Home Blog Page 1540

कोयनानगर येथे महाराष्ट्र पर्यटन पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी जागेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मान्यता

२६४ पदांसाठी २७१.४१ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता

मुंबई, दि.१६ : सातारा जिल्ह्यातील गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे राज्य आपत्ती बचाव पथक युनिट अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला आहे. या केंद्राच्या स्थापनेसाठी एकूण ३८.९३ हेक्टर आर जागा सातारा जिल्हा पोलीस दलाला उपलब्ध करुन देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली.

शासनातर्फे विविध आपत्तीप्रसंगी बचाव कार्य करण्यासाठी राज्य आपत्ती बचाव दलाची स्थापना करण्यात आली आहे. या युनिटअंतर्गत आपत्ती परिस्थिती बचाव कार्याचे प्रशिक्षण पोलीस बांधवांना देण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे कोयना नदीच्या काठावर एकूण ३८.९३ हेक्टर आर जागा उपलब्ध करुन देण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

या प्रशिक्षण केंद्रामुळे राज्याला हक्काचे आपत्ती बचावाचे प्रशिक्षण केंद्र उपलब्ध होणार आहे. नैसर्गिक आपत्तीत प्रामुख्याने पूर परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण याठिकाणी देणे शक्य होणार आहे. तसेच या केंद्रामुळे पाटण तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. राज्य आपत्ती बचाव दलाकरिता आणि प्रस्तावित पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी अशी एकूण २६४ पदांसाठी २७१.४१ कोटी रुपयांच्या खर्चासदेखील यावेळी मान्यता देण्यात आली.

अमेरिकन राजदूतांना आवडला वडापाव!

अमेरिकेसोबत वाणिज्यिक संबंध दृढ करण्यावर महाराष्ट्राचा भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १६: महाराष्ट्रात कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात मोठी संधी असून अमेरिकेने या क्षेत्रात सहकार्य करावे. अमेरिकेसोबत महाराष्ट्राचे वाणिज्यिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृह येथे यावेळी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव मनोज सौनिक यावेळी उपस्थित होते.

हॉलिवूडमधील व्यक्तिमत्वाचे बॉलिवूडमध्ये स्वागत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. शिंदे  यांनी श्री. गारसेट्टी यांचे स्वागत केले. भारत-अमेरिका दोन्ही देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, संपर्क क्षेत्रात वाणिज्यिक संबंध आहेत. थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर असून राज्यातील कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणुकीची संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बदलते हवामान हे शेती क्षेत्रासमोर मोठे आवाहन असून त्यासाठी अमेरिकेने तांत्रिक सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी मुंबईत सुरू असलेले विविध प्रकल्प, महिला सक्षमीकरण, बचत गटांची चळवळ आदीबाबत चर्चा झाली.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये जी २० देशांच्या बैठका सुरू आहेत. त्यासाठी मुंबई महानगरी सजली असून सुमारे एक हजारांहून अधिक ठिकाणी सौंदर्यीकरणाचे प्रकल्प सुरू असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी  सांगितले. मुंबईत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला सुरूवात झाली असून दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी शिष्टमंडळासाठी देण्यात आलेल्या अल्पोपहारामध्ये महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश होता.. श्री. गारसेट्टी खवय्ये असल्याने खासकरून मुंबईची ओळख असलेल्या वडापावदेखील होता. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अमेरिकन राजदूत यांना वडापाव खाण्याचा आग्रह केला. मुख्यमंत्र्यांनी केलेला आग्रह स्वीकारत श्री. गारसेट्टी यांनी वडापाव खाल्ला आणि आवडल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली.

यावेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. एस. कुंदन, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांच्यासह अमेरिकन शिष्टमंडळामध्ये मुंबईतील वाणिज्यदूत माईक हॅंकी, क्रिस ब्राऊन, प्रियंका विसारीया-नायक आदी उपस्थित होते.

संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव, शिंदे गटाचे आमदार शिरसाट यांच्याकडून दाखल

मुंबई-शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर बेताल आरोप केले. त्यांच्या अधिकारावर शंका घेऊन जनमानसात विधानसभा अध्यक्षांची पर्यायाने विधिमंडळाची प्रतिमा खराब केल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे.महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. आमदार अपात्रतेचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आला. त्यानंतर संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात आरोपाच्या फैरी झाडणे सुरू केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण पेटले आहे.

संजय शिरसाट यांनी आपल्या प्रस्तावात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाचे नेते, राज्यसभा सदस्य संजय राऊत हे महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री तसेच शिवसेनेच्या आमदारांबद्दल अतिशय वाईट शब्दांत टीका करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार हे घटनाबाह्य, बेकायदेशीर असल्याचा कांगावा राऊत हे गेल्या अनेक दिवसांपासून करीत असून, आता अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राऊत हे सन्माननीय विधानसभा अध्यक्षांवर बिनबुडाचे आणि बेताल आरोप करीत आहेत.

संजय शिरसाट यांनी प्रस्तावात म्हटले आहे की, भारतीय संविधानाने विधानसभा अध्यक्ष यांना व्यापक, नियमनात्मक, प्रशासकीय आणि न्यायिक अधिकार दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष हे विधानमंडळ आणि विधानसभा सचिवालयाचे प्रमुख, पीठासीन अधिकारी असतात. विधानसभा अध्यक्षांना घटना, कार्यपद्धती, नियम आणि संसदीय परंपरांच्या अंतर्गत अधिकार आहेत. कायदेमंडळाच्या अध्यक्ष या नात्याने विधानसभा अध्यक्ष हे न्यायाधीशांच्या भूमिकेत असतात. विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात देखील आव्हान देता येत नाही. इतके अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिलेले असतात. अशा परिस्थितीत विधानसभेच्या अध्यक्ष पदावर नियुक्त व्यक्तीवर खासदार संजय राऊत यांच्याकडून होत असलेले आरोप गंभीर आहेत.संजय शिरसाट यांनी प्रस्तावात म्हटले आहे की, विधानसभा अध्यक्ष हे विधिमंडळाच्या कार्यप्रणालीत कोणत्याही पक्षाचे नेतृत्व करीत नाहीत किंवा त्यांना कोणत्याही पक्षाची झालर लागलेली नसते, तर ते सर्वच पक्षांचे विधिमंडळातील पीठासन अधिकारी असतात. त्यामुळे त्यांच्यावर खोटे, बेफाम आरोप करून जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन करण्याबरोबरच विधिमंडळाचे पावित्र्य धोक्यात आणण्याचे काम राऊत हे करीत आहेत. त्यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांवर केले जाणारे आरोप हे यांना धमकावण्यासाठी केले जात असून अध्यक्षपदाची मानहानी करीत आहेत.संजय शिरसाट यांनी प्रस्तावात म्हटले आहे की, राऊत यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न होत असून, तो हक्कभंग या प्रकारात मोडत असल्याची आमची धारणा आहे. विधानसभा अध्यक्ष या नात्याने आपल्यावर संजय राऊत यांच्याकडून होणारे आरोप, या पदाची च्याकडून केली जाणारी मानहानी, अपमान या सर्व गोष्टींचा विचार करता संजय राऊत यांच्याविरुद्ध विधानसभेत हकभंग दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आता विधानसभा अध्यक्ष यावर काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेचे इमारत पुनर्विकास धोरण

