Home Blog Page 1541

शालेय पोषण आहाराचे टेंडर भ्रष्ट ठेकेदारांच्या घशात घालण्यासाठी महापालिका प्रशासनाचा खटाटोप

पुणे-शालेय पोषण आहाराचे टेंडर महिला बचत गटांच्या हातून हिसकावून कायमस्वरूपी ठेकेदारांच्या घशात घालण्यासाठी महापालिका प्रशासनाचा खटाटोप सुरु असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.आज आम आदमी पक्ष आणि महिला बचत गटाच्या काही संघटनांनी पत्रकार भवन येथे एकत्रित पत्रकार परिषद घेऊन या अन्यायाला वाचा फोडली. या पत्रकार परिषदेला आम आदमी पक्षाचे डॉ अभिजीत मोरे, घनश्याम मारणे, सुजित अग्रवाल, किशोर मुजुमदार, कुमार धोंगडे, अमोल मोरे, शेखर ढगे तसेच जयश्रीताई ढोबळे (अध्यक्षा, सावित्री बचतगट महासंघ), अल्ताफ तांबोळी ( हेल्पलाईन संस्था), रजनी वाघमारे (अध्यक्ष, तक्षशिला व्यवसाय गट), सुचिता नानगुडे (सचिव, ऋचा महिला बचत गट), जयश्री लोहोकरे (खजिनदार, साविती बचतगट महासंघ), संगिता डाके (तक्षशिला बचत गट) हे उपस्थित होते.

यावेळी यांनी सांगितले कि, पुणे शहरातील शेकडो बचतगटांनी हे टेंडर भरण्याकरिता खूप खर्च केलेला आहे व जागेचे भरमसाठ भाडे भरत आहेत. निविदा प्रक्रिया प्रचंड रखडली असल्याने गरीब बचतगटांना खूप मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. जुन्या ठेकेदाराना नियमबाह्य पुन्हा संधी देण्याचे षडयंत्र आहे.जुन्याच ठेकेदाराना जास्तीचे काम मिळण्याकरिता पुणे शहरातील ज्यांनी अर्ज भरले आहेत अशा बचतगटांना अपात्र करण्याचा प्रयत्न सुरु आहे. खरे तर पोषण आहारामध्ये बचत गटांना प्रोत्साहन देण्याचे शासकीय धोरण असून देखील बचत गटांना या प्रक्रियेतून हद्दपार करण्याचे षडयंत्र पुणे महानगरपालिकेमध्ये शिजत आहे. तरी मनपाने टेंडर भरलेल्या अर्जदार बचत गटांना पूर्ण संधी द्यावी व जास्तीची माहिती प्राप्त करून घ्यावी. माहिती अपूर्ण आहे या कारणास्तव कोणालाही अपात्र करू नये, पूर्ण माहिती देण्यासाठी पुरेसा अवधी प्राप्त करून दिला जावा असे शासन निर्णय आहेत. त्या अनुषंगाने पुणे शहरातील महिला बचतगटांना पुरेशी संधी देण्यात यावी. त्यांना पत्र पाठवून पूरक माहिती मागवून घ्यावी अशी मागणी आम आदमी पार्टी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करीत आहे. तसेच दि.१३.७.२०२२ रोजीचे शुद्धीपत्रक सुद्धा बदलण्याचा प्रयत्न सुरु आहे तो तातडीने थांबवण्यात यावा. दि.१३.७.२०२२ रोजीचे शुद्धीपत्रकाप्रमाणे सर्व बचतगटांना कामे देण्यात यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

जुन 2022 मध्ये पुणे मनपा शिक्षण विभागाच्या शालेय पोषण आहार योजने अंतर्गत, केंद्रीय स्वयंपाकगृह निवडीकरीता टेंडर मागविलेले होते. याबाबत सर्व बचतगटांना कामे मिळण्याच्या दृष्टीने दि.१३.७.२०२२ रोजी शुद्धपत्रक काढून प्रत्येक युनिटसाठी २५०० विद्यार्थी संख्या ठरविण्यात आली. एका किचनसाठी १००० स्क्वे. फु. जागा व सन २०१८-१९ व २०१९-२० ची सरासरी वार्षिक आर्थिक उलाढाल २५ लक्ष एवढी निश्चित करणेत आली. या नंतर पुणे शहरातील अनेक बचतगटांनी 25 जुलै 2022 रोजी टेंडर भरलेले आहेत. अनेक महिने उलटून गेले तरी आजपर्यंत ही टेंडर प्रक्रिया मुद्दाम लांबवलेली असून मनपाचे काही अधिकारी जुन्या ठेकेदाराना फायदा कसा होईल याबाबत प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी दि.१३.७.२०२२ रोजीचे शुद्धीपत्रक सुद्धा बदलण्याचा प्रयत्न सुरु आहे. याकरिता जुन्या ठेकेदाराना कोर्टात पाठवून जाणीवपूर्वक प्रक्रिया विलंब करण्याचा प्रयत्न केला गेला. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने त्या याचिका फेटाळल्या आहेत व प्रक्रिया वेळेत उरकण्याच्या सूचना केल्या होत्या. 29 सप्टेंबर 2022 रोजी राज्य प्राथमिक शिक्षण संचालक यांनी पत्र पाठवून याबाबतची निविदा प्रक्रिया तातडीने उरकण्याबाबत आदेश दिले होते. परंतु पुणे मनपातील या योजनेतील काही अधिकारी जाणीवपूर्वक गेल्या अनेक दिवसांपासून या प्रक्रियेस विलंब लावत आहेत.असा आरोप यावेळी करण्यात आला.

