Home Blog Page 1539

नऱ्ह्यातील महाविद्यालयातच 29 वर्षीय महिलेचा कर्मचाऱ्याकडून विनयभंग

पुणे-नऱ्हे परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात काम करत असलेल्या 29 वर्षीय महिलेचा महाविद्यालयातच काॅम्प्युटर लॅबचे अस्टिटंटने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 29 वर्षीय पिडित महिलेने सिंहगड राेड पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात फिर्याद दाखल केली आहे.

सदर तक्रारीनुसार पोलिसांनी गणेश विठ्ठल कडू (वय-35,रा.किरकटवाडी,पुणे) या आराेपीला अटक केली आहे. सदरचा प्रकार 15 मे राेजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कुणाल हाईटस झी काॅलेज सी विंभ मधील अभियांत्रिकी विभागाचे एचओडी सरांचे कार्यालय जवळ, नऱ्हे,पुणे येथे घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या नाेकरीस असलेल्या झील काॅलेजच्या अभियांत्रिकी विभागातील कंप्युटर लॅबचे असिस्न्टंट म्हणून नाेकरीस असलेला आराेपी मणेश कडु त्यांचे ओळखीचा आहे. 15 मे राेजी दुपारी आराेपीने तक्रारदार यांना एचओडी सरांचे कार्यालयातील पंखा चालु करण्याचे बहाण्याने आत बाेलवून त्यांचे एकटेपणाचा गैरफायदा घेऊन पाठीमागून येवून त्यांच्या खांद्यावर हात टाकून त्यांना बळजबरीने जवळ ओढण्याचा प्रयत्न करत स्त्री मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य केले आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक एस जाधव पुढील तपास करत आहे.

परमवीर सिंहांनी मविआ सरकार पाडण्यासाठी केलेल्या मदतीची शिंदे फडणवीसांनी परतफेड केली: नाना पटोले

फडणवीसांनी परमवीर सिंहाच्या हातून महाराष्ट्राची बदनामी केली

मुंबई, १६ मे २०२३

अँटिलिया स्फोटकाचा कट रचून तसेच महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर १०० कोटींच्या वसुलीचे खोटे आरोप करून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र आता उघडे पडले असून परमवीर सिंह हे फडणवीसांच्या हातचे बाहुले होते हे स्पष्ट झाले आहे. परमवीर सिंहानी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून शिंदे फडणवीस सरकारने कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता निलंबन रद्द करून पुन्हा सेवेत येण्यासाठी त्यांना मदत केली आहे. अशी घणाघाती टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, कॅटच्या ऑर्डरमध्ये असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला स्पष्ट आदेश दिले होते की आपण चौकशी करून आरोपपत्र दाखल करा तसेच परमवीर सिंह यांची विभागीय चौकशी करा. पण शिंदे फडणवीस सरकारने ते केले नाही. परमवीर सिंह यांना निलंबित केले होते पण त्यांच्या निलंबनाचा दर तीन महिन्याला आढावा घेऊन निलंबनाला मुदतवाढ देणे आवश्यक होते. मात्र शिंदे फडणवीस सरकारने ना परमवीर सिंहाची विभागीय चौकशी केली ना त्यांच्या निलंबनाला मुदतवाढ दिली. त्यामुळे कॅट न्यायाधिकरणासमोर झालेल्य़ा सुनावनीत राज्य सरकारच्या भूमिकेमुळे परमवीरसिंहांना दिलासा मिळाला.

आपण विधानसभा अध्यक्ष असताना दिल्ली येथे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटलो त्यावेळी त्यांनी परमवीर सिंह यांच्या भ्रष्टाचाराबाबतची फाईल आपल्याकडे काही जणांनी दिल्याचे सांगितले होते. त्या फाईलची एक प्रतिलीपी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनाही संबंधिताने दिल्याचे ते म्हटले होते. यानंतर परमवीरसिंह मला भेटायला आले होते. त्यावेळी याबाबत मी स्वतः त्यांना विचारले असता त्यांनी आमच्या खात्यात असे चालते असे उत्तर दिले होते. यावरून हे स्पष्ट होते की परमवीर सिंहाच्या भ्रष्टाचाराची संपूर्ण माहिती पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाला असूनही त्याच्यावर कारवाई होणे दूरच त्याची साधी चौकशीही भाजप सरकारने केली नाही.

अँटिलीया जवळ स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करणे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणे हे सर्व प्रकार महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी ठरवून केले होते आणि यामागे फडणवीस होते. हे मी विधानसभेत वारंवार सांगितले होते व ते आता स्पष्ट झाले आहे.