मुंबई-मागासवर्गीय व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यासाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण जाहीर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींचे बांधकाम होऊन जवळपास ५५ ते ६० वर्षे कालावधी लोटला आहे.  बहुतांश इमारती मोडकळीस आलेल्या असून त्या धोकादायक बनल्या आहेत.  अशा संस्थांच्या इमारतींचा पुनर्विकास होणे अत्यंत आवश्यक आहे.  राज्य शासनाने १९४९ ते १९६९ व त्यापुढील कालावधीत पोस्ट वॉर रिहॅबिलिटेशन-२१९ ही योजना सुरु केली.  या योजनेत मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थांना भूखंडाचे वाटप केले.  मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरी ठिकाणी त्यांना निवारा उपलब्ध होऊन पक्की आणि सोयीसुविधांची घरे मिळावी आणि त्यांचे जीवनमान उंचवावे असा यामागील हेतू होता.

आता या नवीन धोरणामुळे अशा इमारतींच्या पुनर्विकासाबाबत यापूर्वी शासनाने काढलेले सर्व शासन निर्णय रद्द झाले असून नव्या धोरणाप्रमाणे कार्यवाही केली जाईल.  अशा संस्थांमध्ये मूळ सभासदांच्या बाबतीत ९० टक्के मागासवर्गीय व १० टक्के अमागासवर्गीय हे प्रमाण जैसे थे ठेवून पुनर्विकासानंतर निर्माण होणाऱ्या अतिरिक्त सदनिकांमध्ये मागासवर्गीयांचे प्रमाण २० टक्के व अमागासवर्गीयांचे प्रमाण ८० टक्के राहील.

पुनर्विकासाकरिता प्राप्त होणारे सर्व प्रस्ताव म्हाडामार्फत सामाजिक न्याय विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतील.

“हिंदू कुंभकर्णाचे बाप…”, कर्नाटकमधील भाजपच्या पराभवानंतर शरद पोंक्षेंची आगपाखड!

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने १३५ जागा जिंकत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा दणदणीत पराभव केला आहे. या निवडणुकीत भाजपाला केवळ ६६ जागा जिंकता आल्या. २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील पराभव हा भाजपाला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.अभिनेते आणि व्याख्याते शरद पोंक्षे यांनी एक ट्वीट केलं आहे. “असं वाटं हिंदू कुंभकर्णाचे बाप आहेत. जागेच होत नाहीत,” असं शरद पोंक्षे यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे. पोंक्षे यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर आता काही ट्विटर वापरकर्ते प्रतिक्रिया देत आहेत. त्यांची ही प्रतिक्रिया कर्नाटक निवडणुकीशी जोडली जात आहे. 

या ट्वीटबरोबर शरद पोंक्षे यांनी अन्य एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी एका एका मुस्लीम नेत्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. संबंधित मुस्लीम नेता कर्नाटकच्या मंत्रिमंडळात मुस्लीम नेत्यांना महत्त्वाची पदं द्यावीत आणि कर्नाटकचा उपमुख्यमंत्री मुस्लीम असावा, अशी मागणी मुस्लीम नेता करत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना शरद पोंक्षे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “हिंदूंनो अजूनही जागे व्हा, वेळ गेलेली नाही .काँग्रेसला निवडून दिल्याची परतफेड म्हणून काय मागतायत पाहा. जागे व्हा हिंदूंनो…”

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाने हिंदू मतदारांना साद घालण्यासाठी विविध हिंदू मुद्द्यांवर मतं मागण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अगदी हिजाब बंदीपासून, मुस्लीम आरक्षण हटवणे, बजरंग बली, बजरंग दलअशा विविध मुद्द्यांचा समावेश होता. असं असूनही या निवडणुकीत धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाचे मुद्दे फारसे चालले नसल्याचं निवडणूक निकालातून दिसून आलं.

आळंदी देवाची येथे लवकरच अन्नछत्र सुरू करणार -:बाबा कांबळे

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून आल्याबद्दल नानासाहेब आबनावे यांचा आळंदी येथे सत्कार सोहळा संपन्न,

आळंदी देवाची येथे भव्य संत रोहिदास महाराजांचे भव्य मंदिर उभारण्यासाठी पाठ पुरवठा करू :- ज्ञानेश्वर कांबळे,

समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा उन्नतीसाठी प्रगतीसाठी वारकरी मंडळींनी साथ द्यावी एकजुटीने काम करावे :-सूर्यकांत गवळी,

पुणे – आळंदी देवाची येथे धार्मिक शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी येत असून त्यांची व इथे येणाऱ्या भाविक भाविकांची उपासमार होत असून त्यांनी जेवण्याची व्यवस्था व्हावी या साठी समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा आळंदी देवाची येथे रोज ५००, लोकांसाठी जेवनाची करण्याच्या प्रयत्न असून लवकरच अन्नछत्र सुरू करणार आहोत, मी स्वतः आळंदी मध्ये धार्मिक शिक्षण घेतले असून, मधुगिरी व भिक्षा मागून मी आयुष्य जगलो आहे त्याकाळी एक वेळ उपाशी राहून आम्ही शिक्षण घेतले, मराठवाडा, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातून आजही अनेक विद्यार्थी आळंदीमध्ये कीर्तनकार होण्यासाठी व धार्मिक शिक्षण घेण्यासाठी येतात परंतु आर्थिक परिस्थितीमुळे वारकरी विद्यार्थ्यांवरती उपाशी राहण्याची वेळ येऊ नये, यासाठीही अन्नछत्र सुरू करणार आहे असे यावेळी बाबा कांबळे म्हणाले,

समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा आळंदी देवाच्या वतीने आळंदी येथे विशेष सर्वसाधारण सभा व कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल नानासाहेब आबनावे व धर्म शाळेतील सभा मंडप पत्रा शेड कामकाज पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरवठा केल्याबद्दलयांचा श्रीरंग आबनावे यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाबा कांबळे उपस्थित होते यावेळी आपले अध्यक्ष भाषणात यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संत रोहिदास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, ग्राहक संरक्षण समितीचे माजी अध्यक्ष सूर्यकांत गवळी हवेली पंचायत समितीचे माजी सभापती किसनराव गाडेकर, दलित मित्र सुदाम लोखंडे, राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकार संघाचे अध्यक्ष सुरेश पोटे, दिंडी नंबर 24 चे अध्यक्ष सुरेश सोनवणे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक उत्तम सोनवणे, धर्मशाळेचे वरिष्ठ उपाध्याध श्रीरंगदादा अबणावे, दिल्ली नंबर 24 चे विनय करी ह भ प रामकृष्ण खाडे महाराज,जयदेव ईश्वर, विकास वाघमारे, व्यासपीठावरती उपस्थित होते,

लवकरच आळंदी देवाची येथे आषाढी वारी सुरू होत असून आषाढी वारीच्या निमित्ताने दिंडी नंबर 24 चे नियोजन भोजनाची व्यवस्था व इतर व्यवस्था याबद्दल देखील यावेळी चर्चा करण्यात आली, संत ज्ञानेश्वर मंदिर मध्ये अधिक गर्दी होऊ नये यासाठी वारकऱ्यांची संख्या कमी करण्यासंदर्भात शासन नुकतेच दिंडी प्रमुखांना काही बंधन घालत आहे शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करण्याचे सूचना देखील या मीटिंगमध्ये करण्यात आले,

यावेळेस सत्कारस उत्तर देताना नानासाहेब आबनावे म्हणाले हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती वरती मी आणि आमचे एक सहकार्य निवडून आले बाकी सर्व पॅनल विरोधी गटाचा आला मी काम केलं आणि माझा जनतेशी संपर्क होता म्हणून मी निवडून आलो वारकरी संप्रदायाच्या वतीने हा जो माझा सन्मान होत आहे हा घरचा सन्मान आहे मी या सन्मानाबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो,

यावेळी ज्ञानेश्वर कांबळे म्हणाले आळंदी ही पवित्र आणि पावन भूमी आहे , संत परंपरेने समाजातील चुकीचा परंपरा रूढी वरती प्रबोधन करून समाज सुधारण्याचे काम केले आहे या ठिकाणी सर्व संतांचे धर्मशाळा व मंदिर आहेत संत रोहिदास महाराज यांचे देखील या ठिकाणी भव्य असे मंदिर उभे राहावे यासाठी सर्व मिळून प्रयत्न कर,

सूर्यकांत गवळी म्हणाले समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या अगदी समोर आहे. धर्मशाळेचा विकास व्हावा यासाठी आपण प्रयत्न करूया, यासाठी समाजातील एकोपा महत्त्वाचा आहे सर्वांनी एकजुटीने काम केल्यास हे शक्य आहे,

श्रीरंग आबनावे म्हणाले मी गेल्या पंधरा वर्षापासून या संस्थेचा अध्यक्ष आहे या काळात आम्ही खूप काम केले लाखो रुपये एफडी स्वरूपात बँकेत ठेवल्या इमारतीचे काम केले वारकऱ्यांची सेवा केली आता नवीन तरुणांकडे सूत्र देत असून बाबासाहेब कांबळे हे अध्यक्ष झालेले आहेत ते धर्मशाळेचा चांगल्या पद्धतीने विकास करतील असे आम्हाला अपेक्षा आहे यामुळे त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे,

यावेळी समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा वरती नियुक्त झालेल्या नवनिर्वाचित विश्वस्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये, अध्यक्ष बाबासाहेब कांबळे, कार्याध्यक्ष नानासाहेब आबनावे, उपाध्यक्ष श्रीरंगदादा आबनावे,सुरेश गाडेकर, तुषार नेटके, डॉ किसन कांबळे,सचिव अनिल सातपुते, खजिनदार बबनराव पटेकर, सहखजिनदार सोपान गवळी, सुरेश सोनवणे श्रीभाऊ काळे, सुखदेव सूर्यवंशी, नंदकुमार सोनवणे,संतोष पाचारणे, सुखदेव आबनावे, सुभाष जाधव, दत्तात्रय शिंदे, मनोहर सोनटक्के, भारती चव्हाण, सोनाली देशमुख खरात, अनुपमा नेटके, मधुरा डांगे, आदींचा यावेळी शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला,कार्यक्रमाच्या संयोजनासाठी, धर्मशाळेचे पुजारी नारायण गाडेकर, गणेश नेटके, विश्वनाथ नेटके, दीपक कांबळे, सूर्यकांत भोसले, बाबासाहेब हनवते, दत्तात्रय खाडे, यांनी परिश्रम घेतले.

राज्यातून बाराशे प्रतिनिधी भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या पुण्यातील बैठकिला उपस्थित राहणार

पुणे-भाजप प्रदेश कार्यकारिणीची येत्या गुरुवारी (18 मे) पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आज पत्रकारांना दिली.मुळीक म्हणाले, या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. त्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मार्गदर्शन होणार आहे. बैठकीनंतर सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या स्वतंत्र बैठका होणार आहेत.

