Home Blog Page 1536

युवकांसाठी कौशल्य विकास ही काळाची गरज- भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा

मुंबई

कौशल्य विकासाची आवश्यकता युवकांनी समजून घ्यायला हवी. मागणी आणि पुरवठा यानुसार तरुणाईने कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. कौशल्य विकास ही काळाची गरज आहे. काळाप्रमाणे स्वत:ला बदलणं गरजेचं आहे. गरजेप्रमाणे स्वतःमध्ये बदल करा असे आवाहन भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. गुरुवारी रविंद्र नाट्य मंदिर येथे त्यांनी युवा संवाद कार्यक्रमात मुंबईतील तरुणांशी संवाद साधला. जे. पी. नड्डा हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर आले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार प्रमुख उपस्थित होते. राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीने ‘युवा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले, सध्याचे जग दररोज बदलणारे आहे. आज देश जिथून उभा आहे, त्या देशाच्या भविष्याची चिंता करणे हे आपल्या सर्वांचे काम आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेद्वारे आम्ही १ कोटी १० लाख तरुणांना प्रशिक्षण दिले आहे. स्टार्टअपबद्दल बोलायचे झाले तर आधी देशात चार युनिकॉर्न होते, आज १०० आहेत. हा आपल्या देशाचा आणि युवा शक्तीचा पुरावा आहे. तरुणांनो, कधीही लहान ध्येय ठेवू नका. मोठा विचार करा, तुमच्यासाठी अवकाश खुले आहे. त्याची पायाभरणी आज करूयात. त्याकरिता मोठा विचार करा, स्वतःचे मूल्यमापन करा आणि कालपेक्षा आजचा दिवस कसा चांगला बनवायचा याचा प्रयत्न करा असेही ते म्हणाले. तांत्रिक शिक्षणासाठी कौशल्य विकास महत्वाचा ठरतो. यासाठी आपण कल्पक असणे आवश्यक आहे. काळ बदलला आहे. तंत्रज्ञानाच्या जगात आज भारत प्रगत बनला आहे. डिजिटलायझेशन होत असताना युवक आघाडीवर असला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर विशेष लक्ष वेधले आहे असेही ते म्हणाले. आज युवकांच्या कौशल्य विकासाला बळ मिळाले आहे. खूप अडथळ्यांना तोंड देत हे मिशन पुढे जात आहे. कौशल्य शिकणे, त्यात प्राविण्य मिळवणे आणि त्यात अद्ययावत राहणे महत्वाचे आहे. त्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, येत्या काळात तब्बल तीन लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आमचे लक्ष आहे. सध्याच्या काळात अनेक देशांची आर्थिक व्यवस्था ढासळत असताना आपण जी २० चे अध्यक्ष पद भूषवतो आहोत. देशाचे भविष्य याच युवा पिढीच्या हातात आहे. राज्यात आयोजित होणाऱ्या शिबिरांमधून जास्तीत जास्त तरुणांना रोजगार कसा मिळेल हेच सरकारचे लक्ष्य आहे. आतापर्यंत २ लाख ८० हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. तर एकाचवेळी ७५ हजार नोकऱ्या देण्याची प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण कमी पैशात घेता यावे यासाठी आम्ही काम करत आहोत. शिक्षण देण्यासाठी सरकार कोट्यावधी रुपये खर्च करत आहे. पालिकेच्या शाळांमध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यासाठी विविध पातळ्यांवर सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

जेपी म्हणजे ‘जबान के पक्के’
मुख्यमंत्र्यांचा असाही हजरजबाबीपणा
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जे. पी. नड्डा यांच्याविषयी बोलताना सांगितले, तुमच्या नावात जे. पी. आहे म्हणजेच तुम्ही ‘जबान के पक्के’ आहात असे म्हणत श्री. शिंदे यांनी नड्डा यांच्याविषयी आदर व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील युवा पिढीची ताकद ओळखली आहे. युवा पिढीसाठी ते सातत्याने काम करत आहेत. भविष्यात हा देश युवकांवरच चालणार आहे असेही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले.

शिबिरात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील करिअरबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे विविध स्टार्टअप तसेच व्यवसाय मार्गदर्शन विषयातील स्टॉल, शैक्षणिक कर्ज पुरविणाऱ्या बँकांचे स्टॉल, पुस्तकांचे आणि व्यवसाय मार्गदर्शन विषयावरील प्रदर्शनही मांडण्यात आले होते

सिद्धिविनायकचा घेतला आशीर्वाद
महाराष्ट्रात दोन दिवसीय दौर्‍यावर आलेल्या भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

स्वा. सावरकर सदनाला भेट
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे . पी. नड्डा यांनी गुरुवारी सकाळी दादर येथील सावरकर सदनास भेट दिली. सावरकरांशी संबंधित अनेक गोष्टींची यावेळी त्यांनी माहिती घेतली. श्री. नड्डा यांनी सर्वप्रथम सावरकर सदनातील स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला आणि अभिवादन केले. त्यानंतर वीर सावरकरांच्या सूनबाई सुंदर सावरकर यांची भेट घेत विचारपूस केली. सावरकरांशी संबंधित अनमोल ठेवा त्यांनी आस्थेने पाहिला, त्याबद्दल माहिती घेतली. स्वातंत्र्यवीरांचा दिनक्रम, त्यांच्या कामकाजाची पद्धत याविषयी वीर सावरकर यांची नातं असिलता सावरकर राजे यांनी श्री. नड्डा यांना माहिती दिली. सावरकरांचे वास्तव्य असलेल्या खोलीची पाहणी यावेळी त्यांनी केली. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, माहिम विधानसभा प्रमुख अक्षता तेंडुलकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री एन चंद्रशेखरन यांना फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली, १८ मे: टाटा समूहाचे अध्यक्ष श्री. एन चंद्रशेखरन यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेवेलियर डे ला लेगियन डी’ऑनरने सन्मानित करण्यात आले आहे. श्री. एन चंद्रशेखरन यांनी भारत आणि फ्रान्समधील व्यापारी संबंध दृढ करण्यात योगदान दिल्याबद्दल फ्रान्सने त्यांना हा सन्मान दिला आहे.

फ्रान्सच्या युरोप व परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती कॅथरीन कोलोना यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वतीने मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान शेवेलियर डे ला लेगियन डी’ऑनर श्री. एन. चंद्रशेखरन यांना प्रदान केला.