कॅटच्या ऑर्डरचे अवलोकन केले असता परमवीर सिंहांना क्लीन चीट दिलेली नाही. तर शिंदे फडणवीस सरकारने जाणीवपूर्वक प्रकरण कमजोर करून परमवीर सिंह यांना तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे वाचविण्यासाठी मदत केली आहे असे दिसून येते. परमवीर सिंह प्रकरणात शिंदे फडणवीस सरकारची गलिच्छ मानसिकता राज्याच्या जनतेसमोर आली आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राच्या इतिहासात राजकारण कधीही एवढ्या खालच्या पातळीवर गेले नव्हते ते घेऊन जाण्याचे आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे पाप शिंदे फडणवीसांनी केले आहे. हे परमवीर सिंहाच्या प्रकरणात स्पष्ट झाले आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

अतिक्रमण विरोधी कारवाईस गेलेल्या महापालिका पथकाला बेदम मारहाण(व्हिडीओ)

पुणे-पुण्यामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई (Anti-Encroachment Action) जोरदार सुरू आहे. या कारवाईमध्ये आज पालिकेच्या सुरक्षारक्षकावर हल्ला करण्यात आला आहे. कारवाई चालू असताना फेरीवाल्यांकडून पालिकेच्या सुरक्षारक्षकालाच बेदम मारहाण करण्यात आली आहे.आज दुपारी 1 ते1.30 चे दरम्यान ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील कैलास स्मशानभूमी ते आरटीओ कार्यालय परिसरात G-20 निमित्त अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करत असताना तेथील व्यवसायीकानी पथकातील सेवकांवर हल्ला करून मारहाण केली. या भ्याड घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी उप आयुक्त , अतिक्रमण व म न पा सेवक युनियन यांचे नियंत्रणात सर्व क्षेत्रिय कार्यालयामधील सर्व अतिक्रमण निरीक्षक,सेवक,बिगारी ,सुरक्षा रक्षकांनी व अधिकारी यांनी उद्या सकाळी 10 वाजता महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोरील हिरवळीवर एका सभेचे आयोजन केले आहे. यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांचे अशा बाबींवर पुढील धोरण ठरविण्यात येईल असे वृत्त आहे.

अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे यावर कारवाई करायची कि नाही याबाबत एकच ठाम निर्णय घ्या ..अन्यथा विभागच बंद करा – महापालिका अधिकाऱ्यांचे राज्य शासनाला थेट आव्हान

पुणे: महापालिकेतील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग नाहक बदनाम करून सोडला जात असून आता राजकारण थांबवा एकच ठाम निर्णय घ्या कारवाई करायची कि नाही ? नसेल करायची तर हे दोन्ही विभागच बंद करून टाका आणि होऊ द्यात काय ते एकदाचे असा पवित्रा घेत आता मेटाकुटीला आलेले महापालिका अधिकारी आणि कर्मचारी थेट राज्य सरकारला आव्हान देण्याच्या मनस्थितीत बंद पुकारणार असल्याचे वृत्त आहे.

महिन्यापुर्वीचे व्हिडीओ आता का आणले जात आहेत , जुने व्हिडीओ दाखवून ,जुन्या कारवाया दाखवून नेमके कोण काय साधत आहे? कुठेही कारवाईला गेले कि विरोध आहेच ,वाद आहेच, राजकीय दबाव आहेच, पोलीस संरक्षणाचा प्रश्न आ वासून आहेच , अगदी मंत्र्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांची बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणे आहेत . हि असताना सामान्य नागरिकांवर देखील कारवाई करायची आहे. या सर्व भावना उचंबळून येण्यास काही घटना अलीकडच्या दिवसात घडल्या आहेत .आज तर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील कैलास स्मशाभूमीत ते आरटीओ कार्यालय परिसरात हा प्रकार घडला.अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई असताना मारहाण करण्यात आली. मारहाणीच्या निषेधार्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची भूमिका घेतली आहे.जी- २० परिषदेच्या निमित्ताने शहरात अतिक्रमण निर्मूलन कारवाई सुरू आहे. ढोले पाटील रस्त्यावर कारवाई सुरू असताना जमावाने कर्मचारी आणि अधिका-यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या घटनेच्या निषेधार्थ महापालिकेच्या हिरवळीवर बुधवारी निषेध सभा होणार असून काम बंद करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जागतिक बँकेसमोर महाराष्ट्रातील प्रकल्पांचे सादरीकरण आगामी प्रकल्पांना निधी देण्यास तत्वत: मान्यता

मुंबई, दि. 16 : राज्यातील पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीचा वेग वाढविण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने जागतिक बँक समूहाचा सदस्य असलेल्या आयएफसी (इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन) सोबत करार केला आहे. महाराष्ट्रात जागतिक बँकेच्या सहकार्याने विविध प्रकल्प सुरू आहेत. पूर्ण झालेल्या आणि जागतिक बँकेने प्रकल्पांना मंजूर केलेल्या निधीव्यतिरिक्त आगामी प्रकल्पाच्या कामासाठी जागतिक बँकेने निधी देण्यास तत्वत: मान्यता दिली.