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल प्रसिद्ध

पुणे, दि ८:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी), पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) तसेच शासकीय, आदिवासी, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल आपल्या लॉगिनमधून तसेच पालकांना त्यांच्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर बघता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घेण्यासाठी तसेच विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी किंवा ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये १७ नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. गुण पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता ५० रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरावी लागेल. यासाठी केवळ ऑनलाईन अर्जच करावे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सहायक आयुक्त स्मिता गौड यांनी दिली आहे.

महाराष्ट्र आणि देश यापलिकडे जाऊन कार्य करणाऱ्या नाट्यसंस्थांसाठी स्पर्धेची दोन स्वतंत्र ऑनलाइन केंद्र होणार

मुंबई, दि 8 :- महाराष्ट्राबाहेरील आणि देशाबाहेरील नाट्यसंस्थांना  हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होता यावे, यासाठी  दोन स्वतंत्र ऑनलाइन केंद्रे सुरू करण्यात येतील,अशी  घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 59 व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या गोवा येथे रविवारी आयोजित पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.  ज्येष्ठ नाट्य कलाकार विजय गोखले, सांस्कृतिक विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे मंचावर उपस्थित होते.

            सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी पारितोषिक प्राप्त रंगकर्मींचे अभिनंदन करून, नाट्य क्षेत्रासाठी काही महत्वपूर्ण घोषणा केल्या.  राज्यात यापूर्वी  दोन नाट्यविषयक प्रशिक्षणे आयोजित केली जात होती, त्यांची संख्या आता 12 करण्यात येत असल्याची घोषणा मंत्री  मुनगंटीवार यांनी केली. बालनाट्य स्पर्धेची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी धोरण निश्चित करणे, राज्य नाट्यस्पर्धेतील पारितोषिक रक्कम वाढविणे, परीक्षकांचे मानधन वाढविणे यांचाही प्राधान्याने विचार करणार असल्याचे श्री मुनगंटीवार म्हणाले.

            समाज आणि देशाला दिशा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या महामानवांवर महानाट्ये करण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.  दुर्मीळ नाटकांच्या संहिता जपणे व त्या नाटकांचे रंगमंचावर चित्रीकरण करून त्यांचे जतन करण्याबाबतही निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिली. यंदाच्या वर्षापासून राज्यातील स्थानिक बोलीभाषेतील एकांकिका स्पर्धा व महोत्सव सुरू करण्याचा मानसही श्री.मुनगंटीवार यांनी जाहीर केला.

            सांस्कृतिक विभागाचे वार्षिक कार्यक्रम वेळापत्रक तयार करण्यात येत असल्याने कलावंत आणि त्यांच्या संस्था यांना योग्य वार्षिक नियोजन करता येईल व त्यातून दर्जेदार निर्मिती प्रेक्षकापर्यन्त पोहोचेल असे ते म्हणाले.

हॅप्पीनेस इंडेक्स ही सांस्कृतिक विभागाची जबाबदारी

            सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणाले की, “इकॉनॉमिक ग्रोथ” तर हवीच, सोबत “हॅप्पीनेस इंडेक्स ” वाढावा यासाठी सांस्कृतिक विभागाची जबाबदारी महत्वाची आहे. धनाने भौतिक साधन-सुविधा मिळविता येतील, मनाच्या समाधानासाठी, त्याचं मूल्यांकन करण्यासाठी सांस्कृतिक संपन्नता आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ही मराठी भाषिक राज्ये यामध्ये मागे राहणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोव्यातील नाट्य चळवळीचे आणि रसिकांचेही श्री मुनगंटीवार यांनी भरभरून कौतुक यावेळी केले.

सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्र सर्वोच्च स्थानी जाईल

            राज्यातील हौशी रंगभूमी, कलावंत तसेच व्यावसायिक मंच या सर्वाना योग्य संधी उपलब्ध व्हावी; नाटय़गृहे प्रशस्त व अद्ययावत व्हावीत, त्या माध्यमातून महाराष्ट्र सांस्कृतिक क्षेत्रात क्रमांक एकचे राज्य होईल असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्त केला.

फडणवीसांनीही टोचले सत्तारांसह मोठ्या नेत्यांचे कान:म्हणाले-दोन्ही बाजूंनी आचार संहिता पाळली पाहिजे, मोठ्या नेत्यांनी आवर घालावा

मुंबई-कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल केलेले वक्तव्य चुकीचे आहे.त्याच बरोबर खोके ..असे म्हणणे देखील चुकीचे आहे महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खूप खाली चालली आहे, असे म्हणत अखेर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तारांचे तर कान टोचले पण त्याच बरोबर पवारांचे वा अन्य विरोधी नेत्यांचे नाव न घेता मोठ्या नेते आपापल्या कार्यकर्त्यांना आवर घालण्याचे काम सुरु केले पाहिजे दोन्ही बाजूनी आचारसंहिता पाळली गेली पाहिजे असे म्हटले आहे. मात्र, अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेणार की नाही, यावर बोलणे फडणवीसांनी टाळले आहे.

