व्ही. व्ही. नातू स्मृती अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धा
पुणे : महाराष्ट्राचा रोहन गुरबानी याने पुणे जिल्हा आणि मेट्रोपोलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) वतीने आयोजित व्ही. व्ही. नातू स्मृती वरिष्ठ गटाची अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला.
शिवाजीनगर येथील पीडीएमबीएच्या मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पीवायसी, लक्ष्मी क्रीडा मंदिर आणि सीओईपी इंजिनीअरिंग कॉलेजच्या कोर्टवर या स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने झाले.
पुरुष एकेरीच्या पात्रता फेरीच्या पाचव्या सामन्यात चौथ्या मानांकित रोहनने दिल्लीच्या आकाश यादववर १५-१२, १५-१२ अशी मात केली. यानंतर राजस्थान प्रणय कट्टा याने तेलंगणच्या मनीषकुमारला १४-१६, १५-५, १५-७ असे पराभूत करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
निकाल – पुरुष एकेरी – पाचवी फेरी – तलर ला (आंध्र प्रदेश) वि. वि. हर्षित १५-ठाकूर (चंडिगड) १३-१५, १५-१३, १५-५ , सत्यमूर्ती व्ही. (तमिळनाडू) वि. वि. हिमनिश दास (आसाम) १५-१२, १०-१५, १५-९, श्रीकर राजेश (कर्नाटक) वि. वि. अनिरुद्ध देशपांडे (कर्नाटक) १५-१३, १५-७, आदित्य वर्मा (उत्तर प्रदेश) वि. वि. सुजलसिन्ह बारिया (गुजरात) १५-८, ८-१५, १५-१३, हर्ष चापलोत (राजस्थान) वि. वि. मुरली कृष्णा के. (ओडिशा) १५-१०, १५-७.
महिला एकेरी – दुसरी फेरी – चित्वान खत्री (हरियाणा) वि. वि. रसिका राजे (आरबीआय) १५-६, १५-८, विद्या टी. (पीवाय) वि. वि. अनुष्का भिसे (महाराष्ट्र) १५-९, १२-१५, १५-७, अदिती गावडे (महाराष्ट्र) वि. वि. चिमरण कलिता (आसाम) १५-१२, १५-११, मेघा एस. (केरळ) वि. वि. श्रद्धा हक्के (महाराष्ट्र) १५-४, १५-७, रिया हब्बू (महाराष्ट्र) वि. वि. प्रणाली करणी (तेलंगण) १५-७, १५-७, अस्मिता शेडगे (महाराष्ट्र) वि. वि. शान्वी नेगी (उत्तर प्रदेश) १५-५, १५-१३, सानिका पाटणकर (महाराष्ट्र) वि. वि. सविता आर. एन. (कर्नाटक) १५-८, १४-१६, १५-९, निधी देसाई (गोवा) वि. वि. मनशिका सूद (पंजाब) १५-१२, १५-१२, अनन्या देशपाडे (महाराष्ट्र) वि. वि. श्रीजनी सरकार (तेलंगण) १५-८, १५-८, अनन्या दुरुगकर (महाराष्ट्र) वि. वि. रितिका पलिअथ (केरळ) १५-१०, १७-१५, ऋचा सावंत (महाराष्ट्र) वि. वि. जस्मीत कौर १५-१०, १५-९, नेहा गोस्वामी (महाराष्ट्र) वि. वि. जुही तिवारी (दिल्ली) १५-५, १५-९, पृथ्वा देकटे (महाराष्ट्र) वि. वि. अनन्या गाडगीळ (महाराष्ट्र) १५-१२, १७-१५, अनन्या अगरवाल (महाराष्ट्र) वि. वि. आद्या जैन (मध्य प्रदेश) १५-१२, १३-१५, १५-११
लोकशाही पद्धतीने पक्षाध्यक्ष निवडणारा काँग्रेस देशातील एकमेव पक्ष
मुंबई, दि. १९ ऑक्टोबर २०२२
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय हा लोकशाही पद्धतीने झाला असून देशात काँग्रेस हाच एक पक्ष आहे ज्या पक्षात कार्यकर्त्यांमधून अध्यक्ष निवडला जातो. मल्लिकार्जून खर्गे यांचा दांडगा अनुभव व सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी आहे. त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मजबूत होईल आणि केंद्रातील हुकूमशाही सरकारचा पराभव करेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्माला समान संधी देणारा पक्ष आहे. काँग्रेसमध्ये अध्यक्ष कार्यकर्ते निवडतात इतर पक्षांसारखा अध्यक्ष लादला जात नाही. काँग्रेस पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी आपल्या राजकीय कारकर्दीला सुरुवात करून नगराध्यक्षपद, कामगार नेते, आमदार, खासदार, कर्नाटक विधानसभेचे विरोधी पक्षनेते, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, केंद्र व राज्य सरकारमध्ये विविध खात्यांच्या मंत्रिपदावर आपल्या कामाची वेगळी छाप पाडली आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी केंद्र सरकारला जाब विचारण्याचे काम केले. मल्लिकार्जून खर्गे यांनी महाराष्ट्राचे प्रभारी म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली.
काँग्रेस पक्ष देशातील सर्वात जुना आणि लोकशाही मानणारा पक्ष आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, जगजीवन राम, निलम संजीव रेड्डी, के. कामराज, जगजीवनराम, शंकरदयाल शर्मा, इंदिराजी गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक महत्वाच्या नेत्यांचे नेतृत्व लाभले आहे. मा. सोनियाजी गांधी यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये नेतृत्व करून पक्षाला नवसंजीवनी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. मल्लिकार्जुन खर्गे आता पक्षाचे नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या निवडीने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले असून खर्गे यांच्या नेतृत्वाखाली जात्यांध, धर्मांध, हुकुमशाहीवृत्तीच्या सरकारचा पराभव करू असे पटोले म्हणाले.
सोनियाजी गांधींनी कठिण काळात धुरा सांभाळून पक्षाला मजबूत केले.
मुंबई, दि. १९ ऑक्टोबर– काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा प्रचंड मतांनी विजय झाला असून त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल आणि धर्मांध हुकुमशाही शक्तींना पराभूत करेल, असा विश्वास काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे त्यांचे अभिनंदन करून बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, मल्लिकार्जुन खर्गे यांना ५० वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असून या कारकीर्दीत खर्गे यांनी पक्ष संघटना व सरकारमधील विविध पदांवर काम पाहिले आहे. पक्षाने त्यांना दिलेल्या प्रत्येक जबाबदारीला त्यांनी योग्य न्याय दिला आहे. आपल्याला मिळालेल्या पदाचा त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी वापर केला. खर्गे साहेब महाराष्ट्राचे प्रभारी असताना त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. यावेळी त्यांच्यामधील नेतृत्वगुण आणि संघटनकौशल्य जाणून घेता आले. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी घेईल. काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांनी अत्यंत कठिण काळात पक्षाची धुरा सांभाळून देशातील सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करत लोकशाही विरोधी ताकदींशी लढा दिला. आम्ही समस्त काँग्रेसजन त्यांचे आभारी आहोत. सोनियाजी गांधी आमच्या सर्वांसाठी अखंड ऊर्जेचा प्रेरणा स्त्रोत आहेत. राहुलजी गांधी यांनी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी विभाजनकारी आणि विषमतावादी शक्तींविरोधात भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशव्यापी जन आंदोलन उभारले आहे, ही यात्रा इतिहास घडवणार आहे. सोनियाजी व राहुलजींच्या मार्गदर्शनाखाली आणि खर्गेजींच्या नेतृत्त्वाखाली देशात काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल, असेही थोरात म्हणाले.
