Home Blog Page 1577

यशस्वी वृक्ष लागवड करणाऱ्यांचा सत्कार 

 पुणे-अभिनेते सयाजी शिंदे यांच्या ‘सह्याद्री देवराई’संस्थेतर्फे रविवारी  ‘वृक्ष संवाद २०२२’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.यशस्वी वृक्ष लागवड करणाऱ्यांचा,  सह्याद्री देवराई ‘संस्थेच्या कृतिशील सदस्यांचा आणि सी.एस.आर. फंडच्या माध्यमातून   वृक्ष लागवडीला मदत करणाऱ्यांचा  सत्कार या कार्यक्रमात करण्यात  आला. देशी वृक्षांच्या बियांच्या वृक्षांची थैली भेट देण्यात आली.९ ऑकटोबर,रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात रामकृष्ण मोरे सभागृह,चिंचवड येथे हा कार्यक्रम झाला.’सह्याद्री देवराई’संस्थेच्या सदस्यांकरिता होता.देशी वृक्षांच्या बियांचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते.
पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील,अभिनेते सयाजी शिंदे,लेखक अरविंद जगताप,डॉ चंद्रकांत साळुंखे,सतीश आवटे यांनी मार्गदर्शन केले.
श्रीकांत इंगळहळ्ळीकर, धनंजय शेडबाळे , विजय निंबाळकर, मधुकर फल्ले  यांच्यासह अनेक वृक्षप्रेमी सभागृहात उपस्थित होते.

निसर्ग संवर्धनाचा संदेश पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन सचिन चंदन यांनी केले.
‘महाराष्ट्रात ‘सहयाद्री देवराई ‘ च्या सहकाऱ्यांच्या योगदानाने महाराष्ट्रात वृक्ष लागवड वाढत आहे.वन विभागाचे सहकार्य वाढत आहे. संस्थेच्या वतीने पुण्यात देवराई करणार आहोत. सीड बँक करणार आहोत ‘, असे सयाजी शिंदे यांनी सांगीतले. अरविंद जगताप यांची  ‘मुळांचे कुळ घेऊ,खोडांचे बळ होऊ,झाडाचे गुण घेऊ,झाडाचे गुण गाऊ ! ‘ ही कविता सयाजी शिंदे यांनी भाषणादरम्यान सादर केली.

अरविंद जगताप म्हणाले, ‘सह्याद्री देवराई ‘ ही संस्था वृक्ष हीच सेलिब्रिटी मानून काम करते. अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ , स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते एकत्र करून वृक्ष लागवडीची चळवळ पुढे नेली जात आहे. आपल्या आवारात, दारात, उद्यानात , गावात झाडं वाढवा. प्रत्येक डोंगर झाडांसाठीच असतात, असे नाही कारण काही डोंगर गवतांचे असतात.

राहुल पाटील म्हणाले, ‘जे कोणी वृक्ष लावतात, वाढवतात ते सर्व वृक्षसंरक्षक असतात. सह्याद्री देवराईच्या माध्यमातून हे मोठे काम महाराष्ट्रात उभे राहत आहे.
मंचावरील कुंडीतील झाडाला अध्यक्षपदाचा मान देऊन आगळा पायंडा या कार्यक्रमाद्वारे पाडण्यात आला. www.sahyadridevrai.org यासंकेतस्थळाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणाऱ्या, सयाजी शिंदे यांच्या आवाजातील गीताचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
संस्थेने महाराष्ट्रात १० लाख वृक्ष लागवड केल्याची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली

हजरत  महमद   पैगंबर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांची अभिवादन मिरवणूक

मिरवणुकीद्वारे दिला शैक्षणिक, सामाजिक ,पर्यावरणाचे संदेश
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस) आणि संलग्न संस्थाच्या वतीने रविवार, दिनांक ९ ऑकटोबर रोजी  ‘हजरत महमद  पैगंबर जयंती’(ईद-ए-मिलाद)निमित्ताने विद्यार्थ्यांच्या अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८. ३०  वाजता संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला प्रारंभ झाला. हजरत मोहम्मद पैगंबरांचे शैक्षणिक, सामाजिक संदेश, घोषवाक्याचे फलक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. संस्थेचे सचिव प्रा. इरफान जे. शेख, शाहिद इनामदार, एस. ए. इनामदार, तसेच गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट, हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट, एमएमईआरसी, डेक्कन मुस्लिम लायब्ररी, अवामी महाज संस्थेचे पदाधिकारी, व आझम कॅम्पस शिक्षण संकुलाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मिरवणूक आझम कॅम्पस येथून निघून, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, ‘ट्राय लक हॉटेल, गाय कसाब मशीद, बाबाजान दर्गा, सरबतवाला चौक, हुसैनीबाग, क्वार्टर गेट, मॉडर्न बेकरी, इस्लमपुरा, ए. डी. कॅम्प चौक, भारत सिनेमा, पद्मजी पोलीस चौकी, निशांत थिएटर, भगवानदास चाळ, चुडामण तालीम, पूना कॉलेज आणि आझम कॅम्पस गेट येथे मिरवणुकीची सांगता झाली.अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे १८ वे वर्ष होते.

