मुंबई: शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार हा प्रश्न अनुत्तरीत असताना शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या वतीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी परवानगी मागणाऱ्या आपल्या अर्जावर निर्णय देण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाने वकील जोएल कार्लोस यांच्या वतीने ही याचिका केली आहे. न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर बुधवारी ही याचिका सादर करण्यात आली.
गणेशोत्सवापूर्वी शिवसेनेकडून दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, महापालिकेने अजून कोणताही निर्णय घेतला नाही. या प्रकरणी तातडीने सुनावणी करावी अशी मागणी केली आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेत मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
शिवसेनेने परवानगीसाठी एकदा अर्ज व त्यानंतर स्मरणपत्र असे दोन वेळा अर्ज केले आहेत. यानंतरही मुंबई महापालिकेच्या विधी विभागानेही दोन्ही गटांच्या अर्जावर अद्याप तरी निर्णय घेतला नाही. दरम्यान, परवानगी मिळो वा न मिळो, उद्धव ठाकरे सांगतील त्या ठिकाणी आम्ही दसरा मेळावा घेणार, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे. मंगळवारी शिवसेनेचे नेते व माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी शिष्टमंडळासह पालिकेच्या जी-नॉर्थ येथील कार्यालयात जाऊन परवानगीबाबत अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.