Home Blog Page 1575

अपघातमुक्त सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील 6 बस चालकांचा ‘सुरक्षा पुरस्कारा’ने सन्मान

नवी दिल्ली : सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये अपघातमुक्त बस चालविणाऱ्या महाराष्ट्रातील 6 बस चालकांचा ‘सुरक्षा पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. देशभरातील एकूण 42 बस चालकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळातील 2, नवी मुंबई महानगर पालिका परिवहनाचे 1, सोलापूर महानगर पालिका परिवहन महामंडळाचे 1, पुणे महानगर पालिका परिवहन महामंडळ मर्यादितचे 1, बेस्ट चे 1 वाहन चालकांचा समावेश आहे.

येथील कंस्टीट्यूशन क्लबमध्ये मंगळवारी सायंकाळी ‘असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग्ज (एएसआरटीयू) च्यावतीने ‘हिरोज ऑन द रोड’या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सचिव अलका उपाध्याय यांच्या हस्ते अपघात मुक्त, निर्दोष सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून बस चालकांच्या कुटूंबीयांसोबत ‘सुरक्षा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यामध्ये 17 बस चालकांनी त्यांच्या एकूण सेवेत अपघात न करता 30 वर्षे सेवा दिलेली आहे.

या पुरस्कार विजेत्यांमध्‍ये महाराष्‍ट्रातील एकूण सहा बस चालकांचा समावेश आहे. महाराष्‍ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन चालकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये किसन रामभाऊ घोडके (36 वर्ष अपघातमुक्त सेवा ) आणि मुल्ला मोहम्मद रफिक अब्दूल सत्तार (29 वर्ष अपघातमुक्त सेवा ) अशी या चालकांची नावे आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिका वाहतूक सेवेतील नंदकुमार लावंड (26 वर्ष अपघातमुक्त सेवा) सोलापूर महानगरपालिका वाहतूक सेवेतील राजेंद्र महादेव आवटे (25 वर्ष अपघातमुक्त सेवा), पुणे म‍हानगर परिवहन महामंडळातील अरूण नारायण कुचेकर (24 वर्ष अपघातमुक्त सेवा), बेस्ट सेवेतील गिरीजाशंकर लालताप्रसाद पांडे (21 वर्ष अपघातमुक्त सेवा) यांचा गौरव करण्‍यात आला.

सध्या, महानगरपालिका अंतर्गत 80 राज्य मार्ग परिवहन उपक्रम हे एएसआरटीयू चे सदस्य आहेत. जे संयुक्तपणे अंदाजे 1,50,000 बस चालवतात आणि सुमारे 70 दशलक्ष प्रवाशांना परवडणारी आणि सुरक्षित वाहतूक सेवा प्रदान करतात. एएसआरटीयूच्यावतीने प्रामुख्‍याने सार्वजनिक रस्ते वाहतुकीला प्रोत्साहन देण्‍यासाठी सुधारणा घडवून आणत आहेत. तसेच नवनवीन घडामोडींवर चर्चा करण्यासाठी, वाहतूकविषयक प्रमुख समस्या/आव्हाने ओळखण्यासाठी विविध बैठका, परिषदा आणि परिसंवाद/कार्यशाळा यांचे आयोजन करत आहे. राज्य रस्ते वाहतूक उपक्रमांच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक मंच म्हणून एएसआरटीयू कार्यरत आहे.

रस्ते अपघात कमी करण्यासाठी एसआरटीयूने केलेल्या काही उपाययोजना चालकांसाठी जाहीर केल्या आहेत. यामध्ये भरतीच्या टप्प्यातच सुशिक्षित आणि अनुभवी चालकाची निवड करणे. निवडलेल्या चालकांना भरतीच्या वेळीच अद्यावत प्रशिक्षण देणे. वेळोवेळी प्रोत्साहन देण्‍यासाठी वाहनचालकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणे.

‘वो फिर नही आते ..म्हणतात खरे पण त्या रमल्या ४० वर्षांपूर्वीच्या आयुष्यात ..