जागतिक बँकेचे भारतातील संचालक अॅगस्ते टॅनो कौमे आणि शिष्टमंडळाला जलसंपदा, कौशल्य विकास, कृषी, बेस्ट आणि आदिंच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध प्रकल्पांविषयी सह्याद्री अतिथीगृह माहिती  दिली.  यावेळी मित्राचे (महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव श्रीकर परदेशी, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, आयएफसीच्या(इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन) देशातील व्यवस्थापक वेडी जो वर्नर, प्रादेशिक संचालक शलभ टंडन, ईएफआयच्या प्रादेशिक संचालक मॅथ्यू वर्झिस, कार्यक्रम प्रमुख अर्णव बंडोपाध्याय आदी उपस्थित होते.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पूराची तीव्रता कमी करण्यासाठी जागतिक बँकेने अर्थसहाय्य करण्याची विनंती जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी केली. 2019 आणि 2021 मधील प्रकल्प उभारणीत पूरामुळे मोठ्या प्रमाणात कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या काठावरील गावांना आणि शेतीला फटका बसला होता.  पूर अभ्यास समितीने सुचविल्यानुसार नागरी क्षेत्रात पाण्याचा निचरा करणारे नैसर्गिक नदी-नाले पुनर्स्थापित करावेत, नदी, मोठे नाले यांचे रूंदीकरण, खोलीकरण, गाळ काढणे, पूरसंरक्षक बांध घालणे आणि नदी सरळीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पूर क्षेत्रातील अतिक्रमणे काढणे, नदीच्या पाण्याला अडथळा येऊ नये यासाठी पूल, कॉजवे, छोटे बंधारे यांची तपासणी आणि बंधन घालणे, कृष्णा नदीवर म्हैसाळ येथे बॅरेज बांधणे, पूरबाधितांचे कायस्वरूपी पुनर्वसन करणे, प्रवाहास असलेले अडथळे दूर करणे, तलाव, जलाशय, नैसर्गिक नाल्यांना जोडणेबाबत जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांसमवेत 28 सप्टेंबर 2022 ला बैठक झाली, होती. त्यानुसार 3200 कोटी रूपयांच्या कामाचा प्रस्ताव आणि प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये 960 कोटी राज्य शासन तर 2240 कोटी जागतिक बँकेकडून कर्ज स्वरूपात प्राप्त होणार आहेत. वित्त विभागाची मान्यता प्राप्त झाली असून पूर कायमस्वरूपी दूर करण्यासाठी काम सुरू असल्याचे, श्री. कपूर यांनी सांगितले.

जागतिक बँकेचे भारतातील संचालक अॅगस्ते कौमे यांनी सांगितले की, हवामान बदलासंबंधी सर्व प्रकल्पांमध्ये जागतिक बँक महाराष्ट्रासोबत असेल,

कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्मा यांनी कौशल्य विकास विभागाची माहिती दिली. राज्यात विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे, आयटीआयला बळकटी देणे, यंत्रणा सक्षम करणे, क्षमता बांधणी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य विकासाचे नवनवीन प्रकल्प सुरु केल्याबद्दल श्री. अॅगस्ते यांनी राज्य शासनाचे अभिनंदन केले.

कृर्षी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी कृषी विभागाकडून  सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. यापूर्वी जागतिक बँकेने चार हजार कोटी रूपये दिले होते. यापैकी विविध प्रकल्पांवर 91.37 टक्के खर्च झाला आहे. येणाऱ्या काळात हवामान बदलाला पूरक शेती पद्धतीचा अवलंब केला जाणार असून कार्बन ग्रहण वाढविणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे यावरही भर देण्यात येणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाबाबतचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी बेस्टच्या वाहतूक प्रकल्पाबाबत माहि

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून आवारे कुटुंबियांचे सांत्वन

दोषींवर कठोर कारवाईची आवारे कुटुंबियांची मागणी

पुणे-तळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि जनसेवा समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आवारे यांच्या निवासस्थानी जाऊन किशोर आवारे यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच आवारे कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी किशोर आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी “माझा मुलगा तळेगावकरांची प्राणपणाने सेवा करत होता. तळेगावकरांना न्याय पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी,” अशी मागणी केली. तसेच या हत्या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपविण्याची मागणी किशोर आवारे यांच्या पत्नीने नामदार पाटील यांच्याकडे केली.

यावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वांना धीर दिला. तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

तर खबरदार ..जिल्हाधिकाऱ्यांचा कात्रज नवीन बोगदा ते नवले पूलदरम्यानच्या व्यवसायिकांना इशारा

पुणे, दि. १६: पुणे- बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर कात्रज नवीन बोगदा ते नवले पूलदरम्यान अपघातांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने सुचविलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज घेतला. दरम्यान रस्त्याच्या बाजूच्या व्यावसायिकांनी सेवारस्ता आणि मुख्य मार्गिका यामधील दुभाजक (डिव्हायडर) तोडल्याचे आढळून आल्यास संबंधिताचा व्यवसाय परवाना रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीस पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर आदी अधिकाऱ्यांसह ‘सेव्ह लाईफ फाउंडेशन’ संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

खेड शिवापूर ते नवले पूलदरम्यान दररोज सरासरी ३०० वाहनांवर कारवाई
यापूर्वी झालेल्या समितीच्या निश्चित करण्यात आल्याप्रमाणे कात्रज नवीन बोगद्याच्या अलिकडे जांभूळवाडीनजीक पोलीस चौकी स्थापन करण्यात आली आहे. या रस्त्यावर २४ तास पोलीस मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून १० अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पोलीस वाहनांद्वारे गस्त घालण्यात येत असून त्याचा चांगला परिणाम झाला आहे. या टप्प्यात विविध वाहतूक नियमांचे उल्लंघनाबद्दल दररोज सरासरी ३०० वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त श्री. मगर यांनी दिली.

दरम्यान व्यवसायाला लाभ व्हावा यासाठी काही हॉटेलचालक तसेच अन्य व्यावसायिक मुख मार्गिका आणि सेवारस्ता यामधील डिव्हायडर तोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. सेवारस्त्यावरील वाहन अचानक थेट मुख्य मार्गिकेवर तसेच मार्गिकेवरील वाहन अचानक वळत असल्यामुळे अपघात होऊ शकतात. त्यामुळे या व्यावसायिकांच्या विरोधात कठोर कारवाईची शिफारस करावी. गरज पडल्यास संबंधितांचे व्यवसाय परवानेही रद्द करण्यात येतील, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

वेगमर्यादा तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना रोखून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ग्रामीण पोलीस आणि शहर वाहतूक विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे इंटरसेप्टर वाहनासाठीचा प्रस्ताव तात्काळ द्यावा. या रस्त्यावर प्रत्येक मार्गिकेमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आलेले असून ते पोलीस विभागाच्या सॉफ्टवेअरशी जोडावेत, जेणेकरुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करता येईल, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जड वाहनांची वेगमर्यादा ४० कि.मी. प्रतितास करणार
कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान अपघात टाळण्याच्या अनुषंगाने जड वाहनांसाठी वेगमर्यादा ६० कि.मी. वरुन ४० कि.मी. प्रतितास इतकी घटवण्याची अधिसूचना तात्काळ काढण्याचे निश्चित करण्यात आले. खेड शिवापूर पथकर प्लाझा येथे सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवरुन वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी सतत उद्घोषणा करण्यात यावी, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.

विविध यंत्रणांनी सुचविलेल्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या रस्त्यावर ब्रेक निकामी झालेल्या वाहनांना रस्त्यावरुन बाजूला जाण्यासाठी इमर्जन्सी एस्केप प्लॅनअंतर्गत बाहेर पडण्याचे ठिकाण (एक्झिट रॅम्प) तयार करण्याबाबत पाहणी केली असल्याचे एनएचएआयचे प्रकल्प संचालक श्री. कदम यांनी सांगितले. याबाबत आवश्यक तो अभ्यास करुन तात्काळ प्रस्तावाला संबंधित यंत्रणेची मान्यता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले.

शासकीय कार्यालयांमध्ये हेल्मेटबाबत जनजागृती
सर्व शासकीय कार्यालयात दुचाकीने येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी परिवहन विभाग तसेच पोलीसांनी संयुक्तपणे जनजागृती करावी. ‘एक दिवस डोक्यासाठी’ अशा स्वरुपाची मोहीम राबवत हेल्मेट न वापरणाऱ्यांचे प्रबोधन तसेच दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. हेल्मेटचे महत्व पटवून देण्यासाठी मास्टर ट्रेनर्स तयार करावेत, असेही ते म्हणाले.

यावेळी अहमदनगर रस्त्यावरील अपघात रोखण्याच्यादृष्टीने उपाययोजनांबाबतही चर्चा करण्यात आली. या रस्त्यावरील अपघाताची ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) निश्चित करण्यात आली असून उपाययोजनांविषयी कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

कोयनानगर येथे महाराष्ट्र पर्यटन पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी जागेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मान्यता

२६४ पदांसाठी २७१.४१ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता

मुंबई, दि.१६ : सातारा जिल्ह्यातील गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे राज्य आपत्ती बचाव पथक युनिट अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला आहे. या केंद्राच्या स्थापनेसाठी एकूण ३८.९३ हेक्टर आर जागा सातारा जिल्हा पोलीस दलाला उपलब्ध करुन देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली.