मुळीक म्हणाले, या बैठकीसाठी राज्यातून बाराशे प्रतिनिधी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. बैठकीत विविध संघटनात्मक आणि राजकीय ठराव संमत करण्यात येणार आहेत.मुळीक पुढे म्हणाले, या बैठकीच्या निमित्ताने पुणे शहर भाजपच्या वतीने विविध व्यवस्थांचे नियोजन आणि वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयारीसाठी विविध विभागांच्या बैठका सुरू आहेत.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी प्रसाद कांबळी आणि प्रशांत दामले यांच्यात चुरस रंगली होती. परिषदेच्या राज्यभरातील 60 सदस्यांनी यासाठी मतदान केले होते. नाट्यपरिषदेचे अध्यक्षपद प्रशांत दामले यांनी जिंकलेले आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली होती. या निवडणुकीत प्रसाद कांबळी यांचे ‘आपलं पॅनल’ आणि प्रशांत दामले यांचं ‘रंगकर्मी समूह’ या दोन गटांमध्ये चांगलीच चुरस रंगली. अखेर या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी समूहा’चे दहा उमेदवार निवडून आले. दुसरीकडे प्रसाद कांबळी यांच्या पॅनलचे चार उमेदवार नियामक मंडळावर निवडून आले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 11 जणांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. यात सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संदीप तेंडुलकर, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा कार्यकारिणीत समावेश आहे.

2018 ते 2023 या कार्यकाळात मोहन जोशी आणि प्रसाद कांबळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. प्रसाद कांबळी यांच्या ‘आपलं पॅनल’ने मोहन जोशी यांचा पराभव करत विजय मिळवला होता. कांबळी यांनी पाच वर्षे नाट्य परिषदेचा कारभार करताना त्यांच्यावर अनेक आरोप झाले होते. त्यांना पदावरून काढण्यासाठी अनेक खलबतं केली गेली. परंतु कांबळी यांनी शेवटपर्यंत या आरोपांच्या विरोधात लढा दिला. याउलट पूर्वी कशा पद्धतीने गैरव्यवहार चालायचे हे देखील त्यांनी उघड केले होते. पण यंदा प्रशांत दामलेंच्या पॅनलने त्यांचा पराभव केला आहे.

सोशिक मानसिकता सोडून स्त्रियांनी प्रश्न विचारावेत

भारती शेवाळे यांचा सल्ला; ‘वंचित विकास’च्या अभया गटातर्फे रणरागिणींचा सन्मान
पुणे : “पिढ्यामागून पिढ्या सोसत राहण्याची मानसिकता स्त्रियांनी बदलत समाजाला वेळोवेळी प्रश्न विचारले पाहिजेत. आपल्या अधिकारांविषयी आपण जागरुक असायला हवे”, असा सल्ला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या भारती शेवाळे यांनी दिला.

वंचित विकास संस्थेच्या ‘अभया’ गटाच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शेवाळे बोलत होत्या. प्रतिकूलतेशी जिद्दीने आणि परिश्रमांनी संघर्ष करीत स्वत:ला सिद्ध केलेल्या जना पंडित, मनीषा धारणे, रुपाली साळुंखे, संगीता राठोड, सविता कुंभार आणि सीमा पेठकर या रणरागिणींचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. त्यांच्या संघर्षकथा ऐकताना श्रोत्यांचे डोळे पाणावले आणि त्यांच्या संघर्षामुळे ते भारावले. 
शेवाळे म्हणाल्या, “बदलाची प्रक्रिया स्वत:मधील बदलांपासून सुरू केली पाहिजे. मुलीच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे. स्त्री नेहमीच सहनशक्तीच्या कडेलोटापर्यंत सोसत राहते. आपल्या समस्या, अडचणी विषयी उघडपणे बोलले पाहिजे. आपण बोललो नाही, तर समाजाला कधीच जाग येणार नाही. घरातल्या निर्णयप्रक्रियेत आवर्जून सहभागी व्हा, तो प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे.”

‘समाजासाठी आपण काय करतो, हे सर्वांत महत्त्वाचे असते, याचा आदर्श अभया उपक्रमाने निर्माण केला आहे, अशा शब्दांत प्रतिभा शाहू मोडक यांनी अभया उपक्रमाचे कौतुक केले. सन्मानित रणरागिणीसाठी त्यांनी स्वरचित कवितांच्या माध्यमातून मानवंदना दिली.

ज्येष्ठ समाजसेविका, कवयित्री प्रतिभा शाहू मोडक अध्यक्षस्थानी होत्या. संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालक व कार्यवाह मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, उद्धव भडसाळकर आदी उपस्थित होते. चैत्राली वाघ, तृप्ती फाटक, प्राची एक्के, माया भांगे आणि मीनाक्षी नवले यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन देवयानी गोंगले यांनी केले.

आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये

मुंबई- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) कंत्राटी निदेशकांचे मानधनात वाढ करून ते २५ हजार रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या निर्णयाचा फायदा २९७ कंत्राटी निदेशकांना होईल. यापूर्वी त्यांना १५ हजार रुपये मानधन मिळायचे. सध्या या आयटीआयमध्ये २९७ निदेशक आहेत. राज्यातील मनपा क्षेत्रातील आयटीआयमध्ये दुसरी व तिसरी पाळी आणि उर्वरित आयटीआयमध्ये दुसरी पाळी ऑगस्ट २०१० पासून सुरु करण्यासाठी एकूण १५०० शिक्षकीय पदांना २०१० मध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. कंत्राटी शिल्प निदेशकांच्या सेवा २०१० पासून २०२२ पर्यंत १२ वर्ष इतक्या झाल्या असून वाढलेली महागाई बघता आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षांनी या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेऊन सेवा पुढे ठेवण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.

मातांनी मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी डॉ. मंजूषा प्रभूणे यांचा सल्ला

