Home Blog Page 1605

जाग्या झाल्या सायकल आणि सायकल ट्रॅक योजनेच्या आठवणी :आता पुण्यात ई-बाईक धावणार ; प्रस्तावाला प्रशासकांची मान्यता (व्हिडीओ)

पहिल्या टप्प्यात २५० ठिकाणी ई-बाईक सेवा :

पुणे-शहरात ई-बाईक धावण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यासंदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. ई-बाईक सेवेसाठी पुढील सहा महिन्यात आवश्यक त्या पायाभूत सुविधा महापालिकेकडून निर्माण केल्या जाणार आहेत. दरम्यान, ई-बाईक सेवेसाठी पहिल्या टप्प्यात अडीचशे ठिकाणी चार्जिंग स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. ई-बाईकसाठी व्हिट्रो कंपनीचा प्रस्ताव मार्च २०२२ मध्ये स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला होता.

यामध्ये ७८० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणे, त्याठिकाणी जाहिरात करण्याचे हक्कही कंपनीला देण्याबरोबरच आकाशचिन्ह विभागातर्फे वार्षिक २२२ चौरस मीटर इतके शुक्ल आकारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.व्हिट्रो कंपनी प्रत्येक जागेसाठी वर्षाला सुमारे १ लाख रुपये भाडे, तसेच सर्व स्टेशनसाठी साधारण तीन लाख आणि एकूण नफ्याच्या २ टक्के नफा महापालिकेला देणार आहे. त्यामुळे चार्जिक स्टेशनच्या जागा पुढील ३० वर्षासाठी देण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात ७८० जागांपैकी ५०० जागा कंपनीला द्याव्यात, त्यापैकी २०० ठिकाणीच चार्जिंग स्टेशन असतील, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

पहिल्या टप्प्यात २५० ठिकाणी ई-बाईक सेवा देण्यात येणार आहे. तेथेच चार्जिंग स्टेशनची सुविधा असणार आहे. सहा महिन्यात सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील त्यानंतर ही सेवा पुणेकरांना उपलब्ध होणार आहे. ई-बाईकसाठी प्रत्येक किलोमीटरासाठी एक रुपया साठ पैसे एवढे शुल्क आकारले जाणार आहे.

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा मुद्दा हायकोर्टात, उद्या सुनावणी

मुंबई: शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार हा प्रश्न अनुत्तरीत असताना शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या वतीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी परवानगी मागणाऱ्या आपल्या अर्जावर निर्णय देण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाने वकील जोएल कार्लोस यांच्या वतीने ही याचिका केली आहे. न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर बुधवारी ही याचिका सादर करण्यात आली.

गणेशोत्सवापूर्वी शिवसेनेकडून दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, महापालिकेने अजून कोणताही निर्णय घेतला नाही. या प्रकरणी तातडीने सुनावणी करावी अशी मागणी केली आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेत मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

शिवसेनेने परवानगीसाठी एकदा अर्ज व त्यानंतर स्मरणपत्र असे दोन वेळा अर्ज केले आहेत. यानंतरही मुंबई महापालिकेच्या विधी विभागानेही दोन्ही गटांच्या अर्जावर अद्याप तरी निर्णय घेतला नाही. दरम्यान, परवानगी मिळो वा न मिळो, उद्धव ठाकरे सांगतील त्या ठिकाणी आम्ही दसरा मेळावा घेणार, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे. मंगळवारी शिवसेनेचे नेते व माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी शिष्टमंडळासह पालिकेच्या जी-नॉर्थ येथील कार्यालयात जाऊन परवानगीबाबत अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन

0

दिल्ली-कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची अखेर जीवन-मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला . ते 58 वर्षांचे होते. 10 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एका हॉटेलमध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता, त्यानंतर त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते कोमात होते. बुधवारी पुन्हा त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. तब्बल 42 दिवस ते कोमात होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळगावी कानपूरमध्ये नव्हे तर दिल्लीतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. विनोदाच्या दुनियेत आपली वेगळी छाप उमटवणाऱ्या राजू यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात 5 भावंडे, पत्नी शिखा, मुलगा आयुष्मान, मुलगी अंतरा असे कुटुंब आहे.

11 ऑगस्ट रोजी राजू यांच्यावर तातडीने अँजिओग्राफी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या हृदयात 100 टक्के ब्लॉकेज असल्याचे आढळून आले होते. ही परिस्थिती अतिशय गंभीर असल्याने डॉक्टरांनी राजू यांच्या हृदयात दोन स्टेंट लावले होते. 13 ऑगस्ट रोजी राजू यांचा एमआरआय काढण्यात आला होता. त्यामध्ये त्यांच्या मेंदूची एक नस दबली गेल्याचे समोर आले होते. राजू यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकष्टा केली. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

राजू नेहमी त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देत असे आणि ते फिटदेखील होता. 31 जुलैपर्यंत ते सतत शो करत होता, अनेक शहरांमध्ये त्यांचे शो होणार होते.

अमिताभ बच्चन यांनी राजू श्रीवास्तव यांनी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी एक खास ऑडिओ संदेश पाठवला होता. यामध्ये अमिताभ म्हणाले होते – उठ राजू, खूप झाले, अजून खूप काम करायचे आहे. आता उठ… आम्हा सर्वांना हसायला शिकवं.” हे रेकॉर्डिंग राजू यांना ऐकवले गेले होते.

राजू श्रीवास्तव उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्षही होते. संघर्षाच्या काळात राजू यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘आमदानी अठ्ठनी खर्चा रुपैया’ आणि ‘मैं प्रेम की दिवानी हूं’ यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्यामोठ्या भूमिका साकारल्या. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मुळे राजू यांनी लोकप्रियता मिळाली. या कॉमेडी शोमध्ये त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला होता.

राजू यांनी ‘बिग बॉस 3’ या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता. 2014 मध्ये राजू यांना समाजवादी पक्षाकडून तिकीट देण्यात आले होते, तरीही त्यांनी काही काळानंतर तिकीट परत केले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना स्वच्छ भारत अभियानाचा भाग बनवले होते, त्यानंतर राजू सतत त्यांच्या कार्यक्रमांद्वारे स्वच्छतेशी संबंधित जनजागृती करत असत.

