भारती शेवाळे यांचा सल्ला; ‘वंचित विकास’च्या अभया गटातर्फे रणरागिणींचा सन्मान
पुणे : “पिढ्यामागून पिढ्या सोसत राहण्याची मानसिकता स्त्रियांनी बदलत समाजाला वेळोवेळी प्रश्न विचारले पाहिजेत. आपल्या अधिकारांविषयी आपण जागरुक असायला हवे”, असा सल्ला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या भारती शेवाळे यांनी दिला.
वंचित विकास संस्थेच्या ‘अभया’ गटाच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शेवाळे बोलत होत्या. प्रतिकूलतेशी जिद्दीने आणि परिश्रमांनी संघर्ष करीत स्वत:ला सिद्ध केलेल्या जना पंडित, मनीषा धारणे, रुपाली साळुंखे, संगीता राठोड, सविता कुंभार आणि सीमा पेठकर या रणरागिणींचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. त्यांच्या संघर्षकथा ऐकताना श्रोत्यांचे डोळे पाणावले आणि त्यांच्या संघर्षामुळे ते भारावले.
शेवाळे म्हणाल्या, “बदलाची प्रक्रिया स्वत:मधील बदलांपासून सुरू केली पाहिजे. मुलीच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे. स्त्री नेहमीच सहनशक्तीच्या कडेलोटापर्यंत सोसत राहते. आपल्या समस्या, अडचणी विषयी उघडपणे बोलले पाहिजे. आपण बोललो नाही, तर समाजाला कधीच जाग येणार नाही. घरातल्या निर्णयप्रक्रियेत आवर्जून सहभागी व्हा, तो प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे.”
‘समाजासाठी आपण काय करतो, हे सर्वांत महत्त्वाचे असते, याचा आदर्श अभया उपक्रमाने निर्माण केला आहे, अशा शब्दांत प्रतिभा शाहू मोडक यांनी अभया उपक्रमाचे कौतुक केले. सन्मानित रणरागिणीसाठी त्यांनी स्वरचित कवितांच्या माध्यमातून मानवंदना दिली.
ज्येष्ठ समाजसेविका, कवयित्री प्रतिभा शाहू मोडक अध्यक्षस्थानी होत्या. संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालक व कार्यवाह मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, उद्धव भडसाळकर आदी उपस्थित होते. चैत्राली वाघ, तृप्ती फाटक, प्राची एक्के, माया भांगे आणि मीनाक्षी नवले यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन देवयानी गोंगले यांनी केले.