फडणवीस यांना चित्रपटासंदर्भात विचारलं असता त्यांनी, “मी चित्रपट पाहिला नाही. त्यात काय वाद आहे मला माहिती नाही. कुणाला त्याबद्दल आक्षेप असतील तर ते सनदशील मार्गाने मांडावेत. मात्र मल्टीप्लेक्समध्ये शिरुन तिथल्या लोकांना मारहाण करणं, त्यांच्याशी दादागिरी करणं हे सहन केलं जाणार नाही,” असं फडणवीस म्हणाले आहेत.

फडणवीस यांना हर हर महादेव चित्रपटासंदर्भात विचारलं असता त्यांनी, “मी चित्रपट पाहिला नाही. त्यात काय वाद आहे मला माहिती नाही. कुणाला त्याबद्दल आक्षेप असतील तर ते सनदशील मार्गाने मांडावेत. मात्र मल्टीप्लेक्समध्ये शिरुन तिथल्या लोकांना मारहाण करणं, त्यांच्याशी दादागिरी करणं हे सहन केलं जाणार नाही,” असं फडणवीस म्हणाले आहेत.

राजकारणात आचारसंहिता हवी

देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नये. सत्तारांनी केलेले वक्तव्य अतिशय चुकीचे आहे. आम्ही या वक्तव्याचा विरोधच करु. राजकारणात आचारसंहिता पाळायलाच हवी. ही आचारसंहिता ज्याप्रमाणे आम्हाला लागू आहे, त्याप्रमामे ही आचारसंहिता विरोधकांनाही लागू आहे.

मोठ्या नेत्यांनी आवर घालावा

फडणवीस म्हणाले, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचे समर्थन कुणीही करणार नाही. मात्र, विरोधकही ज्याप्रमाणे खोके-बोके अशी टीका करतात, तीदेखील चुकीची आहे. दोन्ही बाजुंनी आचारसंहिता पाळणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी येवढ्या खाली जाऊ नये, असे मला वाटते. तसेच, त्या-त्या पक्षातील मोठे नेते आपल्या नेत्यांना याबद्दल काही सांगत नाही, तोपर्यंत हे शक्य नाही, असेही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोन करत अब्दुल सत्तार यांना सुनावले. त्यानंतर जाहीर सभेत सत्तारांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

राजीनाम्यावर फडणवीसांचे मौन

राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, अशी शिवराळ भाषा वापरणाऱ्या व्यक्तीला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान द्यायचे की नाही, याचा विचार राज्यपालांनी करावा. फडणवीसांनीदेखील त्यांना हे वक्तव्य मान्य आहे की नाही? हे स्पष्ट करावे. अखेर यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सत्तारांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

रोजगार मेळाव्यांच्या आयोजनासाठी आता भरीव आर्थिक तरतूद- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. ८: राज्यातील उद्योग, कारखाने, खाजगी आस्थापना, कॉर्पोरेट संस्था यामधील रोजगार भरतीसाठी कौशल्य विकास विभागामार्फत वेळोवेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. या मेळाव्यांच्या आयोजनासाठी आता भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली असून विभागीय तसेच जिल्हास्तरावरील प्रत्येक मेळाव्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

राज्यात ठिकठिकाणी रोजगार मेळाव्यांचे प्रभावीपणे आयोजन करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विभागाने पुढाकार घेतला आहे. महास्वयम वेबपोर्टल मार्फतही बेरोजगार उमेदवारांना कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. आतापर्यंत विभागीय स्तरावरील रोजगार मेळाव्यासाठी १ लाख रुपये तर जिल्हास्तरावरील रोजगार मेळाव्यासाठी 40 ते 60 हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा होती. आता ही मर्यादा विभागीय आणि जिल्हास्तरावरील कोणत्याही मेळाव्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे रोजगार मेळावे प्रभावीपणे आयोजित करणे सुलभ होणार आहे. रोजगार मेळाव्याची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी यासाठी १ लाख रुपये इतकी रक्कम मेळाव्याच्या प्रचार व प्रसिद्धीवर खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्यातील बेरोजगारांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने विविध उद्योग, आस्थापना यांच्याकडून रिक्त पदे अधिसूचित करून घेऊन हे मेळावे आयोजित करण्यात येतात. त्याचबरोबर अप्रेंटीशीप संबंधित रिक्त पदेही मेळाव्यात उपलब्ध करून घेण्यात येतात. स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता कर्ज उपलब्ध करून देणारी विविध शासकीय महामंडळे, राष्ट्रीयकृत तसेच खाजगी बँका, वित्तीय संस्था यांना तसेच कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार राबविणारे इतर शासकीय विभाग यांना मेळाव्यात आमंत्रित करणे, उमेदवारांना माहिती देण्यासाठी स्टॉल्स लावणे, उमेदवारांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्यविषयक प्रशिक्षणाची माहिती देणे, बायोडाटा तयार करणेबाबत माहिती देणे, भविष्यात उपलब्ध होणाऱ्या रोजगार संधी, मुलाखतीची तयारी इत्यादीबाबत मार्गदर्शन किंवा समुपदेशन करणे यासाठी राज्यातील रोजगार मेळाव्यांचे अधिक प्रभावीपणे आयोजन करणे आवश्यक आहे. यासाठी होणारा खर्च लक्षात घेता मेळाव्यांच्या आयोजनासाठी खर्च मर्यादेत भरीव वाढ करण्यात आली आहे. याद्वारे राज्यात रोजगार मेळाव्यांचे प्रभावीपणे आयोजन करून जास्तीत जास्त बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात येईल, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी 3 कोटी 61 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून आतापर्यंत 1 कोटी 51 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत, अशी माहितीही मंत्री श्री. लोढा यांनी दिली