10 वर्षांत तीनदा झाली होती अँजिओप्लास्टी
राजू श्रीवास्तव यांची 10 वर्षांत तीनदा अँजिओप्लास्टी झाली होती. पहिली अँजिओप्लास्टी 10 वर्षांपूर्वी मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात झाली होती. त्यानंतर 7 वर्षांपूर्वी पुन्हा मुंबईच्याच लिलावती रुग्णालयात ते यासाठी दाखल झाले होते. त्यानंतर 11 ऑगस्ट 2022 रोजी डॉक्टरांनी त्यांची तिसऱ्यांदा अँजिओप्लास्टी केली होती.

सामाजिक कार्यात अग्रसेर होते राजू श्रीवास्तव
राजू श्रीवास्तव सामाजिक कार्यात पुढे असायचे. त्यांनी कानपूर येथे त्यांचे दिवंगत मित्र राजेशच्या कुटुंबीयांच्या संपूर्ण खर्च उचलला होता. याशिवाय त्यांनी त्यांच्या परिसरातील रस्तेही बांधले आहेत. कानपूर येथे त्यांच्या शेजारी राहणारे रवी कुमार यांनी सांगितल्यानुसार, राजू काकांमुळे कधीही या परिसरात वाद झाले नाहीत. मदत करणे हा त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग होता. त्यांच्या मित्राचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला होता.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती सदस्य सचिवांच्या मानधनात वाढ – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीची बैठक संपन्न.

मुंबई, दि.20 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे लेखन आणि भाषणे संकलित आणि संपादित करून प्रकाशित करण्याचे अतिशय महत्वाचे आणि ऐतिहासिक असे कार्य सुरू आहे. या समितीत कार्यरत असलेल्या सदस्य सचिव व सदस्यांना काम करताना त्यांच्या पदाला अनुसरून मानधन व सोयी सुविधा दिल्या पाहिजेत. म्हणून त्यांच्या मानधनात वाढ करण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केली.

आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.पाटील यांनी घोषणा केली.

श्री. पाटील म्हणाले, या समितीला सोयी सुविधा दिल्यास दर्जेदार काम वेळेत पूर्ण होईल. यापूर्वी समितीच्या सदस्य सचिवांना 10 हजार रुपये मानधन दिले जात होते. त्यात वाढ करण्यात येत असून आता 25 हजार मानधन देण्यात येईल. समितीचे संशोधन व प्रकाशनाचे काम जलद गतीने होण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय ही बैठकीत घेण्यात आला. तसेच समितीला कार्यालय उपलब्ध करण्यासोबतच सदस्यांना अभ्यास व इतर कामकाज करण्यासाठी शासकीय महाविद्यालय व विद्यापीठात जागेची व्यवस्था याबाबत चर्चा करण्यात आली. समितीकडे उपलब्ध हस्तलिखित जतन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा असेही श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.
बैठकीला आमदार लहू कानडे,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी,पुणे सहसंचालक डॉ.प्रकाश बच्छाव,सहसंचालक डॉ.सोनाली रोडे,समितीचे सदस्य,प्रा. सिद्धार्थ खरात,ज.वि. पवार,डॉ.भालचंद्र मुणगेकर, डॉ.योगीराज बागुल, डॉ.संभाजी बिरांजे ,डॉ. धनराज कोहचाडे, डॉ.कमलाकर पायस,समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पुणे विमानतळ ते विमाननगरला पर्यायी रस्ता जोडण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी : खासदार गिरीश बापट

पुणे दि.२०: पुणे विमानतळावरील 0.58 एकर (2350 चौ.मी.) संरक्षण जमिनीवर विमाननगरला पर्यायी रस्ता जोडण्यासाठी पुणे महानगरपालिकेला काम करण्यासाठी संरक्षण विभागाने परवानगी दिल्याचे खासदार बापट यांनी सांगितले. यावेळी खासदार बापट यांनी सांगितले की पुणे विमानतळापासून विमाननगरला जोडणारा पर्यायी रस्त्यावर असलेली संरक्षण विभागाची केवळ 0.58 एकर (2350 चौ.मी.) जागेवर पुणे मनपाला काम करण्यास परवानगी मिळत नसल्याने सदरचा रस्ता गेली अनेक वर्षापासून प्रलंबित होता. त्यामुळे नागरिकांना विमाननगरला व विमानतळावर जाण्यासाठी इतर पर्यायी दूरच्या रस्त्यांचा वापर करावा लागत होता. तसेच या भागात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती. पर्यायाने नागरिकांना इच्छित स्थळी पोहचण्यास विलंब व मानसिक त्रास होत होता.

तसेच नवीन विस्तारित विमानतळासाठी देखील सदर रस्ता होणे अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे सदरची जागा पुणे मनपाला रस्ता बनवण्यासाठी नाममात्र दरात उपलब्ध करून रस्त्याचे काम तातडीने सुरू होण्यासाठी पुण्याचे खासदार श्री गिरीश बापट यांचे कडून केंद्रीय संरक्षण मंत्री, नागरी विमान वाहतूक मंत्री आणि संबधित विभागाचे अधिकारी यांचे स्तरावर पाठपुरावा सुरू होता. सदर पाठपुराव्यामुळे नुकतीच संरक्षण मंत्रालयाने विशेष बाब म्हणून दि 19.09.22 च्या आदेशानुसार पुणे विमानतळावरून 0.58 एकर (2350 चौ.मी.) संरक्षण जमिनीवर विमाननगरला पर्यायी प्रस्तावित 20 मीटर रुंद असलेला रस्ता जोडणीसाठी पुणे महानगरपालिकेला काम करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी नाममात्र रुपये वार्षिक परवाना शुल्कावर परवानगी देण्यात आली आहे. (1/- प्रति चौ.मी. रु.2350/- प्रतिवर्ष) यामुळे या रस्त्याचे काम तातडीने सुरू होणार आहे. IAF जमिनीच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांचा भाग पुणे महानगरपालिकेने यापूर्वीच पूर्ण केला आहे. या रस्त्यामुळे पुणे विमानतळाकडे आणि तेथून जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरळीत आणि वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

