Home Blog Page 1578

कात्रजच्या नव्या बोगद्याजवळ अज्ञात वाहनाची धडक _बाईकस्वार ठार

पुणे-कात्रजच्या नव्या बोगद्याजवळ मुंबई बेंगलोर महामार्गावर एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकल चालविणारा २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अपघातस्थळ येथे न थांबता अज्ञात वाहनासह त्याचा चालक पळून गेल्याने भारती विद्यापीठ पोलीस त्याचा शोध घेत आहेत .या अपघातात आंबेगाव पठार येथे राहणारा महादेव बाप्पू पिंगळे हा तरुण मृत्युमुखी पडला.काल सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला .फौजदार देशमुख 9765390943 याप्रकरणी अपघात करून पळून गेलेल्या वाहनाचा आणि वाहनचालकाचा शोध घेत आहे.

कार विक्रीच्या बहाण्याने सहा लाखांची फसवणूक

लोहगाव याठिकाणी राहणाऱ्या निखिल दिलीप कुमार यांनी त्याची हुंडाई आय ट्वेन्टी कार विक्रीसाठी असल्याचे सांगून गौरव बाबुलाल मिश्रा (वय -28 ,रा.वाघोली ,पुणे) यांच्याकडून रोख स्वरूपात व गुगल पे वर एकूण सहा लाख रुपये स्वीकारून, कारचे पेपर तक्रारदाराच्या नावावर ट्रान्सफर करायचे आहेत असे सांगितले. मात्र, तक्रारदाराच्या ताब्यात दिलेली कार आरटीओ पुणे येथे घेऊन जाऊन आजपर्यंत ती परत न करता त्यांची फसवणूक करण्यात आली आहे.याप्रकरणी आरोपीवर लोणीकंद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्ववैमन्यस्यातून 2 तरुणावर तलवारीने वार; दोघे गंभीर जखमी

पूर्ववैमन्यास्याच्या टोळक्यातील वादातून दोन तरुणांवर तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी सात आरोपींवर वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

गौरव संजय शेळके (वय -21,निळे वादळ चौक,रामनगर ,वारजे ),अभिषेक नवनाथ सकट (वय- 19,रामनगर ), सचिन शंकर दळवी (वय- 23,दांगट पाटील नगर ),ओंकार मांढरे ,रोहन पाटोळे, साहिल बल्लाळ, अमित धावरे अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी गौरव शेळके , अभिषेक सकट सचिन दळवी या तीन रेकॉर्ड वरील आरोपींना अटक केली आहे. सदर आरोपींच्या विरोधात चेतन मारुती शेडगे (वय -24 ,रा. रामनगर ,वारजे ,पुणे )यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. सदरची घटना 16 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता रामनगर येथे प्रणव सुपर मार्केट जवळ घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,तक्रारदार चेतन शेडगे व त्याचा मित्र कृष्णा शिंगाडे हे रामनगर परिसरात संबंधित ठिकाणी बसले होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी तलवार, लोखंडी हत्यार घेऊन सदर ठिकाणी आले .आरोपी सचिन दळवी याने तक्रारदार यास ‘अण्णा डोळसे कुठे आहे ?’अशी विचारणा केली.

त्यावर तक्रारदार याने माहिती नाही असे सांगितले असता, तक्रारदार व आरोपी यांच्या टोळीतील वादामुळे आरोपीने तक्रारदाराच्या उजव्या हाताच्या दंडावर, कमरेच्या वरील बाजूस तलवारीने वार करून त्यास गंभीर जखमी केले. तसेच त्याचा मित्र कृष्णा शिंगाडे यानी अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्याला देखील वार करून जखमी करण्यात आले आहे. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) एस बागवे 9960780790 पुढील तपास करत आहेत.

देशपातळीवरील ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ स्पर्धेत सहभाग घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आवाहन

पुणे, दि. १८: भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयामार्फत आयोजित ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ (बेस्ट टुरिझम व्हिलेज) स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील पर्यटनक्षम गावांनी ५ मे पर्यंत ऑनलाईन नामांकन दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

देशातील ग्रामीण पर्यटनाचा विकास आणि प्रोत्साहनासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत राष्ट्रीय धोरण तयार केले आहे. त्याअनुषंगाने ग्रामीण पर्यटनाचे उत्कृष्ट उदाहरण दाखवून देणाऱ्या गावाचा गौरव करण्यासाठी ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ स्पर्धा सुरू केली आहे. ग्रामीण विकास, समुदाय कल्याण आणि नैसर्गिक आणि सांस्कृतिक संपदेचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या गावांमध्ये स्पर्धात्मकता वाढीस लागावी, इतर गावांना प्रेरणा मिळावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा तीन टप्प्यात होणार असून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय या प्रत्येक टप्प्यावर ३ सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे निवडली जाणार आहेत. निवडण्यात आलेली गावे पुढील टप्प्यावरील स्पर्धेसाठी पुढे पाठवली जातील. या प्रकारे राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट पर्यटन गावांची निवड होईल. राष्ट्रीय स्तराव निवडण्यात आलेल्या प्रथम क्रमांकाच्या उत्कृष्ट पर्यटन खेड्याचे संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेद्वारे (युएनडब्ल्यूटीओ) घेण्यात येणाऱ्या ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ (बेस्ट टुरिझम व्हिलेज) स्पर्धेसाठी नामांकन पाठविण्यात येईल.

सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धेत भाग घेण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने विकसित केलेल्या https://nidhi.nic.in/BVC/AboutDetail.aspx या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी https://rural.tourism.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.

डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी: या स्पर्धेमुळे गावांमधील पर्यटनक्षमता राज्यासमोर, देशासमोर येणार असून ग्रामीण पर्यटनक्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना देशपातळीवर ओळख मिळणार आहे. पर्यटन सुविधांच्या विकासातून ग्रामीण विकास तसेच रोजगार निर्मितीला चालना मिळेल. गावांचा शाश्वत विकास आणि रोजगार निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ही स्पर्धा एक संधी आहे.
000

पांडवनगरच्या पीएमसी कॉलनीत भाई फक्त अजय:विजय असा ओरडा करत गाड्या फोडणाऱ्या टोळीतील मुलांची धरपकड

पुणे- दाेन टाेळक्यातील भाईगिरीच्या वादातून पीएमसी काॅलनी, पांडवनगर गेट व सार्वजनिक रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या वाहनांची लाेखंडी हत्यारे, लाकडी दांडके हातात घेऊन तब्बल 19 वाहनांची ताेडफाेड करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी चतृश्रृंगी पोलिस ठाण्यात 18 ते 20 जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आराेपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.इस्माईल इब्राहीम शेख(वय १९ रा. १००१ जुनी वडारवाडी )आणि रुपेश उत्तम विटकर(वय २२ रा. विटकर बंगला ,पांडवनगर )अशी दोघांची नावे आहेत याप्रकरणी साेनु सुनिल अवघडे (वय 25) याने आराेपी विराेधात पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. सदरची घटना 17 एब्रिल राेगी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

चपत्या विटकर, लवकुश चव्हाण, सुरज जाधव, अक्षय जाधव, इसान पठाण, , बबलु देवकुळे, चैतन्य पवार यांच्यासह १८ ते २० आराेपींवर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व आराेपी हे एकाच परिसरात राहण्यास आहे. घटनेच्या दिवशी आराेपी हे तक्रारदार राहत असलेल्या साेसायटीत हातात लाेखंडी हत्यारे, लाकडी दांडके घेऊन येवुन त्यांनी इमारतीच्या पार्किंग मध्ये पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकणी गाडयांची ताेडफाेड केली. त्यावेळी रुपेश विटकर याने तक्रारदार यास म्हणाला की, ‘माझी गाडी काेणी फाेडली, काेण भाई झाला आहे’ या भागात अजय व विजय हे दाेनच भाई आहेत त्यांना खुन्नस देताेय काय असे म्हणून आराेपी चपत्या विटकर याने तक्रारदार यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यास प्रतिकार केला असता, आराेपी रुपेश विटकर याने त्याचे जवळील लाेखंडी काेयत्याने तक्रारदार यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने डाेक्यात वार केला.

परंतु सदर वार चुकवल्यामुळे तक्रारदार यांचे खांद्याला वार लागुन ते जखमी झाले आहे. त्यानंतर आराेपींनी एकूण चार चारचाकी वाहने, 14 दुचाकी व एक तीनचाकी टेम्पाेची ताेडफाेड करुन नुकसान केले आहे. तसेच सदर भागात माेठमाेठयाने आरडाआरेड करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. याबाबत पुढील तपास चतुश्रृंगी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रुपेश चाळके9552526603 करत आहे.

कोठारी नामक व्यावसायिकाची २६ लाखाची फसवणूक:एक अटकेत

पुणे- डीलिंग सेंटर बिल्डींग, वेलणकर नगर पर्वती येथे ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकाने कामाच्या निमित्ताने कारागिरांकडे विश्वासाने दिलेल्या सोन्याचा कामगारांनी अपहार करून, संबंधित सोन्याच्या वजनाचे दागिने परत न करता व्यवसायिकाची तब्बल 26 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दत्तवाडी पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

याप्रकरणी संतोष रघुनाथ गायकर( रा. पिरंगुट ,मुळशी ,पुणे)आणि युसुफ शेख (रा. पर्वती दर्शन ,पुणे )या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संतोष गायकर यास पोलिसांनी अटक केले आहे. याबाबत स्वप्निल सतीश कोठारी ( वय – 48 ,रा.एनआयबीएम रोड ,कोंढवा पुणे) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.सदरचा प्रकार सात एप्रिल ते 13 एप्रिल यादरम्यान पर्वती येथील सेंटर बिल्डिंग याठिकाणी घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार स्वप्निल कोठारी यांचा ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे .त्यांच्याकडे सदर आरोपी संतोष गायकर आणि युसुफ शेख हे कामस आहेत .तक्रारदार कोठारी यांनी संतोष गायकर यांच्याजवळ 243.864 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगडीचे दागिने बनवण्यासाठी दिले होते.त्यापैकी संतोषने 104.122 ग्रॅम वजनाचे दागिने तयार करून दिले.

मात्र, उर्वरित 159.742 ग्रॅम वजनाचे सोने दिले नाही. तसेच आरोपी युसुफ शेख याच्याकडे 865.575 ग्रॅम वजनाचे दागिने बनवण्यासाठी दिले असता, त्यापैकी त्यानी 559.320 ग्रॅम वजनाचे सोने परत दिले. उर्वरित 306.255 ग्रॅम वजनाचे दागिने परत न करता तक्रारदार यांची एकूण 26 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी संतोष गायकर या आरोपीस अटक केली आहे तर दुसरा आरोपी पसार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत .याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे 9922970972 पुढील तपास करत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते झाराप मार्गावरील दुपदरी रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

मुंबई, दि. १८ : मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते झाराप मार्गावरील रस्त्याची कामे युद्धपातळीवर पूर्ण करुन पावसाळ्यापूर्वी किमान दोन पदरी रस्ता पूर्णपणे तयार करावा. यामध्ये रायगडमधील पळस्पे ते इंदापूर, रत्नागिरीमधील अरवली ते वाकेड व कशेडी घाटातील प्रलंबित रस्त्यांचा समावेश असून ही सर्व रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत.