गंभीर आजारी वृद्धांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी दानशूरांनी सहकार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई: समाजातील वृद्ध , निराधार तसेच असाध्य आजारांनी ग्रस्त वयोवृद्ध लोकांचे दुःख दूर करणे अतिशय निकडीचे आहे. या क्षेत्रात आपल्या देशात खूप मोठे काम करण्याची गरज आहे. वृद्ध रुग्णांची सेवा हे दैवी कार्य असून जीवनाच्या संध्याकाळी आजारी रुग्णांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी दानशूर लोकांनी तसेच कार्पोरेट्सनी या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

गंभीर आजारामुळे अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सेवा देणाऱ्या राजे पंचम जॉर्ज स्मृती विश्वस्त संस्थेच्या अधिपत्याखाली ‘सुकून निलाय’ रुग्णसेवा केंद्र व ‘मुंबई उपशामक रुग्णसेवा नेटवर्क’ या संस्थांच्या वतीने मुंबई येथे ‘जागतिक उपशामक रुग्णसेवा’ दिनाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

वृद्ध व निराधार लोकांना  रुग्णसेवा देण्याचे चांगले कार्य मुंबईतील काही संस्था करीत आहेत. या कार्यात मोठे आर्थिक सहकार्य करणाऱ्या सिप्ला फाऊंडेशनचे कौतुक करताना इतर कार्पोरेट्सनी देखील त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून उपशामक रुग्णसेवा देणाऱ्या संस्थांना मदत करावी, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. यावेळी राज्यपालांनी आपल्या स्वेच्छा निधीतून पंचम जॉर्ज स्मृती विश्वस्त संस्थेला २५ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

राज्यपालांच्या हस्ते वांद्रे मुंबई येथे असाध्य कर्करुग्णांना सेवा देणाऱ्या ‘शांती आवेदना’ या संस्थेचे संस्थापक डॉ एल जे डिसुझा तसेच टाटा कर्करोग रुग्णालयातील रेडिएशन ऑनकॉलॉजिस्ट डॉ मेरी ऍन मुकादन यांचा त्यांच्या उपशामक रुग्णसेवा क्षेत्रातील मूलभूत कार्यासाठी  सत्कार करण्यात आला.

पंचम जॉर्ज स्मृती विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष डॉ एरीक बॉर्जेस यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची माहिती दिली.  सुरुवातीला दिव्यांग प्रौढ मुलांनी नृत्य व नाट्याचे सादरीकरण केले. कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त व सदस्य, दिव्यांग प्रौढ व पालक तसेच संस्थेचे आश्रयदाते उपस्थित होते.

00000

हिमाचल प्रदेशात वॉटर स्पोर्ट्स केंद्राचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते आज सकाळी हिमाचल प्रदेशात बिलासपूर इथे, कोलडॅम बारमना इथे  वॉटर स्पोर्ट्स केंद्राचे उद्घाटन झाले. हिमाचल प्रदेशातील अशा प्रकारचे हे पहिलेच वॉटर स्पोर्ट्स केंद्र आहे.भारतीय क्रीडा प्राधिकरण-साई आणि राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ- एनटीपीसी ने संयुक्तरित्या या केंद्राची उभारणी केली आहे.

यावेळी, साई आणि एनटीपीसी यांच्यात सामंजस्य करारही करण्यात आला. 

अगदी अल्पावधीत ह्या केंद्राची उभारणी कशी झाली, याबद्दल माहिती देतांना अनुराग ठाकूर म्हणाले, “  केवळ एका महिन्याच्या कालावधीत वॉटर स्पोर्ट्सची व्यवस्था करण्यात आली, आणि यासाठी मी साई आणि एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो, कारण त्यांच्या परिश्रमामुळेच हे केंद्र तयार होऊ शकले. या केंद्रात, रोईंग , कायकिंग, कनोइंग अशा वॉटर स्पोर्ट्ससाठी 40 खेळाडूंची निवड केली जाईल. या केंद्रात अत्याधुनिक उपकरणे आहेत, तसेच मुलामुलींसाठी वसतिगृह आहेत, त्याशिवाय प्रशिक्षण सुविधाही आहे. तसेच, ह्या केंद्रात राष्ट्रीय स्पर्धा देखील भरवल्या जातील, अशी आम्हाला आशा आहे.”

रोईंग, कायकिंग, कनोइंग यासारख्या वॉटर स्पोर्ट्ससाठी समर्पित प्रशिक्षण केंद्र म्हणून हे कार्यरत असेल.