शासनातर्फे विविध आपत्तीप्रसंगी बचाव कार्य करण्यासाठी राज्य आपत्ती बचाव दलाची स्थापना करण्यात आली आहे. या युनिटअंतर्गत आपत्ती परिस्थिती बचाव कार्याचे प्रशिक्षण पोलीस बांधवांना देण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे कोयना नदीच्या काठावर एकूण ३८.९३ हेक्टर आर जागा उपलब्ध करुन देण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

या प्रशिक्षण केंद्रामुळे राज्याला हक्काचे आपत्ती बचावाचे प्रशिक्षण केंद्र उपलब्ध होणार आहे. नैसर्गिक आपत्तीत प्रामुख्याने पूर परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण याठिकाणी देणे शक्य होणार आहे. तसेच या केंद्रामुळे पाटण तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. राज्य आपत्ती बचाव दलाकरिता आणि प्रस्तावित पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी अशी एकूण २६४ पदांसाठी २७१.४१ कोटी रुपयांच्या खर्चासदेखील यावेळी मान्यता देण्यात आली.

अमेरिकन राजदूतांना आवडला वडापाव!

अमेरिकेसोबत वाणिज्यिक संबंध दृढ करण्यावर महाराष्ट्राचा भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १६: महाराष्ट्रात कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात मोठी संधी असून अमेरिकेने या क्षेत्रात सहकार्य करावे. अमेरिकेसोबत महाराष्ट्राचे वाणिज्यिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृह येथे यावेळी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव मनोज सौनिक यावेळी उपस्थित होते.

हॉलिवूडमधील व्यक्तिमत्वाचे बॉलिवूडमध्ये स्वागत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. शिंदे  यांनी श्री. गारसेट्टी यांचे स्वागत केले. भारत-अमेरिका दोन्ही देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, संपर्क क्षेत्रात वाणिज्यिक संबंध आहेत. थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर असून राज्यातील कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणुकीची संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बदलते हवामान हे शेती क्षेत्रासमोर मोठे आवाहन असून त्यासाठी अमेरिकेने तांत्रिक सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी मुंबईत सुरू असलेले विविध प्रकल्प, महिला सक्षमीकरण, बचत गटांची चळवळ आदीबाबत चर्चा झाली.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये जी २० देशांच्या बैठका सुरू आहेत. त्यासाठी मुंबई महानगरी सजली असून सुमारे एक हजारांहून अधिक ठिकाणी सौंदर्यीकरणाचे प्रकल्प सुरू असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी  सांगितले. मुंबईत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला सुरूवात झाली असून दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी शिष्टमंडळासाठी देण्यात आलेल्या अल्पोपहारामध्ये महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश होता.. श्री. गारसेट्टी खवय्ये असल्याने खासकरून मुंबईची ओळख असलेल्या वडापावदेखील होता. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अमेरिकन राजदूत यांना वडापाव खाण्याचा आग्रह केला. मुख्यमंत्र्यांनी केलेला आग्रह स्वीकारत श्री. गारसेट्टी यांनी वडापाव खाल्ला आणि आवडल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली.

यावेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. एस. कुंदन, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांच्यासह अमेरिकन शिष्टमंडळामध्ये मुंबईतील वाणिज्यदूत माईक हॅंकी, क्रिस ब्राऊन, प्रियंका विसारीया-नायक आदी उपस्थित होते.

संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव, शिंदे गटाचे आमदार शिरसाट यांच्याकडून दाखल

मुंबई-शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर बेताल आरोप केले. त्यांच्या अधिकारावर शंका घेऊन जनमानसात विधानसभा अध्यक्षांची पर्यायाने विधिमंडळाची प्रतिमा खराब केल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे.महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. आमदार अपात्रतेचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आला. त्यानंतर संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात आरोपाच्या फैरी झाडणे सुरू केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण पेटले आहे.

संजय शिरसाट यांनी आपल्या प्रस्तावात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाचे नेते, राज्यसभा सदस्य संजय राऊत हे महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री तसेच शिवसेनेच्या आमदारांबद्दल अतिशय वाईट शब्दांत टीका करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार हे घटनाबाह्य, बेकायदेशीर असल्याचा कांगावा राऊत हे गेल्या अनेक दिवसांपासून करीत असून, आता अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राऊत हे सन्माननीय विधानसभा अध्यक्षांवर बिनबुडाचे आणि बेताल आरोप करीत आहेत.

