Home Blog Page 1537

मविआचा 1 पक्ष भाकरी फिरवणारा, दुसरा तुकडे करणारा, तिसरा भाकरी हिसकवणारा – फडणवीस

पुणे-

वज्रमुठीचे प्रमुख शरद पवार यांनी त्यांच्या ‘ लोक माझे सांगती ‘ पुस्तकातून वज्रमुठीच्या चेहऱ्याबाबत (उद्धव ठाकरे) सत्य परिस्थिती सांगितली. कशाप्रकारे मुख्यमंत्री असताना ते काम करत नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितले. जेव्हा आम्ही तेच सांगत होतो तेव्हा, आम्हाला महाराष्ट्र द्रोही ठरवत होते. मविआतील एक पक्ष भाकरी फिरवणारा,दुसरा भाकरीचे तुकडे करणारा आणि तिसरा संपूर्ण भाकरी हिसकवणारा आहे. जनतेला भाकरी देणारा एकमेव पक्ष म्हणजे भाजप असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरवारी व्यक्त केले.

भारतीय जनता पक्ष महारष्ट्र आयोजित प्रदेश कार्य समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

निकालानंतर शंकेचे कारण नव्हते

फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शंका राहण्याचे कारण नव्हते. परंतु ”उद्धवजी तुमचा पोपट मेला, हे त्यांना कोणी सांगायलाच तयार नाही.” त्यांनी 8 मागण्या केल्या होत्या त्यापैकी एकही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मनात शंका ठेवू नका. पोपट मेला असून सध्याचे हे सरकार संविधानिक आहे.त्यामुळे हे सरकार जाणार नाही, पुढचं सरकारही आपलेच येणार आहे.

कर्नाटकातील पराभवाने काहींना उकळ्या

देवेंद्र फडणवीस म्हणाले, कर्नाटक मध्ये आपला पराभव झाल्यानंतर काही लोकांना उकळ्या फुटत आहेत. ज्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही ते देखील बोलत आहेत. दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून आनंद साजरा करत आहेत. कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात आणता येणार नाही. इथे एकच पॅटर्न चालणार तो म्हणजे मोदी पॅटर्न. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील 28 पैकी 25 जागा भाजप जिंकेल.

ठाकरेंनी खुर्चीसाठी विचार सोडला

देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी विचार सोडला मात्र, एकनाथ शिंदेंनी विचारासाठी खुर्ची सोडली. पुढची कोणतीही निवडणूक असू देत, भाजप शिवसेना युतीच जिंकणार आहे. कार्यकर्त्यांनी आगामी एक वर्ष पक्षासाठी द्यायचे आहे.पक्षाने मला काय दिले हे विचारण्यापेक्षा मी पक्षाला काय देणार याचा विचार करायचा आहे. त्यामुळे एक वर्षभर कोणी काही पद मागू नका,समर्पण आवश्यक आहे. कार्यकर्त्यांनी मी काय करायचे ते तुम्ही सांगा मी करायला तयार आहे. तुम्ही म्हणत असाल तर म्हणाल तो त्याग करायला तयार आहे. तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे. एक वर्षाने त्याचे योग्य मूल्यमापन झाल्याशिवाय राहणार नाही.

असे चालणार नाही

देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्यावर दाखल खटल्यावर भाष्य केले. ते म्हणाले, खासदार संजय राऊत यांनी जामीन मिळाला तर लोकशाहीचा विजय आणि नवाब मलिकांना जामीन मिळाला नाही तर लोकशाहीची हत्या हे चालणार नाही.

अॅलेन करियर इंस्टीट्यूटने रु.१.२५ कोटी रोख पारितोषिकआणि रु.२५० कोटीची शिष्यवृत्ती प्रदान करण्याच्या घोषणेसह जाहीर केले टॅलेंटेक्स २०२४

पुणे-

टॅलेंटेक्स २०२४ इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुले आहे आणि राष्ट्रीय क्रमवारी, मान्यता, रोख बक्षिसे, शिष्यवृत्ती, आणि इतर अनेक फायदेमिळवण्याची संधी देते(शहर), मे 17,२०२३: भारतातील अग्रगण्य शिक्षण संस्था अॅलेन करियर
इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेडने (“अॅलेन करियर इंस्टीट्यूट” किंवा “अॅलेन”)२०२४ सालच्या टॅलेंटेक्स परीक्षेची दहावी आवृत्ती जाहीर केली. टॅलेंटेक्स इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करता यावे आणि त्यांना कोचिंग फीमध्ये सवलत देऊन त्यांची स्वप्ने साध्य करता यावे यासाठी एक व्यासपीठ आहे. www.tallentex.com या संकेतस्थळाच्या लॉंचमुळे आधीच देशभरातील विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. अर्जाची पहिली मुदत जून ३०, २०२३ आहे.परीक्षा एकाच टप्प्यात ऑफलाइन घेतली जाईल. ठराविक क्षेत्रांप्रमाणे(झोन) परीक्षा २९ ऑक्टोबर आणि ५ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहेत. राष्ट्रीय आणि राज्य क्रमवारीच्याआधारे रु.२५०कोटी रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाईलआणि प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्पर्धात्मक यश निर्देशांक (CompetitiveSuccess Index) जारी केला जाईल, यामुळे जर ते जेईई (JEE), नीट(NEET) सीए(CA) आणि सीएस (CS) सारख्या परीक्षांना बसले असतील तरत्यांना त्यांच्या राष्ट्रीय क्रमवारीचा अंदाज येईल. याशिवाय विद्यार्थ्यांच्या
करिअर विकासासाठी अत्यंत मौल्यवान असे सहाय्य प्रदान करून गुणवत्तेच्याआधारे १.२५ कोटी रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती आणि रोख बक्षिसे दिली जातील.टॅलेंटेक्स २०२४ ची घोषणा एक पुस्तिका, संकेतस्थळ आणि पोस्टरच्या विमोचनासह एक कार्यक्रमात अॅलेन करियर इंस्टीट्यूटचे संचालकडॉ श्री. गोविंद माहेश्वरी, डॉ. श्री. नवीन माहेश्वरी, डॉ. श्री. ब्रजेश माहेश्वरी
यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
टॅलेंटेक्सबाबत बोलताना अॅलेन करियर इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेडचे चेअरमन डॉ. श्री. ब्रजेश माहेश्वरी म्हणाले, “टॅलेंटेक्स हे संपूर्ण देशभरातील हुशार व कुशल विद्यार्थ्यांना ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एकमहत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी हजारो समवयस्कांशी निरोगी स्पर्धेद्वारे त्यांच्या शैक्षणिक क्षमतेची चाचणी घेऊ
शकतात.”टॅलेंटेक्सचे राष्ट्रीय प्रमुख श्री. पंकज अग्रवाल यांच्या मते, “ज्या विद्यार्थ्यांनी आधीच अॅलेनच्या क्लासरूम कोर्समध्ये प्रवेश घेतला आहे ते देखील परीक्षेत बसण्यास पात्र आहेत. इच्छुक विद्यार्थी www.tallentex.com या संकेत स्थळाला भेट देऊन ऑनलाइन किंवा त्यांच्या जवळच्या अॅलेन केंद्रावरजाऊन व तेथे प्रत्यक्ष फॉर्म भरून परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात. विद्यार्थ्यांनापरीक्षेची तयारी करण्यास मदत करण्यासाठी विनामूल्य सराव प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध असतील. परीक्षा एनसीइआरटी (NCERT) अभ्यासक्रमावर आधारित असेल आणि त्यात भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, गणित, जीवशास्त्र आणि तार्किक मानसिक क्षमता चाचणी या विषयांचे बहूनिवड आणि पूर्णांक प्रकारचे (इंटिजर) प्रश्न असतील.”