मुंबई-प्रत्येक नेत्याला मातोश्रीवर येण्यासाठी भाग पाडणारा बाळासाहेबांचा आदरयुक्त दबदबा उद्धव ठाकरेंनी रसातळाला पोहोचवला आहे. पक्ष, संघटना किंवा कार्यकर्त्यांसाठी कधीही घराबाहेर न पडलेले उद्धव ठाकरे आता राहुल गांधींच्या पदयात्रेसाठी पायघड्या घालण्यासाठी घराबाहेर पडणार हा उद्धव ठाकरे यांच्यावर काळाने उगवलेला सूड आहे, अशी खोचक टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते श्री. केशव उपाध्ये यांनी बुधवारी केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नूतन अध्यक्ष श्री.नरेंद्र पाटील यावेळी उपस्थित होते.
श्री. उपाध्ये म्हणाले की, या आधी भाजपसोबत युती असताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे कधी रस्त्यावर उतरले नाहीत. लालकृष्ण अडवाणी-मुरली मनोहर जोशींच्या रथयात्रांत तर उद्धव ठाकरे फिरकले देखील नाहीत. हात उंचावून जाहीर सभांमध्ये हिंदुत्वाच्या पोकळ गर्जना करणारे उद्धव ठाकरे बाबरी प्रकरणाच्या वेळी शिवसैनिकांना रस्त्यावर उतरवून घरात टीव्ही बघत होते, तर तीन वर्षांपूर्वीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी झाले नव्हते.
‘मुंह मे राम, बगल मे राहुल’ ही म्हण उद्धव ठाकरे यांच्यासाठीच शब्दशः तयार झाली असावी असा टोला हाणून ते म्हणाले, यांना रामाची नाही, तर राहुलची आरती आवडू लागली आहे. राहुल गांधींच्या पदयात्रेस हजर राहुन उद्धव ठाकरे आपल्या काँग्रेसनिष्ठेचा नजराणा सोनिया गांधींना देणार आहेत का, असा सवालही त्यांनी केला.
पुणे, १९ ऑक्टोबर : श्री सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिरातून जागतिक शांतता सर्वदूर पसरेल. येथे येणार्या प्रत्येक भक्ताला शांततेची अनुभूती मिळेल. असे विचार थोर विचारवंत, आध्यात्मिक गुरू परमपूज्य श्री श्रीकृष्ण कर्वे गुरुजी यांनी व्यक्त केले. माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे, भारत आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांनी बद्रीनाथ येथील माणा गाव येथे बांधलेल्या माता श्री सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिराचा कलशारोहण समारंभ मंगळवारी आध्यात्मिक गुरू परमपूज्य श्री कृष्ण कर्वे गुरुजी यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर तेथे महायज्ञ, महापूजा, भजनपूजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, श्रीमती उषा विश्वनाथ कराड, ज्योती कराड ढाकणे, स्वाती कराड चाटे, पूनम नागरगोजे, राजेश कराड, डॉ.एस.एन.पठाण, ह.भ.प.हांडे महाराज, डॉ.मिलिंद पांडे, डॉ.मिलिंद पात्रे, डॉ.महेश थोरवे व मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते. प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती नांदेल” या स्वामी विवेकानंदांच्या वचनावर नितांत श्रध्दा व निष्ठा ठेवून सुदृढ, निकोप व सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी पवित्र तीर्थक्षेत्रांचे खर्या अर्थाने ज्ञानतीर्थ क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडविण्याचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत माता सरस्वतीच्या मंदिराच्या उभारणीमुळे माणा गावाचा आणि परिसराचा विकास तर होणार आहेच, पण या गावाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवात भर पडेल व भारतातच नव्हे तर जगभरात त्याची कीर्ति पसरेल. भारतातील धार्मिक तीर्थक्षेत्रांचा कायापालट करण्याची मोहीम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या अनेक वर्षांपासून राबवत आहेत. पंतप्रधानांची ही संकल्पना पुढे नेत या मंदिराच्या उभारणीचे काम जोमाने पार पडले. त्याअंतर्गत आज कलशारोहण कार्यक्रमाची सांगता झाली. गेल्याचवर्षी या सुंदर श्री सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिराचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री श्री. त्रिवेंद्र सिंह रावत उपस्थित होते. त्यानंतर आठवडाभर येथे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. रेल्वे राज्यमंत्री श्री. रावसाहेब दानवे, बद्रीनाथधामचे अध्यक्ष व पदाधिकारी व सर्व सन्माननीय पंचायत सदस्य व माणा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
· ८ कोटींहून अधिक भारतगॅस ग्राहक सणासुदीच्या योजनांचा लाभ घेऊ शकतात आणि त्यांच्या एलपीजी रिफिलवर १००% पर्यंत कॅशबॅक मिळवू शकतात.
१९ ऑक्टोबर २०२२, गुरुग्राम/मुंबई: एक ‘महारत्न’ आणि फॉर्च्यून ग्लोबल 500 कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने Mobikwik अॅपच्या माध्यमातून एलपीजी सिलिंडर रिफिलिंगसाठी डिजिटल पेमेंट करण्याकरता भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मोबाइल वॉलेट असलेल्या Mobikwik बरोबर भागीदारी केली आहे.
सणासुदीच्या काळात Mobikwik द्वारे एलपीजी सिलिंडरचे बुकिंग केल्याने भारतगॅस ग्राहकांना १००% पर्यंत कॅशबॅक मिळेल. ही योजना ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत वैध आहे.
भारतगॅस आपल्या ग्राहकांना अनेक डिजिटल पेमेंट सुविधा सादर करते आणि Mobikwik सोबत भागीदारी त्यांच्या देशभरातील ग्राहकांना आणखी एक पर्याय देते.
“भारतगॅस ग्राहकांसाठी सणासुदीला जोडून आम्ही Mobikwik सोबत ही देशव्यापी भागीदारी सुरू केली आहे. आम्हाला खात्री आहे की आमच्या अनेक ग्राहकांना या योजनेचा फायदा होईल,” असे बीपीसीएलच्या डिजिटल पेमेंट्सच्या डेप्युटी जनरल मॅनेजर मोना श्रीवास्तव म्हणाल्या.
कॅशबॅकचा लाभ घेण्यासाठी भारतगॅसचे ग्राहक एकतर Mobikwik मोबाइल अॅप्लिकेशनवरून किंवा नियुक्त केलेल्या बुकिंग फोन नंबर 771-801 2345 वर कॉल करून त्यांचे सिलेंडर रिफिल बुक करू शकतात. त्यानंतर बुकिंग झाल्यावर ग्राहकांना Mobikwik मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे पैसे भरण्यासाठी लिंक असलेला एसएमएस मिळेल.
भारत पेट्रोलियम ही दुसरी सर्वात मोठी भारतीय तेल विपणन कंपनी आहे आणि कंपनीकडे देशभरात ८ कोटींहून अधिक एलपीजी ग्राहक आधार आहे.
“सध्या ४०% पेक्षा जास्त भारतगॅस ग्राहक डिजिटल पद्धतीने पैसे देतात. Mobikwik सोबतच्या भागीदारीने आमच्या मोठ्या ग्राहक वर्गासाठी आणखी एक डिजिटल पेमेंट पर्यायाची भर पडली आहे,” असे बीपीसीएलचे एचक्यू, विक्री आणि एलपीजी विपणन धोरण विभागाचे सीजीएम निखिल सिंग म्हणाले.