टाटा समूहाने यासंदर्भात एक ट्विट केले आहे, “आमचे अध्यक्ष श्री. एन. चंद्रशेखरन यांना फ्रान्सच्या युरोप व परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती कॅथरीन कोलोना यांनी शेवेलियर डे ला लेगियन डी’ऑनरने सन्मानित केले आहे.  भारत आणि फ्रान्सदरम्यानचे व्यापारी संबंध दृढ करण्यात श्री. एन. चंद्रशेखरन यांनी  योगदानाबद्दल त्यांना फ्रान्सने स्वतःचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला आहे.”

पुरस्कार प्रदान केल्यानंतर श्रीमती कोलोना यांनी देखील ट्विट केले, “टाटा समूहातील कंपन्या फ्रँको-इंडियन भागीदारीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वतीने टाटा समूहाच्या सीईओना शेवेलियर डे ला लेगियन डी’ऑनरचे मानचिन्ह प्रदान केल्याचा मला खूप आनंद होत आहे. प्रिय नटराजन चंद्रशेखरन, आपण फ्रान्सचे मित्र आहात.”

भारतात फ्रान्सचे राजदूत श्री. इमॅन्युएल लेनेन यांनी देखील एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “प्रिय नटराजन चंद्रशेखरन आपण फ्रान्सचे खरे मित्र आहात.”

या वर्षाच्या सुरुवातीला टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने एअरबससोबत एअरबसकडून २५० विमाने खरेदी करण्यासाठी एक मल्टी-बिलियन डॉलर्सचा व्यवहार केला होता, ज्यामध्ये २१० ए-३२० नियो विमाने आणि ४० ए-३५० विमाने होती.

जागतिक पातळीवरील एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्राच्या नव्या युगाच्या उत्पादन अभियांत्रिकी व डिजिटल गरजा पूर्ण करण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीजने गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये फ्रान्सच्या टुलूजमध्ये आपले इनोव्हेशन सेंटर सुरु केले.

श्री साईबाबा संस्थानमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस बंदरे व खनिकर्ममंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव निरज धोटे उपस्थित होते.

संस्थानमधील प्रत्येक कर्मचारी हा सेवाभावी वृत्तीने काम करीत असून त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मकतेने विचार करण्यात येईल. हे सर्वसामान्य, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून या सर्व घटकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

यावेळी खासदार श्री. लोखंडे आणि संस्थानच्या वतीने श्री साईबाबांची मूर्ती, शाल देऊन मुख्यमंत्र्यांचा आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

देवेन्द्रजी, ५५१० मुली महाराष्ट्रातून बेपत्ता झाल्या आहेत,आपले गृहखाते करतेय काय ?  अंबादास दानवेंचा थेट सवाल

मुंबई-देवेन्द्रजी, ५५१० मुली महाराष्ट्रातून बेपत्ता झाल्या आहेत,आपले गृहखाते करतेय काय ? असा थेट सवाल विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

महाराष्ट्र हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारधारेवर चालणारे राज्य असून मागील कित्येक वर्षांच्या राज्य सरकारच्या कारभारातून सिध्द झाले आहे. राज्यातील मुलींची बेपत्ता होण्याची वाढती संख्या ही चिंताजनक बाब असल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची टीका करत सरकारवर निशाणा साधला आहे.महाराष्ट्रात रोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत आहेत. तर जानेवारी ते मार्च 2023 राज्यातून सुमारे 5510 मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. जानेवारी 2023 या महिन्यात 1600 मुली तर फेब्रुवारी महिन्यात 1810 तर मार्च महिन्यात 2200 मुली बेपत्ता झाल्या आहेत.

अंबादास दानवे म्हणाले, दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली व महिला यांचे प्रमाण वाढत आहे. सदर बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र हे महिलांच्या सुरक्षेसाठी अग्रगण्य असलेले राज्य म्हणून गणले जाते. अशा राज्यात मुलीच महिला सुरक्षित नसतील तर सदर बाब राज्यासाठी चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी व्यक्त केली.

या प्रकरणी योग्य ती पावले उचलून महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी सूचना दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला व बाल विकास मंत्री यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

नवजात अर्भकांची विक्री करणारी टोळी:महिला डॉक्टर सह ६ दलालांवर गुन्हा दाखल

मुंबई-उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅम्प नंबर तीनच्या कंवरराम चौक परिसरात असलेल्या महालक्ष्मी नर्सिंग होममध्ये नवजात अर्भकांची विक्री होत असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नवजात अर्भकांची याठिकाणी लाखो रुपयांना खरेदी-विक्री होत असल्याचे वृत्त समोर आले आहे.महालक्ष्मी नर्सिंग होमच्या डॉ. चित्रा चैनानी यांची नवजात अर्भकांची विक्रीची एक टोळी बनवली होती. बाळांच्या खरेदी आणि विक्रीचे काम या टोळीच्या माध्यमातून चालत असे. या प्रकरणात आरोपी डॉ. चित्रा चेनानी यांच्यासह 5 महिला दलालांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगरच्या या रुग्णालयात असला प्रकार सुरु असल्याचे समाजसेवकाच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी डमी ग्राहकांना डॉ. चित्रा चेनानी यांच्याकडे महालक्ष्मी नर्सिंग होममध्ये पाठवले. आणि अशाप्रकारे डमी ग्राहकांच्या मदतीने या प्रकरणाचा भंडाफोड करण्यात त्यांना यश आले.

नाशिकहून आलेल्या एका 22 दिवसाच्या बाळाला डमी ग्राहकाला विकण्याचा घाट या डॉक्टरांनी घातला होता. या 22 दिवसाच्या लहानग्या जीवाची किंमत 7 लाख ठरवण्यात आली होती. या बाळाला डमी ग्राहकाला विकताना ठाणे क्राईम ब्रांच आणि महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. त्याचप्रमाणे मुली आणि मुलांचे वेगवेगळे दर या महिला डॉक्टरने ठरवलेले होते.

रंगेहाथ पकडल्यानंतर सर्व आरोपींविरुद्ध कलम 370 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आज कोर्टात सर्व आरोपींना हजर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हे रॅकेट कशाप्रकारे चालते? याचा सूत्रधार कोण आहे? असे अनेक धागेदोरे यात तपासले जात आहेत.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचा शनिवारी ऋणनिर्देश व सत्कार सोहळा

पुणे : राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड (आयएएस) यांच्या शासकीय सेवा निवृत्तीनिमित्त ऋणनिर्देश व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भूमाता परिवार, छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब फाउंडेशन आणि शुगरटुडे मॅगझीनच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २० मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. शिरनामे सभागृह, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर पुणे येथे हा सोहळा होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गायकवाड यांचा नागरी सत्कार होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महर्षी डॉ. बुधाजीराव मुळीक असणार आहेत, असे संयोजकांनी कळवले आहे.