अॅलेन टॅलेंटेक्स ही देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा (National Talent Search Examination) आणि ऑलिम्पियाड स्तराची परीक्षा आहे. परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेचे मूल्यांकन करण्याची आणि राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसाठी स्वतःला तयार करण्याची संधी देणारी परीक्षा आहे. या परीक्षेचा निकाल आणि पारितोषिक वितरण नोव्हेंबर
महिन्यामध्ये सक्सेस पॉवर सेशनच्या स्वरूपात जाहीर केला जाईल.

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर हल्ला करत रोकड लांबवणारे पकडले

पुणे-सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील भूमकर चौक येथील डी.के.डी. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना कुऱ्हाडीचे वार करत गंभीर जखमी करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या सिंहगड रोड पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दहा महिन्यांपूर्वी हा गुन्हा घडला होता.ऋषिकेश रमेश कदम (वय २३ वर्षे रामाऊली कृपा बिल्डींग,चरवड वस्ती, वडगाव) असे आरोपीचे नाव आहे. त्याने सांगितलेल्या माहितीनुसार मानस सिताराम पिसे (वय २३, पठार वस्ती, वडगाव) याला भूम (जि. उस्मानाबाद ) येथे जाऊन पकडण्यात आले.येत्या १९ मेपर्यंत न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी दिली आहे.

गेल्या वर्षी २३ आॅगस्ट या पहाटे दीड ते पावणेदोनच्या दरम्यान दोन जणांनी पेट्रोल पंपावरील कामगारांना गंभीर जखमी करून २०,४०० रुपये चोरी करून नेले होते. या गुन्हयातील दोन आरोपींचा सिंहगड रोड पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी व अंमलदार शोध घेत होते.परिसरामधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करूनही आरोपींचा काही धागादोरा हाती येत नव्हता. तब्बल १० महिन्या नंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आबा उतेकर व क्षीरसागर, ओलेकर या पोलीस कर्मचाऱ्यांना १४ मे रोजी माहिती मिळाली की पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी जबरदस्तीने घुसून मारहाण करुन चोरी करणाऱ्या दोघांपैकी एक हिंगणे चौक येथे आला असून हिरव्या रंगाचा फुल शर्ट व चॉकलेटी रंगाची पॅन्ट घातलेली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना ही माहिती कळविली असता त्यांनी वरिष्ठांना सांगितली. पोलिसांना पाहून संशयित गडबडीत पळून जावू लागला. त्यास पकडून चौकशी करण्यात आली व अटक करून साथीदाराचा माग काढण्यात आला. दोघांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता १९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, पश्चिम प्रादेशिक विभाग सह आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त परीमंडळ -३ सुहेल शर्मा, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन , पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, अमित बोडरे, राजाभाऊ वेगरे, विकास बांदल, विकास पांडुळे, अमोल पाटील, सागर शेंडगे, देवा चव्हाण, स्वप्नील मगर, अविनाश कोंडे, दक्ष पाटील यांच्या पथकाचा त्यात समावेश होता.

‘मॉडेलिंग क्षेत्रात या…हजारो रुपये कमवा’, असे सांगून पुण्यातील तरुणांची फसवणूक,

पुणे : मॉडेलिंग क्षेत्रात कामाची संधी तसेच दररोज पाच ते सात हजार रुपये कमवा, अशी जाहिरात समाजमाध्यमात प्रसारित करून युवक-युवतींची फसवणूक केल्याचा प्रकार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी २३ जणांकडून पैसे घेऊन त्यांची ४३ लाख ९३ हजार रूपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी श्रद्धा चंद्रकांत अंदुरे, योगेश मदनलाल मुंदडा (दोघे रा. छत्रपती संभाजीनगर), जय पंकज चावजी, शुभम जयप्रकाश पगारे, अनिरुद्ध बिपीन रासने (रा. कोथरुड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका युवतीने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युवती रंगभूषाकार आहे. माॅडेलिंग क्षेत्रात कामाची संधी असल्याचे आमिष दाखविणारी जाहिरात समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात आली होती. रंगभूषाकार, केशरचना, छायाचित्रकारांना माॅडेलिंग क्षेत्रात कामाची संधी असल्याचे आमिष दाखविण्यात आले होते. दररोज पाच ते सात हजार रुपये मिळतील,असे त्यांना सांगण्यात आले होते. तक्रारदार युवतीने श्रद्धा अंबुरेची भेट घेतली. तेव्हा आमच्या कंपनीला काम मिळाले आहे. त्यासाठी काही पैसे भरावे लागतात. तीन महिन्यांसाठी चार हजार ४२५ रुपये आणि दोन वर्षांसाठी १७ हजार रुपये भरावे (सबक्रिप्शन) लागतील, असे तिला सांगण्यात आले होते. त्यानंतर युवक-युवतीचा समूह तयार करण्यात आला. त्यांना द पुणे स्टुडिओ येथे बोलाविण्यात आले. २१ मार्चपासून काम सुरू होणार असल्याची बतावणी त्यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर कंपनी आर्थिक अडचणीत असून काम मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रार देण्यात आली. आतापर्यंत २३ जणांची ४३ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रार अर्ज पोलिसांकडे दाखल झाले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