कोथरूड हॉस्पिटलमध्ये मातृदिन साजरा

पुणे, दिः १६ मेः दरवर्षी में महिन्याच्या दुसर्‍या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. आईला समर्पित हा एक दिवस आहे. यावेळी आपण सर्व तिच्या आनंदाची व सुखाची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. पण इतर दिवशी त्यांना विशेष महत्व दिले जात नाही. आईवर अनेक जबाबदार्‍या असल्याने रोज काम करण्याचा दबाव असतो. तथापि नवीन मातासाठी हे अधिक आव्हानात्मक असते. कारण त्या शारीरिक तसेच मानसिक तणावातून जात आहेत. अशा परिस्थितीत नवीन मातांनी त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. असा सल्ला प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. मंजूषा प्रभूणे यांनी दिली.
जागतिक मातृदिनानिमित्त कोथरुड हॉस्पिटलतर्फे सर्व मातांसाठी विशेष संदेश देण्यात आला. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. मंजूषा प्रभूणे बोलत होत्या. या वेळी कोथरूड हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र मिटकर, प्रसिद्ध सर्जन डॉ. राजेंद्र गुंडावार उपस्थित होते. तसेच  डॉ. संजना भारती, डॉ. प्राची अमराळे व डॉ. गिता वडरेकर उपस्थित होत्या.
 डॉ. मंजूषा प्रभुणे म्हणाल्या, आज महिलांमध्ये आजारांचे प्रमाण वाढत असल्याने त्यांनी या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यातच गर्भवती महिलांनी बाहेरील सर्व खाद्य पदार्थ खाणे टाळावे. डोहाळे लागल्यावर त्यावर ही नियंत्रण ठेवेणे गरजेचे आहे. त्यांनी घरचाच डायट घ्यावा त्यातही काकडी, टोमॅटो, तुप, भरपूर पाणी आणि शारीरिक हालचाली ठेवाव्यात. आई ही कुटुंबाची गुढी असते. ती स्वस्थ्य आणि शिक्षित राहिली तर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहते. त्यामुळे प्रत्येक महिलेने स्वतःचे आरोग्य सांभाळावे.
डॉ. राजेंद्र गुंडावार म्हणाले, या हॉस्पिटलमधील अत्याधुनिक थिएटरची सुविधा असल्याने येथे कमी वजनांच्या बाळाची डिलीव्हरी सुद्धा केली जात आहे. तसेच महिलांच्या नाळेतील रक्त जमा करून ठेवण्याची योजना आखली आहे. त्यामुळे भविष्यात येथील जन्मलेल्या बाळाची आरोग्याची सर्व काळजी घेतली जाईल. येथे चार प्रकारचे अत्याधुनिक सुविधायुक्त ऑपरेशन थिएटर असल्याने सर्व प्रकारचे  यशस्वी ऑपरेशन केले जाते.
डॉ. राजेंद्र मिटकर म्हणाले, अत्याधुनिक सुविधा व मशिनरींनी परिपूर्ण असलेल्या या हॉस्पिटलमध्ये ३ स्त्री रोग तज्ञ डॉक्टर आहेत. तसेच आधुनिक ऑपरेशन थिएटर असून महिलांसाठी विशेष वार्ड उपलब्ध करून दिले आहेत. येथे उच्च शिक्षित प्रशिक्षीत डॉक्टरांची टीम सदैव तत्पर असते. नवजात शिशूंसाठी अतिविशेष दक्षता विभाग एनआईसी सुरू करण्यात आला आहे. तसेच अन्य हॉस्पिटलच्या तुलनेत येथील शुल्क ५० टक्के कमी असून लग्झरी सुविधा देण्यात येत आहे.

नाल्यातून किती खोल गाळ काढला याची आकडेवारी जाहीर करा

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार

मुंबई, 16,
मुंबईतील नालेसफाईच्या कामावर समाधान व्यक्त करावे अशी स्थिती नाही, किती खोल सफाई झाली त्या खोलीची आकडेवारी पालिकेने जाहीर करावी, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केली
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी आज तिसऱ्या दिवशी पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, आमदार विद्या ठाकूर, मनिषा चौधरी, माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा, श्रीकला पिल्लई, संदिप पटेल, कमलेश यादव, प्रियांका मोरे, प्रतिभा गिरकर, लिना देहरकर, शेजल देसाई, अंजली खेडकर, प्रवीण शहा, जगदिश ओझा, जितेंद्र पटेल, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, आदी उपस्थितीत होते
आज प्रथम ओशिवरा नदी आणि भगतसिंग नाल्याची पाहणी करण्यात आली. दोन्ही ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरु होते. समुद्राला भरती असल्याने पाणी भरलेले असले तरी जेसीबीच्या सहाय्याने खालून गाळ निघत असल्याचे चित्र दिसत होते. तर वळनाई नाल्यात तर गाळाचे ढिगारे आज अखेर कायम असून आज दौऱ्याची माहिती मिळाल्यानंतर कामाला सुरुवात करण्यात आल्याचे दिसत होते. त्यामुळे याबाबत संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना जाब विचारण्यात आला.
तर भिम नगर नाल्याती सफाई करण्यात आली असली तरी नाल्याच्या काठावर अनधिकृत बांधकामे असल्याने या नाल्याची रुंदी कमी झाली आहे. तर दहिसर नदीच्या सफाईचे काम अद्याप सुरु असून बराच गाळ नदीत बाकी आहे. त्यामुळे याबाबत बोलताना आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले की, महापालिकेने गाळाच्या वजनाची जशी आकडेवारी जाहीर केलेय तशी किती खोल गाळ काढला याची आकडेवारी जाहीर करावी तरच कळेल किती सफाई झाली. अन्यथा तरंगता गाळ काढून सफाई झाल्याचे चित्र कंत्राटदार उभे करतील, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.

जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन, हवामान विभागाचा अंदाज; 96 टक्के पावसाची शक्यता

कसा असणार मान्सूचा प्रवास

  • १० ते ११ जून दरम्यान मुंबईत धडकणार
  • ९६ टक्के सरासरी पावसाचा अंदाज

यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात भारतात मान्सूनचे आगमन होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, यावर्षी सरासरी 96 टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. मुंबई आणि प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख सुनील कांबळे यांनी माध्यमांना मान्सूनबाबत ही माहिती दिली. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनीही जून महिन्यात मान्सून भारतात वेळेवर किंवा वेळेआधी दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे.

मागील आठवड्यात भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा सर्वसाधारण म्हणजेच 96 टक्के पाऊस होण्याचा अंदाज जाहीर केला होता. या अंदाजात 5 टक्के कमी-अधिक तफावत होऊ शकते. 96 ते 104 टक्के हा सामान्य पाऊस आहे. 110 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला तर अतिवृष्टी समजली जाते. 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला तर दुष्काळ समजला जातो. यंदा भारतात सर्वसाधारण पावसाचा अंदाज आहे. शेती तसेच अर्थव्यवस्थेसाठी ही समाधानाची बाब आहे.

हवामान विभागाकडून मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनबाबत पुन्हा अंदाज वर्तवला जाणार आहे. त्यावेळी चित्र अधिक स्पष्ट होईल, असेही सुनील कांबळे यांनी सांगितले. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन कधी होईल व त्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास कसा असेल? याबाबतची सविस्तर माहिती महिना अखेरीस सांगण्यात येणार असल्याचे सुनील कांबळे यांनी सांगितले.