जी-20 आपत्ती धोका निवारण कार्यकारी गटाची ( DRRWG – डीआरआरडब्ल्यूजी) दुसरी बैठक मुंबईत 23 ते 25 मे 2023 या कालावधीत होणार

मुंबई, 18 मे 2023

मुंबईया शहराला पावसाळ्यात पाणी साचल्याने आपत्तकालीन परिस्थितीला सामोरे जावे लागले असा इतिहास आहे. 26 जुलै 2005 रोजी मुंबई महानगर प्रदेशात ढगफूटी मुळे झालेला विक्रमी पाऊस आणि त्यानंतर आलेल्या महापूराची आठवणी अद्यापही नागरीकांच्या मनात कायम आहे.

जी -20 अंतर्गत दुसऱ्या आपत्ती जोखीम निवारण कार्य गट (DRRWG) बैठकीत सहभागी होणारे प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट  देणार असून बृहन्मुंबई महानगरपालिकेने तंत्रज्ञान आधारित उपाय योजनांच्या आधारे मुसळधार पावसामुळे उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी आणि मान्सून मध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कोणते उपक्रम राबवले आहेत हे जाणून घेणार आहेत.

येत्या 23 ते 25 मे 2023 या कालावधीत मुंबईत जी-20 आपत्ती धोका निवारण कार्यकारी गटाची (DRRWG – डीआरआरडब्ल्यूजी) दुसरी  बैठक होत आहे. आपत्कालीन परिस्थितील धोका कमी करण्याच्या उद्देशाने या कार्यकारी गटाने अर्थात डीआरआरडब्ल्यूजीने पाच प्रमुख प्राधान्यक्रमावरच्या उपाययोना मांडल्या आहेत. यात आगाऊ सूचना, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करू शकतील अशा लवचिक पायाभूत सुविधा, राष्ट्रीय प्रतिसाद, अधिक चांगले आणि निसर्ग-आधारित उपाययोजनांची आखणी या उपाययोजनांचा समावेश आहे.

2005 मध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर महाराष्ट्र सरकारने माधवराव चितळे सत्यशोधन समिती स्थापन केली होती. या समितीने आपल्या अहवालातून बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात पाणी साचण्याच्यादृष्टीने संवेदनशील असलेल्या भागांमध्ये अशा प्रकारची पाणी उपसा स्थानके उभारावीत यासह विविध उपाययोजना राबविण्याच्या शिफारसी केव्या होत्या.

मुंबईत पावसाच्या वेळीच समुद्राला भरती आलेली असेल तर अशावेळी पावसामुळे साचलेले पाणी समुद्रात वाहून जात नाही. भरतीच्या वेळी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढलेली असल्याने समुद्राच्या दिशेने वाहून आलेले पावसाचे पाणी पुन्हा शहराच्या दिशेनेच ढकलले जाते, आणि परिणामी मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचते. ही परिस्थिती टाळता यावी आणि साचलेल्या पाण्याचा निचरा करता यावा यासाठी पाणी उपसा स्थानकांमधील उच्च क्षमतेच्या पाण्याच्या पंपांच्या उपयोगाने, पावसामुळे साचलेले पाणी पुन्हा समुद्रात फेकले जाते. या व्यवस्थेमुळेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसामुळे साचलेल्या पाण्याचा झपाट्याने निचरा करणे शक्य होत असते. मुसळधार पावसाच्या काळात संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी ही पाणी उपसा स्थानके महत्त्वाची भूमिका बजावतात, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारसू यांनी म्हटले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकाची पाणी उपसा स्थानके (pumping stations – पंपिंग स्टेशन ) आणि भूमिगत पाणी साठवण टाक्यांमुळे पावसामुळे साचलेल्या पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यात मदत होत असते. मुंबईचे विशिष्ट भौगोलिक स्थान लक्षात घेऊन तसेच मुसळधार पावसात पावसाच्या पाण्याचा प्रभावशाली पद्धतीने निचरा व्हावा यासाठी हाजी अली, लव्हग्रोव्ह (वरळी), क्लीव्हलँड बंदर (वरळी गाव), ब्रिटानिया (रे रोड), इरला (जुहू) आणि गजाधारबांध (संत) अशा सहा ठिकाणी पालिकेने उदंचन केंद्रे अर्थात पाणी उपसा स्थानके उभारली असून, ती कार्यरत आहेत. यासोबतच पालिकेच्या वतीने लवकरच आणखी दोन पाणी उपसा स्थानके उभारली जाणार आहेत. नमूद केलेल्या सहा पाणी उपसा केंद्रासोबत मुंबईत आणखी इतर ठिकाणी काही छोटी पाणी उपसा स्थानके देखील कार्यरत आहेत. या 6 पाणी उपसा केंद्रा मध्ये एकूण 43 पंप बसवलेले आहेत. प्रति सेकंद 6,000 लिटर पाण्याचा उपसा करण्याची या पंपांची क्षमता आहे. एकत्रीतपणे पाहीले तर, या सर्व पंपांची मिळून प्रति सेकंदाला एकूण 2 लाख 58 हजार लिटर इतक्या पाण्याचा उपसा करण्याची क्षमता आहे. या सर्व पंपांचे कार्यान्वयन संगणकीय पद्धतीने केले जाते. तसेच पावसाचे प्रमाण आणि पाणी उपसा स्थानकांच्या दिशेने वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रमाणानुसार हे पंप स्वयंचलीतरित्या सुरू होतात.

हाजी अली उदंचन केंद्र

बृहन्मुंबई महापालिकेने ‘स्वर्गीय प्रमोद महाजन पार्क’ परिसरात पाण्याची भूमिगत साठवण टाकी बांधण्याचे कामही हाती घेतले होते. मुंबईतील हिंदमाता भागात पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येपासून सुटका मिळवसाठी ही टाकी उभारण्यात आली होती. मुसळधार पावसाच्या वेळी या भागात साचलेल्या पाण्याचा उपसा करून ते या टाकीत साठवले जाते. 2022 च्या पावसाळ्यात या प्रचंड मोठ्या पाणी साठवण टाकीत लाखो लिटर पावसाचे पाणी साचवले गेले होते. त्यामुळे मागच्या वर्षी पावसाच्या काळात या भागात पाणी साचण्याची समस्या उद्भवली नव्हती.