नाट्य-चित्रपट क्षेत्राच्या गतवैभवासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई, दि. 20 : ‘आपली संस्कृती, कला जोपासलीच पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी नाट्य, चित्रपट आणि कला क्षेत्राला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी ‘मला तुमचं ऐकायचंय…! आपण एकमेकांबद्दल बोलत असतो. आता एकमेकांशी बोलूया.., असं म्हणत एका विशेष भेटीत दिलखुलास संवाद साधला. यावेळी मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये चांगले रस्ते, पायाभूत सुविधा, प्रवासी वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चित्रपटांना जीएसटीमधून सूट, ज्येष्ठ कलाकारांसाठी मानधन योजना, त्यांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा, ज्येष्ठ कलाकार, वादक, तंत्रज्ञ आदींना विमा संरक्षण याबाबत तसेच अनेक धोरणात्मक बाबींविषयी मंत्रालयात बैठक आयोजित करून संबंधित विभागांच्या समन्वयाने चर्चेतून मार्ग काढला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले. तसेच चित्रनगरीला भेट देऊन पाहणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, कला क्षेत्राकडे पाहताना आपल्याला कायम त्यामागील झगमगाट दिसतो. मात्र कलाकारांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न समजत नाहीत. ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. या क्षेत्रातील पडद्यामागील कलावंत, तंत्रज्ञ यांच्याशी निगडीत असे अनेक विषय आहेत. त्यांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यापासून विमा संरक्षण अशा सर्वच बाबतीत सकारात्मक निर्णय घेतले जातील. नाट्यगृहांची परिस्थिती सुधारणे, एकपडदा चित्रपटगृहांच्या समस्या तसेच चित्रपटांसाठी कर सवलत तसेच अन्य मुद्यांवरही विचारविनिमय, चर्चेने उपाययोजना केल्या जातील. संस्कृती, कला जोपासली गेली पाहिजे. या गोष्टीचे संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न केले जातील. समाजासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यातूनच उत्तम कलावंत घडतील, ते देश आणि आपल्या राज्याचा नावलौकिक वाढवतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपल्या नाट्य, चित्रपट सृष्टीला गतवैभव पुन्हा मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

या संवादादरम्यान निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय अशा विविध क्षेत्रातील मान्यवर सर्वश्री प्रशांत दामले, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, श्रीमती वर्षा उसगांवकर, निर्माता विद्याधर पाठारे,  मंगेश कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, जितेंद्र जोशी, गायक अवधूत गुप्ते, विजय पाटकर, विजय केंकरे, प्रसाद ओक, चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रातिनिधीक स्वरूपात त्या-त्या क्षेत्रातील समस्या, मुद्यांची मांडणी केली. तसेच याबाबी समजावून घेण्याकरिता आवर्जून आयोजित केलेल्या या संवाद उपक्रमाचे स्वागतही केले.

मोनालिसा म्हणतेय ‘तू फक्त हो म्हण’

अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून नावारूपाला आलेली मोनालिसा बागल सध्या कोणाच्या तरी प्रेमात पडल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. ‘तू फक्त हो म्हण’ असं ती सांगतेय. ती नेमकी कोणाच्या प्रेमात आहे? ती कोणाला ‘हो’ म्हणायला सांगतेय हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेलच, त्यासाठी तुम्हाला मोनालिसाचा तू फक्त हो म्हण हा आगामी मराठी चित्रपट पहावा लागेल. एन एच स्टुडिओची प्रस्तुती असलेला हा चित्रपट १४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. ‘एन एच स्टुडिओज’ ही भारतातील अग्रगण्य निर्मिती संस्था आहे. अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांची निर्मिती तसेच वितरण या निर्मितीसंस्थेने केले आहे. संगीतमय प्रेमकथा असलेल्या ‘तू फक्त हो म्हण या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ.गणेशकुमार पाटील आणि भास्कर डाबेराव यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मीती किरण बळीराम चव्हाण आणि डॉ.गणेशकुमार पाटील यांची आहे. नरेंद्र हिरावत आणि श्रेयांश हिरावत हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना मोनालिसा सांगते, संगीतमय प्रेमकथा असल्याने मला हा चित्रपट करायचा होता. ही अशा प्रेमाची कथा आहे जी कदाचित आपल्या अवतीभवती देखील असू शकते. प्रेम हे असतंच तरी त्या प्रेमाला जिंकत आपण ते कसं निभावतो? याची कथा यात पहायला मिळणार आहे. प्रेमाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनही ‘तू फक्त हो म्हण या चित्रपटात मांडण्यात आला आहे. अभिनेत्री मोनालिसा बागलसोबत अभिनेता निखील वैरागर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांच्या जोडीला गणेश देशमुख, तुकाराम बीडकर, पुष्पा चौधरी, सविता हांडे, डॉ.गणेशकुमार पाटील, झोया खान आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. अभिनेत्री मानसी नाईक या चित्रपटात पाहुण्या भूमिकेत दिसणार आहे.

तू फक्त हो म्हण चित्रपटाची कथा भास्कर डाबेराव तर पटकथा संवाद सचिन जाधव यांचे आहे. सुरेखा गावंडे, भास्कर डाबेराव, स्वप्नील जाधव यांनी गीतरचना लिहिल्या आहेत. भास्कर डाबेराव यांचे संगीत तर आदित्य बेडेकर यांचे पार्श्वसंगीत चित्रपटाला लाभले आहे. रंगभूषा समीर कदम तर वेशभूषा अमृता पाटील, अंजली भालेराव, अस्मिता राठोड, अभिजीत ठाकूर यांची आहे. नृत्यदिग्दर्शन गणेश पतंगे, पंकज बोरे यांचे आहे. कलादिग्दर्शन गणेश पाटोळे यांचे आहे. आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, आर्या आंबेकर, जय बोरा, पूजा पाटील यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. छायांकन मधुरम सोलंकी तर संकलन आनंद.ए.सिंग यांचे आहे. साउंड डिझायनिंगची जबाबदारी दिनेश उचील, शंतनू आकेरकर यांनी सांभाळली आहे. सहनिर्माता एम.जे.एफ. लॉयन.प्रकाश मुंधडा तर कार्यकारी निर्माता रवीशंकर शर्मा, राहुल चव्हाण आहेत. मार्केटिंग हेडची जबाबदारी श्रद्धा हिरावत यांनी सांभाळली आहे. मुख्य सहाय्यक दिग्दर्शक रोहित निकाळे आहेत.

