Home Blog Page 1535

दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना राबविणार-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे दि.१९: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात राज्य शासनाची ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, मोरया गोसावी देवस्थान परिसर विकासासाठी निधी देण्यात येईल, असे यावेळी श्री. पाटील यांनी सांगितले.

विधानभवन येथे आयोजित बैठकीस ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, जिल्हा परिषद शाळा, रस्ते आणि अंगणवाड्यांच्या बांधकामाबाबत स्वतंत्र बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात येईल. शाळांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शाळांमध्ये स्वच्छतागृहाची व्यवस्था असेल याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेली गावे लक्षात घेता तेथील सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्यात आली आहे. शहर आणि ग्रामीण पोलीस दलाला वाहनांसाठी आवश्यक निधी देण्यात येत आहे. पोलिसांनी अद्ययावत साहित्याची मागणी केल्यास अधिकचा निधी देण्यात येईल, तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

इंद्रायणी मेडिसिटीबाबत आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल. जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्राप्त निधीतून कामांचे नियोजन वेळेवर करावे. दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळावी यासाठी महावितरणने आवश्यक कार्यवाही करावी. जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम पावसाळ्यापूर्वी करावे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने तोकड्या कपड्यांचा नियम घेतला मागे

तुळजापूर-श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात अंगप्रदर्शक कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला होता. पण प्रशासनाने अवघ्या काही तासांतच हा निर्णय मागे घेतला.श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये अंगप्रदर्शक कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना ‘ नो एन्ट्री’ करण्यात आली होती. यासंबंधीच्या नोटीसीचे फलक मंदिर परिसरात ठिकठिकाणी लावण्यात आले होते. देवीच्या दर्शनासाठी देशविदेशातून भाविक येतात. भाविकांनी दर्शनाला येताना कोणते कपडे परिधान करावेत यासंबंधीचा कोणताही नियम आजतागायत अस्तित्वात नव्हता. पण मंदिर प्रशासनाने बुधवारी एका नोटीसीद्वारे अंगप्रदर्शक कपडे घालून दर्शनासाठी येण्यास मनाई केली.

‘जे भाविक अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य, अशोभनीय (वेस्टर्न) तसेच हाफ पॅन्ट व बर्मुडा परिधान करून येतील, त्यांना श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही,’ असे या नोटीसीत नमूद करण्यात आले होते. या आदेशांची गुरुवारपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीही सुरू झाली होती. पण या प्रकरणी चौफेर टीकेची झोड उठल्यामुळे प्रशासनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला.

मंदिराची शालीनता अबाधित राखण्यासाठी भाविकांना अंगप्रदर्शक कपडे घालून न येण्यासंबंधीचा एक तोंडी निर्णय घेण्यात आला होता. पण रेकॉर्डवर असा कोणताही निर्णय नसल्याचे लक्षात आल्यानंतर असे कोणतेही निर्बंध लागू नसल्याचे प्रगटन आम्ही काढले, असे तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक सौदागर तांदळे यांनी गुरुवारी रात्री उशिरा स्पष्ट केले.

मंदिरात येताना भाविकांचा ड्रेसकोड काय असावा, याविषयी भाविकांना आवाहन करणारे असे फलक मंदिर परिसरात लावण्यात आले होते.

लंडनच्या 19 दिवसांच्या सहलीसाठी वानखेडे यांनी एक लाखांचाच दाखवला खर्च,वानखेडे यांचे मुंबईत चार फ्लॅट असल्याचा दावा

मुंबई-नार्कोटिक्स विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे चौकशांच्या फेऱ्यात सापडलेत. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने आपल्या अहवालात वानखेडेंवर गंभीर ठपका ठेवला आहे. वानखेडेंनी गत काही वर्षांत 6 परदेश दौरे केले. पण या दौऱ्यांचा खर्च त्यांनी नाममात्र दाखवून संबंधितांची दिशाभूल केली, असे समितीने म्हटले आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, समीर वानखेडे यांनी 2017 ते 2021 या पाच वर्षांमध्ये परिवारासह सहा परदेशी दौरे केले आहेत. यामध्ये युके, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीवसारख्या दौऱ्यांचा समावेश आहे. ५५ दिवसांहून अधिक दिवस परदेशांमध्ये घालवल्यानंतर केवळ 8.75 लाखांचाच हिशेब दाखवण्यात आला आहे. मात्र, एवढ्या पैशांमध्ये या सगळ्या देशांचा विमानखर्चही निघणे अवघड असल्याचा दावा चौकशी समितीने दाखल केलेल्या अहवालात करण्यात आला आहे.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या समीर वानखेडे यांचा पाय आरोपांच्या चिखलात रुतत चालल्याचे चित्र आहे.

एनसीबी अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विशेष चैाकशी समितीने वानखेडे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारासह अत्यंत गंभीर आरोप लावले आहेत.

यात त्यांच्या परदेशी दौऱ्यांसह दौऱ्यांमध्ये झालेला खर्च लपवण्याच्या प्रयत्नासह महागड्या घड्याळांच्या खरेदीच्या खर्चाचे उल्लेख करण्यात आले आहेत.

समीर वानखेडे यांनी ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला न अडकवण्याच्या बदल्यात २५ कोटींची रक्कम अभिनेता शाहरूख खान यांना मागितल्याचा मुख्य आरोप आहे.

समीर वानखेडे यांनी 2017 ते 21 या पाच वर्षांच्या काळात कुटुंबासह सहा परदेश वाऱ्या केल्या. युके, पोर्तुगाल, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका अशा ट्रीपचा समावेश असणाऱ्या दौऱ्यांचा कालावधी एकत्र केल्यास तो 55 दिवसांहून अधिक होतो. यासाठभ् वानखेडे यांनी केवळ 8.75 लाखांचा खर्च दाखवला आहे. जो वास्तविक खर्चापेक्षा खूपच कमी आहे. लंडनच्या 19 दिवसांच्या सहलीसाठी वानखेडे यांनी एक लाखांचाच खर्च दाखवला होता. तर तिथे ते एका नातेवाईकांकडे राहिल्याचे दाखविले होते. वानखेडे यांनी 17 लाख 40 हजारांचे रोलेक्स गोल्ड घड्याळ खरेदी केले होते. परंतू या घड्याळ्याची मुळ किंमत 22 लाख् 5 हजार एवढी आहे. एवढेच नाही तर वानखेडे यांचे मुंबईत चार फ्लॅट असल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.

आर्यन खानच्या ड्रग प्रकरणाची पूर्ण माहिती वरिष्ठांना होती असा आरोप सीबीआयने केला असून त्यासंदर्भातील संभाषणांचे पुरावेही सादर करण्यात आले आहेत.

२० रुपयात काढा २ लक्षाचा विमा

दैनंदिन धावपळीच्या जीवनात आयुष्य महत्वाचे आहे. अनावधाने अपघात झाल्यास  अशा वेळी पूर्ण कुंटुंबावर त्याचा परिणाम होतो. कुटुंबाची आर्थिक स्थिती खालवली असल्याने अशा वेळी प्रधानमंत्री सुरक्षा योजना अत्यंत लाभदायी ठरणार आहे. या योजनेचा विमा हप्ता केवळ 20 रुपये असून अपघातात पूर्णत: अपंगत्व आल्यास 2 लक्ष रुपये व आंशिक अपगंत्व आल्यास 1 लक्ष रुपये मिळतात. बॅक खातेधारकांनी आपल्या बँकेत साधा अर्ज करावा.  खात्यातून आपोआप ही विम्याची रक्कम वर्ग करण्यात येते. राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमात प्रत्येक बँकेत हा अर्ज भरुन घेण्याची सूचना आहे. जनतेने याचा लाभ घ्यावा.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना केंद्र शासनाची अपघात विमा योजना असून  मे 2015 पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा विमा हप्ता 13 रुपये होता त्यामध्ये वाढ करुन आता फक्त 20 रुपये करण्यात आला आहे.  भारताच्या फक्त 20 टक्के  लोकांजवळच कोणत्याना कोणत्या प्रकारचा विमा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या योजनेंतर्गत 11 लक्ष लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेची व्याप्ती वाढविण्याकरीता जास्तीत जास्त बँक खातेदारांनी यामध्ये सहभागी व्हावे हा मूळ ध्येय आहे.

विमा कोणास अनुज्ञेय याबाबत थोडक्‌यात माहिती : 18 ते 70 वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात, लाभार्थ्याचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. योजनेसाठी वार्षिक हप्ता 20 रुपये असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँकखात्यातून आपोआप वर्ग होईल, हप्त्यासाठी आर्थिक वर्षे 1 जून ते 31 मे असेल. प्रत्येक बँकेत या संदर्भातील अर्ज आहे. खाते असणाऱ्या प्रत्येकाने हा अर्ज करणे आवश्यक आहे.

वैशिष्ट्ये

  1. लक्ष्यगट – अपघात विमा न नोंदवलेले सर्व नागरिक
  2. वय व पात्रता – 18 ते 70 वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात, लाभार्थ्याचे बँकेत खाते असणे जरुरीचे आहे.
  3. हप्ता- योजनेसाठी वार्षिक हप्ता 20 रुपये असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँकखात्यातून आपोआप वर्ग होईल, हप्त्यासाठी आर्थिक वर्षे  1 जून ते 3 मे असेल.
  4. विमा लाभ – लाभार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला 2 लाख रुपये अर्थसाहाय्य मिळेल, लाभार्थ्याला अपघातामुळे पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लक्ष रुपये व आंशिक अपंगत्व आल्यास 1 लक्ष रुपये अर्थसाहाय्य दिले जाते .
  5. खाते ऑटो व डेबिट करण्याची सुविधा या योजनेमध्ये आहे. योजना न्यू इंडिया एश्योरेंस कंपनीशी संलग्नित आहे.
  6. व्यवस्थापन – योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी एल आय सी किंवा कोणत्याही विमा कंपनीत खाते उघडू शकतो.

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांमध्ये प्रत्येक बँकेने  हा  अर्ज भरुन घ्यावा. केवळ 20 रुपये खात्यातून कपात होणाऱ्या या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, आवाहन असे जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक मोहित गेडाम यांनी केले आहे.