भूमिगत साठवण टाकी

जुलै 2005 मध्ये पूरपरिस्थिती, कचरा आणि नदीलगतच्या अतिक्रमणामुळे मिठी नदी नदीच्या पात्राचा विस्तार झाल्याने मुंबईत काही उपनगरीय भागात पूर आला. या अतिशय गंभीर  प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सप्टेंबर 2022 मध्ये पवई परिसरात ‘मिठी नदी पाणी गुणवत्ता सुधारणा’ प्रकल्प सुरू केला, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त  पी. वेलरासू यांनी दिली.

‘मिठी नदी पाणी गुणवत्ता सुधारणा’ प्रकल्प

जी-20 आपत्ती धोका निवारण कार्यकार गट ( DRRWG – डीआरआरडब्ल्यूजी )

हा भारताने आपल्या जी-20 च्या अध्यक्षपदाअंतर्गत हाती घेतलेला उपक्रम आहे. यावर्षी मार्च – एप्रिलमध्ये गांधीनगरमध्ये इथे जी-20 आपत्ती धोका निवारण कार्यकारी गटाची ( DRRWG – डीआरआरडब्ल्यूजी ) पहिली बैठक झाली होती. आपत्ती धोका निवारण्याचा मुद्दा जी 20 अंतर्गत समाविष्ट करण्यासाठी भारताने हाती घेतलेला हा उपक्रम, 2015 ते 2030 ( Sendai Framework ) या काळात आपत्तकाली परिस्थितीतील धोका कमी करण्यासाठीच्या सेंदाई आराखड्याचा ( Sendai Framework ) भाग आहे. हा करार, जी 20 सदस्य देशांना आपत्तींपासून उद्भवणाऱ्या धोक्यांपासून विकास प्रक्रियांच्या लाभांचे संरक्षण करण्यासाठी ठोस कृती आराखडा प्रदान करणारा पहिला महत्वाचा करार ठरला होता. आपत्तींमुळे उद्भवणारे धोके कमी करण्यासंदर्भातल्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक परिषदेवेळी हा करार स्विकारला गेला होता. ‘आपत्तींमुळे उद्भवणारे धोखे, बळी पडणारे जीव, तसेच उपजीविका आणि आरोग्य आणि त्यासोबतच व्यक्ती, व्यवसाय, समुदाय तसेच त्या त्या देशांच्या आर्थिक, भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय मालमत्तेच्या होणाऱ्या नुकसानीत शाश्वत स्वरुपाची लक्षणीय घट साधायला हवी या उद्देशाने हा करार केला गेला आहे. आपत्तींमुळे उद्भवणारे धोके कमी करण्याच्या उपाययोजनांमध्ये प्राथमिक भूमिका ही राज्याची असते, त्यामुळेच स्थानिक पातळ्यांवरची सरकारे तसेच खाजगी क्षेत्रांसह इतर भागधारकांनीही या बाबतीतल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या पाहिजेत असेही या करारात म्हटले गेले आहे.

शिरुर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

पुणे, दि.18: महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह शिरुर या संस्थेत 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक मुलींनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन शिरुर येथील वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती आर.व्ही. साखरे यांनी केले आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग शारिरीकदृष्ट्या दिव्यांग व अनाथ या प्रवर्गातील विद्यार्थींना शासन नियमानुसार आरक्षित टक्केवारी प्रमाणे त्या-त्या प्रवर्गात प्रवेश देण्याचे येणार आहे.

शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थींना विनामुल्य भोजन व निवासाची व्यवस्था असून शिक्षण संस्था प्रमुखाच्या शिफारशीनुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरीता आवश्यक असलेली क्रमीक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश व कॉलजचे ड्रेसकोड इत्यादी शासनाने ठरवून दिलेल्या आर्थिक मर्यादेपर्यंतची रक्कम विद्यार्थींनींच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. तसेच दरहा 600 रुपये निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो. शासकीय वसतिगृहाचे प्रवेश अर्ज विनामुल्य मिळतील. अधिक माहितीसाठी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह शिरुर जि. पुणे येथे संपर्क साधावा.
00000

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांसाठी ‘तणावमुक्ती’ बाबत व्याख्यानाचे आयोजन

पुणे दि. १८: अपर पोलीस महासंचालक व राज्याचे कारागृह व सुधार सेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून व पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रेस रिलीज फाऊंडेशनच्या वतीने येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांच्या ‘तणावमुक्ती’ करीता व्याख्यानाचे आयोजन नुकतेच करण्यात आले.

कार्यक्रमास अपर पोलीस महासंचालक श्री. गुप्ता, कारागृह उपमहानिरीक्षक श्रीमती साठे, कारागृह अधीक्षक राणी भोसले, कारागृह उपअधीक्षक शिवशंकर पाटील, स्ट्रेस रिलीज फाऊंडेशनचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते अशोक देशमुख उपस्थित होते.

यावेळी अशोक देशमुख यांनी तणावमुक्ती या विषयावरील व्याख्यानात शारीरिक व मानसिक ताण-तणाव दूर करण्यासाठी दररोज हलका व्यायाम व योगासन करण्याचे महत्व बंद्यांना पटवून देवून विविध शारीरिक वेदना व व्याधींवर हलक्या व्यायाम प्रकारांचे प्रशिक्षण दिले. दैनंदीन जीवनात आनंदी राहणे व हसणे याचे अनन्य साधारण महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन सत्रात संपन्न झालेल्या या व्याख्यानमालेत जवळपास ३०० बंद्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या समारोपात काही बंद्यांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या.

केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी घेतला ओबीसींसाठीच्या योजनांचा आढावा

पुणे, दि. 18: केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे इतर मागासवर्ग (ओबीसी) आरक्षणाबाबत आयोजित बैठकीत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या ओबीसी प्रवर्गाच्या योजनांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके, सदस्य सचिव वासुदेव पाटील, संशोधन अधिकारी मेघराज भाते, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संगीता डावखर पुणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे आणि इतर महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत अध्यक्ष श्री. अहिर यांनी ओबीसी प्रवर्गाच्या योजनांबाबत सविस्तर आढावा घेतला. तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सद्यस्थितीत कार्यवाहीच्या अधीन असणाऱ्या प्रकरणांबाबतही माहिती घेतली. ओबीसी घटकांच्या सर्व वसतिगृहांच्या बाबतचे मूलभूत प्रश्न व सोयीसुविधा यांच्यावर करावयाच्या उपायोजना याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ व अन्य महामंडळाच्या योजनांचे कार्यान्वयन यथाशीग्र व जलदगतीने करण्यात यावे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशात ओबीसी प्रवर्गासाठीच्या राखीव जागा भरल्या जातात किंवा कसे याबाबतची माहिती केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे तात्काळ सादर करावी असे निर्देशही श्री. अहिर यांनी दिले.