गुजरात इथे झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या हिमाचल प्रदेशातील महिला कबड्डी चमूचा सत्कारही यावेळी  या कार्यक्रमात अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.

पुणे टेरियर्सने साजरा केला 73 वा प्रादेशिक सेना स्थापना दिवस

पुणे-

101 इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना) मराठा LI, “पुणे टेरियर्स” ने आज म्हणजेच 09 ऑक्टोबर 2022 रोजी आपला 73 वा प्रादेशिक सेना दिन साजरा केला. यानिमित्त, कमांडिंग ऑफिसर कर्नल मनीष प्रियदर्शन, यांनी या देश संरक्षणाच्या सेवेत हौतात्म्य पत्करलेल्या  शूर जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, त्यानंतर भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पुणे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तुकडीतील 101 जवानांनी रक्तदान केले. तसेच, बटालियन परिसरात, वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात होता, त्यात फळझाडांची 50 रोपटी लावण्यात आली.

18 ऑगस्ट 1948 रोजी प्रादेशिक सेना कायदा अस्तित्वात आल्यानंतर, ह्या प्रादेशिक सैन्याची स्थापना करण्यात आली. देशाचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांच्या हस्ते, 9 ऑक्टोबर 1949 रोजी या सैन्याची औपचारिक स्थापना करण्यात आली, म्हणूनच हा दिवस, प्रादेशिक सेना स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो.

गेल्या 73 वर्षांत, प्रादेशिक सैन्याने 1962, 1965, 1971 च्या युद्धांमध्ये तसेच जम्मू-कश्मीर आणि ईशान्य भारतातील दहशतवादाचा मुकाबला करण्यात उत्कृष्ट योगदान देत आपली अत्युच्च व्यावसायिकता आणि शौर्याचे प्रदर्शन केले आहे. नैसर्गिक आपत्ती आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत, मदतकार्य पार पाडण्यासाठी आणि  शांततेच्या काळात देशाची सेवा करण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

३ प्रश्न विचारून ठाकरेंना डिवचण्याचा प्रकार …

ठाकरेंना सर्वात मोठा धक्का कोणता?:धनुष्यबाण गोठवणे, आमदार-खासदार गमावणे की भाजपची मैत्री तोडणे – अमृता फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे. त्यांनी रविवारी एका ट्विटद्वारे ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का कोणता बसला? अशी विचारणा केली आहे. ‘ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का कोणता बसला? धनुष्यबाण गोठवणे, 40 आमदार व 12 खासदारांनी साथ सोडणे की भाजपची मैत्री गमावणे,’ असे त्या म्हणाल्यात.

अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडत नाही. तुम्हाला काय वाटते, पुर्वीच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का कोणता वाटतो असे म्हणत त्यांनी ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला. सत्तांतरानंतर ठाकरेंवर अनेक ट्विट आणि शाब्दीक हल्ला चढवला होता.

काय केली टीका?

तुम्हाला काय वाटते – पूर्वीच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का कोणता वाटतो?

  • धनुष्यबाण चिन्हाचे नुकसान
  • 40 आमदार आणि 12 खासदार गमावणे
  • दीर्घकाळ निष्ठावंत युतीचा पराभव
  • हिंदु पक्ष म्हणून असलेली ओळख

सायकल रॅलीतून आरोग्य, पर्यावरणाची जागृती-लायन्स क्लब्ज इंटरनॅशनलच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताह उत्साहात

१० क्लब सहभागी
पुणे : आरोग्य व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी रविवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. ऑक्टोबर सेवा सप्ताहांतर्गत ही सायकल रॅली काढण्यात आली.सारसबाग, टिळक रोड, डेक्कन, फर्ग्युसन रस्ता, संभाजी उद्यान या मार्गावर सायकलस्वारांनी जागृती केली. 
प्रसंगी समन्वयक अनिल मंद्रुपकर, मयूर बागुल, के. के. गुजराती, किशोर मोहोळकर, संदीप गायकवाड, विश्वास सूर्यवंशी, रोहिणी नागवणकर, प्रियांका शेंडगे शिंदे, राजीव निगडीकर, शैलेश बुरसे, स्मिता देव आदी उपस्थित होते. या सप्ताहात ‘लायन्स’च्या ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी, पुना वेस्ट, फ्युचर, विधिज्ञ, मुकुंदनगर, शिवाजीनगर, सुप्रिम, पुणे रिव्हर साईड, मैत्री या क्लबने सहभाग घेतला आहे. या रॅलीचा समारोप संभाजी उद्यानात झाला.
अनिल मंद्रुपकर म्हणाले, “कार्बन उत्सर्जन रोखणे, निसर्गाचे संवर्धन, प्रदूषण कमी करणे, स्वच्छ आणि निरोगी जीवन याबाबत जागृती करण्यात आली. ‘जॉईन ग्रीन रिव्होल्यूशन, स्टॉप पोल्युशन’ हा नारा होता. सायकलचा वापर वाढवून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासह चांगले आरोग्य राखणे हेही यातून सांगण्यात आले.”

