Home Blog Page 1541

कर्नाटकात राणेबेन्नूरमध्ये राष्ट्रवादीमुळे मतविभाजनाचा लाभ भाजपला..राष्ट्रवादी च्या 9 उमेदवारांचा झाला दारुण पराभव


रा
ष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक लढवून मतांची टक्केवारी वाढविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न फोल ठरला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कर्नाटक राज्यातील 9 विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिले होते. राष्ट्रवादीच्या नऊ उमेदवारांपैकी 5 उमेदवारांना 200 मतांचा टप्पा सुद्धा गाठता आलेला नाही या ठिकाणी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले असून 2 मतदारसंघात अनुक्रमे केवळ 360 व 626 मते मिळाली आहेत. अवघ्या 2 मतदारसंघात पाच अंकात मते मिळाली त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील निपाणी विधानसभा मतदारसंघात 66 हजार 056 इतकी मते प्राप्त झाली तर राणेबेन्नूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आर शंकर यांना 37 हजार 559 इतकी मते मिळाली आहेत. या मतदारसंघात मतविभाजनाचा लाभ भाजपला झाल्याचे स्पष्ट होत आहे.     राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे कर्नाटकातील पक्षाच्या उमेदवारांच्या मतांकडे आणि त्यांच्या मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते मात्र राष्ट्रवादीच्या आशा देखील फोल ठरल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कर्नाटक राज्यातील 9 विधानसभा मतदारसंघात एकूण केवळ 1 लाख 04 हजार 807 इतकी नगण्य मते मिळाली आहेत.     निपाणी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांना 66 हजार 056 इतकी मते प्राप्त झाली असून 35.25 टक्के मतांचे प्रमाण आहे. या ठिकाणी भाजपचे उमेदवाराने 73 हजार 348 इतक्या मतांनी विजय मिळवला असून कॉंग्रेसच्या उमेदवाराला 44 हजार 107 मते मिळाली त्यामुळे मतविभाजनाचा फायदा या मतदारसंघात भाजपला झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर देवर हिप्परगी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार मसूरसाहेब बिलगी यांना अवघी 129 मते मिळाली आहेत. नोटाला 695 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवाराने 65 हजार 952 मते मिळवून कॉंग्रेस सह भाजपच्या उमेदवारांवर मात केली आहे. अनुक्रमे कॉंग्रेसच्या 33 हजार 673 तर भाजपच्या उमेदवाराला 45 हजार 777 मते मिळाली आहेत.      बसवान बागेवाडी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार जमीर अहमद इनामदार यांना केवळ 140 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात कॉंग्रेसने विजय मिळवत 68 हजार 126 मते प्राप्त केली आहेत. या मतदारसंघात मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करून मतविभाजनाचा प्रयत्न असफल झाला आहे. नागठाण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार कुलप्पा चव्हाण यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले असून अवघी 360 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात आपच्या उमेदवाराला 2 हजार 974 मते मिळाली असून कॉंग्रेसने तिरंगी लढतीत 78 हजार 990 इतकी मते मिळवून यश मिळवले आहे. तर भाजपला 48 हजार 175 मते आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाला 34 हजार 114 मते या मतदारसंघात मिळाली आहेत.     येलबुर्गा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आर हरी यांना केवळ 626 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र फोल ठरले असून दुरंगीच लढत झाली यामध्ये कॉंग्रेसने 94 हजार 330 मते मिळवून यश मिळवले असून भाजप व जनता दलाला धूळ चारली आहे. भाजपला 77 हजार 149 मते तर जनता दलाला अवघी 1 हजार 038 मते मिळाली आहेत.     राणेबेन्नूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आर शंकर यांना 37 हजार 559 इतकी मते प्राप्त झाली असून 19.46 टक्के मतांचे प्रमाण आहे. या ठिकाणी कॉंग्रेसच्या उमेदवाराने 71 हजार 830 इतक्या मतांनी विजय मिळवला असून भाजप उमेदवाराला 62 हजार 030 मते मिळाली आहेत. मतविभाजनाचा फायदा या मतदारसंघात भाजप होऊ शकला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.      हंगरी बोम्मनहल्ली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार के सुगुणा यांना अवघी 148 मते मिळवून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या मतदारसंघात धर्मनिरपेक्ष जनता दलाने 84 हजार 023 मते मिळवून कॉंग्रेस व भाजला धूळ चारली आहे. या ठिकाणी कॉंग्रेसच्या उमेदवाराने 72 हजार 679 इतकी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली असून भाजपला केवळ 27 हजार 026 मते मिळाली आहेत.      विराजपेठ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार एसवायएम मसूद फौजदार यांना अवघी 121 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवाराने 83 हजार 791 मते मिळवून धर्मनिरपेक्ष जनता दल व भाजला धूळ चारली आहे. भाजपला 79 हजार 500 मते मिळाली आहेत या ठिकाणी दुरंगी लढत झाली.     नरसिंहराजा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार रेहाना बानो यांना अवघी 134 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवाराने 83 हजार 480 मते मिळवून यश संपादन केले आहे तर भाजपला 51 हजार 802 मते तर सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाला 41 हजार 037 मते प्राप्त करून तिरंगी लढत दिली. राष्ट्रवादीचे अस्तित्व मात्र या तिरंगी लढतीत कोठेही दिसून आले नाही. 

बंडखोरी केलेल्या त्या फुटीर आमदारांना जनतेने नाकारले!