महिला खलाशांची संख्या 3327 पर्यंत पोहोचली- केंद्रीय जहाजबांधणी, बंदरे आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल

मुंबई, 18 मे 2023

आज ‘सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांसासाठीचा दिन’ असून या निमित्त मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संयुक्त राष्ट्र सागरी संस्थेने, 18 मे हा सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांसाठीचा दिन म्हणून जगभर साजरा केला जावा, असा ठराव मंजूर केला होता. याचे औचित्य साधून जहाजबांधणी, बंदरे आणि जलमार्ग संचालनालयाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. केंद्रीय जहाजबांधणी, बंदरे आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, नौवहन  महासंचालनालयाचे महासंचालक आणि एनएमडीसी (मध्य) चे अध्यक्ष राजीव जलोटा देखील यावेळी उपस्थित होते. पवईच्या सागरी प्रशिक्षण संस्थेत या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यंदाच्या या दिवसाची यंदाची संकल्पना, “स्त्री पुरुष समानतेसाठी व्यक्ती आणि समूहांचे जाळे निर्माण करणे,” अशी आहे.  

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी, या कार्यक्रमासाठी दिलेला विशेष संदेश, दूर दृश्यप्रणाली मार्फत दाखवण्यात आला. या दिनानिमित्त सागरी क्षेत्रात कार्यरत सर्व महिलांना शुभेच्छा देत, त्यांनी महिलांचे या क्षेत्रातील योगदान अधोरेखित केले. हा दिवस, सागरी व्यवसाय क्षेत्रात महिलांची भरती, त्यांनी या क्षेत्रात टिकून राहावे आणि त्यांना इथे शाश्वत रोजगार मिळावे, यासाठी प्रयत्न करण्याची संधी आपल्याला देतो, असे सोनोवाल म्हणाले. आज जेव्हा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, ‘नारी शक्ती’ला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवत आहोत, अशावेळी, ही संकल्पना अधिकच संयुक्तिक ठरते, असे सोनोवाल म्हणाले. 

यंदाची संकल्पना, सागरी क्षेत्रातील स्त्री-पुरुष असमतोल दूर करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे, तसेच यातून सांघिक भावना आणि स्त्री पुरुष समानता निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचे महत्त्व अधोरेखित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सागरी क्षेत्रासह इतर विविध क्षेत्रात महिलांची संख्या वाढवणे आणि त्यांची प्रगती साधण्याला, केंद्र सरकारने कायमच प्राधान्य दिले आहे. सर्व महिलांना समान हक्क मिळावे आणि त्या सक्षम व्हाव्यात, या शाश्वत विकास उद्दिष्टाची पूर्तता करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे सोनोवाल यांनी सांगितले. सागरी क्षेत्रात अधिकाधिक संख्येने महिला खलाशी याव्यात, यासाठी आम्ही आवश्यक ते सर्व आर्थिक सहाय्य आणि धोरणात्मक पाठबळ देत आहोत. सरकारने या दिशेने केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणूनच, आज भारतीय महिला खलाशांची संख्या, 3327 इतकी झाली आहे, असेही सोनोवाल यांनी सांगितले. महिला खलाशांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, सरकारने महिला खलाशांसाठी विशेष तक्रार निवारण व्यवस्था उभी केली आहे, अशी माहिती सोनोवाल यांनी दिली.

केंद्रीय जहाजबांधणी, बंदरे आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनीही आपल्या भाषणात, आज सत्कार करण्यात आलेल्या सागरी क्षेत्रातल्या सर्व महिला व्यावासायिकांचे अभिनंदन केले. सागरी क्षेत्रात स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी विविध व्यक्ती आणि संस्थांना एकत्रित आणण्याचे, त्यांच्यातला समन्वय वाढवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. महिलांना विविध क्षेत्रात संधी दिल्यामुळे संपूर्ण समुदायाचेच उत्थान होते, देशांचीही प्रगती होते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे, असे नाईक म्हणाले. तसेच, महिलांनी केलेले शांतता करारही दीर्घकाळ प्रभावी ठरले आहेत. सामाजिक विषयांवरही महिलांच्या जाणीवा अधिक प्रगल्भ असतात, हे सगळे पुरावे, महिलांना समान संधी म्हणजे, सर्वांची प्रगती हेच तत्व दर्शवणारे आहेत, असे श्रीपाद नाईक म्हणाले. 

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या अखत्यारीत आठ महिला सागरी संस्थांची स्थापना करण्यात आली आहे, ज्यात 152 देशांसह एकूण 490 सभासद आहेत, अशी महिती त्यांनी दिली. या संस्था, विविध मंचांवर त्यांच्या क्षेत्रांशी संबंधित समस्या, मुद्दे मांडू शकतात, यातूनही महिला खलाशांची संख्या वाढू शकते, असे ते म्हणाले. भारतीय सागरी खलाशी महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मर्चंट नेव्हीच्या भारतीय अधिकारी कॅप्टन राधिका मेनन, ज्यांना, सात मच्छीमारांची यशस्वी सुटका करणाऱ्या धाडसी ऑपरेशन बद्दल, 2016 साली, आंतरराष्ट्रीय सागरी संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते-, त्यांचे कार्य या क्षेत्रातल्या सर्व महिलांसाठी प्रेरणादायी आहे, असेही नाईक यांनी सांगितले. भारतीय सागरी क्षेत्र: भविष्यातील आराखडा 2030 मध्ये, महिला खलाशांना विविध जबाबदाऱ्या देण्याचा आणि इतर प्रोत्साहनपर उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या निमित्त सागरी व्यवसायाच्या विविध विभागात आपले महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व महिलांचा त्यांनी विशेष उल्लेख करत, त्यांच्या कार्याची यथोचित दखल घेतली. 