संस्कृती बदलावर बालसाहित्याचा उपाय- ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.न.म.जोशी 

बालकुमार दिवाळी अंक २०२२ चे प्रकाशन
पुणेः आजच्या काळात आपली मूळ संस्कृती झपाट्याने बदलत आहे. भाजी भाकरीच्या संस्कृतीपासून ती वडापाववर आली आणि आता ती पिझ्झा संस्कृती झाली आहे. हे बदल थांबवायचे असतील तर बालकुमार साहित्यावाचून पर्याय नाही. मुलांमध्ये लहानवयातच आपली मूळ संस्कृती रुजवायला हवी, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.न.म.जोशी यांनी व्यक्त केले.

अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेच्यावतीने बालकुमार दिवाळी अंकांचे प्रकाशन शुक्रवार पेठेतील संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी बालसाहित्यिका डॉ. संगीता बर्वे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार, संस्थेच्या विश्वस्त डॉ. मंदा खांडगे, कोषाध्यक्ष डॉ. दिलीप गरुड, लेखक बबन पोतदार, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, सीमा चव्हाण, कविता मेहंदळे, मुकुंद तेलीचरी, निर्मला सारडा उपस्थित होते.

सुनीता पवार म्हणाल्या, साहित्य संस्था या हॉस्पिटलचे काम करीत आहेत. मुलांना लेखन, वाचनाची गोडी लावा आणि त्यातून त्यांना जे भावले आहे ते व्यक्त करायला शिकवा. त्यांना शब्दांचे सामर्थ्य कळू द्या. जशी बाग फुलवावी लागते तेव्हा ती सुंदर दिसते, तसे मुलांवर संस्कार करावे लागतात. पुढच्या पिढीवर चांगले संस्कार करण्यासाठी आपल्याला सज्ज होण्याची गरज आहे, असे ही त्यांनी सांगितले.

डॉ. दिलीप गरुड, डॉ. मंदा खांडगे, बबन पोतदार यांनी मनोगत व्यक्त केले. नवेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संगीत बर्वे यांनी प्रास्ताविक केले. भरत सुरसे यांनी आभार मानले.

अमृता फडणवीस यांच्या हिंदी चित्रपटातील गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

मुंबई  – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. अमृता फडणवीस यांनी बँकिंग क्षेत्रात देखील आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे त्या विविध राजकीय तसेच सामाजिक घटनांबाबत सोशल मीडियावरून त्या परखडपणे आपली मते मांडताना दिसतात.
अमृता फडणवीस यांचे संगीतावर असणारे प्रेम सर्वश्रुत असून त्यांनी गायन क्षेत्रात आपली एक स्वतंत्र आणि वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता संगीत क्षेत्रात एक पाऊल पुढे नेत, हिंदी चित्रपटात देखील त्यांनी गाणे गायले आहे. दिग्दर्शक अभय निहलानी  यांच्या ‘लव्ह यू लोकतंत्र’ या हिंदी चित्रपटात प्रसिद्ध गायक शान यांच्यासोबत त्यांनी गायलेल्या गाण्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.

लोकाभिमुख आणि बदलत्या परिस्थितीस सक्षमपणे सामोरी जाणारी ‘आरोग्य व्यवस्था ‘ निर्मितीस प्राधान्य -तुकाराम मुंढे


पुणे -आरोग्य विभाग त्याच्या सर्व भागधारकांशी प्रभावी समन्वयाने काम करेल. लोककेंद्रित आरोग्य सेवा, डेटा आधारित निर्णय घेणे आणि सक्षमकर्ता म्हणून माहिती तंत्रज्ञान चा वापर करून लोकाभिमुख कठीण आणि बदलत्या परिस्थितीस सक्षमपणे सामोरी जाणारी ‘आरोग्य व्यवस्था’ निर्मितीस प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे असे आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आरोग्य सेवेतील पुणे येथील विभाग प्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना सांगितले.