एक वोभी था जमाना …म्हणत 40 वर्षांपूर्वीचा काळ पुन्हा एकदा अनुभवला

पुणे- रांगोळी, सनईचे सूर, नटून थटून आलेल्या महिलांची धावपळ, त्यांचं भारावलेपण असं मंगलमय वातावरण नुकतच अहिल्यादेवी प्रशालेत अनुभवायला मिळालं. निमित्त होतं 1982 सालच्या माजी विद्यार्थिनींचा मेळावा.
या सर्व माजी विद्यार्थिनींनी त्यांच्या वेळी त्यांना शिकवायला असणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वेळच्या गुरुजनांनाही आमंत्रित केले होते. विद्यार्थिनी जशा आपल्या गुरुजनांविषयी भरभरून बोलत होत्या तसेच हे सर्व गुरुजनही या विद्यार्थिनी प्रति कृतकृत्य होऊन बोलत होते. या सर्व माजी विद्यार्थिनींनी जवळजवळ 40 वर्षांपूर्वीचा काळ पुन्हा एकदा अनुभवला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनघा डांगे ही आपली बालपणीची मैत्रीण विद्यमान मुख्याध्यापिका आहे याचा या मैत्रिणींना केवढा आनंद झाला होता. त्यावेळच्या मुख्याध्यापिका जयश्री वैद्य याही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांनाही आपली एक विद्यार्थिनी आपण ज्या खुर्चीत बसून प्रशासन चालवलं त्याच खुर्चीत बसून प्रशासन चालवते आहे याचा अभिमान वाटला.
या माजी विद्यार्थिनींनी प्रशालेला भूगोल लॅब अद्ययावत करून देण्यासाठी जी सामग्री लागणार आहे ती सर्व सामग्री भेट देण्याचे नियोजन केले. या सर्व माजी विद्यार्थिनी क्षणभर आपलं वय विसरून शाळेच्या परिसरामध्ये आनंदाने बागडत होत्या.
याप्रसंगी काकडे सर, भोमे सर,माजी मुख्याध्यापिका जयश्री वैद्य,खेरबाई,गोखलेसर, नगरकरबाई यांनी कृतज्ञतापूर्वक आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यमान मुख्याध्यापिका अनघा डांगे यांनी आपल्या मैत्रिणींना अहिल्यादेवी शाळेतील विद्यार्थिनी ते शाळेचे मुख्याध्यापिका होण्याचा प्रवास उलगडून दाखवला. डांगे आपल्या भाषणात म्हणाल्या की शाळेची शिस्त, विविध स्पर्धा या पूर्वीसारख्याच आहेत. त्यात थोडाही बदल झालेला नाही. “मुख्याध्यापक म्हणून जेव्हा मी शाळेत वावरते तेव्हा जागोजागी मला आपल्या वेळेसचे शिक्षक भेटतात आणि ते मला माझ्या या वळणावर मार्गदर्शन करतात. एक विद्यार्थिनी ते मुख्याध्यापिका हा प्रवास माझ्यासाठी खरोखर अभिमानाचा क्षण आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मानसी देशपांडे व माजी विद्यार्थिनी किशोरी कुलकर्णी यांनी गायलेल्या ईशस्तवनाने झाली. प्रास्ताविक वीणा नगरकर यांनी केले, सूत्रसंचालन यशश्री पुणेकर यांनी केले,उज्ज्वल लघाटे यांनी शाळा आणि शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली तर आभार शुभदा गोडबोले यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता किशोरी कुलकर्णी यांनी गायलेल्या पसायदानाने झाली.

संत निरंकारी मिशन द्वारे विश्वव्यापी रक्तदान अभियानाचे आयोजन  

 पुणे- बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ दिनांक २४ एप्रिल हा दिवस देश विदेशामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करत ‘मानव एकता दिवस’ या रूपात साजरा केला जातो. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी  मानव कल्याणार्थ संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून भारत देशातील मिशनच्या बहुसंख्य शाखांसह मिशनचे पुण्याचे मुख्यालय असलेल्या गंगाधाम  येथील सत्संग भवनमध्ये देखील  रक्तदानाचे महाअभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये मिशनचे अनुयायी मोठ्या संख्येने स्वेच्छेने व उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे असे आवाहन संत निरंकारी मंडळाचे पुणे झोनचे झोनल प्रमुख .ताराचंद करमचंदानी यांनी केले आहे .
    ते म्हणाले,’  बाबा गुरबचनसिंहजी यांनी सत्याचा बोध प्रदान करून मनुष्य जीवन समस्त भ्रमापासून मुक्त करण्याचे अलौकिक कार्य  केले; त्या बरोबरच समाज उत्थानासाठी अनेक कल्याणकारी योजना क्रियान्वित केल्या. त्यामध्ये साधे विवाह, नशा मुक्ति तसेच युवा वर्गाला खेळांच्या प्रति प्रेरित केले. समाजात व्याप्त अनिष्ट गोष्टीच्या त्या कालखंडानंतर बाबा हरदेवसिंहजी यांच्या ‘रक्त नाड्यामध्ये वाहावे , नाल्यांमध्ये नको ‘  या प्रेरक संदेशातून समस्त निरंकारी भक्तांना एक नवी सकारात्मक दिशा मिळाली. तोच प्रेरक संदेश जीवनात उतरवत निरंकारी भक्त लोककल्याणार्थ आपल्या सेवा प्रदान करत आले आहेत.
       यांनी या अभियानाची विस्तृत माहिती देताना त्यांनी सांगितले, की हे महाअभियान भारतातील संत निरंकारी मिशनच्या सर्व ९९ झोन मधील बहुसंख्य शाखांमध्ये राबविले जाईल. त्यामध्ये रक्तदान शिबिरांच्या आयोजनापूर्वी केली जाणारी तपासणी  व स्वच्छता याकडे विशेष लक्ष देण्यात येईल. त्या बरोबरच रक्तदात्यांसाठी चहापानाची उचित व्यवस्था केली जाणार आहे. रक्त संकलनासाठी ससून रुग्णालय रक्तपेढी, संत निरंकारी रक्तपेढी , यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी , कमांड हॉस्पिटल रक्तपेढी व अन्य सरकारी रक्त पेढ्यांचे प्रशिक्षित चमू येणार आहेत. मिशनचे सेवादार संपूर्ण आठवडाभर गंगाधाम परिसरातील घराघरांमध्ये जाऊन नागरिकांना रक्तदानाविषयी जागरूक करत आहेत. ठिकठिकाणी पथनाट्य,रॅली च्या माध्यमातून प्रेरणा देखील दिली जात आहे.उदात्त लोक कल्याणकारी हेतूने आयोजित या अभियानामध्ये सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मानवतेच्या दिव्य शिकवणुकीची छाप दिसून येईल जिचा अंगीकार करून निरंकारी जगतातील समस्त भक्तगण प्रेरणा प्राप्त करून आपले जीवन कृतार्थ करत आहेत

पुण्यात घरफोड्या कुठे आणि कशा …पहा

पुणे- बसप्रवास असो गर्दीची ठिकाणे असो कि दाटीवाटीने बांधलेली बेकायदा घरांच्या इमारती असो वा कायदेशीर बांधलेल्या सोसायट्या असोत चोऱ्या, घरफोड्या, भाईगिरी यांचे शहर अशी नवी ओळख तर पुणे ओढू पाहत नाही ना ?रस्तोरस्ती, गल्लोगल्ली सीसी टीव्ही चे जाळेअसूनही असा सवाल कधी उपस्थित होऊ नये एवढी असुरक्षितता पुण्यात वाढू नये हीच अनेकांची अपेक्षा आहे.

