शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे आयोजन ; एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांची उपस्थिती
पुणे : देशासाठी प्राणांची बाजी लावून लढणा-या आणि प्रसंगी वीरमरण आलेल्या भारतीय सैनिकांच्या वीरमाता व वीरपत्नी दिपाली मोरे, मालुताई पाटील, मधुरा जठार, लक्ष्मी गोरे, नीलम शिळीमकर यांची धान्यतुला शुक्रवार पेठेत करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वीरमाता व वीरपत्नींची धान्यतुला करुन त्यांच्या समर्पणाचा आणि सैनिकांच्या हौतात्माचा गौरव यानिमित्ताने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे मंदिरासमोर भारतीय सैनिकांच्या पाच वीरमाता व वीरपत्नींची धान्यतुला करण्यात आली. यावेळी एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, फडगेट पोलीस चौकीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गीतांजली म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष सागर कुलकर्णी, ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, रोहन जाधव, उमेश कांबळे, अमर लांडे, अमेय थोपटे, वैभव वाघ, विक्रांत मोहिते, अभिषेक पायगुडे, कुणाल जाधव, अनुप थोपटे आदी उपस्थित होते.
वीरमाता व वीरपत्नींना मानाचे उपरणे, मानपत्र व मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले. सेवा मित्र मंडळाचे यंदाचे ५७ वे वर्ष आहे. धान्यतुलेतील ७५० किलो धान्य पुणे आणि परिसरातील लुई ब्रेल अंध अपंग कल्याणकारी संस्था, आपलं घर, बचपन वर्ल्ड फोरम या तीन अनाथ मुलांच्या संस्थांना देण्यात आले.
भूषण गोखले म्हणाले, सैनिकांप्रमाणेच प्रत्येकाने देशासाठी चांगले कार्य करायला हवे. वीर सैनिकांनी देशासाठी प्राण अर्पण करण्यापर्यंतचे मोलाचे कार्य केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सैनिक काम करीत असतात. त्याची माहिती घेऊन त्यातून आपण प्रत्येकाने स्फूर्ती मिळवायला हवी. समाजासाठी उपयुक्त असे उपक्रम राबवून त्यातून देशकार्य करायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
सागर कुलकर्णी म्हणाले, दरवर्षी धान्यतुलेचा अनोखा उपक्रम राबविला जातो. गणेशोत्सव कार्यकर्ते, आरोग्य कर्मचारी, पोलीस अशा समाजासाठी कार्य करणा-या घटकांची धान्यतुला केली जाते. हे धान्य समाजातील गरजू व वंचित मुलांसाठी काम करणा-या संस्थांना देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम मंडळ अनेक वर्षे करीत आहे. यावर्षी धान्यतुलेच्या माध्यमातून वीरमाता व वीरपत्नींना नमन करण्याची संधी मंडळाला मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले. पंकज पारवे यांनी सूत्रसंचालन केले.
वीरमाता-पत्नींची धान्यतुला करुन दिला ७५० किलो धान्यरुपी प्रसाद
Date: