मुंबई-देवेन्द्रजी, ५५१० मुली महाराष्ट्रातून बेपत्ता झाल्या आहेत,आपले गृहखाते करतेय काय ? असा थेट सवाल विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
महाराष्ट्र हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारधारेवर चालणारे राज्य असून मागील कित्येक वर्षांच्या राज्य सरकारच्या कारभारातून सिध्द झाले आहे. राज्यातील मुलींची बेपत्ता होण्याची वाढती संख्या ही चिंताजनक बाब असल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची टीका करत सरकारवर निशाणा साधला आहे.महाराष्ट्रात रोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत आहेत. तर जानेवारी ते मार्च 2023 राज्यातून सुमारे 5510 मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. जानेवारी 2023 या महिन्यात 1600 मुली तर फेब्रुवारी महिन्यात 1810 तर मार्च महिन्यात 2200 मुली बेपत्ता झाल्या आहेत.
अंबादास दानवे म्हणाले, दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली व महिला यांचे प्रमाण वाढत आहे. सदर बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र हे महिलांच्या सुरक्षेसाठी अग्रगण्य असलेले राज्य म्हणून गणले जाते. अशा राज्यात मुलीच महिला सुरक्षित नसतील तर सदर बाब राज्यासाठी चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी व्यक्त केली.
या प्रकरणी योग्य ती पावले उचलून महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी सूचना दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला व बाल विकास मंत्री यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.