सुनिलदत्त जांभुळे,

उपसंपादक,

जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर

प्लीज…बाप म्हणून मी तुमच्याकडे भीक मागतोय, शाहरुखने वानखेडेंना काय काय मेसेज केले? उच्च न्यायालयात चॅट सादर

मुंबई- आर्यन ड्रग्स केस प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी प्रादेशिक प्रमुख समीर वानखेडे यांनी शाहरुख खानसोबतचे चॅट कोर्टासमोर सादर केले आहे. यामध्ये शाहरुख खानने आर्यनला तुरुंगात न टाकण्याची विनंती वानखेडेंना केली आहे. समीर वानखेडे यांनी सीबीआयच्या कारवाईबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर 2021 रोजी धाड टाकली. तिथूनच आर्यन खानला अटक करण्यात आली. यानंतर आर्यन 26 दिवस पोलिस कोठडीत राहिल्यानंतर त्याची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली. आर्यनच्या विरोधात ठोस पुराव्याअभावी कोर्टाने त्याची 28 ऑक्टोबर रोजी जामिनावर सुटका केली होती.

“माझ्यावर सुडाच्या भावनेने कारवाई केली जात आहे. याआधीही माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यानंतरही पुरावे सापडले नाहीत. सीबीआयलाही पुरावे सापडणार नाहीत,” असा दावा वानखेडेंनी याचिकेतून केला आहे. आर्यनला सोडण्यासाठी वानखेडेंनी 25 कोटींची मागणी केल्याचा सीबीआयचा आरोप आहे.

शाहरुख खानने 3 ऑक्टोबर 2021 रोजी पहिला मेसेज केला… संपूर्ण संभाषण

समीर वानखेडे यांनी सांगितले की, शाहरुख खानने 3 ऑक्टोबर 2021 रोजी पहिल्यांदा मेसेज केला होता.

शाहरुख- समीर साहेब, मी तुमच्याशी काही मिनिटे बोलू शकतो का? मला माहित आहे की हे कायदेशीर नाही, परंतु एक वडील म्हणून मला तुमच्याशी बोलायचे आहे. तुम्ही मला दिलेल्या माहितीबद्दल मी तुमचे आभार मानावे तितके कमी आहे. मला आशा आहे की तो (आर्यन) असा व्यक्ती बनेल ज्याच्यावर तुम्हाला आणि मला अभिमान वाटेल.

समीर- एक बाप म्हणून मी तुमची परिस्थिती समजू शकतो. काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल.

शाहरुख- प्लीज माझ्या मुलाला घरी पाठवा. वडील म्हणून मी तुम्हाला विनंती करतो.

समीर- डिअर शाहरुख, कदाचित मी एक झोनल डायरेक्टरऐवजी एक मित्र म्हणून तुम्हाला ही परिस्थिती समजावून सांगू शकलो असतो.

शाहरुख- प्लीज माझ्या मुलाला घरी पाठवा. वडील म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. ही एका पित्याकडून एका पित्याला विनंती आहे. तुम्ही तुमच्या मुलांवर जितके प्रेम करता तितकेच मी माझ्या मुलांवर प्रेम करतो. समीर, प्लीज माझा विश्वास मोडू नका. अन्यथा माझा तुमच्यावरचा आणि व्यवस्थेवरचा विश्वास उडेल.

शाहरुख- प्लीज एकदा माझ्याशी बोला. मी एक वडील म्हणून तुझ्याशी बोलेन. कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही मला मदत करू शकता. मी सदैव तुमचा ऋणी राहीन.

वानखेडेंनी एक दिवसापूर्वी अधिकाऱ्यांसोबतच्या चॅटचा तपशील दिला, सीबीआयचा आरोप

समीर वानखेडे यांनी चॅट सादर केले आहे. त्यात ते आर्यन खान प्रकरणाबाबत आपल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. सीबीआयने वानखेडेंवर आरोप केला आहे की ते आपल्या अधिकाऱ्यांना न सांगता प्रकरणाचा तपास करत होते.

या प्रकरणासंदर्भात सीनियर ज्ञानेश्वर सिंह यांच्याशी झालेल्या चॅटचा तपशीलही न्यायालयात सादर करण्यात आला. आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील तपासाबाबत एनसीबीचे डीजी सत्यनारायण प्रधान, डीडीजी अशोक मुथा जैन आणि डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांना वेळोवेळी माहिती देत असल्याचे सांगितले. डीडीजी अशोक मुथा जैन यांनी समीरला आर्यन खानच्या रिमांडसाठी अधिक जोमाने लढा देण्याच्या सूचना दिल्या होत्या. अशोक यांनी यासाठी समीरला आणखी जादा कर्मचारी देण्याचेही बोलले होते.

सीबीआयचा आरोप आहे की वानखेडेंनी आर्यनला सोडण्यासाठी 25 कोटींची मागणी केली होती

CBI प्रकरणात वानखेडेंवर आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यासाठी त्यांनी के.पी.गोसावी नावाच्या व्यक्तीला जबाबदारी दिली होती. केपी गोसावी हा तोच व्यक्ती आहे ज्याने एनसीबीच्या ताब्यात असलेल्या आर्यन खानसोबत सेल्फी काढला होता.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार केपी गोसावीचा एनसीबीशी कोणताही संबंध नाही. सीबीआयचे म्हणणे आहे की, जेव्हा एनसीबीचे अधिकारी तेथे उपस्थित होते, तेव्हा गोसावीला आर्यनसोबत का ठेवण्यात आले.

‘पॉवर ग्रीड’च्या वाहिन्यांची दुरुस्ती पूर्ण ;पुणे, पिंपरी शहरासह चाकण एमआयडीसीचा वीजपुरवठा पूर्ववत

पुणे, दि. १९ मे २०२३: पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) अतिउच्चदाब ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरूवारी (दि. १८) रात्री ७.१० वाजता अचानक तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे चाकण एमआयडीसीसह पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे ३ लाख ५५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या अतिउच्चदाब वीजवाहिन्यांची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी (दि. १९) पहाटे १ वाजेपासून सकाळी ८.५५ वाजेपर्यंत सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला.

दरम्यान, या तांत्रिक बिघाडामुळे महापारेषणचे अतिउच्चदाब उपकेंद्र बंद पडल्याने तसेच भारव्यवस्थापन शक्य झाले नाही. त्यामुळे गुरुवारी (दि. १८) रात्री १० वाजेपासून पहाटे ३ वाजेपर्यंत कोथरूड, एसएनडीटी, औंध, बाणेर, शिवाजीनगर, बालेवाडी, बावधन, मॉडेल कॉलनी, पाषाण आदी भागांमध्ये एक तासांचे चक्राकार पद्धतीने विजेचे भारनियमन करावे लागले.  

याबाबत माहिती अशी की, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या शिक्रापूर ते तळेगाव अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिन्यांच्या चारपैकी दोन वाहिन्यांमध्ये गुरुवारी (दि. १८) रात्री ७.१० वाजता तांत्रिक बिघाड झाला. पाहणीमध्ये तळेगाव नजिकच्या करंजविहिरे गावाजवळ अतिउच्चदाबाची एक वाहिनी तुटून दुसऱ्या वाहिनीवर पडल्याचे दिसून आले. त्यानंतर रात्रीच अदानी कंपनी आणि महापारेषणचे अभियंता व कर्मचाऱ्यांकडून संयुक्तपणे या वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले.  

परंतु, या बिघाडामुळे महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही चाकण, २२० केव्ही चिंचवड, २२० केव्ही उर्से, २२० केव्ही चाकण, १३२ केव्ही चाकण, १३२ केव्ही खराडी या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तब्बल ३९६ मेगावॅट विजेचे वहन बंद पडले होते. परिणामी पुणे शहरातील प्रामुख्याने खराडी, वडगाव शेरी, विमाननगर, येरवडा, धानोरी तसेच पिंपरी गाव, चिंचवड, पुनावळे, वाल्हेकरवाडी, वाकड, ताथवडे, किवळे, रावेत, थेरगाव परिसर, संपूर्ण प्राधीकरण आणइ आकुर्डीमधील ५० टक्के भाग असा एकूण ३ लाख ५५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सोबतच चाकण एमआयडीसीमधील उच्च व लघुदाहबाच्या सुमारे ५ हजार औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला.

महापारेषण व महावितरणचे सर्व वरिष्ठ अभियंता सातत्याने एकमेकांशी संपर्कात होते. एकीकडे उन्हाळ्यामुळे वाढलेली विजेची मागणी व तांत्रिक बिघाडामुळे ३९६ मेगावॅट विजेचे थांबलेले वहन या प्रतिकूल परिस्थितीत भारव्यवस्थापनाद्वारे वीजग्राहकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरु होते. यामध्ये साधारणतः मध्यरात्री एक वाजता टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्यास प्रारंभ झाला. महापारेषण व महावितरणचे उपकेंद्र टप्प्याटप्प्याने सुरु होत गेले त्याप्रमाणे ग्राहकांचा वीजपुरवठा देखील सुरळीत होत गेला. आज सकाळी ८.५५ पर्यंत पॉवर ग्रीडच्या वीजवाहिन्यांमुळे खंडित झालेल्या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

बिबवेवाडीच्या अवघ्या ५ वर्षांच्या ‘दिव्यांक’ ची इंडिया बुकमध्ये नोंद 

उत्तम स्मरणशक्तीच्या बळावर न पाहता ‘डेक ऑफ कार्ड’ ओळखण्याचा विक्रम
पुणे – सध्या मोबाईल आणि टिव्हीच्या स्क्रीन टाईममुळे मुलांच्या डोळ्याबरोबर स्मरणशक्तीवर देखील परिणाम झालेला दिसत आहे. मात्र, यावर मात करीत पुण्यातील दिव्यांक जगताप याने वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी बुद्धिमत्ता आणि उत्तम स्मरणशक्तीच्या बळावर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदविला आहे. कमी वयात केवळ ५७ सेकंदात ५२ पत्ते न बघता ओळखण्याचा विक्रम त्याने केला आहे. तर अत्यंत कमी वेळात हा विक्रम केल्याने वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये देखील त्याची नोंद झाली आहे .

बिबवेवाडी येथे राहणारा दिव्यांक पुण्यातील क्लाइन मेमोरियल स्कूल ऑफ यूबीएस या शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकतो. दिव्यांकला स्मरणशक्तीचे विविध खेळ खेळण्याबरोबर पोहण्याची, सायकल चालविण्याची आवड आहे. मोठे झाल्यानंतर भारतीय प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न हा चिमुकला बघतो आहे. त्याचे वडील राहुल जगताप हे इंजिनियर आहेत. तिची आई आराध्या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते, तर गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिकविते. त्याचबरोबर मुलांच्या बुद्धीला चालना देणारे वर्ग देखील त्या घेतात.

