पुणे : मोग-याच्या लाखो फुलांनी सजलेला दत्तमंदिराचा परिसर…सुवासिक फुलांनी साकारलेला महाराजांचा मुकुट… रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आभूषणे… शोभिवंत फुलांची आरास… आणि गुलाब, झेंडू, चाफा, लिलीसारख्या नानाविध फुलांनी सजलेल्या दत्तमंदिरात वासंतिक पुष्पोत्सव उत्साहात साजरा झाला. चैत्र अमावस्येला दत्तमहाराजांकरीता केलेली फुलांची आरास व महाराजांचे फुलांच्या दागिन्यांनी सजलेले मनोहारी रुप पाहण्याकरीता मोठया संख्येने भाविक उपस्थित होते.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे संस्थापिका लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई यांसह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पुष्पोत्सवाबाबत माहिती देताना ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.प्रताप परदेशी म्हणाले, सुमारे १०० किलो मोगरा, ५० किलो झेंडू, १०० बंडल गुलाब फुले, १२५ किलो गुलाब पाकळ्या, ९ हजार चाफयाची फुले, जाई, जुई आणि पासलीच्या पानांनी पुष्पोत्सवात सजावट करण्यात आली. सुभाष सरपाले आणि सहका-यांनी ही आरास साकारली.
श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, श्रीमत् वासुदेवानंद टेंभेस्वामी महाराज, श्रीमाणिकप्रभू महाराज या दत्तमहाराजांच्या चार अवतारांच्या प्रतिमा आणि कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांची प्रतिमा देखील फुलांनी सजविण्यात आली.