पुणे – छत्रपती शिवाजीनगर परिसरातील महापालिकेच्या दळवी प्रसूतीगृहात अत्याधुनिक यंत्रणा आणणे आणि पुरेसा स्टाफ उपलब्ध करणे यासाठी प्रयत्न केले जातील आणि प्रसूतिगृह सुसज्ज केले जाईल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी नगर परिसरामध्ये महापालिकेचे दळवी प्रसूतीगृह आहे. या प्रसुतीगृहाचा लाभ मुळारोड, पीएमसी कॉलनी, पाटील इस्टेट वसाहत, नरवीर तानाजी वाडी, भैय्यावाडी, छत्रपती शिवाजीनगर, गोखलेनगर या ठिकाणच्या गर्भवती महिलांना होतो. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (सोमवारी) दळवी प्रसूतीगृहाला भेट दिली आणि प्रसूतीगृहाच्या विविध समस्यांबाबत सविस्तर आढावा बैठक घेऊन, हॉस्पिटलची पाहणी केली.
या प्रसूतीगृहात नवजात बालकांसाठी माफक दरात एनआयसीयू आणि आयसीयू सुविधा उपलब्ध केली जाईल. सध्या प्रसूतीगृहात १५ खाटांची (बेड्स) सोय आहे. ती संख्या वाढवली जाईल. माफक दरात डायलिसीसची व्यवस्था केली जाईल. डॉक्टर्स, नर्सेस, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची संख्या तातडीने वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. एनआयसीयू, आयसीयू आणि डायलिसीस सेंटर अशा सुविधा पुरविण्यासाठी गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था होणे महत्वाचे आहे, त्यादृष्टीने महापालिकेचे आरोग्य प्रमुख, भवन विभाग आणि विद्युत विभागाचे प्रमुख यांच्या समवेत प्रसूतीगृहाच्या आवारात पुन्हा पाहाणी केली जाईल, असे आमदार शिरोळे यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
या बैठकीला दत्ताभाऊ खाडे, गणेश बगाडे, हरीश निकम, सुभाष जेऊर, बाळाभाऊ राऊत, नाना गव्हाणे, आकाश बगाडे, प्रकाश सोलंकी, बिरू खोमणे, समाधान शिंदे, चंदू म्हेत्रे तसेच दळवी हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्सेस, सेवक वर्ग उपस्थित होते.