आराध्याचे वडील राहुल जगताप म्हणाले, मुलांना नेहमी मोबईल किंवा टिव्ही बघण्यापेक्षा विविध कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. यासाठी आम्ही आमच्या दोन्ही मुलांना प्रोत्साहन देत असतो. दिव्यांक ची स्मरणशक्ती लहानपणापासून चांगली आहे. त्याला कोणतीही गोष्ट सांगितली तरी ती त्याला लक्षात राहत असे.

आराध्याची आई राधिका जगताप म्हणाल्या, दिव्यांकला नेहमी बुद्धीला चालना देणारे खेळ खेळायला आवडतात. म्हणून मी देखील त्याला ते खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. नुकताच माझ्या मुलीने देखील ‘बायनरी कोड’ ओळखण्याचा इंडिया बुक मध्ये विक्रम केला आहे. मुलांना योग्य मार्गदर्शन दिले तर त्यांना योग्य दिशा मिळते.

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरचे काम वर्षभरात पूर्ण करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १९ : कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाच्या काठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर उभारण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. कोल्हापूर या ऐतिहासीक शहराच्या वैभवात भर घालणारे हे सेंटर वर्षभरात तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार आदी उपस्थित होते.

राजाराम तलावाच्या जवळ तयार होणाऱ्या या कन्व्हेंशन सेंटरमध्ये २००० क्षमतेच ऑडीटेरीअम, बहुउद्देशीय हॉल, कॉन्फरन्स हॉल, आर्ट गॅलरी, ॲम्फीथिएटर आदी सुविधा असणार आहेत. राजाराम तलावामध्ये संगीत कारंजे, लाईट ॲण्ड साऊंड शो ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

स्थानिक आणि परिसरातील कलावंतासाठी आर्ट गॅलरी, ॲम्फीथिएटर हक्काचे व्यासपीठ होणार असून याठिकाणी शहर आणि परिसरातील छोटे व्यासायिक, उद्योजक यांना विविध विषयांवर प्रदर्शनासाठी केंद्र उपलब्ध होणार आहे. सेंटर निर्माण करतानाच त्याठिकाणी वृक्षरोपण करून त्याचे सुशोभीकरण करावे. त्याचबरोबर याभागात येणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेता पंचतारांकीत हॉटेलसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

या सेंटरसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचे बांधकाम एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. शहराच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारे सेंटर निर्माण करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ येथे भारत राखीव बटालियन क्र.३ ला जागा मंजूर करण्याबाबत बैठक घेण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनीअसा जागेवर जाऊन पाहणी करावी आणि लोकांचे हित तसेच भारत राखीव बटालीयनसाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधांबाबत चर्चा करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

जल्लीकट्टू, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्राणीप्रेमी नाराज

पुणे : राज्यांनी बनवलेले कायदे वैध ठरवत सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यत, जल्लीकट्टू आणि कंबाला (म्हशींच्या शर्यती) स्पर्धांचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे प्राण्यांवरील अत्याचार रोखण्यासाठी आता सामान्य माणसाने पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच शर्यतींचे आयोजन करताना आयोजकांनी वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध करण्याची व अत्याचार होणार नाहीत, याची काळजी घेण्याची मागणी पुण्यातील शाकाहार कार्यकर्ते व बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यासाठी लढा देणारे प्राणीप्रेमी डॉ. कल्याण गंगवाल यांनी केले.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “न्यायालयाचा हा निर्णय आम्हा सर्व प्राणीप्रेमींना नाराज करणारा व धक्कादायक आहे. असे असले तरी सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल स्वीकारावा लागेल. या संदर्भात आम्ही २००९ पासून लढा देत होतो. सत्र न्यायालयात, तसेच सर्वोच्च न्यायालयातही याआधीच्या प्रकरणात आम्ही जिंकलो होतो. मात्र, सर्वच राजकीय पक्षांकडून बैलगाडा शर्यतींचा राजकारणासाठी, मनोरंजनासाठी याचा उपयोग होत असल्याने राज्य सरकारने प्राणी संरक्षण कायद्यात सुधारणा करून सुधारित कायदा न्यायालयात सादर केला. न्यायालयाने काल या कायद्याना वैध ठरवत बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवली.”
“जल्लीकट्टू किंवा बैलगाडा शर्यतीत प्राण्यांवर खूप अत्याचार केले जातात. त्यांना स्टिरॉइड देणे, मारहाण करणे, घोड्यासोबत पळवणे, अंधाऱ्या खोलीत डांबणे, कानात मुंग्या सोडणे असे प्रकार होतात. शिवाय शर्यतीच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षाविषयक काळजी घेतली जात नाही. त्यामध्ये अनेकदा मानवी जीवितहानी होते. आजवर जवळपास ८१३ मृत्यू झाल्याची नोंद आहे. बैलांना जखमा होतात, पाय मोडतात. परिणामी, बैल शर्यती योग्य व शेती योग्य नसल्याचे कारण देऊन त्याला कसायाच्या ताब्यात दिले जाते. हा क्रूरपणा दुर्दैवी आहे. या शर्यती केवळ असुरी आनंद मिळवण्यासाठी आणि राजकारणाची पोळी भाजण्यासाठी वापरल्या जातात. तेव्हा यातील हिंसा लक्षात घेऊन आपण सामान्य नागरिकांनी हे रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असेही डॉ. गंगवाल यांनी नमूद केले.
प्राण्यांवरील जीवदयेसाठी गेली १०-१२ वर्षे आम्ही लढा देत आहोत. आमच्यासोबत अहमदनगर येथील अनिल कटारिया हेही या लढ्यात सहभागी होते. लाखो रुपयांचा खर्च या लढ्यासाठी झाला आहे. पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्सने (पेटा) सर्वोच्च न्यायालयात अखेरपर्यंत बाजू लावून धरली. मात्र, राजकीय बाजू वरचढ ठरली आणि बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला. याबाबात आम्ही जनजागृती करणार असून, कायदेशीर लढा देण्याबाबत पुनर्विचार करणार आहोत, असेही डॉ. गंगवाल म्हणाले.