नऱ्हे म्हणजे बेकायदा बांधकामांचे आगर तेथील पारी कंपनी रोड येथील महालक्ष्मी पैलेस फलॅट नंबर ४०७ (व्यंकटेश शर्विल सोसायटी समोर ) कुलूप बंद असताना कुलूप तोडून चोरट्याने १ लाख ८० हजाराचे दागिने चोरून नेले . विशेष म्हणजे हि घरफोडी दुपारी पावणे चार ते सायंकाळी सव्वापाच च्या दरम्यान घडली .प्रशांत हनमघर यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद नोंदविली आहे.सिंहगड पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक यादव 9552160720याप्रकरणी तपास करत आहेत .

दुसऱ्या एका घरफोडीत लोहगाव येथील गुरुद्वारा रोड ,स्मशान भूमि जवळ असलेल्या एका फलॅट चे कुलूप तोडून बेडरूम मध्ये घुसून तेथील कपाटातील सुमारे ३५ हजाराची रोकड आणि दागिने असा सुमारे ३लाखच ऐवज चोरट्याने चोरून नेला .येथे राहणाऱ्या ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे.विमानतळ पोलीस ठाण्यातील फौजदार आर एस ढावरे 9422109997 याप्रकरणी तपास करत आहेत.

उत्तम नगर शिवणे येथील आशीर्वाद गार्डन आणि क्षितीज रेसिडेन्सी येथील २ रूम मधून चक्क नजर चुकवून घुसलेल्या ३१ वर्षीय महिलेने येथून २ लाख १० हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले आहेत . फौजदार लुगडे 8208480303या चोर महिलेचा शोध घेत आहेत .

बाणेरच्या बालेवाडी नजीक ऑर्चीड स्कूल शेजारी असलेल्या श्रद्धा पोलीक्लीनिक मध्ये ४ लाख ८२ हजाराची रोकड आणि अमेरिकन डॉलर ठेवलेली बॅग अज्ञात भामट्याने अशाच पद्धतीने चोरून नेली आहे. रितेश शहा (वय ४५ ) यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली असून चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यातील अंमलदार वणवे 9422347585 या भाम्त्याचा शोध घेत आहेत .

उंड्री जवळील मौजे वडाची वाडी येथील ‘द वात्सल्य स्कूल ‘ च्या खिडकीचे लोखंडी बार तोडून त्यातून आत प्रवेश करून चोरट्याने ७२ हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे . येथील ५४ वर्षीय महिलेने याप्रकरणी कोंढवा पोलिसात तक्रार दिली असून फौजदार सोनावणे 8805337100अधिक तपास करत आहेत

पीएमपी बस प्रवास :हडपसर आणि कात्रज दरम्यान २ चोऱ्या साडेसहा लाखाचे दागिने लंपास

पुणे-पीएमपीएमएल च्या बस प्रवासात होणाऱ्या चोऱ्या ,पाकीटमारी यात लक्षणीय वाढ झाली असून याकडे पीएमपीएमएल चे संचालक आणि महापालिकांचे प्रशासक यांनी असेच दुर्लक्षित कारभार सुरु ठेवला तर यापुढे बसने प्रवास करणे कठीण होत जाणार असल्याचे स्पष्ट आहे. प्रवासी जादा बसगाड्या कमी अशी अवस्था असल्याने गर्दी वाढते आणि चोरांचे फावते अशी अवस्था आहे. प्रवासात कुठलीही सुरक्षितता , विमा नसल्याने प्रवाश्यांची दैना वाढते आहे.

हडपसर ते कोथरूड च्या बस मध्ये प्रवास करत असलेल्या एका ६५ वर्षीय महिलेकडील प्रवासी बॅगेतून चोरट्याने हडपसर ते फातिमा नगर प्रवास दरम्यान तब्बल ३ लाख ६० हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांवर हाथ साफ केला.शनिवार पेठेत राहणाऱ्या या वृद्धेने वानवडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. फौजदार संतोष सोनावणे 8888186999 या चोरट्याचा शोध घेत आहेत .

दुसऱ्या एका घटनेत कात्रज येथील हॉटेल अंबिका समोर पीएमपी च्या बस मध्ये चढत असताना एका ३९ वर्षीय महिलेच्या पर्समधून भामट्याने २ लाख ७२ हजार रुपयांचे दागिने हातोहात लांबविले.वडगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या या महिलेने भारती विद्यापीठ पोलिसात तक्रार दाखल केली असून अंमलदार चीप्पा 9923107178 याप्रकरणी अधिक तपास करत आहेत .

माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म: डॉ. सिद्धार्थ धेंडे

सर्व धर्मीयांसाठी इफ्तार पार्टी

पुणे-संपूर्ण जगात शांतता नांदण्याची गरज आहे. सर्व जाती-धर्मामध्ये भाईचारा निर्माण व्हायला हवा. स्वतःच्या धर्माचा अभिमान असायलाच पाहिजे. मात्र इतर धर्माचा द्वेष करणे योग्य नाही. जगात माणूसकी हाच श्रेष्ठ धर्म आहे, असे प्रतिपादन पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले.