” Mobikwik मधील आमचे ध्येय भारतात कशा प्रकारे पैसे दिले जातात, बचत केली जाते आणि गुंतवणूक केली जाते याचे डिजिटायझेशन करणे हे आहे. आणि बीपीसीएलचे देशभरातली स्थान, पोहोच आणि आवाका तसेच वरचेवर होणारी गॅस खरेदी याचे स्वरूप बघता बीपीसीएल कडून भारतगॅस सोबतचा हा करार आमच्या प्रवासातील एक मोठा टप्पा आहे. आशा आहे की या छोट्याशा प्रयत्नाने भारत गॅसच्या सर्व ग्राहकांसाठी हे सणासुदीचे दिवस अधिक गोड बनतील,” असे Mobikwik चे ग्राहक पेमेंट्सचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदन जोशी म्हणाले.
कंपनी आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मोबाइल वॉलेट आहे. भारतीयांसाठी डिजिटल पेमेंट सोयीस्कर करण्यासाठी कंपनीने मोबाईल वॉलेट म्हणून काम सुरू केले. त्यांच्या सेवांमध्ये बिल पेमेंट, ई-कॉमर्स शॉपिंग, फूड डिलिव्हरी, पेट्रोल पंप, मोठ्या रिटेल चेन्स, फार्मसी, किराणा स्टोअर्स इत्यादींचा समावेश होतो. हा प्लॅटफॉर्म युनिफाइड पेमेंट इंटरफेस (“UPI”) द्वारे पीअर-टू-पीअर पेमेंट देखील सक्षम करते. फिनटेक कंपनीने नुकताच पेमेंटपासून ते डिजिटल क्रेडिट आणि गुंतवणुकीपर्यंत ग्राहक आणि व्यापार्यांसाठी आर्थिक उत्पादनांचा संच यांचा विस्तार केला.
पुणे दि.१९- उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत चाकण औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत कोर्टयार्ड मेरियेट येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक आणि विद्युत समस्या सोडविण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीला आमदार महेश लांडगे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी फारोग मुकादम, मुख्य अभियंता नितीन वानखेडे, प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर, संजय देशमुख, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उद्योगमंत्री सामंत म्हणाले, चाकण औद्योगिक क्षेत्रात विद्युत चार उपकेंद्र स्थापन करण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. महावितरणकडून अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. पाणी पुरवठा आवश्यक प्रमाणात करण्याबाबत पाणी पुरवठा मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. स्थानिक उद्योजकांची भूखंडाची मागणी अधिकाऱ्यांनी घ्यावी, त्यांनाही प्राधान्याच्या उद्योगांसोबत भूखंड देण्याबाबत विचार करण्यात येईल.
लघु आणि सूक्ष्म उद्योजकांना आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. शासनाची सुविधा घेऊन भूखंडाचा वापर उद्योगांसाठी न करणाऱ्या उद्योगांबाबत माहिती घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून कामगारांसाठी रुग्णालय उभारण्याबाबत विचार झाल्यास शासनातर्फे आवश्यक सुविधांसाठी सहकार्य करण्यात येईल. उद्योग सुरू करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी मंजुरी प्रक्रियेत अधिक सुलभता आणण्याचा प्रयत्न आहे, त्याचा फायदा उद्योजकांना होईल.
रस्त्याच्या स्थितीबाबत अधिकाऱ्यांनी एकत्रित माहिती द्यावी. या संदर्भात आवश्यक सुधारणा त्वरित करण्यात येतील. औद्योगिक क्षेत्रातील पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम त्वरित करण्यात यावे, अशा सूचना उद्योगमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
चाकण औद्योगिक क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता येथील समस्या सोडविण्यासाठी, शासनाच्या इतर संबंधित विभागांशी आणि उद्योग संघटनांशी समन्वय साधण्यासाठी नियमित समन्वय बैठका घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येतील. औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमणाबाबत सर्व्हेक्षण करण्यास सांगितले आहे, सर्व्हेक्षणानंतर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. असेही श्री. सामंत म्हणाले.
हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान (आयटी) पार्कमध्ये जागा उपलब्ध नसल्याने तळेगाव औद्योगिक परिसरातही आयटी उद्योगांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू असल्याचे श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.
वाहतूक नियंत्रणासाठी अधिक पोलिसांची गरज-भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी
पुणे, दि. 19 – शहरात कोसळून पडलेली वाहतूक समस्या आणि पाण्याने वाहणारे रस्ते याबाबत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने आजवर अनधिकृत बांधकामांनी शहराचा करून ठेवलेला बट्ट्याबोळ, आणि वर्षभरात प्रशासक म्हणून अपयशी ठरलेले महापालिका आयुक्त विक्रम कुमार कारणीभूत असल्याचा आरोप आज पुन्हा एकदा भाजाप्चे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांची अतिरिक्त कुमक तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिल्याची माहिती भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. मुळीक यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजपच्या शिष्टमंडळाने आज पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उद्देशाने चर्चा केली. सरचिटणीस दत्ता खाडे, संदीप लोणकर, प्रसिद्धी प्रमुख हेमंत लेले, पुष्कर तुळजापुरकर, अरविंद गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुळीक म्हणाले, “शहरातील सर्व चौकांचे स्वतंत्र संस्थेमार्फत सर्वेक्षण करावे. ज्या चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होते, त्याची कारणे शोधावीत आणि त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली होती. त्याला आयुक्तांनी तत्वतः मान्यता दिली. तसेच प्रत्येक चौकात गरजेनुसार एक-दोन अशा 400 वॉर्डनच्या नियुक्त्या लवकरच करण्यात येणार आहेत.” शहरातील वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत वाहतूक पोलिस विभाग, पुणे महापालिका, मेट्रो, सार्वजनिक रस्ते विभाग, राज्य परिवहन मंडळ, पुणे महानगर परिवहन महामंडळ, स्मार्ट सिटी अशा सर्व महत्त्वाच्या विभागांची एकत्रित उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी एक-दोन दिवसांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.
पुणे दि.१९- उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत तळेगाव येथील जलप्रक्रिया केंद्र कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या टप्पा क्रमांक १ साठी येत्या १५ दिवसात वाहन तळाची (ट्रक टर्मिनल) सुविधा करण्यात यावी, असे निर्देश श्री. सामंत यांनी यावेळी दिले.
बैठकीला एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी फारोग मुकादम, मुख्य अभियंता नितीन वानखेडे, प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर, संजय देशमुख, उद्योजक आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उद्योगमंत्री सामंत म्हणाले, तळेगाव औद्योगिक क्षेत्रात सुविधा भूखंडाची व्यवस्था करण्यात यावी. उद्योजकांच्या समस्या दूर करण्यासोबत नवीन उद्योजक आकर्षित होतील अशा सुविधा विकसित कराव्या. पुण्यात चांगल्या शैक्षणिक संस्था आणि गुणवत्ता असल्याने नव्या जागेचा विकास करताना विद्यार्थ्यांकडून संकल्पना आणि सूचना मागविण्यात याव्या. तज्ज्ञांच्या मदतीने उद्योजकस्नेही असणारा परिसर विकास करावा अशा सूचना त्यांनी दिल्या.
उद्योगमंत्री सामंत यांनी तळेगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांशी संवाद साधला. उद्योजकांना चांगल्या सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यांनी केलेल्या चांगल्या सूचनांवर त्वरित कार्यवाही करण्यात येईल. रस्ता रुंदीकरणाबाबतही विचार करण्यात येईल. उद्योजकांच्या नोंदणीकृत संघटनेच्या कार्यालयासाठी भूखंड देण्यात येईल. उद्योग आणण्यासाठी त्यांना उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.सामंत यांनी बैठकीपूर्वी तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या टप्पा क्रमांक २ साठी जागेची पाहणी केली. जागेसाठी संमतीपत्र दिलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर प्रथम रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, भूखंडाचा विकास करताना उद्योगाच्या गरजा लक्षात घ्याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.