कर सहायक पदाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी प्रसिद्ध

मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२२ मधील कर सहायक पदाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी / पात्रता (Qualifying) स्वरुपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (परीक्षोत्तर) (अ.प.) उप सचिव यांनी कळविले आहे.

0000

काढून टाका ती फ्लेक्सची पत्रावळी …असे म्हणतील काय भाजपचे नड्डा आणि फडणवीस ?

भाजपाच्या अधिवेशनासाठी पुण्याचे विद्रूपीकरण कशाला ? संजय मोरेंचा सवाल

फ्लेक्स च्या अतिरेकाने पुणे बेजार

भाजपचे अधिवेशन आणि पुण्यात पाण्याची मारामार-भाजपचे अधिवेशन पुण्यात होत असताना एकीकडे फ्लेक्सच्या माऱ्याने ,वाढत्या उकाड्यात हवा अडविण्याचे काम केलेले असताना दुसरीकडे पुण्यात पाणी कपातीला प्रारंभ झाल्याने पुण्यात पाण्याची मारामार होती .पण भाजपच्या नेत्यांनी यावर ब्र काढला नाही.

पुणे-पक्षाची संघटनात्मक बांधणी जरूर जोमाने करावी त्यांना ती गरज आहेच ,पण त्यासाठी पुणेकरांना वाहतुकीच्या कोंडीत ढकलून , पुण्याला विद्रूप कशाला करता आहात ? असा सवाल शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी केला आहे. विशेष म्हणजे या विद्रुपीकरण करण्यास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष , उपमुख्यमंत्री अशा कोणीच कसा आक्षेप घेतला नाही ? कि त्यांचा यास पाठींबा होता अशी विचारणा मोरे यांनी केली आहे.

मोरे म्हणाले,’ मुंबईहून येताना जंगली महाराज रोडने जात होतो. रस्त्याचे एवढे विद्रुपिकरण झालेले कधी पाहिले नव्हते. भाजप म्हणजे त्यांनी काहीही केले कि ते नियमाप्रमाणे, इतर पक्षांनी केले कि नियमबाह्य ठरवले जाते. आणि त्वरीत कारवाई करून 3’×2′ फूटचा जरी फ्लेक्स लावला तरी प्रशासनावर दबाव टाकून काढला जातो. भाजपची कार्यकारी समितीची पुण्यात बैठक आहे. असावी, का असू नये ? प्रत्येक पक्ष आपल्या संघटनात्मक बांधणीसाठी हे करतच असतो. पण भाजपची कार्यकारी समिती बैठक म्हणजे काही वेगळे आहे का ? एवढी फ्लेक्सबाजी करून पुण्याचे विद्रुपिकरण केले आहे. पुणेकरांचे भले करण्याचा काही विषय तर या बैठकीत नाही. मग पुणेकरांनी हे विद्रुपिकरण का सहन करायचे ? भाजपचे राष्टीय अध्यक्ष पुण्यात येत आहेत तर त्यांचे हे स्वागत म्हणायचे कि एवढ्या मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावणारे अध्यक्षांना आपली ओळख याद्वारे करून देतात कि काय ? असा प्रश्न पुणेकरांना पडल्याशिवाय राहणार नाही. कार्यकारी समितीमधे पक्षांतर्गत विषय असणार .. पुणे शहराच्या विकासाचे या बैठकीत काही देणे घेणे नाही. आधीच विनाकारणाच्या अतिविकासाचा पुणेकर त्रास सहन करत आहेत. नको तो विकास आणि नको ते काँक्रिटीकरण अस पुणेकर म्हणतायत. यात आणखी वेगळी भर या फ्लेक्समुळे शहराच्या झालेल्या विद्रुपिकरणाची … या कार्यकारी समितीच्या बैठकीमधे अध्यक्षांनी सर्व फ्लेक्सधारकांची कानउघडणी करावी म्हणजे बैठक घेतल्याचे काहीप्रमाणात सार्थक होईल. आणि पुणेकर नागरीकांची शहर विद्रुपिकरण झालेले बघण्यापासून सुटका होईल.असेही मोरे यांनी म्हटले आहे…