आयुक्तालयाच्या अंतर्गत पुणे येथील विविध विभागाचा आयुक्त यांनी आढावा घेत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले .
आरोग्यसेवा विषयीची माहिती अद्यावत ठेवून त्यांचा नियोजन व संस्थांच्या सेवांच्या विकासासाठी वापर करावा, आरोग्यासंबंधी ऋतू नुसार आरोग्य सेवांची तयारी ठेवावी .साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील परिस्थिती वर सनियंत्रण ठेवावे ,रोजच्या आकडेवारीवर लक्ष ठेवून जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची यांच्याशी समन्वय व नियंत्रण ठेवून पाठपुरावा करावा .जिल्हा व गाव पातळीवरील संस्थांशी चांगला संवाद ठेवून रोजचा आढावा घेतला जावा अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

आरोग्यसेवा उपक्रमांना मदत करणाऱ्या शासकीय, निमशासकीय विकासात्मक संस्था यांनीही आपली भूमिका व कार्य हे कार्याची पुनरावृत्ती न होऊ देता व कार्यातील उनिवा यांचाही अभ्यास करावा असे सुचविले सर्व भागधारकाशी प्रभावी समन्वयाने आरोग्य विभाग काम करेल असेही त्यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आय. पी. एच. एस .(IPHS ) स्टँडर्ड नुसार आरोग्य प्रणालीसाठी वापरात येणाऱ्या सहा घटकांवर आधारित, जसे देण्यात येणाऱ्या सेवा, आरोग्य सेवेतील घटक, आरोग्य माहिती प्रणाली, आवश्यक असणाऱ्या औषधांची उपलब्धता, आरोग्य प्रणाली वित्त पुरवठा, नेतृत्व व शासन या सहा घटकावर भर देण्याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांना सुचित केले.

आरोग्य सेवा अधिक सक्षम व लोकाभिमुख होण्यासाठी आपला प्राधान्यक्रम असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले .या बैठकीत पुणे येथील आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर व पुणे येथील सर्व विभाग प्रमुख, सहाय्यक संचालक व विकासात्मक स्वयंसेवी संस्थेचे सल्लागार उपस्थित होते .

मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते धामणदेवीच्या चौपदरीकरणाचे काम लवकर सुरु होणार

-सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले,’
दोन वर्षे रखडलेल्या प्रश्नाला मिळाली १५ दिवसात गती

मुंबई, दि. ९ ऑक्टोबर- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला आता अधिक गती मिळणार असून या महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील इंदापूर ते धामणदेवी या सुमारे ६.५ कि.मी. च्या रखडलेले चौपदरीकरणाचे काम आता लवकरच सुरु होणार आहे. सुमारे २ वर्षे रखडलेले हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी अवघ्या १५ दिवसांत मार्गी लावल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणा-या लाखो प्रवाश्यांना आता ख-या अर्थाने दिलासा मिळणार आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ च्या इंदापूर ते धामणदेवीच्या चौपदरीकरणाच्या मार्गाची जमिन ही वनजमिन असल्यामुळे वनविभागाची परवानगी आवश्यक होती, त्यामुळे हे काम गेले दोन वर्षांपासून रखडले होते. या चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी वनविभागाकडे वनजमीन मंजुरीचा प्रस्ताव स्टेज १च्या परवानगीसाठी प्रलंबित होता. परंतु त्या प्रस्तावानुसार स्टेज १ साठी मुख्य मान्यता वनविभाग नागपूर यांनी २२ एप्रिल २०२१ रोजी दिली होती. तथापि सदर परवानगी देताना वनखात्यामार्फत रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी (Avenue Plantation) रक्क्म रु १५.९१ कोटी भरण्याची अट वनविभाग नागपूरकडून घालण्यात आली होती. परंतु सदर रक्कमेची तरतूद ही या प्रकल्प निधीमध्ये नसल्यामुळे सदर रक्कम वनविभागाकडे जमा करण्यासाठी काही अडचणी येत होत्या. गेल्या १५ दिवसांपूर्वी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या निर्दशनास हे प्रकरण आले असता त्यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिका-यांची या संदर्भात बैठक घेतली. या बैठकीतच मंत्री चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालय यांच्याशी चर्चा करून झाडे लावण्यासाठीचे आवश्यक १५.९१ कोटी रुपये लवकर भरण्याची परिवहन मंत्रालयाकडे केली. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालय यांच्याकडून आवश्यक १५.९१ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालयाकडून आवश्यक आर्थिक मंजुरी मिळाल्यानंतर मुंबई-गोवा या महामार्गावरील या प्रलंबित राहिलेल्या टप्प्याच्या कामासाठी लवकर परवानगी देण्याची विनंती आता वन विभागाकडे करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणा-या लाखो नागरिकांच्या दृष्टीने हे काम लवकर पूर्ण होणे अपेक्षित आहे. जेणेकरुन नागरिकांना त्यांच्या प्रवासामध्ये दिलासा मिळू शकेल अशी अपेक्षा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.
त्यानुसार वनविभागानेही सकारात्मक पावले उचलचून या जागेसाठी तत्वत: मंजुरी दिली आहे. तसेच या चौपदीकरणासाठी प्रत्यक्ष काम करण्याची परवानगी अंतिम टप्प्यात आहे, ही परवानगी काही दिवसांत मिळाल्यानंतर तातडीने इंदापूर ते धामणदेवी या सुमारे ६.५ किमी च्या चौपदीकरणाचे काम सुरु होणार असून मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला अधिक गती मिळेल व काम लवकर पूर्ण करणे शक्य होईल असेही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