र्नाटक मध्ये सन २०१९ साली बंडखोरी करून जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या त्या आमदारांना जनतेने नाकारले आहे. २०१९ साली बंडखोरी करून जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडणास कारणीभूत ठरलेल्या त्या ‘१७’ आमदारांपैकी 8 बंडखोरांना या निवडणुकीत काठावरचे मताधिक्य मिळाले असून अन्य त्या बंडखोर आमदारांचा दारूण पराभव झालेला आहे.     २०१९ साली झालेल्या ऑपरेशन लोटसमुळे जेडीएस-काँग्रेस-अपक्ष अशा १७ आमदारांनी बंडखोरी करून राजीनामा दिला. यापैकी काही आमदारांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवून भाजपाला साथ दिल्यामुळे कर्नाटकात भाजपाचे सरकार स्थापन झाले होते. या बंडखोर आमदारांचे यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना कसा प्रतिसाद दिला त्याचे विश्लेषण केले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ चा निकालात १३५ जागा जिंकून काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. मागील २०१८ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती.   २०१८ साली झालेल्या निवडणुकीत भाजपाने २२४ पैकी १०४ जागा मिळवल्या. मात्र बहुमताच्या ११३ या आकड्यापासून भाजपा दूर होते. काँग्रेसने या निवडणुकीत ७६, तर जेडीएसने ३७ जागा जिंकल्या होत्या. इतर अपक्ष आमदारांसह ११६ आमदारांच्या पाठिंब्यावर जेडीएस-काँग्रेसने सरकार स्थापन केले. जेडीएस-भाजपाने एकत्र येऊन सत्ता स्थापन केले. बंडखोरी करून पोटनिवडणुकीला सामोरे गेलेल्या काही आमदारांना भाजपाने मंत्रिपद देऊ केले, काहींना दिल्लीत वर्णी लावली तर काहींची उमेदवारी डावलण्यात आली.     सन २०१९ साली बंडखोरी करून भाजपावासी झालेल्या यातील काही आमदारांना भाजपाने पुन्हा उमेदवारी दिली होती मात्र त्यापैकी सर्वांना विजय मिळू शकला नाही. अनेकांचा या निवडणुकीत पराभव झालेला आहे. सन २०१९ साली भाजपाने ऑपरेशन लोटस राबवून दोन्ही पक्षांचे १७ आमदार फोडले. या आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे तत्कालीन जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडले होते. भाजपाने दोन्ही पक्ष आणि एक अपक्ष मिळून १७ आमदार फोडले होते. या १७ पैकी दोन आमदारांनी या वेळी निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. एका आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र त्यांचा पराभव झाला.     उर्वरित १४ आमदारांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र यापैकी आठ जणांचा पराभव झाला असून फक्त सहा आमदारांना आपला मतदारसंघ राखता आला आहे. बंडखोरी केलेले काँग्रेस माजी आमदार रमेश जारकीहळ्ळी यांनी २०२३ च्या निवडणुकीत गोकाक विधानसभा मतदारसंघातून सर्वात चांगली कामगिरी केल्याचे दिसून येते. काँग्रेस-जेडीएसचे सरकार पाडण्यात जारकीहळ्ळी यांचा प्रमुख सहभाग होता. या वेळी त्यांनी एक लाखाहून अधिकची मते घेऊन दणदणीत विजय मिळवला आहे. बंडखोरी केलेल्यांपैकी सात जणांना भाजपा सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले होते, त्यापैकी सहा जणांना आपला मतदारसंघ राखता आला आहे. पण बीसी पाटील यांना हिरेकेरूर येथून पराभव सहन करावा लागला आहे.पराभूत झालेले आमदार- प्रतापगौडा पाटील (काँग्रेस) मस्की विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले होते. पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होताच. या वेळीदेखील काँग्रेसच्या उमेदवाराकडून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. महेश कुमठळ्ळी (काँग्रेस) अथनी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे होते. लिंगायत समाजाचे नेते असलेल्या कुमठळ्ळी यांना काँग्रेसच्या लक्ष्मण सावदी यांनी पराभूत केले आहे. लक्ष्मण सावदी यांचे तिकीट कापल्यामुळे एक महिन्यापूर्वीच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. बीसी पाटील (काँग्रेस) हिरेकेरुर विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिलेले आहेत. तीन वेळा जेडीएस आणि दोन वेळा काँग्रेसचे प्रतिनिधित्व त्यांनी केले होते. बोम्मई सरकारमध्ये त्यांनी कृषीमंत्री म्हणून काम केले. काँग्रेसचे उमेदवार उजनेश्वार बसवन्नप्पा यांनी त्यांचा पराभव केला. श्रीमंत पाटील (काँग्रेस) कागवाड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकले होते. काँग्रेसमधून त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. या वेळी काँग्रेसच्या भरमगौडा कागे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. के. सुधाकर (काँग्रेस) चिकबळ्ळापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत उभे होते. काँग्रेसच्या प्रदीप ईश्वर यांनी त्यांचा पराभव केला. बोम्मई सरकारच्या काळात ते आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री होते. के. सी. नारायण गौडा (जेडीएस) क्रिष्णाराजपेट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत होते. जनता दलाच्या एच. टी. मंजू यांनी त्यांचा पराभव केला. एन. नागाराजू (काँग्रेस) होसकोटे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत होते. या वेळी भाजपाच्या तिकिटावर त्यांनी एक लाखाहून अधिक मते मिळवली, तरीही त्यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या शरथ कुमार बच्चेगौडा यांचा येथून विजय झाला. २०१९ साली विजयानगरचे आमदार असलेल्या आनंद सिंह (काँग्रेस) यांनी बंडखोरी केली होती. या वेळी त्यांचे पुत्र सिद्धार सिंह ठाकूर यांना भाजपाने तिकीट दिले होते, मात्र त्यांना हा मतदारसंघ गमवावा लागला. काँग्रेसच्या एच. आर. गवियप्पा यांचा येथे विजय झाला. आर. शंकर (अपक्ष) यांनी २०१९ साली बंडखोरी करून भाजपात प्रवेश केला होता. भाजपाने त्यांची वर्णी विधान परिषदेवर लावली होती. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर रानीबेण्णूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही.विजयी झालेले आमदार-  रमेश जारकीहोळी (काँग्रेस) यांचा गोकाक मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजय झाला आहे. २०१९ साली जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. बी. एस. येडियुरप्पा यांच्या सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊ केले होते. मात्र सेक्स सीडी प्रकरणात २०२१ साली त्यांनी राजीनामा दिला. एन. मुनिरत्ना (काँग्रेस) राजराजेश्वरीनगर येथून निवडणूक लढवीत होते. मार्च २०२३ मध्ये त्यांच्यावर ख्रिश्चन समुदायाविरोधात द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तरीही भाजपाने त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना उमेदवारी दिली. १,२७,९८० मते मिळवीत त्यांचा विजय झाला. के. गोपालैह्या (जेडीएस) महालक्ष्मी लेआऊट मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. ९६ हजार ४२४ मते घेऊन त्यांनी विजय मिळवला. बी. ए. बसवराज (काँग्रेस) यांनी के. आर. पुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. १ लाख ३९ हजार ९२५ मते घेऊन त्यांचा विजय झाला. शिवराम हेब्बर (काँग्रेस) येल्लापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत होते. ७४ हजार ६९९ मतदान घेऊन त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. एस. टी. सोमशेखर (काँग्रेस) यांनी येशवंथपुरा येथून निवडणूक लढवली. १ लाख ६९ हजार मतदान घेऊन त्यांनी जेडीएसच्या उमेदवाराचा पराभव केला. तर उर्वरीत रोशन बेग आणि एच. विश्वनाथ यांनी सन २०२३ ची विधानसभा निवडणूक लढवलेली नाही.     दरम्यान सन २०१४ च्या तुलनेत भाजपच्या जनाधार घटत असून आगामी 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये मतदारांचा प्रतिसाद कसा मिळेल त्यावर लोकसभा निवडणुकांचा अंदाज स्पष्ट होणार आहे. सध्या देशात 30 विधानसभा आहेत. त्यात 2 केंद्रशासित प्रदेश, दिल्ली आणि पुद्दुचेरी देखील आहेत. कर्नाटकच्या निकालानंतर 15 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यापैकी केवळ 9 राज्यांमध्ये स्वबळावर सत्ता आहे. उर्वरित 6 राज्यांमध्ये आघाडीच्या साथीदारांसोबत भाजप सत्तेत आहे. यापैकी एकही राज्य दक्षिण भारतातील नाही. 2018 मध्ये भाजपची 21 राज्ये आणि देशाच्या 71% लोकसंख्येवर सत्ता होती, परंतु आता भाजपची सत्ता लोकसंख्येच्या 45% पर्यंत कमी झाली आहे. भाजप किंवा त्यांच्या आघाडीच्या प्रदेशातील फक्त 7 राज्यांची लोकसंख्या एक कोटीहून अधिक आहे. भाजपच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास जनाधार घटत असल्याचे स्पष्ट होत आहे.