महात्मा फुले साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अॅड शिवाजी कोलते

ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांची माहिती

सासवड, दि. ८ खानवडी (ता.पुरंदर) येथे रविवार दि २७ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या १५ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी अॅड शिवाजी कोलते यांची निवड करण्यात आले आहे, ,अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

सासवड येथील नामांकित वकील व बांधकाम व्यावसायिक अॅड श्री शिवाजी कोलते हे पिसर्वे गावचे रहिवासी असून सासवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत, यापुर्वी त्यांनी आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन, छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद भूषविले आहे, राजकीय व सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो,
महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी दि. २७ नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी मराठी साहित्य संशोधन परिषद व अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते ़

सकाळी ११ वा. संमेलनाचे उदघाटन होणार असून, दुपारी २ वा. समाजसुधारक महात्मा फुले या विषयावर परिसंवाद होणार आहे, मी सावित्री बाई बोलतेय, नाट्य प्रयोग, कथाकथन, कविसंमेलन व पुरस्कार वितरण असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत ़ं

संमेलनाचे संयोजन करण्यासाठी आयोजित बैठकीला राजाभाऊ जगताप,सुनील धिवार, दत्तानाना भोंगळे, गंगाराम जाधव, शामराव मेमाणे, सुनील लोणकर, नंदकुमार दिवसे, दत्ता कड रवींद्र फुले, दत्ता होले , रमेश बोरावके, विजय तुपे, प्रा सुरेश वाळेकर, दिपक पवार, संजय सोनवणे, अमोल भोसले आदी उपस्थित होते,

मुंबई मराठी पत्रकार संघाची `राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा’लाखमोलाचे पुरस्कार’

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघ आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 22 वी राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. राज्यभरात सर्वात मोठ्या बक्षीस रकमेच्या या दिवाळी अंक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाला प्रथम पारितोषिक रु. 1,00,000/- (रुपये एक लाख) व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रु. 50,000/- (रुपये पन्नास हजार), तृतीय पारितोषिक रु. 30,000/- (रुपये तीस हजार) अशी भरघोस रकमेची पारितोषिके देण्यात येतील. तसेच उत्कृष्ट दिवाळी अंकास रु. 5,000/- (रुपये पाच हजार), उत्कृष्ट कथा रु. 7,000/- (रुपये सात हजार), उत्कृष्ट कविता रु. 5,000/- (रुपये पाच हजार) आणि उत्कृष्ट व्यंगचित्र रु. 5,000/- (रुपये पाच हजार), उत्कृष्ट मुखपृष्ठ रु. 5,000/- (रुपये पाच हजार), सर्वोत्कृष्ट बाल दिवाळी अंक रु. 7,500/- (रुपये सात हजार पाचशे) व विशेष विषयांवरील अंकालाही दोन ते पाच हजार रुपयांची रोख पारितोषिके दिली जातील.

याशिवाय खास रायगड जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या उत्कृष्ट दिवाळी अंकाला प्रथम पारितोषिक
रु. 40,000/- (रुपये चाळीस हजार), द्वितीय पारितोषिक रु. 20,000/- (रुपये वीस हजार), तृतीय पारितोषिक रु. 10,000/- (रुपये दहा हजार) रोख व सन्मानचिन्ह आणि उत्तेजनार्थ दोन पारितोषिके प्रत्येकी रु. 5,000/- अशी पारितोषिके देण्यात येतील.
तरी ज्या स्पर्धकांना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा असेल त्यांनी दिवाळी अंकाच्या दोन प्रती व प्रवेश शुल्क रु. 100/- रोख, धनादेश अथवा डी.डी.द्वारे दिनांक 30 नोव्हेंबर, 2022 पूर्वी पुढील पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे व रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
अंक पाठविण्याचा पत्ता :

अध्यक्ष/कार्यवाह
मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, आझाद मैदान,

महापालिका मार्ग, सी.एस.टी., मुंबई – 400001.
फोन : 022-22620451/22700715
अथवा
दीपक म्हात्रे
स्पर्धा समन्वयक

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, प्लॉट नं. 475
मार्केट यार्ड, पनवेल, जि. रायगड – 410206
मो. : 9769409161
धनादेश किंवा डी.डी. मुंबई मराठी पत्रकार संघ या नावाने काढावा.

अपघाती रस्ता म्हणून ख्याती पावलेल्या रस्त्याकडे लक्ष कोण घालणार ?

पुणे -राष्ट्रवादीच्या दोन्ही खासदारांनी वेळोवेळी भेटी दिल्या,सूचना केल्या पण प्रशासन ठम्म ,स्थानिक काय कोणातही आमदार याची दखल घेईना,चांदणी चौकाचे तर गडकरी आणि मुख्यमंत्री यांच्या धक्क्याने काम तर सुरु केलेय,पण याच चांदणी चौकाकडून कात्रज कडे येणाऱ्या वारजे पासून ते कात्रज ते कोंढवा -सासवड या मार्गावरील रस्त्याकडे मात्र निव्वळ डोळेझाक चालविली आहे. अपघाती रस्ता,बळी घेणारा रस्ता म्हणून याची ख्याती झाली आहे.

