ऐकण्याची वेळ आली आहे, माझी वसुंधरा अभियान हे असेच आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारे अभियान असल्याचे त्यांनी सांगितले. या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकसहभाग महत्त्वाचा– अजित पवार

            कोणत्याही उपक्रमात लोकसहभाग अंतर्भूत असला की त्यात यश नक्कीच मिळते, असे सांगून उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासाठी यापुढे 200 कोटी रूपयांचा निधी दिला जाईल, असे जाहीर केले. या माध्यमातून माझी वसुंधरा अभियानाद्वारे पर्यावरण रक्षणासाठी काटेकोर उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

            राज्यात पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून एसटी महामंडळाअंतर्गत टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रीक वाहने घेण्यात येणार असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले. याची सुरूवात नुकतीच करण्यात आली आहे. वातावरणीय बदलांमुळे अनेक संकटे येत आहेत, याबाबत सर्वांनीच दक्षता घेण्याची वेळ आली आहे. प्रसारमाध्यमांनी देखील याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या मनावर पर्यावरणपूरक बाबी बिंबविण्यासाठी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावा असेही ते म्हणाले. माझी वसुंधरा 2.0 अंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या संस्था आणि अधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना पंचतत्वाच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा असावी या उद्देशाने यापुढे त्यांच्या प्रत्येक कामासाठी गुण देऊन उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सत्कार करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण आणि पर्यटन हे दोन्ही विभाग उत्कृष्ट काम करीत असल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.

स्वच्छता ही संस्कृती बनावी– बाळासाहेब थोरात

            स्वच्छता, माझी वसुंधरा हे अभियान ही केवळ रोज राबविण्याची बाब नाही तर ती जनमानसात रूजून आपली संस्कृती बनली पाहिजे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. मागील दोन वर्षांच्या कठीण काळात सर्वच अधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागात केलेल्या उत्कृष्ट कामाचे मोजमाप करता येणार नाही. पर्यावरण दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा सन्मान होत आहे ही आनंदाची बाब असून अशाच इतरही चांगल्या कामाची जाणीव सर्वांना झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पर्यावरण, पर्यटन या विभागांमध्ये चांगली कामे होत असल्याचे सांगून त्यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले. पुढील वर्षी पारितोषिकांचा हा कार्यक्रम यापेक्षाही मोठ्या स्वरूपात घ्यावा, असे ते म्हणाले.

‘इज ऑफ लिव्हिंग’साठी काम करायचे आहे– आदित्य ठाकरे

            पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करतानाच शाश्वत विकास साधून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी काम करायचे आहे, असे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनोगताद्वारे व्यक्त केले. ग्रीन ग्रोथ हे केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर रोजगार निर्मिती आणि आर्थिक चक्र गतिशील राहण्यासाठी देखील आवश्यक असल्याचे ते म्हणाले. माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पंचतत्वाच्या रक्षणासाठी काम होत आहे. याकामामध्ये मंत्रिमंडळापासून गाव पातळीपर्यंत सर्वांचे पाठबळ आणि सहकार्य लाभल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

            नुकत्याच डावोस येथे झालेल्या परिषदेत गुंतवणुकीबरोबरच शाश्वततेवर भर दिला जात होता, हा जागतिक पातळीवर होत असलेला मोठा बदल असून राज्याच्या इलेक्ट्रीक वाहन धोरणाबाबत कौतुकाने बोलले जात असल्याचा अनुभव प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती देऊन यामुळे देशाला प्रगतीची मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात नवी दिशा दाखवणारे काम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            प्रास्ताविकाद्वारे प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी माझी वसुंधरा अभियानाच्या दोन टप्प्यांची माहिती देऊन या अभियानाच्या वाटचालीचा आढावा घेतला. एबीपी माझा चे संपादक राजीव खांडेकर यांनी राज्यात पर्यावरणाबाबत होत असलेली जागृती कौतुकास्पद असून हे काम देशाला दिशादर्शक असल्याचे सांगितले. सकाळ चे संपादक सम्राट फडणीस यांनी या अभियानाला माध्यमांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर, टाइम्स ऑफ इंडियाचे पार्थ सिन्हा यांनी देखील यावेळी बोलताना मानवाला राहण्यासाठी एकच पृथ्वी अस्तित्वात असल्याने तिला जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले.

            माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत विविध पातळ्यांवर उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि अधिकाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये अमृत शहरांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त अभिजित बांगर, उत्कृष्ट विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे, उत्कृष्ट जिल्हाधिकारी पातळीवरील पुरस्कार राहुल रेखावार, कोल्हापूर, उत्कृष्ट जिल्हा परिषद पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि आशिष येरेकर, अहमदनगर आदींसह विविध संस्था आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी शालेय शिक्षणामध्ये प्रगतीसाठी शासन आणि सीईडब्ल्यू तसेच युनिसेफ यांच्यादरम्यान सामंजस्य कराराची देवाणघेवाण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय भुस्कुटे यांनी केले.