मुंबई- आर्यन ड्रग्स केस प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी प्रादेशिक प्रमुख समीर वानखेडे यांनी शाहरुख खानसोबतचे चॅट कोर्टासमोर सादर केले आहे. यामध्ये शाहरुख खानने आर्यनला तुरुंगात न टाकण्याची विनंती वानखेडेंना केली आहे. समीर वानखेडे यांनी सीबीआयच्या कारवाईबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर 2021 रोजी धाड टाकली. तिथूनच आर्यन खानला अटक करण्यात आली. यानंतर आर्यन 26 दिवस पोलिस कोठडीत राहिल्यानंतर त्याची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली. आर्यनच्या विरोधात ठोस पुराव्याअभावी कोर्टाने त्याची 28 ऑक्टोबर रोजी जामिनावर सुटका केली होती.
“माझ्यावर सुडाच्या भावनेने कारवाई केली जात आहे. याआधीही माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यानंतरही पुरावे सापडले नाहीत. सीबीआयलाही पुरावे सापडणार नाहीत,” असा दावा वानखेडेंनी याचिकेतून केला आहे. आर्यनला सोडण्यासाठी वानखेडेंनी 25 कोटींची मागणी केल्याचा सीबीआयचा आरोप आहे.
शाहरुख खानने 3 ऑक्टोबर 2021 रोजी पहिला मेसेज केला… संपूर्ण संभाषण
समीर वानखेडे यांनी सांगितले की, शाहरुख खानने 3 ऑक्टोबर 2021 रोजी पहिल्यांदा मेसेज केला होता.
शाहरुख- समीर साहेब, मी तुमच्याशी काही मिनिटे बोलू शकतो का? मला माहित आहे की हे कायदेशीर नाही, परंतु एक वडील म्हणून मला तुमच्याशी बोलायचे आहे. तुम्ही मला दिलेल्या माहितीबद्दल मी तुमचे आभार मानावे तितके कमी आहे. मला आशा आहे की तो (आर्यन) असा व्यक्ती बनेल ज्याच्यावर तुम्हाला आणि मला अभिमान वाटेल.
समीर- एक बाप म्हणून मी तुमची परिस्थिती समजू शकतो. काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल.
शाहरुख- प्लीज माझ्या मुलाला घरी पाठवा. वडील म्हणून मी तुम्हाला विनंती करतो.
समीर- डिअर शाहरुख, कदाचित मी एक झोनल डायरेक्टरऐवजी एक मित्र म्हणून तुम्हाला ही परिस्थिती समजावून सांगू शकलो असतो.
शाहरुख- प्लीज माझ्या मुलाला घरी पाठवा. वडील म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. ही एका पित्याकडून एका पित्याला विनंती आहे. तुम्ही तुमच्या मुलांवर जितके प्रेम करता तितकेच मी माझ्या मुलांवर प्रेम करतो. समीर, प्लीज माझा विश्वास मोडू नका. अन्यथा माझा तुमच्यावरचा आणि व्यवस्थेवरचा विश्वास उडेल.
शाहरुख- प्लीज एकदा माझ्याशी बोला. मी एक वडील म्हणून तुझ्याशी बोलेन. कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही मला मदत करू शकता. मी सदैव तुमचा ऋणी राहीन.
वानखेडेंनी एक दिवसापूर्वी अधिकाऱ्यांसोबतच्या चॅटचा तपशील दिला, सीबीआयचा आरोप
समीर वानखेडे यांनी चॅट सादर केले आहे. त्यात ते आर्यन खान प्रकरणाबाबत आपल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. सीबीआयने वानखेडेंवर आरोप केला आहे की ते आपल्या अधिकाऱ्यांना न सांगता प्रकरणाचा तपास करत होते.
या प्रकरणासंदर्भात सीनियर ज्ञानेश्वर सिंह यांच्याशी झालेल्या चॅटचा तपशीलही न्यायालयात सादर करण्यात आला. आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील तपासाबाबत एनसीबीचे डीजी सत्यनारायण प्रधान, डीडीजी अशोक मुथा जैन आणि डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांना वेळोवेळी माहिती देत असल्याचे सांगितले. डीडीजी अशोक मुथा जैन यांनी समीरला आर्यन खानच्या रिमांडसाठी अधिक जोमाने लढा देण्याच्या सूचना दिल्या होत्या. अशोक यांनी यासाठी समीरला आणखी जादा कर्मचारी देण्याचेही बोलले होते.
सीबीआयचा आरोप आहे की वानखेडेंनी आर्यनला सोडण्यासाठी 25 कोटींची मागणी केली होती
CBI प्रकरणात वानखेडेंवर आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यासाठी त्यांनी के.पी.गोसावी नावाच्या व्यक्तीला जबाबदारी दिली होती. केपी गोसावी हा तोच व्यक्ती आहे ज्याने एनसीबीच्या ताब्यात असलेल्या आर्यन खानसोबत सेल्फी काढला होता.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार केपी गोसावीचा एनसीबीशी कोणताही संबंध नाही. सीबीआयचे म्हणणे आहे की, जेव्हा एनसीबीचे अधिकारी तेथे उपस्थित होते, तेव्हा गोसावीला आर्यनसोबत का ठेवण्यात आले.