(PRAB) PUNE

परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास कुलगुरुंना जबाबदार धरले जाईल- राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. १५ : विद्यापीठांच्या विविध परीक्षांचे निकाल तीस दिवसांत आणि उशिरात उशिरा ४५ दिवसांच्या आत जाहीर करण्याचे बंधन असताना देखील बहुसंख्य विद्यापीठे निकाल लावण्यास अक्षम्य विलंब करीत आहेत.  विद्यापीठांच्या निकालासोबत विद्यार्थ्यांचे भवितव्य निगडित असल्याने सर्व विद्यापीठांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेणे आवश्यक असून यानंतर निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास थेट कुलगुरुंना जबाबदार धरले जाईल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील कुलगुरुंना सांगितले.

कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्या

अध्यक्षतेखाली राज्यातील काही पारंपरिक, कृषि, आरोग्य विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरुंची  बैठक सोमवारी (दि. १५) राजभवन येथे झाली, त्यावेळी ते  बोलत होते.

आगामी २०२३-२४ शैक्षणिक सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात विद्यापीठांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच विद्यापीठांशी निगडित सामायिक विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

याच विषयावर राज्यातील उर्वरित विद्यापीठांची दुसरी बैठक नागपूर येथे घेणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी उणापुरा एक दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. धोरणाच्या उत्तम अंमलबजावणीबाबत महाराष्ट्राने देशापुढे उदाहरण सादर करावे. वेगवेगळ्या परीक्षांचे निकाल वेळेवर न लागल्यामुळे सामायिक शैक्षणिक वेळापत्रक चुकते.  त्यामुळे निकाल वेळेवर लावले पाहिजे, तसेच गुणपत्रिकांचे देखील वितरण वेळेवर झाले पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

अनेकदा इतर विद्यापीठांमध्ये किंवा परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची किंवा तात्पुरत्या पदवी प्रमाणपत्राची गरज असते. विद्यापीठांकडून प्रतिसाद न मिळाल्याने असे विद्यार्थी आपणास निवेदन लिहितात. विद्यार्थ्यांच्या समस्येकडे विद्यापीठांनी संवेदनशीलतेने पहावे.

काही दिवसांपूर्वी २०० विद्यार्थ्यांना एका विषयात चुकून शून्य गुण मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. अशा चुका टाळल्या पाहिजे व चूक झाल्यास विद्यार्थ्यांना त्वरित दिलासा दिला पाहिजे, असेही राज्यपालांनी सांगितले.

बैठकीच्या सुरुवातीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत आढावा सादर केला. तसेच १८ उद्दिष्ट पूर्तीबाबत (कि रिझल्ट एरियाज)  अद्ययावत माहिती दिली.

कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांनी देखील आपल्या विभागांशी संबंधित माहिती दिली. विद्यापीठांच्या कुलगुरुंनी धोरणाच्या अंमलबजावणीबाबत आपल्या विद्यापीठाच्या तयारीची माहिती दिली.

यावेळी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के, एसएनडीटी महिला  विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ उज्वला चक्रदेव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ कारभारी काळे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु ले. जन. (नि) माधुरी कानिटकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ पी जी पाटील, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय सावंत, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रमोद येवले, डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रजनीश कामत आदी उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे ३१ मे रोजी वितरण- महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई: महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामपंचायत व गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात येणार असून ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या महिलांना आपल्या कार्यअहवालासह शनिवार दि. २० मे पर्यंत अर्ज स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये करावयाचा आहे. या पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी बालविवाह प्रतिबंध, हुंडा निमुर्लन, लिंग चिकित्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य, साक्षरता, मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार यासारख्या क्षेत्रात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतलेला असावा.

पुरस्कार निवडीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी यांनी समन्वयाने जिल्ह्यातील  प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये  हा उपक्रम योग्य पदधतीने राबविण्याची दक्षता घ्यावी, तालुकास्तरावर बालविकास प्रकल्प अधिकारी  व संरक्षण अधिकारी यांनी समन्वयाने तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हा उपक्रम राबवावा. ग्रामपंचायत स्तरावर दोन कर्तबगार महिलांची निवड करण्यासाठी संबधित ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येत आहे. याबाबतचाच महिला व बालविकास विभागाचा शासननिर्णय दिनांक ९ मे २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

००००

२७ हजार कोटी खर्च करून रिंगरोडचे काम सुरू करणार:फडणवीस

पुणे:पुण्याचे रिंगरोडचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी २७ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा पुण्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, पुण्यातील रोजगार आणि उद्योगाची गुरुकिल्ली आहे.असे येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेतर्फे शहरासाठी करण्यात आलेल्या सुस-म्हाळुंगे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि २४x७ समान पाणीपुरवठा प्रकल्पाअंतर्गत वारजे जलशुद्धीकरण केंद्र ते बाणेर-बालेवाडी येथील मुख्य दाब नलिकांचे व पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण करण्यात आले. पुणे शहराच्या सुनियोजित आणि गतिमान विकासावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी श्री.फडणवीस यांनी दिली.बालेवाडी येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनिल कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विकास ढाकणे आदी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पुणे केवळ ऐतिहासिक शहर नसून भविष्यातील शहर आहे. जगाच्या पाठीवर २१ व्या शतकातील ‘नॉलेज सिटी’ म्हणून नोंद असलेले पुणे शहर आहे, ही ज्ञाननगरी आहे. पुणे शहर विज्ञान आणि नाविन्यतेची राजधानी आहे. पुणे जिल्हा महाराष्ट्राचा ‘मॅन्युफॅक्चरिंग हब देखील आहे. देशातील २० टक्के उत्पादन महाराष्ट्र करतो, त्यात पुण्याचा सिंहाचा वाटा आहे. इथली वाढती लोकसंख्या लक्षात घेता राहण्यालायक वातावरण निर्माण करणे, शिक्षण, आरोग्य, चांगल्या पर्यावरणाची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे आणि त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे.

भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून पाण्याचे नियोजन

पुण्यात पाणी मुबलक असताना वितरण प्रणालीतील दोषामुळे २५-३० टक्के पुणे तहानलेले असल्याचा विरोधाभास दिसत होता. म्हणून नागपूरच्या धर्तीवर २४x७ समान पाणीपुरवठा योजनेला बाणेर-बालेवाडी भागात प्रथमच सुरूवात करण्यात येत आहे. सुस-म्हाळुंगे हा वाढता भाग आहे. भविष्यात हा भाग मोठ्या प्रमाणात विकसित होणार आहे. इथे सुनियोजित विकास होत असतांना पिण्याच्या पाण्याची सोय करणे महत्वाचे आहे. म्हणून भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

शहरात उत्तम वाहतूक सुविधांवर भर

कोरेगाव रेल्वे उड्डाणपूल आणि सनसिटी ते कर्वेनगर या पुलांमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. वाहतूक नियोजनासाठी अशा सुविधा गरजेच्या आहेत. ५ हजार विद्यार्थ्यांना मुठा नदीवरील पुलाचा फायदा होणार आहे. पुण्याचे रिंगरोडचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी २७ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा पुण्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, पुण्यातील रोजगार आणि उद्योगाची गुरुकिल्ली आहे. पुण्याची मेट्रो वेगाने विकसीत होत आहे, पुढच्या टप्प्याचे कामही लवकरच सुरू करण्यात येईल. उपनगरे मुख्य शहराशी जोडल्यावर पुण्याची वाहतूक सुरळीत होण्यासोबत मेट्रो लाभदायी ठरेल. चांदणी चौकातही महामार्गावरील कामामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत आहे. देशातील सर्वाधिक इलेक्ट्रीक बस वाहतूक पुणे शहरात आहे. भविष्यात एकात्मिक वाहतूक प्रणालीद्वारे सामान्य माणसाला चांगली सुविधा देण्याचे काम करण्यात येईल.

पर्यावरण आणि गतिमान विकासात समन्वय साधणार

पुणे शहराला विकसित करण्यासाठी १५ स्मार्ट सिटीचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयोग पुण्यात सुरू करण्यात येत आहे. पाण्याच्या पुनर्वापरही तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे शुद्ध पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी वापरता येईल. मुळा-मुळा शुद्धीकरणासाठी १ हजार ९०० कोटींची योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नदी निर्मळ होण्यास मदत होईल. पर्यावरण आणि गतिमान विकासात समन्वय साधत पुणेकरांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येईल.पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, बाणेर-बालेवाडी पाणीपुरवठा योजना हा शहरासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. शहरात अधिक वापर होत असतांना शेवटच्या टोकापर्यंत पाणी जात नसल्याने २४x७ समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ८५ टाक्या बांधण्याचे नियोजन करण्यात आले. त्यापैकी ६० टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. योजना पूर्ण झाल्यावर वाया जाणारे ४ टीएमसी पाणी उपयोगात आणता येणार आहे. त्यासोबत २ हजार कोटींच्या जायका प्रकल्पाद्वारे १८ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तयार करून प्रक्रीया केलेले पाणी इतर कामांसाठी उपयोगात आणता येणार आहे. शिवाय उद्योगासाठी हे पाणी वापरल्याने तेथे उपयोगात आणले जाणारे शुद्ध पाणी नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. असे महत्त्वाचे प्रकल्प मुख्यमंत्री असतांना शहरासाठी दिल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना धन्यवाद दिले.विधान परिषद उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, उन्हाळ्यात महिलांना पाण्याची टंचाई जाणवते. पुण्यात इतर शहरातील नागरिकही पुण्यात येतात. पुण्यात चांगले पर्यावरण आणि पाणी आहे. शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाला समोर ठेवून शहरात कामे सुरू आहेत. साधू वासवानी पूलाच्या कामामुळे वाहतूकीची समस्या सुटणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित प्रकल्पांना चालना मिळत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. पुण्यातल्या पर्यावरणविषयक समस्यांबाबत सामाजिक संघटनांसोबत बैठक घेण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रास्ताविकात महानगरपालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले, पुण्याची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन नागरिकांना महानगरपालिकेच्यावतीने सोई-सुविधा पुरविण्यात येत आहेत. भूमिपूजन करण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येईल.माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. ‘मेरा लाईफ मेरा स्वच्छ शहर ‘ हे राष्ट्रीय अभियान मे १५ ते ५ जून या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शहरामध्ये नागरिकांच्या सहभागातून विकेंद्रित पद्धतीने थ्री आर (रिड्युस-रियूज- रिसायकल) केंद्र उभारली जाणार आहे. या अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच प्लास्टिक बॉटल्स संकलन स्पर्धेतून संकलित करण्यात आलेल्या प्लॅस्टिक बॉटल्सपासून बनविण्यात आलेल्या टी-शर्टचे अनावरणही करण्यात आले.

बाणेर-बालेवाडी पाणीपुरवठा योजना

समान पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत बाणेर-पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या तीन टाक्या उभारण्यात आल्या आहेत. वारजे जलशुद्धीकरण केंद्र ते बालेवाडीपर्यंत ५ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या पाणीपुरवठा योजनेमुळे बाणेर बालेवाडी भागातील नागरिकांची पाण्याची मागणी पूर्ण होणार आहे.

सुस व म्हाळुंगे गावातील पाणीपुरवठा योजना

पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या सुस व म्हाळुंगे गावासाठी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे व पाण्याच्या टाक्या बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. पुढील ३० वर्षाची लोकसंख्या लक्षात घेऊन सुस गावात २ व म्हाळुंगे गावात ४ टाक्या बांधण्याचे आणि ६५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांचे नियोजन आहे. या कामांसाठी सुमारे ७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून चांदणी चौक ते बालेवाडीपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

मुठा नदीवरील पूल बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन

मुठा नदीवर सनसीटी सिंहगड रोड ते दुधाने लॉन कर्वेनगर या सहापदरी पूल बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हा पूल ३४५ मीटर लांब आणि  ३० मीटर रुंदीचा असेल.  या पुलामुळे सिंहगड रस्त्यावरून कर्वेनगर, डेक्कन, कोथरूड भागात जाण्याची सोय होणार असून या भागातील वाहतूककोंडी कमी होण्यासोबत इतर रस्त्यावरील वाहतूकीचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.

कोरेगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन

कोरेगाव येथील साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल पाडून नव्याने उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजनही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पुलाच्या कामासाठी सुमारे ८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पूलाची लांबी ६४० मीटर असून बंडगार्डनकडून कॅम्प भागाकडे जाण्याकरिता चार  लेनचा मार्ग उपलब्ध होणार आहे. यामुळे कोरेगाव पार्क व येरवडा भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

अकोला, शेवगाव दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई– अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सामाजिक सलोखा राखला जाईल, कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेऊन सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलीनंतर या दोन्ही ठिकाणी परिस्थिती आता नियंत्रणात असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून येथे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी अकोला येथे तर शेवगाव येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भेट देवून पाहणी केली आहे.

जातीय दंगली रोखण्यासाठी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने जातीय दंगली घडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

कायदा हातात घेऊन जातीय द्वेष पसरवून सामाजिक सलोखा धोक्यात आणणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. कुणीही कायदा हातात घेऊ नये, समाज माध्यमांवर कोणतीही पोस्ट टाकताना काळजीपूर्वक आणि जबाबदारीने टाकावी, आपण केलेल्या पोस्टमुळे सामाजिक तणाव निर्माण होणार नाही आणि कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले आहे.