संजय शिरसाट यांनी प्रस्तावात म्हटले आहे की, भारतीय संविधानाने विधानसभा अध्यक्ष यांना व्यापक, नियमनात्मक, प्रशासकीय आणि न्यायिक अधिकार दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष हे विधानमंडळ आणि विधानसभा सचिवालयाचे प्रमुख, पीठासीन अधिकारी असतात. विधानसभा अध्यक्षांना घटना, कार्यपद्धती, नियम आणि संसदीय परंपरांच्या अंतर्गत अधिकार आहेत. कायदेमंडळाच्या अध्यक्ष या नात्याने विधानसभा अध्यक्ष हे न्यायाधीशांच्या भूमिकेत असतात. विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात देखील आव्हान देता येत नाही. इतके अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिलेले असतात. अशा परिस्थितीत विधानसभेच्या अध्यक्ष पदावर नियुक्त व्यक्तीवर खासदार संजय राऊत यांच्याकडून होत असलेले आरोप गंभीर आहेत.संजय शिरसाट यांनी प्रस्तावात म्हटले आहे की, विधानसभा अध्यक्ष हे विधिमंडळाच्या कार्यप्रणालीत कोणत्याही पक्षाचे नेतृत्व करीत नाहीत किंवा त्यांना कोणत्याही पक्षाची झालर लागलेली नसते, तर ते सर्वच पक्षांचे विधिमंडळातील पीठासन अधिकारी असतात. त्यामुळे त्यांच्यावर खोटे, बेफाम आरोप करून जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन करण्याबरोबरच विधिमंडळाचे पावित्र्य धोक्यात आणण्याचे काम राऊत हे करीत आहेत. त्यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांवर केले जाणारे आरोप हे यांना धमकावण्यासाठी केले जात असून अध्यक्षपदाची मानहानी करीत आहेत.संजय शिरसाट यांनी प्रस्तावात म्हटले आहे की, राऊत यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न होत असून, तो हक्कभंग या प्रकारात मोडत असल्याची आमची धारणा आहे. विधानसभा अध्यक्ष या नात्याने आपल्यावर संजय राऊत यांच्याकडून होणारे आरोप, या पदाची च्याकडून केली जाणारी मानहानी, अपमान या सर्व गोष्टींचा विचार करता संजय राऊत यांच्याविरुद्ध विधानसभेत हकभंग दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आता विधानसभा अध्यक्ष यावर काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेचे इमारत पुनर्विकास धोरण

मुंबई-मागासवर्गीय व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यासाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण जाहीर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींचे बांधकाम होऊन जवळपास ५५ ते ६० वर्षे कालावधी लोटला आहे.  बहुतांश इमारती मोडकळीस आलेल्या असून त्या धोकादायक बनल्या आहेत.  अशा संस्थांच्या इमारतींचा पुनर्विकास होणे अत्यंत आवश्यक आहे.  राज्य शासनाने १९४९ ते १९६९ व त्यापुढील कालावधीत पोस्ट वॉर रिहॅबिलिटेशन-२१९ ही योजना सुरु केली.  या योजनेत मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थांना भूखंडाचे वाटप केले.  मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरी ठिकाणी त्यांना निवारा उपलब्ध होऊन पक्की आणि सोयीसुविधांची घरे मिळावी आणि त्यांचे जीवनमान उंचवावे असा यामागील हेतू होता.

आता या नवीन धोरणामुळे अशा इमारतींच्या पुनर्विकासाबाबत यापूर्वी शासनाने काढलेले सर्व शासन निर्णय रद्द झाले असून नव्या धोरणाप्रमाणे कार्यवाही केली जाईल.  अशा संस्थांमध्ये मूळ सभासदांच्या बाबतीत ९० टक्के मागासवर्गीय व १० टक्के अमागासवर्गीय हे प्रमाण जैसे थे ठेवून पुनर्विकासानंतर निर्माण होणाऱ्या अतिरिक्त सदनिकांमध्ये मागासवर्गीयांचे प्रमाण २० टक्के व अमागासवर्गीयांचे प्रमाण ८० टक्के राहील.

पुनर्विकासाकरिता प्राप्त होणारे सर्व प्रस्ताव म्हाडामार्फत सामाजिक न्याय विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतील.

“हिंदू कुंभकर्णाचे बाप…”, कर्नाटकमधील भाजपच्या पराभवानंतर शरद पोंक्षेंची आगपाखड!

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने १३५ जागा जिंकत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा दणदणीत पराभव केला आहे. या निवडणुकीत भाजपाला केवळ ६६ जागा जिंकता आल्या. २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील पराभव हा भाजपाला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.अभिनेते आणि व्याख्याते शरद पोंक्षे यांनी एक ट्वीट केलं आहे. “असं वाटं हिंदू कुंभकर्णाचे बाप आहेत. जागेच होत नाहीत,” असं शरद पोंक्षे यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे. पोंक्षे यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर आता काही ट्विटर वापरकर्ते प्रतिक्रिया देत आहेत. त्यांची ही प्रतिक्रिया कर्नाटक निवडणुकीशी जोडली जात आहे. 

या ट्वीटबरोबर शरद पोंक्षे यांनी अन्य एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी एका एका मुस्लीम नेत्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. संबंधित मुस्लीम नेता कर्नाटकच्या मंत्रिमंडळात मुस्लीम नेत्यांना महत्त्वाची पदं द्यावीत आणि कर्नाटकचा उपमुख्यमंत्री मुस्लीम असावा, अशी मागणी मुस्लीम नेता करत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना शरद पोंक्षे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “हिंदूंनो अजूनही जागे व्हा, वेळ गेलेली नाही .काँग्रेसला निवडून दिल्याची परतफेड म्हणून काय मागतायत पाहा. जागे व्हा हिंदूंनो…”

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाने हिंदू मतदारांना साद घालण्यासाठी विविध हिंदू मुद्द्यांवर मतं मागण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अगदी हिजाब बंदीपासून, मुस्लीम आरक्षण हटवणे, बजरंग बली, बजरंग दलअशा विविध मुद्द्यांचा समावेश होता. असं असूनही या निवडणुकीत धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाचे मुद्दे फारसे चालले नसल्याचं निवडणूक निकालातून दिसून आलं.