नवी मुंबई येथील कोकण भवन मधील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात मुंबई- गोवा महामार्गाच्या कामाच्या प्रगतीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गुहागर चिपळूण कराड रस्त्याच्या चिपळूण तालुक्यातील पिंपळी-बुद्रुक ते कुंभार्ली घाटमाथा (हेळवाक) या एकूण २१ कि.मी. भागाचे दुपदरीकरण करुन उन्नतीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करणे, आणि हे काम चालू वर्षाच्या वार्षिक आराखड्यामध्ये समाविष्ट करुन रस्त्याची कामे मार्गी लावण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी मुख्य अभियंता, रस्ते परिवहन मंत्रालय व मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग  यांना  दिल्या.

चिपळूण पागनाका (७०० मी.) व सावर्डे शहरामध्ये उड्डाण पूल (१२५० मी.) हे प्रस्ताव चालू वर्षाच्या वार्षिक आराखड्यामध्ये समाविष्ट करुन उड्डाणपूलांची कामेही मार्गी लावण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी दिल्या.

चालू वर्षाच्या वार्षिक आराखड्यामध्ये मंजूर करुन घेऊन चालू आर्थिक वर्षात पुढील कामे सुरु करण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले. रायगड जिल्ह्यातील अलिबाग वडखळ रस्ता ००.०० ते २२.२०० चे महामार्ग दर्जाच्या स्तराला उन्नतीकरण करणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे गगनबावडा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी चे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६.३७ कि.मी. लांबीचे काम मंजूर असून उर्वरित १४.३० कि.मी. चे उन्नतीकरण करण्याच्या सूचनाही मंत्री श्री.चव्हाण यांनी या बैठकीत दिल्या.

****

जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीत राहणार, अ‍ॅफिडेव्हिटवर लिहून देऊ का? अजित पवारांची पत्रकार परिषद

‘त्या बातम्या चुकीच्या -पेरलेल्या ‘

पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांना काही अर्थ नाही. कारण नसताना माझ्याबाबत गैरसमज पसरवले गेले. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात अनेक जण उष्माघाताने दगावले, अनेकांवर उपचार सुरू होते. मी त्या सर्वांची भेट घेतली. मोठ्या प्रमाणावर श्रीसदस्य आले, आदल्या दिवशीही अनेक जण आलेले आपल्याला दिसले असतील. यात आम्हाला कुठल्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही. परंतु महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर 13-14 कोटी रुपये खर्च केला जातो. मग एवढा खर्च केला तर मंडप टाकायला काय अडचण होती? याबाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

अजित पवार पुढे म्हणाले की, मृतांच्या कुटुंबीयांना 5-5 लाख रुपये देऊन त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा कार्यक्रम संध्याकाळीही घेता आला असता, असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरीकडे, माझ्याकडे 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र आहे, अशी जी चर्चा सुरू आहे त्याला काही अर्थ नाही. असं कोणतंही पत्र नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

त्या बातम्यांमध्ये यत्किंचितही तथ्य नाही…

अजित पवार पुढे असेही म्हणाले की, आपण जे वेगवेगळ्या आमदारांची भेट झाल्याचं दाखवत आहात, ते सर्व विविध कामांनिमित्त आले होते. त्यामुळे या चर्चांना काही अर्थ नाही. या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. आम्ही सर्व राष्ट्रवादीतच राहणार आहोत. पक्षाने अनेक चढउतार पाहिलेले आहेत. आम्ही राज्यातील प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं आहे. महागाई असेल, कांदा उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक असेल किंवा अवकाळी पावसामुळे झालेले शेतीचे नुकसान या प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.

तुम्ही दाखवत असलेल्या बातम्यांमध्ये यत्किंचितही तथ्य नाही. ४० आमदारांच्या सह्या घेण्याचे कारण नाही. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहोत. कोणी काय मत व्यक्त करावे, हा त्या-त्या राजकीय पक्षाचा अधिकार आहे. आमदार मंत्रालय कामासाठी येतात. आमदार नेहमीच्या पद्धतीने भेटायला येत आहेत. त्यात वेगळा अर्थ काढू नका.”

राष्ट्रवादीत राहणार हे अ‍ॅफिडेव्हिटवर लिहून देऊ का?

अजित पवार पुढे म्हणाले की, बाबांनो काळी काळजी करू नका. शरद पवारांच्या मार्गदर्शन, नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. आजवर अनेक चढउतार आले. मात्र, बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. महत्त्वाचे प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न. बेकारी, अवकाळी पाऊस, महागाई, नोकर भरती होत नाही. खरेदी केंद्रे अनेक ठिकाणी बंद पडत आहेत. ही केंद्रे सुरू करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे.

महाविकास आघाडीत आम्ही ठरवलं की, प्रत्येक पक्षाचे दोन जण बोलतील. झालेल्या सभांमध्ये जे लोकं बोलले त्यांची बातमी नाही, आणि अजित पवार का बोलले नाहीत याची बातमी होते, हे बरोबर नाही. आमच्यात हे ठरलेलं आहे. अजित पवार राष्ट्रवादीत राहणार हे अ‍ॅफिडेव्हिटवर लिहून देऊ का? असा सवालही त्यांनी केला.

संजय राऊतांना लगावला टोला

महाविकास आघाडीच्या सभेत शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोघे बोलणार आहेत. हे ठरवले आहे. मात्र, तरीही अजित पवार भाषण करणार नाहीत, अशा बातम्या दिल्या जात आहेत. हे चुकीचे आहे. बातम्यांचा विपर्यास सुरू आहे. माझ्या ट्विटर हँडलवर आहे तसे आहे. मी काय झेंडा सारखाच काय धरून ठेवू. काही झाले असेल, तर मीच सांगेन. तुम्हाला ज्योतिषाची गरज नाही. कशाची गरज नाही.