अनुसूचित जातीतील उद्योजक आणि व्यवसायिकांनी अनुदान आणि बीजभांडवलासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई. : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जातीतील १२ पोटजातीतील उद्योजक आणि व्यवसायिकांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अनुदान आणि बीजभांडवलासाठीच्या योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई उपनगर- शहर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

अनुसूचित जातीतील मांग/ मातंग/मिनी,मादींग/दानखणी मांग/मांग महाशी/मदारी/राधेमांग/मांग गारुडी/ मांग गारोडी/ मदारी/मादगी या १२ पोटजातीतील समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांनी उद्योग/व्यवसाय करण्यासाठी महामंडळाच्या २० कलमी कार्यक्रमानुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयाकरिता अनुदान योजनेंतर्गत भौतिक उद्दिष्ट ५०, बीजभांडवल योजनेंतर्गत भौतिक उद्दिष्ट ३० व मुंबई शहर जिल्हा कार्यालयाकरिता अनुदान योजनेंतर्गत भौतिक उद्दिष्ट ५०, बीजभांडवल योजनेतंर्गत भौतिक उद्दिष्ट ३० चे प्राप्त असून अर्ज करण्यासाठी जिल्हा कार्यालय, मुंबई उपनगर शहर, गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रुम नं. ३३, बांद्रा (पू), मुंबई- ४०००५१ या पत्त्यावर संपर्क करावा, असे जिल्हा व्यवस्थापक यांनी आवाहन केले आहे.

अर्जदार मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील असावा, महाराष्ट्रातील रहिवासी असावा, वय १८ ते ५० वर्ष असावे, यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु.३ लाखांपेक्षा जास्त नसावे, एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल,अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव/प्रशिक्षित असावा. अर्जदारास महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरूप असलेली आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्र/करारपत्रे/कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, मुंबई शहर, उपनगर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

एन.एस.एफ.डी.सी. कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध

मुंबई: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत  वर्ष २०२३-२४ मध्ये विविध योजना राबविल्या जात आहेत. केंद्र शासनाचा योजना- एन.एस.एफ.डी.सी. योजना कर्ज प्रस्तावाबाबत ज्या लाभार्थीनी यापूर्वी एन.एस.एफ.डी.सी. कर्ज योजनेअंतर्गत लघु उद्योग रु.१.०० लाख रु.२.० -लाख, महिला समृध्दी योजना व लघु ऋण वित्त योजना यासाठी कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयात दाखल केले असून ज्याची लाभार्थी निवड समितीमार्फत निवड झालेली आहे. तसेच परिपूर्ण कर्जप्रस्ताव जिल्हा कार्यालयामार्फत प्रधान कार्यालय मंजुरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहेत, अशा लाभार्थीची यादी महामंडळाच्या सूचना फलकावर लावलेली असून संबंधित अर्जदारांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क करुन पुढीलप्रमाणे कागदपत्रे तत्काळ दाखल करावी.

१) लाभार्थ्याचा सिबील क्रेडिट स्कोअरसाठी सिबील रिपोर्ट

२) लाभार्थ्याचे उद्योग आधार प्रमाणपत्र

३) लाभार्थ्याचा विनंती अर्ज – कागदपत्रे खरी असल्याबाबत व ज्या जागी व्यवसाय चालू आहे. त्याच जागेचे प्रमाणित केलेले छायाचित्र

४) चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला

५) दोन सक्षम जामीनदारांपैकी नोकरदार असेल तर त्याच्या कार्यालयाचे लाभार्थ्याने वसुलीचा भरणा के ला नाही तर जामीनदाराच्या पगारातून कपात करून भरणा करण्यात येईल असे कार्यालयाचे हमीपत्र,

६) जर लाभार्थ्यांचा जामीनदार सरकारी नोकरदार असेल व तो सेवानिवृत्त झालेला असेल त्याच्या ऐवजी ज्या कर्मचाऱ्याची सेवा ५ ते ६ वर्ष बाकी आहे असा जामीनदार घेणे आवश्यक.

७) जिल्हा व्यवस्थापक यांचा स्थळपाहणी अहवाल व शिफारस

८) अर्जदाराचे वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र व त्यांचे आधारकार्डची झेरॉक्स प्रत

९) यापूर्वी कर्जाच्या अर्जाबरोबर सादर केलेल्या इतर कागदपत्रांची खातरजमा उदा. जातीचा दाखला रेशनकार्ड, रहिवाशी दाखला, निवडणूक आयोग ओळखपत्र इ.

१०) लाभार्थ्याचा आधारकार्ड क्रमांक तसेच आधार संलग्न (Link) बँक खाते क्रमांक

११) जी.एस.टी. क्रमांकासह व्यवसायाचे दरपत्रक

१२) अर्जदाराचे विहित नमुन्यातील शपथपत्र

आदी कागदपत्रे तत्काळ दाखल करावीत आपली कागदपत्रे तत्काळ पूर्ण करून दाखल करून जास्तीत जास्त अर्जदारांनी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला असून प्रलंबित प्रकरणे या योजनेद्वारे लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिलेले असून याबाबत तातडीने कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

विनापरवाना/ मद्यपी किंवा बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा,कायद्यात सुधारणेचा प्रस्ताव-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १५: विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये यासाठी कडक कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस पोलिस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाचे प्रधान सचिव, अपर पोलिस महासंचालक वाहतूक रविंद्र सिंघल, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार आदी यावेळी उपस्थित होते. बेदरकारपणे तसेच मद्य सेवन करून निष्काळजीपणे वाहन चालविण्यामुळे अपघात आणि त्यामुळे निष्पाप प्रवाशांचा मृत्यू यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०२१ मध्ये अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या २० हजार ८६० आहे तर त्यात ९८२९ जणांचा मृत्यू झाला आहे. गृह विभागाच्या यासंदर्भात सार्वजनिक रस्त्यांवर बेदरकारपणे वाहन चालविणे हा अजामिनपात्र गुन्हा करण्याबाबतच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाली. सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांवरील वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात आणि त्यात प्रवाशांचा होणारा मृत्यू यासाठी वाहनाचालकांविरुद्ध प्रभावी कारवाई होण्यासाठी कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यासाठी यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करावी. विनापरवाना वाहन चालविणारे तसेच मद्यपी वाहनचालकांना त्याच्या कक्षेत आणावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग यावरील अपघात रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपायोजनांची माहिती घेतली. मुंबई- पुणे महामार्गावर असलेल्या उतारावरील ठिकाणी अपघात टाळण्यासाठी सूचना फलकांसोबतच रंब्लर बसविणे यासारख्या उपाययोजना तातडीने हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले

दळवी प्रसूतिगृह सुविधांनी सुसज्ज करणार-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – छत्रपती शिवाजीनगर परिसरातील महापालिकेच्या दळवी प्रसूतीगृहात अत्याधुनिक यंत्रणा आणणे आणि पुरेसा स्टाफ उपलब्ध करणे यासाठी प्रयत्न केले जातील आणि प्रसूतिगृह सुसज्ज केले जाईल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी नगर परिसरामध्ये महापालिकेचे दळवी प्रसूतीगृह आहे. या प्रसुतीगृहाचा लाभ मुळारोड, पीएमसी कॉलनी, पाटील इस्टेट वसाहत, नरवीर तानाजी वाडी, भैय्यावाडी, छत्रपती शिवाजीनगर, गोखलेनगर या ठिकाणच्या गर्भवती महिलांना होतो. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (सोमवारी) दळवी प्रसूतीगृहाला भेट दिली आणि प्रसूतीगृहाच्या विविध समस्यांबाबत सविस्तर आढावा बैठक घेऊन, हॉस्पिटलची पाहणी केली.