भारतीय हवामान विभागाने मुंबईत यंदा 10 किंवा 11 जूनला मान्सूनचे आगमन होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. तर, स्कायमेटनेही याबाबतचा अंदाज जाहीर केला आहे. स्कायमेटनूसार, तळकोकणात 7 जूनला मान्सूनचे आगमन होईल. तर, मुंबईत 11 जूनला मान्सूनचे आगमन होईल.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय हवामान विभागाचा नवा अंदाज येणार आहे. त्यावेळी अल निनोच्या परिणामासंदर्भात अधिक माहिती दिली जाणार आहे. यंदा अल निनो असणार, परंतु त्याचा मोठा प्रभाव नसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतात जुलै महिन्यात अल निनो सक्रिय होत आहे. आतापर्यंत 15 वेळा अल निनो सक्रीय असताना मान्सून 6 वेळा अतिवृष्टी देऊन गेला आहे.

सध्याच्या हवामान स्थितीनुसार मान्सून अंदमान समुद्रात निर्धारित वेळेत पोहोचण्याची शक्यता दिसून येत आहे. साधारणपणे अंदमानात मान्सून 20 ते 21 मेपर्यंत पोहोचून तो आपला प्रवास या निर्धारित तारखेपर्यंत पूर्ण करेल, कदाचित त्यापूर्वीही पूर्ण करेल, अशी सध्या हवामान स्थिती असल्याचे सांगण्यात आले आहे.

दक्षिण पुण्यात निसर्गाची हानी,बेकायदा बांधकामांनी.. पर्यावरणवादी बेपत्ता ?

पुणे- दक्षिण पुण्याच्या निसर्ग संपदेत भर घालणाऱ्या आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी तलावाच्या किनाऱ्यावर हजारो मृत माशांचा खच साठला होता, अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात मासे मृत्यू पावल्याने हा मोठा घातपात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात मासे कशामुळे मेली याचे कारण शोधले असता आजूबाजूला झालेली बेकायदा बांधकामे ड्रेनेज चे पाणी याच तलावात सोडत असल्याचे महापालिकेने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे.ज्यामध्ये निवासी आणि व्यापारी बांधकामांचा समावेश आहे आता हि सारी ड्रेनेजस कशी बंद करावयाची हा महापालिके पुढील प्रश्न आहे . तूर्तास तरी सुमारे ४० ते ५० बांधकामांना नोटीसा देण्याचे धोरण महापालिकेने अंगिकारले असून त्यावर आता कार्यवाही सुरु होत असल्याचे वृत्त आहे.

२/३ दिवसांपूर्सवी सकाळी तलावाच्या किनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या माणसांना हे मासे मरून पडल्याचे दृश्य दिसले, बहुतांश जणांनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढून व्हायरल केले. त्यामुळे जांभुळवाडी, कात्रज या परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, ते दृष्य पाहण्यासाठी शेकडो लोकांची तलावाजवळ गर्दी झाली. छोट्या मासोळ्यांपासून ते तब्बल पंधरा-वीस किलो वजनाचे चार-साडेचार फुट लांबीचे मोठे मासे मरून पडले होते. त्यातील बहुतांश मृत माशांचा खच हा तलावाच्या काठावर साचला होता तर तलावात आठ दहा फुटांपर्यंत अनेक मृत मासे पाण्यावर तरंगलेले दिसत होते. दुपारी मृत मास्यांचा खच हटविण्यासाठी सुरवात केली होती. मात्र इकडे माशांचा खच काढला जात होता व दुसरीकडे माशांचे तडफडून मरणाचे प्रकार रात्रीपर्यंत सुरुच होते.

शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी या उद्देशाने या तलावाची निर्मिती केली गेली होती. परंतू या परिसरात बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. .आंबेगाव बुद्रुक,आंबेगाव खुर्द जांभुळवाडी रोडचा काही भाग नव्याने महापालिकेत समाविष्ट झाला आहे.त्यामुळे या भागात मोठ्या इमारती होऊन नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत.त्यामुळे या ठिकाणी शेती शिल्लक राहिली नाही. या भागातील वाढत्या बांधकामा मुळे तलावाचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तलाव शेजारी असलेल्या अनेक मोठ्या सोसायटीचे मैला पाणी तलावात सोडले जात असल्यामुळे तलावाचे पाणी प्रदूषित होत असून जलचर प्राण्याचा जीव धोक्यात आला आहे.

कर्नाटकात राणेबेन्नूरमध्ये राष्ट्रवादीमुळे मतविभाजनाचा लाभ भाजपला..राष्ट्रवादी च्या 9 उमेदवारांचा झाला दारुण पराभव