शेअर मार्केटमध्ये मोठा ब्रोकर असल्याचे सांगत 25 लाख रुपयांचा गंडा; राजस्थानच्या भामट्याला पकडले

पुणे-

शेअर मार्केटमध्ये मोठा ब्रोकर असल्याचे भासवून युट्युब चॅनेलच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आकर्षित करून ,शेअर मार्केटमध्ये त्याच्यामार्फत गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठ्या प्रमाणात नफा मिळेल असे आमिष दाखवून पुण्यातील एका तरुणाची 25 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.

याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी राजस्थानमधील अल्वर येथील मिलन जिनेन्द्र जैन ( वय – 26) यास अटक केले आहे. बुधवारी आरोपीस न्यायालयात हजर केले असता, 22 मे पर्यंत आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

याबाबत सायबर पोलीस ठाण्यात रणवीर राजेंद्र जाधव( वय -26 , रा.सिंहगड रोड, पुणे) यांनी तक्रार दाखल केलेली आहे. सदरचा प्रकार ऑक्टोबर 2019 ते फेब्रुवारी 2022 यादरम्यान घडलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मिलन जैन शेअर मार्केटमध्ये मोठा ब्रोकर असल्याचे सांगून त्याचे युट्युब चॅनेलच्या माध्यमातून तशा प्रकारचे व्हिडिओ प्रसारित करून लोकांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करत होता.

त्याच्या ट्रेडिंग विथ एप्रि या कंपनीच्या माध्यमातून, त्याच्याकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देतो असे सांगून, त्यानी तक्रारदार यांच्याकडून 25 लाख दहा हजार रुपये घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारचा नफा व त्यांची मूळ रक्कम परत न देता फसवणूक केली आहे.अशाप्रकारे आरोपीने देशभरात इतर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याबाबत पुढील तपास सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अनिल डफळ हे करत आहेत.

नैराश्य, एकटेपणाने ग्रासलेल्यांसाठी ‘साथी हाथ बढाना’तर्फे ‘लिसनिंग पोस्ट’

पुणे : नैराश्य, भावनिक तणाव आणि एकटेपणाने ग्रासलेल्यांना आधार देण्यासाठी कार्यरत असलेल्या साथी हाथ बढाना या संस्थेतर्फे ‘लिसनिंग पोस्ट’ उपक्रमाची हेल्पलाईन पुन्हा एकदा सुरु झाली आहे. विनामूल्य हेल्पलाईन क्रमांक ९३७३३३९१६२ असा असून, रोज दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत विनामूल्य कॉल करता येणार आहे. तसेच प्रत्यक्ष भेटीसाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी सकाळी ११ ते १, तर शुक्रवार आणि शनिवारी सायंकाळी ५.३० ते ८ या वेळेत औंध येथील गायकवाड नगर येथे स्थलांतरित झालेल्या साथी हाथ बढाना संस्थेच्या कार्यालयात संवाद करता येईल.

साथी हाथ बढाना ही स्वयंसेवकांनी एकत्रित येऊन सुरु केलेली संस्था असून, मानसिक व भावनिक तणावाचा सामना करणाऱ्या समाजबांधवांना प्रेरणा देण्यासाठी काम करते. निराशा आणि एकाकीपणाच्या भावनांना प्रतिसाद म्हणून सुरू करण्यात आलेल्या लिसनिंग पोस्टने आतापर्यंत परीक्षेच्या त्रासापासून आणि पालकांच्या दबावापासून ते एकाकीपणा, घरगुती हिंसाचार आणि कामाच्या ठिकाणी तणाव अशा अनेक प्रकारच्या भावनिक त्रासांना समजून घेत त्यांना आधार व पाठिंबा दिला आहे. सर्व वयोगटातील व्यक्तींना निर्णयाची भीती न बाळगता त्यांच्या भावना आणि संघर्ष मोकळेपणाने मांडण्यासाठी ही एक सुरक्षित आणि आश्वासक जागा आहे. येथे होणारी संभाषणे गोपनीय आणि विशेषत: मानसिक आघातातून जात असलेल्यांसाठी खूप मदत करणारे असल्याचे सिद्ध झाले आहे. स्वयंसेवक आधारित असलेल्या या संस्थेत वेगवेगळ्या क्षेत्रातील असून, हेल्पलाईन आणि प्रत्यक्ष संभाषणातून मानसिक आधार देण्याआधी त्यांनी कठोर प्रशिक्षण घेतलेले असते. तसेच त्यांचा ऐकण्याचा सराव घेतलेला असतो. पीडितांना संयमाने ऐकून त्यांचे मन समजून घेण्यात त्यांच्यातील कौशल्य उपयुक्त ठरतात.

‘लिसनिंग पोस्ट’नऊ वर्षे पूर्ण करत असून, अनेक हेल्पलाईनवर तसेच प्रत्यक्ष भेटून लाभ घेतलेल्या व या चक्रातून बाहेर पडलेल्या व्यक्तींनी साथी हाथ बढाना संस्थेत येऊन, ईमेलद्वारे त्यांच्या भावना व्यक्त करत त्यांच्या कठीण काळात दिलेल्या पाठिंब्याबद्दल, आधाराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. या सामाजिक कार्यात स्वयंसेवकांनी सातत्याने सेवा दिली आहे. लिसनिंग पोस्ट ही सेवा पूर्णतः मोफत असून, समाजातील दानशूर व स्वयंसेवकांच्या अर्थसाहाय्यावर आधारित चालते. हे एक असे शांततापूर्ण ठिकाण आहे, जिथे प्रत्येकाला आपल्या कठीण काळात आधार, दिलासा आणि आनंद जाणवतो. कोणताही निष्कर्ष न काढता सहानुभूतीपूर्वक समोरच्याचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यावर भर दिला जातो.  त्यामुळे मानसिक आरोग्याभोवती लागलेला कलंक मोडून काढणे आणि लोकांना गरज पडेल तेव्हा त्यांना मदत घेण्यास प्रोत्साहित करणे आज खूप महत्त्वाचे आहे. साथी हाथ बढाना सोशल फाउंडेशन संस्थेविषयी अधिक माहितीसाठी www.saathihaathbadhana.org या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा आपल्या शंका निरसनासाठी ८४४६१५२९६१ या नंबरवर किंवा reachus@saathihaathbadhana.org या ईमेलवर संपर्क साधावा.