या प्रसूतीगृहात नवजात बालकांसाठी माफक दरात एनआयसीयू आणि आयसीयू सुविधा उपलब्ध केली जाईल. सध्या प्रसूतीगृहात १५ खाटांची (बेड्स) सोय आहे. ती संख्या वाढवली जाईल. माफक दरात डायलिसीसची व्यवस्था केली जाईल. डॉक्टर्स, नर्सेस, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची संख्या तातडीने वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. एनआयसीयू, आयसीयू आणि डायलिसीस सेंटर अशा सुविधा पुरविण्यासाठी गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था होणे महत्वाचे आहे, त्यादृष्टीने महापालिकेचे आरोग्य प्रमुख, भवन विभाग आणि विद्युत विभागाचे प्रमुख यांच्या समवेत प्रसूतीगृहाच्या आवारात पुन्हा पाहाणी केली जाईल, असे आमदार शिरोळे यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

या बैठकीला दत्ताभाऊ खाडे, गणेश बगाडे, हरीश निकम, सुभाष जेऊर, बाळाभाऊ राऊत, नाना गव्हाणे, आकाश बगाडे, प्रकाश सोलंकी, बिरू खोमणे, समाधान शिंदे, चंदू म्हेत्रे तसेच दळवी हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्सेस, सेवक वर्ग उपस्थित होते.

श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी ५००० विशेष बसेस सोडणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १५: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरयात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दि. २५ जुन ते ०५ जुलै या दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (२७ जुन रोजी) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटी ने बससेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.यात्रेसाठी सुमारे ५००० गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी तर्फे करण्यात आले आहे. औरंगाबाद प्रदेशातून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

चार तात्पूरर्ती बस स्थानके उभारणार

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान,यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय,संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

शिधापत्रिकाधारकांनी रास्त भाव दुकानदारांकडे भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करण्याचे आवाहन

पुणे, दि. १५: पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व शिधापत्रिकाधारकांनी रास्त भाव दुकानातून धान्य घेताना आपला भ्रमणध्वनी क्रमांक ई-पॉस मशीनमध्ये समाविष्ट करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.

भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट केल्यानंतर किती धान्य मिळाले याचा संदेश भ्रमणध्वनीवर येतो. ज्या लाभार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर संदेश येत नाही त्यांनी त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक रास्त भाव दुकान किंवा तहसिल कार्यालयाकडे समाविष्ट करावा, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

 “बेपत्ता महिलांच्या तपासासाठी समिती स्थापन करत शोध मोहीम राबवावी “-रुपाली चाकणकर

राज्यातील महिला व मुली बेपत्ता होण्याची आकडेवारी चिंताजनक

मुंबई दि. १५ – राज्यातील महिला व मुली बेपत्ता होण्याची गेल्या काही महिन्यांतील आकडेवारी चिंताजनक असून या महिलांच्या तपासासाठी गृह विभागाने समिती स्थापन करत शोध मोहिम राबवावी तसेच दर पंधरा दिवसांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आय़ोगास सादर करावा अशी सुचना गृह विभागाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील मुली व महिला मोठ्या प्रमाणावर बेपत्ता होत असून यात १६ ते ३५ वयोगटातील महिलांची संख्या लक्षणीय आहे. महाराष्ट्र पोलिस, गृह विभाग या बेपत्ता महिलांच्या तपासासाठी करत असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी आज राज्य महिला आयोग कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सदस्या अँड गौरी छाब्रीया, सुप्रदा फातर्पेकर, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दिपक पांडे, कायदा व सुव्यवस्था पोलिस महासंचालक सुहास वारके, पोलिस उपायुक्त डाँ. स्वामी, गृह विभागाचे सह सचिव राहुल कुलकर्णी, महिला आय़ोगाच्या उपसचिव दिपा ठाकूर, विधीतज्ञ अँड विरेंद्र नेवे उपस्थित होते.
या बैठकीत राज्यातील बेपत्ता होणार्या महिला, त्यांच्या तपासासाठी पोलिस तसेच गृह विभाग करीत असलेली कार्यवाही, पोलिसांना बेपत्ता महिलांच्या तपासकार्यात येणारे अडथळे याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, राज्यातून महिला व मुली बेपत्ता होणे ही चिंतेची बाब आहे. आयोग ५ जानेवारी २०२२ पासून विविध यंत्रणां संपर्क करुन याबाबत पाठपुरावा करत आहे. आतापर्यंत राष्ट्रीय महिला आय़ोग, महिला व बाल विकास विभाग, गृह विभाग यांना माहिती आय़ोगाने दिली आहे. बेपत्ता महिलांचा वेळेत शोध न लागल्यास आखाती देशांमध्ये त्यांची तस्करी होण्याचे प्रकार ही समोर आले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड भागातील ८२ कुटुंबाच्या घरातील महिला परदेशी गेल्या असून त्यांच्याशी कुठलाच संपर्क राहिला नसल्याने त्यांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त होते आहे. १ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान राज्यातील ३५९४ महिला हरविल्या आहेत, यातील काहींचा शोध लागला असला तरी एकंदरीतच ही गंभीर बाब आहे. आय़ोग सतत या बाबत पाठपुरावा करत असल्याने महिलांना आमिष दाखवून परदेशी पाठवणार्या मुंबईतील साकीनाका भागातील दोन एजंट विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र ही मोठी यंत्रणा असल्याने याविरोधात ठोस कारवाई कऱणे आवश्यक आहे. राज्यातील मिसिंग सेल, अनेक जिल्ह्यातील भरोसा सेल हे केवळ कागदावरच आहेत ही वस्तुस्थिती आहे असे सांगत महिलांच्या तपासासाठी गृह विभागाने समिती स्थापन करत शोध मोहिम राबवावी तसेच या मोहिमेअंतर्गत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दर १५ दिवसांनी आयोगाला सादर करावा अशी सुचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गृह विभागाला केली आहे.
तसेच राज्य सरकारने बेपत्ता महिलांच्या शोधासाठी नेमलेल्या समितीमध्ये पोलिसांचा समावेश नाही याकडे लक्ष वेधत यात पोलिसांचा समावेश असावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे दि.१५- आकुर्डी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.  शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर बैठक आयोजित करून वेगाने निर्णय घेण्यात येतील आणि जलवाहिन्यांच्या कामासाठी त्वरित भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, मनपा आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, शहर वेगाने वाढतांना पाणी पुरवठा, सांडपाण्याचा निचरा आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट महत्वाची आहे. शहराचे सौंदर्य शाश्वत विकासात आहे असा नवा विचार अलिकडच्या काळात समोर आला आहे.  नव्या १०० द.ल.लिटर जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे शहराला चांगला पाणी पुरवठा होईल. जलशुद्धीकरण केंद्राने ३०० द.ल.लिटरची क्षमता गाठल्यावर शहराची गरज पूर्ण होईल. वाढत्या लोकसंख्येला पाणी देण्यासाठी पुढील टप्पा महत्वाचा आहे. जलवाहिन्यांसाठी आवश्यक भूसंपादनासाठी अडचण दूर करून आवश्यक जमीन एका महिन्याच्या आत महापालिकेला देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिली. महापालिकेने पाणी पुरवठ्याची कामे वेगाने करून पुढील दोन वर्षात मुबलक पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करावे, असे श्री.फडणवीस म्हणाले.