आळंदी देवाची येथे लवकरच अन्नछत्र सुरू करणार -:बाबा कांबळे

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून आल्याबद्दल नानासाहेब आबनावे यांचा आळंदी येथे सत्कार सोहळा संपन्न,

आळंदी देवाची येथे भव्य संत रोहिदास महाराजांचे भव्य मंदिर उभारण्यासाठी पाठ पुरवठा करू :- ज्ञानेश्वर कांबळे,

समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा उन्नतीसाठी प्रगतीसाठी वारकरी मंडळींनी साथ द्यावी एकजुटीने काम करावे :-सूर्यकांत गवळी,

पुणे – आळंदी देवाची येथे धार्मिक शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी येत असून त्यांची व इथे येणाऱ्या भाविक भाविकांची उपासमार होत असून त्यांनी जेवण्याची व्यवस्था व्हावी या साठी समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा आळंदी देवाची येथे रोज ५००, लोकांसाठी जेवनाची करण्याच्या प्रयत्न असून लवकरच अन्नछत्र सुरू करणार आहोत, मी स्वतः आळंदी मध्ये धार्मिक शिक्षण घेतले असून, मधुगिरी व भिक्षा मागून मी आयुष्य जगलो आहे त्याकाळी एक वेळ उपाशी राहून आम्ही शिक्षण घेतले, मराठवाडा, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातून आजही अनेक विद्यार्थी आळंदीमध्ये कीर्तनकार होण्यासाठी व धार्मिक शिक्षण घेण्यासाठी येतात परंतु आर्थिक परिस्थितीमुळे वारकरी विद्यार्थ्यांवरती उपाशी राहण्याची वेळ येऊ नये, यासाठीही अन्नछत्र सुरू करणार आहे असे यावेळी बाबा कांबळे म्हणाले,

समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा आळंदी देवाच्या वतीने आळंदी येथे विशेष सर्वसाधारण सभा व कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल नानासाहेब आबनावे व धर्म शाळेतील सभा मंडप पत्रा शेड कामकाज पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरवठा केल्याबद्दलयांचा श्रीरंग आबनावे यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाबा कांबळे उपस्थित होते यावेळी आपले अध्यक्ष भाषणात यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संत रोहिदास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, ग्राहक संरक्षण समितीचे माजी अध्यक्ष सूर्यकांत गवळी हवेली पंचायत समितीचे माजी सभापती किसनराव गाडेकर, दलित मित्र सुदाम लोखंडे, राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकार संघाचे अध्यक्ष सुरेश पोटे, दिंडी नंबर 24 चे अध्यक्ष सुरेश सोनवणे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक उत्तम सोनवणे, धर्मशाळेचे वरिष्ठ उपाध्याध श्रीरंगदादा अबणावे, दिल्ली नंबर 24 चे विनय करी ह भ प रामकृष्ण खाडे महाराज,जयदेव ईश्वर, विकास वाघमारे, व्यासपीठावरती उपस्थित होते,

लवकरच आळंदी देवाची येथे आषाढी वारी सुरू होत असून आषाढी वारीच्या निमित्ताने दिंडी नंबर 24 चे नियोजन भोजनाची व्यवस्था व इतर व्यवस्था याबद्दल देखील यावेळी चर्चा करण्यात आली, संत ज्ञानेश्वर मंदिर मध्ये अधिक गर्दी होऊ नये यासाठी वारकऱ्यांची संख्या कमी करण्यासंदर्भात शासन नुकतेच दिंडी प्रमुखांना काही बंधन घालत आहे शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करण्याचे सूचना देखील या मीटिंगमध्ये करण्यात आले,

यावेळेस सत्कारस उत्तर देताना नानासाहेब आबनावे म्हणाले हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती वरती मी आणि आमचे एक सहकार्य निवडून आले बाकी सर्व पॅनल विरोधी गटाचा आला मी काम केलं आणि माझा जनतेशी संपर्क होता म्हणून मी निवडून आलो वारकरी संप्रदायाच्या वतीने हा जो माझा सन्मान होत आहे हा घरचा सन्मान आहे मी या सन्मानाबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो,

यावेळी ज्ञानेश्वर कांबळे म्हणाले आळंदी ही पवित्र आणि पावन भूमी आहे , संत परंपरेने समाजातील चुकीचा परंपरा रूढी वरती प्रबोधन करून समाज सुधारण्याचे काम केले आहे या ठिकाणी सर्व संतांचे धर्मशाळा व मंदिर आहेत संत रोहिदास महाराज यांचे देखील या ठिकाणी भव्य असे मंदिर उभे राहावे यासाठी सर्व मिळून प्रयत्न कर,