लिसनिंग पोस्ट हेल्पलाईन

– ९३७३३३९१६२ या नंबरवर रोज दुपारी ४ ते ८ या वेळेत कॉल करता येईल

– सोमवार, बुधवार, शुक्रवार रोजी सकाळी ११ ते १, तर शुक्रवार व शनिवारी सायंकाळी ५.३० ते ८ या वेळेत प्रत्यक्ष भेटता येईल

– अपॉइंटमेंट साठी एसएचबी सोशल फाउंडेशन, शॉप १, सिद्धार्थ, गायकवाड नगर, औंध, पुणे-४११००७ येथे भेटावे

– संपर्क: ८४४६१५२९६१ किंवा www.saathihaathbadhana.org

पीओपी मूर्तीतील प्रदूषणकारी घटकाला पर्यायासाठी समिती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई, दि. 17 : पर्यावरणपूरक उत्सव ही आता काळाची गरज आहे. लोकांमध्ये देखील यासंदर्भात मोठी जागृती निर्माण होत आहे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीतील प्रदूषणकारी घटक कमी करणे अथवा इतर काही पर्याय उपलब्ध करण्यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची घोषणा केली, आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई तसेच कोकणातील मूर्तिकार, सार्वजनिक गणेश मंडळे यांची बैठक पार पडली.

मुख्यमंत्र्यांनी आज घोषित केलेल्या समितीत जलसंपदा, ग्रामविकास, पर्यावरण, नगरविकास, विधी व न्याय, या विभागांचे प्रधान सचिव, सदस्य म्हणून तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव हे समितीचे सदस्य सचिव म्हणून असतील. याशिवाय आयआयटी मुंबई, नीरीचे प्रतिनिधी व डॉ. शरद काळे, डॉ. अजय देशपांडे यांना तांत्रिक तज्ज्ञ म्हणून या समितीत घेण्यात येईल. ही समिती अभ्यास करून आपला अहवाल शासनास सादर करेल.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल तसेच इतर मनपा आयुक्तांना मातीच्या मूर्तीकारांना कुठलाही अडथळा येऊ न देता सुलभपणे जागा उपलब्ध करून द्यावी तसेच परवानग्या वगैरे करीता अनेक ठिकाणी धावपळ करण्याची गरज त्यांना भासू नये यासाठी एक खिडकी उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. गेल्या वर्षी मंडप शुल्क माफ करण्यात आले होते, मात्र त्यापूर्वी जे शुल्क आकारले गेले ते मंडळांना परत करण्याचीही कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

उत्साह हवा पण निसर्गाची तोडफोड नको

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, पर्यावरणपूरक गणेशोत्सव व इतर उत्सव साजरे झाले पाहिजेत यावर राष्ट्रीय हरित लवाद, सर्वोच्च न्यायालय यांनी निर्देश दिले आहेत. आपण टप्प्याटप्प्याने याकडे वाटचाल करतो आहोत. कृत्रिम तलावात घरगुती गणेश विसर्जन करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. लोकांचा यासाठी चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मातीच्या मूर्ती, कागदी लगदा वापरून मूर्ती, किंवा पेंढा वापरून देखील मूर्ती मोठ्या प्रमाणावर तयार होत असून लोक देखील अशा मूर्तींना पसंती देत आहेत. पर्यावरणाचा समतोल ठेवला गेला पाहिजे. सण आणि उत्सव साजरे करायचे पण निसर्गाची तोडफोड नको हे तत्व आपण ठेवले पाहिजे. माती आणि शाडूचे मूर्तिकार असो किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती बनविणारे असोत, पर्यावरणाची हानी होऊ नये हे यावर सर्वांचेच एकमत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, उंच मूर्तींचे आगमन जसे आपण सगळे पावित्र्य ठेऊन करतो तसेच त्यांचे विसर्जनही सन्मानपूर्वक आणि पावित्र्य राखून झाले पाहिजे.

गेल्या वर्षीपासूनच आपण आपले सण, उत्सव उत्साहात साजरे करण्यास सुरुवात केली आहे. मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध उठविले, परवानग्या सुलभ केल्या आहेत अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

कृत्रिम तलाव वाढवास्पर्धांचे आयोजन करावे

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृत्रिम तलाव वाढावेत, पर्यावरणपूरक उत्सवासाठी जास्तीतजास्त स्पर्धा घ्याव्यात, चांगली पारितोषिके द्यावीत यासाठी नियोजन करण्याचे निर्देश विविध आयुक्त तथा प्रशासकांना दिले.

याप्रसंगी मुंबई महानगरपलिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी यावेळीही गणेशोत्सवासाठी सुलभ परवानग्या व मूर्तिकारांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगितले. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले की, गेल्या वर्षी मुंबईत ३६ ते ४० टक्के कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. २ लाख घरगुती गणेश मूर्ती आणि १० हजार सार्वजनिक गणेश मंडळे असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रारंभी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव प्रवीण दराडे यांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्यामागची भूमिका तसेच राष्ट्रीय हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रकारांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी आमदार जयंत पाटील, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे कार्यवाह सुरेश सरनोबत उपस्थित होते. प्रशासनातर्फे या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ आदींची उपस्थिती होती.