सांडपाण्यावर प्रक्रिया करा

पिण्याच्या पाण्याचा विचार करताना सांडपाण्यावर प्रक्रीया करून त्याचा पुनर्वापर करण्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या परिसरात औद्योगिक क्षेत्र असल्याने या क्षेत्रासाठी अशा पाण्याचा उपयोग करता येईल. वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केल्यास शहराच्या परिसरातील गावांनाही पाणी मिळून त्यातील वाद टाळता येतील, सेाबतच नद्यांचे प्रदूषण थांबविता येईल. शाश्वत शहरांकडे जाण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरेल.  प्रत्येक शहराला वर्षानुवर्षे साठवलेले कचऱ्याच्या डोंगरांवर प्रक्रीया करणेदेखील आवश्यक आहे. या गोष्टी वेगाने केल्यास पिंपरी चिंचवड आधुनिक शहर म्हणून ओळखले जाईल.

भविष्यातील शहरांमध्ये पिंपरी चिंचवड

भविष्यातील शहरांमध्ये पिंपरी चिंचवड शहराचा समावेश आहे. त्यामुळे या शहराकडून मोठ्या अपेक्षा आहे. शहराचे संचलन करणारी इमारत सुंदर असली पाहिजे. अशी प्रशासकीय इमारत लवकरच उभी राहणार आहे. इमारतीसोबत काम करणारी माणसे संवेदनशील असणे महत्वाचे असते. चांगली कार्यसंस्कृती निर्माण करणारे वातावरण  नव्या इमारतीत असेल. सामान्य माणसाची कामे वेगाने होतील अशी आधुनिक सुविधांनी युक्त इमारत तयार होत आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. पोलीस आयुक्तालयासाठी नवीन इमारत आणि मनुष्यबळ देण्यात येणार  आहे, असेही ते म्हणाले.

नाट्यगृहाला गदिमांचे नाव देऊन शहराची उंची वाढली

गदिमांच्या नावाने अतिशय सुंदर सभागृह तयार केल्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन करून श्री.फडणवीस म्हणाले, साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातले ग.दि. माडगुळकरांचे नाव अमर आहे. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात आणि मराठी माणसासाठी गदिमा हे अविस्मरणीय स्वप्न आहे. त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाते. गीत रामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाची कथा त्यांनी अजरामर केली. पिढ्या बदलल्या तरी त्यातला गोडवा वाढत राहिला.  साहित्याच्या क्षेत्रात त्यांचे प्रचंड योगदान आहे.  हिंदी चित्रपटातही त्यांचे योगदान महत्वाचे आहे. अशा व्यक्तीचे नाव एखाद्या सभागृहाला देऊन त्या शहराची उंची वाढते, ते काम आपण केले आहे.

कामे गतीने पूर्ण केल्याबद्दल महापालिका प्रशासनाचे अभिनंदन करून पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या उद्योगधंद्यासोबत लोकसंख्याही वाढत आहे. वाढत्या लोकसंख्याच्या गरजा विचारात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. प्रशासनाच्यावतीने शहरात  कचरा प्रकल्प, रस्ते, सुरक्षा, स्वच्छता आदी विषयावर प्रशासन काम करीत असून ते पूर्ण करण्यासाठी  प्रशासनाच्या गतीमानतेसोबत नागरिकांचे सहकार्यही आवश्यक आहे. शहरातील प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

खासदार बारणे म्हणाले, शहराची गरज ओळखून जलशुद्धीकरण केंद्र आणि तारांगणाचे काम झाले याचे समाधान आहे. नागरिकांच्या गरजेचे प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होत आहे. चांगले प्रकल्प उपयुक्त ठरावेत यासाठी नागरिकांनी देखील त्याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

आमदार लांडगे म्हणाले, पुढील ३० वर्षाचा विचार करून शहरातील विकासकामे करण्यात येत आहेत. येत्या काळात कचऱ्याचे डोंगर सपाट करण्यात येतील.  मोशी येथे २०० खाटांचे कर्करोगाचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. टेनिस सोबत कुस्तीमध्येही शहरातील खेळाडू ऑलिम्पिकला जावा असे प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविकात महानगरपालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.  ते म्हणाले, महापालिकेसाठी ३१२ कोटींची नवीन प्रशासकीय इमारत  उभी राहणार आहे.  ही ग्रीन इमारत असणार आहे. शहराची ओळख सांस्कृतिक नगरी व्हावी यासाठी ग.दि.माडगूळकर सभागृह ६७ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रातही महापालिकेने गुणवत्ता वाढीसाठी चांगले प्रयत्न केले आहे. शहरात आरोग्य सुविधेसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाला सुरू करण्यात आला आहे. शहराला देशातील  स्वच्छ आणि सुंदर शहर करण्याचा प्रयत्न आहे,  असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते ग.दि.माडगूळकर यांच्या चौथ्या पिढीतील कुटुंब सदस्यांचा सत्कार करण्यात आला आणि गदिमा यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर माई ढोरे, पीएमआरडीए आयुक्त राजीव महिवाल, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, सुमीत्र माडगूळकर आणि माडगूळकर कुटुंबिय आदी उपस्थित होते.

अकरा विविध विकासकामांचे उद्घाटन

यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. यात निघोजे एमआडीसी तळवडे येथील इंद्रायणी नदीवरील पंप हाऊस व इतर प्रकल्प,  बोऱ्हाडेवाडी व नेहरूनगर येथील शाळा इमारत, मोशी येथील उप अग्निशमन केंद्र (सब फायर स्टेशन), रावेत येथील सेक्टर ३२ए मधील उद्यान, मध्यवर्ती निर्जंतूकीकरण पुरवठा विभाग, चिंचवड येथील क्षेत्रीय कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, इंद्रायणीनगर येथील उद्यान व विरंगुळा केंद्र, चिखली येथील भाजी मंडई,  निगडी येथील लाईट हाऊस प्रकल्प, स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल व वीर सावरकर उद्यानातील लॉन टेनिस कोर्टचे उद्घाटन यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले.

विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उपक्रमांचा शुभारंभ

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भामा आसखेड प्रकल्पातील जॅकवेलचे काम, डेअरी फार्म येथील पूलाचे काम, मोशी, डुडूळगाव येथील प्राथमिक शाळेची इमारत, चोविसावाडी येथील नवीन अग्निशमन केंद्र  उभारणे, गवळीमाथा व कासारवाडी येथील घरगुती घातक कचरा प्रक्रीया केंद्र, पॅकेज ३ अंतर्गत भोसरी विभागातील धावडे वस्ती येथील पाण्याची टाकी बांधण्याच्या कामांचे भूमिपूजनही  यावेळी करण्यात आले.  मनपा हद्दीतील सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण, मालमत्तांची सुधारीत कर आकारणी, मालमत्ता कर विभागाच्या सर्व सेवा वार्षिक पातळीवर पुरविणे आणि दिव्यांगांकरिता निरामय आरोग्य विमा योजनेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.