कोणीतरी बातम्या पेरण्याचे काम आमच्याबद्दल विघ्नसंतोषी लोक करत असतील. काही काही बाहेरच्या पक्षाचे लोक एनसीपीचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहेत. तुम्ही ज्या पक्षाचे मुखपत्र आहे, त्याबद्दल बोला, असा टोला संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला. आमचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये.

अजित पवार म्हणाले की, आता या गोष्टींना पूर्णविराम द्या. आम्ही सर्व परिवार म्हणून काम करत आहोत. जे काही संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. आमचीही सहनशीलता कधी-कधी संपते. आमच्या सहनशीलतेचा अंत होऊ देऊ नका.

ते पुढे म्हणाले की, पवार साहेबांनी आज सकाळी मीडियाला जे काही सांगितलं ते तुम्ही सर्वांनी पाहिले असेल. मी कुणाचीही सही घेतलेली नाही. जे काही करायचं ते पक्ष म्हणून आम्ही निर्णय घेत असतो. घटनेने दिलेल्या अधिकाराचा प्रत्येकाने आदर करावा. हे जे काही चाललं आहे, ते कुठेतरी थांबले पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. मी जीवात जीव आहे तोपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार आहे.”दरम्यान, यापूर्वी अजित पवार यांनी 8 एप्रिल रोजी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, असा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला होता. तसेच, अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 30 ते 40 आमदारही भाजपसोबत जाणार, असा दावा या वृत्तपत्राने केला होता. त्यानंतर आज अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलवली आहे, अशा चर्चांनाही ऊत आला होता. याबाबतही अजित पवारांनी खुलासा केला आहे. अजित पवार यांनी म्हटले आहे की, मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी.

‘मुकुल माधव’तर्फे गुरुनानक मेडिकल फाउंडेशनलाडिजिटल सोनोग्राफी आणि स्ट्रेस टेस्ट मशीनची देणगी

पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्यातर्फे सीएसआर अंतर्गत गुरुनानक मेडिकल फाऊंडेशनला डिजिटल सोनोग्राफी मशीन आणि स्ट्रेस टेस्ट मशीनची देणगी देण्यात आली. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंग लालपुरा यांच्या हस्ते या दोन्ही मशीन पुणे कॅम्पातील गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथे सुपूर्द करण्यात आल्या. मोहिनी प्रल्हाद छाब्रिया यांच्या जयंतीनिमित्त या दोन्ही मशीन देण्यात आल्या.
यावेळी फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल वाबी, उपाध्यक्ष बी. आर. मेहता, मुकुल माधव फाऊंडेशनचे सचिन कुलकर्णी, इंदिरा बजाज, गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे चरणजीत सिंह सहानी, संतसिंग मोखा, सुरिंदर धुपाल, राजपाल सिंह मारवाह आदी उपस्थित होते. गुरुनानक मेडिकल फाउंडेशनच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्रात अत्याधुनिक व प्रगत तपासण्या व उपचार केले जातात. सर्व समाजातील रुग्णांना अल्पदरात ही सुविधा पुरविण्यात येते. मुकुल माधव फाउंडेशनने दिलेल्या या सोनोग्राफी व स्ट्रेस टेस्ट मशीनमुळे रुग्णांना दर्जेदार, विश्वासार्ह तपासणी सुविधा मिळणार आहे.
इकबाल सिंग लालपुरा म्हणाले, “रुग्णसेवा ही ईश्वरसेवा आहे. आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशनने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. समाजाच्या, देशाच्या विकासात ‘सीएसआर’चे योगदान महत्वाचे आहे. आपले सामाजिक दायित्व ओळखून मुकुल माधव फाउंडेशनप्रमाणे इतर संस्थांनीही पुढाकार घेतला, तर आरोग्यासह शिक्षा, पर्यावरण, महिला सक्षमीकरण होण्यास मदत होईल. दिवा तेवत राहण्यासाठी जसा तेलाचा प्रत्येक थेंब महत्वाचा असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक दानशूराचे योगदान मोलाचे असते.”
“शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात मुकुल माधव फाउंडेशन भरीव योगदान देत आहे. आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी ससून सर्वोपचार रुग्णालय, केईएम रुग्णालय, भारती हॉस्पिटल, कमांड हॉस्पिटल यासह इतर अनेक संस्थांमध्ये अत्याधुनिक उपचार व तपासण्याची यंत्रणा कार्यान्वित करत आहे. पुण्यासह बाहेरच्या जिल्ह्यातही आरोग्य व शिक्षण क्षेत्राला सक्षम बनविण्याचे कार्य मुकुल माधव फाउंडेशन करत आहे.”- रितू प्रकाश छाब्रिया, व्यवस्थापकीय विश्वस्त, मुकुल माधव फाउंडेशन

 नवा विष्णू मंदिरात सन १८७३ नंतर पुन्हा एकदा साजरा झाला ‘सार्वजनिक हळदी-कुंकू समारंभ’ 