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनच्या महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथील कै. नटराज गंगावणे सभागृहात डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते धेंडे बोलत होते. या वेळी प्रत्येक घरात ईद साजरी व्हावी यासाठी गरजूंना शिरखुर्मा साहित्य किट प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी नगरसेविका फरझाना शेख, आरपीआय (आठवले गट) महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष अयुब शेख, पुणे शहर भाजपा प्रवक्ते मंगेश गोळे, हिंदू संस्कृती मंचाचे दिलीप म्हस्के, शिख समाजाच्या वतीने सरबतजीतसिंग सिंधू, बौध्दाचार्य रमेश गाडगे, यासिन शेख, ख्रिश्चन समाजाच्या वतीने महापुरे, सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव घाडगे, हुसेन शहा बाबा दर्गा ट्रस्टचे रज्जाकभाई, मुश्‍ताकभाई तसेच प्रभागातील हमारी तंजीम व जामा मजीद ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

हा कार्यक्रम यशस्वी करायला सुरैया शेख, सईदा शेख, नझिम शेख, पप्पु मगदुम, फिरोज शेख, नुमान शेख, अनवर देसाई, फिरदोस शेख, विजय कांबळे, गजानन जागडे, वसंत दोंदे, अल्हाबक्ष, भिमराव जाधव , गणेश पारखे व ईतर सर्व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.

डॉ. धेंडे म्हणाले की, जगाला प्रेम अर्पण करण्याची शिकवण सर्व धर्मांमध्ये दिली जात आहे. कोणताही धर्म एकमेकांच्या विरोधात उभा राहण्याची मुभा देत नाही. माणसांनी एकमेकांचा द्वेष करायला सुरूवात केली. माणसांनीच भेदाभेद निर्माण केला. धर्माचा योग्य अभ्यास केल्यास मानवतावादी भावना सर्वांमध्ये वाढेल. पुढे तीच भावना माणसांनी पुढे घेऊन जाणे गरजेचे असल्याचे डॉ. धेंडे म्हणाले.

डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रभागात जोपासला सामाजिक एकोपा : अय्युब शेख –

डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने गेल्या 17 वर्षांपासून प्रभागात ईफ्तार पार्टीचे आयोजन केले जात आहे. प्रभागात सामाजिक एकोपा वृर्द्धींगत व्हावा, सर्व जाती धर्मात शांतता नांदावी, सर्व जाती धर्मात प्रेम भावना वाढावी या उद्देशाने उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये सर्व धर्मियांना एकत्रित करून भाईचारा वाढीसाठी प्रयत्न केले जात आहे. गेल्या वर्षांपासून महिलांसाठी देखील इफ्तार पार्टीचे आयोजन करून नवीन आदर्श डॉ. धेंडे यांनी निर्माण केला आहे, असे प्रतिपादन आरपीआय (आठवले गट) महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अय्युब शेख यांनी केले.

ठाकरे सभा: चौकटीत बोला ,नाहीतर मी तिथे सभेत घुसेल …गुलाबराव पाटलांनी दिली सरळ सरळ ….

उद्या एसपींना पत्र देणार,त्यांनी चौकटीत राहून बोलावे. अन्यथा मी सभेत घुसेल.

जळगाव:उद्धव ठाकरे यांचे जळगाव जिल्ह्यात स्वागत आहे. मात्र त्यांच्या सभेत संजय राऊत यांनी चौकटीत बोलावे नाहीतर जर माझ्यावर बोलले तर मी थेट त्यांच्या सभेत घुसेल, अशी थेट … फार तर इशारा म्हणा तो शिंदे गटाचे शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे व संजय राऊत हे 23 एप्रिलला जळगावात येत आहेत. माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत येत आहेत. पुतळ्याच्या अनावरणानंतर शहरातील एम.एम. महाविद्यालयाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेपूर्वीच वातावरण तापलेले दिसत आहे.

उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्या या जळगाव दौऱ्यापूर्वीच गुलाबराव पाटील संतापले आहेत. गुलाबराव पाटील म्हणाले, माझे मित्र आर. ओ. पाटील यांचे माझ्यावर फार उपकार होते. त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत. आर. ओ. पाटील आणि उद्धव ठाकरे यांचे पहिल्यापासून संबंध होते. त्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे येत आहेत.

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, पुतळ्याचे अनावर करण्यासाठी येत असतील, तर जळगाव जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचे स्वागत आहे. पण, सभेत संजय राऊतांसारखा माणूस माझ्यावर बोलत असेल, तर मी उद्या एसपींना पत्र देणार आहे. त्यांनी चौकटीत राहून बोलावे. अन्यथा मी सभेत घुसेल.

23 एप्रिलला स्व. आर ओ तात्या यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम होत आहे.यानिमित्ताने उद्धव ठाकरे जळगावात येत आहेत. मात्र सत्तांतर आणि शिंदे गटाच्या बंडानंतर जळगावमध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम होत आहे. त्यामुळे शिवसैनिकांचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडलेले पहायला मिळतील.

उद्धव ठाकरे हे 23 एप्रिलला सकाळी 11 वाजता जळगाव विमानतळावर येतील. त्यानंतर ते पाचोरा निर्मल सिड्स विश्रामगृहात आराम करतील. दुपारी 4ः30 वाजता आर. ओ. पाटील प्रयोगशाळेचे उद्घाटन करतील. संध्याकाळी 5ः15 वाजता माजी आमदार आर.ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करतील. त्यानंतर संध्याकाळी 6ः15 वाजता एम.एम. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

उद्योगपती गौतम अदाणी आणि शरद पवारांची सिल्व्हर ओकवर प्रत्यक्ष बंद दाराआड दोन तास चर्चा! तपशील गुलदस्त्यात

मुंबई-अदाणी समुहाचे गौतम अदाणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांचीही शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर भेट झाली आहे. या दोघांमध्ये बंददाराआड दोन तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी पाहता या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे यात काहीही शंका नाही. आज सकाळी १० वाजून १० मिनिटांनी गौतम अदाणी हे आपल्या काळ्या रंगाच्या कारमधून सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी आले. त्यानंतर बंद दाराआड या दोघांमध्ये चर्चा झाली.