‘शासन आपल्या दारी’ जिल्ह्यात ३० मे रोजी एकाच दिवशी लाभ वाटपाची शिबीरे

पुणे, दि. १७: ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत नागरिकांना विविध योजनांचे प्रत्यक्ष लाभ वाटपासाठी महसूल यंत्रणेसह ३८ विविध यंत्रणांच्या समन्वयातून येत्या ३० मे रोजी एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यात शिबीरे घेण्यात येणार असून त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत संपूर्ण राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याबाबतची आढावा बैठक दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. बैठकीस उपविभागीय अधिकारी, राजेंद्र कचरे, मिनाज मुल्ला, वैभव नावडकर, स्नेहा किसवे, गोविंद शिंदे, पुणे मनपा उपायुक्त नितीन उदास यांच्यासह सर्व तहसीलदार, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्रीमती कदम म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या अभियानातून जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. महसूल, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, कृषि, महिला व बालविकास, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रोजगार, कामगार, नगरविकास, ऊर्जा, सहकार, विविध विकास महामंडळे यांच्या योजनांचा लाभ या शिबीरातून देण्यात येणार आहे.

पुणे शहर, पिंपरी चिंचवड मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे. लोकप्रतिनिधींना समवेत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करावयाचा आहे. उत्पन्नाचे दाखले, रहिवास, वय, अधिवास दाखले, शेतकरी दाखला, रेशनकार्ड वाटप, आधार कार्ड नोंदणी वा दुरुस्ती यासह विविध विभागांचे प्रत्यक्ष लाभ वाटप या दिवशी करायचे असल्याने त्यापूर्वी चांगली पूर्वप्रसिद्धी करावी. जनतेला माहिती द्यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
000

खेलो इंडिया व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्रासाठी व्हॉलीबॉल प्रशिक्षकाकरीता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. १७: जिल्हास्तरीय खेलो इंडिया व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्रासाठी तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी २९ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

व्हॉलीबॉल प्रशिक्षक पदासाठी उमेदवार ४५ वर्ष वयोगटाआतील असावा. अतिउच्च कामगिरी/ गुणवत्ता असल्यास समितीच्या मान्यतेने ५० वर्ष पर्यंत उमेदवारांना संधी देण्यात येईल. ऑलिम्पिक, आशियायी स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद अधिकृत स्पर्धा सहभाग किंवा पदकप्राप्त आणि प्रशिक्षणाचा अनुभव आवश्यक आहे. जागतिक करंडक स्पर्धा, एशियन चॅम्पियनशीप, साऊथ एशियन स्पर्धा संबंधित खेळाच्या आंतरराष्ट्रीय अधिकृत स्पर्धा सहभाग किंवा पदकप्राप्त आणि प्रशिक्षणाचा अनुभव असावा. राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कारार्थी -प्रशिक्षणाचा अनुभव असावा. एन.आय.एस.पदविका किंवा संबंधित खेळाचे अधिकृत पातळीचे अभ्यासक्रम किंवा बी.पी.एड. एम.पी.एड.सह राष्ट्रीय स्पर्धा पदकप्राप्त आणि प्रशिक्षणाचा अनुभव आवश्यक आहे. राज्यस्तर खेळाडू बीपीएड- एम.पी.एड.सह राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त किंवा राष्ट्रीय स्पर्धेतील पदकप्राप्त आणि कमीत कमी ५ वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सर्व्हे क्र. १९१, ग्यानबा मोझे हायस्कुल समोर, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, पुणे ४११००६ येथे सादर करायचे असून अधिक माहितीसाठी तालुका क्रीडा अधिकारी ए.जी. सोलणकर (९८२२३५६१९७) व क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार (९५५२९३१११९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
0000

राज्य नाट्यस्पर्धेत ‘सफरचंदची बाजी

मनोरंजनातून अंजन घालणारी आशयघन नाटकं हे मराठी रंगभूमीचं बलस्थान राहिलं आहे. असाच एक वेगळा विषय  घेऊन रंगभूमीवर दाखल झालेली ‘सफरचंद’  ही  नाट्य कलाकृती  सध्या चांगलीच गाजतेय. लेखिका स्नेहा देसाई यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि राजेश जोशी या सिद्धहस्त दिग्दर्शकानं बसवलेल्या  या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. नुकत्याच झालेल्या ३३ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेत सफरचंद या नाटकाने प्रथम पारितोषिकासह बाजी मारली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे या पारितोषिकाची घोषणा केली आहे. या नाटकाला रुपये सात लाख  पन्नास हजाराचा पुरस्कार मिळणार आहे.  आतापर्यंत एकूण २१ पारितोषिक पटकवणाऱ्या सरगम आणि अमरदीप संस्थेच्या सफरचंद या नाटकाने झी नाट्य गौरव, मटा सन्मान, माझा पुरस्कार, सांस्कृतिक कलादर्पण, महाराष्ट्र शासन अशा विविध व्यासपीठावर जोरदार बाजी मारली आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील यश आमच्या संपूर्ण टीमसाठी आनंददायी असल्याची भावना निर्माता,दिग्दर्शकांनी व्यक्त केली आहे. 

‘सरगम’ आणि ‘अमरदीप’ निर्मित, ‘कल्पकला’ प्रकाशित,  सफरचंद  या नाटकात एक वेगळा विषय मांडला असून ‘सर्वधर्मसमभाव’ हा चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.  निर्माते भरत नारायणदास ठक्कर, प्रविण भोसले व अजय कासुर्डे यांच्या सफरचंद नाटकाने सगळ्याच बाबतीत आपले वेगळेपण अधोरेखित केले आहे.  फिरता रंगमंच, नेत्रसुखद नेपथ्य,  वातावरणाला साजेसं मधुर संगीत,  यातून जबरदस्त नाट्यानुभव प्रेक्षकांना मिळतो आहे. खुर्चीला खिळवून टाकणारी परिणामकारकता आणि शंतनु मोघे, संजय जामखंडी, प्रमोद शेलार, शर्मिला शिंदें, अमीर तळवडेकर, रूपेश खरे, अक्षय वर्तक, राजआर्यन कासुर्डे या दमदार कलावंतांच्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर हे नाटक सध्या चर्चेचा विषय ठरतंय.  

बाणेर मधील विविध विकासकामांसाठी पालकमंत्री आग्रही

विकासकामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

पुणे-बाणेरमध्ये महापालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध विकासकामांची पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पाहाणी केली. तसेच सुरु असलेली कामे जलदगतीने पूर्ण करावित अशा सूचना नामदार पाटील यांनी यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या. तसेच विकासकामांसाठी निधीची कमतरता असल्यास जिल्हा नियोजन आणि आमदार निधीतून तरतूद केली जाईल, असेही यावेळी आश्वास्त केले.

यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, उमाताई गाडगीळ यांच्या सह रस्ते दिनकर गोजरे, भवन हर्षदा शिंदे, स्मार्ट सिटीचे आरुण गोडबोले, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप कलाटे आदी विभागांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वप्रथम बाणेरमधील सावरकर उद्यानामध्ये महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलाची पाहाणी केली. सदर काम का रखडले आहे, अशी विचारणा नामदार पाटील यांनी भवन विभागाच्या हर्षदा शिंदे यांना केली‌. सदर क्रीडा संकुलासाठी महापालिकेने उपलब्ध करुन दिलेला निधी अपूरा असल्याचे शिंदे यांनी नामदार पाटील यांना सांगितले. त्यावर सदर कामासाठी जिल्हा नियोजन आणि आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वास्त केले.

यासोबतच ज्युपिटर हॉस्पिटल जवळ सुरु असलेल्या दोन पूलाच्या कामाची देखील नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पाहाणी केली. वाहतुकीच्या दृष्टीने दोन्ही पूल महत्वाचे असल्याने सदर कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी बाणेरमधील कलमाडी शाळेसमोर स्मार्ट सिटीने विकसित केलेल्या उद्यानाला नामदार पाटील यांनी भेट दिली. सदर उद्यानाची देखभाल दुरुस्ती योग्य प्रकारे होत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी नामदार पाटील यांच्याकडे केली. त्यावर संबंधित उद्यान हे स्मार्ट सिटीकडून महापालिकेला पूर्णपणे हस्तांतरित झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर नामदार पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्याशी संपर्क साधून सदर उद्यानाची देखभाल दुरुस्तीसाठी तरतूद करावी. तसेच उद्यानासाठी दोन सुरक्षारक्षक नेमण्याची सूचना केली.

बालेवाडी-वाकडला जोडणारा सोपान बाग येथील प्रस्तावित रस्त्याची ही नामदार पाटील यांनी यावेळी पाहाणी केली. सदर प्रस्तावित रस्त्यासाठी खासगी विकासकाला टीडीआर मिळाला आहे. पण तरीही विकासकाने जागा हस्तांतरित केली नसल्याचे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर संबंधित विकासक आणि महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन हे काम मार्गी लावण्याचे आश्वास्त केले.

यानंतर नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी महापालिकेच्या माध्यमातून ६.५० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या मुलींच्या वसतिगृहाची पाहाणी केली. सदर वस्तीगृहाच्या कामाच्या पाहणीनंतर महापालिका आयुक्त आणि समाजकल्याण विभागाचे आयुक्त यांच्याशी बैठक घेऊन मुलींच्या वापरासाठीचे नियोजन करु, असे यावेळी स्पष्ट केले.

ॲप आधारित वाहनांसाठी नियमावली येणार; मसुद्यासाठी नागरिकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. १७: ओला, उबर सारख्या ॲप आधारित वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांच्या प्रचलनासाठी नियमावली तयार करण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे. यासंदर्भात मसूदा तयार करण्यासाठी नागरिकांचे अभिप्राय विचारात घेण्यात येणार असून नागरिकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र शासनाने ओला, उबर व इतर ॲग्रीगेटर कंपन्यांसाठी ॲप आधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना www.morth.nic.in या संकेतस्थळावर जनतेकरीता उपलब्ध आहेत. त्या विचारात घेऊन या वाहनांच्या प्रचलनासाठी नियमावली तयार करण्याची बाब राज्य  शासनाच्या कार्यवाहीखाली आहे. तसेच सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चयक नियमावलीचा मसूदा तयार करण्यासाठी राज्य शासनाद्वारे समिती स्थापन करण्यात आली आहे.

याविषयी नागरिकांनी अभिप्राय/मत dycommr.enf1@gmail.com या ई-मेल पत्त्यावर अथवा संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रत्यक्षरित्या शनिवार दि. २० मे २०२३ पर्यंत सादर करावेत. प्राप्त मते व अभिप्राय विचारात घेऊन सूचना अंतिम करण्याविषयी शासनातर्फे पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (प) यांनी कळविले आहे.

०००

कायद्याची अंमलबजावणी करताना अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांबद्दल राजकीय नेत्यांनी समर्थन देणे अनाकलनीय :अतिक्रमण प्रमुख

पुणे -महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना फेरवाल्यांकडून मारहाण केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी पुणे महापालिकेच्या समाेर . अतिक्रमण विभागाचे अधिकारी,सुरक्षा कर्मचारीयांनी माेठया संख्येने सहभागी होत निषेध सभा घेतली . अनाधिकृत फेरीवाल्यांकडून अतिक्रमण पथकास वारंवार शिवीगाळ व मारहाण करण्यात येते याचा निषेध करत, पाेलिसांनी संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.आम्ही कायद्याची अंमलबजावणी करतो आम्ही तेव्हा जशास तसे उत्तर हि देऊ शकतो असा निर्वाणीचा इशारा देत पोलिसांनी बंदोबस्त द्यायला हवा आणि हल्लेखोरांवर जरब बसवायला हवी तरच शहरात अतिक्रमण कारवाया यशस्वी होतील असे अतिक्रमण प्रमुख माधव जगताप यांनी म्हटले आहे.

