पुणे- गेल्या पाच वर्षात पुणे शहरात भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे आणि ठेकेदारीराजने केलेल्या निकृष्ठ कामांमुळे संपूर्ण पुणे शहर खड्डेमय झालेले आहे.असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी येथे केला आहे.
प्रभाग 39 मध्ये भवानीपेठ – मार्केट यार्ड रस्त्यावर खड्ड्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत केल्याने असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सेव्हन लव्हज चौक येथे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत गेल्या ५ वर्षातील गैरकारभाराचा निषेध व्यक्त केला.या आंदोलन प्रसंगी ,महिला शहराध्यक्षा सौ.मृणालिनी वाणी,संतोष नांगरे,दिनेश खराडे,बाळासाहेब अटल,योगेश पवार,मीनाताई पवार,विद्या ताकवले,जयश्री त्रिभुवन आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या ८-१० दिवसांपासून पुणे शहरात पावसाची संततधार सुरू आहे.या काळात पुणे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे.हजारो कोटी रुपयांची रस्त्यांची कामे गेल्या ५ वर्षात होऊन देखील जर पुणे शहरातील रस्त्यांची ही अवस्था असेल तर या कामांच्या गुणवत्तेच्या बाबत निश्चितच प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत . या शहरात साडेआठ हजार कोटी रुपयांचे बजेट असणारी महानगरपालिका जर पुणेकरांचा टॅक्स गोळा करून पुणेकरांना सोयी सुविधा देऊ शकत नसेल तर निश्चितच पुणेकरांच्या मनामध्ये गेल्या ५ वर्षातील सत्ताधारी भाजपच्याबाबत मोठा रोष आहे.या खड्ड्यांमुळे शहरात दररोज अपघात होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.