तू फक्त हो म्हण १४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे

हास्ययोग चळवळीच्या नवचैतन्याचा, रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनी व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम

पुणे : ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ हसरे करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्थेच्या वर्धापनदिना निमित्ताने हास्यक्लब चळवळीचा रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गुरुवार, दि. २२ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९.३० ते रात्री ८.०० या वेळेत गणेश कला क्रीडामंच, स्वारगेट येथे हे कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती संस्थेचे मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मकरंद टिल्लू म्हणाले, “विठ्ठल काटे व सुमन काटे यांच्या प्रेरणेतून १९९७ मध्ये पुण्यातील संस्थेच्या पहिल्या हास्यक्लबची स्थापना झाली. हास्यक्लब स्थापनेच्या त्यांच्या कार्याचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या सुमारे २१५ शाखांमधून सुमारे २५ हजाराहून अधिक शाखा सदस्यांनी शारीरिक व मानसिक आरोग्याचा लाभ घेतला आहे. १३ विश्वस्त, ४० विभागप्रमुख तसेच शाखाप्रमुख, शाखा उपप्रमुख यांच्या सहकार्याने हा उपक्रम जनमानसात रुजला आहे. हास्य हे अमूल्य असल्याने नवचैतन्य हास्ययोग परिवारातील व्यायामासाठी कोणतेही मूल्य घेतले जात नाही. संस्थेच्या विविध शाखातून अनेक सामाजिक उपक्रम केले जातात.”

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे म्हणाले “मकरंद टिल्लू हे गेली पंचवीस वर्षे महाराष्ट्रभर हास्ययोगाचा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य करीत आहे. त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या इंटरनेटवरील ऑनलाइन हास्यक्लब शाखेचा लाभ सुमारे पाच हजार तीनशे सदस्यांनी घेतला आहे. यामध्ये नऊ देशातून, देशाच्या विविध प्रांतातून, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून सदस्य सहभागी होत आहेत.”

संस्थेचे सचिव पोपटलाल शिंगवी म्हणाले, “विठ्ठल काटे यांचाही ८५ वा वाढदिवस या दिवशी आहे. या कार्यक्रमाला संस्थेच्या सर्व शाखातून सुमारे दोन हजार सदस्य उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९.३० वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे. उद्घाटन समारंभाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे , क्रीडावैद्यक तज्ञ डॉ. हिमांशु वझे, माजी एअर मार्शल श्री. भूषण गोखले, कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे, उपाध्यक्ष सचिन आपटे, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते पुनीत बालन, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश धोका उपस्थित राहणार आहेत.  क्रीडावैद्यक तज्ञ डॉ. हिमांशु वझे यांचे ‘ स्वास्थ्यमय वसा, विनाकारण हसा’ आणि ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे ‘ हास्य, आनंद आणि तत्वज्ञान ‘ या विषयावर  यावेळी व्याख्यान  होणार आहे.

दुपारी २.०० ते ४.०० या वेळेत शाखांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. सायंकाळी ५.०० वाजता समारोप, तसेच भारतरत्न गानसरस्वती लतादीदी मंगेशकर यांना समर्पित ‘रंगीला… रे’ हा मनीषा निश्चल व सहकारी यांचा वाद्यवृंदासह कार्यक्रम होणार आहे.”

वीरमाता-पत्नींची धान्यतुला करुन दिला ७५० किलो धान्यरुपी प्रसाद 

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे आयोजन ; एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांची उपस्थिती
पुणे : देशासाठी प्राणांची बाजी लावून लढणा-या आणि प्रसंगी वीरमरण आलेल्या भारतीय सैनिकांच्या वीरमाता व वीरपत्नी दिपाली मोरे, मालुताई पाटील, मधुरा जठार, लक्ष्मी गोरे, नीलम शिळीमकर यांची धान्यतुला शुक्रवार पेठेत करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वीरमाता व वीरपत्नींची धान्यतुला करुन त्यांच्या समर्पणाचा आणि सैनिकांच्या हौतात्माचा गौरव यानिमित्ताने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला.  
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे मंदिरासमोर भारतीय सैनिकांच्या पाच वीरमाता व वीरपत्नींची धान्यतुला करण्यात आली. यावेळी एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, फडगेट पोलीस चौकीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गीतांजली म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष सागर कुलकर्णी, ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, रोहन जाधव, उमेश कांबळे, अमर लांडे, अमेय थोपटे, वैभव वाघ, विक्रांत मोहिते, अभिषेक पायगुडे, कुणाल जाधव, अनुप थोपटे आदी उपस्थित होते. 
वीरमाता व वीरपत्नींना मानाचे उपरणे, मानपत्र व मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले. सेवा मित्र मंडळाचे यंदाचे ५७ वे वर्ष आहे. धान्यतुलेतील ७५० किलो धान्य पुणे आणि परिसरातील लुई ब्रेल अंध अपंग कल्याणकारी संस्था, आपलं घर, बचपन वर्ल्ड फोरम या तीन अनाथ मुलांच्या संस्थांना देण्यात आले. 
भूषण गोखले म्हणाले, सैनिकांप्रमाणेच प्रत्येकाने देशासाठी चांगले कार्य करायला हवे. वीर सैनिकांनी देशासाठी प्राण अर्पण करण्यापर्यंतचे मोलाचे कार्य केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सैनिक काम करीत असतात. त्याची माहिती घेऊन त्यातून आपण प्रत्येकाने स्फूर्ती मिळवायला हवी. समाजासाठी उपयुक्त असे उपक्रम राबवून त्यातून देशकार्य करायला हवे, असेही त्यांनी सांगितले. 
सागर कुलकर्णी म्हणाले, दरवर्षी धान्यतुलेचा अनोखा उपक्रम राबविला जातो. गणेशोत्सव कार्यकर्ते, आरोग्य कर्मचारी, पोलीस अशा समाजासाठी कार्य करणा-या घटकांची धान्यतुला केली जाते. हे धान्य समाजातील गरजू व वंचित मुलांसाठी काम करणा-या संस्थांना देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम मंडळ अनेक वर्षे करीत आहे. यावर्षी धान्यतुलेच्या माध्यमातून वीरमाता व वीरपत्नींना नमन करण्याची संधी मंडळाला मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले. पंकज पारवे यांनी सूत्रसंचालन केले.

गोदरेज मॅजिकने हँडवॉशच्या नवीन टीव्हीसीसाठी ब्रँड अॅम्बेसेडरपदी माधुरी दीक्षित

मुंबई, २० सप्टेंबर २०२२: गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL)चा वैयक्तिक आणि घरगुती स्वच्छता ब्रँड असलेल्या गोदरेज मॅजिकने अभिनेत्री माधुरी दीक्षितला त्यांच्या गोदरेज मॅजिक हँडवॉश पावडर-टू-लिक्विड हँडवॉशसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले. ब्रँडने क्रिएटिव्हलँड एशिया द्वारे संकल्पित एक नवीन टीव्हीसी देखील सादर केली असून त्यामध्ये माधुरी या शाश्वत व्यवहार्य स्वच्छता उत्पादनाची वैशिष्ट्ये सादर करताना दिसते.