यावेळी माध्यमांनी अतिक्रमण प्रमुख माधव जगताप यांना त्यांनी लाथेने उडविलेले एका व्यावसायिकाचे साहित्य याबाबतच्या व्हिडीओ बाबत छेडले आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात जगताप यांच्यावर सोशल माध्यमांतून केलेल्या टीकेकडे लक्ष वेधले तेव्हा जगताप, आणि सभेत आलेले अधिकारी, कर्मचारी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले ,’आमचे कोणीही वैयक्तिक दुश्मन नाही , पण आमच्यावर कायद्याने जबाबदारी काय सोपविली आहे , ती पार पडताना अनेक अडथळे येतात कधी कोणी पोलीस बंदोबस्त देत नाही , कधी कोणी ..ज्यास शक्य ते करते, या सर्वांवर मात करत आम्हाला काम तर करावेच लागते, गरिबांच्या पोटावर परिणाम होईल अशी कारवाई करताना आम्हाला काय वेदना होतात ते आम्हास ठाऊक ,पण बदनामी करायला ,ट्रोल करायला लोक लगेचच पुढे येतात ,प्रत्येकाला मत प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ आहे. पण कुठलाही अल्पसे अपुरे, आवाज नसलेले चित्रीकरण पाहून किमान राजकीय नेत्यांनी तरी प्रतिक्रिया द्यायला नको होती .या मागची पार्श्वभूमी समजावून , किंवा माहिती करून घेऊन नंतर व्यक्त होणे ठीक झाले असते , माझी चूक झाली तर जरूर कारवाई करा , पण अतिक्रमण विभागात काम करणे कितीकाठीन असते ते समजून घ्या ,लोकांवर कितीही वेळा कारवाई करा ते पुन्हा पुन्हा अतिक्रमण करतात शिवाय कारवाई करणारांना बदनाम करतात , आम्हीही माणसे आहोत आम्हालाहि परिवार आहे , चुका करायच्या , बेकायदा काम करायचे आणि वर आमच्यावर अरेरावी करत मारहाण देखील करायची हे कुठवर आमचे लोक सहन करतील ,आम्हीही त्यांना जशास तसे उत्तर देऊ शकतो पण आम्हाला बंधने फार असतात आणि टीकेचे धनी आम्हीच होतो अशीच अवस्था राहिल्याने शहर अतिक्रमण मुक्त होण्यास अडचणी येतात असेही ते म्हणाले .

ज्ञानेश्वर मोळक,विलास कानडे यांची कमतरता भासली

दरम्यान महापालिका कर्मचाऱ्यांवर असो वा आय ए एस अधिकाऱ्यावर असो जेव्हा जेव्हा असे हल्ले लोकांनी, लोक्प्रतीनिधिनी व कार्यकर्त्यांनी केले तेव्हा तेव्हा महापालिका प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होऊ नये म्हणून मोळक ,कानडे यांनी मोलाची कामगिरी बजावली त्यांना क्लास १ /२ /३ अशा अनेक अधिकाऱ्यांनी वेळोवेळी साथ दिली . आज या सर्व अधिकाऱ्यांची कमतरता या निषेध सभेत प्रामुख्याने जाणवली . मोळक ,कानडे निवृत्त झालेले आहेत.

मुंबईला मागे टाकून दिल्ली बनले देशातील सर्वात विसराळू शहर; उबरमध्ये विसरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये झाडू, टीव्ही, कमोड यांचाही समावेश

गुरगाव१७ मे २०२३: उबरने आपला २०२३ सालचा लॉस्ट अँड फाउंड इंडेक्स प्रकाशित केला. उबरमध्ये सर्वात जास्त विसरल्या जाणाऱ्या वस्तूदेशातील सर्वाधिक विसराळू शहरे तसेच उबर रायडर्सचा विसराळूपणा सर्वात जास्त प्रमाणात असतो ते दिवस आणि वेळा अशी तपशीलवार माहिती या इंडेक्समध्ये देण्यात आली आहे.

देशातील विसराळू शहरांच्या यादीत गेली दोन वर्षे पहिल्या स्थानावर असलेल्या मुंबईला मागे टाकून यंदा दिल्लीचा विसराळूपणा वाढला आहे. या यादीत पहिल्या ४ स्थानांमध्ये पहिल्यांदा हैदराबादचा समावेश झाला आहे. २०१९ सालचे देशातील सर्वाधिक विसराळू शहरबंगलोर या यादीत चौथ्या स्थानावर आहे. उबरमध्ये आपली काही वस्तू राहून गेली तर ती परत मिळवण्याचा सहजसोपा उपाय उबर ऍपमध्ये उपलब्ध असल्याची माहिती रायडर्सपर्यंत मजेशीर पद्धतीने पोहोचवणे हा उबरच्या लॉस्ट अँड फाउंड इंडेक्सचा उद्देश आहे.

गेल्या वर्षभरात फोनबॅग्सवॉलेट्स आणि कपडे या वस्तू भारतभरात उबरमध्ये सर्वात जास्त विसरल्या गेल्या. त्यापाठोपाठ पाण्याच्या बाटल्याचाव्या आणि चष्मे व दागिने यासारख्या ऍक्सेसरीज देखील रायडर्स विसरले. झाडूकॉलेजचे ऍडमिट कार्डलहान मुलांचा स्ट्रॉलर या गोष्टी देखील रायडर्स उबरमध्ये विसरतात. एक रायडर तर स्वतःची वॉकिंग स्टिक विसरले होते तर एक जण चक्क मोठा टीव्हीच उबरमध्ये विसरून गेले.

सेंट्रल ऑपरेशन्सचे डायरेक्टर श्री. नितिश भूषण म्हणालेमहत्त्वाचीखूप जवळचीवैयक्तिक वस्तू विसरली हे लक्षात आले की भीती वाटणेगोंधळ उडणे हे आपल्या सर्वांच्याच बाबतीत होते.  पण उबरमध्ये तुम्ही सपोर्टशी संपर्क साधून तुमच्या वस्तू परत मिळवू शकता. उबरमध्ये एखादी वस्तू विसरली गेली तर ती परत मिळवण्याची विनंती ऍपमधूनच करण्याची सुविधा रायडर्सना उपलब्ध करवून देण्यात आली आहे याची आठवण करून देण्यासाठी आम्ही दरवर्षी हा मजेशीर व माहितीपूर्ण सर्व्हे करत असतो. सध्या उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवासाचे दिवस असल्याने रायडर्सना उबरमधील सेवासुविधांची आठवण करून देण्याची ही योग्य वेळ आहे असे आम्हाला वाटते.”

ठळक वैशिष्ट्ये:

  1. शनिवार हा सर्वात आळसाचा दिवस असावा कारण यादिवशी उबरमध्ये वस्तू विसरण्याचे प्रमाण जास्त असते.
  2. उबरमध्ये विसरल्या गेलेल्या आयफोन्सपेक्षा अँड्रॉइड फोन्सचे प्रमाण तीन पट जास्त आहे.
  3. उबरमध्ये विसरल्या गेलेल्या वस्तूंमध्ये लाल रंगाच्या वस्तूंचे प्रमाण जास्त आहे.
  4. संध्याकाळी लोकांचा विसराळूपणा वाढतोवस्तू विसरण्याचे प्रमाण सायंकाळी ७ नंतर सर्वात जास्त आहे.