40 डोक्याच्या रावणाने रामाचा धनुष्यबाण गोठवला; खूप सहन केले; आता अती झाले- उद्धव ठाकरे

त्रिशूळ, उगवता सूर्य अन् धगधगती मशाल-उद्धव ठाकरेंनी मागितली तात्पुरती ३ चिन्हे – पक्षाला दिली तात्पुरती ३ नावे ;शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे

आता निवडणूक आयोगाकडे लक्ष

उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोगाने आदेश देताच मी तीन चिन्हे ठरवली आहे. एक त्रिशुळ, दुसरा उगवता सूर्य आणि तिसरा आहे धगधगती मशाल नावेही निवडणुूक आयोगाला दिली आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे ही नावे दिले आहेत.

चाळीस डोक्याच्या रावणाने रामाचे धनुष्यबाण गोठवला. त्यानंतर वरुन हेच म्हणतात की, बघा आम्ही करून दाखवले. काय मिळवले त्यांनी शिवसेना फोडून? ज्या शिवसेनेने मराठी अस्मिता जपली ती फोडायला तुम्ही निघाला. धनुष्यबाणच नव्हे तर शिवसेनाप्रमुखांची हिंंमत तुम्ही गोठवली. शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी दिले. वडीलांनी ती वाढवली आता या नावाशी तुमचा संबंध काय? तुम्ही या नावाचा आणि शिवसेनेचा घात केला असा घणाघात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केला.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवले आहे. त्यानंतर ठाकरे आता राज्यातील जनता आणि शिवसैनिका्ंशी फेसबूक लाईव्हद्वारे संवाद साधत आहेत.ठाकरे म्हणाले, जेव्हा मी कोरोनाच्या संकटकाळात फेसबुक लाईव्हद्वारेच मी सूचना करीत होतो. आपण कोरोनावर मात केली. अनेक जण त्यावेळी मला अनेकदा सांगत होते की, तुम्ही आम्हाला कुटुंबातील वाटतात. म्हणूनच मी कुटुंबाजवळ मन मोकळे करीत आहोत.ठाकरे म्हणाले, शिवसेनेच्या मुलाला मुख्यमंत्रीपदी नको पद मलाच हवे असे सांगून त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले. तत्पूर्वी मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला. ज्यांना मुख्यमंत्रीपद हवे होते त्यांना ते मिळाले. जे नाराज होते ते गेले. पण आपण सहन केले. आता मात्र, अती होत आहे.ठाकरे म्हणाले, शिवसेनेच्या लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. इंदीरा गांधींच्या सरकारमध्येही शिवसेनेला एवढा त्रास झाला नाही. जे काँग्रेसने केले नाही ते तुम्ही करीत आहात मग पापी कोण तुम्हीच ना. ज्या शिवसेनेने मोठे केले त्या शिवसेनेला छळण्याचे काम करीत आहात.ठाकरे म्हणाले, मी डगमगलो नाही. शिवसैनिकांनी घरादाराची पर्वा न करता अंगावर केसेस घेतल्या त्या शिवसैनिकांना छळत आहात. त्यांना शिंदे गटात या म्हणून केसेस करण्याची धमकी दिली जात आहे. पण आमच्यात ठासून आत्मविश्वास आहे. शिवसैनिक जीवाला जीव देणारे आहेत.ठाकरे म्हणाले, उलट्या काळजाच्या माणसाने शिवसेनेचे पक्ष नाव आणि चिन्ह गोठवले. बुद्धी गोठलेली नसेल तर बाळासाहेबांचे नाव घेऊ नका. बाळासाहेब हवे पण बाळासाहेब ठाकरे हवे आहेत पण त्यांचा मुलगा नको. शिवसेना आणि ठाकरे वगळून जे राहील ते तुम्हाला गो-शाळेत बांधायचे आहे.ठाकरे म्हणाले, काही काळासाठी आमचे चिन्ह गोठवले हा आपल्यावरील अन्याय आहे. सोळा जणाच्या अपात्रतेचा निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाचा निकाल लागायला नको होता. पण हा गोंधळ झाला तो निस्तारणार कसा हा कायद्याचा विषय आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. नक्की आम्हाला न्याय मिळेल.