यंदा मुंबई ची होणार नाही तुंबई … मुख्यमंत्र्यांनी तपासली नाल्यांची सफाई

मुंबई, दि. 18 : मुंबईतील सुमारे २२०० किमी लांबीच्या नाल्यांची सफाई व्यवस्थित आणि खोलपर्यंत केल्यास यंदा पावसाळ्यात पाणी साचण्यापासून मुंबईकरांना होणारा त्रास वाचेल. त्यामुळे किती मेट्रीक टन गाळ काढला यापेक्षा मुंबईत पाणी कुठे तुंबणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा प्रत्यक्ष जागेवर जात आढावा मुख्यमंत्री श्री.  शिंदे यांनी घेतला. दुपारी तीन वाजता भर उन्हात सुरू झालेला हा पाहणी दौरा सायंकाळी सहाच्या सुमारास वरळी येथे संपला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तो यावर्षी करावा लागू नये, याकरिता नाले सफाई चांगली झाली पाहिजे, नाल्यांचे खोलीकरण मोठ्या प्रमाणावर करावे, असे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. किती मेट्रीक टन गाळ काढला यापेक्षा नाल्यांचे खोलीकरण कठीण खडक लागेपर्यत करावे, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. जे अधिकारी चांगले काम करतील त्यांचा सन्मान केला जाईल. कर्तव्यात जे कसूर करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

नाल्यांचे खोलीकरण झाल्यावर त्यांची वहन क्षमता वाढेल. त्याचबरोबर ज्या ठिकाणी दरवर्षी पाणी साचते, त्यांची माहिती अधिकाऱ्यांना असते त्यामुळे अशा जागी नोडल अधिकारी नेमून कंत्राटदाराकडून चांगल्या पद्धतीने काम करुन घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. वरळी येथील लव्हग्रोव्ह उदंचन केंद्राच्या ठिकाणी नाल्यांना फ्लड गेट लावण्यात आले आहेत. जेणेकरून भरतीच्या वेळी समुद्रातील पाणी नाल्यांमध्ये शिरणार नाही.

अशाच प्रकारे फ्लड गेट आणि वेगाने पावसाचे पाणी समुद्रात फेकणाऱ्या पंपाची संख्या वाढवावी असे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रेल्वे हद्दीतील नाल्यांचीदेखील चांगल्या पद्धतीने सफाई झाली पाहिजे जेणेकरून रेल्वे रुळांवर पाणी साचणार नाही. याचीदेखील दक्षता घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला सांगितले.

दुपारी तीनच्या सुमारास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे वांद्रे (पूर्व) परिसरातील मिठी नदी येथे आगमन झाले. तेथून त्यांच्या पाहणी दौऱ्यास सुरूवात झाली. त्यानंतर वांद्रे कुर्ला संकुलातील भारत नगर येथे वाकोला नदीची पाहणी केली. त्या पाठोपाठ दादरमधील प्रमोद महाजन उद्यानातील साठवण टाकीचे बांधकाम, वरळीतील लव्हग्रोव उदंचन केंद्र या ठिकाणी भेट देऊन नालेसफाई तसेच पावसाळ्यात पाणी साचणार यासाठीच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सदा सरवणकर, महापालिका आयुक्त आय. ए. चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासु, आशीष शर्मा, महापालिका उपायुक्त, मुख्य अभियंता आदी अधिकारी उपस्थित होते.

आप ची राज्य समिती बरखास्त, नव्याने संघटन बांधणी होणार!

पुणे-आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य कमिटी व विभागीय कमिटी या बरखास्त करण्यात आलेल्या आहेत.
नुकत्यातच राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेल्या आम आदमी पार्टीने आता 2024 च्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने पावले उचलत पूर्णतः नव्याने संघटन बांधणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.आपचे राष्ट्रीय सचिव खासदार डॉक्टर संदीप पाठक यांनी आज तशी घोषणा केली आहे. तसेच थेट राष्ट्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनात नव्याने कमिटी तयार करण्यात येतील असे या पत्रकात म्हटले आहे.

दिल्ली, पंजाब, गुजरात नंतर अनेक राज्यात पसरण्याचा आम आदमी पार्टी चा प्रयत्न असून महाराष्ट्रातही आप ला मोठी संधी आहे असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे आता आप च्या पुढच्या वाटचालीकडे सर्व पक्षांचे लक्ष आहे.

‘ आम आदमी पार्टी महाराष्ट्रात तळागाळापर्यंत एक मजबूत आणि सशक्त संघटना बांधणी करणार आहे म्हणून आज हे पहिले पाऊल उचलण्यात आले आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व जाती, धर्म आणि पंथाच्या लोकांना समाविष्ट करून एक सशक्त राज्य समिती बनवण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक वस्तीत, गावात आणि बूथ पातळी पर्यंत आम आदमी पार्टीचे कार्यकर्त्यांचे जाळे उभारले जाईल. हे एक अत्यंत महत्वाचे पाऊल आहे. महाराष्ट्रातील बदलणाऱ्या राजकारणात आप वेगाने पुढे वाटचाल करत आहे. महाराष्ट्रातील सर्व बुद्धिवान, सामाजिक व राजकीय लोकांना आम आदमी पार्टीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध होईल. ‘ असे आप चे राज्य सह प्रभारी गोपाल इटालिया यांनी म्हंटले आहे.