रा
ष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक लढवून मतांची टक्केवारी वाढविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न फोल ठरला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कर्नाटक राज्यातील 9 विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिले होते. राष्ट्रवादीच्या नऊ उमेदवारांपैकी 5 उमेदवारांना 200 मतांचा टप्पा सुद्धा गाठता आलेला नाही या ठिकाणी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले असून 2 मतदारसंघात अनुक्रमे केवळ 360 व 626 मते मिळाली आहेत. अवघ्या 2 मतदारसंघात पाच अंकात मते मिळाली त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील निपाणी विधानसभा मतदारसंघात 66 हजार 056 इतकी मते प्राप्त झाली तर राणेबेन्नूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आर शंकर यांना 37 हजार 559 इतकी मते मिळाली आहेत. या मतदारसंघात मतविभाजनाचा लाभ भाजपला झाल्याचे स्पष्ट होत आहे.     राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे कर्नाटकातील पक्षाच्या उमेदवारांच्या मतांकडे आणि त्यांच्या मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते मात्र राष्ट्रवादीच्या आशा देखील फोल ठरल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कर्नाटक राज्यातील 9 विधानसभा मतदारसंघात एकूण केवळ 1 लाख 04 हजार 807 इतकी नगण्य मते मिळाली आहेत.     निपाणी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांना 66 हजार 056 इतकी मते प्राप्त झाली असून 35.25 टक्के मतांचे प्रमाण आहे. या ठिकाणी भाजपचे उमेदवाराने 73 हजार 348 इतक्या मतांनी विजय मिळवला असून कॉंग्रेसच्या उमेदवाराला 44 हजार 107 मते मिळाली त्यामुळे मतविभाजनाचा फायदा या मतदारसंघात भाजपला झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर देवर हिप्परगी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार मसूरसाहेब बिलगी यांना अवघी 129 मते मिळाली आहेत. नोटाला 695 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवाराने 65 हजार 952 मते मिळवून कॉंग्रेस सह भाजपच्या उमेदवारांवर मात केली आहे. अनुक्रमे कॉंग्रेसच्या 33 हजार 673 तर भाजपच्या उमेदवाराला 45 हजार 777 मते मिळाली आहेत.      बसवान बागेवाडी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार जमीर अहमद इनामदार यांना केवळ 140 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात कॉंग्रेसने विजय मिळवत 68 हजार 126 मते प्राप्त केली आहेत. या मतदारसंघात मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करून मतविभाजनाचा प्रयत्न असफल झाला आहे. नागठाण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार कुलप्पा चव्हाण यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले असून अवघी 360 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात आपच्या उमेदवाराला 2 हजार 974 मते मिळाली असून कॉंग्रेसने तिरंगी लढतीत 78 हजार 990 इतकी मते मिळवून यश मिळवले आहे. तर भाजपला 48 हजार 175 मते आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाला 34 हजार 114 मते या मतदारसंघात मिळाली आहेत.     येलबुर्गा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आर हरी यांना केवळ 626 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र फोल ठरले असून दुरंगीच लढत झाली यामध्ये कॉंग्रेसने 94 हजार 330 मते मिळवून यश मिळवले असून भाजप व जनता दलाला धूळ चारली आहे. भाजपला 77 हजार 149 मते तर जनता दलाला अवघी 1 हजार 038 मते मिळाली आहेत.     राणेबेन्नूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आर शंकर यांना 37 हजार 559 इतकी मते प्राप्त झाली असून 19.46 टक्के मतांचे प्रमाण आहे. या ठिकाणी कॉंग्रेसच्या उमेदवाराने 71 हजार 830 इतक्या मतांनी विजय मिळवला असून भाजप उमेदवाराला 62 हजार 030 मते मिळाली आहेत. मतविभाजनाचा फायदा या मतदारसंघात भाजप होऊ शकला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.      हंगरी बोम्मनहल्ली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार के सुगुणा यांना अवघी 148 मते मिळवून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या मतदारसंघात धर्मनिरपेक्ष जनता दलाने 84 हजार 023 मते मिळवून कॉंग्रेस व भाजला धूळ चारली आहे. या ठिकाणी कॉंग्रेसच्या उमेदवाराने 72 हजार 679 इतकी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली असून भाजपला केवळ 27 हजार 026 मते मिळाली आहेत.      विराजपेठ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार एसवायएम मसूद फौजदार यांना अवघी 121 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवाराने 83 हजार 791 मते मिळवून धर्मनिरपेक्ष जनता दल व भाजला धूळ चारली आहे. भाजपला 79 हजार 500 मते मिळाली आहेत या ठिकाणी दुरंगी लढत झाली.     नरसिंहराजा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार रेहाना बानो यांना अवघी 134 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवाराने 83 हजार 480 मते मिळवून यश संपादन केले आहे तर भाजपला 51 हजार 802 मते तर सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाला 41 हजार 037 मते प्राप्त करून तिरंगी लढत दिली. राष्ट्रवादीचे अस्तित्व मात्र या तिरंगी लढतीत कोठेही दिसून आले नाही. 

बंडखोरी केलेल्या त्या फुटीर आमदारांना जनतेने नाकारले!

र्नाटक मध्ये सन २०१९ साली बंडखोरी करून जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या त्या आमदारांना जनतेने नाकारले आहे. २०१९ साली बंडखोरी करून जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडणास कारणीभूत ठरलेल्या त्या ‘१७’ आमदारांपैकी 8 बंडखोरांना या निवडणुकीत काठावरचे मताधिक्य मिळाले असून अन्य त्या बंडखोर आमदारांचा दारूण पराभव झालेला आहे.     २०१९ साली झालेल्या ऑपरेशन लोटसमुळे जेडीएस-काँग्रेस-अपक्ष अशा १७ आमदारांनी बंडखोरी करून राजीनामा दिला. यापैकी काही आमदारांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवून भाजपाला साथ दिल्यामुळे कर्नाटकात भाजपाचे सरकार स्थापन झाले होते. या बंडखोर आमदारांचे यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना कसा प्रतिसाद दिला त्याचे विश्लेषण केले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ चा निकालात १३५ जागा जिंकून काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. मागील २०१८ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती.   २०१८ साली झालेल्या निवडणुकीत भाजपाने २२४ पैकी १०४ जागा मिळवल्या. मात्र बहुमताच्या ११३ या आकड्यापासून भाजपा दूर होते. काँग्रेसने या निवडणुकीत ७६, तर जेडीएसने ३७ जागा जिंकल्या होत्या. इतर अपक्ष आमदारांसह ११६ आमदारांच्या पाठिंब्यावर जेडीएस-काँग्रेसने सरकार स्थापन केले. जेडीएस-भाजपाने एकत्र येऊन सत्ता स्थापन केले. बंडखोरी करून पोटनिवडणुकीला सामोरे गेलेल्या काही आमदारांना भाजपाने मंत्रिपद देऊ केले, काहींना दिल्लीत वर्णी लावली तर काहींची उमेदवारी डावलण्यात आली.     सन २०१९ साली बंडखोरी करून भाजपावासी झालेल्या यातील काही आमदारांना भाजपाने पुन्हा उमेदवारी दिली होती मात्र त्यापैकी सर्वांना विजय मिळू शकला नाही. अनेकांचा या निवडणुकीत पराभव झालेला आहे. सन २०१९ साली भाजपाने ऑपरेशन लोटस राबवून दोन्ही पक्षांचे १७ आमदार फोडले. या आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे तत्कालीन जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडले होते. भाजपाने दोन्ही पक्ष आणि एक अपक्ष मिळून १७ आमदार फोडले होते. या १७ पैकी दोन आमदारांनी या वेळी निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. एका आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र त्यांचा पराभव झाला.     उर्वरित १४ आमदारांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र यापैकी आठ जणांचा पराभव झाला असून फक्त सहा आमदारांना आपला मतदारसंघ राखता आला आहे. बंडखोरी केलेले काँग्रेस माजी आमदार रमेश जारकीहळ्ळी यांनी २०२३ च्या निवडणुकीत गोकाक विधानसभा मतदारसंघातून सर्वात चांगली कामगिरी केल्याचे दिसून येते. काँग्रेस-जेडीएसचे सरकार पाडण्यात जारकीहळ्ळी यांचा प्रमुख सहभाग होता. या वेळी त्यांनी एक लाखाहून अधिकची मते घेऊन दणदणीत विजय मिळवला आहे. बंडखोरी केलेल्यांपैकी सात जणांना भाजपा सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले होते, त्यापैकी सहा जणांना आपला मतदारसंघ राखता आला आहे. पण बीसी पाटील यांना हिरेकेरूर येथून पराभव सहन करावा लागला आहे.पराभूत झालेले आमदार- प्रतापगौडा पाटील (काँग्रेस) मस्की विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले होते. पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होताच. या वेळीदेखील काँग्रेसच्या उमेदवाराकडून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. महेश कुमठळ्ळी (काँग्रेस) अथनी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे होते. लिंगायत समाजाचे नेते असलेल्या कुमठळ्ळी यांना काँग्रेसच्या लक्ष्मण सावदी यांनी पराभूत केले आहे. लक्ष्मण सावदी यांचे तिकीट कापल्यामुळे एक महिन्यापूर्वीच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. बीसी पाटील (काँग्रेस) हिरेकेरुर विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिलेले आहेत. तीन वेळा जेडीएस आणि दोन वेळा काँग्रेसचे प्रतिनिधित्व त्यांनी केले होते. बोम्मई सरकारमध्ये त्यांनी कृषीमंत्री म्हणून काम केले. काँग्रेसचे उमेदवार उजनेश्वार बसवन्नप्पा यांनी त्यांचा पराभव केला. श्रीमंत पाटील (काँग्रेस) कागवाड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकले होते. काँग्रेसमधून त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. या वेळी काँग्रेसच्या भरमगौडा कागे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. के. सुधाकर (काँग्रेस) चिकबळ्ळापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत उभे होते. काँग्रेसच्या प्रदीप ईश्वर यांनी त्यांचा पराभव केला. बोम्मई सरकारच्या काळात ते आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री होते. के. सी. नारायण गौडा (जेडीएस) क्रिष्णाराजपेट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत होते. जनता दलाच्या एच. टी. मंजू यांनी त्यांचा पराभव केला. एन. नागाराजू (काँग्रेस) होसकोटे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत होते. या वेळी भाजपाच्या तिकिटावर त्यांनी एक लाखाहून अधिक मते मिळवली, तरीही त्यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या शरथ कुमार बच्चेगौडा यांचा येथून विजय झाला. २०१९ साली विजयानगरचे आमदार असलेल्या आनंद सिंह (काँग्रेस) यांनी बंडखोरी केली होती. या वेळी त्यांचे पुत्र सिद्धार सिंह ठाकूर यांना भाजपाने तिकीट दिले होते, मात्र त्यांना हा मतदारसंघ गमवावा लागला. काँग्रेसच्या एच. आर. गवियप्पा यांचा येथे विजय झाला. आर. शंकर (अपक्ष) यांनी २०१९ साली बंडखोरी करून भाजपात प्रवेश केला होता. भाजपाने त्यांची वर्णी विधान परिषदेवर लावली होती. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर रानीबेण्णूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही.विजयी झालेले आमदार-  रमेश जारकीहोळी (काँग्रेस) यांचा गोकाक मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजय झाला आहे. २०१९ साली जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. बी. एस. येडियुरप्पा यांच्या सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊ केले होते. मात्र सेक्स सीडी प्रकरणात २०२१ साली त्यांनी राजीनामा दिला. एन. मुनिरत्ना (काँग्रेस) राजराजेश्वरीनगर येथून निवडणूक लढवीत होते. मार्च २०२३ मध्ये त्यांच्यावर ख्रिश्चन समुदायाविरोधात द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तरीही भाजपाने त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना उमेदवारी दिली. १,२७,९८० मते मिळवीत त्यांचा विजय झाला. के. गोपालैह्या (जेडीएस) महालक्ष्मी लेआऊट मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. ९६ हजार ४२४ मते घेऊन त्यांनी विजय मिळवला. बी. ए. बसवराज (काँग्रेस) यांनी के. आर. पुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. १ लाख ३९ हजार ९२५ मते घेऊन त्यांचा विजय झाला. शिवराम हेब्बर (काँग्रेस) येल्लापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत होते. ७४ हजार ६९९ मतदान घेऊन त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. एस. टी. सोमशेखर (काँग्रेस) यांनी येशवंथपुरा येथून निवडणूक लढवली. १ लाख ६९ हजार मतदान घेऊन त्यांनी जेडीएसच्या उमेदवाराचा पराभव केला. तर उर्वरीत रोशन बेग आणि एच. विश्वनाथ यांनी सन २०२३ ची विधानसभा निवडणूक लढवलेली नाही.     दरम्यान सन २०१४ च्या तुलनेत भाजपच्या जनाधार घटत असून आगामी 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये मतदारांचा प्रतिसाद कसा मिळेल त्यावर लोकसभा निवडणुकांचा अंदाज स्पष्ट होणार आहे. सध्या देशात 30 विधानसभा आहेत. त्यात 2 केंद्रशासित प्रदेश, दिल्ली आणि पुद्दुचेरी देखील आहेत. कर्नाटकच्या निकालानंतर 15 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यापैकी केवळ 9 राज्यांमध्ये स्वबळावर सत्ता आहे. उर्वरित 6 राज्यांमध्ये आघाडीच्या साथीदारांसोबत भाजप सत्तेत आहे. यापैकी एकही राज्य दक्षिण भारतातील नाही. 2018 मध्ये भाजपची 21 राज्ये आणि देशाच्या 71% लोकसंख्येवर सत्ता होती, परंतु आता भाजपची सत्ता लोकसंख्येच्या 45% पर्यंत कमी झाली आहे. भाजप किंवा त्यांच्या आघाडीच्या प्रदेशातील फक्त 7 राज्यांची लोकसंख्या एक कोटीहून अधिक आहे. भाजपच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास जनाधार घटत असल्याचे स्पष्ट होत आहे.

(PRAB) PUNE