सूर्यकांत गवळी म्हणाले समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या अगदी समोर आहे. धर्मशाळेचा विकास व्हावा यासाठी आपण प्रयत्न करूया, यासाठी समाजातील एकोपा महत्त्वाचा आहे सर्वांनी एकजुटीने काम केल्यास हे शक्य आहे,

श्रीरंग आबनावे म्हणाले मी गेल्या पंधरा वर्षापासून या संस्थेचा अध्यक्ष आहे या काळात आम्ही खूप काम केले लाखो रुपये एफडी स्वरूपात बँकेत ठेवल्या इमारतीचे काम केले वारकऱ्यांची सेवा केली आता नवीन तरुणांकडे सूत्र देत असून बाबासाहेब कांबळे हे अध्यक्ष झालेले आहेत ते धर्मशाळेचा चांगल्या पद्धतीने विकास करतील असे आम्हाला अपेक्षा आहे यामुळे त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे,

यावेळी समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा वरती नियुक्त झालेल्या नवनिर्वाचित विश्वस्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये, अध्यक्ष बाबासाहेब कांबळे, कार्याध्यक्ष नानासाहेब आबनावे, उपाध्यक्ष श्रीरंगदादा आबनावे,सुरेश गाडेकर, तुषार नेटके, डॉ किसन कांबळे,सचिव अनिल सातपुते, खजिनदार बबनराव पटेकर, सहखजिनदार सोपान गवळी, सुरेश सोनवणे श्रीभाऊ काळे, सुखदेव सूर्यवंशी, नंदकुमार सोनवणे,संतोष पाचारणे, सुखदेव आबनावे, सुभाष जाधव, दत्तात्रय शिंदे, मनोहर सोनटक्के, भारती चव्हाण, सोनाली देशमुख खरात, अनुपमा नेटके, मधुरा डांगे, आदींचा यावेळी शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला,कार्यक्रमाच्या संयोजनासाठी, धर्मशाळेचे पुजारी नारायण गाडेकर, गणेश नेटके, विश्वनाथ नेटके, दीपक कांबळे, सूर्यकांत भोसले, बाबासाहेब हनवते, दत्तात्रय खाडे, यांनी परिश्रम घेतले.

राज्यातून बाराशे प्रतिनिधी भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या पुण्यातील बैठकिला उपस्थित राहणार

पुणे-भाजप प्रदेश कार्यकारिणीची येत्या गुरुवारी (18 मे) पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आज पत्रकारांना दिली.मुळीक म्हणाले, या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. त्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मार्गदर्शन होणार आहे. बैठकीनंतर सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या स्वतंत्र बैठका होणार आहेत.

मुळीक म्हणाले, या बैठकीसाठी राज्यातून बाराशे प्रतिनिधी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. बैठकीत विविध संघटनात्मक आणि राजकीय ठराव संमत करण्यात येणार आहेत.मुळीक पुढे म्हणाले, या बैठकीच्या निमित्ताने पुणे शहर भाजपच्या वतीने विविध व्यवस्थांचे नियोजन आणि वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयारीसाठी विविध विभागांच्या बैठका सुरू आहेत.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी प्रसाद कांबळी आणि प्रशांत दामले यांच्यात चुरस रंगली होती. परिषदेच्या राज्यभरातील 60 सदस्यांनी यासाठी मतदान केले होते. नाट्यपरिषदेचे अध्यक्षपद प्रशांत दामले यांनी जिंकलेले आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली होती. या निवडणुकीत प्रसाद कांबळी यांचे ‘आपलं पॅनल’ आणि प्रशांत दामले यांचं ‘रंगकर्मी समूह’ या दोन गटांमध्ये चांगलीच चुरस रंगली. अखेर या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी समूहा’चे दहा उमेदवार निवडून आले. दुसरीकडे प्रसाद कांबळी यांच्या पॅनलचे चार उमेदवार नियामक मंडळावर निवडून आले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 11 जणांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. यात सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संदीप तेंडुलकर, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा कार्यकारिणीत समावेश आहे.

2018 ते 2023 या कार्यकाळात मोहन जोशी आणि प्रसाद कांबळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. प्रसाद कांबळी यांच्या ‘आपलं पॅनल’ने मोहन जोशी यांचा पराभव करत विजय मिळवला होता. कांबळी यांनी पाच वर्षे नाट्य परिषदेचा कारभार करताना त्यांच्यावर अनेक आरोप झाले होते. त्यांना पदावरून काढण्यासाठी अनेक खलबतं केली गेली. परंतु कांबळी यांनी शेवटपर्यंत या आरोपांच्या विरोधात लढा दिला. याउलट पूर्वी कशा पद्धतीने गैरव्यवहार चालायचे हे देखील त्यांनी उघड केले होते. पण यंदा प्रशांत दामलेंच्या पॅनलने त्यांचा पराभव केला आहे.