डॉ.दाभोलकर खुनातील सूत्रधार प्रकरणात तपास बंद का ? सीबीआयला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

पुणे-अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाच्या प्रकरणातील तपास बंद करण्याच्या सीबीआयच्या निर्णयाच्या विषयी गुरवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या विषयी मुक्ता आणि हमीद दाभोलकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टाने सीबीआयला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली.न्या. संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती अहसुंद्दिन अमनउल्लाह यांच्या समोर झालेल्या सुनावणीमध्ये ॲड.आनंद ग्रोव्हर आणि ॲड. किशन कुमार यांनी ॲड. अभय नेवागी यांच्यामार्फत तयार केलेल्या याचिकेवर बाजू मांडली.

डॉ नरेंद्र दाभोलकर खून खटल्यात जरी संशयित आरोपींच्या वरती पुणे कोर्टात ट्रायल चालू आहे .सादर याचिका ही पुणे कोर्टातील खटल्याच्या देखरेखीसाठी नसून ह्या खुनाचा सूत्रधार हा फरार असल्याविषयी आहे. हे याचिका कर्त्यांच्या वकिलांचा मार्फत सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आले.डॉ. दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी यांचे खून हे एका व्यापक कटाचा भाग असल्याचे अनेक पुरावे समोर आल्याचे याचिकेमार्फत मांडण्यात आले आहे. तसेच या मागचे सूत्रधार फरार असेपर्यंत विवेकवादी विचारवंतांच्या जीवाला असलेला धोका कायम आहे हे याचिकाकर्त्यां मार्फत मांडण्यात आले आहे. या याचिकेवर न्यायालयाने सीबीआयला त्याच्या तपास बंद करण्याच्या भूमिके विषयी नोटीस बजावली आहे.

पुणे- अहमदनगर महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्देश

पुणे, दि. १८: पुणे- अहमदनगर महामार्गावरील वाढलेल्या रहदारीमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी खराडी चौक ते शिरुर घोडनदी पूल या मार्गावर विविध उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यंत्रणांना दिले आहेत.

पुणे- अहमदनगर महामार्ग हा पुणे जिल्ह्यास अहमदनगर व मराठवाडा तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. या रस्त्याची क्षमता ४० हजार वाहने (पॅसेंजर कार युनिट- पीसीयु) इतकी असताना प्रत्यक्षात ७५ हजार वाहने दररोज धावतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाणे वाढले असून नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

यावर उपाययोजना सुचविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष डॉ. देशमुख यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना महामार्गाची संयुक्त पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. संयुक्त पाहणीनंतर सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

त्यानुसार वाघेश्वर पार्किंग येथे वाहतूक नियंत्रण सिग्नल बसविणे, वाघेश्वर मंदिर ते वाहनतळ चौक दरम्यान रस्ते दुभाजकांना रंग लावणे, रिफ्लेक्टर, कॅटआय, रेलींग बसवणे, रस्त्यांवर पट्‌टे मारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पदपथापरील अतिक्रमणे हटवणे, अनाधिकृत फेरीवाले, टपरीवाले, फळविक्रेत्यांना मज्जाव करण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे. वाघोली चौकात प्रवासी बसेसना रस्त्यावर थांबण्यास मज्जाव करुन त्यांच्यासाठी सुयोग्य बसथांबा उपलब्ध करुन द्यावा अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

बीजेएस चौक, वन स्टॉप फर्निचर मॉल, सोमेश्वर पार्क फ्लॅश आपले घर, आय व्ही इस्टेट, केसनंद फाटा येथे विकफिल्ड कंपनी व जगताप डेअरी येथील महामार्गाचे वळण व उतार, केसनंद फाटा चौक, थेऊर फाटा, पुरेा फाटा, कोरेगाव भीमा, सणसवाडी चौक, शिक्रापूर, चाकण चौक, वेळू नदीवरील पूल, कोंढापुरी, रांजणगाव गणपती मंदीर, राजमुद्रा चौक, यश ईन चौक, शिरुर बायपास चौक आदी ठिकाणी विविध उपाययोजना कराव्यात असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पदपथावरील, रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे, आवश्यक तेथे ट्रॅफिक सिग्नल्स बसविणे, दिशादर्शक फलक व नो पार्किंग सूचनाफलक बसवणे, दुभाजकांची दुरुस्ती, अनावश्यक छेद दुभाजक बंद करणे, ब्लिंकर्स, वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रंबलर्स बसविणे, पादचाऱ्यांसाठी रस्ता क्रॉसिंग, झेब्रा क्रॉसिंगची व्यवस्था करणे, गतिरोधक बसविणे, उच्च प्रकाशव्यवस्थेसाठी दिवे बसविणे आदी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग पोलीस, परिवहन विभाग, महावितरण, पीएमपीएमएल, पीएमआरडीए, एमआयडीसी, संबंधित ग्रामपंचायती आदी सर्वांनाच याअनुषंगाने उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत.

या महामार्गावर वाहनांच्या वेगाचे संनियंत्रण करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी स्पीडगन बसविण्यात येणार आहेत. प्रमुख गावातून जाणाऱ्या रस्त्यांवरील दुभाजकांवर रेलिंग बसविण्यात येणार आहेत. पोलीस विभागाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे प्रमाण वाढवावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

अपघातमुक्त महामार्गासाठी नागरिकांच्या सूचनांचे स्वागत
हा महामार्ग अपघातमुक्त करण्यासाठी नागरिकांच्या सूचनांचाही गांभिर्याने विचार करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले असून नागरिकांनी आपल्या सूचना rto.12-mh@gov.in या ई-मेलवर पाठवाव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे.