मुंबई, 18 मे 2023
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांच्या नेतृत्वाखाली काल संध्याकाळी ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया पासून सागर परिक्रमेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ झाला. केंद्रीय मंत्री रुपाला यांनी आज महाराष्ट्रातील रायगड येथील करंजा जेट्टी येथे हितधारकांना संबोधित केले. आज आणि उद्या ते महाराष्ट्र आणि गोवा येथील सहा ठिकाणी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
करंजा जेट्टी येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड आणि ई-श्रम कार्डचे वाटप केले. तेथील स्थानिक समुदायाने रुपाला यांच्या आगमनानंतर त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.
सध्याच्या सरकारला देशातील मच्छीमार समुदायाच्या हितामध्ये किती स्वारस्य आहे ते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून दिसून येते, असे केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले. या कार्यक्रमाच्या तरतुदीत 20,000 कोटी रुपयांची लक्षणीय वाढ कशी झाली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. याशिवाय वेळोवेळी अतिरिक्त तरतुदी करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
रुपाला हे रत्नागिरी येथील दाभोळ मधील रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड जेट्टीला भेट देणार आहेत. भारतातील मासेमारी क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावते आणि लाखो मच्छिमार लोकांना उपजीविका प्रदान करते. भारत जगातील तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादन करणारा आणि दुसरा सर्वात मोठा मत्स्यपालन उत्पादक देश आहे. भारतातील नील क्रांतीने मच्छीमारांचे महत्व दिसून येते.
ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आणि आणि उपजीविकेच्या अधिक संधी निर्माण करण्यासाठी तसेच शाश्वत विकास उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने समग्र दृष्टिकोन स्वीकारला आहे.