पुणे : चैत्र वद्य त्रयोदशी म्हणजेच दिनांक २५ एप्रिल १८७३ रोजी सदाशिव पेठेतील नवा विष्णू मंदिरात झालेल्या पाच हजार महिलांच्या हळदी-कुंकू समारंभाच्या आठवणींना उजाळा देत तब्बल १५० वर्षांनी पुन्हा एकदा त्याच ठिकाणी त्या तिथीच्या दिवशी सार्वजनिक हळदी-कुंकू समारंभ पार पडला. पुणे सार्वजनिक सभेचे नेते गणेश वासुदेव जोशी उर्फ ‘सार्वजनिक काका’ यांनी ‘स्त्री विचारवती सभा’ यांच्या पुढाकाराने सार्वजनिक हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती करीत कार्यक्रमाचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव मोठया उत्साहात साजरा झाला. 
इतिहास प्रेमी मंडळ व पुणे सार्वजनिक सभेच्या वतीने सदाशिव पेठेतील नवा विष्णू मंदिरात सार्वजनिक हळदी-कुंकू कार्यक्रम शतकोत्तर सुवर्णमहोत्सव या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या शेफाली वैद्य, पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष विद्याधर नारगोळकर, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, शरद पंडित, सुप्रसाद पुराणिक आदी उपस्थित होते.  
शेफाली वैद्य म्हणाल्या, हळदी-कुंकू सारख्या समारंभामध्ये महिलांमध्ये संवाद होतो. महिला एकत्र येणे हे महत्वाचे आहे. हळदी-कुंकू समारंभाची परंपरा केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतभर आहे. सामाजिक उद्देशाने एखादी परंपरा पुढे नेणे, हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. तो पण जपायला हवा. 
विद्याधर नारगोळकर म्हणाले, सार्वजनिक काकांनी स्वदेशी शपथ, इंग्रजी भाषेतील मासिक, दुष्काळात गरजूंना आर्थिक मदत अशी वैविध्यपूर्ण सामाजिक कामे केली. त्यात १५० वर्षांपूर्वी आयोजित केलेले सार्वजनिक हळदी-कुंकू हा वेगळा कार्यक्रम होता. नवा विष्णू मंदिर त्या घटनेचे साक्षीदार आहे. 

मोहन शेटे म्हणाले, तब्बल १५० वर्षांपूर्वी झालेल्या या कार्यक्रमाची बातमी मुंबई च्या नेटिव्ह ओपिनियन मध्ये छापून आली होती. ही घटना  त्या काळातील एक क्रांतिकारी व महाराष्ट्राला प्रागतिक घडवणारी घटना ठरली. त्यामुळे या ऐतिहासिक घटनेला उजाळा  देण्यासाठी पुन्हा एकदा त्याच नवा विष्णू मंदिरात सार्वजनिक हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. याप्रसंगी स्वच्छता कामगार, भटके विमुक्त, देवदासी, तृतीयपंथी अशा समाजातील उपेक्षित महिलांना निमंत्रित करून सन्मानित करण्यात आले. तसेच याप्रसंगी महिलांना संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. दीप्ती डोळे यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश घाटपांडे यांनी आभार मानले. 

उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले – मला एकट्याला भाजपशी लढावे लागेल

शरद पवार आणि आता अजित पवार दोघांच्या विश्वासाहर्तेला तडा

मुंबई-राज्यात चालू आणि संभाव्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभुमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक मोठे विधान व्यक्त केले. एका बड्या नेत्याशी खासगीत बोलताना उद्धव ठाकरेंनी मला एकट्याला भाजपविरोधात लढावे लागेल असे वक्तव्य केले आहे. यामुळे मविआच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित होत आहे.

काॅंग्रेस नेत्याशी बोलताना विधान

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका काँग्रेस नेत्यासोबत बोलताना ‘मला एकट्याला भाजपसोबत लढावे लागेल’ असे विधान केले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता महाविकासआघाडी टिकणार का? आघाडीचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एकीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या सुरस चर्चा रंगल्या. तर दुसरीकडे शरद पवारांनी पक्ष एकसंध असून सर्व सहकाऱ्यांची पक्ष शक्तिशाली करण्याची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया देत या चर्चांना स्वल्पविराम दिला आहे. त्यावर अजित पवार यांनी अशा चर्चांना पूर्णविराम दिला.

राष्ट्रवादी आणि सत्ता

राज्याच्या राजकारणात उलथापालथी होत आहेत. एकीकडे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने सलग दहा वर्षे सत्ता उपभोगली. राष्ट्रवादी काॅंग्रेस नेहमी सत्तेला महत्व देते. राष्ट्रवादीच्या उदयानंतर २०१४ साली शरद पवारांच्या पक्ष प्रथमच विरोधी बाकावर बसला. २०१४ ते २०१९ या काळात राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार होते. त्यानंतर २०१९ ला शिवसेना भाजप युतीचे बिनसले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी काॅंग्रेसचा हात आणि घड्याळाची साथ घेत राज्यात सत्ता स्थापली. जेमतेम अडीच वर्ष सरकार चालले. त्यानंतर फूटीच्या राजकारणाचा फटका मविआला बसला.

शरद पवार आणि आता अजित पवार दोघांच्या विश्वासाहर्तेला तडा

  • शरद पवार यांची राजकीय भुमिका नेहमीच बदलती राहीली. ते एकाच गोष्टीवर ठाम असातात असे नाही. त्यामुळे त्यांच्या भुमिकेला सहज घेतले जात नाही. शरद पवारांनी २०१४ ला भाजपला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठींबा देऊ केला होता.
  • अर्थात सलग दहा ते अकरा वर्षे काॅंग्रेसोबत सत्ता भोगल्यानंतर २०१४ ला आघाडीची हार झाली. या काळात शरद पवारांनी सत्तेसाठी भाजपची साथ देण्याची जाहीर भुमिका घेतली. पण नंतर विरोधी पक्षात बसले.
  • नुकत्याच नागालॅंडमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांत सात जागा पवारांच्या पक्षाने पटकावल्या. विरोधी पक्षात राहणार असल्याचे पवारांनी सांगितले नंतर सरकारमध्ये सामिल झाले.
  • अर्थात शरद पवारांची भुमिका नेहमी भोवऱ्यासारखी राहीली आहे. याची चांगलीच जाणीव उद्धव ठाकरेंना आहे. ती एक बाब आणि अलिकडे राष्ट्रवादी आणि भाजपची जवळीक तसेच अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा रंगल्या त्यातून उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केले असे दिसून येते.