बॉलीवूडवर अनेक वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री माधुरी दीक्षितचा प्रचंड मोठा आणि निष्ठावंत चाहतावर्ग आहे. हे चाहते तिच्याकडे विविध पैलूंतून बघतात. सध्या काम सुरू  असलेल्या एका नवीन चित्रपटासह एका लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो मधील उपस्थिती आणि ओटीटी माध्यमातील पदार्पणातच मिळालेले भरघोस यश यामुळे माधुरीची लोकप्रियता विविध वयोगटांमध्ये आणि भौगोलिक क्षेत्रांमध्ये पसरली आहे. या सहयोगाचा उद्देश लोकांना हात धुण्याच्या गोष्टीला प्राधान्य देण्यासाठी आणि शाश्वत निवडी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी माधुरीबद्दल कालातीत वाढणारी ओढ आणि गोदरेज मॅजिकची ब्रँड मूल्ये एकत्र आणणे हा आहे.

या सहयोगाबद्दल बोलताना गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या मुख्य विपणन अधिकारी सोमश्री बोस म्हणाल्या, “गोदरेज मॅजिक हँडवॉश हे अशा प्रकारचे पहिले उत्पादन आहे जे स्वच्छतेच्या श्रेणीत नावीन्य आणि टिकाऊपणामध्ये झेप घेणारे आहे. या उत्पादनाने स्वच्छ जीवनशैली सोपी, परवडणारी आणि मजेदार केली आहे. गोदरेज मॅजिकने आधीच भारतीय हँडवॉश बाजारपेठेचा १/५ भाग व्यापला आहे. इथून पुढच्या प्रवासासाठी माधुरी दीक्षितला मॅजिक ब्रँडमध्ये सामावून घेतल्याने आम्हाला आनंद होत आहे. माधुरीसोबतच्या या ब्रँडच्या सहयोगामुळे भारतीय बाजारपेठेत खोलवर शिरायला आणि जंतुविरहीत भारताचा प्रसार करायला आम्हाला मदत होईल.”

या सहयोगाविषयी बोलताना माधुरी दीक्षित म्हणाली, “भारतातील पहिला पावडर टू लिक्विड हँडवॉश असणाऱ्या आणि या श्रेणीतील अग्रणी अशा गोदरेज मॅजिक हँडवॉशशी जोडले जाण्याचा मला खूप आनंद झाला आहे.  हाताची स्वच्छता आणि आरोग्य यावर भर देणाऱ्या सामाजिक प्रश्नांसाठी उपाय असलेल्या या हँडवॉशचे स्वरूप नाविन्यपूर्ण असून हा एक परवडणारा उपाय आहे. यामध्ये प्लास्टिक आणि इंधनाचा वापर कमी होत असल्याने मॅजिक हँडवॉश हे पर्यावरणपूरक उत्पादन आहे.

“मी स्वत: स्वच्छतेबद्दल विशेष आग्रही असते आणि माझ्या कुटुंबासह त्याचे काटेकोरपणे पालन करते. हात धुणे आणि दात घासणे या दोन स्वच्छतेसंदर्भातील गोष्टी माझ्या मुलांनीही नेहमी काटेकोरपणे करण्याचा आग्रह मी करत असते. मी गोदरेजच्या टीमसह लोकांना केवळ जंतूंपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नव्हे तर एक पाऊल पुढे शाश्वततेच्या दिशेने टाकत पर्यावरणपूरक उत्पादने वापरण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यास प्रेरित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.”

गोदरेज मॅजिक हँडवॉश कडुनिंब आणि कोरफड यांनी समृद्ध आहे. त्यामुळे ते हातांना सौम्य परंतु जंतूंसाठी नाशक बनते. हे सिंगल पावडर सॅशेमध्ये आणि मॅजिक रिकामी बाटली आणि पावडर सॅशेच्या कॉम्बी पॅकमध्ये देखील उपलब्ध आहे. पावडर सॅशेची किंमत १५ रुपये आहे. सध्याच्या लिक्विड हँडवॉश रिफिलच्या किंमतीच्या ती एक तृतीयांश आहे. कॉम्बी पॅकची किंमत ३५ रुपये आहे. सध्याच्या लिक्विड हँडवॉश बॉटल पॅकच्या किंमतीपेक्षा ही किंमत निम्म्याहून कमी आहे. तर मग सुरक्षित राहण्यासाठी ही पावडर एकत्र करा, हलवा आणि हात धुवा.

पावडर-टू-लिक्विड स्वरूप गोदरेज मॅजिक हँडवॉशला पर्यावरणपूरकही बनवते. मॅजिक हँडवॉशला नेहमीच्या हँडवॉशच्या तुलनेत पॅकेजिंगमध्ये फक्त १/२ प्लास्टिक आवश्यक असते. पावडर सॅशे लहान आणि हलके असल्यामुळे एका ट्रकमधून अधिक सॅशेची वाहतूक केली जाऊ शकते. त्यामुळे  केवळ १/४ इंधनाचा वापर होतो ज्यामुळे नियमित हँडवॉशच्या वाहतुकीच्या तुलनेत कार्बन उत्सर्जन कमी होते.  सॅशे हलके असल्यामुळे प्रत्येक ट्रकमधून चार पट अधिक रिफिल वाहतूक केली जाऊ शकते.

स्टडी ऑस्ट्रेलियातर्फे विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रातील अग्रणी आणि ऑस्ट्रेलियन विद्यापीठांना एकाच छताखाली आणण्याचा कार्यक्रम

0

पुणे, २० सप्टेंबर २०२२: ऑस्ट्रेलियन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशन (ऑस्ट्रेलियन सरकारी एजन्सी) द्वारे स्टडी ऑस्ट्रेलिया रोड शो चे मंगळवारी पुण्यात आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील नेत्यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.

भारतीय विद्यार्थ्यांच्या जागतिक पातळीवरील करिअरला आकार देण्यासाठी डिझाइन केलेल्या ऑस्ट्रेलियन सरकारच्या उपक्रमांवर या कार्यक्रमा प्रकाश टाकण्यात आला. हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकारांसाठी २६ हून अधिक ऑस्ट्रेलियन विद्यापीठांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी होती.

१२ ते २२ सप्टेंबर या कालावधीत कोची, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू आणि जयपूरसह इतर पाच भारतीय शहरांमध्ये स्टडी ऑस्ट्रेलिया रोड शो कार्यक्रम आयोजित केले जातील.

दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाचे शिक्षणातील उत्कृष्टतेचे प्रदर्शन करण्यात आले आणि विद्यार्थी, पालक, शिक्षण सल्लागार आणि संस्था प्रमुखांना यात सहभागी करून घेण्याची सुविधा होती. ऑस्ट्रेलियात शिक्षण घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी विचार करणे आवश्यक असलेल्या प्रमुख पैलूंचाही यात समावेश होता.

या कार्यक्रम स्थळी विद्यार्थ्यांसाठी कोणता अभ्यासक्रम सर्वोत्तम आहे हे त्यांना ठरवायला मदत करण्यासाठी करिअर मॅचर स्क्रीन होती. या साधनामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रांशी जुळणारे अभ्यासक्रम सादरीकरण समजायला मदत झाली. अनेक विद्यार्थ्यांनी मग त्यानुसार सहभागी विद्यापीठांशी संपर्क साधला.

या उपक्रमांबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियन सरकारच्या ऑस्ट्रेलियन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशन (ऑस्ट्रेड)चे इंडिया डिजिटल एज्युकेशन हबचे संचालक श्री विक सिंग म्हणाले, “ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेण्याबाबत विचार करताना विद्यार्थी सर्वोत्तम निर्णय घेत आहेत याची खात्री करण्यासाठी आम्ही भारतीय विद्यार्थ्यांसोबत जवळून काम करतो. स्टडी ऑस्ट्रेलिया रोड शोने विद्यार्थी, पालक, शिक्षण सल्लागार आणि संस्था प्रमुखांना अद्ययावत, विश्वासार्ह आणि संबंधित माहिती प्रदान केली. ऑस्ट्रेलिया जागतिक दर्जाचे शिक्षण, मजबूत करिअर मार्ग आणि विद्यार्थ्यांसाठी एक अतुलनीय जीवनशैली पुरविते.”

रोड शोमध्ये सहभागींना स्टुडंट व्हिसा मिळविण्याची प्रक्रिया आणि ऑस्ट्रेलियन व्हिसा आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून ग्रॅज्युएट रूट याविषयी स्पष्ट उत्तरे देण्यात आली. यावेळी ऑस्ट्रेलियन सरकारच्या प्रतिनिधींनी शिष्यवृत्ती, विद्यार्थी जीवन आणि देशातील सुरक्षा याबद्दल तपशीलवार माहिती देखील दिली. 

अलीकडेच ऑस्ट्रेलियन विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या सध्याच्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी त्यांची रोजगारक्षमता कौशल्ये वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलियन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशनचा ‘द स्टडी ऑस्ट्रेलिया इंडस्ट्री एक्सपिरीअन्स प्रोग्रॅम (SAIEP) सादर करण्यात आला.

गेल्या काही वर्षांमध्ये, जागतिक दर्जाचे शिक्षण, अभ्यासानंतरच्या कामाच्या संधी आणि राहणीमानाच्या उच्च गुणवत्तेसाठी मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियामध्ये शिकण्याचा पर्याय निवडत आहेत.  डिसेंबर २०२१ च्या मध्यापासून २२ जुलै २०२२ पर्यंत सीमा पुन्हा उघडल्यापासून २६०,००० हून अधिक विद्यार्थी व्हिसा धारक ऑस्ट्रेलियात आले.

स्टडी ऑस्ट्रेलियाबद्दल अधिक माहितीसाठी आणि भारतीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पाठबळाबद्दल अधिक माहिती https://www.studyaustralia.gov.au/india वर उपलब्ध आहे.

महापालिकेतील ५ वर्षातील भ्रष्ट कारभाराने पुणे खड्ड्यात -प्रशांत जगताप यांचा आरोप

पुणे- गेल्या पाच वर्षात पुणे शहरात भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे आणि ठेकेदारीराजने केलेल्या निकृष्ठ कामांमुळे संपूर्ण पुणे शहर खड्डेमय झालेले आहे.असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी येथे केला आहे.
प्रभाग 39 मध्ये भवानीपेठ – मार्केट यार्ड रस्त्यावर खड्ड्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत केल्याने असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सेव्हन लव्हज चौक येथे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत गेल्या ५ वर्षातील गैरकारभाराचा निषेध व्यक्त केला.या आंदोलन प्रसंगी ,महिला शहराध्यक्षा सौ.मृणालिनी वाणी,संतोष नांगरे,दिनेश खराडे,बाळासाहेब अटल,योगेश पवार,मीनाताई पवार,विद्या ताकवले,जयश्री त्रिभुवन आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या ८-१० दिवसांपासून पुणे शहरात पावसाची संततधार सुरू आहे.या काळात पुणे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे.हजारो कोटी रुपयांची रस्त्यांची कामे गेल्या ५ वर्षात होऊन देखील जर पुणे शहरातील रस्त्यांची ही अवस्था असेल तर या कामांच्या गुणवत्तेच्या बाबत निश्चितच प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत . या शहरात साडेआठ हजार कोटी रुपयांचे बजेट असणारी महानगरपालिका जर पुणेकरांचा टॅक्स गोळा करून पुणेकरांना सोयी सुविधा देऊ शकत नसेल तर निश्चितच पुणेकरांच्या मनामध्ये गेल्या ५ वर्षातील सत्ताधारी भाजपच्याबाबत मोठा रोष आहे.या खड्ड्यांमुळे शहरात दररोज अपघात होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

बदलीसाठी दबाव आणणा-या अधिकारी – कर्मचा-यांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करा-सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आदेश

0

मुंबई, दि. २० सप्टेंबर :– सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक अधिकारी आपल्या पदस्थापनेच्या ठिकाणी अद्यापही रुजू झालेले नाहीत. तसेच काही अधिकारी हे त्यांच्या सोयीनुसार त्यांना पदस्थापना मिळावी यासाठी विविध माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही निर्दशनास आले आहे. परंतु अशा अधिकारी- कर्मचा-यांवर यापुढे कोणत्याही प्रकारची सहानुभूती न दाखविता जे अधिकारी बदलीच्या अथवा पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत अशा अधिका-यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांची आढावा बैठक संपन्न झाली. याबैठकीला विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मंत्री रविंद्र चव्हाण यांनी अधिका-यांच्या कामाचा व त्यांच्या कार्यपध्दतीचा आढावा घेतला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या आस्थापनेचाही आढावा घेतला. याप्रसंगी अनेक अधिकारी व कर्मचारी त्यांच्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची विहित कामे मुदतीमध्ये पूर्ण होत नाहीत व त्यांच्या कामाचा ताण हा अन्य अधिका-यांवर पडत असल्याची गंभीर बाब यावेळी मंत्री चव्हाण यांच्या निदर्शनास आली. या गंभीर विषयांची मंत्री चव्हाण यांनी दखल घेत जे अधिकारी – कर्मचारी आपल्या पदस्थापनेच्या ठिकाणी तातडीने रुजु होणार नाहीत व आपल्या कामाचा पदभार स्वीकारून काम करणार नाहीत. अशा अधिकारी – कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई सुरु करण्याचे आदेश मंत्री चव्हाण यांनी या बैठकीतच दिले.