शेषन यांनी मस्ती चालू दिली नाही-ठाकरे म्हणाले, टी. एन. शेषन हे माजी निवडणूक आयुक्त होते पण त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांचीही मस्ती त्यांनी चालू दिली नाही. त्यांनी निपक्षःपाती काम केले. तुम्ही लोकशाहीचे रक्षणकर्ते आहात. अंधेरीची पोटनिवडणूक लागली आहे. त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला चिन्ह आणि पक्ष द्याठाकरे म्हणाले, जनता जनार्धन सर्वोच्च आहेत. त्यांच्या दरबारात आम्हाला जायचे आहे. आज कोजागिरी पौर्णिमा आहे. त्याचे महत्व हेच की, दिवस आणि रात्र वैऱ्यांची आहे. जागे राहा. अजिबात झोपू नका. आपल्याला लढाई जिंकायची आहे. आजपर्यंत जनतेचे आशिर्वाद आणि प्रेमाच्या बळावरच आम्ही सामोरे गेलो आहे. हेच प्रेम जनतेने द्यावे.

शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ‘धनुष्यबाण’ कोणालाच नाही!

मुंबई- महाराष्ट्रातील राजकीय लढाईत दोन्ही गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्य बाण गोठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. दरम्यान हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असल्याची माहिती आहे. केवळ अंधेरी पोटनिवडणुकीकरता हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत नव्या चिन्हासाठी दावा करण्याचे निर्देशही आयोगाकडून देण्यात आले आहेत. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत, अशी माहिती मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. तसेच संपूर्ण पक्ष माझ्यासोबत असल्याचं म्हणत शिवसेना पक्षावर आपला हक्का सादर केला होता. त्यामुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या पक्ष चिन्हाचा मुद्दा निवडणूक आयोगाकडे गेला होता. मात्र आज निवडणूक आयोगाने हे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय़ घेतला आहे. शिवाय शिवसेना नाव दोन्हीपैकी एकाही गटाला वापरता येणार नाही, हेही स्पष्ट करण्यात आलं आहे.

ठाकरे गटानं आज त्यांच्याकडील महत्त्वाची माहिती निवडणूक आयोगात सादर केली होती. शिवाय अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवारच नाही मग चिन्ह का मागतायत असा सवाल ठाकरे गटानं निवडणूक आयोगासमोर केला होता.  शिवाय शिंदेंनी अद्याप उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर दावा केलेला नाही. त्यामुळे चिन्हाबाबतचा दावा पक्षप्रमुखांच्या परवानगीविना होऊ शकत नाही असं ठाकरे गटानं म्हटलं होतं. आमच्याकडे राजधानी दिल्लीमध्ये दहा लाखांपेक्षा अधिक शपथ पत्र तयार आहेत. अडीच लाख पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आणि दहा लाखांपेक्षा अधिक प्राथमिक सदस्यांची शपथपत्रे तयार आहेत.  फक्त विहित नमुन्यामध्ये ती सादर करण्यासाठी आम्हाला चार आठवड्यांचा वेळ मिळावा. जर निवडणूक आयोगाला ती आत्ता आहे त्या स्थितीत हवी असतील तर ती पण आम्ही सादर करू, असा दावा उद्धव ठाकरे गटाचा निवडणूक आयोगासमोर केला होता.

देशात उत्तम प्रशासन निर्माण करण्यासाठी युवकांनी सत्य, शांती आणि अहिंसेचा मार्ग अनुसरायला हवा :डॉ.राजकुमार रंजन सिंग

पुणे, 08 ऑक्टोबर 2022

केंद्रीय शिक्षण आणि परदेश व्यवहार राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग यांनी आज सांगितले की,देशाचे भावी नेतृत्व असलेल्या युवा पिढीने आपल्या स्वप्नातील भारताची उभारणी करण्यासाठी सत्य, शांती आणि अहिंसेचा मार्ग अनुसरायला हवा. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा आणि राष्ट्रीय नेत्यांचा संघर्ष तसेच त्यांनी दिलेले योगदान यांचा उल्लेख करून ते म्हणाले की, या सर्वांनी उत्तम प्रशासनासाठी आपल्याला राज्यघटना दिली.