उबर लॉस्ट अँड फाउंड इंडेक्स इंडिया २०२३ मधील माहितीमधील ठळक मुद्दे:

सर्वात जास्त विसरल्या गेलेल्या अनोख्या वस्तू

1. टीव्ही

2. वेस्टर्न कमोड

3. 3 दुधाची पॅकेटआणि पडदे

4. झाडू

5. कॉलेज ऍडमिट कार्ड

6. चालताना आधारासाठी हातात धरण्याची काठी

7. इंडक्शन स्टोव्ह

8. कौटुंबिक फोटोंचा कोलाज

9. अवजड यंत्रसामग्री

10. प्रिंटेड दुपट्टा (स्कार्फ)

१० सर्वात जास्त विसरल्या जाणाऱ्या सर्वसामान्य वस्तू

  1. फोन
  2. लॅपटॉप बॅग्स
  3. पैशाचे पाकीट
  4. कपडे
  5. हेडफोन्स
  6. पाण्याची बाटली
  7. चष्मा/सनग्लासेस
  8. चाव्या
  9. दागिने
  10. घड्याळ

देशातील पहिली चार सर्वाधिक विसराळू शहरे

  1. दिल्ली
  2. मुंबई
  3. हैदराबाद
  4. बंगलोर

विसराळूपणा सर्वात जास्त असतो असे वर्षातील टॉप तीन दिवस

  1. २६ मार्च
  2. ९ एप्रिल
  3. ८ एप्रिल

विसराळूपणा सर्वात जास्त असतो असे आठवड्यातील टॉप तीन दिवस

  1. शनिवार
  2. रविवार
  3. शुक्रवार

विसराळूपणा सर्वात जास्त असतो असा दिवसातील तीन वेळा 

  1. सायंकाळी ७
  2. रात्री ८
  3. संध्याकाळी ६

या रंगांच्या वस्तू सर्वाधिक विसरल्या जातातपहिले पाच रंग

  1. लाल
  2. निळा
  3. पिवळा
  4. गुलाब
  5. गुलाबी

उबरमध्ये या ब्रँड्सचे फोन सर्वात जास्त विसरले गेले

  1. सॅमसंग
  2. ऍपल
  3. वनप्लस

उबरमध्ये एखादी वस्तू राहिली तर ती परत मिळवण्यासाठी हे करा:

  • “मेनू” चिन्हावर टॅप करा.
  • “युअर ट्रिप्स” वर टॅप करा आणि ज्या ट्रीपमध्ये तुम्ही वस्तू विसरलात ती ट्रिप निवडा.
  • “रिपोर्ट ऍन इश्यू विथ धिस ट्रिप” वर टॅप करा.
  • “आय लॉस्ट ऍन आयटम” वर टॅप करा.
  • “कॉन्टॅक्ट माय ड्रायव्हर अबाउट अ लॉस्ट आयटम” वर टॅप करा.
  • खाली स्क्रोल करा आणि तुमच्याशी ज्यावर संपर्क साधता येईल तो फोन नंबर एंटर करा. “सबमिट”वर टॅप करा
  • तुमचा फोन हरवला असल्यास, त्याऐवजी मित्राचा फोन नंबर एंटर करा.
  • तुमच्या फोनवर रिंग वाजेल आणि तुम्हाला तुमच्या ड्रायव्हरच्या मोबाईल नंबरशी थेट कनेक्ट करेल.
  • जर ड्रायव्हरने फोन उचलला आणि तुमची वस्तू राहिली आहे याची खात्री केली तर ती वस्तू परत मिळवण्यासाठी सोयीचे ठिकाण व वेळ ठरवा. 
  • जर तुम्ही ड्रायव्हरशी कनेक्ट होऊ शकत नसाल तर, नुकसानाची तक्रार करण्यासाठी ‘इन-अॅप सपोर्ट’ वापरा आणि उबर सपोर्ट टीम तुम्हाला मदत करेल.

पाच वर्षांतील मेट्रो प्रकल्पासाठीच्या वाढीव अतिरिक्त विकास शुल्क माफ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १ हजार ९२६ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता

मुंबई, दि. १७: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणाच्या या वर्षांच्या १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता यावेळी देण्यात आली. जुलै २०१८ ते एप्रिल २०२३ या पाच वर्षांच्या काळातील प्राधिकरणाकडून विकास आणि बांधकाम प्रकरणांमध्ये वसुल करण्यात येणारे १०० टक्के अतिरिक्त विकास शुल्क माफ करण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

सह्याद्री अतिथीगृह येथे पीएमआरडीए प्राधिकरणाची दहावी बैठक झाली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी अधिकारी उपस्थित होते.

पुणे मेट्रो लाईन ३ हा महत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प घोषीत केल्याने १८ जुलै २०१८ ते १६ एप्रिल २०२३ पर्यंत मंजूर केलेल्या प्रकरणांमध्ये १०० टक्के वाढीव अतिरीक्त विकास शुल्काच्या थकबाकी वसूली चा प्रस्ताव या बैठकीत चर्चेला ठेवला होता. त्यावर या पाच वर्षांच्या काळातील वाढीव अतिरिक्त विकास शुल्क माफ करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच एप्रिल २०२३ पासून जे अतिरिक्त विकास शुल्क लावले जात आहे, ते सरसकट न लावता क्षेत्रनिहाय देता येईल काय हे तपासण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. माफ केलेल्या वाढीव विकास शुल्काची रक्कम सुमारे ३३२ कोटी एवढी आहे.

यावेळी मोशी पुणे (पीआयईसीसी) येथील अडीच एकर जागा छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेला हस्तांतरीत करण्यासाठीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यासाठी मान्यता देण्यात आली. पीएमआरडीएचा विकास आराखडा २० जूनपर्यंत सादर करण्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजीत करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आल्या यावेळी पुणे रिंग रोड प्रकल्प, प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातून पुणे महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या ११ व २३ गावांचा विकासनिधी त्याचबरोबर महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा उपाययोजना अधिनियम २०२३ ची पीएमआरडीए क्षेत्रात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस पीएमआरडीएच्या क्षेत्रात चालविल्या जातात या महामंडळाला जो तोटा सहन करावा लागतो त्यापोटी १८८ कोटी एकवेळ देण्यास यावेळीमान्यता देण्यात आली. यावेळी प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.