रस्त्यावरील खड्यांचा विषय हा सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी चालढकल करीत असल्याचेही निर्दशनास आले आहे. त्यामुळे जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यासाठी मोबाईल अॅप तयार करण्यात यावे. त्याचप्रमाणे खड्डे मुक्त रस्ते करण्यासाठी कामाची गती वाढविणे गरजेचे असून जी कामे सध्या अपूर्ण आहेत ती काम आता युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे आदेशही मंत्री चव्हाण यांनी संबंधित अधिका-यांना दिले.

रस्यांवरील खड्डयांची कामे पावसाळ्यामुळे अपूर्ण राहिली असतील तर ही कामे कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यानंतर लवकरात लवकर पूर्ण करुन रस्त्यांवरील खड्डे मुक्त करण्याच्या कामाला लागा व जनतेला दिलासा द्या, तसेच या कामाच्यादृष्टीने सर्व अधिका-यांनी आपापल्या पातळीवर नियोजन करण्याच्या सूचनाही मंत्री चव्हाण यांनी दिल्या.

घाट रस्त्यांच्या पर्यायी मार्गाची दुरुस्ती अद्यापही मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्यामुळे वाहनचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे ही दुरुस्ती लवकरात लवकर करावीत. तसेच शासकीय इमारती व हॉस्पिटल आदींची अनेक अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री चव्हाण यांनी याबैठकीत अधिका-यांना दिल्या.

स्वराज पुरस्कारांच्या चौथ्या सोहळ्यात स्वराज ट्रॅक्टर्सने केला भारतीय कृषी क्षेत्रातील नायकांचा सन्मान

शेतकरी आणि कृषी-संस्थांनी दिलेल्या योगदानाची घेतली दखल

नवी दिल्ली,  २० सप्टेंबर २०२२: महिंद्रा समूहाचा एक भाग आणि एक अग्रगण्य भारतीय ट्रॅक्टर ब्रँड स्वराज ट्रॅक्टर्स यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित कृषी परिषदेत स्वराज पुरस्कार २०२२ च्या चौथ्या सोहळ्याचे आयोजन केले.

या परिषदेमध्ये माननीय केंद्रीय कृषी मंत्री श्री. नरेंद्र सिंह तोमर यांच्या उपस्थितीत स्वराजने २०२१-२०२२ मध्ये कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल शेतकरी आणि कृषी संस्थांचा सन्मान केला.  यावेळी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी स्वराज ट्रॅक्टर्सने दिलेल्या योगदानाचीही दखल घेण्यात आली.   यावेळी बोलताना श्री. तोमर यांनी कृषी क्षेत्राला विशेषत: लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतीचे यांत्रिकीकरण आणि शेतीमधील तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयाच्या अनुषंगाने दिवसभराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आपल्या मुख्य भाषणादरम्यान स्वराज विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हरीश चव्हाण म्हणाले, “भारताच्या आर्थिक वाढीसाठी कृषी क्षेत्र महत्त्वपूर्ण आहे आणि लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची उत्पादकता आणि उत्पन्न वाढविण्यात यांत्रिकीकरण आणि अॅग्रीटेकची भूमिका महत्त्वाची आहे. भारतीय कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनवून एकूण उत्पादकता वाढविण्यासाठी भारतीय शेतजमिनींवर शाश्वत, परवडणारे आणि सुलभ कृषी यांत्रिकीकरण याचा आपण अवलंब केला पाहिजे.”

श्री. चव्हाण पुढे म्हणाले, “स्वराज ट्रॅक्टर्समध्ये आमचा ‘ट्रान्सफॉर्म फार्मिंग आणि एनरिच लाईव्ह्स’ या आमच्या उद्देशावर ठाम विश्वास आहे आणि स्वराज पुरस्कार केवळ केलेल्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठीच नव्हे तर या क्षेत्राच्या गरजा आणि प्रश्नांवर चर्चा आणि प्रकाश टाकण्यासाठीही एक व्यासपीठ म्हणून काम करतात. आम्हाला शेतकरी आणि त्यांच्या समुदायांपर्यंत थेट पोहोचण्याची संधी यामुळे मिळते.”

भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्यासाठी सक्षम, परवडणाऱ्या आणि सुलभ तंत्रज्ञानासह शेतकऱ्यांना सक्षम करण्यासंबंधी विविध कृषी विषयांवर पॅनेल चर्चा आणि तांत्रिक सत्रांमध्ये सहभागी झालेल्या कृषी क्षेत्रातील विविध मान्यवर आणि प्रमुख सरकारी अधिकाऱ्यांनाही स्वराज पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

स्वराज पुरस्कार विजेत्यांची यादी व्यक्ती
पुरस्कार विभागस्थळव्यक्ती
   
केव्हीके यादी
उत्कृष्ट केव्हीकेगुमला, झारखंडडॉ. संजय कुमार
उत्कृष्ट केव्हीकेमहेंद्रगढ, हरयाणाडॉ. रमेश कुमार
उत्कृष्ट केव्हीकेकुचबेहार, पश्चिम बंगालडॉ. बिकाश रॉय
उत्कृष्ट केव्हीकेबाराबंकी, उत्तर प्रदेश      डॉ. शैलेश सिंग
एफपीओज यादी 
उत्कृष्ट एफपीओउडुपी कालपरसा कोकोनट अँड ऑल स्पाईसेस प्रॉडयूसर कंपनी लिमिटेडश्री सत्यनारायण उडूपा. बी
उडुपी, कर्नाटक
उत्कृष्ट एफपीओकझानी फार्मर्स प्रॉडयूसर कंपनी लिमिटेड, एरोड, तामिळनाडू श्रीमती के. पी. कविथा
उत्कृष्ट एफपीओलवकुश अॅग्रो प्रॉडयूसर कंपनी लिमिटेडपूर्व चंपारण, बिहारश्री परमानंद पांडे
उत्कृष्ट एफपीओश्री कृष्ण उत्पादनमुखी क्रिसकाक समिती सिवसागर, आसामडॉ. खनिंद्र देव गोस्वामी
श्री कृष्ण उत्पादनमुखी क्रिसकाक समिती
 