या 4 कारणांनी चर्चा

1) वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी येत्या 15 दिवसांत राज्यात दोन मोठे धमाके होतील, असे वक्तव्य केले होते. यावर प्रश्न विचारला असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली टिपण्णी चर्चेत राहिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘एक धमाका दिल्ली आणि एक राज्यात होईल. मात्र, मी वर्तमानात जगणारी आहे. 15 दिवसानंतर काय होणार, हे मी सांगू शकत नाही, असे म्हणत त्यांनी उत्तर देणे टाळले.

2) अजित पवार यांनी सोमवारचा दौरा रद्द केला. त्यानंतर काही आमदारांसोबत बैठक घेतल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांनी दिल्या होता. मात्र, आज अजित पवार यांनी ट्विट करून याबाबतचे वृत्त फेटाळून लावले होते. शिवाय शरद पवारांनीही असे काही झाले नसल्याचे सांगितले.

3) अजित पवारांसोबत 40 आमदार आहेत. त्यांनी आमदारांच्या सह्याचे पत्र घेतले आहे. ते भाजप आणि शिंदे गटासोबत जाऊ शकतात, असा दावाही काही प्रसारमाध्यांनी केला होता. मात्र, हा दावाही पत्रकार परिषदेत अजित पवारांनी फेटाळून लावला.

4) शरद पवार यांनी अदाणी – हिंडेनबर्ग प्रकरणी जेपीसीची (संयुक्त संसदीय समिती) गरज नसल्याचे सांगितले होते. काँग्रेसने या विधानापासून स्वतःला चार हात दूर ठेवले. पवारांची ही भूमिका सुद्धा भाजपला सहाय्य करणारी असल्याच्या चर्चा झाल्या. त्यानंतर पवारांनी जेपीसी चौकशीला विरोध नसल्याचे सांगितले.

भाजपचा प्लॅन B

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष सुनावणीचा निकाल कधीही येऊ शकतो. समजा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे गटाविरोधा गेला. त्यांच्याकडे आमदार आहेत. त्यातले 16 अपात्र होतील. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार भाजपसोबत जाऊन सरकार वाचवतील. मात्र, ही शक्यताही स्वतः अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वी फेटाळत असे झाले तरी सरकार पडणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, चर्चा सुरूच होत्यात. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदार अजित पवारांसोबत आहेत. भाजपला पाठिंबा देण्यासाठी अजित पवार सातत्याने या आमदारांच्या संपर्कात आहेत. या आमदारांचे सहमती पत्रही घेतले असून, ते भाजपमध्ये सहभागी होणार नाहीत. मात्र, ते बाहेरून पाठिंबा देतील.

विधानसभेतले चित्र

– एकूण जागा – 288

– बहुमत आकडा 145

राष्ट्रीय लोकशाही आघाडी

– एनडीए एकूण – 162

– भाजप – 106

– शिवसेना (शिंदेगट) – 40

– अपक्ष – 12

– इतर – 3

– प्रहार जनशक्ती – 2

महाविकास आघाडी

– मविआ एकूण – 121

– राष्ट्रवादी – 53

– काँग्रेस – 44

– ठाकरे गट – 16

– इतर – 4

– समाजवादी पक्ष – 2

अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्याचे वीजग्राहकांना आवाहन

पुणेदि. १८ एप्रिल २०२३: महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांना माहे एप्रिल / मे महिन्याच्या वीजबिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. या अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या रकमेचा वीजग्राहकांना भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास महावितरणकडून जास्तीत जास्त सहा समान मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याबाबतचा संदेश सुरक्षा ठेवीच्या बिलावर नमूद करण्यात आला आहे.

मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद मा. आयोगाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दराच्या सममूल्य दराने व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना अदा करण्यात येते.

त्याप्रमाणे पुणे परिमंडलातील वीजग्राहकांना एप्रिल महिन्यामध्ये अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. या बिलामध्ये नमूद सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यासाठी जास्तीत जास्त सहा मासिक समान हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासंबंधीची माहिती सुरक्षा ठेवीच्या बिलामध्ये नमूद आहे. तसेच लघुदाब वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम घरबसल्या भरण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरण मोबाईल अॅपद्वारे सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बिलाची रक्कम भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपये

मुंबई, दि. १८ : कात्रज-देहू मार्गावरील किवळे येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.

कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळल्याने या  दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तीव्र दुःख तसेच मृत, त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदनाही व्यक्त केली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

महाराष्ट्र भूषण ग्रॅँड इव्हेंटचे १३ बळी,अनेकांचे सयंमी मौन,तर शिंदे गट तोफेच्या तोंडी

पुण्यात एकदा घेतली होती फडणवीसांची भर उन्हात सभा पण … ५ पुणेकर हि नव्हते फिरकले सभेला ;सभा रद्द करून फडणवीस फिरले होते सभास्थळावरून माघारी …

दिवसभर वाजविली जाणारी कल्हई ..माध्यमातून वाजली का नाही ?