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे सरचिटणीस, किटॅक लिम यांनीही या कार्यक्रमासाठी आपला संदेश पाठवला. ‘स्त्री-पुरुष समानतेसाठी एक जाळे निर्माण करणे’ ही संकल्पना, सागरी क्षेत्रातील स्त्री पुरुष समानता प्राप्त करण्यासाठी सहकार्य आणि नेटवर्किंगचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे, असे लिम यांनी आपल्या संदेशात सांगितले. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना, आणि सागरी क्षेत्रात प्रस्थापित महिला संघटना यांच्यातील समन्वय याचेच उदाहरण आहे, असे ते म्हणाले. यातून जगभरातील सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांना पाठबळ मिळेल आणि पुढच्या पिढ्यांना सागरी उद्योगात प्रोत्साहनही मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.  संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठीही सर्व क्षेत्रात स्त्री पुरुष समानता महत्वाची असल्याचे लिम यांनी संगितले.

एनएमडीसी चे अध्यक्ष, राजीव जलोटा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यक्रमानंतर ‘सागरी क्षेत्रात स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी व्यक्ती आणि समूहांचे जाळे निर्माण करणे’ ह्या विषयावर चर्चासत्रही घेण्यात आले. 

यावेळी श्रीपाद नाईक यांच्या हस्ते सागरी क्षेत्राततल्या विविध भागात महिला म्हणून पहिल्यांदाच कार्य करण्याचा मान मिळवणाऱ्या आणि आपले विशेष उल्लेखनीय योगदान दिलेल्या सोळा कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. या महिलांची ओळख आणि कार्यकर्तृत्व पुढीलप्रमाणे:

  1. सुमतीबेन मोरारजी : सागरी क्षेत्राचा पाया रचण्यात सुमतीबेन मोरारजी यांचे महत्वाचे योगदान आहे.
  2. अॅना राजम मल्होत्रा : सागरी क्षेत्राचा पाया रचण्यात अॅना राजम मल्होत्रा यांचे महत्वाचे योगदान आहे.
  3. आशा शेठ : राष्ट्रीय सागरी वारसा संकुल समितीच्या सदस्य असलेल्या आशा शेठ भारतात जहाजबांधणी क्षेत्राचा पाया रचणाऱ्या ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनीचे संस्थापक, दिवंगत वसंत शेठ यांच्या पत्नी आहेत. हा वारसा लोकांसमोर आणण्याऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
  4. राणी जाधव आयएएस (निवृत्त) : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. अनेक महत्वाचे निर्णय आणि धोरण आखणीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. 
  5. किरण धिंग्रा, IAS (निवृत्त) : पहिल्या महिला नौकानयन महासंचालक म्हणून किरण धिंग्रा यांनी आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेत खलाशांच्या कार्याचे नेतृत्व केले आहे. 
  6. मालिनी शंकर, आयएएस (निवृत्त), कुलगुरू, भारतीय सागरी विद्यापीठ : डॉ.मालिनी शंकर या सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत ज्यांना तीन दशकांहून अधिक काळ अनुभव आहे. डॉ.शंकर सध्या भारतीय सागरी विद्यापीठाच्या कुलगुरू असून, या विद्यापीठाच्या त्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत.
  7. कॅप्टन सुनेहा गडपांडे, अधीक्षक, हाफनिया : सर्व जुन्या परंपरा मोडून, कॅप्टन सुनेहा गडपांडे यांनी एमटी स्वर्ण कृष्णाच्या नेतृत्वाखाली सर्व महिला कर्मचाऱ्यांचे नेतृत्व केले. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एससीआय) मध्ये सहभागी झालेल्या पहिल्या महिला नॉटिकल कॅडेट्सपैकी एक आहेत. महिला सागरी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
  8. दिव्या जैन, सीई, एससीआय : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे एमटी स्वर्ण कृष्णा, सर्व-महिला खलाशांना घेऊन जाणारे पहिले जहाज बनले. मुख्य अभियंता दिव्या जैन, या त्या जहाजावर, सर्व-महिला सागरी अभियंत्यांच्या इंजिन संघाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला मुख्य अभियंता होत्या.
  9. कॅप्टन राधिका मेनन : अडकलेल्या मच्छीमारांची सुटका करतांना खोल समुद्रात शौर्य गाजवणाऱ्या , कॅप्टन राधिका मेनन सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहेत. त्या भारताच्या पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन म्हणून ओळखले जातात.
  10. सोनाली बॅनर्जी, सागरी सर्वेक्षक, IRS : मुख्य अभियंता बनलेल्या सोनाली बॅनर्जी यांना जहाजबांधणी उद्योगाचा दोन दशकांहून अधिक अनुभव आहे.  त्या पहिल्या  महिला सागरी अभियंता आहेत.
  11. सुनीती बाला :सस्टेनेबिलिटीच्या प्रमुख SCI अल्बर्टा एक्का सागरी जहाजावर सेवा देणारी पहिली महिला मुख्य अभियंता आहे.
  12. रेश्मा निलोफर, मरीन पायलट : रेश्मा निलोफर विशालक्षी, श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट (पूर्वी कोलकाता पोर्ट ट्रस्ट) मधील सागरी पायलट आहेत. त्या भारतातील पहिल्या महिला सागरी पायलट आहेत.
  13. एच. के. जोशी- माजी CMD, SCI : एच. के. जोशी भारतीय शिपिंग कॉर्पोरेशनच्या प्रमुखपदी होत्या, जेव्हा एमटी स्वर्णा कृष्णाने सर्व महिलांच्या क्रूसह अशा प्रकारचा पहिला प्रवास केला. त्या SCI च्या प्रथम महिला अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राहिल्या आहेत.
  14. पार्वती राजलक्ष्मी, नौदल वास्तुविशारद : पार्वती राजलक्ष्मी या नौदल वास्तुविशारद आहेत. त्या  पहिल्या महिला नौदल वास्तुविशारद आहेत. 
  15. रत्ना चढ्ढा, अध्यक्षा आणि संस्थापक, तिरुन ट्रॅव्हल मार्केटिंग : उद्योग क्षेत्रातील दिग्गज उद्योजक म्हणून, रत्ना चड्ढा यांनी भारतात क्रूझ पर्यटनाला प्रोत्साहन दिले. ट्रॅव्हल मार्केटिंगमधल्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.  
  16. डॉ. सुजाता तोलानी-नाईक, अध्यक्षा, तोलानी बल्क कॅरिअर्स लिमिटेड आणि तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूट : एक बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. सुजाता-तोलानी-नाईक ह्या पल्मोनरी क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट आहेत, त्या तोलानी शिपिंग कंपनी लिमिटेडच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांच्या नेतृत्वाखाली सागर परिक्रमेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ


मुंबई, 18 मे 2023

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांच्या नेतृत्वाखाली  काल संध्याकाळी ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया पासून सागर परिक्रमेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ झाला. केंद्रीय मंत्री रुपाला यांनी आज महाराष्ट्रातील रायगड येथील करंजा जेट्टी येथे हितधारकांना संबोधित केले.  आज आणि उद्या ते महाराष्ट्र आणि गोवा येथील सहा ठिकाणी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

करंजा जेट्टी येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड आणि ई-श्रम कार्डचे वाटप केले. तेथील स्थानिक समुदायाने रुपाला यांच्या आगमनानंतर त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.