पुणे येथील डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाच्या चौथ्या दीक्षांत समारंभात उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, आपण इतिहासाच्या अशा टप्प्यावर आहोत की जिथे सर्व पातळ्यांवर अत्यंत जलदगतीने बदल घडून येत आहेत. आपण सर्वांनी नव्या गोष्टी शिकत राहून ज्ञान प्राप्त केले पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2022 हे 21 व्या शतकातील आपले पहिलेच शैक्षणिक धोरण आहे. आपल्याजवळ मजबूत ज्ञानाचा पाया असेल तरच त्यावर सशक्त भारताची उभारणी करता येईल असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, शिक्षण घेणे म्हणजे केवळ पदव्या मिळविणे नव्हे तर शिक्षित असणे म्हणजे चांगला माणूस असणे, ज्ञानी होणे आणि आपल्या समाजातील सामाजिक विषमता कमी करणे होय. आणि यासाठी आपल्याला समाजाच्या एकंदर हितासाठी प्रयत्न करतानाच सहयोगात्मक दृष्टीकोन स्वीकारणे गरजेचे आहे असे केंद्रीय राज्यमंत्री पुढे म्हणाले. आजच्या आधुनिक शिक्षणाला नितीमूल्यांच्या मजबूत पायाची गरज असल्याचं ते पुढे म्हणाले. नवीन शिक्षण धोरण तयार करताना प्राचीन परंपरा आणि आधुनिकतेचा योग्य संयोग साधला गेल्याचे त्यांनी सांगितले. नविनतम तंत्रज्ञानासह संशोधन आणि ई-लर्निंगला या धोरणात महत्त्व दिल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण मंत्रालयातर्फे उच्च शिक्षणात विविध माहिती आणि संवाद  उपक्रमांचा समावेश केल्याचे डॉ सिंग यांनी अधोरेखित केले.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे अध्यक्ष डॉक्टर के कस्तुरीरंगन यांच्यासह युनेस्कोचे अध्यक्षपद भूषवणारे आदरणीय प्राध्यापक तसच पुण्याच्या एम ए ई ई आर अर्थात  महाराष्ट्र अभियांत्रिकी आणि शैक्षणिक संशोधन अकादमीच्या एम आय टी चे संस्थापक आणि मुख्य आश्रयदाता डॉक्टर विश्वनाथ डी कराड तसच एम ए ई ई आर, एम आय टी विश्व शांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अंतराळ दुर्बिणीची उभारणी तसच इतर ग्रहांवरच्या सजीवांचा शोध घेण्यासह भारताच्या येत्या पन्नास वर्षातल्या अंतराळ कार्यक्रमामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना मुबलक संधी उपलब्ध होणार असल्याचे डॉ कस्तुरीरंगन यांनी सांगितले. हायब्रीड नोकऱ्यामध्ये  वाढ होत असून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार आपली शिक्षण प्रणाली ही 21व्या शतकाच्या गरजांबरोबर जोडली जात असल्याचं ते म्हणाले.

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, मुक्तकला, ललित कला, बी एड, माध्यम आणि पत्रकारिता, वाणिज्य, अर्थशास्त्र, विज्ञान, औषधनिर्मिती, शाश्वत अभ्यासक्रम, डिझाईन, सुशासन या क्षेत्रातल्या एकूण 4 हजार ५७६  विद्यार्थ्यांना  पदवीदान समारंभात सुवर्ण, रौप्य    आणि कांस्य पदकांसह यावेळी पदव्या प्रदान करण्यात आल्या. केवल पद्मावार आणि मिनू कलीता यांना अनुक्रमे संस्थापक अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्राण्यांची तस्करी:विदेशी प्रजातीचे 665 प्राणी गुप्तचर संचालनालयाने पकडले.

मुंबई 08 ऑक्टोबर 2022

डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई प्रदेश कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एअर कार्गो संकुलातील आयात सामानामध्ये सापडलेले विदेशी प्रजातीचे 665 प्राणी ताब्यात घेतले. दुर्मिळ आणि विदेशी वन्यजीवांच्या प्रजातींच्या मोठ्या संख्येने जप्तींच्या कारवाईपैकी ही एक कारवाई आहे अशी माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोठ्या संख्येतील अजगर, पाली, कासवे तसेच घोरपड इत्यादींच्या परदेशी प्रजातींचे प्राणी मासळीच्या खोक्यांमध्ये लपवलेले आढळून आले. ज्या व्यक्तीने या प्राण्यांची आयात केली तसेच जी व्यक्ती या प्राण्यांना इच्छित स्थळी पोहोचविणार होती त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे अशी माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हाती आलेल्या गुप्त माहितीवरून डीआरआयच्या मुंबई प्रदेश कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एअर कार्गो संकुलात आलेले आयात सामान 6 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले. या सामानाची बारकाईने तपासणी केल्यानंतर वन विभाग आणि वन्यजीवविषयक गुन्हे नियंत्रण ब्युरोच्या अधिकाऱ्यांना त्यात मासळीच्या खोक्यांमध्ये लपवलेले अजगर, पाली, कासवे तसेच घोरपड इत्यादींच्या परदेशी प्रजातींचे प्राणी मोठ्या संख्येने आढळून आले.

लुप्त होण्याचा धोका असलेल्या वन्य प्राणी आणि वनस्पती यांच्या व्यापारासंदर्भातील कराराच्या परिशिष्टात सूचीबद्ध केलेले अशा प्रजातींचे प्राणी आयात करण्यावर कायद्याने बंदी आहे. या प्राण्यांची तस्करी करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने, हे प्राणी ताब्यात घेण्यात आले. सीमाशुल्क कायदा तसेच परदेशी व्यापार विकास (नियंत्रण) कायदा यांतील तरतुदींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.