मुंबई- महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाचा ‘ग्रॅँड इव्हेंट’ करून डाॅ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या लाखो शिष्यांची व्होट बँक खेचून घेण्याच्या उद्देशाने शिंदे-फडणवीस सरकारने या सोहळ्याचा उन्हाची आणि त्याच्या तीव्रतेची परवा न करता घाट घातला. आजवर हा सोहळा मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत होत असे. मात्र यंदा सरकारने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व लाखो श्रीसेवकांना आमंत्रित केले. कोट्यवधींचा खर्च केला. पण गालबोट लागल्यानंतर मात्र भाजप नेत्यांनी मौन धारण केले. जे सांस्कृतिक मंत्रालय आयोजक होते त्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार जबाबदारी घेण्यासही पुढे आले नाहीत. उलट पालकमंत्री उदय सामंतांना प्रेससमोर उभे करून जनक्षोभ शिंदे गटाकडे वळवण्याची खेळी भाजपने खेळली.

१५ एप्रिलपासून उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा आपत्ती व्यवस्थापन खात्याने दिला होता तरीही सरकारने भरदुपारी मैदानावर कार्यक्रम का केला, असा प्रश्न आहे. दरम्यान, अमित शाह यांंच्या गोवा दौऱ्यामुळे सर्वांना वेठीस धरले असा विरोधकांचा आरोप आहे. तर श्रीसदस्यांना वेळीच घरी जाता यावे म्हणून व अप्पासाहेबांच्या सूचनेनुसार कार्यक्रम दुपारी घेतला, असा दुसरा दावा करण्यात आला.तर अचानक तापमान वाढल्याने दुर्घटना घडल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

ज्येष्ठ निरूपणकार डाॅ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघाताने बळी गेलेल्या श्रीसदस्यांची संख्या १३ वर गेली. रविवारी दुपारी खारघरच्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर ३८ अंश तळपत्या उन्हात लाखो अनुयायी ५ ते ६ तास तिष्ठत बसले होते. त्यापैकी ११ जणांचा उष्माघातामुळे रविवारी मृत्यू झाला होता, तर सोमवारी आणखी दोघांची प्राणज्योत मालवली.

1. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम २५ लाख केली आहे. मात्र पुरस्कार वितरण सोहळ्यात सरकारने १३ कोटी खर्च केले.

2. व्हीआयपी पाहुण्यांसाठी स्टेजवर मंडप, कूलर्स लावले होते. प्रेक्षक अनुयायांसाठी मात्र मंडप नव्हता, ते उन्हातच तळपले.

3. मोबाइल शौचालयेही दूरवर होती, गर्दीत तिथे जाणे जिकिरीचे होते म्हणून प्रेक्षक पाणी कमी पिले, त्यामुळे उन्हाचा फटका.

4. लाखोंच्या संख्येने लोक आल्याने चेंगराचेंगरीही झाली. सरकारने ते लपवून ठेवले. काही मृत व रुग्णांच्या अंगावरील जखमांवरून ते आता समोर आले आहे.

5. सविता पवारचा (मंगळवेढा) मृत्यू उष्माघाताने नव्हे, चेंगराचेंगरीत झाल्याचे त्यांचे भाऊ सचिन घुले यांनी सांगितले.

मृतांची नावे : महेश नारायण गायकर (४२, मुंबई), जयश्री जगन्नाथ पाटील (५४, रायगड), मंजूषा कृष्णा भोंबडे (५१, मुंबई), स्वप्निल सदाशिव केणी (३०, विरार), तुळशीरामभाऊ वांगड (५८, पालघर), कलावती सिद्राम वायचळ (४५, सोलापूर), संगीता संजय पवार (४२, मंगळवेढा, सोलापूर), भीमा कृष्णा साळवे (५८, ठाणे). इतरांची ओळख पटलेली नाही.

भारतीय सागरी विद्यापीठात करियरचे विविध पर्याय:नवीन शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश अर्जाची अंतिम तारीख १४ मे, अध्यापकांच्या २६ जागांसाठी मागविले अर्ज

नागपूर : समुद्र व त्याच्याशी निगडीत जहाज बांधणी, प्रशिक्षण, व्यवस्थापन असे विविध कोर्सेस उपलब्ध करुन देणाऱ्या चैन्नई स्थित भारतीय सागरी विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक सत्रासाठी अर्ज मागविण्यात येत असून १४ मे ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. तर अध्यापकांच्या  २६ जागांसाठी पात्र उमेदवारांना अर्ज मागविण्यात येत आहेत. या दोन्हीही संधीचा विदर्भातील विद्यार्थी व पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा आणि करियरच्यादृष्टीने महत्वाच्या व वेगळ्या क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन भारतीय सागरी विद्यापीठाच्या कुलगुरु मालिनी शंकर यांनी केले आहे.

विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक सत्रातील प्रवेश आणि अध्यापकांच्या भरावयाच्या पदांबाबत श्रीमती शंकर यांनी माध्यमांना आज माहिती दिली. सागरी विद्यापीठाद्वारे चालविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांला विदर्भातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन करियरसाठी नवा पर्याय निवडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. विद्यापीठाचे कोची, मुंबई, नवी मुंबई, कोलकत्ता, चेन्न्ई, विशाखापट्टनम येथे कॅम्पस असून येथे ३ हजार विद्यार्थ्यांची क्षमता आहे. एकूण १७ खाजगी महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत व त्यांची क्षमताही ३ हजार विद्यार्थ्यांची असल्याचे श्रीमती शंकर यांनी सांगितले.

नवीन शैक्षणिक सत्रासाठी १४ मे पर्यंत अर्ज करता येणार ; सत्राला १० जूनपासून सुरुवात

विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक सत्रासाठी १४ एप्रिल पासून अर्ज मागविण्यात आले आहेत. १४ मे पर्यंत अर्ज करता येणार असून १० जूनपासून नवीन सत्रास प्रारंभ  होणार आहे. तांत्रिक व अतांत्रिक पध्दतीचे अभ्यासक्रम या विद्यापीठाद्वारे चालविण्यात येतात. तांत्रिक अभ्यासक्रमांत बी.टेक आणि एम.टेक हा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. यासाठी इयत्ता १२ वी मध्ये (पीसीएम गृप) किमान ६० टक्के गुण प्राप्त विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास पात्र राहतील. बी.बी.ए. अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विद्याशाखेतून किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र ठरतील. तर एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विद्याशाखेतून किमान ५५ टक्के गुणांनी पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी पात्र ठरतील.            

अध्यापक पदांच्या २६ जागांसाठी ४ मे पर्यंत अर्ज करता येणार

विद्यापीठाने सहयोगी प्राध्यापक पदांच्या १४ जागांसाठी तर सहाय्यक प्राध्यापक पदांच्या १२ जागांसाठी अर्ज मागविले आहेत. समुद्र अभियांत्रिकीच्या  ७ आणि नॉटीकल सायन्सच्या ७ अशा एकूण १४ सहयोगी  प्राध्यापकांच्या जागा आहेत. यातील ७ जागा आरक्षित तर उर्वरित ७ जागा अनारक्षित आहेत. समुद्र अभियांत्रिकीच्या  6 आणि नॉटीकल सायन्सच्या 6 अशा एकूण 12 सहायक प्राध्यापकांच्या जागा आहेत. यातील ७ जागा आरक्षित तर उर्वरित 5 जागा अनारक्षित आहेत. या पदांसाठी ४ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज स्विकारले जातील. नवी मुंबई, चेन्नई, विशाखापट्टनम आणि कोची येथे कॅम्पस डायरेक्टरच्या प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ४ जागांसाठी अर्जही मागविण्यात आले असून २ मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.

विविध अभ्यासक्रमांसाठी मागविण्यात आलेल्या अर्जांबाबत आणि अध्यापक पदांच्या जागांबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या www.imu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही श्रीमती शंकर यांनी सांगितले.

खोबरेल तेलाने भरलेला कंटेनर पलटी:सावधान

पुणे: बेंगलोर महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कात्रज देहूरोड दरम्यान खोबरे तेलाने भरलेला टँकर उलटला. ही घटना संध्याकाळी घडली आहे. अपघातात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.परंतु रस्त्यावर खोबरे तेल पसरल्याने महामार्ग मोठ्या प्रमाणावर निसरडा झाल्याने, महामार्गावरील वाहतूक मंदावली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. टँकर कोईमतूर तामिळनाडू येथून २४००० हजार लिटर खोबरे तेल घेऊन मुंबईच्या दिशेने जात असताना, नऱ्हे येथील भुमकर पुलावर गिअर बॉक्स निकामी झाल्याने टँकर चालकाचे टँकर वरील नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला. सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तसेच सर्वत्र तेल पसरल्याने महामार्ग निसरडा झाला असल्याने इतर अपघात होण्याची शक्यता असल्याने सिंहगड वाहतूक विभाग व सिंहगड पोलीस वाहतूक सुरळीत करत आहेत.

टीडीएमच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून मिळतोय प्रतिसाद

  राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे ‘टीडीएम’ हा मराठी चित्रपट घेऊन आले आहेत. २८ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटातील गाणी आणि ट्रेलरने सिनेरसिकांची उत्सुकता वाढवली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘टीडीएम’चा ट्रेलर रिलीज झाला असून या ट्रेलरने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांकडून ट्रेलरला भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 

बुधवार (१२ एप्रिल) रोजी ‘टीडीएम’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून अवघ्या काही दिवसांतच ट्रेलरला लाखो व्ह्यूज आले आहेत. नवोदित कलाकार पृथ्वीराज थोरातचा अष्टपैलू अभिनय आणि अभिनेत्री कालिंदी निस्तानेच्या देखण्या रुपाची प्रेक्षकांना भुरळ पडली. ‘विदर्भ कन्या’ कालिंदीच्या अदा आणि ट्रेलरमधील तिच्या डायलॉग्जनी हजारो तरुणांच्या हृदयात प्रेमाच्या कळी खुलू लागल्या आहेत. परिणामी विदर्भातून ‘टीडीएम’च्या ट्रेलरला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. 

“एकदम कडक ट्रेलर, टीडीएम सुपरहिट होणार”… “आता आतुरता फक्त TDM ची, राडा तर होणारच ना अन् तो करणार पण TDM च ना”… “भाऊसाहेब कऱ्हाडेंची नवीन कथा पहावीच लागेल, वास्तव्याशी नाळ पुन्हा एकदा जोडावीच लागेल, आतुरता २८ एप्रिल ची”… अशा प्रतिक्रिया मराठी सिनेमा चाहत्यांकडून ‘टीडीएम’च्या ट्रेलरवर आल्या आहेत. तर पृथ्वीराज आणि कालिंदीचे डायलॉगही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. टीडीएमच्या ट्रेलरखाली “बघतुय एकीकड आणि चालतुय एकीकड होपलेश, पळ तिकड”… अशी कमेंट करणाऱ्या कालिंदीच्या चाहत्यांचीही संख्या मोठी आहे. तर पृथ्वीराजचा “जब जिंदगी झंड होती है, तो पुणा मुंबईही याद आती हे”… या डायलॉगने लाखो तरुणांना आपलंस केलं आहे. 

‘टीडीएम’मधील गाणी आणि ट्रेलरला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर आता २८ एप्रिलला हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे. हा सिनेमा हिट होणार आणि मराठीतील सिनेइंडस्ट्रीत अनेक नवे रेकॉर्ड  तयार करणार अशी चिन्हे दिसत आहेत.