चिखली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते चिखली येथील १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.  पिंपरी चिंचवड शहराच्या लोकसंख्या वाढीचा दर, विकासाचा वेग आणि २०३१ पर्यंतची लोकसंख्या लक्षात घेऊन चिखली  येथे ३०० द.ल. लिटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे नियोजित असून  त्यातील पहिल्या टप्प्यात १०० द.ल. लिटरचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

प्रदीप कुरुलकर यांच्यासह हवाई दलातील अधिकारीदेखील पाक गुप्तचरांच्या संपर्कात, एटीएसचा दावा

पुणे-भारतीय संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना दिल्याप्रकरणी सुरू असलेल्या एटीएसच्या तपासात मोठी माहिती समोर आली आहे. डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यासह भारतीय हवाई दलाचा एक अधिकारीदेखील पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. निखील शेंडेअसे या अधिकाऱ्याचे नाव आहे. निखील शेंडे हे बंगळुरूमध्ये कार्यरत आहेत.
आरोपी डॉ. प्रदीप कुरुलकर याची आज एटीएस कोठडी संपल्याने कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने कुरुलकरांना मंगळवारपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉ. प्रदीप कुरुलकर याच्यासह निखिल शेंडे हे भारतीय वायुदलातील अधिकारीही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात असल्याच एटीएसच्या तपासात निष्पन्न झालं आहे. पाकिस्तानातील ज्या आयपी अॅड्रेसवरुन डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांच्याशी संपर्क साधण्यात येत होता, त्याच आयपी अॅड्रेसचा उपयोग निखिल शेंडे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी वापरण्यात येत होता अशी माहिती एटीएसच्या तपासात समोर आली आहे.
निखिल शेंडे यांचा याबाबतीत एटीएसने जबाब नोंद केला असून एअर फोर्सकडून देखील चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानी यंत्रणा कुरुलकरच्या माध्यमातून इतर अधिकाऱ्यांनादेखील ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्यासाठी प्रयत्न झाले का, इतर कोणते अधिकारी या कटात अडकले, याचाही तपास सुरू आहे. डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हनीट्रॅपच जाळं टाकलं होतं. त्यासाठी लंडनमधील मोबाईल नंबरचा उपयोग करून प्रदीप कुरुलकर यांच्याशी आधी फेसबुकवरून संपर्क साधण्यात आला. संपर्क साधणाऱ्या महिलेने तीच नावं झारा दास गुप्ता असून ती मूळची पश्चिम बंगालची असल्याचं सांगितलं. पुढे या दोघांमधला संवाद अतिशय खाजगी पातळीवर पोहचला.

डीआरडीओचे अधिकारी असलेले आरोपी प्रदीप कुरुलकरकडून चार मोबाईल फोनचा वापर सुरू होता. त्यापैकी एका मोबाईलचे लॉक उघडले जात नव्हते.  फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे तो मोबाईल दिल्यानंतर देखील तो उघडण्यात अपयश येत होतं. अखेर कुरुलकरने आज स्वतः तो मोबाईल सुरू करुन दिला. या मोबाईलमधे जो डाटा सापडला आहे, त्याचा तपास ए टी एस कडून करण्यात येणार आहे. 

या संवादादरम्यान डॉ. प्रदीप कुरुलकर यांना डीआरडीओकडून देशातील वेगवगेळ्या प्रयोगशाळांमध्ये सुरु असलेल्या संशोधनाबाबत माहिती विचारली जाऊ लागली. त्याचबरोबर भारतीय बनावटीच्या ब्राम्होस आणि इतर क्षेपणास्त्रांची डिझाइन्स मागण्यात आली. त्याचबरोबर भारत संरक्षण क्षेत्रात इतर कोणत्या देशांसोबत व्यवहार करत आहे याचीही महिती विचारली जात होती. कुरुलकर ई-मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते, असं एटीएसच्या तपासात निष्पन्न झालं आहे. एटीएसने प्रदीप कुरुलकर यांचे जप्त केलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इतर तांत्रिक साहित्य फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यातून ही बाब समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवड तारांगण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे, दि.१५: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निर्मित चिंचवड येथील सायन्स पार्क परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण तारांगण प्रकल्पाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सर्वश्री महेश लांडगे, उमा खापरे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, पिंपरी चिंचवड मानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांगण प्रकल्पाची पाहणी केली. तारांगणात खगोलशास्त्राची चित्रफीत पाहिल्यानंतर तारांगणाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या सूर्यमालिकेची चांगल्याप्रकारे माहिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘दिवसा तारे पहाणे’ ही बोलण्यातील कल्पना तारांगणाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आली. तासभर तारांगणात बसून सृष्टीची रचना समजून घ्यावी असे वाटले. आपली मुले आणि युवकांच्या ज्ञानात सकारात्मक भर घालण्याचे आणि विज्ञानाकडे आकर्षित करण्याचे काम तारांगणाच्या माध्यमातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी संचालक तुपे यांनी तारांगण प्रकल्पाविषयी माहिती दिली.

असा आहे तारांगण प्रकल्प

ऑप्टोमेकॅनिकल व डिजीटल पद्धतीच्या माध्यमातून हायब्रिड प्रोजेक्शन पद्धतीचे अत्याधुनिक तारांगण विकसित केलेले आहे. तारांगण प्रकल्प २ हजार ४१० चौ.मी. क्षेत्रफळात विकसित करण्यात आलेला आहे. तारांगण प्रकल्पात ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांचा सहभाग असलेल्या समितीचे मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. १५.७ मीटर व्यासाच्या या तारांगणामध्ये १२२ आसन क्षमता असून ‘खगोलविज्ञानातील १७ वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम फित जपान येथील ‘गोटो’ कंपनीच्या सहाय्याने तयार केलेले आहेत. या व्यतिरिक्त १०० आसन व्यवस्थेचे स्वतंत्र सभागृह सुविधा उपलब्ध आहे.

नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजित नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन केले. नवीन प्रशासकीय इमारत १८ मजली होणार असून तीन बेसमेंट असणार आहेत. इमारतीचे भूखंड क्षेत्र ८.६५ इतके आहे. ९१.५ हजार वर्ग मिटरचे बांधकाम होणार आहे. याठिकाणी ६०० चारचाकी आणि ३ हजार दुचाकी वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था असणार आहे. महापौर, उपमहापौर, आयुक्त, उपायुक्त, स्थायी समिती कार्यालय, बहुउद्देशीय व महानगरपालिका सर्वसाधरण सभागृह यांच्यासह महानगरपालिकेच्या ६० विभागांची कार्यालये या ठिकाणी असणार आहेत. इत्यादी सोयी सुविधांनी सुसज्ज अशी ही इमारत असणार आहे.

00000