सध्याच्या सरकारला देशातील मच्छीमार समुदायाच्या हितामध्ये किती स्वारस्य आहे ते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून दिसून येते, असे केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले. या कार्यक्रमाच्या  तरतुदीत 20,000 कोटी रुपयांची लक्षणीय वाढ कशी झाली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. याशिवाय वेळोवेळी अतिरिक्त तरतुदी करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

रुपाला हे रत्नागिरी येथील दाभोळ मधील रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड जेट्टीला भेट देणार आहेत. भारतातील मासेमारी क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावते आणि लाखो मच्छिमार  लोकांना उपजीविका प्रदान करते.  भारत जगातील तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादन करणारा आणि दुसरा सर्वात मोठा मत्स्यपालन उत्पादक देश आहे. भारतातील नील क्रांतीने मच्छीमारांचे महत्व दिसून येते.

ग्रामीण भागातील लोकांचे  जीवनमान आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आणि आणि उपजीविकेच्या अधिक संधी निर्माण करण्यासाठी तसेच शाश्वत विकास उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने समग्र दृष्टिकोन स्वीकारला आहे.

आता तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातही ड्रेसकोड लागू

तुळजापूर- तिरुपती नंतर तुळजाभवानी मंदिरात हाफ पॅन्ट, उत्तेजक आणि अंग प्रदर्शन करणारे कपडे घालणाऱ्या भाविकांना प्रवेश मिळणार नाही. तुळजाभवानी मंदिर संस्थानने एक नियमावली जारी केली आहे. त्यानुसार आज मंदिर परिसरात फलकही लावण्यात आलेत.उस्मानाबादचे जिल्हाधिकारी हे मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत. भारतीय राज्य घटनेनुसार नागरिकांनी कोणते कपडे घालावेत, काय खावे, काय प्यावे याचे स्वातंत्र्य आहे. तरीही हा निर्णय घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

नवीन नियम काय?

तुळजाभवानी मंदिर परिसरात प्रवेश करण्यासाठी तुळजाभवानी मंदिर समितीने नवीन नियम केलेत. त्यानुसार हाफ पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट घालणारे महिला व पुरुषांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. महिलांना वन पीस आणि शॉर्ट स्कर्ट घालून मंदिरात प्रवेश मिळणार नाही. या सूचना देणारे फलकही मंदिर परिसरात लावण्यात आलेत.

सभ्यता पाळा

मंदिर परिसरातल्या फलकावर म्हटले आहे की, अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पॅन्ट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही. कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा, असे आवाहन या संदेशातून करण्यात आले आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल पुजारी वर्गाकडून मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सौदागर तांदळे, सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे यांचा सत्कार करण्यात आला.

तुळजाभवानी मंदिरात दिवसेंदिवस भाविकांचा ओघ वाढतो आहे. त्यामुळे भाविकांनी दिलेले दानही वाढत चालले आहे. आता दानपेट्यांच्या लिलावाची पद्धत बंद झाल्यामुळे गेल्या 13 वर्षांत मंदिराचे रोख व सोन्या-चांदीच्या स्वरूपातील उत्पन्न तब्बल 10 पट वाढले आहे. 2010 मध्ये मंदिराकडे भाविकांनी वाहिलेले 21 किलो सोने होते. 13 वर्षांत यात सुमारे 187 किलोची भर पडली असून मंदिराकडे आता 208 किलो वाहिक सोने आणि 3 हजार 404 किलो चांदी आहे. रोख रकमेचे दानही वाढले असून देणग्या आणि एकूण उत्पन्नामुळे मंदिराकडे 40 कोटींवरून 240 कोटी 97 लाख,60 हजार रुपये जमा झाले आहेत. याशिवाय पुरातन काळापासून राजा-महाराजांनी मातेला वाहिलेले अमूल्य असे 7 पेट्या भरून दागिने मंदिराकडे आहेत.

सुप्रीम कोर्टाने बंगालमधून द केरला स्टोरीवरील बंदी हटवली

नवी दिल्ली-बंगालमध्ये ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावर बंदी घालण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाने बंगाल सरकारला चित्रपट पाहणाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याच्या विरोधात याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. त्यांचे ऐकण्याआधी आम्हालाही हा चित्रपट बघायला आवडेल.

न्यायालयाने म्हटले आहे की, ‘या चित्रपटात 32 हजार महिलांनी इस्लाम स्वीकारल्याच्या आरोपांवर डिस्क्लेमर टाकला जावा आणि निर्मात्याने 20 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेपूर्वी हे काम करावे. जनतेच्या असहिष्णुतेला महत्त्व देऊन कायद्याचा असाच वापर केला तर प्रत्येक चित्रपटाची अशीच अवस्था होईल. कायदा व सुव्यवस्था राखणे हे राज्याचे कर्तव्य आहे.

पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर सरकारने बंदी घातली होती, तर तामिळनाडूमध्ये थिएटर मालकांनी बंदी घातली होती. कोलकाता आणि मद्रास उच्च न्यायालयांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. या दोन्ही उच्च न्यायालयांचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालय उन्हाळी सुट्टीनंतर 18 जुलै रोजी सुनावणार आहे.