या भेटीने पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.हिंडेनबर्ग अहवालावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत गौतम अदाणींवर जोरदार हल्लाबोल केला. या प्रकरणी पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे, अशी मागणी केली. तसेच या आरोपाची जेपीसीद्वारे चौकशी व्हावी, यासाठी विरोध आक्रमक आहेत. मात्र, शरद पवारांनी जेपीसी चौकशीची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर अदाणी-पवारांच्या भेटीला महत्त्व आले आहे.

गौतम अदाणी यांनी २० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असा हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर खळबळ माजली होती. हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण तापलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी हिंडेनबर्ग हे नाव आपण ऐकलं नाही असं म्हटलं होतं. तसंच जेपीसी ऐवजी सर्वोच्च न्यायालयाची समिती या प्रकरणात योग्य असेल असंही म्हटलं होतं. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर गौतम अदाणी आणि शरद पवार यांच्यात झालेली भेट सूचक आहे. शरद पवार आणि गौतम अदाणी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत अदाणी किंवा शरद पवार यांच्याकडून काहीही तपशील समोर आलेला नाही. शरद पवार आणि गौतम अदाणी हे एकमेकांना भेटले तेव्हा त्या ठिकाणी कुणीही इतर उपस्थित नव्हते.

राहुल गांधींचे अपील सुरत जिल्हा कोर्टाने फेटाळले , जज एक शब्द म्हणाले – डिसमिस;आता हायकोर्टात जावे लागणार

सुरत – मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींची 2 वर्षांची शिक्षा झाली होती. या विरोधात राहुल गांधी यांनी अपील दाखल करत अशी शिक्षा मिळणे अन्यायकारक असल्याचे न्यायालयात म्हटले होते. मात्र, या याचिकेवर राहुल गांधी यांना दिलासा मिळालेला नाही. सुरतच्या सत्र न्यायालयाने यात राहुल गांधी यांना दणका देत त्यांचे अपील फेटाळून लावले आहे.आता राहुल यांना हायकोर्टात जावे लागेल.

अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.पी.मोगेरा यांनी राहुल गांधी यांना सुनावणीदरम्यान उपस्थित न राहण्याची सूट दिली होती. राहुल गांधी यांचे वकील आरएस चीमा यांनी कोर्टात युक्तिवाद केला की, या टिप्पणीबाबत मानहानीचा खटला योग्य नाही. तसेच या प्रकरणात जास्तीत जास्त शिक्षेची गरज नव्हती.

चीमा म्हणाले की, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 389 मध्ये अपील प्रलंबित असलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची तरतूद आहे. ते म्हणाले की, सत्ता हा अपवाद आहे, पण न्यायालयाने शिक्षेच्या परिणामांचा विचार करावा. दोषीला अधिक शिक्षा भोगावी लागेल का, याचा विचार न्यायालयाने करायला हवा, असे ते म्हणाले. अशी शिक्षा मिळणे अन्यायकारक असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

याचिकाकर्ते पूर्णेश मोदी यांनी न्यायालयात दाखल केलेल्या त्यांच्या उत्तरात गांधींच्या अपीलला विरोध करताना म्हटले आहे की, काँग्रेसच्या नेत्यांना वारंवार बदनामीकारक विधाने करण्याची सवय आहे. यापूर्वी, 3 एप्रिल रोजी न्यायालयाने राहुल गांधी यांना 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला होता. राहुल गांधी यांनी सुरत कोर्टात मुख्य अपील आणि दोन अर्ज दाखल केले होते.

मोहन जोशी आणि सविता मालपेकर गाजवणार रंगमंच

सुमी आणि आम्ही नाटकातून दिग्गज कलावंतांची जोडी पुन्हा एकत्र

मराठी मनावर गारूड केलेलं ‘गाढवाचं लग्न’ हे वगनाट्य अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या अफलातून अदाकारीनं गाजलं. आपल्या अभिनयातून हुकूमत दाखवत प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करणाऱ्या या दोन ताकदीच्या कलाकारांची जोडी पुन्हा एकदा रसिकांचं मनोरंजन करायला एकत्र आली आहे. आगामी सुमी आणि आम्ही या नाटकातून ही जोडी पुन्हा रंगमंचावर एकत्र आली आहे. चित्रपट, मालिका, नाटक या तिन्ही माध्यमातून आपल्या समर्थ अभिनयाचा ठसा या दोघांनी उमटवला आहे. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षांनी हे दोन मात्तबर कलाकार रंगभूमीवर दिसणार आहेत. राजस प्रोडक्शन्स आणि मायबोली चित्र निर्मित सुमी आणि आम्ही हे नाटक २२ एप्रिलला रंगभूमीवर येणार आहे. नाटकाचे निर्माते राजस संजय गोडसे, शैलेश राजे आहेत. राजन मोहाडीकर यांनी हे नाटक लिहिले असून पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शित केले आहे.

आपल्या भूमिकेविषयी सांगताना मोहन जोशी सांगतात की आनंद धडफळे ही व्यक्तीरेखा मी साकारतोय. सविता आणि पुरुषोत्त्तम यांच्यासोबत काम करायला मिळतंय, विशेष म्हणजे राजन मोहाडीकर या माझ्या मित्राने हे नाटक लिहिल्याने एक उत्तम सकस नाटयकृती असणार हे लक्षात घेऊन मी हे नाटक करायला होकार दिला. जवजवळ १२ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर काम करणाऱ्या सविता मालपेकर सांगतात, माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळया बाजाची भूमिका आणि त्यात पुन्हा पुरुषोत्तम बेर्डे आणि मोहन जोशी या माझ्या आवडत्या मंडळीसोबत काम करण्याची संधी मला मिळाली ती संधी सोडणं मी शक्य नव्हतं. मेधा धडफळे ही माझी व्यक्तीरेखा आहे.

अभिनयातील परिपक्वता, सहजता यांचा सुरेख मिलाफ या दोघांच्या अभिनयातून पाहायला मिळतो. रंगभूमीवर बऱ्याच वर्षांनी काम करण्याचा आनंद व्यक्त करताना एका चांगल्या टीमसोबाबत काम केल्याचं समाधान देणारं हे नाटक प्रेक्षकांना ही अंतर्मुख करेल असा विश्वास हे दोघे व्यक्त करतात.

सुमी आणि आम्ही फॅमिली ड्रामा असलेलं दोन अंकी नाटक आहे. तरुण मुलगी गाठू पाहणारं एक वेगळंच ध्येय आणि त्यावेळचे तिचे आई- वडिलांशी संबंध असं खेळकर कुटुंब या नाटकातून पाहायला मिळेल या नाटकात मोहन जोशी, सविता मालपेकर या दोघांसोबत श्रद्धा पोखरणकर, उदय लागू, राजेश चिटणीस, प्रदीप जोशी, चंद्रशेखर भागवत कलाकार काम करणार आहेत. प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून सूत्रधार सुनील महाजन, संदीप विचारे आहेत.

जपान आणि महाराष्ट्राची मैत्री अबाधित राहण्यासाठी एकत्र काम करू या : डॉ. नीलम गोऱ्हे

आपत्ती व्यवस्थापन, शेती, पायाभूत सुविधा यासारख्या अनेक क्षेत्रात जपानचे सहकार्य मिळण्याचे केले आवाहन

जपान, ता. १९ : ‘आपत्ती व्यवस्थापन हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे या विषयावर अनेक देश काम करीत आहेत. आपत्ती व्यवस्थापन आणि त्यासाठीचे अनुभव नागासाकी आणि हिरोशिमाच्या रूपाने जपानकडे आहेतच. मात्र अनेकदा भूकंपासरख्या नैसर्गिक आपत्तीला देखील सामोरे जावे लागते. त्यासाठी पूर्वतयारी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतामध्येही गेल्या काही वर्षात भूकंप, वादळे, चक्रीवादळ अशा प्रकारच्या आपत्तीना सामोरे जावे लागले आहे. याकरिता आपत्ती व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे ही अतिशय आवश्यक आहे. महाराष्ट्राने याबाबत काम करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. येत्या काळातही जपान आणि महाराष्ट्राची मैत्री अबाधित राहण्यासाठी एकत्र काम करू या’ असे आवाहन आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.

महाराष्ट्र विधान मंडळाच्या शिष्टमंडळासह त्या जपान दौऱ्यावर आहेत. वाकायमा गव्हर्नर किशीहो शुहेई पर्फेक्चेअुल असेंब्ली अध्यक्ष ओझाकी योजी तसेच जपान भारत मैत्री प्रोत्साहन संस्थेचे श्री. निजीमत यांनी संयोजन केले होते.
यावेळी विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आ.गीता जैन, आ.श्वेता महाले, आ.विक्रम काळे, आ.मनीषा कायंदे, आ.रेमश पाटील, आ.ज्ञानराज चौगुले, आ संजय बनसोडे, आ.किरण सरनाईक, आ.चेतन तुपे, आ.बाबासाहेब पाटील, आ.किशोर दराडे, आ.जयंत आसगावकर, आ.संजय जगताप, आ.लहू कानडे, आ.राजहंस सिंह विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यावेळी उपस्थित होते.

सामाजिक विषयांवरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. विशेषत: हिंसाचार आणि गुन्ह्याबाबत बोलताना त्यांनी दोष सिद्धीचे प्रमाण वाढले पाहिजे याकडे लक्ष वेधले. भारतात हे प्रमाण ५० टक्के तर महाराष्ट्रात ५४ टक्के असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, ‘जपानमध्ये हे प्रमाण ९८ ते ९९ टक्के असल्याचे पाहून आम्हाला यातून शिकायला मिळाले आहे. लोकाना न्यायासाठी अतिशय जिकिरीने वाट न पाहता त्वरीत न्याय मिळण्यासाठी ही बाब अतिशय स्तुत्य आहे. या माध्यमातून न्याय संस्थेसाठी आणि लोकांसाठी ही गोष्ट एक सोनेरी पहाटेसारखी आहे. सामाजिक कार्यकर्ते, राज्यकर्ते या नात्याने आम्ही सर्व या गोष्टीसाठी सकारात्मक आहोत. विधान सभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर आणि विधान सभा उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवळ यानीही महाराष्ट्रात प्रगत शेती, शेतमाल प्रक्रिया, पॉलिहाऊसेस उभारण्यासाठी तसेच शेतीविषयक तंत्रज्ञानसाठी पुढाकार घेतलेला आहे. तंत्रज्ञान, उद्योग, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील आहोत. आपण सगळे एकत्र येऊन एकमेकांकडून शिकण्याच्या प्रयत्नात राहू या.’

यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील विधान सभा आणि विधान परिषदेच्या कामकाजाबाबत माहिती दिली.

यावेळी जपान दूतावसाचे सहकार्य मोठ्याप्रमाणात झाले.

आनंदनगरला चार लाखाची घरफोडी तर मार्केट यार्डातील भगवती किराणा दुकान फोडून २ लाखाची रोकड पळविली

पुणे- सिंहगड रोड परिसरातील आनंदनगर याठिकाणी एका सोसायटीत चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस शिरून पाच फ्लॅटचे कडी कोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत एक फ्लॅट कुलूप तोडून घरात प्रवेश करून चोरी करण्यात आली. त्यांनी 4 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नीलिमा अनिल देशपांडे (वय- 65, रा. आनंदनगर ,पुणे )यांनी अज्ञात आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 17 एप्रिल रोजी दुपारी तीन ते 18 एप्रिल संध्याकाळी साडेनऊ या दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या कामानिमित्त कुटुंबासह बाहेरगावी गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात आरोपीने त्यांच्या राहत्या घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला, त्यानंतर बेडरूम मधील कपाटातील लॉक तोडून चोरट्याने 142 ग्रॅम सोन्याचे व 390 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण चार लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

तसेच अज्ञात चोरट्याने कापरे गार्डन येथील चार फ्लॅटचे कडीकोंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचेही निष्पन्न झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्याचप्रमाणे सदर भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून, चोट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. याबाबत सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एम निकम पुढील तपास करत आहेत.

मार्केटयार्ड परिसरातील भगवती ट्रेडर्स या किराणा मालाच्या होलसेल दुकानाचे शटर उचकटून दुकानात दोन अनोळखी आरोपींनी प्रवेश करून कॅश काउंटरचे ड्रॉवर्स तोडून त्यातून दोन लाख रुपयांची रक्कम घोरफोडी करून चोरून नेली आहे. या प्रकरणी संजीव राधेश्याम गोयल (वय- 55, रा. कोंढवा ,पुणे) यांनी आरोपी विरोधात मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये सदर आरोपी कैद झाले असून त्याआधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.

तर दुसऱ्या घटनेत, हनुमान नगर येथील सुर्यतारा हाऊसिंग सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या हेमा दत्तात्रय माने (वय -34 )या बाहेरगावी गेल्या असताना, त्यांच्या बंद फ्लॅटचा कडीकोयडा अज्ञात चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी लाकडी कपाटातील 25 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इतर रक्कम असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला आहे. याबाबत चतुर्श्रुंगी पोलिस पुढील तपास करत आहे.

रिमांड होममधील मुलांच्या २ गटात हाणामारी : ४ मुले भिंतीवरून उड्या मारून फरार

पुणे- सिनेमा स्टाईल ने येरवड्याच्या रिमांड होम मध्ये असलेल्या मुलांच्या २ गटात हाणामारी झाली आणि ४ मुलांनी कुलूप तोडून शिडी मिळवून शिडीवरून भिंतीवर चढून उड्मायारून रिमांड होम ची रखवाली तोडून पळ काढला आहे. हि मुले कोयता टोळीतील असल्याचे सांगण्यात आले आहे. या मुलांनी बालसुधारगृहात झालेल्या भांडणाचा फायदा घेत सुरक्षा भिंतीला शिडी लावून धूम ठोकली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रातील कर्मचारी सुमंत जाधव (वय ३१, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी ) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या गुन्ह्यामुळे कोयता टोळीतील चार मुलांना येरवडा येथील बालसुधार गृहात ठेवण्यात आले होते. या मुलांनी सुधारगृहात झालेल्या भांडणाच्या गोंधळाचा फायदा घेत, लाकडी शिडी सुरक्षा भिंतीला लावून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मुलांनी मंगळवारी 18 एप्रिल रोजी पलायन केले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या बाल निरीक्षण गृह, येरवडा येथे ही घटना घडली आहे.

येरवडा पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार सुमंत जाधव हे येरवड्यातील बालसुधारगृहात काम करतात. मंगळवारी या बालसुधारगृहात मुलांमध्ये आपापसात जोरदार भांडण झाले. भांडणांमध्ये पलायन केलेल्या मुलांनी इतर दोन मुलांना शिवीगाळ केली. तसेच, दगड मारून खिडकीचेही नुकसान केले. त्यामुळे बालसुधारगृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. पसार झालेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील9766764471 तपास करत आहेत.

हवामानशास्त्र विभागाकडील हवामान अंदाजविषयक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे दि. १९: भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात येणारे हवामान अंदाज, पर्जन्यमान अंदाजविषयक सेवांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. हवामानशास्त्र विभागाकडील माहितीचा आरोग्य विभागाला चांगला उपयोग करुन घेता येईल, असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

एल निनो समुद्र प्रवाह आणि हवामान बदलाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणेचे प्रमुख के. एस. होसळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, हवामानशास्त्र विभागाचे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी, डॉ. राजीव चटोपाध्याय यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उन्हाळ्यात होत असलेले हवामानबदल पाहता हवामानशास्त्र विभागाचे हवामान अंदाज, इशारे याकडे सर्वांचे लक्ष असणे महत्त्वाचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, सध्याची परिस्थिती पाहता उष्णतेची लाट, पावसाचे अंदाज, वादळवारा आदींबाबतच्या अंदाजांची माहिती जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत. शेतकरी तसेच सर्वसामान्य व्यक्तीसाठी ही माहिती उपयुक्त असल्याने प्रत्येक गाव, ग्रामपंचायत तसेच गावातील व्हॉट्सॲप ग्रुपपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत.

हवामानशास्त्र विभागाकडील विविध अंदाज, अहवालांचा उपयोग आरोग्य विभागाला हवामानबदलामुळे होणारे साथीचे आजार आदींविरोधात उपाययोजना करण्यासाठी होऊ शकेल. त्याचबरोबर याबाबतची संबंधित विभागांनीही आपली माहिती हवामानशास्त्र विभागाला उपलब्ध करुन दिल्यास संयुक्तपणे चांगले काम होऊ शकेल. पुणे हवामानशास्त्र विभागाच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही डॉ. देशमुख यावेळी म्हणाले.

यावेळी श्री. होसाळीकर यांनी सांगितले, हवामानशास्त्र विभागाकडून विविध अत्याधुनिक प्रारुपांचा उपयोग हवामान तसेच पावसाचा अंदाजासाठी केला जातो. आगामी नैऋत्य मोसमी पावसाचा पहिल्या टप्प्यातील अंदाज हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला असून त्यानुसार सरासरीच्या ९६ टक्के म्हणजेच सामान्य पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसावर प्रभाव टाकणाऱ्या अल निनो प्रवाहाची स्थिती यावर्षी पावसाळ्यात विकसित होण्याची असली तरी सध्यातरी त्याबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही.

फेब्रुवारी आणि मार्च २०२३ मध्ये युरेशियावर सामान्यापेक्षा कमी बर्फाचे आवरण दिसल्यामुळे भारतात नैऋत्य मोसमी पावसासाठी अनुकूल घटक आहे. तसेच तटस्थ हिंद महासागर द्विध्रुव (आयओडी) परिस्थिती विकसित होण्याची शक्यता असून हा घटकही नैऋत्य मोसमी पावसासाठी अनुकूल आहे. मे अखेरीस दुसऱ्या टप्प्यातील पावसाचा अंदाज जाहीर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

पुण्यासाठी लवकरच स्वतंत्र डॉप्लर रडार
स्थानिक हवामान अंदाज अधिक अचूक आणि वेगवानरित्या वर्तविण्याच्यादृष्टीने पुणे शहरासाठी स्वतंत्र डॉप्लर रडार मंजूर केले आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. या रडारमुळे ‘नाऊकास्ट’ नुसार आगामी दोन तीन तासातील अचूक अंदाज वर्तवणे शक्य होणार आहे. पुणे शहरात सध्या पुणे, पाषाण, लोहगाव, चिंचवड, लवळे, मगरपट्टा या सहा ठिकाणी रिअल टाइम तापमान व हवामान स्थितीविषयक माहिती जमा करण्याची व्यवस्था असून ही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही श्री. होसळीकर यावेळी म्हणाले.

यावेळी अनुपम कश्यपी यांनी विभागाकडील हवामान अंदाज, इशारे, त्याचे प्रकार, चिन्हांचे अर्थ आदींबाबत माहिती दिली. पुणे शहर व परिसरासाठी विभागाकडून स्थानिक अंदाज व हवामान सल्ला जाहीर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने पुणे शहरात १६० ठिकाणी इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर हवामानाची माहिती दर्शविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. चटोपाध्याय यांनी उष्णतेची लाट आणि हवामान प्रारुपांचा आरोग्य क्षेत्रासाठी उपयोग याबाबत माहिती दिली. मलेरिया, डेंग्यू सारख्या साथीचा पूर्वानुमानासाठी या प्रारुपांचा उपयोग होऊ शकतो. आरोग्य विभाग आणि हवामानशास्त्र विभागाने समन्वयाने काम केल्यास याविषयी गतीने उपाययोजना करता येतील, असे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी हवामानशास्त्र विभागाचे मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे संकेतस्थळ https://mausam.imd.gov.in/mumbai/, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे https://mausam.imd.gov.in/ तसेच पुणे https://www.imdpune.gov.in/marathi/indexmarathi.php या संकेतस्थळ तसेच विभागाचे ‘मौसम’ ॲप, वीजांबाबत माहिती देणारे ‘दामिनी’ ॲप आदी मोबाईल ॲपचा उपयोग करण्याबाबत माहिती देण्यात आली.

वासंतिक पुष्पोत्सवात सजले दगडूशेठ दत्तमंदिर 

पुणे : मोग-याच्या लाखो फुलांनी सजलेला दत्तमंदिराचा परिसर…सुवासिक फुलांनी साकारलेला महाराजांचा मुकुट… रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आभूषणे… शोभिवंत फुलांची आरास… आणि गुलाब, झेंडू, चाफा, लिलीसारख्या नानाविध फुलांनी सजलेल्या दत्तमंदिरात वासंतिक पुष्पोत्सव उत्साहात साजरा झाला. चैत्र अमावस्येला दत्तमहाराजांकरीता केलेली फुलांची आरास व महाराजांचे फुलांच्या दागिन्यांनी सजलेले मनोहारी रुप पाहण्याकरीता मोठया संख्येने भाविक उपस्थित होते. 
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे संस्थापिका लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई यांसह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
पुष्पोत्सवाबाबत माहिती देताना ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी म्हणाले, सुमारे १०० किलो मोगरा, ५० किलो झेंडू, १०० बंडल गुलाब फुले, १२५ किलो गुलाब  पाकळ्या, ९ हजार चाफयाची फुले,  जाई, जुई  आणि पासलीच्या पानांनी पुष्पोत्सवात सजावट करण्यात आली. सुभाष सरपाले आणि सहका-यांनी ही आरास साकारली. 
श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, श्रीमत् वासुदेवानंद टेंभेस्वामी महाराज, श्रीमाणिकप्रभू महाराज या दत्तमहाराजांच्या चार अवतारांच्या प्रतिमा आणि  कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांची प्रतिमा देखील फुलांनी सजविण्यात आली.