श्री.सामंत यांनी जेसीबी उद्योगाला भेट देऊन माहिती घेतली. राज्यात उद्योगविस्तार करण्यासाठी शासन सहकार्य करेल असे त्यांनी सांगितले
पंतप्रधानांनी गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर परिषद आणि प्रदर्शन केंद्रात संरक्षण प्रदर्शन 22 (DefExpo22) चे केले उद्घाटन
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर परिषद आणि प्रदर्शन केंद्रात संरक्षण प्रदर्शन 22 (DefExpo22) चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी भारताच्या दालनात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने डिझाइन केलेल्या स्वदेशी ट्रेनर(प्रशिक्षण देणारे ) विमान एचटीटी-40 चे अनावरण केले. पंतप्रधानांनी कार्यक्रमादरम्यान, मिशन डेफस्पेसचा शुभारंभ केला आणि गुजरातमधील डीसा हवाईक्षेत्राची पायाभरणी केली.
मेळाव्याला संबोधित करताना,पंतप्रधान आणि गुजरातचे सुपुत्र या नात्याने, पंतप्रधानांनी, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या या कार्यक्रमामध्ये प्रतिनिधींचे स्वागत केले.
अमृत कालात नवीन भारताच्या संकल्पांचे आणि त्याच्या क्षमतांचे चित्र यात साकारले जात आहे असा डेफएक्सपो22 चा उल्लेख पंतप्रधानांनी केला. देशाच्या विकासाचे तसेच राज्यांच्या सहकार्याचे हे एकत्रीकरण आहे. “यात तरुणांचे सामर्थ्य आणि स्वप्ने आहेत, यात तरुणांचा संकल्प आणि क्षमता आहेत. यात जगाच्या आशा आहेत आणि मैत्री असलेल्या राष्ट्रांसाठी संधी आहेत.” असे पंतप्रधान म्हणाले.
फक्त भारतीय कंपन्याचाच सहभाग आणि केवळ मेड इन इंडिया उपकरणे असलेले हे पहिलेच संरक्षण प्रदर्शन आहे असे यंदाच्या संरक्षण प्रदर्शनाचे वेगळेपण अधोरेखित करताना पंतप्रधानांनी सांगितले ”. “लोहपुरुष सरदार पटेल यांच्या भूमीतून आम्ही भारताच्या सक्षमतेचे उदाहरण जगासमोर ठेवत आहोत असे ते म्हणाले. प्रदर्शनात 1300 हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले आहेत. यात भारत संरक्षण उद्योग, भारतीय संरक्षण उद्योगाशी संबंधित काही संयुक्त उपक्रम, एमएसएमई आणि 100 हून अधिक स्टार्टअपचा समावेश आहे. हे प्रदर्शन एकाच नजरेत भारताची क्षमता आणि त्यात दडलेल्या संधींची झलक देते. यानिमित्ताने पहिल्यांदाच 400 हून अधिक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
विविध देशांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाची दखल घेत, भारत आपल्या स्वप्नांना आकार देत असताना आफ्रिकेतील 53 मित्र देश आपल्यासोबत वाटचाल करत आहेत याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.
यानिमित्ताने दुसरा भारत-आफ्रिका संरक्षण संवादही होणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. “भारत आणि आफ्रिका यांच्यातील हे नाते काळाच्या कसोटीवर तावूनसुलाखून निघालेल्या विश्वासावर आधारित आहे. ते काळाच्या ओघात अधिक दृढ होत आहे आणि नवीन आयामांना स्पर्श करत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. आफ्रिका आणि गुजरातमधील जुन्या संबंधांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी आफ्रिकेतील पहिल्या रेल्वे मार्गाच्या उभारणीत कच्छमधील लोकांचा सहभाग असल्याच्या आठवणीला उजाळा दिला. आफ्रिकेतील दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्या अनेक शब्दांचे मूळ आफ्रिकेतील गुजराती समुदायात आहे. “महात्मा गांधींसारख्या जागतिक नेत्यासाठीही, जर गुजरात त्यांची जन्मभूमी असेल, तर आफ्रिका ही त्यांची पहिली ‘कर्मभूमी’ होती. आफ्रिकेबद्दलची ही आत्मीयता अजूनही भारताच्या परराष्ट्र धोरणात केंद्रस्थानी आहे. कोरोनाच्या काळात, जेव्हा संपूर्ण जग लसीबाबत चिंताक्रांत होते, तेव्हा भारताने आफ्रिकेतील आपल्या मित्र देशांना प्राधान्य देत लस वितरित केली,” असे ते म्हणाले.
दुसरी हिंद महासागर क्षेत्र+ (आयओआर+) परिषद देखील प्रदर्शनादरम्यान आयोजित केली जाईल. पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या अनुषंगाने प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकासासाठी (सागर-Security and Growth for All in the Region -SAGAR) शांतता, वाढ, स्थिरता आणि समृद्धीकरता आयओआर+ राष्ट्रांमधील संरक्षण सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापक संवादासाठी ती एक मंच प्रदान करेल. “आज आंतरराष्ट्रीय सुरक्षेपासून ते जागतिक व्यापारापर्यंत सागरी सुरक्षा ही जागतिक प्राथमिकता म्हणून उदयास आली आहे असे पंतप्रधान म्हणाले. जागतिकीकरणाच्या युगात व्यापारी नौदलाची (मर्चंट नेव्हीची) भूमिकाही विस्तारली आहे.” “भारताकडून जगाच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि मी जागतिक समुदायाला खात्री देतो की भारत त्या पूर्ण करेल. त्यामुळे हे संरक्षण प्रदर्शन भारताप्रती असलेल्या जागतिक विश्वासाचेही प्रतीक आहे असे ते म्हणाले.
विकास आणि औद्योगिक क्षमतांबाबत गुजरातची ओळख असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “हा डिफेन्स एक्स्पो या ओळखीला एक नवी उंची देत आहे”. आगामी काळात गुजरात संरक्षण उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल, असेही ते पुढे म्हणाले.
गुजरातमधील डीसा हवाई क्षेत्राची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. आघाडीवरील हवाईदल तळ देशाच्या सुरक्षा रचनेत भर घालेल. डीसा सरहद्दीच्या जवळ आहे हे लक्षात घेता आता भारत पश्चिम सीमेवरील कोणत्याही आगळीकीला प्रत्युत्तर देण्यासाठी अधिक सज्ज आहे असे पंतप्रधान म्हणाले. “सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही डीसा येथे कार्यान्वयन तळ उभारण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या सैन्यदलांची ही अपेक्षा आज पूर्ण होत आहे. हा प्रदेश आता देशाच्या सुरक्षेचे एक प्रभावी केंद्र बनेल,” असे मोदी म्हणाले.
“अवकाश तंत्रज्ञान हे भविष्यात कोणत्याही मजबूत राष्ट्रासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असेल. तिन्ही सैन्यदलांनी अवकाश तंत्रज्ञानातील विविध आव्हानांचे पुनरावलोकन करत त्यांची नोंद घेतली. त्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्याला वेगाने काम करावे लागेल असे ते म्हणाले.” “मिशन डिफेन्स स्पेस”, “नवोन्मेषाला प्रोत्साहन आणि आपल्या सैन्याला बळकट करण्यासोबतच नवीन आणि नाविन्यपूर्ण उपाय देखील प्रदान करेल.” अवकाश तंत्रज्ञान भारताच्या उदार अवकाश मुत्सद्देगिरीच्या नवीन संकल्पनांना आकार देत आहे आणि नवीन शक्यतांना जन्म देत आहे यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. “अनेक आफ्रिकी देश आणि इतर अनेक लहान देशांना याचा फायदा होत आहे”,असेही ते पुढे म्हणाले. साठपेक्षा अधिक विकसनशील देशांबरोबर भारत आपले अवकाश विज्ञान सामायिक करत आहे. दक्षिण आशिया उपग्रह हे याचे प्रभावी उदाहरण आहे. पुढील वर्षापर्यंत, दहा आसियान देशांनाही भारताचा उपग्रह डेटा वास्तव वेळेत उपलब्ध होईल. अगदी युरोप आणि अमेरिकेसारखे विकसित देशही आपला उपग्रह डेटा वापरत आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
संरक्षण क्षेत्रात, इच्छाशक्ती, नवोन्मेष आणि अंमलबजावणी या त्रिसूत्रीच्या मंत्रासह नवभारताची आगेकूच सुरू आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आठ वर्षांपूर्वीच्या काळापर्यंत जगातला सगळ्यात मोठा संरक्षण विषयक आयातदार देश म्हणून भारताची ओळख होती. मात्र नवभारताने , इच्छाशक्ती, दाखवली, दृढनिश्चय केला आणि आता मेक इन इंडिया हा भारताच्या संरक्षण क्षेत्रातला एक यशस्वी अध्याय होत चालला आहे. “आपली संरक्षण निर्यात गेल्या पाच वर्षात आठ पटीने वाढली आहे. आपण जगभरातल्या 75 हून जास्त देशांना आता संरक्षण सामग्री आणि उपकरणे निर्यात करत आहोत. भारताची संरक्षण निर्यात 2021-22 या वर्षात एक अब्ज 59 कोटी अमेरिकी डॉलर्सपर्यंत म्हणजेच 13 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे आणि येणाऱ्या काळात, पाच अब्ज डॉलर्स म्हणजेच चाळीस हजार कोटी रुपयांची संरक्षण निर्यात करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे,” असेही त्यांनी पुढे सांगितले.
भारताच्या लष्कराने भारतीय तंत्रज्ञानाच्या मदतीने आपली क्षमता आणि लढाईतले कौशल्य सिद्ध केले असल्यामुळे जग आता भारतीय तंत्रज्ञानावर विश्वास ठेवत आहे. आय एन एस विक्रांत सारख्या, अत्याधुनिक अशा लढाऊ विमान वाहून नेणाऱ्या अत्याधुनिक युद्धनौकेचा, भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात समावेश केला आहे.अभियांत्रिकीचा हा महाकाय आणि अतिशय विराट असा सर्वोत्कृष्ट नमुना, कोचीन शिपयार्ड लिमिटेडने, स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून घडवला आहे. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत बनवलेल्या प्रचंड या कमी वजनाच्या लढाऊ हेलिकॉप्टरचा समावेश भारतीय हवाई दलाने आपल्या ताफ्यात केलेला समावेश, हे सुद्धा भारताच्या संरक्षण विषयक क्षमतेचे एक ठळक उदाहरण आहे, असे ते म्हणाले.
भारताचे संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर म्हणजे स्वावलंबी बनवण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की भारतीय लष्करानेसुद्धा भारतामध्येच तयार झालेले लष्करी साहित्य खरेदी करण्याचे ठरवले असून, अशा उपकरणांच्या दोन याद्या तयार केल्या आहेत. अशा 101 वस्तूंची यादी आज आम्ही प्रसिद्ध करत आहोत. असे निर्णय सुद्धा आत्मनिर्भर भारताचे सामर्थ्य दाखवून देत असतात. या यादीनंतर पुढे,संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या लष्करी साहित्याची आणखी 411 उपकरणं, मेक इन इंडिया उपक्रमा अंतर्गतच तयार करण्यात येतील, निश्चित केलेल्या या 411 उपकरणांची बाहेरून आयात केली जाणार नाही.’ एवढ्या मोठ्या आर्थिक उलाढालीमुळे भारतीय संरक्षण उद्योगाचा पाया भक्कम होईल आणि त्यामुळे भारतीय संरक्षण साहित्य उत्पादक कंपन्या कर्तृत्वाची नवी शिखरे गाठतील, अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे देशातल्या युवा वर्गाला जास्तीत जास्त फायदा होईल असे ते पुढे म्हणाले.
संरक्षणविषयक सामग्री पुरवठ्याच्या क्षेत्रात काही कंपन्यांनी निर्माण केलेली मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आता नवनवे विश्वासार्ह पर्याय पुढे येत आहेत ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. “या संरक्षण उद्योग क्षेत्रात काही करू इच्छिणाऱ्या भारताच्या युवावर्गाने या क्षेत्रातली ही मक्तेदारी मोडून काढण्याचे सामर्थ्य दाखवले आहे आणि आपल्या युवा वर्गाचे हे प्रयत्न संपूर्ण जगालाही ललामभूत ठरणार आहेत,” असे मोदी म्हणाले. संसाधनांच्या अभावी संरक्षणात मागे पडलेल्या छोट्या देशांनाही यातून मोठा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
“भारत संरक्षण क्षेत्राकडे अगणित संधींकडे झेपावता येईल असे असीमित आकाश म्हणून बघत असून, यातून चांगल्या संधी वास्तवात कशा उतरवता येतील याचा विचार करत आहे”, असेही पंतप्रधान म्हणाले.
भारतातल्या संरक्षण क्षेत्रात उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या संधींबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली की भारत, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये दोन संरक्षणविषयक उद्योग पट्टे म्हणजेच कॉरिडॉर उभारत असून जगभरातल्या मोठमोठ्या कंपन्या इथे गुंतवणूक करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. या क्षेत्रामध्ये भारतीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांची उपयुक्तता स्पष्ट करुन ते पुढे म्हणाले की जगभरातल्या मोठ्या कंपन्यांना आपले सूक्ष्म लघु मध्यम उद्योग क्षेत्र, या गुंतवणुकीशी निगडीत पुरवठा साखळीचे मोठे जाळे निर्माण करून, पाठबळ पुरवेल. या क्षेत्रातल्या अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणातल्या गुंतवणुकीमुळे आपल्या देशातल्या युवा वर्गासाठी खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल, ज्याचा याआधी कधी विचारच झाला नव्हता, असे पंतप्रधानांनी पुढे सांगितले.
या संरक्षण प्रदर्शनात उपस्थित असलेल्या सर्व कंपन्यांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी त्यांना कळकळीची विनंती केली की त्यांनी भविष्यातल्या भारताला केंद्रस्थानी ठेवून या क्षेत्रातल्या सर्व संधींची निर्मिती करावी. “तुम्ही नवनव्या नवोन्मेषी कल्पना राबवा, जगात सर्वोत्तम ठरण्याची प्रतिज्ञा करा आणि समर्थ विकसित भारताचे स्वप्न साकारा. तुमच्या या सर्व प्रयत्नांमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सहकार्य करण्यासाठी मी नक्की पाठीशी उभा असेन,” असे सांगत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
याप्रसंगी अन्य मान्यवरांसह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी, नौदल प्रमुख अॅडमिरल आर.हरी कुमार आणि संरक्षण विभागाचे सचिव डॉ.अजय कुमार हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिफेन्स एक्सपो 2022 चे उद्घाटन केले. पाथ टू प्राइड ही या कार्यक्रमाची संकल्पना असून आजवरच्या डिफेन्स एक्स्पो कार्यक्रमांच्या तुलनेत या कार्यक्रमाला सर्वात मोठा प्रतिसाद लाभला आहे. प्रथमच, या कार्यक्रमात, फक्त भारतीय कंपन्यांसाठी संरक्षण प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, ज्यात परदेशी OEM(original equipment manufacturers, म्हणजेच उपकरणांच्या मूळ उत्पादक कंपन्या) च्या भारतीय उपकंपन्या, भारतात नोंदणीकृत कंपन्यांचा विभाग, भारतीय कंपन्यांसोबत संयुक्त उपक्रम राबवणारे प्रदर्शक यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम भारतीय संरक्षण उत्पादनांच्या कौशल्याची विस्तृत व्याप्ती आणि सामर्थ्य दाखवेल. प्रदर्शनामध्ये संपूर्ण भारतासाठीचे एकत्रित असे एक दालन आणि दहा, राज्य दालने असतील. भारत दालनात, पंतप्रधानांनी HTT-40 या, हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड (HAL) ने विकसित केलेल्या प्रशिक्षण देणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या विमानाचे अनावरण केले. या विमानात जगातल्या विद्यमान परिस्थितीत वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक प्रणाली आहेत आणि या विमानाची रचना पूर्णपणे वैमानिक स्नेही आहे.
कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी मिशन डिफेन्स स्पेसचे देखील उद्घाटन केले. हे मिशन, उद्योग आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून अंतराळ क्षेत्रात संरक्षण दलांकरता नाविन्यपूर्ण उपक्रम विकसित करण्यासाठी आहे. गुजरातमधील डीसा (Deesa) हवाईतळाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. या आधुनिक हवाई तळामुळे देशाच्या संरक्षण विषयक सुविधांमध्ये भर पडेल.
‘भारत-आफ्रिका: संरक्षण आणि सुरक्षाविषयक सहकार्याच्या समन्वयासाठी रणनीती स्वीकारणे’ या संकल्पने अंतर्गत या एक्स्पोमध्ये, दुसऱ्या भारत-आफ्रिका संरक्षण संवादसत्राचे आयोजन होत आहे्. हिंद महासागर क्षेत्र आणि जवळचे इतर देश (IOR+) परिषद देखील प्रदर्शनादरम्यान आयोजित केली जाईल. ही परिषद, पंतप्रधानांच्या संकल्पाच्या अनुषंगाने , शांतता, विकास, स्थैर्य आणि समृद्धीसाठी IOR+ राष्ट्रांमधील संरक्षण सहकार्याला प्रोत्साहन देण्याकरता व्यापक संवादासाठी एक मंच प्रदान करेल. या क्षेत्रातील (SAGAR ) सर्वांची सुरक्षा आणि वाढीच्या दृष्टीने , या प्रदर्शनादरम्यान, प्रथमच गुंतवणूकदारांची बैठक होणार आहे. मंथन 2022, iDEX (डिफेन्स एक्सलन्ससाठी इनोव्हेशन्स अर्थात संरक्षण क्षेत्रातल्या सर्वोत्कृष्टतेसाठी नवीन) च्या कार्यक्रमात, शंभरहून अधिक स्टार्टअप्सना त्यांच्या नवकल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. ‘बंधन’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून 451 भागीदारी उपक्रम आणि उद्घाटनही, या कार्यक्रमात होतील.
नवी दिल्ली- काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी शशी थरूर यांचा जवळपास 7 हजार मतांनी पराभव केला. अधिकृत माहितीनुसार, खरगे यांना 7 हजार 897 मते मिळाली. त्याचवेळी शशी थरूर यांना केवळ 1 हजार 72 मते मिळवता आली. 416 मते नाकारण्यात आली. मात्र, मतमोजणी सुरू असतानाच राहुल गांधी यांनी पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार हे सांगितले होते. भारत जोडो यात्रेदरम्यान आंध्रमधील पत्रकार परिषदेत राहुल म्हणाले होते– आता माझी भूमिकाही खरगेजीच ठरवतील.
काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांनी निकालातील कल पाहून खरगेंचा विजय निश्चित असल्याचे जाहीर केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी ट्वीट करून खरगेंचे अभिनंदनही केले. ट्वीटमध्ये ते म्हणाले- INCचे अध्यक्ष होणे हा सर्वात मोठा सन्मान आणि मोठी जबाबदारी आहे. खरगेजी ह्या कार्यात सर्वस्वी यशस्वी व्हावेत अशी माझी इच्छा आहे. एक हजाराहून अधिक सहकार्यांचा पाठिंबा मिळणे आणि काँग्रेसच्या अनेक हितचिंतकांच्या आशा आणि आकांक्षा भारतभर घेऊन जाणे, हा बहुमान होता.”
मित्रों, @INCIndia का अध्यक्ष बनना बहुत सम्मान और जिम्मेदारी की बात है। इस कार्य में @Kharge जी की सफलता की कामना करता हूं। 1072 सहयोगियों का समर्थन प्राप्त करना एवं भारत भर में कांग्रेस के इतने शुभचिंतकों की आशाओं व आकांक्षाओं को आगे बढ़ाना मेरे लिए सौभाग्य की बात थी। 🙏 pic.twitter.com/JDCTwbvAdS
यापूर्वी, अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असलेले शशी थरूर यांचे मुख्य पोलिंग एजंट सलमान सोज यांनी मतदानादरम्यान गडबड झाल्याची तक्रार केल्यावर राहुल गांधींचे हे वक्तव्य आले आहे. मात्र, पत्रकार परिषदेत राहुल यांनी निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेतल्याबद्दल काँग्रेसचा अभिमान व्यक्त केला आहे. येथे काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी दावा केला की, खरगे यांना 9500 मतांपैकी 7897 मते मिळाली. त्याचवेळी थरूर यांना केवळ 1072 मते मिळवता आली. खरगे 90% पेक्षा जास्त मतांनी विजयी होत असल्याचेही त्यांनी सकाळीच सांगितले होते.
राहुल म्हणाले – काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जिथे निवडणुका होतात
भारत जोडो यात्रेत आंध्र प्रदेशात पोहोचलेले राहुल गांधी म्हणाले, “काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे ज्यात निवडणुका होतात आणि त्याचा स्वतःचा निवडणूक आयोग आहे. काँग्रेस निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांच्यासोबत मी काम केले. तो अतिशय बोलका वक्ता आहे. सर्व बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या असून ते कारवाई करणार आहेत. प्रत्येकजण काँग्रेसच्या निवडणुकीबद्दल विचारतो. मला काँग्रेसचा अभिमान आहे, ज्यात खुल्या आणि पारदर्शक निवडणुका होत आहेत. इतर पक्षांतर्गत निवडणुकांमध्ये कोणीही रस का घेत नाही, मग तो भाजप असो वा अन्य प्रादेशिक पक्ष?’
– पहिल्या श्रेणीतील शहरांत सोन्याच्या मागणीत २८ टक्के वाढ, तर दुसऱ्या श्रेणीतील शहरांत ३७ टक्के वाढ
– पहिल्या श्रेणीतील शहरांमध्ये प्रेशियस मेटलमध्ये ३४ टक्के आणि दुसऱ्या श्रेणीतील शहरांत ४४ टक्के वाढ
– दिल्लीत चांदीच्या नाण्यांची लोकप्रियता कायम, एकूण मागणीत दिल्लीचा ५० टक्के भाग
– चांदीच्या सजावटीच्या वस्तूंच्या सर्चेसमध्ये बेंगळुरू आघाडीवर, त्यापाठोपाठ मुंबई आणि दिल्लीचा क्रमांक
मुंबई, १९ ऑक्टोबर – धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवरसोन्या- चांदीच्या (प्रेशियस मेटल) मागणीत ४० टक्के (वार्षिक पातळीवर) वाढ झाली असून सणासुदीच्या निमित्ताने एकंदर मागणीत सोन्याचा वाटा ७० टक्के असल्याचे जस्टडायल ग्राहक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दुसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये प्रेशियस मेटलला असलेली मागणी वाढली असून पहिल्या व दुसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये असलेल्या मागणीत ४४ टक्के वाढ झाली आहे. पहिल्या श्रेणीतील शहरांत सोन्या- चांदीच्या सर्चेसमध्ये ३४ टक्के वाढ झाली आहे. किंमती स्थिर होत असतानाच सोन्याला सर्वाधिक मागणी असून त्यात ३४ टक्के (वार्षिक) वाढ, चांदीमध्ये १४० टक्के, प्लॅटिनममध्ये ८२ टक्के वाढ झाली आहे, तर हिऱ्यांना असलेली मागणी स्थिर आहे.
गेल्या वर्षी धनत्रयोदशीमध्ये सोन्याच्या मागणीत चांदीच्या तुलनेत तीन पटींची वाढ झाली होती, तर यंदा ही मागणी चार पटींवर पोहोचली आहे. मागणीत वाढ झाल्यामुळे देशभरातील रिटेलर्समध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
ग्राहकांमधील ट्रेंडविषयी जस्टडायलचे सीएमओ श्री. प्रसून कुमार म्हणाले, ‘किमती कमी झाल्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. पहिल्या श्रेणीतील शहरांत असलेल्या मागणीत २८ टक्के, तर दुसऱ्या श्रेणीतील शहरांतून येणाऱ्या मागणीत ३७ टक्के वाढ झाली आहे. दुसऱ्या श्रेणीतील शहरांतील सोन्याच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली असून त्यामागे वाढलेली क्रयशक्ती आणि महत्त्वाकांक्षा ही कारणे आहेत. चांदीचीया मागणीतही वाढ झाली असून देशभरात २.४ पटींची वाढ दिसून येत आहे. या मागणीमुळे रिटेलर्ससाठी ही दिवाळी उत्साहवर्धक ठरेल असा आमचा अंदाज आहे.’
सोन्याच्या दागिन्यांना असलेल्या मागणीवर पहिल्या श्रेणीतील शहरांपैकी मुंबई, हैद्राबाद, दिल्ली आणि बेंगळुरू यांचे वर्चस्व आहे. सोन्याच्या नाण्यांना असलेल्या मागणीत दिल्ली ४१ टक्के सर्चेससह आघाडीवर आहे आणि मुंबईत सोन्याच्या बार्सना ३४ टक्के मागणी आहे.
सोन्याच्या दागिन्यांना असलेल्या मागणीवर दुसऱ्या श्रेणीतील शहरांपैकी कोईम्बतूर आघाडीवर असून त्यानंतर चंदीगढ व लखनौचा क्रमांक लागतो. सोन्याच्या बार्सच्या बाबतीत जयपूर आघाडीवर असून त्यानंतर कोईम्बतूर व लखनौ आहे. सोन्याच्या नाण्यांना असलेल्या मागणीत दुसऱ्या श्रेणीतील शहरांपैकी जयपूर आघाडीवर असून त्यानंतर कोईम्बतूर आणि लखनौ अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे.
चांदीच्या बाबतीत दागिन्यांना जास्त मागणी असून मागणीत त्यांचा २७ टक्के वाटा आहे. पहिल्या श्रेणीतील शहरांपैकी हैद्राबादमध्ये चांदीच्या दागिन्यांना जास्त मागणी आहे, तर बेंगळुरू व दिल्लीचा त्यानंतर क्रमांक लागतो. दिल्लीमध्ये चांदीची नाणी लोकप्रिय असून एकूण मागणीत त्यांचा ५० टक्के वाटा आहे. चांदीच्या सजावटीच्या वस्तूंच्या सर्चेसमध्ये बेंगळुरू आघाडीवर, त्यापाठोपाठ मुंबई आणि दिल्ली आहे.
दुसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये चांदीच्या दागिन्यांची मागणी ३८ टक्क्यांनी, सोन्याच्या नाण्यांची मागणी ४६ टक्क्यांनी आणि डिनर आयटम्सची मागणी ४१ टक्क्यांनी वाढली आहे. विजयवाडा, विशाखापट्टणम आणि राजकोटमध्ये चांदीच्या दागिन्यांना सर्वाधिक मागणी असून त्यांच्या लोकप्रियतेमध्ये वार्षिक पातळीवर ५९ टक्के वाढ झाली आहे. विजयवाडा आणि विशाखापट्टणम चांदीच्या डिनर सेट्समध्ये आघाडीवर आहे, तर लखनौ, उदयपूर व जयपूरमध्ये चांदीच्या नाण्यांना जास्त मागणी आहे.
पहिल्या श्रेणीतील शहरांपैकी मुंबई, दिल्ली आणि हैद्राबादमध्ये हिऱ्याच्या दागिन्यांना सर्वाधिक मागणी असून जयपूर, कोईम्बतूर व इंदौर दुसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये आघाडीवर आहे. प्लॅटिनम दागिन्यांच्या बाबतीत पहिल्या श्रेणीतील शहरांपैकी मुंबई, हैद्राबाद आणि बेंगळुरू आघाडीवर आहे, तर सुरत, कोईम्बतूर, जयपूर दुसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये आघाडीवर आहे.
अनोख्या पद्धतीत वऱ्हाडी वाजंत्रीचे मुंबईतील सिटीलाईट चित्रपटगृहात ‘म्युझिक व ट्रेलर लाँच‘!
खरं तर दिवाळी झाल्यावर तुळशीच्या लग्नापासून संपूर्ण महाराष्ट्रभर विवाह सोहळ्यांची धूम सुरू होते, पण यंदा दिवाळीपूर्वीच ‘वऱ्हाडी वाजंत्री’चा गाजावाजा होऊ लागला आहे. अभिनेते-दिग्दर्शक विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. उत्सुकता वाढवणाऱ्या या चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेणारी आहेत. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता मकरंद अनासपुरेसंगे चित्रपटातील इतर कलाकारांनी धरलेल्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’च्या ठेक्यावर महाराष्ट्रातील तमाम सिनेप्रेमींचे पाय थिरकणार आहेत. या चित्रपटाच्या म्युझिक लाँचसाठी अनोखी शक्कल लढवत संगीतकार अविनाश – विश्वजित, शशांक पोवार आणि लोकशाहीरी कला जोपासणारे, बाजीराव मस्तानी, तानाजी द अनसंग वारीअर अश्या अनेक चित्रपटांत पार्श्वगायन करणारे आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख आणि वऱ्हाडी वाजंत्री हे टायटल सॉंग गायलेले हरहुन्नरी कलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. ‘वऱ्हाडी वाजंत्री’ हे शीर्षक गीत वाद्य सुरावटीद्वारे प्रत्यक्ष सादर करीत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. या अनोख्या सोहळ्यात सर्व गायक, संगीतकार आणि कलाकारांनी सहभाग घेत शोभा वाढविली. संगीत प्रदर्शनानंतर या चित्रपटाचा खुमासदार ट्रेलर आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे, पंढरीनाथ कांबळी, विजय कदम, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, पूर्णिमा अहिरे, राजेश चिटणीस, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, निर्माते कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर, सहनिर्माते अतुल राजारामशेठ, दिग्दर्शक विजय पाटकर यांच्या उपस्थितीत प्रदर्शित होताच सभागृहात हास्याचे कारंजे फुलू लागले होते.
११ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांनी स्वराज फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली केली आहे. वैभव अर्जुन परब यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा व संवादलेखन केलं असून, दिग्दर्शन विजय पाटकर यांनी केलं आहे. ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटात तीन सुमधूर गाणी असून, अविनाश-विश्वजीत व शशांक पोवार या संगीतकार त्रयींनी ती संगीतबद्ध केली आहेत. ‘वऱ्हाडी वाजंत्री’ हे टायटल साँग शशांक पोवार यांनी संगीतबद्ध केलं असून, गीतकार राजेश बामुगडे हे तिन्ही गीतांचे गीतकार आहेत. लोकप्रिय गायक आदर्श शिंदे, नंदू भेंडे, आनंदी जोशी, मैथिली पानसे–जोशी, गणेश चंदनशिवे यांनी ती गायली आहेत.
‘छू मंतर छू’ या गाण्यात मोहन जाशी आणि रिमा यांनी रेट्रो लुक कोरिओग्राफर उमेश जाधव यांच्या तालावर ताल धरला आहे. अभिनेत्री हेमांगी कवी आणि पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळी यांनी ‘दोन जीवांची होईना भेट’ या गाण्यात अफलातून गंमत आणली आहे. राजेश बिडवे यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. ‘वऱ्हाडी वाजंत्री’ ह्या जबरदस्त ठेका असलेल्या टायटल सॉंगमध्ये सर्वच कलाकार दिसत असल्याने तालासुरात हे गीत पाहताना कलरफुल दिसते. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, मोहन जोशी, रीमा, पंढरीनाथ कांबळी, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, प्रशांत तपस्वी, राजेश चिटणीस, जयवंत भालेकर, विनीत बोंडे, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. निर्माते कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांना सहनिर्माते म्हणून अतुल राजारामशेठ ओहळ यांनी साथ दिली आहे.
या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद लेखन वैभव अर्जुन परब यांनी लिहिले आहेत तर छायाचित्रण शैलेश अवस्थी यांचे असून संकलक स्व. सलोनी कुलकर्णी, हेमंत गायकवाड आहेत. कला दिग्दर्शक गिरीश कोळपकर असून वेशभूषा गीता गोडबोले, पोर्णिमा ओक यांनी केली आहे तर कार्यकारी निर्माता इंदुराव कोडले पाटील आहेत. सह दिग्दर्शक मनोज सहदेव माळकर असून विज्युअल प्रमोशन संकलक दिनेश मेंगडे आहेत. साऊंड डिजाईनर शेखर भगत तर पार्श्वसंगीत रवींद्र खरात यांचे आहे. रंगभूषा अजित पवार तर जाहिरात संकल्पना मिलिंद मटकर यांची आहे. प्रसिद्धी जनसंपर्क प्रमुख राम कोंडू कोंडीलकर असून डिजिटल मार्केटिंग व ब्रँडिंग तुषार रोठे पाहत आहेत. ध्वनीमुद्रण सुरेश कचवे यांनी तर पुनॆ: ध्वनिमुद्रक केविन गाला आहेत. स्थिरचित्रण राम वासनिक यांनी तर जाहिरात स्थिरचित्रण प्रथमेश रांगोळे यांनी केले आहे. पोस्ट प्रोडक्शन स्टुडीओ डीजीटोन येथे करण्यात आले असून चित्रपट वितरक – जयेश मिस्त्री यांची युजेएम नेटवर्क्स एन एन्टरटेनमेंट एलएलपी संस्था करीत आहे.
पाण्याचा निचरा झाल्यामुळे एनआयबीएम परिसरातील पाचपैकी चार सोसायट्यांचा वीजपुरवठासुरु
पुणे, दि. १९ ऑक्टोबर २०२२: रास्तापेठ विभाग अंतर्गत एनआयबीएम परिसरातील पाचपैकी चार सोसायट्यांचा वीजपुरवठा बेसमेंट व मीटर बॉक्सजवळील पावसाच्या पाण्याचा निचरा झाल्यानंतर मंगळवारी (दि. १८) मध्यरात्रीच्या सुमारास पूर्ववत करण्यात आला. साईदर्शन, अर्चना कॅसल, ब्रम्हा मॅजेस्टिक व मनीष प्लाझा अशी वीजपुरवठा सुरु झालेल्या सोसायट्यांची नावे आहेत. या सोसायट्यांमध्ये सुमारे १५५ वीजग्राहक आहेत.
दरम्यान बुधवारी (दि. १९) दुपारी तीन वाजेपर्यंत द लॅटीट्यूड या ९५ वीजग्राहकांच्या सोसायटीमधील पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. मीटर बॉक्स व संच अद्यापही पाण्यात असल्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. पाण्याचा निचरा, चिखल व ब्लोअरने ओल काढल्यानंतर या सोसायटीचा वीजपुरवठा सुरु करण्यात येणार आहे.
पुणे -गेल्या पाच वर्षांमध्ये न झालेल्या नालेसफाईमुळे झालेल्या या सर्व परिस्थितीबद्दल जबाबदारी स्वीकारून जबाबदारपणे चूक मान्य करण्याऐवजी पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीवर बोट दाखवणाऱ्या भारतीय जनता पार्टीला येत्या निवडणुकांमध्ये नागरिक आरसा नक्की दाखवतील, परंतु कुठल्याही कामाचे श्रेय घेण्यासाठी जशी रस्सीखेच करता तशी जर चूक झाल्यानंतर चूक कबूल केली असती तर कदाचित पुणेकरांनी तुम्हाला माफ केले असते. परंतु यावेळी देखील पुणे भाजपमधील राजकारण्यांनी ती परिपक्वता दाखवली नाही.आज पुणे शहर पाण्याखाली असण्याला गत पाच वर्षातील पुणे महानगरपालिकेची न झालेली नालेसफाई जबाबदार आहे व तसेच या न झालेल्या नालेसफाईच्या पोटी एक हजार कोटींची बिले लाटनारे सत्ताधारी पक्षातील नगरसेवक व त्यांनी पाळलेले ठेकेदार देखील तितकेच जबाबदार आहेत , असा थेट आरोप राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे, ,’ एक कारभारी कोल्हापूरचा तर दुसरा नागपूरचा अशी पुण्याची गत झाली असून या दोघांच्या कार्यक्षमतेवर नागरिक बोट उचलतील या अगोदर त्यांनी पुणे शहरातील गत पाच वर्षातील नालेसफाई च्या कामांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी व नालेसफाई घोटाळा झाला नसल्याचे सिद्ध करून दाखवावे , असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिले आहे.
ते म्हणाले,’ गेल्या काही दिवसात पुणे शहरात झालेल्या प्रत्येक पावसात पुणे शहरातील रस्त्यांवर पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सोमवारी झालेल्या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांमध्ये गुडघ्या एवढे पाणी साचले होते. व्यापारी आस्थापनांमध्ये पाणी घुसले होते, कित्येक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसले तर दुचाकी देखील वाहून गेल्यात.
प्रशासनाच्या गैरवस्थापनाचा व नालेसफाईमध्ये हलगर्जीपणा केल्याचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसला.या अगोदर पुण्यनगरीने अनेक मोठे- मोठे पावसाळे पाहिले आहेत परंतु त्या काळात दरवर्षी उन्हाळ्यात होणारी नालेसफाई यामुळे हा सर्व पाऊस सामावून घेण्याची या पुण्यनगरीची क्षमता होती. परंतु अलीकडच्या काळातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने नालेसफाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याची किंमत सर्वसामान्य पुणेकरांना मोजावी लागली आहे असा आरोप जगताप यांनी केला आहे.
जगताप म्हणाले, खरे तर पुणे शहरातून उद्भवलेली ही परिस्थिती गेल्या पाच वर्षात नालेसफाई न करता परस्पर बिले लाटल्याने निर्माण झाली आहे.इतिहासात कधीही पुण्यात पाणी जमा झाले नव्हते परंतु या पाच वर्षात आंबील ओढ्याला आलेला पूर, कात्रज तलाव ओव्हर फ्लो होऊन आलेला पूर, यावर्षी तर पुणे शहराच्या मध्यवर्तीतील प्रत्येक रस्त्यावर आलेला पूर ही पाच वर्षांमध्ये झालेल्या अक्ष्यम चुकांची परिणीती आहे. पुणे शहरातील कुठलाही नाला आज साफ झालेला नाही त्यामुळे चोक-अप होणारे हे सर्व पाणी पुण्याचा रस्त्यांवर आले आहे.पुणेकर व्यावसायिकांचा दुकानांमध्ये, पुणे शहरातील नागरिकांच्या घरांमध्ये हे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.