तमिळनाडू सरकारनेही चित्रपट निर्मात्यांच्या शॅडो बॅनिंगचे आरोप फेटाळून लावले होते. सरकारने म्हटले आहे की, हा चित्रपट 19 मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित झाला आणि चित्रपट निर्मात्यांकडे कोणताही लेखी पुरावा नाही की चित्रपटाचे प्रदर्शन सरकारने बंद केले आहे

5 मे रोजी मुस्लिम संघटनांनी सुमारे 20 ठिकाणी केरळ स्टोरीचा निषेध केला. त्यानंतर 6 मे रोजी चेन्नईत आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कोईम्बतूरमध्ये निदर्शने झाली. आंदोलकांवर चेन्नईत 5 आणि कोईम्बतूरमध्ये 4 असे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट विविध समाजातील मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर आणि त्यांचे ISIS मध्ये समावेश करण्यावर आधारित आहे. त्याचबरोबर मुस्लिम संघटना, मानवाधिकार कार्यकर्ते आणि काही राजकीय पक्ष या चित्रपटाला इस्लाम आणि केरळची बदनामी करणारे म्हणत आहेत.काँग्रेस नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी 30 एप्रिल रोजी या चित्रपटाबद्दल ट्विट केले होते. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘ही तुमच्या केरळची कथा असू शकते, ही आमच्या केरळची कथा नाही.’

कुशल, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथील छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे उद्घाटन

मुंबई, दि, १८: अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर नक्कीच मोलाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर मार्गदर्शन शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिबिराला ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला.

कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार जे. पी. नड्डा, खासदार मनोज कोटक, आमदार आशीष शेलार, आमदार मनीषा कायंदे, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्या विकास विभागाचे आयुक्त एन.रामास्वामी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, कौशल्य विद्यापीठाच्या डॉ. अपूर्वा पालकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, युवा पिढीच्या ताकदीवर देश महाशक्तीकडे वाटचाल करतोय, यामुळेच संपूर्ण जगात देशाचे नाव अभिमानाने घेतले जाते. देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून ५ व्या क्रमांकावर आणण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. सध्या देशात जी २०च्या बैठक सुरु आहेत. जी २०चे अध्यक्षपद भारताकडे आहे, ही देशासाठी गौरवाची बाब आहे.

देशाचे भवितव्य युवा पिढीच्या हातात आहे त्यामुळेच युवा पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम केले जात आहे. नव्या पिढीने परंपरागत शिक्षणाबरोबर काळाची पाऊले ओळखून नाविन्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे. युवा संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या करिअरमध्ये मार्गदर्शन करण्याचा तसेच सरकारच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व युवकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना लागणारे शिक्षण, तसेच शिक्षणासाठी देण्यात येणारे अर्थ सहाय्य, शिष्यवृत्ती तसेच रोजगाराच्या विविध संधी, पालकांचे समुपदेशन या शिबिरात केले जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना राज्यात ७५ हजार नोकऱ्या देण्याचे उद्दीष्ट आहे. बार्टी, सारथी व महाज्योती या माध्यमातून शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. १ लाख २५ हजार रोजगार उपलब्ध होण्यासाठी विविध संस्थासोबत राजभवनात करार करण्यात आले. आगामी काळात ३ लाख रोजगार निर्माण करण्यात येतील.

मंत्री श्री. लोढा यांनी मुंबई महापालिका शाळांमध्ये स्कील डेव्हलपमेंट सेंटर सुरु करण्याची गरज व्यक्त केली होती त्यानुसार १०० शाळांसोबत करार केला आहे, लवकरच महापालिकेच्या शाळांमध्ये कौशल्ययुक्त शिक्षण मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

युवा पिढीने कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून दिलेल्या संदेशात म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर मार्गदर्शन आज राज्यातील सर्व मतदार संघात आयोजित केले आहे. या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून युवक, युवतींना नक्की फायदा होईल. या शिबीराच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची एकत्रित माहिती मिळेल. पालकांनाही या शिबिराच्या माध्यमातून एक दिशा मिळेल. बदलत्या काळानुसार युवा पिढीला कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे.

औद्योगिक क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन शिक्षण घ्या खासदार जे. पी. नड्डा

खासदार जे. पी. नड्डा म्हणाले की, आज औद्योगिक क्षेत्रामध्ये झपाट्याने बदल होत आहेत. बदलत्या काळानुसार कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज बनली आहे. पुरवठादारास औद्योगिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदल आणि तशी मागणी कळत नाही त्यामुळे मागणी करणाऱ्याला काय हवे ते जाणून घ्या. तांत्रिक प्रशिक्षण गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात अपग्रेड व्हावे लागेल. १० लाख रोजगार देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. प्रधानमंत्र्यांनी २ लाखांहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले आहे. १३ लाखांहून अधिक जणांना प्रशिक्षण दिले आहे. देशात स्कील डेव्हलपमेंटची गरज होती हे लक्षात घेवून प्रधानमंत्र्यांनी कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना केली .

प्रधानमंत्री यांनी स्वप्नं पहिले आणि स्कील इंडिया मिशन सुरु झाले. युवा पिढी प्रशिक्षित होताना पुनर्प्रशिक्षण गरजेचे आहे. पुनर्प्रशिक्षणानंतर पुन्हा अपग्रेड होणे आवश्यक आहे. प्रशिक्षण दिलेल्या उमेदवारांत ६६ टक्के महिलांचा समावेश असून, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत १ कोटींहून अधिक उमेदवारांनी प्रशिक्षण घेतले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचा कार्यक्रम राबवला, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. स्टार्ट अप मध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे.५०० कोटी रुपयांची इको सिस्टीम तयार करण्यासाठी तरतूद केली आहे.

राज्यात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणार – कौशल्य,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना काय करावे, असा प्रश्न असतो तसेच कोणत्या क्षेत्रात आपल्याला कौशल्य प्राप्त करावे लागेल याबाबत साशंकता असते. विद्यार्थ्यांचा संवाद वाढून त्यांना योग्य वेळेत योग्य मार्गदर्शन मिळाले तर चांगले रोजगार मिळण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो हे लक्षात घेऊन राज्यभरात २८८ मतदारसंघात असे रोजगार मेळावे आयोजित केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात मेळावे यशस्वीपणे पार पाडले जात आहेत, असेही ते म्हणाले.

मान्यवरांनी केले व्यवसाय समुपदेशन

प्रेरणादायी मार्गदर्शन याविषयी मार्गदर्शक डॉ. दिनेश गुप्ता, रोजगाराच्या विविध संधी या विषयी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी संचालक सुरेश वांदिले, करिअर कसे निवडावे या विषयी श्रीमती प्रिया सावंत, व्यक्तीमत्व विकास या विषयी सुचिता सुर्वे तसेच स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन श्री. रोकडे यांनी केले. यावेळी विविध ३८ विविध संस्थांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर स्टॉल लावले होते.