नवले पूल ते कात्रज चौकाकडे येणारा मुख्य रस्त्यावर पोतदार स्कुल जवळ हा स्पॉट कायम ट्राफिक चा पॉईंट ठरला असून प्रशासनाच्या निष्काळजीपणाने रस्त्याचे काम पूर्ण होत नसून गेले अनेक वर्षे दररोज नागरिकांना हा सहन करावा लागतोय,ट्राफिक पोलिसांचे नियोजन नसून मागील आठवड्यापूर्वी एका महिलेचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाला, आजपर्यंत या रस्त्यावर अगणित अपघात आणि मृत्यू देखील झालेत पण अद्यापही यावर उपाय योजना मात्र सुरु झालेल्या नाहीत.येथील स्थानिक नागरिक आशिष भोसले याबाबत वारंवार तक्रार करत आहेत.यापुढे कात्रज ते कोंढवा -त्यापुढे सासवड अशा रस्त्याची मोठ्ठी दुरावस्था झालेली आहे.आमदार निवडून येतात,मुंबई,दिल्ली अन्य शहरात वाऱ्या करतात,एवढेच काय परदेश वाऱ्या देखील करतात पण या रस्त्यांवरील आणि यांना मिळणाऱ्या छोट्या छोट्या रस्त्यांकडे लक्ष द्यायला अजिबात कोणी धजावलेले नाही.

लग्नसोहळ्यात जयवंत वाडकरांनी मारलाय डल्ला!

प्रख्यात विनोदी अभिनेते जयवंत वाडकर यांनी एका राजेशाही विवाहसोहळ्यात आहेरावरच डल्ला मारला आहे. आणि हो… त्यांना यासाठी अभिनेते सुनील गोडबोले, अभिनेत्री साक्षी परांजपे आणि शितल कलाहापुरे यांनी साथ दिली आहे… चमकलात ना हे वाचून? …बरोबर आहे तुमचं! सेलिब्रेटी असलेल्या ह्या बिनीच्या कलावंतांकडून असं घडेलच कसं? … पण तसं घडलंय! आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर यांच्या चित्रपटाच्या निमित्तानं!

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असणाऱ्या पु. ल. देशपांडेंचा उल्लेख येताच अमराठी लोकांनाही ‘व्यक्ती आणि वल्ली’ची अनाहुतपणे आठवण होते. ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या आगामी मराठी चित्रपटामध्येही अशीच वल्ली कॅरेक्टर्स प्रेक्षकांचं अफलातून मनोरंजन करण्यासाठी एकवटली आहेत. मराठी रंगभूमीपासून मराठी-हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे जयवंत वाडकर ‘वऱ्हाडी वाजंत्री’मध्ये पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात दिसणार आहेत. अभिनेते-दिग्दर्शक विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘वऱ्हाडी वाजंत्री’ ११ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वराज फिल्म प्रॉडक्शन या बॅनरखाली निर्माते कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्यासह अतुल राजारामशेठ ओहळ यांनी केली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एका पेक्षा एक वल्ली कॅरेक्टर पहायला मिळणार असल्याचं जयवंत यांनी सांगितलं.

‘वऱ्हाडी वाजंत्री’ हा चित्रपट म्हणजे फुल टू धमाल असून याबाबत जयवंत वाडकर म्हणाले की, वैभव परबनं अतिशय सुरेख लेखन केल्यामुळं आणि विजय पाटकरने अनोख्या शैलीत दिग्दर्शन केल्यानं ‘वऱ्हाडी वाजंत्री’मध्ये काम करताना खूप धमाल आली. दैनंदिन जीवनातील घटनाक्रमांच्या आधारे या चित्रपटात निखळ विनोदनिर्मिती केली आहे. कोणत्याही लग्नात वेगवेगळ्या स्वभावाची, भिन्न विचारांची आणि निरनिराळे हेतू असलेली मंडळी एकत्र येतात आणि लग्नसोहळा साजरा करतात. या सोहळ्यात मी रावसाहेब नावाच्या नातेवाईकाची भूमिका साकारली आहे. याचा लग्नात मिळणाऱ्या आहेरावर डोळा आहे. आहेराच्या पैशावर हात साफ करण्यासाठी हा लग्नाला आला आहे. हे कॅरेक्टर ग्रे शेडेड नाही. काहींना पैसे बघितले की ते आपल्याकडे यावेत असं वाटतं अशांपैकी हा आहे. चित्रपटात याची फॅमिलीही आहे. याचे वडील वयस्कर असल्यानं त्यांना उचलून लग्नात आणताना फुल धमाल होते. या चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टर हे एखाद्या कॅरीकॅचरसारखं आहे. विजयनं सर्व कॅरेक्टर्स एकाच फ्रेममध्ये सादर केली आहेत. रिमा आणि मोहन जोशी यांनी एका गाण्यात अफलातून परफॅार्म केलं आहे. पॅडी कांबळे आणि हेमांगी कवीचं एक नवं रूप प्रेक्षकांसमोर येईल. सर्व प्रेक्षकांनी हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन अवश्य पहायला हवा अशी ईच्छाही जयवंत वाडकर यांनी व्यक्त केली.

महिला आयोगाने मंत्री सत्तारांवर कारवाई करण्याचे पोलिसांना दिले आदेश

पुणे- राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उदगार काढल्याप्रकरणी तात्काळ चौकशी करून कारवाई करावी आणि त्याबाबतचा अहवाल आम्हाला सादर करावा असे आदेश आज महिला आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

याबाबत आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालक यांनी लेखी पत्र दिले आहे त्यात म्हटले आहे कि,’सत्तार यांनी खासदार सुळे यांच्याबद्दल उदगार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने करत त्यांच्या  प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे, कमी लेखणे, कर्तुत्वहनन करणार्या अशा वक्तव्याची आयोगाने दखल घेतली आहे. याप्रकरणी राज्याचे पोलिस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई करण्यात करावी आणि त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

महावितरण प्रादेशिक नाट्य स्पर्धेचे थाटात उद्घाटन’इस्किलार’, ‘ब्लाइंड गेम’ नाट्यकृतींनी रसिक मंत्रमुग्ध

पुणे दि. ७ नोव्हेंबर :* महावितरणच्या पुणे परिमंडलाद्वारे आयोजित पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेला आज थाटात सुरुवात झाली. पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात या स्पर्धा होत आहेत.
स्पर्धेची सुरुवात नटराजपूजन व दीप प्रज्वलनाने झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंते सचिन तालेवार (पुणे ), सुनील पावडे  (बारामती), परेश भागवत (कोल्हापूर) तसेच नाट्य परीक्षक संजय गोसावी, अरुण पटवर्धन व सौ. मंजुषा जोशी यांची उपस्थिती होती. ‘महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी या नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कर्मचारी, त्यांच्या कुटुंबियांनी व नाट्यप्रेमींनी आनंद घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी यावेळी केले.
कोल्हापूर परिमंडलाच्या ‘इस्किलार’ या जी. ए. कुलकर्णी लिखीत कथेवरील नाट्य रूपांतराच्या पहिल्या प्रयोगाने स्पर्धेला सुरुवात झाली. या नाटकातून एका शापित राजकुमाराच्या माध्यमातून नियतीचा खेळ मांडला आहे. त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या शोध प्रवासात त्याला विविध व्यक्तिरेखा भेटतात. त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखेचा जीवनाकडे बघण्याचा एक स्वतंत्र दृष्टीकोन, मांडलेलं तत्वज्ञानाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
दुपारच्या सत्रात बारामती परिमंडलाने रत्नाकर मतकरी लिखित ‘ब्लाइंड गेम’ या दोन अंकी नाटकाचे दमदार सादरीकरण केले. एका अंध महिलेच्या जिवनातील जगण्याचा संघर्ष मांडण्याचा त्यांनी प्रभावी प्रयत्न केला. या नाटकाने शेवटच्या क्षणापर्यंत ‘सस्पेंन्स’ कायम ठेवत रसिकांना गुंतून ठेवले. यावेळी अधीक्षक अभियंते राजेंद्र पवार, प्रकाश राऊत, सतीश राजदीप, अंकुर कावळे व गौतम गायकवाड, उपमहाव्यवस्थापक अभय चौधरी, सहायक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर, पांडुरंग वेळापुरे, माधुरी राऊत, किर्ती भोसले, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, भुपेंद्र वाघमारे व श्रीकृष्ण वायदंडे यांचेसह पुणे शहरातील सर्व अभियंते व कर्मचारी, पुणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली 07 ; आरोग्य क्षेत्राचा कणा असणा-या परिचारिकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चार परिचारिकांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. तीन परिचारिकांनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वर्ष 2021 चे राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार वितरण सोहळा आज राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 50 पर‍िचारिकांना तसेच परिचारक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय राज्य आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार या उपस्थित होत्या.
सोलापूर जिल्ह्यातील मोरूची येथ‍ील मनिषा भाऊसो जाधव, सहायक नर्सिंग मिडवाइफरी (ANM) यांना आरोग्य क्षेत्रात 16 वर्षांचा अनुभव आहे. आतापर्यंत त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य विभागातील योजनांचे प्रभावीर‍ित्या अंमलबजावणी केलीली आहे. श्रीमती जाधव यांनी माता आणि बालकल्याण क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. श्रीमती जाधव यांनी क्षयरोग्यांना हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे. त्यांच्या या कामांची दखल घेत आज त्यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान‍ित करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला आरोग्य सहाय्यक (एलएचवी) राजश्री तुळशीराम पाटील यांना आरोग्य क्षेत्राचा 22 वर्षाचा अनुभव आहे. श्रीमती पाटील यांचा केंद्र तसेच राज्य शासनाच्या आरोग्य योजनांमध्ये सक्रिय सहभाग असतो. श्रीमती पाटील यांना जिल्हा, राज्य पातळीवर अनेक पुरस्काराने सन्मान करण्यात आलेले आहे.
पुणे येथील राज्य ग्राम आरोग्य परिचारिका (वीएचएन) तसेच राज्य कुटूंब कल्याण कार्यालयाच्या निवृत्त मेट्रन अल्का कोरेकर यांना ही फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरविण्यात आले. श्रीमती कोरेकर यांनी तीन दशकांपासून अधिक काळ आरोग्य क्षेत्रात सेवा दिलेली आहे. सद्या त्या राज्य सार्वजनिक आरोग्य परिचारीका आहेत. 1989 मध्ये रायगड येथे आलेल्या पुरामध्ये तसेच लातूर येथे आलेल्या भुकंपाच्या प्रसंगी पुर्नवसन झालेल्या रूग्णांची सेवा श्रीमती कोरेकर यांनी केली आहे. वर्ष 2018 मध्ये त्यांना युनीसेफतर्फे लसीकरणाची अंमलबजावणी उत्कृष्ट करण्यासाठी अ दर्ज्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. कोव‍िड काळात केलेल्या रूग्ण सेवांमुळे राज्य शासनाच्यावतीने विविध 4 पुरस्कार तर जागत‍िक आरोग्य संघटनेच्यावतीनेही पुरस्कृत करण्यात आले आहे.
अंजली अनंत पटवर्धन यांनाही फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार जाहिर झाला होता. तथापि काही अपरीहार्य कारणास्वत त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.

महाराष्ट्राची सुपूत्री मीरा धोटे यांना फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार
मूळ नागपूरच्या असणा-या मीरा धोटे यांनाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती धोटे या दिल्लीतील जयप्रकाश नारायण अपेक्स ट्रामा सेंटर, एम्स येथे उपनर्सिंग अधीक्षक होत्या. मागील 30 वर्षापासून त्या आरोग्य क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांनी नर्सिंग व्यवस्थापनात पदविका घेतलेली आहे. कोविडच्या काळात एम्समध्ये सुनियोज‍ित पद्धतीने व्यवस्थापन करण्यात श्रीमती धोटे यांनी महत्वपूर्ण भुमिका निभावली. संक्रमण देखरेख, कायाकल्प, स्वच्छ भारत हे आरोग्याशी संबंधित उपक्रम राबविल्याबद्दल श्रीमती धोटे यांना अनेक प्रमाणपत्रांनी यापूर्वीही सन्मानित करण्यात आलेले आहे.
प्रदान करण्यात आलेले पुरस्कार वर्ष 2021 असून एकूण 50 परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वरूपात पदक, प्रशस्तीपत्र आणि 50 हजार रूपये रोख प्रदान करण्यात आले आहे. हा पुरस्कार 1973 पासून देण्यात येत आहे.

या वयात मोहन जोशींनी उडी घेतली पाण्यात अन …..

११ नोव्हेंबरला महाराष्ट्रात विनोदाचा खळखळाट!

अभिनेता मकरंद अनासपुरे, २१ अवली विनोदवीर वाजंत्र्यांसोबत अख्या महाराष्ट्राला खळखळून हसविण्यासाठी सज्ज झाला आहे. कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्यासह अतुल राजारामशेठ ओहळ यांनी ही फुल्ल मनोरंजनाची ट्रीट ‘स्वराज फिल्म प्रॉडक्शन’द्वारे आणली आहे. त्यांची पहिलीच निर्मिती असलेला “वऱ्हाडी वाजंत्री” हा मल्टीस्टारर चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरु असून आज या चित्रपटातील अभिनेत्री प्रिया बेर्डे, जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, विजय कदम, जयवंत वाडकर, प्रभाकर मोरे या प्रमुख कलावंतांसोबत सहनिर्माते अतुल राजारामशेठ ओहळ, कार्यकारी निर्माता इंदुराव कोडले यांनी संवाद साधला. दस्तुरखुद्द लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेला हा भन्नाट मल्टीस्टारर ‘वऱ्हाडी वाजंत्री’ चित्रपट रसिकांसाठी विनोदाचा महाबंपर ठरणार असून मकरंद अनासपुरे या विनोदाच्या हुकमी एक्क्यासह जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, रिमा लागू, विजय कदम, जयवंत वाडकर, प्रिया बेर्डे, आनंदा कारेकर, प्रभाकर मोरे यांसह पॅडी कांबळी आणि हेमांगी कवी या छुईमुई ही जोडी ११ नोव्हेंबरला धम्माल कमाल करणार आहे. लग्न ही जगात प्रत्येकासाठी विलक्षण गोष्ट असते. वधुवर व त्याच्या नातेवाईकांसाठी हा अनुभव अविस्मरणीय असतो. आजच्या हायटेक जमान्यात पारंपरिक लग्नसोहळ्याची जागा ‘मॅरेज इव्हेंट्स’नी घेतली आणि त्यासोबत ‘शादीराम घरजोडे’ जाऊन ‘सुटाबुटातला मॅरेजगुरु’ डॉट कॉमसोबत जागोजागी कांदेपोह्यांसोबत गट्टी जमवत नवदांपत्यांचे प्री-वेंडिंग करत मेहेंदी – संगीत पार्ट्यांमध्ये तल्लीन होऊन धम्माल कम्माल करीत आहेत. काहीशी अशीच थीम घेऊन आपल्या एका सुसज्ज मॅरेजमेंट कंपनीद्वारे जगनकुमार अर्थात आपला लाडका मक्या…पंचक्रोशीतला मॅरेजगुरू झालाय…! आजमितीस या अवलियाने आपल्या भन्नाट हुशारीतून ९९ ची खेळी पार केलीय … सचिनसारखी सेंचुरी करण्यासाठी तो कमालीचा उतावळा झालाय…. या रेकॉर्डब्रेक कामगिरीसाठी तो चक्क दादासाहेबांची बहीण ‘परी’ आणि ताईसाहेबांचा भाऊ ‘युवराज’ यांना बोहल्यावर चढविण्याचा चंग बांधून वरातीमागून घोडे दौडवण्यास सज्ज झालाय…. असं साधारण कथा बीज घेऊन ‘वऱ्हाडी वाजंत्री’चा संगीतमय विनोदी प्रवास सुरु होतो.वैभव अर्जुन परब लिखित “वऱ्हाडी वाजंत्री” या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेल्या मकरंद अनासपुरेंसोबत जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, रीमा लागू, पंढरीनाथ कांबळी, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, राजेश चिटणीस, प्रशांत तपस्वी, विनीत बोंडे, जयवंत भालेकर, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे इत्यादी कलाकार आहेत. या चित्रपटाच्या संगीताची लीलया समर्थपणे संगीतकार अविनाश विश्वजित, शशांक पोवार यांनी पेलेली असून गीतकार राजेश बामगुडे यांच्या गीतांवर स्वरसाज गायक आदर्श शिंदे, आनंदी जोशी, मैथिली पानसे-जोशी, स्व. नंदू भेंडे, गणेश चंदनशिवे यांनी चढवला आहे. तर त्यावर नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव, राजेश बिडवे यांनी केले आहे.

सत्तारांनी माफी मागावी:मुख्यमंत्र्यांनी फोनवरून टोचले कान

मुंबई- खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून सत्तारांचे कान टोचत त्यांना पुन्हा एकदा माफी मागण्याच्या सूचना केल्याचे समजते.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या मुंबईतील घरावर हल्लाबोल केला असून काचा, खिडक्यांचीही तोडफोड केली. तर ठाणे, पुणे, औरंगाबादसह सर्वच ठिकाणी आंदोलन करून त्यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला.

पन्नास खोक्यांचा आरोप कुणी तरी केला. त्यावर कुणीही आम्ही ते घेतले नाही हे कोणीच म्हटले नाहीत. त्यांनी खोक्याचे आरोप फेटाळले नाहीत. हे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे या्ंनी व्यक्त केले होते. त्यावर अब्दुल सत्तारांची जीभ घसरली. त्यांनी थेट सुप्रिया सुळे यांना टार्गेट करीत भिकार असे व्यक्तव्य केले आहे. याचविरोधात राज्यभर संताप सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले असून हा महिला वर्गाचा अपमान आहे. सत्तार यांच्या वक्तव्यामुळे राज्यात संताप असून त्या्ंच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणीही राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली असून याबाबत महेश तपासे यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्र्मक झाले असून सत्तारांना माफी नाहीच असा पावित्रा त्यांनी घतला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. यानंतर सत्तारांच्या पुतळ्याचे दहनही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले. तसेच पुतळ्याला चपलाचा हार घालून जोडेही मारण्यात आले.

माज उतरवला जातो- जितेंद्र आव्हाड

अब्दुल सत्तार इस्लाम धर्मातील आहे. येथे मुस्लिम महिला आहेत. ईस्लाम महिला आहेत त्या काय म्हणत आहेत हे तुम्ही बघा असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली. अब्दुल सत्तारांना माज आला आहे. हा माज उतरवला जातो. लोकशाहीत असा माज तर उतरवलाच जातो.

सत्तारांना फिरू देणार नाही- विद्या चव्हाण

आमदार विद्या चव्हाण यांनी संतप्त प्रतिक्रीया देताना सांगितले की, सत्तारांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करा. सत्तारांनी महिलांचा अपमान केला आहे. त्यांना विधानसभेत बसण्याचा काहीही अधिकार नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी याची दखल घ्यावी, सत्तारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही.

अब्दुल सत्तार यांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे “जोडे मारो आंदोलन”

पुणे- खासदार सौ.सुप्रिया सुळे यांच्यावर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरत टीका केली. या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राणी लक्ष्मीबाई पुतळा ,जंगली महाराज रोड येथे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. सुप्रिया सुळे यांची कृषिमंत्र्यांनी व्यक्तिगत माफी मागावी व महिलांबाबत अपमानकारक विधान करणाऱ्या मंत्र्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप,प्रकाश कदम , नितीन कदम, रूपाली पाटील,अंकुश काकडे, प्रदीप गायकवाड , विशाल तांबे , महेंद्र पठारे, प्रदीप देशमुख ,वैशाली नागवडे , मुणालिनी वाणी , किशोर कांबळे , विक्रम जाधव , अप्पा शिंदे , अमोघ ढमाले यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की , “महिलांच्या बद्दल आदर नसणारी लोक आज शिवरायांच्या महाराष्ट्राचा गाडा हाकत आहे ही, आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकीय संस्कृतीचा एक धागा गेली अनेक वर्षे जपण्यात आलेला आहे. यामध्ये विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांनी गेली अनेक वर्षे राजकारणापलीकडे जाऊन सौहार्दाचे वातावरण जपले आहे. अशामध्ये आपल्या मंत्रीमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत अशोभनीय व असंस्कृत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
खासदार सुप्रियाताई सुळे यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागेल!
अब्दुल सत्तार सारख्या बेताल वक्तव्य करत महाराष्ट्रातील वातावरण बिघडविनाऱ्या वाचाळवीरांचा बंदोबस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी नक्की करतील”.