  
शास्त्रज्ञांची यादी 
उत्कृष्ट शास्त्रज्ञआयसीएआर – नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिटयूट, कर्नाळ डॉ. नरेश सेळोकर शास्त्रज्ञ, प्राणी विज्ञान  डॉ. नरेश सेळोकर शास्त्रज्ञ, प्राणी विज्ञान
उत्कृष्ट शास्त्रज्ञक्रॉप प्रॉडक्शन डिव्हिजन आयसीएआर – नॅशनल राईस रिसर्च इन्स्टिटयूट, कटक ओडिशाडॉ. राहुल त्रिपाठी, वरिष्ठ शास्त्रज्ञ
उत्कृष्ट शास्त्रज्ञडिव्हिजन ऑफ जेनेटिक्स आयसीएआर- आयएआरआय, नवी दिल्ली  डॉ. प्रोलय कुमार भौमिक शास्त्रज्ञ
उत्कृष्ट शास्त्रज्ञआयसीएआर इंडियन इन्स्टिटयूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च पोस्ट बॅग नं.१ पी. ओ. जाखीनी (शाहनशापूर), वाराणसीडॉ. प्रदीप करमरकर शास्त्रज्ञ
आयसीएआर इन्स्टिटयूट/ कृषी विद्यापीठे यादी  
उत्कृष्ट संस्थाआयसीएआर- नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ अॅनिमल न्यूट्रिशन अँड फिजीओलॉजी, बंगळुरूडॉ. राघवेंद्र भट, संचालक
उत्कृष्ट संस्थाआयसीएआर- इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मिलेट्स रिसर्च, हैद्राबादडॉ. बी दयाकर राव
उत्कृष्ट संस्थाआयसीएआर- सेंट्रल इन्स्टिटयूट ऑफ फ्रेशवॉटर अॅग्रिकल्चर, भुवनेश्वर डॉ. सरोज कुमार स्वेन
उत्कृष्ट संस्थागोविंद बल्लभ पंत युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी, पंतनगर  डॉ. एम. एस. चौहान, व्हीसी
फार्मर कॉपरेटीव्ह्ज  
उत्कृष्ट फार्मर कॉपरेटीव्ह्जओडिशा स्टेट कॉपरेटीव्ह बँक, भुवनेश्वर, ओडिशाश्री. संजीव चढा, अध्यक्ष
उत्कृष्ट फार्मर कॉपरेटीव्ह्जप्रायमरी अॅग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी, सिक्का, पश्चिम चंपारण, बिहार श्री. श्री संजीव कुमार पांडे, अध्यक्ष
उत्कृष्ट फार्मर कॉपरेटीव्ह्जरंगपूर ग्रुप दूध उत्पादक सहकारी मंडळी, रंगपूर, गुजराथश्री राम सिंग रथवा अध्यक्ष
उत्कृष्ट फार्मर कॉपरेटीव्ह्जमुंबई जिल्हा मछिमार मध्यवर्ती सहकारी संघ लिमिटेड- महाराष्ट्र श्री रामदास सांधे  अध्यक्ष
वैयक्तीक शेतकरी  
उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शेतकरी  गाव आणि पोस्ट: खेडाजिल्हा: अमरोहा (उत्तर प्रदेश) श्री. सुखवीर सिंग
उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शेतकरी  गाव: लडारी, पी. एस. केओतीजिल्हा: दरभंगा (बिहार)श्री. शंकर झा  
 
उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शेतकरी  गाव: मंडलखण, तालुका आणि जिल्हा साजापूर (मध्यप्रदेश)श्री. शरद भंडावत  
 
उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शेतकरी  गाव: बोडादरोब्लॉक: चक्रधर पूर, पश्चिम सिंघभूम (झारखंड )श्रीमती जयंती समद  
 
 
उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शेतकरी  गाव: हिरानार (पटेलपारा)जिल्हा: दंतेवाडा (छत्तीसगड)
 श्रीमती कमला आतमी
राज्य/ केंद्रशासित प्रदेश कृषी सचिव विभाग 
उत्कृष्ट राज्यकृषी सचिव विभागकर्नाटक
उत्कृष्ट एनई राज्यकृषी विभागमिजोराम
उत्कृष्ट केंद्रशासित प्रदेशकृषी विभागलडाख
   

महाविद्यालयीन जीवनात आत्मशोध घेण्याची संधीगायिका आरती अंकलीकर-टिकेकर

पुणे, दि. २० – मी कोण आहे? मला काय आवडते? मला काय व्हायचे आहे? ते करण्या योग्य टॅलेंट माझ्यात आहे का? हा आत्मशोध घेण्याची संधी महाविद्यालयीन जीवनात मिळत असते. विविध स्पर्धांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांनी ती शोधली पाहिजे, असे मत ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी व्यक्त केले.

डीईएसच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) ‘हेरिटेज कलेक्टिव्ह विभागा’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अस्तित्व’ या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे उद्घाटन करताना अंकलीकर बोलत होत्या.

डीईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रमोद रावत, प्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, माजी प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित, डॉ. राजश्री गोखले, डॉ. अनघा काळे, प्रा. वृषाली महाजन, प्रा. निकिता शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

अंकलीकर पुढे म्हणाल्या, ‘‘कोणतीही गोष्ट उत्तम करण्यासाठी किमान बारा वर्षांची तपश्चर्या करावी लागते. त्यानंतर कोणी शिक्षक, कोणी गायक तर कोणी कानसेन होतो. आपल्या गुरुचा सल्ला घेऊन योग्य दिशेने सातत्यपूर्ण मेहनत केल्यास यश निश्चित मिळते.’’

कुंटे म्हणाले, ‘‘आपल्या राष्ट्राची ओळख इतिहास, कला आणि संस्कृती यामुळे आहे. कला आणि संस्कृतिचा आयाम हा वैयक्तिक नसून, आपल्या देशाचा राष्ट्रीय आविष्कार आहे. त्याचे जतन करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे महत्त्व आहे.’’

भारतीय संस्कृतिच्या संवर्धनासाठी ‘अस्तित्व’ या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा स्पर्धेचे तेरावे वर्ष आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या संकल्पनेवर आधारित नृत्य, संगीत, वादन, चित्रकला, छायाचित्रण, स्केचिंग, मेहेंदी, कोडी सोडवा अशा पंधरा प्रकारांमध्ये या वर्षी स्पर्धा झाल्या. त्यामध्ये दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.